Home Blog Page 2903

पुण्यातील आंबेगावात भिंत कोसळली -6 जणांचा मृत्यू

पुणे-पुण्यातील कोंढवा येथील सीमा भिंत कोसळून दूर्घटना शनिवारी घडली होती. त्यानंतर आज पहाटे प्रकार पुन्हा आंबेगांव सिंहगड कँम्पसमध्ये सिमाभिंत कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यृ झाला आहे. दुर्घटनेत राधेलाल पटेल (२५), जेटू लाल पटेल (५०), ममता राधेलाल पटेल (२२) आणि जेटू चंदन रवते अशी मृतांची आत्तापर्यंत समजलेली नावं आहेत. या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले असून अग्निशमन दलातर्फे मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.
शनिवारी पुण्यातल्या कोंढवा भागात आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यात पुन्हा एकदा दुसरी दुर्घटना घडून त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत ठार झालेले मजूर छत्तीसगढचे रहिवासी आहेत असेही समजते आहे.

कोंढव्यातील घटनेत बिल्डर्सना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणी काय कारवाई होणार? आणि असे किती जीवआणखीजाणारआहेत ?असा सवाल आता उपस्थित होतो आहे

सीए स्थापना दिवसानिमित्त विविध उपक्रम; ५९९ जणांनी केले रक्तदान

पुणे : सनदी लेखापाल (सीए) स्थापना दिवसानिमित्त दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वतीने सीए सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यंदा ७० वा सीए स्थापना दिवस साजरा झाला. २७ जून ते १ जुलै यादरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात आला. पालखी सोहळ्यात स्वच्छता अभियान, वारकऱ्यांना फराळाचे वाटप, गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शन सत्र, आर्थिक साक्षरता कार्यक्रम व करिअर काऊन्सलिंग, ९ ठिकाणी रक्तदान शिबीर, मुकुंदनगर ते बिबवेवाडी अशी ‘नाईट मॅरेथॉन’, बिबवेवाडीतील शाळेच्या परिसरात १०५ रोपांचे वृक्षारोपण, आरोग्य आणि आहार यावर कार्यशाळा, मोफत आरोग्य तपासणी, अवयवदान जनजागृती कार्यक्रम यासह बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, स्विमिंग, बुद्धिबळ अशा क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
सीए विषयाचा अभ्यास करत असणारे विद्यार्थी, संस्थेचे सभासद, कर्मचारी यांनी सगळ्याच उपक्रमांत उल्लेखनीय सहभाग घेतला. शहराच्या विविध भागात ९ ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबिरात तब्बल ५९९ जणांनी रक्तदान केले. ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समितीचे सदस्य सीए आनंद जाखोटिया, ‘आयसीएआय’ पुणेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, सचिव सीए समीर लड्ढा, खजिनदार सीए काशिनाथ पाठारे, सीए राजेश अगरवाल, सीए अमृता कुलकर्णी प्रत्येक उपक्रमावेळी उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे आयोजन एकूण दहा ठिकाणी करण्यात आले होते. रक्ताचे नाते चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष राम बांगड यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाट्न झाले. रक्तदान शिबिरांच्या काही ठिकाणांना भेट देत बांगड यांनी रक्तदात्यांना प्रोत्साहित केले. यंदा एकूण ५९९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सीए सुहास बोरा यांच्या ‘एसपीसीएम’ येथे सर्वाधिक रक्तदान १८० बॉटल्स रक्तसंकलन झाले. सीए ऋता चितळे म्हणाल्या, “यंदा सीए इन्स्टिट्यूट सत्तरावा वर्धापन दिवस साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन केले होते. सर्व सीए सभासद, विद्यार्थ्यांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. सीए दिवसरात्र एकत्र करून काम करतो. त्याच्या या कार्याच्या सन्मानासाठी ही नाईट मॅरेथॉन काढण्यात आली. अशा प्रकारची नाईट मॅरेथॉन प्रथमच काढण्यात आली.”

कॅरी…सर्व काही (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

0

‘नही नही, वो प्लास्टिक के पिशवी मे भाजी मत दो. मेरे पास हे कॉटन की कॅरी बॅग…’ एका खांद्याला पर्स, दुसऱ्या खांद्याला एक कॉटनची भरलेली पिशवी आणि हातात कॉटनचीच भाजीची पिशवी हे सगळं सांभाळण्याची तारेवरची कसरत करत या बाई भाजीवाल्याला सूचना देत होत्या.

कॅरी बॅग – माझ्याकडे रोज आता कॉटनची कॅरी बॅग असतेच, हे वाक्य बऱ्याच वेळा सार्वजनिक ठिकाणी कुणा ना कुणाकडून ऐकायला मिळतं. भाजीपाला, फळं, किराणा सामान इत्यादी सर्व काही कॅरी करणारी कॅरी बॅग. ‘कॅरी’ हा सुटसुटीत आणि छान शब्द. हा शब्द फक्त ‘कॅरी बॅग’ पुरताच मर्यादित नाही तर व्यवहारात तो बऱ्याच ठिकाणी सर्रास वापरला जातो. शाळेत जाताना डब्याची बॅग करी करणे, ऑफिस जाताना फाईल कॅरी करणे, पिकनिकला जाताना कोण कोण, काय काय नाश्ता आणि उपयोगी वस्तू कॅरी करताहेत यावर चर्चा, वगैरे.

लांबच्या प्रवासाला जातानाही नातेवाईक-मित्रमंडळी बरोबर काय काय कॅरी करायला हवे, त्याची भलीमोठी लांबलचक लिस्ट देतात आणि वर एक सल्लाही देतात-जेवढं झेपेल तेवढंच कॅरी करा हां…गंमतच आहे!

मे महिन्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या मुंबैकर गाड्यांच्या कॅरिअरवर किती वस्तू असतात…सायकल, भांड्याचा रॅक आणि येताना त्याच कॅरिअरवर आंब्याच्या पेट्या, फणस , नारळ व सोबत कॅरी केलेल्या गावच्या आठवणी…मातीचा गंध…

तसेच ‘कॅरी ऑन’ हा शब्दही नेहमीच आपण ऐकतो की. नवीन कपडे घातले की तेही चांगल्या प्रकारे कॅरी करता (म्हणजे सांभाळता) आले पाहिजेत. नुकताच एका लग्नातला प्रसंग- एक युवती छान डिझाईनर लॉन्ग पायघोळ ड्रेस घालून आली होती, त्यावर तितक्याच लांबीची ओढणी, त्यात हाय हिल्स…चालताना तिची अक्षरशः त्रेधातिरपीट उडत होती…नक्की काय काय सांभाळू. आपण जो काही ड्रेस घातला आहे तो चांगल्या प्रकारे कॅरीही करता आला पाहिजे – आजूबाजूला कुजबूज ऐकायला आली. खरंच आहे म्हणा…भरजरी ड्रेस आणि भडक मेकअप केला म्हणजे आपण खूप सुंदर दिसतो, असं नाही ना? त्यापेक्षा आपल्याला सांभाळता येईल, ज्यात आपण कम्फर्टेबल असू, जे कॅरी करणं सोपं जाईल, असा वेष परिधान करूनही आपण ग्रेसफुल दिसू शकतो.

कॅरी… काय काय आपण कॅरी करतो? फक्त कॉटनची पिशवीच, फाईल, डबा… नाही तर रोज आपण सगळेच बरोबर काही ना काहीतरी कॅरी करतोच की. खूप काही…टेन्शन, भीती, सुखदुःख, घरातले व्याप, ऑफिसची कामं…त्या कॅरी बॅगेसारखं कॅरी करतो…सर्व काही.

 

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वारी नारीशक्तीची उपक्रमात आरोग्याचे संदेश

0
पुणे : आषाढी पालखीनिमित्त `महाराष्ट्र राज्य महिला आयोगा’च्या वतीने `वारी नारीशक्ती`ची या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  या सक्षमीकरणाच्या दिंडीमध्ये दररोज एक क्षेत्रातील नामवंतांचा सहभाग असतो.  `डॉक्टर जनरल प्रॅक्र्टीशनर असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. नरेंद्र खेनट आणि डॉ. संगीता खेनट यांच्या नेतृत्वाखाली वीस सभासदांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. सासवड मुक्काम ठिकाणी हा उपक्रम झाला, अशी माहिती उषा बाजपेयी (महाराष्ट्र राज्य महिला आयोग, `वारी नारीशक्ती` उपक्रम संयोजिका) यांनी दिली.
डॉक्टरांच्या विशेष पथकाने आयोगाच्या चित्ररथावरील सॅनेटरिन नॅपकिनचे महत्त्व सांगितले. अध्यात्यामाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत स्वत:चे व समाजाचे आरोग्य कसे जपावे याचे मार्गदर्शन केले. तसेच वारीतील मार्गावर कमीतकमी प्रदूषण होण्यासाठीचे उपाय सांगितले.
डॉक्टर्स आणि वारकरी संवाद उपक्रमाला सुवर्णा जोशी, अ‍ॅड.वर्षा डहाळे, मुकुंद वर्मा यांनी सहकार्य केले.
या दिंडीमध्ये महिला सक्षमीकरणाचे संदेश देण्यासाठी वारीच्या दोन्ही मार्गांवर फिरता चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत २९ जून (शनिवार) रोजी `दिवली नाही विझता कामा’ हा लघुपट आणि `दामिनी’ हा चित्रपट दाखविण्यात आला.
या संपूर्ण उपक्रमाची संकल्पना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची आहे. त्यांनी उषा बाजपेयी यांच्याकडे दिंडी उपक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी दिली आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवराना आमंत्रीत करणे हे प्रमुख कार्य त्या करीत आहेत.
दिनांक ३० जून (रविवार) रोजी क्रिडापटूंनी वारकऱ्यांशी संवाद साधला यामध्ये मराठी चित्रपट कलाकार, डॉक्टर्स, क्रीडापटू, वास्तूरचनाकार, वकील, स्वयंसेवी संस्था, आर्मी ऑफिसर, मुस्लिम महिलांचे पथक यांचा सहभाग आहे. या उपक्रमातील चित्ररथ आणि महिला सक्षमीकरण दिंडीचा शुभारंभ शनिवारवाडा पुणे येथे झाला. महिला सक्षमीकरण हा या दिंडीचा प्रमुख उद्देश आहे. आषाढीची वारी हा महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मक वारसा आहे. या वारीत लक्षावधीच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. यात महिलांचा लक्षणीय सहभाग असतो. अध्यात्माचा समाजप्रबोधनासाठी प्रभावी वापर हे वारीचे खरे सूत्रे आहे. या सूत्राला अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचे कार्य महिला आयोग करत आहे.
वारी नारीशक्तीची या उपक्रमांतर्गत चित्ररथ आणि महिला सक्षमीकरणाची दिंडी  समाजप्रबोधनाचे कार्य  करणार आहे. महिला सक्षमीकरण या संकल्पनेवर आधारित महिलाचे कीर्तन, भारूड याचे आयोजन करण्यात येत आहे.

डॉक्टर्स डे ‘ निमित्त रंगला डॉक्टरांचा सन्मान सोहळा !

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर्स  सेल पुणे शहर तर्फे ‘डाॅक्टर्स डे ‘ निमित्त   वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डाॅक्टरांचा सन्मान सोहळा  आयोजित करण्यात आला होता   . अण्णाभाऊ साठे सभागृह , (पद्मावती पुणे-सातारा -रस्ता ) येथे हा कार्यक्रम झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चेतन तुपे आणि  राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर्स  सेल पुणे शहर अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांच्या हस्ते शहरातील नामवंत आणि उपक्रमशील डॉक्टर्स ,रुग्णामित्र आणि रक्तदान चळवळीतील संघटकांचा सत्कार करण्यात आला .

पद्मश्री डॉ. सुदाम काटे, डॉ.सुरेश पाटणकर, डॉ.किरण गद्रे, डॉ. अण्णासाहेब बिराजदार, डॉ. रवींद्र कोलते, डॉ. विश्वंभर हुंडेकर,  डॉ. अजित कारंजकर , डॉ. फकीम तकमिली, डॉ. योगेश सातव, डॉ. उमेश फडे, डॉ. ज्ञानेश्वर शेळके, डॉ. रवींद्र कोलते, डॉ. प्रसाद राजहंस, नितीन कदम , डॉ. विनोद सातव, राम बांगड,यांचा सत्कार चेतन तुपे  आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.पद्मश्री डॉ. सुदाम काटे म्हणाले, ‘ पैशाअभावी आदिवासींना आवश्यक उपचार मिळत नाहीत. शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सातपुडा भागातील आदिवासीच्या सिकल सेल व्याधीवर उपचार करण्यासाठी वेळ द्यावा. आर्थिक मदत करावी ‘.    चेतन तुपे म्हणाले, ‘ रुग्ण मंडळींचा ताणतणाव कमी करताना डॉक्टरांनी स्वतःवरील ताणतणावही सांभाळावेत. रुग्णसेवेबद्दल डॉक्टरांना सलाम केला पाहिजे. डॉक्टरांवरील हल्ले करणारा समाज भानावर आणायची गरज आहे. ‘

जनरल प्रक्टिसशंर्स असोसिएशन च्या अध्यक्ष डॉ. संगीता खेनट, पिडी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोप पवार, यांचाही सत्कार करण्यात आला
डॉ.मधूसुडन झंवर , डॉ.राजेश पवार,डॉसिद्धार्थ जाधव,डॉ अजित पाटील,डॉ शिवदीप उंद्रे,डॉ सुनील होनराव,डॉ शंतनू जगदाळे,डॉ परशुराम सूर्यवंशी,डॉ प्रताप ठुबे,डॉ प्रदीप उरसळ,डॉ मुश्ताक तांबोळी,डॉ नितीन पाटील,डॉ सुहास लोंढे,डॉ राजेंद्र जगताप ,डॉ गणेश निंबाळकर,डॉ लालासाहेब गायकवाड,डॉ सुलक्षणा जगताप उपस्थित होते.’ रस्त्यावरचा अपघात ‘ विषयावरील मूकनाट्य सादर करण्यात आला.तसेच ‘आबा की आयेगी बारात ‘ या विनोदी नाट्याचा आनंद डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लुटला.राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर्स  सेल पुणे शहर अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांनी  प्रास्ताविक केले . आभार डॉ. हेमंत तुसे यांनी मानले

भरे येथे 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ  

पुणे  : 33 कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. यावर्षी या कार्यक्रमांतर्गत 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे, या वृक्षलागवड कार्यक्रमात शेतकरी, विद्यार्थी व विविध यंत्रणांनी सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेशकुमार त्यागी यांनी केले.
33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ सामाजिक वनीकरण विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेशकुमार त्यागी यांच्या हस्ते तरअपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव – पश्चिम) सुनिल लिमये,  मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर,वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांच्या विशेष उपस्थितीत भरे (ता. मुळशी) येथे करण्यात आला. विद्यार्थी तसेच ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी वृक्षारोपणासंबंधीची प्रतिज्ञा घेतली.
या प्रसंगी बोलताना डॉ. त्यागी म्हणाले,  33कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात दरवर्षी प्रत्येकाने किमान एक वृक्षलागवड व संवर्धन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वृक्ष लागवड हे ईश्वरीय कार्य असल्याचे नमूद करुन वृक्ष लागवडीमुळे आपणास पिण्यासाठी शुद्ध पाणी व श्वसनासाठी ऑक्सिजन उपलब्ध होणार असल्याचे तसेच प्रदूषण, वाढणारे तापमान, वातावरणातील बदल या समस्यांची सोडवणूकही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येकाने किमान एक रोप लावण्याबरोबरच किमान 10 रोपे वाचवून वृक्ष संवर्धन व पर्यावरणाचे रक्षण करावे असे लिमये यांनी सांगितले. या प्रसंगी वंदना मारणे, मुक्ता मारणे, सुमन मारणे, नंदा टेमघरे,सुनिता डफळ या ग्रामस्थांना वन विभागातर्फे गॅसचे वाटप करण्यात आले.
या वर्षी 33 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत पुणे जिल्हयास 1 कोटी 52 लक्ष 36 हजार एवढे वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट आहे. यावेळी उपवनसंरक्षक रमेश कुमार, उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी, उपविभागीय अधिकारी सुधीर जोशी, दिलीप घोलप, अभय चव्हाण,डॉ.स्मिता पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
या प्रसंगी ग्रामस्थ, विद्यार्थी, विविध खात्यांचे अधिकारी, पदाधिकारी तसेच वन खात्याचे अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

युवा अभिनेत्री अदिती विनायक द्रविड रोटरी पुरस्कारा ने सम्मानित

पुणे-युवा कलाकार अदिती द्रविड ला रोटरी क्लब् पुणे शिवाजीनगर  तर्फ़े व्यावसाइक् गुणवत्ता पुरस्काराने सम्मानित केले गेले . ह्या प्रसंगी ख्यात नाम उद्योजक मीलोन नाग (के के नाग चे अध्यक्ष ),  रोटरी  प्रान्तपाल  रवी धोत्रे , माजी प्रान्तपाल व संगणक  तज्ञ डॉ दीपक शिकारपुर  अध्यक्ष अन्जली रावेतकर उपस्थित होते .

अभिनेत्री अदिती द्रविड ने  “तुझ्यात जीव रंगला  ” “माझ्या नव रया ची बायको ” सारख्या अनेक लोकप्रिय मलिकेत त्यानी आपला ठसा उमटवला आहे. मराठी इंडस्ट्रीत डान्सर, अभिनेत्री, गीतकार आणि गायिका म्हणून नावलौकिक मिळवलेली अभिनेत्री म्हणजे आदिती द्रविड. भूमिकेची जाण, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि नवीन शिकण्याची धडपड आदितीमध्ये जाणवते. आता ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर-महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

त्यानच्या  ‘वीरांगना’ या लघुपटाला पॅरिस फिक्टिव्हा फेस्टिव्हलमध्ये सन्मानित  करण्यात आले आहे. विरांगणा’ ही शॉर्टफिल्म सीमेवर धारातिर्थी पडणाऱ्या सैनिकांच्या वीरपत्नींविषयीची आहे.  ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधून ईशा निंबाळकर म्हणून लोकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणु न त्यान्चा लौकिक आहे आदितीचा नुकताच रिलिज झालेला ‘यु अॅण्ड मी’ अल्बमला सध्या चांगलाच गाजत आहे.अदितीने ‘फ्लाय हाय’  ही संस्था सुरू केली असून आपल्या ह्या संस्थेद्वारे तिने समाजोपयोगी कामं हाती घेण्याचा संकल्प केला आहे.नुक तंच तिने पुण्याजवळच्या किर्कवाडीमधल्या ज्ञानज्योती विद्यामंदिर शाळेतल्यामुलींसाठी १५० सॅनिटरी नॅपकिन असलेलं स्वयंचलित मशीन दान केले आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे, दि. 1 : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी अभिवादन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी निता शिंदे, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोरगरिबांची सेवा, मदत करणे हाच आमचा धर्म – टायगर ग्रुप महाराष्ट्र

0

मुंबई / करमाळा. (शाहरुख मुलाणी) – गोरगरिबांची सेवा, मदत करणे हाच आमचा धर्म असल्याचे मत टायगर ग्रुप महाराष्ट्र चे संस्थापक जालिंदर जाधव तर युवा वर्गाला घडवणे हा आमचा उद्देश आहे असे मत अध्यक्ष तानाजी जाधव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले आहे.

यावेळी जालिंदर जाधव म्हणाले की, आम्ही गरिबी बघितली असून अनुभवली आहे. आमच्यावर जर अडीअडचणी येऊ शकतात तर सामान्य माणसाची काय परिस्थिती असेल हा विचार करून आम्ही ही संघटना चालवत आहोत. कोणालाच अडीअडचणी येऊ नये. गोरगरिबांच्या अडीअडचणी मध्ये आपला हातभार लागला पाहिजे. पैश्यांपुढे कोणाचेच नाही लागत नाही हे आपण सर्वजण जाणतो. एखादा व्यक्ती एखाद्या पर गावी गेला तर त्यास होणाऱ्या अडचणीस समोर येऊन कोणी मदत करत नाही अशा वेळी त्यास तात्काळ मदत व्हावी मग ती कसलीही अडचण असू द्या यासाठीच आम्ही टायगर ग्रुप आम्ही तयार केला आहे. रुग्णालयात गोरगरिब रुग्णांना मदत करून त्याच्या उपचारासाठी मदत व्हावी. सामान्य माणसाला जी गरज भासते, लागते. त्यास मदत करत राहणे. सोशल मिडियाद्वारे आमच्या संघटनेत फक्त गेल्या 10 – 12 दिवसात 45000 युवक – युवतींनी ऑनलाईन सदस्य नोंदणी केली असून आमचे ध्येय 10 लाख पर्यंत पोहचणे हा आहे. प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते की, आपला मुलगा निरव्यसनी असला पाहिजे. हा हेतू आम्ही अंगी गाठला आहे. आम्ही आमच्या सदस्यांना कोणतेही व्यसन करू देत नाही. महाराष्ट्रातील गावागावात पर्यंत आमचे 40 हजार व्हाट्स अँप ग्रुप असून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे हा आमचा उद्देश आहे. कपडे वाटप, जेवण वाटप, खाऊ वाटप असे उपक्रम रोजच सुरू आहे.  काही मुले रागीट असतात पण त्यांच्या मनात दयेची भावना असते. http://tigergroupindia.org/ या वेबसाईट वरून आमचे सदस्य होता येते. तर आम्ही महाराष्ट्रातील तरुण तरुणींना आव्हान करतो की, जास्तीत जास्त लोकांनी सदस्य व्हावे. असे टायगर ग्रुप महाराष्ट्र चे अध्यक्ष तानाजी जाधव यांनी केले आहे.

अन मुले रमली ‘गोष्टीच्या गावा’त

सुश्री फाउंडेशन व वंचित विकास आयोजित कार्यक्रमात रंगली गोष्टींची मैफल
पुणे : गोष्ट आपल्या सगळ्यांच्याच आवडीची. गोष्टीचा गाभा, त्यातील नाट्यछटा उलगडत, अभिवाचन करत लहानग्यांनी गोष्टींच्या गावात सफर केली. जादूच्या गोष्टी अनुभवत मोबाईल, इंटरनेटच्या जगात मुलांनी गोष्टी समजून घेतल्या. गोष्टींचे अभिवाचन करताना श्रोत्यांचे कान आणि डोळे मुलांवर खिळून राहिल्याचे पाहायला मिळाले.
निमित्त होते, सुश्री फाउंडेशन, वंचित विकास व नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित ‘गोष्टींचा गाव’ या विशेष कार्यक्रमाचे. वीस वर्षांपूर्वी जादूच्या गोष्टीची निर्मिती करून भारतासह अमेरिकेतील लोकनांची जादूच्या गोष्टीत रमवणारे प्रकाश पारखी यांनी मुलांच्या या गोष्टींच्या गावात आठवणींना उजाळा देत मैफल रंगवली.
आजकालची लहान मुले मैदानी खेळ खेळताना, गोष्टीची पुस्तके वाचताना दिसत नाहीत. मोबाईलच्या दुनियेत गोष्टी ऐकल्या जातात. मात्र, त्यांचे वाचन होत नाही. गोष्टीची पुस्तके वाचण्याची मजा ते आज गमावून बसलेली दिसत आहेत, अशावेळी हा कार्यक्रम मुलांचे क्षितिज विस्तारणारा ठरला आहे. मुलांनी कथांचे अभिवाचन केले. तर नाट्यसंस्कारचे विश्वस्त प्रकाश पारखी यांनी ‘जादूचे घर’ दाखवले.
वंचित विकास संस्थेच्या अभिरुची गटातील मधुमिता सोनवणे, उमेश लोहार, आयेशा शेख, प्राजक्ता  क्षीरसागर, प्रणिता गाडे यांनी ‘निर्मळ रानवारा’ या मासिकातील काही कथांचे अभिवाचन केले. तर नाट्यसंस्कारच्या वेदांत गोळवलकर, आयुष परांजपे, अवनी ताम्हाणे यांनी ‘खारीच्या वाटा’ या कथेच्या संपादित अंशाचे अभिवाचन केले. श्रीजय देशपांडेंनी नाट्यछटा सादर केल्या. याप्रसंगी ‘निर्मळ रानवारा’ या बालमासिकाच्या ‘नाट्यछटा’ विशेषकांचे प्रकाशन करण्यात आले.
वंचित विकासचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका सुनीता जोगळेकर, साहित्य अकादमी पुरस्कार विजेती कादंबरी ‘खारीच्या वाटा’चे लेखक ल. म. कडू, निर्मळ रानवाराचे व्यवस्थापक स्नेहल मसालिया, सल्लागार ज्योती जोशी, सरोज टोळे, ललितगौरी डांगे, सुप्रिया जोगदेव आणि लहान मुले व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीराम ओक यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारला होता. त्याचे प्रास्ताविक ओक यांनी केले.

 

महाराष्ट्रात आत्ता रस्ते बांधणीत प्लास्टिक कचऱ्याचा वापर!

0

 

मुंबई : रस्ते तयार करताना प्लास्टिकच्या कचऱ्याचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून योजना तयार केली जात आहे. यामध्ये रस्ता तयार करताना सिमेंटऐवजी प्लास्टिकच्या कचऱ्याचा उपयोग करण्यात यावा, यासाठीही सरकार प्रयोगशील आहे. आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत प्लास्टिक बंदीच्या नियमाच्या उल्लंघनाबाबत प्रश्न उपस्थित केला, त्यानंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी रस्ते बांधणीत प्लास्टिकच्या कचऱ्याचा वापर करणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी आहे, मात्र सरकार प्लास्टिकच्या कचऱ्याच्या विघटनावर काय करीत आहे, असा प्रश्न आमदार लोढा यांनी विधानसभेत उपस्थित केला. याबरोबरच त्यांनी असाही प्रश्न उपस्थित केला की, प्लास्टिक बंदीनंतर २००हून अधिक कारखाने बंद झाले आहेत, त्यामुळे तब्बल १० हजार लोक बेरोजगार झाले आहेत. त्या बेरोजगार लोकांसाठी सरकारची काय योजना आहे. देशातील काही राज्यांमध्ये सरकारकडून प्लास्टिकच्या कचऱ्यापासून डिझेल तयार केले जात आहे, याबाबत सरकार काय विचार करीत आहे? प्लास्टिक बंदी असतानाही सुरू असलेल्या उल्लंघनावरील चर्चेत आमदार अजित पवार, मनिषा पवार, राज के पुरोहित यांनीही सहभाग दर्शविला. याशिवाय प्लास्टिक बंदीच्या नियमावरील कडक कायदे व नियमांचे होणारे उल्लंघन शिवाय प्लास्टिक बंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकारचे लक्ष केंद्रीत केले.

पर्यावरण मंत्री कदम म्हणाले की, प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध असतानाही गुजरातहून महाराष्ट्रात प्लास्टिक आणले जात आहे. जे रोखण्याची मागणी गुजरात सरकारकडे करण्यात येणार आहे. सोबतच प्लास्टिकच्या कचऱ्यापासून रस्ते तयार करण्याचे काम जलद गतीने व्हावे, यासाठी सरकार यासंदर्भात योजना तयार करणार आहे.

मानधनापासून कलावंत वंचितच-पण सांस्कृतिक कार्य संचालनालय जबाबदार नाही…

0

मुंबई / पुणे – सांस्कृतिक कार्य संचालनायच्या निष्क्रियतेमुळे;पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित..! या मायमराठी ने काल प्रसिद्ध केलेल्या वृत्ताबाबत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने खुलासा करून , कलावंत मानधनापासून  वंचित आहेत मात्र त्यास कार्य संचालनालयाची निष्क्रियता असे म्हणणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.याबाबत या विभागाने असे म्हटले आहे कि ,वृद्ध साहित्यिक ,कलावंत यांना मानधनासाठी २०१९-20 साठी ४९ कोटी ८१ लाख ३० हजार रुपये निधीची मागणी नोव्हेंबर २०१८ मध्येच सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली होती मात्र २ कोटी 20 लाख रुपये एवढाच निधी मंजूर झाला . ३४ जिल्ह्याचे मानधन जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाद्वारे अदा करण्यात येत होते .मात्र सप्टेंबर २०१६ पासून संचालनालयाच्या मार्फत थेट कलावंतांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. मार्च २०१९ च्या अंदाजपत्रकात संचालनालयाने मागणी केलेला निधी मंजूर न झाल्याचे निदर्शनास येताच १८ मार्च ,20 मार्च आणि 6 मे रोजी शासनास कळविण्यात आले. आकस्मिक निधीची मागणी करण्यात आली .मात्र कोणताही निधी आजतागायत प्राप्त न झाल्याने कलावंताना फेब्रुवारी २०१९ पासून मानधनापासून वंचित राहावे लागले आहे .मात्र त्यामुळे  सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रीयते मुळे कलावंत मानधनापासून वंचित राहिले हि बाब चुकीची आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

सशांच्या छळ प्रकरणी सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांवर गुन्हा दाखल…

0

पुणे : स्वारगेटजवळील आदिनाथ सोसायटीच्या गार्डनमध्ये ससे व मत्स्यपालन करताना योग्य काळजी न घेता, त्यांचा छळ केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत (पीसीए) दोघांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांचाही समावेश आहे. याप्रकरणी अमित असित शहा (वय ३८, रा. आदिनाथ सोसायटी, पुणे-सातारा रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. अमित शहा यांच्या फिर्यादीवरून सोसायटीचे अध्यक्ष महेंद्र जैन व सचिव राहुल विलास मेहता (दोघेही रा. आदिनाथ सोसायटी, पुणे-सातारा रस्ता) यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण कायदा व वन्यजीव संरक्षण कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित शहा यांची प्राणी सेवा नावाची संस्था आहे. या संस्थेमार्फत भटक्या, अपंग व जखमी प्राण्यांची काळजी व संगोपनाचे कार्य केले जाते. फिर्यादी रविवारी त्यांच्या आदिनाथ सोसायटीच्या गार्डनमध्ये फिरत होते. त्यावेळी त्यांना गार्डनच्या कोपऱ्यात एक लोखंडी जाळीचा पिंजरा आढळून आला. त्यामध्ये ५० ते ६० ससे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बहुतांश ससे पावसामध्ये भिजत व उपाशी होते. याबरोबरच तेथील पाण्याच्या टाकीमध्ये पाळीव मासे सोडण्यात आले होते. त्यांनाही ऑक्सीजन किंवा खाद्य दिले नव्हते. फिर्यादी यांनी याबाबत चौकशी केली असता हे ससे व मासे सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडून पाळले असल्याची माहिती मिळाली. मात्र त्यांचे पालन करताना त्यांना योग्य त्या मूलभूत सुविधा पुरवणे, खाद्य देणे व त्यांची काळजी घेण्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ससे व मत्स्य पालन करताना त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक असतानाही दोघांनीही त्यांची काळजी घेतली नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वाल्हे मुक्कामी माऊलींच्या पालखीतील ५० दिंड्याना पाच हजार ताटांचे वाटप

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा पत्रावळी मुक्त व्हावा, यासाठी पुण्यातील युवराज ढमाले कॉर्प यांच्याकडून पत्रावळी मुक्त दिंडी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत वाल्हे येथील पालखी मुक्कामी माऊलींच्या पालखी सोहळ्यातील ५० दिंड्यातील ५००० वारकर्‍यांना स्टीलच्या ताटांचे वाटप करण्यात आले.

यावेळी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, विश्वस्त योगेश देसाई, युवराज ढमाले कॉर्पचे वैष्णवी ढमाले, युवराज ढमाले, यांच्यासह धावडे, जगताप, तरवडे, परमार, सपकाळ, मोडवे कुटुंबीय आणि विविध दिंड्यांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवराज ढमाले म्हणाले, “गेली बारा वर्षे माऊलींच्या पालखी सोहळ्यात शक्य तेवढी सेवा करतो. वारकर्‍यांच्या गरजांना अनुसरून उपक्रम हाती घेऊन काम करत आहोत. अनेक वर्षे टिकतील आणि त्यांना उपयोगी पडतील, अशा वस्तू देण्यावर आम्ही भर देतो.”

राजाभाऊ चोपदार म्हणाले, “वारीला पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी युवराज ढमाले यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. शासन आणि सामाजिक स्तरावर पालखी सोहळा अधिक सुरळित होण्यासाठी प्रयत्न केले जातात. विविध पालखी तळावर विकासात्मक कामे व्हावीत, तसेच पायाभूत सुविधा उभाराव्यात.” रामभाऊ चोपदार यांनी वारकर्‍यांच्या वतीने युवराज ढमाले कॉर्पच्या पुढाकाराचे कौतुक केले. सचिन पवार यांनी सूत्रसंचालन केले.

‘रयत प्रबोधिनी’च्या दहा विद्यार्थ्यांचा खर्च करणार

पालखी सोहळ्यात स्वयंसेवक म्हणून काम करत असलेल्या रयत प्रबोधिनी संस्थेतील विद्यार्थ्यांशी युवराज ढमाले यांनी संवाद साधला. यातील राज्यसेवा आणि पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या प्रत्येकी पाच अशा दहा गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांचा वर्षभराचा भोजन आणि शैक्षणिक खर्च करणार असल्याचे ढमाले यांनी सांगितले.

अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सवाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संवाद पुणे आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 30 जुलै ते 3 ऑगस्ट 2019 या कालावधीत अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सवाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन आज (दि. 1) महापौर मुक्ता टिळक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी आणि लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोधचिन्हाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे, निमंत्रक राजेश पांडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संवाद पुणेचे सुनिल महाजन, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे उपस्थित होते.
संवाद पुणे आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या उपक्रमास शुभेच्छा देऊन महापौर टिळक म्हणाल्या, ‘‘जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, विचार जनतेपर्यंत पोहोचणार आहेत. अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख खूप उंचावलेला आहे. आजच्या पिढीला या महापुरुषांच्या कार्याची पुरेशी माहिती नाही. महापुरुषांचा इतिहास पुसता येत नाही, पण विस्मृतीत जाण्याची शक्यता असते. अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी आणि लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.’’
डॉ. सदानंद मोरे यांनी महापौरांच्या वक्तव्याचा धागा पकडून महापुरुषांच्या स्मृती जागविणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी बरोबरच 1 ऑगस्ट 2019 रोजी लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीशताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. या निमित्ताने दि. 31 जुलै रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा, सारसबाग ते केसरीवाडा, टिळक रोड येथे ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी सांगितले.
संवाद पुणे आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र साहित्य परिषद अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या साहित्याचा संपूर्ण महाराष्ट्रात जागर करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
पुण्याच्या परंपरेला शोभेल असे कार्यक्रम घेण्याचा मानस असल्याचे निमंत्रक राजेश पांडे यांनी नमूद केले. नाट्य, चित्रपट, साहित्य, संगीत, शाहिरी अशा क्षेत्रातील विविध संस्था या उपक्रमात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुनिल महाजन म्हणाले, दि. 30 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत छायाचित्र, कथा, कादंबर्या्, नाटक व इतर साहित्याचे बालगंधर्व कलादालनात प्रदर्शन भरविण्यात येणार असून बालगंधर्व रंगमंदिरामध्ये परिसंवाद, चर्चासत्र, अभिवाचन कार्यक्रम, ऑडिओ बुक प्रकाशन, कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.