Home Blog Page 2834

करारो समूह – करारो इंडिया-पुण्यात नव्या जागेत पायाभरणी

0

पुणे – करारो इंडियाच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले दोन दिवसीय सेलिब्रेशन, समूहाचे इटलीबाहेरचे पहिले हरित केंद्र आज बंद होईल. याप्रसंगी नव्या उत्पादन जागेची पायाभरणी करण्यात आली असून हे केंद्र सध्या रांजणगाव (पुणे) येथील केंद्राची जागा घेईल आणि त्यामुळे भारतीय कारखान्याला आपली क्षमता लक्षणीय प्रमाणात विकसित करणे शक्य होईल.

1400 कर्मचाऱ्यांना सामावून घेणाऱ्या या औद्योगिक केंद्राने उत्पादन सुरू केल्याची 20 वर्ष आज आपण साजरी करत आहोत. हा एक असामान्य आकडा असून, जर आपण विचार केला, तर सर्व इटालियन कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या करारो कर्मचाऱ्यांची संख्या सारखीच आहे, असे समूहाचे अध्यक्ष एन्रिको करारो आपल्या भाषणात म्हणाले – याचा अर्थ स्पष्ट आहे, की भारत हा आमच्या संपूर्ण समूहाच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचा संदर्भबिंदू आहे आणि राहील.

आज 17 टक्क्यांच्या हिश्श्यासह भारत हा आपल्या समूहासाठी पहिली महत्त्वाची बाजारपेठ आहे. सर्वोत्तम पातळीवर काम करण्याच्या आपल्या संस्कृतीमुळे करारो ब्रँड आपल्यासारख्या क्षेत्रातल्या सर्व महत्त्वाच्या कंपन्यांद्वारे ओळखला जातो व समूहाचा आदर केला जातो. करारो म्हणजे दर्जा, तंत्रज्ञान आणि विश्वासार्हता.

आजच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने पायाभरणीसह सुरू झालेल्या या उत्पादन जागेच्या विस्तारामुळे आम्हाला भारतीय बाजारपेठेसाठी खास डिझाइन करण्यात आलेल्या पोर्टल एक्सेलसारख्या नव्या उत्पादन श्रेणीसाठी क्षमता विस्तार करणे शक्य होईल, असेही एन्रिको करारो म्हणाले. स्थानिक आणि निर्यात बाजारपेठेसाठीचे आमचे कामकाज व सेवांच्या भविष्यकालीन विकासासाठी हा मूलभूत घटक आहे.

आज आपण ज्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भात काम करतो, ते अजिबात सोपे नाही याची जाणीव आपल्याला असलीच पाहिजे. विकासाचा निर्देशांक सातत्याने खाली घसरत आहे. आणि भारतासारख्या बाजारपेठेत, जिथे आम्हाला आतापर्यंत कायम उच्च समाधान मिळाले, तिथे शेती तसेच बांधकाम उपकरणे क्षेत्रात अवघड परिस्थिती दिसून येत आहे, असे एन्रिको करारो म्हणाले. मात्र, इतिहासाने आपल्याला शिकवले आहे, की अशाच परिस्थितीमध्ये भविष्यातल्या विकासाची पायाभरणी करायला हवी.

नवे उत्पादन केंद्र पाच हजार चौरस मीटर्सची जागा व्यापेल आणि ते 2021 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होईल असे अपेक्षित आहे. त्याअंतर्गत आधुनिक उत्पादन लाइन इन्स्टॉल केली जाईल, जी प्रामुख्याने 75 एचपीपर्यंतचे इंजिन असलेल्या छोट्या ट्रॅक्टर्ससाठी पोर्टल एक्सेल्स तयार करेल. या उत्पादनाला आधीपासूनच भारतीय शेती यंत्रणा उत्पादकांकाडून मान्यता मिळत आहे.

समांतरपणे या विस्तारामुळे अंतर्गत लॉजिस्टिक्सचा प्रभावी वापर होईल, कारण या जागेत आधुनिक पद्धतीने गोदामे बांधली जाणार आहेत. यामुळे ग्राहक सेवा उंचावेल आणि साठ्याच्या पातळीचे वेळेवर व्यवस्थापन शक्य होईल.

उत्पादन जागेच्या पुढील विस्तार प्रक्रियेचा हा केवळ एक तुकडा असेल, ज्यामुळे आजची श्रेणी नव्या उत्पादनांसह जास्त समृद्ध होईल व पर्यायाने तीन वर्षांत स्थानिक कामकाजामध्ये 50 टक्क्यांची वाढ होईल.

गेल्या 20 वर्षांत भारतीय कारखान्यामध्ये 100 दशलक्ष युरोपेक्षा जास्त गुंतवणूक. 2023 पर्यंत कामकाजाचे आधुनिकीकरण आणि स्थानिक कारखान्यांच्या विस्तारासाठी 20 दशलक्ष युरोंची गुंतवणूक करणे अपेक्षित.

करारो समूह – प्रोफाइल

करारो हा एक आंतरराष्ट्रीय समूह असून तो ऑफ- हायवे गाड्या आणि खास ट्रॅक्टर्ससाठी लागणाऱ्या ट्रान्समिशन यंत्रणा क्षेत्रात अग्रेसर आहे. 2018 मध्ये समूहाची एकत्रित उलाढाल 624 दशलक्ष युरोज होती.

समूहाचे कामकाज दोन व्यावसायिक शाखांमध्ये विभागण्यात आले आहे.

–    ड्राइव्ह यंत्रणा

–    करारो ड्राइव्ह टेक आणि एसआयएपी या उपकंपन्यांद्वारे समूह डिझाइन, उत्पादन आणि ट्रान्समिशन यंत्रणेच्या विक्री (अक्सेल्स, टान्समिशन्स आणि ड्राइव्ह) प्रामुख्याने शेती आणि बांधकाम उपकरणांसाठी केली जाते तसेच वाहन उद्योगापासून साहित् हाताळणी, शेती उपकरणे आणि बांधकाम उपकरणे यांसारख्या वैविध्यपूर्ण क्षेत्रांसाठी गियर्सच्या मोठ्या श्रेणीचे विपणन केले जाते.

–    ट्रॅक्टर्स

करारो अग्रीतालिया या उपकंपनीद्वारे ग्रुप खास प्रकारच्या ट्रॅक्टर्सचे (विनयार्ड्स आणि ऑर्किड्ससाठी 60 ते 100 एचपीपर्यंत) डिझाइन आणि उत्पादन करतो. जॉन डिअरे, मॅसे फर्ग्युसन आणि क्लास यांसारख्या थर्ड पार्टी ब्रँड्ससाठी हे उत्पादन केले जाते तसेच खास स्वतःच्या ब्रँडच्या श्रेणीसाठी अग्रीतालिया नाविन्यपूर्ण ट्रॅक्टर श्रेणीसाठी अभियांत्रिकी सेवा पुरवते.

समूहाची होल्डिंग कंपनी करारो एस. पी. ए. इटालियन शेअर बाजारात 1995 पासून (सीएआरआर. एमआय) नोंदली गेलेली असून तिचे मुख्यालय काम्पोदार्सेगो (पॉडा) येथे आहे. 30 जून 2019 रोजी समूहाची एकूण कर्मचारी संख्या 3196 असून त्यापैकी 1479 इटलीमध्ये – इटलीतील उत्पादन केंद्रांत (3), भारत (2), चीन, अर्जेंटिना आणि ब्राझील येथे कार्यरत आहेत.

अजित पवारांच्या आमदारकीच्या राजीनाम्याने राजकीय खळबळ

0

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. हा राजीनामा तातडीने मंजूर केल्याने अनेक तर्क वितर्क लढवण्यात येत आहेत. या घटनेनंतर अजित पवार यांनी त्यांचा फोन बंद ठेवल्याने याबाबतचे गुढ वाढले आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला.

ईडी कार्यालयाने आपण चौकशीसाठी येण्याची गरज नाही असे कळविल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तेथे जाण्याचा नियोजित कार्यक्रम रद्द करून पुण्यातील पावसाने आणि जिल्ह्यातील पुराने बाधित झालेल्यांचे अश्रु पुसण्यासाठी पुण्यात धाव घेतली. नेमक्‍या याच काळात राजिनाम्याचे हे वृत्त धडकल्याने त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा न करताच अजित पवार यांनी हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. पक्षांतर्गत कुरबुरी आणि शिखर बॅंक घोटाळ्यातील कथित सहभाग यावरून हा राजीनामा दिला असण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

बागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी विधीमंडळाच्या कार्यलयात माझ्या स्वीय सहाय्यकाकडे राजीनामा दिला. मला फोन करून राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली. राजीनामा पत्रात त्यांनी कोणतेही कारण दिलेले नाही, असे ते म्हणाले.

लेकटाऊन पासून आंबील ओढ्याच्या बाजूच्या अधिकृत,अनधिकृत सर्वच बांधकामांची चौकशी करणार -पालकमंत्री

0

पुणे- पूररेषेत झालेली बांधकामे मग ती परवानग्या दिलेली असो ,किंवा न दिलेली असो अशा सर्व बांधकामांची तसेच नाल्याच्या संरक्षक भिंतीचे अंतर आणि त्यांचा दर्जा याबाबत  चौकशी आचारसंहिता संपल्यावर करून पुराची कारणे आणि अहवाल पाहून योग्य ती कारवाई करण्यात येईल .मात्र अनपेक्षितपणे झालेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात ही परिस्थिती उद्भवली असली तरी प्रशासनाने ती व्यवस्थितपणे हाताळली आहे असा दावा आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे केला .

पुणे शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागातील घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज पुण्यात आले होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, भाजपा शहर अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ आदींची याप्रसंगी उपस्थित होती.
पुणे शहर आणि जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मनुष्यहानी आणि मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झाले आहे. शहरातील घटनास्थळाची पाहणी केली आहे. अनपेक्षितपणे झालेल्या परतीच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यात ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच, अशा घटनेच्या वेळी कोणीही राजकारण न करता एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच यावेळी ते म्हणाले की, पुणे शहरात अपेक्षे पेक्षा जास्त प्रमाणात परतीचा पाऊस झाल्याने बुधवारी रात्री मुसळधार पावसाला पुणेकरांना सामोरे जावे लागले. यात नाहक १४ जणांचा मृत्यू, तर ९ जण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. ९ बेपत्ता व्यक्तींचा युद्ध पातळीवर शोध घेण्याचे काम सुरू असून, मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक स्वरूपाची मदत नियमानुसार केली जाणार आहे. तसेच, सांगली आणि कोल्हापूर येथील परिस्थितीचे नियम देखील लागू करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. याबाबत लवकरच निवडणूक आयोग निर्णय जाहीर करेल असेही त्यांनी सांगितले.

टांगेवाला कॉलनी परिसरात काहींचे राजकारण
पुणे शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे टांगेवाला कॉलनी परिसरात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनास्थळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दुपारी भेट देण्यास गेले असता. तेथील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावर त्यांना विचारले असता ते म्हणाले की, ज्यांना याबाबत राजकारण करायचे आहे. त्यांना करू द्या, मी तिथे जाऊन. तेथील स्थानिक रहिवाशांशी बोललो आहे. त्या सर्वांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. साधारण अर्ध्या तासानंतर बाहेरील काही २० ते २५ नागरिक येऊन गोंधळ करण्याचा प्रकार केला आहे. असे स्पष्टीकरण त्यावर त्यांनी दिले.

अतिवृष्‍टीमुळे बाधित ठिकाणांची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली पाहणी

0

पुणे:गेल्या 25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित खेड- शिवापूर तसेच सुखसागर नगर, इंदिरा नगर, बिबवेवाडी, ट्रेझर पार्क, टांगेवाले कॉलनी, मित्रमंडळ, दत्तवाडी  येथील आपत्तीग्रस्त ठिकाणांची जिल्हाधिकारी नवल किशोर राम  यांनी पाहणी करून आपत्ती ग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली.  यावेळी अभयसिंह कोंडे,सागर धोंडे,संतोष कोंडे, भाऊसाहेब शिंदे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

‘विश्‍वगान सम्राज्ञी भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर विश्‍वशांती संगीत अध्यासना’ची स्थापना

0

पुणे- विश्‍वगान सम्राज्ञी भारतरत्न श्रीमती लता मंगेशकरजी यांच्या ९१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून व त्यांनी आयुष्यभर केलेल्या अलौकिक अशा संगीत साधनेचा व संगीत सेवेचा उचित गौरव म्हणून त्यांच्या नावाने, माईर्स एमआयटीच्या विश्‍वशांती संगीत कला अकादमीतर्फे ‘विश्‍वगान सम्राज्ञी भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर विश्‍वशांती संगीत अध्यासना’ची स्थापना करण्यात आल्याचे आज संस्थेद्वारे जाहीर करण्यात आले.

संगीताच्या साधनेतून ईश्‍वरदर्शन व शांतरसाची अनुभूती देणार्‍या भारतीय शास्त्रीय व सुगम संगीताचा प्रचार व प्रसार संपूर्ण जगभर व्हावा, या उद्देशाने सदरील अध्यासनाची स्थापना करण्यात आली आहे. या अध्यासना अंतर्गत संगीताच्या क्षेत्रात शिक्षण घेणार्‍या गरीब, होतकरू, गुणवंत तसेच संशोधन करणारे एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी यांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.

आदरणीय भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर या विश्‍वशांती संगीत कला अकादमीच्या स्थापनेपासून अध्यक्ष असून त्यांचे बहुमोल मार्गदर्शन संस्थेला सतत लाभत आले आहे. भारतीय संगीत सृष्टी सर्वार्थाने समृध्द करणार्‍या लतादीदी यांना दीघायुष्य लाभो, अशा शुभेच्छाही एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी यावेळी व्यक्त केल्या.

भुजबळांना अटक केली तेव्हा हे आंदोलनाचे ‘इव्हेंट ‘का केले नाहीत ? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल

0

पुणे-राष्ट्रवादीची आंदोलने म्हणजे हे इव्हेंट आहेत. छगन भुजबळांना अटक केली तेव्हा असले इव्हेंट राष्ट्रवादीने का केले नाहीत ? असा सवाल करत शरद पवारांच्यावरील इडी च्या कारवाईत सरकारचा कुठलाही हाथ नाही असा दावा करत खरे तर हा शिखर बँक घोटाळा आणि त्याची चौकशी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच लावली होती आणि न्यायालयाच्या आदेशानुसारच यांसंदर्भात कारवाई होते आहे . इडी हि स्वायत्त संस्था असून त्यात सरकारचा हस्तक्षेप होत नसूनजर याबाबत शरद पवार यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी कोर्टात जावे असा सल्ला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिला आहे  … पहा आणि ऐका नेमके चंद्रकांत दादा यांनी काय म्हटले आहे …

पोलीस आयुक्तांच्या विंनती नंतर ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास स्थगित : शरद पवार

0

मुंबई-महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात शुक्रवारी स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले होते. यानंतर आज त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊ नये यासाठी मनधारणी करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी त्यांची भेट घेतली होती.त्यानंतर खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकंडून कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले होते. याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली होती. दुपारी पावणे दोनच्या सुमारास खुद्द शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय स्थगित केल्याची माहिती दिली.

तूर्तास कोणत्याही चौकशीची सध्या गरज नसून आवश्यकता असल्यास चौकशीसाठी बोलवण्यात येईल, असा ईमेल ईडीकडून शरद पवार यांना पाठवण्यात आला होता. तसंच त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊ नये यासाठी मनधारणी करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही वेळाने शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपण तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केला असल्याची माहिती दिली. तसंच यानंतर आपण पुण्यात पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे ते म्हणाले.

‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर गर्दी करू नका : पवार
“पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानुसार, मी शुक्रवारी दुपारी २ वाजता ‘ईडी’ कार्यालयात उपस्थित राहणार आहे. मात्र, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांनी या कार्यालयाबाहेर उपस्थित राहू नये,” असे आवाहन शरद पवार यांनी गुरुवारी ट्विटद्वारे केले होते. राज्यघटना आणि संस्थांचा आदर करण्याची आपली परंपरा कायम राखत पोलीस आणि शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे, असेही पवारांनी म्हटले होते.

निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांवर सुडबुद्धीने कारवाई; राहुल गांधींचा हल्लाबोल

0

मुंबई – शिखर बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी ईडीच्या मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार आहेत. याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी शरद पवारांच्या समर्थनार्थ आले असून आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना सत्ताधाऱ्यांनी लक्ष केल्याचे मत मांडले.

ही कारवाई म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय संधीवादाची पुनरावृत्ती – राहुल गांधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थनार्थ आले आहेत. राहुल गांधी म्हणाले की, सरकारकडून लक्ष्य केलेले शरद पवार हे विरोधी पक्षाचे नवे नेते आहेत. अशी कारवाई निवडणुकीच्या एक महिन्यापूर्वी महाराष्ट्रातील राजकीय संधीवादाची पुनरावृत्ती असल्याचे राहुल गांधींनी ट्वीट केले. आज शरद पवार यांच्याबरोबर ईडीच्या चौकशीला विरोध वाढत आहे. निषेधाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयाभोवती कार्यकर्ते दाखल होऊ शकतात. यामुळे या परिसरात 144 कलमान्वये जमावबंदी लागू करण्यात आले आहे.

इतिहास, संस्कृती, परंपरा जपा : उपराष्ट्रपती

0

पुणे : इतिहास शिवाजी महाराज, बसववेश्वर, राणी लक्ष्मीबाई, रामानुजाचार्य…यांचा आदर्श घेत त्यासाठी इतिहास, परंपरा, संस्कृती जपून आपला पाया बळकट केला पाहिजे. त्यातून एकात्मता वाढत राहील. पुढील पिढी बळकट होईल. ‘इन्फर्मेशन विदाऊट कन्फर्मेशन इज अॅम्युनेशन’ असे म्हणत भारत विश्व गुरू आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी केले.

पुण्यभूषण फाऊंडेशन'(त्रिदल पुणे)च्या वतीने दिला जाणारा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ २०१९ ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांना बालगंधर्व रंगमंदिरात प्रदान करण्यात आला. यावेळी उपराष्ट्रपती बोलत होते. व्यासपीठावर डॉ. शां.

ब. मुजुमदार, चंदू बोर्डे, डॉ. प्रभा अत्रे, डॉ. के. एच संचेती उपस्थित होते.

उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, पुणे हे ऐतिहासिक, सुंदर शहर आहे. पुणे सांस्कृतिक केंद्र आहे. पुणे हे समता आणि स्वातंत्र्य लढ्याचे केंद्र राहिले आहे, असे सांगून उपराष्ट्रपतींनी इतिहासातील महनीय पुणेकरांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. सेवा वृत्तीचा, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्याचा हा सोहळा महत्वपूर्ण आहे. पुण्यभूषण पुरस्कार प्राप्त प्रत्येक पुणेकरांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे.

पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी असून मोठा वारसा लाभला आहे. भविष्यातील पिढीला पुरातत्वबाबत माहिती असायला हवी, यासाठी त्याची जपणूक करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. आज देशातील ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षाखालील आहे. जगातील मोठ्या आणि नामवंत संस्था देशाकडे तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून पाहत आहे. यासाठी आपापसांतील हेवेदावे, मतभेद विसरून एक देश, एक व्यक्ती हीच आपली पद्धत असायला हवी. विविधतेत एकता असलेला भारत देशाचा प्रत्येकाला भारतीय असल्याचा गर्व असायला हवा.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘मराठवाडयातून आलेल्या माझ्यासारख्याला पुण्यभूषण पुरस्कार मिळाल्याने पुरस्काराचे कार्यक्षेत्र वाढल्याचा आनंद आहे. ज्ञानाची मशागत व्यासंगाने करीत राहिले पाहिजे. नवा इतिहास प्राचीन गोष्टी पुढे आणण्याचा आमचा प्रयत्न असतो.’ मातीत जन्मती, मातीत मरशी, या उक्तीला जोडून मातीत उत्खननास जुळशी ‘ अशी ओळ मला जोडावीशी वाटते. भारतीय संस्कृतीत मंदिर स्थापत्य, मूर्तिशास्त्राला महत्त्व असते. मंदिर ही सामाजिक व्यवस्था आहे.’

पुरस्काराचे यंदाचे ३१ वे वर्ष होते. डॉ. देगलूरकर यांच्यासह वीरमाता लता नायर, मोहम्मद चांदभाई शेख, नाईक फुलसिंग, हवालदार गोविंद बिरादार यांचा देखील पुण्यभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. डॉ. प्रभा अत्रे यांनी आभार मानले.

पुर आला तिथे दुरुस्ती- पिण्याच्या पाण्याचे होतेय वांधे…

0

पुणे : पावसामुळे महापालिकेच्या पद्मावती जलकेंद्रात पाणी शिरले असून, त्यामुळे या केंद्रातील आठ पंप जळाले आहेत. तसेच, दांडेकर पूल, कात्रज (राजीव गांध प्राणिसंग्रहालय) सिंहगड रस्ता (सनसिटी) आणि येवलेवाडीतील नाल्यांवरून टाकलेल्या जलवाहिन्याही वाहून गेल्या आहेत. त्यामुळे पद्मावती जलकेंद्रातर्गंत होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असून, त्याच्या दुरुस्तीचे काम पुढील तीन दिवस सुरू राहणार आहे. तसेच, वाहून गेलेल्या जलवाहिन्यांची कामे होती घेतली असली तरी त्यातून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी (27 सप्टेंबर) सकाळी बंद राहणार आहे.कात्रज आणि येवलेवाडीतील कामे शुक्रवारी (27 सप्टेंबर) दुपारपर्यंत पूर्ण होतील, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले. तर, विविध भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी कात्रज, येवलेवाडी, दांडेकर पूल आणि सनसिटी येथील ओढ्या-नाल्यांवरून वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. पावसामुळे नाल्यांत पाणी पाणी आल्याने त्या वाहून गेल्या. तर पद्मावती जलकेंद्रात प्रचंड पाणी साचल्याने तेथील आठ पंप जळाले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या जलकेंद्राच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, ते लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असेही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

या भागांतील पाणीपुरवठा बंद (पद्मावती जलकेंद्र) : बिबवेवाडी टाकी : बिबवेवाडी-कोंढवा रस्ता, गंगधाम, बिबवेवाडी गावठाण, माकर्केटयार्ड, गुलकटेकडी, इंदिरानगर झोपडपट्‌टी, डायस प्लॉट, महर्षीनगर अंशत:, न्यू इरा सोसायटी, बुराणी कॉलनी, पीएमपी कॉलनी, संदेशनगर, विद्यासागर कॉलनी, सोपान महाराज, बिबवेवाडी कोठारी ब्लॉक, बिबवेवाडी ओटा, लोअर इंदिरानगर, वसंतबाग, पारिजात, अतनिकेत सोसायटी, प्रेमनगर सोसायटी, आंबेडकरनगर परिसर.
तळजाई गोल : पद्मावती परिसर, संभाजीनगर, चव्हाणनगर, तळजाई वसाहत, अहिल्यादेशी चौक, के के. मार्केट, लोअर इंदिरानगर, अप्पर इंदिरानगर, अप्पर-सुपर, लेक टाऊन, बालाजीनगर, गुलाबनगर परिसर, इत्यादी.
सेमिनरी टाकी : वर्धमानपुरा, स्वयंभू सोसायटी, पापळवस्ती,पोकळेवस्ती, शिवतेजनगर, महेश सोसायटी, मिठानगर, शिवनेरीनगर, अप्पर-सुपर, कोंढवा खुर्द, साईबाबानगर,भाग्योदयगर,
दांडेकर पूल वाहिन्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणारा भाग : शास्त्री रस्ता परिसर, लोकमान्य कॉलनी, नवी पेठ परिसर, लोकमान्य टिळक चौक (अलका टॉकीज), पूना हॉस्पिटल, राजेंद्र नगर, वैकुंठ, डेक्कन, पुलाची वाडी,प्रभात रस्त्यावरील सर्व गल्ली,

टँकरने होणार पाणीपुरवठा
दरम्यान, पद्मावती जलकेंद्राच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद होणार असल्याने या केंद्रातून पुरवठा होणाऱ्या भागांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी जलकेंद्रातून टॅंकर सोडण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, लोकांना पाणी कमी पडू देणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे

अतिवृष्टीमुळे 5 तालुक्यातील शाळा, महाविद्यालये यांना उद्या 27 सप्टेंबर रोजी सुट्टी

0

– जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे, दि.26 : 25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये याकरिता पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या पाच तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उद्या शुक्रवार दि. 27 सप्टेंबर, 2019 रोजी सुट्टी घोषित केली आहे.

भाजप १४४, शिवसेना १२६ आणि इतर १८ जागांवर एकमत -रविवारी युतीची अधिकृत घोषणा

0

नवी दिल्ली: जागा वाटपावरून निर्माण झालेली शिवसेना-भाजप युतीची कोंडी अखेर फुटली असल्याचं वृत्त आहे. नव्या फॉर्म्युल्यानुसार भाजप १४४, शिवसेना १२६ आणि इतर १८ जागांवर लढणार असल्याचं आज झालेल्या भाजपच्या बैठकीत नक्की झाल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं. मात्र त्याला अद्याप कुणी दुजोरा दिलेला नाही.दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू आहे. गेल्या नऊ तासांपासून सुरू असलेल्या या बैठकीत शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत सोबत घेण्याचं नक्की झालं असून सेनेला १२६ जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर भाजपने १४४ जागांवर लढण्याचं ठरलं असून रिपाइं, रासप, शिवसंग्राम आणि रयत क्रांती सेनेला मिळून १८ जागा सोडण्यावरही या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. मात्र सध्या पितृपक्ष सुरू असल्याने रविवारी युतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

मुख्यमंत्री, पालकमंत्री जागावाटपाच्या बैठकीसाठी दिल्लीत व्यस्त’

0

पुणे – शहर आणि परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक ठिकाणी एनडीआरएफचे जवान लोकांना वाचविण्याचे प्रयत्न करत आहेत. पुण्यात इतकी भयंकर स्थिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री दिल्लीला युतीच्या बैठकीसाठी गेलेले आहेत. सरकारला पूरस्थितीचं गांभीर्य नाही अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.

पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, या सरकारचा कारभार रामभरोसे चालला आहे. लोकांच्या प्रश्नांची यांना काही देणंघेणं नाही. पुण्यात पूरामुळे माणसं मेली तरी भाजपाचे मंत्री निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. कोल्हापूर-सांगली येथे पूर आला होता त्यावेळी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत मग्न होते तर आता पुण्यात पूर आलेला असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे दिल्लीला युतीच्या जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी गेले आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

तसेच पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी घटनास्थळी असणं गरजेचे होते. मात्र निवडणूक महत्वाची असल्याने जनतेकडे दुर्लक्ष केलं जात आहे. सरकारला जनतेचं कोणतंही सोयरसुतक नाही अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी रात्री शहरात झालेल्या पावसाने उच्चांक गाठला. रात्री 8 च्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. शहरातील सर्वच भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरात अतिवृष्टी होत असल्याने तसेच आपत्कालीन परिस्तिथी निर्माण झाली असल्याने पुणे जिह्यातील 5 तालुक्यांच्या शाळांना आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.

तर प्रचंड पावसामुळे आंबील ओढ्याला आलेल्या पुरात अरण्येश्वर येथील टांगेवाले कॉलनीमधील दहा जणांचा मृत्यू झाला. यातील पाच मृतदेह मिळून आले असून, अन्य मृतदेहांचा शोध घेण्याचे काम एनडीआरएफच्या तीन पथकांकडून सुरू होते. टांगेवाले कॉलनी ही टांगे चालवणाऱ्यांची कॉलनी आहे. ही कॉलनी नेमकी नाल्याला खेटून आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यावर नाल्याचे पाणी वाढले. अक्षरशः रौद्र रूपाने वाहणारे पाणी कॉलनीतील घरांमध्ये घुसले. भिंती खचल्याने येथील काही घरे पडली. अंगावर भिंती पडल्याने काही जणांच्या मृत्यू झाला. तर काही जण प्रवाहासोबत वाहून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले.

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरात मृत्यू झालेल्यांप्रती ट्विटरवरुन दु:खं व्यक्त केलं आहे. राज्य सरकार संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. पुणे आणि बारामतीला एनडीआरएफ टीम रवाना केल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

रात्रीच्या पुरात 14 जण दगावले,9 बेपत्ता,आज रात्रीही पावसाचा इशारा

0

पुणे, दि. 26: पुणे शहरासह जिल्ह्यातील 5 तालुक्यांना काल रात्री जोरदार  पावसाचा फटका बसला. शहरासह ग्रामीण परिसरातील सखल भागातील घरात पाणी शिरले. नदी-नाल्यांना पूर आले. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 14 जण दगावले असून 9 जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून बचाव व मदतीसाठी एनडीआरएफची 5 पथके कार्यरत आहेत. प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल,अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, यावर्षी 22 वर्षानंतर प्रथमच ऑगस्ट महिन्यात धरणे भरली. काल रात्रीचा पाऊस मात्र खूपच होता. यावर्षी जिल्ह्यात सरासरी 180 टक्के पाऊस झाला आहे. कालच्‍या पावसामुळे जिल्ह्यात 14 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पुणे शहरातील 6, हवेली तालुक्यातील 6, पुरंदर तालुक्यातील 2 जणांचा समावेश आहे.
या पावसाचा फटका जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांना बसला आहे. पाच तालुक्यातील 59 गावे बाधित झाली आहेत. नाझरे धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कऱ्हा नदीच्या पात्रात 85 हजार क्युसेक पाणी वाहत होते. या कऱ्हा नदीच्या पाण्यामुळे बारामती शहराला फटका बसला. दक्षतेचा उपाय म्हणून बारामती शहरात 38 निवारा शिबिरांची उभारणी करण्यात आली आहे. या शिबिरात 2 हजार 500 नागरीकांना स्थलांतरीत करण्यात आले. तर पुणे शहरातील 3 हजार नागरिकांना काही काळासाठी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले. जिल्ह्यातील 1 हजार 1 कुटुंबांतील ३ हजार 65 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात दरड कोसळून 5 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून या रस्त्यांवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. जिल्ह्यात 5 एनडीआरएफच्या टिम तैनात करण्यात आल्या असून 275 जवान मदत कार्य करत आहेत. त्यापैकी बारामती तालुक्यात एनडीआरएफच्या दोन टीम कार्यरत आहेत. या आपत्कालिन स्थितीची माहिती निवडणूक आयोगाला कळवून त्यांच्या सूचनांनुसार प्रशासनाच्यावतीने बाधित नागरिकांना मदत देण्यात येणार आहे. आचार संहितेचा कोणताही अडसर मदत व बचाव कार्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

सर्वधर्मियांनी दिला अहिंसा, शाकाहाराचा नारा

0
रांची ते श्री सम्मेद शिखर ‘अहिंसा यात्रा’; डॉ. कल्याण गंगवाल यांचा विशेष सन्मान
पुणे : अहिंसा, शाकाहार आणि व्यसनमुक्तीबाबत जनजगृती करण्यासाठी झारखंडची राजधानी रांची ते श्री शिखर सम्मेद (पारसनाथ) या अहिंसा यात्रेला सर्वधर्मियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हजारो नागरिकांनी रस्त्यांवरून चालत अहिंसा, शाकाहाराचा नारा दिला. १७ ते २२ सप्टेंबर या कालावधीत ही यात्रा निघालेल्या या अहिंसा यात्रेचे नेतृत्व पुण्यातील सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल व छत्तीसगडच्या पवन जैन यांनी केले. जीवदया, शाकाहार, नशाबंदी, गो-संरक्षण, पर्यावरण रक्षणासाठी समाजात जागृती करण्याच्या उद्देशाने ही यात्रा निघाली.
या यात्रेदरम्यान, जीवदया, शाकाहार, अहिंसा आणि व्यसनमुक्तीसाठी गेली ४० वर्षे कार्यरत असलेल्या डॉ. कल्याण गंगवाल यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘अहिंसा राष्ट्रगौरव पुरस्कार’ आणि ‘पार्श्वरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. दोन्ही पुरस्काराची रक्कम डॉ. गंगवाल यांनी येथील आदिवासी समाजाच्या विकासासाठी परत केली. हा सोहळा धुबन पारसनाथ येथील गुणायतनच्या परिसरात झाला. यावेळी अखिल भारतीय श्री दिगंबर महासमितीचे अध्यक्ष मणिंद्र जैन, तीर्थरक्षा कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र गोधा, पारसनाथ इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे पदाधिकारी व शिखर संस्कारचे अध्यक्ष एम. पी. अजमेरा, मुंबईचे उद्योगपती प्रभात जैन, कोटा राजस्थानचे उद्योगपती नेमाकाका उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुनिश्री प. पू. १०८ कुंथूसागरजी महाराज, सिद्धांतसागरजी यांचे मंगल सानिध्य लाभले. गुणायतन परिसरात झालेल्या कार्यक्रमात राज्याचे पर्यटन, सांस्कृतिक व क्रीडामंत्री अमर बाऊरी यांच्या हस्ते ‘अहिंसा राष्ट्रगौरव पुरस्कार’ आणि ‘पार्श्वरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यावेळी मंत्री बाऊरी यांनी डॉ. कल्याण गंगवाल यांनी केलेल्या प्रबोधनानंतर आजन्म शाकाहारी व व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प घेतला. त्याचबरोबर श्री सम्मेद शिखरला अहिंसा क्षेत्र घोषित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या यात्रेमध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला. महिला, पुरुष, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. गाणी, पथनाट्य, भजन आदींच्या माध्यमातून जागृती करण्यात आली. झारखंडमधील सामाजिक संस्था, राजकीय नेते व कर्यकर्तेही यामध्ये सहभागी झाले होते. या अहिंसा यात्रेला संत शिरोमणी आचार्य १०८ विद्यासागरजी महामुनीराज व प्रखर वक्ता प. पू. १०८ मुनी प्रमाणसागरजी यांचे आशीर्वचन लाभले होते.