Home Blog Page 2860

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सामूहिक बासरीवादन

0
पुणे : ओम जय जगदीश हरे, वैष्णव जन तो तेने कहिये, रघुपति राघव राजाराम, हरे रामा हरे कृष्णा अशी मनाला भिडणारी भजने, दुर्गा, भूपाळी रागातील स्वर बरसात करीत कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सामूहिक बासरीवादन झाले. पुण्यातील सौरभ फ्ल्यूट अकॅडमीच्या ७० विद्यार्थ्यांनी इस्कॉन मंदिरात भगवंतासमोर आपली कला सादर केली. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिरामध्ये कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये रविवारी सौरभ फ्ल्यूट अकॅडमीच्या सौरभ वर्तक व त्यांच्या ७० शिष्यांनी सामूहिक बासरीवादन केले. सामूहिक बासरीवादनात रोहित मुजुमदार यांनी तबल्यावर, तर कृष्णा साळुंखे यांनी पखवाजावर साथ केली. यावेळी झालेल्या भजन व रागांच्या सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
प्रसंगी चित्कला मुळ्ये, अदिती मुळ्ये, इस्कॉन मंदिरातील विश्वस्त श्वेतद्वीप दास व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख श्रीधर कृष्ण दास उपस्थित होते. यावेळी सौरभ वर्तक म्हणाले, “बासरी कृष्णाचे अतिशय प्रिय असे वाद्य आहे. कृष्ण जन्माच्या निमित्ताने भगवान कृष्णाप्रती सद्भाव व्यक्त करण्यासाठी माझ्यासह शिष्यानी सामूहिक बासरीवादन केले. सौरभ फ्ल्यूट अकॅडमीच्या ७० शिष्यांना घेऊन ही स्वरांची बरसात आम्हाला करता आली, याचा आनंद आहे.”

समाजातील कोलाहल समजावून घेऊन शिकविले पाहिज -डॉ. एन. एस. उमराणी

0
पुणे, ता. २५ : कला, साहित्य, संस्कृती, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, व्यापार, व्यवसाय, नोकरी अशा जीवनातील विविध अंगांशी वाणिज्य शाखेचा संबंध आहे. त्यामुळे वाणिज्य शाखेच्या शिक्षकांनी समाजातील कोलाहल लक्षात घेऊन शिकविले पाहिजे. असे मत  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी व्यक्त केल
‘बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय’ (बीएमसीसी) आणि ‘गुरुकुल’ संस्थेच्या वतीने प्राचार्य डॉ. श्री. वि. कडवेकर यांच्या शिक्षण क्षेत्रातील 50 वर्षांच्या योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी ‘वाणिज्य शिक्षणाची भावी दिशा’ या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात डॉ. उमराणी बोलत होते.
बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, गुरुकुलचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चि. शेजवलकर, मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, डॉ. विद्याधर भाटे, डॉ. एस. जी. जोशी, डॉ. वसुधा जोशी, डॉ. संजय कंदलगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. उमराणी पुढे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना चांगला अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती  देण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ अनुभवी व्यक्तींच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. अभ्यासाच्या  विविध पद्धतीतून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, वर्तन, संवेदनशीलता आदी मध्ये कसे बदल होतात हे शिक्षकांनी समजून घेतले पाहिजे. तसा विचार विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवला पाहिजे.’
डॉ. शेजवलकर म्हणाले, ‘लहान मोठ्या पासून काही तरी शिकले पाहिजे त्यातून आनंद मिळतो. कडवेकर सरांचे कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व वेगळे आहे. ध्येयाची बांधिलकी आणि आत्मविश्वास दांडगा आहे. नावीन्य आणि  ध्यास घेऊन काम करणे हा त्यांचा धर्म आहे. त्यांच्यात १०० टक्के सौजन्य आणि सभ्यता आहे. त्यांचे वाचन अफाट आहे. वाणिज्यचे लोक वर्णनात्मक अभ्यास करतात. त्यांनी विश्लेषणात्मक  अभ्यास केला पाहिजे.    भरपूर वाचन हा कडवेकर यांचा गुण आहे. शिक्षकांनी त्यांचे अनुकरण केले पाहिजे. विद्यार्थ्यांना दैवत मानून शिक्षकांनी सेवा केली पाहिजे.’
सत्काराला उत्तर देताना डॉ. कडवेकर म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्याची क्षमता शिक्षकांमध्ये असावी. शिक्षकांकडून अपेक्षा ठेवताना त्यांना योग्य वेळी वेतन मिळाले पाहिजे. व्यावसायिक शिक्षण पद्धतीशी वाणिज्य शाखेची पदवी जोडणे आवश्यक आहे.’
वसुधा जोशी म्हणाल्या, ‘संशोधनाचा नेहमीच्या जीवनावर परिणाम होत असतो. संशोधन करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण, तंत्रशुद्ध, सैद्धांतिक मांडणी करावी.’
आजकाल चौकटीत संशोधन केले जाते. समाजाला त्याची गरज आहे की नाही याचा विचार करणे आवश्यक वाटते. संशोधनात उद्योगांना सहभागी करून घेतले पाहिजे. शिक्षाकांचा सहभाग महत्वाची असतो. असे मत डॉ. श्रावण कडवेकर यांनी व्यक्त केले.
डॉ. संजय कंदलगावकर म्हणाले, ‘वाणिज्य शाखेचे  स्वरूप  उयोजितेकडून व्यावसायिक झाले आहे. वाणिज्य प्रयोगशाळा, कॉमर्स कट्टा, संशोधन, उद्योग भेटी असे उपक्रम राबविण्यात येणे गरजेचे आहे.’
डॉ. एस. जी. बापट यांनी शिक्षकांची बदलती भूमिका याविषयी मत व्यक्त केले. शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. अभ्यासाला पूरक साहित्य पुरविले पाहिजे.
डॉ. विद्याधर भाटे यांनी वाणिज्य विषयक संशोधन सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. चालू संशोधन पद्धतीत आमूलाग्र बदल करता येणे शक्य आहे. केवळ पुस्तकी संशोधनावर भर देणे योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

‘गुरुकुल’चे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी प्रास्ताविक, बीएमसीसीचे प्राचार्य  डॉ. चंद्रकांत रावळ यांनी स्वागत आणि रवींद्र कोठावडे यांनी सूत्रसंचालन केले.

महर्षी कर्वे, डॉ. स्कडर यांच्या योगदानामुळेच स्त्रियांना सन्मान- डॉ. विकास आबनावे

0
पुणे : “भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आयडा स्कडर यांनी निरपेक्ष वृत्तीने आरोग्यसेवेचे कार्य केले. मुलींसाठी वैद्यकिय महाविद्यालय सुरु केले. भौतिक जीवनाचा त्याग करून त्या समाजासाठी जागल्या. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुरुषप्रधान संस्कृतीची मुळे खोलवर रुजली असताना त्यांनी त्या काळात स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहचे कार्य उभारले. त्यांच्या योगदानामुळे आजची स्त्री शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात नाव कमवत आहे. महिला मुख्याध्यापिका असलेल्या शाळांमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक विकास झाल्याचे चित्र पहावयास मिळते. कारण त्यांच्या शिकवण्यात ममत्व दडलेले असते,” असे मत महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव व आंतरराष्ट्रीय वक्ते डॉ. विकास आबनावे यांनी व्यक्त केले.
श्री शिवसाई प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणारा ‘महर्षी धोंडो केशव कर्वे समाजभूषण पुरस्कार’ अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव व जिजामाता हायस्कुलच्या माजी मुख्याध्यापिका प्रमिला गायकवाड यांना, तर वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणारा ‘डॉ. आयडा स्कडर कार्यभूषण पुरस्कार’ ऍक्युपंक्चर स्पेशालिस्ट डॉ. सुमिता सातारकर यांना डॉ. आबनावें यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या या कार्यक्रमावेळी पुणे शहर महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शलाका पाटील, इलेक्टॉहोमिओपँथी तज्ञ प्रतिमा सिंग, संयोजिका ऍड. वैशाली भोसले, नितीन भोसले आदी उपस्थित होते. शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
प्रतिमा सिंग म्हणाल्या, ”बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. कमी वयातच मधुमेहासारखे आजार झालेले पहावयास मिळत आहे. होमिओपँथी शास्त्राच्या माध्यमातून आजार मुळापासून दूर करण्यात यश मिळते. आपल्याकडील देशी वनस्पतीत आजार बरे करण्याची ऊर्जा आहे. तसेच निरोगी आरोग्यासाठी शाकाहार हा सर्वात योग्य आणि परिपूर्ण आहार आहे. त्याचा आपण अंगीकार केला पाहिजे.”
शलाका पाटील म्हणाल्या, “समाजातील लोकांच्या समस्या, पीडा ओळखून ते दूर करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. माणुसकीच्या नात्याने सर्वांशी जोडले जाणे गरजेचे आहे. पाळणाघर, वृद्धाश्रम संस्कृती वाढत जाणे खेदजनक आहे. सामाजिक काम कोणत्याही महाविद्यालयात जाऊन शिकता येत नाही. त्यासाठी लोकांमध्ये जाऊनच काम करणे महत्वाचे आहे.”
प्रमिला गायकवाड म्हणाल्या, ”बहुजन समाजासाठी शिक्षण देणाऱ्या संस्थेत गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. या गरीब दीनदुबळ्या मुलींची आई बनून त्यांना मी शिक्षण देण्याचे काम करत आहे.” डॉ. सुमिता सातारकर म्हणाल्या की, सरकारने २०१५ मध्ये ऍक्युपंक्चर शास्त्राला परिपूर्ण शास्त्र म्हणून मान्यता दिली. परंतु यासाठी अनेक वर्ष लढा द्यावा लागला. या शास्त्राला आपल्या देशात शैक्षणिक आणि वैद्यकीय वारसा आहे. विभा आबनावे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ऍड. वैशाली भोसले, नितीन भोसले यांनी आभार मानले.

रक्तदानात पुणे देशात अव्वल: खा. वंदना चव्हाण

0
पुणे :’शिवप्रजाराज्यम ‘,’ग्रीन रिव्हॉल्युशन ‘ तर्फे  नागरी गौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून राम बांगड(रक्तमहर्षी गौरव सन्मान ) ,राम बोरकर(लोकसेवक गौरव सन्मान ) ,स्वप्नील नाईक(युवा गौरव सन्मान ) यांचा सन्मान करण्यात आला  . खासदार एड वंदना चव्हाण यांच्या हस्ते हा सन्मान झाला.  महिला गृह उद्योग लिज्जत पापड चे व्यवस्थापक सुरेश कोते आणि एड . प्रतापसिंह परदेशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम उद्यान प्रसाद मंगल कार्यालय येथे २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६  वाजता झाला.
‘रक्तदानात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर आहे ,आणि महाराष्ट्रात पुणे प्रथम स्थानावर आहे ,कारण कार्यकर्ते आणि संस्थांचे मोहळ पुण्यात आहे . पुण्याने अन्य वैशिष्ट्यांप्रमाणे हेही वैशिष्ट्य जपून ठेवावे . कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याचा सन्मान करण्याची  ही प्रथा अनोखी असून कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी समाजाने पुढे येऊन कायमस्वरूपी व्यवस्था उभारायला हवी ‘,असे उद्गार खा . वंदना चव्हाण यांनी यावेळी बोलताना काढले .
सुरेश कोते म्हणाले ,’रक्तदान करणे ही खरी मानवसेवा असून निरपेक्ष वृत्तीने समाजसेवा करण्याची वृत्ती वाढली पाहिजे ‘
‘रक्ताचे नाते ‘ संस्थेचे राम बांगड ,मनसे उपाध्यक्ष राम बोरकर ,स्वप्नील नाईक यांनी समाजकार्यातील  अनुभव सांगितले .
‘शिवप्रजा राज्यम ‘ चे अध्यक्ष अनंत घरत ,’ग्रीन रिव्होल्यूशन ‘ चे अध्यक्ष किशोर रजपूत यांनी स्वागत केले.   निमंत्रक ललित राठी यांनी आभार मानले. ‘वनराई ‘ चे मुकुंद शिंदे ,राष्ट्रवादी काँग्रेस चे बबलू जाधव ,व्यापारी महासंघाचे सचिन निवंगुणे,युवक क्रांती दल शहराध्यक्ष सचिन पांडुळे ,अप्पा अनारसे  उपस्थित होते .

आम्ही भाजपचे झेंडेच धरायचे काय ? शिवसैनिकांचा रोखठोक सवाल (व्हिडीओ)

पुणे- पुण्यात आठ हि आमदार भाजपचे दोन्ही खासदार भाजपचे .. आणि विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षालाच ठेवायच्या …मग आम्ही पुण्यातल्या शिवसैनिकांनी काय आयुष्यभर भाजपचेच झेंडे  धरायचे काय ? असा रोख ठोक सवाल , वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील सेनेचे इच्छुक आणि महापालिकेतील माजी गटनेते नगरसेवक संजय भोसले यांनी येथे केला आणि त्यास विशेष म्हणजे सेनेचे खासदार अनिल देसाई यांनी आपल्या पद्धतीने उत्तर देखील दिले .
येरवडा कारागृहां समोरील केके भवन येथे सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त सेनेच्या  संजय भोसले यांनी महिला मेळाव्याचे आयोजन केले होते . भोसले यांनी विविध कार्यक्रमाद्वारे आणि एकंदरीतच वडगाव शेरी मधून विधानसभा लढविण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे . या मेळाव्यात सेनेचे नेते आणि खासदार अनिल देसाई प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते यावेळी लकी ड्रो मधील विजेत्या महिलांना गृहपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले. महिलांसाठी यावेळी स्नेह भोजन  कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता . गेल्याच आठवड्यात भोसले यांनी अशक प्रकारे दहावी आणि बारावी तील उत्तीर्ण विद्यार्ती आणि पालक मेळावा घेतला होता .त्यावेळी देखील प्रचंड गर्दी होती .या दोन्ही कार्यक्रमातून भोसले यांनी आपल्या विधानसभा उमेदवारीचे बिगुल वाजविले . मात्र नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सिटींग मेंबर च्या जागा त्या त्या पक्षाकडे ठेवून समसमान जागावाटप होईल त्यामुळे पुण्यात आठ हि जागांवर भाजपचे आमदार असल्याने येथील आठ हि जागा भाजपच्या वाटेलाच येणार असा सूचक दावा केला होता . या त्यांच्या वक्तव्याचे पडसाद या कार्यक्रमात उमटले ….पहा यावेळी नेमके कोण काय म्हणाले …

हृदय विकाराला वयाची अट नसते : डॉ. ईश्वर झंवर

0

पुणे : ता. २५:-  हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने हृदयविकार होऊ शकतो. हृदयविकाराला वयाची अट नसते,कोणत्याही वयोगटातील माणसाला हा आजार होऊ शकतो असे मत सुप्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ ईश्वर झंवर यांनी व्यक्त केले.

हिराबाई भिकाजी माने यांच्या पुण्यानुमोदनाच्या वेळी ते बोलत होते. कॅटलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनिल माने यांच्या मातोश्री हिराबाई माने यांचे रविवार दि. १८ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.श्रध्दांजली सभेस उपस्थित असणारे लोक गेलेल्या व्यक्तिच्या आठवणी जागवतात मात्र त्या आजाराबाबत जनजागृती करत नाहीत. सुनील माने यांनी डॉ. ईश्वर झंवर यांचे ‘ह्रदयविकाराची प्राथमिक लक्षणे’याविषयावर व्याख्यान आयोजित केले.अशाप्रकारचा कार्यक्रम घेऊन त्यांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. लोकांना हृदय विकाराविषयी माहिती व्हावी, हृदय विकाराचा झटका आल्यानंतर कोणते प्रथोमपचार करावे हा त्यामागचा उद्देश होता.

डॉ. झंवर म्हणाले, पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतात हृदय रोग होण्याचे वय कमी आहे. हृदय रोग होणाऱ्या व्यक्तींमध्ये पन्नास टक्के रुग्ण हे ३० ते ४० वर्ष वयोगटातील असतात. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर प्रत्येकाने हृदयाशी संबंधित लक्षणांना गांभीर्याने घेणे आवश्यक असते. मधुमेहाच्या रुग्णांना हा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. तिशीनंतर प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा तरी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तुमच्या कुटुंबात रक्ताच्या नात्यात कोणाला हृदयरोग झाला असेल तर तुम्हाला हृदय रोग होण्याची शक्यता अधिक असते. हृदय रोगामुळे तुम्हाला तुमच्या मेंदू आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजार होऊ शकतात. मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल या तीन गोष्टी नियंत्रणात ठेवल्यास तसेच धूम्रपान,मद्यपान न केल्यास हृदयरोगाचा धोका टाळता येवू शकतो. आहार, विहार व जीवनशैली उत्तम ठेवल्यास आपण हृदयविकारावर मात करू शकतो.

हिराबाई माने यांना श्रद्धांजली वाहताना मिलिंद कुलकर्णी यांनी आई विषयी कवितांचे सादरीकरण करताना उपस्थितांचे अश्रू अनावर झाले.निवृत्त आयपीएस अधिकारी अशोक धिवरे यांनी आईचे जीवनातील अस्तित्व शब्दापलीकडे असल्याने तीला चाकोरीत बांधता येत नसल्याचे सांगितले. आरपीआयचे नेते परशुराम वाडेकर, प्रसिद्ध नेत्रशल्यचिकित्सक अंबरीश दरक, विशाल तांबे यांनी भावना व्यक्त केल्या.

यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, पुणे महानगरपालिकेचे शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर, नगरसेवक उमेश गायकवाड, दीपक पोटे, दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील, अजय खेडेकर, उज्ज्वल केसकर, जयंत येरवडेकर, दत्ताजीराव गायकवाड यांच्यासह विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली

बहिणाबाई चौधरी यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त सांगीतिक नृत्य सादरीकरण

0
पुणे ः‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त ‘  परिमळ  ‘ या सांगीतिक नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते  .
तेजदिप्ती पावडे प्रस्तुत हा बहारदार कार्यक्रम शनीवार, २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता  ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, (सेनापती बापट रस्ता) येथे झाला. 
कथा संकल्पना ,नृत्य दिग्दर्शन तेजदिप्ती पावडे यांचे होते . बहिणाबाई चौधरी यांच्या आयुष्याचा मागोवा या कार्यक्रमातून घेतला गेला. .
 ‘ मन वढाय, वढाय ‘,   ‘गुढी पाडव्याचा सण , आता उभारारे गुढी ‘,अरे, संसार संसार ‘,  ‘खोप्यामधी खोपा, सुगरणीचा खोपा ‘,  ‘जाय आता पंढरीला ‘,’ आज माहेराला जाणं, झाली झाली गं पहाट ‘ बहिणाबाईंच्या अशा अनेक बहारदार कविता नृत्यासह नजाकतीने  सादर झाल्या आणि रसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला.
‘ बहिणाबाईंच्या काव्यातील भावनांचा शोध घेत आम्ही जळगाव जिल्हयात त्यांच्या गावी गेलो. दोन वर्षे तयारी करुन ‘ परिमळ ‘ हा सांगितिक नृत्य कार्यक्रम तयार केला . हा बहिणाबाई यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न आहे’, असे मनोगत तेजदिप्ती पावडे यांनी व्यक्त केले. 
हा कार्यक्रम विनामूल्य होता. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ८४ वा कार्यक्रम  होता
संकेत देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.

राहुल गांधींसह विरोधी पक्षाच्या १२ नेत्यांना श्रीनगर विमानतळावर अडविले-काश्मीर स्थितीबाबत साशंकता कायम

0

नवी दिल्ली -काश्मीर मध्ये नेमके चाललय तरी काय ? नेमकी तिथे कोणाची दहशत आहे काय ? नागरिक आनंदित ,सुरक्षित,समाधानी आहेत कि व्यथित आणि दहशतीखाली आहेत काय ? या सर्व परिस्थितीबाबत आता आणखी उत्सुकता ताणली जावू लागली आहे कारण खुद्द राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेसच्या १२ बड्या नेत्यांना तेथून त्यांच्या मर्जी विरुद्ध माघारी पाठवून देण्यात आले. काश्मिरात पावूल ठेवू देण्यात आले नाही . कलम १४४ लागू असेल तर आम्ही दोघे -दोघे विविध भागात जावू ..फार नाही तर फक्त १० ते १५ लोकांना भेटू .. असे सांगूनही राहुल गांधी यांना जुमानण्यात आले नसल्याचे इंडिअन नशनल कॉंग्रेसच्या फेसबुक पेजवर टाकण्यात आलेल्या व्हिडीओने आणि फोटो ने स्पष्ट केले आहे .

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली गेलेल्या विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाला श्रीनगर विमानतळाबाहेर येण्यास परवानगी नाकारण्यात आली. श्रीनगर विमानतळावर उतरल्यानंतर तासाभरातच या शिष्टमंडळाला दिल्लीला माघारी पाठवून देण्यात आले. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती तिथे येऊन पाहण्याचे निमंत्रण दिले होते.

जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य नाहीय. शिष्टमंडळासोबत गेलेल्या पत्रकारांना वाईट वागणूक देण्यात आली. त्यांना मारहाण करण्यात आली असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या राहुल गांधींना श्रीनगर विमानतळावरुनच माघारी पाठवून देण्यात आले. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे आरोप केले.

शिष्टमंडळाला काश्मीरमधल्या जनतेला नेमक्या कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय ते जाणून घ्यायचे होते. पण आम्हाला विमानतळाबाहेर येऊ दिले नाही. आमच्या बरोबर असलेल्या पत्रकारांना वाईट वागणूक देण्यात आली. त्यांना मारहाण करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य नाहीय यावरुन स्पष्ट होते असे राहुल म्हणाले.काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेत्यांसह श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आलं आणि तिथूनच त्यांना परत पाठवण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत आलेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या शिष्टमंडळाला माघारी पाठवण्यात आलं.

झेंड्याचा दांडा पकडायला तुमच्याकडे माणसं नाहीत, तुमचा झेंडा कोण खांद्यावर घेणार- विनोद तावडे

0

मुंबई- ज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे दाखल करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत, त्यांना भगव्याला हात लावण्याचा काहीच अधिकार नाही असा घणाघात भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांवर केला. तसेच, एका झेंड्याचा दांडा पकडायला तुमच्याकडे माणसं नाहीत, तुमचा झेंडा कोण खांद्यावर घेणार असा सवालही त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभांमध्ये यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेला भगवा झेंडाही फडकणार आहे. घड्याळ चिन्हाच्या झेंड्यासोबत भगवाही फडकवण्याची घोषणा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीतल्या पाथरीमध्ये आयोजित शिवस्वराज्य यात्रेत केली आहे. त्याबाबत बोलताना विनोद तावडे यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीवर टीका केली.

तावडे म्हणाले, “अजितदादा तुमच्याकडे एक झेंडा आहे, त्याचा दंडा पकडायला माणसं नाहीत. तो झेंडा कोण घेणार खांद्यावर? तुमच्या पक्षाचे लोक सोडून चालली आहेत, मग झेंडा-झेंडा काय करता? छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा घेऊन चालत नाही तर शिवाजी महाराजांनी जे शिकवले आहे ते अंमलात आणणार आहोत का? रयतेला न लुटता रयतेला घडवणे हे महाराजांनी केले. आपल्या काळात किती घोटाळे झाले, आपण रयतेच आपण काय केले हे विसरू नका. झेंडा मानाने, प्रेमाने, खंबीरपणे त्याचा दंडा पकडणारा कार्यकर्ता हा उभा राहिला पाहिजे. जो तुमच्या सगळ्या नेत्यांना बघून पळत सुटला आहे आणि नेतेही पळत सुटले आहेत.”

काँग्रेस नेत्यांच्या त्यागाने देश स्वतंत्र झाला हे विसरता येणार नाही – श्रीपाल सबनीस

0

पुणे-कॉंग्रेस नेत्यांच्या त्यागाने आज देश स्वतंत्र झाला हे विसरता येणार नाही. आज कार्यकर्त्यांनी त्याची गंभीर दाखल घेऊन पुन्हा कॉंग्रेसचा जीर्णोद्धार करावा असे आवाहन श्रीपाल सबनीस यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना  केले.
भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या 75 व्या जयंती निमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे काल आज आणि उद्या याविषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 75 कार्यरत संस्था व मंडळाचा जाहीर सन्मान कार्यक्रम मेमोरियल हॉल येथे संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, तिन्ही गांधींच्या परमोच्च त्यागाने देशात कॉंग्रेस सक्रीय राहिली. देशासाठी महात्मा गांधीने अहिंसा मार्गाने लढा देऊन देशाला स्वातंत्र्य  मिळवून दिले. पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार पटेल यांचे कार्य कॉंग्रेसला अत्यंत मोलाचे ठरले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व संस्थाना विलीन करून अखंड भारत उभा केला. नेहरूंनी स्वातंत्र्य प्राप्ती नंतर दूरदृष्टी ठेवून विधायक कार्याने देश विकासाकडे साधला. तसेच इंदिरा गांधी यांनी आपल्या बलशाली दृष्टीकोनातून देश सुजलाम सुफलाम करण्याचे कार्य केले. शेवटी राजीव गांधी यांनी संगणक आणून देशाला तंत्रज्ञानाकडे नेले. चले जाव चळवळ, ९ ऑगस्टचा क्रांती दिवस, १९३० चा मिठाचा सत्याग्रह, असहकारतेची चळवळ, खिलापत चळवळ, टिळकांचे योगदान, सुभाषचंद्राचे योगदान व एकूणच सबंध तुरुगांमध्ये जाणाऱ्या कॉंग्रेसची यादी काढा आणि भाजपच्या इतिहासाला प्रश्न विचारा कि तुमचे किती कार्यकर्ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुरुगांत गेले,  असा सवाल उपस्थित करत सबनीस यांनी  भाजपला धारेवर धरले.

यावेळी कॉंग्रेसचे  शहराध्यक्ष .रमेश बागवे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर ,नगरसेवक अविनाश बागवे, रफिक शेख,नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी, लता राजगुरु, माजी महापौर रजनी त्रिभुवन,  भीमराव पाटोळे, देवकी शेट्टी,   निता रजपुत, सारिका आगज्ञान, असलम बागवान, जयसिंह भोसले, बुवा नलावडे, सुजित यादव, अॅड रोहन शेट्टी, विठ्ठल गायकवाड, रविंद्र आरडे व समस्त कार्यकर्ते पदाधिकारी, नागरिक. उपस्थित होत.कार्यक्रमाचे आयोजन महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी,  माजी उपमहापौर आबा बागुल व  काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मुख्तार शेख यांनी केले.
यावेळी आगामी निवडणुकीत पुन्हा कॉंग्रेस सत्तेत येईल असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांच्या बळावर रमेश बागवे यांनी बोलवून दाखविला.तर सदानंद शेट्टी यांनी  सांगितले कि, कॉंग्रेस पक्षाकडे मोठ्या संख्येने जनशक्ती व हितचिंताकाचा ताफा आहे. आज देशाने जी प्रगती साधली आहे त्यामध्ये राजीव गांधी यांचा कार्याचा मोठा वाटा आहे. राजीव गांधी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची सुरुवात केली व महिलांना प्रत्येक क्षेत्रात अधिकार दिले. कॅन्टोमेंट मतदार संघ हा कोस्मोपोलीटन व संमिश्र मतदार संघ असून कॉंग्रेसला मानणारा आहे. यासंघात पक्षाच्या माध्यमातून बरीच प्रगती साधली आहे

प्रकाश आंबेडकरांची दत्तक घेतलेल्या ब्रम्हऩाळ गावास भेट

0

सांगली – प्रकाश आंबेडकर यांनी ब्रम्हऩाळ या दत्तक घेतलेल्या गावास भेट दिली व पुरामध्ये नुकसान झालेल्या व पडलेल्या घरांचे पुनर्वसनाच्या कामकाजांची पाहणी केली. तसेच नागरिकांना ऍड. आंबेडकर यांच्या हस्ते रेशनचे वाटप या वेळी करण्यात आले. तसेच त्यांनी पुनर्वसनाच्या कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर , राज्य प्रवक्ते अमोल पांढरे, जयसिंग तात्या शेंडगे व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुनर्वसनाचे काम चालू झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ब्रम्हऩाळ या गावात भेट दिली. कोल्हापूर सांगली जिल्ह्याला मोठ्याप्रमाणात पुराचा तडका बसल्यानंतर जीवित व आर्थिक नुकसान प्रचंड प्रमाणात झाले आहे. सांगली जिल्ह्यातील पळूस तालुक्यातील ब्रम्हऩाळ गावात पुराचे पाणी घुसले असतांना स्थानिक गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु होते. यात बोट पाण्यात उलटुन 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या गावावर शोककळा पसरलेली आहे.

पुरग्रस्त ब्रम्हनाळ गावातील 700 कुंटुंब, 3500 लोकसंख्या असलेल्या गावाचे पुनर्वसन करण्यासाठीची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत ज्यांनी सरकारच्या पोकळ धोरणांवर व यंत्रणेवर अवलंबून न राहता सामाजिक जबाबदारी म्हणून गाव दत्तक घेऊन गावाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेतली आहे.

माई बालभवन मधील अंध मुलींनी फोडली पुस्तक दहिहंडी

0

पुणे  : दहीहंडी हा सण हंडी फोडण्याचा नसून तो आपली संस्कृती आणि परंपरा जपणारा आहे. भारतीय परंपरेतील सण-उत्सव हे एक सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बांधले गेले आहे. खरतर आपण या माध्यमातून आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचंच काम करत आहोत.

गेल्या नऊ वर्षापासून संस्कृती व भारतीय परंपरेला अनुसरून निरनिराळे सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रणीय असलेले साम्राज्य प्रतिष्ठान व सामर्थ्य वाद्य पथकच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. प्रतिष्ठानची दहीहंडी फोडण्याचा मान या वर्षी माई बालभवन मधील अंध मुलींना देण्यात आला. खेळ, विविध कला, शिक्षण, स्वयंपाक अशा अनेक कामात निपुण असलेल्या या मुलींनी पहिल्यांदाच दहीहंडी फोडण्याचा अप्रतिम उपक्रम सांगवी मधुबन सोसायटी मधे साम्राज्य प्रतिष्ठान द्वारे करण्यात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमा प्रसंगी सांगवी पूरग्रस्त विद्यार्थांना शालेय वस्तूंचे तर महिलाना संसार उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले. दहीहंडी च्या या उत्सवाला प्रमुख उपस्थितीत वीरपत्नी श्रीमती दीपाली विजय मोरे त्याच बरोबर पथकातील कार्यकर्ते उपस्थित होते.

या वर्षी दहीहंडी उत्सव साजरा करतांना प्रतिष्ठानच्या वतीने सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील गावांना मदतीचा हात देण्यासाठी परीसरातील समाज बांधवांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आव्हान करण्यात आले. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व परीसरातील अनेक जण येणाऱ्या 31 ऑगस्ट रोजी पूरग्रस्त भागातील गावात जाऊन महाश्रमदान व तेथिल नागरिकांचे आरोग्य तपासणी करणार असल्याचे प्रतिष्ठानच्या कार्यकरणी मंडळाने सांगितले

व्हायचे होते ७४३ महिलांना एस टी ड्रायव्हर -संधी मिळतेय १६३ महिलांना

0

महिला एसटी बस चालक प्रशिक्षणार्थींचा आत्मविश्वास, धाडस सर्वांसाठी प्रेरक-माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
एसटी महामंडळात नियुक्त 163 महिला बस चालकांच्या प्रशिक्षणास प्रारंभ

पुणे दि 23: कोणत्याही क्षेत्रात संधी मिळाल्यास महिला आपले कर्तृत्व सिद्ध करतात. महिलांना एसटी चालक म्हणून प्रशिक्षण देऊन महामंडळाने सामाजिक आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे पाऊल टाकले असून त्याचा आत्मविश्वास आणि धाडस सर्वांना प्रेरक ठरेल असा विश्वास माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज व्यक्त केला.


महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्यावतीने महिला चालक प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित होते. त्यावेळी प्रतिभाताई पाटील बोलत होत्या. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार माधुरी मिसळ, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल, केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेचे संचालक कॅप्टन राजेंद्र सनेल-पाटील, महामंडळाचे सरव्यवस्थापक माधव काळे उपस्थित होते.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, अनेक खडतर आव्हानांचा सामना करत एसटी महामंडळाचे काम यशस्वीपणे सुरू आहे. महामंडळाच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या विविध योजना समाजासाठी उपयुक्त आहेत. महिलांना एसटी चालकांचे प्रशिक्षण देऊन महामंडळाने त्यांना जगण्याचा नवा मार्ग दाखवला आहे. हे पाऊल अत्यंत धाडसी असून ते यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. महामंडळाचा हा उपक्रम देशासमोर नवा आदर्श निर्माण करेल, असे त्या म्हणाल्या.
परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले, एसटी महामंडळात सकारात्मकता निर्माण करण्याचे काम केले. महिला टॅक्सीचालक आणि महिलांसाठी अबोली रिक्षा हे प्रयोग केले, महिला सक्षमीकरण करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम परिवहन विभागाच्या माध्यमातून केले. 163 महिला चालक प्रशिक्षणाचा हा प्रयोग राज्यातील महिला-मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. रोजगार निर्माण करणे हेच परिवहन खात्याचे धोरण आहे, त्यातूनच रिक्षा चालक परवाने देण्याचे काम केले. एसटी कर्मचाऱ्यांसाठी जागतिक दर्जाचे पुण्यातील व्हिजन नेक्स्ट रुग्णालय डोळे तपासण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच 55 वर्षानंतर स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे सर्व लाभ देण्याबरोबरच 10 लाख रुपये देण्यात येतील. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना पती-पत्नीसाठी 65 वर्षांपर्यंत मोफत प्रवासाची सवलत देण्यात येणार आहे. सध्या महामंडळात 36 हजार बस चालक असून पुढील काही वर्षात किमान 10 हजार महिला बस चालक असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आजचा दिवस महिला सक्षमीकरणासाठी ऐतिहसिक दिवस आहे. महिला सशक्तीकरणाच्या धोरणाचे कृतिशील पाऊल परिवहन महामंडळाने टाकले आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 15 महिला एसटी चालकांना प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन यावेळी करण्यात आले. एसटी महामंडळाचे कर्मचारी दत्तात्रय गायकवाड यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सन 2017 व 2018 साली विशेष कामगिरी केलेल्या एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजित सिंह देओल यांनी केले. या कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

महिला चालाकांसाठी नियम शिथील…
एसटी महामंडळात चालक पदासाठी अवजड वाहन चालक परवाना व त्यानंतर तीन वर्षाचा अनुभव या अटी शिथील करून एक वर्ष हलके वाहन चालविण्याचा परवाना असलेल्या महिलांना संधी देण्यात येते. तसेच महिलांसाठी किमान उंचीची अट 160 सेंमी वरुन 153 सेंमी पर्यंत शिथील करण्यात आली आहे. ही योजना राज्यातील 21 जिल्ह्यात राबविण्यात आली असून राज्यातील 932 महिला उमेदवरांनी या पदाकरिता अर्ज केला होता. त्यापैकी 743 महिला उमेदवार लेखी परिक्षा उत्तीर्ण झाल्या व 151 अंतिम प्रशिक्षणासाठी पात्र ठरल्या आहेत.
***
15 प्रशिक्षणार्थीचे प्रातिनिधिक सत्कार
▪प्रतीक्षा सूर्यकांत सांगवे,पुणे.
▪सरोज महिपती हांडे, कोल्हापूर.
▪मीना भीमराव व्हनमाने,सांगली.
▪पुनम अशोक डांगे, सोलापूर.
▪माधवी संतोष साळवे, नाशिक.
▪ज्योती तनखु आखाडे, जळगाव.
▪मंजुळा बिभीषण धोत्रे, धुळे.
▪रेशमा सलीम शेख, परभणी.
▪भाग्यश्री शालिकराम परानाटे,अमरावती.
▪भावना दिगंबर जाधव, बुलढाणा.
▪अंकिता अंकुशराव आगलावे, यवतमाळ.
▪गीता संजय गिरी, नागपुर.
▪रब्बना हयात खान पठाण, वर्धा.
▪राखी विजय भोतमांगे, भंडारा.
▪पौर्णिमा बाळकृष्ण कुमरे, गडचिरोली.

गोयल गंगा फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

0

पुणे :- महापुरामुळे कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील लोकांना अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.सर्व स्तरातून मदतीचा ओघ चालू आहे. यात खारीचा वाटा म्हणून गोयल गंगा फाऊंडेशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे तसेच १५० हून अधिक ब्लँकेट्स यावेळी देण्यात आले आहेत. टूथपेस्ट,टूथब्रश,साबण, आणि दैनंदिन वापराच्या अनेक गोष्टींचे ४ बॉक्स यावेळी पाठवण्यात आल्या.  

गोयल गंगा फाऊंडेशनचे विश्वस्त अमित गोयल यावेळी उपस्थित होते.ते  म्हणाले कि, पूर ओसरल्यानंतर त्याठिकाणी अधिकाधिक प्रमाणात मदतीची गरज आहे.त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येकाने आपापल्यापरीने सर्वतोपरी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.

अरुण जेटली यांचे निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त

0

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2019-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

“अरुण जेटली हे राजकारणातील दिग्गज व्यक्तीमत्व, विद्वान आणि कायदेतज्ज्ञ होते. देशाच्या विकासात त्यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांचे निधन दुःखद आहे. पत्नी संगीताजी आणि मुलगा रोहन यांच्याशी मी बोललो. ओम शांती.

अतिशय विद्वान, विनोदाची जाण असलेले करिश्माई व्यक्तीमत्व होते. अरुण जेटलींना समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी आपलेसे केले होते. ते बहुआयामी व्यक्तीत्व होते. भारताची राज्यघटना, इतिहास, धोरणे, शासन आणि प्रशासन यांचा प्रचंड अभ्यास होता.

आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत, अरुण जेटली जी यांनी विविध मंत्रालयाचे कामकाज पाहिले. त्यांचे देशाच्या आर्थिक विकासात योगदान आहे, तसेच आपल्या संरक्षण क्षेत्राची मजबूती केली, मैत्रीपूर्ण कायदे करुन परदेशाशी व्यापार वृद्धींगत केला.

भारतीय जनता पक्ष आणि अरुण जेटली यांचे अतूट नाते होते. आणीबाणीच्या काळात विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व करत देशाच्या लोकशाहीचे रक्षण केले.अरुण जेटली जी यांच्या निधनाने, मी जवळचा मित्र गमावला. ते अतिशय उत्कृष्ट जीवन जगले आणि आनंदी स्मृती मागे सोडून गेले. आम्हाला त्यांची सदैव आठवण येईल ”,  असे पंतप्रधान म्हणाले.

-उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अरुण जेटली हे उत्कृष्ट संसदपटू, कायदेतज्ज्ञ, विद्वान, उत्कृष्ट प्रशासक आणि असामान्य व्यक्तीमत्व होते. ऐतिहासिक जीएसटी विधेयकावर राजकीय एकमत घडवून आणण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. उपराष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणतात, “अरुण जेटली हे माझे दीर्घकाळापासून स्नेही होते. त्यांच्या निधनामुळे देशाची तसेच माझी वैयक्तिक मोठी हानी झाली आहे. दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. अरुण जेटली हे उत्कृष्ट संसदपटू, कायदेतज्ज्ञ, विद्वान, उत्कृष्ट प्रशासक आणि असामान्य व्यक्तीमत्व होते. अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अरुण जेटलींनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरवण्यात आले होते. ऐतिहासिक जीएसटी विधेयकावर राजकीय एकमत घडवून आणण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. ते अतिशय उत्कृष्टपणे संवाद साधणारे आणि अवघड बाबी सोप्या करुन समजावणारे व्यक्ती होते”.

अमित शाह –

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “मी अरूण जेटली यांच्या अकाली निधनामुळे अतिशय दुःखी आहे. त्यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक नूकसान आहे. मी केवळ संघटनेचा ज्येष्ठ नेता नाही तर परिवारातील सदस्याला मुकलो आहे. त्यांचे मार्गदर्शन मला कैक वर्षांपासून मिळत होते. त्यांच्या निधनामुळे देशाचे राजकारण आणि भारतीय जनता पक्षात पोकळी निर्माण झाली आहे, जी लवकर भरुन येणारी नाही”.गृहमंत्री म्हणाले “ आपला अनूभव आणि अनोख्या क्षमतेसह अरुण जी यांनी पक्ष आणि सरकारमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. उत्तम वक्ते आणि समर्पित कार्यकर्त्याच्या रुपाने त्यांनी देशाचे अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद अशा महत्वपूर्ण पदांची शोभा वाढवली”.

अमित शाह यांनी म्हटले की, “अरूण जी यांनी रालोआ सरकारच्या 2014-2019 या कार्यकाळात पंतप्रधानांचे गरीबांचे कल्याण हे धोरण प्रत्यक्षात उतरवण्यास आणि जगातील वेगाने विकसित होणारी देशाची अर्थव्यवस्था निर्माण करुन अर्थमंत्रीपदाचा ठसा उमटवला आहे. ते लोकाभिमुख नेते होते आणि नेहमी सर्वसामान्यांचा विचार करत. त्यांचा प्रत्येक निर्णय- मग तो काळ्या पैशावर कारवाई करण्याचा असो, जीएसटी- एक देश-एक कर, हे स्वप्न साकार करण्याचा, नोटाबंदी असो, यातून हे दिसून येते. देश सदैव त्यांचे अतिशय सरळ आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून स्मरण करेल”.

श्रेष्ठ संसदपटू आणि कुशल प्रशासक गमावला – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई: माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने एक श्रेष्ठ संसदपटू, आणिबाणीविरूद्ध कठोर संघर्ष करणारा नेता, मानवी हक्कांचा खंदा समर्थक, एक उत्तम व निष्णात विधिज्ञ आणि संघर्षशील नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. जेटली यांच्या निधनाने मी अतिशय व्यथित झालो आहे. अगदी तरुण वयात एक उमदा विद्यार्थी नेता म्हणून राजकारणात सक्रिय झालेल्या जेटलीजींनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वगुणांची चमक दाखवली होती. मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात अर्थमंत्री म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. या कालावधीत अत्यंत क्रांतिकारी अशा निर्णयांनी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबुती दिली होती. जीएसटीच्या अंमलबजावणीत त्यांनी दिलेले योगदान कायम अधोरेखित होत राहील. राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळताना वरिष्ठांच्या या सभागृहातील विविध चर्चा वादविवादांना त्यांनी एक अनोखी उंची प्राप्त करून दिली होती. महिला आरक्षण, जनलोकपाल विधेयक अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांचा आग्रही पुढाकार मूल्यांशी बांधिलकी दर्शवणारा होता. प्रकृती प्रतिकूल असतानाही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पडद्याआड आपल्या क्षमतांचा पूर्ण विनियोग करतानाच जवळजवळ प्रत्येक दिवशी ब्लॉगच्या माध्यमातून लेखन करीत प्रचारात स्वत:ला झोकून दिलेले आम्ही त्यांना पाहिले आहे. तसेच प्रकृती साथ देत नसतानाही अलिकडच्या काळात भाजपाच्या प्रत्येक बैठकांमध्ये ते उपस्थित राहत. त्यांचा समर्पण भावच त्यातून दिसून येतो. देशाचे अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, माहिती आणि प्रसारणमंत्री, विधि व न्याय विभागाचे मंत्री, राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी देशाची केलेली सेवा कायम स्मरणात राहील. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना त्यांनी नेहमी पाठिंबा दिला. अटलजी, पर्रिकरजी, सुषमाजी यांच्या पाठोपाठ जेटलीजींच्या निधनाने संसदीय राजकारणातील अतिशय अभ्यासू असे व्यक्तिमत्त्व आपण गमावले असून माझीही वैयक्तिक हानी झाली आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे-

विद्यार्थी दशेपासूनच नेतृत्व, उत्कृष्ट वक्तृत्व असे गुण असेलेले देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने एक झंझवाती नेतृत्व गमावला असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.

श्री. तावडे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, अभ्यासपूर्ण युक्तिवादाने भल्याभल्यांना गारद करण्याची शक्ती अरुण जेटली यांच्याकडे होती. उत्कृष्ट वकिल म्हणून ख्याती मिळविणाऱ्या श्री. जेटली यांनी विद्यार्थी नेते ते केंद्रीय अर्थमंत्रीपदापर्यंतच्या प्रवासात त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. देश उभारणीसाठी योगदान देणाऱ्या श्री. जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश मुकला आहे.

मंगल प्रभात लोढा-

 मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. लोढा आपल्या शोक संदेशात म्हणाले की,  “बदलता भारत घडवताना जेटलीजी हे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी यांचे सहयोगी होते, अशा समर्थ नेत्याचे निधन म्हणजे हे संपूर्ण देशाचे मोठे नुकसान आहे. देशाचे महान नेते अरुण जेटली यांच्या निधनाने मला दु: ख झाले आहे. त्यांच्या निधनाने देशाने एक विद्वान, एक प्रगल्भ कायदेपंडित आणि कर्तुत्ववाननेता गमावला.” ते म्हणाले की, “जेटली यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप वेदनादायक आहे कारण ते माझे मार्गदर्शक आहेत आणि त्यांनी नेहमीच आमच्या संपूर्ण कुटुंबावर प्रेम केले.” लोढा म्हणाले की, “जेटली यांनी भारताला उच्च स्थानावर पोहचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असे सांगत लोढा यांनी शोक व्यक्त करत जेटलीजी यांना श्रद्धांजली वाहिली.

खासदार गिरीश बापट –

पुणे-माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. नरेंद्र मोदीजी यांच्या सरकार मध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. राजकारणासह साहित्य, अर्थकारण, वकीली अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. मितभाषी आणि कार्यतत्पर अशी त्यांची ख्याती होती. सुषमाजी यांच्या जाण्यानंतर जो मोठा धक्का आम्हाला व पक्षाला बसला होता त्यातून आम्ही सावरलो नव्हतो. तोच हा मोठा आघात सर्वाच्या मनावर झाला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.