Home Blog Page 2937

शिरुर मावळच्‍या मतमोजणी केंद्राची पहाणी

पुणे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शिरुरचे निवडणूक निर्णय अधिकारी  श्री.रमेश काळे व मावळच्‍या निवडणूक निर्णय अधिकारी कविता व्दिवेदी यांनी मतमोजणीच्‍या ठिकाणाची आज पहाणी केली. यावेळी  उपजिल्‍हाधिकारी संदिप निश्चित,भारत संचार निगम लिमिटेडचे श्री.परदेशी, श्री. राखेलकर, सार्वजनिक बांधकामाच्‍या विद्युत विभागाचे उप कार्यकारी अभियंता श्री.शुल्‍क, श्री.वाघमारे, पोलिस निरीक्षक यशवंत गवारी उपस्थित होते.

‘बंदिशाळा’ येत्या २१ जून रोजी रसिकांच्या भेटीला!

0

‘जोगवा’, ‘पांगिरा’, ‘७२ मैल एक प्रवास’ या गाजलेल्या दर्जेदार चित्रपटांचे लेखक प्रस्तुतकर्ते आणि ‘दशक्रिया’ या चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेले संजय कृष्णाजी पाटील त्यांचा नवा चित्रपट घेऊन येत आहेत.‘शांताई मोशन पिक्चर्स’ या संस्थेची पहिली निर्मिती असलेला सौ. स्वाती संजय पाटील निर्मित व संजय कृष्णाजी पाटील आणि श्री माऊली मोशन्स पिक्चर्स प्रस्तुत व मिलिंद लेले दिग्दर्शित ‘बंदिशाळा’ या सत्य घटनेवर आधारित चित्रपटाची कथाही संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिली असून पहिल्यांदाच त्यांनी कादंबरी बाहेरील विषयालाहात घेतला आहे. हा चित्रपट येत्या २१ जून २०१९ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कान्ससाठी निवड झाली असून ५६ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ठ कलादिग्दर्शनाच्या घोषित पुरस्कारासह ६ विभागांमध्ये नामांकने मिळाली आहेत.

‘बंदिशाळा’मध्ये मध्यवर्ती भूमिकेत मुक्ता बर्वे यांची अत्यंत धाडसी भूमिका असून तिची ही भूमिका पहाण्यासाठी तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट मिलिंद लेले यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘५६ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये’ सर्वोत्कृष्ठ कलादिग्दर्शन घोषित पुरस्कारासह ६ विभागांमध्ये सर्वोत्कृष्ठ चित्रपट निर्मिती, सर्वोत्कृष्ठ चित्रपट निर्माता पदार्पण, सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री, सर्वोत्कृष्ठ गीतकार, सर्वोत्कृष्ठ गायिका, सर्वोत्कृष्ठ पार्श्वसंगीतासह पहिल्या सर्वोत्कृष्ठ दहा चित्रपटामध्ये बाजी मारली आहे.

संजय कृष्णजी पाटील लिखित प्रस्तुत ‘बंदिशाळा’ हा एक सामाजिक महत्वाकांशी चित्रपट असून त्याला एका कारागृहाची पार्श्वभूमी लाभली आहे. एका कर्तव्यदक्ष महिला तुरुंग अधिकार्‍याची कथा या चित्रपटातून उलगडणार असून ही भूमिका आणि हा वेगळा विषय मुक्ता बर्वे या अभिनेत्रीने उत्तुंग शिखरावर पोहचविला आहे. तिने या चित्रपटात माधवी सावंत ही महिला तुरुंग अधिकारी जीवंत केली आहे. आजपर्यंतची सर्वाधिक आव्हानात्मक भूमिका तिला या निमित्ताने करायला मिळाली आहे.

सौ. स्वाती संजय पाटील यांच्या‘शांताई मोशन पिक्चर्स’ निर्मित आणि संजय कृष्णाजी पाटील व श्री माऊली मोशन्स पिक्चर्स प्रस्तुत ‘बंदिशाळा’चे सहनिर्माते पायल गणेश कदम, मंगेश रामचंद्र जगताप असून या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद, गीते आणि प्रस्तुती अश्या विविधांगी भूमिका संजय कृष्णजी पाटील यांनी पार पडल्या असून दिग्दर्शन मिलिंद लेले यांचे आहे. जेष्ठ सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून ‘बंदिशाळे’तील घटनाक्रम पहायला मिळणार असून संजय कृष्णाजी पाटील लिखित चार गीतांना संगीतकार अमितराज यांनी स्वरबद्ध केले आहे. यामध्ये प्रार्थना, लावणी, थीम सॉंग आणि लग्नगीत असून प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, प्रियांका बर्वे, आरती केळकर, आरोही म्हात्रे इत्यादी गायकांच्या आवाजाचा पगडा ही गीते ऐकताना – चित्रपट पाहताना रसिकांवर पडल्यावाचून राहणार नाही. प्रसिद्ध कोरिओग्राफर विठ्ठल पाटील यांनी या चित्रपटातील गाण्यांवरसाजेशी नृत्यरचना केली आहे. बंदिशाळेसाठी तुरुंगाचा भव्य सेट नरेंद्र हळदणकर यांनी उभा केला असून रंगभूषा विजय पाटील यांनी केली आहे. ध्वनिमुद्रण प्रकाश निमकर यांनी केले असून प्रमुख सहाय्यक दिग्दर्शन सुनील मांजरेकर यांचे आहे. प्रॉडक्शन कंट्रोलर शंकर धुरी तर फायनान्स कंट्रोलर पी.आर. पालवे यांनी केले आहे. चित्तथरारक साहसदृश्य प्रशांत नाईक यांनी डिझाईन केली असून पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे यांनी दिले आहे. बंदिशाळेला वेगवान करण्यासाठी संकलक भक्ती मायाळू यांचे कसब लागले असून इंग्रजीमध्ये उपशीर्षके विशाखा गोखले यांनी लिहिली आहे. कार्यकारी निर्मितीची सूत्रे राम कोंडू कोंडीलकर यांनी सांभाळली आहेत.

‘बंदिशाळा’या चित्रपटात मुक्ता बर्वे यांच्यासोबतच विक्रम गायकवाड, शरद पोंक्षे, हेमांगी कवी, सविता प्रभुणे, अशा शेलार, प्रवीण तरडे, अश्विनी गिरी, अजय पुरकर, शिवराज वाळवेकर, आनंद आलकुंटे, अभिजीत झुंजारराव, आनंदा कार्येकर, प्रसन्न केतकर, वर्षा घाटपांडे, सोनाली मगर, प्रताप कळके, राहुल शिरसाट, पंकज चेंबूरकर, लक्ष्मीकांत धोंड, अनिल राबाडे, उमेश बोलके, अनिल नगरकर आणि उमेश जगताप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण, पुणे शहर, पुणे ग्रामीण, भोर तालुका, मुंबई अश्या ठिकाणी करण्यात आले आहे. ही एक भव्य आणि उत्कंठावर्धक कलाकृती असून येत्या २१ जून २०१९ रोजी आपले मनोरंजन करण्यासाठी जवळच्या चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट सोहळ्याला ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांची विशेष उपस्थिती

0
२६ मे रोजी रंगणार एनएससीआय मध्ये पुरस्कार वितरण सोहळा
मुंबई – येत्या २६ मे रोजी होणा-या ५६ व्या राज्य राठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ऑस्कर अकादमीचे विद्यमान अध्यक्ष जॉन बेली उपस्थित राहणार आहेत.वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे सायंकाळी ६.३० वाजता पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, ऑस्करच्या स्थापनेपासून ऑस्करचे कोणतेही अध्यक्ष यापूर्वी कधीच भारतात आले नव्हते. ऑस्करच्या स्थापनेपासून भारतामध्ये येणारे जॉन बेली हे पहिलेच अध्यक्ष आहेत.हे प्रथमच घडत असावे. ऑस्कर अध्यक्षांना निमंत्रित करुन मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय गोष्टी त्यांच्या मार्फत जगभरातील सिनेसृष्टीत पोहचविण्याच्या दृष्टीने हा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे.
जॉन बेली यांनी या  पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहावे यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक सचिव भूषण गगराणी व ऑस्कर अकादमीचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर यांनी विशेष प्रयत्न केले.
जॉन बेली हे गेली २ वर्षे ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष आहेत. ऑस्कर अकादमीच्या सिनेमॅटोग्राफर विभागातून त्यांची ही निवड झाली आहे. कॅलिफोर्निया येथील “School of cinematic Art” येथून त्यांनी पदवी प्राप्त केली. १९७१ ते २०१७ पर्यंत वेगवेगळ्या ७० हुन अधिक हॉलिवूड चित्रपटांचे त्यांनी छायाचित्रण केले. तसेच हॉलिवूड चित्रपटांसाठीही त्यांनी दिग्दर्शनही केले आहे.  “American Society of cinematographers” चा जीवनगौरव पुरस्काराने प्राप्त झाला आहे. येत्या १९ मे रोजी आयोजित केलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हस मध्ये बेली यांचा विशेष गौरव होणार आहे. उज्ज्वल निरगुडकर यांनी स्वत जॉन बेली यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना महाराष्ट्राच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले आणि बेली यांनी हे निमंत्रण स्वीकारले असेही विनोद तावडे यांनी सांगितले.
गेले चार वर्ष  आम्ही वेगवेगळे प्रयत्न करत आहोत. पहिल्यांदा आम्ही मराठी सिनेमा हा “गोवा फिल्म फेस्टीव्हलला” पाठवायला सुरुवात केली. आणि जगभरातून येणाऱ्या लोकांना चांगले सिनेमे दाखवायला सुरुवात केली. मग “कान्सला” पण आपण मराठी सिनेमा पाठवायला लागलो, त्याठिकाणी विश्वातल्या वेगवेगळे डायरेक्टर्स आणि प्रोडयुसर्स यांना आपण मराठी सिनेमे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहोत,असेही श्री.तावडे यांनी सांगितले.
      ऑस्कर चे अध्यक्ष जॉन बेली २५ मे व २६ मे २०१९ असे दोन दिवस मुंबईत येत आहेत. या दोन दिवसात बेली महाराष्ट्र मराठी चित्रपट सोहळ्याला उपस्थित राहणार आहेतच पण त्याव्यतिरिक्त चित्रपट सृष्टीतील संबंधितांची मान्यवरांची भेट घेणार आहेत असेही तावडे यांनी सांगितले. बेली यांच्या मुंबई भेटीचा मोठा लाभ मराठी चित्रपट सृष्टीला तर होईलच पण देशातील सर्वच चित्रपटसृष्टीलाही याचा सकारात्मक लाभ होऊ शकेल असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
बेली यांच्या पत्नी कॅरॉल लिटलटन सुध्दा या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. बेली यांच्या पत्नी या व्यवसायाने फिल्म एडिटर  असून त्यांनी ३० हुन अधिक चित्रपटांचे एडिटिंग केले आहे. यामध्ये  हॉलिवूडचे सुप्रसिध्द दिग्दर्शक स्टीवन स्पिलूबर्ग यांच्या गाजलेल्या  “Et the extra-terrestrial” या चित्रपटाचा ही समावेश आहे.
राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे ५६ वे वर्ष आहे. चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. त्याचप्रमाणे व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, राज कपूर विशेष योगदान जीवन गौरव पुरस्कार या सर्वोच्च पुरस्काराचे वितरण सुध्दा २६ मे रोजी होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील नामंवत अभिनेते,अभिनेत्री, दिग्दर्शक उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांना व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, प्रसिध्द दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना राज कपूर विशेष योगदान जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा

 
पुणे- ‘ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑङ्ग इंडिया’च्या पुणे शाखेच्या वतीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कुंदनमल ङ्गिरोदिया सभागृहात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे आयोजन करण्यात आले होते. 
एन. एम. वाडिया हॉस्पिटलचे नर्सिंग संचालक बि‘गेडियर (निवृत्त) जनेत डीन यांना या वर्षीच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आरोग्य सेवेत वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणार्‍या परिचारिकांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. 
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे आणि पूना हॉस्पिटलचे नर्सिंग सुपरिटेंडन्ड पिल्ले सुशिला आनंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आरोग्य सेवा, रोग होऊ नये प्रतिबंधक उपाय आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेत परिचारिकांची भूमिका महत्त्वाची असते. त्या निस्वार्थीपणे समाजाची सेवा करीत असतात असे मत डॉ. कुंटे यांनी यावेळी व्यक्त केले. शहरातील सर्व महत्त्वाच्या रूग्णालये व प्रशिक्षण संस्थांमधील परिचारिकांची उपस्थिती होती.

महाराष्ट्रातील नौकऱ्या, उद्योग यावर पहिला हक्क महाराष्ट्रीयनांचा -राज ठाकरे

0
ठाणे: आरक्षण देण्याच्या नावाखाली राज्य सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नसताना त्यांनी आरक्षणाची घोषणा करून मराठा समाजाची दिशाभूल केली आहे, अशी टीक करतानाच महाराष्ट्रातील सरकारी आणि खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांनाच प्राधान्य दिल्यास महाराष्ट्रात आरक्षण देण्याची गरजच पडणार नाही, असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

ठाण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता राज ठाकरे यांनी हे मत मांडले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबाही दिला. मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर पेढे वाटून आनंद साजरा करणारे भाजपचे नेते कुठे आहेत? असा सवाल करतानाच जी गोष्ट आपल्या हाती नाही, त्याची राज्यसरकार घोषणा कशी करू शकते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मग विचारवंत, साहित्यिक म्हणून का मिरवताय?

देशातील परिस्थितीवर प्रत्येकानं बोललं पाहिजे. साहित्यिक आणि विचारवंतांनीही बोललं पाहिजे, असं सांगतानाच देशातील परिस्थितीवर बोलत नसाल तर साहित्यिक आणि विचारवंत म्हणून कशाला मिरवताय? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. भाजपचं सरकार म्हणून नव्हे तर उद्या काँग्रेसचं किंवा माझंही सरकार आलं तरी त्यावर विचारवंत आणि साहित्यिकांनी बोललंच पाहिजे, असंही ते म्हणाले.

दुष्काळासाठी काय कामं केली?

दुष्काळावरूनही राज यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. दुष्काळासाठी राज्य सरकारने काय केलं ते सांगावं. दुष्काळाची कामं केली तर मग दुष्काळ जाहीर का करावा लागला, २९ हजार गावं दुष्काळग्रस्त म्हणून का जाहीर करण्यात आली, दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी यावेळी केली.

हल्ल्या आधीचं ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो, असा सल्ला मी दिला होता असं मोदींनी म्हटलं होतं. या वक्तव्यावरून जगभरात आपली खिल्ली उडवली जाते आहे, असा चिमटाही राज यांनी काढला.

-परदेशात अभ्यास दौऱ्यासाठी जाणाऱ्या नेते आणि अधिकाऱ्यांना पकडून काय अभ्यास केला हे एकदा विचाराच

– टँकरची लॉबी कोणाची आहे? कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे, हे तपासा; आम्हीही तपासतोय

-धंदा चालवण्यासाठीच राजकारण्यांकडून टँकर लॉबीला मोकळं रान करून दिलं जातंय

नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारताचा पहिला हिंदू दहशतवादी:-कमल हसन

0

चेन्नई – अभिनेता ते राजकीय नेते बनलेले कमल हसन आपल्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत आले आहेत. स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हिंदू होता असे वक्तव्य त्यांनी केले आहे. तामिळनाडूच्या अरावकुरिचि येथे प्रचार मोहिमेत ते बोलत होते. मुस्लिम बहुल असलेल्या या ठिकाणी त्यांनी नथुराम गोडसेचा मुद्दा काढला. स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी हाच नथुराम गोडसे होता असे ते म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानावर भाजपने तीव्र आक्षेप नोंदवला. तसेच ते आगीशी खेळत असल्याची प्रतिक्रिया जारी केली आहे.

कमल हसन यांनी सांगितल्याप्रमाणे, स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी नथुराम गोडसे होता. केवळ एका मुस्लिम बहुल भागात प्रचार करतोय म्हणून मी हे विधान करत नाही. प्रत्यक्षात, माझ्यासमोर गांधींची प्रतिमा आहे. त्यांच्याच हत्येचे उत्तर मी शोधतोय. एक सच्चा भारतीय म्हणून सर्वांना समान अधिकार मिळेल असा देश मला हवा आहे. यापूर्वी 2017 मध्ये सुद्धा कमल हसन अशाच स्वरुपाचे विधान करून चर्चेत आले होते. त्यांनी केलेल्या हिंदू कट्टरवादावरील वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला होता.

कमल हसन आगीशी खेळत आहेत -भाजप
हसन यांच्या वक्तव्यावर भाजपने तीव्र आक्षेप नोंदवला. भाजप प्रदेशाध्यक्ष तमिलसई सौंदरराजन यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया जाहीर केली. “गांधींची हत्या आणि हिंदू दहशतवादाचा मुद्दा उचलणे निंदणीय आहे. तामिळनाडूच्या पोटनिवडणुकीपूर्वी कमल हसन अल्पसंख्याकांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची मते मिळवण्यासाठी ते अशा स्वरुपाचे विधान करत आहेत. त्यांनी श्रीलंका बॉम्बस्फोट प्रकरणी काहीही का बोलले नाही असा सवाल भाजपने उपस्थित केला.

अरुण खोरे यांना फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार प्रदान

पुणे : आजही समाजात वंचित घटकांवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती आहेत. त्या प्रवृत्ती बाजूला ठेवण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबविला पाहिजे. लक्ष्मण माने यांच्यासारख्या काही व्यक्ती वंचित समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. वंचितांसाठी झटणाऱ्या चांगल्या प्रवृत्तीही समाजात आहेत. त्यामुळे वंचितांसाठीचे हे कार्य असेच पुढे सुरू ठेवायला हवे,” असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
जकातवाडी (ता. सातारा) येथील यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयात फुले-आंबेडकर साहित्य पंचायत, भटक्या विमुक्त जमाती संघटना व भारतीय भटके विमुक्त संशोधन संस्थेच्या वतीने दिला जाणारा फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे (मानचिन्ह व १० हजार रुपये रोख), जीवनगौरव पुरस्कार अंकुश काळे (मानचिन्ह व पाच हजार रुपये रोख) व युवा साहित्य पुरस्कार सुप्रिया सोळांकूरे (मानचिन्ह व पाच हजार रुपये रोख) यांना पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, लक्ष्मण माने आदी उपस्थित होते. अंकुश काळे हे पारधी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, तर
शरद पवार म्हणाले, “वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना प्रसिद्धीची अपेक्षा नसते. या घटकांचे भले होण्यातच त्यांना समाधान असते. त्यासाठी कोणी लेखणीतून, तर कोणी साहित्यातून, तर कोणी प्रत्यक्ष काम करून आपल्या भावना रेखांकित करतात.” अरुण खोरे म्हणाले, “सर्व चळवळीत एका व्यक्तीवर कायम अन्याय झाला आहे. ते म्हणजे महात्मा गांधी होय. गांधीजींना अस्पृश्य न ठेवता चळवळींशी जोडून घेतले पाहिजे. त्यासाठी वैचारिक सांधेजोड झाली पाहिजे.”

‘स्टीम’ संकल्पनेवर आधारित प्रदर्शन …

हिंजवडी येथील एडिफाय इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्टीम (एसटीईएम – सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, आर्ट्स अँड मॅथेमॅटिक्स) प्रदर्शनाचा नुकताच यशस्वी समारोप झाला. या प्रदर्शनाने विद्यार्थी, पालक समुदाय व देशभरातील स्टीम कंपन्यांसह जवळपास ५०० प्रेक्षकांना आकर्षित केले. स्टीम शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक कुतूहलास प्रोत्साहन देते आणि ते भिन्नशाखीय भर देण्यातून प्रेरित असल्याने विद्यार्थ्यांना चिकित्सात्मक विचार करण्याचे बहुविध अन्य मार्गही शिकता येतात. हे शिक्षण विद्यार्थ्यांना दूरदृष्टीचे, सर्जनशील व स्वतंत्र विचार करणारे बनवते.

यासंदर्भात शाळेच्या संचालक चांद बुधरानी म्हणाल्या, प्रोग्रॅमिंगचे ज्ञान हे कंटाळवाणे असले तरी नाविन्यपूर्ण व रंजक शैक्षणिक खेळणी आणि स्मार्ट रोबोंमुळे किशोरवयीन मुलांना संवादात्मक खेळांमध्ये गुंतून टप्प्या टप्प्याने आवश्यक ते ज्ञान मिळण्यास एक अवकाश मिळतो आणि त्यातूनच मुलांमधील ज्ञानतृष्णेला प्रेरणा मिळू शकते. ही बाब लक्षात घेऊन एडिफायने प्लेझ्मोच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ निर्माण केले आहे, ज्यायोगे त्यांना प्रकाश, बल, गती, दाब, ऊर्जा, वीज, चुंबकत्व, काळ, जलशक्ती, अन्न भेसळ, बायोप्लास्टिक अशा अनेक प्रात्यक्षिक संकल्पनांचे आकलन होऊन ते त्यांच्या ज्ञानाचा वापर करु शकतील.

या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी प्रकल्प, प्रतिकृती, प्रयोग व सादरीकरणांतून विविध स्टीम संकल्पनांविषयीचे त्यांचे आकलन प्रदर्शित केले. ‘एडिफाय’च्या पर्य़ावरणवाद या मध्यवर्ती मूल्याशी सुसंगती राखून विद्यार्थ्यांनी जागतिक तापमानवाढ, प्रदूषण, अन्न सुरक्षा व ऊर्जा संकट अशा जागतिक पर्य़ावरणविषयक समस्या निश्चित करुन पर्यावरणाप्रती आपली संवेदनशीलता प्रतित केली.

प्रदर्शनाला विविध क्षेत्रांची पार्श्वभूमी असलेल्या प्रेक्षकांच्या प्रचंड समुदायाचा प्रतिसाद मिळाला. अध्यापनाचा दृष्टीकोन व एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेली अध्ययन क्षमता यामुळे हे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. पीवायपी व एमवायपी अशा दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रतिकृती व प्रयोग पाहुण्यांसमोर आत्मविश्वासाने सादर केले व त्यांच्या प्रश्नांनाही बुद्धिमत्तेने उत्तरे दिली.

प्रदर्शनाने विद्यार्थ्यांना विज्ञान, रचना व तंत्रज्ञान, गणित व कला अशा विषयांचा अशा पद्धतीने समन्वय साधण्यासाठी सामाईक व्यासपीठ पुरवले ज्यातून विद्यार्थ्यांमधील सर्जनशील व विश्लेषणात्मक विचार कौशल्यांना उत्तेजना मिळावी आणि त्यांना त्यांच्या एकात्मिक ज्ञानाचा वापर उत्पादक चौकशीसाठी करणे शक्य व्हावे.

आव्हानासाठीच्या तयाऱ्या, कष्ट व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अपयशातून शिकणे यांचा एकत्रित परिणाम म्हणजे यश, अशी ‘एडिफाय’ची श्रद्धा असून येथील विद्यार्थी सहकारी व शिक्षकांसमवेत आपल्या शाळेला असे ठिकाण बनवण्यासाठी सातत्याने परिश्रम करतात, जेथे ते एकमेकांप्रती प्रेम बाळगायला आणि अध्ययनावरही प्रेम करायला शिकतात.

भारतीय उद्योजकांनी अफगाणिस्तानात उद्योग उभारावेत; नसीम शरीफी यांचे आवाहन

ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे पश्चिम विभागीय पुरस्कारांचे वितरण
पुणे : “अफगाणिस्तानात पेट्रोलियम, मेडिसिन यासह फळे आणि सुकामेवाचा उत्पादनाच्या निर्यातीत मोठ्या संधी आहेत. कार्पेट, मार्बल्स, सिल्क, सफ्रॉन या गोष्टीं अफगाणिस्तानात प्रसिद्ध असून, त्यात व्यवसाय उभारण्यासाठी भारतीयांना संधी आहेत. आमच्या देशात उद्योग सुरु करण्याची प्रक्रिया आणि करप्रणाली अतिशय सोपी आहे. त्याचा परवानाही केवळ तीन दिवसात मिळतो. भारतीयांकडे ज्ञान आणि व्यावसायिक तंत्र मोठ्या पप्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय उद्योजकांचे अफगाणिस्तानात स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. भारतीय उद्योजकानी अफगाणिस्तानात येऊन उद्योग उभारावेत,” असे आवाहन अफगाणिस्तानचे कॉन्सुल जनरल नसीम शरफी यांनी केले.
ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (जीआयबीएफ) आयोजित पश्चिम विभागीय पुरस्कार सोहळ्यावेळी नदीसीम शरीफी बोलत होते. प्रसंगी शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, अफगाणिस्तानचे कॉन्सुल जनरल अब्दुल नफी सरवारी, इथिओपियाचे कॉन्सुल जनरल तेस्फामरियम मेस्केल, ‘जीआयबीएफ’चे ग्लोबल प्रेसिडेंट डॉ. जितेंद्र जोशी, कोऑर्डिनेटर दीपाली गडकरी, अभिषेक जोशी आदी उपस्थित होते. विविध क्षेत्रात यशस्वी उद्योग उभारणाऱ्या २५ उद्योजकांना ‘जीआयबीएफ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्याआधी  ‘पश्चिमेपलिकडील व्यापार आणि अफगाणिस्तान, इथियोपिया व इंडोनेशिया येथे व्यापाराच्या संधी’ या विषयावर चर्चासत्र झाले. अफगाणिस्तानचे कॉन्सुल जनरल नदीम शरिफी, इथियोपियाचे कॉन्सुल जनरल तेस्फामरियम मेस्केल, अनंत सरदेशमुख, हरि श्रीवास्तव, सागर आरमोटे, निखिल ओसवाल यांनी सहभाग घेतला. यावेळी भारतातील व्यावसायिक बाहेरच्या देशात जाऊन उद्योग किंवा त्या देशातल्या व्यक्तीसोबत व्यवसायात भागीदारी कशाप्रकारे करू शकतात, यावरही चर्चा झाली. इथियोपियाच्या कॉन्सुल जनरल मेस्केल यांनी तेथील नियम, अटी, कायदा, प्रसिद्ध वस्तू, प्रचलित व्यवसाय, भारतीयांसाठीच्या संधी अशा गोष्टींवर मार्गदर्शन केले. कॉफीच्या क्षेत्रात उद्योग करणाऱ्यांसाठी खूप मोठी संधी उपलब्ध असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “जगभरातील व्यापाराच्या संधींचा वेध घेत आपला व्यवसाय जागतिक स्तरावर नेला पाहिजे. गेल्या पाच वर्षांत राज्य आणि केंद्र सरकारने जागतिक स्तरावर उद्योगांना प्रोत्साहन दिले आहे. अनेकदा अमेरिकेसह इतर देशांमध्ये जाणे झाले. सगळे जग भारताकडे व्यापारी संधींचे दालन म्हणून पाहत आहे. विविध देशातील उद्योजक भारतात येत आहेत, तर भारतीयांनाही  परदेशात व्यवसाय विस्तारासाठी निमंत्रित केले जात आहे. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमने विविध देशांत व्यापारासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा भारतीय उद्योजकांनी फायदा उठवावा. सर्व प्रकारच्या उद्योगांना जागतिक व्यासपीठ देण्यासाठी डॉ. जितेंद्र जोशी यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.”
डॉ. जितेंद्र जोशी म्हणाले, “कोणत्याही देशाच्या प्रगतीत तेथील औद्योगिक क्षेत्राचा मोठा वाटा असतो. लघु व मध्यम उद्योगांना जागतिक स्तरावर व्यवसाय विस्तारासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम काम करत आहे. या फोरममध्ये अनेक देशांचे कॉन्सुलेट, मंत्री सहभागी होत असून, उद्योग देवाणघेवाण करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.” मुग्धाला करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. दीपाली गडकरी यांनी आभार मानले.

राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात ‘पुरुषोत्तम’ चा स्पेशल शो संपन्न.

पुणे (प्रतिनिधी) :-  औरंगाबाद महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या प्रशासकीय कामगिरीवर आधारित ‘पुरुषोत्तम’ हा मराठी चित्रपट शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.
पुणे येथे राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या कोथरूड येथील मिनी थिएटरमध्ये शनिवारी दि. ११ मे रोजी दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त या ‘पुरुषोत्तम’ या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दिग्दर्शिका रिमा अमरापूरकर, अभिनेत्री देविका दप्तरदार, केतकी अमरापूरकर, पूजा पवार, अभिनेते नंदू माधव, उमेश घेवरीकर, देवीप्रसाद सोहोनी, दिप्ती घोडके, भगवान राऊत, सुहास लहासे, सहाय्यक दिग्दर्शिका भाग्यश्री राऊत आदी उपस्थित होते.
लोकहिताची कामे करणाऱ्या प्रामाणिक व कर्तव्य दक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांचे काम जनतेसमोर यावे या हेतूने संवेदना फिल्म फौंडेशन व आदर्श ग्रुप निर्मित, श्रीमती सुनंदा अमरापूरकर प्रस्तुत ‘पुरुषोत्तम’ हा चित्रपट  सर्व जनतेने चित्रपट गृहात जाऊन पहावा, असे आवाहन दिग्दर्शिका रिमा अमरापूरकर यांनी यावेळी केले.
पुरुषोत्तम या चित्रपटाच्या माध्यमातून तत्कालीन म.न.पा. आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भूमिका मी या चित्रपटात साकारली आहे. आपल्याच मातीतील, आपल्याच माणसांची कामगिरी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहावा व पुरुषोत्तमच्या टिमला पाठबळ द्यावे असे आवाहन नंदू माधव यांनी यावेळी केले.
जेष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी पुरुषोत्तम या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. यावेळी सुनिल सुकथनकर, सुनिल महाजन, प्रा. मंगेश जोशी, शांभवी जोशी, दिग्दर्शक मिलिंद लेले, डॉ. अनिल अवचट यांच्यासह पुण्यातील साहित्य, कला, क्रीडा, नाट्य, व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असताना राज्याचं हक्काचं 46 टीएमसी पाणी गुजरातमध्ये पाठवले, मनसेच्या माजी आमदाराचा आरोप

0

मुंबई- महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ असतानाही राज्याने आपल्या हक्काचे 46 टीएमसी पाणी गुजरातला दिल्याचा आरोप मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन भोसले यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व करत असून त्यांच्याकडे याचे कोणतेही उत्तर नसल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी जनतेला खोटी माहिती दिल्याचा आरोप भोसले यांनी केला. राज्यातल्या 13 जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. पण या परिस्थितीतही आपल्या हक्काचे पाणी गुजरातला दिले जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना कोणताही करार झाला नव्हता. मुख्यमंत्री जाहीर भाषणात खोटी माहिती देत आहेत, असा आरोपही नितीन भोसले यांनी केलाय.

नितीन भोसले 13 दुष्काळी जिल्ह्यात पाणी यात्रा काढणार आहेत. गुजरातला जाणारे पाणी महाराष्ट्रासाठी साठवून परत ते दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना देण्यात यावे असी त्यांची मागणी आहे. महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देऊन मोदी-शाह यांना खुश केले जात आहे. मुख्यमंत्र्यांशी अनेकदा याविषयी बोलणे झाले, पण आमच्याकडे पैसे नाहीत आणि केंद्रातून जेव्हा पैसे येतील तेव्हा आम्ही पाण्याचा विचार करू अशी उत्तरे मुख्यमंत्र्यांकडून मिळतात, असे नितीन भोसले यांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांवर गुजरातला पाणी दिल्याचा आरोप केला होता. पण आघाडी सरकारच्या काळात अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना झालेला पाणी देण्याचा करार मी स्वतः रद्द केला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. पण मुख्यमंत्र्यांनी भरसभेत खोटी माहिती दिली, असा आरोप नितीन भोसले यांनी केला आहे. यापूर्वी नितीन भोसले यांनी याविरोधात कोर्टात याचिकाही दाखल केली होती.

”एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही” ही राज्य सरकारची फक्त वलग्ना आहे. 1 एप्रिललाच महाराष्ट्रातून गुजरातला पाणी सोडण्यात आल्याचे भोसले म्हणाले होते. नार-पार, तापी, नर्मदा, दमनगंगा, पिंजाळ या नद्यांतून तब्बल 1330 दशलक्ष घन मीटर पाणी कच्छ आणि सौराष्ट्रकडे वळवण्याचा हा प्रस्ताव म्हणजे राज्यात पाण्याची कमतरता असतानाही लोकांच्या हक्काचे पाणी पळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नितीन भोसले यांनी केला होता.

पुणे महापालिकेच्या चार जागांसाठी निवडणूक-समाविष्ट गावातून येणार २ नगरसेवक

पुणे-महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या दोन नगरसेवकांच्या एका प्रभागासह ,नगरसेवक पद रद्द झाल्याने नव्याने रिक्त झालेल्या दोन जागा अशा चार जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक एक (अ) आणि प्रभाग क्रमांक २४ (ब) या ठिकाणच्या नगरसेवकांचे पद रद्द झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या चार जागांसाठी जून महिन्यांत पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

राज्यभरातील दहा महापालिकांमध्ये जवळपास २० नगरसेवकांची पदे रिक्त असून, त्यासाठीची पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. पुणे महापालिकेत नव्याने दोन तर रिक्त झालेली दोन अशा चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. पुणे महापालिकेत नव्याने ११ गावांचा समावेश करण्यात आल्याने लोकसंख्येच्या प्रमाणात दोन नगरसेवकांची संख्या ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने दोन नगरसेवकांचा एक प्रभाग तयार करण्यात आला असून, या नगरसेवकपदांसाठी निवडणूक होणार आहे.

याशिवाय प्रभाग क्रमांक एकमधील (अ) भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका किरण जठार आणि प्रभाग क्रमांक २४ (ब) मधील ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेविका रुक्साना इनामदार यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. या दोन जागांसाठी नव्याने पोटनिवडणुका होणार आहेत. या चारही निवडणुका एकाच वेळी घेण्यात येणार असून, त्यासाठीची

प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी १७ मे पर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीवर १७ ते २१ मे दरम्यान हरकती-सूचना नोंदविण्याची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर २७ मे ला अंतिम प्रभागनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करून ती २९ मे रोजी मतदान केंद्रनिहाय जाहीर करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर जून महिन्यांत निवडणूक होण्याची शक्यचा असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांमुळे पुण्यातील हजारो कामगार मृत्युच्या दाढेत …

पुणे-पुण्यातील कामगारांची सुरक्षा आणि हक्क यांना शास्कीत स्तरावरूनच तिलांजली  देण्यात आली असून हडपसर परिसरात उरळी देवाची, फुरसुंगी आणि मंतरवाडी येथे नव्याने विकसित झालेल्या कपड्यांच्या बाजारपेठेतील दुकानांमध्ये कामगार कायद्यांची किमान अंमलबजावणीही होत नसल्याची माहिती तमाम लोकांना ज्ञात  आहे. तसेच, कामगारांच्या सुरक्षेसाठीही आवश्यक पावले उचलण्याच आलेली नसल्याने परिस्थिती अपघातप्रवण बनली असून, त्यामुळे सुमारे १५० दुकानातील पाच ते सहा हजार कामगार अपघातांच्या तोंडावर उभे असल्याचा निष्कर्ष अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीने काढला आहे. आपल्या कर्तव्य बजावण्याऐवजी कामगार उपायुक्त आणि सुरक्षा संचालक कार्यालय मात्र आपल्याच तंद्रीत मश्गुल असल्याचे वार्षाणु वर्षे दिसून येते आहे .

हडपसर-सासवड रस्त्यावर उरळी देवाची या ठिकाणी राजयोग कापड दुकानाला आग लागली. त्या वेळी दुकानाला बाहेरून कुलूप असल्याने आत झोपलेल्या पाच तरुण कामगारांचा त्यात मृत्यू झाला. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी (१० मे) अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घटनास्थळी प्रत्यक्ष भेट दिली.

या ठिकाणी मोठ्या संख्येने असलेल्या दुकाने आणि गोदामांच्या रचनेची त्यांनी पाहणी केली. दुकानांमधील कामकाजाची पद्धत, कामगारांच्या कामाची माहिती घेतली. तसेच, दुकानांमध्ये काम करणारे कामगार, मालक, उरळी देवाची गावातील विविध क्षेत्रातील नागरिक यांच्याशी चर्चा केली. दुकानांमध्ये कामगार कायद्यांची किमान अंमलबजावणीही होत नसल्याचे दिसून आले.

कामगारांना आठवड्याची पगारी सुट्टी, आठ तासाचे काम, त्यावरच्या कामाचा जादा मोबादला, नियमानुसार किमान वेतन, विमा, आजारपणात उपचाराची व्यवस्था, भविष्य निर्वाह निधी इत्यादी सामाजिक सुरक्षेची अमलबजावणी करावी, तसेच अपघात पुन्हा होण्याची श्यक्यता निकालात काढावी, अशी मागणी करणारे निवेदन पुणे जिल्ह्याचे कामगार उपयुक्त विकास पनवेलकर यांना समितीने दिले. कामगार नुकसान भरपाई कायद्यानुसार अपघातात मृत कामगारांच्या वारसांना भरपाई मिळावी. नुकसान भरपाईच्या निश्चितीसाठी अपघाताची माहिती कामगार अपघात नुकसान भरपाई आयुक्त तथा कामगार न्यायधीश यांच्याकडे पाठवावी अशीही मागणी शिष्टमंडळाने या वेळी केली.

समितीचे निमंत्रक नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात ‘लोकभारती’चे प्रमोद दिवेकर, राकेश नेवासकर, प्रीतम ओस्वाल याचा समावेश होता. या विषयी प्रशासन गंभीर असून, येत्या आठवड्यातच सर्व व्यापाऱ्यांची आपण बैठक घेणार आहे. त्यांनी कामगारांना द्यावयाच्या सोयी सवलती, हक्क इ. बाबत त्यांना सूचना दिल्या जातील. त्याचे पालन न झाल्यास कायदेशीर कडक कारवाई केली जाईल, असे पनवेलकर या वेळी म्हणाल्याचे समितीने कळविले आहे.

युवकांनी राजकारणातही यशस्वी व्हावे : डॉ. सप्तर्षी

पुणे :’युवक क्रांती दल ‘आयॊजीत ‘युवक आणि राजकारण ‘ या विषयावरील कार्यशाळेला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ( गांधीभवन ) कोथरूड येथे  शनिवार, ११ मे २०१९ रोजी ही एक दिवसीय कार्यशाळा झाली .
सकाळी १० ते सायं ४ पर्यंत विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले .
पहिल्या सत्रात संदीप बर्वे,जांबुवंत मनोहर,अप्पा अनारसे, फिरोज मुल्ला यांनी  युवा भान,ग्रामीण भागाची सध्याची परिस्थिती आणि राजकारण ‘या विषयांवर प्रभावी मांडणी केली. ‘माझा वैचारिक प्रवास ‘ या विषयावर मनोगत व्यक्त केले
दुसऱ्या सत्रात ‘युवक क्रांती दलाचे ‘ संस्थापक  डॉ.कुमार सप्तर्षी यांनी ‘राजकारणाचा अर्थ समजुन घेताना’ या विषयवार सविस्तर मार्गदर्शन केले .ते म्हणाले ,’
डॉ. कुमार सप्तर्षी यांनी जागतिक इतिहासातील क्रांतीचा मागोवा घेतला. तरुण पिढीला क्रांती चे आकर्षण असते. पण, सर्जनशीलता दाबून , विचार दाबून संघटना, जाती, पक्ष चालवल्या जातात. माणसा- माणसातील अंतर कमी करणे हीच आजच्या काळात क्रांती होय.जातींमुळे माणसामाणसात अंतर निर्माण झाले. ते कमी करुन जातीमुक्त झाले पाहिजे.
लोकशाही मान्य केल्यावर राजकारण हे जीवनात अंतिम, अपरिहार्य आहे. त्यापासून फटकून राहता येणार नाही.
आता क्रांती केवळ राजकीय मार्गानेच शक्य आहे.युक्रांद कार्यकर्त्यांनी केवळ सामाजिक कामात समाधान न मानता राजकारणात यशस्वी व्हावे, अशी अपेक्षा डॉ. सप्तर्षी यांनी व्यक्त केली. दूरगामी ध्येय्य ठेवून काम केले पाहिजे, कारण एका -दोन पिढीत क्रांती होत नाही.जनशक्तीलाच बरोबर क्रांती करता येईल, मात्र, लौकिक कायम ठेवणारे राजकारण आपण केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला .
सुदर्शन चखाले, लहू आरेकर,महेश पाटील यांनी संयोजन केले

कोथरूड परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत

 

पुणे, – महापारेषण कंपनीच्या फुरसुंगी येथील  220/132  केव्ही उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे कोथरूड 132 केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा शुक्रवारी (दि. 10) रात्री 8.20 वाजता बंद पडला. यामुळे कोथरूड, वारजे परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. रात्री उशिरापर्यंत सर्व परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या फुरसुंगी 220/132 केव्ही उपकेंद्रातून कोथरूड 132 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा होतो. आज रात्री 8.20 वाजताच्या सुमारास फुरसुंगी उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कोथरूड 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी महावितरणचे देखील 6 उपकेंद्र बंद पडल्यामुळे प्रामुख्याने कोथरूड, कर्वेनगर, डेक्कन, वारजे, शारदा सेंटर, डहाणूकर काॅलनी, काकडे सिटी आदी परिसरातील सुमारे एक लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठ्याच्या पर्यायी व्यवस्थेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले. यामध्ये एनसीएल उपकेंद्रांसह इतर विविध उपकेंद्रातून पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये 60 मेगावाॅटपैकी 45 मेगावाॅटचे भारव्यवस्थापन करण्यात आले. सुमारे एक लाख वीजग्राहकांपैकी 60 वीजग्राहकांचा वीजपुरवठा लगेचच सुरु करण्यात आला. तर सुमारे 20 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पाऊण तासांनी सुरु करण्यात आला. उर्वरित 20 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरु असून रात्री उशिरा 10.30 पर्यंत या ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यात येत आहे.

———————————-