Home Blog Page 2806

५५० व्या गुरुनानक जयंती निमित्त आयोजित मिरवणुकीचे मुस्लीम बांधवांकडून स्वागत

0

‘अवामी महाज ‘ सामाजिक संघटनेचा सहभाग

पुणे:शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या ५५० व्या  जयंती निमित्त शीख बांधवानी आयोजित केलेल्या  मिरवणुकीचे क्वार्टर गेट येथे मुस्लीम बांधवांकडून स्वागत करण्यात आले . ‘अवामी महाज ‘ सामाजिक संघटनेने त्यासाठी पुढाकार घेतला.’अवामी महाज’चे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्यासह अनेक मुस्लीम बांधवानी या मिरवणुकीत सहभागी होवून सलोखा आणि परस्पर प्रेमाचे दर्शन घडवले.’अवामी महाज‘चे सचिव वाहिद बियाबानी,मौलाना महमद हुसेन कासमी,अब्दुल वहाब शेख,मश्कुर शेख,शफाकत शेख ,हाजी इम्तियाझ ,मुमताज सय्यद इत्यादी सहभागी झाले .

मिरवणुकीत सहभागी पुण्यातील गुरुद्वाराच्या  विश्वस्तांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला .शीख बांधवाना फुले आणि पिण्याच्या  पाण्याचे वाटप करण्यात आले .

‘रुरल इंडिया ‘ वार्षिक परिषदेचा समारोप

0
पुणे : ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘तर्फे  पुण्यात  ‘रुरल इंडिया ‘  या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .   ‘ग्रामीण भारताच्या प्रगतीत उपेक्षितांचा समावेश ‘ या विषयावर परिषदेत चर्चा झाली . देशभरातील तज्ज्ञ ,स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी ,धोरणकर्ते ,संशोधक त्यात सहभागी झाले . वारजे ,पुण्याच्या ‘बाएफ ‘ संस्थेच्या सभागृहात  ७ ते ९ नोव्हेंबर रोजी ही परिषद पार पडली  . राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी स्टडीज  चे संचालक  विजय महाजन यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन ७ नोव्हेंबर रोजी झाले  . टाटा ट्रस्ट्स चा एक सामाजिक उपक्रम असलेले ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘ हे या परिषदेचे आयोजक होते.
   पहिल्या दिवशी ‘भारतातील कृषी भवितव्य -सामाजिक उद्योजकतेच्या भारतातील प्रेरणादायक कथा ‘ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले . या पुस्तकात भारतातील विविध राज्यामध्ये काम करीत असलेल्या,कृषी क्षेत्रातील १५ सामाजिक उद्योजकांचा (सोशल इंटरप्रायजेस ) चा परिचय करून देण्यात आला आहे .
‘विकासान्वेष फाउंडेशन ‘ चे संचालक संजीव फणसळकर ,सल्लागार अजित कानिटकर, गिरीश सोहनी (संचालक ,बाएफ )  ,गीतांजय साहू (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ),बिश्वदीप घोष (अर्घ्यम संस्था ),व्ही. विवेकानंदन ,पूर्णेन्दु कावुरी हे मान्यवर परिषदेत सहभागी झाले . परिषदेतील विविध विषयांवरील चर्चासत्रात दिना जीजीभॉय(फाउंडेशन फॉर इक्विटी अँड वेल बीइंग ),डॉ शर्वरी शुक्ला (सिम्बायोसिस स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ),सरस्वती पद्मनाभन (टाटा ट्रस्टस )डॉ अन्वर जाफरी ,अमीर उल्लाह खान ,अशोक दलवाई (रेनफेड एग्रीकल्चर ऍथॉरिटी ,केंद्रीय कृषी मंत्रालय ),श्रीजित मिश्रा ,सी. शंभू प्रसाद ( ईसीड ईर्मा ), बिक्षम गुज्जा (अॅग श्री, हैदराबाद ), उषा गणेश, अंशू भारतीय, मारुती चापके ( गो फॉर फ्रेश, मुंबई )हे मान्यवर सहभागी झाले  .  परिषदेत महाराष्ट्र आणि भारतातील अनेक राज्यातून सुमारे १५० तज्ज्ञ उपस्थित होते .
  ग्रामीण भारताशी संबंधित मह्त्वाच्या विषयांवर ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘  ने वर्षभर केलेले संशोधन या परिषदेत मांडले गेले  . देशभरातील संशोधकांचे संशोधनपर निबंध सादर केले गेले . शाश्वत शेतीच्या पद्धती ,ग्रामीण भागातील उपजीविका ,मुस्लिम समाजाचे उच्च शिक्षणातील कमी प्रमाण ,स्थलांतर ,’कीटकनाशकांचे परिणाम ,विकास आणि प्रसारमाध्यमे ‘अशा अनेक विषयांवर तीन दिवस  चर्चा झाली  .

गांधी कुटूंबियांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जबाबदार राहणार – रमेश बागव

0

पुणे-गांधी कुटूंबियांच्या जीवाला काही धोका निर्माण झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
गृहमंत्री अमीत शहा हे जबाबदार राहतील. केंद्र सरकारने गांधी कुटूंबियांना पुन्हा एस.पी.जी. संरक्षण
द्यावे अन्यथा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशारा पुणे
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी या पत्रकाद्वारे दिला आहे.

बागवे यांनी या पत्रकात असेही म्हटले आहे कि,सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना

असणारे एस. पी. जी. चे संरक्षण काढूनघेण्याचा निर्णय केंद्रिय गृहमंत्रालयाने घेतलेला आहे.

इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोन्ही नेत्यांचे दहशतवाद्यांकडून हत्या झाल्यानंतर गांधी कुटूंबातील

व्‍यक्तींना एस.पी.जी. संरक्षणदेण्यात आले होते. त्यांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन त्यांना एस.

पी.जी. चे संरक्षण देण्यात आले होते. मोदी सरकारच्या या निर्णयाला काँग्रेस पक्षाने तीव्र विरोध केलेला आहे.

माजीपंतप्रधान स्व. व्‍ही.पी.सिंग यांनी स्व. राजीव गांधी यांची एस.पी.जी. सुरक्षा काढून घेतली होती.
‍त्यानंतर दोन वर्षातच राजीव गांधी यांची हत्या झाली. गांधी परिवार देशातील करोडो लोकांचे व
काँग्रेस कार्यकर्त्यांचे प्रेरणा स्थान आहे. गांधी कुटूंबियांनी देशाच्या ऐक्यासाठी आपल्या प्राणाची
आहुती दिली. गांधी कुटूंबियांचे एस.पी.जी. संरक्षण काढून घेण्याचा निर्णय मोदी सरकारने सूडबुध्दीने
घेतलेला आहे. माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी गांधी कुटूंबियांची एस. पी. जी. सुरक्षा
चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसच्या राजवटीत माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी
यांना एस.पी.जी. ची सुरक्षा चालू ठेवली होती. मोदी सरकारच्या राज्यात काही सामाजिक संघटनेच्या
प्रमुखांना कारण नसताना झेड प्लसची सुरक्षा देण्यात आली आहे. केवळ त्या संघटना भारतीय
जनता पक्षाशी निगडीत आहेत म्हणून त्यांच्या प्रमुखांना झेड प्लसची सुरक्षा देण्यात आली आहे.

भाजपा सरकारच्या आर्थिक धोरणाने देश हैराण- काँग्रेसचा पुण्यात मोर्चा

0

पुणे-भाजपा  सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिटणीस सोनलबेन पटेल यांच्या नेतृत्वाखाली फडके चौकातून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचे 8 नोव्हेम्बर रोजी सकाळी मोर्चा नेला.

या आंदोलनात शहराध्यक्ष रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, अविनाश बागवे, नीता राजपूत आदि मान्यवर  या आंदोलनात सहभागी झाले . नोटबंदी, जीएसटीमुळे देशात मोठी मंदी आहे.तरुणांच्या हाताला काम नाही. छोट्या छोट्या कंपन्या बंद पडत आहेत. मोठ्या कंपन्यांही याचा फटका बसला आहे. लोकांच्या खिशातून मोदी सरकारने पैसा काढून घेतला आहे. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. या सर्व बाबींचा विचार करून मोदी सरकार विरोधात काँगेस आक्रमक झाली आहे. या आंदोलनात ‘मोदी सरकार हाय हाय, बीजेपी सरकार हाय हाय’, अशा घोषणा देण्यात  आल्या.

19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत संयुक्त क्लब संघाची व्हेरॉक संघावर मात

0

पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू  भालेकर करंडक निमंत्रित १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात सिद्धांत दोषी 47 याच्या अर्धशतकी खेळीसह रोहित हडके(4-54), सोहेल शेख(3-61) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर संयुक्त क्लब संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा 55 धावांनी पराभव करून विजय मिळवला. तर एमसीए संयुक्त जिल्हा संघ व डेक्कन जिमखाना यांच्यातील सामना अनिर्णित राहिल्यामुळे पहिल्या डावाच्या आघाडीवर 5 गुणांची कमाई केली.

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत दोन दिवसाच्या लढतीतील सामन्यात काल संयुक्त क्लब संघाने 54.1 षटकात 233 धावा केल्या. याच्या उत्तरात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघ 27.5षटकात अवघ्या 61धावावर संपुष्टात आला व त्यामुळे संयुक्त संघाने पहिल्या डावात 172 धावांची आघाडी मिळाली. आज संयुक्त क्लब संघाने 32.1षटकात 7बाद118धावावर डाव घोषित करून व्हेरॉक संघाला 290 लक्ष विजयासाठी दिले. यामध्ये सिद्धांत दोषी 47, वरून नेने नाबाद 19 यांनी धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना  व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघ 52षटकात 235धावावर संपुष्टात आला. यात अमन मुल्ला 50, यज्ञेश मोरे 44, आदिराज कदम 16, रोहित चौधरी 16 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. संयुक्त क्लबकडून रोहित हडके 4-54, सोहेल शेख 3-61, मिहीर किल्लेदार 1-37 यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 55धावांनी विजय मिळवून दिला. सामनावीर रोहित हडके ठरला.

दुसऱ्या डेक्कन जिमखाना क्लब क्रिकेट मैदानावरील सामन्यात एमसीए संयुक्त जिल्हा संघाने आज 82षटकात 5 बाद 280धावावर आपला डाव घोषित केला. यात अभिषेक पवार नाबाद 131, वेंकटेश काणे 38, सौरभ गढक 34, सनतकुमार माळगे 18, प्रथमेश बजाज 17 यांनी धावा केल्या. याच्या उत्तरात डेक्कन जिमखाना संघाचा डाव 50.3षटकात 147धावावर संपुष्टात आला. यात अजय बोरुडे 58, यशोधन शुक्ला 13, सुहेल श्रीखंडे 13, अथर्व वनवे 14, श्लोक धर्माधिकारी नाबाद 27यांनी धावा केल्या. एमसीए संयुक्त जिल्हा संघाकडून रामेश्वर दौड 4-30, रिषभ बंसल 2-12, ओंकार मोहिते(2-19), वेंकटेश काणे(1-8)यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला पहिल्या डावात 133धावांची आघाडी मिळवून दिली.  पण अनिर्णित ठरलेल्या सामन्यात एमसीए संयुक्त जिल्हा संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर डेक्कन जिमखानाचा पराभव केला व 5 गुणांची कमाई केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदान: पहिला डाव:  संयुक्त क्लब संघ: 54.1 षटकात सर्वबाद 233 धावा(मिहीर किल्लेदार 62(90), नचिकेत वेर्लेकर नाबाद 70(58), रोहित हडके 37(35), शिवम ठोंबरे 31, यश जागडे  4-13, हर्षवर्धन पवार 3-43, विकी ओस्वाल 1-46, अमन मुल्ला 1-55) वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी:27.5षटकात सर्वबाद  61धावा(अद्वैत मुळ्ये 30(66), सोहेल शेख 5-15, वरून नेने 4-4, रोहित हडके 1-9); पहिल्या डावात संयुक्त क्लब संघाकडे 172 धावांची आघाडी;

दुसरा डाव: संयुक्त क्लब संघ: 32.1षटकात 7बाद118धावा(डाव घोषित)(सिद्धांत दोषी 47(70), वरून नेने नाबाद 19, यश जगदाळे 2-18, रोहित चौधरी 2-17, आदिराज कदम 1-11) वि.वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 52षटकात सर्वबाद 235धावा(अमन मुल्ला 50(58), यज्ञेश मोरे 44(80), आदिराज कदम 16, रोहित चौधरी 16, रोहित हडके 4-54, सोहेल शेख 3-61, मिहीर किल्लेदार 1-37); संयुक्त क्लब 55धावांनी विजय; सामनावीर-रोहित हडके;       

डेक्कन जिमखाना क्लब क्रिकेट मैदान: पहिला डाव: एमसीए संयुक्त जिल्हा संघ: 82षटकात 5 बाद 280धावा(डाव घोषित)(अभिषेक पवार नाबाद 131(163), वेंकटेश काणे 38(49), सौरभ गढक 34(64), सनतकुमार माळगे 18, प्रथमेश बजाज 17, ओंकार मोहिते नाबाद 26, आर्यन बांगले 2-62, श्लोक धर्माधिकारी 2-74, रेहान खान 1-64) वि.डेक्कन जिमखाना: 50.3षटकात सर्वबाद 147धावा(अजय बोरुडे 58(91), यशोधन शुक्ला 13, सुहेल श्रीखंडे 13, अथर्व वनवे 14, श्लोक धर्माधिकारी नाबाद 27, रामेश्वर दौड 4-30, रिषभ बंसल 2-12, ओंकार मोहिते 2-19, वेंकटेश काणे 1-8); एमसीए संयुक्त जिल्हा संघाकडे 133धावांची आघाडी; 

राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या विनिथ मुत्याला, सिद्धार्थ मराठे, परी चव्हाण यांचा अंतिम फेरीत प्रवेश

0

औरंगाबाद-एड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स्‌ सनराईज्‌ 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या विनिथ मुत्यालाने   दिल्लीच्या  अधिरी अवल याचा तर  सिद्धार्थ मराठेने  महाराष्ट्राच्या  जैष्णव शिंदेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात  महाराष्ट्राच्या परी चव्हाणने सायना देशपांडेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली

इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस्‌ कॉम्पलेक्स्‌ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या विनिथ मुत्यालाने दिल्लीच्या अधिरी अवल याचा 7-6(6), 0-6, 6-3 असा टायब्रेकमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या सिद्धार्थ मराठेने  आपला राज्य सहकारी जैष्णव शिंदेचा 6-1, 6-1 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुहेरी गटात महाराष्ट्राच्या काहिर वारीकने कर्नाटकच्या ऋषिल खोसलाच्या साथीत हरियाणाच्या वंश नांदल व वितिन राठी या जोडीला 6-4, 3-6, 10-1 असा पराभव करत दुहेरीचे विजेतेपद  पटकावले. 

मुलींच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या नवव्या मानांकीत परी चव्हाणने आपल्या राज्य सहकारी सायना देशपांडेने 7-6(6),0-6, 6-3 असा टायब्रेकमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तमिळनाडूच्या चौथ्या मानांकीत कुंदना भंडारूने महाराष्ट्राच्या सहाव्या मानांकीत  रुमा गायकैवारीचा 6-4, 6-2 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुहेरीच्या विजेतेपदासाठीच्या लढतीत तमिळनाडूच्या कुंदना भंडारूने मध्य प्रदेशच्या काश्वि शुक्लाच्या साथीत दिल्लीच्या रिया सचदेव व हरियाणाच्या नंदिनी दिक्षितचा 6-1,6-4 असा पराभव करत दुहेरीचे विजेतेपद  पटकावले. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुले: उपांत्य फेरी:     
विनिथ मुत्याला(महाराष्ट्र)  वि.वि अधिरी अवल(दिल्ली) 7-6(6), 0-6, 6-3
सिद्धार्थ मराठे(महाराष्ट्र)वि.वि. जैष्णव शिंदे(महाराष्ट्र)   6-1, 6-1
 
दुहेरी गट- अंतिम फेरी- मुले
काहिर वारीक(महाराष्ट्र)/ऋषिल खोसला(कर्नाटक) वि.वि वंश नांदल(हरियाणा)/वितिन राठी(हरियाणा) 6-4, 3-6, 10-1
 
मुली: उपांत्य फेरी:    
परी चव्हाण(9)(महाराष्ट्र) वि.वि सायना देशपांडे(महाराष्ट्र) 7-6(6),06, 6-3
कुंदना भंडारू(4)(तमिळनाडू) वि.वि रुमा गायकैवारी(6)(महाराष्ट्र)6-4, 6-2       
 
दुहेरी गट- अंतिम फेरी- मुली  
कुंदना भंडारू(तमिळनाडू)/काश्वि शुक्ला(मध्य प्रदेश) वि.वि रिया सचदेव(दिल्ली)/नंदिनी दिक्षित(हरियाणा) 6-1,6-4

एमएसएलटीए योनेक्स सनराईज अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरिज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत देशभरातून 120हुन अधिक खेळाडू सहभागी

0
पुणे-   डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व एपीएमटीए यांच्या संलग्नतेने एमएसएलटीए योनेक्स सनराईज अखिल भारतीय मानांकन  चॅम्पियनशिप   सिरिज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत राज्यातून 120हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. हि स्पर्धा  डेक्कन जिमखाना येथील टेनिस कोर्ट येथे दि. 9  ते 11 नोव्हेंबर 2019 या कालावधीत रंगणार आहे.
 
स्पर्धेसाठी मुंबई, कोल्हापुर, सांगली, नगर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, खामगाव, सोलापुर येथुन प्रवेशीका आल्या आहेत. 

खोटारडेपणा मान्य करा तोपर्यंत चर्चा नाही; उद्धव ठाकरे

0

मुंबई- देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केल्यानंतर आता शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  पत्रकार परिषद घेतली .

पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

  • ‘गेल्या ५ वर्षांत आम्ही कुठेही महाराष्ट्राच्या विकास कामांच्या आड राजकारण येऊ दिलं नाही.’
  • पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबावर खोटारडेपणाचा आरोप
  • आम्ही जर भाजपसोबत नसतो तर ते विकास करू शकले नसते
  • आज शिवसेना प्रमुखांच्या मुलावरती खोटे आरोप झाले
  • अमित शहांचा संदर्भ देऊन आमच्यावर खोटेपणाचा आरोप केला गेला, पण जनतेला सर्व माहिती आहे कोण खोटं बोलतय
  • शब्द देऊन फिरवण्याची भाजपची वृत्ती
  • अमित शहा, देवेंद्र फडणवीस आले होते तेव्हा युतीची चर्चा थांबली त्याच कारण मी होतो
  • शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ,असे ते म्हणाले होते. परंतु मला ते मान्य नव्हतं त्यामुळे चर्चा थांबवली आणि मी तेथून निघून आलो.
  • मी खोटा नसून भाजप खोटे आहे
  • मुख्यमंत्रीपदाबाबत तेव्हाच ठरलं होत. तेव्हा फडणवीस म्हणाले हे आता जाहीर झालं तर मला पक्षांतर्गत प्रॉब्लेम होईल
  • लोकसभेत आमच्या गळ्यात अवजड मंत्रिपद बांधलं
  • मी भाजपला शत्रुपक्ष मानत नाही ते गेल्या पाच वर्षात सतत खोटं बोलत आहेत
  • मी तुमची अडचण समजून घेतली हा माझा गुन्हा का?
  • मी भाजपला शत्रु मानत नाही, पण भाजपने खोटं बोलू नये
  • साताऱ्याची जागा शिवसेनेला दिलेली ती उदयनराजेंसाठी सोडली ते विसरलेत का

 

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न

0

पुणे दि8 :- राम जन्मभूमी– बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाच्या अनुशंगाने कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली.

    येत्या काही दिवसात राम जन्मभूमी– बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहेया निकालाचा सर्वांनी आदर ठेवून शांतता राखावीअसे आवाहन जिल्हाधिकारी राम व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केलेतसेच नागरिकांनी सोशल मिडीयासंदर्भात दक्ष रहावे असे आवाहनही त्यांनी केले.

      जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटीलपिंपरी चिंचवडचे सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळनिवासी उपजिल्हाधिकारी डॉजयश्री कटारे आदींसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारीसामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

सातव्या पुणे-गोवा 645कि.मी.डेक्कन क्लिफहँगर सायकल शर्यत

0
पुणे,दि.8 नोव्हेंबर 2019: सातव्या पुणे-गोवा 645कि.मी.डेक्कन क्लिफहँगर सायकल शर्यत स्पर्धेत वैयक्तिक(सोलो)गटात 37 सायकलपटूंसह, सांघिक प्रकारात 32 क्लबने आपला सहभाग नोंदविला आहे. ही सायकल शर्यत शनिवार, दि.9 नोव्हेंबर रोजी प्रारंभ होणार आहे.
 
स्पर्धेच्या संचालिका आणि फ्रांसमधील 1200कि.मी.शर्यतीस पात्र ठरलेल्या पहिल्या भारतीय महिला आणि अल्ट्रा सायकलिस्ट दिव्या ताटे यांनी सांगितले की, भारतांतील अल्ट्रा सायकलींसाठी प्रसिध्द असलेले पुणे येथे यावर्षी आयोजित या स्पर्धेत हैद्राबाद, गोवा, मैसूर, नवी दिल्ली, मुंबई, लातुर, बीड, नाशिक येथुन 350 सायकलपटू सहभागी झाले आहेत.
 
ही स्पर्धा वैयक्तिक(सोलो गट) आणि सांघिक गट(रिले टीम फॉरमॅट)या दोन प्रकारांत पार पडणार आहे. या स्पर्धेतील वैयक्तिक गटातील विजेता स्पर्धक रेस अॅक्रॉस अमेरिका(रॅम)या जगातील आव्हानात्मक सायकल शर्यतीसाठी पात्र ठरणार आहे. या सायकल शर्यतीमध्ये स्पर्धकांसमोर 32 तासात 643कि.मी.अंतर पूर्ण करण्याचे आव्हान असते. रेस अॅक्रॉस अमेरिका(रॅम)ही 5000 कि.मी. अंतराचा टप्पा असलेली अल्ट्रा सायकल शर्यत असून उत्तर अमेरिका खंड, कॅलिफोर्निया येथील समुद्रापासून ते वॉशिंग्टन डी.सी अशी सायकल शर्यत असते. रॅम शर्यतीमध्ये सोलो रायडर्सला 12 दिवसांत ही शर्यत पूर्ण करावी लागत असून यामध्ये दिवसाला 450 ते 600कि.मी अंतर पूर्ण करावे लागत असल्याचे ताटे यांनी नमुद केले. या वर्षी स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे पुण्यातील राजलक्ष्मी तेली, प्रियांका पवार, नेहा टिकम व मुंबईच्या स्वाती सबलोक या चार महिला रेस अॅक्रॉस अमेरिका(रॅम) स्पर्धेतसाच्या पात्रतेसाठी प्रयत्न करणार आहेत

सिक्स रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत सुरज राठी, संकेत मुथा यांचा बाद फेरीत प्रवेश

0

पुणे, 8 नोव्हेंबर 2019: द पूना क्लब लिमिटेड आणि बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या संलग्नतेने  बीएसएएम सिक्स रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत सुरज राठी, संकेत मुथा या खेळाडूंनी आपली विजयी मालिका कायम ठेवत बाद फेरीत प्रवेश केला.

पूना क्लब येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत डबल एलिमनेशन फेरीत पुण्याच्या सुरज राठी याने मुंबईच्या शयान राझमीचा 4-3(27-41, 22-44, 49-24, 55-13, 32-22, 36-27) असा संघर्षपूर्ण पराभव करून सलग तिसऱ्या विजयासह बाद फेरी गाठली.

पुण्याच्या माधव जोशीने अमरदीप घोडकेचा 4-1(37-05, 49-15, 22-37, 42-05, 29-17) असा तर पुण्याच्या साद सय्यदने चिपळूणच्या सिद्धेश मुळ्येचा 4-1(08-47, 53-06, 61(49)-09, 38-21, 35-23) असा पराभव करून अंतिम पात्रता फेरीत धडक मारली. साद याने आपल्या खेळीत तिसऱ्या फ्रेममध्ये 49 गुणांचा ब्रेक नोंदविला. मुंबईच्या अजिंक्य येलवेने आपला शहर सहकारी अनंत मेहताचा 4-3(17-39, 39-09, 19-31, 34-15, 22-30, 28-18, 36-33) असा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: डबल एलिमनेशन राउंड:
अनंत मेहता(मुंबई)वि.वि.ओमर फारुकी(औरंगाबाद)4-3(17-27, 44-20, 09-29, 03-32, 35-11, 38-08, 42-11);
अश्विन पळणीतकर(पुणे)वि.वि.पोरस शहा(मुंबई)4-2(36-23, 38-12, 24-39, 11-33, 47-21, 45-08);
सुरज राठी(पुणे)वि.वि.शयान राझमी(मुंबई)4-3(27-41, 22-44, 49-24, 55-13, 32-22, 36-27);
अमरदीप घोडके(पुणे)वि.वि.अभिषेक बजाज(मुंबई) 4-3(09-36, 33-32, 00-39, 40-14, 21-51, 30-21, 54-09);
माधव जोशी(पुणे)वि.वि.तुषार सावदी(पुणे)4-3(35-17, 10-45, 29- 22, 08-44, 41-09, 06-48, 32-22);
साद सय्यद(पुणे)वि.वि.निलेश पळणीतकर(पुणे)4-1(36-01, 34-08, 28-24, 19-53, 40-01);
अनंत मेहता(मुंबई)वि.वि.रोहन सहानी(मुंबई)4-2(21-31, 34-20, 36-19, 31-17, 16-48, 37-05);
राजवर्धन जोशी(पुणे)वि.वि.निशाद चौघुले(पुणे)4-1(42-26, 32-19, 44-17, 20-29, 36-18);
माधव जोशी(पुणे)वि.वि.अमरदीप घोडके(पुणे)4-1(37-05, 49-15, 22-37, 42-05, 29-17);
साद सय्यद(पुणे)वि.वि.सिद्धेश मुळ्ये(चिपळूण)4-1(08-47, 53-06, 61(49)-09, 38-21, 35-23);
अजिंक्य येलवे(मुंबई)वि.वि.अनंत मेहता(मुंबई) 4-3(17-39, 39-09, 19-31, 34-15, 22-30, 28-18, 36-33);

अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटपाचा विषय कधीच माझ्यासमोर झाला नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा

0

मुंबई- सरकार बनवताना भाजप कोणताही घोडेबाजार करणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. भाजपकडून आमदारांच्या फोडाफोडीचा प्रयत्न सुरू असल्याचे सर्व आरोप फडणवीस यांनी फेटाळून लावले.फोडाफोडीचे राजकारण आम्ही कधीही केलेले नाही. याबाबत जर कुणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते जाहीर करावेत, असे आव्हानच फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्रात जे नवं सरकार येईल ते भाजपच्या नेतृत्वाखालीच येईल. हा माझा विश्वास आहे, असेही फडणवीस पुढे म्हणाले.

शिवसेना मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर ठाम असून सेनेच्या सर्व आमदारांनी यासंबंधाचे सर्व अधिकार पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिले आहेत. दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार नसल्याने सत्तास्थापनेचा तिढा अजुनही सुटलेला नाहीये. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे. त्यानंतर ते सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेली
त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपकडून सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे फोडाफोडीचे राजकारण केले जाणार नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

 

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमधील महत्वाचे मुद्दे..

१)अडीच अडीच वर्षाचा प्रस्ताव नाही

अडीच-अडीच वर्षे हा फॉर्म्युला ठरलेलाच नाही, हे मी आजही सांगतो आहे. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर आमची बोलणी फिस्कटली होती त्यानंतरच्या माझ्यासमोरच्या एकाही चर्चेत हा विषय झाला नाही. उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात जर विषय झालेला असेल तर मला माहित नव्हतं. मी तसं अमित शाह आणि नितीन गडकरी यांना विचारलं मात्र त्यांनीही असं काहीही ठरलेलं नाही असं सांगितलं. या संदर्भातले समज-गैरसमज चर्चेने सोडवता आले असते. मात्र शिवसेनेने आमच्याशी चर्चाच केली नाही. मित्रपक्षाशी चर्चा करण्याऐवजी ते काँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा केली. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याशी शिवसेनेने चर्चा केली. मात्र त्यांना आमच्याशी चर्चा करावीशी वाटली नाही.

२)युती तुटलेली नाही

आम्ही महायुतीसाठी अद्यापही तयार आहेत. त्यामुळे युती तुटली आहे असं मी म्हणणार नाही. आमची खंत मात्र दूर व्हायला हवी त्यानंतर शिवसेनेशी चर्चा होईल. आम्ही आजूनही चर्चेसाठी तयार आहोत, त्यामुळे आमच्यातील मतभेद दूर झाल्यास मिळून सरकार स्थापन करु.

३)सत्तेत बसून टीका सहन होणार नाही

सत्तेत असतानाही शिवसेनेकडून वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर बड्या नेत्यांवर टीका केली जात होती. हे आम्हाला मान्य नाही. अशी टीका सहन केली जाणार नाही. विरोधी पक्षातील नेत्यांनी केलेली वक्तव्य आम्ही समजू शकतो. पण आमच्या सोबत केंद्रात आणि राज्यातही राहायचं आणि खालच्या पातळीवर टीकाही करायची, हे चालणारं नाही.

४)आजूबाजूची लोकं दरी वाढवणारी विधाने करतात

उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूची लोकं ज्याप्रकारे वक्तव्य करत आहेत, त्यांनी सरकार होत नसतं, आम्हाला उत्तर देता येत नाही, असं समजू नये. जबरदस्त भाषेत उत्तर देण्याची क्षमता आमच्यातही आहे, पण आम्ही देणार नाही. आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही. त्यांच्या अशा वक्तव्यांमुळेदोन्ही पक्षांमध्ये दरी निर्माण होते.

५)उद्धव यांचे ते विधान धक्कादायक

विधानसभेच्या निकालाच्या दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद घेतली. पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सत्ता स्थापनेसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे वक्तव्य केले. त्यांनी केलेले हे वक्तव्य आमच्यासाठी धक्कादायक होते.

६)माझा फोन उचलला नाही

गेली पाच वर्षे उद्धव ठाकरे यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. अनेकदा मी त्यांच्याशी चर्चा नाही. मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन केले पण त्यांनी ते उचलले नाही. चर्चेची दारं आमच्याकडूून खुली होती. भाजपासोबत चर्चाच करायची नाही हे धोरण शिवसेनेचे आहे आमचे नाही. दिवसातून अनेकदा शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा व्हायची. मात्र आमच्यासोबत चर्चा करण्यात शिवसेनेला रस नव्हता. काही मुद्दे असतील तर ते चर्चेने सुटले असते मात्र शिवसेनेने चर्चा करण्याची तयारी दाखवली नाही.

७)आम्ही कधी विरोधी विधान केला नाही

आम्ही तोडणारी नाही जोडणार लोक आहोत. आम्ही आमची मर्यादा कधीच ओलांडली नाही. आम्ही उद्धवजींबद्दल एकही वक्तव्य केलं नाही. गेल्या दहा दिवसात नरेंद्र मोदींवर ज्या खालच्या दर्जाची टीका झाली. त्यामुळे अशा सरकारमध्ये सोबत रहाव का? हा प्रश्न माझ्या मनात आहे.

८)शिवसेनेशी युती का केली?

हिंदुत्व या एकमेव मुद्द्यावर आम्ही पुन्हा युती करण्याचा निर्णय घेतला. मात्र जेव्हा युतीची चर्चा झाली तेव्हा व्यक्तीगत टीका केली जाणार नाही यासंदर्भात आमची त्यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी अशाप्रकारची टीका केली जाणार नाही असं स्पष्ट केलं होतं.

९)काळजीवाहू मुख्यमंत्री

मी आज दुपारी राज्यपालांकडे माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. मात्र राज्यपालांच्या सांगण्यावरून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मी यापुढे काम करणार आहे.

१०)घोडेबाजाराचा आरोप करणाऱ्यांना आव्हान

भाजपा सरकार तयार करताना कोणतंही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही. आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी.

मुख्यमंत्रिपद देणार असाल तरच फोन करा – ठाकरेंचा भाजपला थेट इशारा

0

मुंबई- राज्यात सत्ता संघर्ष शिगेला पोहचला आहे. भाजप मुख्यमंत्री पदावरून आपला हक्क सोडण्यास तयार नाही तर दुसरीकडे शिवसेनेनही मुख्यमंत्री पद दिल्याशिवाय चर्चा होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बैठकीत उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. या बैठकीनंतर आता उद्धव ठाकरे यांची भूमिका समोर आली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, ”मला स्वतःहून युती तोडायची नाही. भाजपने त्यांचा निर्णय घ्यावा. लोकसभेवेळी जे ठरलं त्याप्रमाणे व्हावं. भाजप अध्यक्ष अमित शाहा यांच्यासोबत सगळे ठरलं होतं. सत्तेचे समान वाटप हा फॉर्म्युला होता. युती कायम राहावी हीच इच्छा आहे. मात्र भाजपनं दिलेला शब्द पाळावा. ठरल्याप्रमाणे अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे देणार असाल तरच भाजपने फोन करावा,” अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतल्याची माहिती आहे.

 

बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत करणे आवश्यक – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे :- बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत केली तर बालकामगार प्रथा समूळ नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. आजची ही लहान मुले उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. उज्ज्वल भारताच्या भविष्यासाठी या मुलांना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज येथे केले.

            बाल कामगार प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने समाजाच्या विविध घटकामध्ये या प्रथेविषयी जनजागृती करण्यासाठी 7 नोव्हेंबर 2019 ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीत जिल्हयात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, कामगार उप आयुक्त विकास पनवेलकर, सहायक कामगार आयुक्त चेतन जगताप, सहायक कामगार आयुक्त अजित खरात, कामगार अधिकारी डी. डी. पवार, कामगार अधिकारी एस.एच. चोभे आदी उपस्थित होते.

           जिल्हाधिकारी राम म्हणाले, बालकामगार प्रथा बंद झाली पाहिजे. बालकांचे हरविलेले बालपण त्यांना मिळवून दिले पाहिजे. केवळ चरितार्थ चालत नाही म्हणून बालवयात कामगार म्हणून काम करणाऱ्या मुलांना त्यांचे हरविलेले बालपण परत मिळवून देण्यासाठी आता सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. घरकाम, विटभट्टीवर, बांधकाम, हॉटेल, कचरा/भंगार वेचणे अशा अनेक उद्योगात ही मुले काम करतात. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. बालकामगारांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनामार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. बालकामगारांच्या या मोहीमेत स्वयंसेवी संस्थांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

     बालकामगारांना शाळेची विशेष गोडी लागावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, बालकामगार शिक्षणापासून वंचित असतात. बालकामगारांवर याबाबतीतील संस्कार करुन, शिकण्याची गोडी लावून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.

बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत केली तर बालकामगार प्रथा समूळ नष्ट होण्यास वेळ लागणार नाही असा विश्वासही राम यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक करताना उप आयुक्त विकास पनवेलकर म्हणाले, या अभियानामध्ये विविध संस्थाचालक, मालक यांच्या बैठका घेवून बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम,1986 ची माहिती देणे, तसेच यावर चर्चासत्रे आयोजित करून आस्थापना मालक, चालक यांचेकडून बाल कामगार कामावर न ठेवणेबाबत हमीपत्र लिहून घेणे, दुकाने तसेच आस्थापनेमध्ये बालकामगार कामावर न ठेवणेबाबतचे स्टीकर दर्शनी भागात प्रदर्शित करणे, स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचे सहकार्याने अत्यल्प उत्पन्न असणाया पालकांचे प्रबोधन करणे, पत्रके वाटणे, वस्तीमधील लोकांना बाल कामगार निर्मूलन कार्यक्रमात सामावून घेणे, विविध प्रसार माध्यमातून बालकामगार प्रथेविरूध्द जनजागृती करणे, पथनाट्य प्रचार फेरी इत्यादी माध्यमातून जनजागृती करणे तसेच रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरामध्ये बाल कामगार प्रथा विरोधी स्वाक्षरी मोहिम राबविणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बालकामागार जागृती संदर्भातील पोस्टर्सचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. यावेळी कामगार विभागाचे अधिकारी, कर्मचारी व स्वंयसेवी संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विकास प्रक्रियेत ग्रामीण उपेक्षितांना न्याय मिळावा : परिषदेतील सूर

0
पुणे : ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘तर्फे  पुण्यात  आयोजित  ‘रुरल इंडिया ‘  या  दुसऱ्या वार्षिक परिषदेचे उद्धाटन ७ नोव्हेंबर रोजी सकाळी वारजे येथील ‘ बाएफ ‘ संस्थेच्या सभागृहात  झाले.   ‘ग्रामीण भारताच्या प्रगतीत उपेक्षितांचा समावेश ‘ या विषयावर परिषदेत चर्चा होत असून देशभरातील तज्ज्ञ ,स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी ,धोरणकर्ते ,संशोधक त्यात सहभागी झाले आहेत .
पुण्याच्या वारजे येथील  ‘बाएफ ‘ संस्थेच्या सभागृहात  ७ ते ९ नोव्हेंबर रोजी ही परिषद सुरू झाली आहे . राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी स्टडीज  चे संचालक  विजय महाजन यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता  झाले . गिरीश सोहनी (संचालक ,बाएफ ), अंशू भारतीय, उषा गणेश, बिक्षम गुज्जा, सी. शंभू प्रसाद हे मान्यवरही उदघाटन कार्य्रक्रमात उपस्थित होते. परिषदेचे आयोजक असलेले   ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘ हा टाटा ट्रस्ट्स चा एक सामाजिक उपक्रम आहे .  ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘ चे संचालक संजीव फणसळकर ,सल्लागार अजित कानिटकर उपस्थित होते.
 पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात ‘भारतातील कृषी भवितव्य -सामाजिक उद्योजकतेच्या भारतातील प्रेरणादायक कथा ‘ या पुस्तकाचे प्रकाशन  झाले . या पुस्तकात भारतातील विविध राज्यामध्ये काम करीत असलेल्या,कृषी क्षेत्रातील १५ सामाजिक उद्योजकांचा (सोशल एंटरप्रायजेस ) चा परिचय करून देण्यात आला आहे . परिषदेच्या उदघाटन सत्रात  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले . सामाजिक उद्योजकतेचे भवितव्य ( सोशल एंटरप्रायजेस ) या विषयावर झालेल्या परिसंवादात गिरीश सोहनी ( अध्यक्ष, बाएफ ), सी. शंभू प्रसाद ( ईसीड ईर्मा  ), बिक्षम गुज्जा (अॅग श्री, हैदराबाद ), उषा गणेश, अंशू भारतीय, मारुती चापके ( गो फॉर फ्रेश, मुंबई ), अजित कानिटकर ( विकासान्वेश फाऊंडेशन ) सहभागी झाले.
‘ विकासक्षेत्रात संशोधनाची आवश्यकता ‘ या विषयावर डॉ. विजय महाजन यांचे बीजभाषण झाले.
‘विकासाच्या निरंतर प्रक्रियेत नवे संशोधन ,तंत्रज्ञान आणि विकासाचे फायदे उपेक्षित आणि ‘नाही रे ‘ वर्गापर्यंत नेले पाहिजेत. सामाजिक उद्योजकतेचे फायदे -तोटे सहानुभूतीपूर्वक पाहताना सामाजिक उद्योजकतेबाबत जागरूकता वाढवली पाहिजे ‘ असे प्रतिपादन डॉ. विजय महाजन यांनी उद्घाट्न प्रसंगी बोलताना केले.
ते म्हणाले, “सामाजिक उद्योजकाला स्वयंसेवी कार्यकर्त्याचे ह्रदय आणि उद्यमशील डोके असले पाहिजे. भारतासारख्या देशात या उद्योजकाने सतत स्वतः त आणि सभोवती सुधारणा करीत राहिले पाहिजे. “
 परिषदेत महाराष्ट्र आणि भारतातील अनेक राज्यातून सुमारे १५० तज्ज्ञ उपस्थित  आहेत . गीतांजय साहू (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ),बिश्वदीप घोष (अर्घ्यम संस्था ),व्ही. विवेकानंदन ,पूर्णेन्दु कावुरी हे मान्यवर परिषदेत सहभागी  आहेत.
परिषदेतील विविध विषयांवरील चर्चासत्रात दिना जीजीभॉय(फाउंडेशन फॉर इक्विटी अँड वेल बीइंग ),डॉ शर्वरी शुक्ला (सिम्बायोसिस स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ),सरस्वती पद्मनाभन (टाटा ट्रस्टस )डॉ अन्वर जाफरी ,अमीर उल्लाह खान ,अशोक दलवाई (रेनफेड एग्रीकल्चर ऍथॉरिटी ,केंद्रीय कृषी मंत्रालय ),श्रीजित मिश्रा हे मान्यवर सहभागी  आहेत .
 ग्रामीण भारताशी संबंधित मह्त्वाच्या विषयांवर ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘  ने वर्षभर केलेले संशोधन या परिषदेत मांडले  . देशभरातील संशोधकांचे संशोधनपर निबंध सादर केले जात आहेत. शाश्वत शेतीच्या पद्धती ,ग्रामीण भागातील उपजीविका ,मुस्लिम समाजाचे उच्च शिक्षणातील कमी प्रमाण ,स्थलांतर ,’विकास आणि प्रसारमाध्यमे ‘अशा अनेक विषयांवर तीन दिवस  चर्चा होत आहे .