Home Blog Page 2859

अजित पवार,विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे आदींसह बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल

0

मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (एमएससी) कथित हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वितरण घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे आदींसह इतर बड्या नेत्यांवर एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्याची शिखर बँक म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हजारो कोटी रुपयांची कर्जे नियमबाह्यपणे वितरित केली. राजकीय नेत्यांनी आपल्या मर्जीतील संस्था आणि व्यक्तींना नियमबाह्यपणे कर्जे दिल्याने बँक अडचणीत सापडली आणि त्यावर प्रशासक नेमणे रिझर्व्ह बँकेला भाग पडले. या संदर्भात नाबार्ड, सहकार व साखर आयुक्त, कॅग इत्यादींचे अहवाल असूनही एफआयआर नोंदवण्यात आला नाही, असा आरोप करत एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्याची विनंती माहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी फौजदारी जनहित याचिकेद्वारे केली होती. याविषयी हायकोर्टाने निर्देश दिल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जानेवारी महिन्यात अरोरा यांचा जबाब नोंदवून घेतला. मात्र, त्यानंतर कोणतीच कार्यवाही केली नव्हती. त्यामुळे हायकोर्टाने आर्थिक गुन्हे शाखेला जाब विचारला होता. तेव्हा अरोरा यांच्या तक्रारीत तथ्य आढळले नसल्याने एफआयआर नोंदवण्यात आला नाही, असं उत्तर आर्थिक गुन्हे शाखेने दिले होते. त्यानंतर न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने याचिकादारांची विनंती मान्य करत पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानुसार या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेत्यांची नावे
अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप देशमुख, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, हसन मुश्रीफ, प्रसाद तनपुरे, दिवंगत सदाशिवराव मंडलिक, दिवंगत पांडूरंग फुंडकर, मिनाक्षी पाटील, आनंदराव अडसूळ, जगन्नाथ पाटील, तानाजीराव चोरगे, जयंत पाटील, जयंतराव आवळे, दिलीप सोपल, राजन तेली, विलासराव जगताप, रजनीताई पाटील, माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेक जणांची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र स्टेट को ऑप बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे, त्यामुळे गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी मुंबई हायकोर्टात काही वर्षांपूर्वी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून सुनावणी सुरू होती. त्यावरील सुनावणी 31 जुलै रोजी संपली. यावेळी बँकेच्या संचालक मंडळावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे का असा प्रश्न न्यायमूर्तींनी विचारला असता, राज्य सरकारच्या वकिलांनी नाही, असे उत्तर दिल्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती. महाराष्ट को ऑप बँक ही शिखर बँक आहे. या बँकेच्यावतीने 2005 ते 2010 या काळात मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केले होते. हे कर्ज सहकारी साखर कारखाने आणि सहकारी सूत गिरण्या आणि इतर कंपन्या, कारखाने यांना दिले होते. हे कर्ज देताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. मुख्य म्हणजे हे कर्ज राज्यातील अनेक राजकारण्यांच्या कंपन्या, कारखान्यांना दिले होते. पुढे हे कर्ज वसूल झाले नाही. त्यामुळे हा एक मोठा गैरव्यवहार आहे असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.

वाचकाला आपल्या विचारप्रवाहात सोबत नेणे महत्वाचे ! :डॉ विद्या येरवडेकर

0
‘ऑफ स्वान्स  अँड सॉंग्ज ‘  कथासंग्रहाचे प्रकाशन 
पुणे :’लेखन करताना  सोपे इंग्रजी लिहिणे हेच अवघड असते .सोप्या इंग्रजीत  इंग्रजी कथा लिहून वाचकांना त्यात आपल्या विचारप्रवाहात सोबत घेऊन जाणे  ,हे लेखकाच्या दृष्टीने अतिशय कौशल्याचे काम आहे ‘,असे मत   ‘सिम्बॉयसिस’ आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती    डॉ विद्या येरवडेकर यांनी काढले .
 
रोहिणी परांजपे-साठे लिखित आणि’नोशनप्रेस’ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘ऑफ स्वान्स  अँड सॉंग्ज ‘ या कथासंग्रहाचे प्रकाशन डॉ विद्या येरवडेकर  आणि ज्येष्ठ गायन गुरु माधुरी जोशी हस्ते झाले . तेव्हा डॉ  येरवडेकर  बोलत होत्या. हा कार्यक्रम  शनिवारी सायंकाळी पीवायसी जिमखाना येथे झाला .रोहिणी परांजपे -साठे यांचा हा पहिलाच इंग्रजी कथासंग्रह आहे .   सभागृहात डॉ  शां  ब मुजुमदार ,दिलीप प्रभावळकर,डॉ गो ब देगलूरकर ,डॉ  शिरीष साठे ,डॉ  प्रसाद राजहंस इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
               डॉ येरवडेकर  म्हणाल्या’पुस्तक लिहिणे हेच अवघड आणि कष्टाचे  काम आहे .कारण प्रत्येक शब्द लिहिताना अनेकदा विचार करावा लागतो .  लेखन करताना सोपे इंग्रजी लिहिणे हेच अवघड असते .सोप्या इंग्रजीत  इंग्रजी कथा लिहून वाचकांना त्यात आपल्या विचारप्रवाहात सोबत घेऊन जाणे  ,हे लेखकाच्या दृष्टीने अतिशय कौशल्याचे काम आहे . या कामात लेखिका रोहिणी परांजपे -साठे यशस्वी झाल्या आहेत ‘,
 डॉ विद्या येरवडेकर  पुढे म्हणाल्या ,’लेखनाची आवड असणे आणि  आपल्या आवडीच्या गोष्टींना न्याय देता येणे हेही धैर्याचे काम आहे .  आवड पुस्तकरूपाने पूर्ण होणे  यात रोहिणी परांजपे साठे यशस्वी झाल्या आहेत . हे लेखन उत्तम दर्जाचे असून भविष्यात त्या इंग्रजीतील देशातील अव्वल लेखिका म्हणून उदयास येतील . ‘माधुरी जोशी यांनीही छोटेखानी भाषणातून शुभेच्छा दिल्या .
मूळच्या गायिका आणि अर्थतज्ज्ञ असलेल्या लेखिका रोहिणी परांजपे -साठे म्हणाल्या ,’लेखन हे एक प्रकारचे खुळावलेपण आहे . गायन आणि लेखन या दोन्ही प्रक्रिया सारख्याच  अभिव्यक्तीच्या आणि ताकदीच्या आहेत . गाताना स्वरांचे सामर्थ्य जाणवावे तसे लिहिता लिहिताच मला शब्दांचे सामर्थ्य जाणवत गेले.ज्यांच्या जगण्याची  कुठे  दखल घेतली गेलेली नाही अशा   अनेक  व्यक्तिरेखांच्या जीवनातील  कथा माझ्या हातून लिहिल्या गेल्या .
लीला रविचंद्रन  यांनी सूत्रसंचालन केले

चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत 4 दिवसांची वाढ

0

नवी दिल्ली – आयएनएक्स घोटाळा प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत 4 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सीबीआयच्या कोठडीत असताना त्यांना शेवटच्या दिवशी अर्थात 26 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर करण्यात आले. यामध्ये सीबीआय कोर्टात त्यांच्याविरोधात सविस्तर चौकशी करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत मागण्यात आली. त्यानंतर सीबीआयला आणखी 4 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 30 ऑगस्ट रोजी होणार आहे.

तत्पूर्वी सुप्रीम कोर्टाने पी. चिदंबरम यांची याचिका सोमवारी फेटाळून लावली आहे. माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी अंतरिम जामीनासाठी यापूर्वी दिल्ली हायकोर्टात अर्ज केला होता. ती फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली होती. आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा चिदंबरम यांना दणका दिला. सुप्रीम कोर्टात सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी स्पष्ट केले की चिदंबरम यांना आधीच अटक झाली आहे. आता जुन्या अंतरिम जामीनाच्या याचिकेवर सुनावणी घेता येणार नाही. त्यामुळे, चिदंबरम यांना नव्याने नियमित जामीन याचिका दाखल करावी लागणार आहे.

चिदंबरम यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी जस्टिस भानुमती यांच्या बेचसमोर जामीन याचिकेचा उल्लेख केला होता. आपल्या याचिकाकर्त्याची याचिका सुनावणीसाठी यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाही असेही ते म्हणाले होते. त्यावर सुप्रीम कोर्टाच्या रेजिस्ट्रारने आवश्यक पावले उचलणे आणि याचिका यादीत समाविष्ट करण्यास सांगितले. तर दुसरीकडे, अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) सुप्रीम कोर्टात शपथपत्र सादर केला. त्यानुसार, चिदंबरम आणि आयएनएक्स मीडिया घोटाळ्यातील सह-आरोपींनी अर्जेण्टीना, ऑस्ट्रिया, ब्रिटिश व्हर्जिन बेट समूह, फ्रान्स, ग्रीस, मलेशिया, मोनॅको, फिलीपाइन्स, सिंगापूर, दक्षिण आफ्रीका, स्पेन आणि श्रीलंकेत संपत्ती गोळा केली. ईडीने सांगितल्याप्रमाणे, या संबंधित विशिष्ट माहिती आर्थिक गुप्तचर शाखेकडून मिळवण्यात आली होती.

काय आहेत आरोप?
चिदंबरम यांनी कथितरित्या अर्थमंत्री असताना लाच घेऊन आयएनएक्सला फायदा करून दिला. या कंपनीला त्यांनी 2007 मध्ये 305 कोटी रुपये घेण्यासाठी परदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाची मंजुरी मिळवून दिली होती. ज्या कंपन्यांना फायदा झाला त्यांना चिदंबरम यांचे पुत्र आणि खासदार कार्ती चिदंबरम चालवत होते. सीबीआयने 15 मे 2017 रोजी या प्रकरणात खटला दाखल केला होता. 2018 मध्ये ईडीने सुद्धा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी खटला दाखल केला. एअरसेल-मॅक्सिस डीलमध्ये सुद्धा चिदंबरम आरोपी आहेत. यामध्ये सीबीआयने 2017 मध्ये एफआयआर दाखल केला होता.

काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा ! जी-7 संमेलनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्पष्टोक्ती

0

फ्रान्समधील जी ७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प आणि मोदी यांनी या भेटीत काश्मीरसह वेगवगेळया मुद्दांवर चर्चा केली. मोदींनी यावेळी ट्रम्प यांच्यासमोर काश्मीर हा भारत-पाकिस्तानमधला द्विपक्षीय मुद्दा असल्याचे सांगितले. दोन्ही देश आपसातील मतभेद सोडवतील असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला.

काश्मीरसह सर्व विषय भारत-पाकिस्तानमधले दि्वपक्षीय मुद्दे आहेत. आम्हाला तिसऱ्या देशाला त्रास द्यायचा नाही असे मोदी यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प काश्मीर मुद्दावर मध्यस्थी करण्याची वारंवार तयारी दाखवत होते. पण आता त्यांनी माघार घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान त्यांचे मतभेद सोडवतील असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

काश्मीर मुद्दावर काल रात्री आम्ही बोललो. काश्मीरमधली परिस्थिती नियंत्रणात असल्याचे मोदींचे मत आहे. ते पाकिस्तान बरोबर चर्चा करुन नक्कीचे काही तरी चांगले घडवून आणतील असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. काश्मीर प्रश्नी अमेरिकेने मध्यस्थी करावी यासाठी पाकिस्तानचा आटापिटा सुरु आहे. पण ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दावर आज जी भूमिका मांडली तो एकप्रकारे भारताचा राजनैतिक विजय आहे. महत्वाचं म्हणजे ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी काश्मीर द्विपक्षीय मुद्दा असल्याचे सांगितले.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्दे केल्यापासून पाकिस्तान आगपाखड करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान विजयी झाले तेव्हा त्यांना शुभेच्छा देताना आपण गरीबीविरोधात लढले पाहिजे हे बोललो होते असे नरेंद्र मोदी संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले.

मावळात राज्यमंत्री बाळा भेगडेंसह तिघात शर्यत !

0

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांनी इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. भाजपनेही नावं निश्चित करण्यासाठी मुलाखती घेतल्या. भाजप नेते आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मावळ विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती घेतल्या. यावेळी 20 जणांनी या मतदारसंघातून इच्छुक असल्याचं सांगत मुलाखती दिल्या. यामध्ये कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांचाही समावेश होता. राज्यमंत्री बाळा भेगडेंनी उमेवारी साठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मुलाखत दिली.

मावळ विधानसभा मतदारसंघात  भाजपाचा मोठा मतदार आहे. त्यामुळे ज्यालाउमेदवारी मिळेल तो विजयी होईल असा समज इच्छुकांमध्ये आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये युतीला भरघोस मतदार झालं.  इथे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पराभव केला.

आता विधानसभेला या मतदारसंघात बाळा भेगडे यांनाच उमेदवारी  मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र तरीही भाजपची संसदीय समितीच उमेदवार ठरवेल, असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं.

बाळा भेगडे हे सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. दोन वेळा  आमदार असलेल्या भेगडे यांची नुकतीच राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यांनी पुन्हा एकदा इथे दावेदारी सांगितली आहे. मात्र सुनील शेळके आणि रवी भेगडे या दोघांनीही या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे.

संजय दत्त रासपात येणार असे कधीच म्हणालो नाही – जानकर

0

अभिनेता संजय दत्त राष्ट्रीय समाज पक्ष (रासप)मध्ये प्रवेश करणार असल्याचे मी कधीच म्हटलं नव्हतं, असे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट केले आहे. २५ ऑगस्ट रोजी पक्षाच्या मेळाव्यात संजय दत्त रासपात प्रवेश करणार अशी माहिती स्वतः महादेव जानकर यांनी दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांत झळकले होते.

दरम्यान काही माध्यमांशी बोलताना काल महादेव जानकर म्हणाले, ‘संजय दत्त रासपामध्ये प्रवेश करणार नाहीत. प्रसारमाध्यमांत आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत.’ ते म्हणाले की, ‘संजय दत्त रासपात प्रवेश करणार नाहीत. पण इतर पक्षाचा जसा प्रचार करतात तसाच ते रासपाचा प्रचार करणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत माझ्या पक्षाचा प्रचार करणार असल्याचे संजय दत्त यांनी मला आश्वासन दिले आहे.’

रविवारी मुंबईत रासपच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर साजरा करण्यात आला. यावेळी प्रचंड शक्तिप्रदर्शन करण्यात आले. याप्रसंगी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची देखील उपस्थिती होती. या मेळाव्याला संबोधित करताना जानकर यांनी संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं.

काय म्हणाले होते जानकर ?
‘तारीख चुकल्याने संजय दत्त यांचा पक्ष प्रवेश पुढे ढकलला गेला आहे. पक्षप्रवेशासाठी संजय दत्त यांना २५ ऑगस्ट तारीख मागितली होती पण त्यांनी चुकून २५ सप्टेंबर तारीख नोंद केली. त्यामुळे त्यांचा आज प्रवेश होऊ शकला नाही. पण पुढच्या काळात ते पक्षात प्रवेश करतील.

अभिनेता संजय दत्त करणार ‘रासप’चा प्रचार

0

मुंबई – बाॅलीवूड अभिनेता लवकरच राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार अाहे. खरे तर अाजच्या कार्यक्रमातच पक्षप्रवेश हाेणार हाेता, पण संजय दुबईत असल्याने हा कार्यक्रम हाेऊ शकला नाही. विधानसभा निवडणुकीत ताे रासप उमेदवारांच्या विधानसभेच्या प्रचाराला हेलिकाॅप्टरने येणार आहे, असे जानकर यांनी सांगितले. आता संजय दत्त २५ सप्टेंबर रोजी प्रवेश करेल. या वेळी संजय दत्तने रासपला व्हिडिअाेद्वारे शुभेच्छा दिल्या.

 

 

प्लास्टिक निर्मूलनासाठी पुणेकरांना एक लाख कापडी पिशव्या वाटणार

0

पुणे : माय अर्थ फाउंडेशन व दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिकमुक्त भारताचे स्वप्न साकारण्यासाठी एक लाख कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. ‘एक कापडी पिशवी घ्या आणि एक किलो प्लास्टिक द्या’ हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, प्लास्टिक वापराच्या बंदीबाबत जनजागृतीही केली जाणार आहे. या उपक्रमात लायन्स क्लब इंटरनॅशनल, महाएनजीओ फेडरेशन या संस्थांचाही सहभाग असणार आहे, अशी माहिती माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ललित राठी, लायन्स क्लबचे राज मुछाल तसेच ‘महाएनजीओ’चे शेखर मुंदडा आदी उपस्थित होते.

अनंत घरत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये, असे आवाहन केले होते. त्याला अनोख्या पद्धतीने प्रतिसाद देण्यासाठी माय अर्थ फाऊंडेशन व दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. टप्प्याटप्प्याने पुणेकरांना प्लास्टिककडून कापडी पिशव्या वापरण्यास प्रोत्साहित करायचे आहे. त्यासाठी एक कापडी पिशवीच्या बदल्यात घरातील एक किलो प्लास्टिक कचरा घेतला जाणार आहे. याशिवाय प्लास्टिकच्या वापरावर अभ्यासही केला जाणार आहे. प्लास्टिक कचरा ही फार मोठी समस्या जरी असली, तरी त्या समस्येवर फक्त पर्यायच नाही, तर त्यातून मोठ्या प्रमाणात व्यवसाय निर्मिती, रोजगार आणि बरेच काही असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. कचर्‍याला आम्ही लक्ष्मी म्हणून संबोधतो. एक पाऊल, वसुंधरेसाठी, प्लास्टिक मुक्त पर्यावरणासाठी हा प्रयत्न आणि सुरवात आहे. स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याचा घसरलेला क्रमांक वाढविण्यासाठी या माध्यमातून जनजागृती हि केली जाणार आहे.

दीपाली सय्यद म्हणाल्या, पुणे हे विद्येचे माहेरघर असून, स्वच्छतेच्या बाबतीतही भारतात अग्रेसर असावे, अशी इच्छा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करणे आणि कापडी पिशवीचा जीवनातील वापर वाढावा ही इच्छा आहे. हा उपक्रम लोकांमध्ये पोहोचविण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात पथनाट्यांचे प्रयोग केले जाणार आहेत. प्लास्टिक हा अविघटनशील पदार्थ आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे मानवासह जनावरे, झाडे, जमीन यासह पाण्याचे प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी आपण कापडी पिशवीचा वापर करणे अतिशय गरजेचे आहे. त्याच भावनेतून कापडी पिशवीच्या वापरला नागरिकांनी प्राधान्य द्यावे, यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. प्लास्टिक वापरावर बंदीबरोबरच त्याच्या फायद्या-तोट्यांविषयी देखील या उपक्रमात माहिती दिली जाणार आहे.

ललित राठी यांनी सांगितले की, संकलित प्लास्टिक कचर्‍याचे संशोधन करून त्यातुन कोणते प्लास्टिक योग्य कोणते अयोग्य आहे, याचा अहवाल एन्व्हायरमेंट क्लब ऑफ इंडियाच्या माध्यमातून सरकारला पाठविण्यात येणार आहे. एक कापडी पिशवीच्या बदल्यात एक किलो प्लास्टिक द्या असे आवाहन आम्ही करीत आहोत आणि त्यामार्फत 100 टन प्लास्टिक गोळा करण्याचा आमचा प्रथमदर्शी मानस आणि ध्येय आहे. प्लास्टिकबद्दल समाजात समज-गैरसमज असल्यामुळे प्लास्टिकच्या वापरासंदर्भी सर्व उपभोगत्याना जाणीव होणे गरजेचे आहे. कचर्‍याचे वर्गीकरण झाल्यानंतर त्याचे पुढे काय होते जाची जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे.

लायन्स क्लबचे राज मुछाल म्हणाले हा उपक्रम पुणे शहरातील प्रत्येक शाळा , महाविद्यालयात नेण्याचे काम लायन्स तर्फे केले जाईल. तसेच लायन्सच्या वतीने 5000 कापडी पिशव्या या उपक्रमात दिल्या जातील.

आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या निर्मितीचे ‘संवाद ‘ प्रदर्शन

0
‘अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ‘चे आयोजन 
पुणे:महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ‘ च्या वतीने आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या निर्मितीचे ‘संवाद २०१९’हे वार्षिक  प्रदर्शन २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे .सहकारनगर च्या बागुल उद्यानातील पंडित भीमसेन जोशी कलादालनात हे प्रदर्शन सकाळी १० ते ६ या वेळात होणार आहे .
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या हस्ते २९ ऑगस्ट ला सकाळी १० वाजता उदघाटन होणार आहे. ‘अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ‘च्या प्राचार्य डॉ . लीना देबनाथ यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .उदघाटन कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,उपाध्यक्ष आबेदा इनामदार उपस्थित राहणार आहेत .

दिव्यांग व सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती निर्मिती उपक्रम

0
‘पुणे टीचर ऍक्टिव्हिटी ग्रुप ‘ चा पुढाकार
पुणे :’पुणे टीचर ऍक्टिव्हिटी ग्रुप तर्फे ‘दिव्यांग व सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक  श्री गणेश मूर्ती तयार करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
 हा उपक्रम नारायणी धाम मंदिर,कात्रज,पुणे, येथे घेण्यात आला .यामध्ये धनकवडी,बालाजीनगर,कात्रज, आंबेगाव,पुणे परिसरातील एकूण 200 विद्यार्थी व पालक सहभागी झाले.यासाठी झाँसी राव यांनी मार्गदर्शन केले.  या उपक्रमासाठी लागणारी  शाडू माती म्हाळू पार्वती प्रतिष्ठान निलेश निकम यांच्या तर्फे मोफत उपलब्द्ध करण्यात आली .
कार्यक्रम उदघाटन नगरसेवक युवराज बेलदरे,अर्चना शहा,लायन विनय निंबाळकर, लायन सचिन कर्णिक,मोहन दुधाने,गिरीश लिमन या मान्यवरांच्या हस्ते झाले .
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आरती लिमन,दैवत लिमन,अशोक नांगरे,रवींद्र जोशी,हेमंत यादव,अजय बोऱ्हाडे,प्रशांत गडदे,संजय पाटील, मेघना जोशी,पूजा गयावळ,इनामदार,चित्रा शिंदे,सुषमा सोनवले या शिक्षकांनी सहकार्य केले.

‘पुणे टीचर ऍक्टिव्हिटी ग्रुप ‘ पुणे जिल्ह्यात दिव्यांग शाळेत काम करणाऱ्या शिक्षक एकत्र येऊन दर महिन्यातून एकदा सुट्टीच्या दिवसात पुणे परिसरातील दिव्यांग विद्यार्थी एकत्र करून विविध समाजपयोगी उपक्रम घेऊन सहभागी करून आनंद देण्याचे काम  करतो.

दिव्यांग मुलांना समाजासमोर ठाम पणे उभे राहण्यासाठी आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून ऍक्टिव्हिटी ग्रुप कार्यरत  आहे.

‘सीएफओ-सीईओ मीट’चे आयोजन

0
पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कमिटी फॉर मेम्बर्स इन इंडस्ट्रीच्या (सीएमआय) वतीने ‘सीएफओ-सीईओ इंटरॅक्टिव्ह मीट’चे आयोजन केले आहे. ही परिषद येत्या शुक्रवारी (दि. ३० ऑगस्ट २०१९) सायंकाळी ७.०० वाजता पुणे स्टेशन जवळील हॉटेल शेरटॉन ग्रँड येथे होणार आहे. या परिषदेत उद्योग क्षेत्रातील मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती आयसीएआय’ पुणेचे उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सीए अभिषेक धामणे म्हणाले, “ऑगस्ट महिना ‘मेंबर इन इंडस्ट्री मंथ’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. विविध उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या सदस्यांशी संपर्क साधणे आणि संबध वाढविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात एचडीएफसी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष श्री. केकी मिस्त्री यांचे ‘सीएफओ व सीईओचीची सद्यस्थितीतील भूमिका’ या विषयावर बीजभाषण होणार आहे. यांनतर कार्यक्रमात होणाऱ्या चर्चासत्रात सीए अनिल भांडारी, सीए दिलीप आपटे, सीए अनिल पटवर्धन, कोटक बँकेचे अ-कार्यकारी अध्यक्ष प्रकाश आपटे, सीए एस बी झावरे मार्गदर्शन करणार आहेत. पुण्यातील नामांकित सीईओ / सीएफओ, नॉन-चार्टर्ड अकाउंटंट सीएफओ / सीईओंनादेखील आमंत्रित करण्यात आले आहे.”

पूरग्रस्तांना स्वयंपाकाच्या भांड्यांचे वाटप

0

पुणे :

दि मुस्लिम कॉपरेटिव्ह बँक लि. पुणे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट) यांच्या वतीने ७१५ पूरग्रस्तांना रविवारी स्वयंपाकाच्या भांड्यांचे, संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

डॉ. पी. ए. इनामदार (चेअरमन, मुस्लिम को-ऑपरेटिव बँक), आमदार जगदीश मुळीक. नगरसेविका फरजाना अयुब शेख , अॅड. अयुब शेख यांच्या हस्ते वाटप झाले.

रविवारी दुपारी नगरसेविका फरजाना अयुब शेख , अॅड. अयुब शेख ( संचालक ,दि मुस्लिम को. ऑप. बँक लि. )यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

शांतीनगर, कतारवाडी व आदर्श इंदिरानगर (येरवडा )या परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. पूरग्रस्त नागरिकांना मदत करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

दिनांक २५ ऑगस्ट रोजी दुपारी नानासाहेब परुळेकर शाळा हा कार्यक्रम झाला.

‘ नैसर्गिक आपत्तीत मदत करण्यासाठी सर्व समाजसेवक, लोकप्रतिनिधी, संस्था प्रतिनिधी धावून गेले. हेच मानवतेचे वैशिष्ट्य आहे. ही मानवता आणि सलोखा टिकवून ठेवला पाहिजे ‘ , असे प्रतिपादन डॉ.पी. ए. इनामदार यांनी केले.

याप्रसंगी नगरसेविका शीतल सावंत, अशोक शिरोळे, अध्यक्ष पुणे शहर आरपीआय (A), संजय कदम, स्वीकृत नगरसेवक, चंद्रकांत जंजिरे, स्वीकृत नगरसेवक, अशोक कांबळे, संपर्क प्रमुख आरपीआय (A), बाळासाहेब जानराव, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश आरपीआय (A) आदी मान्यवर उपस्थित होते.

ऋजुता दिवेकर यांचा फिटनेस मंत्र – ‘स्थानिक आहार, वैश्विक विचार’

0

मुंबई,

टपाल खात्याचा चेहरा आणि दूत अशी ओळख असलेला पोस्टमन हा स्वत:ची काळजी न घेता अविरत आपले कर्तव्य बजावत असतो, मात्र पोस्टमनच्या कामाचे स्वरुप, त्याचा धावपळीचा दिनक्रम, तणाव आणि सतत फिरण्याच्या कामामुळे आहाराच्या चुकीच्या सवयींचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो. हा विचार करुन पोस्टमन आणि टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये आहार आणि आरोग्यविषयक जागृती या दृष्टीने मुंबईच्या मुख्य टपाल कार्यालयाने आज ‘फिटनेस मंत्र’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सुप्रसिद्ध आहार तज्ज्ञ आणि उदरविकारशास्त्र आशियाई संस्थेचा ‘पोषण आहार पुरस्कार’ विजेत्या ऋजुता दिवेकर यांनी या सत्रात आरोग्य आणि उत्तम आहाराविषयी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

पोस्टमननी आहाराच्या आपल्या पारंपरिक आणि दैनंदिन सवयी कायम ठेवाव्या, असा साधा मात्र उपयुक्त सल्ला त्यांनी दिला. आहाराविषयी खुप गुंतागुंतीच्या डाएटचा विचार न करता, पारंपरिक खाद्य पदार्थ आणि आधुनिक पोषण आहार विज्ञान याचा संगम करुन आपला आहार ठरवावा असे त्या म्हणाल्या. मातीत पिकणारे अन्न म्हणजेच स्थानिक आहार आणि पोषण विज्ञान म्हणजेच वैश्विक विचार याची सांगड घालावी, असा फिटने मंत्र त्यांनी श्रोत्यांना दिला.या सत्रासाठी टपाल खात्याच्या मुंबई विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य आणि आहार विषयक जागृतीसाठी हे सत्र आयोजित करण्यात आले होते. दिवेकर यांनी दिलेल्या मंत्रामुळे आहारातून आरोग्याची गुरुकिल्ली सापडल्याचा आनंद सर्व श्रोत्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

इथिओपियाचा फिक्रू अबेरा दादी सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये प्रथम

0
औरंगाबादचा धनावत प्रल्हाद रामसिंग भारतीय गटात प्रथम; ६४०० लोकांचा सहभाग

पुणे/सातारा : ढगाळ वातावरण… यवतेश्वर घाटातील धबधबे… रस्त्यावर आलेले ढग… अशा आल्हाददायी वातावरणात रविवारी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धकांमुळे येवतेश्वर घाट फुलला होता. सातारकरांनी मार्गाच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात धावपटूंचे स्वागत केले. स्पर्धेवर इथिओपिया व केनियाच्या धावपटूंचे वर्चस्व राहिले. ‘मैं भी सिपाही’ ही यंदाच्या स्पर्धेची संकल्पना होती.

खुल्या गटात फिक्रू अबेरा दादी (इथिओपिया) या धावपटूने १ तास १० मिनिटे आणि ६ सेकंदात मॅरेथॉन पूर्ण करत प्रथम आला. केनियाचा हिलारी किप्टू किमोसोप दुसरा, तर भारतीय धावपटूंमध्ये औरंगाबादच्या धनावत प्रल्हाद रामसिंग याने पहिला, भारतीय महिला गटात स्वाती गाडवे हिने पहिला क्रमांक पटकावला.

सातारा रनर्स फौंडेशन आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला पोलिस कवायत मैदानावरुन सकाळी ६ वाजता सुरुवात झाली. स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे. शौर्यचक्र विजेते सुभेदार त्रिभूवन सिंग, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सातारा रनर्स फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे, फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव गोळे व रेस डायरेक्टर डॉ. देवदत्त देव यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. पोवई नाका, कर्मवीर पथमार्गे शेटे चौक, कमानी हौद, राजपथावरुन राजवाडा- समर्थ मंदीरमार्गे बोगदा-प्रकृती रिसाॅर्ट, परत बोगदा, अदालतवाडामार्गे शाहू चौक, रविवार पेठ पोलिस चौकी, कर्मवीर पथावरुन नाक्यावर धावपटू आल्यानंतर पोलिस मैदानावर स्पर्धेची सांगता झाली.

“नेटक्या संयोजनामुळे सातारा रनर्स फौंडेशनचे पदाधिकारी व सर्व टीम कौतूकास पात्र आहे. गिनिज बुकमध्ये या स्पर्धेची नोंद झाली आहे. या पुढील काळात विविध विक्रम प्रस्थापित करत सातारा हिल मॅरेथॉन आपल्या साताऱ्याचे नाव जागतिक स्तरावर उंचावेल,” अशा शब्दात उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.

२१ किलो मिटरच्या या स्पर्धेत हजारो तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. यासाठी देशभरातूनच नव्हे, तर काही आंतरराष्ट्रीय  धावपटू शनिवारीच साताऱ्यात दाखल झाले होते. सकाळी ९ वाजता ‘फन रन’ सुरू झाली. ‘मै भी सिपाही’ म्हणजे डाॅक्टर, पोष्टमन, वकील, रिक्षाचालक आदी विविध व्यावसाईकांचा सन्मान करणारी थीम यामध्ये राबविण्यात आली. यावेळी चिमुरड्यांचा उत्साह पाहायला मिळाला. स्पर्धेत मोठ्यांबरोबरच शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते. सुमारे ८ हजार ५०० स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. शिस्तबद्धता, जल्लोषी वातावरण, उत्कृष्ट नियोजनामुळे सातारा हिल मॅरेथॉनने जगभरात आपला ठसा उमटवला आहे. या मॅरेथॉनचे नियोजन, संयोजन आणि सातारकरांच्या आदरातिथ्याबाबत येथे आलेल्या धावपटूंतून उत्स्फूर्त प्रतिक्रीया ऐकायला मिळाल्या. सोशल मिडियावरही याचे पडसाद उमटले. सोशल मीडियावर रविवारी दिवसभर या मॅरेथॉनची धूम राहिली.

खासदार उदयनराजे भोसले, सुभेदार त्रिभूवन सिंग, जिल्हा सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत, दिलीप दोशी, गणेश देशमुख, राम कदम, लेफ्टनंट कर्नल रणजित नलावडे, किसनवीर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव तसेच सातारा रनर्स फौंडेशनच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. पोलिस कवायत मैदानावर तत्काळ वैद्यकीय सेवा तैनात ठेवण्यात आली होती. जणू छोटा अतिदक्षता विभागच उभारण्यात आला होता. ह्रदयविकाराचा झटका आल्यास अशाप्रसंगी तत्काळ लागणारं इंजक्शनही वैद्यकीय कक्षात उपलब्ध होते. १२ डाॅक्टर ; पैकी एक पुर्णवेळ कार्डिऑलॉजीस्ट, २ अतिदक्षता विभाग तज्ज्ञ असा चोख वैद्यकीय बंदोबस्त होता.
सातारा हिल हाफ मॅरेथॉनचा सविस्तर निकाल

(खुला गट)
पहिला क्रमांक : फिक्रू अबेरा दादी, इथिओपिया (१.१०.०६), रुपये – १,५०,०००/-
दुसरा क्रमांक : हिलारी किप्टू किमोसोप, केनिया (१.११.३५) रुपये – १,००,०००/-
तिसरा क्रमांक : फ्रेसिव अस्फाव बेकल, इथिओपिया (१.११.५६) रुपये ७५,०००/-

महिला गट
पहिला क्रमांक : मर्सी जेलीमो टू, केनिया (१.२४.३०), रुपये १,५०,०००/-
दुसरा क्रमांक : जेनेट ऍडेक अग्टेव, इथिओपिया, (१.२५.४८), रुपये १,००,०००/-
तिसरा क्रमांक : झिनेबा कासिम गेलेटो, इथिओपिया, (१.२९.३५), रुपये ७५,०००/-

भारतीय (पुरुष)

प्रथम क्रमांक : धनावत प्रल्हाद रामसिंग, औरंगाबाद (१.१२.५३), रुपये ५०,०००/-
दुसरा क्रमांक : राहूल कुमार पाल, (१.१३.१९), रुपये ३०,०००/-
तिसरा क्रमांक : आदिनाथ भोसले, (१.१५.०४), रुपये २०,०००/-

भारतीय महिला
पहिला क्रमांक : स्वाती गाडवे, (१.२५.१८), रुपये ५०,०००/-

दुसरा क्रमांक : रेश्मा केवटे, (१.३२.२९), रुपये ३०,०००/-
तिसरा क्रमांक : आरती देशमुख (१.३३.४०), रुपये २०,०००/-
बाईक ऍम्ब्युलन्स व फूट मसाज

धावपटूंच्या वैद्यकीय सोईसाठी १३ रुग्णवाहिका होत्या. त्यात ६ कार्ड्याक, ७ मिनी रुग्णवाहिका २ बाईक अँब्युलन्सचा समावेश होता. गरजेनुसार रुग्णाला जागेवर कृत्रिम श्वासोश्वास देण्यात आला. मॅरेथॉन झाल्यानंतर धावपटूंसाठी फूट मसाजची व्यवस्था करण्यात आली होती. पायांची मसाज करणा-या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईच्या कांचन काया या स्वयंसेवी संस्थेतील ६ अंधबांधवांचा समावेश होता. त्यांच्याकडील कौशल्य पाहून धावपटूंसह सातारकरही आवाक झाले. सातारा रनर्स फौंडेशनच्या सहकार्यामुळे अंधबांधवांनी ही सेवा दिली होती.

अभिराम निलाखे, अमोघ दामले, अथर्व राऊत यांचा मानांकित खेळाडूंवर विजय

0
पुणे: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व फ्युचर प्रो टेनिस अकादमी यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरीज मानांकन टेनिस 2019 स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात अभिराम निलाखे, अमोघ दामले, अथर्व राऊत यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आजचा दिवस गाजवला.
येरवडा येथील फ्युचर प्रो टेनिस अकादमीच्या टेनिस कोर्टवर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगरमानांकित अभिराम निलाखे याने चौथ्या मानांकित अनन्मय उपाध्यायचा टायब्रेकमध्ये 6-5(7-2) असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. अथर्व राऊतने सातव्या मानांकित दिव्यांक कवितकेचा 6-3 असा सहज पराभव करून आगेकूच केली. अमोघ दामले याने पाचव्या मानांकित आर्यन घाडगेचा 6-2 असा एकतर्फी पराभव करून तिसऱ्या फेरीत धडक मारली.
14वर्षाखालील मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित सिद्धी खोतने आरोही देशमुखला 6-3 असे पराभूत केले. देवांश्री प्रभुदेसाई हिने मृणाल शेळकेचा 6-3 असा तर, अलिना शेखने श्रावणी पत्कीचा 6-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 12वर्षाखालील मुले: दुसरी फेरी:
अद्विक नाटेकर(1)वि.वि.पार्थ काळे 6-4;
अर्जुन वेल्लूरी वि.वि.देवदत्त पाटील 6-1;
शार्दुल खवळे वि.वि.सनत कडले 6-2;
आदित्य कामत वि.वि.विहान तिवारी 6-5(7-3);
शिवतेज श्रीफुले(6) वि.वि.आरुष देशपांडे 6-5(8-6);
अर्णव बनसोडे(5)वि.वि.श्रवण देवी 6-0;
अभिराम निलाखे(2) वि.वि.हिमनिश बागिया 6-1;
14वर्षाखालील मुले: दुसरी फेरी:
आर्यन हूड(1)वि.वि.विवान शंकर 6-1;
आदित्य भटवेरा(6)वि.वि.राजचंद्र त्रिमुखे 6-3;
पार्थ देवरूखकर(3)वि.वि.करण चहल 6-0;
अमोघ दामले वि.वि.आर्यन घाडगे(5)6-2;
अथर्व राऊत वि.वि.दिव्यांक कवितके(7)6-3;
अभिराम निलाखे वि.वि.अनन्मय उपाध्याय(4) 6-5(7-2);
14वर्षाखालील मुली: दुसरी फेरी:
सिद्धी खोत(1)वि.वि.आरोही देशमुख 6-3;
देवांश्री प्रभुदेसाई वि.वि.मृणाल शेळके 6-3;
अलिना शेख वि.वि.श्रावणी पत्की 6-2;
सिमरन छेत्री वि.वि.रितिका मोरे 6-1;
श्रावणी देशमुख वि.वि.नाव्या भामिदिप्ती 6-2;
संचिता नगरकर(2)वि.वि.आस्मि टिळेकर 6-2.