Home Blog Page 2880

विमानतळ प्रश्नी तातडीने बैठक घ्यावी खासदार गिरीश बापट यांची संसदेत मागणी

0

पुणे  : “आंतरराष्ट्रीय पातळीवर पुण्याची वेगळी ओळख निर्माण होत असून पुणे विमानतळाचा प्रश्न प्राधान्याने सोडवणे गरजेचे आहे. झपाट्याने विकसित होत असलेल्या पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी पडणारी सध्याची पुणे विमानतळाची जागा यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनेक समस्या निर्माण होत आहे. याची गांभीर्याने दखल घेत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संरक्षक मंत्र्यांनी तातडीने बैठक घ्यावी” अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी संसदेत केली.

लोकसभेच्या शून्य प्रहरामध्ये बोलताना ते म्हणाले, पुण्याची लोकसंख्या पाच लाख असताना उपलब्ध  असणारी विमानतळाची जागा लोकसंख्या ५० लाखावर पोहचली तरी अजून तेवढीच आहे. त्यामुळे विमान वाहतुकीवर ताण येत आहे. पुण्याचे सध्याचे विमानतळ हवाई दलाच्या तळावर आहे त्यामुळे त्याचा पूर्ण क्षमतेने वापर आणि विस्तार करण्यावर मर्यादा येत आहेत. दुसरीकडे, नागरी सेवेसाठी एकाच उपलब्ध असलेल्या धावपट्टीचा वापर होत असल्याने विमानतळावर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे हवाईदल, विमानतळ प्राधिकरण, लोकप्रतिनिधी यांची संरक्षक मंत्र्यांनी तातडीने बैठक बोलवावी अशी विनंती या खात्याच्या मंत्र्यांना मी करतो.

ते पुढे म्हणाले की, राज्यात मंत्री असताना लोहगाव विमानतळाच्या विस्तारासाठी संरक्षण खात्याची अतिरिक्त जमीन देण्यासंदर्भात बैठक झाली होती. या बैठकीस तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती. या बैठकीत विमानतळ विस्तारासाठी लष्कराकडील जमीन द्यावी त्याबदल्यात राज्य सरकारने त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी चर्चा झाली होती. पुण्याचे वाढते नागरीकरण आणि औद्योगिकरण लक्षात घेऊन हा प्रश्नी मार्गी लावणे गरजेचे असल्याचे बापट यांनी यावेळी सांगितले.

हि अफजलखानाची प्रवृत्ती – अमोल कोल्हे यांची सणसणीत चपराक (व्हिडीओ)

0

पुणे- तुम्ही आमचे मांडलिक व्हा ..म्हणजे ठीक नाही तर … हि व्यक्ती नाही तर प्रवृत्ती आहे आणि ती अफजल खानची प्रवृत्ती आहे . ज्याचा सामना खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना करावा लागला होता असी सणसणीत चपराक आज खासदार डॉ .अमोल कोल्हे यांनी ..भाजपा मध्ये होणाऱ्या मेगा भरतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे   नाव न घेता लगावली .

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात युवासंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. कोल्हे बोलत होते. राष्ट्रवादी पक्षातून अनेक जण सध्या पक्षांतर करत आहेत. नेत्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीवर संकट आले आहे. मात्र हे संकट नसून ही तर संधी आहे, युवक मित्रांनो. या संधीच सोनं करा, असं आवाहन कोल्हे यांनी युवकांना केले.

यावेळी कोल्हे यांनी शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले. स्वराज्यावर अफजलखान चाल करून आला होता. तेव्हा सर्वांनाच त्याची भिती वाटत होती. बलाढ्य सेनेसह आलेल्या अफजल खानाने तमाम सरदारांना, मांडलिकांना आमच्यात सामील व्हा, तरच तुम्ही सुरक्षित राहू शकाल असं फर्मान सुनावले. त्यामुळे अनेक सरदार, मंडलिक अफजल खानाला सामीलही झाले. तशीच काहीशी परिस्थिती आताही आहे. इतिहासाची कायम पुनरावृत्ती होत असते. परंतु, महाजारांनी यातून संधी शोधल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

शिवाजी महाराजांसमोर शरणागती पत्करण्याचा पर्याय होता. परंतु, दख्खनमधून मोठा योद्धा येत आहे, त्याला पराभूत केले तर दख्खनमध्ये सर्वांनाच कळेल, शिवाजी महाराज काय आहेत. ही संधी होती. महाराजांनी आलेल्या संकटात संधी शोधली. आपण महाराजांचे मावळे असून यातून आपल्याला संधी शोधायची, अस डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरू होण्याच्या एक दिवसआधी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शिवस्वराज्य यात्रेची घोषणा केली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली असून छत्रपती उदयनराजे भोसले या यात्रेत स्टार प्रचारक असणार आहे. या यात्रेमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

राष्ट्रकुल कांस्य पदक विजेता मुष्ठियोद्धा नमन तंवर याला मोर्डे समूहाचा पाठींबा

0

पुणे-: राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्य पदक विजेता मुष्ठियोद्धा नमन तंवर याला पुण्यातील मोर्डे फूड्स या खाद्यपदार्थ उत्पादक समूहाने आपला पाठिंबा जाहीर केला असून क्रीडा क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था “लक्ष्य”च्या माध्यमातून हे साहाय्य करण्यात येणार आहे.

गेल्या 2 वर्षापासून लक्ष्यचा पाठिंबा लाभलेल्या नमन  तंवरने 2016 मध्ये रशियात झालेल्या एआयबीए युवा जागतिक मुष्ठियुद्ध स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते. तसेच, 2017 मध्ये कझाकस्तान येथे झालेल्या गॅलिम झारीलगापोव्ह  मुष्ठियुद्ध या स्पर्धेत नमनने सुवर्ण पदकासह सर्वोत्तम  मुष्ठियोद्धा हा किताब पटकावला होता.

मोर्डे फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक किशोर मोर्डे म्हणाले की, इंडिया ओपन मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणाऱ्या नमनला पाठिंबा देताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे आणि या पाठिंब्याचा उपयोग करून नमन आपली कामगिरी आणखी उंचावेल, अशी आम्हांला खात्री आहे. चॉकोलेट उत्पादनात क्षेत्रात आघाडीवर असलेल्या मोर्डे फूड्सला नमनच्या या आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे आम्ही भाग्यवान ठरलो आहोत असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना “लक्ष्य”चे उपाध्यक्ष स्वस्तिक सिरसीकर आणि सचिव सुंदर अय्यर म्हणाले कि, टोकियो ओलंपिकला एक वर्षाचा कालावधी बाकी असताना विविध पात्रता स्पर्धांमध्ये सहभागी होत असलेल्या नमनला हा पाठिंबा अत्यंत योग्य वेळी मिळाला आहे. “लक्ष्य”च्या वतीने मिळालेले सर्वांगीण साहाय्य या खेळाडूंसाठी अतिशय महत्वाचे ठरणार असून त्यांचा आत्मविश्वास त्यामुळे उंचावणार आहे.

खेळाडूंना पाठिंबा देण्याऱ्या  पुरस्कर्त्यांमध्ये आघाडीचे खाद्यपदार्थ उत्पादक मोर्डे फूड्स समुहाचा समावेश करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. खेळाडूंना पाठिंबा देण्याच्या त्यांच्या धोरणामुळे आगामी काळात भारताला क्रीडा क्षेत्रात महासत्ता बनण्यास मदत होणार असल्याचे “लक्ष्य”चे उपाध्यक्ष स्वस्तिक सिरसीकर यांनी सांगितले.

“लक्ष्य” चे प्लेअर मॅनेजमेंट प्रमुख ग्रँडमास्टर अभिजित कुंटे आणि खजिनदार भरत शहा  म्हणाले की, या साहाय्याचा पुरेपूर उपयोग करून नमन  तंवर   टोकियो ओलंपिकसाठी भारतीय संघात नक्की स्थान मिळवेन, असा आम्हांला विश्वास वाटतो. तसेच, त्याचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला पदक मिळविण्याचीही निश्चित संधी आहे.

ग्रँडमास्टर अभिजित कुंटे पुढे म्हणाले की, येत्या काही महिन्यात नमनला आपल्या बलस्थानावर आणि तंदरुस्तीवर आणखी भर द्यावा लागणार आहे. तरच, त्याला 91 किलो गटातील आपल्या प्रतिस्परध्यांवर मात करता येईल. हे शक्य झाल्यास टोकियो 2020 ओलंपिकमध्ये पदक मिळविण्याची नमनला उत्तम संधी असल्याचे मत राष्ट्रीय मुष्टीयुद्ध प्रशिक्षकांनी व्यक्त केले आहे.

दोन महिन्यापूर्वी आपला 20वा वाढदिवस साजरा करणारा नमन तन्वर राष्ट्रीय शिबिरात नसताना भिवानी येथे आपले प्रशिक्षक संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

तत्पूर्वी मोर्डे फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक किशोर मोर्डे, वित्त व नियंत्रण महाव्यवस्थापक मदन देशपांडे  यांच्या हस्ते नमन  तंवर याचा सत्कार करण्यात आला.

लक्ष्यचा पाठिंबा लाभलेल्या खेळाडूंची यादी

स्वप्निल कुसळे(नेमबाजी- नांदेड सिटी), सोनिया लाथर(मुष्ठियुध्द-भारत फोर्ज), यश आराध्या(गोकार्टींग मोटर स्पोर्टस्- भारत फोर्ज), विदित गुजराती(बुध्दिबळ- भारत फोर्ज), शुभंकर डे(बॅडमिंटन-भारत फोर्ज), प्रिथा वर्टीकर(टेबल टेनिस-दालमिया मानव सेवा ट्रस्ट), सिमरनजीत कौर(मुष्ठियुध्द-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्), सचिन सिवाच(मुष्ठियुध्द-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्), निरज फोगट(मुष्ठियुध्द-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्), नुपुर हगवणे पाटील(नेमबाजी-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्), आयुषी पोतदार(नेमबाजी-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्), मल्लिका मराठे(टेनिस-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्), सचेत पिन्नानाथ(नेमबाजी-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्), रौनक साधवाणी(बुध्दिबळ-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्), शरण्या गवारे(टेनिस-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्), सालसा आहेर(टेनिस-जनरल इंडस्ट्रीयल कंट्रोल), रेश्मा माने(कुस्ती- कांतिलाल लुंकड फाउंडेशन), साक्षी शितोळे(तिरंदाजी- सायबेज खुशबु/खुशबू चॅरिटेबल ट्रस्ट), सुहाना सायनी(टेबल टेनिस- शेविएट कंपनी), माहक जैन (शेविएट कंपनी), सिमरन कौर(कुस्ती-सुहाना प्रविण मसाले), नमन  तंवर(मुष्ठियुध्द- मोर्डे फुडस्), ऋतुजा भोसले(टेनिस- भारत फोर्ज),  अक्षय कुमार(मुष्ठियुध्द- बुक अ स्माईल), निशा मलिक(कुस्ती-बुक अ स्माईल), नताशा दुमने(तिरंदाजी-बुक अ स्माईल), प्राप्ती सेन(टेबल टेनिस- बुक अ स्माईल), मनिश(मुष्ठियुध्द- बुक अ स्माईल), साजन भानवल(ग्रेको रोमन कुस्ती-बुक अ स्माईल)

महसूल विभाग प्रशासनाचा कणा -विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

0

जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलदिन कार्यक्रम

पुणे  : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. येथे येणा-या प्रत्येक नागरिकांचे समाधान करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे महसूल विभागात कार्यरत प्रत्येक अधिकारी, कर्मचा-यांने सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदु माणून काम करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केले.

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुणवंत अधिकारी-कर्मचारी यांचा डॉ. म्हैसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल  किशोर राम, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त प्रताप जाधव, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, विविध योजनांच्या अंमलबजावणीत गावपातळीवरील अधिकारी-कर्मचारी यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या कामकाजावर प्रशासनाची प्रतिमा अवलंबून असते. प्रत्येकाने त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. महसूल विभागाची भूमिकाच कायम मदतीची राहीली आहे, त्यामुळेच सर्वसामान्य माणसाच्या कामाला प्रत्येकाने प्राधान्य दिले पाहिजे. प्रशासनात केलेल्या सेवेबाबत आज ज्यांचा गौरव झाला, हाच दृष्टीकोन समोर ठेवत प्रत्येकाने सेवा करावी, असे आवाहनही डॉ. म्हैसेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, प्रशासनात काम करताना सामाजिक कार्य करण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रत्येक अधिकारी, कर्मचा-याने काम करताना सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवत सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करावे,  प्रशासनात काम करताना निर्णयक्षमता महत्वाची असल्याचे सांगून गावपातळीपासून जिल्हापातळीवरील प्रत्येक अधिकारी, कर्मचा-यांची सकारात्मक भूमिका महत्वाची ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अपर जिल्हाधिकारी रमेश काळे म्हणाले, आजचा पुरस्कार सोहळा हा प्रातिनिधीक स्वरूपाचा असून सर्वच अधिकारी व कर्मचारी हे चांगले काम करीत असल्याचे सांगून महसूल प्रशासनाने वर्षभर राबविलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

यावेळी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष दिपक चव्हाण, तलाठी संघटनेचे अध्यक्ष हेमंत नाईकवाडी, कोतवाल संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. आभार निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी मानले.यावेळी अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

‘झी टॉकीज’वर अवतरणार ‘राक्षस’!!!

0

मराठी नाटक, कथाबाह्य कार्यक्रम इत्यादी अनेक दर्जेदार सादरीकरण ‘झी टॉकीज’वर पाहायला मिळतात. अर्थात, मराठी सिनेसृष्टीतील ही सर्वोत्तम वाहिनी, आजही दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येण्यात कुठेही मागे नाही. जुन्या व नव्या चित्रपटांची सांगड घालत, एक उत्तम मेजवानी ही वाहिनी सर्वांसाठी पेश करते.  आजवर अनेक मराठी चित्रपटांचे ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर’ या वाहिनीवर प्रेक्षकांनी पाहिलेले आहेत. असाच आणखी एक प्रीमियर ऑगस्टच्या पहिल्या रविवारी ‘झी टॉकीज’ घेऊन येत आहे. ‘राक्षस’ ही एका त्रिकोणी कुटुंबाची चित्तथरारक कथा आहे. हा चित्रपट, रविवार ४ ऑगस्ट रोजी, दुपारी १२ व संध्याकाळी ६ वाजता, झी टॉकीजवर पाहता येईल.

अविनाश (शरद केळकर) हा एक डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी जंगलात गेलेला असतांना, तो तिथेच हरवतो. त्याच्या काळजीपोटी त्याची पत्नी इरावती (सई ताम्हणकर) व मुलगी अरण्या त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागतात. संपूर्ण चित्रपटात, या दोघींची अविनाशला शोधण्यासाठी सुरू असलेली धडपड पाहायला मिळते. चित्रपटात जंगलातील प्रसंग फार महत्त्वाचे असल्याने, या सिनेमाचे बरेचसे चित्रीकरण जंगलात करण्यात आले आहे. मायलेकींचे हे शोधकार्य सुरू असतांना, कथांचे एक पुस्तक त्यांना फार उपयोगी पडते. अरण्या म्हणजेच अरु, बाबांसोबत जंगलात गेलेली असतांना, तिला हे पुस्तक सापडलेले असते. या पुस्तकाच्या आधारे, अविनाश नाहीसे होण्याचे गूढ सोडवण्याचा त्या दोघी आटोकाट प्रयत्न करतात. अर्थात, अविनाशने अदृश्य होण्याव्यतिरिक्त इतर काही रहस्यांचा उलगडा या शोधकार्यात होत आहे, हे त्या दोघींच्या लक्षात येते.

अविनाशला शोधून काढण्यात या दोघी यशस्वी होतील का? उलगडत जाणारे ते दुसरे रहस्य कुठले असेल, हे जाणून घेण्यासाठी ‘राक्षस’ या चित्रपटाचा ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर’,  ‘झी टॉकीजवर’ पहावा लागणार आहे .

जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातील सचिन मुंढे यांचे कुस्ती पंच परीक्षेत यश

0
 जुन्नर / आनंद कांबळे :
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या कुस्ती पंच परीक्षेत जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातील सचिन मुंढे यांनी यश संपादन केले आहे.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या वतीने भोसरी येथे राज्यस्तरीय नवीन पंचांसाठी प्रशिक्षण शिबिर व परीक्षा घेण्यात आली. यामध्ये जुन्नर तालुक्यातील क्रीडाशिक्षक सचिन मुंढे यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे व ऑलम्पिकवीर मारुती आडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सचिन मुंढे यांना कुस्तीक्षेत्रात आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड सर,मारुती सातव,संदीपआप्पा भोंडवे,मोहन खोपडे,रवी बोत्रे,रोहिदास आमले आशा नामांकित पंचाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

अण्णाभाऊ साठे यांच्यावरील पहिली वेबसाईट -खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते होणार अनावरण

0

पुणे  :आपल्या अलौकिक प्रतिभेतून कला आणि साहित्य विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची संपूर्ण माहिती आता एका क्लिक उपलब्ध होणार आहे. कॅटलिस्ट फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने हा विधायक उपक्रम हाती घेतला असून लवकरच  अण्णाभाऊ साठे यांच्यावरील या पहिल्यावहिल्या वेबसाईटचे संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते या अनावरण होईल. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेने हा विधायक उपक्रम हाती घेतला आहे.

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा एक प्रयत्न म्हणून माजी पत्रकार सुनील माने यांनी  ‘कॅटलिस्ट फाऊंडेशनची’ स्थापना केली. सामाजिक, शैक्षणिक तसेच पर्यावरण या विभागामध्ये काम करणे हा त्या पाठीमागील उद्देश आहे. खासदार गिरीश बापट हे या संस्थेचे पालक तर लष्करातून  सेवानिवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल डी.बी शेकटकर या संस्थेचे मेंटॉरआहेत.

कॅटलिस्ट फाऊंडेशनची स्थापना केल्यानंतर सातत्याने काही तरी नवीन करायचे या विचाराने ही संस्था कार्यरत आहे. हाच ध्यास बाळगून संशोधन केल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्यावरील वेबसाईट नसल्याचे लक्षात आले. म्हणूनच अण्णाभाऊंचे महान कार्य डिजिटल स्वरुपात जनतेसमोर आणण्याच्या निश्चयाने या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली. अण्णाभाऊंचे अलौकिक व्यक्तिमत्व, त्यांची व्यापक साहित्य संपदा, स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील त्यांचे योगदान, लोकशाहीर म्हणून त्यांनी केलेले समाजप्रबोधन या विषयीची एकत्रित माहिती या वेबासाईटच्या माध्यमातून देण्याचा संस्थेचा प्रयास आहे. ही वेबसाईट अण्णाभाऊंच्या बद्दल उपलब्ध होणारी माहिती सतत उपलब्ध करून देईल. त्यांचे राज्य सरकारने प्रकाशित केलेले साहित्य या वेबसाईटवर उपलब्ध राहील. त्याची परवानगी साहित्य संस्कृती मंडळाने फाऊंडेशनला दिली आहे.

बदलत्या युगाप्रमाणे माहितीचे अदानप्रदान करण्यासाठी आजची तरुणाई मोबाईल, संगणक आणि इंटरनेट सारख्या डिजिटल माध्यमांना प्राध्यान्य देते. आमची संस्था प्रामुख्याने तरुणांसाठी काम करणारी संस्था असल्याने याचाच एक भाग म्हणून अण्णाभाऊंचा चरित्रपट वेबसाईटच्या माध्यमातून साकारण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. हा उपक्रम लोकाभिमुख असून यास तरुणांचा  प्रतिसाद लाभेल असा विश्वास संस्थेच्या सचिव लक्ष्मीकांता माने यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केला.

श्रमाला प्रतिष्ठा मिळाल्यास कौशल्याधारित शिक्षणाला महत्व प्राप्त होईल

0

शैक्षणिक व्यवस्थेची पुनर्बांधणी विषयावरील परिसंवादात मान्यवरांची भूमिका

डीपर, सर फाउंडेशन व साद माणुसकीतर्फे परिसंवादाचे आयोजन

पुणे,  : श्रमाला प्रतिष्ठा मिळाल्यासच कौशल्याधारित शिक्षणाला महत्व प्राप्त होईल. आणि शिक्षणातून माणूस व संस्कृतीची जोपासना झाली तरच, हे शिक्षण मानवाच्या कल्याणाकरीता उपयुक्त राहील, अशी भूमिका ‘शैक्षणिक व्यवस्थेची पुनर्बांधणी’ विषयावरील परिसंवादात मांडण्यात आली.

डीपर, सर फाउंडेशन व साद माणुसकीतर्फे या परिसंवादाचे कोथरुड येथील जे पी नाईक सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज, सामाजिक कार्यकर्ते किशोर देशपांडे, सिस्कॉमचे राजेंद्र धारणकर, विज्ञानाश्रमाचे योगेश कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ अभिजीत पाटील, सुधीर दाणी, अभ्यासक प्राचार्य डॉ. चंद्रकांत रागीट, श्यामची आई फाउंडेशनच्या शीतल बापट आणि आयआयटी प्रतिष्ठानचे दुर्गेश मंगेशकर सहभागी झाले होते. आयोजक व संस्थापक हरीश बुटले यांनी प्रास्ताविकादरम्यान सध्याची परिस्थिती आणि शिक्षण व्यवस्था यासंदर्भात विवेचन केले. शैक्षणिक व्यवस्थेची पुनर्बांधणी विषयावरील परिसंवाद अतिशय उपयुक्त ठरला असून यामुळे शैक्षणिक धोरणकर्त्यांना निश्चितच त्याचा फायदा होईल, असा आशावाद मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्रातल्या शिक्षणाची परिस्थिती फारशी चांगली नाही. कारण 30 ते 35 टक्के मुलांना लिहिता-वाचता येत नाही. त्यांची जबाबदारी कोण घेणार? आणि पैसे मिळवून देणारं शिक्षण जर माणसाला माणसापासून दूर करीत असेल तर, काय कामाचं? असा प्रश्न उपस्थित करून अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांनी त्यांच्याकडे सुरु असलेल्या शैक्षणिक प्रयोगाचे दाखले देत शिक्षणातून आपली संस्कृती जोपासली गेली पाहिजे असे स्पष्टपणे नमूद केले.

निवडणूक आयोगाच्या धर्तीवर शिक्षण आयोग स्थापन केला पाहिजे आणि जून ते एप्रिल दरम्यान शिक्षण आचारसंहिता लागू केली पाहिजे. यामध्ये केंद्रबिंदू विद्यार्थी ठेवून शिक्षणाचे धोरण तयार केले पाहिजे, असे मत राजेंद्र धारणकर यांनी यावेळी व्यक्त केले.

क्रिएटिव्हीटीला वाव देणारं आणि मुलांमधील क्रिएटीव्हीटी वाढविणारं शिक्षण आवश्यक आहे. आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे लोकांना जे हवंय तेच शिक्षण सरकारकडून दिले जाते. त्यामुळं लोकांनी ठरविले पाहिजे की त्यांना कशाप्रकारचे शिक्षण हवं आहे, असे मत योगेश कुलकर्णी यांनी मांडले.

शिक्षणाचे धोरण तयार करीत असताना या क्षेत्रातील दिग्गज माणसांना संबंधीत समितीवर का नेमण्यात येत नाही हा खरा प्रश्न पडतो. आपल्याला यापुढच्या काळात शास्त्रज्ञ तयार करायचेत की सुपरव्हायजर हे ठरविले पाहिजे. आणि जर शास्त्रज्ञ तयार करायचे असतील तर, शिक्षक हा या व्यवस्थेचा गाभा आहे म्हणून सर्वात अगोदर शिक्षक घडवला पाहिजे, असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.

शिक्षण व्यवस्थेवरच राष्ट्राची निर्मिती आधारित आहे. त्यासाठी दर्जेदार शिक्षकांची आवश्यकता आहे. आताचं शिक्षण कौशल्याधारित नाही. त्यामुळे बेकारी वाढत आहे. आपल्या देशातील परिस्थिती पाहता येथे माफक दरात शिक्षण मिळायला पाहिजे. त्यासाठी शुल्क नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सुधीर दाणी यांनी सांगितले.

शिक्षणात लवचिकता असायला हवी आणि नवीन होणाऱ्या शिक्षण धोरणात ती आहे. शिक्षण विभागाच्या विविध स्तरावर असणाऱ्या समित्यांऐवजी आता शिक्षण आयोग नियुक्त होणार आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षणात संशोधनावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. चंद्रकांत रागीट यांनी दिली.

शिक्षण धोरणातही एक देश – एक अभ्यासक्रम – एक शिक्षण धोरण आणायला हवे. कोचिंग क्लासेस हे पूरक आहेत. त्यामुळे त्यासाठीही धोरण आणायला हवं. डिजिटल लर्निंग हा यापुढील काळातील महत्वाचा विषय राहणार आहे. याविषयी निश्चित धोरण आणायला हवे आणि विशेष म्हणजे धोरण ठरविताना संबंधीत विषयातील तज्ज्ञ व शिक्षकांना विश्वासात घ्यायला हवं, असे मत दुर्गेश मंगेशकर यांनी व्यक्त केले.

शिक्षणात लवचिकता असणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना हवा तो अभ्यासक्रम निवडता यावा. तसेच पालकांनीही त्यांच्या पाल्यांवर विनाकारण दडपण आणणे इष्ट होणार नाही. मनमोकळेपणाने शिक्षण घेता आले तर, विद्यार्थ्यांची जडणघडण अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकते, असे शीतल बापट यांनी सांगितले.

विश्‍वात्मक नागरिक घडविणारी एकमेव परिक्षाः डॉ. श्रीपाल सबनीस

0

पुणे-“ पारंपारिक शिक्षणाबरोबरच मूल्याधिष्ठित शिक्षण ही काळाची गरज आहे. जाती धर्माच्या भिंती ओलांडून मानवापर्यंत संस्कार देण्याची ही परिक्षा पद्धती आहे. त्यामुळे संस्कारक्षम  नागरिक तयार करण्यास मदत होईल.”असे उद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी,पुणेच्यावतीने आयोजित केल्या गेलेल्या “वैश्‍विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षा -२०१९” या राज्यस्तरीय प्रमाणपत्र परीक्षेत यशस्वी झालेल्या सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी परीक्षेचे प्रमुख समन्वयक व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे आणि प्र-कुलगुरू  प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस हे उपस्थित होते.
डॉ.सबनीस म्हणाले,“ या परिक्षेमध्ये विश्‍वात्मक संस्कृती, शिक्षण, विज्ञान, अध्यात्म, नितिमूल्य, विश्‍वशांती तसेच संत महात्मांची ओळख अशा अनेक विषयांचा अंतर्भाव आहे. त्यामुळे या परीक्षेतून सर्वगुण संपन्न नागरीक तयार होतो. हेच विद्यार्थी समाजात बदल घडविण्यासाठी अग्रस्थानी असतील.”
“या परिक्षेच्या माध्यमातून ते केवळ विद्यार्थी घडवित नाही तर समाजाचे चरित्र निर्माण करीत आहेत.  सर्वधर्मांचे ग्रंथ हे जीवनग्रंथ असून भारतीय संस्कृतीची मुळे ही खोलवर रूजलेली आहे. त्यामुळे नव्या पिढीला याची जाणीव करणार्‍यासाठी डॉ. कराड यांनी वैश्‍विक मूल्याधिष्ठित शिक्षण परिक्षा सुरू केली. मुळात अशी संकल्पना राबविणे म्हणजेच विश्‍वशांतीसाठी उचलेले पाऊल आहे. शिकागो येथे स्वामी विवेकांनद हेे अध्यात्म आणि विज्ञानावर बोलले पण डॉ. कराड यांनी हीच मूल्यवर्धित शिक्षण पद्धती चालविली. ज्यातून सृष्टीवरील ७०० कोटी लोकांसाठी ते शांतीचा मार्ग शोधित आहेत.
डॉ. प्रमोद येवले, “ ही परिक्षा देऊन कोणालाही नोकरी मिळणार नाही परंतू संस्कृतीची जोपासना केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी हे शिक्षण सर्वांना मिळावयाला हवे. ज्या प्रकारे विदेशात भारतीय संस्कृतीचे जतन केले जात आहे, तसेच आपल्या येथे करण्याची वेळ आली आहे. सध्या या देशाला शाश्‍वत शिक्षणाची गरज असून ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगिण विकास करावयाचा आहे.”
“१३० कोटीच्या देशामध्ये चांगला माणूस मिळू नये ही देशाची शोकांतिका आहे. याला आपली शिक्षण पद्धतीच जवाबदार आहे. त्यासाठी ही परिक्षा एक प्रभावी माध्यम असून यातून चांगला माणूस निर्माण होईल.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ पारतंत्र्यामुळे भारत देशाने अस्मिता गमाविली आहे. ब्रिटीश लोकांनी भारतीय संस्कृतीवर आघात केला. येथे शेकडो वर्षांपूर्वींच संतांनी आम्हाला सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली आहेत. त्याच मार्गावर चालून संपूर्ण जगाला विश्‍व शांतीचा संदेश देण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या घुमटाची निर्मिती येथे केली आहे. येणार्‍या काळात वसुधैव कुटुम्बकमच्या मंत्रातूनच सर्व जगाला शांतीचा मार्ग दाखवू.”
डॉ. एस.एन.पठाण म्हणाले,“परिक्षेमुळे भौतिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास होतो. मन आणि शरीराचा विकास म्हणजेच शिक्षण आहे. मुलांना संस्कार देण्यासाठी सुरू केलेली ही परिक्षा आज राज्यातील सर्वं शाळांमधील शिक्षकांच्या प्रयत्नामुळे अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. तसेच पुढील वर्षी ही परिक्षा गोवा राज्यात घेण्याचा मानस आहे”.
या वेळी कु.श्रृती पवार, कु.रिया गोरे, कु. स्नेहा ओंबासे व अन्य विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
निलिमा शितोळे यांनी सूत्रसंचालन केले. सौ. देवयानी पालवे यांनी आभार मानले.

‘सायलेंट-टाईज’ शॉर्ट फिल्ममध्ये रेणुका शहाणे साकारणार प्रमुख भूमिका

0

गेली अनेक वर्षे टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सई देवधरने मराठी सिनेमातही काम करावं अशी अनेकांची इच्छा नुकतीच ‘मोगरा फुलला’ या सिनेमाच्या निमित्ताने पूर्ण झाली. आणि या सिनेमानंतर तिचे काम पुन्हा एकदा पाहायला मिळावे असे अनेकांना वाटले. अभिनेत्रीसह दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून पण काम पाहणारी धाडसी, मेहनती, जिद्दी सई जास्त वेळ तिच्या कामापासून लांब राहू शकत नाही हे ही तितकेच खरे आहे. सतत काही ना काही नवीन करत राहायचं, शिकत राहायचं असा विचार करणारी सई आता काय घेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष हमखास असणार यात शंका नाही.

काही दिवसांपूर्वी सई देवधरने तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवर अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिची आई आणि दिग्दर्शिका श्राबणी देवधरही होत्या. आणि त्या फोटोसह सईने स्पष्ट म्हंटलंय की ‘My second directorial venture’. याचाच अर्थ असा की झी5 वरील ‘डेट’ या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन सईने केले होते आणि आता ती पुन्हा एक नवीन शॉर्ट फिल्म दिग्दर्शित करणार आहे ज्याचे नाव आहे ‘सायलेंट-टाईज’.

पलाश दत्ता यांनी निर्मित केलेल्या ‘सायलेंट-टाईज’ या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून सईने एक नवीन पण तितकाच नाजूक विषय सुंदर पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एलजीबीटी विषयी समाजाला आणि समाजातील लोकांना जागरुक करणे हा या शॉर्ट फिल्मचा हेतू आहे. ही एक कौटुंबिक कथा आहे जी बहिण-भावाच्या नात्यावर आधारित आहे आणि अभिनेत्री रेणुका शहाणे यामध्ये बहिणीची भूमिका साकारणार आहे.

या महिन्यात रक्षाबंधन सण ही येतोय आणि सईची नवीन शॉर्ट फिल्म देखील येतेय, त्यामुळे एक छान कलाकृती आणि सोबतीला ब-याच दिवसांनी रेणुका शहाणे यांचा अभिनय पण प्रेक्षकांना पाहायला मिळणार हे नक्की.

पुष्पक विमान’च्या फिल्ममेकरसोबत पुर्वी भावेचे नवे प्रोजेक्ट

0

अभिनेत्री आणि नृत्यांगना पुर्वी भावेच्या ‘अंतर्नाद’डान्स सिरीज मधले भज गणपती हे पहिले गाणे लोकांच्या पसंतीस उतरल्यावर आता ह्या सीरिजमधले दुसरे गाणे ‘धागा प्रेम का’ नुकतेच रिलीज झाले आहे. गाण्याची विशेषता म्हणजे या गाण्याचं दिग्दर्शन ‘पुष्पक विमान’ ह्या सिनेमाचेदिग्दर्शक वैभव चिंचाळकर ह्यांनी केले आहे.

ह्या गाण्याविषयीअभिनेत्री पुर्वी भावे सांगते, “भरतनाट्यम नृत्यप्रकाराचे मी शास्त्रशुध्द शिक्षण घेतले आहे. त्यामुळे ह्या नृत्यशैलीत पहिला आणि ह्याच नृत्यशैलीत दूसराही व्हिडीयो आला आहे.युगानुयुगांपासून पारंपारिक शास्त्रीय कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचवल्या गेल्या आहेत. आत्ताच्या पिढीपर्यंत भरतनाट्यम हा नृत्यप्रकार पोहचावा यासाठी युट्युब हे उत्तम माध्यम आहे. एखाद्या कलेची सिरीज करत असताना त्यात विविध प्रकारच्या भावभावनांचा अंतर्भाव केला पाहिजे. म्हणून ‘अंतर्नाद’ डान्स सिरीजमधल्या दूस-या गाण्यामध्ये एक प्रेमकथा दाखवली गेली आहे. “

‘धागा प्रेम का’ या गाण्यात रहीम दास ह्यांचे दोन लोकप्रिय दोहे आहेत. ‘प्रेमाचा धागा तोडू नये, तुटला तर गाठ पडते’. अशा आशयाचे हे गाणे आहे.गाण्यात नृत्यांगना आणि मृदुंग वादक या जोडीची प्रेमकथा भरतनाट्यमच्या माध्यमातून सांगितली आहे. गाण्याला पुर्वी भावेची आई आणि शास्त्रीय सुप्रसिध्द गायिका वर्षा भावे ह्यांनी संगीत दिले आहे.

 या गाण्याच्या शुटींगचा अनुभव सांगताना पुर्वी भावे म्हणते, “या गाण्यात जितकी माणसं स्क्रीन वर दिसत आहेत त्यापैकी कुणालाच शुटिंगचा अनुभव नव्हता. मात्र कसलेला दिग्दर्शक वैभव चिंचाळकरह्याने सर्वांकडून उत्तम परफॉर्मन्स करवून घेतला आहे. याआधीच्या ‘भज गणपती’ डान्स मध्ये मी एकटीच दिसले होते. परंतु ह्या गाण्यात माझी डान्स अकॅडमी ‘हाउस ऑफ नृत्य’ च्या विद्यार्थिनींचाही सहभाग आहे.

कल्याण ज्वेलर्सतर्फे चार स्तरीय हमी योजना

भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक पसंतीच्या कल्याण ज्वेलर्सने चार स्तरीय हमी उपक्रम सुरू केला असून त्याद्वारे आपल्या निष्ठावान ग्राहकांना ब्रँडप्रती दाखवलेल्या बांधिलकीसाठी सर्वोत्तम भेट देण्याचा उद्देश आहे. ब्रँडशी जोडला गेलेला विश्वासाचा वारसा कायम राखत कल्याण ज्वेलर्सतर्फे ग्राहकांना चार स्तरीय हमी प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

कल्याण ज्वेलर्समध्ये विकले जाणारे दागिने विविध प्रकारच्या शुद्धता चाचण्यांमधून गेलेले असतात आणि त्यावर बीआयएस हॉलमार्कही दिलेला असला, तरी चार स्तरीय हमी प्रमाणपत्र ग्राहकांना बदली किंवा पुनर्विक्रीदरम्यान शुद्धतेच्या मुल्यावरून पैसे देण्याची खात्री त्यावर नमूद केलेली असते. कल्याण ज्वेलर्सला ग्राहकांच्या भावनांची जाणीव आहे आणि म्हणूनच कंपनीच्या देशभरातील कोणत्याही दालनात खरेदी केलेल्या दागिन्यांवर आयुष्यभरासाठी मोफत देखभाल करून दिली जाणार आहे.

हा ब्रँड न्याय्य आणि पारदर्शक व्यवसाय पद्धतींसाठी ओळखला जाणारा असून चार स्तरीय हमी योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या उत्पादनाच्या माहितीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे, की ग्राहकांना सोन्याचे मूल्य त्याच्या एकूण वापरानुसार लावण्यात आले असून उत्पादनाच्या एकूण वजनातून लाख, मौल्यवान खडे, काच, लाकूड, अनॅमल इत्यादी घटकांचे वजन वजा करण्यात आले आहे. त्याशिवाय कल्याण ज्वेलर्सने दागिन्यांच्या बदली आणि पुनर्विक्रीवरही चांगले मूल्य देण्याचे आश्वासन दिले आहे.

या उपक्रमाविषयी श्री. टी. एस. कल्याणारामन, अध्यक्ष आणि व्यवस्थाकीय संचालक, कल्याण ज्वेलर्स म्हणाले, एका दालनापासून जागतिक पातळीच्या ब्रँडपर्यंत कल्याण ज्वेलर्सचा झालेला अभूतपूर्व प्रवास हा आमच्या मूलभत विश्वास आणि पारदर्शकतेचा पाया आहे. 26 वर्षांपूर्वी स्थापना झाल्यापासूनच कल्याण ज्वेलर्सने असामान्य डिझाइन्स, खात्रीशीर दर्जा, योग्य किंमत आणि सर्व ग्राहकांना खरेदीचा सर्वोत्तम अनुभव देणारा ब्रँड अशी आपली अभिनव ओळख तयार केली आहे. फार कमी जणांना माहीत आहे, की या ब्रँडने बीआयएस हॉलमार्किंग, दरांच्या टॅग्जची सुरुवात, हिरे व इतर जेमस्टोन दागिन्यांसाठी आयजीए प्रमाणपत्र अशा कित्येक गोष्टींची सुरुवात केली असून आज हे सर्व या क्षेत्रातील प्रचलित नियम बनले आहेत. सोन्याच्या दागिन्यांवरील हे चार स्तरीय हमी प्रमाणपत्र ग्राहकांप्रती आम्हाला वाटणारी बांधिलकी अधोरेखित करणारे आहे.

हे चार स्तरीय हमी प्रमाणपत्र कल्याण ज्वेलर्सच्या भारतातील सर्व दालनांमध्ये 1 ऑगस्ट 2019 पासून लागू होणार आहे. सध्याचे ग्राहकही कल्याण ज्वेलर्सच्या कोणत्याही दालनात जाऊन आपल्या दागिन्यांचे पुनर्मूल्यांकन करून घेत चार स्तरीय हमीचा शिक्का मिळवू शकतात. यापूर्वी कल्याण ज्वेलर्समध्ये हिरे आणि जेमस्टोन्सच्या दागिन्यांसाठी अशाप्रकारचे प्रमाणपत्र राबवण्यात आले आहे. या चार स्तरीय हमी प्रमाणपत्राविषयी कल्याण ज्वेलर्स मीडिया अभियानही राबवत आहे.

ग्राहक समाधानाला कल्याण ज्वेलर्सचे प्रथम प्राधान्य असून ग्राहकांना सोने, हिरे व जेमस्टोन्समधील पारंपरिक तसेच आधुनिक दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देण्यात आली आहे, जी प्रत्येक ग्राहकाच्या विविध गरजा पूर्ण करणारी आहे.

अवघ्या 23 पत्रकारांना पेन्शन – आणि नावांबाबत गुप्तता का ? एस एम देशमुख यांचा सवाल

0

मुंबई- संपूर्ण  महाराष्ट्रातून अवघ्या  23 ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा (पेन्शन )लाभ मिळाला आहे.27 तारखेला त्याच्या चेकचे वाटपही झाले.मात्र हे 23 भाग्यवंत कोण आहेत त्यांची नावं का कोणास ठाऊक पण गोपनीय ठेवली गेली.त्यामुळं हे 23 भाग्यवंत कोण याबद्दल महाराष्टा्रतील पत्रकारांमध्ये उत्सुकता होती.23 भाग्यवंतांची यादी आम्हाला आता उपलब्ध झाली आहे.ज्यांना पेन्शन दिलं गेलं ती नावं आक्षेप घेण्यासाऱखी नाहीत.नावं योग्यच आहेत.तरीही गुप्तता का पाळली गेली याचं उत्तर मात्र मिळत नाही.असे मराठी पत्रकार परिषदेचे एस एम देशमुख यांनी म्हटले आहे.

त्यांनी सांगितले ,ज्या 23 जणांना सन्मान योजनेत स्थान मिळालं ती नावं खालील प्रमाणं

1) दिनू रणदिवे , मुंबई (वय95 वर्षे)

2) रामभाऊ जोशी , पुणे वय 97 वर्षे

3) लक्ष्मणराव जोशी नागपूर वय 81 वर्षे

4)मनोहर प्रभाकर अंधारे नागपूर वय 85 वर्षे

5)गोपाळराव साक्रीकर पुणे वय 77 वर्षे

6) दिगंबरराव घुमरे नागपूर वय 92 वर्षे

7)अनंत दीक्षित पुणे वय 66

8) अरविंद वैद्य, औरंगाबाद वय 76 वर्षे

9) विजय वैद्य मुंबई 76 वर्षे

10)विद्याविलास पाठक पुणे 69 वर्षे

11) अरविंद श्रीधर कोकजे रत्नागिरी वय 72

12) सदाशिव केशव कुलकर्णी पुणे वय 83 वर्षे

13)मधुकरराव बुवा नाशिक नाशिक वय 68

14) सुरेश शहा सोलापूर वय 81 वर्षे

15)महादेव मनोहर कुलकर्णी ,नगर वय 76 वर्षे

16) विनोद देशमुख, नागपूर वय 66 वर्षे

17)हॅरी डेव्हीड , 78 वर्षे पुणे 

18)वसंत केसरकर सिंधुदुर्ग वय 74 वर्षे

19)नरहरी भागवत नाशिक वय 74 वर्षे

20) किसन बळवंत जाधव 80 वर्षे

21) नागेश केसरी , मुंबई वय 69 वर्षे

22)विनायक बेटावरकर 80 वर्षे

23) भाऊ सिनकर अलिबाग 85 वर्षे

कुत्र्याला मारहाण करून छळ केल्याने एकाला अटक

0

पुणे- : कुत्र्याच्या गळ्यात दोरी बांधून छळ केला. तसेच मारहाण करून कुत्र्याचा छळ केला. त्यावेळी एका तरुणाने कुत्र्याला सोडवून त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. कासारवाडी येथे मंगळवारी (दि. ३०) हा प्रकार घडला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करून जामीनावर मुक्तता करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलसिंग रामचंद्र घायगुळे (वय ५०, रा. कासारवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा गंगाराम जमादार (वय २०, रा. कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. जखमी कुत्र्यावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
फिर्यादी जमादार मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या घराच्या परिसरात वावरणाऱ्या  एका कुत्र्याच्या गळ्यात दोरी बांधून आरोपी घायगुळे त्याला ओढत होता. तसेच बांबूने मारत होता. त्यामुळे कुत्रा जखमी झाला. फिर्यादी जमादार यांनी त्या कुत्र्याला आरोपीच्या ताब्यातून सोडविले. संतोष मलिनमनी, आकाश जाधव, रोहित डिसुझा यांच्या मदतीने जखमी कुत्र्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, प्राण्यांचा छळ होत असल्याचे या घटनेवरून दिसून येत असल्याचे सांगत प्राणीमित्रांनी आरोपीला अटक करण्याची मागणी केली. त्यासाठी काही प्राणीमित्र बुधवारी (दि. ३१) दुपारपासून भोसरी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी आरोपी बलसिंग घायगुळे याला बुधवारी अटक केली. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली.

गोव्यातही नोकऱ्यांत भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण

0

मुंबई- -आंध्र प्रदेशच्या पावलावर पाऊल ठेवत गोव्यातील भाजप सरकारनेही खासगी नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देण्याचे निश्चित केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत याबाबत माहिती दिली. गोवा सरकारकडून सवलती घेणाऱ्या सर्व उद्योगांना नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देणं बंधनकारक राहील, असेही सावंत यांनी यावेळी नमूद केले.

राज्यातील सर्व कंपन्या व कारखान्यांनी सरकारकडे नोंदणी करावी तसेच कर्मचाऱ्यांचा तपशील सादर करावा, असे नमूद करतानाच पुढील सहा महिन्यांत राज्याच्या कामगार व रोजगार धोरणाला अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

भूमिपुत्रांसाठी आरक्षित ठेवण्यात येणाऱ्या ८० टक्के नोकऱ्यांपैकी ६० टक्के नोकऱ्या कायमस्वरूपी असाव्यात, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी नमूद केले आहे.

काँग्रेस आमदार अॅलिक्सो लोरेन्को यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना खासगी नोकऱ्यांत ८० टक्के आरक्षणाचा मानस मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केला. सरकारचं नवं धोरण अमलात येताच भूमिपुत्रांना ८० टक्के नोकऱ्या देणे उद्योगांना बंधनकारक होईल, असे सावंत म्हणाले.