Home Blog Page 2881

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे “संचालक” पद  चार महिने रिक्त राहणार?  अनेक योजनांचा बोजवारा उडण्याची शक्यता..!

0

मुंबई (प्रतिनिधी)- संस्कृतीचे  वैभव असणाऱ्या सुसंस्कृत महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे “संचालक”पद किमान चार महिने तरी रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा अनेक योजनाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे.सध्या संचालक  पदाचा पदभार सह संचालक सांभाळत आहेत.

ऑक्टोबर २०१८ रोजी श्रीमती स्वाती काळे ह्या  सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक पदी रुजू झाल्या.परंतु आपल्याच खात्यातील अधिकाऱ्यांशी त्यांनी “पंगा”घेतला. त्यामुळे अवघ्या आठ महिन्यांत त्यांना संचालक पदावरून पायउतार व्हावे लागले. चार महिने वयोवृद्ध लोककलावंताचे मानधन वेळेत न दिल्याने श्रीमती काळे  यांच्यावर माध्यमांनी  जोरदार टिका केली होती. परंतु त्यांनी  एका खुलाशाच्या माध्यमातून आपल्याच वरिष्ठांचे वाभाडे काढले होते. त्यामुळे हे प्रकरणं सुद्धा त्यांना चांगलेच भोवले होते.म्हणूनच  याची गंभीर दखल घेत  खात्याने त्यांना सन्मानाने कार्यमुक्त  केले.

परंतु  त्यांच्या जाण्यानंतर सांस्कृतिक कार्य खात्याने अद्याप नवीन संचालकांचा शोध घेतला  नसल्याने संचालनालयाचे काम ठप्प होण्याची शक्यता आहे.नवीन संचालक आता थेट विधानसभा निवडणुकी नंतर येण्याची शक्यता आहे.त्यामुळे पुन्हा लोककलावंतासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा बोजवारा उडण्याची शक्यता नाकारता।येत नाही.प्रभारी संचालक पदाचा पदभार सध्या सह संचालक यांच्याकडे आहे.मात्र सांस्कृतिक कार्य संचालनालय  यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अनेक महत्त्वाचे  उपक्रम वेळेत पूर्ण करणे हे सध्याच्या  प्रभारी संचालक यांच्या आवाक्या बाहेर आहे.त्यामुळे पुन्हा एकदा  “येरे माझ्या मागल्या”अशी परिस्थिती संचालनालयाची  झाली तर आश्चर्य वाटणार नाही.

श्री क्षेत्र भिमाशंकर येथे  भाविकांसाठी सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबध्द-सुधीर मुनगंटीवार

0

पुणे:  श्री क्षेत्र भिमाशंकर येथे  श्रावण महिन्यात येणा-या भाविकांसाठी सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे सांगतानाच बसेसच्या माध्यमातून भाविकांना प्रवास सुखकर होईल, असा विश्वास वित्त व नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
विधानभवन येथे श्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखडाअंतर्गत मिडी बसेसचा लोकार्पण सोहळा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, ‍जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपवनसंरक्षक ए.लक्ष्मी, विभाग नियंत्रक श्रीमती जोशी आदी उपस्थित होते.
वित्त व  नियोजन मंत्री मुनगंटीवार म्हणाले, श्रावण महिना व यात्रा कालावधीत संपुर्ण देशभरातून मोठया प्रमाणात भाविक भिमाशंकर येथे दर्शनासाठी येतात. त्यांच्यासाठी वाहतूक व परिवहनाच्या असणा-या सोई अपु-या होत्या. त्यामुळे विकास आराखडयात वीस मिडी बसेसचा समावेश करण्यात आला. श्रावण महिन्यातच या बससेवेला प्रारंभ होत असल्याने भाविकांसाठी ही बससेवा नक्कीच आनंददायी ठरेल.
राज्यात सर्व ज्योर्तिलिंगाचा विकास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भिमाशंकरचा या विकास आराखडयात प्राधान्याने समावेश करण्यात आला असून भिमाशंकरच्या सर्वांगिण विकासासाठी निधीही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी भिमाशंकर विकास आराखडयातील कामे पुर्ण करण्यासाठी लक्ष द्यावे. अशा सुचनाही वित्त व नियोजन मंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या.
प्रास्ताविक विभाग ‍नियंत्रक श्रीमती जोशी यांनी केले. यावेळी नागरिक, अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

ईडी आणि आयटी हे दोन बलदंड कार्यकर्ते भाजपाकडे ते घडवितात पक्षांतर -राजू शेट्टी

0

पुणे- ईडी आणि आयटी हे दोन बलदंड कार्यकर्ते भाजपाकडे असून त्यांच्या आधारावर आघाडीतल्या नेत्यांवर भाजपाने पक्षांतरासाठी भाजपाने दबाव टाकला असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते  राजू शेट्टी यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्षांतरावर भाष्य केले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले दिग्गज नेते भाजपात गेले आहेत. आघाडीतल्या आऊटगोईंगवरुन राजू शेट्टी यांनी भाजपावर निशाणा साधला. गेल्या पाच वर्षांमध्ये या सरकारने जी आश्वासनं दिली त्याचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर द्या अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली. मी ११ प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं फडणवीस सरकारने महाराष्ट्राला  द्यावीत अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आजच भाजपामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रवेश केला. राष्ट्रवादीला खिंडार पडल्याची चर्चा सध्या राज्यात रंगली आहे. मात्र आघाडीतल्या या आऊटगोईंगवर राजू शेट्टी यांनी निशाणा साधला. मेगाभरतीची घोषणा सरकारने केली होती. ती मेगाभरती मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची भाजपात होती असा टोलाही त्यांनी लगावला. ईडी आणि आयटी हे दोन बलदंड कार्यकर्ते भाजपाकडे आहेत. त्यांचा वापर करुन नेत्यांना सांगण्यात येते की तुम्ही कोणत्या पक्षात जायचं. भाजपात गेल्यावर भ्रष्ट नेते पवित्र कसे होतात? याचं उत्तरही सरकारने द्यावं अशीही मागणी फडणवीस यांनी केली आहे.

उद्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा काढत आहेत. या यात्रेदरम्यान त्यांनी जनतेच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचं काय झालं? धनगर आरक्षणाचं काय झालं? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत ती दिली नाहीतर या मोर्चापाठोपाठ आम्ही आक्रोश मोर्चा काढू असाही इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

मृण्मयी देशपांडे करणार ‘एक नंबर’ सूत्रसंचालन!!!

0

‘युवा सिंगर, एक नंबर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ‘एक नंबर’ गोष्टी पाहण्याची प्रेक्षकांना संधी मिळणार आहे. ‘झी युवा’वरील या गाण्याच्या स्पर्धेत, गायिका सावनी शेंडेसह अभिनेतावैभव मांगले हे परीक्षकाच्या खुर्चीत बसलेले पाहायला मिळतील. या कार्यक्रमाची संकल्पना सुद्धा फार निराळी आणि आगळीवेगळी असणार आहे. महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागातून आलेल्यातरुण गायकांची ही स्पर्धा नेमकी कशी असेल, हे पहिला एपिसोड पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे. संकल्पना गुलदस्त्यात असली, तरीही या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका कोण आहे, हे जाणूनघेताना रसिकांना नक्कीच आनंद होईल. सर्वांची लाडकी अभिनेत्री, मृण्मयी देशपांडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. या गुणी अभिनेत्रीला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहण्याची संधी ‘युवासिंगर, एक नंबर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळेल.

मालिका किंवा चित्रपटांमध्ये अभिनय करण्यापेक्षा, सूत्रसंचालन अधिक आव्हानात्मक असते, हे मृण्मयी आवर्जून नमूद करते. प्रेक्षक, स्पर्धक आणि परीक्षक यांच्यातील दुवा साधण्याची कलाअवगत असणे यासाठी गरजेचे असते. तिच्या सूत्रसंचलनाची पद्धत, स्वाभाविक शैली, स्पर्धकांना तिच्याकडून मिळणारे प्रोत्साहन यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहे. ही भूमिका उत्तमतर्हेने पार पाडण्यासाठी व ‘युवा सिंगर्स’च्या मंचावर ‘एक नंबर’ धुमाकूळ घालण्यासाठी ही अभिनेत्री सज्ज आहे. ही गुणी अभिनेत्री बऱ्याच कालावधीनंतर सूत्रसंचालनाच्या भूमिकेत आपल्याला  झीयुवावरील युवा सिंगर एक नंबर या कार्यक्रमाच्या माध्यमातुन बुधवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता भेटायला येईल. वैभव मांगले, सावनी शेंडे आणि मृण्मयी देशपांडे यांचा सहभाग असलेल्या याकार्यक्रमाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता आता आणखी वाढली आहे.

जॉली रँचरने भारतातील कॉन्फेक्शनरीमध्ये दाखल केले वैशिष्ट्यपूर्ण ‘ट्रिपल पॉप’

मुंबईहर्षी कंपनी या जगातील आघाडीच्या स्नॅकिंग कंपनीचा भाग असणाऱ्या हर्षी इंडिया प्रा. लि.नेजॉली रँचर ट्रिपल पॉप हा भारतातील पहिला तीन लेअरचा लॉलिपॉप दाखल केल्याचे जाहीर केले असून त्याच्या प्रत्येक लेअरमध्ये वेगळा फ्लेवर समाविष्ट आहे. हे नवे उत्पादन जॉली रँचर कॉन्फेक्शनरी उत्पादनांचा एक भाग असून, ही उत्पादने उत्कृष्ट, गोड व टँगी फ्रुटी फ्लेवरसाठी प्रसिद्ध आहेत. ब्रँडच्या व्यक्तिमत्त्वानुसार, जॉली रँचर ट्रिपल पॉपचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. हे प्रकार निरनिराळे फ्लेवर देत असून, त्यामध्ये बाहेरची च्युई लेअर,मधली क्रंची लेअर व त्यानंतर पावडर्ड सेंटर यांचा आनंद मिळेल.

जॉली रँचर ट्रिपल पॉप दोन विशेष प्रकारांमध्ये उपलब्ध असतील:

स्ट्रॉबेरी (च्युई आउटर) I मँगो (क्रंची मिडल लेअर) I रास्पबेरी (पावडर्ड सेंटर) व;

ब्लुबेरी (च्युई आउटर) I स्ट्रॉबेरी (क्रंची मिडल लेअर) I मँगो (पावडर्ड सेंटर)

ब्रँड अम्बेसिडर तमन्ना भाटिया यांचा सहभाग असणाऱ्या उत्पादनाच्या टेलिव्हिजन जाहिरातीमध्ये, तमन्ना ब्रेक घेत असताना ट्रिपल पॉपच्या फ्लेवर्सचा आनंद घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हा जाहिरात तुम्हाला येथे पाहता येईल: Insert link

जॉली रँचर ट्रिपल पॉप दाखल केल्याबद्दल हर्षी इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक हरजित भल्ला यांनी सांगितले, “हर्षी इंडिया ग्राहकांच्या पसंतीच्या चवींच्या अनुषंगाने सातत्याने उत्पादनात बदल आणत असते. जॉली रँचर ही जगभरातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आहे व भारतातील लॉलिपॉप श्रेणीतील एक आघाडीचा ब्रँड आहे. तीन लेअर असणारे ट्रिपल पॉप अतिशय वेगळे आहे आणि या श्रेणीतील पहिलेवहिले आहे. भारतात हे उत्पादन दाखल करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

हर्षी इंडियाचे मार्केटिंग डायरेक्टर सरोष शेट्टी म्हणाले, ग्राहकांना कॉन्फेक्शनरी श्रेणीतील नावीन्य अतिशय आवडते. ग्राहकांना अपूर्व अनुभव देणाऱ्या या उत्पादनामार्फत आम्ही ठसठशीतफ्रुटी व धमाल ही ब्रँडची वैशिष्ट्ये पुन्हा सादर केली आहेत. आम्ही ब्रँडच्या जागतिक प्रसिद्धी घटकांचा वापर केला आहेजसे सिग्नेचर अॅनिमेटेड फ्रुट कॅरॅक्टर,यामुळे ग्राहकांचा उत्साह व धमाल आणखी वाढेल. जॉली रँचर ट्रिपल पॉप दाखल केल्याचे टेलिव्हिजन व डिजिटल यासह सर्व माध्यमांतून जाहीर केले जाणार आहे. सेलिब्रेटी तमन्ना भाटिया या उत्पादनाचा चेहरा असणार आहेत.”

 जॉली रँचर ब्रँड अम्बेसिडर तमन्ना भाटिया यांनी सांगितले, “तुम्हाला जवळच्या वाटणाऱ्या ब्रँडशी जोडलेले असणे नेहमीच उत्साहाचे असते. जॉली रँचर हा माझ्यासाठी असाच एक ब्रँड आहे. हा थोडीशी मौजमस्ती करणारा ठसठशीतआकर्षक व धमाल ब्रँड आहे आणि हे माझ्या व्यक्तिमत्त्वातही दिसून येते. ट्रिपल पॉपद्वारेब्रँडने आणखी एकदा धमाल आणली आहे आणि माझ्याप्रमाणेच ग्राहकांनाही जॉली रँचर ट्रिपल पॉप नक्कीच आवडेल याची खात्री आहे!”प्रत्येक जॉली रँचर ट्रिपल पॉप प्रकाराची किंमत 10 रुपये आहे.

 हर्षी कंपनीविषयी 

125वा वर्धापनदिन साजरा करणाऱ्या हर्षी कंपनीचे मुख्यालय पेन्सिल्वेनिया येथे आहे आणि ती या उद्योगातील आघाडीची स्नॅक्स कंपनी असून, ती वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड, उल्लेखनीय व्यक्ती व बालकांना मदत करण्यासाठी कटिबद्ध म्हणून नावाजली जाते. हर्षीचे जगभर अंदाजे 16,500 कर्मचारी आहेत व ते लज्जतदार, दर्जेदार उत्पादने देण्यासाठी दररोज कार्यरत आहेत. कंपनीचे जगभर 80 हून अधिक ब्रँड आहेत आणि ते 7.8 अब्ज डॉलरहून अधिक वार्षिक उत्पन्न नोंदवत आहेत. त्यामध्ये र्षीजरीसेजकिट कॅटजॉली रँचरआइस ब्रेकर्सस्किनीपॉप व पायरेट्स बूटी अशा महत्त्वाच्या ब्रँडचा समावेश आहे.

125 वर्षे, हर्षी प्रामाणिकपणे, नैतिकपणे व शाश्वतपणे कार्यरत आहे. हर्षीचे संस्थापक मिल्टन हर्षी यांनी 1909 मध्ये मिल्टन हर्षी स्कूलची स्थापना केली आणि तेव्हापासून कंपनी बालकांना मदत करण्यासाठी काम करत आहे.

महिला सबलीकरणाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार शरद पवारांनी गमावला – खासदार संजय काकडे यांची टीका

0
पुणे : राज्यसभेत मंगळवारी तत्काळ तिहेरी तलाक विधेयक मंजुरीसाठी आलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, माजीद मेमन हे तिन्ही नेते अनुपस्थित होते. महिला सबलीकरण आणि महिला आरक्षण याविषयांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नेहमीच शरद पवार यांच्या कार्याचे कौतुक होताना दिसते. परंतु, मुस्लिम महिलांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या सबलीकरणासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या तिहेरी तलाक विधेयकाच्या बाजुने मतदान करण्याची सुवर्णसंधी शरद पवार यांना काल होती. परंतु, ते व त्यांच्याच पक्षाचे प्रफुल्ल पटेल व माजीद मेमन यांनी अनुपस्थित राहून ती सुवर्णसंधी त्यांनी गमावली. त्यामुळे महिलांचा विकास, महिलांचे सबलीकरण याविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार काल खऱ्या अर्थानं शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गमावला असल्याचे परखड मत भाजपचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज व्यक्त केले.
तिहेरी तलाकमुळे मुस्लिम समाजातील महिला भगिनींची आयुष्य उध्वस्त झाल्याची अनेक उदाहरणे आपल्या आजुबाजुला आहेत. एकतर्फी असलेल्या या तिहेरी तलाकला कायद्याच्या चौकटीत आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्याचं अतिशय महान कार्य केले आहे. लोकसभेत मंजुर झालेल्या तिहेरी तलाक विधेयकाला काल मंगळवारी राज्यसभेत मंजुरी मिळाली. आता हे विधेयक मंजुरीराठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे जाईल आणि त्यांच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल.
राज्यसभेत विधेयक मंजुरीसाठी झालेल्या मतदानात 99 मतं विधेयकाच्या बाजुने तर, 84 मतं विधेयकाच्या विरोधात पडली. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या घोषणेप्रमाणे मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी हा निर्णय निश्चितच क्रांतिकारक ठरेल, असा मला विश्वास वाटतो. आणि राज्यसभेत आज या प्रक्रियेचा प्रत्यक्ष भाग होता आलं याचा विशेष आनंद आहे. परंतु, यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणीही महिला सबलीकरण व महिला विकास यासंबंधी बोलू नये. कारण, त्यांच्या नेत्यांनी राज्यसभेत तिहेरी तलाक हे मुस्मिम महिलांच्या संदर्भातील अतिशय महत्वाचे विधेयक मंजुरीसाठी आले असताना गैरहजेरी लावली, असे परखड मत राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले आहे.

बँक ऑफ बडोदा व एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा, लि. यांच्यात सामंजस्य करार

मुंबई: भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी बॅंक असलेल्या बॅंक ऑफ बडोदातर्फे एलजीइलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा. लि.शी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. या बॅंकेच्या 112 व्यावर्धापनदिनानिमित्त दोन्ही संस्थांमध्ये सुरू असलेली व्यावसायिक भागीदारी यामुळे बळकट होणार असल्याचेयावेळी सांगण्यात आले. या प्रसंगी बँक ऑफ बडोदाच्या वरिष्ठ व्यवस्थापकांच्या उपस्थितीत बँक ऑफ बडोदाचेव्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एस. जयकुमार आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचेमुख्य आर्थिक अधिकारी सू चियोल किम यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

एलजीच्या विक्रेत्यांचे व उप विक्रेत्यांचे मोठे नेटवर्क, डेबिट व क्रेडिट कार्डांवर आधारित ईएमआयची परवडणारीसोल्यूशन्स आणि बँकेचे 7 कोटींहून अधिक डेबिट कार्डधारक यांची सांगड घालून काही व्यावसायिक प्रस्तावांवरकाम करण्यास या दोन्ही संस्थांनी सहमती दर्शविली आहे. करारातील इतर व्यावसायिक प्रस्तावांमध्ये, एलजीच्या कर्मचाऱ्यांना गट विमा उत्पादनांसह बँकेची किरकोळ कर्जांची उपलब्धता आणि बॅंक ऑफ बडोदाच्याकर्मचाऱ्यांना एलजीची उत्पादने मिळणे अशा काही तरतुदींचा समावेश आहे. एलजीच्या विक्रीमधील पन्नासटक्क्यांहून अधिक वाटा उचलणाऱ्या तिच्या वितरकांच्या मोठ्या जाळ्याचा लाभ बॅंक ऑफ बडोदाच्या 12 कोटींहून अधिक ग्राहकांना मिळण्याच्या दृष्टीने ही भागिदारी महत्त्वाची ठरणार आहे.

बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एस. जयकुमार या प्रसंगी म्हणाले, “दोन्ही संघटनांमधील व्यवसायातील वाढ, उत्पादकता आणि नफा यांचा समन्वय साधण्यासाठी एलजीबरोबरसंयुक्तपणे काम करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. एलजीसारख्या आघाडीच्या संस्थेची सर्वसमावेशकव्यावसायिक भागीदारी आम्हाला बिझनेस-टू-बिझनेस (बी 2 बी) संबंध निर्माण करण्यात मदत करेल. याभागिदारीमुळे आमच्या ग्राहकांना एलजीची उत्पादने घेताना खरेदी प्रक्रियेत सुधारणा आढळून येईल, तसेच याप्रक्रियेचा एकंदर खर्च कमी करणे, नाविन्यपूर्ण उत्पादने उपलब्ध होणे आणि सेवा-वितरण त्वरित मिळणे यांचालाभ होणार आहे.“

एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य आर्थिक अधिकारी सू चेओल किम म्हणाले, “आम्हीनेहमीच नवीन उपक्रमांवर आणि आमच्या ग्राहक व व्यावसायिक भागीदारांना भिन्न उत्पादने, सेवा देण्यावरविश्वास ठेवतो. बँक ऑफ बडोदाच्या सहकार्याने नवीन व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीने एलजी आणि अँड बँक ऑफबडोदा या दोन्ही संस्थांसाठी हा मोठ्या लाभाचा प्रस्ताव असेल. ही सामरिक भागीदारी आमच्या ग्राहकांना विविधस्वरुपाच्या आकर्षक योजना मिळण्यात साह्यकारी ठरेल, तसेच आमच्या चॅनेल भागीदारांना सोपेपणाने कर्जांचेपर्याय प्रदान करेल. एलजी इलेक्ट्रॉनिक्स आणि बँक ऑफ बडोदा या दोन्ही संस्थांच्या कर्मचाऱ्यांना एकमेकांच्याउत्पादनांचा व सेवांचा विशेष लाभ मिळवून देणारी ही सुवर्णसंधी असणार आहे. ”

बँक ऑफ बडोदाबद्दल :

बँक ऑफ बडोदाची स्थापना 20 जुलै 1908 मध्ये झाली. गुजरातमधील वडोदरा येथे (पूर्वीचे बडोदा) मुख्यालयअसलेली ही सरकारी बँकिंग आणि वित्तीय सेवा संस्था आहे.

बँक ऑफ बडोदा ही भारतात सर्वत्र पसरलेली आणि स्वयं-सेवा वाहिन्यांचे पाठबळ असलेली तिसऱ्या क्रमांकाचीमोठी बॅंक आहे. बँकेच्या वितरण नेटवर्कमध्ये 9,500हून अधिक शाखा, 13,400हून अधिक एटीएम आणि1,200हून अधिक स्वयं-सेवा देणाऱ्या ई-लॉबी समाविष्ट आहेत. या बॅंकेच्या २१ देशांमध्ये १०० शाखा वउपकंपन्यांची कार्यालये आहेत. त्या माध्यमांतून बॅंक आंतराष्ट्रीय स्वरुपाचे कामकाज करते. बीओबीफायनान्शियल सोल्यूशन्स लिमिटेड (आधीचे बीओबी कार्ड्स लि.), बीओबी कॅपिटल मार्केट्स आणि बीओबीअॅसेट मॅनेजमेन्ट कंपनी लिमिटेड अशा बॅंकेच्या उपकंपन्या आहेत. इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स याकंपनीबरोबर  बॅंक ऑफ बडोडाने आयुर्विम्याबाबत संयुक्त उद्योग सुरू केला आहे. नैनिताल बँकेत बँक ऑफबडोदाची  98.57 टक्के मालकी आहे. बडोदा उत्तर प्रदेश ग्रामीण बँक, बडोदा राजस्थान ग्रामीण बँक आणि बडोदागुजरात ग्रामीण बँक या तीन प्रादेशिक ग्रामीण बँकादेखील बँकेने प्रायोजित केल्या आहेत.

एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बद्दलः

एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा. लि., ही दक्षिण कोरियातील एलजी इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीच्या मालकीचीउपकंपनी आहे. भारतात तिची स्थापना जानेवारी 1997 मध्ये झाली. इलेक्ट्रॉनिक्सच्या ग्राहकोपयोगी वस्तू वउपकरणे, एचव्हीएसी, आयटी हार्डवेअर आणि मोबाईल कम्युनिकेशन्स या क्षेत्रातील हा अत्यंत लोकप्रिय व मोठाब्रॅंड आहे. गेल्या दशकभरात, एलजीने भारतात प्रीमियम ब्रँड हे स्थान मिळवलेले आहे. तसेच या उद्योगामध्ये याकंपनीने काही ट्रेन्ड्स निर्माण केलेले आहेत. एलजीच्या जगभरातील सर्व कारखान्यांमध्ये ग्रेटर नोएडा येथीलएलजीईआयएलचा कारखाना हा सर्वात पर्यावरणपूरक असा ठरला आहे.या कंपनीचा दुसरा पर्यावरणपूरककारखाना पुण्याजवळ रांजणगाव येथे आहे. येथे एलईडी टीव्ही, वातानुकूलन आणि व्यावसायिक वातानुकूलनयंत्रणा, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, मॉनिटर्स, ऑडिओ, वॉटर प्युरिफायर, एअर प्यूरिफायर आणि डिझायनरसिलिंग फॅन तयार करण्यात येतात.

सत्ताधाऱ्यांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खासदार डॉ. अमोल कोल्हेंवर जबाबदारी तर उदयनराजे -स्टार कॅम्पेनर

0

मुंबई- आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध पक्ष आपापल्या परीने मतदारांना आपल्याकडून करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी शिवसेनेने जन आशीर्वाद यात्रा काढली तर भाजपने महाजनादेश यात्रेचे आयोजन केले. आता या यात्रांची सुरुवात झाल्यावर राष्ट्रवादीने त्यांना प्रत्युत्तर म्हणून शिवस्वराज्य यात्रेची घोषणा केली आहे. खासदार उदयनराजे भोसले हे या शिवस्वराज्य यात्रेत ठिकठिकाणी स्टार कॅम्पेनर म्हणून सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे शिवस्वराज्य यात्रेची धुरा नवनिर्वाचीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आणि आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता शिवस्वराज्य यात्रा काढणार आहे. शिवस्वराज्य यात्रेला 6 ऑगस्टपासून सुरुवात होईल.

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून होईल. रोज 3 विधानसभा मतदारसंघांचा दौरा या यात्रेदरम्यान केला जाईल. पहिला टप्पा बुलडाण्यातील सिंदखेडराजा येथे संपेल. 16 ऑगस्ट रोजी यात्रेचा दुसरा टप्पा तुळजापूर येथून सुरू होईल आणि या यात्रेची सांगता रायगडावर होणार आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण यात्रेची मदार युवक राष्ट्रवादी काँग्रेसवर सोपवण्यात आली आहे.

EVM हटावो -राज ठाकरेंनी घेतली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट

0

कोलकाता- ईव्हीएमविरोधात आंदोलन छेडल्यानंतर काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानंतर आता आज(31 जुलै)त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यादरम्यान त्यांच्यात सध्याची राजकीय स्थिती आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यावर चर्चा झाली. तृणमूलच्या सुत्रांनी सांगितले की, राज ठाकरेंनी फोन करुन भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.

ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर राज ठाकरे म्हणाले, “आम्ही मतपेटीवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहोत. बर्‍याच काळापासून आम्ही ही मागणी उपस्थित करीत आहोत. जेव्हा बहुतेक देशांनी ईव्हीएम बंद केली आहे, तेव्हा आपण अद्याप त्याचा वापर का करीत आहोत?” असा सवालही राज ठाकरेंनी केला. “मी इतर पक्षांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन एकत्रित पद्धतीने मतपत्रिकेवर निवडणुकांची मागणी वाढवावी. टीएमसी या विषयावर आमच्यासोबत आहे. 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात लोकशाही वाचवण्याचा कार्यक्रम होणार आहे. ममता बॅनर्जी यांनाही मी आमंत्रण दिले आहे.” अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. शिवाय ईव्हीएमविरोधात कोर्टात जाणार का, या प्रश्नावर आपल्याला कोर्टावर विश्वास नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. मला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात विश्वास नाही, असेही राज म्हणाले.

लोकसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींनी ईव्हीएम मशीन्ससोबत छेडछाड झाल्याचा आरोप लावत भाजपच्या विजयावर संशय व्यक्त केलाहोता. त्यासोबतच त्यांनी सध्याच्या निवडणुक प्रक्रियेवर बोट ठेवत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती, त्यावर अनेक पक्षांनी त्यांना समर्थन दिले होते.

अशातच राज ठाकरेंनी आगामी निवडणुक ईव्हीएमवर घेण्याऐवजी बॅलेचल पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. त्यासाठीच राज ठाकरे सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करण्याच्या दिशेने पाऊले उचलत आहेत. यासाठीच ममतांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. मनसे आगामी काळात ईव्हीएम विरोधात आपले आंदोलन आणखी मोठे करणार आहेत.

मनसेने येत्या 9 ऑगस्टला निवडणूक आयोगाच्या सध्याच्या मतदान आंदोलन करण्याचे ठरवले आहे. मनसेने ईव्हीएमच्या विश्वासहार्यतेवर शंका उपस्थित केली आहे आणि इशारा दिला आहे की, जर आगामी निवडणूक बॅलेट पेपरवर झाल्या नाहीत, तर मनसे निवडणुकीवर बहिष्कार टाकेल. दुसरीकडे, महाराष्ट्रात लोकप्रियता आणि जनाधार हरवल्यानंतर आता मनसे प्रमुख इतर भाजप विरोधी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. ममता बॅनर्जींना भेटण्यापूर्वी त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची 8 जुलैला दिल्लीत जाऊन भेट घेतली होती.

गिनेस विक्रमवीरासह संजय फिनलँड रॅलीत सहभागी

0
पुणे ः पुण्याचा अनुवी आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले सलग दुसऱ्या वर्षी जागतिक रॅली मालिकेतील (डब्ल्यूआरसी) फिनलंड रॅलीत सहभागी होईल. एक ते चार ऑगस्ट दरम्यान ही रॅली होईल. या आठवडाअखेर ही रॅली होत आहे. बाल्टीक मोटरस्पोर्ट्सने सुसज्ज केलेली फोर्ड फिएस्टा आर2 कार तो चालवेल. ब्रिटनचा डॅरेन गॅरॉड नॅव्हीगेटर असेल, जो गिनेस विक्रमवीर आहे.
 
संजय फिनलंडमध्ये दाखल झाला असून त्याने मंगळवारी आणि बुधवारी रेकीमध्ये भाग घेतला. संजय डब्ल्यूआरसी3 विभागातील ज्यूनीयर आरसी4 गटात भाग घेईल. संजयने इस्टोनियातील रॅलीत पूर्वतयारीसाठी भाग घेतला होता. त्यावेळी त्याची कार बिघडली होती. त्यानंतर संघाच्या तंत्रज्ञांनी मेहनत घेऊन कार सुसज्ज केली. आता ही कार आणखी सुसज्ज झालेली असेल.
 
संजयने सांगितले की, जगातील सर्वाधिक खडतर आणि उत्कंठावर्धक रॅली अशी फिनलंडची ओळख आहे. त्यामुळे मी जागतिक पदार्पणासाठी याच रॅलीची निवड केली. गेल्या वर्षी रॅली पूर्ण करण्याचे प्राथमिक उद्दीष्ट पार केले. त्यानंतर आता अधिकाधिक वरचा क्रमांक मिळविण्याचे ध्येय आहे.
 
बारीक खडी आणि वाळूच्या मार्गामुळे ही रॅली वेगवान असते. जायवस्कीला परिसरातील स्टेजेसमध्ये जोरदार जम्प असतात. त्यामुळे ही रॅली आव्हानात्मक ठरते. त्यामुळे आगामी खडतर स्पर्धांसाठी रॅलीचे तंत्र आणि कौशल्य आत्मसात करण्याची प्रक्रिया पुढे सुरू राहील असा संजयचा दृष्टिकोन आहे.
 
या रॅलीत सर्वाधिक आव्हान अचूक पेस नोट््सचे असेल. गेल्या वर्षी गॅरॉडच्या साथीत ड्रायव्हिंग केल्यानंतर यावेळी समन्वय आणखी सरस बनले अशी संजयची भूमिका आहे. तो म्हणाला की, येथे वेळाचा फरक फार नसतो. त्यामुळे काही सेकंदांची चूक फटका देते. अशावेळी नॅव्हीगेटरसह समन्वय साधणे महत्त्वाचे असते.
 
गॅरॉडने गेल्या वर्षी रुमानियात ब्रिटनच्या मार्क हिगीन्स याच्या साथीत विलक्षण आव्हानात्मक विक्रम केला. सुबारू डब्ल्यूआरएक्स एसटीआय कारसह 52.4 मैल अंतराच्या मार्गावरील तब्बल 624 वक्र भाग त्यांनी पार केले. त्यात तीव्र चढाचा मार्ग 1607 फुटांपासून 6699 फुटांपर्यंत वाढत होता.अशा मार्गावर साधी कार ताशी कमाल 25 मैल वेगाने जाऊ शकते, पण या जोडीने 40 मिनिटे 58.8 सेकंद वेळेत हा टप्पा पूर्ण केला. त्यांनी ताशी 76.69 मैल वेग राखला.
 
फिनलँड रॅली 2019
 
मार्गाचे स्वरुप ः बारीक खडीचा वेगवान मार्ग, पोटात गोळा आणणाऱ्या जम्प
परिसर ः जायवस्कीला शहरातील सरोवरे आणि जंगलातून जाणारा मार्ग
यंदाचा मार्ग ः हारजू येथे गुरुवारी 2.31 किलोमीटर अंतराची स्पेशल स्टेज, जेथे प्रेक्षकांचा सर्वाधिक प्रतिसाद. शुक्रवारी ऑट्टीला (19.34 किमी), मोक्सी (20.04), उरीया (12.28), असामाकी (12.33) आणि थोडा बदल असलेली अनेकोस्की (7.80) अशा स्टेजेस दोन वेळा. पुन्हा एकदा हारजू स्टेज. (एकूण अंतर 126.55)
शनिवारी 133 किमी अंतर. एकूण 14 तास मार्गावर असणार. जाम्सा येथे लेयूत्सू (10.50 किमी) ही नवी स्टेज. पीहलाजाकोस्की (14.42), पैजाला (22.78) आणि कॅकारीस्टो (18.7) अशा स्टेज. कॅकारीस्टो येथे औनीनपोहजा ही प्रसिद्ध जम्प.
रविवारी लौका (11.75), रुहीमाकी (11.12) अशा स्टेजेस. रुहीमाकीमघ्ये बोनस पॉईंट््स देणारी वोल्फ पॉवर स्टेज.
एकूण स्टेजेस ः 23
एकूण अंतर ः 307.22

पुणे मॉन्सून अश्वशर्यतींचा थरार

0

आठवड्याच्या शेवटी दोन महत्वाच्या शर्यती रंगणार

पुणे, 31 जुलै 2019: येत्या शनिवारी व रविवारी (3 व 4 ऑगस्ट रोजी ) रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब(आरडब्लूआयटीसी) येथे अश्वशर्यतींच्या यंदाच्या मौसमातील दोन अत्यंत थरारक शर्यती रंगणार आहेत.

द ऑगस्ट हँडीकप ही त्यातील पहिली शर्यत शनिवारी, 3 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहे.1966 पासून सुरू झालेली ही रेस तीन वर्षे वयाच्या अश्वांसाठी आहे. यातील प्रत्येक अश्वाला विजयासाठी 1400 मीटर धाव घ्यावी लागणार असून अश्वशर्यतींच्या इतिहासामध्ये या रेसला महत्त्वाचे स्थान आहे.

रेस शौकिनांना प्रतीक्षा असलेली टर्फ क्लब ट्रॉफी ही आणखी एक महत्वाची शर्यत रविवार, 4 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहे. या शर्यतीला मोठा इतिहास असून ही रेस मुंबई रेसकोर्सवर टर्फ क्लब कप या नावाने 1947 पासून सुरू झाली. 1987 मध्ये ग्रेडेड रेस स्टेटस मिळाल्यानंतर 1400 मीटरची ही रेस महत्त्वाची मानली जाते.

भारती विद्यापीठ ‘आयएमईडी ‘ आणि पोलंडमधील विद्यापीठात शैक्षणिक आदान -प्रदान कार्यक्रम

0
पुणे :
भारती अभिमत  विद्यापी  इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (‘आयएमईडी’) आणि पोलंडमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ बिझनेस इन रॉकलॉव् ‘ या विद्यापीठात शैक्षणिक आदान -प्रदान  होणार असल्याची माहिती ‘युनिव्हर्सिटी ऑफ बिझनेस इन रॉकलॉव् ‘च्या प्रतिनिधी  डॉ अनेटा सिझिमनसॉफ आणि भारती अभिमत  विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र विभागाचे अधिष्ठाता आणि ‘आय एम ई डी’चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर यांनी दिली .
यासंबंधी २७ जुलै रोजी ‘आय एम ई डी’,पौड रस्ता कॅम्पस मध्ये बैठक झाली . डॉ सचिन वेर्णेकर म्हणाले,  ‘ विद्यार्थ्यांना  जागतिक व असामान्य अनुभव आंतरराष्ट्रीय स्तरावर  मिळावा या  ध्यासाने दोन्ही संस्था तंत्रज्ञानाच्या साहाय्याने  काम करतील.संस्थाना ज्ञान अदान-प्रदान करता येणार आहे’.डॉ.एनेटा म्हणाल्या, ‘ स्पर्धेच्या युगात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अनुभवाला अधिक महत्त्व आहे. तो विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्‍न दोन्ही संस्था करतील’.
आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनशास्त्र सल्लागार प्रा.  जयंत ओक ,’आयएमईडी’च्या प्लेसमेंट विभागाचे प्रा.दीपक नवलगुंद  हे उपस्थित होते.

शिवसेनेच्या नगरसेवकाने घेतला वाघ दत्तक …

0

पुणे – वाघांची घटती संख्या आणि वन्य जीवांप्रति जागरूकता निर्माण व्हावी यासाठी 29 जुलैला व्याघ्र दिन साजरा केला जातो. या दिवशी वेगवेगळ्या माध्यमातून व्याघ्र दिवस साजरा केला जातो. पुण्यातल्या कात्रज प्राणी उद्यानात असलेले वाघ या दिवसानिमित्त दत्तक घेऊन एका वेगळ्या पद्धतीने व्याघ्र दिवस साजरा करण्यात आला.

शिवसेनेचे हडपसर भागातील नगरसेवक नाना भानगिरे यांनी कात्रज उद्यानातील तानाजी या वाघाला 2 महिन्यांसाठी दत्तक घेतले आहे. या दोन महिन्यात तानाजी या वाघाला लागणारे अन्न तसेच औषध उपचाराचा खर्च भानगिरे करणार आहेत. वाघ दत्तक घेताना भानगिरे यांनी शिवसेनेचे चिन्ह आणि पक्षाची आक्रमकता यांची सांगड असल्याने वाघ दत्तक घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.या निमित्ताने वाघ संरक्षण संवर्धनासाठी जागरूकता निर्माण व्हावी, असा ही उद्देश असल्याचे भानगिरे म्हणाले. एकीकडे व्याघ्र दिनाचा निमित्ताने भानगिरे हे वाघ दत्तक घेत असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीकडे त्यांचे लक्ष आहे. हडपसर मतदारसंघातून भानगिरे शिवसेनेतील प्रमुख इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांच्या हा वाघ दत्तक घेण्याची चर्चा मतदारसंघात होत आहे.

नगरसेविका पल्लवी जावळे यांच्या अहवालाचे प्रकाशन

0

पुणे-शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे  यांच्या वाढदिवसा निमित्त पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघातील सर्व पदाधिकारी, गटप्रमुख व शिवसैनिकांचा भव्य निर्धार मेळावा व स्नेह भोजन आयोजित करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका सौ.पल्लवी चंद्रशेखर जावळे यांच्या कार्य आहवालाचे प्रकाशन व जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, मोठ्या प्रमाणात नवीन कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला.  रविंद्र मिर्लेकर,बाळाभाई कदम अजय भोसले ,दिलीप तांबोळी ,नगरसेविका सौ पल्लवी  जावळे (उप शहर संघटीका), राम भाऊ पारीख (माजी शहरप्रमुख) उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन संजय मोरे, उत्तम भुजबळ,अभय वाघमारे,चंद्रशेखर जावळे,अमोल देवळेकर,राजेश मोरे,सनी गवते,अतुल गोंदकर, अनिल दामजी,मनोज घाटे,अजय परदेशी,शंकर साठे,संतोष सोनावणे,रिजवान शेख, अमित जगताप, विरेंद्र गायकवाड, अॅड धनश्री बोराडे, त्रिगुणानाईक ताई रोहिणी कोल्हाळ, यांनी केले

अनुबद्ध’ मैफलीतून घडणार अभिजात नृत्यशैलीचे दर्शन

0

पुणे : नृत्यभारती कथक डान्स अकॅडमीचा ७२ वा  वर्धापनदिन तसेच गुरुपौर्णिमा उत्सव असे दुहेरी औचित्य साधून येत्या २ तारखेला ‘अनुबद्ध’ या कथक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी ६.३० ते रात्री १० या दरम्यान ही मैफल रंगेल. संस्थेच्या विविध शाखांमधील निपुण नर्तकींचा नृत्यविष्कार एकाच व्यासपीठावर अनुभवण्याची संधी यानिमित्ताने रसिक पुणेकरांना लाभेल. पं. रोहिणीताई भाटे यांनी रचलेली अनोखी संरचना ‘कठपुटली ‘ हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असेल.

पं. रोहिणीताई भाटे यांच्या नृत्याविष्काराचा वारसा नृत्यभारती संस्था गेली ७१ वर्षे अव्याहतपणे जपत आहेे. ‘अनुबद्ध’ मैफल म्हणजे या अथक मेहनतीचे मूर्त रूप असून याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी म्हणजे पुणेकरांसाठी पर्वणी ठरेल, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

गुरु पं.रोहिणीताई भाटे यांच्या स्मरणार्थ संस्थेच्या विविध शाखांकडून कथक मैफलीचे आयोजन करण्यात येते. यात ‘मति अमित गति ललित’, ‘संचित आणि सृजन’, ‘आवर्तन’, ‘अनुग्रह’, ‘अनाहत’ ‘एकल विधा’, ‘उजवी बाजू’ आदी मैफलींना रसिक प्रेक्षकांची भरभरून दाद लाभते. तसेच या माध्यमातून कलाकारांना हक्काचे व्यासपीठही उपलब्ध होते.