Home Blog Page 2870

दुःखी पिडीताची सेवा हीच ईश्वराची पूजा समजून ज्यांना ईश्वराने दिले आहे त्यांनी पुरग्रस्तांना सढळ हाताने मदत करावी-अण्णा हजारे

0

सांगली, कोल्हापुर आणि इतरत्र अतिपर्जन्य होऊन नद्यांना महापुर येऊन अनेक गावे पाण्याखाली गेली. त्या गावांतील सर्व घरे पाण्याखाली गेल्याने हजारो कुटूंब बेघर झाली. जनावरांची फार मोठी हानी झाली. प्रसार माध्यम, दुरदर्शन मुळे संवेदनशीलतेची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेची संवेदनशिलता जागृत झाली आणि तातडीचा उपाय म्हणून पिण्याचे पाणी, बिस्कीटे ,इतर खाद्य पदार्थांचे आणि कपड्यांचे मदतीचे ट्रक, टेम्पो कोल्हापूर व सांगलीकडे जाऊ लागले.

            राळेगणसिध्दी परिवाराने एक ट्रक साहित्य पाठविले होते. पारनेर येथील नागेश्वर मित्र मंडळाने ही एक ट्रक साहित्य पाठविले. महाराष्ट्रातील विविध भागातून मदतीचा ओघ सुरू आहे. सरकार पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी आपल्या परिने अथक परिश्रम करत आहे. पुरग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी सैनिकांनी जे काम केले त्याला तोड नाही. राळेगणसिध्दी परिवारातील तरूणांनी तेथे पाहिलेल्या बाबींबद्दल सांगत असताना आणि परिस्थितीचे फोटो पाहताना अतिव दुःख होत होते. पुर ग्रामस्थांना मदत करून काही गावातील सैनिक गावाचा निरोप घेऊन गाव सोडून चालले होते त्यावेळी त्या गावातील महिला सैनिक भावांना राखी बांधून निरोप देत होत्या आणि दोन्ही बाजूंनी अश्रूंच्या धारा वाहत होत्या. हे पाहणाऱ्यांच्याही डोळ्यात अश्रू दिसत होते.  ह्रदय दाटून येत होते. या परिस्थितीला कोण दोषी आहे? वगैरे गोष्टींचा उहापोह करण्याची आजची वेळ नाही. पुरग्रस्तांना तातडीची मदत मिळणे महत्वाचे आहे.

            आता पुर कमी झाल्यानंतर आम्हा जनतेचे महत्वाचे कर्तव्य आहे की, जी घरे पाण्याखाली गेल्यामुळे त्या कुटूंबातील माणसे फक्त अंगावरील कपड्यानिशी बाहेर पडली आहेत त्या माता-भगिनी, मुले आणि पुरूष मंडळी यांच्या दैनंदिन वापरात येणाऱ्या कपड्यांची गरज आहे. घरे पाण्याखाली गेल्यामुळे अंथरूण-पांघरूणासाठी वापरणारे कपडे पाण्यात कुजली, शाळेत जाणाऱ्या मुलांची वह्या पुस्तके पाण्यात गेली. त्या मुलांना वह्या पुस्तकांची नितांत गरज आहे. दररोज वापरात येणारी स्वयंपाक, जेवणाची आणि इतर भांडी मोठ्या प्रमाणात निकामी झाली आहेत. पुर ओसरल्यानंतर सर्वत्र चिखल झाला असल्याने आजार उद्भवण्याची शक्यता आहे. त्यासाठी गावात रोगराई पसरू नये म्हणून त्यांना जंतुनाशक औषधांची गरज आहे. जनतेने प्रयत्न करुन जी जनावरे वाचली आहेत त्यांना पशुखाद्याची गरज आहे. काही घरांची दृष्ये पाहिली आहेत. कच्ची घरांची पडझड झाली  आहे. अशा कुटुंबांना तातडीचा निवारा करण्याची गरज आहे.

            शासन आपल्या परीने प्रयत्न करित आहे. पण अचानक आलेल्या आपत्तीमुळे  शासन प्रत्येक कुटुंब किंवा माणसापर्यंत पोहचेल की नाही हा प्रश्न आहे? कारण काम मोठे आहे. त्यासाठी माणवतेच्या दृष्टीने आम्हा सर्व जनतेने कर्तव्य भावनेने सेवाभावाने हे काम यथा शक्तीने वाटून घेणे आवश्यक आहे. विशेषःता ईश्वराने समाजातील ज्या ज्या व्यक्तींना धन, दौलत सर्व काही दिले आहे अशा माणसांनी या आपत्ती मध्ये त्यांचे दुःख वाटुन घेणे आवश्यक आहे. दुःखी पिडीत, रंजले- गांजलेल्या माणसांच्या दुःखात सहभागी होणे हिच खरी ईश्वर सेवा आहे. राजकारण, धर्मकारण, समाजकारण यांचा उद्देश हाच आहे की समाजाची सेवा घडावी.

            माझे वय 82 वर्षे आहे. जनतेची सेवा घडावी म्हणून आयुष्यात जनसेवेचे व्रत घेतले पण वयानुसार त्या सेवेला मर्यादा आल्या आहेत, बँक अकाउंट कुठे असतो हे माहीत नाही. फक्त जनतेची सेवा घडावी हेच व्रत घेऊन काम करित आलो. सर्वांना माझे सारखे जनतेच्या सेवेसाठी आयुष्य देणे शक्य होणार नाही हे मी समजू शकतो. पण आज जी माणसे महापुरासारख्या आपत्ती मध्ये सापडली आहेत आणि ईश्वराने आपल्याला सर्व दिले आहे अशा माणसांनी आज आपत्ती मध्ये सापडलेल्या माणसांना शक्य होईल ती मदत करणे मानवी जीवनाचे कर्तव्य आहे. गुजरातमधील भूकंपामध्ये  कच्छ मध्ये मी सहा महिने राहून त्या भूकंपग्रस्तांना मदत करण्याचा प्रयत्न केला.

            दुःखी पिडीतांची सेवा हीच खरी ईश्वराची पुजा समजून आपणही आपल्या परिने सेवा करावी ही विनंती. या कामासाठी ईश्वराने सर्वांना सदबुद्धी द्यावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

आपला,

कि. बा. तथा अण्णा हजारे

दि. 13/08/2019

राळेगणसिद्धी

जीवनावश्यक सेवा पुरविण्याबरोबरच पुनर्वसनाच्या कामाला विशेष प्राधान्य -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

0

5 हजारांच्या रोख मदतीचे उद्यापासून वाटप;स्वच्छतेच्या कामांना सुरूवात

पुणे दि. 12: पुणे विभागातील पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील पूर झपाट्याने ओसरत असला तरी अजूनही तेथील नद्या धोकापातळीच्या वरुन वाहत आहेत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू झाली असून सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला प्राधान्य देण्यात येत आहे. ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांसह पूलांची कामे करून त्यांच्याशी संपर्क पूर्ववत प्रस्थापित करण्याचे काम सुरू आहे. बाधीत ग्रामीण भागाला पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छतेसह पशूवैद्यकीय सेवा विशेष प्राधान्याने देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली. तसेच जादा दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे विभागातील पूरस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. म्हैसेकर बोलत होते.
डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात पावसाचा जोर कमी झाला असून अलमट्टी धरणातून 5 लाख 70 हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, मात्र धरणात 6 लाख 11 हजार क्युसेक एवढी पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पूर पातळी कमी होण्यास वेळ लागत आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या नद्या अजूनही धोका पातळीच्यावर सरासरी पाच फूट वाहत आहेत. विभागातील 147 रस्ते बंद असून 66 पूल पाण्याखाली आहेत. कोल्हापूरशी रस्ते वाहतूक सुरु झाली असून पुणे-बंगळुरू महामार्गावरुन जीवनावश्यक सेवेची वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांनाच सोडण्यात येत आहे.
95 हजार 206 कुटंबांचे स्थलांतर
पुणे विभागातील 584 बाधीत गावातील 95 हजार 206 कुटुंबातील एकूण 4 लाख 74 हजार 226 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांची 596 निवारा केंद्रात त्यांची सोय केलेली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 1 लाख 85 हजार 855, कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख 47 हजार 678, सातारा जिल्ह्यातील 10 हजार 755, सोलापूर जिल्ह्यातील 29 हजार 777 तर पुणे जिल्ह्यातील केवळ 161 लोकांचा समावेश आहे. पुरामुळे विभागात एकूण 43 व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 21 लोक, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी 7 लोक तर सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. सांगली शहरात रविवारी रात्री उशीरा दोन पुरूषांचे मृतदेह अढळून आले असून अद्यापी त्यांची ओळख पटलेली नाही.
वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दपातळीवर
महावितरणच्या माध्यमातून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या पुरामुळे 30 उपकेंद्रातील 412 वाहिन्या, 9 हजार 489 रोहित्रे व 3 लाख 29 हजार 603 ग्राहक बाधीत झाले आहेत. त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 72 हजार 921 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. सध्या शेतीला पाण्याची आवश्यकता नसल्याने कृषक रोहित्रांऐवजी घरगुती वापरांसह इतर प्रकारच्या बंद रोहित्राच्या दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंद असणारा वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी महावितरणच्या बाहेरील पथके बाधीत क्षेत्रात पाहोचली असून त्यांनी काम सुरु केले आहे.
313 एटीममध्ये 25 कोटींचा भरणा
पुरामुळे बाधीत झालेल्या कुटुंबांकडील पासबुक, चेकबुक खराब झाले असल्याचे गृहीत धरून मदत देताना बँकांनी युआयडीच्या माध्यमातून बाधीतांना पैसे देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच शासनाकडून देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानापैकी 5 हजार रुपयांची मदत प्रत्येक कुटंबांना मंगळवार पासून रोख स्वरूपात देण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. तर उर्वरीत रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तसेच बाधित क्षेत्रातील 469 एटीएम पैकी बंद एटीमए यंत्रे दुरूस्त करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. सध्या 313 एटीएम मशिन सुरळीत करण्यात यश आले असून त्यांच्यामध्ये 25 कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. तसेच एसबीआय व ट्रेझरी बँकांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांना तातडीने रक्कम उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही मृत जनावरांचे स्वतंत्र शवविच्छेदन न करता संबंधित बाधीतांना वीमा रक्कम मंजूर करण्याच्या सूचना वीमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येणार नाही.
पाणीपुरवठा योजनांच्या दुरूस्त्यांवर भर
पुणे विभागातील बाधीत झालेल्या पाणी पुरवठा योजना प्राधान्याने दुरूस्त करून पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काम सुरू आहे. सध्या मीरज शहराच्या पाणी पुरवठा योजनेतून सांगली शहराला पाणी पुरवठा करण्यात येत आहे तर कोल्हापूर शहराला शिवाजी विद्यापीठाच्या पंपींग स्टेशनवरून पाणी पुरवठा केला जात आहे. कोल्हापूर आणि सांगली शहरांचा पाणीपुरवठा दोन दिवसात सुरू होईल. तसेच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाणी पुरवठा योजना प्राधान्याने दुरूस्त करण्यात येणार आहेत.
स्वच्छतेच्या कामासाठी ‘बीएमसी’ची मदत
पुरामुळे बाधीत झालेल्या ठिकाणी कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरू नयेत म्हणून स्वच्छतेची कामे सुरू करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी पाणी ओसरले आहे त्याठिकाणी स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनासाठी शॉर्ट टेंडर काढण्यात येणार असून येत्या चार ते पाच दिवसात ती प्रक्रीया पूर्ण करण्यात येईल. मुंबई महानगरपालिकेचे पथक दाखल झाले असून त्यांनी मनुष्यबळासह यांत्रिक साहित्य पुरविले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्यावतीने स्वच्छता कार्मचाऱ्यांची टीम व साहित्य बाधीत भागात रवाना करण्यात आले आहे.
मदतीचे स्टँडर्ड किट…
सामाजिक संस्थांसह वैयक्तिक लोकांकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा मोठा ओघ सुरू आहे. मात्र मदतीच्या माध्यमातून देण्यात येणारे साहित्य पूरग्रस्तांपर्यंत योग्य रित्या वेळत पोहोचविण्यासाठी शासनाच्यावतीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अनेक संस्था, सामाजिक संस्था मदतीचे साहित्य आणून देत आहेत. मात्र ते साहित्य तातडीने पूरग्रस्तांना उपयोगी पडावे यासाठी शासनाच्यावतीने मदतीचे एक स्टँडर्ड कीट तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये टूथपेस्ट, साबणापासून तयार स्वयंपाकाचे सर्व साहित्य असणार आहे. एका किट मधील शिधा एका कुटुंबाला किमान एक आठवडा पुरेल इतका आहे, लागल्यास अतिरिक्त शीधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा प्रकारे मदतीचे स्टँडर्ड किट तयार करून देण्याचे आवाहन सामाजिक संस्थांना करण्यात आल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते पुण्‍यात व्हर्चुअल क्लासरूम स्टुडिओचे उद्घाटन

0

पुणे, दिनांक 12-  शालेय शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण)च्या संकुलात उभारण्यात आलेल्या स्टुडिओचे उद्घाटन केले. या स्टुडिओच्या माध्यमातून नंदुरबार, गडचिरोली, नाशिक आणि पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यांमधील शैक्षणिकदृष्ट्या मागास विभागातील तब्बल ३६ शाळांमध्ये आरएमएसए (समग्र शिक्षा) या प्रकल्पांतर्गत व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून संपर्क प्रस्थापित होणार असून त्याद्वारे ‘व्हर्चुअल क्लासरूम’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी ‘व्हॅल्युएबल ग्रुप’ हा व्हीसॅटआधारित संवादरुपी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करणार आली आहे.

            राज्याचे शालेय शिक्षणमंत्री  शेलार म्हणाले की,  शहरी परिसरातील विद्यार्थ्यांना मिळणारे फायदे,ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यातील पुढचे पाऊल हे व्हर्च्युअल क्लासरूम या प्रकल्पाच्या माध्यमातून टाकण्यात आले आहे.  व्हर्च्युअल क्लासरूम स्टुडिओच्या माध्यमातून 9 जिल्ह्यातील 36 शाळांमधील विद्यार्थ्यांना  तज्ञ शिक्षकांशी  थेट संवाद साधता येणार आहे. सध्याच्या अभ्यासक्रमाचे काही विषयांचे धडे हे व्यक्तिमत्त्वांवर, स्वातंत्र सैनिकांवर तसेच इतिहासातील महान व्यक्तींवर आहेत. या विषयावर प्रावीण्य असलेल्या तज्ञ व्यक्ती, कथाकार किंवा इतिहासकार यांना स्टुडिओत बोलावून व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांशी  संवाद साधून त्यांना हा विषय समजावून देण्यासाठी व विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे

            समान आणि दर्जेदार शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. ही बाब लक्षात घेऊन आरएमएसए (समग्र शिक्षा), एमएससीआरटी आणि व्हॅल्युएबल ग्रुप यांनी संयुक्तपणे पुणे येथे १२ ऑगस्ट २०१९ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शैक्षणिक प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर किती महत्त्वाचा आहे आणि त्या माध्यमातून या चार जिल्ह्यांमधील शिक्षणात दर्जा वाढण्यास कशी मदत होईल, ही बाब अधोरेखित करण्‍यात आली.

            पुणे आणि आसपासच्या भागातील तज्ञ शिक्षक हे या स्टुडिओच्या माध्यमातून दैनंदिन पातळीवर इंग्रजी, गणित आणि विज्ञान यांसारखे विषय दुर्गम भागातील शाळांमधील ९ वी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. व्हर्च्युअल इंटरॅक्शन प्रोग्राम हा प्रकल्प उपग्रहाचा वापर करून उभारण्यात आलेल्या व्यासपीठाच्या माध्यमातून राबविला जातो. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्या माध्यमातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांशी  संवाद साधत शिक्षक त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत त्यांना शिकवतात.

            या कार्यक्रमाला शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव  वंदना कृष्णा तसेच एमएससीइआरटी आणि ‘आरएमएसए’चे अधिकारी उपस्थित होते.

            ‘इनोव्हेशन फंड फॉर सेकंडरी स्कूल’ या केंद्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत आदीवासीबहुल पालघर,नंदुरबार, नाशिक व गडचिरोली या जिल्ह्यांमधील माध्यमिक शाळांमध्ये ‘व्हर्चुअल क्लासरूम’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत ३६ शाळांमध्ये आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच पुण्‍याच्‍या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) येथे स्टुडिओ उभारण्यात आला आहे. ‘क्लासरूम लर्निंग’मध्ये विद्यार्थ्यांना काही विषयांच्या संकल्पना कठीण वाटतात. त्याकरिता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद)  ही तज्ञ शिक्षकांच्या मदतीने वर्गनिहाय नियोजन करत ‘व्हर्च्युअल क्लासरूम’च्या माध्यमातून या शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

            या उपक्रमाची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासून करण्यात येत असून विषयनिहाय शिक्षकांनी स्वतः ‘व्हर्चुअल क्लासरूम’द्वारे वर्ग घेणे अपेक्षित आहे. यासाठी पुणे आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांतील माध्यमिक शाळांमधील अनुभवी व अभ्यासू शिक्षकांची निवड करुन त्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे. हे शिक्षक स्वयंप्रेरणेने विनामानधन हे काम करतात. त्यासाठी त्यांना वर्षअखेरीस राज्यस्तरावरून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. या उपक्रमाची अंमलबजावणी प्रायोगिक तत्वावर करण्यात येत असून हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून राबविला जात आहे.

            या कार्यक्रमाचा मूळ हेतू हा शिक्षणाचा दर्जा वाढवणे आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे,हा आहे. त्या माध्यमातून दुर्गम भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांशीसुद्धा संवाद साधला जातो. हा उद्देश केवळ तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साध्य होऊ शकतो. त्यासाठी व्हॅल्युएबल ग्रुप महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे.

            व्हॅल्युएबल ग्रुपने इतर अनेक राज्यांप्रमाणेच ओडिशा येथील सुंदरगड येथेही ‘व्हर्च्युअल क्लासरूम सोल्युशन’ स्थापन केले असून त्या माध्यमातून दुर्गम भागातील ७० शाळांशी एका स्टुडिओच्या माध्यमातून संपर्क स्थापित केला जातो. या स्टुडिओच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या क्लासरूमद्वारे अत्यंत दुर्गम अशा भौगोलिक भागात असलेल्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी व्हीसॅट सोल्युशनचे तंत्रज्ञान वापरले गेले आहे. तज्ञ शिक्षक या स्टुडिओचा वापर करून नियमितपणे शालेय अभ्यासक्रमाला अनुसरून सत्रांचे आयोजन करतात. त्यात या मागास राज्यातील ७० शाळा सहभागी होतात आणि संवादही साधतात. व्हॅल्यूएबल ग्रुप हा तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्णतेसाठी ओळखला जातो. या समुहाने शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि मनोरंजन या क्षेत्रात असे अनेक उपक्रम दाखल केले आहेत.

पूरग्रस्तांना मदत पोहचविण्यात परिवहन विभागाचा राहील पुढाकार -परिवहनमंत्री दिवाकर रावते

0

पुणे, दिनांक 12- पुण्‍याच्‍या विभागीय आयुक्‍त कार्यालयात आलेली मदत पुरग्रस्‍तांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्‍यावर वाहतुकीचे नियोजन आणि समन्‍वयाची जबाबदारी सोपविण्‍यात आल्‍याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. आज विभागीय आयुक्‍त कार्यालयाला श्री.रावते यांनी भेट देऊन विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांच्‍याकडून मदतीची माहिती घेतली. सांगली आणि कोल्‍हापूर येथील पूरग्रस्‍तांसाठी जमा झालेली मदत अधिकारी सांगतील त्‍या ठिकाणापर्यंत ट्रकमधून योग्‍य पध्‍दतीने पोहोचवण्‍यात येईल, असेही त्‍यांनी सांगितले.
श्री. रावते पुढे म्‍हणाले, पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाने पुढाकार घेऊन एनडीआरएफच्‍या जवानांना पुण्‍यातून पुरग्रस्‍त भागात घेऊन जाण्‍यासाठी 10 बसेस उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या होत्‍या. त्‍या आजही त्‍यांच्‍याकडेच आहे. परिवहन खात्‍यामार्फत 41 ट्रकमधून मदत पाठविण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. एनडीआरएफकरिता 11 इनोव्‍हा गाड्या देण्‍यात आल्‍या. पूरग्रस्‍त भागातील बचाव आणि मदत कार्यासाठी आपत्‍ती विभाग रात्रंदिवस कार्यरत आहे. या विभागातील महिलांना उशिरापर्यंत काम करावे लागते, त्‍यांना घरी सुरक्षित सोडण्‍याची जबाबदारी परिवहन विभागाने घेतली असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
कोल्‍हापूर आणि सांगली येथे पूरपरिस्थिती असतांनाच सातारा जिल्‍ह्यात भैरवगड येथेही डोंगर खचल्याने घरांचे मोठे नुकसान झाले. हे गाव खाली करण्‍यात आले असून गावक-यांनी मंदिरात आश्रय घेतला आहे. गावाकडे जाणारे रस्‍ते खचल्‍याने वाहतूक बंद झाली. या गावाचे पुनर्वसन करण्‍याची गरज असून सध्‍या त्‍यांना तातडीने तात्‍पुरता निवारा उपलब्‍ध करुन द्यावा लागणार असल्याचेही रावते यांनी सांगितले. या गावाला साता-याच्‍या जिल्‍हाधिका-यांनी भेट देऊन पहाणी केली आहे, त्‍यांचा अहवाल आयुक्‍तांकडे येईल, त्‍यानंतर पर्यायी जागा उपलब्‍ध करुन त्‍यांच्‍या पुनर्वसनाचा प्रयत्‍न करावा लागेल, असेही ते म्‍हणाले. भैरवगड येथील गावक-यांसाठी महिला संघटनेमार्फत भोजनाची व्‍यवस्‍था करण्‍यात आल्याबद्दल त्‍यांनी कौतुक केले.

सरकार घाबरायला लागलंय म्हणून जमावबंदी -जयंत पाटील

0

पाण्याखालील ऊसाला १ लाख रुपये तर भात – नाचणीसाठी ४० हजार रुपये अनुदान द्या…

पुरग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि विद्यार्थाची फी माफ करावी…

कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी केली मागणी…

कोल्हापूर दि. १२ ऑगस्ट – सरकार घाबरायला लागलं आहे म्हणून कोल्हापुरात जमावबंदीचा आदेश लागू केलाय अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत केली.

पूरपरिस्थिती सरकारला हाताळता आली नाही. सरकारची मदत खूप उशिरा पोहोचली. बोटी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची होती; पण तसं झालं नाही असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

पूर ओसरल्यानंतर राज्य सरकारने पुरग्रस्तांच्या घराचे पंचनामे तात्काळ करुन मदत करावी. १० हजार आणि १५ हजाराची मदत अत्यंत तोकडी असून
शेतमजुरांना आता लवकर मजुरी मिळणार नाही. त्यामुळे सर्व शेतमजुरांना उदरनिर्वाह करण्यासाठी साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.

प्रत्येकाला एक महिन्याचा रोजगार उपलब्ध करून द्यावा. शिवाय पाण्याखाली गेलेल्या पिकांना तात्काळ मदत करावी. पाण्याखाली असणाऱ्या ऊसाला १ लाख रुपये तर भात आणि नाचणीसाठी ४० हजार रुपये अनुदान द्यावे अशीही मागणी जयंत पाटील यांनी सरकारकडे केली.

पुरग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. विद्यार्थाची फी माफ करून शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

कर्नाटक येथील अलमट्टी धरणातील प्रशासनाने पाणी सोडण्याबाबत जाहीर केलेली आकडेवारी चुकीची आहे अशी जोरदार टीका करतानाच पूरपरिस्थिती हाताळण्यामध्ये सरकार आणि प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका सरकारवर ठेवला.

पूरग्रस्तांसाठी ४४१ तात्पुरता निवारा केंद्रे सुरू

0

मुंबई, दि.१२ : पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील पूरग्रस्त भागातील ४ लाख ६६ हजार ९६३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या नागरिकांसाठी ४४१ तात्पुरता निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या ३३ पथकांसह आर्मी, नौदल, तटरक्षक दलाची एकूण १११ बचाव पथके कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी वैद्यकीय सेवा कार्यरत असल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.

पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये १०५ बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ५४ तर सांगली जिल्ह्यात ५१ पथकांचा समावेश आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग,नाशिक, धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहेत.

पूरग्रस्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील बारा बाधित तालुक्यातील २ लाख ४७ हजार ६७८ तर सांगली शहरासह जिल्ह्यातील चार बाधित तालुक्यातील १ लाख ७३ हजार ८९ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २०८ तर सांगली जिल्ह्यात १०८ तात्पुरता निवारा केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

पावसामुळे पूरस्थितीत असलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये बचाव कार्य जोमाने सुरू आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ११८ गावांमधील ९ हजार ५२१, ठाणे जिल्ह्यामधील सात तालुक्यातील २५ गावांमधील १३ हजार १०४, पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यातील १०८ गावांमधील १३ हजार ५००, नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ५ गावांमधील ३ हजार ८९४, पालघर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील ५८ गावांमधील २ हजार, रत्नागिरी जिल्ह्यातील सात तालुक्यातील १२ गावांमधील ६८७, रायगड जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ६० गावांमधील ३ हजार, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सात तालुक्यातील १८ गावांमधील ४९० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

पूर परिस्थितीमध्ये कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक,पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ७० तालुके बाधीत झाले आहेत. यातील पूरग्रस्त गावांची संख्या ७६१ इतकी आहे. या सर्व ठिकाणी मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

बुशटॉप्सने आजचा दिवस गाजवला

0

पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019

पुणे- पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत बुशटॉप्स या घोड्याने 2000मीटर अंतरावरच्या द ईव्ह चॅम्पियन ट्रॉफी  या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब(आरडब्लूआयटीसी)येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी द ईव्ह चॅम्पियन ट्रॉफी या महत्वाच्या लढतीत फाईव्ह स्टार्स शिपिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी मिस्टर व मिसेस विजय शिर्के, जय शिर्के व के.एन.धंजीभॉय यांच्या मालकीच्या बुशटॉप्स या घोड्याने 2मिनिट 4सेकंद व 742मिनिसेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. याचा एन.एस.परमार हा जॉकी होता, तर एम.के.जाधव ट्रेनर होता.

सविस्तर निकाल
द युनिकॉर्न प्लेट क्लास V
विजेता: पावर ऑफ थोर, उपविजेता: डेझल एन डेज;

द कोलंबियाना प्लेट क्लास V
विजेता: माय प्रिशियस, उपविजेता: जेगर बॉम्ब;

द टू द मेनॉर बेरोन प्लेट
विजेता: बीमर, उपविजेता: पोलारीस;

द पी हॅडो ट्रॉफी
विजेता: एडलीन, उपविजेता: हार्मोनी ऑफ द सी;

द ईव्ह चॅम्पियन ट्रॉफी
विजेता: बुशटॉप्स, उपविजेता:ऍडजुडीकेट

पुण्याचे आघाडीचे कर्करोग शल्यविशारद डॉ. सुमित शहा यांचा ‘प्रॉमिसिंग सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट २०१९’ पुरस्काराने गौरव

0

पुण्यातील प्रोफाईल कॅन्सर सेंटरचे सल्लागार कर्करोग शल्यविशारद डॉ. सुमित शहा यांना नुकतेच ‘प्रॉमिसिंग सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट ऑफ द इय़र – २०१९ इन इंडिया’ हाराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. नवी दिल्लीत झालेल्या सातव्या ग्लोबल हेल्थकेअर एक्सलन्स ॲवॉर्ड्स २०१९ अँड समिट या कार्यक्रमात डॉ. शहा यांना हा पुरस्कार त्यांनी गेली १२ वर्षे ऑन्कॉलॉजी (कर्करोगविज्ञान) क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल ; केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री व  खासदार अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

डॉ. शहा यांनी कर्करोग जागृती व तंबाखू व्यसनमुक्ती यावर विस्तृत काम केले असून तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत शाळा व महाविद्यालयांत अनेक व्याख्याने दिली आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते तंबाखू व्यसनमुक्तीसाठी मोफत बाह्यरुग्ण विभाग चालवत आहेत. ऑन्कॉलॉजी क्षेत्र वृद्धिंगत होत असताना ते अवयव  जतन शस्त्रक्रियांमधील नवीन प्रवाहांचा प्रसार करतात, ज्यायोगे कँसर बारा होण्याबरोबर रुग्णांना उत्तम आयुष्य जगाता येते. इतकेच नव्हे तर डॉ. शहा कर्करोगावरील लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियाही करतात ज्या रुग्णांना वेदनामुक्त ठेऊन कमीतकमी व्रण व जलद स्वास्थ्य देतात. गेल्या पाच वर्षांत त्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या दूरवरच्या भागांतील वंचित क्षेत्रासाठी अनेक मोफत कर्करोग शस्त्रक्रिया केल्या आहेत.

डॉ. शहा यांनी लोकांच्या मनातून कर्करोगाची भीती काढून टाकण्यासाठी, तसेच कर्करोग हा बरा होणारा रोग आहे याची जाणीव करुन देण्यासाठी अलिकडेच पुण्यात प्रोफाईल कॅन्सर सेंटर हे व्यापक कर्करोग रुग्णालय सुरू केले आहे.

कर्करोग हे भारतातील मृत्यूंचे दुसरे प्रमुख कारण आहे. वर्ष २०१८ मध्ये कर्करोगग्रस्त रुग्णांची भारतातील संख्या २२.५ लाख होती. दरवर्षी कर्करोगाच्या ११.५ लाख नव्या रुग्णांचे निदान होते व जवळपास ७.८४ लाख मृत्यू कर्करोगाने ओढवतात. या रोगाची मुख्य कारणे तंबाखू, एचपीव्ही इन्फेक्शन, बदलती जीवनशैली व लठ्ठपणा ही आहेत. पाश्चिमात्य जगात कर्करोगाचे बहुतांश रुग्ण बरे होतात, पण दुर्दैवाने भारतात मात्र बहुतांश रुग्ण त्यांचे उपचार या रोगाच्या उशिराच्या टप्प्यात सुरू करतात.

डॉ. शहा म्हणतात, “या समस्येवर मात करण्यासाठी आपल्याला जागृती करावीच लागेल. मुख्यत्वे लोकांनी त्यांची मानसिकता बदलायला हवी आणि कर्करोग बरा होणारा रोग आहे हे स्वीकारायला हवे. भारतातील सर्वसाधारण कर्करोगांची सर्वसाधारण लक्षणे आपण लक्षात ठेवली तर सुरवातीच्या टप्प्यातच कर्करोगाचे निदान होऊन उपचारांनी हा रोग बरा करता येऊ शकेल.”

ते पुढे म्हणाले, “स्त्रियांमधील स्तनांचा व गर्भाशयमुखाचा कर्करोग, पुरुषांमधीलतोंडाचा, फुप्फुसाचा व पोटाचा कर्करोग हे भारतातील सर्वसाधारण कर्करोग आहेत. गर्भाशयमुखाचा कर्करोग एचपीव्ही लसी देऊन, तोंडाचा कर्करोग तंबाखू व्यसनमुक्तीतून आणि उर्वरित कर्करोग आरोग्यपूर्ण जीवनशैली पत्करुन व लठ्ठपणा टाळून टाळता येतात. भारतातील हे सर्व साधारण कर्करोग हे प्रतिबंधात्मक कारणांमुळे होतात. वेळेवर कृती आणि जागृती वाढवण्याने देशावरील हे कर्करोगाचे ओझे कमी करता येऊ शकते.”

6 रुग्णवाहिका, औषध साठा आणि वैद्यकीय पथक शरद पवार यांच्या उपस्थितीत रवाना

0

पुणे:पूर ओसरल्यावर येणाऱ्या साथींच्या आजारापासून नागरिकांना लागणाऱ्या वैद्यकीय मदतीसाठी,तसेच सर्व प्रकारच्या तातडीच्या उपचारांसाठी राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल कोल्हापूर -सांगली भागात सोमवारपासून कार्यरत राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, पुणे शहराध्यक्ष डॉ सुनील जगताप यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, एस.एम. जोशी फाऊंडेशन , पुणे येथे रुग्णवाहिकाना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा झेंडा दाखवून पूरग्रस्त भागात रवाना केले.खा. वंदना चव्हाण , प्रदीप गारटकर, संजोग वाघेरे ,पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन तुपे, अंकुश काकडे, दिलीप बराटे इ. सह अनेक डॉक्टर्स , पदाधिकारी उपस्थित होते.

सांगली,कोल्हापुर परिसरामध्ये पावसामुळे भयानक परिस्थिती उदभवली आहे.पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे.पूर ओसरला कि विविध आजार पसरण्यास सुरुवात होवू शकते. अशावेळी गावागावात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय मदत लागणार आहे . या साठी राष्ट्रवादी डॉक्टर सेलची सामजिक जबाबदारी म्हणून राष्ट्रवादी डॉक्टर सेल ने वैदयकिय मदत करण्याचे नियोजन केले आहे .तसे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल ने केले आहे . ३०० डॉक्टर्सनी या सेवा कार्यासाठी वेळ देण्याचे ठरवले आहे. तसेच अनेक डॉक्टर्स या आपत्कालीन सेवेत सामील होत आहेत.

८ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉक्टर्स सेलने मदतकार्य करावे ,असे सुचवून मार्गदर्शन केले होते. त्यासाठी औषधांची उपलब्धता व लागणारे सर्व सहकार्य पक्षा तर्फे उपलब्ध केले जात आहे. त्याच बरोबर पुरग्रस्त भागातील स्थानिक डॉक्टर्सशी समन्वय साधून सक्षम आपत्कालीन आरोग्य यंत्रणा राष्ट्रवादी डाँक्टर सेल उभी करणार आहे. त्या साठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट व आ. जगन्नाथ शिंदे मदत करत आहे.

खा.शरद पवार , . आ. जयंत पाटील स आ. अजितदादा पवार, खा. सुप्रियाताई सुळे, आ. जगन्नाथ शिदे व डॉ. नरेंद्र काळे (डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष), डॉ. सुनील जगताप( डॉक्टर सेल अध्यक्ष पुणे), डॉ. शिवदीप उंद्रे, डॉ. राजेश पवार (कार्याध्यक्ष पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.

जाती धर्माच्या आधारे निष्पाप व्यक्तींची हत्या करणारेच दहशतवादी : राहुल डंबाळे

0

पुणे: जाती-धर्माच्या आधारे संघर्ष छेडत मॉब लिंचींग व अन्य प्रकारे निष्पाप लोकांची हत्या करणारेच खरे दहशतवादी असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मॉब लिंचींग विरोधी कायद्याची निर्मिती करावी,असे प्रतिपादन रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्ष नेते राहुल डंबाळे यांनी केले.

रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आयोजित लोकसंवाद यात्रा अंतर्गत पुणे लोणी काळभोर येथे दलित-आदिवासी अत्याचार व मॉब लिंचिंग विरोधी परिषदेचे आयोजन 11 ओगस्ट रोजी करण्यात आले होते.

राहुल डंबाळे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी इंडियन मुस्लिम फ्रंट चे संस्थापक मुनवर कुरेशी, रिपब्लिकन युवा मोर्चाचे विठ्ठल गायकवाड, तसेच युवक क्रांती दलाचे राज्य समन्वयक जांबुवंत मनोहर, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अश्विन दोडके, रुपाली काळभोर, विजया खांडेकर, प्रकाश लांडगे, आनंद रणधीर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील वाढत्या जातीय अत्याचाराच्या घटना तसेच अल्पसंख्यांक मुस्लिम बांधवांवरील हल्ले रोखण्यात राज्य सरकारला पूर्णतः अपयश आले असून, या घटनातील आरोपींना कठोर कायदेशीर शिक्षा व्हावी या प्रकारचे कोणतीच कृती सरकार कडून दिसत नाही. त्यामुळे सरकार बद्दल दलित व अल्पसंख्यांक समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराज असून येत्या निवडणुकांमध्ये याची गंभीर किंमत सरकारला चुकवावी लागेल,असे प्रतिपादनही राहुल डंबाळे यांनी केले.

तसेच लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघातील किमान 50 हजार दलित आदिवासी व अल्पसंख्यांक तसेच अन्य पुरोगामी धर्मनिरपेक्ष व्यक्तींशी संवाद साधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार हे केवळ मुस्लिम द्वेषावर आधारित राजकारण करत असून सुप्रीम कोर्टाचा आपल्या सोईप्रमाणे अर्थ लावत ट्रिपल तलाक आणि शबरीमाला प्रकरणी वेगवेगळी भूमिका घेत आहे. खरंतर सरकार म्हणून सर्वांना विश्वास देणे याऐवजी सरकार दलित व अल्पसंख्यांक समुदायावर दहशत पसरवत असल्याचा आरोप इंडियन मुस्लिम फ्रंटचे मुनवर कुरेशी यांनी केला.

फडणवीस सरकारची एकूण पाच वर्षांची कारकीर्द ही अत्यंत निराशाजनक असून निवडणूक जिंकण्यासाठी ठोस असे अशी कोणतीच कामगिरी नसल्याने फोडाफोडीचे राजकारण तसेच धार्मिक कट्टरता वादाचे राजकारण करून निवडणूक जिंकण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरेल. कारण जनता पूर्णपणे सरकारविरोधी मानसिकतेत असून निवडणुकांमध्ये सरकारला पराभूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु सरकारचा जनता व कामापेक्षा ईव्हीएम वर अधिक भरोसा असल्याने ते निर्धास्त आहेत. अशी टीका युवक क्रांती दलाचे राज्य समन्वयक जांबुवंत मनोहर यांनी केली.

या संवाद यात्रेच्या माध्यमातून रिपब्लिकन व आंबेडकरी चळवळीतील नवतरुणांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न यशस्वी होईल असा विश्वास रिपब्लिकन नेते विठ्ठल गायकवाड यांनी व्यक्त केला .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विन दोडके यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष रफिक इनामदार यांनी केले. आभार शाखा अध्यक्ष स्नेहलताई कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन शाहरुख तांबोळी, इसाक पठाण, आदर्श डंबाळे, योगेश काकडे यांनी केले.

सलग २५ तास करणार देशभक्तीचे जागरण

0
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने आयोजन; शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, कर्मचारी होणार सहभागी
पुणे : ७३व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने ‘सूर्यदत्ता काव्यथॉन २०१९’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजल्यापासून १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत सलग २५ तास देशभक्तीपर गाणी, कवितांचे सादरीकरण होणार आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी स्वयंप्रेरणेने यामध्ये सहभागी होणार असून, संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये हा कर्यक्रम होणार आहे, असे ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले. या उपक्रमाची नोंद ‘गोल्डन बुक वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी सल्लागार सचिन इटकर, संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, प्राचार्य अजित शिंदे, नूतन गवळी आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “संस्थेशी संलग्नित प्रत्येक विद्यालय यात सहभागी होत असून, फँशन टेक्नॉलॉजीतर्फे ‘विविधतेतून एकता’ संकल्पनेवर फँशन शो आयोजिला आहे. भारतातील विविध राज्यांची प्रादेशिक वेशभूषा, ‘स्वदेशी’ संकल्पनेत खादीपासून बनवलेले, भरतकाम केलेले कपडे, तसेच आधुनिक कपड्यांच्या साहाय्याने रेखाटलेला तिरंगा ध्वजाचे  यांचे सादरीकरण पहावयास मिळणार आहे. यासाठीची सर्व सामुग्री विद्यार्थ्यांनी बनवलेली आहे. ‘वॉक द हीरो’मधून स्वातंत्र्यलढ्यातील प्रभावशाली व्यक्तींचे दर्शन घडणार आहे. हातमागावरील साड्या परिधान करून विद्यार्थिनी रॅम्पवाक करतील. यासह राखी बनवणे, मेहंदी/रांगोळी काढणे, ज्वेलरी बनविणे, पोस्टर बनवणे अशा विविध उपक्रमांची जोड या कार्यक्रमाला असणार आहे. इंटिरियर डिझाइनचे विद्यार्थी कॅनव्हासवर लाइव्ह पेंटिंग, देशभक्तीविषयक पोर्ट्रेट काढणार आहेत. हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी वैविध्यपूर्ण पाककला संस्कृती दाखवतील. व्यवस्थापनाचे विद्यार्थी ‘स्टेट इकॉनॉमी एक्स्पो’, डिफेन्स एक्स्पो भरविणार आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटचे विद्यार्थी संस्थेचा परिसर सजवणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी स्वातंत्र्यपूर्व-स्वातंत्रोत्तर काळातील प्रभावशाली व्यक्तींवर माहितीसह फोटो प्रदर्शन भरविणार आहेत. त्याचबरोबर विज्ञान, क्रीडा, राजकारण, मनोरंजन, कृषी, समाजकारण अशा विविध क्षेत्रातील नामांकीत आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या व्यक्तींचे ‘ब्रँड्स ऑफ इंडिया’ प्रदर्शन भरविणार असल्याचे डॉ. चोरडिया यांनी नमूद केले.
सचिन इटकर म्हणाले, “स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागवणारा हा अनोखा उपक्रम सूर्यदत्ताने हाती घेतला आहे. त्यामुळे दोन दिवस सूर्यदत्ता संस्थेचा परिसर देशप्रेमाने भारावून जाणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासह त्यांच्यात सामाजिक भान आणि राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. ‘काव्यथॉन’मधून क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक आणि सीमेवरील सैनिकांच्या बलिदानाची आठवण व्हावी, त्यांच्याप्रती आदर निर्माण व्हावा, त्यातून विद्यार्थ्यांना एकात्मतेचे महत्व समजावे, या उद्देशाने दोन दिवसांचा उपक्रम आयोजिला आहे. सलग २५ तास गाण्यांतून, कवितांमधून देशप्रेमाचे जागरण करण्याची ही पहिलीच वेळ असावी. संस्थेतील बारा विद्याशाखांमधील विद्यार्थी एकमेकांशी समन्वय साधून आपल्या क्षेत्राशी संबंधित काम करणार आहेत. त्यामुळे त्यांना प्रात्यक्षिक, तसेच आयुष्यातील अविस्मरणीय उपक्रम राबविल्याचा अनुभव मिळणार आहे.”
पूरग्रस्त भागातील ७२ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणार : डॉ. चोरडिया
कोल्हापूर-सांगली जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागातील ७२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट स्वीकारणार आहे. या पूरग्रस्तांना सगळीकडूनच मदतीचा हात दिला जात आहे. त्यामध्ये आर्थिक मदतीबरोबरच कपडे, अन्नपदार्थ, औषधे यासह जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. परंतु, या पुरामुळे तेथील विद्यार्थ्यांचे शालेय साहित्यही वाहून गेले आहे. त्यामुळे या भागातील एकूण ७२ मुलांच्या शिक्षणाचा खर्च सूर्यदत्ता संस्थेकडून केला जाणार आहे. त्यांना संस्थेत प्रवेश देऊन मोफत शिक्षण व निवास व्यवस्था केली जाणार आहे, असे डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले. पुण्यातील इतर शैक्षणिक संस्थांनीही सूर्यदत्ता संस्थेप्रमाणे पुढाकार घेऊन पुरग्रस्तांच्या मुलांच्या शिक्षणास हातभार लावावा, असे आवाहन सचिन इटकर यांनी केले.

‘देवदूत ‘चा अहवाल दडवलेल्या अतिरिक्त आयुक्तांना भेटले तब्बल ३ ‘टीचकुले अँँड टीचकुले’

0

पुणे -अक्षय कुमारचा ‘खट्टा मिठा ‘ अनेकदा टीव्ही वर असतो..  त्यातला अक्षय कुमार ने  साकारलेला टीचकुले नावाचा ठेकेदार अनेकांच्या लक्षात राहिला असेल ..पाहिला असेल ..असे  तब्बल ३ टीचकुले महापालिकेत नव्याने आलेल्या  अतिरिक्त आयुक्तांवर  प्रत्यक्ष पाहण्याची वेळ आली .अर्थात ३ दिवसात ,किंवा आठवड्यात जे ‘देवदूत ‘ नावाच्या भ्रष्टाचारी बकासुराचा अहवाल देणार होते पण हा अहवाल जाहीर न करता ज्यांनी दडवून ठेवला अशाच अतिरिक्त आयुक्तांना हे १ नाही २ नाही तर तब्बल तीन टीचकुले भेटले ….

“साहेब, सरकारच्या निर्णयानुसार, बिगाऱ्यांना किमान वेतन द्यावे लागते. मात्र, हे काम मिळवायचे असल्यास आम्हाला नगरसेवकांनाही टक्‍केवारी द्यावी लागते. त्याशिवाय, कोणतेही काम करता येत नाही,’ अशा थेट शब्दात महापालिकेच्या झाडणकामासाठी निविदा भरलेल्या ठेकेदारांनी तीनही अतिरिक्‍त आयुक्‍तांसमोर पालिकेतील टक्‍केवारीचीच कबुली दिली. त्यामुळे काहीवेळ हे अतिरिक्‍त आयुक्‍तही शांतच झाले. हा प्रकार 2 आठवड्यांपूर्वी महापालिकेत घडला आहे.

महापालिकेकडून 2019-20 या आर्थिक वर्षासाठी प्रशासनाकडून क्षेत्रीय कार्यालयस्तरावर तब्बल 50 कोटींच्या निविदा काढल्या आहेत. शहरातील रस्ते तसेच पडीक हद्दीचे झाडणकाम दैनंदिन स्वरूपात केले जाते. त्यासाठी पालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ठेकेदार नेमून हे काम केले जाते. त्यासाठीच्या निविदा प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर काढल्या असून 15 पैकी 8 क्षेत्रीय कार्यालयांच्या निविदा 10 निविदा रकमेपेक्षा 10 टक्‍के अधिक आल्या आहेत. त्यामुळे ठेकेदारांशी चर्चा करून त्यांना जास्तीत जास्त 9.99 टक्‍के दर देण्यासाठी आयुक्‍तांच्या आदेशानुसार, अतिरिक्‍त आयुक्‍त रूबल अग्रवाल, डॉ. विपीन शर्मा आणि नवनियुक्‍त आयुक्‍त शान्तनू गोयल यांनी क्षेत्रीय अधिकारी, परिमंडळ प्रमुख तसेच या निविदा भरलेल्या ठेकेदारांची संयुक्‍त बैठक झाली. यावेळी अतिरिक्‍त आयुक्‍तांनी ,ठेकेदारांनी महापालिकेच्या विनंतीनुसार, हे काम करावे अशी विनंती केली.

आग लागलेल्या जग्वार जहाजातून , जीव वाचवण्यासाठी 29 कर्मचाऱ्यांनी मारल्या समुद्रात उड्या

0

विशाखापट्टनम(तेलांगाना)- कोस्टगार्ड जहाज जगुआरमध्ये आज(सोमवार) सकाळी भीषण आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे जहाजावर एकच गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांना आग नियंत्रणात आणता आली नाही, त्यामुळे जीव वाचवण्यासाठी 29 कर्मचाऱ्यांनी समुद्रात उड्या मारल्या. त्यानंतर भारतीय कोस्टगार्ड विभागाने 28 क्रू मेंबर्सना वाचवले, पण एक अद्याप बेपत्ता आहे. सध्या त्या बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

कोस्टगार्डनी सांगितले की, सकाळी 11.30 वाजता जहाजावर अचानक मोठा स्फोट झाला आणि सगळीकडे धुर पसरला. जीव वाचवण्यासाठी क्रु मेंबर्सना समुद्रात उड्या माराव्या लागल्या. कोस्टगार्डचे दुसरे जहाज “रानी राशमोनी” त्याच परिसरात फिरत होते. ते जहाज यांना वाचवण्यासाठी आले. 29 पैकी 28 क्रु मेंबर्सना वाचवण्यात यश आले, पण 1 बेपत्ता झाला आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयातून पाठविले ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू

0

पुणे: पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या पूरग्रस्त मदत केंद्रातून आतापर्यंत 32 ट्रक जीवनाश्यक वस्तू कोल्हापूर व सांगली येथे पाठविण्यात आले आहेत.

उपायुक्त श्रीमती निलिमा धायगुडे यांच्या देखरेखीखाली मदत केंद्राचे कामकाज सुरु असून विविध संस्था, संघटना व दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात मदत होत आहे.

प्रसिद्ध चित्रपट अभिनेता सुबोध भावे याने  आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेऊन पूरग्रस्तांना मदत करण्याची ईच्छा व्यक्त केली. सध्या पूरग्रस्तांना कोणत्या वस्तू व साहित्याची आवश्यकता आहे, याची माहिती जाणून घेतली व पूरग्रस्त सहाय्य मदत केंद्राला भेट दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाने त्यांना आवश्यकता असणाऱ्या वस्तूंची यादी दिली.

आपले बांधव पुरामुळे अडचणीत सापडले आहेत. अशा बिकट प्रसंगी आपण सर्वांनी मदतीसाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. ही दुर्घटना हृदय हेलावून टाकणारी असल्याची भावना श्री. भावे यांनी यावेळी व्यक्त केली.

रोजच्याप्रमाणे आजही विभागीय आयुक्त सकाळपासून आपल्या अधिकाऱ्यांसमवेत व्यस्त होते. दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची सूचना ते देत होते. यावेळी उपायुक्त प्रताप पाटील, संजयसिंह चव्हाण, दिपक नलावडे, निलिमा धायगुडे, चंद्रकांत गुडेवार, जयंत पिंपळगावकर, महा ऊर्जाचे प्रादेशिक संचालक महेश आव्हाड, नगरपालिका प्रशासन विभागाचे उपसंचालक प्रशांत खांडकेकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पूराचे पाणी ओसरत आहे. या पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत, वस्तू व सेवा-सुविधा गतीने पोहोचविणे आवश्यक आहे. यापुढे मदत पोहोचविण्याबरोबरच आरोग्य सेवा पुरविणे तसेच साफ-सफाईवर भर देणे गरजेचे आहे. साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने या भागातील साफ-सफाईची कामे करुन घेऊन कचरा हटवून निर्जंतुकींची कामे गतीने करावीत. पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने दुरुस्ती व अन्य कार्यवाही करावी. वीज पुरवठा खंडीत असणाऱ्या भागातील वीज पुरवठा तात्काळ सुरु करावा. पुराचे पाणी ओसरलेल्या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरु कराव्यात. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना आवश्यक सेवा-सुविधा गतीने पोहचविण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.

हे जनरल डायरचे सरकार आहे का?’ नवाब मलिक यांचा सरकारला सवाल

0

मुंबई – एकीकडे शेतकर्‍यांना ‘ऐ तू गप्प बस’ अशा धमक्या आणि दुसरीकडे पुरग्रस्त भागातील जनतेचा रोष दाबण्यासाठी भाजपाने जमावबंदीचा आदेश काढला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

हे सरकार जनरल डायरचं सरकार आहे का? असा संतप्त सवाल करतानाच अशा जनरल डायर सरकारला घाबरुन न जाता त्यांना उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत अशा शब्दात नवाब मलिक यांनी भाजप सरकारचा समाचार घेतला.

पुरग्रस्त भागात 12 ते 24 ऑगस्ट दरम्यान जमावबंदी
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुलमंत्री चंद्रकांत पाटील हे शेतकऱ्यांना दमदाटी करत आहेत तर दुसरीकडे सरकारने पुरग्रस्त भागात 12 ते 24 ऑगस्ट दरम्यान जमावबंदी आदेश निर्गमित केला आहे. सरकारच्या या हुकुमशाही पद्धतीवर नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांना अशी दमदाटी करा किंवा जमावबंदी आदेश काढा आम्ही घाबरणार नाही. उलट जनताच याचं उत्तर द्यायला तयार आहे असेही नवाब मलिक म्हणाले.