Home Blog Page 2842

तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करा…… प्रकाश जगताप

0
पुणे -अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ण्ड   रिसर्च पर्वती,
 पुणे महाविद्यालयाच्या ISTE Student Chapter विभागाच्या वतीने इंजिनिअर डे चे आयोजन करण्यात आले
 होते. या कार्यक्रमाची सुरवात श प्रकाश जगताप मुख्य कार्यकारी संचालक साज टेस्ट प्लांट प्रा.ली. पुणे व
 डॉ.एन बी. पासलकर माजी संचालक तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ. 
मोक्षगोंडम विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.या प्रसंगी बोलताना प्रकाश जगताप 
यांनी भारत  सरकारने २०३० पर्यंत 'इलेक्ट्रिक व्हेईकल नेशन' घडवण्याचा निर्धार केला आहे. इलेक्ट्रिक 
वाहनांनचा वापर करून शाश्वत परिवहन पद्धत विकसित करण्यासाठी संशोधन सुरु आहे. पेट्रोलियम पदार्थांवर 
अवलंबून असलेल्या वाहनांमुळे निर्माण होणारा कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी ही वाहने उपयुक्त
 ठरणार आहेत. यामुळे ई चार्जिंग स्टेशन, वाहनाचे सुटेभाग निर्मिती उद्योग, असेम्ब्ली एन्टरप्रायझेस, बॅटरी आणि
 चार्जिंग उपकरणे निर्मिती उद्योगाच्या संधी उपलब्ध होऊन नवउद्योजकाना संशोधनासाठी नवे क्षेत्र उपलब्ध होणार
आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये नवनिर्माता म्हणून इंजिनिअरचे योगदान महत्वाचे आहे. सध्याच्या मंदिच्या काळात
 संधी शोधण्यासाठी   विद्यार्थ्यांनी नवभारताच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करून संशोधन करण्याचे
 आवाहन इंजिनिअर डे च्या  निमित्ताने उपस्थितांना केले. इंजिनिअर्स डे च्या निमित्ताने पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा,
 प्रोजेक्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते स्पर्धेच्या विजेत्यांचा व महाविद्यालयातील 
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विदायार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाच्या ‘पर्वती २०१९’
 या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. ISTE विद्यार्थी प्रतिनिधी कु.भूषण 
नाडकर याने इंजिनिअर्स डे चे महत्व  पटवुन दिले. कार्यक्रमासाठी प्रकाश जगताप, मुख्य कार्यकारी
 संचालक साज टेस्ट प्लांट प्रा.ली. पुणे, डॉ.एन बी. पासलकर, माजी संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय 
महाराष्ट्र राज्य, ऋजुता जगताप कार्यकारी संचालक, साज टेस्ट प्लांट प्रा.ली., महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.
 सुनिल ठाकरे, सर्व  विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे 
नियोजन  ISTE विद्यार्थी विभागाचे समन्वयक प्रा.संदीप राऊत व प्रा.सारंग दुबे यांनी केले तर सूत्रसंचालन 
प्रा.वैशाली भिमटे व प्रा. प्राजक्ता कचरे यांनी केले.

शहर काँग्रेसची निवडणूक पूर्व तयारीची बैठक संपन्न.

0

पुणे –
आज काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी विधानसभा
निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी प्रमुखांची बैठक शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली पार
पडली.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘आघाडीचा धर्म पाळून काँग्रेस
राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे जो कोणी उमेदवार निवडणुकीसाठी उभा असेल त्यास निवडून
आणण्याची जबाबदारी आपण सर्वांनी एकत्रितपणे घ्यावी. काँग्रेस पक्षाच्या या कठिण काळामध्ये
सर्व एकनिष्ठ कार्यकर्ते जोमाने कामाला लागू.’’
माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, ॲड. अभय छाजेड, अरविंद शिंदे, रशिद
शेख, सदानंद शेट्टी, नीता रजपूत या प्रमुखांनी बैठकीमध्ये आगामी विधानसभेच्या
निवडणुकीसाठी राज्यपातळीवरील भाजप सेना सरकारला आलेले अपयश, भ्रष्टाचार तसेच पुणे
महानगर पालिकेतील भ्रष्टाचार व विकासाच्या नियोजनाचा अभाव या मुद्दांवर निवडणुक केंद्रित
केली पाहिजे अशी चर्चा यावेळी करण्यात आली. विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या
वतीने शिष्टाचार समिती, सोशल मिडीया समिती, प्रसिध्दी विभाग, कंट्रोल रूम, वक्ते समन्वयक,
रणनिती व व्‍यूह रचना समिती, कायदा सल्लागार समिती इत्यादी समित्यांचे गठन करण्याचे
ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व समविचारी मित्र पक्षांशी बोलणी करून बैठकीचे आयोजन
करण्याचे ठरले.
या बैठकीस अजित दरेकर, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, मनिष आनंद, दत्ता बहिरट,
सुजाता शेट्टी, मेहबुब नदाफ, रमेश अय्यर, सचिन आडेकर, सुनिल शिंदे, वाल्मिक जगताप, द.
स. पोळेकर आदी उपस्थित होते.

शेती पूरक व्यवसायांना राज्य शासनाची पत हमी

0

मुंबई, दि. 18 : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या शेती पूरक व्यवसायासाठीच्या कर्जांना राज्य शासन पतहमी देणार आहे.

आतापर्यंत महामंडळाच्या योजनेचा लाभ 7 हजार 866 जणांना मिळाला असून बँकेमार्फत 400 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. महामंडळांकडून 3 हजार 700 लाभार्थींना 10 कोटींचा व्याज परतावा केलेला आहे. उर्वरीत लाभार्थींना व्याज परतावा देण्याचे काम सुरु आहे.

बँकामार्फत शेतीपूरक व्यवसायांकरिता कर्ज देताना अडचणी येत होत्या. त्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. क्रेडिट गँरटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल इंटरप्राईजेस अंतर्गत शेतीपूरक कर्जाला पत हमी देता येते.

 शेती पूरक व्यवसायांसाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेच्या धर्तीवरच क्रेडिट गॅरंटी फंडस फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायजेस आणि  क्रेडिट गॅरंटी फंडस ट्रस्ट फॉर मायक्रो अँड मिडीअम इंटरप्रायजेस या दोन्ही पत हमीच्या योजना यापुढील काळात महामंडळाच्या कर्जासाठी लागू  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळामार्फत सीजीटीएमएसई आणि सीजीएफएमयू या दोन्ही पत हमीच्या योजनांचे शुल्क बँकेत भरल्यावर त्याचा परतावा करण्यात येईल.

 या निर्णयानुसार राज्य शासनामार्फत बँकांना 25 सप्टेंबर 2018 रोजी क्रेडिट गँरटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल इंटरप्राईजेस अंतर्गत घेतलेल्या कर्जावरील पत हमी देण्याकरिता मंजुरी देण्यात आली आहे.

बीडमध्ये दिसणार काका-पुतण्या आणि बहिण-भावामध्ये लढत

0

बीड – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान बीड दौऱ्यात पवार यांनी बीडच्या पाच उमेदवारांची घोषणा केली.

परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गेवराई – विजयसिंह पंडित, केज – नमिता मुंदडा, बीड – संदीप क्षीरसागर, माजलगाव – प्रकाश सोळंके असे पहिले पाच उमेदवार शरद पवारांनी जाहीर केले. तर आष्टी मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले.

नातलगांमध्ये लढत पाहायला मिळणार
बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी काका-पुतण्याची लढाई पाहायला मिळणार हे निश्चित झाले आहे. तर महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या परळी मतदारसंघातून पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात लढत होणार आहे.

शिल्पा ठाकरे आता चित्रपटामध्ये ..

0

शिल्पा ठाकरे हे नाव चित्रपट आणि टीव्ही माध्यमांसाठी नवीन असेल मात्र इंटरनेटवर तिच्या एक्सप्रेशन मुळे ती अत्यंत लोकप्रिय कलाकार आहे . टिकटॉक , लाईक आणि यु  ट्यूब सारख्या सोशल प्लँटफॉर्मन्सवर तिचे एक्सप्रेशन चे व्हिडिओ हे अत्यंत वायरल आहेत. लाखोंनी तिचे चाहते  आहेत आणि तिच्या नव्या व्हिडिओंची अत्यंत आतुरतेने ते वाट पाहत असतात . आता हि सोशल मीडिया क्वीन शिल्पा ठाकरे चित्रपटांमध्ये तिचे भाग्य आजमावणार आहे . तिच्या या एक्सप्रेशन च्या चाहत्या वर्गामुळेचं   तिचे खिचिक , ट्रिपल सीट आणि

भिरकीत हे ३  चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. हे चित्रपट सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होतील.

शिल्पा ठाकरे ही मूळची नागपूरमधील एका छोट्या गावातून आलेली मुलगी . स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असून तीने २ वर्ष पुण्यात टेक महिंद्रा या कंपनीमध्ये नोकरी केली. अभिनेत्री होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून  नागपूरच्या छोट्याश्या गावातून पुण्यात आलेली शिल्पा ही रात्रीची कामाची शिफ्ट आणि दिवसा जिथे चित्रपटांची ऑडिशन असतील तिथे जायची . ह्या दोन्ही गोष्टी ती सांभाळत स्वतःच स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करत होती.  मात्र एक दिवस , केवळ एक मजा म्हणून केलेले  तिचे एक्सप्रेशनचे म्युझिक व्हिडिओ एवढे वायरल झाले की संपूर्ण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर केवळ एकच नाव होते ते म्हणजे शिल्पा ठाकरे . नेटकरांनी तिला एक्सप्रेशन क्वीन ही उपाधी सुद्धा बहाल केली . व्हाट्स ऍप मुळे अक्ख जग जोडले गेले आहे , त्यामुळे केवळ महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत , अमेरिका , इंगलंड आणि आणखी अनेक देशात व्हाट्स ऍप च्या ग्रुप्स मुळे वायरल झालेले ते व्हिडिओ तिच्या चाहत्यांनी   जगभर पोहोचवले . तिची तुफान लोकप्रियता आणि एक्सप्रेशनची कला पाहून तिला चित्रपटांच्या मागण्या स्वतःहून येऊ लागल्या. शिल्पा मागील वर्षी झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या नृत्यावर आधारित कार्यक्रमात सुद्धा झळकली होती .

तिच्या या प्रवासाबद्दल शिल्पाला विचारले असता ती सांगते ” नागपूर ते पुणे आणि नंतर मुंबई चा प्रवास हा खरच खूप मेहनतीचा होता . एक अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड आणि एक मजा म्हणून केलेल्या व्हिडीओमुळे मिळालेली प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी जरी वेगवेगळ्या असल्या तरीही माझी मेहनत आणि प्रेक्षकांचे एका वेगळ्या कलाकृतीला दिलेले प्रेम हे नक्कीच महत्वाचे आहे . मला मिळालेल्या संधीचा मी खूप आदर करते आणि यापुढेही युट्युब ,  नाटक , सिनेमा , वेबसिरीज च्या माध्यमाने प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचा मी प्रयत्न करत राहीन .”

मंत्रालयात दोन शिक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न

0

मुंबई- मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्या प्रकरण सुरू झाले आहे. दोन शिक्षांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर प्रशासनाने मंत्रालयात संरक्षक जाळी लावली आहे, त्यामुळे दोन्ही शिक्षकांचे जीव वाचले आहेत.दिव्यांग शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी मंत्रालयात आलेल्या दोन शिक्षकांनी आज आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे मंत्रालय परिसरात एकच गोंधळ उडाला. दोन्ही शिक्षकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. संरक्षक जाळीमुळे दो दोघेही सुरक्षित आहेत. दरम्यान, दोघांनी अचानक उडी मारल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. पोलिसांनी ताबडतोब धाव घेत दोघांनी संरक्षक जाळीवरून उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी आंदोलकांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

अमित शहा घेत आहेत सुरत लुटल्याचा बदला … माजी महापौरांचा घणघणाती आरोप (व्हिडीओ)

0
पुणे- छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचा अपमान आणि राग धरून अजूनही त्याचा बदला घेण्याच्या दृष्टीने मराठा बहुजन नेत्यांना आणि छत्रपतींच्या वंशजांना मांडलिक बनविण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप करत.. जे त्यावेळी तलवारींनी गुजरात च्या  राजकीय धुरिणांना जमले नाही ,जे मुंबई महाराष्ट्रा पासून तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई ना जमले नाही .ते जमविण्याचे षड्यंत्र भाजपचे नेते म्हणजे पंतप्रधान मोदी,तसेच अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्न करत असल्याचा आरोप हि पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी येथे केला आहे.  ते म्हणाले ,गुजरातच्या जनतेत हा राग नाही तर तेथील मुठभर राजकीय धुरिणांमध्ये हा महाराष्ट्राबद्दलचा संताप कायम असल्याचेच जाणवते आहे.
अनेक मराठा आणि बहुजन समाजाचे नेते, तसेच छत्रपतींचे वंशज भाजप मध्ये जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आपले मत ‘माय मराठी ‘कडे मांडताना पहा नेमके ते काय म्हणाले ….

AB आणि CD’ मध्ये नीना कुळकर्णी यांची सरप्राईज एण्ट्री

0

‘नीना कुळकर्णी ’ हे नाव प्रत्येकाच्या परिचयाचं आणि व्यक्तिमत्त्व देखील प्रत्येकाच्या आवडीचं. नीना कुळकर्णी  यांनी आतापर्यंत साकारलेल्या अनेक भूमिका या अनेकांना आवडल्या अन् भावल्या देखील. ‘आसू’ आणि ‘हसू’ या दोन्ही गोष्टी त्यांनी त्यांच्या अभिनयातून अगदी सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवल्या. अभिनेत्री या नात्याने ते प्रेक्षकवर्गापर्यंत पोहचल्या जरुर पण आता सोशल मिडीयाच्या माध्यमातून देखील त्यांनी एक सरप्राईज प्रेक्षकांना दिले आहे.

नीना कुळकर्णी  यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अभिनेते विक्रम गोखले यांच्या सोबतचा त्यांचा फोटो पोस्ट केला. त्यावरुन हे नक्कीच लक्षात येते की ‘AB आणि CD’ या सिनेमात त्यांची सरप्राईज एण्ट्री झाली आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे यांच्या भूमिका आहेत हे सर्वांना माहित आहे, पण नीना कुळकर्णी  पण महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत हे अनेकांसाठी नक्कीच सरप्राईज असेल. पण त्या कोणती भूमिका साकारणार आहेत? त्यांच्या सरप्राईज एण्ट्रीच्या मागे नेमके कारण काय? याची उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहेत.

अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी निर्मित आणि गोल्डन रेशो फिल्म्स, केव्हीआर प्रॉडक्शन्स आणि क्रिष्णा प्रसाद प्रस्तुत ‘AB आणि CD’ चे दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. आता प्रतिक्षा केवळ या सिनेमाची झलक पाहण्याची.

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत सरकार करणार फेरविचार-मुख्यमंत्री

0

रत्नागिरी- कोकणातील बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. शिवसेना आणि ग्रामस्थांच्या विरोधानंतर हा प्रकल्प दुसरीकडे हलवण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले होते, पण राजापूरमधील हा उत्साह पाहून प्रकल्प पुन्हा आणावा वाटतोय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सुचक विधान केलं आहे.मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सध्या कोकणात आहे. या यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले. नाणार प्रकल्प कोकणात आणण्यास शिवसेनेचा विरोध असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या विधानाने शिवसेना आणि भाजपा यांच्यात वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

नाणारमध्ये येणारा प्रकल्प हा ग्रीन रिफायनरी आहे, ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. या रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. ज्या प्रकारे विरोध झाला, त्यामुळे आम्ही हा निर्णय थांबवला. पण हा उत्साह पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चा करावी असे मला वाटते. आज मी कोणताही निर्णय जाहीर करत नसलो तरी पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला बोलावणार, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एक लाख रोजगार निर्मिती

आशिया खंडातील सर्वांत मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोकणात उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरील नाणारमध्ये उभारण्यात येणार होता, पण विऱाधानंतर हा दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या प्रमुख तेल कंपन्या एकत्र येणार आहेत. या प्रकल्पात तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, सुमारे एक लाख रोजगार निर्माण होण्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे.

आता तरी कसबा सेनेला द्या ..विशाल धनवडे

0

पुणे-कसब्याने  25 वर्षे आमदारकी,मंत्रिपदे दिली त्यानंतर खासदारकी ..मिळाली … आता तरी कसबा शिवसेनेला द्या ..असे साकडे गणरायाला घालीत थेट प्रचाराचा शुभारंभ म्हणत शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी कसबा गणपती मंदिरासमोर प्रचाराचा नारळ फोडला ..आता ते खरेच कसब्यात  शिवसेनेचा प्रचार करत फिरणार काय ?याचे उत्तर मिळेलच तसेच सेनाप्रमुख देतील तो आदेश आपण पाळू असे सांगत ;कसबा सेनेला द्यावा म्हणून त्यांनी केलेला हा लक्षवेधी प्रयत्न आता नेत्यांच्या किती पचनी पडेल हे देखील दिसून येणार आहेच .

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून गिरीश बापट हे निवडून आले आहे. हा मतदारसंघ राज्यात भाजपचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो. तसेच, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आणि प्रचंड मतांनी निवडून देखील आले. त्यानंतर गिरीश बापट यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. आता गिरीश बापट यांच्यानंतर कसबा मतदार संघातून उमेदवार कोण याची चर्चा सुरू आहे. दरम्यान भाजपकडून अनेक नेत्यांची नावं देखील पुढे येत असताना शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी या मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी गणरायाची आरती करण्यात आली आणि गणपती बाप्पा मोरया, कसबा शिवसेनेला मिळू दे अशी प्रार्थना देखील करण्यात आल्याने राजकीय वातावरण गरम झाले आहे. तर या सर्व घडामोडी लक्षात घेता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत खरच युती होणार का? असा प्रश्न देखील सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह मतदारांना पडला असल्याचे दिसत आहे.विशेष म्हणजे शहरातील आठही मतदारसंघात भाजपाचे आमदार असून ते निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यात आज पुण्यात शिवसेनेच्या नगरसेवकाकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आल्याने आगामी काळात जागा वाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून जय्यत तयारी सुरू आहे. या तयारीमध्ये भाजप आणि शिवसेना आघाडीवर असून केंद्रात, राज्यात, महापालिकांमध्ये हे पक्ष सत्तेवर आहेत. या दोन्ही पक्षात अद्यापर्यंततरी सर्वकाही ठीक सुरू असल्याचे दिसत असताना, आता पुण्यातील शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी मंगळवारी शहराचं ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरासमोर प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी गणपती बाप्पा मोरया, कसबा मतदारसंघ शिवसेनेला मिळू दे, अशी प्रार्थना त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी गणराया चरणी केली.विशेष म्हणजे भाजपा आणि शिवसेनेकडून अद्यापपर्यंत कोणत्याही मतदारसंघातील उमेदवाराची निश्चिती केलेली नसताना किंवा युतीचे जागा वाटपही झालेले नसताना पुण्यात शिवसेनेकडून भाजपाच मतदारसंघ असलेल्या कसबा येथे प्रचाराचा नारळ फोडला गेल्याने युतीबाबत राजकीय वर्तुळात जोरादार चर्चा सुरू आहे.आणि अगोदर सांगून जाहीर करून धनवडे यांनी प्रचार शिभारंभ हा तथाकथित प्रकार केला आहे आणि ज्यास त्यांना कोणी रोखण्याचा  यत्न मात्र केलेला नाही .

 

 

पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारताच्या ताब्यात असणार!- परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर

0

नवी दिल्ली -पंतप्रधान मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाचे शंभर दिवस नुकतेस पूर्ण झाले आहेत. याबरोबरच परराष्ट्रमंत्रलायचे देखील १०० दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्त बोलताना परारष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी यावेळी हे देखील म्हटले की, पाकव्याप्त काश्मीरवरची आमची भूमिका नेहमीच स्पष्ट व कायम आहे. पीओके हा भारताचा भाग आहे व आम्ही एकदिवस त्यावर प्रत्यक्ष ताबा मिळवू अशी अपेक्षा आहे. याबरोबर एस जयशंकर यांनी कलम ३७० हा द्विपक्षीय मुद्दा नाही तर अंतर्गत मुद्दा असल्याचेही स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवण्यात आल्यापासून मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी पीओके बाबत वक्तव्य केले आहे. अशातच केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले होते की, सरकारचे पुढील धोरण पीओकेला पुन्हा मिळवण्याचे आहे. तर जयशंकर यांनी कलम ३७० बाबत बोलताना म्हटले की, पाकिस्तानबरोबर कलम ३७० चा मुद्दा नाहीच असू शकत कारण हा मुद्दा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यांच्याबरोबर दहशतवादाचा मुद्दा आहे. कलम ३७० बाबत आंतरराष्ट्रीय मंचाने देखील भारताची भूमिका समजून घेतलेली आहे.

पाकिस्तानवर टीका करताना परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटले की, भारत शेजार धर्म निभावण्याचे धोरण अवलंबत आहे. मात्र शेजारी देशाकडून वेगळे धोरण अवलंबवले जात आहे. त्यांना आपली वर्तवणूक सुधारण्याची व दहशतवादाविरोधात कारवाई करण्याची आवश्यकता आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारने शंभर दिवसात केलेल्या विशेष कामांची देखील उजळणी केली. राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण अधिक बळकट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

शहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

0
 
पुणे : तळजाई टेकडीसह सिंहगड रस्त्यावर झालेली वृक्षतोड आणि बांधकाम व्यावसायिकांकडून इमारती बांधताना होणारी झाडांची कत्तल यावरुन नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमध्ये चांगलेच धारेवर धरले. पालिकेच्या अधिकाऱ्यांना नगरसेवकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. शेवटी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी उत्तरे देऊन बोळवण केली.
नगरसेवक सुभाष जगताप यांनी तळजाई टेकडीवर मोठ्या प्रमाणावर झाडे कापली गेली आहेत. वनविभागाच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रावरही ही वृक्षतोड झालेली आहे. वास्तविक त्यासाठी पालिकेची परवानगी घेणे आवश्यक होते. क्षेत्र जरी वनविभागाचे असले तरी पर्यावरण रक्षण ही पालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक होते असा मुद्दा उपस्थित केला
.
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/386347455374590/
नगरसेविका नंदा लोणकर यांनी बांधकाम व्यावसायिकांकडून त्यांच्या साईट्सला चारही बाजूंनी मोठाले पत्रे लावून आतमध्ये असलेल्या झाडांची बिनबोभाट कत्तल होत असल्याकडे लक्ष वेधले. तर नगरसेवक अ‍ॅड. भैय्यासाहेब जाधव म्हणाले, झाडे तोडण्याची परवानगी दिल्यावर त्याबदल्यात दुसरीकडे लावल्या जाणाऱ्या वृक्षांची लागवड होते की नाही हे तपासण्याची यंत्रणा काय आहे अशी विचारणा केली. तसेच नगरसेवक अजित दरेकर यांनी सिंहगड रस्त्यावर झालेल्या वृक्षतोडीबद्दल किती गुन्हे दाखले अशी विचारणा केली.
या प्रश्नांना आयुक्तांनी उत्तर दिले. आयुक्त म्हणाले, तळजाई टेकवडीवरील वनविभागाच्या जागेवरील क्लिरीसिडीया झाडे काढण्यात आली आहेत. त्यासाठी वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेतली आहे किंवा नाही याची माहिती घेतली जाईल. परंतू, राज्य शासनाने वन विभागाला अशी वृक्ष काढण्यासाठी प्राधिकृत केले आहे. नियमांचे उल्लंघन झालेले असल्यास कारवाई केली जाईल. तसेच बांधकाम व्यावसायिकांकडून बेकायदा वृक्ष तोड होत असल्यास त्याची तक्रार करावी, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, तसेच पयार्यी वृक्षारोपणाची माहिती घेतली जाईल. पयार्यी वृक्षरोपणासंदर्भात तज्ञ समुहाची मदत घेतली जाते.
नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी उभे राहिलेल्या वृक्ष प्राधिकरणाचे वृक्ष अधिकारी तथा सदस्य सचिव गणेश सोनूने उभे राहिले. परंतू, त्यांना समाधानकारक उत्तरे देता नाहीत. अपुऱ्या माहितीच्या आधारे माहिती देताना सोनूने यांची तारांबळ उडाली. त्यामुळे शेवटी स्वत: महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी उभे राहात नगरसेवकांच्या प्रश्नांना मी उत्तरे देतो असे सांगून नगरसेवकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.

धरणे भरून ओसंडून वाहिलीत पण गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद

0

पुणे: शहराला पाणी पुरवठा करणा-या पर्वती जलकेंद्र पंपींग, रॉ वॉटर पंपींग, वडगाव जलकेंद्र, एसएनडीटी-वारजे जलकेंद्र आणि होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युत व पंपींग विषयक व स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जाणार आहेत. यामुळे येत्या गुरुवार (दि.१९ )रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी देखील संपूर्ण शहरात उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद

पर्वती जलशुद्धीकरण केंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, पर्वती गाव, मुकुंदनगर, सहकारनगर, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे क्र ४२, ४६ कोंढवा खुर्द, पर्वती आणि पद्मावती टँकर भरणा केंद्र.

वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक. चतु:शृंगी, एसएनडीटी

वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, बावधन, बाणेर, चांदणी चौक, महात्मा सोसायटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरुगणेशनगर.

लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, येरवडा परिसर, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, मुंढवा, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, गोंधळेनगर, सातववाडी.

नवीन होळकर पंपिंग : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड परिसर.

राज्य सेवा परीक्षा-२०१७ व २०१८ मधील पात्र ५०६ उमेदवारांच्या नियुक्ती प्रस्तावास शासनाची मान्यता; प्रशिक्षण आदेश काढण्याची कार्यवाही सुरू

0

मुंबई: राज्य सेवा परीक्षा-2017 आणि 2018 मध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली असून या उमेदवारांना एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमअंतर्गत रुजू होण्याचे आदेश काढण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.

राज्य सेवा परीक्षा-2017 आणि राज्य सेवा परीक्षा 2018 मध्ये उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आज शासनाने माहिती दिली की, राज्य सेवा परीक्षा-2017 च्या निकालाच्या अनुषंगाने श्रीमती शिल्पा साहेबराव कदम यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात समांतर आरक्षणाशी संबंधित याचिका क्रमांक 6578/2018 केली होती. ही याचिका तसेच समांतर आरक्षणासंदर्भातील इतर याचिका यावरील विशेष सुनावणीअंती मुंबई उच्च न्यायालयाने दि. 8 ऑगस्ट 2019 रोजी अंतिम आदेश दिले.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा परीक्षा, 2017 साठी शिफारस करण्यात आलेल्या 377 उमेदवारांची सुधारित यादी 9 सप्टेंबर 2019 रोजी शासनास प्राप्त झाली. हे 377 उमेदवार आणि राज्य सेवा परीक्षा, 2018 अन्वये शिफारसप्राप्त 129 असे एकूण 506 उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार या सर्व उमेदवारांना एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) अंतर्गत रुजू होण्याचे आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

मराठवाड्यातील गावागावांपर्यंत पाणी पोहोचविणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

0

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण
औरंगाबाद : स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान, कारावास व त्यांनी सहन केलेल्या अनन्वित अत्याचारातून मराठवाडा निजामांच्या जोखडातून मुक्त झाला. आपल्याला यापुढे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करावयाचे आहे. त्यासाठी शासनाने मराठवाडा वॉटर ग्रीडसारखी महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक गावागावांपर्यंत पाणी पोहोचविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभाजवळ मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यानंतर जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेशात श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीचे सदस्य सचिव विष्णूपंत धाबेकर, आमदार सर्वश्री अंबादास दानवे, प्रशांत बंब, भाऊसाहेब चिकटगावकर, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त निपुण विनायक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कुमार सिंगल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आणि नुकतेच जम्मू काश्मीरमधील हटविलेले 370 कलम यातून स्वातंत्र्याची अनुभूती येते. मराठवाड्याच्या विकासाला अधिक चालना देण्याचे काम मागील पाच वर्षांपासून शासन करत आहे. सिंचन, रस्ते, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. आता शासनाने मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी संकल्प केलेला आहे. दुष्काळमुक्तीसाठी मराठवाड्यातील धरणे लूप पद्धतीने जोडून 64 हजार किलो मीटरच्या पाईपलाईनच्या माध्यमातून प्रत्येक गावात पाणी पोहोचविणार आहे. या कामाला सुरूवात झाली आहे. मराठवाड्यातील चार जिल्ह्यांच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. अजून चार जिल्ह्यांच्या निविदा प्रक्रिया लवकरच पूर्णत्वास येतील व वॉटर ग्रीड प्रकल्प पूर्ण होईल, अशी अपेक्षाही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.

त्याचबरोबर औरंगाबादचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने एक हजार 650 कोटी रुपयांच्या योजनेला नुकतीच मंजुरी दिली आहे. यामुळे आगामी 50 वर्षात औरंगाबादला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नसल्याचेही ते म्हणाले. मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी कोकणातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.

दुष्काळमुक्तीबरोबरच मराठवाड्यात उद्योग येऊन मराठवाड्याचा विकासाला अधिक चालना देण्यासाठी नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते डीएमआयसी टप्पा एकचे लोकार्पण करण्यात आले आहे. यातून मराठवाड्यातील औरंगाबाद-जालना उद्योगाचे मॅग्नेट आगामी काळात तयार होईल. त्यातून मराठवाड्यातील तरुणांच्या हाताला काम मिळेल, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. आगामी काळात मराठवाडा विकासाच्या दिशेने गतीने पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त करत मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना श्री. फडणवीस यांनी अभिवादन केले. तसेच जनतेला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सुरूवातीला स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून श्री. फडणवीस व मान्यवरांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर पोलीस दलाकडून बँड, बिगूल वाजवून व तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर श्री. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्री. फडणवीस यांनी स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे नातेवाईक यांची भेट घेऊन मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले.

महत्त्वाचे मुद्दे

शासनाची ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ महत्त्वाकांक्षी योजना

मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी संकल्प

  • मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून प्रत्येक गावाला पाणी मिळणार
  • DMIC च्या माध्यमातून रोजगार निर्मिती.
  • औरंगाबाद – जालना बनणार ‘उद्योगाचे मॅग्नेट’