Home Blog Page 2872

‘खेड शिवापुर ते कोल्हापूर’ ‘टोल’ वसुली १५ दिवस बंद करा… – संभाजी ब्रिगेड

0

पुणे-पुणे सातारा सांगली कोल्हापूर महामार्गावर किमान धरा दिवस ‘टोल’ वसुली बंद करा अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी केली आहे .

ते म्हणाले,’सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पुरपरिस्थिती अत्यंत भयानक आहे. या भागातील लोकांना खायला अन्न नाही, राहिला घर नाही आणि घालायला कपडे सुद्धा उपलब्ध नाहीत. महाराष्ट्रभरातून मदतीसाठी लोक पुढे येत आहेत. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड आणि इतर संस्था, संघटना, गणेश मंडळ, सामाजिक संस्था, मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. बरेच कार्यकर्ते मंडळी या पूरग्रस्त लोकांसाठी मिळेल त्या गाड्या घेऊन… सातारा सांगलीकडे येत आहेत. मात्र पुणे – सातारा सांगली – कोल्हापूर या मार्गावर खेड-शिवापूर पासून ‘टोल’ सुरू होतात. महाराष्ट्राच्या इतर भागातून ही या मार्गाने बरेच लोक वाहतूक करत आहे. यामुळे मदत करणाऱ्या हातांना ‘टोल’ वसुलीचा भुर्दंड पडत आहे. म्हणून राज्य सरकार पुणे जिल्हाधिकारी व रस्ते विकास महामंडळ, व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण… यांना विनंती आहे की… या महामार्गावरील १५ (पंधरा) दिवसांसाठी ‘टोल’ वसुली तात्पुरती थांबवावी, बंद करावी.

खेड – शिवापूर ते कोल्हापूरच्या या मार्गावर टोलवसुली सुरू आहे. दिवसभर व रात्री अपरात्री मध्यरात्री या मार्गावरून मदतीच्या गाड्या वाहतूक करणार आहेत. मदतीसाठी जाणाऱ्या बहुतेक लोकांच्या आमच्याकडे तक्रारी येत असून लोकांकडून विनंती करण्यात येत आहे. या मार्गावरील ‘टोल’ वसुली तत्काळ थांबवावी. या मार्गावर 65 रुपये ते 95 रुपये पर्यंत टोल वसुली केली जाते. हे सामाजिक जाणिवेतून स्वयंप्रेरणेने मदतीचे हात पुढे येत असताना प्रशासनाने १५ दिवस टोलवसुली बंद करून मदत करणाऱ्या नागरिकांना सहकार्य करावे. अशी पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.

पुर परिस्थिती महा भयानक असल्याने लोकांना मदत करणे गरजेचे आहे. उद्या पासून ‘संभाजी ब्रिगेड’ व शिवप्रेमी संघटनांच्यावतीने औषधे कपडे अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू इत्यादी देण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे बरेच लोक सहकार्य करण्यासाठी प्रत्यक्ष जाणार आहेत. जर यासाठी कुणाला मदत करण्याची इच्छा असेल तर आमच्याशी संपर्क साधावा…
कैलास वडघुले 8329373670, प्रशांत धुमाळ 9881402241, सौरभ भिलारे 7286086412, संतोष शिदे 9850842703 यांच्याशी संपर्क करावा. तुम्ही दिलेले कपडे भिजलेल्या माणसाच्या आरोग्याचा संरक्षण करतील हीच अपेक्षा आहे. स्थानिक प्रशासनाची चर्चा करून एखादं गाव दत्तक घेऊन गावामध्ये स्वच्छता व आरोग्य कॅम्प लावण्याचा संभाजी ब्रिगेडचा मानस आहे.

‘टोल’ वसुली तात्पुरती रद्द करण्याची प्रशासनाला विनंती आहे.’ याबाबत पुणे जिल्हाधिकारी सातारा जिल्हाधिकारी सांगली व कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत आम्ही पाठपुरावा करून पंधरा दिवस टोलवसुली बंद झाली पाहिजे. ही विनंतीवजा मागणी करत आहोत. कृपया प्रशासनानेही दखल घ्यावी.

पाणी शुद्धीकरणासाठी 1 कोटी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप

0

मुंबई, दि. 10: राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचे काम वैद्यकीय पथकांमार्फत करण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली भागात सुमारे 70 पेक्षा अधिक पथके तैनात करण्यात आली आहेत. पूरग्रस्तांना मदत करतानाचा संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या नियंत्रणासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. कोल्हापूर,सांगली भागात सर्पदंशावरील लस, लेप्टोवरील गोळ्या आणि पाणी शुद्धीकरणासाठी 1 कोटी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप केले जात आहे.

आरोग्यमंत्री श्री. शिंदे बुधवारपासून कोल्हापूर मुक्कामी आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या कामात सहकार्य करतानाच त्यांना आवश्यक ती वैद्यकीय मदतदेखील केली जात आहे. राज्यातील अन्य भागात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती आहे. तेथील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधेचाही आरोग्यमंत्री दैनंदिन आढावा घेत आहेत. राज्यभरात 325 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यातील अन्य भागापेक्षा कोल्हापूर, सांगली भागातील परिस्थिती बिकट आहे. या भागातील पाणी काहीसे कमी होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचा भर स्वच्छता मोहीम आणि साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये यावर आहे.

आरोग्य विभागामार्फत या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 70 पेक्षा अधिक वैद्यकीय पथके कार्यरत केली आहेत. शिवाय रविवारी मुंबईहून 100 डॉक्टरांचे पथक, औषधांसह या दोन जिल्ह्यांमध्ये दाखल होणार आहे.  पुराच्या पाण्यामुळे सांगली आणि कोल्हापूर भागात मानवी वस्तीत साप शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्पदंशावरील लसीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यात आला आहे. कोल्हापूरमध्ये 12 हजार तर सांगलीमध्ये 5 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.

पुराच्या पाण्यामुळे होणारा लेप्टोचा संभाव्य धोका ओळखून त्याच्यावरील उपचाराच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले असून सांगलीमध्ये 8 लाख आणि कोल्हापूरमध्ये 12 लाख डॉक्सिसायक्लिन गोळ्या देण्यात आल्या आहेत. 30 लाख गोळ्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. साथरोगांचा उद्रेक होऊ नये यासाठी संनियंत्रण केले जात आहे.पूरग्रस्त भागात पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी एक कोटी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

अलमट्टी धरणातून 5 लाख क्युसेक विसर्ग सुरु

0

कोल्हापूर, दि. 10 : अलमट्टी धरणातून 5 लाख क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित 4 दरवाजे खुले आहेत. त्यामधून 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी दिली आहे. आज सकाळी 7 वाजता कोयना धरणामधून 77987 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  7 वाजता 52 फूट 2  इंच असून, एकूण 107 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.30 टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प,पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ व शिंगणापूर. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी,  सरकारी कोगे,खडक कोगे, शिरगाव व तारळे. कासारी नदीवरील- बाजारभोगाव,वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, यवलूज, कांटे, करंजफेन व पेंडाखळे. तुळशी नदीवरील- बीड, आरे, बाचणी, घुंगुरवाडी,कांचणवाडी व भाटणवाडी. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव,कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर,भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली,सुळकुड, बाचणी, क.वाळवे, तुरूंबे व सुळंबी. कुंभी नदीवरील- शेनवडे,कळे (खा), वेतवडे, मांडूकली, असळज, सांगशी व काताळी. वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरुपली, बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण,वाघापूर, शेणगाव, चिखली, सुक्याचीवाडी, शेळोली, तांबाळे,पाटगाव, दासेवाडी, अन.फ, वाण्याचीवाडी. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, गिजवणे, जरळी, खंदाळ, निलजी, हरळे,गजरगाव व दाबीळ. घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी,हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, दुंडगे,कामेवाडी व ढोलगरवाडी. शाळी नदीवरील- येळावणे, कोळगाव व टेकोली.  धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे, गवसी, म्हसूर्ली व शेळोशी व चित्री नदीवरील कर्पेवाडी (करोली) असे एकूण 107 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या अलमट्टी धरणात 88.76 टीएमसी तर कोयना धरणात 103.19  टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.28  टीएमसी, वारणा 32.26 टीएमसी, दूधगंगा 23.15 टीएमसी,कासारी 2.52 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.53 टीएमसी,पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.40, चित्री 1.88 टीएमसी,जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.

    बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 52.2 फूट, सुर्वे 49.7 फूट, रुई 80.5 फूट, इचलकरंजी 78 फूट, तेरवाड 82.6 फूट,शिरोळ 78 फूट, नृसिंहवाडी 78 फूट, राजापूर 62.8  फूट तर नजीकच्या सांगली  56.6 फूट आणि अंकली  61.8  फूट अशी आहे.

क्रांती दिन व युवक क्रांती दल स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबीर

0
पुणे:क्रांती दिन व युवक क्रांती दल स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले   एफएम वाहिनीवरचे लोकप्रिय आरजे संग्राम यांची प्रमुख उपस्थिती होती
शुक्रवार, दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजी, सायंकाळी ४  ते ९ या वेळेत महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ( गांधी भवन ) कोथरूड  येथे हे शिबीर झाले  .  महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल,रक्ताचे नाते ट्रस्ट या संस्थांनी संयुक्तपणे आयोजन केले .  युक्रांद चे शहराध्यक्ष सचिन पांडुळे ,सुदर्शन चखाले, संघटक ऋतुजा पुकाळे यांनी स्वागत केले .
डॉ प्रवीण सप्तर्षी ,अन्वर राजन ,संदीप बर्वे ,अभिजित मंगल इत्यादी उपस्थित होते .

पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या अन्न-धान्यावर नेत्यांचे फोटो लावू नका, व्हायरल फोटोंवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन (संपूर्ण पत्रकार परिषद व्हिडीओ)

0

मुंबई – राज्यात आलेल्या पूरपरिस्थित राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या मदत प्रक्रियेवर सोशल मीडियावर संताप उमटत आहे. मंत्री गिरीश महाजन यांचा पूरग्रस्त परिसरातील व्हिडिओ असो वा मदतीसाठी सरकारने काढलेला जीआर या सर्वांनाच ट्रोल केले जात आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सरकारी मदतीच्या पाकिटांचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामध्ये सरकारकडून पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या गहू आणि तांदळाच्या पाकिटांवर पुढाऱ्यांचे फोटो आहेत. हे फोटो फेसबूक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर संतप्त प्रतिक्रियांसह शेअर केले जात आहेत. त्यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

शासकीय मदतीवर नेत्यांचे फोटो लावू नका -मुख्यमंत्री
व्हायरल होणाऱ्या फोटोंवर शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. मुख्यमंत्री म्हणाले, पूरग्रस्तांना सरकारकडून अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. त्या पाकिटांवर मुख्यमंत्री, मंत्री आणि राजकीय नेत्यांसह पक्षांची छायाचित्रे चिटकवली जात आहेत. ही मदत म्हणजे एक सरकारी काम आहे. त्यावरून कुठल्याही व्यक्तीने असे करणे अपेक्षित नाही. या मदतीवर कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा व्यक्तीचा फोटो लावू नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केले आहे.

:” सावित्रीची लेकरं उपाशी , विद्यापीठ प्रशासन तुपाशी”विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी

0

गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी  विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर  निदर्शने:विवेक बुद्धी जागृती अभियान

पुणे :भोजनाच्या सुविधांसंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात  न्याय्य मागणी मांडत  असताना  अजामीनपात्र गुन्हे दाखल झालेल्या विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी १० ऑगस्ट रोजी दुपारी २ पासून  विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर  जोरदार घोषणा देत निदर्शने करण्यात आली .
३५३ कलमाखाली गुन्हे दाखल झालेल्या सतीश गोरे, सतीश पवार, आकाश दौंडे, आकाश भोसले(मुक्त पत्रकार), कृणाल सपकाळे, मुन्ना आरडे, सोमनाथ लोहार यांचा त्यात समावेश होता . युवक क्रांती दलाचे कार्यवाह संदीप बर्वे,  युवक क्रांती दलाचे संघटक जांबुवंत मनोहर, कमलाकर शेटे, पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, सुदर्शन चखाले, अभिजित मंगल, सागर सावंत(दलित पँथर), शुभम चव्हाण(सम्यक विद्यार्थी आंदोलन), सुभाष कारंडे( आम आदमी पार्टी), शर्मिला येवले, रुकसाना शेख, शीना आणी निवेदिता(लोकराज), वैभव कदम(जनता दल सेक्युलर), सतीश गोरे, सतीश पवार, मुन्ना आरडे, आकाश भोसले, सोमनाथ लोहार, सतिशकुमार पडोळकर, अशोक चाटे व इतर विद्यार्थी, संघटना, नागरिक उपस्थित होते.
 जोरदार घोषणा देऊन यावेळी विद्यापीठाचे प्रवेशद्वार दणाणून सोडण्यात आले .   ”एक ताट ,एक वाटी , आमचा लढा जेवणासाठी”,” सावित्रीची लेकरं उपाशी , विद्यापीठ प्रशासन तुपाशी”,” हल्ला बोल ,हल्ला बोल , दडपशाहीपे हल्ला बोल, तानाशाहीपे हल्ला बोल”,”पांडे ,तुमचा विद्यार्थ्यांवर भरोसा नाय का ?”  अशा घोषणा देण्यात आल्या . ” क्रांतीज्योती सावित्रीबाई  क्रांतीसुर्य महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीं,छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचाही जयजयकार करण्यात आला .
  रिफेक्टरी नियमांसंदर्भात आवाज उठवताना   पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या आंदोलक  विद्यार्थ्यांवर   १ एप्रिल २०१९ रोजी    गुन्हे दाखल करण्यात आले होते . या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी अलीकडेच जाहीर सभा घेण्यात आली होती . त्यात अन्वर राजन यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला होता .
कुलगुरूंनी गुन्हे मागे न घेतल्यास 22 तारखेला 11 वाजता रिफेक्टरी समोर (अनिकेत कॅन्टीन जवळ ) आंदोलन करण्यात येणार आहे.विवेक बुद्धी जागृती अभियान करून ,या सत्याग्रहात सहभागी होऊन , राष्ट्राचे भवितव्य असणाऱ्या  विद्यार्थ्यांना  न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू या,असे आवाहन यावेळी करण्यात आले .

केंद्र व राज्याने अंदाजपत्रात शिक्षणासाठी भरीव तरतूद करावी – मनिष सिसोदिया

0

पुणे: “देशातील सर्वच राज्यातील सरकारी शाळेतील पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारच्या असतील असे नाही. आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये विरोधाभास असल्याचे जानवते. विद्यार्थ्यांना सरकारी शाळामधून उत्तम प्रकारचे शिक्षण द्यावयाचे असेल, तर केंद्र व राज्य सरकारने अंदाजपत्रात शिक्षणावरील खर्चात भरीव तरतूद करावी.”असे विचार दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मांडले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या १५ व्या तुकडीच्या शुभारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. लोकसभेचे खासदार अ‍ॅड. पिनाकी मिश्रा व शिवसेनाच्या उपनेता प्रियंका चतुर्वेदी या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एस. परशूरामन, प्र कुलगुरू डी.पी.आपटे, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या सह संचालिका प्रा.डॉ. शैलश्री हरिदास, डॉ. अनुराधा पाराशर आणि प्रा. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
मनिष सिसोदिया म्हणाले,“ या देशाला शिक्षणाच्या आधारे उभे करावयाचे आहे. शिक्षणाच्या माध्यमातून दहशतवाद आणि हिंसा संपविता येते. त्यामुळे दिल्लीतील सर्व सरकारी शाळांच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधार आणून तेथे ४४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहे. तसेच हॅपिनेस कार्यक्रमाच्या माध्यमातून रोज १६ लाख विद्यार्थी मेडिशन करतात.”
“शिक्षणाच्या माध्यमातून जगात विश्‍व शांती येऊ शकते यासाठी एमआयटी संस्था कार्यरत आहे. तसेच राजकारणाचे प्रशिक्षण देणार्‍या या संस्थेने आता नेते बनणार्‍यांसाठी नवा पाठ्यक्रम सुरू करावा. त्याच्या माध्यमातून या देशातील राजकारणातील वैचारिक पोकळी भरून निघेल. राजकारणात प्रवेश करणारे विद्यार्थी जेव्हा देशसेवेचे स्वप्न पाहतील तेव्हाच त्यांचे व कुटुंबाचे स्वप्न पूर्ण होईल. लोकशाहीमध्ये आंदोलनाची ताकद मोठी आहे. ज्याच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळू शकते. त्यामुळे राजकारणत प्रवेश करणार्‍या युवाकांनी समाजाच्या प्रश्‍नांसाठी आंदोलनाचे शस्त्र उचलावे.”
पिनाकी मिश्रा म्हणाले,“ १७ व्या लोकसभेत महिला बील पास होईल असी आशा वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात परिवर्तनाची लहर आणली आहे. त्यांनी लोकसभेत जीव ओतला आहे. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ओडिसात सर्वप्रथम १२ टक्के महिला आरक्षण आणले होते. त्यानंतर राज्यात ५० टक्के आरक्षण केले आहे. पुढील काळात लोकसभेमध्ये अनेक महिला खासदार दिसतील.”
प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या,“धर्माच्या आधारे चांगल्या मार्गावर चालावे असे सांगणारे संत ज्ञानेश्‍वर यांचा हे सूत्र राजकारणासाठी लागू होतो. राजकारणातून समाजसेवा करणार्‍यासाठी मिटसॉग हा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. तसेच सेवा हाच धर्म लक्षात ठेऊन चांगल्या विचारधारेवर चालून देश सेवा करावी. देशात संतुलन ठेवण्यासाठी सत्ताधारी बरोबरच विरोधी पार्टीची गरज आहे. राजकारणात महिलांची संख्या वाढत आहे परंतू पार्टीत त्यांना महत्वाचे पद दिल्यास देशात परिवर्तन येईल.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ टी.एन. शेषण यांचा आभारी आहे. त्यांच्या माध्यमातून स्कूल ऑफ गव्हर्नमेंट सुरू झाली. राजकारण व समाजिक कार्य करताना चारित्र्य आणि शिस्त या दोन गोष्टी असणे गरजेचे आहे. येथे राजकारणाचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी आपल्या भारतीय संस्कृती, परंपरा व तत्वज्ञानाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. जेणे करून सर्वासामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यास मदत मिळेल.”
प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले,“ राजकारणातील बदलाला पाहुण आम्ही स्कूल ऑफ गव्हर्नमेंटीची स्थापना केली. राजकारणात शिक्षीत युवकांनी सहभाग घ्यावा हा याचा मुख्य उद्देश आहे. देशात विकास आणि परिवर्तन आणायचे असेल तर  राजकारणाचे शिक्षण अतिशय महत्वाचे आहे. बीसीएस सारखे अनेक उपक्रम संस्थेद्वारे केले जात आहेत.”
यावेळी संबल झा आणि अरविंद शर्मा या विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.
प्रा. डॉ. शैलश्री हरिदास यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एस. परशूरामन यांनी स्वागत पर भाषण केले.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डी.पी. आपटे यांनी आभार मानले

गुजराती चित्रपट ‘हेलारो’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘भोंगा’ ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार

0

नवी दिल्ली-66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज नवी दिल्ली येथे घोषणा करण्यात आली. चित्रपट निवड समितीने आज नवी दिल्ली येथे वार्ताहर परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली.

‘हेलारो’  या गुजराती चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. तर ‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. ‘बधाई हो’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. हिंदी चित्रपट ‘पॅड मॅन’ ला सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित करण्यात आले. ‘अंधाधुन’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला.  ‘ओंदला एर्दला’ या कन्नड चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नर्गीस दत्त पुरस्कार जाहीर झाला. ‘पाणी’ या मराठी चित्रपटाला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरवण्यात आले तसेच ‘नाळ’ या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांना सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा इंदिरा गांधी पुरस्कार जाहीर झाला. या चित्रपटातल्या भूमिकेसाठी श्रीनिवास पोकळेला सर्वोत्कृष्ट बालकलाकार ठरवण्यात आले. ‘चुंबक’ या मराठी चित्रपटासाठी स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. ‘आई शप्पथ’ साठी दिग्दर्शक गौतम वझे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘ आयुष्मान खुराणा आणि विकी कौशल यांना ‘अंधाधुन’ आणि ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातल्या भूमिकांबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा संयुक्त पुरस्कार जाहीर झाला. तेलगू चित्रपट ‘महानती’ मधील भूमिकेसाठी किर्ती सुरेश या अभिनेत्रीला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला तर ‘उरी’ या चित्रपटासाठी आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

अडीच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात प्रशासनाला यश- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

0

मुंबई, दि. 9 : कोल्हापूर व सांगलीत पुरामध्ये अडकलेल्या आतापर्यंत 2 लाख 52 हजार 813 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.

शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी,कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर,नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून केंद्र शासनाकडून मदत घेण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे राज्य शासनाच्या संपर्कात असून केंद्राकडून लागेल ती मदत करण्यासाठी सूचना दिल्या असल्याची माहिती महसूल श्री. पाटील यांनी दिली.

कोल्हापूर व सांगलीमध्ये जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाचे जवानासह महसूल, जलसंपदा, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह इतर सर्व विभागाचे कर्मचारी व अधिकारी अहोरात्र पूरग्रस्तांच्या बचाव कार्यासाठी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून राबत आहेत. स्थानिक प्रशासनाबरोबरच ओडिसा, पंजाब व गुजरात राज्यातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे 22 तसेच नौदलाच्या 26,तटरक्षक दलाचे सांगलीमध्ये 2 व कोल्हापुरात 9 पथके, सैन्यदलाचे8 पथके, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे सांगलीमध्ये दोन तर कोल्हापुरात एक अशी तीन पथके कार्यरत आहेत. तसेच कोल्हापुरात76 तर सांगलीमध्ये 90 बोटींद्वारे बचाव कार्य सुरू आहे.

पूरपरिस्थितीबद्दल राज्य शासनाने केंद्र शासनाशी तत्काळ संपर्क साधल्यामुळे सैन्य दलाची व तटरक्षक दलाची पथके कार्यरत झाली आहेत. मदत व पुनर्वसन विभागाचे आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असून वेळोवेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाबरोबर मदती संदर्भात संपर्कात आहे.

सध्या कर्नाटकातील आलमट्टी धरणातून आज संध्याकाळपर्यंत 4लाख 80 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असून त्यामुळे कोल्हापुरातील पाणी पातळी कालच्या पेक्षा कमी झाली आहे. तसेच सांगलीतील पाणी पातळी स्थिर आहे. पाऊस कमी झाल्यानंतर या ठिकाणची पाणीपातळी आणखी कमी होण्यास मदत होईल.

पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्य शासनाने 154 कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यातून ग्रामीण भागातील आपत्तीग्रस्त नागरिकांना प्रति कुटुंब 10 हजार तर शहरी भागातील प्रति कुटुंब 15 हजार रुपये मदत करण्यात येणार आहे. ही मदत तातडीने वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 239 गावे व सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 90 गावे अशी 12 तालुक्यातील 329गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. पुरामुळे बाधित गावातील दोन लाख 52 हजार जणांना बचाव पथकानी सुरक्षितस्थळी हलविले असून विविध 270 ठिकाणी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातील सांगलवाडी व हरिपूर येथे एनडीआरएफ व एसडीआरएफची टीम बचाव कार्य सुरू करत आहेत. सांगलवाडीत वीस ते बावीस बोटीद्वारे बचावकार्य सुरू आहे. एअरलिफ्टिंगने नागरिकांना हलविण्यात येत आहे. हरिपूरमध्येही बोटीतून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मिरज, पलूस व वाळवा तालुक्यातही प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्या राहण्याची, जेवणाची व औषधोपचाराची सोय केली आहे. याबरोबरच जनावरांच्या बचावासाठीही प्रयत्न सुरू आहेत. कवलापूर येथे तीन हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू आहे.

पूरग्रस्त भागात अन्न पाकिटे, पिण्याचे पाणी तसेच औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. कोल्हापूर शहरामधील पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. तसेच ज्या ठिकाणी अद्याप पाणी आहे तेथील नागरिकांना सुखरुप काढण्यात येत असून वृद्ध व आजारी नागरिकांना प्राधान्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. तसेच जे नागरिक उंचावर सुरक्षित ठिकाणी आहेत, त्यांना फळे,अन्न पाकिटे व पाणी पुरवठा करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरात सर्वत्र पोचून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या मदतीचे नियोजन करण्याचे काम करत आहेत. पूरग्रस्तांना ठेवण्यात आलेल्या तात्पुरत्या निवासस्थानी श्री. पाटील स्वतः जाऊन तेथील नागरिकांची चौकशी करत असून आवश्यक तेथे अन्न, औषधे व इतर साहित्याचा पुरवठा करण्यासंदर्भात सनियंत्रण करत आहेत.

कोल्हापुरातील पूरपरिस्थिती सामान्य करण्याचे काम वेगाने सुरू आहे. शिरोळ तालुक्यात मदतीसाठी पथके पाठविण्यात आली आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी राज्य व केंद्र शासन सर्व मार्गाने प्रयत्न करत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन श्री.पाटील यांनी केले आहे.

पूरग्रस्त मदतीसाठी १५४ कोटी तातडीने वितरीत -मुख्य सचिवांची माहिती

0

मुंबई, दि. 9 : पूरग्रस्त भागातील नागरीकांना देण्यात येणाऱ्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने 154 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. हा निधी कमी पडल्यास ट्रेझरीतून निगेटीव्ह डेबीट करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जेणेकरुन मदत कार्याला निधीची कमतरता जाणवणार नाही. पूरग्रस्त भागात सर्पदंशावरील लसी देण्यात आल्या असून कोल्हापूरमध्ये 12 हजार तर सांगलीमध्ये 5 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. लेप्टोवरील उपायांच्या सांगलीमध्ये 8 लाख आणि कोल्हापूरमध्ये 12 लाख डॉक्सीसीन गोळ्या देण्यात आल्या आहेत. 30 लाख गोळ्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :· महाराष्ट्रात जून ते 9 ऑगस्टपर्यंत 782 मि.मी. पाऊस झाला. सरासरीच्या 109 टक्के पाऊस झाला. मागीलवर्षी या काळात 80 टक्के पाऊस झाला होता.

· 4 ऑगस्ट पासून कोल्हापूर येथे सरासरीच्या 124 टक्के पाऊस पडला. सांगलीमध्ये सरासरीच्या 223 टक्के पाऊस पडला आणि साताऱ्यात सरासरीच्या 181 टक्के पाऊस झाला.

· अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात 8 आणि सांगली जिल्ह्यात 4 असे एकूण 12 तालुके बाधित झाले.

· कोल्हापूरमध्ये 239 गावे, सांगलीत 90 गावे अशी 329 गावे पुरामुळे बाधित झाली आहेत.

· या बाधित गावांमध्ये आतापर्यंत प्रशासन, लष्कर, नौदल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांच्या मदतीने आतापर्यंत 2 लाख 52 हजार 813 व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

· या सर्व व्यक्तींसाठी मदत निवारे उभारले आहेत. तेथे त्यांना वास्तव्यास ठेवण्यात आले आहे.

· राज्य शासनाने असा निर्णय घेतला आहे की, या निवाऱ्यांच्या बांधकामांचा, तेथील नागरीकांच्या जेवणाचा तसेच आवश्यकता भासल्यास त्यांना कपडे पुरविल्यास त्याचा खर्च आणि औषधांचा खर्च शासन देणार आहे. निवाऱ्यातील नागरीकांसाठी अन्य बाबींसाठी खर्च करावा लागला तर त्याचे अधिकार शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

· एनडीआरएफची एकूण 31 पथके (एका पथकात 40 जणांचा समावेश) कार्यरत असून त्यातील 16 पथके सांगलीमध्ये, 6 कोल्हापूरमध्ये, बाकी पथके आवश्यकता भासल्यास कार्यरत ठेवण्यात येत आहेत.

· महाराष्ट्रात एनडीआरएफच्या ओडीसा येथून 5 पथके आणि 5 पथके भटींडा पंजाब येथून मागविण्यात आली आहेत. या पथकांना शासनाने एअर लिफ्टींग करुन पूरग्रस्त भागात तैनात केले आहेत. गुजरातमधून 3 पथके मागविण्यात आली असून ती देखील कार्यरत आहेत. एसडीआरएफची 2 पथके सांगलीमध्ये कार्यरत आहेत. तर एक पथक कोल्हापूरात आहे.

· भारतीय नौदलाची 14 पथके कोल्हापूरमध्ये आणि सांगलीमध्ये 12 पथके कार्यरत आहेत.

· या सर्व पथकांकडे मोठ्या बोटी असून अत्याधुनिक साधने आणि विशेषज्ञांचा देखील समावेश आहे. राज्य शासनाने सैन्याकडे विनंती करुन बचाव पथकाला डोनीअर विमानाद्वारे पूरग्रस्त भागात सोडण्याचे काम केले. सेनादलाचे 8 कॉलम कार्यरत असून दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 4 कॉलम तैनात आहेत. एका कॉलमध्ये 40 जवानांचा समावेश आहे.

· पूरग्रस्त भागात जे नागरीक स्थलांतर करु इच्छित नव्हते त्यांना प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी 10 किलो तांदुळ आणि गहू वाटप करण्यात येत आहे.

· सर्व पूरग्रस्त भागातील आपत्तीग्रस्त नागरीकांना प्रति कुटुंब दहा हजार रुपये तर शहरी भागातील नागरीकांना 15 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नागरीकांना ही मदत देण्याकरीता जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने 154 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. त्याचबरोबर हा निधी कमी पडल्यास ट्रेझरीतून निगेटीव्ह डेबीट करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जेणेकरुन मदत कार्याला निधीची कमतरता जाणवणार नाही.

· आरोग्य विभागामार्फत 70 वैद्यकीय पथके कार्यरत केली आहेत. त्यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी आणि 2 ते 3 नर्स यांचा समावेश आहे.

· पूरग्रस्त भागात सर्पदंशावरील लसी देण्यात आल्या असून कोल्हापूरमध्ये 12 हजार तर सांगलीमध्ये 5 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.

· लेप्टोवरील उपायांच्या गोळ्यांचे (डॉक्सीसीन) वाटप करण्यात आले असून सांगलीमध्ये 8 लाख आणि कोल्हापूरमध्ये 12 लाख डॉक्सीसीन गोळ्या देण्यात आल्या आहेत. राखीव म्हणून 30 लाख गोळ्या ठेवण्यात आल्या आहेत. साथ रोगांचा उद्रेक होऊ नये यासाठी संनियंत्रण केले जात आहे. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत.

· आपत्तीग्रस्त भागात पाणी शुद्धीकरणासाठी एक कोटी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

· प्राथमिक अंदाजानुसार आतापर्यंत सुमारे एक लाख हेक्टर शेतीची जमीन बाधित झाली आहे. त्याची जिरायत, बागायती, फळबाग अशी फोड करण्यात येईल.

· पाणी ओसरल्यावर पीक विम्यापोटी नुकसान भरपाईच्या सर्वेक्षणासाठी वीमा कंपन्यांना निर्देश देण्यात आले असून पिकाचे नुकसान त्याचे पंचनामे करण्याचेही निर्देश दिले आहेत. जेणेकरुन शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ मिळू शकेल. केंद्र शासनाकडे यासाठी विनंती करण्यात आली होती ती मान्य झाली आहे. पाणी कमी झाल्यावर पीक विम्याचे पंचनामे सुरु होतील.

· पूरामुळे बाधित झालेल्या रस्त्यांचा आढावा घेतला. रस्ते वाहून जातात, खराब होतात पाणी ओसरल्यानंतर त्यावरुन वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु होते. प्रत्येक भागात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते दुरुस्तीसाठी डांबर यासह आवश्यक साहित्य आणि मनुष्यबळ पोहोच करण्यात आले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

· ज्यावेळेस रस्त्यांवरुन वाहतूक सुरु होईल त्यावेळेस वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. जेणेकरुन वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही याचेही नियोजन करण्यात आले आहे.

· पुरामुळे पाण्याचे स्त्रोत दुषित होतात. पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही दिवस टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी टँकर्स उपलब्ध आहेत ते अधिग्रहीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासाठी आवश्यक निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

· वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणने नियोजन केले आहे. 32 पथके कोल्हापूर येथे तर 8 पथके सांगलीमध्ये तैनात केली आहेत. एका पथकात 4 लाईनमन आणि कर्मचारी उपलब्ध आहेत. पाणी कमी झाल्यावर त्यांच्यामार्फत पुरवठा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

· ट्रान्सफॉर्मर पाण्यात बुडाले असतील तर त्याच्या दुरुस्तीची वाट न पाहता नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा. मोठ्या संख्येने ट्रान्सफॉर्मर कोल्हापूर आणि सांगली येथे पाठविण्यात येत आहेत. पाणीपुरवठा योजनांना वीज पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर, रुग्णालय, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये यांना वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर सुरु करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

· राज्यात आतापर्यंत पूरस्थितीमुळे 144 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

भारतीय विद्या भवनमध्ये गर्जले ‘ क्रांतीचे पोवाडे

0
पुणे ः‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत   ‘ शाहिरांचे बोल  खडे ,ऐका क्रांतीचे पोवाडे ‘  हा कार्यक्रम दि. ९ ऑगस्ट २०१९ रोजी , शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, (सेनापती बापट रस्ता) येथे आयोजित करण्यात आला होता. रसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.
‘  शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी ‘ आणि होनराजराजे  प्रस्तुत या कार्यक्रमात शाहीर हेमंतराजे मावळे  आणि सहकारी क्रांतिदिनाचे  औचित्य साधून पोवाड्यांच्या  विविध  शाहिरी रचना सादर केल्या.त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर ,कवी वसंत बापट ,शाहीर समरेन्द्र ,शाहीर दादा कोंडके , शाहीर हेमंतराजे मावळे ,शाहीर महादेव नानिवडेकर यांच्या रचना सादर केल्या गेल्या .
 अफजलखान वध ,१८५७ चे स्वातंत्र्यसमर ,पुण्याची निर्मिती ,शौर्याची परंपरा अशा अनेक  विषयांवर हे पोवाडे होते.
पुण्याचा इतिहास सांगणाऱ्या ‘ भव्य दिव्य अशी ही, सांगीतो पुण्याची महती ‘ या पोवाड्यानेही रसिकांची दाद मिळवली.
गणाधिपतीला वंदन शाहीर दादा कोंडके लिखित  गणाने करुन पोवाड्यांचा हा कार्यक्रम सुरु झाला. त्यात सर्व स्वातंत्र्यवीरांना नमन करण्यात आले.
संगीत संयोजन होनराजराजे मावळे यांचे होते. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्वातंत्र्याचा   पोवाडा सादर केला. ‘ गर्जली मराठी शाहिरी ‘ हा मुजराही शाहीर हेमंतराजे मावळे यांनी सादर केला. शौर्य , परंपरेचे पोवाडे ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि ‘ शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण ‘ या शब्दांची प्रचीती आली. भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.
हा कार्यक्रम विनामूल्य होता. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ८१ वा कार्यक्रम  होता.

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भाजप अध्यक्षांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली

0
मुंबई: भारत छोडो आंदोलनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई भाजपाध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईमधील ऑगस्ट क्रांती मैदान येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पित करून शहिदांचे स्मरण केले. ९ ऑगस्ट १९४२ साली भारतीय स्वतंत्र चळवळीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत याच मैदानातून महात्मा गांधी यांनी ‘भारत छोडो’ हा नारा दिला. याप्रसंगी मलबार हिलचे आमदार लोढा म्हणाले की, ऑगस्ट क्रांती मैदान सारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या क्षेत्रातून ते आमदार असल्याचा त्यांना गर्व आहे.
ऑगस्ट क्रांती नावाने प्रसिद्ध असलेल्या या मैदानात इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलनाची सुरुवात केली असल्याने, या घटनेचे स्मरण करून दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी शहिदांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ९ ऑगस्ट या दिवस ‘भारत छोडो आंदोलन’ म्हणून नोंदविला गेला आहे. शुक्रवारी याच क्रांतिकारी घटनेचा ७७ वा वर्धापन दिवस होता. काल संक्रांति स्थळी श्रद्धासुमन कार्यक्रमात मुंबई अध्यक्ष लोढा यांच्यासह दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष शरद चिंतन सहित भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जुन्नरच्या आदिवासी भागात हिरडा प्रक्रिया उद्योग सुरु व्हावा यासाठी राज्य शासनाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर केंद्राकडून भरीव निधी – शिवाजीराव आढळराव पाटील

0
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नरच्या आदिवासी भागात हिरडा प्रक्रिया उद्योग सुरु व्हावा यासाठी केंद्रीय आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा, अव्वर सचिव के. चंद्रशेखर यांच्याकडे १८ कोटी २४ लक्ष निधीची मागणी केली असून राज्य शासनाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर केंद्राकडून भरीव निधीची तरतूद करण्याचे सूतोवाच केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी केल्याची माहिती शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक संस्थेचे अध्यक्ष काळू शेळकंदे व मारुती वायाळ यांनी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांची भेट घेऊन खानापूर, (ता.जुन्नर) येथे हिरडा प्रक्रिया उद्योग सुरु करण्याबाबत मागणी करत प्रकल्पाच्या स्थितीबाबत माहिती दिली होती. यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली होती. त्यानुसार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केंद्रीय आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा व केंद्रीय अव्वर सचिव के. चंद्रशेखर यांना सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करुन या उद्योगासाठी १८ कोटी २४ लक्ष रुपये निधीची केंद्रीय योजनेतून तरतुद करण्याची मागणी केली. त्यामध्ये ५.५५ कोटी रुपये
तातडीचा निधी, ५.५० रुपये अतिरिक्त आवश्यक निधी व भविष्यातील प्रकल्प उभारणीसाठी ७.३० कोटी याप्रमाणे प्रकल्प अहवालात निधीचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
आढळराव पाटील म्हणाले की, खेड, आंबेगाव, जुन्नर व मावळ तालुक्यांमध्ये आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात असून या हिरडा प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता आदिवासी बांधवांना हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या कायमस्वरुपी फायद्याचा ठरणारा आहे. हिरडा प्रक्रिया उद्योगासाठी २ कोटी निधीची तरतूद केल्यास हा प्रकल्प सुरु होऊ शकेल. मात्र भविष्यातील या भागाची गरज लक्षात घेता हिरड्यावरील प्रक्रियेबरोबरच जांभूळ, आंबा, करवंदे आदिंवरील प्रक्रियांसाठी ५० टन क्षमतेचे शितगृह उभारणेसाठी ४.८० कोटी तसेच बाळ हिरडा गोळ्यांचा प्रकल्प उभारणेकरिता १.५ कोटी निधीची मागणी केली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मक प्रतिसाद देत केंद्राकडे निधीची उपलब्धता असून महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाऐवजी महाराष्ट्र शासनामार्फत या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल पाठवून निधीची मागणी करावी. प्रस्ताव योग्य वाटल्यास या प्रकल्पासाठी भरीव निधी केंद्र शासनाच्या आदिवासी विभागाकडून दिला जाईल असे आश्वासनही यावेळी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी दिले. केंद्रीय मंत्री महोदयांच्या सूचनेनंतर मी राज्याच्या आदिवासी विभागाच्या सचिव श्रीमती मनिषा वर्मा यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्रीय आदिवासी विभागाला लवकरच पाठविणार असल्याचे स्पष्ट केले.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, या व्यतीरिक्त ५३२ आदिवासी हिरडा उत्पादक सभासदांना समभाग खरेदीसाठी २६.६० लक्ष निधीची मागणी आदिवासी मंत्री अशोक उईके व प्रधान सचिवांकडे केली होती. त्यास राज्य शासनाकडून संमती दर्शवीत सदरचा निधी नियमीत योजनेतून उपलब्ध करणेबाबत जिल्हाधिकारी पुणे व प्रकल्पाधिकारी घोडेगाव यांना शासन स्तरावरुन सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे माझा पाठपुरावा सुरु असून लवकरच या निधीस प्रशासकीय मान्यता मिळेल.
श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्यावतीने मागणी केलेला हा प्रकल्प लवकरात लवकर सुरु व्हावा यासाठी माझे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरु झाल्यानंतर जुन्नर, आंबेगाव, खेड व मावळ भागातील आदिवासी शेतकऱ्यांना कायमस्वरुपी हक्काचा व्यवसाय मिळून रोजगार निर्मितीचे भरीव साधन भविष्यात उपलब्ध होईल अशी खात्री यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.

भाजप सदस्य नोंदणी सह मुख्यमंत्र्यासाठी राख्या ..उपक्रमाला मोठा प्रतिसाद

0

पुणे- भारतीय जनता पार्टी पर्वती विधानसभा मतदार संघाच्या वतीने गंगाधाम चौकात भाजपा सदस्य नोंदणी अभियान महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि माजी नगरसेविका वंदना भिमाले यांनी राबविले यावेळी तरुणांसह अनेक वयस्क नागरिकांनी नोंदणीसाठी उत्स्फुर्तपणे गर्दी केली होती .

येत्या राखी पौर्णिमेचे औचीत्य साधून यावेळी वंदना भिमाले यांनी महिला नागरिकांच्या वतीने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या पाठविण्यासाठी त्या संकलित करण्याचा कार्यक्रम यावेळी केला. भाजपचे कार्यकर्ते आणि आजी माजी पदाधिकारी यांनी यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आनंद व्यक्त केला .

 

जायकामध्ये कित्येक कोटीचा मलिदा खाण्याचा भाजपचा प्रयत्न- राष्ट्रवादीचे आंदोलन (व्हिडीओ)

0

पुणे- महानगरपालिकेच्या जायका प्रकल्पाच्या निविदेमध्ये सत्ताधारी भाजपा ने ३०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करत आज महापालिका भवनाच्या प्रवेश द्वारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील व विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी  बोलताना शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील म्हणाले भाजपा पुणे महानगरपालिकेत सत्तेवर आल्यापासून फक्त भ्रष्टाचार हेच काम चालले आहे.प्रत्येक योजनेत फक्त गोलमाल भाजपाने चालविला आहे. एकाच कंपनीने समान नावाच्या कंपन्या स्थापन करून व भाजपाशी हातमिळवणी करून जायका प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. आपण दोघे भाऊ भाऊ एकत्र मिळून खाऊ   अशा प्रकारचे काम पुणे महानगरपालिकेत भाजपा व कंपन्या कडून चालू आहे. मनपा आयुक्तांना पुणे मनपा मध्ये लक्ष द्या लक्ष द्या असे म्हणण्याची वेळ आली आहे, आयुक्त सौरव राव यांनी  लक्ष नाही दिले तर आयुक्तांना पुणे महानगरपालिकेत बंदी करावी लागेल असा इशारा दिला. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी सताधार्यांवर टीका करताना भाजपा ने  सतत पुणे महानगरपालिकेत भ्रष्टाचार चालविला आहे . जायका प्रकल्पाच्या निविदेत बदल नाही केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याहीपेक्षा मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असे सांगितले. यावेळी माजी महापौर प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे,नगरसेवक ,प्रकाश कदम,लक्ष्मी दुधाने,नंदा लोणकर,नारायण लोणकर ,नितीन कदम गणेश ढोरे,पूजा कोद्रे,समन्वयक राकेश कामठे, महिला अध्यक्ष स्वाती पोकळे,प्रदीप देशमुख,युवक अध्यक्ष महेश हांडे,ओबीसी अध्यक्ष संतोष नागरे,विद्यार्थी अध्यक्ष विशाल मोरे, युवती अध्यक्ष अश्विनी परेरा,बाबासाहेब गलांडे,फहीम शेख,गणेश नलावडे,मनोज पाचपुते, दत्ता सागरे, आपा जाधव, संतोष डोख तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते.