Home Blog Page 2830

महापौर सज्ज आमदारकीसाठी …

0

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार मुक्ता शैलेश टिळक यांनी आज  उमेदवारी अर्ज दाखल केला.कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे टिळक यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून समाजातील विविध घटकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचीच प्रचिती आज अर्ज भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीवेळी आली. पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपतीच्या दर्शनानंतर या रॅलीस प्रारंभ झाला.तत्पूर्वी, टिळक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. या रॅलीमध्ये खासदार गिरीश बापट,सुहास कुलकर्णी , नगरसेवक हेमंत रासने, धीरज घाटे, अजय खेडेकर, आरती कोंढरे, राजेश येनपुरे, अर्चना पाटील, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

शक्तीप्रदर्शन करत सुनील कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0

पुणे -भाजपा-शिवसेना ,रिपाई ,शिवसंग्राम,रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार ,स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी आपल्या हजारो कार्यकर्तासह कँटोंमेनट विधानसभा मतदार संघातून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केला .
सुनील कांबळे यांच्या सोबत माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे ,नगरसेवक उमेश गायकवाड,राजेन्द्र शिळीमकर , मनीषा लडकत ,नगरसेविका मंगला मंत्री ,रिपाई चे माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे कॅन्टोन्मेंट बोर्डमधील नगरसेवक यासह हजारो समर्थक या पदयात्रेत सहभागी होते.ही पदयात्रा भवानी पेठ ,कौरटर गेट ,नरपतिरी चौक या मार्गे जाताना पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण कऱण्यात आला .त्यानंतर  1 वाजता सुनील कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला .

सप्तसूरांनी रंगला ‘सूर नवा, ध्यास नवा’

0

पुणे : ‘लंबी जुदाई, चार दिनोका प्यार ओ रब्बा’, ‘टिक टिक वाजते डोक्यात’, ‘मोरया मोरया’, ‘खेळ मांडला’ अशा नवीन आणि जुन्या गाण्याचे अप्रतिम सादरीकरण करित नवोदित गायक आणि वादकांनी ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमात रंग भरला. पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फौंडेशनतर्फे आयोजित २५ व्या पुणे नवरात्र महोत्सवात युवा गायक आणि कलाकारांनी मनिषा निश्चल महक प्रस्तुत ‘लव्ह यु जिंदगी’मधून सप्तसुरांची बरसात केली. महोत्सवाचे संयोजक आबा बागूल, जयश्री बागूल, घनःश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल, विकी खन्ना यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

शरयू दाते यांनी महात्मा गांधी यांच्या ‘वैष्ण जन तो, तेने कहिये’ या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. ‘देदी हमे आझादी बिना खडग बिना ढाल’ या गाण्याने गायकांनी महात्मा गांधी यांच्या कार्याला सलाम केला. नटरंग चित्रपटातील ‘खेळ मांडला’ हे गाणे आणि संघर्षयात्रा या चित्रपटातील पोवाडयाने कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. मनिषा निश्चल यांनी ‘लंबी जुदाई’ या गाण्याने जुन्या काळाला उजाळा दिला. ‘कधी तू रिमझिम झरणारी बससात’, ‘मितवा’ या गाण्यांवर रसिकांना गायकांनी ताल धरायला लावला तर ‘दिलबर दिलबर’, ‘मला वेड लागले प्रेमाचे’ आणि ‘टिक टिक वाजते डोक्यात’ या गाण्यांना रसिकांनी ‘वन्स मोअर’ देत टाळया आणि शिटयांच्या रुपात भरभरुन दाद दिली.

कार्यक्रमाचे निर्माते मनिषा निश्चल आणि निश्चल लताड यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रशांत क्षीरसागर, कुणाल जाधव, शब्बीर भाई, अ‍ॅड चंद्रशेखर पिंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. अनिरुध्द जोशी, शरयू दाते, जितंद्र तुपे, जयदीप बागवाडकर, मनिषा निश्चल यांच्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. अमृता केदार, विशाल थेलकर, लिजेश शशीधरन, निलेश देशपांडे, रोहन वनगे, विशाल गंडतवार, ऋतूराज कोरे यांनी साथसंगत केली. पायत गीत आणि दिपक सक्सेना यांच्या निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली.

जगातून असमानता आणि भेदभाव नष्ट व्हावा -केरळचे राज्यपाल डॉ. अरिफ मोहम्मद खान

0

पुणे :- जगातून धर्मांधता, अस्पृश्यतेची भावना, पंथ भेद, स्वधर्म अहंकार नष्ट होऊन, बंधूभाव निर्माण व्हावा हीच खरी ईश्वरीय अनुभूती आहे. कोठेही हाहा:कार माजू नये. वाईट मनोवृत्तीचे निर्मूलन व्हावे. भेदभावाच्या पलीकडे जाऊन सर्वधर्मसमभावाच्या आणि आधुनिक मूल्यांची जोपासना करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल डॉ. अरिफ मोहम्मद खान यांनी केले.

विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, एमआइटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटी आणि एमआयटी आर्ट, डिजाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्यातर्फे काश्मीर येथील थोर विचारवंत आणि माजी केंद्रिय मंत्री पद्मविभूषण डॉ. करण सिंग यांना ‘तत्वज्ञ संत ज्ञानेश्वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्ञानेश्वर माऊली यांची सुवर्ण जडीत प्रतिमा, सुवर्ण पदक, सन्मानपत्र आणि सव्वा पाच लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी जगप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, जेष्ठ पत्रकार डॉ. वेद प्रकाश वैदिक, आत्मसंतुलन व्हिलेजचे सदगुरू डॉ. बालाजी तांबे, शिक्षणतज्ञ रितू सिंग, स्वामी चिदानंद सरस्वती, डिव्हाईन शक्ति फाउडेशनच्या साध्वी भगवती सरस्वती, डॉ. राजीव शारदा, आयसीसीटीच्या डॉ. आनामिक वडेरा, एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी डब्ल्युपीयुचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी युनिवर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. एस. परशूरामन व एमआयटी एडीटी युनिवर्सिटीचे कुलगुरू डॉ. सुनील राय हे उपस्थित होते.

डॉ. अरिफ मोहम्मद खान म्हणाले, भारताला प्राचीन संस्कृती आहे. आज जगात सर्वात युवा देश म्हणून देशाची ओळख आहे. आध्यात्मिक अध्यासन आणि ईश्वरी तत्वज्ञानाचे आचरणातूनच शिक्षण मिळेल. भारत हा ऋषीमुनिंचा देश म्हणून ओळखला जातो. येथील ऋषीमुनींनी केवळ भौतिक बाबींचे अध्ययन केले नसून त्यांनी आंतरिक मनाच्या ज्ञानाचे अध्ययन केले आणि शिकवले. ईश्वरीय अनुभूती प्रत्येक जीवाबरोबर असते, त्याला विद्यावान म्हणतात. प्रत्येक व्यक्तिची मदत करणे, सर्वांचा आदारसन्मान राखने आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करने हीच ईश्वरीय अनुभूतीची प्राप्ती आहे. श्री रामाने लक्ष्मणला वनवासाला जाताना शिक्षण दिले होते की, आमचा केवळ आत्मा आहे, शरीर नाही. ऋषीमुनींयांनी भारतीय संस्कृतीला जतन केले आहे. ज्ञान आणि शिक्षण महत्वाचे आहे.
डॉ. करणसिंग म्हणाले, भगवद् गीतेच्या माध्यमातून जगाला शाश्वत विकास आणि आध्यात्माचे ज्ञान दिले गेले. गीता हे संघर्षशास्त्र आहे. गुरू आणि शिष्याचे नाते हे भारतीय शास्त्र शिकवतात. मित्रत्वासाठी कोणत्याही प्रकारचे अडथळे नसावे. चांगले कर्म करत असताना ते ईश्वर चरणी ठेऊन समर्पित भावनेने करत राहवे. तुम्ही काहीही चुकीचे केले, तर त्याचे परिणाम भोगावे लागतात. ज्ञानाने आणि भक्तीने कर्मयोगी, धर्मयोगी आणि राजयोगी व्हावे. यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करावे. विद्या, धन, राजकारण, मोहमाया यापासून परावृत्त व्हावे, असे वाटत असेल तर ईश्वरभक्तीत लीन व्हावे. सध्याच्या सोशल माध्यामातील गोंगाटामुळे आत्मिक विचार ऐकू येत नाही.

डॉ. विजय भटकर म्हणाले, चांगल्या विचारांना आत्मसात करण्याची आणि ते अंमलात आणण्याची गरज आहे. मानवता कल्याण हेच विश्वशांतीचे तत्वज्ञान असावे.

डॉ. बालाजी तांबे म्हणाले, विज्ञान, तत्वज्ञान आणि धर्म एकमेकांच्या हातात हात घालून काम करत आहेत. यांच्यातील संबंधामुळे मानवतेसाठी कल्याणाची काम होत आहे. मानवतेला युद्धाची गरज नसून विश्वशांतीची आवश्यकता आहे. शांती ही विकासाचे आणि आत्मसमाधानाचे प्रतिक आहे.

डॉ. साध्वी भगवती सरस्वती म्हणाल्या, भारताला देवाचे वरदान मिळाले आहे. अमेरिकेतील एमआयटीत केवळ तंत्रज्ञान शिकवले जाते. येथील एमआयटीत तंत्रज्ञानासोबत जीवन जगण्याचे तत्वज्ञान शिकवले जाते. शिक्षण संस्थांमधून विज्ञान आणि तत्वज्ञानाचे शिक्षण घ्यावे, मात्र जीवनात आध्यात्माला ही विशेष स्थान द्यावे. आध्यात्म योग्य दिशा दाखवू शकते. आध्यात्म हेच खरे ज्ञान आहे.

स्वामी चिंदानंद सरस्वती म्हणाले, या सर्वात मोठ्या घुमटातून जगाला विश्वशांतीची प्रेरणा दिली जाईल. तुकड्या तुकड्यामध्ये जगण्यापेक्षा शांतीसाठी एकत्र येण्याची गरज आहे. आध्यात्माचा अर्थ केवळ माळांचा जप नसून यात सर्वांना एकात्मतेत गुंफण्याची गरज आहे.

विश्वनाथ कराड म्हणाले, विश्वशांती आणि मानवता कल्याणासाठीचा संदेश या तीन दिवसीय वर्ल्ड पार्लमेंटच्या माध्यमातून दिला जाईल. भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि परंपरेचे दर्शन जगाला देण्याचे कार्य यातून होत आहे. २१ व्या शतकात भारत हा ज्ञानाचे दालन म्हणून जगासमोर येईल.

मंगेश कराड प्रस्ताविकात म्हणाले, संतांनी भारतीय संस्कृती आणि परंपराचे जतन केले. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी मानवी कल्याणाचे काम केले. जगात विश्वशांती नांदावी आणि युद्धापासून परावृत्त करावे यासाठी संत, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ यांनी विचार मांडले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस. परशुरामन यांनी आभार मानले.

अभिनेत्री स्मिता तांबेने केली मढ समुद्रकिना-याची सफाई

0

मराठी-हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सशक्त अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री स्मिता तांबे आपल्या सामाजिक जाणिवांविषयी सजग आहे. नुकतीच ती ‘कोस्टल बीच क्लिनिंग’मध्ये सक्रिय सहभाग घेताना दिसली.

स्मिता तांबे म्हणते, “मी मढला राहते. आणि मढ बीचला मॉर्निंग वॉकला येताना इथे असलेलं प्लॅस्टिकचं साम्राज्य आणि अस्वच्छ होत चाललेला समुद्रकिनारा याने धड चालताही येत नसल्याची जाणीव होत होती. जरी पालिकेचे कर्मचारी तो कचरा उचलण्यासाठी येत असले, तरीही हा कचरा इतक्या महिन्यांचा किंवा वर्षाचा आहे, की ह्याला जास्त हातांची गरज आहे, हे लक्षात आलं. आणि मग बीच क्लिनिंगमध्ये मी सहभाग घेतला.”

स्मिता पूढे म्हणाली, “सण-वार आले की आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो. पण आपल्या घराच्या बाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठीही आपले हात पूढे सरसावण्याची गरज आहे. ब-याचदा गणपतीविसर्जनानंतर अनेकजण समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी सरसावतात. पण मुंबईच्या समुद्रकिना-यावर असलेलं प्लॅस्टिकचं साम्राज्य पाहता, समुद्रकिनारा अधुमधून स्वच्छ होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.”

वडगावशेरी मधून भाजप सेनेचे जगदीश मुळीक यांनी भरला उमेदवारी अर्ज

पुणे-वडगाव शेरी मतदार संघातील भाजपचे महायुतीचे उमेदवार आमदार जगदीश मुळीक यांनी आज शिवसेना, रिपाई, रासप महायुतीचे नगरसेवक,पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत विधानसभा निवडणूकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

या रॅलीत मोठ्या प्रमाणात कार्यकत्यांनी सहभागी झाले होते. त्यानंतर आमदार जगदीश मुळीक पत्रकारांशी बोलले.

  • भामा-आसखेड योजनचे काम ९० टक्के पुर्ण

वडगाव शेरीच्या विकासासाठी मी कटिबंध्द आहे. वडगाव शेरी मतदार संघाच्या विकासासाठी केंद्र, राज्य आणि पालिकेच्या माध्यमातून दोन हजार कोटी पेक्षा जास्त निधीचे विकास कामे केली आहेत. विकास कामांमुळे जनतेशी नाळ जुळली आहे. नागरिकांचा कौल भाजपाच्या बाजूने असल्यानं माझा विजय निश्चित आहे, असा विश्र्वास आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.

यावेळी मुळीक म्हणाले, ”वडगावशेरी मतदार संघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये मोठया प्रमाणात विकासकामे केली आहे. वनाझ ते रामवाडी मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. वाघोली पर्यंत मेट्रोचा प्रस्ताव सादर केला आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चार उड्डाणपुल आणि नदीपात्रावरील पुल करण्याचे नियोजन केले. भामा-आसखेड योजनचे काम ९० टक्के पुर्ण झाले आहे. समान पाणी पुरवठा योजनाचे काम सुरू आहे. लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण केले आहे.”

  • वडगाव शेरीची वाटचाल टँकरमुक्तीकडे

मुळीक पुढे म्हणाले, ”वडगाव शेरीची वाटचाल टँकरमुक्तीकडे चालू आहे. डॉ आंबेडकर शासकीय वसतीगृहाचे निर्माण, एमएनजीएलव्दारे हजारो घरांमध्ये पाईपलाईनमार्फत गॅस पुरवला जात आहे. हरित वडगावशेरीसाठी राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, विश्रांतवाडीतील पाम उद्यान, खराडीतील बोलद्यान, वडगाव शिंदे येथे वनपर्यंटन केंद्र करत आहे. तारकेश्र्वर देवस्थानला क दर्जाचे पर्यटनस्थळ घोषित केले आहे. लोहगाव येथील हरिण तळाचा विकास करण्यासाठी जवळपास दोन कोटीचा निधी मंजुर केला आहे.”

विकास कामाविषयी बोलताना मुळीक म्हणाले, ”मतदार संघामधील नागरीकांच्या चांगल्या आरोग्यासाठी शेकडो ओपन जीम तयार केले आहे. येरवडा राजीव गांधी रुग्णालयामध्ये डायलेसिस आणि डायग्नेसिस केंद्र आणि लोहगाव येथे शंभर खाटांचे रुग्णालय होणार आहे. अकरा गावांच्या विकासासाठी भरीव निधीची तरतुद केली. लोहगाव, वडगाव शिंदे, निरगुडी, मांजरी येथे अकरा कोटी रुपयांचा विकास निधी दिला आहे. लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा न देता मतदार संघातील विकास कामे करण्यासाठी कोट्यावधीचा निधी आणला. मतदार संघाचा विकास करणे हा अजेंडा डो्ळयासमोर ठेवून मी प्रामाणिक काम केले आहे. यामुळे सर्व समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.”

सत्तेचा वापर हुकुमशाही पद्धतीने -शरद पवार

0
जुन्नर   (आनंद कांबळे  वार्ताहर )-
सत्तेचा  चुकीच्या पद्धतीने वापर  करून महाराष्ट्रला 25 वर्ष मागे सारण्याचे  काम  सत्ताधाऱ्यांनी केले आहे. राज्यात  शेतीकडे उद्योगधंदे याकडे लक्ष दिले जात नाही,गुन्हेगारीचे प्रमाण बोकाळले आहे. अशी टीका  राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जुन्नर येथे  राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे  आधीकृत उमेदवार अतुल बेनके यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत केले.
 खासदार अमोल कोल्हे ,आमदार  दिलीप वळसे पाटील,     तालुकाअध्यक्ष पांडुरग पवार ,   बाजार समिती  सभापती संजय काळे,विघनहर कारखान्याचे  अध्यक्ष सत्यशील शेरकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक घोलप माजी आमदार पोपटराव गावडे,सुर्यकांत पलांडे, राम कांडगे,  प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे,शरद लेंडे,धनराज खोत,    उज्जवला शेवाळे, ,नगरपालिका  उपनगराध्यक्षा अलका फुलपगर ,गटनेते दिनेश दुबे आदी मान्यवरासह जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य , राष्ट्रवादी  काँग्रेस ,काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकते ,महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 शरद पवार पुढे म्हणाले ,ईडीने माझे नाव गोवले, मी त्या बँकेचा पदाधिकारी नाही,संचालक,नाही का सभासद नाही ,विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभ्रम नको म्हणून मीच त्यांच्या चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला .     नोटाबंदीत काही जणांनी काळा पैसा शुद्ध करून घेतला .

तुल बेनके निवडणुक निर्णय अधिकारी सारंग कोडीलकर यांच्याकडे अर्ज सुपूर्त केला.यावेळी तालुकाअध्यक्ष पांडुरग पवार , बाजार समिती सभापती संजय काळे,विघनहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक घोलप
 नोटाबंदीसारखा इतिहासात घोटाळा आहे.  नोटा बंदीत  तर अमित शहांच्या बँकेत  एकाच  दिवसात कोट्यवधी रुपये जमा झाले तर  आमच्या शेतकऱ्यांच्या  जिल्हा बँकेच्या नोटा मात्र बदलुन दिल्या नाही .  राज्यात 16000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.आमच्या सरकारने शेतकऱ्यांचे 70000 कोटींचे कर्ज माफ केले.शेतकरी  हिताच्या योजना  राज्यकर्त्यांनी बंद केल्या. मोठमोठ्या उद्योजकानीं बँकांचे कर्ज बुडविले त्यांना मोकळे सोडले गेले आहे.शेतकरी  विरोधी  नेत्यांच्या हातात सध्या सत्ता आली आहे, त्यांना धक्का देण्याची  आवाहन पवार यांनी केले.
    खासदार अमोल कोल्हे यावेळी बोलताना म्हणाले महाराष्ट्रत परिवर्तनाची व शरद पवार नावाची लाट आली आहे. मोठ्या प्रमाणात कंपन्या बंद पडल्या असून बेरोजगारीमुळे तरुण नोकऱ्यांची मागणी करतोय  अशी टीका करताना जुन्नर तालुक्याची जागा मोठ्या मताधिकय्याने निवडुन आनण्याचा विश्वास व्यक्त केला..
अतुल बेनके यांनी    यावेळी म्हणाले  की,तालुक्यातील धरणाचे पाणी तालुक्यातच ठेवणार,यशवंतराव चव्हाण पर्यटन केंद्र उभारणार, चिल्हेवाडीचे पाणी तालुक्याच्या पूर्व भागात नेणार .  तालुका पर्यटन घोषित केला पण कोणताही निधी आणला नाही अशी टीका केली.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने पुण्यात पहिला उमेदवारी अर्ज रमेश बागवेंचा दाखल (व्हीडीओ)

 
पुणे-कॉंग्रेस राष्ट्रवादी आरपीआय आघाडीच्या वतीने आज पहिला उमेदवारी अर्ज पुणे   कॅन्टोनमेंटमधून अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांनी दाखल केला आहे .यावेळी प्रथमतः कॅम्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या तसेच कुटुंबियांच्या समवेत बागवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . खासदार वंदना चव्हाण ,माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर ,मोहन जोशी,अनंतराव गाडगीळ ,शरद रणपिसे ,अभय छाजेड ,अविनाश बागवे,रफिक शेख ,राहुल डंबाळे,विठ्ठल थोरात ,जेनब बागवे,लता राजगुरू ,सुजाता सदानंद शेट्टी ,संगीता तिवारी ,रोहित जोशी,वाल्मिक जगताप ,रमेश अय्यर आदीअसंख्य कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते .

शिवाजीनगर मधून भाजप सेना युतीच्या सिद्धार्थ शिरोळे यांनी भरला उमेदवारी अर्ज

0

पुणे : भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (A), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीच्या शिवाजीनगर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी गुरुवारी (ता.3) अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू कलादालन येथे निवडणूक अधिकारी अस्मिता मोरे यांच्याकडे शिरोळे यांनी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करण्याआधी शिवाजीनगर गावठाण येथील रोकडोबा मंदिर येथून कार्यकर्त्यांनी त्यांची जंगी मिरवणूक काढली. माजी खासदार अनिल शिरोळे, शिवाजीनगर मतदार संघाचे माजी आमदार विजय काळे, भाजपचे शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, शिवाजीनगरमधील नगरसेविका जोत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, नगरसेवक मधुकर मुसळे, आदित्य माळवे, विजय शेवाळे, प्रकाश ढोरे यांच्यासोबत शिवसेनेचे शिवाजीनगर विभाग प्रमुख राहुल शिरोळे उपविभाग प्रमुख मंगेश खेडेकर, माजी उपविभाग प्रमुख राजेश मांजरे यावेळी उपस्थित होते.

 

शिवसैनिकांचा भाजपाविरोधात बंडाचा झेंडा

पुणे-विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातील आठही मतदारसंघ भाजपाने स्वतःकडे राखल्याने व शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा न आल्याने अपेक्षेप्रमाणे शिवसैनिकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. खडकवासला व कसबा या दोन मतदारसंघातुन शिवसैनिकांनी भाजपाविरोधातच निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

पुण्याच्या किमान एक किंवा दोन जागांसाठी शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींनी जोर लावयला हवा होता, अशी स्थानिक शिवसैनिकांची भावना होती. मात्र असे न झाल्याने शिवसैनिकांनी उघडपणे नाराजी देखील व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवरच आज (गुरूवार) शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेशबापू कोंडे यांनी खडकवासला व नगरसेवक विशाल धनवडे यांनी कसबा मतदारसंघामधुन शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

एकीकडे महायुती झालेली असताना आता या दोन मतदार संघासह पुण्यातील अन्य मतदारसंघातही भाजपाच्या उमेदवाराविरोधात स्थानिक नाराज शिवसैनिक नेमकी काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.

चेतन तुपे पा. ,अश्विनी कदम,सचिन दोडके,सुनील टिंगरेंना राष्ट्रवादीची उमेदवारी

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या पक्षाच्या 77 उमेदवारांची पहिली यादी आज (ता.02) मंगळवारी जाहीर केली आहे. या यादीत पुण्यातील चार मतदारसंघाचा समावेश आहे. हडपसर:-चेतन तुपे पाटील,पर्वती:-अश्विनी नितीन कदम,वडगावशेरी:-सुनील टिंगरे,खडकवासला:-सचिन दोडके

यांचा समावेश आहे .तर बारामती:-अजित पवार,कर्जत जामखेड-रोहित पवार लढविणार आहेत .

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसची इतर मित्रपक्षाची आघाडी आहे. आघाडीतील जागावाटपानुसार 125-125 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी तर 38 जागांवर मित्रपक्ष लढणार आहेत. त्यानुसार राष्ट्‌वादीने आज एकूण 77 मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत.

हडपसर मध्ये यावेळी मोठी रंगतदार लढत होणार आहे , विद्यमान आमदार भाजपचे योगेश टिळेकर यांना आघाडीचे चेतन तुपे पा. आणि  मनसे चे वसंत मोरे लक्ष्य करतील असे स्पष्ट चित्र आहे. टिळेकर यांना ५ वर्षातल्या सर्व आरोपांचे उत्तरे देताना शिवसेनेतील बंडखोरीचा सामना हि करावा लागणार आहे .पर्वतीतून राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम या भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्या पुढे मोठे आव्हान उभे करतील मात्र आपल्या पक्षातील सहकारी स्थानिक नेते आणि कॉंग्रेसचे स्थानिक जुने निष्ठावंत यांचे सहाय्य घेण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल .खडकवासल्यातून भाजपच्या विद्यमान आमदार आणि उमेदवार भीमराव तापकीर यांच्यापुढे राष्ट्रवादीचे सचिन दोडके मोठे आव्हान उभे करतील. आणि शिवसेनेचे रमेश बाप्पू कोंडे देखील याच मतदारसंघातून बंडखोरीच्या तयारीत आहेत .वडगाव शेरीत सुनील टिंगरे यांना भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांचा सामना करावा लागणार आहे .येथे मुळीक यांनी आपला प्रभाव कायम ठेवण्यात यश मिळविले आहे .त्यांचा सामना हि रंगतदार होण्याची शक्यता आहे .

भुजबळ, अजितदादा,रोहित पवारांना उमेदवारी

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. याशिवाय रोहित पवार यांच्यासह आज सकाळी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या माणिकराव कोकाटे यांनाही तिकीट देण्यात आले आहे.

राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीतील उमेदवार

संदीप बेडसे – सिंदखेडा (धुळे)

जगदिश वळवी – चोपडा (जळगाव)

पुष्पा ज्ञानेश्वर महाजन – जळगाव ग्रामीण

अनिल भाईदास पाटील – अमळनेर

डॉ. सतीश पाटील – एरंडोल

राजीव देशमुख – चाळीसगाव

दिलीप वाघ – पाचोरा

संजय गरुड – जामनेर

राजेंद्र शिंगणे – सिंदखेडराजा (बुलडाणा)

रविकुमार राठी – मुर्तिजापूर

राजू तिमांडे – हिंगणघाट (वर्धा)

अनिल देशमुख – काटोल (नागपूर)

विजय घोडमारे – हिंगणा

इंद्रनील मनोहर नाईक – पुसद (यवतमाळ)

प्रदीप नाईक – किनवट (नांदेड)

दिलीप शंकरअण्णा धोंडगे – लोहा

चंद्रकांत नवघरे – वसमत (हिंगोली)

विजय भांबळे – जिंतूर (परभणी)

राजेश टोपे – घनसावंगी (जालना)

बबलू चौधरी – बदनापूर

चंद्रकांत दानवे – भोकरदन

नितीन पवार – कळवण (नाशिक)

छगन भुजबळ – येवला

माणिकराव कोकाटे – सिन्नर

दिलीप बनकर – निफाड

नरहरी झिरवळ – दिंडोरी

सुनिल भुसारा – विक्रमगड

दौलत दरोडा – शहापूर

प्रमोद हिंदुराव – मुरबाड

भरत गंगोत्री – उल्हासनगर

प्रकाश तरे – कल्याण (पूर्व )

जितेंद्र आव्हाड – मुंब्रा-कळवा

धनंजय पिसाळ – विक्रोळी

विद्या चव्हाण – दिंडोशी

 नबाव मलिक – अणुशक्तीनगर

अदिती तटकरे – श्रीवर्धन

अतुल बेनके – जुन्नर

दिलीप पाटील – आंबेगाव

अशोक पवार – शिरुर

 रमेश थोरात – दौंड

दत्तात्रय भरणे – इंदापूर

 अजित पवार – बारामती

सुनिल टिंगरे – वडगाव शेरी

सचिन दोडके – खडकवासला

अश्विनी कदम – पर्वती

चेतन तुपे – हडपसर

किरण लहामटे – अकोले

आशूतोष काळे – कोपरगाव

प्रताप ढाकणे – शेवगाव

निलेश लंके – पारनेर

संग्राम जगताप – अहमदनगर शहर

 रोहित पवार – कर्जत जामखेड

विजयसिंह पंडीत – गेवराई

प्रकाश सोळंखे – माजलगाव

संदीप क्षीरसागर – बीड

पृथ्वीराज साठे – केज

धनंजय मुंडे – परळी

बाबासाहेब पाटील – अहमदपूर

संजय बनसोडे – उदगीर

राहुल मोटे – परांडा

भारत भालके – पंढरपूर

दीपक चव्हाण- फलटण

मकरंद पाटील- वाई

शशिकांत शिंदे – कोरेगाव

बाळासाहेब पाटील – कराड उत्तर

सत्यजीत पाटणकर – पाटण

दीपक पवार – सातारा

संजय कदम – दापोली

सहदेव बेटकर – गुहागर

शेखर निकम – चिपळूण

सुदेश मयेकर – रत्नागिरी

बबन साळगावकर – सावंतवाडी

के. पी. पाटील – राधानगरी

हसन मुश्रीफ – कागल

 जयंत पाटील – इस्लामपूर

मानसिंग नाईक – शिराळा

सुमन पाटील – तासगाव-कवठे महांकाळ

 

 

चंद्रकांत दादा पाटील 1 लाख 15 हजार मतांनी विजयी होतील -खासदार संजय काकडे यांना विश्वास

0
पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील कोथरुड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत असून त्यांच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी आहे. कोथरुड हा भाजपाचा बालेकिल्ला आहे आणि चंद्रकांत दादा पाटील येथून 1 लाख 15 हजार मतांनी विजयी होतील, असा विश्वास भाजपचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज व्यक्त केला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना कोथरुड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार संजय काकडे बोलत होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, खासदार गिरीश बापट, माजी मंत्री शशिकांतभाऊ सुतार, योगेश गोगावले, शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, आमदार मेधा कुलकर्णी, मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत दादा पाटील यांचा पुणे शहराशी गेेल्या 40 वर्षांंपासून संबंध आहे आणि पुणे पदवीधर मतदार संघाचे ते गेली 12 वर्षे प्रतिनिधित्व करीत आहेत. पुुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी सहा महिने काम केले आहे. त्यामुळे ते बाहेरून आलेत असा आरोप अत्यंत चुकीचा आहे. चंद्रकांत दादा पाटील यांच्या उमेदवारीचा मला वैयक्तिक खूप आनंद आहे. फक्त कोथरुडच नाही तर, संपूर्ण पुणे जिल्ह्याला चंद्रकांत दादांकडून अपेक्षा आहेत, असेही खासदार काकडे म्हणाले.
विरोधकांना आता प्रचारासाठी मुद्दे नाहीत. त्यामुळे ते काहीही आरोप करीत आहेत व पुढेही करतील. परंतु, आपला प्रत्येक कार्यकर्ता घराघरात पोहचेल आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोथरुड मधून खासदार गिरीश बापट यांना मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिक मताधिक्य आपणांस मिळवून देऊ. कोथरुड विधानसभा मतदार संघातून लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना 1 लाख 9 हजार मताधिक्य मिळाले आहे. आता त्यात वाढ होईल व चंद्रकांत दादांना 1 लाख 15 हजार मताधिक्य मिळेल, असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

उत्सवांना विधायक कामाची जोड देणे महत्वाचे-राजदत्त

0

नवरात्र महोत्सवात महर्षी पुरस्काराने २५ ऋषीतुल्यांचा सन्मान

पुणे : “समाजातील पंचवीस स्वयंप्रकाशीत ताऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कोणत्याही सांदी कोपऱ्यात असला तरी तो कोपरा माझ्या परीने प्रकाशित करीन, या ध्येयाने या ऋषीतुल्यांची कार्य केले आहे. उत्सवाच्या माध्यमातून समाजाला जागृत करायचे असते. लोकमान्य टिळकांनी याच उद्देशाने गेणशोत्सव सुरू केला. त्याला विधायक कामाची जोड दिली आणि स्वातंत्र्यलढा उभारला. त्यामुळे उत्सवांना विधायक कामाची जोड दिली, तर त्याचे महोत्सवात रूपांतर होते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केले.

पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने आयोजित पुणे नवरात्र महोत्सवात यंदा २५ ऋषीतुल्यांचा सन्मान राजदत्त यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते उल्हास पवार होते. गणेश कला क्रीडामंच येथे झालेल्या या सोहळ्यावेळी ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, माजी आमदार मोहन जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, संयोजक आबा बागुल, जयश्री बागुल, घनःश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल, विकी खन्ना यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यंदा महोत्सवाचे २५ वे वर्ष असल्याने २५ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. डॉ. अनिल अवचट (सामाजिक), विद्या बाळ (महिला सक्षमीकरण), डॉ. कुमार सप्तर्षी (सामाजिक), अनिस चिश्ती (अध्यात्मिक), प्रभाकर जोग (संगीत), मोरेश्वर घैसास (वेदाचार्य), रामभाऊ जोशी (पत्रकारिता), विजयकांत कोठारी (उद्योग), डॉ. कल्याण गंगवाल (व्यसनमुक्ती), वालचंद संचेती (शिक्षण), डॉ. वसंत शिंदे (शिक्षण), एस. के. जैन (कायदा), विठ्ठल काटे (हास्ययोग), डॉ. संप्रसाद विनोद (अध्यात्म), उमेश झिरपे (गिर्यारोहण), डॉ. दिपक शिकारपूर (माहिती तंत्रज्ञान), संजय टकले (क्रिडा), डॉ. दत्ता कोहिनकर (समुपदेशन), आदिनाथ चव्हाण (कृषि पत्रकारिता), श्री. द. महाजन (पर्यावरण), यशवंत खैरे (पर्यावरण), चंद्रकांत काळे (गायन), शमा भाटे (नृत्य), विवेक खटावकर (शिल्पकला) यांना ‘महर्षी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. मानपत्र, पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

उल्हास पवार म्हणाले, “अशी ऋषितुल्य व्यक्तिमत्वेच पुण्याचे भूषण आहेत. आज यांच्या सन्मानामुळे नवीन पिढीला प्रेरणा मिळेल. त्यांच्याकडून समाज हिताचे काम होईल. या विविध व्यक्तींच्या उतुंग कार्यामुळे त्यात्या क्षेत्रात भरीव कामगिरी झाली आहे आणि याचा समाजाला फायदाही झाला आहे. त्यामुळे अश्या व्यक्तींच्या सानिध्यात येणाऱ्या लोकांना एक सकारात्मक उर्जा मिळते.”

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, “नम्रता मानवी जीवनात बहुआयमी आहे, आज विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव केला, ती समाजाची गरज आहे. अशा लोकांच्या कार्यामुळेच समाज सुदृढ बनतो. सांस्कृतिक पोषण चांगले हवे. कारण जिथे सांस्कृतिक कुपोषण आहे, तिथे युद्धे होतात. सुरुवातीच्या काळात एकजुट पाहायला मिळायची. मात्र, आज जातीपातीच राजकारण सुरू आहे. द्वेषाचे हे स्वरूप असेच वाढत राहिले, तर आपल्या देशाची व्याख्या बदलेल. त्यामुळे द्वेषभाव बाजूला करून माणूस म्हणून आपण जगले पाहिजे.

विद्या बाळ म्हणाल्या, आजही स्त्री स्वातंत्र्याची आणि समानतेची लढाई सुरू आहे. ही पुरुषांविरोधातील लढाई नसून पुरुषशाहीविरोधातील आहे. समानतेचा प्रवास आजही सोपा नाही. या पुरस्काराच्या निमित्ताने कामाचा गौरव झाला. पुण्यात कर्तृत्ववान महिलांची संख्या अधिक आहे, त्यामुळे अधिकाधिक कर्तृत्ववान महिलांचा गौरव व्हावा. डॉ. अनिल अवचट म्हणाले, शांतीच्या मार्गाने आज सर्व गोष्टींवर विजय मिळवता येतो. त्यामुळे महात्मा गांधींच्या विचारावर आपण चालणे गरजेचे आहे. जगभर जिथे आंदोलने सुरू आहेत, तिथे महात्मा गांधी यांचा नामोल्लेख होतो, यावरून त्यांच्या कार्याची प्रचिती येते.

मिलिंद जोशी म्हणाले, “भारतीय संस्कृतीचा पाया ही ज्ञानी व्यक्तीवर उभा आहे. माणसाने तत्वानुसार जगले पाहिजे. तत्व सोडले तर जीवनाला अर्थ राहणार नाही. सत्ता संपत्तीच्या जोरावर प्रत्येक गोष्ट विकत घेता येते. पण आदर्श व्यक्तीमत्व हे आचार विचारांनीच बनते. समाजाला सकारात्मकतेची गरज आहे. सज्जन व्यक्तींचे एकत्र येणे गरजेचे आहे.” डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले, आपापल्या क्षेत्रात सखोल अभ्यास करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार मिळाला आहे. कोणत्याही क्षेत्रातील सखोल दृष्टी प्राप्त झालेली व्यक्ती महर्षी होतात. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात असाल तरी तेथे सखोल अभ्यास करत रहा.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबा बागुल यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. घनःश्याम सावंत आभार मानले.

कोणी पाठीत खंजीर खुपसला ,प्राण गेला तरी म्हणेन ”भाजपाचा विजय असाे” : मेधा कुलकर्णी

पुणे-दादा ,मुलाबाळांच्या आजारपणाकडे दुर्लक्ष केले ,शिक्षणाकडे दुर्लक्ष केले ,पहिला पाहिला तो मी माझा मतदार संघ आणि आता कोणी ‘पाठीत खंजीर खुपसला तरी भारतीय जनता पार्टीचा विजय असाे” अशीच घाेषणा देईल अशा वक्तव्याने आपल्या कापलेल्या उमेदवारीबाबत संताप व्यक्त करत आणिआपण भाजपामध्येच राहणार असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. तसेच पाटील यांना बहुमताने निवडून देण्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आज काेथरुडमध्ये भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात कुलकर्णी यांनी पाटील यांना निवडूण आणणार असल्याचे सांगत पक्षाशी बंडखाेरी करणार नसल्याचे स्पष्ट केले.

कुलकर्णी म्हणाल्या, आमदार असताना विविध याेजना काेथरुडमध्ये मी आणल्या. काेथरुडकरांनी मला माेठ्या मताधिक्याने 2014 ला निवडूण दिले. दादांनी देखील या भागातील अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यात या भागातील पुरग्रस्तांचा प्रश्न दादांनी मार्गी लावला. आजही शिवणे भागातील काही नागरिक त्यांच्या समस्या घेऊन आले हाेते. त्यांना मी आश्वासन दिले की दादा या भागातील आमदार हाेणार असल्याने तुमचे प्रश्न ते नक्कीच साेडवतील. उमेदवारीमध्ये कुठेही जातीचा विषय नाही. आम्ही कधीही जात पाहून राजकारण केले नाही. नागरिक जे कुठले प्रश्न घेऊन आले ते मी साेडविण्याचा प्रयत्न केला. काेथरुडमध्ये पक्षाची रुजवात नव्हती तेव्हापासून मी या भागातील नगरसेविका आहे. या भागातील प्रत्येक नागरिकाशी संबंध जाेडून पक्ष वाढविण्याचे काम केले. घराघरांमध्ये जाऊन भाजपाचा प्रचार केला.

काल मला अनेक संघटनांचे फाेन आले. काेणालाही जातीच्या आधारावर नाही तर कर्तृत्व पाहून काम मिळायला हवे. मी कुटुंबाकडे दुर्लक्ष करुन पक्षाचे काम केले. माझी माझ्या संघटनेवर पूर्ण निष्ठा आहे. काेणी पाठीत खंजीर खुपसले तरी मी भारतीय जनता पार्टीचा विजय असाे असेच म्हणेन. काेणी काय म्हणाले त्याच्याशी मी सहमत नाही. उमेदवारी न मिळाल्याचे दुःख झाले. ती भावना मी व्यक्त केली. परंतु दादांची भेट घेऊन मी त्यांना म्हणाले दादा तुम्ही जाे आदेश द्याल ते मी करायला तयार आहे असेही कुलकर्णी यावेळी म्हणाल्या.

तसेच चंद्रकांत पाटील यांना माेठ्या मताधिक्याने निवडूण आणण्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यकर्त्यांमधील संभ्रम टाळण्यासाठी बाेलत असून सर्व कार्यकर्ते साेबत असल्याचेही कुलकर्णी यांनी यावेळी स्पष्ट केले. दादा तुम्ही घरी या तुमचे औक्षण करायचे आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या.

अप्रेंटिसशिप योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘यशस्वी’ संस्थेची निवड

0

पुणे :  अप्रेंटिसशिप  योजनेच्या  अंमलबजावणीसाठी  केंद्रीय  कौशल्य विकास व उद्योजकता  मंत्रालयाने  पुण्यातील  ‘यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स’  या संस्थेची निवड केली आहे. या संदर्भातील   सामंजस्य करारावर  दिल्ली येथे  नुकतेच  (दिनांक :३० सप्टेंबर २०१९ ) रोजी  झालेल्या  कार्यक्रमात  केंद्रीय  कौशल्य विकास व उद्योजकता  मंत्रालयाचे मंत्री  महेंद्र नाथ पांड्ये  व ‘यशस्वी’ संस्थेचे  अध्यक्ष  विश्वेश  कुलकर्णी  यांनी   स्वाक्षरी केली.

विविध    व्यावसायिक व औद्योगिक   आस्थापना   सर्व क्षेत्रामध्ये  अप्रेंटिसशिप कायद्यानुसार

‘अप्रेंटिस’  घेणे हे बंधनकारक असून त्यासंदर्भातील  कराव्या लागणाऱ्या पूर्ततेच्या प्रक्रियेमुळे बहुतेक  औद्योगिक आस्थापना  ‘अप्रेंटिस’ घेत नाहीत.  त्यावर उपाययोजना म्हणून या सर्व  औद्योगिक आस्थापना व उद्योग क्षेत्राच्यावतीने कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांच्या व प्रक्रियेच्या पूर्ततेसाठी  ‘यशस्वी’  या संस्थेची नेमणूक केली आहे. या सामंजस्य करारानुसार ‘यशस्वी’ ही  संस्था मार्च  २०२० पर्यंत  देशभरातील  विविध  औद्योगिक आस्थापनांमधून किमान पाच हजार तरुणांना   ‘अप्रेंटिस’ म्हणून नियुक्त करेल.

या संदर्भात  बोलताना केंद्रीय  कौशल्य विकास व उद्योजकता  मंत्रालयाचे मंत्री  महेंद्र नाथ पांड्ये यांनी  सांगितले की,  गेले एक दशकाहून अधिक काळ  ‘यशस्वी’ या  संस्थेने  कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरीबद्दल कौतुक केले. तसेच भविष्यकाळात किमान दहा लाख तरुण   ‘अप्रेंटिस’ म्हणून  विविध   औद्योगिक आस्थापना व इतर क्षेत्रामध्ये नियुक्त होतील व त्याद्वारे त्यांना रोजगाराच्या संधी  उपलब्ध होतील. अशी माहिती दिली. या प्रसंगी देशातील सर्व राज्यातील  कौशल्य विकास मंत्रालयाचे मंत्री, सर्व राज्यांच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे मुख्य सचिव,  केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाचे राज्य मंत्री आर. के. सिंग, केंद्रीय कौशल्य  विकास मंत्रालयाचे प्रधान सचिव के. पी. कृष्णन व इतर अधिकारीवर्ग उपस्थित होता.

तर या कराराबद्दल  बोलताना ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष  विश्वेश  कुलकर्णी यांनी सांगितले कि,  सध्याच्या  भेडसावणाऱ्या   बेरोजगारीच्या  समस्येवरती उपाय म्हणून  तसेच अनुभव  नाही म्हणून  नोकरी नाही  व नोकरी नाही म्हणून  अनुभव  नाही या दुष्टचक्रातून बाहेर  येण्यासाठी ‘अप्रेंटिसशिप योजना’ हा सर्वोत्तम  उपाय असून ‘यशस्वी’ संस्था  त्याच्या प्रभावी अंमलबजावणी  संपूर्ण देशपातळीवर करेल.