विद्यार्थ्यांकडून बस चालकांसमवेत राखी पौर्णिमा साजरी
ईशान खानचा करिष्मा नागपूर शहर पोलिसांच्या वेलफेर शो मध्ये
वृक्ष लागवड अभियानात लोकसहभाग महत्त्वपूर्ण- आमदार माधुरी मिसाळ
लायन्स क्लब पुणे सारसबाग आणि पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या वतीने गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर परिसरात सुमारे दीडशे पिंपळ वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यावेळी माधुरी मिसाळ बोलत होत्या. प्रसंगी लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनलचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, माजी प्रांतपाल फत्तेचंद रांका, नगरसेवक प्रवीण चोरबेले, राजश्री शिळीमकर, बाळासाहेब ओसवाल, पोपटलाल ओस्तवाल, क्लबचे अध्यक्ष नितीन मेहता, आशा ओसवाल, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य दत्तात्रय पोळेकर, डिस्ट्रिक्ट अॅक्टिविटी चेअरपर्सन योगेश कदम, विकास काळे आदी उपस्थित होते. रघुनाथ ढोले यांनी झाडे दिली.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, “लायन्स क्लबचे सामाजिक काम मोठे आहे. बारावीपर्यंत माझे शिक्षण लायन्सच्या शिष्यवृत्तीवर झाले. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, स्वच्छ भारत आदी क्षेत्रात लायन्स क्लबने उल्लेखनीय कार्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी लायन्सचे हे काम पूरक आहे.”
ओमप्रकाश पेठे म्हणाले, “सारसबाग आदर्श असा क्लब आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधीना बरोबर घेऊन काम करत असल्याने ते अधिक चांगले होते. झाडे लावणे सोपे आहे. पण त्याची निगा राखणे हे महत्त्वाचे आहे. झाडांच्या संरक्षणासाठी पिंजरे बसवल्याने ही दीडशे झाडे बहरतील आणि भविष्यात सावली देतील.”
राजश्री शिळीमकर, दत्तात्रय पोळेकर, नितीन मेहता यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. फतेचंद रांका यांनी प्रास्ताविकात क्लबतर्फे राबविण्यात येणाऱ्या डायलिसिस, आरोग्य तपासणी, रक्तदान, गणेश विसर्जन मिरवणूकीदिवशी ३००० पोलीस मोफत जेवण, महिलांसाठी प्रदर्शन आदी उपक्रमांची माहिती दिली. संतोष पटवा सूत्रसंचालन केले. विकास काळे यांनी आभार मानले.
शेतकऱ्यांनी ‘जीएम’ऐवजी पारंपरिक वाण वापरावीत
‘अँटी करप्शन कमिटी’तर्फे पूरग्रस्तांना मदत
पुणे : कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत. या पूरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तूंची आवश्यकता आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अँटी करप्शन कमिटी, महावीर फूड बँक, एमईएस भिशी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांना चादरी, साड्या कपडे, औषधे अशी मदत संकलित करण्यात आली. संकलित केलेली ही सर्व मदत भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. तृप्ती देसाई यांच्या माध्यमातून ही मदत चंदगड, गडहिंग्लज, शिरोळ, हेब्बाळ, आरळगुंडी आदी पूरग्रस्त गावांना पोहोचविण्यात येणार आहे. यावेळी अँटी करप्शन कमिटीचे पुणे शहर अध्यक्ष सूर्यकांत फाळके, दक्षता अधिकारी अविनाश चिवटे, महावीर फूड बँकेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, उपाध्यक्ष शांतीलाल देसर्डा, ऍड. ईश्वर बोरा, विजय चोरडिया, प्रमोद छाजेड, सतीश सुराणा, अनंत फाळके, नयन मक्तेदार उपस्थित होते. एक हजार वह्या-पेन आणि इतर शालेय साहित्य संस्थेच्या वतीने गरजू मुलांना पाठविण्यात येणार असल्याचे विजयकुमार मर्लेचा यांनी सांगितले.
कोथरूड भूषण’ पुरस्कार २०१९ मेजर डॉ. विपुल पाटील यांना जाहीर
पूरग्रस्त शिरगावला ‘कॅटलिस्ट फाउंडेशनकडून दोन ट्रक जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पुणे : ता.१७. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य …. पाण्याखाली गेलेली शेती….पडलेल्या भिंती… उध्वस्थ झालेले संसार … मरण डोळ्यासमोर पाहिलेले असूनही परिस्थितीशी दोन हात करायला कंबर कसून उभा राहिलेले गावकरी हे चित्र आहे सांगली जिल्ह्यातील शिरगाव गावचे. शंभर टक्के पूर बाधित असणाऱ्या या गावात ‘कॅटलिस्ट फाऊंडेशन’ मार्फत मदत पोहचवण्यात आली. हवलदार वस्ती येथे तर सर्वात प्रथमच कॅटलिस्टमुळे मदत पोचली.
कृष्णा नदीच्या पोटात असल्याने सांगलीच्या वाळवा तालुक्यातील शिरगाव, हवलदार वस्ती, शिंदे वस्ती, नागठाणे या गावांना दरवर्षी पुराचा सामना करावा लागतो. या वेळी मात्र कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे धन धान्याने भरलेली घरे, जनावरांचे गोठे, कष्टाने पिकवलेली शेती, काडी –काडी जमवून उभा केलेला संसार सर्व वाहून गेले. रस्ते बंद असल्याने आजवर प्रशासनामार्फत किंवा स्वयंसेवी संस्थांमार्फत येणारी मदत गावात पोहचली नव्हती. गावांना जोडणारे रस्ते खुले होताच, दोन ट्रक जीवनावश्यक साहित्य कॅटलिस्ट फाऊंडेशन मार्फत देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सुनील माने, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक अजय खेडेकर, किरण दगडे पाटील, संस्थेच्या सचिव लक्ष्मीकांता माने, सदस्य समीर भुते, मिलिंद मोरे, नितीन मोनंदा, यांच्यासह पत्रकार वैभव सोनवणे, डेविड कॅड, रोनित वाघ, सचिन भुंडे पाटील, सचिन दगडे पाटील, यांनी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन लोकांशी संवाद साधला तसेच त्यांना मदत दिली. पुणेकरांनी दिलेल्या या मदतीमुळे गावकरी भावूक झाले.
खासदार गिरीश बापट या संस्थेचे पालक तर लष्करी सेवेतून सेवानिवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल डी.बी शेकटकर या संस्थेचे मेंटॉर आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील होती. संस्थेच्या वतीने पुणेकरांनाही मदत देण्याचे आवाहन करण्यात आले होते. पूर ओसरल्यानंतर लोकांना कपडे व स्वच्छतेच्या साहित्याची आवश्यक असल्याने संस्थेमार्फत महिला, पुरुष तसेच लहान मुला – मुलींची अंतरवस्त्रे,सॅनिटरी नॅपकीन, टॉवेल, टी शर्ट, साड्या, शर्ट, लहान मुलांसाठी कानटोप्या, महिलांसाठी स्टोल, परकर, पडदे, बेडशीट,पत्रावळ्या, धान्य, खाद्यपदार्थ, मसाले,खाद्यतेल, टूथपेस्ट, टूथब्रश, कपड्याचे आणि अंगाचे साबण,तसेच स्वच्छतेसाठी फिनेल, खराटे,ब्लिचिंग पावडर,हातमोजे,आणि प्रथोमपचारासाठी काही औषधांचे कीट यासारख्या वस्तूंचे ही वाटप करण्यात आले.
पुरामुळे सर्वच गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सर्वांनाच मदतीची आवश्यकता होती. मात्र मदत घेऊन गेल्यानंतर कोणत्याही प्रकारची गडबड, दंगा न करता गावकऱ्यांनी आमच्या कडून येणारी मदत रांगेत उभा राहून स्वीकारली. गावाच्या आजूबाजूला असणाऱ्या वाड्या वस्त्यांवर मदत मिळत नसल्याने येथील लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतय. त्यामुळे मदत घेऊन जाणाऱ्या लोकांनी वाड्या वस्त्यांपर्यंत मदत पोहचवावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनील माने यांनी केले.
पुरग्रस्त कुटुंबासाठी कॅटॅलिस्ट फाउंडेशनकडून 2 ट्रक जीवनावश्यक साहित्य रवाना
पुणे- पुरग्रस्त कुटुंबासाठी कॅटॅलिस्ट फाउंडेशनकडून खासदार गिरीश बापट आणि भाजपा नगरसेवक यांच्या प्रमुख सक्रिय उपस्थितीत 2 ट्रक जीवनावश्यक साहित्य रवाना करण्यात आले.
कॅटॅलिस्ट फाउंडेशनचे सुनील माने यांनी सांगितले की,पुरामुळे संकटात सापडलेल्या गावांना मदतीचा हात देण्याच्या निश्च्याने आम्ही काही दिवसांपासून खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतो. पुणेकरांना ही आम्ही मदतीचे आवाहन केले होते. आज दोन ट्रक मदत आम्ही सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात रवाना केली.
या साहित्या मध्ये महिला,पुरुष, लहान मुलं मुली यांची आंतरवस्त्रे, टी शर्ट, साड्या, शर्ट, लहान मुलांसाठी कानटोप्या, महिलांसाठी स्टोल, टॉवेल, परकर, सॅनिटरी नैपकीन,हातमोजे,पत्रावळ्या, बिस्कीट, तांदूळ, टूथपेस्ट, टूथब्रश, कपड्याचे आणि अंगाचे साबण,बिस्कीट, मॅगी, भडंग, मसाले, हाळदपूड, मीठ, मसाले, शेंगदाणे, तांदूळ, आटा, बेसन, खाद्यतेल, व इतर खाद्यपदार्थ, फिनेल, खराटे, ब्लिचिंग पावडर यासारख्या वस्तू पाठवन्यात आल्या आहेत.
यावेळी खासदार गिरीश बापट, कॅटॅलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने, सचिव लक्ष्मीकांता माने, पुणे महानगर पालिकेच्या शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर, नगरसेवक उमेश गायकवाड, दीपक पोटे, सुशील मेंगडे, किरण दगडे पाटील, अजय खेडेकर, आदित्य माळवे, प्रल्हाद सायकर, क्रीडा अधिकारी सुहास पाटील, रतन बालवडकर, राघवेंद्र मानकर, समीर भूतकर, मिलिंद मोरे, नितीन मोलंदा, डॉ. राजेश देशपांडे, अमित सोनावणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. लोकांच्या दुःखातून सावरण्याचा छोटासा प्रयत्न ही संस्था यानिमित्ताने करत आहोत. असे यावेळी खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.
पुण्यातून शिवसेनेला शिवाजीनगर आणि हडपसर मतदारसंघ …?
पुणे – विधानसभेसाठी युती होणार, हे स्पष्ट असले तरी 8 पैकी कोणते मतदारसंघ भाजपकडून शिवसेनेला सोडण्यात येणार यावर चर्चा रंगत असताना शिवाजीनगर आणि हडपसर हे दोन विधानसभा मतदार संघ सेनेला देण्यास मुख्यमंत्री अनुकूल असल्याचे वृत्त आहे . यामुळे विद्यमान आमदार विजय काळे आणि योगेश टिळेकर यांचे राजकीय पुनर्वसन नेमके कसे होणार ? कि होणार नाही यावर देखील चर्चा होते आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युती आणि जागावाटपावर नुकतेच भाष्य केले. त्यावेळी त्यांनी ” निवडणुकीत युती होणार आहे. विद्यमान आमदारांचे मतदारसंघ बदलण्यात येणार नाहीत. उर्वरित मतदार संघ निम्मे वाटून घेण्यात येतील,’ असे स्पष्ट केले. हा फॉर्म्युला मान्य केला, तर पुण्यात सध्या आठही जागांवर भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे सध्या शिवसेनेला संधी मिळेल, अशी शक्यता कमी आहे. तर, शहरातील प्रत्येक आमदार “विधानसभा मीच लढविणार’ असे स्पष्ट सांगत आहे.असे असले तरी सर्वाधिक टांगती तलवार विजय काळे आणि योगेश टिळेकर यांच्यावर असल्याचे त्यांनाही ठाऊक असल्याचा दावा देखील केला जातोय . याच अनुषंगाने शिवाजीनगर आणि हड़पसर येथून शिवसेनेच्या इछुकांनी काम सुरु केल्याचे सांगण्यात येते आहे,.
पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना ७ कोटी १४ लाख ९५ हजार रुपयांचे वाटप
गहू व तांदुळ २२९६ क्विंटल तर १० हजार २५१ लिटर केरोसिनचे वाटप
पुणे दि. १५: पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार प्रमाणे ७ कोटी १४ लाख ९५ हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत. २२ हजार ९६२ कुटुंबांना २ हजार २९६ क्विंटल गहू व तांदूळ आणि १० हजार २५१ लिटर केरोसिनचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागात पूरस्थिती निर्माण झाल्यापासून सातत्याने लक्ष ठेवून आहोत. पूरग्रस्तांना लागणारी मदत व करावयाच्या उपाय-योजनाबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात येत आहेत. पुणे विभागाचे आयुक्त म्हणून शासनाने आपणास जे अधिकार दिले आहेत, त्याची ताततडीने अंमलबजावणी करण्यात येत असून आवश्यकते प्रमाणे अधिकारी व कर्मचारी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पाठविण्यात आले असल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, दोन्ही जिल्ह्यातील पूरस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तातडीने मदत म्हणून प्रत्येक कुटुंबास ५ हजार रुपये रोख रक्कम देण्यात येत असून उर्वरित रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. आता पर्यंत विभागातील १४ हजार २९९ कुटुंबांना या रकमेचे वाटप करण्यात आले असून उर्वरित पूरग्रस्तांना मदतीच्या वाटपाचे काम सुरूच आहे.
सांगली जिल्ह्यात ३ लाख ११ हजार २२० तर कोल्हापूर जिल्ह्यात ४ लाख ३ हजार ४३५ व्यक्तींचे सुरक्षितस्थळी हलवून त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. पुरामुळे आतापर्यंत पुणे विभागात ५१ व्यक्ती मृत्यूमुखी पडले असून ४ जण बेपत्ता झाले आहेत. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक २४ तर १० जण कोल्हापूर जिल्ह्यातील व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश आहे. सातारा जिल्हा व पुणे जिल्हा प्रत्येकी ८ जण तर सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश आहे. बेपत्तांमध्ये सांगलीतील एक, कोल्हापूमधील दोन व पुण्यातील एकाचा समावेश आहे.
रस्त्यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास सांगली जिल्ह्यातील ४७ बंद रस्त्यांपैकी ३२ रस्ते वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ८८ पैकी ६२ रस्ते खुले झाले आहेत. एसटी वाहतुकीच्या बाबतीत सांगली जिल्ह्यातील बंद ४५ मार्गांपैकी ३७ मार्ग सुरू झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात ३१ पैकी २३ मार्ग सुरू करण्यात आले आहेत.
बँकीग सेवेच्या बाबतीत सांगली जिल्ह्यात ३२९ एटीएमपैकी २२६ एटीएम सुरु झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात ६४७ पैकी ३२० एटीएम सुरु झाले आहेत. पुरामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. हे काम लगेच युध्द पातळीवर सुरू करण्यात आले असून त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील २४ उपकेंद्र, ३ हजार ९७ रोहित्र व १ लाख ५८ हजार ६५१ बिगर कृषी ग्राहकांचा विद्युत पुरवठा महावितरणने पुर्ववत केला आहे. तर सांगली जिल्ह्यात ११ उपकेंद्र, २ हजार ४९६ रोहित्र व १ लाख २२ हजार ८५३ ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी
मुख्यमंत्री सहायता निधी करिता पुणे विभागातील आयुक्त कार्यालयात आतापर्यंत ६ लाख २५ हजार इतक्या रकमेचे धनादेश विविध संस्था व व्यक्तींकडून प्राप्त झाले आहेत. या व्यतिरिक्त कपडे, बिस्कीट, पाण्याच्या बाटल्या, दूधपावडर आदी जीवनावश्यक साहित्य व वस्तू स्वरूपात प्राप्त होत असून आजपर्यंत सांगलीसाठी ४३ तर कोल्हापूरसाठी ४० ट्रक असे एकूण ८३ ट्रकव्दारे मदतीचे साहित्य पाठविण्यात आले आहेत.
सध्या औषध व उपचाराची आवश्यकता पाहून मोठ्या संख्येने वैद्यकीय पथके पाठविण्यात आली आहेत. सांगली जिल्ह्यात १७४, कोल्हापूर जिल्ह्यात १६९ तर सातारा जिल्ह्यात ७२ अशी एकूण ४१५ वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.
घराच्या पडझडीच्याबाबतीत सर्व्हेक्षणाचे काम सुरू असून प्राप्त माहितीनुसार सांगली जिल्ह्यात पूर्णत: पडझड झालेल्या घरांची संख्या ११ असून १ हजार ८२९ घरांची अंशत: पडझड झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ५८८ पूर्णत: तर ९ हजार ४१३ अंशत: घरांची पडझड झाली आहे. शिवाय ३२७ गोठ्यांची पडझड झाली आहे.
पुणे जिल्ह्यात १७ लाख ५० हजार रुपये ३५० ग्रामीण भागातील कुटुंबांना, सातारा जिल्ह्यातील ५६६ ग्रामीण कुटुंबांना, २८ लाख ३० हजार तर सोलापूर जिल्ह्यातील ३९८ ग्रामीण भागातील कुटुंबांना १९ लाख ९० हजार रुपयांचे ५ हजार रुपये प्रमाणे वाटप करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागात ६ हजार ३३५ तर शहरी भागातील २ हजार २३३ कुटुंबांना ४ कोटी २८ लाख ४० हजार रूपयांचे ५ हजार प्रमाणे वाटप झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग ४ हजार १३० तर शहरी भागातील २८७ कुटुंबांना २ कोटी २० लाख ८५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मदतीच्या वाटपाचे काम अजूनही सुरू असल्याची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.
सांस्कृतिक कार्य खात्यात “हौशे, नवशे, गवशे”ची परंपरा कायम..!
पूर्ण वेळ “संचालक” शोधण्यास अधिकारी हतबल..!!
मुंबई- आज एक महिना पूर्ण झाला तरी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा कारभार हाकण्यासाठी पूर्ण वेळ ” संचालक” सांस्कृतिक कार्य खात्यातील अधिकाऱ्यांना दुर्बिण लावून ही सापडेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संचालनालयामध्ये “हौशे, नवशे, गवसे”ची परंपरा कायम राहणार असल्याचे दिसते.
न. नि. पटेल हे सन २००० च्या दरम्यान संचालक पदावरून सेवानिवृत्त झाले. त्या नंतर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच अधिकाऱ्यांनी संचालकपदाची जबाबदारी सांभाळतांना, कलावंतांचे हित जपले. त्यांच्यासाठी अनेक योजना मार्गी लावल्या. मात्र काही संचालक आणि सहसंचालक केवळ आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी या पदावर रुजू होतात, हे अनेक वेळा निदर्शनास आले आहे.
आपली मुलं मुंबईत शिकतात अन् अचानक मुंबई बाहेर बदली झाली की कौटुंबिक अडचण निर्माण होते. मुंबई बाहेर जाण्यापेक्षा कुठंच काही नाही तर सांस्कृतिक कार्य संचालनालयात काही महिने काम करायचे, अशी धारणा काही अधिकाऱ्यांची असते. अनेक अधिकारी संचालनालयामध्ये रुजू झाल्यावर मनासारखे केंव्हाही.. कुठेही कार्यक्रमाच्या नावाखाली वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन, भ्रमंती करण्याची संधी उपलब्ध होते म्हणून येतात. तर काही अधिकारी आपल्या मूळ खात्यांमध्ये वरिष्ठांशी जमत नाही किंवा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणून ती पीडा टाळण्यासाठी सांस्कृतिक कार्याची सुखासुखी सेवा करायला उत्सुक असतात. आतापर्यत असे खूप कमी संचालक आणि सह संचालक या सांस्कृतिक कार्य संचालनालयाला मिळाले आहेत की, खरोखर त्यांना कलेबद्दल आत्मीयता आहे किंवा लोककलावंतांसाठी काही तरी करावे, म्हणूनच जीव ओतून काम केले. याबद्दल त्यांचे अजूनही कलावंत नाव काढत आहेत. मात्र त्यापेक्षा अधिक या खात्याला केवळ “हौशे नवशे गवशे”अशा स्वरूपाचे संचालक आणि सहसंचालक मिळाले आहेत. असे अधिकारी कधी आले आणि कधी गेले, हे शेवट पर्यत कुणालाच कळत नाही.
श्रीमती स्वाती काळे ह्या दि. ११ जुलै २०१९ रोजी संचालक पदावरुन कार्यमुक्त झाल्या आहेत. सध्या या पदाचा कार्य पद”भार” सहसंचालक सांभाळत असून विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण वेळ संचालक देण्याची मानसिकता संबंधित अधिकाऱ्यांची दिसत नाही. मात्र जर पूर्ण वेळ संचालक मिळाला नाही तर अनेक योजनांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग याला जबाबदार कोण राहणार आहे ?
सांस्कृतिक कार्य खात्यातील काही अधिकारी ठरवून या पदावर पूर्ण वेळ संचालक येवू नयेत म्हणून प्रयत्न करीत असतात तर काही अधिकारी आपल्या दालनात बसून दुर्बिणीचे भिंग लावून नवीन संचालक पदाच्या व्यक्ती शोधत असतात.
सांस्कृतिक खात्यातील अशा अंतर्गत वादामुळे जर वेळीच पूर्ण वेळ संचालक मिळाला नाही, तर सध्या सांस्कृतिक कार्य खात्याची जबाबदारी सांभाळत असणारे मुख्यमंत्री, त्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांना शेवटी याकडे लक्ष घालावे लागणार आहे, हे स्पष्ट दिसते.
वाहून गेलेल्या महिलांचे 25 तोळे दागिने सापडले
सांगली- सांगलीतील महापुरात ब्रम्हनाळमध्ये बोट उलटून अनेकांना मृत्यू झला. आता पूर ओसरल्यामुळे या पुरात वाहून गेलेल्या महिलांचे दागिने सापडले आहेत. 25 तोळे सोन्याचे दागिने आणि पैसे सापडले गावातील म्हसोबा कॉर्नर परिसरात सापडले.सांगली जिल्ह्यातील महापुरानंतर बचावकार्य करत असताना क्षमतेपेक्षा जास्त लोक बसल्यामुळे ब्रम्हनाळमध्ये बोट उलटून अनेकांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी काही जणांना वाचवण्यात यश आले, तर काहींना प्राण गमवावे लागले. सरकारी मदत न पोहोचल्यामुळे या सर्वांना खाजगी बोटीतून वाचवले जात होते. पण बोट फांदीला अडकली आणि पलटी झाली.
महापुरानंतर सांगली आणि कोल्हापूर जिल्हा आता सावरत आहे. राज्यासह देशभरातून पूरग्रस्तांसाठी मदत मिळत आहे. सरकारकडूनही पीडितांना मदतीचे वाटप सुरू करण्यात आले आहे. या नैसर्गिक संकटामध्ये ब्रम्हनाळच्या घटनेने सर्वांचे हृदय हेलावून गेले आहे.
कोल्हापूरात शरद पवारांनी पुरग्रस्तांसह साजरा केला स्वातंत्र्य दिन… पुरग्रस्तांनी शरद पवारांना राखी बांधून आस्था आणि आपुलकी व्यक्त केली…
कोल्हापूर – राजर्षी शाहूंनी देशाला एकसंध राहण्याचा संदेश दिला आहे. आज संकट मोठं आहे आपण एकत्र या संकटाला तोंड देऊ असा दिलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुरग्रस्तांना दिला. देशाचा 73 वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसोबत साजरा केला. तसेच पीडितांची विचारपूस केली. यावेळी स्थानिक महिलांनी शरद पवारांना राखी देखील बांधली.
महापुराचा मोठा फटका कोल्हापूर शहराला आणि आजूबाजूच्या अनेक गावांना बसला आहे. आज मुस्लिम बोर्डींग, नेहरू हायस्कूल येथे काही पूरग्रस्त कुटुंब आहेत. या कुटुंबातील भगिनी व बांधवांसह आजचा स्वातंत्र्य दिन साजरा केला. झेंडावंदन जेथे झाले त्या मैदानातील उपस्थित भगिनींनी शरद पवार यांना राखी बांधून आपली आस्था आणि आपुलकी व्यक्त केली. एवढंच नाही तर आसपासच्या लोकांनी यथाशक्ती येथे मदतही दिली.
समुद्राला मिळणारे पाणी गोदावरी खोऱ्यात, तेलंगणात जाणारे पाणी बोगद्यातून नळगंगेत-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार
मुंबई, दि. 15 : कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र; तसेच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा- नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम विदर्भाला देऊन दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला दुष्काळाच्या फेऱ्यातून मुक्त करण्याचा निर्धार आज स्वातंत्र्यदिनी पुन्हा व्यक्त केला.भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
राज्य शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्याला जलपरिपूर्ण करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षात केला, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, असे असताना गेल्या तीन चार वर्षात कमी पावसामुळे काही भागात दुष्काळाचे संकट अनुभवले आहे. त्यावर मात करण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे 167 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल. तसेच वैनगंगा नदीचे तेलंगणात जाणारे पाणी वैनगंगा- नळगंगा योजनेत 480कि.मी.चा बोगदा तयार करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आणण्याचा प्रयत्न आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील सर्व अपूर्ण सिंचन प्रकल्प केंद्र सरकारच्या निधीतून गतिमानतेने पूर्ण करुन संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.
| राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीतून तिन्ही सैन्यदले, एनडीआरएफ, एसडीआरएफ, तटरक्षक दल आदींनी प्रचंड मेहनत करुन अव्याहत काम करुन करुन सुमारे 5 लाख नागरिकांची यशस्वी सुटका केली. पूरग्रस्त नागरिकांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी राज्य शासन भक्कमपणे पूरग्रस्तांच्या पाठिशी उभे आहे. पुनर्वसनासाठी 6 हजार 800 कोटींचे पॅकेज तयार केले असून विक्रमी वेळेत पुनर्वसन केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. |
देशासाठी आजचा अनोखा स्वातंत्र्य दिवस आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिरंगा फडकावत असतानाच जम्मू, श्रीनगर तसेच लडाख मध्येही डौलाने आणि अत्यंत मुक्त वातावरणात फडकावला जात आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री, देशाचे गृहमंत्री आणि संसदेचे अभिनंदन केले.
राज्याला गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात अग्रेसर करु शकलो. देशातील सर्वात भक्कम अशी राज्याची अर्थव्यवस्था आहे. औद्योगिक गुंतवणुकीमध्ये राज्य अग्रेसर असून देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी 50 टक्के गुंतवूणक एकट्या महाराष्ट्रात येते. देशाला 5 ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य खंबीर पावले टाकत असून त्यामध्ये राज्याची 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवून आपला सहभाग नोंदविल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाने गेल्या पाच वर्षात शेती क्षेत्रात सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांची गूंतवणूक केली. सुमारे 50 हजार कोटी रुपयांचा थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यात आला. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात अनुसुचित जाती, जनजाती आदी सर्व वंचितांपर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या राज्यकारभाराच्या सूत्रानुसार कार्य करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दिलेल्या सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या त्रिसूत्रीच्या आधारावर पुढील वाटचाल करण्यात येईल.
शिक्षण, उद्योग आदी सर्वच क्षेत्रात राज्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मराठा आरक्षण, धनगर समाजासाठी विविध प्रकारच्या सोयी, इतर मागासवर्गीयांसाठी विविध प्रकारच्या योजना कार्यान्वित करणे तसेच खुल्या प्रवर्गातील गरिबांसाठी योजना आदी माध्यमातून समाजाच्या सर्व घटकांपर्यंत विकास पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापुढेही सर्वांना सोबत घेऊन राज्याची प्रगतीची वाटचाल सुरू राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
मनोगतानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस तसेच राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून न्यूझीलंडचे महावाणिज्यदूत आणि व्यापार आयुक्त तथा मुंबईतील सर्व महावाणिज्यदूत कार्यालय गटाचे प्रमुख राल्फ हायस् यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार सर्वश्री राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा, विनायक मेटे, अबू आझमी, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया, लोकायुक्त एम. एल. तहलियानी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंद कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल, तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख अधिकारी, मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे निधन, तीन दिवसांपासून होत्या व्हेंटिलेटरवर
मुंबई – ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे 71 व्या वर्षी निधन झाले. नुकतेच त्यांना जुहू येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी वेळीच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, गुरुवारी त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. ‘रजनीगंधा’ आणि ‘छोटी सी बात’ या चित्रपटांसह 70 आणि 80 चे दशक त्यांनी गाजवले होते. सोबतच, 2011 मध्ये त्यांनी सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटातही काम केले होते. गेल्या काही वर्षांपासून हिंदी टीव्ही सिरियल्समध्ये काम करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. त्या ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या शोमध्ये आजींची भूमिका साकारत होत्या.ज्येष्ठ अभिनेत्री विद्या यांचे हृदय आणि फुफ्फुसांचा विकार होता. त्यांची प्रकृती बुधवारी अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफीचा सल्ला देखील दिला होता. परंतु, दुर्लक्ष केल्याने त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. या दरम्यानही त्यांची परिस्थिती आणखी वाइट झाली आणि गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पहिल्या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. यानंतर रजनीगंधा, छोटी सी बात, किरायेदार आणि अशा संख्य चित्रपटांमुळे त्या 70 च्या दशकातील स्टार म्हणून समोर आल्या. यानंतर 80 च्या दशकातच त्यांनी बॉलीवूडला रामराम ठोकला. गेल्या काही वर्षांपासून त्या हिंदी सीरियल्समध्ये काम करत होत्या. काव्यांजली, कुबूल है, चंद्र नंदिनी, कुल्फी कुमार बाजेवाला यामध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.



