Home Blog Page 2817

पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू

0

पुणे – पुणे एक्स्प्रेसवेवर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कामशेत बोगदापासून काही अंतरावर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसने सर्विस लेनवर नादुरुस्त असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने या अपघातात बसमधील एकूण ३५ प्रवाशांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सोळाजण गंभीर जखमी झाले आहेत. सयाजी पाटील, संभाजी पाटील, तसेच मोहन नलावडे यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अपघातातील मयत तसेच जखमी मुंबई घनसोली येथून पाटस सातारा येथे मतदान करण्यासाठी जात होते. भवानी ट्रॅव्हल्सची बस कामशेत बऊर गावाजवळ आली असता भरधाव चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने चालकाने रस्त्याच्या कडेला पंचर झालेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. महामार्ग तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी तळेगाव येथील पावना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

राष्ट्रीय गोल्फ स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्यमान सिंगची चमकदार कामगिरी

0

पुणे: नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय गोल्फ स्पर्धेत महाराष्ट्राकडून  एकमेव पदक पटकावण्याची कामगिरी पुण्याचा युवा गोल्फपटू आर्यमान सिंग याने केली आहे. जमशेदपूर येथील गोलमुरी गोल्फ कोर्स येथे 15 ते 18 ऑक्टोंबर या कालावधीत आयजीयु झारखंड गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली.

पहिल्या काही फेऱ्यांमध्ये खराब फटके खेळल्या मुळे पदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेलेल्या आर्यमान अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये कमालीची झुंज देत जबरदस्त पुनरागमन केले आणि पदकांपर्यंत मजल मारली. आर्यमानने अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करताना अखेरच्या 12 होलमध्ये सर्वोत्तम कामगिरी बजावली आणि अखेर संयुक्त दुसरे स्थान पटकावले. केवळ 12 वर्षे वयाच्या आर्यमानने राष्ट्रीय स्तरावरील गोल्फ स्पर्धेत महाराष्ट्राकडून पटकावलेले हे तिसरे पदक आहे या दैदिप्यमान यशाबद्दल आर्यमानचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

केदारनाथ हायवेवर भूस्खलन; 3 गाड्या 400 मीटर खोल दरीत कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू

0

डेहराडून- उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये भूस्खलनामुळे एक कार आणि दोन मोटरसायकल 400 मीटर खोल दरीत कोसळल्या. शनिवारी संध्याकाळी उशीरा झालेल्या या अपघातामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दरीत पडल्यानंतर या वाहनांवर डोंगरावरुन आलेली एक मोठी दरड पडली.

रुद्रप्रयागचे अपघात नियंत्रक अधिकारी हरीशचंद्र शर्माने सांगितले की, शनिवारी संध्याकाळी रंजीत शर्मा, हासिद आणि रवी कुमार हे तिघे जखमी अवस्थेत सापडले. रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले, पण रात्री अंधार असल्यामुळे कामात अडथळे येत होते.

आज(रविवार) सकाळी बचाव पथकास 5 मृतदेह सापडले. उंचीवरुन पडल्यामुळे सर्व मृतदेह छिन्न-विछीन्न अवस्थेत पडले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटनेही अवघड होती. रुद्रप्रयागचे जिल्हा मजिस्ट्रेट मंगेश गिलडियाल यांनी सांगितले की, कारमधील नागरिक केदारनथा मंदिरातून परत येत होते.

विधानसभा मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. तरी प्रत्येकाने मतदान करावे. आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदानाला घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

          जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी राम बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी राम म्हणाले,  पुणे जिल्ह्यातील 77 लाख 29 हजार 217 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 21 तारखेला होणारी मतदान प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात व्हावी. मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व भयमुक्त वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडावी यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज सज्ज आहे, एकूण 7915 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. या मतदान केंद्रापैकी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 21 मतदान केंद्रांना सखी मतदान केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या मतदान केंद्राची संपूर्ण व्यवस्था महिला अधिकारी सांभाळणार आहेत. अशी एकूण 21 मतदान केंद्रे सखी मतदार केंद्र जिल्ह्यात असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            पुणे शहारातील मतदारसंघाची तसेच संपूर्ण जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मतदार जनजागृती अभियानाच्या माध्यमातून अनेक जागृतीचे उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रापर्यंत पोचण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, यासाठी व्हीलचेअरचा वापर करून त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी वाहतूक सुविधा पुरवण्यात येणार आहे.

मतदानाच्या हक्कापासून कामगार व मजूरवर्ग वंचित राहू नये याकरिता 21 ऑक्टोबर रोजी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

           विधानसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी  पोलीस अधिकारी, पोलीस कॉन्स्टेबल, होमगार्ड सह बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

मतदार मदत केंद्राद्वारे मतदान करण्याचे आवाहन

0

पुणे – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदानाचा हक्क बजावण्याकरिता पुणे जिल्ह्यातील मतदारांना आवाहन करण्याकरिता व मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे जिल्हा मतदार मदत केंद्र डिस्ट्रीक कॉल सेंटर जिल्हाधिकारी कार्यालय, तळमजला, भूसंपादन अधिकारी क्र. १९, पुणे यांचे कार्यालय, पुणे ‘ए’ विंग तळमजला, पुणे येथे सुरु करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील २१ मतदार संघातील ज्या केंद्रावर कमी मतदान झाले आहे, अशा केंद्रातील मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. प्रत्येक दिवसाला ३ हजार मतदारांना याप्रमाणे सुमारे ८ हजार मतदारांना मतदान करण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे.

तदान मदत केंद्राचे (डिस्ट्रीक कॉल सेंटर) संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत.

020-26121231,        020-26121259,       020-26121263,       020-26121264,

020-26121267,       020-26121268,       020-26121269,       020-26121271,

020-26121272,       020-26121273,       020-26121274,      020-26121275,

020-26121279,       020-26121281,       020-26121291

एकविसावे बंधुता साहित्य संमेलन भोसरीत

0
अध्यक्षपदी डॉ. अशोककुमार पगारिया, स्वागताध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल
 २१ व २२ डिसेंबरला होणार बंधुता चळवळीतील साहित्याचा जागर
पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भगवान महावीर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय एकविसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन भोसरी येथे होणार आहे. साहित्यिक डॉ. अशोककुमार पगारिया यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेले हे संमेलन पूर्वनियोजनानुसार दिल्ली येथे होणार होते. मात्र, काही अपरिहार्य कारणामुळे संमेलनस्थळात बदल करण्यात आला असून, आता ते भोसरी येथील प्रितम-प्रकाश महाविद्यालयाच्या प्रांगणात २१ आणि २२ डिसेंबरला होणार आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक कृष्णकुमार गोयल यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती बंधुता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी दिली.
संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. पिंपळे गुरव येथील ‘बंधुता भवन’मध्ये झालेल्या या सोहळ्याला प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, प्राचार्य सदाशिव कांबळे, हाजी अफझलभाई शेख, मधुश्री ओव्हाळ, शंकर आथरे, महेंद्र भारती, प्रकाश जवळकर, संगिता झिंजुरके, प्रा. प्रशांत रोकडे आणि विश्वास रानवडे उपस्थित होते. ”महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विविध समुहांची साहित्य संमेलने होतात. मात्र बंधुता साहित्य संमेलनाने आपले वेगळेपण नेहमीच जपले असून, सांस्कृतिक चळवळीमध्ये बंधुताचे एक वेगळे दालनच निर्माण केले आहे. नियोजीत २१ वे साहित्य संमेलनही विचारांच्या पातळीवर आपले महत्व अबाधित ठेवून मूल्यविचारांचे बिजारोपण करेल,” असा विश्वास डॉ. पगारिया यांनी व्यक्त केला.

लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलायला हवे- डॉ. मिलिंद वाटवे;

0
पुणे: ”स्त्री-पुरुष यांच्यातील संबंध व्यवस्थित समजून घेण्यासाठी जीवशास्त्र, उत्क्रांतीशास्त्र माहित करून घेणे आवश्यक आहे. हे समजून घेतल्यास वैवाहिक जीवनात एकमेकांची समज चांगल्या प्रकारे होईल. लैंगिकतेविषयी खुलेपणे बोलणे, त्यामागचे विज्ञान जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सामाजात घडत असलेल्या अनेक विकृती टळतील,” असे मत डॉ. मिलिंद वाटवे यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लैंगिक उत्क्रांती’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. वाटवे आणि डॉ. शंतनु अभ्यंकर सहभागी झाले होते. एस. एम. जोशी सभागृहामध्ये झालेल्या या चर्चासत्राला परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, सदस्य सुजाता बरगाले, सतीश सकटे, शशी भाटे, विनय र.र. आदी उपस्थित होते. लेखक जॅरेड डायमंड याच्या ‘व्हाय सेक्स इज फन’ या इंग्रजी पुस्तकाचा ‘संभोग का सुखाचा?’ हा मराठी अनुवाद डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी केला आहे. चर्चसत्रात त्यांनी पुस्तकाविषयी माहिती सांगितली.
डॉ. मिलिंद वाटवे म्हणाले, ”माणसाच्या उत्क्रांतीचे नियम प्राण्यांच्या अभ्यासातून समजतात. दोघांमध्ये फरक असला तरी प्राण्यांच्या अभ्यासातून आपले जीवन जास्त चांगले समजू शकते. आताच्या काळात उत्क्रांती विज्ञान खूप पुढे गेले आहे. मानवी लैंगिकतेचा अभ्यासही मोठ्या प्रमाणात होत आहे. समलैंगिकता या विषयाबद्दल आपल्या हाती निश्चित अशी माहिती आली नाही. प्राण्यामध्येही समलैंगिकता दिसते. पण तिचे स्वरूप वेगळे आहे. माणसांमध्ये अशी प्रकृती असणे हा गुन्हा नाही. परंतु या विषयाचा उलघडा पूर्णपणे झालेला नाही.”

डॉ. अभ्यंकर म्हणाले, ”लैंगिकतेकडे सजगतेने बघावे. तसेच शास्त्रीय पद्धतीने हा विषय समजावून घ्यावा. मग आपल्या वागणुकीबद्दल निर्णय घ्यावा. खूप आधीच्या काळात या विषयावर मोकळेपणाने बोलले; तसेच लिहले गेले. त्यांनतर आपल्या सामाजिक, राजकीय परिस्थितीमुळे नैतिक-अनैतिकतेच्या कल्पना वेगळ्या झाल्या. सध्याची परिस्थिती मात्र बदलत आहे. हा विषय उघडपणे चर्चिला जातो. स्त्री-पुरुषांच्या लैंगिक संबंधात स्त्रियांचा भावनिक सहभाग अधिक असतो, ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे प्रजनन व्यवस्थेसंबधी विविध अडचणीना सामोरे जावे लागत आहे, त्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा स्विकार करावा.”
राजेंद्रकुमार सराफ म्हणाले,” भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्या गोष्टी योग्य बसतात याचा विचार करायला हवा. आदिवासी समाजापासून उच्च समाजापर्यंत स्त्री ला आपण योग्य साथीदार निवडण्याचा अधिकार दिला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे लैंगिकता आणि प्रजोत्पादना विषयी अनास्था निर्माण होत आहे यावर गांभीर्याने विचार करायला हवा.” डॉ. सुजाता बरगाले यांनी सूत्रसंचालन केले. दिपाली अकोलकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. सचिन सकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

‘विद्यार्थ्यांना शिकतानाच उद्योगांच्या बरोबरीने काम करायला मिळणे महत्त्वाचे’- अतुल किर्लोस्कर

0

-‘केआयएएमएस’ संस्थेत ‘इंडस्ट्री ४.० लॅब’चे उद्घाटन

पुणे : ‘‘शिकतानाच उद्योगांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची व्यवस्थापन कौशल्ये, संवाद कौशल्ये वाढतात. तसेच कोणत्याही समस्येवर नावीन्यपूर्ण उपाय शोधण्याची हातोटी आणि उद्योजकाची मानसिकता त्यांच्यात तयार होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशी संधी मिळणे महत्त्वाचे आहे.’’ , असे मत ज्येष्ठ उद्योजक अतुल किर्लोस्कर यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांमधील कल्पकता व नावीन्यपूर्ण संशोधनास चालना देण्यासाठी पुण्याजवळ मावळ येथे असलेल्या ‘किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट स्टडीज’मध्ये (केआयएएमएस) ‘इंडस्ट्री ४.० लॅब’- ‘सुमन’ अर्थात ‘सस्टेनेबल युनिव्हर्सल मॅन्युफॅक्चरिंग ऑगमेंटेड नोड’ या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांचे आज ज्येष्ठ उद्योजक व केआयएएमएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अतुल किर्लोस्कर आणि त्यांच्या मातोश्री सुमन किर्लोस्कर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याद्वारे ‘केआयएएमएस’मधील विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा सुविधांमध्ये ‘डेटा अॅनालिटिक्स लॅब’, ‘स्टार्ट-अप इन्क्यूबेशन सेंटर’ यासह ‘ इंडस्ट्री ४.०’ लॅबचीही भर पडली आहे.

केआयएएमएसचे संचालक डॉ. एल. के. त्रिपाठी, प्रकल्प संचालक (बिझनेस अॅनालिटिक्स अँड कॉर्पोरेट रिलेशन्स) प्रो. पंकज रॉय गुप्ता, ‘समर्थ उद्योग टेक्नॉलॉजी फोरम’चे संचालक दत्तात्रय नवलगुंदकर, ‘किर्लोस्कर ऑईल इंजिन्स’चे व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख कार्यकारी अधिकारी आर. आर. देशपांडे, ‘केआयएएमएस’च्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष अमरशेखर भोनागिरी, क्लाऊडक्यू टेक्नॉलॉजीजचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आदित्य परांजपे आदि या वेळी उपस्थित होते.

ही ‘इंडस्ट्री ४.० लॅब’ पुण्यातील ‘सीफोरआयफोर’ (सेंटर फॉर इंडस्ट्री ४.०) या केंद्राच्या सहकार्याने स्थापन झाली आहे. यातील ‘सीफोरआयफोर लॅब’ला केंद्र सरकारच्या अवजड उद्योग विभागाचे साहाय्य मिळाले आहे. केआयएएमएसमधील ‘इंडस्ट्री ४.० लॅब’ अंतर्गत विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये काम करणा-या व्यक्तींशी वैचारिक देवाणघेवाण करण्याची आणि स्वतःच्या कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे, तसेच काही अद्ययावत ‘अॅनालिटिक्स टूल्स’च्या माध्यमातून शिकता येणार आहे. ‘इंडस्ट्री ४.०’ ही चौथी औद्योगिक क्रांती समजली जात असून देशात उत्पादनामध्ये अद्ययावत व ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाचा अवलंब केला जावा यासाठी ही केंद्रे एक प्रकारे दुवा म्हणून काम करतात.

‘ ‘इंडस्ट्री ४.० लॅब’मुळे विद्यार्थ्यांबरोबर उद्योगांमध्ये काम करणा-या लोकांनाही मदत होणार आहे. त्यामुळे ‘केआयएएमएस’सारख्या शिक्षणसंस्थेत या प्रकारची लॅब स्थापन होणे दोहोंसाठी फायद्याचेच आहे,’ असे किर्लोस्कर यांनी सांगितले.

रमेश बागवेंचा रथ रोखण्यासाठी साम ,दाम,दंड भेद नीती वापरूनही भाजप घायकुतीला …

पुणे- गेल्या ३५ वर्षांची राजकीय कारकिर्द ,सद्य स्थितीत साथीला  हुशार आणि जनहितवादी विचारसरणीचा युवा पुत्र ,सुरुवातीपासून कायम साथ निभावणाऱ्या कार्यकर्त्यांचा सहभाग ,आणि कायमच बरोबर राहिलेल्या आपल्या मतदार संघातील हितचिंतक नागरिकांची फौज ,या जोरावर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांचा प्रभाव करण्यासाठी सर्व प्रकारचे डावपेच भाजपने वापरल्याचे या निवडणुकीत दिसून आले आहे. बागवे  यांनी गेल्या २०१४ च्या पराभवानंतर तातडीने सुरु केलेल्या २०१९ च्या लढाईच्या तयारीचा रथ …रोखण्यासाठी… निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यानंतर  .आणि आता अखेरच्या टप्प्यात हा रथ रोखताना अक्षरशः भाजप घायकुतीला आल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. विद्यमान आमदार आणि माजी मंत्री दिलीप कांबळे यांची उमेदवारी कापून त्यांच्या भावाला उमेदवारी देण्यात आली आणि कॉंग्रेस मधील बागवे यांच्याशी स्पर्धा करू पाहणारे संधिसाधू राजकारणी फोडून बागवेंवर मात करता येईल काय या दृष्टीने प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले .
प्रथमतः हे समजायला हवे कि भावाचे तिकीट कापून दुसऱ्या भावाला का दिले ? या मतदार संघात मागासवर्गीय ,मध्यमवर्गीय, गोरगरिबांचे मोठे वास्तव्य आहे.. भाजपच्या  दिलीप कांबळे यांना याच मतदार संघातून भाजपने कायम संधी दिली .आणि कॉंग्रेस विरोधी लाटेत त्यांना अशा संधीचा २ वेळा फायदा झाला .आणि इथला बागवेंचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी च (जनहितासाठी नाही )दिलीप कांबळे यांना दोन्ही वेळा मंत्री केले .पण दुदैवाने २ वेळा समाजकल्याण खाते मिळूनही कुठे त्यांच्या समाजाचे कल्याण झाल्याचे दृष्टीक्षेपात आले नाही .उलट दोन्ही वेळेस त्यांच्यावर काही ना काही बालंट आले आणि मंत्रीपद काढून घेण्यात आले.लोहियानगर पासूनचा कांबळे यांचा हा प्रवास सातत्याने अशाच मार्गावर राहिला . लोकांनी आशेने त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांच्याकडून निराशाच पदरी पडली .
औरंगाबाद येथे खुद्द मंत्री असलेल्या कांबळे वर चक्क ‘वाईन्स शाॅप चा परवाना देतो सांगून खंडणी उकळण्याच्या  गुन्हा दाखल होणे म्हणजे सरकारच्या दृष्टीने अत्यंत शरमेची बाब होती .  ती कशी बशी झाकून ठेवण्याचा प्रयत्न करण्याची वेळ फडणवीस सरकारवर आली .आणि कांबळे यांना अभय देवून लाज राखण्याची वेळ आली .याबाबत आजतागायत सरकार च्या वतीने ,भाजपच्या वतीने कोणीही कसल्याही स्वरूपाचे अधिकृत वक्तव्यदेखील  केलेलं नाही .आणि दिलीप यांची उमेदवारी डावलून त्यांच्या भावाला म्हणजे सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली गेली . आता एका भावाची उमेदवारी का कापली आणि दुसऱ्या भावाला का दिली ? याबाबत देखील कसलेही स्पष्टीकरण ना स्थानिक नेत्यांनी केले ,ना सीएम फडणवीस यांनी केले.किमान कांबळे यांनी तरी स्पष्टीकरण करायला हवे होते पण त्यांनी हि केले नाही .
या साऱ्या ..त्यांच्या खामोशीत च … सारे काही स्पष्ट आले असे लोक मानू लागले.
पुणे महापालिकेतील स्थायी समितीवर दर वर्षी वर्णी लावत,आवत  नुकतीच समितीच्या अध्यक्ष पदावर देखील त्यांची वर्णी लावलेली असताना . त्यांनांच दिली विधानसभेची उमेदवारी ….. नागरिक ,मतदार  ..विरोधक ..सोडा ..पण खुद्द भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील हि बाब रुचली नाही .महापौरांना विधानसभेची उमेदवारी, स्थायी समिती अध्यक्षांना उमेदवारी , एकाच बाजूने सातत्याने होणारा हा वर्षाव पाहून आणि निकष पाहून
निष्ठावंतांचा संताप झाला नाही तर नवल च …. . अशा पद्धतीने पक्ष चालविण्यात येत असल्याबाबत जाहीर रित्या माध्यमांपुढे बोलले गेले. बंडखोरी केली गेली .पण अखेरीस या बंडखोरांनी ..पक्ष शिस्तीचा भाग म्हणून बंडखोरी मागे घेतली .पण या नव्या कांबळे यांच्या प्रचाराला कोणी पुढे धजावेना .. आम्ही काय सांगावे लोकांना ..म्हणत त्यांनी पर्वती मतदार संघात जावून  माधुरी मिसाळ यांच्या प्रचाराचे काम पत्करले .स्थायी समितीचा कारभार चार भिंतीच्या आता ‘अभय ‘ रित्या चालविणाऱ्या या उमेदवाराला मदत द्यायला हवी म्हणून त्यासाठी अखेर कॉंग्रेस मधील रमेश बागवे यांच्यावर नाराज असलेली मंडळी फोडून ती या कांबळे यांच्या पाठीशी उभी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण खरोखर हि मंडळी त्यांच्या पाठीशी आहेत काय ? जी मंडळी कॉंग्रेस कडे याच मतदार संघातून लढण्यास इच्छूक होती तीच मंडळी नेमकी घेण्यात आल्याने उलट कांबळे यांच्या ‘ती ‘ पाठीशी ‘ राहतील कि कांबळे यांनाच घरचा रस्ता दाखवून ..स्वतःचा रस्ता इथे तयार करण्याचा यत्न करतील …ते अर्थात येणारा काळच सांगणार आहे. कारण अशा दलबदलू ची  पत्नी पंजाचा तर दल बदलून भाजप मध्ये गेलेला पती कमळाचा प्रचार करताना इथे दिसून आले.
भाजपचे बरेचसे कार्यकर्ते कांबळे यांच्याबरोबर काम करीत नाहीत हे स्पष्ट झाल्यावरच पायाखालची वाळू घसरली आणि मग सुरु झाली साम ,दाम , दंड भेद ,नीती … पुण्यातील ८ पैकी सर्वाधिक हि नीती वापरली कुठे गेली असेल तर या मतदार संघात .. बाग्वेंनी भाजपला फोडलेला घाम ..त्यामागे कारणीभूत आहे .
  २०१४ च्या पराभवानंतर रमेश बागवे यांनी कॉंग्रेसचे कार्यकर्ते ,आपले कार्यकर्ते,मतदार यांच्याशी सलग ५ वर्षे संपर्क ठेवला आहे ,सातत्याने लोकहितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत .पक्षातील अन्य विरोधकांकडून त्यांचे पाय खेचण्याच्या स्ठीतीत त्यांनी आपले कामकाज कधी थांबविले नाही . त्यांचे चिरंजीव नगरसेवक अविनाश बागवे यांनी महापालिकेच्या माध्यमातून प्रशासनातील आणि सत्ताधाऱ्यांकडून होणारी  गैरप्रकारांची पाठराखण सातत्याने चव्हाट्यावर मांडून मुखवटे ओरबाडून काढण्याचे काम केले आहे . आता त्याच्या पक्षातील अनेक पदे उपभोगलेली बडी कार्यकर्त्यांची फळी भाजपचे मधून काढण्यात यासह मिळविले आहे , एवढेच काय या मतदार संघात बागवे यांच्या  प्रचारासाठी बडी नेते मंडळी येणार नाहीत यासाठी देखील  हि कुटनीती अवलंबली गेली आहे. मोहन जोशी,विठ्ठल थोरात ,दयानंद अडागळे, राहुल डंबाळे, संगीता तिवारी आणि अविनाश बागवे आणि बागवेंची अन्य मुले, आणि बागवे यांच्याशी इमान ठेवलेली ठराविक कार्यकर्ते  मंडळी बागवे यांच्याबरोबर ठाम राहिली आहेत .पण तरीही एकीकडे महापालिका स्थायी समिती चा चेअरमन असलेल्या माजी मंत्र्याचा भाऊ एवढीच पुंजी घेऊन आलेला आणि त्यासाठी काहींनी आक्रमक पणे फोडा फोडी चे तंत्र वापरल्याने आता बागवे यांची राजकीय कारकीर्द पणाला लागणार आहे आणि अखेर त्यांची सारी भिस्त आता केवळ मतदारांवर असल्याचे दिसते आहे.

भर पावसात लढला, तेल लावलेला पैलवान…

0

सातारा – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचारसभांच्या झंझावाताची चर्चा राज्यभर चांगली रंगली. तसेच, पायाला जखमा असतानाही वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. आता, साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित केले.

आम्ही लोकांनी साताऱ्यातील निवडणुकांसाठी चूक केली होती. आम्हाला ती चूक दुरूस्त करायची आहे. साताऱ्यातील चूक दुरूस्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तरुण घराघरातून वाट पाहात आहे. 21 तारखेला हा तरुणवर्ग निर्णय घेईल, असे म्हणत शरद पवारांनी साताऱ्यात उदयनराजेंना लक्ष्य केलं. एका बाजुला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. निवडणुकीत विरोधकच नाहीत. आम्हाला दुसऱ्याबाजुला पैलवान दिसतच नाहीत. या तालुक्यात अनेक पैलवान आमच्या नेत्यांनी तयार केले आहेत. भाजपला पैलवान आणि कुस्ती हे शब्द शोभत नाहीत. येत्या 21 तारखेचा निकाल हा सातारा जिल्हा शब्दाचा किती पक्का आहे, हे सांगेल. खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा हा जिल्हा असल्याचं पवारांनी सांगितंल.

भरपावसात रात्री 8 वाजता पवारांची सभा सुरु होती. या सभेला व्यासपीठावर पवार पावसात भिजून जनतेला संबोधित करत होते. पवारांच्या हे रुप पाहून सातारकर भारावले होते, तसेच पवारांच्या भाषणाला टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून जोरदार प्रतिसाद उपस्थितांकडून मिळत होता. पावसात भिजत उपस्थित नागरिकांनीही सभेला गर्दी केली होती. आपल्या खिशातील रुमाल काढून, डोक्यावर छत्री घेऊन कार्यकर्त्यांनी सभेला प्रतिसाद दिला.

नव्या पिढीवर विश्वास, जबाबदारी टाकावी-उद्योजक श्रीकृष्ण चितळे

0
पुणे : “उद्योग उभारताना आणि वाढविताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे व्यवसायात जोखीम घेण्याची तयारी असायला हवी. नव्या पिढीवर विश्वास टाकून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली, तर तेही जिद्दीने आणि मेहनतीने व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. एखाद्या मुलाच्या मनात व्यवसाय करण्याचा विचार आला, तर पालकांनी त्याला पाठबळ द्यायला हवे,” असे मत उद्योजक श्रीकृष्ण चितळे यांनी व्यक्त केले.
शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियानाच्या (युवा) अकराव्या वर्धापन दिनानिमित्त कै. चंद्रकांत जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ’युवा उद्योजक पुरस्कार’ महाभृंगराज तेल कंपनीचे गणेश आणि केदार कुलकर्णी यांना, तर सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत ’सृजन युवा पुरस्कार’ गायिका बेला शेंडे यांना श्रीकृष्ण चितळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राजन कुलकर्णी व शौनक पानसे यांना युवा उत्कर्ष पुरस्काराने, तर नारायण पेठेतील आपली राहती वास्तू देणगीस्वरुपात देणाऱ्या डॉ. अनिल गांधी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. टिळक स्मारक मंदिरात झालेल्या या सोहळ्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत जोशी, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, डॉ. संजय जोशी, ‘युवा’चे श्रीकांत जोशी, सृजन आर्ट गॅलरीचे चारुहास पंडित, मंजुषा वैद्य, तृप्ती नानल, मिलींद दार्वेकर आदी उपस्थित होते.
श्रीकृष्ण चितळे म्हणाले, “व्यवसायात नवीन गोष्टी आत्मसात करताना ग्राहकांच्या मागणीचाही आदर केला पाहिजे. दुग्ध पदार्थांबरोबर बाकरवडी सुरु केली. त्यानंतर बाकरवडी तयार करण्यासाठी मशीन घेण्याचा विचार केला. तेव्हा वडिलांनी आणि काकांनी पाठिंबा दिला. आज मशीनवर बाकरवडी केली जाते. दिवसाला सहा टन बाकरवडी बनते. सहनशीलतेचा वसाही आम्ही व्यवसाय पुढे नेताना जपला आहे.”
बेला शेंडे म्हणाल्या, “गायनाचा वारसा असला तरी मेहनत आणि रियाज महत्वाचा आहे. करिअरमध्ये चढ-उतार आले तरी तुम्ही सामोरे कसे जाता यावर यश अवलंबून असते. प्रत्येक गाणे नवे आव्हान असते. त्यासाठी सतत सराव करते.” विश्राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अदिती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णा कुर्डुकर यांनी आभार  मानले.

बिल्डरांच्या घशात जागा घातल्याने पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न जटील- मेट्रोने तो सुटणार नाही – राज ठाकरे

पुणे-मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घातल्याने पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न जटील झाला आहे , मेट्रोने तो सुटणार नाही असे सांगत आज बाणेर येथे पार्किंगच्या कारवाई वरून नागरिक आणि पोलीस यांच्या उद्भभवलेल्या वादाच्या प्रसंगाचा उल्लेख मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला . खासदाराची गाडी ट्राफिक मध्ये अडकल्याने या भागात नो पार्किंग चा झोन करण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला .कोथरूड येथील जाहीर सभेत ते बोलत होते .

कोथरुडमध्ये भाजपाने बाहेरचा उमेदवार लादला कारण तुम्हाला गृहित धरलं गेलं आहे. आम्ही कोणताही माणूस कुठेही टाकला तरीही ही भाबडी जनता त्यांना निवडून देईल हा विश्वास सत्ताधाऱ्यांना वाटतो. चंद्रकांत पाटील कोल्हापुरातले आहेत तर ते कोल्हापूरमधून का उभे राहिले नाहीत? कोल्हापूरमध्ये उभं रहायला तुम्हाला भीती का वाटली? असे प्रश्न विचारत राज ठाकरेंनी कोथरुड येथील सभेत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. सत्ता डोक्यात जाते तेव्हा अशा कृती केल्या जातात असाही आरोप राज ठाकरेंनी केला. महाराष्ट्राला काय झालं आहे ते मला समजत नाही असंही राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राचा तुम्हाला उत्तर प्रदेश, बिहार करायचा आहे का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. एवढंच नाही तर कोथरुडची निवडणूक तुम्हा सगळ्यांसाठी सोपी आहे. तुम्हाला स्थानिक उमेदवार हवा आहे की बाहेरुन आयात केलेला उमेदवार हवा आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. निवडणूक झाल्यावर चंद्रकांत पाटील हे मतदारांच्या हाती तरी लागणार का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

महापुरुषांचीही वाटणी जातीनिहाय वाटणी करण्यात येते आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला. शिवाजी महाराज मराठ्यांचे, सावरकर ब्राह्मणांचे, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, महात्मा फुले माळी समाजाचे अशी जातीनिहाय वाटणी केली जाते आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला. महाराष्ट्र असा कधीच नव्हता. महाराष्ट्राने देशाला प्रबोधनाचा विचार दिला आहे आज या महाराष्ट्रात चाललंय काय हा प्रश्न पडतो असंही राज ठाकरे म्हणाले.

मध्यंतरी पुण्यात राम गणेश गडकरींचा पुतळा पुण्यात उद्ध्वस्त केला गेला. ज्यांनी उमेदवार हा उद्ध्वस्त केला त्यांना रामगणेश गडकरी ठाऊक आहेत का? केला त्यांना राम गणेश गडकरी माहित तरी आहेत का? आज आपण महापुरुषांना, साहित्यिकांना, कलाकारांना जातीच्या नजरेतून बघायला लागलो आहोत. पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न सर्वात मोठा आहे. तो मेट्रोने सुटणार नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

– मनमोहन सिंग मोठे अर्थतज्ज्ञ, विद्वान आहेत. ते म्हणाले तेव्हा काळजात धस्स झालं. त्यांनी सांगितले की मंदीचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर होईल. त्याची सुरुवात झाली आहे.

– २०१७साली नोटबंदीनंतर नरेंद्र मोदी यांनी पन्नास दिवस द्या असे सांगितले होते. आता २०१९ सुरु आहे मात्र तरीही मंदी आहे.

– पुण्याचे खासदार ट्रॅफिकमध्ये अडकले तेव्हा बाणेरचा रस्ता रिकामा करायला निघाले, मग आम्ही अडकलो तर काय करायचं ?

-आज पुण्यासारख्या शहरात वाहनांचा सर्वाधिक धोका आहे. इथले रस्ते अपुरे आहेत. रस्त्यावर गाड्या पार्क होतात कारण मोकळे भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जातात.

-विरोधासाठी विरोध करण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका नाही. नरेंद्र मोदींच्या भूमिका चुकल्या त्यावर प्रहार केले आणि ३७० साठी अभिनंदन करणारा मीच होतो. मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकीत ते ३७० सोडून महाराष्ट्राचे तरुण, तरुणी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कधी बोलणार?

-सत्त्ताधाऱ्यांची सभांसाठी आणि मेट्रोसाठी रात्रीतून झाडे छाटण्याची हिंमत कशी होते यामागचे कारण सत्ता डोक्यात जाते.

– आमचे उमेदवार स्थानिक आहेत, सत्तेची हवा डोक्यात न जाणारे आहेत. आणि ती गेलीच तर टाचणी लावायला मी आहेच.

वाहतूक पोलिसांच्या कारवाईवरून नागरिकांसमवेत भाजप नगरसेवक रस्त्यावर उतरले-पोलीस अधिकारी ठाम

0

पुणे –: वाहतूक विभागाच्या नो पार्किंग कारवाई विरोधात बाणेरमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. व्यापारी संघटनांच्या वतीने व डॉक्टर संघटनांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनात पोलीस प्रशासनाकडून कोणतेच आश्वासन न मिळाल्याने व्यापारी व नागरिक आक्रमक झाले.नो पार्किंग झोन रद्द करता येणार नाही असा ठाम निर्णय वाहतूक डीसीपी पंकज देशमुख यांनी घेतला आणि पुढील आठवड्यात पालिका प्रशासन व वाहतूक विभाग यांची  संयुक्त बैठक घेवू असे सांगितल्याने बाणेर मधील नागरिकांच्या वर असलेली नो पार्किंग मधील कारवाईची टांगती तलवार ही सध्या तरी कायम राहणार आहे .

कुंदन मंगल कार्यालयासमोर मुख्य बाणेर रस्त्यावर हजारोच्या संख्येने नागरिक व व्यापारी व स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर ,स्वप्नाली सायकर , नितीन कळमकर, लहू बालवडकर, विशाल विधाते , मनोज बालवडकर, प्रकाश बालवडकर , प्रकाश तापकीर यांनी रस्त्यावर बसून पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला व रास्ता रोको करत आंदोलन केले. गेले काही आठवडे बाणेर येथे सहा किलोमीटर परिसरात दोन्ही बाजूला नो पार्किंग झोन करण्यात आले आहे यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून व्यापारी वर्गही त्रस्त झाला आहे. नो पार्किंग झोन विरोधात बाणेर येथील व्यापारी संघटना व डॉक्टर असोसिएशन तसेच विविध संघटनांनी बाणेर बंदला पाठिंबा दर्शवला होता. पोलीस आयुक्त विधाते यांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाहतूक विभागाचे डीसीपी यांनी याबाबत निर्णय घ्यावा अशी जमावाने मागणी केली. वाहतूक विभागाचे डीसीपी हे या या आंदोलनावेळी उपस्थित न राहिल्याने काहीकाळ जमाव आक्रमक झाला होता. बाणेर परिसरात अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे मोठ्या प्रमाणात बाणेर रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती दरम्यान एसीपी विधाते यांनी आंदोलकांना समजावत आंदोलकांनी शिष्टमंडळ घेऊन डीसीपी कार्यालयात सलावे अशी विनंती केली त्यानुसार बंद कायम ठेवून व्यापारी व स्थानिक लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ वाहतूक विभागाच्या डीसीपी ना भेटण्यासाठी गेले यावेळी रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.

 पोलीस प्रशासनाने नो पार्किंग संदभार्तील निर्णय त्वरित मागे न घेतल्यास व्यापारी संघटना व डॉक्टर असोसिएशन तसेच बाणेर परिसरातील विविध संघटना या निर्णयाच्या विरोधात मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशारा देखील बाणेर व्यापारी असोसिएशन च्या वतीने देण्यात आला. ऑनलाइनसाठी घेतली तर घेणे व्यापारी असोसिएशन चे पदाधिकारी स्थानिक नगरसेवक व विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी वाहतूक शाखेच्या डीसीपींची भेट घेत निर्णय रद्द करण्यासंदर्भात निवेदन दिले.

‘तुमच्या ‘ईडी’ला ‘येडी’ केल्याशिवाय गप्प बसणार नाही’,

0

पंढरपूर- “राज्यात ठिकठिकाणी चितपट कुस्ती खेळणार्‍या पैलवानांची फळी तयार केली आहे, त्यामुळे येत्या 21 तारखेच्या मतदानानंतर 24 तारखेला कळेल की यावेळी लोकांचा मुड काही वेगळाच होता.” अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाच्या सत्ता स्थापन करण्याच्या वक्तव्यावर आपले मत व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा आज पंढरपूर येथे पार पडली. ” राज्याचे मुख्यमंत्री जिथे जातात तिथे सांगतात या निवडणुकीत काही दमच नाही. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, परंतु आम्हाला कोण पैलवानच दिसत नाही. त्याचे उत्तर आम्ही ‘कुणाशीही कुस्ती खेळत नसतो’ असे दिले होते. तुम्ही कुठलातरी धरुन आणलेला पैलवान समोर आणता आहात, मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे. जिल्ह्या-जिल्ह्यात तालुक्या-तालुक्यात पैलवान तयार करण्याचे काम न बोलता गेले अनेक वर्षे करतोय.” असेही शरद पवार यांनी सांगितले.

“मी पंढरपुरात अनेक वेळा आलो, परंतु आजचे चित्र काही वेगळेच आहे. तुमचं ठरलं वाटतं” असं शरद पवार यांनी विचारताच सभेला जमलेल्या समुदायाने भारत भालके यांचं नाव जोरजोरात ओरडत सांगितले. “मी महाराष्ट्राचा दौरा करतोय, जाहीर सभा घेतोय. आज सर्वात पुढे तरुण पिढी दिसत आहे. नाहीतर काही ठिकाणी बाप एकीकडे आणि पोरगा दुसरीकडे. त्यामुळे आता बापानेच ठरवलं पोरगं म्हणतंय तेच खरं. त्यामुळे या दोघांची शक्ती संपुर्ण महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या पाठीशी उभी राहिलेली दिसत आहे.” असेही शरद पवार म्हणाले.

तसेच, ” या सोलापूरात अमित शहा येवून गेले. ते गृहखात्याबद्दल काही सांगतील असं वाटलं होतं, परंतु त्यांनी भाषणाची सुरुवात ‘पवारसाबने महाराष्ट्र के लिए क्या किया’ अशी केली. यांनी दिवे लावले आणि आम्हाला विचारतात आम्ही काय केले.” अशी खोचक टिकाही शरद पवार यांनी केली. “आम्ही महाराष्ट्रात शेतीउदयोग उभे केले, महाराष्ट्रात शैक्षणिक संस्था उभ्या करण्याचे काम केले, समाजातील सर्व घटकांना सवलती देण्याचा प्रयत्न केला, राज्य चालवत असताना सर्वांच्या हिताची जपणूक केली. मग त्यामध्ये स्त्रियांना 50 टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. हिंदुस्थानात पहिल्यांदा महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न केला.” असेही शरद पवार यांनी सांगितले.

“ज्यांच्या हाती सत्ता आहे, ते सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. त्यांच्याविरोधी कोणी बोलले तर तो देशद्रोही ठरवला जातो. आजचे राज्यकर्ते गुन्हेगारांवर कारवाई न करता त्यांच्याविरोधात जो बोलतो त्यावर ईडीचे हत्यार वापरतात. आता तुमची ईडी असो वा काही तिला ‘येडी’ केल्याशिवाय गप्प बसणार नाही.” असा स्पष्ट इशाराही शरद पवार यांनी दिला.

भाजपच्या पोकळ गप्पांना लोकं कंटाळले- अरविंद शिंदे

0

पुणे : तीन खासदार, आठ आमदार आणि शंभर नगरसेवक असूनही भाजपच्या नेत्यांना पाण्याचा प्रश्न सोडविता आलेला नाही आणि पुण्याचा विकास साधता आलेला नाही, भाजपच्या नेत्यांनी विकासाच्या पोकळ गप्पा मारल्या, याला लोकं कंटाळली आहेत, अशी टीका कसबा विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी केली.कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आघडीच्या समंजस आणि सर्व घटकांना सामावून घेणाऱ्या भूमिकेला मतदार मतदान करतील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

मतदार संघातील प्रतिष्ठीत व्यक्ती, प्रमुख कार्यकर्ते, संस्थांचे संचालक अशांच्या गाठीभेटी शिंदे यांनी शुकवारी दिवसभर घेतल्या, प्रचार आणि मतदान या विषयीच्या कामकाजाचा आढावा घेतला.

गेल्या काही वर्षांपासून महानगर म्हणून पुणे आकाराला येत आहे.परन्तु पुण्याच्या विकासाला गती देण्यात भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक सपशेल अपयशी ठरले आहेत. शहरातील पेठांना अपुरा पाणी पुरवठा होतो आहे आणि त्याकडे लक्ष देण्याऐवजी सत्ताधारी चोवीस तास पाणी पुरविण्याच्या गप्पा मारत आहेत. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पुण्याचा समावेश झाला, नंतर अंमलबजावणी शून्य झाली, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मेट्रोचे काम चालू झाले आणि अलिकडे ते कामही ढेपाळले. मेट्रो लवकर धावू लागेल अशा घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केल्या, अजून तरी मेट्रो धावलेली नाही. पुणे, नाशिक अशा शहरांची फसगत झाली आहे. बांधकाम क्षेत्र ठप्प आहे, कारखानदारी मंदावली आहे, महागाई वाढतेच आहे. सामान्य माणसाचे दैनंदिन जगणे अवघड झाले आहे आणि भाजपच्या मोठ्या घोषणा ऐकू येत आहेत आणि त्याला जनता कंटाळली आहे. राज्यकारभारात समंजसपणा दाखविणाऱ्या काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीकडे मतदार वळतील असे अरविंद शिंदे यांनी सांगितले.

लोकायत संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात पथनाट्ये सादर केली. पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांच्या नेतृत्वाखाली महिला सहकार्यांनी  घरोघर जावून प्रचार पत्रके वाटून मतदारांशी संवाद साधला.त्यामध्ये गीता तारू,भारती कोंडे,दुर्गा देशमुख,स्वाती शिंदे,शारदा वीर,फडतरे ताई,रोहिणी बल्लाव,मनीषा नेवसे,विमल जगताप आदी सहभागी झाल्या होत्या.