Home Blog Page 2858

बुद्धिबळपटूंना सरकार कडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही-क्रीडामंत्र्यांकडे गाऱ्हाणे

0

पुणे-बुद्धिबळपटूंना सरकार कडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही अशी तक्रार करणाऱ्या ज्येष्ठांना सकारात्मक प्रतिसाद देत क्रीडा मंत्र्यांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले.

आमदार मेधा कुलकर्णी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटे, इंटरनॅशनल मास्तर शशिकांत कुतवळ, नरेंद्र सापळे (IWM सलोनी सापळे ह्यांचे वडील), श्री कृष्णातेर (कॉमनवेल्थ चॅम्पियन कुशागर ह्यांचे वडील) ह्यांनी आज बुद्धिळपटूंच्या प्रदीर्घ कालापासून प्रलंबित असलेल्या समस्यांबाबत शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रीआशिष शेलार ह्यांची भेट घेतली.

आशियाई / राष्ट्रकुल व जागतिक बुद्धिबळ स्पर्धामध्ये पदके/अजिंक्यपद मिळवून शासनाच्या रोख बक्षीस योजनेस पात्र असलेल्या राज्यातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना मागील काही वर्षे प्रशासकीय अनास्थेमुळे पाठपुरावा करूनही बक्षीसाची रक्कम मिळू शकलेली नाही. त्याबाबतीत तातडीने निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती . मंत्रीमहोदयांना करण्यात आली. तसेच जवळपास २०० देशांत खेळला जात असलेला, अतिशय लोकप्रिय असलेला बुद्धिबळ हा खेळ महाराष्ट्र सरकारच्या धोरणात क श्रेणीत ढकलला गेला आहे. हे केंद्र सरकारच्या क्रीडा धोरणाशीही विसंगत आहे. त्यामुळे जागतिक पाताळीवरील आव्हानात्मक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करूनही बुद्धिबळपटूंना सरकार कडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. धोरणात्मक पातळीवर सुधारणा करून बुद्धिबळ ह्या खेळाला योग्य ते उत्तेजन देणे अतिशय गरजेचे आहे. याबाबतही अनेक ठोस कागदपत्रांसहित निवेदन क्रीडामंत्र्यांना देण्यात आले. बुद्धिबळ हा खेळ आता आशियाई खेळांत समाविष्ट करण्यात आला आहे हे देखील त्यांत नमूद करण्यात आले. या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत क्रीडा मंत्र्यांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले.

आमदार मेधा कुलकर्णी ह्यांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्याने व क्रीडा मंत्री ह्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे, प्रशासकीय पातळीवरही योग्य ते सहकार्य मिळून बुद्धिबळाच्या बाबतीतले हे प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने महत्त्वाची प्रगती झाली आहे. उपस्थित सर्व बुद्धिबळपटूंनी ह्याबद्दल क्रीडामंत्र्यांचे व आमदारांचे आभार मानले.

जलतरण स्पर्धेत वैष्णवी, समृद्धी, अद्विका प्रथम

0

पुणे : जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारा आयोजित पुणे जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज लांडेवाडी तालुका आंबेगाव येथे नुकतीच झाली. या स्पर्धेत सूर्यदत्ता पब्लिक स्कुलच्या वैष्णवी मोरे, समृद्धी घोलबा व अद्विका रमेश या जलतरणपटूंनी या मिळवले.

वैष्णवी मोरे हिने १७ वर्षाखालील मुलींच्या गटात (११ वी विज्ञान) १०० मीटर फ्री स्टाइल, ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक व १०० मीटर ब्रेस्ट स्टोक या प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला. समृद्धी घोलाबाने (११ वी विज्ञान) २०० मीटर फ्री स्टाइल प्रकारात प्रथम, १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात द्वितीय, तर १०० मीटर फ्री स्टाइल प्रकारात तृतीय क्रमांक पटकाविला. १९ वर्षाखालील मुलींच्या गटात अद्विका रमेश (१२ वी विज्ञान) हिने ५० मिटर बॅक स्ट्रोक प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला. या तीनही विद्यार्थिनींची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

पाऊसगाणी, कवितांनी श्रोते ओलेचिंब

0
साहित्यानंद प्रतिष्ठानतर्फे ‘प्रेमात पडलेला पाऊस’वर रंगली काव्यमैफल
पुणे : भेटू पुन्हा म्हणाली पाऊस थांबल्यावर… आला वयात पाऊस… क्षितिजावर पसरत जाती ढग निळे सावळे काळे… आला गार गार वारा लडिवाळ झोंबणारा… घन घन माला नभी दाटल्या… भेट तुझी माझी स्मरते… चिंब भिजलेले रूप सजलेले… असा बेभान हा वारा… अशा पावसावरील लोकप्रिय काव्य-गीतांनी रसिकांच्या मनावर बरसात केली. स्वर-शब्दांच्या या बरसातीने उपस्थित ओलेचिंब होऊन गेले. निमंत्रित कवींच्या पाऊसकविता आणि विजय वडवेराव-स्मिता भद्रिगे यांचे गायन यांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले.
निमित्त होते, साहित्यानंद प्रतिष्ठान आयोजित ‘प्रेमात पडलेला पाऊस’ या साहित्य व संगीताच्या चिंब आविष्काराचे. पावसावर आधारित कवितांची मैफल आणि जोडीला मनाला चिंब भिजवणारी पाऊसगाणी. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात रंगलेल्या या निमंत्रित कवींच्या काव्यमय मैफलीला ज्येष्ठ गजलकार म. भा. चव्हाण, कवियत्री प्रा. कल्पना सोमनाचे, शास्त्रीय गायक शिवाजी चामनार यांची उपस्थिती होती.  प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय वडवेराव, सचिव दत्ता हगवणे, कार्याध्यक्ष बाळासाहेब घस्ते उपस्थित होते.
‘भेटू पुन्हा म्हणाली पाऊस थांबल्यावर, ओलावतील तळवे पाऊस सांडल्यावर’, ‘क्षितिजावर पसरत जाती ढग निळे सावळे काळे, अन् क्षणात विणले जाते पाऊस सरींचे जाळे’, ‘असे भरुनी आभाळ यावे, ढग पाण्याचा तडकावा, पाण्याचा तो शुभ्र पितांबर, धरणीवरती बरसावा’ अशा कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली. तीन तास रंगलेल्या या काव्य मैफिलीत पावसाच्या आगमनाची आतुरता काव्यप्रतिभेतून व्यक्त झाली. संजय बोरुडे, संदीप वाघोले, प्राजक्ता पटवर्धन, नेहा चौधरी, वैभव धस, भाग्यश्री कुलकर्णी, दत्ता हगवणे, दत्तू ठोकळे, विवेक कुलकर्णी आदी कवींनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन कविता मोरवणकर यांनी केले.
म. भा. चव्हाण म्हणाले, “पाऊस हा कवीचा आवडता विषय आहे. पावसावरच्या कविता त्याच्या थेंबाप्रमाणे हळुवार गारवा देणाऱ्या असतात. प्रत्येक थेंबावर, सरीवर, त्याच्या आगमनावर आणि त्याच्या विरहावरही काव्यरचना होऊ शकतात. अशा पावसावर काव्य मैफल भरविण्याचा साहित्यानंद प्रतिष्ठानचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.”

आता थेट पंतप्रधानांच्या कानावर जाणार पुण्यातील पाण्याचा ठणठनाट ?(व्हिडीओ)

पुणे- धरणे भरली ,नद्यांना पूर आले ..पण शिवाजीनगर मधील रेव्हेन्यू कॉलनीत आठ ते दहा महिन्यांपासून महापालिकेच्या नळाला पाणीच येईना .. नगरसेवक,महापौर ,आयुक्त सारेच खोटी आश्वासने देताहेत आता आम्ही ..पंतप्रधानांच्या कानात ओरडावे काय ? असा संतप्त सवाल  आज महापालिकेत आलेल्या या कॉलनीतील रहिवाश्यांनी माध्यमांपुढे केला आहे. यावेळी सातत्याने खोटी आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींसह आयुक्तांबद्दल देखील संताप व्यक्त केला.
आम्ही सुशिक्षित आहोत, आंदोलने ,शिवीगाळ ,धक्काबुक्की करू शकत नाही ,त्याची शिक्षा आम्हाला मिळते आहे काय ?पाहुण्यांना सांगावे लागते पिण्याचे पाणी बरोबर घेऊन या ,आम्हाला स्वतः साठी बाजारातून पाणी विकत आणावे लागते आणि वापरण्यासाठी अक्षरशःआम्ही पाऊस आला कि पावसाच्या पाण्याने बादल्या अन्य भांडी यात पाणी भरून ठेवीत आहोत .. स्मार्ट म्हणविणाऱ्या..राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळविलेल्या पुणे शहरातील नामांकित भागातील हि अवस्था आहे . विशेष म्हणजे हि मंडळी पाण्याच्या मागणी साठी महापालिकेतआली असता महापौर आणि आयुक्त आपापल्या दालनात वेगवेगळ्या बैठकीत व्यस्त असतात …पुण्याची हि व्यथा ..आणि कथा ऐका आणि पहा … या पुणेकरांच्याच तोंडून ..जशीच्या तशी …

राजकीय रणनीतीकार सुनील माने यांचा भाजप प्रवेश

पुणे ता. २७ : पत्रकारितेतून यश शिखरावर पोहोचल्यानंतर जनसंपर्क व्यवसायात पदार्पण करून राजकीय रणनीतीकार म्हणून ख्याती प्राप्त केलेले सुनील माने आजपासून नवी इनिंग सुरु करत आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाने बहुआयामी व्यक्तिमत्वाची राजकारणात आज ‘एण्ट्री’ झाली आहे.असे मत संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांनी येथे व्यक्त केले .यावेळी बापट यांच्या सह भाजप शहराध्यक्षा माधुरी मिसाळ, शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, सरचिटणीस उज्वल केसकर, मुरली मोहोळ आणि गणेश घोष यांच्या उपस्थितीत माने यांनी  आज जंगली महाराज रस्त्यावरील भाजप शहर कार्यालयात पक्षप्रवेश केला.

याप्रसंगी खासदार बापट म्हणाले की, सुनील माने यांच्यासोबत अनेक वर्षांपासून काम करतोय. सुनील दैनिकात काम करत असल्यापासून आमचा परिचय असून पत्रकार नावाला शोभेल असं त्यांचं कर्तृत्व आहे. त्यांच्या अनेक वर्षांच्या पत्रकारितेत त्यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी वृत्त प्रसिद्ध केले. या माध्यमातून त्यांनी समाजाला पुढे नेण्याचे काम केले. आज सुनील माने यांच्या रूपाने झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता पक्षाला मिळाला असून त्याच्या व्यूहरचनेचा पक्षाला फायदा होईल, अशी खात्री वाटते.

मिसाळ म्हणाल्या की, खासदार बापट यांच्या समवेत अनेक निर्णायक प्रसंगांमध्ये सुनील माने यांना काम करताना मी जवळून पाहिले. ज्या एकनिष्ठेने आणि एकरुपतेने त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी काम केले त्यावरून आम्ही तेव्हाच त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले होते. आजची केवळ औपचारिकता आपण पार पाडत आहोत, असे मला वाटते.

माने म्हणाले की, वीस वर्ष पत्रकारिता व यासंबंधी क्षेत्रात कामे केली. या दरम्यान विधानसभा ते संसद अशा वेगवेगळ्या पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. केंद्रात नरेंद्र मोदीजी, अमितभाई शहा यांचे व्हिजन आणि राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यपद्धतीने मला प्रभावित केले. खासदार बापट यांच्या समवेत काम करत असताना सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते देशाला पुढे घेऊन जाण्याच्या ध्येयाने काम करत असल्याचे जाणवले. या विकास प्रक्रियेत आपल्यालाही अल्प वाटा देता यावा, या उद्देशाने मी आज भारतीय जनता पक्ष प्रवेश केला.

यावेळी शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर, नगरसेवक विजय शेवाळे, आदित्य माळवे, किरण दगडे पाटील, उमेश गायकवाड, प्रकाश ढोरे, सुशील मेंगडे, महेश लडकत, अजय खेडेकर, सम्राट थोरात, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे, प्रतीक देसर्डा, सुनील शुक्ला,जतिन पांडे, चंद्रकांत पोटे,पुनीत जोशी,संजय मयेकर,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, डॉ अंबरीश दरक,ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, विनोद सातव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

पीएम, अर्थमंत्र्यांनीच ओढावले देशावर आर्थिक संकट; राहुल गांधींचा आरोप

0

नवी दिल्ली – देशावर आर्थिक संकट पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनीच आणले. आता त्यांना यातून कसे बाहेर पडावे ते सूचत नाही अशा शब्दांत राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला. सोबतच, भारतीय रिझर्व्ह बँकेतून चोरी करून चालणार नाही असा टोला देखील माजी काँग्रेस अध्यक्षांनी लगावला आहे. आरबीआयने नुकतेच आपल्या राखीव (रिझर्व्ह) फंड्समधून 1 लाख 76 हजार कोटी रुपये सरकारला सुपूर्द केले. भारत सरकारला इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम देण्यास मंजुरी मिळाल्याचा हा एक विक्रमच आहे. त्यावरच प्रतिक्रिया देताना राहुल यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.

राहुल यांनी ट्विट करून म्हटले, की “पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना स्वतःच आणलेल्या आर्थिक संकटाची उकल काढता येत नाही. अशात आरबीआयमधून चोरी करून चालणार नाही. हे तर असेच झाले, की जणु गोळी लागली आणि जखम भरण्यासाठी एखाद्या डिस्पेंसरीतून बँडेज चोरली.” आरबीआयने विमल जालान समितीच्या शिफारसींवर अंमलबजावणी करत सोमवारी विक्रमी 1.76 लाख कोटी रुपयांचा आरक्षित / राखीव निधी सरकारला सुपूर्द केला आहे. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला देशास आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात मदत होईल असे सांगितले जात आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, रिझर्व्ह बँकेचे रिझर्व्ह फंड सरकारला देण्यावर विचार करण्यासाठी समिती 2018 मध्ये स्थापित करण्यात आली होती. त्यानंतरच तत्कालीन आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आणि काही महिन्यांतच रिझर्व्ह फंड सरकारला ट्रांसफर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये ‘आंत्रप्रुनरशिप स्किल डेव्हेलपमेंट प्रोग्रॅम ‘

0
पुणे :भारती  विद्यापीठ इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट (आयएमईडी‘ ) मध्ये ‘आंत्रप्रुनरशिप स्किल डेव्हेलपमेंट प्रोग्रॅम ‘ आयोजित करण्यात आला होता . प्रोविजडम प्रा. लि . चे संस्थापक पुनीत रामन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . आयएमईडी चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर अध्यक्षस्थानी होते . डॉ भारती जाधव यांनी संयोजन केले . दीक्षा श्रीवास्तव ,अनू शेकोकर ,जन्मेजय कुमार ,अमर चौधरी आणि ८० विद्यार्थी उपस्थित होते . हा कार्यक्रम २५ ऑगस्ट रोजी पौड रस्ता कॅम्पस येथे झाला

तेज ओक, श्रावणी देशमुख, सार्थ बनसोडे, सिमरन छेत्री यांना विजेतेपद

0

पुणे: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व फ्युचर प्रो टेनिस अकादमी यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरीज मानांकन टेनिस 2019 स्पर्धेत  12 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात अनुक्रमे तेज ओक, श्रावणी देशमुख यांनी तर,  14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात सार्थ बनसोडे व सिमरन छेत्री या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

येरवडा येथील फ्युचर प्रो टेनिस अकादमीच्या टेनिस कोर्टवर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगरमानांकीत तेज ओक याने अव्वल मानांकित अद्विक नाटेकरचा 4-2, 4-1 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. तेज हा सिम्बायोसिस शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून बाऊन्स टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या वर्षातील या गटातील हे तिसरे विजेतेपद आहे. मुलींच्या गटात बिगर मानांकीत श्रावणी देशमुखने आपली विजयी मालिका कायम ठेवत चौथ्या मानांकित मृणाल शेळकेचा 4-1, 2-4, 4-0असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद मिळवले. श्रावणी ही सिंहगड स्प्रिंगडेल शाळेत आठवी इयत्तेत शिकत असून महाराष्ट्रीय मंडळमध्ये प्रशिक्षक धरणीधर मिश्रा आणि सिंहगड इन्स्टिटयूटमध्ये प्रशिक्षक राजेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

 
14 वर्षाखालील मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित सार्थ बनसोडे याने अव्वल मानांकित आर्यन हूडचा टायब्रेकमध्ये 1-4, 5-4(7-4), 5-4(11-9) असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले. सार्थ हा पी जोग शाळेत नववी इयत्तेत शिकत असून डेक्कन जिमखाना येथे एपीएमटीएमध्ये आदित्य मडकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तर मुलींच्या पाचव्या मानांकित सिमरन छेत्री हिने श्रावणी देशमुखचा 1-4, 4-1, 4-2 असा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. सिमरन ही आठवी इयत्तेत डीपीएस शाळेत शिकत असून महाराष्ट्रीय मंडळ येथे प्रशिक्षक धरणीधर मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. 
 
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे विभागाचे क्रीडा व युवा सेवासंचालनायचे उपसंचालक अनिल चोरमले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक राधिका कानिटकर-तुळपुळे आणि प्रल्हाद मोघे आदी मान्यवर उपस्थित होते.  
  

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 12 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:   
श्रावणी देशमुख वि.वि.देवांशी प्रभुदेसाई(1) 7-4;
मृणाल शेळके(4)वि.वि.अनुष्का 7-1; 
अंतिम फेरी: श्रावणी देशमुख वि.वि.मृणाल शेळके(4)4-1, 2-4, 4-0;    
 
12वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:    
अद्विक नाटेकर(1)वि.वि. शार्दुल खवळे 7-2;
तेज ओक वि.वि. अर्णव बनसोडे(5)7-4;
अंतिम फेरी: तेज ओक वि.वि.अद्विक नाटेकर(1)4-2, 4-1;  

14 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:  
सिमरन छेत्री(5) वि.वि. देवांशी प्रभुदेसाई(7) 7-5;
श्रावणी देशमुख वि.वि.संचिता नगरकर 7-6(7-5);
अंतिम फेरी: सिमरन छेत्री(5) वि.वि.श्रावणी देशमुख 1-4, 4-1, 4-2;    
 
14 वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:    
आर्यन हूड(1)वि.वि.पार्थ देवरूखकर(3)7-6(8-6);
सार्थ बनसोडे(2) वि.वि. अभिराम निलाखे 7-2;
अंतिम फेरी: सार्थ बनसोडे(2) वि.वि.आर्यन हूड(1)1-4, 5-4(7-4), 5-4(11-9).    

// विघ्न टाळावे वीज अपघाताचे //

0

वीज दिसत नाही मात्र, तिचे परिणाम भयावह असतात. जीवघेणे असतात. त्यामुळे विजेपासून सर्वांना सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजनांना सर्वाधिक प्राथमिकता देणे आवश्यक आहे. विघ्नहर्ता श्रीगणेशांचा सार्वजनिक उत्सव लवकरच (दि. 2 सप्टेंबरला) सुरु होत आहे. बाप्पांच्या आगमनाचे वेध सर्वांना लागलेले आहेत. मात्र सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महावितरणकडून अधिकृतपणे तात्पुरती वीजजोडणी आवश्यक आहे. पथदिव्यांवरून, घरातून किंवा वीजयंत्रणेमध्ये आकडे टाकून घेतलेला अनधिकृत वीजपुरवठा हा कोणत्याही क्षणी वीज अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकतो.

सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट प्रतियुनिट 3 रुपये 27 पैसे अधिक 1 रुपया 28 पैसे वहन (व्हिलींग) आकार असे 4 रुपये 55 पैसे वीजदर आहेत. याउलट घरगुती व वाणिज्यिक किंवा इतर वर्गवारीमध्ये वीजवापराच्या स्लॅबनुसार वेगवेगळे वीजदर निश्चित करण्यात आले आहे. मात्र सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी घेतलेल्या वीजजोडणीद्वारे वीजवापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत आहे. त्यामुळे कितीही वीज वापरल्यास शेवटच्या युनिटपर्यंत केवळ 4 रुपये 55 पैसे दर आकारण्यात येणार आहे. या तुलनेत घरगुती व वाणिज्यिक वर्गवारीचा वीजदर स्लॅबनुसार दुप्पट व तिपटीने अधिक आहेत. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे यासाठी वीजदर कमी ठेवण्यात आला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येत भाविकमंडळी श्रीगणेशांच्या दर्शनाला आणि विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील वीजवहन यंत्रणा व्यवस्थित आणि वीजअपघाताचा धोका टाळणारी आवश्यक आहे. गणेशोत्सवातील मंडप, रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी विद्युत संचमांडणी ही परवानाधारक कंत्राटदारांकडून करून घेतली पाहिजे व काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी अहवाल सुद्धा घेतला पाहिजे. इलेक्ट्रिक मीटर व इतर स्विचगिअर्स लावलेली जागा देखभालीसाठी व अधिकृत व्यक्तींना काम करण्यासाठी मोकळी ठेवावी. तसेच मीटर व स्विचगिअर्सवर पाणी गळणार नाही याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे. महावितरणकडून मंजूर जोडभारा इतकाच जोडभार संचमांडणीत जोडणे आवश्यक आहे. या जोडभारानुसार योग्य क्षमतेचे वायर्स / केबल्स तसेच एमसीबी, ईएलसीबी याचाही वापर करण्यात यावा. संचमांडणीत दोन स्वतंत्र व कार्यक्षम अर्थिंगची जोडणी केली पाहिजे. जनित्र वापरत असल्यास बॉडी व न्यूट्रलसाठी स्वतंत्र अर्थिंग जोडणे आवश्यक आहे. यासोबतच मीटर, स्विचगिअर्स, विद्युत उपकरणे आदींजवळ धोक्याची सूचना देणारा फलक लावला पाहिजे व अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था उपलब्ध असे आवश्यक आहे.

गणेशोत्सवात विविध कामांसाठी करण्यात येणारी वायरिंग ही योग्य तसेच दोष व धोकाविरहीत असणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी विजेचे वायर्स विस्कळीत स्वरुपात राहणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. विजेचा भार सहन करू शकत नसणाऱ्या तकलादू वायर्स वापरल्यास शार्टसर्किट किंवा वायर्स जळून आग लागण्याची शक्यता मोठी असते. संचमांडणीत कोणत्याही प्रकारचे वायर्स / केबल्स यांचे जोड नसावेत. जोड देणे आवश्यकच असल्यास योग्य प्रकारे इन्सुलेशन टेप वापरावे. गणेशोत्सवात पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेल्या पण टेपने जोडलेल्या असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह वीज अपघाताची शक्यता असते.

संचमांडणीत असलेले इन्सुलेटेड जोड तसेच इतर यंत्रणा व उपकरणे हे दर्शनरांगेपासून दूर व सहजपणे कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. संचमांडणीत कुठेही वायर्स प्लगमध्ये खोचू नयेत. पंखे, फ्लड लाईट्‌सची जोडणी ही थ्रीपीन टॉपने करावी. हॅलोजन, फ्लड लाईटस्‌ किंवा जोड असलेल्या वायर्सजवळ सिल्क कपडा, मंडप किंवा इतर ज्वालाग्राही पदार्थ ठेऊ नयेत. वीजपुरवठा करणारी वायर लोखंडी ग्रील, अल्यूमिनियम, स्टील आदींच्या संपर्कात येणार नाही याचीही काळजी घ्यावी. श्रीगणेशाला निरोप देण्यासाठी मिरवणूक काढली जाते. मिरवणूक मार्गावरील उच्च व लघुदाब वाहिन्या, फिडर पिलर्स तसेच इतर वीज यंत्रणा ही मिरवणुकीतील वाहने, देखावे आदींपासून सुरक्षित अंतरावर राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे.

गणेशोत्सवाच्या काळात वीजतारा जळणे, शार्टसर्किट होणे किंवा वीजव्यवस्थेत बिघाड होणे आदींची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे संबंधीत परिसरातील जनमित्र, शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता किंवा कार्यकारी अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवणे आवश्यक आहे. तातडीच्या मदतीसाठी गरज भासल्यास महावितरणच्या 24 तास सुरु असणाऱ्या टोल फ्री क्रमांक 1912, 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा. जाणते, अजाणतेपणाने केलेल्या चुका या वीज अपघातांसाठी क्षम्य ठरत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना वीज सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजनांना प्राथमिकता देणे अतिशय गरजेचे आहे.

लेखक – निशिकांत राऊत,

 जनसंपर्क अधिकारी, बारामती परिमंडल, बारामती,

मोबाईल – 7875762055

भीम आर्मीतर्फे संविधानविरोधी सरकार चले जाव’ महापरिषद

0
पुणे : भीम आर्मीतर्फे (बहुजन एकता मिशन, महाराष्ट्र) ‘संविधानविरोधी सरकार… चले जाव महापरिषद’ आयोजित करण्यात आली आहे. येत्या रविवारी (दि. १ सप्टेंबर २०१९) दुपारी ३.०० वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रीडामंच येथे ही महापरिषद होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते महापरिषदेचे उद्धाटन होणार असून, जेष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी महापरिषदेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत, अशी माहिती संयोजक भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष दत्ता पोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महिला आघाडीच्या नीता आडसुळे, उपाध्यक्ष हुसेनभाई शेख, मुकेश गायकवाड, संपर्कप्रमुख प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते.
दत्ता पोळ म्हणाले, “या परिषदेत दिल्ली येथील मुस्लिम विचारवंत वली रहमानी, गणराज्य संघाच्या अध्यक्षा सुषमा अंधारे, आंबेडकरी विचारवंत कुमार मेटागे आदी सहभागी होणार आहेत. ईव्हीएम हटाव, संविधान बचाव, झुंडशाही, मुस्लिम युवकांच्या हत्या, वाढते दलित अत्याचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे हल्ले, सांगली-कोल्हापूर पूरपरिस्थितीबाबत बेजबाबदार असलेले सरकार, घटनात्मक संस्थांचा होणार गैरवापर, खासगी क्षेत्रातील आरक्षणाचा प्रश्न, शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी, झोपडपट्टी धारकांची होणारी फसवणूक यासह भीमा कोरेगाव हल्लाप्रकारणी अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत असलेला समाज अशा विविध मुद्यांवर या महापरिषदेत विचारमंथन होणार आहे.”
“केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असून, गेल्या काही निवडणुकात ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्याची शंका वारंवार उपस्थित होत आहे. दलित, मुस्लिमांवर हल्ले होत आहेत. सत्ताधारी पक्षातील लोक संविधानाचा अपमान करत असून, संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम होत असल्याचे गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांवरून दिसत आहे. अशा लोकशाही विरोधी आणि संविधानविरोधी सरकारला सत्तेवरून पायउतार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपण सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे,” असेही दत्ता पोळ यांनी यावेळी सांगितले.
भीम आर्मी विधानसभा लढणार
सत्ताधारी संविधान विरोधी सरकारला हटविण्यासाठी समविचारी पक्ष, राजकीय संघटनानी एकत्र यावे. महाआघाडी झाल्यास भीम आर्मीला पुण्यातील कॅंटोन्मेंटसह परभणी, अमरावती आणि नवी मुंबई येथून पाच जागा मिळाव्यात. महाआघाडी झाली नाही, तर राज्यातील अनेक मतदारसंघात आमची ताकद चांगली असून, तेथे उमेदवार उभे केले जाणार आहे. निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने संघटनात्मक पातळीवर तयारी करण्यात येत असल्याचे दत्ता पोळ म्हणाले.

आमदार टिळेकरांच्या दहशती खाली पिण्याच्या पाण्याचे ही वाटप -राष्ट्रवादी च्या नगरसेवकांचा आरोप

0

पुणे-विरोधकांना सातत्याने त्रास देण्याचा उद्योग सत्ताधारी भाजपकडून सुरू आहे. त्रासच द्यायला असेल तर आम्हाला द्या. ‘ईडी’ अथवा इतर प्रकारे त्रास द्यायचा असेल तर, तसेही करा..,पण स्थानिक नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवू नका. या प्रभागात विरोधी पक्षाचे नगरसेवक आहेत, म्हणून पाणी तोडायचे, असे विकृत राजकारण करू नका, अशी आळवनी करण्याची वेळ राष्ट्रवादी च्या नगरसेवकांवर आली आहे.

हडपसर येथील मगरपट्ट्यासारख्या ‘आयटी इंडस्ट्री’ असलेल्या भागात केवळ विरोधी पक्षाचे नगरसेवक असल्याने येथील पाणीपुरवठा सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी बंद केला आहे. या प्रभागातील चारही नगरसेवक विरोधी पक्षाचे असल्याने स्थानिक आमदार योगेश टिळेकर यांनी जाणीवपूर्वक पाणीपुरवठा बंद केला आहे. या बाबत पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता ‘या ठिकाणाहून आमची बदली करा; परंतु आम्ही पाणी देऊ शकत नाही,’ अशी उत्तरे मिळत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, हेमलता मगर, पूजा कोद्रे, सुनील गायकवाड प्रभाग क्रमांक २२मधून निवडून आले आहेत. या चारही नगरसेवकांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन टिळेकर यांच्यावर टीका केली आहे. या प्रभागातील मुंढवा, मगरपट्टा, माळवाडी, भागीरथी नगर, लक्ष्मी कॉलनी आदी परिसरात पंधरा मिनिटेच पाणी सोडण्यात येते. उन्हाळ्यात परिसरात पाणीटंचाई जाणवली नाही. मात्र, विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने परिसरातील पाणीपुरवठा कमी करत राजकारण केले जात असल्याची टीकाही तुपे यांनी केली.

‘पालिका अधिकाऱ्यांकडे सुरुवातीला विचारणा केली असता पाणी सोडतो, अशी उत्तरे देण्यात आली. त्यामुळे पाणी कपातीमागे राजकारण असावे अशी शंका आली नाही. गेले दोन महिने सातत्याने पाण्याचा त्रास सुरू असल्याने या प्रकाराची माहिती घेतली असता, खरा प्रकार उघडकीस आला. त्यांच्याकडे पाण्याची मागणी केल्यानंतर, आमची बदली करा पण, आम्ही पाणी सोडू शकत नाही,’ अशी उत्तरे देण्यात आल्याचे चारही नगरसेवकांनी सांगितले. या प्रकारांमागे स्थानिक आमदार असल्याचा दावाही त्यांनी केला. या संदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, अन्य कामांमध्ये व्यग्र असल्याची उत्तरे देण्यात येतात. मात्र, त्याचवेळी ते स्थानिक आमदारांच्या वाहनांतून फिरत असल्याचे प्रकार दिसल्यानंतर या पाणी कपातीमागचे खरे कारण उजेडात आले. या प्रकरणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना निवेदन देण्यात आले आहे, असेही तुपे म्हणाले.

राज ठाकरेंच्या ED चौकशी नंतर शरद पवार, अजित पवारांना ही दणका

0

मुंबई :  -चिदंबरम ,त्यानंतर राज ठाकरे आणि आता शरद पवार, अजित पवार यांच्यासह असंख्य नेत्यांना बड़े हादरे देण्यात आल्याने आगामी निवडणुका EVM मशीन वरच होतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेष मानली जाते आहे .

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी एमआरए पोलीस ठाण्यात ७६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्यामध्ये संबंधित खात्याचे अधिकारी आणि तत्कालीन मंत्र्यांची नावंही आरोपी म्हणून देण्यात आली आहेत. यामध्ये त्यावेळचे कृषीमंत्री शरद पवार यांचे देखील नाव आरोपी म्हणून आले असल्याचे याचिका कर्त्यांचे वकील माधवी अय्यपन यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला दिले होते.

सावधान ! 1 सप्टेंबर पासुन ‘रॅश’ ड्रायव्हिंगला 5000 तर ‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’ला 10 हजाराचा दंड

0

नवी दिल्ली : – मोटार वाहन अधिनियम कायद्यात सुधारणा केल्यानंतर आता 1 सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होणार आहेत. याविषयी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितले कि, 1 सप्टेंबरपासून हे नवीन नियम लागू होणार असून, रस्त्यावर गाडी चालवताना तुम्ही नियम तोडल्यास यापुढे मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागणार आहे.

याबाबत गडकरींनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन दिवसांत याला मंजुरी मिळणार असून 1 सप्टेंबरपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत. राष्ट्रपतींचे या विधेयकावर हस्ताक्षर झाले असून हा कायदा लवकरच मंजूर होईल अशी अपेक्षा आहे.

अशी असेल दंडाची रक्कम
1) वेगाने गाडी चालवल्यास

याआधी वेगाने गाडी चालवल्यास तुम्हाला 500 रुपये दंड किंवा 3 महिन्यांच्या शिक्षेची तरतूद होती. मात्र नवीन सुधारित कायद्यानुसार तुम्ही हे नियम मोडल्यास 5 हजार रुपये दंड तर 3 महिन्याची शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर दुसऱ्यांदा नियम मोडल्यास 10 हजार रुपये दंड आणि 1 वर्षाची शिक्षा होऊ शकते.

2) ओव्हरलोडिंग
याआधी ओव्हरलोडिंगचा नियम मोडल्यास 2 हजार रुपये दंड भरावा लागत असे. त्यामुळे आता यापुढे नियम मोडल्यास 10 हजार रुपये दंड तसेच 6 महिन्यांची शिक्षा देखील होणार आहे.

3) दारू पिऊन वाहन चालवणे
याआधी यासाठी 2 हजार रुपयांचा दंड भरावा लागत असे. मात्र आता यापुढे 10 हजार रुपयांचा दंड आणि 6 महिन्यांची शिक्षा देखील होणार आहे.

4) वाहतूक नियम आणि फोनवर बोलताना पकडल्यास

यासाठी आधी 1 हजार रुपये दंड तसेच 6 महिन्याची शिक्षा होत असे मात्र आता यापुढे 5 हजार रुपये दंड आणि 1 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

अंतिम मंजुरीसाठी विधेयक कायदा मंत्रालयाकडे

मोटार वाहन अधिनियम विधेयकामध्ये बदल केल्यानंतर हे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेत मंजूर झाले असून ते सध्या मंजुरीसाठी कायदे मंत्रालयाकडे पाठवले असून त्याच्या मंजुरीची वाट पहिली जात आहे.

चातुर्मासनिमित्त महावीर फूड बँकेतर्फे दहा हजार किलो धान्याचे मोफत वाटप

0
पुणे : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘एक मुठ धान्य’ या संकल्पनेतून महावीर फूड बँक व जय आनंद ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील संस्थांना चातुर्मासनिमित्त ध्यानाचार्य भगवंत, प. पू. डॉ. शिवमुनीजी म. सा. तथा युवाचार्य प. पू. महेंद्र ऋषीजी म. सा. आदीठाणा 15 यांच्या पवित्र पावन सानिध्यात शिवाचार्य समवसरण वर्धमान सांस्कृतिक भवन येथे दहा हजार किलो धान्याचे मोफत वाटप करण्यात आले. प. पू. राष्ट्रसंत आचार्यसम्राट श्री आनंद ऋषीजी पुण्यप्रदान रथावर पुणेकरांनी धान्य, रोख देणगी प्रदान केली. प्रमिलाबाई नौपतलाल साकला, बी. जे. भंडारी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विजय भंडारी, स्व. शांतीलाल छाजेड (चोपडा) यांचे स्मरणार्थ प्रमोद छाजेड या परिवाराने दिलेल्या देणगीतून हा भव्य उपक्रम घेण्यात आला. यास जवाहरलाल बोथरा, पुष्पा कटारिया, हेमा गदीया, रंजना साकला, संगीता छाजेड यांचे योगदान मिळाले.
महावीर फूड बॅंकचे पुणे शहर अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती दिली. महावीर फुड बँकेने पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे पाच लाख अकरा हजार किलो धान्य मोफत वाटल्याचे सांगितले. आजचे धान्य वाटप पुणे शहर भाजपच्या अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे, नगरसेवक प्रवीण चोरबेले, विजय भंडारी, पोपटलाल ओस्तवाल, राजेश साकला, कमलाबाई भंडारी, जय आनंद ग्रुपचे अध्यक्ष अशोक लोढा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवाचार्य समवसरण येथे पाच हजार श्रावण आणि श्राविका यांनी डॉ. शिवमुनी यांचे ‘शक्ती का स्रोत’ या विषयावरील प्रवचनाचा लाभ घेतला.

भारतात सोन्याचा भाव 40 हजार,पाकिस्तानात प्रतितोळा सोने 80 हजार रुपयांच्या पार

0

नवी दिल्ली- सोन्याच्या किमतीने आज उच्चांक गाठला आहे. सध्या भारतात प्रतितोळा सोन्याचे दर 40,000 रुपये झाले आहेत. सोन्याबरोबर चांदीचे दरही वाढले आहेत. भारतात चांदीचे दर 46,000 रुपये प्रतिकिलो असे झाले आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबई, जयपूर आणि सोन्याचा सर्वात मोठा बाजार अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 40,000 रुपयांच्याही पुढे गेले आहेत. मुंबईत सोमवारी (26 ऑगस्ट) सोन्याचे दर 40,040 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मुंबईतच चांदीचे दर 46,380 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. जयपूरमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे 40,020 रुपये आणि 39,900 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तसेच चांदीचा दर 46,400 रुपये प्रति किलोग्रॅम झाला. अहमदाबादमध्ये हेच सोन्याचे दर अनुक्रमे 40,000 रुपये आणि 39,870 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर चांदी 46,400 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये सोन्याच्या दरांनी भारताला कितीतरी मागे टाकले आहे. पाकिस्तानमधील सोन्याचे दर प्रतितोळा 80 हजारांच्या पार गेले आहेत.भारतात 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम आहे, तर पाकिस्तानमध्ये 1 तोळा म्हणजे 11.34 ग्रॅम आहे. पाकिस्तानात 10 ग्रॅम सोन्याचा दर 75 हजार 874 रुपयांपासून 80 हजारांपर्यंत पोहोचला आहे. तसेच हाच दर पाकिस्तानमध्ये प्रतितोळा 88,550 रुपये झाला आहे.