चंद्रकांत दादांची प्रतिमा स्वच्छ : खासदार काकडे
काश्मीरचे भवितव्य’ परिसंवादास प्रतिसाद
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी सप्ताह निमित्त आयोजन
पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी सप्ताह निमित्त ‘काश्मीरचे भवितव्य’ परिसंवादास शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला .
रतनाकर महाजन ( राजकीय विश्लेषक ),प्रा. डॉ.उल्हास बापट( जेष्ठ संविधानतज्ञ ),प्रा.परिमल माया सुधाकर ( आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक ) सहभागी झाले . डॉ.कुमार सप्तर्षी ( अध्यक्ष महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ) कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते .
शनिवार दि.५ ऑक्टो २०१९ रोजी सायं ६ वा. गांधीभवन कोथरूड पुणे येथे हा कार्यक्रम झाला
परिमल माया सुधाकर म्हणाले, ” आंतरराष्ट्रीय स्तरावरील पार्श्वभूमी मोदी सरकारच्या पथ्यावर पडली. पाकिस्तानची परिस्थिती खालावलेली आहे. मोठ्या देशांना मानवी अधिकाराचा कळवळा उरलेला नाही. ३७o रद्द केल्यावर चीन विरोधात गेला आहे.पाकिस्तान अंतर्गत इम्रान खानची परिस्थिती आता सदृढ झाली आहे.पाकव्याप्त काश्मीरमधून भारताला पाठिंबा उरलेला नाही. चीनच्या ताब्यातील काश्मीरचा भाग परत मिळण्याची शक्यता उरलेली नाही. मोदी सरकारची काश्मीर विषयक भूमिका ई स्रायलच्या पॅलेस्टाईनविषयक भूमिकेवर आधारित आहे. पण, ईस्रायल ला आदर्श ठेवण्यासारखे यश त्यांना पॅलेस्टाईनमध्ये मिळालेले नाही, हे लक्षात घेतले पाहीजे.
डॉ.रत्नाकर महाजन म्हणाले, ” काश्मीरप्रश्नी प्रधान प्रचारक आणि तडीपार यांनी काश्मीर प्रश्नी जगात स्वतःचं हसं करून घेतले आहे. काश्मीरच्या त्रिभाजनाचं संघ परिवाराचं जुनं स्वप्न होतं. आताची देशाची परिस्थिती असह्य आहे. कायद्याचा बडगा दाखवून कोणालाही गजाआड केले जात आहे. काश्मीरची परिस्थिती सुधारावी अशी मोदी -शहा दुकलीची इच्छा नाही. त्यामुळे ती सुधारणार नाही.आपण आपल्या पातळीवर काश्मीरींशी माणुसकीचे नाते जोडून ठेवावे, इतकेच आपल्या हातात आहे. ”
प्रा. उल्हास बापट म्हणाले, “अत्यंत कळीच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालये वेळ काढूपणा करतात , हे अनाकलनीय आहे. सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्तिना निवृत्तीनंतर लाभाचे पद स्वीकारण्यावर निर्बंध असते, तर देशाचे भले झाले असते.
३७० वे कलम हळूहळू संपलेलेच होते. ते रद्द करून कोणतीही क्रांती झालेली नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आरक्षणासारख्या अनेक तात्पुरत्या तरतुदी अजूनही घटनेत आहेत.३७०रद्द करणे ही प्रक्रिया कायद्याची चेष्टा आहे.कणखरपणा दाखवला तर सर्वोच्च न्यायालय हा निर्णय बेकायदेशीर ठरवण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला आधी घेतला असता तर ही संभाव्य नामुष्की टळली असती.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ” काश्मीरींना सर्वसमावेशक कश्मीरीयतची सार्वभौमता हवी आहे,यात चुकीचे काही नाही. पण भाजपला घटनेचा प्राण असलेले नागरिकत्व नष्ट करायचे आहे. सर्वांना जुन्या प्रजेच्या काळात न्यायचे आहे. काश्मीर ही त्यासाठीची प्रयोगशाळा म्हणून वापरली जात आहे. ”
संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
मोठ्या रक्कमेच्या व्यवहारावर लक्ष ठेवा -विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांच्या सूचना
पु णे, : विधानसभा निवडणुकीत मोठ्या रकमेच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा, अशा सूचना निवडणूक विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांनी दिल्या.
विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक खर्च विषयीचे विविध विभाग प्रमुख व पथक प्रमुख यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, निवडणूक निरीक्षक चंदरशेखर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, विशेष पोलीस महानिरिक्षक सुहास वारके, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, निवडणूक खर्च व्यवस्थापन विभागाचे समन्वय अधिकारी अजित रेळेकर, सी-व्हिजीलचे समन्वय अधिकारी सुरेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उप जिल्हाधिकारी सुधीर जोशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, माहिती उपसंचालक मोहन राठोड आदी उपस्थित होते.
बी. मुरलीकुमार म्हणाले, विधानसभा निवडणूक कामकाजातील सर्व पथकांनी अचूक व काटेकोर कामकाज करावे, तसेच दैनंदिन माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करावी. बैठकीमध्ये भरारी पथके, स्थिर संनिरीक्षण पथके (एसएसटी), छायाचित्रण संनियंत्रण पथक, छायाचित्रण निरीक्षण पथक अशा विविध पथकांनी आतापर्यंत आचारसंहिता अंमलबजावणी व निवडणूक खर्च विषयक तक्रारीबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. विधानसभा निवडणुकीमध्ये पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देश बी. मुरलीकुमार यांनी दिले.
मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वापरण्यात येणारे पैसे व दारुच्या वापराला आळा घालावा यासाठी बेकायदा दारु आणि रोकड वाहतुकीवर लक्ष ठेवावे, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या. पथकांनी संशयित वाहनांची तपासणी करुन अवैधरित्या वाहतूक होत असलेली रोकड, मद्य, मादक पदार्थ व तत्सम बाबी जप्त करुन संबंधितांविरुध्द योग्य ती कारवाई करावी. उमेदवारांचा निवडणूक खर्च आणि बेकायदा पैशाचा वापर याची तपासणी काटेकोरपणे करावी, असेही त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले, आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून काम करावे. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निवडणुकीच्या कामकाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध विभागांची व पथकांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. सर्व विभागप्रमुखांनी आपापल्या विभागांच्या कामकाजाची माहिती यावेळी दिली. निवडणूक आचारसंहिता कालावधीत प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या जाहिरातींना परवानगी देणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्या कामकाजाची माहिती जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी दिली.
बैठकीला निवडणूक खर्च व्यवस्थापन विभाग, उत्पादन शुल्क विभाग व महसूल व पोलीस प्रशासन, सहकार विभाग, अग्रणी बँकेचे अधिकारी, पेड न्यूज व प्रसार माध्यम विभाग, माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती, आचारसंहिता कक्ष अशा विविध विभागाचे व पथकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दोन आकडी संख्या वाचविण्याचा शरद पवारांचा प्रयत्न -चंद्रकांत दादा पाटील
पुणे: यंदा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती महायुतीचे उमेदवार विक्रमी संख्येने विधानसभेवर निवडून जातील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला.याचवेळी शरद पवार आता आपली दोन आकडी संख्या वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत,” असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, राज्यसभा खासदार संजय नाना काकडे, कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, योगेश मोकाटे, पृथ्वीराज सुतार, श्याम देशपांडे, आरपीआयच्या संगीता आठवले महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही अब की बार 220 पारचा नारा दिला होता. मात्र, महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या पद्धतीत समर्थन मिळतंय, ते पाहता संपूर्ण राज्यातून महायुतीचे उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होतील. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता आपली दोन आकडी संख्या वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत,” असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
कोथरूड मतदारसंघाबद़दल बोलताना ते पुढे म्हणाले की, “गेल्या पाच वर्षात कोल्हापूरचा सर्वांगीण विकास केला. त्यामुळे आज कोल्हापूरमधील जनता समाधान व्यक्त करत आहे.असाच विकास पुढच्या पाच वर्षात पुणे जिल्ह्याचा करायचा आहे. कोथरुड मतदारसंघातून मला उमेदवारी मिळाल्यापासून अनेक जण शंका व्यक्त करत होते की, हे सहज उपलब्ध होतील की नाही? पण मी जसं कोल्हापूरमध्ये सहज उपलब्ध असायचो, राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून लोकांना सहज उपलब्ध होण्यासाठी मंत्रालयासमोरचाच बंगला निवडला. त्याच प्रकारे कोथरूडकरांना मी सहज उपलब्ध असून, यासाठी मी संपूर्ण नियोजन केले आहे.”
आमदार मेधाताई कुलकर्णी म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षात मतदार संघातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यात चंद्रकांतदादा यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पानशेत धरणग्रस़तांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मात्र, मा. दादांनी केवळ दोन बैठकीत पानशेत धरणग्रस़तांचा विषय मार्गी लावला. त्यामुळे पुढील पाच वर्षात कोथरूड मतदारसंघातील सर्व प्रश्न मार्गी लागतील. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
खा. गिरीश बापट म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून मला सर्वाधिक मताधिक्य मिळाले. त्यापेक्षा जास्त मताधिक्य विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून देऊन दादांना विजयी करायचे आहे. त्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेच आहेत. पण आता दिवस कमी राहिल्याने कार्यकर्ते़यांनी दिवसरात्र एक करुन काम केलं पाहिजे. प्रत्येक घरात जाऊन मतदारांना मतदानासाठी आवाहन केलं पाहिजे.”
दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल म़हसके आणि अखिल भारतीय जनता दलाचे अध्यक्ष के.जी. शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने राधाकृष्ण विखे पाटलांचा उमेदवारी अर्ज ठरवला वैध
शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी आक्षेप घेतला होता. विखेंनी ज्याच्याकडे प्रतिज्ञापत्र केले आहे. त्या वकीलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकार नसल्याचा दावा विरोधकांनी केला होता. पण, आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे.
भाजपचे शिर्डीतील उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी आक्षेप घेतला होता. विखेंनी ज्याच्याकडे प्रतिज्ञापत्र केले आहे. त्या वकीलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकार नसल्याचा दावा विरोधकांनी केला होता. त्यानंतर तक्रारीवर शनिवारी तीन वाजता सुनावणी झाली आणि विखेंचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे.
घ्या … एचसीएमटी आर मार्गाची निविदा तब्बल 44 % अधिक दराने…
पुणे-भाजपची एक हाथी सत्ता महापालिकेत आल्यापासून टेंडर वाढीव दराने येण्याचे प्रकार काही थांबता थांबेनात असे दिसते आहे .शहर सुधारणा समितीच्या मंजुरी शिवाय ,स्थायी समितीने घाई घाई ने मंजूर करवून तात्काळ मुख्य सभेत पाठवून तात्काळ मुख्य सभेचीही मान्यता घेण्यात आलेल्या एचसीएमटी आर मार्गाची निविदा तब्बल 44 % अधिक दराने आल्याचे वृत्त आहे.
वाहतुकीच्या कोंडीवर उपाययोजनेसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात येणार्या ३६ कि.मी.चा इलेव्हेटेड रिंगरोड अर्थात एचसीएमटीआरच्या निविदा आज उघडण्यात आल्या. यासाठी दोन निविदा आल्या असून त्यापैकी सर्वात कमी रकमेची निविदा ही सुमारे ४४ टक्के अधिक आहे. समान पाणी पुरवठा योजना, जायका नदी सुधार योजनेप्रमाणेच एचसीएमटीआर योजनेची निविदाही तब्बल ४४ टक्के अधिक दराने आली आहे. मोठ्या प्रकल्पांच्या निविदा सातत्याने चढ्या दराने येत असल्याने यामागे कोणाचा वरदहस्त आहे, अशी चर्चा सुरू असून एवढ्या चढया दराने आलेली एचसीएमटीआरची निविदाही वादाच्या भोवर्यात अडकण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या १९८७ च्या विकास आराखड्यामध्ये एचसीएमटीआर मार्गाची आखणी करण्यात आली आहे. शहरातील उपनगरे उन्नत मार्गाच्या सहाय्याने जोडण्यात येणार असून यावर बीआरटी प्रकल्पही राबविण्यात येणार आहे. सुमारे ३६ कि.मी. मार्गिकेवर वाहने उतरण्यासाठी आणि मार्गावर जाण्यासाठी २९ ठिकाणी रॅम्पही उभारण्यात येणार आहेत.
या कामासाठी ५ हजार १९२ कोटी रुपयांचे एस्टीमेट तयार करण्यात आले असून जागतिक स्तरावर निविदाही मागविण्यात आल्या होत्या. दरम्यान दीड महिन्यांपुर्वीच दोन निविदा प्राप्त झाल्या असून प्रशासनाच्यावतीने या निविदांची तांत्रिक छाननी करण्यात येत होती. या दोन्ही निविदा भारतीय आणि चीनी कंपनीचे कोलॅब्रेशन केलेल्या संयुक्त कंपन्यांनी भरल्या आहेत. त्यापैकी गावर आणि एका चायनीज कंपनीने ७ हजार ५२५ कोटी रुपयांची निविदा भरली असून वेलस्पन अदानी या भारतीय कंपनीने एका चायनीज कंपनीसोबत कोलॅब्रेशन करून ७ हजार ९६६ कोटी रुपयांची निविदा भरली आहे.
यापैकी गावर कंपनीची निविदा कमी दराची असल्याने नियमाप्रमाणे त्यांनाच काम मिळण्याची शक्यता आहे. परंतू या कंपनीची निविदा ही एस्टीमेट कॉस्टपेक्षा तब्बल ४४ टक्के अधिक दराने आलेली आहे. त्यामुळे अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. महापालिकेने मागील काही वर्षांपासून २० टक्क्यांहुन अधिक अथवा १५ टक्के कमी दराने निविदा आल्यास फेरनिविदा काढण्याची नियम केला आहे.
त्यामुळे ४४ टक्के दराने आलेली निविदा स्वीकारली जाणार नाही, असे वरकरणी तरी दिसते. मात्र, हा एकमेव प्रकल्प सत्ताधारी भाजपने पुढे केलेला असल्याने या प्रकल्पाचे भूसंपादन, निविदा प्रक्रिया आदी कामासाठी महापालिकेने सल्लागार नेमला असून अधिकार्यांची स्वतंत्र टीमही तयार केली आहे. एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापुर्वी एचसीएमटीआर प्रकल्पाच्या मार्गीकेत ११ ठिकाणी बदल करण्यात आले असून त्याला सर्वसाधारण सभेची मंजुरीही घेतली आहे. परंतू निविदा या चढ्या दराने आल्याची कुणकुण अगोदर पासूनच विरोधी पक्षाला लागल्याने त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देवून चढया दराच्या निविदा स्वीकारू नयेत, अशीच यापुर्वीच मागणी केली आहे.
नेमके विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना प्रशासनाने या निविदा उघडल्याने सत्ताधार्यांची चांगलीच पंचाईत होणार आहे. तर समान पाणी पुरवठा योजना, जायका नदीसुधार योजना आणि कात्रज कोंढवा रस्त्याच्या निविदा अशाच चढ्या दराने आल्यानंतरही सत्ताधार्यांनी त्या मंजुरीसाठी ठेवल्यानंतर विरोधकांनी तसेच शहरातील स्वंयसेवी संस्थांनी या निविदांना जोरदार विरोध केला होता. अखेर सत्ताधार्यांना समान पाणी पुरवठा योजना आणि कात्रज कोंढवा रस्त्यांच्या फेरनिविदा काढाव्या लागल्या. यामुळे या दोन्ही योजनांचे मिळून सुमारे ११०० कोटी रुपये वाचले.
तर नदीसुधार योजनेच्या ५० ते ७५ टक्के दराने आलेल्या निविदा तपासणीसाठी केंद्रीय समितीकडे पाठवाव्या लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीनंतर सत्ताधारी चढ्या दराने आलेल्या एचसीएमटीआर मार्गाच्या चढ्या दराने आलेल्या निविदांबाबत काय निर्णय घेणार? याची उत्सुकता वाढली आहे.
अखेर … ब्राह्मण महासंघाचा चंद्रकांतदादा पाटलांना पाठिंबा
चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले कि, ब्राम्हण महासंघाचा माझ्या उमेदवारीला विरोध नाही, तर त्यांच्या काही मागण्या आहेत, ज्या सरकारने अद्याप पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा रोष सरकारवर आहे. पण सध्या आचारसंहिता असल्यामुळे त्यांच्या मागण्यांवर निर्णय होत नाही. आचारसंहिता समाप्त होताच आम्ही त्यांच्या मागण्यांचा नक्कीच विचार करू. त्यामुळे ब्राह्मण महासंघाचा उमेदवार माघार घेईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
देशात सहा तर महाराष्ट्रात दीड लाख कंपन्या बंद पडण्यास कोण जबाबदार ? अनंतराव गाडगीळ यांचा सवाल
पुणे : देशातील बेकारी हटवून रोजगाराची स्वप्ने दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सध्याच्या आर्थिक मंदीबद्द्ल उत्तरे द्यावीत. अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. लाखोजण बेरोजगार झाले आहेत. अशावेळी अर्थमंत्री ओला आणि उबेरमुळे मंदी आल्याचे सांगतात. देशात सहा लाख तर महाराष् ट्रात दीड लाख कंपन्या बंद पडल्या आहेत. तसेच राज्यातील 950 कारखान्यांना टाळे लागले आहेत. विविध उत्पादनाच्या शंभर शोरुम बंद पडले आहेत. यासगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार आहेत. असा सवाल आमदार अनंत गाडगीळ यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.
तिकीट वाटपाच्या वेळी कुठे विचारात घेतले…
विधानसभा निवडणूकांच्या दरम्यान सर्वत्र तिकीट वाटपाची चर्चा सुरु असताना काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठांना त्यापासून लांब ठेवण्यात आले. यात माझाही समावेश होता. मलाही पक्षात काय चालले आहे? कुणाला तिकीट देण्यात आले आहे? याविषयी काहीही माहिती नव्हती. जे काही आहे ते सर्व अगोदर ठरलेले होते. उमेदवार निवडीबाबत एका ठिकाणी बैठक झाली. त्यात उमेदवाराच्या नावावर शिक्का मारण्यात आला. ज्येष्ठांना विचारत घेतले जात नसल्याची खंत गाडगीळ यांनी यावेळी व्यक्त केली.
‘बिझनेस लिटरेचर’मुळे उद्योजकतेला चालना – डॉ. रघुनाथ माशेलकर
‘इंडिया बिझनेस लिटरेचर फेस्टिवल’चे उद्घाटन
पुणे : “यशस्वी उद्द्योजक बनण्यासाठी महत्त्वकांक्षा आणि ज्ञान या गोष्टी आवश्यक आहेत. स्टार्टअप इंडियामुळे व्यवसाय करत नोकऱ्या निर्माण करण्याकडे तरुणांचा, विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. उद्योजकता विकसनासाठी निरनिराळे कार्यक्रम, धोरण राबविले जात आहे. नवउद्योजकांना आर्थिक साह्यदेखील देण्यात येत आहे. तरुणांनी मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायाकडे वळावे हा या मागील उद्देश आहे. चांगले आणि सकस ‘बिझनेस लिटरेचर’ उपलब्ध झाले, तर उद्योजकतेला चालना मिळेल. त्यासाठी इंडिया बिझनेस लिटरेचर फेस्टिवल यासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना व्यावसायिकतेकडे वळण्यासाठी उपयुक्त ठरतील,” असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
आयसीएफएआय बिझनेस स्कुल, इन्स्टिट्यूट फॉर जनरेटिव्ह लीडरशिप, होप फाउंडेशनचे आयस्क्वेअरआयटी इंजिनिअरिंग कॉलेज आणि बीडब्ल्यू बिझनेसवर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या इंडिया बिझनेस लिटरेचर फेस्टिवलचे (आयबीएलएफ) उद्घाटन डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले. शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मिनी ऑडिटोरियममध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी ‘केपीआयटी’चे सहसंस्थापक रवी पंडित, उद्योजक डॉ. गणेश नटराजन, ‘बिझनेस वर्ल्ड’चे डॉ. अनुराग बत्रा, आयसीएफएआय बिझनेस स्कुलच्या संचालिका प्रा. ज्योती टिळक , होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या अध्यक्षा अरुणा कटारा, फेस्टिवलचे संयोजक आणि लेखक समीर दुआ, होप फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा कटारा, ‘सीओईपी’चे संचालक डॉ. भारतकुमार अहुजा उपस्थित होते.
उद्योजकता विषयावर लिहलेल्या साहित्यावर २० लेखकांनी फेस्टिवलमध्ये चर्चा केली. ‘टेडएक्स’च्या धर्तीवर आयोजित या फेस्टिवलमध्ये प्रत्येकी लेखकाने १८ मिनिटात आपले मनोगत मांडले. त्यामध्ये नॅसकॉमचे माजी अध्यक्ष किरण कर्णिक, डॉ. शिरीष जोबळे, लेखक आर. गोपालकृष्णन, किशोर चक्रवर्ती, जयराम ईश्वरन, अपर्णा राजे, अवार्ड विनिंग व्हायरल व्हिडीओ मार्केटर आशिष चोप्रा, टूलटेक ग्लोबल इंजिनिअरिंगचे संस्थापक अतुल खन्ना, एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च अधिष्ठाता डॉ. रंजन बॅनर्जी, लेखक-पत्रकार पवन लाल, जाहिरात दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर, लेखक-संपादक शशांक शहा, मानसोपचारतज्ज्ञ सैलजा मनाचा, लेखक नरेंद्र गोईदानी, लेखक-वकील मुक्ता महाजनी आदींचा समावेश होता.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, “बिजनेस लिटरेचर फेस्टिव्हलची कल्पना पुण्यात आली ही आनंदाची गोष्ट आहे. हा विचार देशभर पसरेल. बेडूकउडी न घेता हनुमान उडी घेण्याची आपली मानसिकता हवी. धीरूभाई आंबानी सारखे आदर्श आपल्यासमोर आहेत. उद्योगक्षेत्रात संकुचीत दृष्टी न ठेवता उत्तुंग उडी घेण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे. येत्या काळात भारत हा विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात जगात सर्वात पुढे असेल. या क्षेत्राबाबत आपल्या लोकांमध्ये जगरूकता निर्माण झाली आहे. ‘चंद्रयान-२’ मोहिमेवर सर्व भारतीयांचे लक्ष होते. लोकांचा उत्साह आणि त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. शासनस्तरावर चांगले धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. याचा फायदा नव्या पिढीतील तरुणांना उद्योगात येण्यासाठी नक्की होईल.”
रवी पंडित म्हणाले,”तंत्रज्ञान, धोरण, लोकसहभाग आणि आर्थिक नियोजन या चार गोष्टींचा मेळ घातला, तर ऊर्जा, पर्यावरण आणि रोजगारनिर्मिती या गोष्टीसाध्य होतील. शाश्वत ऊर्जेचा वापर करून पर्यावरण करण्यासह त्यातून रोजगार निर्मिती करण्यावर उद्योगांनी भर दिला पाहिजे. त्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन मिळावे. गेल्या काही वर्षात पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. घनकचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी या चार गोष्टींचा उपयोग होईल. देशातील आव्हाने दूर करण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग आणि संवेदनशीलता महत्वाची आहे.”
डॉ. गणेश नटराजन म्हणाले, “उद्योग जगतात सातत्याने नवनवीन बदल होत आहेत. उद्योजकांनी या सतत होणाऱ्या बदलांचा स्वीकार करावा. ‘नॉलेज मॅनेजमेंट’ या पुस्तकात उद्योग क्षेत्रातला माझा प्रवास लिहला आहे. उद्योजकांनी नोकऱ्या देताना समोरच्या व्यक्तीमधील क्षमता, विश्वसनीयता, गुणवत्ता पाहावी. त्यानुसार काम द्यावे. तसेच डिजिटल इंडियाच्या जगातील आव्हाने समजून वाटचाल करावी.”
डॉ. अनुराग बत्रा म्हणाले, “उद्योजक बनण्याच्या प्रक्रियेत परिस्थिती तुम्हाला खूप गोष्टी शिकवून जाते. सतत नवीन काहीतरी शिकत राहणे गरजेचे आहे. तसेच डोळसपणा जागरूकता, उत्सुकता, सातत्य हे गुण असणे आवश्यक आहेत. संधीची वाट बघण्यापेक्षा संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते. व्यवसाय वृद्धीसाठी नवनव्या माध्यमांचा वापर आपण केला पाहिजे.”
ज्योती टिळक म्हणाल्या, “तरुणांनी साहित्यातील यशोगाथा वाचाव्यात. त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. शिक्षण पद्धतीतील बदल आत्मसात करत प्रत्यक्ष अनुभव घेण्यावर भर दिला पाहिजे. उद्योजकता या विषयावरील शैक्षणिक पुस्तकांसोबत अवांतर पुस्तकांचे वाचन करावे. प्राध्यापकांनी अद्ययावत ज्ञान व प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत अध्यापन करावे.”
समीर दुआ म्हणाले, “धर्माचा खरा अर्थ आपण समजून घ्यायला हवा. मनुष्य हा विविध चिंतांनी ग्रासलेला असतो. तो आंनद, समाधनाच्या शोधात असतो. माणसाने आपला आतला आवाज ऐकायला हवा. अपयाशाची भीती बाळगण्यापेक्षा सतत प्रयत्नशील राहावे. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.”
प्रास्ताविकात अरुणा कटारा म्हणाल्या, “उद्योग क्षेत्राची ओळख वडील प्रकाश छाब्रिया यांच्यामुळे झाली. इथे सतत नवीन गोष्टी समजून घ्याव्या लागतात. या क्षेत्रात साहित्यनिर्मिती व्हावी आणि भावी पिढीला त्याचा लाभ व्हावा, या उद्देशाने हे लिटरेचर फेस्टिवल भरवत आहोत.” डॉ. भारतकुमार अहुजा यांनी स्वागत करताना अशा फेस्टिवलच्या आयोजनामागील महत्व विशद केले. प्रा. वैदही बॅनर्जी यांनी सूत्रसंचालन केले.
सूर-तालातून उलगडला चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ
पुणे : ‘जाने क्यु लोग मोहब्बत किया करते है’, ‘कस्मे वादे प्यार नफा सब’, ‘ख्वाब हो तुम या कोई हसी हो’, ‘मेरे सपनो कि राणी कब आएगी तु’ अशा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एव्हरग्रीन ठरलेल्या गाण्यांचे आपल्या सुमधूर गायनातून सादरीकरण करित युवा गायक आणि कलाकारांनी रसिकांसमोर संगीताचा संवर्णकाळ उलगडला. पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फौंडेशनतर्फे आयोजित २५ व्या पुणे नवरात्र महोत्सवात युवा गायक आणि कलाकारांनी सूर पालवी प्रस्तुत सिल्वहर ज्सुबिली या संगीतमय कार्यक्रमातून आपल्या अप्रतिम अदाकारीने कार्यक्रमात रंगत आणली. महोत्सवाचे संयोजक आबा बागूल, जयश्री बागूल, घनःश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल, विकी खन्ना यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. किशोर सरपोतदार आणि अजित कुमठेकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
अभिषेक मारटकर यांनी कोहिनूर या चित्रपटातील ‘मधुबन मे राधिका नाचे रे’ या गाण्याने कार्यक्रमाची अप्रतिम सुरुवात केली. त्यानंतर सामी सौदागर यांनी ‘कस्मे वादे प्यार वफा सब’ या गाण्यातून मेलडीचा प्रत्यय दिला. पल्लवी पत्की यांनी गायलेल्या ‘जाने क्यू लोग मोहब्बत किया करते है’ या गाण्याने रसिकांना ताल धरायला लावला. अभिषेक मारटकर, समीर सौदागर, पल्लवी पत्की, मकरंद पाटणकर, संतोष गायकवाड, सय्यद राज यांनी गायलेल्या गाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रशिद शेचा (किबोर्ड), मिहिर भडकमकर, (किबोर्ड), अंकुश बोर्डे (ढोलक), विजय मूर्ती (गिटार), महेश रिसवडकर (गिटार), मनोज मोरे (ड्रम), रोहित साने (तबला), संजय हिवराळे (ऑक्टोपॅड) यांनी गायकांना साथउसंगत केली. महेश अचिंतलावार यांनी कार्यक्रमाचे निावेदन केले. ‘कह दो के तुम हो मेरी वरना’, ‘है अगर दुश्मन’, ‘परदा है परदा’, ‘तुझे देखा तो ये जाना सनम’, ‘सोचेंगे तुम्हे प्यार कर के नही’ या नवीन आणि जुन्या गाण्यांच्या सादरीकरणाने रसिकांना संगीताच्या सुवर्णकाळाची आठवण करुन दिली.
पुणे डर्बीसाठी पुणे रेसकोर्स सज्ज येत्या 13 ऑक्टोबर रोजी रंगणार
आरडब्लूआयटीसीचे अध्यक्ष झावरे पूनावाला यांनी सांगितले कि, या विशेष दिवशी रेस शौकिनांचे मनोरंजन करण्यासाठी क्लबने बॉटेको या ब्राझिलियन फूड कंपनीशी करार केला आहे.संगीताची मेजवानी देण्यासाठी खास रेट्रो बँडची व्यवस्था करण्यात आली आहे.
नवरात्री (लेखिका-पूर्णिमा नार्वेकर)
आजचा रंग कोणता ?? नवरात्र सुरू झाली आणि मराठी वर्तमानपत्र, मोबाईल मधील ‘उद्या कुठला रंग’ याच मेसेजनी धुमाकूळ घातला आहे. खरं तर ८-१० दिवस आधीपासूनच महिला वर्गाची तरी जय्यत तयारी सुरू होते आणि मग त्या नवरंगामधील एखादा रंग नाही आहे तर लगेच खरेदीकडे मोर्चा वळतो. माझ्या एका मैत्रिणीने (मेधा मराठे) तर ८ दिवस आधीपासूनच व्हाट्सअपच्या डीपीमध्ये ९ रंगाच्या साड्या ठेवल्या होत्या. नवरात्र सुरू झाल्यापासून सगळीकडेच बस, ट्रेन, ऑफिस, कॉलेज त्या त्या दिवशीचा रंग दिसतो आहे. एका मराठी दैनिकात तर त्या दिवशीच्या रंगाचे ग्रुप फोटो ही प्रसिद्ध होतात. मग तू साडी नेसणार की ड्रेस…त्यावर मोत्याचे दागिने चांगले दिसतील की थ्रेडचा सेट घालू…ए, पण ऑफिसमध्ये आल्या आल्याच फोटो काढू या गं…मग नंतर अगं मेकअप लाईट होतो. सगळीकडे अश्या प्रकारचे धम्माल संवादही कानावर पडताहेत. एकूणच काय तर या रंगाच्या दुनियेत सगळेच रंगून गेले आहेत.
एकीकडे रंगभरे मोसमचा अनुभव काही जण घेत असतात, दुसरीकडे आजे क्या रमवा जवानू?… कोणा पासेस छे तारी पासे ?…फाल्गुनी ना के प्रीती ना ?…आज कुठे गरबा-दांडिया खेळायचा जायचा आहे यावर चर्चा रंगते आहे. बघाल तर गरबा आणि दांडिया चांगला खेळता यावा म्हणून त्याची प्रॅक्टिस महिनाभर आधीच चालू होते, एवढेच नाही तर त्यासाठी कोरिओग्राफरना अपॉईंट केलं किंवा केली जाते. मोठमोठ्या गरबा इव्हेंट्समध्ये चांगलं खेळणाऱ्याला आकर्षक बक्षिसेही असतात. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. जणू काही सगळ्यांमध्ये ऊर्जा संचारली आहे असेच वाटते.
डीजेच्या तालावर बेफाम होऊन नाचणाऱ्यांना पाहिलं की पूर्वीचा गरबा आठवतो…केटला वागे आरती आजे ? …कांता बेनला विचारणा व्हायची कारण त्यांच्या घरी गरबा असायचा आणि देवीचा फोटोही त्यांच्या घरूनच यायचा. रात्री ८.३० वाजले की आम्हा मुलांची गडबड सुरू व्हायची कांता बेन आणि त्यांच्या घरातील कधी मैदानात येणार ते. त्यांच्या घरून कोणी लाकडी खुर्ची घेऊन जाताना दिसलं रे दिसलं की आम्ही सगळ्या मुलांनी या ए विंगच्या मैदानात धूम ठोकलीच म्हणून समजा. मोठ्या लाकडी खुर्चीत त्या देवीचा फोटो लाल चुनरी ओढून ठेवायच्या आणि समोर गरबा. हळूहळू बिल्डिंगमधले सगळेच आरतीसाठी जमायचे. त्यावेळी प्रसाद म्हणून मोठाले साखर फुटाणे द्यायचे. आरती झाली की गरबा चालू व्हायचा. पारंपरिक गरब्याची गाणी म्हणायच्या. कांताबेन, हेमलताबेन, मन्ना फोई, ईला काकी, शांताबेन, संगीता भाभी सगळ्याच गरबा गायच्यात. केसरीयो रंग तारो…, डोंगर उपर बोले छे मोर…, अशी पारंपरिक गाणी असायची. कधी एक टाळीचा गरबा, कधी २ टाळीचा गरबा कधी ३ टाळीचा गरबा. आधी हळूहळू गरबा खेळता खेळता मग स्पीड कधी पकडला जायचा तेच कळायचं नाही. अशावेळी मग ज्यांना इतक्या जलदतेने गरबा खेळायला यायचा नाही त्या बाहेर पडायच्या. गरबा खेळायला बायका, मुले तसेच पुरुष मंडळीही तितक्याच उत्साहाने भाग घ्यायचित. आधी गरबा आणि मग दांडिया. शेवटचे २-३ दिवस ढोलकवाले सुद्धा यायचे. नऊ दिवस मस्त मंतरलेले असायचे. त्या वेळीही रंगाची मजा होती. रोज ठरवले जायचे उद्या कोणत्या रंगाची साडी नेसायची. मग त्या त्या दिवशी त्या रंगाची साडी किंवा चनिया चोळी घालून नटूनथटून सगळ्या यायच्या. त्या काळी या नवरात्रीच्या रंगांना हल्ली एवढं ग्लॅमर आणि प्रसिद्धी नव्हती की फोटो काढण्याची फॅशन. मात्र या सगळ्या आठवणी स्मृतीपटलाच्या फोटो फ्रेममध्ये कायमच्या बंदिस्त आहेत! खास आकर्षण असायचे ते विसावाच्या गल्लीतील देवीचे, कारण देवीला पुण्याचा दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचे डेकोरेशन असायचे आणि दुसरे आकर्षण म्हणजे शिवाजी पार्कची बंगाली देवी. अष्टमीला ब्राह्मण सेवा मंडळात होम असायचा, त्यावेळी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम असायचा. घागरी फुंकणाऱ्या बायकांना पाहून खूप भीती वाटायची. त्यांना मी तरी लांबूनच नमस्कार करायचे. मंडळात रोज भोंडल्याचा कार्यक्रम असायचा. आजही होतात हे कार्यक्रम असे म्हणण्यापेक्षा आता हे सगळे इव्हेंट आहेत, त्यांना ग्लॅमर आहे.
काही जण रंगांत दंग आहेत, तर काही जण गरबा दांडियात रंगून गेले आहेत. तर काही जण नऊ दिवस उपवास आणि देवीच्या दर्शनात मग्न आहेत.
आजही कुठे तरी जुन्या बिल्डिंगच्या अंगणात अंबा मातेची आरती आणि गरबा गातानाचा आवाज कानावर पडला की मन तिथेच रेंगाळते…मग वाटते नवरात्रीचे महत्त्व आणि पारंपरिकता अजूनही जपली जातेय…!
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068
कसबा जर आहे आमचा बालेकिल्ला ..तर …?
वडगावशेरीत राष्ट्रवादीला धक्का ; चंद्रकांत टिंगरेचा भाजप मध्ये प्रवेश
पुणे : ऐन विधानसभा निवड्णूकीच्या तोंडावर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या धानोरीच्या नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी ऍड भगवान जाधव यांनी कार्यकत्यांसह आमदार जगदिश मुळीक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे वड्गावशेरी विधानसभा मतदारसंघात भाजपला फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपचे नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे यावेळी उपस्थित होते.
अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवड्णूकीत भारतीय जनता पक्षाकडे मतदारांचा कल वाढत असल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
त्यामुळे गेल्या काही महिन्यात या विधानसभा मतदारसंघातून मोठया प्रमाणात सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यात आता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या नातेवाईकांचीही भर पडू लागली असून गेल्या काही महिन्यात अनेक कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरली असल्याने मतदारसंघात राजकीय समिकरणे वेगाने बदलत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप विरोधी पक्षांची चांगलीच कोंडी झाली असून ही गळती न थांबल्यास इतर राजकीय पक्षांना त्याचा फटका निवडणूकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, टिंगरे यांच्या पक्ष प्रवेशाचे आमदार तसेच विद्यमान उमेदवार जगदीश मुळीक यांनी स्वागत केले असून गेल्या पाच वर्षामध्ये भाजप पक्ष खुप वाढला आहे. या वडगावशेरी मतदार संघामध्ये सर्वाधिक ताकद ही भाजपची आहे. गेल्या दोन महिन्यामध्ये जवळपास सहा हजार कार्यकत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच या मतदार संघामध्ये हजार पेक्षा जास्त सभासद नोंदणी झाली आहे. मतदार संघामध्ये भाजपचे 14 नगरसेवक आहेत. शिवसेनाचे तीन नगरसेवक आहे. वडगावशेरी हा भाजप चा बालेकिल्ला बनला असल्याचे मत मुळीक यांनी या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी केले आहे.
हडपसर मध्ये चेतन पाटलांसाठी घुमणार डॉ. अमोल कोल्हेंचा आवाज
पुणे- राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील नवा आवाज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या परमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मित्रपक्ष महाआघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन विठ्ठल तुपे यांचा उमेदवारीचा अर्ज भरण्यात आला
तत्पूर्वी काढण्यात आलेल्या मिरवणुकित खासदार अमोल कोल्हे खासदार वंदना चव्हाण माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर माजी आमदार जयदेव गायकवाड,सुरेश घुले, अनिस सुंडके, मंगेश तुपे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक पदाधिकारी तसेच काँग्रेस व मित्र पक्षाचे आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते प्रचंड मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत मिरवणुकीने जाऊन हा अर्ज भरण्यात आला. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमुळे यावेळी तरून कार्यकर्त्यांच्या मध्ये प्रचंड उत्साह होता व महिलांनीदेखील उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला.




