राजश्री कांबळे यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर-आदर्श मुख्याध्यापक ,शिक्षक सेवक पुरस्कार प्रदान सोहळा
मेट्रो 10, 11, 12 या मार्गांचे आणि मेट्रो भवनाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन
मुंबई,-21 व्या शतकाला अनुरूप अशी पायाभूत संरचना देशात विकसित करण्यासाठी सरकार 100 लाख कोटी रुपये खर्च करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत मेट्रोच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन करताना सांगितले. 20 हजार कोटी रुपयांहून अधिकच्या कामांना आज झालेल्या प्रारंभामुळे मुंबईतल्या पायाभूत संरचनेला नवा आयाम मिळेल आणि लोकांचे जीवनमान आणखी सुधारेल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईच्या गतीशील विकासामुळे देशाच्या विकासालाही चालना मिळत असल्याचे, असे ते म्हणाले.
पाच ट्रिलिअन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरु आहे, यासाठी शहरं ही 21व्या शतकाला अनुरूप हवीत आणि त्यासाठी उत्तम वाहतूक, सुरक्षितता या बाबींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
मुंबईमध्ये सध्या असलेला 11 किलोमीटर मेट्रो मार्गाचा 2023-24 पर्यंत 325 किलोमीटरपर्यंत विस्तार होईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले. देशात पहिली मेट्रो सुमारे 30 वर्षांपूर्वी धावली आणि 2014 पर्यंत मेट्रो सेवा काही शहरांपूरतीच मर्यादित राहिली. मात्र, आज देशातल्या 27 शहरांमध्ये मेट्रो सुरु झाली आहे अथवा नजिकच्या भविष्यात सुरु होणार आहे. गेल्या 5 वर्षात देशात 400 किलोमीटर मेट्रो मार्ग सुरु झाले आहेत. त्याचबरोबर 600 किलोमीटरच्या मेट्रो मार्गांना मंजूरी देण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई आणि महाराष्ट्रात विकास कामे वेगाने पूर्णत्वाकडे नेत असल्याबद्दल पंतप्रधानांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा केली.
पायाभूत संरचनेचा रोजगाराशीही संबंध आहे, आज सुरु झालेल्या विकास कामांमुळे 10 हजार अभियंते आणि 40 हजार कुशल आणि अकुशल मनुष्यबळाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
वर्तमानात सुविधा निर्माण करताना भविष्यासाठीही तरतूद करायला हवी, भावी पिढीला समस्यांना तोंड द्यावे लागू नये, यादृष्टीने आपण प्रयत्न केले, तरच येणारी पिढी अधिक सुखी होईल, असे ते म्हणाले.
केंद्रातल्या सरकारला 100 दिवस पूर्ण होत असून, या काळात अनेक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. हे निर्णय भारतीयांना अधिक मजबूत आणि सुरक्षितता प्रदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने भाषणाची सुरुवात करत पंतप्रधानांनी गणेशोत्सवाच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या. ‘स्वराज्य हा, माझा जन्म सिद्ध हक्क आहे’ या लोकमान्य टिळकांच्या गर्जनेचा उल्लेख करत ‘सुराज्य हे देशवासियांचे कर्तव्य’ असल्याचा नवा मंत्र त्यांनी दिला. देशहितासाठी संकल्प करा, तो पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा. गणपती बाप्पाच्या विसर्जनादरम्यान जलप्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन त्यांनी केले. समुद्र तसेच मिठी नदीसह इतर जलस्रोतही प्लास्टिकमुक्त करण्यासाठी संकल्प करावा आणि त्यामुळे देश प्लास्टिकमुक्त करण्याच्या मोहिमेला मोठा हातभार लागेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
चंद्रयान-2 या मोहिमेत आता काही समस्या निर्माण झाली असली तरी चंद्रावर जाण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला. लक्ष्य साध्य करेपर्यंत शास्त्रज्ञ अथक प्रयत्न करत राहतील, लक्ष्य साध्य कसं करावे हे आपण इस्रोच्या वैज्ञानिकांकडून शिकावे, त्यांच्या मनोबलाने आपण प्रभावित झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
मुंबईच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित प्रयत्न करत असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यावेळी सांगितले.
‘वन नेशन, वन कार्ड’ असणारे मुंबई हे देशातले पहिले शहर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. मेट्रो भवन हे देशातले सर्वात मोठे नियंत्रण केंद्र ठरणार असून, यामध्ये आधुनिक सिग्नल यंत्रणेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होणार असल्याने यंत्रणेत बिघाडाची शक्यता अत्यल्प असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मेक इन इंडियाला चालना देण्याच्या दृष्टीने, मेट्रो कोच बनवण्यासाठी एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने ‘बीईएमएल’शी करार केला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे डबे आता भारतातही तयार होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला दिशा देणारे नेतृत्व मिळाले असल्याचे गौरवोद्गार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले.
पंतप्रधानांनी 10, 11 आणि 12 या तीन मेट्रो मार्गांची रिमोट कंट्रोलचे बटण दाबून पायाभरणी केली. या तीन मार्गांमुळे शहरातील मेट्रोचे जाळे 42 किलोमीटरने वाढणार आहे. यामध्ये गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) हा मेट्रो-10 वरील 9.2 किलोमीटर मार्ग, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मेट्रो-11 वरील 12.7 किलोमीटरचा मार्ग आणि कल्याण ते तळोजा हा मेट्रो-12 वरील 20.7 किलोमीटरचा मार्ग समाविष्ट आहे.
32 मजली अद्ययावत मेट्रो भवनाचे भूमीपूजनही त्यांनी केले. ही इमारत 340 किलोमीटर अंतराच्या 14 मेट्रो मार्गांचे परिचालन आणि नियंत्रण करेल. कांदिवली-पूर्व इथल्या बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटनही त्यांनी केले. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पहिल्या मेट्रो डब्याचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले त्याचबरोबरच महामुंबई मेट्रोसाठी ब्रॅण्ड व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या आधी पंतप्रधानांनी विले-पार्ले इथल्या लोकमान्य सेवा संघाला भेट देऊन श्रीगणेशाची पुजा आणि प्रार्थना केली तसेच लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
‘मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन २०१९’ सौंदर्य स्पर्धा पुण्यात दिमाखात संपन्न
पुणे-दिवा पेजंट्स’चे संचालक कार्ल व अंजना मस्कारेन्हास यांच्या कल्पनेतून साकारलेली ‘मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन २०१९’ ही सौंदर्य स्पर्धा नुकतीच पुण्यात दिमाखात संपन्न झाली. या स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष आहे. ‘हयात पुणे’ हॉटेलने पाठबळ पुरवलेल्या या दिमाखदार स्पर्धेमुळे अंतिम फेरीतील सहभागी ४२ स्पर्धकांची खऱ्या अर्थाने आत्मिक उन्नती घडली. स्वपरिचय, आवाजाची किनार, रंगमंचावरील वावर, प्रश्नोत्तरे या सर्वच बाबतीत दिवाने अंजना व कार्ल यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली स्पर्धकांची उत्कृष्ट जडण-घडण केली होती.
स्पर्धेच्या नामवंत परीक्षक मंडळात प्रसिद्ध तारका व व्यक्तींचा समावेश होता. अभिनेता अश्मित पटेल, अभिनेत्री मुग्धा गोडसे व डॉ. अदिती गोवित्रीकर, ‘द बॉडी क्लिनिक’च्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. रचना शर्मा, मिसेस इंडिया २०१८ विजेत्या डॉ. गौरांगी श्रावत, आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नृत्यांगना सिमरन गोधवानी, आंतरराष्ट्रीय मॉडेल पिया पावानी, हयात पुणेचे डीओएसएम कमल शर्मा, कार्ल मस्कारेन्हास यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
सिल्व्हर श्रेणीतील (२० ते ३७ वर्षे) विजेते :
चैताली पाटील – विनर
मोनिका रेड्डी – फर्स्ट रनर अप
कमल मोंगिया – सेकंड रनर अप
गोल्ड श्रेणीतील (३८ ते ५५ वर्षे) विजेते :
निष्ठा कारखानीस – विनर
अर्चना शहा – फर्स्ट रनर अप
डेलिया दत्ता – सेकंड रनर अप
महाअंतिम फेरीतील किताब विजेते :
इंटरनॅशनल क्वीन – रीना भावसार
इंटरनॅशनल क्वीन – पूनम बिरारी
क्वीन ऑफ वेस्ट इंडिया – ममता ओसवाल
क्वीन ऑफ सेंट्रल इंडिया – अर्चना प्रसाद
मिसेस युनिव्हर्स वेस्ट एशिया २०१९ – वार्तिका पाटील
मिसेस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया २०१९ – आस्था आगरवाल
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सूत्रसंचालक दिलरुबा पांडे यांनी सह-यजमान फरहा अन्वर यांच्या साथीने या कार्यक्रमाचे संचालन केले.
आघाडीच्या नृत्य दिग्दर्शक पूजा सिंग यांनी या कार्यक्रमाचे दिग्दर्शन व नृत्य दिग्दर्शन केले तर श्रद्धा रामदास, नेहा चौहान व मृणाली तायडे यांनी कार्यक्रमाचा यशस्वी समन्वय साधला. या प्रशंसनीय कार्यक्रमाने उपस्थितांची केवळ मनेच जिंकली नाहीत तर त्यांना धाडस, स्वप्न व प्रसिद्धीसाठी प्रेरणा दिली.
सातव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स, अर्बन रेवन्स, स्कॅवेंजर्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश
पुणे, दि. 7 सप्टेंबर 2019- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित सातव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत ब्लेझिंग ग्रिफिन्स अर्बन रेवन्स व स्कॅवेंजर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाने द ईगल्स संघाचा 5-2 असा पराभव करत स्पर्धेत तिसरा विजय नोंदवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. गोल्ड खुल्या दुहेरी गटात अकाश सुर्यवंशी व कुणाल पाटील यांनी अनिरूध्द आपटे व देवेंद्र चितळे यांचा 19-21, 21-13, 21-14 असा पराभव करत सामन्यात विजयी सुरूवात केली. सिल्व्हर खुल्या दुहेरी गटात राजश्री भावे व विनित रुकारी यांनी बिपिन चोभे व चेतन वोरा यांचा 21-00, 21-00 असा पराभव करत आघाडी घेतली. वाइजमन गटात गिरिश करंबेळकर व प्रशांत वैद्य यांनी अविनाश दोशी व संजय फेरवानी यांचा 21-00, 21-00 असा पराभव करत आघाडी भक्कम केली. सिल्व्हर मिश्र दुहेरी गटात आशय कश्यप व कर्णा मेहता यांनी अयुष गुप्ता व पार्थ केळकर यांनी 15-07, 15-11 तर सिल्व्हर खुल्या दुहेरी गटात चिन्मय चिरपुटकर व तुषार मेंगळे यांनी जय परांजपे व कैस्तुभ वाळिंबे यांचा 15-08, 15-05 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला
दुस-या लढतीत अर्बन रेवन्स संघाने पेलिकन स्मॅशर्स संघाचा 4-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सिल्व्हर खुल्या दुहेरी गटात अजिंक्य मुठे व अनिकेत सहस्त्रबुध्दे यांनी भाग्यश्री देशपांडे व दत्ता देशपांडे यांचा 21-06, 21-05 असा पराभव करत आघाडी घेतली. गोल्ड खुल्या मिश्र दुहेरी गटात संग्राम पाटील व सारा नवरे यांनी सिध्दार्थ साठ्ये व चैत्राली नवरे यांचा 21-15, 21-19 असा तर वाईजमन गटात श्रीदत्त शानबाग व विवेक जोशी यांनी समिर जोशी व विवेक लिमये यांचा 21-14, 17-21, 21-20 असा पराभव करत संघाचा डाव भक्कम केला. सिल्व्हर मिश्र दुहेरी गटात गिरीश मुजुमदार व रोहित भालेराव यांनी नितल शहा व शरयु राव यांचा 15-06, 15-02 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
अन्य लढतीत स्कॅवेंजर्स संघाने इम्पेरियल स्वान्स संघाचा 4-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. विजयी संघाकडून मिहिर विंझे,शकाक्षी किनिकर, अभिजीत राजवाडे,अनिश रुकारी, तन्मय चोभे,वृशी फुरीया, रमन जैन, विरल देसाई यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
ब्लेझिंग ग्रिफिन्स वि.वि द ईगल्स 5-2(गोल्ड खुला दुहेरी गट- आकाश सुर्यवंशी/कुणाल पाटील वि.वि अनिरूध्द आपटे/देवेंद्र चितळे 19-21, 21-13, 21-14; सिल्व्हर खुला दुहेरी गट- राजश्री भावे/विनित रुकारी वि.वि बिपिन चोभे/चेतन वोरा 21-00, 21-00; गोल्ड खुला मिश्र दुहेरी गट- प्रथम पारेख/दिपा खरे पराभूत वि आर्य देवधर/गौरी कुलकर्णी 00-21, 00-21; वाइजमन- गिरिश करंबेळकर/प्रशांत वैद्य वि.वि अविनाश दोशी/संजय फेरवानी 21-00, 21-00; सिल्व्हर मिश्र दुहेरी गट- आशय कश्यप/कर्णा मेहता वि.वि आयुष गुप्ता/पार्थ केळकर 15-07, 15-11; सिल्व्हर खुला दुहेरी गट- चिन्मय चिरपुटकर/तुषार मेंगळे वि.वि जय परांजपे/कैस्तुभ वाळिंबे 15-08, 15-05; गोल्ड खुला दुहेरी गट- जयदीप गोखले/सुधांशू मेडसीकर पराभूत वि बिपिन देव/तेजस चितळे 00-21, 00-21);
अर्बन रेवन्स वि.वि पेलिकन स्मॅशर्स 4-3(गोल्ड खुला दुहेरी गट- अव्दैत जोशी/आनंद शहा पराभूत वि नितिन कोनकर/प्रथम वाणी 12-21, 15-21; सिल्व्हर खुला दुहेरी गट- अजिंक्य मुठे/अनिकेत सहस्त्रबुध्दे वि.वि भाग्यश्री देशपांडे/दत्ता देशपांडे 21-06, 21-05; गोल्ड खुला मिश्र दुहेरी गट- संग्राम पाटील/सारा नवरे वि.वि सिध्दार्थ साठ्ये/चैत्राली नवरे 21-15, 21-19; वाईजमन- श्रीदत्त शानबाग/विवेक जोशी वि.वि समिर जोशी/विवेक लिमये 21-14, 17-21, 21-20; सिल्व्हर मिश्र दुहेरी गट- गिरीश मुजुमदार/रोहित भालेराव वि.वि नितल शहा/ शरयु राव 15-06, 15-02; सिल्व्हर खुला दुहेरी गट- चिन्मय चोभे/रोहन जमेनिस पराभूत वि प्रियदर्शन डुंबरे/सचिन अभ्यंकर 10-21, 01-21; गोल्ड खुला दुहेरी गट- अनिकेत शिंदे/केदार नाडगोंडे पराभूत वि हर्षद बर्वे/प्रतिक धर्माधिकारी
स्कॅवेंजर्स वि.वि इम्पेरियल स्वान्स 4-3(गोल्ड खुला दुहेरी गट- मिहिर विंझे/शताक्षी किनिकर वि.वि आदित्य काळे/तुषार नगरकर 21-17, 19-21, 21-12; सिल्व्हर खुला दुहेरी गट- अभिजीत राजवाडे/अनिश रुकारी वि.वि ईशान भाले/प्रिती फडके 21-15, 21-20; गोल्ड खुला मिश्र दुहेरी गट- तन्मय चोभे/वृशी फुरीया वि.वि मिहिर केळकर/आदिती रोडे 21-10, 21-09; वाइजमन- रमन जैन/ विरल देसाई वि.वि हेमंत पाळंदे/संदिप साठे 11-21, 21-19, 21-17; सिल्व्हर मिश्र दुहेरी गट- अमेय कुलकर्णी/कविता रानडे पराभूत वि अक्षय ओक/अभिजीत गाणु 00-15, 00-15; सिल्व्हर दुहेरी गट- मनिष शहा/तन्मय चितळे पराभूत वि विनायक भिडे 00-15, 00-15; गोल्ड खुला दुहेरी गट- अमित देवधर/मकरंद चितळे पराभूत वि अनिश राणे/तेजस किंजीवडेकर 00-21, 00-21);
रिबाउंड ब्लॅक हॉक्स वि.वि फाल्कन्स 4-3(गोल्ड खुला दुहेरी गट- करण पाटील/ विक्रांत पाटील पराभूत वि मधुर इंगळहाळीकर/ तन्मय आगाशे 14-21, 16-21; सिल्व्हर खुला दुहेरी गट- अमर श्रॉफ/अशुतोष सामण वि.वि राहुल परांजपे/राजशेखर करमरकर 21-12, 16-21, 21-12; गोल्ड खुला मिश्र दुहेरी गट- सिध्दार्थ निवसरकर/राधिका इंगळहाळीकर वि.वि रणजीत पांडे/दिप्ती सरदेसाई 21-16, 21-20; वाइजमन- बाळ कुलकर्णी/नरेंद्र पटवर्धन पराभूत वि आनंद घाटे/निलेश केळकर 13-21, 14-11; सिल्व्हर मिश्र दुहेरी गट- समिर जालन/अनया तुळपुळे वि.वि अभिषेक ताम्हाणे/आरुषी पांडे 21-08, 21-14; सिल्व्हर खुला दुहेरी गट- जयकांत वैद्य/राहुल गांगल पराभूत वि प्रशांत कृष्णन/सोहन वर्तक 14-15, 08-15; गोल्ड खुला दुहेरी गट- अमोल मेहेंदळे/सारंग आठवले वि.वि अनिल देडगे/पराग चोपडा 21-15, 21-19).
घोरपडी रेल्वे उड्डाणपूलाचे काम सुरु होणार -रविवारी भूमिपूजन …(व्हिडीओ)
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खासदार काकडेंच्या घरच्या गणपतीची आरती
हर्षवर्धन पाटील यांनी घाई केली- जयंत पाटील
पुणे-हर्षवर्धन पाटील यांनी निर्णय घेण्यास घाई केली असे प्रतिपादन राष्ट्रवादी चे नेते जयंत पाटिल यांनी येथे केले.
विधानसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज (ता.६) पुण्यातील बारामती होस्टेल येथे आयोजित करण्यात आली . या बैठकीमध्ये राष्ट्रवादीची खलबते सुरू आहेत. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित आहेत.
या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांची यादीवर चर्चा केली जाणार आहे. तसेच मित्र पक्षांसोबत जागावाटप कशाप्रकारे करता येईल यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष इंदापूर जागेवरून खुलासा केला. ते म्हणाले, की राष्ट्रवादीच्या यादीमध्ये इंदापूर सोडून सर्व जागांवर चर्चा करण्याचे ठरले आहे.
इंदापूरच्या जागेसंदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शरद पवार हे निर्णय घेतील असे ठरले होते. मात्र, त्यापूर्वीच हर्षवर्धन पाटील यांनी मेळावा घेत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात रोष व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेबाबत टोकाची भूमिका घेतलेली नव्हती, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबाबत खुलासा केला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी निर्णय घेण्यास घाई केली असेही ते म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये आमचा मित्र पक्ष काँग्रेससोबत चर्चा केली आहे. काही जागांच्या बाबतीत आम्हाला उमेदवार अंतिम करायचे आहेत त्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा केली जाणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पुणे फेस्टिवलने पुण्याचे सांस्कृतिक जीवन समृध्द केले
३१ व्या पुणे फेस्टिव्हलचे शानदार उद्घाटन संपन्न
पुणे-गेल्या ३० वर्षांपासून अखंडित सुरु असलेल्या पुणे फेस्टिवलने पुण्याचे सांस्कृतिक जीवन समृध्द केले व कालावातांना प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे अशा शब्दांत जेष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे फेस्टिवलचा गौरव केला. केवळ पुणे फेस्टिवलच नव्हे तर क्रीडा क्षेत्रात पुण्याला जागतिक नकाशावर नेण्याचे काम सुरेश कलमाडी यांनी केले आहे असे गौरोद्गारही त्यांनी काढले
कला, संस्कृती, गायन,वादन, नृत्य, क्रीडा यांचा मनोहारी संगम असणाऱ्या पुणे फेस्टिव्हलचे गणेश कला क्रीडा रंगमंच येथे जेष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. फेस्टीवलचे यंदाचे ३१ वे वर्ष आहे. महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, माजी खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते प्रेम चोप्रा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, दिल्लीतील ललित कला अकॅडमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे, मराठी अभिनेते प्रशांत दामले, सुबोध भावे, अमेय वाघ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह मिलिंद जोशी, महिला उद्योजिका उषा काकडे व बॉडी बिल्डर संग्राम चौघुले, फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सुभाष सणस हे या प्रसंगी उपस्थित होते

विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणार्या व्यक्तींना उद्घाटन सोहळ्यात‘जीवनगौरव पुरस्कार’ व’पुणे फेस्टिव्हल अॅवॉर्ड’देऊन गौरवले जाते. यंदा ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज आणि ज्येष्ठ चित्रपट अभिनेते प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच ज्येष्ठ चित्रपट अभिनेते सुबोध भावे, नाट्य अभिनेते प्रशांत दामले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह मिलिंद जोशी, महिला उद्योजिका उषा काकडे व बॉडी बिल्डर संग्राम चौघुले यांना पुणे फेस्टिव्हल अॅवॉर्ड देवून गौरविण्यात आले.महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत म्हणून पुणे फेस्टिव्हलतर्फे २ लाख रुपयांचा धनादेश पुणे फेस्टिवलचे अध्यक सुरेश कलमाडी यांनी मुख्यमंत्री सहाय्यनिधीस जयकुमार रावळ यांच्याकडे सुपूर्द केला. सार्वजनिक गणेशोत्सवात शताब्दी साजरी करणाऱ्या गणेश मंडळांच्या पुणे फेस्टिव्हलमध्ये उद्घाटन सोहळ्यात सत्कार करण्यात येतो. या वर्षी कस्तुरी चौक मित्र मंडळ आणि निंबाळकर तालीम गणेशोत्सव मंडळ या शताब्दी साजरी करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांचा उद्घाटन सोहळ्यात सत्कार करण्यात आला.
पवार म्हणाले, पाहिल्या दिवसापासून पुणेकरांनी पुणे फेस्टिवलचे स्वागत केले आहे. सुरेश कलमाडींनी हा सोहळा हातात घेतला आणि स्व. कृष्कांत कुदळे यांनी त्याचा नेटकेपणा जपला. म्हणून पुण्याचे नाव देशात आणि देशाबाहेर गेले. जगातील अशा प्रकारच्या फेस्टिवलमध्ये पुण्याचे नाव या फेस्टिवलमुले यायला लागले. या महोत्सवाच्या माध्यमातून अनेक कलाकारांना त्यांच्या कलेचे दर्शन दाखवण्याची संधी मिळाली तशीच पुणेकरांना विविध कलांचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली.
शेवटच्या सिने रसिकांपर्यंत रुजलेले नाव म्हणजे प्रेम चोप्रा आहे. त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक भूमिका निभावल्या त्यांच्या अभिनयाने त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. असे गुरोद्गार त्यांनी काढले. देशाच्या उभारणीमध्ये बजाज कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. देशात व अराज्यात अनेक उद्योजक आहेत परंतु आपल्या कंपनीजवळ कामगारांबरोबर राहणारे राहुल बाजाज हे एकमेव उद्योजक आहेत असे गौरोद्गार त्यांनी काढले. स्व. कृष्णकांत कुदळे यांच्या गेल्याचे मनस्वी दू:ख आहे.आपल्याला नवीन पिढीतील कृष्णकांत कुदळे तयार करावे लागतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जयकुमार रावळ म्हणाले, कला, क्रीडा, संस्कृती सदर करण्याचे पुणे फेस्टिवल हे एक मोठे व्यासपीठ आहे. याच मंचावरून अनेकांनी पुढे देशात व जगात व्यासपीठ गाजवले. हा फेस्टिवल आता थांबवता येणार नाही. या फेस्टिवलचा आलेख हा चढता ठेवावा लागेल. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करू असे आश्वासन त्यांनी दिले.
छगन भुजबळ म्हणाले, पुणे फेस्टिवल हा पुण्यापुरता मर्यादित न राहता तो जगाचा फेस्टिवल झाला. त्याच्यामागे सुरेश कलमाडींची शक्ती तर आहेच परंतु स्व. कृष्णकांत कुदळे यांची मेहनतही होती. मंदीच्या काला सुद्धा पुणे फेस्टिवलमध्ये होणारे भव्यदिव्य कार्यक्रम यशस्वी होताहेत याबद्दल पुणेकरांचे अभिनंदन असे उद्गार त्यांनी काढले. कलमाडींना अनेक अडचणी आल्या मात्र ‘ शो मस्ट गो ऑन’ या उक्तीप्रमाणे त्यांनी हे कार्य ३१ वर्षे सुरु ठेवले. बॉलीवूडच्या कलाकारांना पहिल्यांदा मुंबईच्या बाहेर कलमाडी यांनी आणले असे ते म्हणाले. प्रेम चोप्रा यांची नकारात्मक भूमिका होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात राग असायचा मात्र तीच त्यांच्या कलेची पावती आहे असे ते म्हणाले.
सुरेश कलमाडी म्हणाले, एखादा महोत्सव सुरु करणे सोपे असते मात्र तो सुरु ठेवणे अवघड असते. पुणे फेस्टिवलच्या ३१ वर्षाच्या प्रवासात अनेकांचे योगदान आहे. जेष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी २७ वर्षे गणेश वंदना आणि बले सदर केली. पुणे फेस्टिवलची “मदर ऑफ ऑल फेस्टिवल’ अशी झाली आहे. स्व. कृष्णकांत कुदळे यांचेही त्यासाठी मोठे योगदान होते असे ते म्हणाले.
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, राहुल बजाज यांनी हजारो लोकांना रोजगार व काम दिले आहे. प्रेम चोप्रा यांनी अनेक कुटुंबे उध्वस्त केली परतू ती पडद्यापुरतीच होती. प्रत्यक्ष जीवनात हा माणूस खूप शांत आणि प्रेमळ आहे असे गौरोद्गार त्यांनी काढले. शरद पवार हे भारताच्या राजकारणातील खरे चाणक्य किंवा भारतरत्न आहेत. त्यांनी महाराष्ट्राला व देशाला दिशा दिली. त्यामुळे त्यांची देशाला गरज असून त्यांनी मार्गदर्शक मंडळात जाऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जेष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनी त्यांच्या प्रसिध्द असलेल्या ‘प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा’ या संवादाने आपल्या भाषणास सुरुवात केली. त्याला प्रेक्षकांनी शिट्या व टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. आपल्याला आज खूप आनंद आणि अभिमान वाटतो आहे असे सांगत ज्यांची उमेद हरवली आहे त्यांच्यासाठी पुणे फेस्टिवलसारख्या फेस्टिवल आवश्यक असतो असे ते म्हणाले.
राहुल बजाज यांनी पुण्याला मी भारताचे महत्वाचे शहर मानत असे सांगितले. पुणे फेस्टिवलचा सुरेश कलमाडी यांच्यामुळे अनेकदा संबंध आला आहे. आजच्या गौरवाने मनस्वी आनंद झाला आहे असे ते म्हणाले.
प्रशांत दामले, सुबोध भावे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात जेष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर यांच्या सनईवादनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.यानंतर‘पंचजन्य शंखनाद’प थकातर्फे २० युवक युवतींनी सलवार, झब्बा,उपरणे व पुणेरी पगडी अशा पेहेरावात सादर केलेल्या सामुहिक शंखध्वनी कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. संतोष पोतदार यांनी याचे आयोजन केले होते. यानंतर नंदिनी गुजर यांनी गणेश स्तुती सादर केली. कथ्थक नृत्यांगना तेजस्विनी साठे व भरतनाट्यम नृत्यांगना अरुंधती पटवर्धन यांनी १२ सहकलावंतांसमवेत एकत्रित ‘गणेश पंचरत्नं -मुदा करत मोदकं’ या संस्कृत श्लोकावर आधारित कथ्थक व भरतनाट्यम यांचे फ्युजन असणारी नेत्रदीपक गणेश वंदना सादर केली.अमोद कुलकर्णी यांनी याचे संगीत संयोजन केले आहे.यानंतर श्री गणेशाची पूजा व आराधना करणार्या ‘जय देव जय देव श्री गणराया’, ‘लंबोदर तू विनायका’, ‘सुख करता दुःख हरता’, ‘सांगतो नमन’ आणि ‘हरे राम हरे राम’ महामंत्र यावर आधारित बॉलीवूड गणेश पूजा या सिद्धी पोतदार आणि अक्षय गुप्ता यांनी ‘सिधाक्ष प्रॉडक्शन’ तर्फे सादर केलेल्या विशेष नृत्याविष्कार सादर केला. यामध्ये १८ मुले मुली सहकलावंत सहभागी झाले होते. सिद्धी पोतदार यांनी नृत्यदिग्दर्शन केले . यानंतर गुरु पंडिता मनीषा साठे यांनी संरचना केलेला जपानी डान्सिकल टायको‘कलासंयुज’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. . टायको हे पारंपारिक जपानी वाद्य ११ भारतीय शिष्यांनी कथ्थक नृत्य प्रणालीसह सादर केले. पुणे फेस्टिव्हलच्या स्थापनेपासून सलग 30 वर्षे पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक म्हणून काम करणारे कृष्णकांत कुदळे यांचे मागील वर्षी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहणारी फिल्म यावेळी दाखविण्यात आली. सुभाष सुर्वे यांनी याची निर्मिती केली आहे. केरळच्या सांस्कृतिक परंपरांवर आधारित ‘आपला केरळ’हा नृत्यसंगीत कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यामध्ये ४० स्थानिक मल्याळी मुले-मुली कलावंत पारंपारीक वेषभूषेत कथ्थकली,भरतनाट्यम्, मोहिनीअट्टम,थिरूवाथिरकली, कुचीपूडी अशी नृत्ये सादर केले.पुणे मल्याळी फेडरेशनचे अध्यक्ष राजन नायर यांनी याचे आयोजन केले होते.या उद्घाटन सोहळ्यात शेवटी ‘लावणी आणि घुमर’यांचे फ्युजन सादर करण्यात आले. त्यामध्ये चित्रतारका तेजा देवकर, संस्कृती बालगुडे, भार्गवी चिरमुले,मानसी मुसळे, गिरीजा प्रभू आणि वैष्णवी पाटील सहभागी झाल्या होत्या. सोबत पुणे फेस्टिव्हलचे 30-40सहकलावंत देखील सहभागी झाले होते. पायलवृंदच्या निकिता मोघे यांनी यांचे नृत्य दिग्दर्शन केले
या उद्घाटन सोहळ्याचे मराठीतून सुधीर गाडगीळ आणि इंग्रजीतून दूरिया शिपचांडलर यांनी सूत्रसंचालन केले.
शिवरायांच्या किल्ल्यांना नख लागू देणार नाही – मुख्यमंत्री
पुणे दि.6 : छत्रपती शिवाजी महाराज आणि जो मराठयांचा इतिहास आहे, त्यांच्याशी सबंधित कुठल्याही किल्ल्यांवर कोणत्याही प्रकारची परवानगी देणार नाही, अशा किल्ल्यांना आम्ही नखभरही हात लावू देणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली.
मानाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री पुणे येथे आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले, किल्लांसंदर्भात पसरविण्यात आलेली बातमी अत्यंत चुकीची आहे. यासंदर्भात पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी पत्रकार परिषद घेवून स्पष्टीकरण दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठयांचा जो इतिहास आहे त्यांच्याशी सबंधित कुठल्याही किल्ल्यांवर कुठल्याही गोष्टीची कधीच परवानगी देण्याचा प्रश्नच नाही. हे सर्व संरक्षित किल्ले आहेत.
सरकारने स्वराज्याची राजधानी रायगडचा विकास केला, त्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी लक्ष घालून ज्याप्रकारे काम रायगड किल्ल्यावर चालू केले आहे. तसाच इतिहास आम्हाला जतन करावयाचा आहे. ऐतिहासिक किल्ल्यांच्या व्यतिरिक्त जे दोन-तिनशे किल्ले आहेत, तिथे पर्यटनाच्या दृष्टीने काही करता येईल का, यासंदर्भातील तो निर्णय होता. कुठले समारंभ, लग्न याला काही अर्थ नाही. छत्रपतींचा आणि हिंदवी स्वराज्याचा, मराठयांच्या साम्राज्याचा इतिहास ज्या किल्ल्यांशी सबंधित आहे, अशा किल्ल्यांना आम्ही नखभरही हात लावू देणार नाही, असेही ते शेवटी म्हणाले.
महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होवो- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दगडुशेठ गणरायाला साकडे
पुणे : महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होवो, अशी प्रार्थना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दगडूशेठ गणपती चरणी केलेल्या अभिषेकातून केली. गणरायाला अभिषेक करताना गुरुजींनी केलेल्या मंत्रपठणातून संपूर्ण महाराष्ट्राचे कल्याण होवो, अशी प्रार्थना करण्यासोबतच पुढील काळातही मुख्यमंत्रीपद मिळू देत, असे पौरोहित्य करणा-या गुरुजींच्या मंत्रपठणाला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा देत गणरायाचरणी जणू साकडे घातले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे १२७ व्या वर्षानिमित्त ॅगणेशोत्सवात साकारण्यात आलेल्या श्री गणेश सूर्यमंदिरात गणरायाचे दर्शन घेण्यासाठी व अभिषेकासाठी फडणवीस यांनी आर्वजून हजेरी लावली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उत्सवप्रमुख व नगरसेवक हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, सुनील रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच खासदार संजय काकडे, भाजपा पुणे शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ, दिलीप कांबळे,सभागृह नेते श्रीनाथ भिमाले हे देखील यावेळी उपस्थित होते. फडणवीस यांनी गणरायाचे पूजन करीत आरती देखील केली. ट्रस्टतर्फे त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
पुण्यात गणपतीच्या वर्गणीवरून आई-मुलाला टोळक्यांनी केली बेदम मारहाण
पुणे-गणपतीची वर्गणी न दिल्याच्या रागातून दहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने आई आणि मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सागर घडसिंगसह दहा जणांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश देवराम चौधरी (वय-३७) यांनी वाकड पोलिसात फिर्याद नोंदवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर हा वाकड परिसरातील सदगुरू कॉलनीत राहतो. तर फिर्यादी यांचे त्याच परिसरात माताजी कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. कॉलनीत ओम साई गणपती मंडळ असून त्याची ५ हजार वर्गणी का देत नाहीत म्हणून मध्यरात्री आरोपीने फिर्यादी यांच्या बंद दुकानाची जाळी जोरजोरात वाजवत होता. तेव्हा, फिर्यादी आणि जखमी भाऊ मुकेश चौधरी, आई जमनीबाई चौधरी हे त्याला विरोध करत होते.सागरने दहा जणांचे टोळके बोलावले त्यांच्या हातात लाकडी दांडके होते. तर सागर च्या हातात लोखंडी पाईप होता, तुम्ही आम्हाला वर्गणी का देत नाही थांब तुला जीवे ठार मारतो असे म्हणून लोखंडी पाईप ने फिर्यादी यांचा भाऊ मुकेशच्या डोक्यात मारला यात ते गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर टोळक्याने लाकडी दांडक्याने आईला आणि फिर्यादी यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.
सोमनाथ मंदिर स्वच्छतेत देशात पहिल्या क्रमांकावर
बीव्हीजी इंडियाच्या स्वच्छतेचे यश
पुणे (प्रतिनिधी) : गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिर हे देशातील सर्वात स्वच्छ मंदिर ठरले आहे. केंद्र
सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत या मंदिराला ‘सर्वात स्वच्छ मंदिर’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला
आहे. पुण्यातील बीव्हीजी इंडिया या कंपनीकडे या मंदिराच्या देखभालीचे काम आहे. राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कारांचे
वितरण दिल्लीत होणार आहे.
गुजरातमधील सर्व तीर्थस्थळांच्या स्वच्छतेची मोहीम राज्य सरकारने २०१७ मध्ये हाती घेतली होती. विविध
मंदिरांमध्ये सोमनाथ, गिरनार, द्वारका, अंबाजी, पलितना, पावागड, श्यामलजी आदींचा समावेश आहे. यातील
सोमनाथ, द्वारका या तीर्थस्थळांचे काम बीव्हीजी इंडियाकडे सुपूर्द करण्यात आले. तेथील उत्तम काम पाहून
स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसराच्या देखभालीचे कामही सरकारने बीव्हीजी इंडिया कंपनीला दिले आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी टिव्टर संदेशाद्वारे सोमनाथ मंदिराच्या पुरस्काराबाबत माहिती देताना
म्हटले आहे की, जलशक्ती आणि स्वच्छता मंत्रालयाने जाहीर केलेल्या या पुरस्कारामुळे राज्याच्या शिरपेचात
आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या निकषांचे काटेकोरपणे पालन करून सोमनाथ
देशातील सर्वात स्वच्छ मंदिर ठरले आहे. वर्षाचे ३६५ दिवस सोमनाथ मंदिर स्वच्छ ठेवण्यात बीव्हीजी इंडियाने
घेतलेली मेहनत कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया रूपानी यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ‘बीव्हीजी इंडियाने स्वच्छतेच्या बाबतीत देशात निर्माण केलेल्या अत्युच्च मापदंडांवर या पुरस्काराने
मोहर उमटवली आहे’, देशाची स्वच्छता करणे ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठी बीव्हीजी इंडिया अहोरात्र
प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया कंपनीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केली.
वंचित बहुजन आघाडीमधून एमआयएम बाहेर; आता स्वतंत्र निवडणूक लढवणार
मुंबई- एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटपावरील वादातून अखेर फूट पडली आहे. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मान राखला नाही, त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले.
वंचितकडून 8 जागांची ऑफर होती, तर एमआयएम 100 जागांसाठी आग्रही होती. 8 जागांची ऑफर एमआयएमला अमान्य असल्यामुळे मागील दोन-चार दिवसांपासूनच एमआयएमकडून बाहेर पडण्याचे संकेत देत होते. त्यामुळे अखेर बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नव्हती. त्यांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. विशेष म्हणजे या यादीत औरंगाबाद मध्य मतदारसंघाचाही समावेश नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत,
स्मिता तांबेच्या गौराईच्या साडीसाठी आणलं कोल्हापूरवरून खणाचे कापड
अभिनेत्री स्मिता तांबेचे यंदा 18 जानेवारीला लग्न झाले. स्मिताच्या माहेरी दरवर्षी गौराईचे आगमन होते. यंदा तिच्या सासरी मुंबईमध्ये पहिल्यांदाच गौराई बसल्यात. स्मिताने सुंदर वस्त्रालंकार परिधान करून मोठ्या थाटामाटाने गौराईचे स्वागत केले. भक्तिभावाने गौराईची पूजाअर्चा, पाहुणचार केला.
स्मिता तांबेच्या घरी सात दिवसांचे गौरी-गणपती येतात. गणपती बाप्पाची मुर्ती तिचे यजमान धिरेंद्र व्दिवेदी स्वत: हाताने बनवतात. आणि स्मिता गणपतीचे वस्त्रांलकरा सजवते. तसेच गौराईसाठीही साडी-चोळी हाताने बनवण्यापासूनते ते तिचा साजशृंगार करण्यापासून ते नैवेद्य बनवण्यापर्यंत सगळे स्मिता स्वत:च्या हाताने बनवते.
गौरी गणपती आणि स्मिता तांबेचे वेगळे नाते आहे. त्याविषयी स्मिता सांगते, “लहानपणापासून गौरी-गणपती आल्यावर माढ्यात आगळे चौतन्य निर्माण होते. हा सण मला प्रचंड आवडतो. मला लहानपणापासून गौरीचा शृंगार, तिचे दागिने, तिला टिकली लावायची, हातावर मेंदी लावायची आणि साड्या नेसवायच्या हे सगळं करायला खूप आवडायचं. आज लग्नानंतर पहिल्यांदाच माझ्या स्वतःच्या घरी गौंरी आली आहे.”
ती पूढे सांगते,“एरवी आईच्या हाताखाली गौरी गणपतीसाठी तिला मदत करायचे. यावेळेला पहिल्यांदा हे सगळं मी स्वतः केलं. गौरी-गणपती माझ्या घरी आल्यामुळे मी खूप भावूक झाले आहे. त्यांची पूजाअर्चा, सेवा करताना त्यांच्यात मन रमायला लागतं. मी त्यांच्याशी मनाने एकरूप होते.”
स्मिताने स्वत: गौरीसाठी खणाच्या नऊवारी साड्या बनवल्या आहेत. ती म्हणते. “मी गौराईला खणाच्या नऊवाऱ्या नेसवल्या आहेत. कारण मला खणाचं कापड खूप आवडतं. त्यासाठी कोल्हापूरच्या महलक्ष्मी मंदिराच्या बाहेरून हे कापड खरेदी केलंय. त्या कापडाच्या या नऊवारी साड्या मी नेसवल्या आहेत.”
७६ शानदार दोन-बेडरुम अपार्टमेंट्स असलेला २३ मजली टॉवर- पुण्यातील पहिली हेल्थ-टेक होम्स साकार होत आहेत खराडीमध्ये
‘व्हॅस्कॉन’च्या ‘फॉरेस्ट एज – फेज २‘ चा शुभारंभ
पुणे, ६ सप्टेंबर, २०१९: अतिशय विश्वसनीय व ख्यातनाम विकासकांपैकी एक व्हॅस्कॉन इंजिनिअर्स लिमिटेड (बीएसई स्क्रिप आयडी VASCONEQ) या पुणे स्थित कंपनीने आपल्या ‘फॉरेस्ट एज – फेज २‘ चा शुभारंभ होत असल्याची घोषणा केली आहे. व्हॅस्कॉन इंजिनिअर्स, क्लोवर बिल्डर्स व श्री मधुर रिअल्टर्स यांच्या दरम्यान भागीदारीतून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.
१.७ एकर जमिनीवर उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पामध्ये भविष्यातील जीवनशैलीसाठी अनुकूल अशी निवासी नगरी विकसित केली जात आहे. फेज २ मध्ये एक २३ मजली टॉवर असणार आहे व त्यामध्ये ७६ दोन-बेडरुम अपार्टमेंट्स असतील. या दोन-बेडरुम अपार्टमेंट्समध्ये ७७८ चौरस फीट व ७९३ चौरस फीट असे दोन कार्पेट क्षेत्रफळांचे पर्याय उपलब्ध आहेत. फॉरेस्ट एज – फेज २ मध्ये पुण्यातील पहिली हेल्थ-टेक घरे तयार करण्यात येत आहेत. या घरांच्या किमती ८५ लाख रुपयांपासून पुढे आहेत (सर्वसमावेशक). घरांचा ताबा २०२४ सालापर्यंत दिला जाईल.
यावेळी व्हॅस्कॉन इंजिनिअर्स लिमिटेडचे एमडी श्री. सिद्धार्थ वासुदेवन यांनी सांगितले, “फॉरेस्ट एज – फेज १ ला ग्राहकांकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद आमच्यासाठी अतिशय आनंददायी व प्रेरणादायी ठरला. हाच उत्साह कायम राखत आम्ही आता आमच्या ग्राहकांसाठी फेज -२ चा शुभारंभ केला आहे. गेली तीन दशके यशस्वी वाटचाल करणारी ‘व्हॅस्कॉन’ कंपनी ही सर्वोत्कृष्ट कामगिरी व ग्राहकांना खर्च केलेल्या पैशांचे पुरेपूर मूल्य मिळवून देण्यासाठी नावाजली जाते. भविष्यकाळातही आम्ही आमच्या सर्व हितधारकांसाठी प्रोत्साहक, सुखदायी वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत राहू.”
अतिशय विचारपूर्वक नियोजन करण्यात आलेला फॉरेस्ट एज हा प्रकल्प मध्यवर्ती ठिकाणी असून पुणे विमानतळ, प्रस्तावित पुणे मेट्रो सटेशन आणि पुणे रेल्वे स्थानक याठिकाणी सहज पोहोचता येईल अशा अंतरावर आहे. वर्ल्ड ट्रेंड सेंटर, ग्लोबल बिझनेस हब, इऑन आयटी पार्क, वीकफील्ड आयटी चेंबर्स यासारख्या महत्त्वाच्या व्यापारी केंद्रांपासून हा प्रकल्प केवळ काही मिनिटांच्या अंतरावर आहे. अनेक नामवंत शाळा, रुग्णालये, रेस्टॉरंट्स व मनोरंजनाची ठिकाणे अशा सर्व सामाजिक सोयीसुविधा अगदी जवळपास आहेत.


















