Home Blog Page 2895

आता पाणीकपात  नको -महापौर

0

पुणे- शहराला पाणीपुरवठा करणार्‍या चारही धरणात पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावली आहे. यामुळे धरणात समाधानकारक पाणीसाठा आहे. हे लक्षात घेता शहराला पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात यावा. तसेच कोणत्याही प्रकारची कपात होणार नाही. याबाबत काळजी घ्यावी, असे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी आज पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठा अधिकारी व्ही. जी. कुलकर्णी यांना दिले आहेत. महापौरांच्या या आदेशामुळे पुणेकर नागरिकाची पाणी कपातीमधून सुटका झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे शहराला खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चार धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणातील पाणीसाठा लक्षात घेता महापालिका प्रशासनाने मागील सहा महिन्यापासून पुणेकर पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

  • तर या पाणी प्रश्नावर शहरातील विविध संघटनी पुणे महापालिकेच्या बाहेर आंदोलन देखील केले. तरी देखील पाणी प्रश्नावर तोडगा काही निघाला नाही. या सर्व घडामोडी घडत असताना. पुणे महापालिकेच्या सभागृहात नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली. त्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी पाणीपुरवठा अधिकारी व्ही. जी. कुलकर्णी यांना खुलासा करण्यास सांगितला.

धरणातील पाणी साठयाबाबत दिलेल्या आकडेवारी वरून महापौरांनी धरणातील पाणी लक्षात घेता पुणेकर नागरिकांना पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करावा, असे आदेश देण्यात आले. शहरातील नागरिकांची पाणी कपातीमधून सुटका होणार असल्याने नागरिकांसाठी ही आनंदाची बाब म्हणावी लागेल.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/675775049604225/

आधुनिक काळात विवाह ठरविताना पत्रिका न पहाता मेडिकल रिपोर्ट व इतर माहिती घ्यावी–उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे

0

पुणे- राष्ट्रीय ओबीसी महासंघ, डॉ प्रल्हाद वडगांवकर समाज सेवा ट्रस्ट, फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन व सप्तपदी वधु वर केंद्रातर्फे राष्ट्रीय सामाजिक एकात्मता अभियानातर्गत   सर्व धर्मीय,सर्वजातीय  मधील विधवा,विधुर घटस्फोटित , विकलांगाचा   मोफत वधु वर परिचय मेळावा उद्यान प्रसाद सभागृहात सम्पन्न झाला  त्या प्रसंगी उद्घाटक म्हणून भाषण करताना पुण्यनगरीचे उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडें म्हणाले की विवाह ठरविताना आजच्या आधुनिक काळात पत्रिका पाहून काही उपयोग नाही जे घडायचे ते घडतेच त्या ऐवजी दोन्ही कडून मेडिकल चेकअप ची मागणी करा.कोणतेही व्यंग ,आजार, व्यसन नाही याची व इतर खात्री करणे हे कधीही चांगले.18 व्या शतकात महात्मा फुले यांनी सत्यशोधक विवाह लावून सत्यता  पाहून कार्य करा यांची शिकवण दिली आणि अनेक विवाह अंतर जातीय देखील लावले आहेत.आज आपल्या संस्थेने पुर्वीच्या पुरोगामी  पुणे शहरात मध्यवर्ती ठिकणी पुन्हा एकदा सर्व जाती धर्माचे मेळावे भरवून सत्यशोधक पद्धतीने विवाह लावीत आहात त्यामुळे नाहक रुढी परंपरा आणि आर्थिक खर्चाच्या बचतीचा संदेश देत आहात,राष्ट्रीय ओबीसी महासंघ व डॉ वडगावकर समाज सेवा ट्रस्ट चे नेहमी उपक्रम चांगले असते तसेच  या कार्यात रघुनाथ ढोक यांचे देखील मोठे कार्य आहे असे गौरवादगार काढले. यावेळी  राष्ट्रीय ओबीसी महासंघ व डॉ.वडगांवकर समाज सेवा ट्रस्ट अध्यक्ष डॉ प्रल्हाद वडगांवकर,सप्तपदी केंद्राचे अध्यक्ष सुदाम धाडगे ,सरचिटणीस व फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन तसेच महात्मा जोतीराव फुले साहित्य, साधने, प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासनाचे सदस्य रघुनाथ ढोक उपस्थित होते. यावेळी वधुवर यांना आशीर्वाद  देण्यासाठी ख्रिश्चन धर्म गुरू रेव्हरंड जयंत गायकवाड ,शीख धर्म गुरू,गयानजी चिनंदरपाल सिंगजी,हिंदू धर्माचे वेदाचार्य डॉ.अजय भागवत गुरुजी उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या धर्माची माहिती देऊन मानवता धर्म सर्वांनी पाळवा तसेच आज कोणत्या गोष्टी ची गरज आहे हे ओळखुन त्या पद्धतीने विवाह करून जाती भेद नष्ट करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले.

या वेळी सर्व जाती धर्माचे 95 वर आणि 28 वधु पुनर्विवाह मेळाव्यासाठी उपस्थित होते या मध्ये विधुराची संख्या देखील मोठी होती.नाशिक,औरंगाबाद, सोलापूर,मुबंई, सातारा, पुणे परिसरातुन मोठ्या संख्येने सर्व समाज उपस्थित होता. काही प्रथम वर विवाह लवकर जमेना म्हणून विधवा,घटस्फोटित चालेल म्हणून ही सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सुरवातीला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळ्यास उपमहापौर डॉ धेंडे आणि धर्मगुरू यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण केला तर सर्व मान्यवरांना युगपुरुष बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज,सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले,भारतीय स्री शिक्षणाच्या आध्यप्रनेत्या सावित्रीबाई फुले, सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी शाहु महाराज  आणि  भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एकत्रित असलेली फोटो प्रेम  आणि पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला तर सर्व वधु वर यांचे गुलाब फुल व सप्तपदी चे मासिक देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रास्थाविक भाषणात वर्षभर  राष्ट्रीय सामाजिक एकात्मता अभियानात विविध उपक्रम यशस्वी पणे राबविले गेलेची माहिती डॉ.प्रल्हाद वडगांवकर यांनी दिली,तर स्वागत आणि सूत्रसंचालन रघुनाथ ढोक यांनी केले व आभारप्रदर्शन सुदाम धाडगे यांनी मानले.आणि सहधर्मदाय आयुक्त श्रीमती आर.पी. मुक्कावर (अडगुलवार) , उपधर्मदाय आयुक्त नवनाथ जगताप साहेब, अधीक्षक अनाप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तर  उद्यान प्रसाद कार्यालयाचे मालक  शेखर बामणे, किशोर भास्कर,  आकाश ढोक ,श्रीमती उज्वला कांडपीळे, सौ सुधा धाडगे सौ आशा ढोक  यांनी मोलाचे सहकार्य केले.

‘बकासुराचा’अहवाल सभागृहात आला ..पण …(व्हिडीओ)

0
पुणे- भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे असंख्य अहवाल गिळून बसलेल्या महापालिकेने आज आणखी एक मोठ्ठा म्हणजे भ्रष्टाचाराचा बकासुर ठरलेल्या ‘देवदूत ‘ प्रकरणाचा अहवाल सभागृहात मुस्कटदाबी करत गुंडाळून नगरसचिव कार्यालयात पाठविला आहे .महापौर मुक्ता टिळक या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या . त्यांच्या आदेशानेच हा अहवाल सभागृहात वाचून न दाखविता त्यावर चर्चा होवू न देता…ज्यांना पहायचा आहे त्यांनी हा अहवाल नगरसचिव कार्यालयात जावून पाहावा असे सांगत सभागृहातच या अहवालाची  आणि एकूणच  प्रकरणाचा आवाज बंद  करण्याचा प्रयत्न केल्याचे  स्पष्ट झाले आहे .
या अहवालाचा मुद्दा नगरसेवक अविनाश बागवे यांनी आज मुख्य सभेत उपस्थित केला , तेव्हा हा अहवाल आताच हाती आला असे सांगून त्यांना दुरूनच फाईल दाखविण्यात आली. पण नेमके या अहवालात काय दडले आहे हे सभागृहात मात्र उलगडू दिले गेलेले नाही .
 गेली काही दिवसांपासून सातत्याने पुण्यातील नामांकित म्हणून गणल्या जाणाऱ्या ‘सकाळ ‘या वृत्तपत्रातून  महापालिकेच्या ‘देवदूत ‘ नावाच्या प्रकल्पात होणाऱ्या गैरबाबी चव्हाट्यावर मांडल्या जात आहेत .या प्रकरणी चौकशी करून अहवाल १५ जुलै रोजी सभागृहात सादर करू असे जाहीर केले होते . आयुक्त खरोखर ‘बकासुराचा वध ‘ करणार कि क्लीन चीट देणार याबाबत उत्सुकता होती . मात्र महापौर यांनी एकूणच हे प्रकरण अशा पद्धतीने सभागृहात चर्चेला येण्यापासून आज थांबविल्याचे स्पष्ट झाले आहे.

मालिकेच्या शिर्षकामध्येच खूप काही दडलेलं आहे – आदेश बांदेकर

0

महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांनी सोहं प्रोडक्शन्सच्या माध्यमातून दर्जेदार मालिकांची निर्मिती केली आहे. त्यांच्या प्रॉडक्शनची ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण हि मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा खास संवाद

सोहम प्रोडक्शन्सची अजून एक नवीन मालिका झी युवा वाहिनीवर येत आहेत्याबद्दल काय सांगाल?

‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ नावाची ही नवीन मालिका सोहम प्रोडक्शन्स घेऊन येत आहे. १५ जुलैपासून रात्री ८ वाजता ही मालिका ‘झी युवा’वर पाहता येईल. आजपर्यंत सोहम प्रोडक्शन्सच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात विविधप्रकारे काम केले आहे. हा याच प्रवासाचा पुढचा टप्पा आहे असं म्हणता येईल. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. आजवर जसं समर्थन मिळत राहिलंय, तसंच यापुढेही मिळत राहील याची आम्हाला खात्री आहे.

. ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्णही मालिका नावाप्रमाणेच अनोखी आहेमालिकेविषयी थोडक्यात सांगा.

मालिकेच्या शिर्षकामध्येच खूप काही दडलेलं आहे. तरीही सांगायचं झालं तर, मराठी संस्कृतीचा अभिमान असलेलं एक कुटुंब या मालिकेत तुम्ही पाहणार आहात. परदेशात राहणाऱ्या एका मुलाचा जेव्हा या कुटुंबाशी संबंध येतो, त्यानंतर घडणारी आणि दोन तरुण जीवांची अशी ही एक प्रेमकहाणी आहे. आपली संस्कृती टिकवण्याचा कुटुंबप्रामुखाचा अट्टाहास आणि त्यातून इतरांची उडणारी तारांबळ, ही या मालिकेतील खरी गम्मत असेल. ही मालिका प्रत्येक प्रेक्षकाला कायम आपलीशी वाटत राहील याचं मी आश्वासन देतो.

 

मराठीवर इंग्रजी भाषेचं वर्चस्व होतंय असं तुम्हाला वाटतं का?

नक्कीच असं घडतंय. आपण मराठीत बोलत असतानाही, अनेक मराठी शब्दांचे इंग्रजी प्रतिशब्द अगदी सर्रास वापरात असतो. अनेकदा या शब्दांसाठी असलेले मूळ मराठी शब्द आपल्याला आठवत सुद्धा नाहीत. या मालिकेच्या माध्यमातून आमचा हाच प्रयत्न असणार आहे.  इंग्रजी शब्द न वापरता, पूर्णपणे मराठीत बोलायचा तुम्ही प्रयत्न केलात आणि इंग्रजीचं मराठीवर होत असलेलं अतिक्रमण कमी झालं; तर ते या मालिकेचं खरं यश असेल. मनोरंजन करतानाच ही मालिका, मराठीवर इंग्रजीचं वर्चस्व कशाप्रकारे आहे, हेदेखील तुम्हाला दर्शवून देईल.

 

प्रेक्षकांना काय आवाहन कराल?

प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद यांची नितांत आवश्यकता आहेच. निखळ मनोरंजन करणारी अशी ही मालिका असणार आहे. त्यामुळे दिवसभराचा ताण हलका करण्यासाठी आणि निखळ आनंदाचा लाभ घेण्यासाठी ही मालिका नक्की पहा. ‘झी युवा’ या वाहिनीवर एक युवा निर्माता आणि अभिनय क्षेत्रात एक युवा जोडी पडद्यावर दिसणार आहे. त्यांना तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. हा पाठिंबा रसिक प्रेक्षकांकडून मिळावा हीच अपेक्षा आहे.

‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड युथ स्किल्स डे ‘ साजरा

0

पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयात ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड युथ स्किल्स डे ‘ साजरा करण्यात आला . ‘आयआयटी मुंबई ‘,तसेच ‘स्वयम ‘ च्या स्किल डेव्हलपमेंट विषयक विविध अभ्यासक्रमांचे उदघाटन प्राचार्य डॉ शैला बुटवाला  यांच्या हस्ते करण्यात आले . डॉ एम  जी मुल्ला ,प्रा  रईसा शेख ,प्रा . सलाउद्दीन सज्जन उपस्थित होते . वाणिज्य विभागाचे शंभर विद्यार्थी उपस्थित होते .हा कार्यक्रम  १५ जुलै रोजी आझम कॅम्पस (पुणे कॅम्प ) येथे झाला .

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात

0

नवी दिल्ली : लोकसभेत झालेल्या दारूण पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता त्यांच्या जागी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तसेच काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी के. सी. पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


बाळासाहेब थोरात यांची निवड प्रदेशाध्यक्षपदी केली जाईल याबाबतच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. त्यानंतर आता पक्षाकडून हे निश्चित करण्यात आले आहे. थोरात यांच्यासोबत राज्यात पाच कार्यकारी अध्यक्षांची नियुक्तीही करण्यात आली आहे. यामध्ये युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार विश्वजित कदम, नितीन राऊत, बसवराज पाटील, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेतेपदी के. सी. पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मान्यता दिल्यानंतर संघटना सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी या सर्व नियुक्त्या जाहीर केल्या.

राधाकृष्ण नार्वेकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर

0

 

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ पत्रकार श्री राधाकृष्ण नार्वेकर यांना दिला जाणार असल्याची घोषणा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी आज केली. आचार्य अत्रे जयंतीच्या दिवशी, दि. 13 ऑगस्ट रोजी, समारंभपूर्वक श्री. नार्वेकर यांना हा पुरस्कार देण्यात येईल, असे श्री. वाबळे म्हणाले.

मराठी पत्रकारितेत सुमारे पाच तप कार्यरत राहिलेल्या श्री नार्वेकर यांनी दैनिक `नवाकाळ’चे बातमीदार ते संपादक, दैनिक `सकाळ’, दैनिक `पुण्यनगरी’ वृत्तपत्र समूहाचे सल्लागार संपादक ही सर्व महत्त्वाची जबाबदारीची पदे भुषविली आहेत. मुंबईतील दैनिक `सकाळ’च्या संपादक पदावरुन निवृत्त झाल्यावर नार्वेकर यांनी लिहिलेले `सेवानिवृत्त झालात, आता पुढे काय?’ हे पुस्तक लोकप्रिय ठरले. उर्दू भाषेत त्याचे भाषांतर झाले आहे. हिंदी व इंग्रजी भाषेतही भाषांतर झाले आहे. लवकरच त्याचे प्रकाशन होईल. त्यांनी लिहिलेले ‘मनातली माणसं’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मुंबईतील अनेक नामवंत पत्रकार आणि संपादक घडविण्यासाठी नार्वेकर यांनी दिलेले योगदान अमुल्य आहे. माथाडी कामगारांना त्यांचे हक्क मिळावे, गिरणी कामगारांना न्याय मिळावा नवी मुंबई मधील प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचे रक्षण व्हावे, वसई–विरार, मुरबाड, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, शहापूर या शहरांच्या विकासाकरिता मुंबई सकाळच्या माध्यमातून विशेष पुरवण्या प्रकाशित करून या शहरांच्या विकासातील आपली जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. या उपक्रमांची शासनाने देखील दखल घेतली आहे. या पुरवण्या निश्चितच मार्गदर्शक व संग्राह्य ठरल्या आहेत. यासाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल शासनपातळीवर सुध्दा घेतली गेली आहे. दूरदर्शनचा सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. अनेक महत्वाचे पुरस्कार प्राप्त झालेले नार्वेकर संपादक या नात्याने अमेरिका, जपान, रशिया, इस्राएल, बांगलादेश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड अशा विविध देशात महत्वाच्या घटनांचे साक्षीदार राहिले आहेत. लोणावळा येथील दि. गो. तेंडुलकर स्मृती मंदिर उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. किंबहुना, त्यांच्याच पुढाकाराने निसर्गरम्य परिसरातील पत्रकार संघाची ही वास्तू उभी राहिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष आणि विश्वस्त म्हणून काम केलेल्या राधाकृष्ण नार्वेकर यांना आचार्य अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार देताना पत्रकार संघांला आनंद होत आहे. आचार्य अत्रे यांच्या प्रमाणेच शिक्षकी पेशामधून पत्रकारितेचा मार्ग स्वीकारून समाज हितासाठी झटणारे आणि अनेकांना तसं झटण्याची प्रेरणा देणारे नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास अनुमती दिल्याने आमचा आनंद द्विगुणीत झाला आहे, असे पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी म्हटले आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून कंगना राणावतचा निषेध

0

 

मुंबई : पत्रकारांविषयी आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषा वापरणाऱ्या, विशेषत: पीटीआयचे प्रतिनिधी जस्टिन राव यांना अपमानित करून वृत्त माध्यमांना लाखोल्या वाहणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतचा मुंबई मराठी पत्रकार संघाने आज निषेध केला.

दि. 7 जुलै 2019 रोजी एका हिंदी चित्रपटाच्या गीत प्रदर्शन प्रसंगी जस्टिन राव यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात करताच कंगना राणावत हिने त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरण्यास सुरुवात केली. राव हे शांत होते. पण तरीही सदर कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांनी मायक्रोफोन काढून घेत त्यांना व इतर पत्रकारांना बाऊंसर्सद्वारे धक्काबुक्की केली. या घटनेनंतर राणावत हीची बहीण रंगोली चांडेल हीनेदेखील ट्वीटरद्वारे पत्रकारांवर आगपाखड केली. `नालायक’, `नंगे’, `सस्ते’ आणि `बिकाऊ’ अशा शब्दात रंगोली हीने आपल्या `सभ्यते’चे आणि `संस्कृति’चे प्रदर्शन केले. या दोघींची ही वर्तणुक आक्षेपार्ह, संतापजनक आणि निंदनीय असून त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी केली आहे. यासंदर्भात `द एंटरटेंनमेंट जर्नलिस्ट गिल्ड’ने उपस्थित केलेल्या मुद्यांना पत्रकार संघाचा पाठिंबा असून `गिल्ड’ने केलेल्या मागणीनुसार राणावतने जस्टिन राव यांची व इतर पत्रकारांची त्वरित माफी मागावी, असेही श्री. वाबळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगती व विकासामध्ये शीख समुदायाचे योगदान महत्त्वाचे- राज्यपाल चे. विद्यासागर राव

0

गुरु नानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त

आयोजित कार्यक्रमास राज्यपालांची उपस्थिती 

मुंबई – मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगती व विकासामध्ये शीख समुदायाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

गुरू नानक विद्याक सोसायटीच्या वतीने गुरु तेगबहादूर नगर येथील गुरू नानक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन व वारसा या विषयावर आयोजित आंतर-धर्मीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार सरदार तारासिंह, आमदार कॅप्टन आर. तमिल सेल्वन, मौलाना आझाद विद्यापीठाचे कुलगुरू पद्मश्री प्राध्यापक अख्तरुल वासे, मोझांबिक आणि स्वित्झर्लंडचे माजी भारतीय उच्चायुक्त डॉ. जसपाल सिंह, गुरु नानक विद्याक सोसायटीचे अध्यक्ष सरदार मनजीत सिंह भट्टी, व्यवस्थापन समितीचे सदस्य सरदार बचन सिंह धाम, सरदार सर्दुल सिंह, गुरू नानक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पुष्पिंदर भाटिया आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. विद्यासागर राव म्हणाले की, 1947 मध्ये फाळणीनंतरच्या स्थलांतरित कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या गुरु नानक विद्याक सोसायटीचे आज वटवृक्षामध्ये रुपांतर झाले आहे.  या संस्थेच्या 38 शैक्षणिक संस्थांमध्ये 25 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

गुरुनानक विद्याक सोसायटीने आपल्या कार्यातून समता, सेवा आणि मानवता ही शीख धर्मतत्त्वे प्रत्यक्ष कृतीत उतरविली आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये शीख समुदायाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

पंजाब आणि महाराष्ट्रातील भौगोलिक अंतर मोठे असले तरी अध्यात्म, मानवता आणि सामाईक मूल्यांद्वारे ही दोन राज्य एकमेकांशी जोडली गेली आहेत. तेराव्या शतकात संत नामदेव यांनी भागवत धर्माची पताका पंजाबमध्ये नेली आणि आपले उर्वरित आयुष्य तेथेच व्यतीत केले. त्याचप्रमाणे नंतर दहावे शीख गुरु गोविंद सिंह राज्यात नांदेड येथे आले आणि सत्य धर्माच्या रक्षणासाठी त्यांच्या शिकवण दिली.

शीख धर्म गुरूनानक देव यांनी जगाला दिलेली सर्वोत्तम देणगी-राज्यपाल

गुरु नानकजी भारतातील महान संतांपैकी एक होते. शीख धर्म गुरू नानक देव यांनी जगाला दिलेली सर्वोत्तम देणगी आहे. तर गुरुग्रंथसाहिब ही मानवतेला दिलेली सर्वोत्कृष्ट देणगी आहे. त्यांनी जनतेला अज्ञानाच्या अंध:कारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे काम केले. ते एक अग्रगण्य समाजसुधारक होते. अनिष्ट चालीरिती, अंधश्रद्धेच्या बंधनातून समाजाच्या मुक्ततेसाठी त्यांनी काम केले.

 

गुरु ग्रंथ साहिब हा एकमेव पवित्र ग्रंथ असावा की ज्यामध्ये बाबा फरीद, कबीर, जयदेव, संत नामदेव, रवीदास आणि इतर अनेक संतांच्या वचनांचा समावेश आहे. विविध धर्मतत्त्वांवरील विश्वासाचे हे एक आदर्श उदाहरण समजता येईल.

विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना राज्यपाल म्हणाले की, शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी किंवा चांगली नोकरी मिळवण्यापुरता मर्यादित नसावा. नोकरी मिळवणाऱ्याऐवजी नोकरी देणारे बना, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते राज्याचे माजी पोलीस महासंचालक डॉ. पी. एस. पसरिचा यांना पहिले राय बुलर भट्टी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प. बंगालमधील विरोधीपक्षांचे १०७ आमदार भाजपात होणार दाखल

0

कोलकाता -पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षांचे १०७ आमदार लवकरच भाजपात दाखल होणार आहेत, असा खळबळजनक दावा भाजपा नेते मुकुल रॉय यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. यामध्ये तृणमुल काँग्रेस, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या आमदारांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

मुकुल रॉय म्हणाले, भाजपात दाखल होणाऱ्या या विरोधी पक्षातील आमदारांची आमच्याकडे यादी देखील तयार असून ते आमच्या संपर्कात आहेत.

सध्या कर्नाटक आणि गोव्यामध्ये भाजपाने विरोधी पक्षांच्या आमदारांना आपल्याकडे वळवण्याची खेळी केली आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांतील राजकीय परिस्थितीत प्रचंड उलथापालथ झाली आहे. यानंतर मध्य प्रदेश आणि राजस्थानातही भाजपा अशीच खेळी खेळणार असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी माध्यमांमधून सुरु होते. त्यानंतर आता पश्चिम बंगालमधून हे नवे वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे.

कर्नाटक सरकारमधील काँग्रेस-जेडीएसच्या १० आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर येथे निर्माण झालेला राजकीय पेच आणि त्यानंतर भाजपाने सरकार स्थापनेसाठी केलेला दावा या पार्श्वभूमीवर भाजपा राज्यांच्या राजकारणात जाणीवपूर्ण अनैतिक व्यवहार करीत असल्याचा आरोप नुकताच विरोधी पक्षांनी केला होता. त्यासाठी काँग्रेससह तृणमुल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएम आणि तेलगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसद परिसरात निदर्शने केली होती.

भाजपात दाखल झालेल्या काँग्रेसच्या तीन आमदारांना मिळाली मंत्रिपदे

0

पणजी -गोवा सरकाचा शनिवारी मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. यावेळी चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या १० आमदारांपैकी ३ जणांना समावेश आहे. चंद्रकांत कवळेकर, फिलीप नेरी रॉड्रिग्ज आणि जेनिफर मोनसेराट अशी या मंत्र्यांची नावे आहेत. तर गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष मायकल लोबो यांनाही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी गोवा फॉरवर्ड पार्टीचे तीन आमदारांना आणि एका अपक्ष आमदाराला कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, गोव्याच्या मंत्रीमंडळातून उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, जल संसाधन मंत्री विनोद पालेकर, ग्रामविकास मंत्री जयेश साळगांवकर या तीन गोवा फॉरवर्ड पार्टीच्या आमदारांसह महसूल मंत्री रोहन खुंटे या अपक्ष आमदाराला मंत्रीपदावरुन हटवण्यात आले आहे. त्याचबरोबर मंत्रीपदाची शपथ घेण्याआधी काही वेळापूर्वीच लोबो यांनी विधानसभा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

दरम्यान, चंद्रकांत कवळेकर यांच्यासह काँग्रेसचे १० आमदार बुधवारी रात्री भाजपात सामिल झाले होते. त्यानंतर आता गोव्याच्या ४० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसची संख्या केवळ ५ इतकी राहिली आहे.

गोव्याची माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी या प्रकारावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, काँग्रेसच्या १० आमदारांना भाजपात सहभागी करणे हे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या परंपरेला संपवल्यासारखे आहे. कारण, मनोहर पर्रिकर यांनी भाजपाकडे बहुमत नसताना प्रादेशिक पक्षांची एकजुट करीत २०१७ मध्ये गोव्यात सरकार स्थापन केले होते.

भारतात वाढत्या जातीभेद आणि असहिष्णुतेसह बेरोजगारीवर गोदरेज ग्रुपचे चेअरमन आदी गोदरेज यांची नाराजी

0

मुंबई – प्रसिद्ध उद्योजक आणि गोदरेज ग्रुपचे चेअरमन आदी गोदरेज यांनी भारतात वाढत्या जातीभेद आणि असहिष्णुतेवर नाराजी व्यक्त केली. असहिष्णुता, घृणा आणि धर्म व जातीच्या आधारे होणाऱ्या हिंसाचारांमुळे देशाच्या आर्थिक विकासाला फटका बसू शकतो. आदी गोदरेज यांनी शनिवारी एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात आपले मत मांडले आहे.

गोदरेज यांनी कार्यक्रमात बोलताना, नव्या भारताच्या निर्माण आणि 5 ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेसाठी विशाल दृष्टीकोन ठेवणाऱ्या पीएम नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या. परंतु, देशात सर्व काही सुरळीत सुरू नाही अशी खंत व्यक्त केली. गोदरेज यांनी समाजातील परिस्थिती आणि विकासदरावर चिंता व्यक्त केली. देशाला अजुनही गरीबीची समस्या भेडसावत आहे ही गोष्ट विसरू नये. या परिस्थितीमुळे आर्थिक विकासाला नुकसान होऊ शकते. देशभरात जात, धर्मावरून हिंसाचार, महिलाविरोधी हिंसाचार आणि इतर प्रकारच्या असहिष्णुता वाढत आहेत, ही सामाजिक सलोख्यासाठी मुळीच चांगली गोष्ट नाही.

4 दशकांतील बेरोजगारीचा उच्चांक
बेरोजगारीवर सुद्धा आदी गोदरेज यांनी आपल्या चिंता मांडल्या. देशात बेरोजगारीचा दर 6.1 टक्के आहे. गेल्या 4 दशकांतील हा उच्चांक आहे. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी नव्हती. ही परिस्थिती लवकरच आटोक्यात आणणे आवश्यक आहे. जल संकट, प्लास्टिकचे वाढते वापर, ढासळलेली आरोग्य यंत्रणा या सर्वच समस्यांवर युद्ध पातळीवर काम करणे आवश्य आहे.

बल्लवाचार्य विष्णू मनोहर यांची नवी इनिंग

0

‘Once मोअर चित्रपटासाठी निर्मिती व अभिनयाचा डबल धमाका

सलाम पुणे पुरस्कार प्राप्त ,खाद्यक्षेत्रात मुशाफिरी करत महाराष्ट्रातील पारंपरिक पाककृतींना जागतिक व्यासपीठ मिळवून देणारे ज्येष्ठ बल्लवाचार्य विष्णू मनोहर हे नाव आज घराघरांत सर्वपरिचित आहे. आपल्या हातच्या चवीने सगळ्यांची मनं तृप्त करत स्वयंपाकाला ग्लॅमर मिळवून देणारे विष्णू मनोहर आता चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत आपली कमाल दाखवायला सज्ज झाले आहेत. ‘Once मोअर या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने ते अभिनय क्षेत्रात पदार्पण करताहेत. तसेच या चित्रपटाच्या निर्मितीची धुराही त्यांनी सांभाळली आहे. येत्या १ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

आपल्या या इनिंगबद्दल बोलताना विष्णू मनोहर सांगतात की, ‘मी खाद्यप्रांतात रमलो असलो तरी मला   अभिनयाच्या क्षेत्रातच करिअर करण्याची इच्छा होती.इच्छा दांडगी असेल तर ती पूर्ण होतेच. माझी अभिनयाची ओढ आता ‘Once मोअर चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. या चित्रपटात मी एका राजाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या भूमिकेसाठी राजाच्या देहबोलीचा अभ्यास मी केला, त्यासोबत दिग्दर्शक नरेश बिडकर व सहकलाकार यांचं खास मार्गदर्शन मला या भूमिकेसाठी मिळालं. प्रत्येक सहकलाकाराने मला सांभाळून घेतलं. माझ्या प्रत्येक सीननंतर मी सेटवर बसून चित्रीकरण बघायचो. त्यातील बारकावे जाणून घेतले. या चित्रपटाचे ‘व्हीएफएक्स’ ही कमाल झाले आहेत. दिग्दर्शक नरेश बिडकर आणि मी एकमेकांना आधीपासून ओळखत होतो. आमचं खास असं ‘नागपूरी कनेक्शन’ आहे. हे क्षेत्र मला जरी नवखं नसलं तरी अभिनय करणे हा पूर्णपणे वेगळा भाग आहे. ‘Once मोअर चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा अनुभव मी घेतला. या चित्रपटाची निर्मितीही मी करतोय, त्यामुळे माझ्यासाठी हा डबल धमाकाच आहे.

या चित्रपटात विष्णू मनोहर यांच्यासोबत रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, नरेश बीडकर आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन श्वेता बिडकर यांनी केले आहे. धनश्री विनोद पाटील, सुहास जहागीरदार, निलेश लवंदे, विष्णू मनोहर आणि डॉ. विनित बांदिवडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभय ठाकूर, सुदिप नाईक, संपदा नाईक आणि व्ही.टी एच.एटंरटेन्मेंट सहनिर्माते आहेत.

कचरा प्रकल्पांच्या श्वेतपत्रिकेची मागणी ‘:कचरा परिषदेला चांगला प्रतिसाद

0

पुणे :पुणे शहराची कचरा समस्या ,संभाव्य उपाय ,नागरिकांचा सहभाग ,स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाचे प्रयोग  अशा अनेक पैलूंचा उहापोह करण्यासाठी आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कटिबद्ध होण्याचा निर्धार करण्यासाठी ‘शिवप्रजाराज्यम संघटना’,’माय अर्थ फाउंडेशन ‘, एन्व्हायर्नमेंट क्लब ऑफ इंडिया ‘ यांच्यातर्फे कचरा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .’पालिकेच्या कचरा प्रकल्पांवर  श्वेतपत्रिका  यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केली तर स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल होण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे आणि प्रशासन प्रामाणिकपणे कार्यरत असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सह आयुक्त  ज्ञानेश्वर मोळक  यांनी या परिषदेत सांगितले .

पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृह येथे ही परिषद  झाली .परिषदेला पुणेकर नागरिकांची  चांगली उपस्थिती होती .

       रवींद्र धारिया (अध्यक्ष ,वनराई),   ज्ञानेश्वर मोळक (सह आयुक्त , पुणे  मनपा  ),विवेक वेलणकर ( सजग नागरिक मंच ),नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे , सचिन निवंगुणे (पुणे  जिल्हा रिटेल व्यापारी संघटना ),ललित राठी (कचरा  व्यवस्थापन तज्ज्ञ ), नीलेश इनामदार ( एन्व्हायर्नमेंट क्लब ऑफ इंडिया ), विलास लेले ( ग्राहक पंचायत ), अॅड. अनिरूद्ध कुलकर्णी यानी परिषदेत विचार मांडले .

‘वनराई ‘चे अध्यक्ष रवींद्र धारिया म्हणाले, ‘ कचरा समस्येचे मूळ हे स्वच्छतांच्या सवयींशीसुध्दा निगडीत आहे. हव्यासामुळे पर्यावरणाचा नाश होत आहे. पुण्याच्या  लोकसंख्येला साजेसे कचरा व्यवस्थापन करणे आव्हानात्मक काम आहे.सर्वांच्या  प्रयत्नांनी ते शक्य आहे.त्यासाठी जनजागृती करण्याचा कचरा परिषदेच्या संयोजकांचा प्रयत्न महत्वाचा आहे . ‘

विवेक वेलणकर म्हणाले, ‘पालिकेच्या कचरा व्यवस्थापन कामाचा लेखाजोखा घेतला पाहिजे. पुणेकरांचा वचक, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर नाही.२५ हून अधिक प्रकल्प होऊनही समस्या सुटली नाही.कोटयवधी रुपये वाया गेले. या सर्व गोष्टींची श्वेतपत्रिका आणायची गरज आहे. सल्लागारांवर कोटयवधी खर्च केले जातात. जुने प्रकल्प वाऱ्यावर सोडून नवे आणले जातात. महापालिका स्वतःची जबाबदारी नागरिकांवर झटकून टाकत आहे .इंदोर चा स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक येतो ,आणि पुण्याचा येत नाही ,कारण इंदुरप्रमाणे पुण्यातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सकाळी रस्त्यावर कचरा व्यवस्थापनसाठी उपस्थित नसते .

पालिकेचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक म्हणाले. २१०० मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. त्यातील १४०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.पुणे पालिका प्रामाणिकपणे कचरा समस्येवर काम करू इच्छित आहे. माझ्या कारकिर्दीत नागरिकांशी संवाद ठेऊन समस्येला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. नागरिकांची मानसिकता सकारात्मक करण्याची आवश्यकता आहे.  स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल होण्याचे प्रयत्न सुरु आहेत.ओला- सुका कचरा वर्गीकरणाची जबाबदारी नागरिक पार पाडणार की नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे.

नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे ही सभागृहात उपस्थित होत्या.त्या म्हणाल्या ,’नागरिकांचा  सहभाग मिळवून सातत्याने प्रयत्न केल्याने आमच्या प्रभागात ३६ कचरापेट्या काढण्यात यश मिळाले आणि घरोघरी कचऱ्याचे वर्गीकरण होऊ लागले .ओल्या -सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण ही दैनंदिन सवय बनली पाहिजे . पालिका कर्मचाऱ्यांसमवेत मी  नगरसेवक   या नात्याने रोज सकाळी रस्त्यावर कामाची देखरेख करते . देशभरात कचरा निर्मूलनाच्या चांगल्या प्रयॊगातून नवे उपाय शिकत राहते  ‘

सचिन निवंगुणे म्हणाले, ‘ पूर्वी शहरातील कंपोस्ट झालेला कचरा शेतीसाठी नेला जायचा. प्लास्टिक हे   पुण्यातील कचऱ्यात मिसळल्याने शेतकऱ्यांनी कंपोस्ट खत म्हणून नेणे बंद केले. पुण्यात कचरा साठून राहत आहे.पन्नास मायक्रॉन जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आल्याने प्लास्टिक वाढलेच आहे. फक्त दंडात्मक कारवाईची सोय म्हणून दुकाने आणि व्यापाऱ्यांकडे पाहिले जाते.

नीलेश इनामदार म्हणाले, ‘ प्लास्टिक पासून इंधन तयार करणे शक्य आहे. घरोघरी कचऱ्याचे वर्गीकरण, विघटन करुन बागांसाठी वापरता येईल.अनेक नवी संशोधने घरच्या कचरा व्यवस्थापन करण्यासाठी   आहेत .त्याचा उपयोग केला पाहिजे .

‘कचरा आणि प्लास्टिक व्यवस्थापन करताना त्याकडे समस्या म्हणून पाहता कामा नये. सर्व समाज एकत्र येऊन मॉडेल उभे केले पाहिजे ‘ , असे विचार ललीत राठी यांनी व्यक्त केले.

प्रारंभी कचरा समस्येवर पथनाट्य सादर करण्यात आले . शेवटी कचरा व्यवस्थापन ,शहर स्वच्छतेची सामूहिक शपथ   घेण्यात आली.  परिषदेचे संयोजक अनंत घरत  यांनी प्रास्ताविक केले .

देवळे शाळेतील शिक्षिका स्काऊट मेळाव्यासाठी जाणार अमेरिकेला

0
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील आदीवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळे या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता सुनील कुऱ्हाडे मॅडम यांची उत्तर अमेरिका येथे होणाऱ्या चोविसाव्या जागतिक स्काऊट जांबोरी मेळाव्यासाठी निवड झाली आहे.
15 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अमेरिकेतील ग्लेन जैन वेस्ट व्हर्जिनिया येथे स्काऊट मेळावा होणार आहे.स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांनी ही चळवळ सुरू केली आहे.दर चार वर्षांनी विविध देशात जागतिक जांबोरी चे आयोजन करण्यात येत असते.
अनलॉक न्यू वर्ल्ड बंधनमुक्त नवीन जग हे या मेळाव्याचे ब्रीद वाक्य आहे जगातील विविध देशाचे 40,000 स्काऊट प्रतिनिधी एकत्र येऊन आपल्या देशातील संस्कृती,जागतिक वारसा,रूढी परंपरा चालीरीती यांचे एकत्रित देवाण-घेवाण करून अभ्यास करत असतात, आणि कुऱ्हाडे  हे या अगोदर जांबोरी साठी लंडन या ठिकाणी गेल्या होत्या कुऱ्हाडे राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्मसहिष्णुता वाढीस लागण्यास मदत करणार आहेत.
तसेच साहसी खेळ सांस्कृतिक कार्यक्रम यात सहभागी होऊन विविध देशाचे देशातील संस्कृतीचा अभ्यास करणार आहेत.शाळेच्या वतीने कुऱ्हाडे मॅडम यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
आदिवासी दुर्गम भागातील एक शिक्षिका स्काऊट गाईड साठी उत्तर अमेरिकेत जाते. हे गावासाठी आणि शाळेसाठी भूषणावह बाब आहे. म्हणून शाळेच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने कुऱ्हाडे मॅडम यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री चिमाजी भोजने बाळासाहेब लांघी सर सुवर्णा ढोबळे ,मॅडम मनीषा कवडे मॅडम, रमेश वायडे सर, आणि केंद्रप्रमुख विठ्ठल सांगडे साहेब उपस्थित होते.