Home Blog Page 2891

एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी

0

पुणे: नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑपथेलमॉलजी(एनआयओ) आणि रन बडिज क्लब यांच्या तर्फे सहाव्या एनआयओ व्हिजन अर्ध मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी असुन यामध्ये 1000 ब्लॉईंड फोल्डेड धावपटू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा रविवार, दि. 21 जुलै 2019 या दिवशी होणार आहे.

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑपथेलमॉलजी(एनआयओ)चे संस्थापक डॉ. श्रीकांत केळकर यांनी सांगितले की, आज अंधत्वातने ग्रासलेल्या किमान 31 दशलक्ष नागरिकांना आल्या अंधत्वावरील उपचारांचे योग्य व्यवस्थापन करता आले असते किंवा हे अंधत्व त्यांना पूर्णपणे टाळणेही शक्य झाले असते. भारतातील अंधांची संख्या जगातील एकूण अंधांच्या 75 टक्के इतकी आहे. आपल्या मुलांमधील किंवा 30 वर्षांवरील प्रौढांमधील टाळता येण्याजोग्या अंधत्वाचे प्रमाण लक्षणीय आहे. खरे म्हणजे ग्लाकोमामोतीबिंदू किंवा मधुमेह हे समजण्यासाठी केल्या जाणाऱ्या वैद्यकीय चाचण्या अतिशय सर्वसामान्य आहे. त्यामुळे आपल्या दृष्टीचे अधिक नुकसान होणे टाळता येऊ शकते. डॉ आदित्य आणि डॉ जाई केळकर यांनी गेल्या पाच वर्षांपासून टाळता येण्याजोग्या अंधत्वाचे उच्चाटन ही मोहीम हाती घेतली असून या उपक्रमांतर्गत त्यांनी दारिद्रय रेषेखालील 700हुन अधिक रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया केल्या आहेत. या उपक्रमांर्गत आयोजित करण्यात आलेली एनआयओ व्हिजन मॅराथॉन ही डॉक्टर कुटुंबियांचा मोहिमेचाच एक भाग आहे. 

स्पर्धेविषयी माहिती देताना रनबडिज्‌ क्लबचे निखिल शहा आणि अरविंद बिजवे यांनी सांगितले की, रनबडिज्‌ क्लब या शहरांतील महत्वाच्या संस्थेच्या संलग्नतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 3कि.मी, 5कि.मी, 10कि.मी, 15कि.मी आणि 21कि.मी.या प्रकारात होणार आहे.  यामध्ये यापैकी कुठल्याही शर्यतीत तुम्ही एक साथीदार डोळेबांधून धावू शकता किंवा अर्धे तुम्ही धावायचे आणि अर्धे तुमच्या साथीदाराने धावायचे अशा अनोख्या व नाविन्यपूर्ण संकल्पनेचा यात समावेश आहे. रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर  येथे  स्पर्धेचा फ्लॅग ऑफ होईल.  स्पर्धेचा मार्ग रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर येथुन स्पर्धेला प्रारंभ होणार असून औधच्या दिशेने पुन्हा फिरून रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर असा मार्ग असणार आहे. स्पर्धेचा फ्लॅग ऑफ एनआयओचे  डॉ.श्रीकांत केळकर व अरुणा केळकर, एनआयओच्या संचालिका डॉ. आदित्य केळकर, डॉ. जाई केळकर यांच्या हस्ते होणार आहे. एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत गतवर्षी नोंदविलेला विक्रम यावर्षी मोडीत काढून एक नवा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अंड्याला शाकाहारी म्हणणे अयोग्य व अवैज्ञानिक

0
डॉ. कल्याण गंगवाल यांचे स्पष्टीकरण; अंडे मांसाहारी असल्याचा दावा
 
पुणे : ”कोंबडी आणि अंड्याला शाकाहाराचा दर्जा मिळावा, अशी मागणी अतिशय चुकीची असून, अंड्याला शाकाहारी म्हणणे  अयोग्य व अवैज्ञानिक आहे,” असे स्पष्ट मत सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी व्यक्त केले. आयुष मंत्रालयाने कोंबडी आणि अंड्याला शाकाहारी म्हणून घोषित करावे, अशी मागणी संजय राऊत यांनी नुकतीच राज्यसभेत केली होती. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गंगवाल बोलत होते.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “ज्या पेशीला सेल मेम्ब्रेन असते, तो पदार्थ मांसाहारी असतो. ज्या पेशीला सेलवॉल असते तो शाकाहारी, अंड्याला सेल मेम्ब्रेन आहे. त्यामुळे ते मांसाहारी आहे. दुसरा मुद्दा म्हणजे ते कोंबडीच्या गर्भाशयातून येते. प्रत्येक फलित वा अ-फलित अंड्यात जिवंत स्त्रीबीज असते. अंड्याच्या कवचावर १५००० सूक्ष्म छिद्रे असतात त्यातून आतील स्त्रीबीज श्वासोच्छवास करत असते. अंडे इन्क्युबेटरमध्ये ठेवले असता, ते ऑक्सिजन घेते, हे त्याच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. पूर्वी भाजीवाल्यांच्या दुकानात अंड्याची विक्री जात होती. आम्ही ऍडव्हर्टायझिंग कौन्सिलकडे तक्रारी केल्या. त्यांनीही अंडे मांसाहारी असल्याचे मान्य केले होते. अफलित अंडी शाकाहारी म्हणून विकणे सामाजिक गुन्हा असल्याचा निकाल एडव्हर्टायजिंग स्टँडर्ड्स कौंसिल ऑफ इंडियाने (भारतीय विज्ञापन मापक परिषद) २६ में १९९० रोजी दिला आहे, हेदेखील आपण लक्षात घेतले पाहिजे.”
डॉ. गंगवाल पुढे म्हणाले, “अंड्याची तुलना स्त्रीच्या राजोधर्माशी करता येईल. अंडी ही गर्भरज व योनीजन्य पदार्थ आहे. स्त्रीच्या प्रत्येक मासिक पाळीत एक स्त्रीबीज बाहेर पडत असते. तसेच कोंबडीच्या प्रजनन प्रक्रियेत कोंबडीचे स्त्रीबीज अंड्याच्या रूपाने बाहेर पडते. ज्यांना नराचा संकर झाला नाही, त्या अफलित अंड्याना शाकाहारी म्हणणे अवैज्ञानिक आहे. अफलित अंड्यातदेखील जिवंत स्त्रीबीज असते. त्यामुळे त्याला शाकाहारी म्हणणे चुकीचे आहे, असा निष्कर्ष शास्त्रज्ञ पीटर रॉम्पकीन्स क्रिस्तोर यांच्या द सिक्रेट लाईफ ऑफ प्लॉट्स या पुस्तकात आहे.”
“अंड्याला शाकाहारी ठरवण्यामागे आर्थिक राजकारण आणि खेळी आहे. आम्ही शाकाहाराचे समर्थन करणाऱ्या सर्व संघटना याला एकत्रित विरोध करणार आहोत. अर्थनीतीवर आधारित, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातबाजीच्या तंत्राने अंडी शाकाहारी, पौष्टिक आणि आरोग्याला उत्तम असल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. त्याची खरच गरज आहे का? ज्यावेळी अंडी झाडाला लागतील किंवा जमिनीत उगवतील तेव्हा आपण त्याला शाकाहारी नक्की म्हणू. तोवर मात्र अंडे हे मांसाहारी आहे, हेच सत्य आहे.”
काय होतात आजार
अंड्याच्या सेवनामुळे सालमोनेला (टायफॉईडचा ताप), ऍलर्जी, सर्दी, दमा, त्वचारोग, फूड पॉइजनिंग, पचन प्रक्रियेत बिघाड आदी आजार बळावतात. अनेक घातक अंश शरीरात येत असल्याने ह्रदयविकार होण्याची शक्यता अधिक असते. अंडी शाकाहारी नाहीत. अफलित अंड्यातील जिवंत स्त्रीबीजाला आपण मारतो. अशा हिंसक आहारामुळे मानसिक आरोग्यही बिघडते.

योगी सरकारची मस्ती : पीडितांना भेटायला निघाल्या म्हणून प्रियांका गांधींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न(व्हिडीओ)

0

लखनऊ/वाराणसी : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आज सोनभद्र जिल्ह्यात जमिनीच्या वादातून झालेल्या हत्याकांडा तील  पीडित कुटुंबीयांच्या भेटीसाठी सोनभद्रकडे निघाल्या होत्या. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली .दरम्यान या प्रकारामुळे देशभर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून कॉंग्रेसचे जनरल सेक्रेटरी के सी वेणुगोपाल यांनी या कृतीचा जोरदार निषेध देशभरातील कॉंग्रेस कार्यकर्ते करतील असे सांगितले

सोनभद्र हत्याकांड प्रकरणात १० जणांची हत्या झाली होती. या हत्याकांडामुळे सोनभद्र परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रियांका गांधींना रोखलं. त्यानंतर प्रियांका गांधींनी रस्त्यातच ठाण मांडून आंदोलन सुरु केलं असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर आम्हाला केवळ पीडित कुटुंबीयांची भेट घ्यायची आहे. माझ्यासोबत फक्त चार जण असतील असंही मी सांगितलं होतं. तरीही हे प्रशासन आम्हाला तिथे जाऊ देत नाही. आम्हाला का अडवलं याचं उत्तर द्यायला हवं,’ असं प्रियांका म्हणाल्या. ‘पोलीस आम्हाला ताब्यात घेऊन कुठे नेत आहेत हे आम्हालाही माहीत नाही. मात्र आम्ही कुठेही जाण्यास तयार आहोत’ अशी प्रतिक्रिया प्रियंका यांनी दिली.

दरम्यान प्रियांका यांनी सुरुवातीला लखनऊमध्ये जाऊन गोळीबारात जखमी झालेल्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्या पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी सोनभद्रकडे निघाल्या. त्याचवेळी नारायणपूरजवळ त्यांचा वाहनताफा अडवला. या कारवाईविरोधात प्रियांकांनी रस्त्यावरच धरणे धरले. पोलिसांनी परिसरात जमावबंदी आदेश लागू केले. त्यानंतर प्रियांकांना ताब्यात घेण्यात आले .

उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगार सुसाट
सोनभद्रला जाताना प्रियंकांच्या ताफ्याला वाराणसीजवळच थांबवण्यात आले. त्यानंतर त्या धरण्यावर बसल्या. प्रियंकांनी याआधी ट्रॉमा सेंटरमधून निघताना मीडियाशी बोलताना सांगितले होते की, उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्था राखली जात नाही. येथील गुन्हेगार सुसाट आहेत, त्यांना सरकारची भीती राहिली नाहीये.

प्रियंका गांधींनी योगी अदित्यनाथांना पत्र लिहीले
गुरुवारी प्रियंकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहीले. त्यात त्यांनी लिहीले की, राज्यातील दौऱ्या दरम्यान दिलेल्या सुरक्षेचे कौतुक करते, पण या सुरक्षेमुळे जनतेला होणाऱ्या त्रासामुले दुखी आहे. जनतेची सेवक असल्यामुळे माझ्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये.

EVM विरोधी रॅलीत राज ठाकरे, अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येण्याची शक्यता

0

मुंबई- क्रांती दिनी म्हणजेच 9 ऑगस्टला इव्हीएम विरोधात सर्व विरोधीपक्ष आणि संघटनां मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. विरोधकांच्या या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा येणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमविरोधी भूमिका आणखी तीव्र झाली, त्यामुळे मोर्चात प्रमुख विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत.

विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी विरोधी पक्षांची आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधी भूमिका अनेकवेळा जाहीर बोलून दाखवली आहे. त्यामुळेच आता ईव्हीएमविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात राज ठाकरे, अजित पवार, प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.मुं

राज ठाकरे यांनी इव्हीएमच्या मुद्यावर केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती, तसेच बॅलेज पेपरद्वारे मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयुक्तांकडे केली होती. या भेटीनंतर राज ठाकरेंनी थेट सोनिया गांधींच भेट घेतली. इव्हीएम विरोधात देशव्यापी आंदोलन उभे राहण्याची गरज असल्याची भूमिका त्यावेळी राज ठाकरे यांनी मांडली

लोकेशन….(लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

0

प्रसंग १ – अरे यार, तू नक्की कुठे उभा आहेस ते आधी सांग…मी तू सांगितलेल्या स्पॉटवर उभा आहे, इंडिकेटरच्या अगदी खाली._

प्रसंग २ – अगं, मी इथेच तर आहे. टेलरकडेच भेटायचं ठरवलं होतं ना आपण, ये लवकर आता._

प्रसंग ३ – आज कुठे भेटू या आपण? नेहमीचा बस स्टॉप नको आता…सगळे ओळखायला लागलेत आपल्याला.

असे संवाद आपण आजूबाजूला नेहमीच ऐकतो किंवा कानावर तरी पडतातच. भेटण्याचं ठिकाण…कुठे आणि कुणाला, यावर सगळं अवलंबून असतं. या भेटण्याच्या ठिकाणालाही खूप महत्त्व असतंच की आणि ही भेटण्याची ठिकाणं पण खूप मजेशीररित्या सांगितली जातात .

स्टेशनवर भेटायचं असलं की – मग त्या ४ नंबरच्या मेन  इंडिकेटरच्या खाली भेट किंवा पेपर स्टॉलवर भेट – हा पुरुषांमधील, साधा सुटसुटीत संवाद पण दोन बायकांना भेटायचं असलं की – अगं ४ नंबरच्या पुढच्या लेडीजच्या डब्याकडे येशील का? की असं करुया…उतरल्यावर बाहेर पडायला म्हणून फर्स्ट क्लासच्या बाजूचा लेडीज बरा पडेल…यावर खलबतं. कधी तर घाईघाईत एकतर प्लॅटफॉर्म किंवा डबा चुकीचा सांगितला जातो आणि मग गोंधळ उडतो.

गावातील एखाद्या मिटींग बहुतेक वेळा गार्डनमध्ये किंवा शाळेच्या वर्गात रविवारच्या ठरलेल्या (दादरला प्लाझा सिनेमासमोरील गार्डनमध्ये या अशा मिटींग नेहमीच होत असतात). सेल्स प्रतिनिधी किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह कमी वर्दळ असलेल्या प्लॅटफॉर्मवर मिटींगसाठी सकाळी वा संध्याकाळच्या वेळेत जमलेले असतात (प्लॅटफॉर्मवरील ही अलोट गर्दी अशी असते). कित्येकदा बस स्टॉपवर रांगेत उभे असलेले प्रवासी बससाठी कमी तर इतर कुणाला भेटण्यासाठी वाट पाहत असतात. बस आली तरी हे काही चढत नाही आणि मग मागचा प्रवासी खेकसतो – बसमध्ये चढायचं नव्हततं तर कशाला रांगेत उभा राहिला…वगैरे वगैरे

शक्यतो भेटण्याचं ठिकाण हे मध्यवर्ती आणि सोयीचं असंच असतं. दादरमध्ये ‘सुविधा’च्या बाहेरील दृश्य – बरेच जण कुणाला ना कुणाला तरी भेटण्यासाठी थांबलेले असतात. दुकानात जेवढी गर्दी तेवढीच गर्दी बाहेर भेटेकरांची असते. त्या भेटकरांकडून दुकानदार आता चार्जेस वसूल करेल की काय, असे गमतीने म्हणावेसे वाटते…कारण नेहमीच ही गर्दी असते.

सीसीडी, कँटीन, कट्टा ही कॉलेजकरांची हमखास भेटण्याची आणि कटिंग चहा टाकायची ठिकाणे. सिनिअर सिटीझन सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने पार्कच्या कट्टयावर किंवा सार्वजनिक वाचनालयाच्या बाकड्यावर भेटतात तर महिलामंडळ देऊळ किंवा कुणाच्या घरी वगैरे.

आता तर कांदेपोह्याचा कार्यक्रम म्हणजेच मुलीला बघण्याचा कार्यक्रमही घरी न होता, भेटण्याचे ठिकाण ठरवून बाहेरच केला जातो. म्हणजे घरी कांदेपोहे करायलाही नकोत आणि शेजारीपाजारी कळायलाही नको. मध्यंतरीचा एक पाहण्यातला प्रसंग आठवतो. असंच आम्ही एकदा लंचला रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. आमच्या बाजूच्या टेबलवर एक फॅमिली होती ४ जणांची, पण टेबल मात्र १० माणसांच्या कॅप्यासिटीचे होते. हे बघून जरा आश्यर्च वाटले. थोड्या वेळाने आणखी एक फॅमिली त्यांना जॉईन झाली. लंच करता करता अधूनमधून तिकडं लक्ष जात होतं. काही वेळाने त्यातील एक मुलगा व मुलगी दुसऱ्या वेगळ्या टेबलावर जाऊन बसले. माझ्या चेहऱ्यावरील आश्चर्य बघून ओमकारने (माझ्या मुलाने) माहिती पुरवली – आई, मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे तो. मग माझी उत्सुकता वाढली. इकडे त्या दोन फॅमिली मध्येही बोलणे चालू होतेच. थोड्या वेळाने ती दोन्ही जणं फॅमिलीला जॉईन झाली. बहुतेक दोघे एकमेकांना पसंत पडली असावीत. त्यांच्या आनंदी चेहऱ्यावरून तरी तसं जाणवत होतं. एकंदरीत हा प्रकार बघून मला गम्मत वाटली. किटी पार्टीसाठी काही हॉटेलं दुपारच्या लंचसाठी स्पेशल डिस्काउंट देतात, तसं आता या खास कांदेपोह्याच्या कार्यक्रमासाठीही खास डिस्काउंट देतील की! ‘पहिली  अविस्मरणीय भेट आमच्याच इकडे. खास स्पेशल डिस्काउंट (आपल्या आवडीनुसार खास मेनू)’ असे बोर्डही लागतील रेस्टारंटच्या बाहेर.

जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पहाते, असे म्हणण्याचे दिवस गेले. आता भेटण्याची ठिकाणं, डेस्टिनेशन्स बदलले. सीसीडी, चाय टाइम, स्टार बक्स…इथे तासनतास गप्पा मारत बसलेली तरुणाई दिसते. आता तर भेटण्याच्या ठिकाणाचे लोकेशनही शेअर करता येते (मोबाईलचा हा एक महत्त्वाचा फायदा).

कुठे ना कुठे कुणीतरी अचानक भेटतं आणि मग जुन्या आठवणी निघाल्या की आपण म्हणतोच…तो किंवा ती भेटला होती मला त्या ठिकाणी. अशीच एखादी प्रिय व्यक्ती भेटल्याचे त्या भेटण्याच्या ठिकाणासह लक्षात राहते…आपल्या आठवणींच्या अल्बममध्ये. प्रत्येकाच्याच आयुष्यात कितीतरी महत्त्वाचे असते हे भेटण्याचे ठिकाण…

 

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

 

 

 

 

झी मराठीवर येतोय ‘नटसम्राट’

0

विलयम शेक्सपिअरच्या गाजलेल्या शोकांतिकांवरून प्रेरित होऊन साहित्यऋषि वि. वा. शिरवाडकर यांनी नटसम्राट हे नाटक लिहिलं. ७०च्या दशकात या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास रचला. आजवर यशवंत दत्त, सतीश दुभाषी, दत्ता भट, श्रीराम लागू, उपेंद्र दाते यांनी गणपतरावांची व्यक्तिरेखा साकारली.

‘नटसम्राट’च्या रूपाने झी मराठी वाहिनीने एक अजरामर नाट्यकृती पुन्हा रंगभूमीवर आणली. ‘कोणी घर देत का घर?’ अशी आर्त साद देत हिंडणाऱ्या अप्पासाहेब बेलवणकरांच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेते मोहन जोशी प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि प्रेक्षकांचा या नाट्यकृतीला भरगोस प्रतिसाद मिळाला. नाट्यगृहाबाहेर हाउसफुलची पाटी असणं यात काहीच शंकाच नव्हती. प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळालेली ही यशस्वी नाट्यकृती आता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. येत्या रविवारी २१ जुलै रोजी दुपारी १२ आणि  संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षक या अजरामर नाट्यकृतीचा आस्वाद घेऊ शकतात.

पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत विपार स्पिडिंग चिताज संघाचा बाद फेरीत प्रवेश

0
पुणे-पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत विपार स्पिडिंग चिताज संघाने पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाचा 44-30 असा पराभव करत सलग चौथ्या विजयासह बाद फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत विपार स्पिडिंग चिताज संघाने पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाचा 44-30 असा पराभव करत सलग चौथ्यांदा विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला. 8 वर्षाखालील मिश्र गटात नमिष हुडने अचिंत्य कुमारचा 4-0 असा एकतर्फी पराभव करत विजयी सुरूवात केली. 12 वर्षाखालील मुलींच्या गटात सलोनी परीदाने  वैष्णवी सिंगचा 6-0 असा पराभव केला.  14 वर्षाखालील मुलांच्या गटात ईशान देगमवारने मोक्ष सुगंधीचा 6-3 असा तर मुलींच्या गटात अलिना शेखने शान्या हटणकरचा 6-0 असा पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.
14 वर्षाखालील दुहेरी गट गटात  केयुर म्हेत्रे व अदनान लोखंडवाला यांनी आदित्य राय व आदित्य भट्टेवारा यांचा 6-4 असा तर 10 वर्षाखालील दुहेरी गटात वेद मोघे व रियान माळी या जोडीने दक्ष पाटील व मनन अगरवाल यांचा 4-2 असा पराभव केला. मिश्र दुहेरी गटात श्रावणी पत्की व विश्वजीत सनस या जोडीने सिमरन छेत्री व अभिनीत शर्मा यांचा 6-1 असा पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.
 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

विपार स्पिडिंग चिताज वि.वि  पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स: 44-30 (एकेरी: 8 वर्षाखालील मिश्र गट: नमिष हुड वि.वि  अचिंत्य कुमार 4-0; 10वर्षाखालील मुले: क्रिशांक जोशी पराभूत वि राम मगदुम 2-4; 10वर्षाखालील मुली: हृतीका कापले पराभूत वि आस्मी टिळेकर  0-4;
12 वर्षाखालील मुले: अर्चीत धुत पराभूत वि अभिराम निलाखे 3-6;
12 वर्षाखालील मुली: सलोनी परीदा वि.वि वैष्णवी सिंग 6-0; 14 वर्षाखालील मुले:  ईशान देगमवार वि.वि मोक्ष सुगंधी 6-3; 14 वर्षाखालील मुली: अलिना शेख वि.वि शान्या हटणकर  6-0; कुमार दुहेरी गट: कृष्णा घुवलेकर/वेदांग काळे पराभूत वि अमोद सनस/अर्णव बनसोडे 1-6; 14 वर्षाखालील दुहेरी गट: केयुर म्हेत्रे/अदनान लोखंडवाला वि.वि आदित्य राय/ आदित्य भट्टेवारा 6-4, 10 वर्षाखालील दुहेरी गट: वेद मोघे/रियान माळी वि.वि दक्ष पाटील/मनन अगरवाल 4-2; मिश्र दुहेरी गट: श्रावणी पत्की/विश्वजीत सनस वि.वि सिमरन छेत्री/अभिनीत शर्मा 6-1

खड्डे विरहीत रस्ते आणि आपत्तकालीन ‘देवदूत’कसा असावा यासाठी महापौरांसह १० भाजप नगरसेवक न्यूयार्क दौऱ्यावर

0

पुणे :-तेरा लाखाच्या मोटारीला  १ कोटी १० लाखात ‘देवदूत ‘बनवूनही कामाला आली नाही ,विविध मार्ग वापरूनही रस्ते खड्डेमुक्त होवू शकले नाहीत ,पावसाळ्यात भिंती,बांधकामे कोसळून दरवर्षी काहीजण हकनाक मरतातच कसे ? महापालिकेतील बोगस कामगार हटवून रिकाम्या जागा(रिक्त पदे) भराव्यात कशा ?पुणेकरांना २४ तास समसमान पाणीपुरवठा करावा तरी कसा ? या सर्वावर उत्तर शोधण्यासाठी आणि आता तोडगा काढण्यासाठी पुण्याचे महापौर मुक्ता टिळक ,स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे ,शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष तरुण तडफदार नगरसेवक सुशील मेंगडे तसेच अजय खेडेकर,दिलीप वेडे पाटील,राजा बराटे  यांच्यासह १२ नगरसेवक स्वखर्चाने न्यूयार्क दौऱ्यावर आज पहाटे रवाना झालेत .त्यांना ओस्टन सिस्टर सिटी -मैत्री करारान्वये न्युयार्कच्या महापौरांनी दिलेल्या निमंत्रणावरून हि सारी मंडळी मोठी गुप्तता पाळून शहर हितासाठी स्वखर्चाने तातडीने रवाना झाली असल्याचे समजते .

महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही या दौऱ्याबाबत माहिती नसल्याचे समोर आले आहे.सभागृहनेते श्रीनाथ भिमाले,   उमेश गायकवाड, यांचा समावेश करूनही हे  दौऱ्यात सहभागी झाले नसल्याचे वृत्त आहे. शहरात बेरोजगारी आणि वाढती वाहतूक अशा प्रश्नांनी उग्र स्वरूप धारण केले आहे .धरण भरूनही शहराला पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते आहे .महापौर पदाचा कार्यभार सांभाळून अडीच वर्षे झालीत या अडीच वर्षात महापालिकेच्या आपत्तीकालीन व्यवस्थे ने ‘देवदूत’ नावाच्या वाहनावर करोडोंची उधळण केली .हि चुकीची कि बरोबर याचा चौकशी अहवाल आला कि नाही आला हा गोंधळ कायम असताना हा दौरा सुरु झाला आहे .
भाजपची सत्ता आल्यानंतर काही उड्डाणपूल तयार झाले ,आता मेट्रो हि लवकरच सुरु होईल पण …कुठे तरी काही तरी चुकते आहे ..हे सारे करूनही वाहतूक समस्या मिटेल असे वाटत नाही ..यामागे नेमके काय रहस्य असावे याचा शोध घेण्याचा प्रयत्न न्यूयार्क मध्ये महापौरांच्या नेतृत्वाखाली हि नगरसेवकांची टीम करेल असे समजते आहे.

मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबई भाजपचा पदभार लोढा यांच्या हाती

0

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई भाजप प्रदेशचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगल प्रभात लोढा शुक्रवारी पदभार स्वीकारतील. मुंबई भाजपच्या दादर येथील वसंत स्मृती भवन कार्यालयात १९ जुलै रोजी दुपारी १ वाजता होणारा हा कार्यक्रम ‘नव संकल्प’ संमेलनाच्याअंतर्गत आयोजित करण्यात आला आहे. अनेक मंत्री, खासदार, आमदार व नगरसेवकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील.

भाजपच्या या ‘नवसंकल्प’ संमेलनात उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, गृह निर्माण राज्यमंत्री योगेश सागर आणि महिला व बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्यासह उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, उत्तर मध्य मुंबईचे खासदार पूनम महाजन आणि उत्तर पूर्व मुंबईचे खासदार मनोज कोटक ही लोढा यांच्या भाजप मुंबई प्रदेश अध्यक्षाच्या पदग्रहण समारंभात सहभागी होतील. याशिवाय प्रकाश मेहता, अतुल भातखळकर, अमित साटम, राम कदम, भाई गिरकर, राज के पुरोहित, मनीषा चौधरी, प्रसाद लाड, कॅप्टन तमिल सेल्वन, पराग अलवणी, सरदार तारासिंह, भारती लवेकर, प्रवीण दरेकर, आरएन सिंह आदी मुंबईतील सर्व आमदारांबरोबरच नगरसेवकही उपस्थित राहतील. या कार्यक्रमात शायना एनसी, संजय उपाध्याय, मधु चव्हाण, अमरजीत मिश्र, हाजी हैदर आजम, सुमंत घैसास, हाजी अराफात शेख, संजय पांडे आणि मुंबईतील सर्व जिल्हा अध्यक्ष, नगरसेवक व पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित राहतील.

मुंबईतील अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक संघटना आणि विविध संस्थांशी संबंधित लोक ‘नवसंकल्प संमेलनात’ सभागी होणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा यांची भाजप मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पदभार ग्रहण समारंभाला ‘नवसंकल्प संमेलना’च्या स्वरूपात आयोजित करण्यामागे ही भावना आहे कि, पक्षाचे कार्यकर्ते या समारंभातून विजयाचा नवीन संकल्प घेऊन पुढे वाढावे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईमध्ये भाजपचा मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित करावा.

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढण्याची निवडणूक आयोगाकडून नोटीस

पुणे(चंद्रकांत भुजबळ )-लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता निवडणूक आयोगाकडूनही राष्ट्रवादीसह इतर पक्षांना धक्का बसण्याची शक्यता आहे. आयोगाने अनेक पक्षांना त्यांना दिलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस दिली असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे. मताधिक्यात घट झाल्याने राष्ट्रवादी प्रादेशिक पक्षच राहणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना चिन्ह वाटपात त्याचा फटका बसणार आहे. निवडणुकीत उमेदवारांना चिन्ह वाटपात सर्वप्रथम राष्ट्रीय पक्षाना प्राधान्य देण्यात येते नंतर प्रादेशिक पक्ष व नंतर इतर पक्ष आणि अपक्ष अशाप्रकारे प्राधान्यक्रम असल्याने या निर्णयाचा काही प्रमाणात थेट मतदानावर परिणाम होण्याची शक्यता असते. आधीच पराभवाने खच्चीकरण व आत्मविश्वास ढळल्याने इच्छुकांची संख्या कमी झालेली असून आता या निर्णयामुळे आणखीनच मनोधैर्य खचणार आहे. नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत बसपमुळे बहुतांश मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी व काँग्रेस उमेदवारांना दुसरया व तिसऱ्या क्रमांकावर मतपत्रिकेवर (बॅलेंट पेपर) स्थान मिळाले होते. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला आज (गुरुवार) नोटीस दिली आहे. आयोगाच्या या नोटीशीवर राष्ट्रवादीला 20 दिवसांमध्ये उत्तर द्यावे लागणार आहे. उत्तर न आल्यास राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्याने देशाच्या राजधानीत असलेले शासकीय कार्यालय देखील काढून घेण्याची शक्यता आहे. आयोगाने राष्ट्रवादीला आज नोटीस दिली आहे. आयोगाच्या या नोटीशीवर राष्ट्रवादीला 20 दिवसांमध्ये उत्तर द्यावं लागणार आहे. उत्तर न आल्यास राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांच्या फक्त 5 जागा आलेल्या आहेत यामध्ये काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली तर राष्ट्रवादीला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. निवडणूक आयोगाने सध्या देशातल्या सात पक्षांना राष्ट्रीय पक्षांचा दर्जा दिला होता.राष्ट्रीय पक्षांचा दर्जा तपासण्यासाठी नव्या नियमांनुसार पाच ऐवजी 10 वर्षांच्या कामगिरीचा विचार केला जातो. राष्ट्रवादीचे चार खसादार निवडून आले असले तरी इतर नियमांची पुर्तता करणे पक्षाला शक्य नाही त्यामुळे पक्ष काय उत्तर देतो हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली की त्या पक्षाला कार्यालयासाठी मोठ्या शहरांमध्ये कमी किंमतीत जागा व देशभर एकच निवडणूक चिन्ह अशा अनेक सुविधा मिळत असतात.

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी आवश्यकता-

* निवडणूक आयोग 1968 च्या नियमानुसार राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देते.

* त्या पक्षाचे लोकसभेत किमान चार खासदार पाहिजे.

* त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांत लोकसभा निवडणुकीत किंवा तेथील विधानसभा निवडणुकांमध्ये सहा टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली पाहिजे.

* चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता पाहिजे.

सध्या हे आहेत सात राष्ट्रीय पक्ष-

भारतीय जनता पक्ष

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

भारतीय कम्युनिस्ट पक्ष

बहुजन समाज पक्ष

तृणमूल काँग्रेस

महाराष्ट्रातील सहा प्रकल्पांना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी

0

नवी दिल्ली: केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदलमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत आज महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण 6 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.

श्री. जावडेकर यांनी ही माहिती दिली असून या मंजुरीने आदिवासी व वन बांधवांना फायदा होईल तसेच पर्यावरणाचे रक्षण व विकास होणार असल्याच्या भावनाही व्यक्त केल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील सोनवडे-घोडगे हा कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोडणाऱ्या घाट रस्त्याला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची दुसऱ्या टप्प्याची मंजुरी प्रलंबित होती, आजच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली. यासह अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या वनाच्छादित व आदिवासीबहुल भागातील चौराकुंड-खोपण-खोलमार रोड पासिंगच्या कामासह करंजखेडा-हातरू-राजपूर-सेमाडोह या 16 किलोमीटर रोड पासिंगला मंजुरी देण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर भागातून जाणाऱ्या या रस्त्यांचे काँक्रिटीकरण राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या परवानगीअभावी अपूर्ण होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड-पुगलर ट्रान्समिशन लाईन आणि निमगाव लघु पाटबंधाऱ्याच्या कामालाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

या बैठकीत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली.

तलावातील पुरेशा जलसाठ्यामुळे मुंबईतील दहा टक्के पाणीकपात रद्द करण्याची राज्यमंत्री योगेश सागर यांची महानगरपालिकेला सूचना

0

मुंबई: मुंबई शहर व उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील उपयुक्त साठ्यामध्ये आतापर्यंत सुमारे 50 टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने गेल्या वर्षीपासून शहरात उपनगरामध्ये केलेली 10 टक्के पाणीकपात तसेच पाणीपुरवठ्याच्या वेळेतील कपात रद्द करावी, अशी सूचना नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी केली आहे.

मुंबई शहर व उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावामध्ये गेल्या वर्षी पाणीसाठा कमी झाला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यामध्ये 10 टक्के कपात केली होती. तसेच पाणीपुरवठ्याच्या वेळेतही 15 टक्के कपात केली आहे. त्यामुळे उपनगरातील नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. पाणीकपात रद्द व्हावी, याविषयी नगरविकास राज्यमंत्री श्री. सागर यांनी वारंवार पाठपुरावा केला होता.

श्री. सागर म्हणाले की, यंदा जून व जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे तलावातील उपयुक्त जलसाठा साधारणपणे 50 टक्क्यापर्यंत झाला आहे. अद्याप सप्टेंबरपर्यंत सुमारे 57 दिवस पावसाचे आहेत. या काळात समाधानकारक पाऊस पडल्यास पाणीसाठ्यात वाढ होईल. गेल्या वर्षी पाणीटंचाईमुळे महानगरपालिकेने पाणीपुरवठ्यात कपात केली होती. मुंबईतील विशेषतः उपनगरातील नागरिकांना या कपातीचा त्रास होत आहे. यंदाच्या पुरेशा साठ्यामुळे महानगरपालिकेने केलेली ही कपात तातडीने रद्द करून पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करावा आणि उपनगरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

भंडाऱ्यात इथेनॉल-सीएनजी प्रकल्पाची उभारणी – राज्यमंत्री डॉ. परिणय फुके

0

मुंबई : भंडारा येथे धानाच्या तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मिती च्या प्रकल्प उभारणीसंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. लवकरच हे दोन्ही प्रकल्प उभारणीचे काम सुरु होणार असल्याची माहिती भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. फुके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, मकरधोकडा येथे जमीन उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून याबाबत आवश्यक ती कार्यवाही जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केली जाणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी यासाठी सर्व सहकार्य करणार आहे. या प्रकल्पामुळे बायो इथेनॉल निर्मिती होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. याशिवाय या परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

अशाच पद्धतीचे भारतात 12 प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी 4 प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. या प्रकल्पासाठी जनावरांचा चारा वगळून मोठ्या प्रमाणात तणस उपलब्ध आहे. 3.84 लाख टन तणस भंडारा जिल्ह्यात तर गोंदिया जिल्ह्यात 3.46 लाख टन तणस उपलब्ध आहे. हे सर्व जाळले जात असून आता त्यापासून इथेनॉल व गॅसची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पासाठी अत्याधुनिक असे तंत्रज्ञान भारत पेट्रोलियम उपलब्ध करून देणार आहे. सद्यस्थितीत भारतात एकूण पेट्रोल व डिझेलमध्ये मिश्रण करण्यास 1 टक्कासुद्धा इथेनॉल उपलब्ध नाही त्यामुळे अशा प्रकल्पाची देशाला गरज आहे अशी माहिती डॉ. फुके यांनी यावेळी दिली.

आदिवासी विकास विभागाची माहिती मिळण्यासाठी डॅशबोर्ड तयार करणे, आदिवासी विद्यार्थ्यांना विमा कवच उपलब्ध करुन देणे, वन परिक्षेत्रात राहणाऱ्यांसाठी रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणे, वन्यजीव संरक्षणासाठी उपाययोजना करणे, गोरेवाडा प्राणी संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्याचे काम 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करणे अशी विविध कामांना गती देण्यात येत असल्याची माहिती डॉ. फुके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शासकीय संदेश प्रसारण धोरणात सुधारणा करावी यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु – अप्पासाहेब पाटील

0

कराड (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील वृत्तपत्रांची निकोप वाढ व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने जाहिरात धोरण निश्चित केले आहे. दरम्यान यामधील बहुतांश अटी व शर्ती लघु व मध्यम वृत्तपत्रांसाठी जाचक असल्याने यामध्ये सुधारणा करून शुद्धीपत्रक प्रसिद्ध करावे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अाप्पासाहेब पाटील यांनी दिली.

लघु व मध्यम वृत्तपत्रांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी कराडमधील विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या बैठकीमध्ये त्यांनी ही माहिती दिली. यावेळी निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रंगराव शिंपुकडे, संघटन सचिव गोरख तावरे, खंडू इंगळे, अजित भिलारे, कृष्णत घाडगे, संतोष शिंदे, उध्दव बाबर, शामराव अहिवळे, रघुनाथ कुंभार, विश्चासराव पानवळ, शंकर शिंदे, प्रकाश पिसाळ, धनंजय सिंहासने उपस्थित होते.

नव्याने जाहीर झालेल्या शासकीय संदेश प्रसारण धोरण २०१८ मध्ये सुधारित नियमावली पुन्हा प्रसिद्ध करावी यासाठी हरकती, दुरुस्ती व सूचना असणारे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांना देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात शासनामार्फत सर्व स्तरावरून देण्यात येणाऱ्या जाहिरातीच्या वितरणात सुसूत्रता यावी, त्यात स्वेच्छाधिकाराला कोणत्याही पातळीवर वाव राहु नये, वितरण पारदर्शक असावे. सर्व वर्गातील वृत्तपत्रांची निकोप वाढ होऊन त्या सर्वांना न्याय मिळेल अशा प्रकारचे जाहिरात धोरण असावे. यासाठी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया या संघटनेच्या माध्यमातुन प्रयत्न केला जात आहे असे ही प्रदेशाध्यक्ष अाप्पासाहेब पाटील यांनी सांगितले.

लघु व मध्यम वृत्तपत्रांबरोबरच जिल्हास्तरावरील दैनिक व साप्ताहिक शासनाच्या योजनांना ठळक प्रसिद्धी देत असतात. याचा विचार करून शासकीय संदेश प्रसारण धोरणाबाबत घेतलेल्या हरकती, दुरुस्ती व सूचनांचा सकारात्मक विचार शासनाने करावा अशी मागणी रंगराव शिंपुकडे यांनी केली. संघटितपणे संपादकांनी एकत्रितपणे राहुन वृत्तपत्र वाढीसाठी आणि आपल्या हक्काच्या जाहिराती मिळवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नवनियुक्त जिल्हाध्यक्ष खंडु इंगळे यांनी केले.

सर्व उपस्थित संपादकांनी शासकिय जाहिराती जादा प्रमाणात कशा मिळवाव्यात ? शासकिय धोरण काय आहे ? संघटना देशात व राज्यात कशा पद्धतीने काम करते ? अशा विविध प्रश्नाबरोबर वृत्तपत्र प्रसिद्ध करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. अप्पासाहेब पाटील यांनी सर्व संपादकांना सविस्तर माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांचे स्वागत खंडू इंगळे यांनी तर रंगराव शिंपुकडे यांचे स्वागत उद्धव बाबर, कृष्णात घाडगे यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत गोरख तावरे यांनी केले. तर शेवटी आभार शंकर शिंदे यांनी मानले.

असोसिएशन स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी खंडु इंगळे

0

कराड (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शासन पुरस्कृत सहकारी संस्था यांच्याकडून वितरित होणाऱ्या जाहिराती वृत्तपत्रांना शासकीय नियमानुसार समप्रमाणात दिल्या गेल्या पाहिजेत, सातारा जिल्ह्यातील वृत्तपत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडियाचे नवनियुक्त सातारा जिल्हाध्यक्ष खंडु इंगळे यांनी मत व्यक्त केले.

असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया या संघटनेची सातारा जिल्हा कार्यकारणीची बैठक नुकतीच कराड येथे शासकिय विश्रामगृहात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रंगराव शिंपुकडे, संघटन सचिव गोरख तावरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी सातारा जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडियाच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी खंडू इंगळे (कराड), कार्याध्यक्ष अजित भिलारे (सातारा), उपाध्यक्ष कृष्णत घाडगे (वाई), सचिव संतोष शिंदे (कराड ), समन्वयक उध्दव बाबर (सातारा) प्रदेशाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांनी प्रत्येक पदाधिकार्याला नियुक्तीपत्र दिले. गोरख तावरे (कराड), बापूसाहेब जाधव (सातारा), अनिल देसाई (सातारा), शामराव अहिवळे (फलटण) यांना सल्लागार म्हणून काम करण्याची विनंती करण्यात येणार आहे. तर दैनिक व साप्ताहिकांच्या संपादकांना कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्त केले जाणार आहे.

असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया ही देशपातळीवर वृत्तपत्रांच्या प्रश्नांसाठी काम करणारी संघटना आहे. केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया व आरएनआय यावर प्रतिनिधीत्व करणारी ही संघटना आहे. असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडियाच्या सातारा जिल्ह्यातील बैठकीसाठी शामराव अहिवळे (फलटण ), रघुनाथ कुंभार (सातारा), विश्चासराव पानवळ (उंब्रज), कृष्णात घाडगे (वाई) उद्धव बाबर (सातारा), अजित भिलारे (सातारा), शंकर शिंदे (कराड), प्रकाश पिसाळ (कराड), संतोष शिंदे (कराड), धनंजय सिंहासने (कराड) उपस्थित होते.