Home Blog Page 2810

श्री स्वामी समर्थांची पुणे ते अक्कलकोट पायी पालखीचे उत्साहात प्रस्थान

0

पुणे-श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने श्री स्वामी समर्थांची महाराष्ट्रातील मानाची पहिली पुणे ते अक्कलकोट पायी पालखीचे वानवडीमधील  भैरोबानाला येथील श्री काळभैरवनाथ मंदिरातून उत्साहात प्रस्थान झाले .  पहाटे महापूजा विक्रांत चौगुले व काजल चौगुले यांच्याहस्ते करण्यात आली . त्यानंतर महाआरती सूर्यकांत चौगुले   व विजया चौगुले यांच्याहस्ते करण्यात आली . त्यानंतर प्रसादाचे वाटप गणेश हेगडे व दिनेश हेगडे यांच्याहस्ते करण्यात आले . मंदिरात स्वामींच्या पादुकांच्या दर्शनासाठी स्वामी भक्तांनी गर्दी केली होती .

यावेळी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख , सचिव प्रकाश कनोज , बिपीन नाईक गुरुजी , रमेश चौगुले  , राजेंद्र चौगुले , आदित्य चौगुले , सुभाष जांभुळकर , सोपानराव गवळी , शाम जांभुळकर ,  पुंडलिक गवळी ,अनिल गवळी , नईम मलिक , मकसूद सय्यद , स्वप्नील जगताप , सर्वेश चौगुले ,ओंकार बनकर , साई बनकर व संतोष बंड व अन्य  मान्यवर उपस्थित होते

हि पालखी मंगळवार , दिनांक १२ नोव्हेंबर २०१९ रोजी अक्कलकोट येथे पोहचणार आहे . 

शहर स्वच्छ रोगराईमुक्त करण्यात सफाई कर्मचाऱ्याचा वाटा : शिरोळे

0
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसोबत दीपोत्सव
पुणे : शहर स्वच्छ, सुंदर आणि रोगराईमुक्त ठेवण्यात सफाई कामगारांचा वाटा महत्वाचा आहे. त्यांच्यामुळे आपण निरोगी आणि आनंदी आयुष्य जगतो. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण आहे. रोज सकाळी संपूर्ण शहर स्वच्छ करणाऱ्या या सफाई कामगारांचे जीवन अधिक सुखकर व्हावे, त्यांचे आरोग्य सदृढ व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहे,” असे मत नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (A) (रिपाइं) वतीने आणि नगरसेविका सुनिता वाडेकर व ‘रिपाइं’चे नेते परशुराम वाडेकर यांच्या पुढाकारातून सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘दीपोत्सव आरोग्य कर्मचाऱ्यांसमवेत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, आनंद छाजेड, ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शहर युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेन्द्र चव्हाण, जिल्हा युवक आघाडीचे उमेश कांबळे, प्रविण ओव्हाळ, वसंत जूनवने आदी उपस्थित होते. पुणे महानगर पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचा दिवाळीच्या निमित्ताने सत्कार करून भेटवस्तू देण्यात आल्या. आमदारपदी निवड झाल्याबद्दल शिरोळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
परशुराम वाडेकर म्हणाले, “घरची परिस्थिती बिकट होती. झाडू खात्यात नोकरीसाठी खुप प्रयत्न केले. नोकरीसाठी मुकादमाकडे जाऊन बसायचो. पण काम काही मिळाले नाही. सफाई कर्मचाऱ्यांच्या भावना, व्यथांची जाण आहे.त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. त्याच भावनेतून गेल्या काही वर्षांपासून सत्कार सोहळा व दीपोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद होतो. त्यांच्या अडीअडचणी समजतात आणि त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो.”
प्रकाश ढोरे म्हणाले, “समाजात काम करताना विविध घटकांशी आपला संबंध येतो. समाज आपली दखल घेत असतो. आपणही त्यांची दखल घेऊन काम करणे गरजेचे आहे. आपण न थांबता काम सुरु ठेवले पाहिजे.” सुनीता वाडेकर म्हणाल्या, “आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या पाल्याकडेही आमचे लक्ष असते. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवत असतो. तसेच नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केलेले आहेत.”
प्रभागातील सर्व सामाजिक राजकिय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन विजय ढोणे यांनी केले. आभार सुनीता वाडेकर यांनी मानले.

नव्या सरकारच्या शपथविधीसाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम ५ नोव्हेंबरसाठी बुक-भाजपचा विश्वास ठाम

0

मुंबई: राज्यात सत्ता स्थापन्यासाठी शिवसेनेबरोबर मंत्रिमंडळाबाबतची कोणतीही चर्चा अद्याप सुरू झालेली नसताना आणि शिवसेनेने चर्चेची दारे बंद केलेली असतानाही भाजपने मात्र नव्या सरकारच्या शपथविधीसाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम ५ नोव्हेंबरसाठी बुक केले आहे. बीसीसीआयच्या परवानगीनेच शपथविधी सोहळ्यासाठी हे स्टेडियम बुक करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुंबई पोलीस आणि अधिकाऱ्यांनी आज वानखेडे स्टेडियमवर जाऊन पाहणी केली. याआधी नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी महालक्ष्मी येथील रेसकोर्स मैदान निवडण्यात आलं होतं. मात्र मुंबई पोलिसांनी दिलेल्या अहवालानंतर वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळ्या घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. सत्तेच्या फॉर्म्युल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घुमजाव केल्यानंतर त्यादिवशी होणारी शिवसेना-भाजपची सत्ता स्थापन करण्याबाबतची बैठक रद्द करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ५०-५० फॉर्म्युल्याच्या मुद्द्यावरून तसूभरही मागे हटणार नसल्याचं जाहीर करत मुख्यमंत्र्यांवर पहिल्यांदाच जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या दोन्ही पक्षात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्याच दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने शिवसेना-राष्ट्रवादी सत्ता स्थापन्यासाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दुसरीकडे शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसचं एक शिष्टमंडळ आज दिल्लीत दाखल झालं असून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतील घडामोडींकडंही सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असतानाच भाजपने मात्र शिवसेनेशी चर्चा करण्यााधीच शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियम बुक केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पत्रकार निशा पाटील-पिसे यांची आत्महत्या

0

पुणे-पिंपरी- चिंचवड महिला पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षा आणि दैनिक प्रभातच्या जेष्ठ पत्रकार निशा पाटील-पिसे (वय 34) यांनी काल (गुरूवारी) रात्री नऊच्या सुमारास नेहरूनगर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू व अभ्यासू पत्रकार म्हणून त्या ओळखल्या जात.

दैनिक केसरीतून त्यांनी पत्रकारितेच्या कारकिर्दीस सुरूवात केली होती. ‘लोकसत्ता’च्या ‘पिंपरी-चिंचवड अंतरंग’ पुरवणीसाठी त्या नियमित लेखन करायच्या.पिंपरीतील प्रसिद्ध  ‘एमपीसी न्यूज’मध्ये त्यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली. ‘एमपीसी न्यूज’च्या मुख्य वार्ताहर पदाची धुराही त्यांनी सक्षमपणे सांभाळली होती. पुढे ‘पीसीबी टुडे’च्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. शेवटी दैनिक ‘प्रभात’मध्ये उपसंपादक म्हणून त्या कार्यरत होत्या.

काल रात्री पावणेनऊ वाजता त्या कार्यालयातून घरी गेल्या. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी खोलीचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. या प्रकाराबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून मृतदेह यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्यात आला. सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

या प्रकरणी निशा पाटील-पिसे यांचे बंधू महेश शिंगोटे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून निशा यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले अाहे. पोलिसांनी निशा यांचा पती प्रशांत पांडुरंग पिसे याला ताब्यात घेतले आहे. निशा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.त्यांच्या मूळ गावी, उंब्रज नंबर १, तालुका जुन्नर, येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार रचना करण्यासाठी एबीपी न्यूजद्वारे संपादकीय विभाग अधिक सक्षम

0

भूमिकेमध्ये अधिक विश्वासार्हता आणि स्पष्टता आणण्यासाठी पुनर्रचना

नॉयडा – भारतातील आघाडीचे न्यूज चॅनेल एबीपी न्यूज चॅनेल हे संपादकीय विभागातील स्त्रोतांची
मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना करत जागतिक मापदंडाशी बरोबरी करणारे पहिले भारतीय मीडिया चॅनेल ठरणार आहे.
आपल्याकडे असलेल्या गुणवत्तेचा जास्त चांगल्या प्रकारे वापर करून संपादकीय विभागाला सक्षम करत त्यांना अधिक विश्वासार्ह करण्यासाठी आणि भूमिकेमध्ये आणखी स्पष्टता आणण्यासाठी एबीपी न्यूजने हे पाऊल उचलले आहे.
बातमी विभागात (न्यूजरूम) सध्या अस्तित्वात असलेल्या पदक्रमाचे स्वरूप बदलले जात आहे. यामुळे चॅनेल जास्त प्रमाणात
प्रेक्षकाभिमुख आणि ग्राहकांप्रती जास्त प्रतिसादात्मक होणार आहे.
कंपनीतील भूमिका आणखी सुनिश्चित होणार असून श्री. रजनीश आहुजा हे न्यू व प्रोग्रॅमिंग विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष, श्री. संजय
ब्रागता न्यूज गॅदरिंगचे उपाध्यक्ष, श्रीच अरूण नौटियाल हे न्यूज प्रॉडक्शनचे उपाध्यक्ष, श्री. सुमीत अवस्थी हे प्लॅनिंग आणि
स्पेशल कव्हरेजचे उपाध्यक्ष, श्रीमती विभा कौल भट्ट या प्रोग्रॅम प्रॉडक्शनच्या असोसिएट उपाध्यक्ष आणि श्रीमती अंजू जुनेजा या
स्पेशल प्रोजेक्ट्सच्या असोसिएट उपाध्यक्ष असतील.
त्याशिवाय बातमी विभाग आणि तंत्रज्ञान टीमबरोबर काम करण्यासाठी असोसिएट उपाध्यक्ष, प्रॉडक्शन आणि ऑपरेशन्स हे नवे
पदही तयार केले जाणार आहे. श्री. नितीन सुखिजा याचे नेतृत्व करतील.
या नव्या घडामोडींविषयी एबीपी न्यूज नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अविनाश पांडे म्हणाले, ‘कर्मचाऱ्यांचे
सक्षमीकरण हा आमच्या कंपनीचा मुख्य गाभा आहे. संपादकीय रचनेमधील रुपांतरण हा आमच्यासाठी महत्त्वाचा क्षण असून
त्यामुळे भारतात बातमी विभागाच्या कामकाजात क्रांती घडून येईल. नव्याने तयार करण्यात आलेले युनिट्स भारतीय मीडियाचे
चित्र विकसित करण्यासाठी काम करतील आणि या सध्या अतिशय गरजेच्या असलेल्या बदलाचे नेतृत्व करताना आम्हाला
अभिमान वाटत आहे.’
डिजिटल युगात जास्त वेगवान राहाण्यासाठी एबीपी न्यूजने पारंपरिक न्यूज चॅनेलचे रुपांतरण करून चॅनेल्सनी आंतरराष्ट्रीय
मापदंड मिळवण्यासाठी त्यांच्यात अद्यावत सुधारणा करण्यासाठी आघाडी घेतली आहे.
  – एएनएनबद्दल-
एबीपी न्यूज नेटवर्क प्रा. लि. (एएनएन) ही विविध भारतीय भाषांतील टीव्ही आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत असलेली
न्यूज मीडिया कंपनी असून तिने भारत व परदेशात दमदार अस्तित्व तयार केले आहे. एएनएन ही एबीपी न्यूजची समूह कंपनी
असून 90 वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही कंपनी आजही सर्वात मोठ्या भारतीय मीडिया समूहांपैकी एक आहे.
एएनएन हिंदी, मराठी, बांग्ला आणि पंजाबी या भाषांतील बातम्यांच्या संकेतस्थळासह डिजिटल व्यासपीठांवरही लक्षणीय
प्रमाणात कार्यरत असून त्याशिवाय कंपनीचे क्रिकेट आणि बॉलिवुडशी संबंधित व्यासपीठही अस्तित्वात आहे.

काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देऊ शकते काय ? दिल्लीत चर्चा …

0

नवी दिल्ली- निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजप-शिवसेनेत सत्तावाटपावरुन तुतू-मैमै सुरू आहे. या सर्वात काँग्रेस-राष्ट्रवादीची काय भूमिका असणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. निकालानंतर राष्ट्रवादीकडून विरोधी बाकावर बसण्याची भाषा बोलली गेली, तर काँग्रेसकडून सेनेला साथ देणार असल्याच्याही चर्चा रंगू लागल्या. यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काही नेत्यांनी दिल्लीत पक्षाचे जेष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली आहे.

आजच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. सहाजिकच त्यासाठी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज लागेल. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला साथ देणार का? हा महत्वाचा मुद्दा आहे.

बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे हे काँग्रेस नेते सोनिया गांधीच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. राज्यातील काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी कोणाची निवड करायची यावरही चर्चा होईल. काँग्रेसला यंदा ४४ जागा मिळाल्या आहेत.

काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. काँग्रेसने शिवसेनेसोबत मुळीच जाऊ नये अशी भूमिका सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली आहे. सुशीलकुमाऱ शिंदे हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याच्या भूमिकेला कडाडून विरोध दर्शवला आहे. जनमत मान्य करुन काँग्रेसने विरोधात बसावं असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा या दोहोंमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

वेणुगोपाल यांच्यासोबतच्या भेटीबद्दल बाळासाहेब थोरातांनी म्हणाले की, “या भेटीत आम्ही त्यांना महाराष्ट्राच्या परिस्थितीविषयी आणि विधानसभा निवडणुकीतील आमच्या कामाविषयी माहिती दिली. सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसार आम्ही वेणुगोपाल यांची भेट घेतली. आम्हाला विस्तृत चर्चा करायची असल्याने सोनिया गांधी यांनी आम्हाला वेणुगोपाल यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले.” तसेच, राज्यातील परिस्थितीवर आमची नजर आहे आणि सध्या “वेट अँड वॉच” ही परिस्थिती असल्याचं देखील थोरात यांनी यावेळी नमूद केलं.

या बैठकीत माणिकराव ठाकरे देखील उपस्थित होते. ते म्हणाले की, “आज महाराष्ट्रात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला पूर्णपणे भाजप जबाबदार आहे. सध्या आमचे काहीही ठरलेले नाहीये. आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनाधार मिळालेला आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”, असे ते म्हणाले.

झारखंडमध्ये 30 नोव्हेंबरपासून पाच टप्प्यात निवडणुका; 23 डिसेंबर रोजी निकाल…

0

नवी दिल्ली झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. येथील ८१ विधानसभा मतदारसंघासाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ डिसेंबरला मतमोजणी असणार आहे. राजकीय पक्षांना बहुमतासाठी ४१ चा आकडा पार करावा लागणार आहे.

निवडणुकीचा दुसरा टप्पा ७ डिसेंबर, तिसरा टप्पा – १२ डिसेंबर, चौथा टप्पा – १६ डिसेंबर आणि शेवटचा पाचवा टप्पा २० डिसेंबर रोजी पार पडणार आहे. २०१४ मध्ये झारखंडमध्ये चार टप्प्यात निवडणूक पार पडली होती, तेव्हा भाजपाला सर्वाधिक ३७ जागा मिळाल्या होत्या. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२० संपुष्टात येणार आहे. झारखंडमधील एकूण मतदारांची संख्या २.२६ कोटी आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी पत्रकारपरिषदेद्वारे याबाबत माहिती दिली आहे. झारखंडमधील ८१ मतदारसंघापैकी ६७ मतदारसंघ हे नक्षलग्रस्त आहेत. शिवाय १९ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. झारखंडमध्ये पहिल्यांदाच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरी बसून पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यांना घराशेजारी ईव्हीएमवर जाऊन मतदान करायचे नसेल तर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय त्यांना देण्यात आला आहे.

निवडणूक आयोग झारखंडबरोबरच दिल्ली विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम देखील घोषित करले, असे वाटत होते . मात्र आयोगाने केवळ झारखंडच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २२ फेब्रुवारी २०२० रोजी संपुष्टात येणार आहे.

झारखंडमध्ये सध्या भाजपाचे सरकार आहे. मुख्यमंत्री रघुबर दास यांच्यासमोर या निवडणुकीस समोरे जाताना काही आव्हानं आहेत. ज्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीबरोबर जमावाकडून घडणाऱ्या हत्या व जमावाकडून होणार हिंसाचार यांचा समावेश आहे.

शिवसेनेनं ठरवलं तर…बहुमत सिद्ध करू शकतो – संजय राऊत

0

मुंबई – शिवसेनेनं ठरवलं तर आवश्यक ते बहुमत सिद्ध करू शकतो असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा असल्याचे ते म्हणाले. शुक्रवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

राऊत पुढे म्हणाले की, आम्हाला मुख्यमंत्रिपदासह सत्तेत समसमान वाटप हवे आहे. मुख्यमंत्र्यांनी आजच शपथ घ्यायला काय हरकत आहे? ते यासाठी 8 दिवस का थांबले? भाजपने चर्चा का सुरू केली नाही. भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी खुशाल शपथविधी करावा. परंतु शिवसेना मात्र स्थिर सरकारसाठी बहुमत सिद्ध करेल, असे म्हणून संजय राऊतांनी मोठा इशाराच भाजपला दिला.

दरम्यान संयज राऊत यांनी गुरुवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. पवारांच्या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नव्हते. बळीराजाच्या प्रश्नावर आमच्यात चर्चा झाली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात आहे. राज्यात सध्या सरकार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच आम्ही पवारांशी चर्चा केली, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.

तर राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही ‘, भाजपने उपसले अखेरचे अस्त्र ; शिवसेनेला इशारा

0

मुंबई- निवडणुका झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत सत्ता वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर दावा करत आहेत, यामुळे सत्ता स्थापन व्हायला उशीर होत आहे. यातच आता भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे विधान केले आहे. “पुढील आठवड्याभरात सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते,” असा अप्रत्यक्ष इशाराच त्यांनी शिवसेनेला दिला आहे.

महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान झाले तर 24 तारखेला निकाल लागला. यात शिवसेना भाजप महायुतीला जनतेने कौल दिला आहे. पण, सत्तेतल्या वाट्यावरून आता दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडलीये. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद हवंय पण, त्यासाठी भाजपची तयारी नाहीये. भाजप सेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि काही महत्त्वाची खाती देण्याची भाजपची तयारी आहे. यावरुनच आता सुधीर मुनगंटीवर यांनी “सत्ताच स्थापन झाली नाही तर राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही”, असे विधान केले आहे. पुढे ते म्हणाले की, “भाजप आणि सेनेनं एकत्र येत विधानसभा निवडणूक लढवली. लोकांनी या दोनही पक्षांना सत्ता स्थापनेसाठी कौल दिला. त्या जनादेशाचा आदर करायला पाहिजे. जनादेशाचा आदर झाला नाही तर ती लोकांशी प्रतारणा ठरेल. शिवसेनेनं लोकांची भावना समजून घेतली पाहिजे,” असे मतही त्यांनी व्यक्त केलं.

जीटीडीसीतर्फे अष्टविनायक सहलींचे आयोजन

0

पणजी – गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अविस्मरणीय अष्टविनायक सहलींचा आजपासून प्रारंभ करण्यात आला. जीटीडीसीचे माननीय अध्यक्ष दयानंद सोपटे यांनी अष्टविनायक सहलींचे उद्घाटन केले. लाँचप्रसंगी इतर मान्यवर आणि अधिकारीही उपस्थित होते.

जीटीडीसीचे माननीय अध्यक्ष दयानंद सोपटे म्हणाले, ‘गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे अतिशय वाजवी किंमतीत अष्टविनायक सहलींचे आयोजन केले असून त्यामध्ये दर्जेदार प्रवास, दर्शन, वास्तव्य आणि इतर सोयींचा समावेश आहे. या सहलीला चांगला प्रतिसाद मिळेल याची मला खात्री वाटते.’

यानिमित्ताने सर्व गणेशभक्तांना महाराष्ट्र राज्यातील अष्टविनायकाचे दर्शन घेण्याची अनोखी संधी मिळणार असून या सहलीत मयुरेश्वर (मोरगाव), सिद्धीविनायक (सिद्धटेक), चिंतामणी (थेऊर), महागणपती (रांजणगाव), गिरीजात्मज (लेण्याद्री), विघ्नेश्वर (ओझर), वरदविनायक (महाड) आणि बल्लाळेश्वर (पाली) यांचा समावेश आहे. ही सहल स्थानिक गोवेकरांना अष्टविनायकाचे दर्शन घडवून आणेल.

ही सहल गुरुवारी संध्याकाळी सुरू होणार असून रविवारी संध्याकाळी संपेल. त्यामध्ये तीन दिवस व तीन रात्रींचा समावेश असेल. त्याशिवाय नोव्हेंबर 2019 मध्येही अशा चार सहलींचे आयोजन करण्याचा जीटीडीसीचा विचार आहे.

जीटीडीसीने या सहलींची किंमत प्रती व्यक्ती 5500 रुपये ठेवली असून त्यामध्ये स्वतंत्र गाईड सेवेचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये हॉटेलमधील वास्तव्य आणि प्रवासाचा खर्चही समाविष्ट आहे. संपूर्ण सहलीचे आयोजन गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे. पिक अपची व्यवस्था पर्यटन भवन पाटो, पणजी येथून संध्याकाळी 7.15 वाजता आणि म्हापसा रेसिडेन्सी येथून रात्री 8 वाजता करण्यात आली आहे.

शरद पवारांनी राधिकाला सांगितले पावसात भिजण्यामागचे गुपित!!

0

झी युवा या वाहिनीवर ‘ युवा सिंगर एक नंबर ‘ हा गाण्यांवर आधारित एक अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिला जातो. या कार्यक्रमाचा महा अंतिम सोहळा हा ११ नोव्हेंबर ला रात्री ९:३० वाजता झी युवा वाहिनीवर प्रक्षेपित होईल. या कार्यक्रमाचे चित्रीकरण नुकतेच बारामतीच्या गदिमा सभागृहात दिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रम शारदोत्सव मध्ये शरद पवारांच्या उपस्तिथीत पार पडला. या कार्यक्रमात ओंकार कानिटकर, जगदीश चव्हाण, दर्शन-दुर्वांकुर, पूजा-पल्लवी, अनिमेश ठाकूर आणि एम एच फोक बँड हे ६ अंतिम प्रतिस्पर्धी होते. या कार्यक्रमाच्या एका ऍक्ट मध्ये राधिका पवार ह्या बालगायिकेने शरद पवारांना ५ असे प्रश्न विचारले की ज्यामुळे शरद पवारांनी सुद्धा तिला एक गुपित सांगितले.

 

बारामती मध्ये झालेल्या ” युवा सिंगर एक नंबर” या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यात बाल गायिका राधिका पवारने निवेदिका मृण्मयी देशपांडे हीला सांगितले की आज मी सुद्धा निवेदन करणार आहे आणि आज मी शरद पवारांना काही प्रश्न विचारणार आहे. शरद पवारांनाही या गोष्टीला संमती दिली आणि राधिका सरळ पवार बसले होते तिथे जाऊन तिने त्यांना प्रश्न विचारायला सुरु केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचं नाव बरंच चर्चेत राहील होतं ते त्यांच्या झंझावाती प्रचार सभांमुळे. पाच दशकाहून अधिक काळ राजकीय प्रवास केलेले पवार किती हजर जबाबी आहेत आणि प्रत्येक वयातील प्रत्येकासोबत किती सहजतेने संवाद साधतात हे ” युवा सिंगर एक नंबर” च्या महाअंतिम सोहळ्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

 

राधिकाच्या प्रश्नांचा ओघ हा या प्रचार सभांना घेऊनच होता. तिने पहिला प्रश्न विचारला की, ” तुमच्या पायाला एवढी मोठी दुखापत झाली असताना सुद्धा महाराष्ट्रात एवढ्या सभा तुम्ही कश्या घेतल्यात? ” यावर पवार म्हणाले,” मला कुणीतरी सांगितलं की मला हे जमणार नाही, तर ‘ मला हे जमणार नाही’ हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.” राधिका ने दुसरा प्रश्न विचारला “क्रिकेट जास्त आवडतं की कुस्ती?” यावर पवार म्हणाले, ” दोन्ही खेळ माझ्या तेवढेच जवळचे आहेत त्यामुळे हे सांगणं कठीण आहे.”  त्यानंतर राधिकाने त्यांना तिसरा प्रश्न विचारला, ” शाळेत मला निबंध लिहिताना ” मी मुख्यमंत्री झाले तर या विषयावर तिला काय लिहायचं ते कळत नाही, तर यावर पवार तिला म्हणाले, ” तुम्ही आत्मविश्वासाने निबंधाची सुरुवातचं करायची ” हो…  मी मुख्यमंत्री होणारच ” ” यावर सभागृहात एकंच हशा पिकला. तिने चौथा प्रश्न विचारला,” मला कविता छान करता येतात, पण तुम्ही इतकी छान भाषणं कशी काय देता हो? “यावर पवार मिश्कीलपणे म्हणाले ” मी भाषणं देऊ शकतो पण कविता काही करू शकत नाही, तिथे तुझी आणि माझी परिस्तिथी सारखीच!”  आणि शेवटचा प्रश्न ज्यात पवारांनी त्यांचे गुपित सांगितले तो म्हणजे ” मी पावसात भिजायला गेले तर माझे आजोबा मला भरपूर रागवतात तर तुम्ही इतक्या जोरदार पावसात कसं काय भाषण दिलं? राधिकाने विचारलेल्या या प्रश्नावर सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सगळेच पवारांकडे पाहू लागले. यावर पवार राधिका ला म्हणाले “पावसात भिजण्यामुळे, तुझे आजोबा जरी तुला रागावत असले, तरी मी पावसात भिजून भाषण केल्याने माझ्या मतदारांनी मला आणखी मते देऊन मतांचा पाऊस पाडला. यावर सभागृह टाळ्यांनी कडाडून निघाले. शरद पवारांचा हजर जबाबी पणा सर्वानाच खूप आवडला. तर ही सगळी मजा प्रत्यक्ष पाहायला विसरू नका ‘युवा सिंगर एक नंबर ‘ या कार्यक्रमाचा महा अंतिम सोहळा  हा ११ नोव्हेंबर ला रात्री ९:३० वाजता झी युवा वाहिनीवर पाहायला मिळेल .

इदेमित्सु होंडा रेसिंग इंडियाचा रायडर महंमद मिखाईलची अभिमानास्पद कामगिरी

0

पुणे-इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट हंटफिल्ड 2018 आणि इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप (एनएसएफ250आर) 2019  या स्पर्धांचा विजेता महंमद मिखाईल याने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. होंडाबरोबर केवळ दोनच वर्षे घालवलेल्या चेन्नईच्या या केवळ 15 वर्षे वयाच्या रायडरला 2020 मधील इदेमित्सु एशिया टॅलेंट कप (आयएटीसी) ग्रीडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. संपूर्ण जगात मोटरस्पोर्ट रायडर विकसीत करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या होंडा 2व्हीलर्स इंडिया प्रा. लि. या कंपनीने ही घोषणा आज केली.

मलेशियाच्या सेपांग सर्किटमध्ये आयएटीसीच्या 2020 हंगामात होणा-या निवडीमध्ये भाग घेण्यासाठी आलेल्या पाच जणांच्या भारतीय संघात महंमद मिखाईल हा सहभागी होता. या संघामध्ये पुण्यातील 13 वर्षीय सार्थक श्रीकांत चव्हाण, 14 वर्षीय कविनसमार क्विंटल, 15 वर्षीय जेफ्री आणि चेन्नई येथील 16 वर्षीय वरुण एस. हेही सामील आहेत.

2014 मध्ये सुरुवात झालेली इदेमित्सु एशिया टेलेंट कप ही स्पर्धा आशिया आणि ओशिनिया प्रदेशातील तरुण चालकांसाठी डोर्नाची व्यासपीठ ठरली आहे. नव्या प्रतिभावान भावी पिढ्यांचा विकास सुनिश्चित करणे, तसेच मोटोजीपी आणि वल्डएसबीके या विख्यात स्पर्धांमध्ये भाग घेण्यास या पिढीला सक्षम करणे हे या स्पर्धेचे उद्दीष्ट आहे.

होंडा रेसिंग इंडियाच्या मिखाईलचा प्रवास 90 जणांमधून अंतिम 12 जणांमध्ये

यावर्षीच्या निवड प्रक्रियेमध्ये 15 देशांतील आलेल्या 90 तरूण रायडर्सनी भाग घेतला होता. आपले नैपुण्य दाखविण्यासाठी त्यांनी सेपांग गो-कार्ट ट्रॅकवर दिवसभर रायडिंग केले. त्यांचे प्रत्यक्ष रायडिंग पाहिल्यावर तीन वेळा शॉर्टलिस्ट बनविण्यात आल्या. प्रीमिअर क्लासचे माजी रेसर व प्रख्यात टॅलेंट स्काऊट असलेले टॅलेंट प्रमोशन डायरेक्टर अल्बर्टो प्यूग यांच्या अध्यक्षतेखालील समितीने भारत, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपाईन्स, जपान व तुर्कस्तान या देशांतील 17 रायडर्सची निवड त्यांत केली. भारताच्या मिखाईलसह 12 जणांना पुढील वर्षी ग्रीडमध्ये भाग घेण्याची संधी मिळणार असून उर्वरीत 5 जणांना राखीव ठेवण्यात आले आहे.

होंडा मोटरसायकल व स्कूटर इंडिया प्रा. लि.चे ब्रॅन्ड अॅन्ड कम्युनिकेशन विभागाचे उपाध्यक्ष प्रभू नागराज यांनी भारतीय रायडर्सच्या या कामगिरीचे आणि या रायडर्सना प्रोत्साहन देण्याच्या होंडाच्या उपक्रमशीलतेचे कौतुक यावेळी केले. ते म्हणाले, “2018 मध्ये होंडाने आपले रेसिंगबद्दलचे धोरण जाहीर केले. तेव्हापासून, आमचे लक्ष पुढील पिढीतील नवीन रायडर विकसित करण्याकडे आहे. इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट हंट’च्या माध्यमातून अगदी 13 वर्षांच्या मुलांना संभाव्य रायडर म्हणून ओळखणे व जागतिक दर्जाच्या रेसिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांना प्रशिक्षण देऊन सुसज्ज करणे, ही आमची पहिली पायरी आहे. एनएसएफ 250 आर ही होंडाची मोटो 3 रेसिंग मोटरसायकल खास भारतीय रायडर्ससाठी आम्ही प्रथम आणली. मोटोजीपीसाठी अव्वल भारतीय रायडर विकसित करण्याच्या आमच्या प्रवासात आम्ही युवा भारतीय रायडर्सना एआरआरसी आणि थायलंड टॅलेंट कपसारख्या आंतरराष्ट्रीय रेसिंगच्या संधी देत आहोत. आमचा विश्वास आहे की संघाने चालना दिल्यास मिखाईल हा जागतिक स्तरावर भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करेल आणि त्याच्यासारख्या इतर तरुण चालकांना प्रेरणा देईल.”

महंमद मिखाईलचा रेसिंग क्षेत्रातील प्रवास 2018 मध्ये सुरू झाला. इदेमित्सु होंडा टॅलेंट हंटच्या सीझन १ मध्ये होंडा २ व्हीलर्स इंडियाने या चेन्नईच्या मुलास उचलले. पहिल्या वर्षातच, 15 वर्षीय मिखाईलने रेसिंगमधील आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले आणि सीबीआर 150 आर वर्गात इदेमित्सु होंडा टॅलेंट कप स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्याची गुणवत्ता जोखून होंडानेदेखील मिखाईलच्या प्रगतीची योजना आखली.

2019 मध्ये, थायलंड टॅलेंट कपमध्ये मिखाईलला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय रेसिंगमध्ये संधी मिळाली. राष्ट्रीय रोड रेसिंगमध्येही एनएसएफ 250 आर या होंडाच्या दिग्गज मोटो रेस मशीन प्लॅटफॉर्मवर रेसिंग करण्याची संधी मिळविणाऱ्या पहिल्या 8 भारतीय तरूण रायडर्समध्ये मिखाईलचा समावेश होता. मिखाईलने एमएमआरटी सर्किट (चेन्नई) येथे 250 सीसी मोटारसायकलवर एक नवीन सर्वोत्तम लॅप टाइम विक्रम केला आणि शेवटी एनएसएफ 250 आर वर्गातही इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप जिंकला.

महंमद मिखाईल म्हणाला, “प्रथम, मी जागतिक मंचावर शर्यतीसाठी मला मोठी संधी दिल्याबद्दल होंडा 2 व्हीलर्स इंडिया, माझी टीम आणि आमच्या प्रायोजकांचे आभार मानू इच्छितो. होंडा टॅलंट हंटच्या 2018 च्या हंगामात होंडा २ व्हिलर्स इंडियाने मला शॉर्टलिस्ट केले, तेव्हापासून रेसिंगमध्ये माझे स्वप्न पूर्ण होऊ लागले आहे. होंडा 2 व्हीलर्स इंडियाने मला पंख दिल्यामुळे, 2019 थायलंड टॅलेंट कपमध्ये मला सर्वोत्कृष्ट थाई रायडर्ससह आंतरराष्ट्रीय स्तरावर माझे कौशल्य सुधारण्याची संधी मिळाली. इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप मध्ये एनएसएफ 250 आर हे होंडाच्या मोटो 3 प्लॅटफॉर्म मशीन आणल्याबद्दल मला होंडाचे आभार मानायला हवेत. या जागतिक दर्जाच्या रेस मशीनवर मला अधिक आत्मविश्वास वाटतो. होंडातर्फे भारताचा एकमेव खेळाडू या नात्याने  मी संघाबरोबर कठोर परिश्रम करेन आणि प्रत्येक शर्यतीत सर्वोत्तम कामगिरी करेन.”

इदेमित्सु एशिया टॅलेंट कप शर्यतीचे 2020 मधील वेळापत्रक

महंमद मिखाईल आणि आशिया-ओशनियाच्या इतर स्पर्धकांसाठी रेसिंगचा हंगाम फेब्रुवारी 2020 पासून चाचणीसह प्रारंभ होत आहे. यावेळी मिखाईलला होंडा एनएसएफ 250 आर मोटो 3 या बाईकची वैशिष्ट्ये बारकाईने लक्षात येतील. यामुळे त्याला मार्गक्रमण, बाईकच्या सस्पेंशनचा प्रतिसाद आणि ब्रेकिंगची मर्यादा समजून घेण्यातही मदत होईल. प्रतिभावान तरुण चालकांनी या बाबी समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

एकंदरीत, इदेमित्सु एशिया टॅलेंट कपच्या सातव्या स्पर्धेत मार्च ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत 1२ शर्यतींच्या चॅम्पियनशिपचे सहा फेऱ्यांमध्ये आयोजन करण्यात आले आहे .2020च्या या हंगामास कतार येथील लॉसेल सर्किट येथून प्रारंभ होईल. नंतर थायलंड (बुरिराम) येथील मोटोजीपीची शर्यत होईल. ऑस्ट्रेलियात बेंड येथे तिसरी फेरी, मलेशियात सेपांग येथे चौथी फेरी ऑस्ट्रेलियन व मलेशियन सुपरबाईक चॅम्पियनशिप सोबत होणार आहे. शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये आशियातील हे स्पर्धक जपानमधील मोटेगी आणि मलेशियातील सेपांगमध्ये मोटोजीपी शर्यतीत झुंज देताना दिसतील.

 

इदेमित्सु एशिया टॅलेंट कप (आयएटीसी) च्या मागील स्पर्धांमधील विजेते

इदेमित्सु एशिया टॅलेंट कप स्पर्धा 2014 मध्ये सुरू झाली, तेव्हापासून या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक रत्ने जन्माला आली. ती आता जागतिक मंचावर स्वतःचे नाव कमावत आहेत. 2014 मधील आयएटीसी विजेते कैटो टोबा (होंडा टीम एशिया) यांनी  2019 मध्ये मोटो 3 क्लास वर्गात कतार जीपी जिंकला. इदेमित्सु होंडा टीम एशियासह ग्रँड प्रिक्समध्ये प्रभावी पदार्पण करणाऱ्यांमध्ये 2016 चे आयएटीए चॅम्पियन असलेले थायलंडच्या मोटो 2 क्लासचे सोमकीट चंद्रा आणि 2016 च्या आयएटीएमध्ये उपविजेते ठरलेले आय ओगुरा यांचा समावेश आहे.

फॉरवर्ड …. ( लेखिका -पूर्णिमा नार्वेकर )

0

 

अरेच्च्या! हा मेसेज तर आत्ताच फॅमिली ग्रुपवर वाचला होता…मेसेज वाचता वाचता माझ्या लक्षात आलं. फॉर्वर्डेड मेसेज…व्हाट्सअप वर येणारे हे फॉर्वर्डेड मेसेज.

सकाळी ‘गुडमॉर्निंग’ पासून जे चालू होतात ते रात्रीच्या ‘गुडनाईट’ मेसेजपर्यंत. मैत्रीचे, चांगला सुविचार, शेरोशायरी असं बरंच काही…फॉर्वर्डेड मेसेज. सकाळी उठल्यावर हात जोडून देवाचे नाव घेण्याऐवजी आता ही अशी ‘प्रार्थना’ बरेच जण करत असतील-

कराग्रे वसते मोबाईल

कर व्हाट्सअप ओपन तू

वाचता एकेक मेसेज

कर एक फॉरवर्ड हि तू

प्रभाते करदर्शनम ! 

बेडमधून न उठताच आधी मोबाईल हातात घेतला जातो. डोळ्यावर थोडी झोप असतेच, अशाच अवस्थेत आधी व्हाट्सअप ओपन करून पाहिले जाते आणि मग एखादा पूर्णपणे वाचलेला किंवा न वाचलेला ‘गुडमॉर्निंग’चा मेसेज फॉरवर्ड केला जातो. मग काय दिवसभर वेगवेगळ्या फॉर्वर्डेड मेसेजचा माराच सुरू होतो. काही वेळा चांगले, माहितीपूर्ण मेसेजही असतातच की…आणि ते वाचायलासुद्धा आवडतात. कुणी तरी प्रसिद्ध व्यक्ती गेल्याची किंवा काही अघटित प्रसंगाचे फॉर्वर्डेड  मेसेज ताणतणाव निर्माण करतात. क्वचितच खात्री केलेली माहिती त्वरीत फॉरवर्ड केली जाते…त्याचा परिणाम काय होईल याचा सारासार विचारच केला जात नाही. मग एखादा मेसेज येतो की ही माहिती, हा मेसेज चुकीचा आहे. त्याबद्दल नंतर दिलगिरी व्यक्त केल्याचा मेसेजही फटाफट सगळीकडे फॉरवर्ड केला जातो.

फॉरवर्डेड मेसेज…न वाचता पुढे पाठवण्याची मानसिकताच आता बऱ्याच जणांमध्ये आढळते. मागे असाच एक मैत्रीच्या नातेसंबंधावर एक फॉर्वर्डेड मेसेज आला होता. न राहून मी त्या व्यक्तीला मेसेज केला- पाठवलेला मेसेज अप्रतिम आहे, याचा मराठीत अर्थ काय ते माहीत आहे का? समोरून रिप्लाय आला – माहीत नाही, पण चांगलं वाटलं म्हणून फॉरवर्ड केला. हे असं बऱ्याचदा सगळ्यांच्याच बाबतीत होत असेल. काहीही माहिती न करून घेता, न वाचता आला मेसेज की लगेच पाठवा पुढे. त्यातही ‘स्पर्धा’ असतेच की. उदाहरणच द्यायचे झाले तर दिवाळी किंवा नवीन वर्षाच्या शुभेच्छांचे मेसेज अगदी आठ-पंधरा दिवस आधीच येऊ लागलेत – ते असे की तुम्हाला शुभेच्छा देणारा / देणारी मी पहिलाच किंवा पहिलीच व्यक्ती. बरे असे मेसेज ४-५ ग्रुप वर तरी आणि १०-१२ जणांनी तरी पाठवलेला असतोच. मग यातील पहिला / पहिली फॉर्वर्डेड  शुभेच्छा देणारी व्यक्ती तरी कोण? हे ओळखायचं तरी कसं? असे मेसेज वाचले की काय म्हणायचं? ते सुजाण वाचकांना समजलंच असेल.

मोबाईलच्या मेसेजमुळे आता दिवसेंदिवस एकमेकांमधील संवादच कमी होत चालला आहे. पूर्वी काही नाही तरी वाढदिवसाच्या आणि सणावाराच्या शुभेच्छांचे फोन यायचे, पण आता ते सुद्धा येत नाहीत. फॅमिलीचा किंवा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप असेल तर एकाने शुभेच्छा दिलेला मेसेजच, फॉरवर्डेडच्या रूपात आणखी १० जणांकडून येतो….गम्मतच आहे खरी! एकमेकांमधला थेट होणार संवादच कमी झाला असेल तर ‘बोलायचे काय’ हा प्रश्न आजच्या पिढीसमोर आहे. एखाद्या लग्नातही आताच्या जनरेशनची मुले-मुली एकत्र आली की हाय – हॅलो आणि ४-५ वाक्यं झाली की काय बोलायचं…मग सगळ्यांचा हातातील मोबाईलशी चाळा सुरू होतो! एकमेकांच्या बाजूला बसून सुद्धा बोलण्यापेक्षा आलेले मेसेज एकमेकांना फॉरवर्ड करण्यात धन्यता मानणारी आणि त्यातच आनंद शोधणारी ही आताची पिढी. (अर्थात काही अपवाद आहेतही.) गूगल सर्च आणि मोबाईलमुळे सगळी माहिती घरबसल्या मिळायला लागली. हेच अगदी शिक्षणाच्या बाबतीतही. एकाने लिहिले उत्तर किंवा असाइनमेंट मग भराभर एकाकडून दुसरीकडे फॉरवर्ड केले जाऊ लागले आणि दुसऱ्या दिवशी ‘मी सगळंच वेळेत पूर्ण केलं’ या अविर्भावाने सबमिशनही. (आमची पिढी त्या बाबतीत नशीबवान…उत्तरे आम्ही आमची पुस्तकातून शोधून स्वतःच्या भाषेत लिहीत असू, कारण त्या वेळी गूगल नव्हते आणि गाईडही सगळ्यांकडे नसायचे.) फॉर्वर्डेड असाइनमेंटने आपल्या बुद्धीचा कस लागत नाही हे या मुलांच्या लक्षातच येत नाही. खऱ्या आयुष्यात एखाद्या प्रसंगाला सामोरे जाताना मग मात्र तारांबळ उडते. कारण इकडे काही ‘इमोशनल कोशंट’ फॉरवर्ड करता येण्यासारखं नसतं …संपदाशी गप्पा मारता मारता आजच्या पिढीची कथा आणि व्यथा समजली. त्या व्यथेमधलाच एक भाग फॉरवर्ड केला.

  • पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

बॉलिवूडमध्ये दोन नव्या प्रॉडक्शन कंपन्या लाँच; श्रेयस तळपदे पुन्हा करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन

0

चित्रपट, नाटक, मालिका, संगीत यांची आवड ज्यांना मनापासून असते किंवा या माध्यमांच्या मदतीने आपण प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करायला हवे अथवा करु शकतो अशी भावना ज्यांच्या मनात असते त्या व्यक्ती मनोरंजनसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख बनवण्यासाठी विशेष मेहनत घेत असतात. मग ती व्यक्ती कलाकार, गायक, दिग्दर्शक असू शकते किंवा एखादी नवीन प्रॉडक्शन कंपनी ज्याच्या अंतर्गत अनेक मनोरंजक प्रकल्पांची निर्मिती करण्यात येईल.

‘वेगवेगळ्या जॉनरच्या माध्यमातून, नवीन कथेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले जावे’, या हेतूने सध्या अनेक नवीन प्रॉडक्शन कंपन्यांची निर्मिती होत आहे. त्यापैकी हरिहरन अय्यर यांची ‘साईश वेंच्युअर सोल्युशन्स प्रा. लि.’ आणि राज भट्टाचार्य यांची ‘ओम साई राज फिल्म्स’ प्रॉडक्शन कंपनी या दोन नवीन प्रॉडक्शन कंपन्या नुकत्याच लाँच करण्यात आल्या आहेत. लाँचिंगनंतर हरिहरन अय्यर आणि राज भट्टाचार्य यांनी त्यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटाची घोषणा केली ज्याचे नाव आहे ‘सरकार की सेवा में’. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता श्रेयस तळपदे करणार असून महत्त्वाची भूमिका देखील श्रेयसने साकारली आहे. या प्रॉडक्शन कंपनीच्या लाँचिंग सोहळ्यात निर्माते हरिहरन अय्यर, राज भट्टाचार्य, दिग्दर्शक श्रेयस तळपदे, चित्रपटातील कलाकार सुधीर पांडे, ब्रिजेंद्र काला, श्रध्दा जैसवाल, अनिल चरणजीत, चेतना पांडे उपस्थित होते.

‘साईश वेंच्युअर सोल्युशन्स प्रा. लि.’चे हरिहरन अय्यर आणि ‘ओम साई राज फिल्म्स’चे राज भट्टाचार्य यांनी त्यांच्या प्रॉडक्शन कंपनीविषयीची माहिती उपस्थित मिडीयाला देऊन त्यांच्याशी संवाद साधला.

सत्य घटनेपासून प्रेरित असलेला ‘सरकार की सेवा में’ या चित्रपटाच्या नावावरुनच चित्रपटाविषयीची उत्सुकता निर्माण होते की, हा चित्रपट नेमक्या कोणत्या गोष्टीवर आधारित आहे, यामध्ये काय मजेशीर पाहायला मिळणार इत्यादी. प्रेक्षकांना लवकरच या चित्रपटाची झलक आणि श्रेयस तळपदेचे दिग्दर्शन कौशल्य पुन्हा एकदा पाहायला मिळेल.

अजय गोगावलेंच्या आवाजातील ‘सुंदरा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

0

मध्यमवर्गीय बंडखोर बाईची एक बंडखोर गोष्ट असलेला ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि ट्रेलरमधून स्त्री आणि बायको यांमध्ये अडकलेल्या आईच्या आयुष्यात येणा-या अनेक घडामोडींची झलक प्रेक्षकांनी पाहिली. सई ताम्हणकर, निखिल रत्नपारखी आणि राजेश श्रृंगारपुरे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे.

तरुणी, आई आणि बायको म्हणून भूमिका साकारताना, प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देताना स्त्रीला तडजोड ही कधी ना कधी करावीच लागते. ही तडजोड कधी स्वत:च्या अस्तित्वासाठी असते तर कधी नात्यांसाठी. आयुष्य म्हटलं की नात्यांचा सहवास, त्यांचा गुंता, नात्यात होणा-या विचारांची देवाण-घेवाण या आपसूक आल्याच…पण या सर्व प्रसंगाना अगदी धैर्याने सामोरी जाते ती चित्रपटाची नायिका म्हणजेच सई ताम्हणकर.

ट्रेलरनंतर या चित्रपटाचे पहिले गाणे आज प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. ट्रेलरमधून जशी प्रेक्षकांना चित्रपटाची झलक पाहायला मिळाली त्याचप्रमाणे या गाण्यातून देखील सईच्या भूमिकेचा अंदाज प्रेक्षकांना घेता येईल. अजय गोगावले यांचा आवाज सर्वांच्या मनावर राज्य करतो आणि त्यांच्या आवाजाची जादू ही सर्वत्र पसरली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अजय गोगावलेंच्या आवाजातील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हे गाणं प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. अजय यांनी गायलेले हे गाणे अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये टॉपला नक्कीच असेल याची खात्री आहे. गाण्याच्या आवाजानंतर थेट काळजाला भिडतात ते गाण्याचे शब्द… या गाण्याचे शब्द पण प्रेक्षकांना आवडतील, भावतील कारण गाण्याचे बोल गजेंद्र अहिरे यांनी लिहिले आहेत. संगीत दिग्दर्शन पण गजेंद्र अहिरे आणि त्यांच्या सोबतीला चैतन्य अडकर यांनी केले आहे.

स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्मिता गानू यांनी केली आहे तर सहनिर्मिती अजित माधवराव पोतदार आणि सीमा निरंजन अल्पे यांनी केली आहे. प्रशांत गोखले हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत येत्या २२ नोव्हेंबरला ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.