Home Blog Page 2942

‘फनी’ चक्रीवादळ ओडिशात धडकणार; लाखोंचे स्थलांतर

0

भूवनेश्वर –
१९९९च्या सुपर चक्रीवादळानंतरचे सर्वांत विध्वंसक असणारे फनी वादळ आज, शुक्रवारी ओडिशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार राज्याच्या समुद्रकिनाऱ्याच्या आसपास राहणाऱ्या सुमारे लाखो नागरिकांना तेथून स्थलांतरित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या वादळाचा सामना करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.

ओडिशासह आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना ‘फनी’चा फटका बसण्याचा अंदाज आहे. ओडिशातील पुरीनजीकच्या किनारी शुक्रवारी सध्याकाळी सुमारे ताशी १७० ते १८० किमी वेगाने हे वादळ धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वादळाचा वेग ताशी २०० किमीपर्यंतही जाऊ शकतो, असे हवामानतज्ज्ञांनी म्हटले आहे. वादळा सर्वाधिक फटका बसणाऱ्या ओडिशातील एकूण १३ जिल्ह्यांमधील सुमारे साडेअकरा लाख नागरिकांना फनीचा धोका असून, त्यांना सुरक्षितस्थळी हसवण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘फनी’च्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. यात त्यांनी या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. दुसरीकडे नागरी हवाई उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी सर्व संबंधित विमानतळ प्राधिकरणांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

‘एनडीआरएफ’ची ८१ पथके तैनात

‘फनी’च्या तडाख्याचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती कृती दलाची (एनडीआरएफ) ८१ पथके तैनात करण्यात आली आहेत. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागांत जवळपास ५० पथक यापूर्वीच सज्ज करण्यात आली आहेत, तर अन्य ३१ पथकेही तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये चार हजारहून अधिक विशेष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असे ‘एनडीआरएफ’चे प्रमुख एस. एन. प्रधान यांनी सांगितले.
‘फनी’च्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांत सुमारे ९५ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द किंवा अन्य मार्गांवर वळवण्यात आलेल्या गाड्यांतील प्रवाशांनी निर्धारित वेळेनंतर तीन दिवसांत पैशाची मागणी केल्यास त्यांना पूर्ण परतावा दिला जाईल, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. रेल्वेने बुधवारी ८१ गाड्या रद्द केल्या होत्या.

‘अप्पलाऊड’ स्वयंसेवी संस्थेला ‘राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार’

0
संस्थेच्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या सबलीकरणासाठी योगदान
पुणे :’अप्पलाऊड’ स्वयंसेवी संस्थेला ‘राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तृतीयपंथीयांच्या सबलीकरणासाठी संस्थेच्या अनुकरणीय योगदानासाठी ‘असोसिएशन ऑफ इंडियन जर्नालिस्ट’ च्या वतीने नुकताच हा गौरव केला, अशी माहिती संस्थेचे संस्थापक रिदम वाघोलीकर यांनी पत्रकाद्वारे दिली.
हा कार्यक्रम नाशिक येथे पार पडला. या गौरव कार्यक्रमांतर्गत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि कलाकार अभिजित खांडेकर यांना देखील सन्मानित करण्यात आले.
तृतीयपंथीयांच्या समस्या आणि सबलीकरणासाठी ‘अप्पलाऊड’ ही संस्था रिदम वाघोलीकर यांनी सुरु केली आहे. तृतीयपंथी कार्यकर्त्या श्री गौरी सावंत या संस्थेच्या अध्यक्ष तर संगीता शेट्ये सचिव, प्रतीक रोकडे खजिनदार आणि राहुल कोटगळे हे संपर्क प्रमुख आहेत.
तृतीयपंथींच्या समोरील शैक्षणिक आव्हाने, समस्या आणि संक्रमणासाठी उपाय योजना हे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेऊन ही संस्था स्थापन करण्यात आल्याचे , संस्थापक रिदम वाघोलीकर यांनी सांगितले.
‘अप्पलाऊड’ संस्थेच्या माध्यमातून तृतीयपंथी समाजाला सक्षम, प्रेरित करणे आणि त्यांना सामान्य जीवन जगण्यास मदत करत आहे. तसेच ही स्वयंसेवी संस्था त्यांना सुशिक्षित करणे, सामाजिक स्वीकृतीचा हक्क मिळवून देणे, विविध कंपन्या आणि तृतीयपंथी यांच्यातील दुवा होऊन त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे कार्य करत आहे. तसेच तृतीयपंथी आणि समाज यांच्यात सामाजिक बांधिलकी निर्माण होण्याकरिता संस्था विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे, असे तृतीयपंथी कार्यकर्त्या श्री गौरी सावंत यांनी माहिती देताना सांगितले.

अभयांच्या संघर्ष कहाण्यांनी उपस्थितांचे डोळे पाणावले

वंचित विकास संस्थेच्या अभया मैत्री गटातर्फे परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या महिलांचा सन्मान
पुणे : निर्भयपणे स्मशानात काम करणाऱ्या मालतीताई… स्वतःची किडनी नवऱ्याला देऊन रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारी एकता… खोट्या गुन्ह्यात नवऱ्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या सोनालीताई… दोन महिन्यात जवळची सहा माणसे गमावल्यानंतर पुन्हा उभ्या राहणाऱ्या संध्याताई… घरकाम करून, मोलमजुरी करून आपल्या पोटाच्या मुलांना वाढवणाऱ्या आणि संघर्षाची ज्योत तेवत ठेवून आयुष्य प्रकाशमय करणाऱ्या अभयांच्या संघर्षकहाण्यांनी उपस्थितांचे डोळे पाणावले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर येताना अभयांना भरून येत होते.
निमित्त होते, वंचित विकास संस्थेच्या अभया मैत्री गटातर्फे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उभ्या राहणाऱ्या १६ स्त्रियांचा ‘अभया पुरस्कार‘ देऊन सन्मान सोहळ्याचे. अभया पुरस्काराचे हे पाचवे वर्ष होते. कीर्तनकार, शाहिरा प्रा. संगीता मावळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी शेटे यांच्या हस्ते सेवासदन शाळा येथे या पुरस्कारांचे वितरण झाले. प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार उद्धव भडसाळकर, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर, संचालिका सुनीता जोगळेकर, मीनाताई कुर्लेकर, मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले आदी उपस्थित होते.
 
परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी स्मशानात चिता रचण्याचे काम करणाऱ्या मालतीताई माझिरे, मनोरुग्ण-व्यसनी जोडीदारापासून वेगळे होत जिद्दीने मुलींना घडवणाऱ्या वर्षा तिखे, पती सोडून गेल्यानंतर घरकाम करून मुलींना वाढवणाऱ्या संगीता चांदणे, सासरच्या छळाला कंटाळून घर सोडल्यानंतर पाणीपुरीच्या गाडीवर धाडसाने उभे राहून मुलीला उच्चशिक्षित करणाऱ्या पूजा देसाई, नवऱ्याने फसवल्यानंतर एकट्या पडलेल्या पण पुन्हा जिद्दीने उभ्या राहिलेल्या विद्या वाईकर, अंथरुणाला खिळलेल्या, निराधार, अंध अपंगांची माय झालेल्या ऍड. प्रीती वैद्य, पती बेपत्ता झाल्यानंतर वडिलांच्या आधाराने पोटच्या मुलीला घेऊन स्वाभिमानाने जगणाऱ्या निर्मला थोरात, दोन महिन्यात पाठोपाठ जवळची सहा माणसे गमावल्याचे दुःख उराशी घेऊन सहा वर्षाच्या नातीबरोबर रमणाऱ्या संध्या हुलकोपकर, पतीच्या निधनानंतर अनुवाद, घरगुती कामे करून मुलांना उच्च पदावर पोहोचवणाऱ्या अनुराधा काळे, नवऱ्याने घराबाहेर काढल्यानंतर आणि सावत्र आईने नाकारल्यानंतर दोन मुलांना घेऊन संघर्ष करणाऱ्या मनीषा भोसले, वस्तीतील गुंडाच्या त्रासापासून मुली-महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणारी किरण पवार, सासरकडून नाकारल्यानंतर आयुष्यभर स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या रंजिता आरेकर, खोट्या गुन्ह्यात नवऱ्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर मोलमजुरी करून तीन मुलांना वाढवणाऱ्या सोनाली कांबळे, कौटुंबिक अडचणींवर मात करीत सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या विनया लेले, नवऱ्याला स्वतःची किडनी देऊन उभे करणारी आणि रिक्षा चालवून घर चालवणारी एकता सोनावणे आणि हातावर पोट असणाऱ्या जनता वसाहतीत सामाजिक काम उभारणाऱ्या संध्या बोगाम्मा यांना यंदा अभया पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी बोलताना प्रा. संगीता मावळे म्हणाल्या, “प्रत्येकीचे आयुष्य जिद्दीने, संघर्षाने भरलेले आहे. या सगळ्यांची कहाणी प्रेरणादायी, तर आहेच पण प्रत्येकीवर एक सिनेमा होईल अशी आहे. आयुष्यात आलेल्या आव्हानांचा सामना करून ताठ मानेने उभे राहण्याचा त्यांचा प्रयत्न जगण्याचा अर्थ सांगणारा आहे. त्यांचा संघर्ष पाहिल्यानंतर आपले आयुष्य फारच सुलभ असल्यासारखे वाटू लागले आहे.”
नंदिनी शेटे म्हणाल्या, “येथे पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या प्रत्येक स्त्रीची कथा डोळ्यात पाणी आणणारी आहे. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत ताठ मानेने जगणाऱ्या या अभयांना भेटून मलाही जगण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.” सूत्रसंचालन देवयानी गोंगले यांनी केले. मीनाताई कुर्लेकर यांनी अभया मैत्री गटाविषयी सांगितले. मिनाक्षी नवले यांनी पुरस्कारार्थींच्या संघर्षाचा आढावा घेतला.

स्मशानभूमीतील कामगारांचा सन्मान

पुणे –  महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त कुसुमवात्सल्य  फाउंडेशन तर्फे स्मशानभूमीतील कामगारांचा जाहीर सन्मान व कुसुमवात्सल्य फाउंडेशन या संस्थेचे उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.  स्मशानभूमीतील काम करणाऱ्या दुर्लक्षित राहिलेल्या कामगाराला जगण्याचा सन्मान मिळावा, कामगारांच्या हिताचे रक्षण व संवर्धन ही काळाची गरज आहे, परंतु आज कामगार वर्ग सेवा सुविधांपासून वंचित राहिला, अशा कामगारांच्या पाठीशी कुसुमवात्सल्य फौंडेशन नेहमीच उभी राहील असे मत संस्थेच्या संस्थापिका वैशाली पाटील यांनी व्यक्त केले.
कुसुमवात्सल्य फाउंडेशनच्या वतीने कात्रज तलाव येथील स्मशान भूमीतील ‘कामगारांचा सन्मान’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्मशान भूमीतील 42 महिला, पुरुष कामगार व एका हिंदू मुस्लिम जोडप्याचा भेटवस्तू, मिठाई आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. सर्व कामगारांच्या डोळ्यात आनंदाश्रु आले. यावेळी महाराष्ट्र राज्य करागृह पोलीस महासंचालक डॉ विठ्ठलराव जाधव, शांतिदूत फाऊंडेशनच्या अध्यक्षा विद्याताई जाधव, नगरसेविका मनीषा कदम, नगरसेविका अमृता बाबर, शिरीष मोहिते, किरण गहिवरकर, राजाभाऊ कदम, उद्योजिका प्रीती काळे, ज्योती देशकर, दीपा परब, महेश धाडवे पाटील, मनोज मांगडे, यशवंत पाटील, योगिता पाटील, पूजा पाटील, जयप्रकाश पाटील, राधिका नगरे, वर्षा गवते, महेंद्र पाटील, तानाजी दुधाने, डॉक्टर बावसकर, राजाभाऊ पानगावे, सागर घाम, भूषण पाटील, यशवंत माझिरे, अशोक रायकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक वैशाली पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन किरण गहिवरकर यांनी केले.

मे महिन्याची सुट्टी (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

0

एप्रिल महिना सुरू झाला की शेवटचा पेपर कधी एकदाचा संपतोय आणि शाळेला सुट्टी कधी पडतेय, याचेच वेध लागलेले असायचे. शेवटाचा पेपर झाला की शाळेचे दप्तर पलंगावर भिरकावून देऊन मी खेळायला पळायचे सुद्धा. गॅलरीतल्या पेटीत ठेवलेले लगोरीचे पत्थर, विटी दांडू, काचपाणी खेळण्यासाठी जपून ठेवलेल्या डबातल्या काचांचे तुकडे, सागरगोटे सगळे एकूण एक बाहेर काढले जायचे. मग काय, सकाळी उठल्यापासून अगदी रात्री निजेपर्यंत खेळ सुरु असायचे. एवढं खेळून तरी पोट मात्र भरायचं नाही. आता हे सारं आठवलं की खूप गम्मत वाटते, मनातल्या मनात हसू ही येत.

तेव्हा खेळायचे प्रकार तरी किती भन्नाट होते. विटी-दांडू, लगोरी, डबा ऐसपैस, पकडापकडी, साखळी, लंगडी असे अनेक आणि हो, दुपारच्या वेळी घरच्यांना वा बाहेरच्यांना त्रास नको म्हणून आरडाओरडीचे आणि पळापळीचे खेळ खेळायची मनाई. त्यावेळी बैठे खेळ – सागरगोटे, काचपाणी, कॅरम, भातुकली, त्याचबरोबर सामान्यज्ञान वाढविण्यासाठी एक खेळ खेळायचो तो असा  की, एक अक्षर दिले जायचे… मग त्यावरुन नाव, आडनाव, शहर, भाज्या, फळे, फुले इ. ची नावे लिहायची आणि त्याला मार्कही द्यायचे.  सुट्टीत बऱ्याचदा आत्या आणि आत्येभावंडेही राहायला यायचीत. खूप मज्जा यायची. हसण्याखिदळण्यात सारा वेळ कसा निघून जायचा ते कळायचे नाही. रात्री बहुदा आम्ही  बिल्डिंगमधले सारे बॅडमिंटन खेळायचो किंवा मग पत्त्यांचा डाव रंगायचा- मेंढीकोट, बदामसात, पाच-तीन-दोन, झब्बू. कितीही वेळ खेळलो तरी अजून खेळायचं बाकीच आहे, असं वाटायचं. मी आणि माझा भाऊ खूप मजा करायचो आणि खेळताना खूप भांडायचो सुद्धा. माझं आजोळ बाजूच्याच बिल्डिंगमधे त्यामुळे खूप वेळा मग तिकडेही खेळायला जायचो. खूप त्रास दिला की आई आणि काकाजवळ आजी आमची तक्रार करायची. मग मोठ्या माणसांचा ओरडाही खावा लागायचा. त्यात मीच जास्त मस्तीखोर होते म्हणून मला ओरडा जास्त; पण काकाने शिक्षा केली की आजी लगेच माझी बाजूही घ्यायची. त्याला म्हणाची,‘जाऊ दे रे रमाकांत, पोरंच ती… मस्ती करणारच. पुढच्या वेळेस नाही हो मला त्रास द्यायची.’ गम्मत वाटायची या सगळ्याची. आधी खरं तर आजीचा खूप राग आलेला असायचा तिने तक्रार केली म्हणून आणि मग तीने माझी बाजू घेतली की सगळं काही विसरून मी आजीला घट्ट बिलगायचे. आजीची खूप लाडकी होते मी !

शनिवार – रविवार आला की आई-बाबांबरोबर कुठे तरी बाहेर जायचो फिरायला. बाबांना सिनेमा बघणायचं भरपूर वेड होतं त्यामुळे बहुतेक वेळा शनिवारच्या 6 च्या शोची तिकीटे अगोदरच काढून ठेवलेलीच असायची. आई कामावरून कधी येतेय आणि आम्ही कधी सिनेमा बघायला जातोय, असं झालेलं असायचं. सिनेमाबरोबरच आम्ही मराठी नाटकही बघायचो आजी-आजोबांबरोबर. आजी-आजोबांना संगीत नाटकं  बघायची खूप आवड. संगीत नाटकाच्या आवडीबरोबरच आणखी एक आवड आम्ही आजोबांची घेतली, ती म्हणजे वाचन. आजोबांना वाचनाची खूप आवड. आम्हालाही त्यांनी लायब्ररी सुरू करुन दिली होती. माझ्या आठवणीत अगदी 3री – 4थीत असल्यापासून आम्ही लायब्ररीचे सभासद होतो. मे महिन्यात खेळाबरोबर भरपूर वाचनही करायचो. कुठल पुस्तक वाचतो ते तारखेवार एका वहीत त्याची नोंद करायचो. ही आवड,  हा छंद आजही आम्ही दोन्ही भावडांनी जोपासला आहे.

खेळ आणि वाचन याबरोबर थोडा अभ्यास. हा रोजचा असायचा, त्यापासून सुटका मात्र न्हवती. काकाने आधीच सांगितलेले असायचे, रोजचे पाढे आणि मराठी आणि इंग्रजी शुद्धलेखन एक पानभर रोज मला लिहून हवं आहे. काकापुढे बोलायला काय, त्याच्यासमोर उभं रहायला सुद्धा मी घाबरायचे. त्यामुळे हा रोजचा अभ्यास न चुकता केला जायचा. आता हे सारं आठवलं की वाटतं खरंच आज माझ्यावर आणि माझ्या भावावर याच छोट्यामोठया गोष्टींतून संस्कार होत गेले आणि आम्ही घडत गेलो. आताच्या काळात याच सर्व गोष्टींसाठी मुलांना वेगवेगळे क्लास, संस्कार वर्ग लावायची गरज पालकांना भासते आहे.

अशी ही मे महिन्याची सुट्टी कधी संपायची कळायचेच नाही. जून महिना उजाडायचा सुद्धा ! तेव्हा मात्र शाळा कधी सुरू होते आहे आणि मैत्रिणींना कधी भेटतो आहे, सु्ट्टीतील गमतीजमती सांगतो आहोत असं  झालेलं असायचं

आजही मे महिना सुरू झाला की मन निरागसपणे लहान मुलासारखं त्या बालपणीच्या आठवणीत हरवून जातं…..

  • पूर्णिमा नार्वेकर
  • पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
  • भिकाजी लाड मार्ग, 
  • दहिसर फाटक जवळ, दहिसर (प.), मुंबई – 400068

डिलिव्हरीमध्ये बदल घडवून क्रांतीकारी ऑनलाइन आरोग्यसेवा परिसंस्था आणणार

0

हैदराबादझोयलो डिजिहेल्थ प्रायव्हेट लिमिटेड (झोयलो) हे भारतातील नवीन युगातील आरोग्यसेवा क्षेत्राच्या गाथेतील एक उदयोन्मुख नाव असून, या कंपनीने वैद्यकीय सेवेची मागणी करणारे व सेवा पुरवणारे यांना एकात्मिक, पारदर्शक प्लॅटफॉर्मवर एकत्र आणणाऱ्या एका क्रांतीकारी ऑनलाइन आरोग्यसेवा परिसंस्थेची रचना यशस्वीरित्या केली आहे. झोयलो हा भारतातील पहिला ऑफलाइन व ऑनलाइन एकात्मिक आरोग्यसेवा प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर सेवा पुरवठादारांचे विस्तृत जाळे असून भारतभरातील ६००हून अधिक ठिकाणी याद्वारे सर्व प्रकारच्या (३६० डिग्री) आरोग्यसेवा पुरवल्या जातात. अॅपचे ५००,०००हून अधिक डाउनलोड्स झाल्यामुळे झोयलो आता देशभरातील लोकांना सेवा देत आहे, त्यांना तंत्रज्ञानाच्या बळावर निरोगी आयुष्य जगण्याची मुभा देत आहे.

झोयलो डिजिहेल्थचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कुमार रेड्डी म्हणाले, “आरोग्यसेवा जीवनचक्रातील प्रत्येक घटकाला सक्षम करणे आणि अखंडित आरोग्यसेवा पुरवण्यासाठी पारदर्शक संवाद व माहितीचे आदानप्रदान शक्य करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. झोयलोने डिझाइन केलेल्या सर्वसमावेशक परिसंस्थेमुळे आरोग्यसेवेची मागणी करणारे, त्यासाठी पैसे मोजणारे, रुग्ण तसेच या गतीशील नेटवर्कमधील सर्वांना अचूक व कार्यक्षम सेवा मिळेल.” आज एखाद्या व्यक्तीला तिच्या सोशल प्रोफाइलला, प्रोफेशनल प्रोफाइलला, लाइफस्टाइल प्रोफाइलला केवायसी अॅक्सेस असतो आणि सोशल मीडियाच्या अॅप्सद्वारे केवायसीला अॅक्सेस असतो. मात्र, एखादी व्यक्ती कधीही, कोठूनही ऑनलाइन साधनांचा वापर करून तिची हेल्थ प्रोफाइल बघू शकत नाही. झोयलो व्यक्तीची ‘हेल्थ प्रोफाइल’ तयार करण्याच्या दिशेने काम करत आहे. हा आरोग्यसेवा परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक असेल आणि त्यात व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास, निदान, धोक्याचे मूल्यांकन आणि अन्य तपशील असतील. या महत्त्वपूर्ण माहितीला झटपट ऑनलाइन अॅक्सेस मिळाला तर व्यक्तीला कधीही अचूक व कार्यक्षम उपचार देणे शक्य होईल.

ऑनलाइन आणि ऑफलाइन सेवांच्या विस्तृत श्रेणीचे अलगीकरण म्हणजे आरोग्यसेवांची डिलिव्हरी सुलभ करण्याचा आणि या एकंदर प्रणालीचा दर्जा व कार्यक्षमता देण्याचा भाग आहे. आरोग्यसेवा क्षेत्रातील मूल्यवर्धन व व्यक्तीआधारित अनुभवाने अनेक यंत्रणांचे लक्ष वेधले आहे. यांमध्ये विमा कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि अन्य आरोग्यसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचा समावेश होतो. या कंपन्यांनी झोयलोसोबत भागीदारी करून त्यांच्या ग्राहकांना अर्थपूर्ण आरोग्यसेवा देण्यास सुरुवात केली आहे.

कंपन्यांसाठी कायमच मुसंडी मारण्याचे क्षेत्र राहिलेल्या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपायांचा व्यक्तींना फायदा होत आहे. यामुळे संभाव्य जीवनशैली विकारांचे निदान लवकर होत आहे. विशेषत: उच्चरक्तदाब, मधुमेह, स्थूलत्व व कर्करोग या एनसीडींचा यात समावेश होतो. या सोल्युशनमुळे व्यक्तीला एक आरोग्यपूर्ण जीवनशैली स्वीकारण्यास मदत होणार आहे. ऑनलाइन सल्ल्यामुळे अंतराचा अडथळा दूर होणार आहे. स्पेशलाइझ्ड तसेच सुपर स्पेशलाइझ्ड डॉक्टर उपलब्ध नसलेल्या भागांत राहणाऱ्यांनाही देशातील सर्वोत्तम डॉक्टरांशी संवाद साधणे तसेच त्यांचा सल्ला व उपचार घेणे शक्य होणार आहे. ई-फार्मसी सेवा २५,००० ठिकाणी पोहोचून भारतभरात अस्सल दर्जाची औषधे पुरवणार आहे. झोयलोचे कॉर्पोरेट हेल्थ कार्ड कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्यविषयक सर्व गरजांसाठी वन स्टॉप सोल्युशन देऊ करते.

श्री. रेड्डी म्हणाले, “आम्ही व्यक्तीच्या आरोग्याच्या नोंदी ऑनलाइन ठेवण्यासाठी तसेच संपूर्ण आरोग्यसेवा परिसंस्था तयार करण्यासाठी सर्व डॉक्टरांना प्रॅक्टिस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर देऊ करत आहोत. आरोग्यसेवा परिसंस्थेची चाकोरी मोडण्याच्या आमच्या प्रयत्नांना विविध पुरस्कार व प्रमाणपत्रांच्या रूपाने मान्यता मिळत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. तंत्रज्ञानाची जोपासना करून आरोग्यसेवा पुरवणे सुलभ करणारा ब्रँड होण्याचे ध्येय आमच्यापुढे आहे.”

लोकांना हेल्थ प्रोफाइल तयार करण्यात मदत करणे तसेच वैद्यकीय इतिहासाचे ऑनलाइन व्यवस्थापन करण्यात मदत करण्याशिवाय झोयलो वैद्यकीय खर्च कमी करण्यासाठी, अचूक निदान करून घेण्यासाठी तसेच भारतभरात Healthcare@Homeच्या सोयीचा लाभ घेण्यासाठी मदत करणार आहे. झोयलो हे तुमच्या सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणारे एक अॅप आहे!

झोयलो विषयी

झोयलो हा देशभरातील आरोग्यसेवांच्या संपूर्ण कक्षेतील वापरकर्त्यांना तंत्रज्ञानाची क्षमता वापरून जोडणारा ऑनलाइन आरोग्यसेवा प्लॅटफॉर्म आहे. हैदराबादस्थित हेल्थटेक व्हेंचर झोयलो आरोग्यसेवा क्षेत्रातील डिजिटल कायापालटाचे नेतृत्व करत आहे. आरोग्यसेवा पुरवण्याच्या तसेच उपलब्ध करून घेण्याच्या मार्गामध्ये ही कंपनी डिजिटल तंत्रज्ञानाचा चातुर्याने वापर करून बदल घडवून आणत आहे. त्याचवेळी आरोग्यसेवा क्षेत्रातील निश्चित मानक, मार्गदर्शक तत्त्वे व नियमांचे पालनही ही कंपनी करत आहे. यातील प्रमुख सेवांमध्ये डॉक्टरांची अपॉइंटमेट बुक करणे, निदानात्मक चाचण्या, प्रतिबंधात्मक आरोग्य व स्वास्थ्य पॅकेजेस, डॉक्टरांचा ऑनलाइन सल्ला, ई-फार्मसी सेवा, होम हेल्थकेअर, रुग्णालय उपचार पॅकेजेस, प्रॅक्टिस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, डिजिटल वैद्यकीय नोंदी, कॉर्पोरेट हेल्थ कार्ड, ऑनलाइट हेल्थ हब्ज आदींचा समावेश होतो.

आज झोयलोने ५०,०००हून अधिक डॉक्टर्स, ३०००हून अधिक रुग्णालये आणि भारतभरातील ६००हून अधिक निदान केंद्रे आपल्या नेटवर्कमध्ये आणली आहेत.   

बारामतीची मते भाजपला मिळावी म्हणून पळविले पुण्याचे पाणी -गिरीश बापटांचे महापाप -मोहन जोशींचा आरोप (व्हिडीओ)

पुणे-पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीच्या भाजप उमेदवार कांचन कुल यांना फायदा होण्यासाठीच कालव्यातून पाणी सोडले गेले. शहरावर पाणी कपातीचे संकट असताना कालव्यातून पाणी सोडण्याचे महापाप पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी केला आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, पुणे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी यांनी बापटांवर पाणीप्रश्नावर टीका केली आहे.

पावसाळ्यात पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणे भरली होती, मात्र पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले नाही, त्यामुळे शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईला गिरीश बापट हेच जबाबदार आहेत, दौंड, इंदापूरला पाणी सोडण्यासाठी बापट यांनी प्रशासनावर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप मोहन जोशी यांनी केला.

 

‘बेरोकजिंदगी’मुळे अनेकांनी मिळवला दम्यावर विजय-डॉ. हिमांशू पोफळे

पुणे: दम्यासंबंधित गैरसमज दूर करुन लोकांच्या मनातील भीती कमी करण्याच्या, तसेच दमाग्रस्तांना बंधमुक्त आयुष्य जगता येण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जात आहेत. जागतिक दमा दिनाच्या निमित्ताने दमाच्या यशस्वी नियोजनासाठी ‘बेरोकजिंदगी’ उपक्रमातून इन्हेलेशन थेरपीविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इन्हेलेशन थेरपी आणि दम्याच्या रुग्णांना समाजात अधिक स्वीकारार्ह बनवण्याचे ध्येय हाती घेण्यात आले आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या फिजिशयन्समध्ये चांगला संवाद निर्माण होऊ शकेल. आजवर ‘बेरोकजिंदगी’ उपक्रमांतून अनेकांनी दम्यावर विजय मिळवला आहे. दम्याच्या यशस्वी नियोजनासाठी मार्गदर्शक असलेल्या ’बेरोकजिंदगी’ जनजागृती अभियानाला सर्व रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती पुण्यामधील चेस्ट फिजिशियन डॉ. हिमांशू पोफळे आणि पेडियाट्रिशियन, चेस्ट फिजिशियन डॉ. शशांक कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. हिमांशू पोफळे म्हणाले, ”दमा आणि इन्हेलेशन थेरपीविषयीचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. दम्याचा लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम व त्याचे गांभीर्य कमी करण्यात इन्हेलेशन उपचारपद्धती मोठी भूमिका बजावते. इन्हेलेशनच्या माध्यमातून घेतल्यामुळे औषधे थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात. रुग्णांना उपचारांचा संपूर्ण फायदा मिळावा यासाठी सांगण्यात आलेल्या उपचारांचा त्यांनी पूर्णपणे स्वीकार करणे गरजेचे आहे. दमा रोखण्यासाठी आणि त्याच्या लक्षणांपासून सुटका करण्यासाठी तसेच दम्याचा त्रास कमी करून दम्याच्या विकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इन्हेलेशन उपचार केले जातात, पण जेव्हा रुग्ण जनरल प्रॅक्टिशनरला सहाय्य करून त्याने सांगितलेल्या पद्धतीने औषधे घेतो, तेव्हाच त्या उपचारांचा परिणाम दिसतो. इन्हेलर्स, स्पेसर्स, रोटाहेलर्स आणि नेब्युलायझर्स या साधनांच्या माध्यमातून औषधे इन्हेल करण्याची अद्ययावत सुविधा निर्माण झाल्यामुळे दम्याचे नियोजन सोपे झाले आहे. औषधे थेट आवश्यक अवयवापर्यंत म्हणजेच फुफ्फुसांत पोहोचतात. त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम न होता कमी किंमतींमध्ये औषधांचे सर्वाधिक फायदे मिळतात. लक्षणे नाहीत म्हणजे दमा नाही, हा समज चुकीचा आहे. जरासे बरे वाटू लागले की औषधे थांबवणे योग्य नाही. त्यामुळे आजार पुन्हा बळावतो आणि त्याचा दुहेरी दुष्परिणाम होतो. औषधोपचार थांबवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. दम्याला दीर्घकालीन उपचारांची गरज असते.”

डॉ. शशांक कदम म्हणाले, ”दीर्घकालीन दम्यासारख्या आजाराबाबत जागृती निर्माण करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘बेरोकजिंदगी’मुळे दम्यावर विजय मिळवता येणार आहे. रुग्णांना त्यांच्याच आजारावर अधिक योग्य पद्धतीने उपचार घेण्यामध्ये स्वत:ला सहभागी करुन घेता येणार आहे. डॉक्टरांच्या सहाय्याने दम्यावर नियंत्रण मिळवून इन्हेलरचा कमीत-कमी वापर करण्याचे ध्येय गाठणे आणि त्याच्या माध्यमातून जीवनाचा संपूर्ण आनंद लुटणे हेच साध्य आहे. दम्याच्या व्यवस्थापनाबाबत अधिक संवाद साधण्याला प्रोत्साहन देऊन आपण जागतिक दमा दिन साजरा करूया.”
“रुग्णांनी इन्हेलर्सचा वापर थांबवण्यामागे औषधोपचारांचा खर्च, दुष्परिणाम, इन्हेलर साधनांबाबत गैरसमज यांसारखी अनेक कारणे आहेत. मानसिक अडचणींमुळेही वापर बंद केला जातो. त्यामध्ये डॉक्टरांच्या उपचारांबद्दल असमाधान, अवास्तव अपेक्षा, एखाद्याच्या परिस्थितीबद्दल मनात राग, रोगाच्या स्थितीला कमी लेखणे, आरोग्याबाबत निष्काळजीपणा आदी. दम्यावर विजय मिळवायचा असेल तर परिणामकारक उपचार म्हणजेच इन्हेलेशन थेरपी घेणे गरजेचे आहे. भारतात हे उपचार अगदी कमीत-कमी म्हणजे दिवासाला 4 ते 6 रुपयांपर्यंत इतक्या कमी किंमतीत उपलब्ध आहेत,” असेही डॉ. कदम यांनी नमूद केले.

डॉ. पोफळे म्हणाले, ”इन्हेल्ड कॉर्टिकॉस्टेरॉइड थेरपी (आयसीटी) हा दम्याच्या नियंत्रणाची पायाभरणी आहे. कोणत्याही उपचारांचा परिणाम साधण्यासाठी व सुरक्षितता राखण्यासाठी पद्धती आणि आवश्यक तेवढे औषध देणे महत्त्वाचे असते. औषध दाह होणार्‍या श्वसनमार्गात लहान डोसच्या स्वरूपात थेट पोहोचते. त्यामुळे संभाव्य दुष्परिणाम कमी होतात. आयसीटीद्वारे दिल्या जाणार्‍या औषधाच्या प्रमाणाच्या तुलनेत तोंडावाटे दिल्या जाणार्‍या औषधांचे प्रमाण अधिक असल्याने दुष्परिणाम संभवतात. तरीही, अज्ञानामुळे अनेक रुग्ण हे उपचार घेतात. अनेकांनी ‘स्टिरॉइड्ज’ हा शब्द ऐकला की त्यांना शरीरातील स्नायू बळकट करणार्‍या पदार्थांचीच आठवण होते. बरेचदा कॉर्टिकोस्टिरॉइड्ज आणि अनॅबोलिक स्टिरॉइड्ज यांच्यात गोंधळ केला जातो.”

राष्ट्रीय दमा शिक्षण आणि प्रतिबंधक कार्यक्रमाच्या (एनएईपीपी) ताज्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, एक वर्षाच्या मुलापासून सर्व वयोगटांतील साध्या किंवा वारंवार होणार्‍या दम्यासाठी इन्हेल्ड कोर्टिकोस्टिरॉइड् थेरपीचा (आयसीएस) वापर करण्यात यावा. इन्हेल्ड कोर्टिकोस्टिरॉइड्मुळे रुग्णाच्या दैनंदिन जीवनाच्या दर्जात सुधारणा होत असल्याचे लक्षात आले आहे. तसेच दम्याचा झटका येण्याचे प्रमाण कमी करण्यात तसेच दमा नियंत्रणात, तोंडावाटे स्टिरॉइड घेण्याची गरज कमी करण्यात तसेच ईआरच्या वार्‍यांचे प्रमाण कमी करण्यात व रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमी करण्यातही इन्हेल्ड कोर्टिकोस्टिरॉइड्जची मदत होत आहे.

यावर्षी जागतिक दमा दिनी आपण दम्यावर विजय मिळवणार्‍यांचे यश साजरे करत आहोत, ज्यांनी दम्याविरुद्धचा त्यांचा लढा जिंकला असून, त्यासंबंधी गैरसमजांवरही मात केली आहे. आजार, त्याचा स्वीकार आणि त्याची योग्य थेरपी घेणेबद्दल जागृती निर्माण केल्यामुळे दम्याविरुद्ध आपण एकत्रितपणे विजय मिळवू शकू. आज, ज्यांनी इन्हेलेशन थेरपीच्या माध्यमातून दम्यावर विजय मिळवणे शक्य करून दाखवले, त्यांच्याकडून आम्ही धडा घेत आहोत. त्यांच्याप्रमाणेच ‘बेरोकजिंदगी’ जगण्याचा प्रयत्न करुया. दमा बरा होणे शक्य नसेल, पण त्याच्यावर उपचार नक्की होतात. तुमच्या डॉक्टरांनी सुचवलेल्या इन्हेलेशन थेरपीचा अवलंब करून दमा नियंत्रणात ठेवता येतो आणि तुमच्या जगण्याचा दर्जा उंचावता येतो.

प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री गप्प का ?कॉंग्रेसचा सवाल (व्हिडीओ)

पुणे : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यांवर मारहाणीचे आरोप केले आहेत. शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री व लोकसभा अध्यक्षांनीही प्रज्ञासिंह यांची बाजू घेतली आहे. भाजपाकडून हा केवळ एका अधिकाऱ्याचा अपमान नसून महाराष्ट्र पोलिस दलाचा अपमान केला जात असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, अभय छाजेड व सचिव संजय बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत ही टीका केली. प्रज्ञासिंग यांनी तत्कालीन एटीएस अधिकारी व ठाण्याचे पोलिस आयुक्त परमविरसिंग यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर मारहाणीचे आरोप केले आहेत. प्रज्ञासिंह यांनी महाराष्ट्र पोलिसांविरूध्द तक्रार दिल्यास आपण कारवाई करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले होते. आता मुख्यमंत्री परमविरसिंग यांना अटक करणार का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी व लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन प्रज्ञासिंह यांची पाठराखण करतात. महाराष्ट्र पोलिसांनी इंदौरमधील काही मुलांना अटक केली. पण त्यातील काही युवक परत आले नाहीत, असा आरोप महाजन यांनी केला आहे. या सर्व बाबी पोलिस दलाचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या आहेत, अशी टीकायावेळी करण्यात आली

प्रज्ञासिंह यांच्या करकरेविषयीच्या वक्तव्यावर निवडणुक आयोगाने काहीच कारवाई केलेली नाही. इतर वक्तव्यांबाबतच त्यांच्यावर ७२ तासांची बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्याकडून सातत्याने लोकशाही व्यवस्थेचा अपमान केला जात आहे, अशा स्थितीत त्यांची उमेदवारी निवडणूक आयोगाने रद्द केली पाहिजे अशी मागणी अभय छाजेड यांनी यावेळी केली.

सावरकरांच्या घरातील वीरांगनांच्या शौर्यगाथेने भारावले पुणेकर !

पुणे :स्वातंत्र्यसंग्रामातील सावरकर कुटुंबियांच्या घरातील बंधू त्रयींच्या पत्नींचे योगदान मांडणाऱ्या ‘त्या तिघी’ या डॉ. शुभा साठे लिखित कादंबरीवर आधारित ‘त्या तिघी… स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ या एकपात्री प्रयोगाला बुधवारी सायंकाळी पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
क्रांतिकार्यात हालअपेष्टा सोसणाऱ्या, तरीही हार न मानता राष्ट्राचा संसार पुढे नेणाऱ्या या वीरांगनांची शौर्यगाथा पाहताना पुणेकर रसिक भारावून गेले! ‘अभिव्यक्त पुणे’ संस्थेतर्फे १ मे, महाराष्ट्र दिनी सुदर्शन रंगमंच येथे हा एकपात्री प्रयोग सादर झाला.
प्रयोगाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, लेखिका डॉ. शुभा साठे, श्रेयसचे दत्ता चितळे हे मान्यवर उपस्थित होते. प्रयोगाची संकल्पना, संहिता लेखन अपर्णा चोथे यांचे असून सावरकर घराण्यातील सौ. यशोदाबाई गणेश सावरकर, सौ. यमुनाबाई विनायक सावरकर व सौ. शांताबाई नारायण सावरकर या तीनही व्यक्तिरेखा त्यानी समरसून साकारल्या आणि तो रोमांचक काळच रसिकांसमोर उभा केला.
दिग्दर्शन अजिंक्य भोसले यांचे असून संगीत अजित विसपुते यांनी केले आहे. नेपथ्य आणि वेशभूषा अश्विनी चोथे-जोशी यांचे असून प्रकाशयोजना संकेत पारखे, स्थिरचित्रण चैतन्य कुलकर्णी यांनी केले आहे.
सावरकर बंधूंचा त्याग, पराक्रम, कष्ट इतिहासात नोंदवला गेला आहे. पण हा त्याग, पराक्रम करत असताना त्यांच्या घरातील स्त्रिया कशा जगल्या? कष्टभरली आयुष्य अनेकींच्या वाट्याला येतात, पण आनंदी आणि रसाळ मन, उदात्त विचार आणि दुःखाचं हलाहल पिऊनही न ढळणारी देशनिष्ठा हे त्यांचे विशेष गुण त्यांना अढळपदी नेऊन बसवतात. अशा, आपल्या पतींच्या राष्ट्रकार्याची धुरा निष्ठेने सांभाळणार्‍या वीरांगनांची शौर्यगाथा या एकपात्री प्रयोगाद्वारे रंगमंचावर आली.
यावेळी डॉ.सतीश देसाई यांच्या हस्ते कलाकार आणि तंत्रज्ञांचा सत्कार करण्यात आला.
‘सावरकर घराण्यातील प्रत्येकाचा त्याग अतुलनीय असून या प्रयोगाद्वारे तो अत्यंत प्रभावीपणे मांडला गेला आहे. युवा पिढीने हा प्रयोग जरूर पाहावा आणि प्रेरणा घ्यावी’ असे आवाहन डॉ.सतीश देसाई यांनी यावेळी बोलताना केले.

नवीन मराठी शाळा वार्षिक नियतकालिक झेप प्रकाशन व विदयार्थी पदवीदान समारंभ

पुणे : ३० एप्रिल रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत वार्षिक निकाल, वार्षिक
नियतकालिक झेप चे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विपुलश्री मासिकाच्या संपादिका माधुरी
वैद्य, शाळेच्या माजी विद्यार्थिनी व अभिनेत्री अनुपमा देशमुख, शाळेचे माजी विद्यार्थी अरविंद
वाकणकर, शालासमिती अध्यक्षा डॉ.प्राची साठे ,मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने
व सरस्वती पूजनाने झाली.स्वाती यादव यांनी उपस्थित अतिथींचा परिचय करून दिला.यावेळी उपस्थित
सर्व मान्यवरांना शाळेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या स्वागत व प्रास्ताविकात मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या कामांचे मनापासून कौतुक केले व भावी वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या वार्षिक
नियतकालिक ‘झेप’ अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. शिक्षिका प्रिया इंदुलकर यांनी झेप
अंकाविषयी माहिती दिली.त्यानंतर अनुपमा देशमुख यांनी आपल्या मनोगतात शाळेतील विविध उपक्रमांचे
कौतुक केले.
अरविंद वाकणकर यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .तर प्रमुख अतिथी
माधुरी वैद्य यांनी गोष्टीतून विद्यार्थ्यांना परोपकार करा व माणूस म्हणून मोठे व्हा असा संदेश दिला .
त्यानंतर वर्गातील सर्वोत्तम विद्यार्थी, १००% उपस्थिती व स्पोकन इंग्लिश मध्ये विशेष यश संपादन
केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देवून गौरविण्यात आले. यावर्षीपासून इयत्ता चौथी मधून प्रत्येक वर्गातून
सर्वोत्कृष्ट ठरलेल्या एक विद्यार्थिनी व एक विद्यार्थी यांना प्रातिनिधिक स्वरूपात चौथी पास पदवीप्रदान
करण्यात आली. यावेळी सर्व शिक्षकांना भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.अशा प्रकारे बहारदार अशा
कार्यक्रमात झेप चे प्रकाशन व बक्षीस वितरण पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री हजारे व
आभार प्रदर्शन योगिता भावकर यांनी केले.

प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार संधी कायमस्वरूपी   देण्याचे औद्योगिक जगताचे धोरण कौतुकास्पद – डॉ. कॅप्टन. सी. एम. चितळे

‘यशोत्सव’ स्नेहसंमेलनात ‘यशोगाथा’ प्रकाशन सोहळा संपन्न.

पुणे :  :प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी  रोजगार संधी देण्याचे औद्योगिक जगताचे धोरण कौतुकास्पद आहे असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे  मानद प्राध्यापक डॉ. कॅप्टन. सी. एम. चितळे यांनी  व्यक्त केले.

‘यशस्वी’ संस्थेच्या  विद्यार्थ्यांच्या ‘यशोत्सव’ स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना  ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, कंपन्यांमधून ऑन द जॉब ट्रेनिंग  करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्याना प्रत्यक्ष मशिनवर व  शॉप फ्लोअर वर काम  करण्याची  संधी मिळत असल्याने  त्यांच्यात कामाप्रती अनुभव संपन्नता वाढीस लागते आणि यामुळेच अशा कौशल्याधिष्टित शिक्षणव्यवस्थेतून तयार होणारे हे  कुशल मनुष्यबळ उद्योगजगताची खरी गरज पूर्ण करण्यास सक्षम ठरते. शिवाजीनगर येथील महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड  केटरिंग  टेक्नॉलॉजीच्या  सभागृहात  महाराष्ट्र दिनानिमीत्त  या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते.

तर याप्रसंगी  उपस्थित असणाऱ्या द  सोसायटी  फॉर  डोअरस्टेप स्कुल्सच्या संस्थापक अध्यक्ष रजनीताई परांजपे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की,आजही  आपल्या  देशात अगदी पुणे,  मुंबई सारख्या  महानगरांमधुनही  शाळेची पायरीसुद्धा ओलांडू न  शकणारी  हजारो मुले- मुली दिशाहीन आयुष्य जगत आहेत. एकीकडे महागडे अभ्यासक्रम शिकवून बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे  ‘यशस्वी’ सारख्या  संस्थेतून  कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगारक्षम युवा पिढी तयार होत आहे, ही  नक्कीच आश्वासक  बाब  आहे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला ‘यशस्वी’ संस्थेच्या विद्यार्थ्यांना आवाहन करायला आवडेल की  त्यांनीही त्यांच्या आयुष्यातील करिअरच्या वाटेवर प्रगती करत असताना  शक्य होईल तितक्या प्रमाणात  अजूनही शाळेत न  पोहोचू शकलेल्या मुला-मुलींना किमान शाळेपर्यन्त  आणण्यासाठी प्रयत्न करावेत.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या ‘यशोगाथा’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध कंपन्यांतून ऑन द जॉब ट्रेनिंगमध्ये शंभर टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचे व कंपनीत ऑन  रोल  नोकरीची संधी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात प्रशस्तीपत्र व सुवर्णपदक देऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

तर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात  विद्यार्थ्यांचे गायन, वादन व समूह गायन  हे कलाविष्कार सादर करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला  ‘यशस्वी’ संस्थेचे  अध्यक्ष  विश्वेश कुलकर्णी,संस्थेच्या  संचालक, स्मिता धुमाळ, संचालक डॉ. मिलिंद मराठे,संजय छत्रे, राजेश नागरे,अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस, अध्यापन विभाग प्रमुख डॉ. सुनीता पाटील, संस्थेच्या मनुष्यबळ  व्यवस्थापक  मुक्ता  हुपरीकर, कौशल्य विकास  प्रशिक्षण विभाग प्रमुख संजय सिंग यांच्यासह संस्थेचे  सर्व अध्यापक, सुपरवायजर, फिल्फ ऑफिसर व विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्त हुपरीकर  यांनी तर आभार प्रदर्शन  डॉ.सुनीता पाटील यांनी  व सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी  केले.

या कार्यक्रमासाठी श्वेता साळी,हर्षा पटेल,अश्विनी घनवट, वर्षा राणे, प्रशांत कुलकर्णी, वैशाली भुसारी,माधवानंद खांडेकर,सोमन पात्रा, मेघा बोरकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

महाराष्ट्र दिनी पालकमंत्री बापट यांच्‍या हस्‍ते मुख्‍य शासकीय ध्‍वजारोहण

पुणे : महाराष्ट्र राज्‍य स्‍थापनेच्‍या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त अन्‍न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्‍न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्‍या हस्ते ध्‍वजारोहण झाले.

शिवाजीनगर येथील पोलीस संचलन मैदानावर झालेल्‍या कार्यक्रमास विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, पुणे शहराचे पोलीस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाथन यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी पोलीस बँडवर राष्‍ट्रगीत वाजवण्‍यात आले. त्‍यानंतर मानवंदना देण्‍यात आली. पालकमंत्री बापट यांनी पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल आदींच्‍या संयुक्‍त संचलनाची पहाणी केली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांना देखील पालकमंत्री बापट यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

कार्यक्रमास खा. अमर साबळे, महापौर मुक्‍ता टिळक, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष विश्‍वासराव देवकाते यांच्‍यासह आनंद लिमये, एस. चोकलिंगम, शेखर गायकवाड, विक्रमकुमार, सुभाष डुंबरे, प्रताप जाधव, संजयसिंह चव्हाण, रमेश काळे, चिंतामणी जोशी, जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, प्रमोद केंभावी, भाऊसाहेब गलांडे, अमृत नाटेकर, सुधीर जोशी, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, भानुदास गायकवाड या शासकीय अधिका-यांसह स्‍वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, ज्‍येष्‍ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, छायाचित्रकार, विद्यार्थी, महिला, पोलीस अधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची भेट घेऊन महाराष्‍ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्‍त पालकमंत्री बापट यांनी शुभेच्छा दिल्‍या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिताराम नरके आणि प्रिया बेल्‍हेकर यांनी केले.

शनिवार वाड्यावर जिल्‍हाधिकारी राम यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण

जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍या हस्‍ते शनिवार वाड्यावर ध्वजारोहण झाले. यावेळी निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्‍हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी, भाऊसाहेब गलांडे, अमृत नाटेकर, सुधीर जोशी, भानुदास गायकवाड, विक्रांत भालेराव, सुहास मापारी आदी शासकीय अधिका-यांसह ज्‍येष्‍ठ नागरिक, कर्मचारी उपस्थित होते.

श्रीलंकापाठोपाठ भारतातही ‘बुरखा बंदी’ लागू करा; उद्धव ठाकरेंची पीएम मोदींकडे मागणी

मुंबई – भारतात बुरखा आणि नकाब बंदी लागू करा अशी मागणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी सामनातून लिहिलेल्या अग्रलेखात पंतप्रधान नरेंद्र मोदींना अशा स्वरुपाचे आदेश काढण्यास सांगितले. श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्ल्यानंतर आणीबाणी व त्यानंतर बुरखा बंदी लागू करण्यात आली. उद्धव यांच्या मते, बुरखा किंवा नकाब घालून चेहरा लपविणे देशाच्या सुरक्षेसाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे, सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब घालणे हे गुन्हेगारी कृत्य मानले जावे. श्रीलंका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि ब्रिटनने सुद्धा दहशतवादविरोधात कठोर पावले उचलून ही बंदी लागू केली असे उद्धव यांनी सांगितले.

रावणाच्या लंकेत झाले, रामाच्या अयोध्येत कधी?
आणीबाणीत असलेल्या श्रीलंकेने चेहरा झाकणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर बंदी लागू केली. तेथील राष्ट्रपती मैत्रिपाला सिरीसेना यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय धाडसी आणि धैर्याचे दर्शन घडवणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात ट्रिपल तलाक रद्द करून पीडित मुस्लिम महिलांना न्याय दिला. परंतु, दहशतवादविरोधात कठोर पावले कधी उचलणार आहेत. त्यांनी अग्रलेखात लिहिल्याप्रमाणे, “जम्मू आणि काश्मीर इस्लामी दहशतवादाने त्रस्त आहे. श्रीलंका, न्यूझीलंड, फ्रान्स आणि ब्रिटनने सुद्धा बुरखा आणि नकाब बंदी लागू केली. मग, भारत मागे का?”

“मुस्लिमांमध्ये कुणी फुले शाहू निर्माण झाले नाहीत…”
भारतातील मुस्लिमांवर भाष्य करताना, “आधी धर्म नंतर राष्ट्र असा मुस्लिम समाजाचा प्राधान्यक्रम आहे. इस्लाम धर्म देखील फालतू रुढी-परंपरांमध्ये अडकला आहे. मुसलमानांत कुणी शाहू, फुले निर्माण झाले नाहीत. किंबहुना होऊ दिले गेले नाहीत. याच कारणांमुळे शहाबुद्दीन, आझम खान, ओवेसी बंधू, अबु आजमी यांचे फावले आहे.” उद्धव ठाकरेंनी अग्रलेखात या सर्वांना धर्मांध आणि माथेफिरु म्हटले आहे.

महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांचा जवानांवर हल्ला, भूसुरुंग स्फोटात किमान 15 जण शहीद झाल्याची भीती

0

गडचिरोली – येथील जांभूरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनाला लक्ष्य करून हल्ला केला. या हल्ल्यात किमान 15 जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नक्षलविरोधी विशेष पथकाचे हे जवान एका खासगी वाहनातून जात होते. जांभूरखेडा येथे त्यांचे वाहन पोहोचताच मोठा स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस आणि निमलष्करी दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सोबतच, परिसरात नक्षल्यांना पकडण्यासाठी कोंबिंग ऑपरेशनची तयारी केली जात आहे. या हल्ल्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी नक्षलवाद्यांनी 36 वाहनांना आग लावली होती.

वाहनांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या
सुरुवातीला गृह राज्यमंत्र्यांनी हे जवान सीआरपीएफचे असल्याचा दावा केला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते सी-60 जवान असल्याचे ट्वीटच्या माध्यमातून स्पष्ट केले. घटनास्थळावरून आलेल्या छायाचित्रांवरून स्फोटाची तीव्रता जाणवते. ज्या वाहनात जवान नेले जात होते त्या वाहनाचे केवळ तुकडे सापडले आहेत. याच दिशेने सी-60 जवानांना खासगी वाहनातून नेले जात होते. त्यानुसारच, नक्षलवाद्यांनी भूसुरुंग पेरून घात लावून हा हल्ला केला. उल्लेखनीय बाब म्हणजे, गडचिरोलीच्या या भागात नक्षलवाद्यांनी लोकांना मतदान करू नका असे धमकावले होते. त्यानंतरही स्थानिकांनी उत्सफूर्तपणे सहभाग घेतला. मोठ्या संख्येने लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचाच राग काढून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला असे सांगितले जात आहे.

या हल्ल्यानंतर एएनआय शी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहा काय म्हटले आहे.

रेणुका शहाणेंची संतप्त प्रतिक्रिया-
गडचिरोलीतील दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी बुधवारी कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले. या घटनेने पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीसुद्धा घटनेचा निषेध केला आहे.

‘निषेध! या नक्षलवाद्यांचा निषेध, या भ्याड हल्ल्याचा निषेध! ज्या सुरक्षाकर्मींचे प्राण गेले त्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली. एकीकडे आतंकवाद तर दुसरीकडे नक्षलवाद, आपल्या सुरक्षाकर्मींच्या प्राणाचे काहीच मोल नाही का? त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हा संताप व्यक्त केला आहे.

मंगळवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर बुधवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात १५ जवान शहीद झाले असून खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे.