Home Blog Page 2874

पूरग्रस्त भागात 325 वैद्यकीय पथके

0

मुंबई, दि. 8 : राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी विभागामार्फत वैद्यकीय पथकांची संख्या वाढविण्यात आली असून सुमारे 325 वैद्यकीय पथके ठिकठिकाणी कार्यरत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

पूर परिस्थितीनंतर त्या भागात उद्‌भवणाऱ्या साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आवाहन करण्यात येत आहे. विभागामार्फत पूरग्रस्त भागात वैद्यकीय पथक पाठविण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी असून मोठ्या लोकसंख्येच्या गावात पथकामध्ये दोन महिला कर्मचारी व दोन पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. छोट्या गावांसाठी पथकामध्ये एक महिला व एक पुरुष कर्मचारी ठेवण्यात आला आहे.

औषधोपचाराबरोबरच नागरिकांना निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा होण्याकरिता ब्लीचिंग पावडर, क्लोरीन टॅब्लेट्‌स, लिक्विड क्लोरीनचा वापर करण्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना द्याव्यात.

शहरी व ग्रामीण भागातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे विस्थापित झालेल्या लोकांसाठी शाळा, मंगल कार्यालये, मंदिर आदी ठिकाणी वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी दररोज करावी. गावात सार्वजनिक स्वच्छता करणे, तुंबलेली गटारे साफ करणे, केर कचऱ्याची विल्हेवाट लावणे आदी बाबी ग्राम पंचायतीच्या सहकार्याने करुन घ्यावी, अशी सूचना आरोग्य विभागाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पाणी ओसरलेल्या गावात जंतूनाशकाची धुरळणी करावी. जेणेकरुन डास व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढणार नाही. पूर परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे काही गावात शक्य नसल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने टँकरच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण केलेल्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा.

घरोघरी सर्वेक्षण करुन जलजन्य आजार अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ,विषमज्वर तापाचे रुग्ण याबाबतचे सर्वेक्षण करावे. चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहिल याची दक्षता घेतानाच सर्व ठिकाणी औषधांचा साठा उपलब्ध राहील याबाबत नियोजन करावे. ब्लीचिंग पावडर, क्लोरीन टॅब्लेट्‌स, लिक्विड क्लोरीन व अत्यावश्यक औषधांची खरेदी जिल्हा परिषदेच्या निधीतून करण्यात यावी.

पुराच्या पाण्यातून चालत गेलेल्या नागरिकांना ताप आल्यास त्यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे किंवा गावात कार्यरत असलेल्या वैद्यकीय पथकाकडून आवश्यक उपचार करुन घ्यावेत.दोन महिन्याच्या आतील बालकांना अतिसाराची लागण झाल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करावे. अशा सूचना देखील आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

पूरग्रस्त भागात जास्तीच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासल्यास पूर परिस्थिती नसलेल्या विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात येईल, असेही आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

ब्रह्मनाळ दुर्घटना अत्यंत दुखःद -राज्यपाल

0

मुंबई, दि. 8 : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेबद्दल राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातले असताना ब्रह्मनाळ गावात पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत अनेक निरपराध लोकांना प्राण गमवावे लागले, हे समजून अतिशय वाईट वाटले. सांगलीसह सातारा व कोल्हापूर येथे पूरपरिस्थितीमुळे आणखी काही लोकांना प्राण गमवावे लागले हे दु:खद आहे. सर्व मृत व्यक्तींच्या आप्तेष्टांना मी आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

३७० कलमामुळे काश्मीरचा काय फायदा झाला? – नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली-जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी कलम ३७० रद्द करणे का आवश्यक होते ते सांगताना जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन नव्या केंद्रशासित प्रदेशाच्या विकासाची रुपरेखा मांडली. यावेळी त्यांनी पाकिस्तानकडून जी आक्रमक भाषा सुरु आहे किंवा त्यांनी जे काही निर्णय घेतले आहेत त्यावर काहीही भाष्य केले नाही.

ते म्हणाले की, एका देश म्हणून, एक कुटुंब म्हणून, तुम्ही-आम्ही एक ऐतिहासिक निर्णय घेतला. एक अशी व्यवस्था ज्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील नागरिक त्यांच्या अधिकारांपासून वंचित राहीले होते. यामुळे त्यांचा विकास थांबला होता, अशी व्यवस्था आम्ही मोडून काढली आहे. “जे स्वप्न पटेलांचे होते, आंबेडकरांचे होते, श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलजी आणि कोट्यावधी देशवासियांचे होते, ते स्वप्न आता पूर्ण झाले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. देशातील सर्व नागरिकांना समान हक्क मिळायला हवेत. मी काश्मीर, लडाख आणि देशातील प्रत्येक नागरिकांना मनातून शुभेच्छा देतो.

ते पुढे म्हणाले- “काही गोष्टी वेळेनुसार इतक्या मिसळतात की, त्या आपल्या मनात घर करुन बसतात. कलम 370 बद्दल असेच झाले होते. त्याने जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये जे नुकसान होत होते, त्याची चर्चाच होत नव्हती. विशेष म्हणजे कलम 370 ने काश्मीरच्या लोकांना काय फायदा झाला, असे विचारल्यावर कोणालाही याचे उत्तर देता येत नव्हते.”

“370 आणि 35ए ने जम्मू-काश्मीरला फुटीरदावाद, दहशदवाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराशिवाय काहीच दिले नाही. या दोन्ही कलमांचा पाकिस्तानने देशाविरुद्ध लोकांच्या भावना भडकवण्यसाठी उपयोग केला. यामुळे मागील 3 दशकात 42 हजार लोक मारले गेले. जम्मू-काश्मीर आणि लडाखचा विकास इतर राज्यांप्रमाणे झालाच नाही. आता तेथील लोकांचे वर्तमान तर सुधरेलच शिवाय भविष्यही उज्वल असेल.”

“या प्रक्रियेतून जाऊन जो कायदा बनतो, त्याने संपूर्ण देशातील लोकांचे चांगले होते. अशी कल्पनाच करवत नाही की, एखादा कायदा बनवला आणि तो एखाद्या राज्यात लागूच होत नाही. आतापर्यंतच्या सरकार सांगूच शकत नव्हत्या की, एखादा कायदा बनला आणि तो त्या राज्यात लागू होत आहे का नाही. जो कायदा संपूर्ण देशासाठी बनत होता, त्याच्या फायद्यापासून जम्मू-काश्मीरचे नागरिक वंचित राहायचे.”

“देशातील इतर राज्यातील मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे, पण जम्मू-काश्मीरची मुले वंचित आहेत. काय गुन्हा आहे त्या मुलांचा ? इतर राज्यातील मुलींना जे अधिकार मिळतात, ते काश्मीरच्या मुलींना मिळत नव्हते. दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध देशात कडक कायदा लागू आहे, पण तेथील नागरिकांसाठी नव्हता. अल्पसंख्यांकाच्या हक्कासाठी देशात मायनॉरिटी अॅक्ट लागू आहे, पण जम्मू-काश्मीरमध्ये नव्हता. मजुरांसाठी किमान वेतन कायदा  लागू आहे, पण तेथील मजूरांसाठी फक्त कागदावरच कायदा होता.”

“कलम 370 रद्द झाल्यानंतर त्याच्या नकारात्मक परिणामांमधून जम्मू-काश्मीर लवकरच बाहेर येईल. नवीन सरकारमध्ये तेथील कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा मिळतील. हेल्थ स्कीम, रेंट अलाउंस, मुलांसाठी शिक्षणासाठी अलाउंसही मिळेल. हे आतापर्यंत काश्मीरच्या कर्मचाऱ्यांना मिळत नव्हता. आता या सुविधा तत्काळ लागून करुन पोलिस, आणि इतर कर्मचारी तसेच, त्यांच्या कुटुंबीयांना मिळतील. लवकरच जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील रिक्त जागांना भरण्याचे काम केले जाईल. स्थानीक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळलीत. पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर कंपन्यांमध्येही रोजगार उपलब्ध होतील.”

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/376820266570404/

सांगलीच्या ब्राम्हनाळमध्ये 30 जणांना घेऊन जाणारी बोट पुराच्या पाण्यात उलटली; 9 जणांचा मृत्यू, 15 जणांना वाचवण्यात यश

0

सांगली – सांगलीच्या ब्राम्हनाळ येथे पुरस्थितीत सुरु असलेल्या बचाव कार्यादरम्यान 25 ते 30 जणांना घेऊन जाणारी बोट उलटली. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून इतर बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. ब्रह्मनाळ (तालुका पलूस जि. सांगली) येथे ग्रामपंचायतची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचे मृतदेह हाती आले. तर 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. सोबतच, आणखी 3 जणांना बुड़ाल्याची शक्यता असून 3 जणांचा काहीच पत्ता नाही. NDRF TEAM घटनास्थळी पोहोचली असून शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे.

या बोटमध्ये एकूण 30 लोक होते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, बचावकार्य सुरू असताना जवळपास 30 जणांना एक बोट घेऊन जात होती. याचवेळी बोटच्या इंजिनमध्ये झाडाची तुटलेली फांदी अडकली. याच फांदीमुळे इंजिनमध्ये बिघाड आला आणि बोट बुडाली. या घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. त्यांनी कोल्हापूरच्या दौऱ्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

राष्ट्रवादी ची शिव स्वराज्य यात्रा थांबणार -पूरग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ची शरद पवारांची मागणी

0

पुणे-पुरामुळे लोकांचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के कर्ज माफी दिली पाहिजे अशी मागणी करत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दुष्काळी भागासाठी असलेली राष्ट्रवादी ची शिवस्वराज्य यात्रा आता स्थगित करून पूरग्रस्तांना कशी मदत करता येईल याकडे पाहिले पाहिजे असे येथे सांगितले .

पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात महापूर आला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर मदतकार्य करत आहे. दरम्यान, या परिस्थितीवर बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहर अध्यक्ष चेतन तुपे पाटील, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे तसेच अंकुश काकडे उपस्थित होते.

पवार म्हणाले, सांगली, कोल्हापूर भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा भाग ऊस उत्पादनातील अग्रेसर भाग असून इथल्या पुरामुळे ऊसाच्या एकंदर उंचीपेक्षा अधिक भागापर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे. त्यामुळे ऊस पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर द्राक्षे आणि डाळींब सारख्या फळ बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. जमिनीवरची माहितीही मोठ्या प्रामाणावर वाहून गेली आहे. तसेच घरे, रस्ते इतर पायाभूत सुविधा आणि जनावरेही वाहून गेली आहेत. या जिल्ह्यांमधील अशी परिस्थिती मी आजवर कधीही पाहिली नव्हती. यानंतर आता पाणी ओसरल्यानंतरच नुकसानीचा खरा अंदाज येईल. यावेळी पुराची व्याप्ती आणि पूर भागातील शेतीचे झालेले नुकसान पाहता, पाणी ओसरल्यानंतर शासनाने तातडीने येथील नुकसानीचे मोजमाप आणि पंचनामे करावेत. त्यानंतर नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच केंद्र आणि राज्य सरकारने इथल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्यावी, अशी मागणी यावेळी पवार यांनी केली.

राष्ट्रवादीच्या संघटनांकडून पूरग्रस्तांना मदत पुरवणार – पवार

पवारांनी यावेळी राज्य शासनावरही टीका केली. आजवर अनेक संकटे आली तेव्हा शासकीय यंत्रणांनी तत्परतेने कामं केली. मात्र, यंदा मदत आणि पुनर्वसन कार्यात शासकीय यंत्रणा कमी पडल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, तरीही बिकट प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता राज्यातील सार्वजनिक संघटना, तरुणांच्या संघटना आणि सेवाभावी संघटनांनी सर्व हेवेदावे बाजूला ठेऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनेही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नियोजन केल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. यामध्ये पक्षाच्या विधानसभा, विधानपरिषद आणि संसद सदस्यांच्या एका महिन्याचे वेतन देण्याची घोषणा त्यांनी केली. या वेतनाचा ५० लाखांचा धनादेश सोमवारपर्यंत संबंधीत यंत्रणेपर्यंत पोहोचवला जाईल असेही त्यांनी सांगितले. याशिवाय राष्ट्रवादीची आरोग्य विषयक काम करणारी संघटना तसेच डॉक्टर सेलकडून विविध प्रकारच्या तातडीच्या औषधांची आणि डॉक्टरांची पूर्तता करण्यात येणार असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर-सांगलीत तर महापूर आला आहे. या महापुरामुळे हजारो नागरिकांना स्थलांतरीत होण्याची वेळ आलीये. नेव्ही, लष्कर आणि एनडीआरएफच्या टीम युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवले. ते म्हणाले की, शासकिय यंत्रणा सपशेल फेल ठरली आहे. यावेळी त्यांनी यापूर्वीच्या नैसर्गिक आपत्तीवेळी राब्लेलेया यंत्रणांची आठवण करून दिली .

ही परिस्थिती का उद्भवली आणि शासन तोकडे का पडले, याच्या खोलात जावे लागेल. कर्नाटक आणि महाराष्ट्रात जुना वाद आहे. परंतु कर्नाटक सरकारने वाद न करता मानवता म्हणून मदतीची भूमिका घ्यावी. राज्य सरकार जरी कमी पडत असले तरी केंद्राने राज्याच्या पाठीशी उभे राहावे. केंद्र सरकारच्या सर्व संघटना येथे पाठवण्याची गरज आहे. राजकीय टीकाटिप्पणी न करता लोकांना मदत कशी करता येईल, ही आमची भूमिका आहे, असेही पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.

राष्ट्रवादी पक्षाकडून वैद्यकीय मदत
राष्ट्रवादीचा डॉक्टर सेल अतिशय प्रभावी आहे. यात डॉक्टरांना संघटित करण्याचे काम केले आहे. याबाबत जशी गरज पडेल तसे हे डॉक्टर जाऊन वैद्यकीय सेवा देणार आहेत. वैद्यकीय सेवा आणि त्या अनुषंगाने औषधी देण्याची सेवा राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात येत आहे. अशाच प्रकारे इतरांनी पुढाकार घेऊन मदतकार्यात यावं, असंही पवार म्हणाले.

राष्ट्रवादीतर्फे 50 लाखांचा मदत निधी
पूरग्रस्त भागात मदतीचे आवाहन करताना पवार म्हणाले की, आता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सार्वजनिक संस्था, सेवाभावी संस्था, तरुणांच्या संघटनांनी या सर्वांनी पुढाकार घेऊन मदतकार्याला हातभार लावण्यासाठी पुढाकार घ्यावा. पाणी ओसरताच विदारक परिस्थिती खऱ्या अर्थाने समोर येईल. राष्ट्रवादीचे जेवढेही लोकप्रतिनिधी आहेत त्या सर्वांनी आपले एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा जवळपास 50 लाखांचा निधी आम्ही देणार आहोत.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
>पाणी पातळी वाढल्यामुळे उसाचे नुकसान
>पावसामुळे दाळिंब आणि द्राक्षाचे ही नुकसान
>लहान व्यावसायिकांचे नुकसान झाल्यामुळे त्यांच्याव आर्थिक संकट कोसळले
>दुधाची आवक 35 ते 40 टक्के कमी झाली
>पुरामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचे, शेतीचे, घरांचे आणि जनावरांचे मोठे नुकसान
>केंद्र आणि राज्य सरकारने पुर सदृष्य भागात 100 टक्के कर्जमाफी करावी
>राष्ट्रवादी पक्षाकडून वैद्यकीय मदत
>राष्ट्रवादीकडून 50 लाखांची मदत

पुण्यात पावसाची उघडीप -धरणातील विसर्ग ४५ हजारांवरून ९४१६ क्युसेस वर ..रेड अलर्ट चे हसे …

0
पुणे- पुणे सांगली, सातारा ,कोल्हापूर येथे आणि नाशिक मध्ये पावसाने थैमान घातले असताना आज पुण्यात पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली. काल काहीजणांनी आज पावसाबाबत रेड अलर्ट जारी केला होता त्याचा चक्क फज्जा उडाला . काल रात्री पासून खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत होता आज सकाळी ९ वाजता देखील तो वाढवून ४५ हजार क्युसेस वर नेण्यात आला . पण पावसाने उघडीप दिल्याने दुपारी २ वाजता  तो कमी करून ३९ हजार क्युसेस वर नेण्यात आला आणि हळू हळू कमी होत तो आज रात्री साडेआठ वाजता १८ हजार ४९१ तर रात्री १० वाजता ९४१६ एवढा विसर्ग करण्यात येत होता ..तस तसे नदीतील  पाणीपातळी  रात्री कमी कमी होत गेली .

कोल्हापूर, सांगली आणि सातारा पूरस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा 

0

मुंबई, दि. 8 : राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्त नागरिकांना राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत दिली जात असून या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून तत्परतेने मदत केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आश्वस्त केले आहे. केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहितीही गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

राज्यातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी यावेळी पूरस्थितीचे हवाई सर्वेक्षण आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या ठिकाणांना भेट दिली. तसेच पूरग्रस्तांच्या निवारा शिबिरामध्ये जाऊन त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते. पूरस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजनांना गती देण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी संबंधित स्थानिक यंत्रणांना निर्देश दिले.

कर्नाटकातील आलमट्टी धरणाच्या फुगवट्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये वाढलेली पुराच्या पाण्याची पातळी कमी करण्यासाठी या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची विनंती श्री. फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी केली आहे. त्यानुसार आलमट्टी धरणातून पाच लाख क्युसेक्स पाणी सोडण्याचे श्री. येडीयुरप्पा यांनी मान्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ),भारतीय हवाई दल, नौदल, कोस्टल गार्ड आदी संस्थांचे चमू कार्यरत आहेत. कोल्हापूर परिसरात एकूण 22 मदत पथके कार्यरत असून त्यामध्ये एनडीआरफ-5, नेव्ही-14, कोस्टगार्ड-1, आर्मी कॉलम -1,एसडीआरएफ-1 आदींचा समावेश आहे. तसेच सांगलीमध्ये एकूण 11 पथके कार्यरत असून त्यामध्ये एनडीआरएफ-8, कोस्टगार्ड-2 आणि आर्मी-1 आदींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मदतकार्यासाठी आणखी पथके मागविण्यात आली असून पाच पथके पुण्यापर्यंत पोहोचली असून कोल्हापूर व सांगलीकडे येण्यास प्रत्येकी दोन पथके मार्गस्थ झाली आहेत. तसेच त्यातील एक पथक पुण्यात कार्यरत आहे.  कोस्टगार्डची आणखी दोन पथके कोल्हापूरमध्ये आणि नौदलाची पाच व एसडीआरएफची दोन पथके सांगलीमध्ये पोहोचत आहेत. गतिमान बचाव कार्यासाठी आणखी पाच एनडीआरएफ टीम मागविण्यात आल्या असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष रेल्वे गाडी

कोल्हापूर आणि सांगली परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून मिरज आणि कराड दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले आहे

पुणे विभागात अतिवृष्टीने २७ मृत्यू ,२०४ रस्ते बंद -पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली तील सर्व धरणे फुल्ल…ओसंडून वाहताहेत

0

कोल्हापूर व सांगली जिल्हयात
मदत व बचाव कार्य युध्द पातळीवर
डॉ. दिपक म्हैसेकर

पुणे दि. 8ऑगस्ट२०१९ -: पुणे विभागात 779 मि.मि. म्हणजे 142 टक्के पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस सांगली जिल्हयात 225 टक्के झाला आहे. 58 तालुक्यांपैकी 28 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्हयातील पूर परिस्थिती गंभीर असून प्रशासनातर्फे मदत व बचाव कार्य युध्द पातळीवर सुरु आहे. पलुस तालुक्यातील बामनाळ येथील बोट दुर्घटना ही ग्रामपंचायतीच्या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा आधिक लोक बसल्यामुळे घडली. प्रशासनातर्फे पुरवण्यिात येणारी बोट वापरली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदे पूर्वी डॉ. म्हैसेकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांना पुणे विभागातील पूर परिस्थितीबाबत माहिती देवून केल्या जाणाऱ्या उपाय योजनांबाबत सांगितले.
डॉ.म्हैसेकर अधिक माहिती देताना म्हणाले, आज कोल्हापूर जिल्हयातील 5 पाच तालुक्यांत तर सांगली 2 असे एकूण 7 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सांगली जिल्हयातील 80 हजार 319 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. त्यासाठी 94 तात्पुरती निवारा केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तर कोल्हापूर जिल्हयातील 154 निवारा केंद्रात 97 हजार 102 नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पूरपरिस्थिती व उपाय योजना – (दुपारी 4.00 वाजेपर्यंत)
पुणे विभागात आज अखेर सरासरी 779 मि.मी, 142 टक्केर पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस सांगली जिल्ह्यात 225 टक्के झाला आहे. सातारा जिल्ह्यात 180 टक्के ,पुणे जिल्ह्यात 168 टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात 123 टक्के तर तसेच सोलापूर जिल्ह्यात 78 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पुणे विभागात 58 पैकी 30 तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे.

28 तालुक्यामध्ये अतिवृष्टी-
1. सांगली :- मिरज, वाळवा, शिराळा, पलूस या 4 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे .
2. कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हयातील सर्व 12 तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे.
3. सातारा :- सातारा, कराड, पाटण, वाई या 4 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे .
4. पुणे :- मावळ ,मुळशी, भोर ,वेल्हा, जुन्नर ,आंबेगाव, शिरुर, खेड या 8 तालुक्यात
अतिवृष्टी झाली आहे .
कोल्हापूर जिल्हयातील गडहिंग्लंज, भूदरगड,आजरा, कागल व चंदगड या 5 तालुक्यामध्ये तसेच सातारा जिल्हयातील 2 तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे.

धरणातील पाणीसाठा

पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्हयातील सर्व धरणे 100 % भरली आहेत.

 स्थानांतरांची माहिती- पुणे विभागातील नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असुन नदीकाठच्या गावातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.
स्थानांतरित केलेली कुटुंब

अ.क्र. -जिल्हा स्थानांतरीत कुटूंबांची संख्या -स्थानांतरीत व्यक्तींची संख्या -स्थानांतरीत व्यक्तींना राहण्यासाठी तात्पुरता निवारा केंद्र संख्या

1 सांगली 15149- 80319 -94
2 कोल्हापूर 20933 -97102- 154
3 सातारा 1638- 7085- 35
4 पुणे 3343- 13336- 17
5 सोलापूर 1878 -7749 -30
एकूण 42941- 205591- 330

पुरामुळे मयत व्यक्ती

जिल्हा – पुरामुळे मयत व्यक्तींची संख्या
सांगली 11
कोल्हापूर 02
सातारा 07
पुणे 06
सोलापूर 01
एकूण 27

जिल्हा सांगली
बाम्हनाळ, ता. पलूस, जि. सांगली येथील ब्राम्हनाळ येथून खटावच्या दिशेने जाताना बोट दुर्घटना घडली सदरची बोटगावाची असून त्यामध्ये 30 ते 35 महिला, पुरूष व लहान मुले होती. 7 महिला 1 पुरूष व 1 लहान मूल मृत पावले आहेत. अजूनही 4 ते 5 व्यक्ती बेपत्ता आहेत.
अ.क्र- मयत व्यक्तीचे नाव
1 पप्पू ताई भाऊसाहेब पाटील
2 राजमती जयपाल चौगुले
3 नंदा तानाजी गडदे
4 कल्पना रवीद्र कारंडे
5 कस्तूरी बाळासाहेब वडर
6 बाबासाहेब अप्पासाहेब पाटील वडर
7 लक्ष्मी जयपाल वडर
8 मनीषा दिपक पाटील

मदत व बचाव कार्य-
सांगली- जिल्हयामध्ये
अ. एनडीआरएफ ची 8 पथके (190 जवान व 26 बोटी) पोहोंचली आहेत. एनडीआरएफची आणखी 3 पथके पुणे येथून व एसडीआरएफ ची 2 पथके धुळे येथून रवाना होत आहेत. तसेच मुंबई येथून येणा-या एनडीआरएफ ची 3 पथक सांगलीला रवाना होत आहेत.
ब. टेरिटोरिअल आर्मी :- 1 पथक (54 जवान व 2 बोट) कार्यरत आहेत.
क. नेव्ही :- सांगली जिल्हयामध्ये 11 पथके (54 जवान व 12 बोटी) पोहोचले आहे.
ड. जिल्हा प्रशासन :- 11 पथके (54 कर्मचारी व 12 बोटी) कार्यरत असून या व्यतिरिक्त सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून 20 बोटी सांगलीकरिता रवाना झाल्या आहेत.
इ. कोस्टगार्ड :-1 पथक, (20 जवान 1 बोट )
कोल्हापूर जिल्हयामध्ये अ. एनडीआरएफ ची 7 पथके (140 जवान व 20 बोटी ) पोहोचली आहेत.
ब. टेरिटोरिअल आर्मी:- कोल्हापूर मध्ये 4 पथके (106 जवान व 2 बोट) कार्यरत आहेत.
क. नेव्ही :- कोल्हापूर जिल्हयामध्ये 14 पथके (70 जवान व 14 बोटी) पोहोचले आहे.
ड. जिल्हा प्रशासन :- 21 पथके (127 कर्मचारी व 23 बोटी)
इ. एसडीआरएफ :-1 पथक (28 जवान व 2 बोटी ) कार्यरत आहेत.
ई. एनजीओ :- 1 पथक (10 जवान व 2 बोटी) कार्यरत आहेत.
सातारा जिल्हयामध्ये एनडीआरएफ चे 1 पथक कार्यरत होते ते आता सांगलीकडे पाठविण्यात येत आहे.
अशा प्रकारे कोल्हापूर जिल्हयामध्ये एकुण 48 पथक (481 जवान /कर्मचारी व 63 बोटी), सांगली जिल्हयामध्ये एकुण 21 पथक (318 जवान /कर्मचारी व 41 बोटी ) सातारा जिल्हयामध्ये एकुण 8 पथक (46 जवान /कर्मचारी व 10 बोटी ) सदयस्थितीत कार्यरत आहेत.
पुरग्रस्तांना मदत-
1.विविध संस्थांनी 1.रोटरी क्लब मुंबई 2. क्रेडाई पुणे 3. राजेंद्र मराठे अधिमित्र परिवार 4. श्री संचिद्र प्रतापसिंह अध्यक्ष वखार महामंडळ, महाराष्ट्र 5. लायन्स क्लब पुणे 6. विठठल पेट्रोलियम 7. सुंदर राठी इत्यादी मार्फत 63500 बिस्कीट पाकीटे पुरग्रस्तांसाठी जमा केली असून 8500 पाकीटे सांगलीसाठी पाठविण्यात आली आहेत.
2.भारतीय जनसंविधान मंच कोल्हापूर कॉलींग या संस्थेमार्फत 4 हजार बिस्किट पाकिटांचा कोल्हापूरमध्ये पुरवठा केला असून कोल्हापूर शहरामधील कॅम्पमध्ये या संस्थेमार्फत 2 वेळेचे जेवण दिले जात आहे.
3. केाल्हापूर जिल्हयामध्ये गोकुळ डेअरीमार्फत 24 तास मोफत दुधपुरवठा करण्यात येत आहे. येथे कोणीही येवून दुध घेऊन जाऊ शकतात.
4. सांगली व कोल्हापूर जिल्हयातील सर्व हॉस्पीटल हे रुग्णांना मोफत सेवा पुरवित आहे.
महावितरण
पुणे विभागातील 11 हजार 61 ट्रान्सफार्मर बाधित असून त्यामुळे एकुण 3 लाख 96 हजार 737 वीज ग्राहक बाधित झाले आहेत. तथापी पूर्वी बंद असल्यापैकी एकुण 5 हजार 880 ग्राहकांचा बंद केलेला वीज पुरवठा पुर्ववत सुरु (Restore) करण्यात आला आहे.तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव वीज पुरवठा खंडीत केलेला असून पूरस्थिती कमी होताच तात्काळ सुरु करणेत येत असलेबाबत कोल्हापूर जिल्हयातील 1 लाख् 10 हजार व सांगली जिल्हयातील 99 हजार वीज ग्राहकांना महावितरण तर्फे एस.एम.एस. द्वारे कळविणेत आले असून कोल्हापूरसाठी हेल्पलाईन क्रमांक 7875769103 व सांगली जिल्हयासाठी 7875769449 कळविणेत आला आहे.
स्थानांतरित केलेल्या मदत कॅम्पमध्ये वीज पुरवठा देण्यासाठी विदयुत जनरेटरची सोय करणेत आली आहे.
वैदयकीय पथके – सांगली 72 कोल्हापूर 57 व सातारा 72 अशी एकुण 201 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.
अन्न धान्य वितरण – शासनाने अतिवृष्टी पुरामुळे बाधीत कुटूंबाना अन्नधान्य वितरीत करण्यासाठी काढलेल्या शासन निर्णयानुसार प्रति कुटूंब 10 किलो गहू व 10 किलो तांदुळ मोफत पुरविण्यात येणार असून त्याचे नियोजनही करणेत आले आहे. सदयस्थितीत मदत कॅम्पमधील स्थलांतरीत व्यक्तींना शिजवलेले अन्न पाणी व इतर जीवनावश्यक साहित्यही पोहोचविण्यात येत आहे.
बंद पुल व बंद रस्ते
अ.क्र. जिल्हा बंद रस्त्यांची संख्या
1 सांगली 47
2 कोल्हापूर 86
3 सातारा 12
4 पुणे 32
5 सोलापूर 27
एकुण 204
सांगली जिल्हयामध्ये प्रमुख राज्यमार्ग 6 प्रमुख जिल्हामार्ग 15 व इतर जिल्हा मार्ग 6 पाण्याखाली गेलेले आहेत.
कोल्हापूर जिल्हयामध्ये 29 राज्यमार्ग व 57 प्रमुख जिल्हामार्ग असे एकुण 86 रस्ते बंद आहेत.
सातारा जिल्हयामध्ये 8 पूल पाण्याखाली गेले असून पर्याची मार्ग उपलब्ध आहेत.

पुणे विभाग-
जिल्हा नियंत्रण कक्ष – दुरध्वनी क्रमांक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांचे नाव-भ्रमणध्वनी क्रमांक
1 सांगली 0233-2600500
श्री रफिक नदाफ 9096707339
2 कोल्हापूर 0231-2652953/2652950
श्री संकपाळ 9823324032
3 सातारा 02162-232175/232349
श्री देविदास ताम्हाणे 9657521122
4 पुणे 020-26123371
श्री विठठल बनोटे 8975232955
5 सोलापूर 0217-2731012
श्री बडे 9665304124
6 विभागीय नियंत्रण कक्ष पुणे 020-26360534 —
0000000

भाजपची संघटनात्मक बैठक संपन्न

0

पुणे- शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आणि शक्तिकेंद्र प्रमुखांची बैठक आज डी. पी. रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती.
शक्तिकेंद्र प्रमुख, त्यांच्या कामाची पद्धत, बैठक, बूथ समितीचे कामकाज, योजना मतदारांपर्यंत पोहोचविणे, बूथप्रमुखांची २३ कामे, शक्तिकेंद्र प्रमुखांची ११ कामे, सध्या सुरू असलेले कार्यक‘म, आगामी कार्यक‘म, मु‘यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांची महाजनादेश यात्रेची तयारी आदींचा आढावा प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणीक यांनी घेतला.
पुणे शहर प्रभारी व सहकार मंत्री सुभाष देशमुख, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार गिरीश बापट, आमदार दिलीप कांबळे, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, विजय काळे, योगेश टिळेकर, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेता श्रीनाथ भिमाले, पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उज्ज्वल केसकर, दीपक मिसाळ, गणेश घोष, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे, महिला अध्यक्षा शशिकला मेंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. गोगावले यांनी प्रास्ताविक आणि मोहोळ यांनी सूत्रसंचालन केले.

क्रांतिकारकांचे योगदान पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हावे-प्रवीणकुमार श्रीवास्तव

0
पुणे : “स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचे योगदान मोठे आहे. पुण्यातून अनेक क्रांतिकारक घडले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकरांचा इतिहास नव्या पिढीला सांगितला पाहिजे. त्यासाठी क्रांतिकारकांचे योगदान पाठ्यपुस्तकांत समाविष्ट करायला हवे,” असे प्रतिपादन लखनौ विद्यापीठातील इतिहास विभागाचे माजी प्रमुख प्रा. प्रवीणकुमार श्रीवास्तव यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर (मुंबई) आणि एच. व्ही. देसाई महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने थोर क्रांतीलेखक आणि क्रांतीकारकांचे चरित्रकार वि. श्री. जोशी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त एच. व्ही. देसाई महाविद्यालयात आयोजिलेल्या व्याख्यानात ‘अंदमानातील क्रांतिकारकांचे जीवन’ या विषयवार श्रीवास्तव बोलत होते. यावेळी वि. श्री. जोशी यांचे चिरंजीव चंद्रशेखर जोशी, एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य गिरीश पठाडे, उपप्राचार्य डॉ. गणेश राऊत, सावरकर स्मारकाच्या मंजिरी मराठे, नितीन शास्त्री, डॉ. गीतांजली घाटे, सुधाकर पाटील उपस्थित होते.
प्रवीणकुमार श्रीवास्तव म्हणाले, “पुण्यात क्रांतिकारकांवर कार्यक्रम आयोजिले जातात, हे इतिहासाच्या पुर्नजीवनासाठी उपयुक्त आहे. उत्तरप्रदेशमध्ये असे कार्यक्रम कमी होतात. स्वातंत्र्यासाठी झालेल्या आंदोलनांचा समावेश पाठ्यपुस्तकात व्हायला हवा. मीही अनेक क्रांतिकारकांच्या मुलाखती टेप रेकॉर्डवर घेतलेल्या आहेत. जवळपास पन्नास तासांचे रेकॉर्डिंग माझ्याकडे उपलब्ध आहे. बाहेर देशात व्याख्यानादरम्यान उल्लेख केल्यानंतर तेथील सरकारने ते डिजिटल स्वरूपात मांडण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, आपल्याकडील राज्यकर्त्यांना त्याचे महत्व अजूनही समजले नाही. इतिहासकारांना दुय्यम समजने योग्य नाही. सरकारने योग्य तो विचार करून क्रांतिकारकांच्या इतिहास संवर्धनासाठी तरतूद करावी.”

अरविंद गोखले म्हणाले, “अनेक क्रांतिकारकांनी विविध वेशभूषा करून इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडले होते. या सगळ्या चळवळीमध्ये अनेक क्रांतिकारकांना तुरुंगात जावे लागले आणि त्यांना चळवळीत सहभागी असलेल्यांची नाव सांगण्यासाठी प्रचंड छळवणूक केली गेली, परंतु एकाही क्रांतिकारकांनी दुसऱ्या क्रांतिकारकांची नावे सांगितली नाहीत, यावरून त्यांची देशावरील प्रेमाची आणि एकनिष्टपणाची जाणीव होते. लोकमान्य टिळक आणि चाफेकर बंधू यांचे स्वतंत्र्यातील योगदानही फार मोठे आहे, त्यामुळे यांचे योगदान आपल्याला विसरून चालणार नाही. टिळक अजुन काही दिवस आपल्यात राहिले असते, तर आजचे चित्र काही वेगळेच पाहायला मिळाले असते.”

मंजिरी मराठे म्हणाल्या, “क्रांतीकारकांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक करत आहे. स्मारकाच्या वतीने मोडी लिपीचे वर्ग, धनुर्विद्या, व्यायाम शाळा हे उपक्रम राबविले जातात. तसेच सावरकरांचे कार्य ‘हे मृत्युंजय’ या नाट्यातून विद्यार्थ्यांसाठी सादर केले जात आहे. आतापर्यंत पन्नास हजार विद्यार्थ्यांपर्यंत या नाट्यातून सावरकरांचे कार्य पोहचले आहे. वि. श्री. जोशी यांचे सर्व साहित्य स्मारकाकडे त्यांच्या वारसदारांनी सुपूर्त केले आहे. त्याचेही संग्रह, संवर्धन आणि प्रसार करण्याचे काम आम्ही करत आहोत.”

गिरीश पठाडे म्हणाले, “क्रांतीकारकांचे चरित्र लिहणे कष्टाचे आणि धैर्याचे काम आहे. जोशी यांनी अत्यंत अचूकपणे ही चरित्र साहित्य रूपात मांडले आहेत. कित्येक क्रांतिकारकांच्या बलिदानामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे, याची जाणीव प्रत्येकांने ठेवली पाहिजे.” डॉ. गणेश राऊत म्हणाले, “क्रांतीकारकांचे खरे चरित्रकार वि श्री जोशी होते, जोशी यांनी अनेक क्रांतीकारकांचे जीवनावर प्रकाश टाकत बऱ्याच गोष्टींची उकल केली आणि आपल्या चरित्र ग्रंथातून सर्वांसाठी ती खुले केले. जोशींचे साहित्य पुढील कित्येक पिढ्याना प्रेरणादायी ठरणार आहे.”

सूत्रसंचलन डॉ. नीता बोकील यांनी केले. आभार प्रतीक घोलप यांनी मानले.

मर्सिडीज-बेंझने सादर केली कार खरेदी करण्याची ‘विशबॉक्स’ ऑफर

पुणे ः भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार निर्माती कंपनी मर्सिडीज-बेंझ हिने आज ‘विशबॉक्स’ नावाची गाडी खरेदीसाठी ग्राहकांना आर्थिक सुविधा देणारी योजना सादर केली.   या योजनेत काही अद्वितीय व नावीन्यपूर्ण असे आर्थिक प्रस्ताव देऊन ग्राहकांना त्यांच्या आवडीची, स्वप्नातील मर्सिडीझ बेंझ कार खरेदी करण्यास कंपनीने प्रोत्साहन दिले आहे. या खास योजनेमुळे ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास वाढेल व त्याद्वारे बाजारपेठेत अधिकाधिक व्यवहार होतील, अशी मर्सिडीझ बेंझ कंपनीला आशा आहे.

‘की-टू-की चेंज’, ‘25-25-25-25’, ‘झीरो डाऊन पेमेंट’, ‘स्टार अ‍ॅजिलिटी+’ आणि ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा’ इत्यादी पाच प्राथमिक वैशिष्ट्यांसह विशबॉक्स ही योजना नाविन्यपूर्ण आणिग्राहकानुरूप अशी मोबिलिटी सोल्यूशन्स कंपनी देऊ करते.

मर्सिडिज-बेंझ इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी मार्टिन श्वेंक याप्रसंगी म्हणाले, ‘’मर्सिडीज बेंझमध्ये आम्ही भारतीय ग्राहकांची मानसिकता लक्षातघेतली आहे आणि त्यानुसारच त्यांना उत्कंठा वाटेल, अशा स्वरूपाची खास योजना आम्ही आणली आहे. वाहन उद्योगात प्रथमच सादर होणारी काही वैशिष्ट्ये या योजनेत आहेत. कार खरेदी करताना ग्राहकांना सोयीच्या होतील अशा सवलती या निमित्ताने देऊन त्यांचा विश्वास पुन्हा जिंकण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. या नावीन्यपूर्ण आणि स्मार्ट अशायोजनेतून आम्ही सध्या बाजारपेठेत समोर येणाऱ्या आव्हानांवर मात करीत आहोत आणि आमच्या ग्राहकांना कार खरेदीच्या त्यांच्या निर्णयांमध्ये मदत करीत आहोत. यायोजनेतील वैशिष्ट्यांचा ग्राहकांना निश्चितच चांगला उपयोग होईल आणि ही बाब बाजारपेठ विकसित होण्यास सहाय्यभूत ठरेल, असा आमचा विश्वास आहे.’’

‘’आमच्या मोटारींच्या सर्व श्रेणींमध्ये बीएस-6 हे पर्यावरणविषयक मापदंडाचे निकष लागू करण्याची आमची प्रक्रिया सुरू आहे. आजपर्यंत आम्ही ही प्रक्रिया 60 टक्के पूर्ण केलीअसून येत्या सप्टेंबर 2019 पर्यंत ती 80 टक्के इतकी पूर्ण होईल. एप्रिल 2020 पर्यंत आमचा संपूर्ण पोर्टफोलिओ बीएस-6 ने परिपूर्ण झालेला असेल, याची आम्ही ग्वाही देतो,’’ असेहीश्वेंक यांनी नमूद केले.

विशबॉक्स मोबिलिटी सोल्युशनसची प्रमुख वैशिष्ट्ये कीटूकी चेंज  ही एक अनोखी योजना आहे. यामध्ये ग्राहकाला चार वर्षांच्या कालावधीत दोन मर्सिडीज बेंझ कार बाळगता येतील. जीएलई आणि जीएलएस एसयूव्ही या मॉडेलवरही योजना लागू असेल. या योजनेनुसार ग्राहकाला कोणतीही अतिरिक्त किंमत न देता ते त्याची कार दोनदा अपग्रेड करण्याची संधी मिळेल आणि त्यातून त्याला अत्याधुनिकस्वरूपाची कार नेहमीच बाळगता येईल.

25-25-2525  या वैशिष्ट्यानुसार ग्राहकाला डाऊन पेमेंटची आणि लगेच भराव्या लागणाऱ्या ईएमआयची चिंता करावी न लागता, मर्सिडीज बेंझ कारची मालकी मिळवता येईल. यामध्ये ग्राहकाने गाडी घेतेवेळी तिच्या किमतीच्या 25 टक्के इतकी रक्कम द्यायची आहे व उर्वरित रक्कम तीन वार्षिक हप्त्यांमध्ये फेडायची आहे.

झीरो डाऊन पेमेंट  मर्सिडीज बेंझ घेताना ग्राहकाला सुरुवातीस जी अडचण भासते ती असते डाऊन पेमेंटची. अनेकदा कारवरील मार्जिन, कर आणि विमा यांच्यासह हे डाऊन पेमेंटकारच्या किमतीच्या 40 टक्के इतके भरते. झीरो डाऊन पेमेंटमध्ये ग्राहकाला केवळ रोड टॅक्स भरावा लागतो आणि उर्वरित रक्कम कमी व्याजदराच्या साठ महिने मुदतीच्याकर्जामध्ये रूपांतरित होते.

स्टार एजिलिटी प्लस  ग्राहकांना भराव्या लागणाऱ्या ईएमआयमध्ये तब्बल 40 टक्क्यांची सवलत तसेच गाडीची देखभाल, वॉरंटी आणि खात्रीलायक बायबॅक या सुविधा असे यायोजनेचे वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ सी-क्लास हे मॉडेल तीन वर्षांच्या कर्ज सुविधेसह येणाऱ्या ग्राहकाला सर्वसाधारणपणे 1,35,000 रुपये इतका इएमआय (देखभालीच्यासुविधांशिवाय) लागू होतो. नव्या स्टार एजिलिटी प्लस या योजनेनुसार, हा इएमआय 82,000 इतकाच घेण्यात येतो. तसेच यामध्ये देखभालीचा खर्चही समाविष्ट आहे. यामुळेग्राहकांची दरमहा 53,000 रुपये # इतकी बचत होते.

कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स ः या योजनेतून ग्राहकाला दोन वर्षांचा विमा मोफत उपलब्ध होईल. यामध्ये मोटारीच्या उच्च ज्ञात मूल्यावर कमी इक्विटीची गरज लागून ग्राहकाचाकमी खर्चाचा फायदा होईल.

मर्सिडीज बेंझ ही कंपनी तिच्या ग्राहकांना उच्च दर्जाची उत्पादने व तशीच सेवा देण्याबाबत प्रसिद्ध आहे. जेडी पॉवर ग्राहक समाधान निर्देशांकामध्ये (सीएसआय) आणि लक्झरी कारक्षेत्रात विक्री समाधान निर्देशांकामध्ये मर्सिडीज बेंझला उच्च श्रेणी मिळालेली आहे. ग्राहककेंद्री योजना व उपक्रम आखून ग्राहकाला कार खरेदी करताना येणाऱ्या अडचणींचे प्रमाणकमी करून त्याच्या मर्सिडीज बेंझ खरेदीच्या स्वप्नाची पूर्तता करण्याचा कंपनीचा नेहमीच प्रयत्न होता व यापुढेही राहील.

‘तांबडी जोगेश्वरी’तर्फे ग्रामदेवता पुरस्कार-

0

डॉ. अनिल अवचट, मेधा कुलकर्णी, सूर्यकांत कुलकर्णी यांचा होणार सन्मान

पुणे : ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘ग्रामदेवता पुरस्कार’ यंदा जेष्ठ समाजसेवक आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख डॉ. अनिल अवचट, मेक माय ड्रीम फाउंडेशनच्या संस्थापिका मेधा कुलकर्णी आणि बुलडाण्यातील केरवाडीच्या सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्टचे संस्थापक सूर्यकांत कुलकर्णी यांना जाहिर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप ११,१११/- रुपये, मानचिन्ह असे आहे. येत्या शनिवारी (दि. १० ऑगस्ट) सायंकाळी ६.०० वाजता घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक भवन येथे या पुरस्काराचे वितरण होणार असून, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम व आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नगरसेवक हेमंत रासने, राजेश येनपुरे, योगेश समेळ यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने ‘ग्रामदेवता पुरस्कार’ देण्यास प्रारंभ झाला असून, यंदा त्याचे तिसरे वर्ष आहे. जोगेश्वरी मातेची प्रेरणा घेऊन आजच्या काळात काही चांगली समाजप्रबोधक, समाजबदलाची कार्ये केलेल्या तीन संस्थांचा अथवा व्यक्तिंचा सन्मान करावा, त्यांच्या विशेष गुणांचा समाजाला परिचय व्हावा, या उद्देशाने हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. या पुरस्करार्थीच्या कार्याची माहिती समाजाला व्हावी, तसेच त्यांच्या बहुमोल विचारातून समाजाला प्रेरणा मिळावी, यासाठी हा पुरस्कार महत्वाचा असल्याचे तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांनी दिली.

सकाळी खडकवासल्याचा विसर्ग आणखी वाढविला, मुठेत आता 45474 क्युसेस

0

पुणे- सर्व धरणा त 100 टक्के पाण्याची पातळी कायम राहत असताना , पुन्हा सुरुच राहिलेल्या जोरदार पावसामुळे काल रात्री 10 वाजता खड़कवासला धरणातून 41 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्यावर ही पावसाने अधुन मधून बरसने सुरुच ठेवल्याने धरणातील विसर्गात सकाळी 9 वाजता आणखी वाढ करावी लागली आहे आता  मुठा नदीच्या पात्रात 45474 क्युसेस एवढे पाणी सोडले जावू लागले आहे .

दरम्यान नागरिकांच्या माहिती साठी नोंद असू द्यावी अशी पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी राजकुमार क्षीरसागर यांनी पुढील माहिती दिली आहे पहा नेमकी ती काय आहे ,वाचा….

सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील बहुतेक छोटी -मोठी धरणे भरून त्यातील पाणी मोठ्या प्रमाणावर सोडले जात आहे. त्यासंबंधी काही महत्त्वपूर्ण तांत्रिक माहिती —

*धरण पाणी आवक जावक मापक बघा किती पाणी येते जाते माहिती आहे का ?*
.
*1) “TMC” टी.एम.सी. म्हणजे काय ?*
*2) “Cusec” क्युसेक म्हणजे काय ?*
*3) “Cumec” म्हणजे काय ?*….

*या प्रश्नांची उत्तरे* 👉

*ओसंडून वाहणा-या धरणांमधुन सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात आहे*.

म्हणजेच फार मोठ्या प्रमाणावर धरणांतील पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
.
*इतके TMC टी.एम.सी. पाणी धरणात जमा झाले, तितके CUSEC क्युसेक पाणी सोडले वगैरे आपण नेहेमीच वृत्तपत्रां मधून वाचत आहोत*.

*तसेच अनेक विविध टी.व्ही. चॅनेलस् द्वारे विविध धरणं ओव्हर फ्लो झाल्याबाबत बातम्यांचे द्वारे विविध दृश्ये पहातो व ऐकतो*.

तसेच विविध सोशल नेटवर्किंगस् द्वारे महत्वपूर्ण माहितीचे आदान – प्रदान करतो.

**परंतु विविध धरणांतील पाणीसाठ्या बाबत ज्या संज्ञा* *व मोजणीसाठी जी विविध आंतरराष्ट्रीय एकके परिमाणे वापरली जातात*

*त्यांचा नेमका अर्थ काय* …….???..?

*हे समजून घेता यावे या एकमेव उद्देशाने सदरची उपयुक्त माहिती सर्व संबंधितांना, हितचिंतक मित्र परिवारास सविनय सादर…..*

*आपणास फक्त “लिटर” संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवू या*… ✔

१) *01 tmc म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (०१ अब्ज) इतके घन फूट.*

*01 tmc = 28,316,846,592 litres*

२) *01 Cusec = 01 cubic feet per second = 28.317 litres per second.*

३) *01 Cumec = 01 cubic meters per second = 1000 litres per second.*

*उदाहरणार्थ*-

*पुण्याच्या “खडकवासला धरणाची” क्षमता १.९७ tmc आहे.म्हणजे त्यात १.९७x२८.३१७ अब्ज लिटर्स पाणी साठप क्षमता आहे*.
.
याच धरणातून सध्या ५०० क्युसेक पाणी नदीत सोडत आहेत.
म्हणजे ५००x२८.३१७ लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.
.
*महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी ०५ धरणे* 👇

*१)उजनी ११७.२७ tmc*

*२) कोयना १०५.२७*
*tmc*

३) *नाथसागर डॅम,(पैठण) जायकवाडी ७६.६५ tmc*

४) *पेंच तोतलाडोह डॅम ३५.९० tmc*

५) *पूर्णा येलदरी डॅम २८.५६ tmc*

*सोप्या भाषेत,एक टीएमसी म्हणजे 1000 फूट लांब,1000 फूट रुंद आणि 1000 फूट उंच टाकीमध्ये जेवढे पाणी साठवू तेवढे परिमाण* !

*1000 फूट उंच टाकी व्यवहारात असू शकत नाही.10 फूट उंच असू शकते. म्हणून अशी 10 फूट उंच आणि 10,000 फूट लांब व तितक्याच रुंद टाकीमध्येही *एक टीएमसी *पाणी मावते* !

*व्यावहारिक जगात नेहेमीच लागणारी काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची एकके परिमाणे आणि संज्ञा रुपांतरे माहिती साठी पुढीलप्रमाणे*; —✔
.
*१ हेक्टर = १०००० चौरस मीटर.*
*१ एकर = ४० गुंठे*
*१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौरस फुट*

*१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे*
*१ आर = १ गुंठा*
*१ हेक्टर = १०० आर*
*१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौरस फुट*
*१ चौरस मीटर =१०.७६ चौरस फुट*

 

खडकवासल्यातून ४१ हजार ६२४ क्युसेस एवढ्या पाण्याचा विसर्ग

0
पुणे-आज दिनांक 7 रोजी रात्री येथील टेमघर धरणातून २ हजार ५७६ क्युसेस तर वरसगाव धरणातून १६१३१ क्युसेस ,पानशेत धरणातून १२९३६ क्युसेस आणि खडकवासला धरणातून ४१ हजार ६२४ क्युसेस एवढा विसर्ग करण्यात आल्याने नदी काठच्या आणि शहरातील लोकांना दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत . 
दिनांक 7 रोजी सायंकाळ पर्यंत पानशेत आणि वरसगाव धरणातून अनुक्रमे 9892 व 13720 क्युसेस आणि टेमघर धरणातून 2943 क्युसेस असा विसर्ग नदी पात्रात सोडण्यातयेत होता  त्यामुळे खडकवासला धरणातून सुद्धा रात्री 8 वाजता विसर्ग 35574 क्युसेस पर्यंत वाढविण्यात आला तेव्हा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे व पानशेत आणि वरसगाव धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यातही  5000 क्युसेस ने वाढ केल्यामुळे खडकवासला धरणातून रात्री अकरा वाजता मुठा नदी पात्रात 41624 क्युसेस इतका विसर्ग सोडण्यात आला  आहे.
 कोणत्या धरणातून, कुठून किती विसर्ग केला जातोय त्याची रात्री ११ वाजता जलसंपदा -पाटबंधारे विभागाने दिलेली  माहिती पुढील प्रमाणे 
Gauge at 10.00PM. Dt.7 August 2019 Discharge Q in Cusec 
Temghar Q 2576
Varasgaon Q 16131
Panshet Q 12936
Khadakwasla Q 41624
Pawana Q/=10000
Kasarsai Q =450
Mulshi Q=12300
Kalmodi Q 628
Chaskaman Q 5510
Bhama Askhed Q 3229
Andra Q 4100
Vadiwale Q 2454
Gunjawani Q 3076
Bhatghar Q 14730
Nira Deoghar Q 19650
Veer Q 78325
Pimpalgaon Joge Q 0
Manikdoh Q 0
Yedgaon Q 4701
Vadaj Q 1508
Dimbhe Q 9415
Chilhewadi Q 4710
Ghod Q 13560
Visapur Q 0
Bundgarden Q=31770
Daund Q 77600
Nira Narsingpur Q 211005
Pandharpur Q 254620
Ujjani Q 100000

जवानांसाठी पत्ररुपी राखीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
पुणे-अमित बागुल मित्र परिवारातर्फे राखीपोर्णिमेनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येतात त्यामध्ये पोलीस बांधवांना रक्षण राखी, झाडांना वृक्षवल्ली राखी,एडसग्रस्त मुलींसोबत राखी,अंध बांधवांसोबत राखी हे उपक्रम गेल्या १० वर्षांपासून आयोजित करीत असून यंदाच्या वर्षी  बंध नात्याचे,वचन रक्षणाचे या संकल्पने अंतर्गत भारतीय लष्करातील जवान आपल्या प्राणाची तमा न बाळगता, आपली सुख दुःख, कोणतेही सण साजरे न करता भारतीय सीमांचे रक्षण करतात,सर्व भारतीयांना आपल्या कार्याचा सार्थ अभिमान आहे हा विश्वास देण्यासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिकांना या उपक्रमात सहभागी होऊन राख्या तयार करून व पत्ररूपी राखी आपल्या सैनिकांप्रती असलेल्या भावना व्यक्त करून आमचे कार्यालय ओटा नं १२ शिवदर्शन पुणे येथे दिनांक १०/०८/२०१९ पर्यंत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पुणे शहराच्या विविध भागातून नागरिक,पुणे महानगरपालिकेच्या शाळा,खासगी शाळा व संस्था सहभागी होत असून आज जैन इंटरनॅशनल सोशल नारी संघटन या संस्थेने १००० राख्या व पुणे महानगरपालिकेच्या कै . केशवराव जेधे प्राथमिक विद्यालय शाळा क्र १६ या शाळेने ४०० राख्या व पत्र जमा केले. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन  सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमचे कार्यालयात आपण तयार केलेल्या राख्या व पत्र  आणून द्याव्यात सर्व राख्या सीमेवर तैनात सैनिकांना पोहचवण्यात येणार आहेत.  यावेळी  मा.विजयाताई हरिहर,अमित बागुल,मुख्याध्यापिका ज्योती मानकर,शिक्षिका सौ देवकर,सागर आरोळे,महेश ढवळे ,अभिजित गायकवाड ,भाऊसाहेब दोडके, गोरख मरळ, इम्तियाझ तांबोळी,अभिषेक बागुल,विश्वास दिघे,इमाम हनुरे,राम रणपिसे  आदी उपस्थित होते.