Home Blog Page 2805

नवाजुद्दिन सिद्दिकी यांनी हॅलोच्या फ्रायडेफिव्हर शोमध्ये सांगितले “मोतीचूर चकनाचूर” या त्यांच्या नव्या सिनेमाच्या दृष्यांबद्दलचे किस्से

0

नवी दिल्ली: मोतीचूर चकनाचूर या नव्या सिनेमाच्या प्रदर्शनाबद्दल अतिशय खुष असणारे लोकप्रिय अभिनेते नवाजुद्दिन सिद्दिकी यांनी हॅलोच्या फ्रायडेफिव्हर या प्रमुख ऑनलाइन शोच्या आजच्या एपिसोडमध्ये सिनेमाविषीचे रंजक किस्से सांगितले. हॅलोच्या युजरनी या एपिसोडच्या प्रोमोला भरभरून प्रतिसाद दिला असून, प्रोमोज सुरू केल्यापासून केवळ 4 दिवसांत मिळाले तब्बल 10 दशलक्ष व्ह्यूज, 20,000+ लाइक व 1000 हून अधिक शेअर्स नोंदवले आहेत.

फ्रायडेफिव्हर हा वैशिष्ट्यपूर्ण ऑनलाइन शो हॅलोवरील चाहत्यांना त्यांच्या सिनेमातील आवडत्या कलाकारांच्या नजिक आणतो. या शोमुळे कलाकारांना त्यांच्या आगामी सिनेमाबद्दलची उत्सुकता व अपेक्षा व्यक्त करण्याची संधी मिळते. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी कलाकारांच्या मनामध्ये निर्माण होणारी अस्वस्थता टिपणाऱ्या या शोमध्ये धमाल प्रश्नोत्तरे रंगतात.

या एपिसोडदरम्यान, नवाजुद्दिन सिद्दिकी यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी #हॅलोफ्रायडेफिव्हर प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. जसे, सिनेमातील उत्साही व चिंतामुक्त पात्र साकारण्यासाठी त्यांनी कशी तयारी केली. त्यांनी वैयक्तिक अनुभवांविषयी बोलताना, अनेक टप्प्यांवर मिळालेल्या नकाराचा सामना कसा केला, तसेच त्यांचे जीवनातील ध्येय काय आहे, याविषयी सांगितले. मेहनत करणे आणि कधीही हार न मानणे, हे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. आणखी एका फेरीमध्ये, नवाजुद्दीन यांनी त्यांच्या अभिनयातील कारकिर्दीविषयी आणि लोकप्रिय बनत असताना त्यांना तोंड द्याव्या लागलेल्या आव्हानांविषयी अनेक किस्से सांगितले. शोच्या अखेरीस त्यांनी प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये काही गमतीशीर प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट करण्यासाठी “अपारंपरिक” हा शब्द अनेकदा वापरला जात असल्याचे त्यांनी मान्य केले.

15 नोव्हेंबर 2019 रोजी प्रदर्शित होत असलेल्या मोतीचूर चकनाचूर या सिनेमामध्ये नवाजुद्दिन सिद्दिकी व अथिया शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बायको मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या 36 वर्षीय पुरुषाची ही कथा आहे.

हॅलोच्या मागील एपिसोडमध्ये तापसी पन्नू व भूमी पेडणेकर यांनी त्यांच्या ‘सांड की आँख’ या सिनेमाबद्दल सांगितले. या एपिसोडनेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले. हा एक एपिसोड 9,78,000 हून अधिक व्ह्यूजद्वारे असंख्य लोकांपर्यंत पोहोचला. युजर्सनी या एपिसोडचा पुरेपूर आनंद घेतला आणि सिनेमाच्या यशासाठी या कलाकारांना शुभेच्छा दिल्या.

लता मंगेशकर रुग्णालयात दाखल

0

मुंबई-लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी श्वसनास त्रास झाल्यानंतर लता मंगेशकरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचं कारण नसल्याचं सांगितलं जात आहे.

संजय राउत लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल

0

 

मुंबई – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राउत यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना सोमवारी चेक-अपसाठी बोलावले होते. तत्पूर्वी त्यांना छातीत दुखण्याचा त्रास होता. परंतु, रुग्णालयात नेताना उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राउत यांना दाखल करावे लागले आहे. याच ठिकाणी राहून त्यांच्यावर विविध प्रकारच्या चाचण्या घेऊन उपचार केले जात आहेत. त्यामुळे, राउत यांनी किमान दोन दिवस विश्राम करावा अशा सूचना डॉक्टरांकडून देण्यात आल्या आहेत. संजय राउत यांच्या अनुपस्थितीत सुभाष नार्वेकर, अनिल परब आणि अनिल देसाई यांच्यावर पक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, संजय राउत यांची स्ट्रेस टेस्ट घेण्यात आली होती. त्यानंतरच डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. यात त्यांची एन्जिओग्राफी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागले. तेव्हापासूनच रोज तीन-चार वेळा संजय राउत माध्यमांशी संवाद साधत होते. त्यानंतरही भाजपवर मुख्यमंत्री पदासाठी दबाव टाकणे असो वा आपल्या पक्षाची भूमिका मांडणे, सर्वच घटनाक्रमात शिवसेनेकडून संजय राउत सर्वात पुढे होते. त्यातही राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणावर भाजपने सत्ता स्थापनेत असमर्थ असल्याचे सांगितले, शिवसेनेवर टीका केली. यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी 24 तासांची वेळ गेली, त्यावेळी सुद्धा संजय राउत यांनी प्रखरपणे आपली भूमिका मांडली. संजय राउत यांनी डॉक्टरांची आधीच अपॉइंटमेंट घेतली होती. अर्थात त्यांना आधीपासूनच छातीत दुखण्याचा त्रास होता असे कळते. परंतु, अगदी अपॉइंटमेंटच्या दिवशी (सोमवारी) सुद्धा त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. त्यातच राउत यांना आता रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.

या बालदिनी तुमच्या मुलांचे डिजिटल डिटॉक्स करण्यासाठी पाच मार्ग

0

आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात मुलं जास्तीत जास्त वेळ घरातच बसून घालवतात. बहुतेक मुलं टीव्ही, स्मार्टफोन्स आणि इतर गॅजेट्सना चिकटून असतात. ते क्वचितच शरीराला व्यायाम देतात किंवा बाहेर जाऊन खेळतात.

ना – नफा तत्वावर काम करणाऱ्या आणि लहान मुलांच्या तंत्रज्ञानविषयक सवयींचा मागोवा घेणाऱ्या कॉमन सेन्स मीडिया या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 8 ते 12 वर्ष वयोगटातील मुलं दररोज ऑन- स्क्रीन मीडियावर किमान 4 तास 44 मिनिटं घालवतात, तर किशोरवयीन मुलांमध्ये हेच प्रमाण सरासरी 7 तास 22 मिनिटे आहे. विशेष म्हणजे यात शाळेसाठी किंवा गृहपाठ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रीन मीडियाचा समावेश केलेला नाही. व्हिडिओ पाहात – बहुतेक वेळेस यु- ट्यूबवर घालवला जाणारा वेळ अंदाजे दुप्पट म्हणजे दिवसाला एक तास इतका झाला आहे.

पालकांसाठी ही चिंतेची बाब झाली आहे. नॅशनल ट्रस्ट सर्व्हेमध्ये (83 टक्के) प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पालकांनी मुलांनी तंत्रज्ञान आत्मसात करणं महत्त्वाचं वाटत असल्याचं सांगितलं, तर दहापैकी नऊ पालकांना आपल्या मुलांनी बाहेरच्या जगात, निसर्गाशी नाते जोडत आपले बालपण घालवावे असे वाटत असल्याचे सांगितले.

याची दखल घेत फेव्हिक्रिएटमधील तज्ज्ञांनी बालदिनानिमित्त मुलांच्या डिजिटल डिटॉक्ससाठी काही मार्ग सुचवले आहेत.

कलाकुसरीत सहभाग

मुलांना कलाकुसरीमध्ये गुंतवा. त्यांना आपली सर्जनशीलता उंचावण्यासाठी चौकटीबाहेरचा विचार करण्यासाठी चालन द्या. हस्तकलेत गुंतल्याने मुलांच्या मेंदूला चालना मिळते आणि त्यांची एकाग्रता वाढते. कलेमुळे मुलांना वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये आत्मसात करता येतात, शिवाय शिकण्याप्रती व्यवहार्य दृष्टीकोन विकसित करण्यात मदत होते. कल्पक आणि सर्जनशील निर्मिती करण्याची भावना मुलांना आपण काहीतरी साध्य केल्याचे समाधान देते. मुलांना डु- इट- युअरसेल्फमधून मूलभूत कौशल्ये विकसित करता येतात, शिवाय त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

या बालदिनी मुलांना त्यांची कलाकुसर दाखवू द्या आणि आकर्षक वस्तू तयार करत मजेत शिक्षण घेऊ द्या. त्यांना रिसायकल केलेल्या साहित्यापासून रोबोट बनवता येईल, स्लाइम बनवता येईल, Fevicreate.com वर देण्यात आलेल्या वेगवेगळ्या संकल्पना वापरून फ्रीज मॅग्नेट बनवता येईल. तुम्हाला फेव्हिक्रिएट डीआयवाय किटसुद्धा खरेदी करता येईल, ज्यात एका बॉक्समध्ये मजेदार गोष्टी दिलेल्या आहेत.

बाहेर खेळा

मुलांना सगळ्यात जास्त आवडतं, ते बागेत खेळणं. झोक्यापासून घसरगुंडीपर्यंत मुलांना सगळं काही तिथे खेळता येतं. फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेटसारखे खेळ आणि दोरीच्या उडया, सायकलिंगसारख्या इतर गोष्टी… ही यादी न संपणारी आहे. मोकळ्या हवेत खेळण्यामुळे शारीरिक विकास होतो, शिवाय तो मुलांची शैक्षणिक क्षमता विकसित करण्याचा अभिनव मार्ग आहे. बाहेर खेळण्यामुळे मुलांचे संवादकौशल्य सुधारते, कारण त्यांना आपणहून आपल्या कोशातून बाहेर येऊन तर मुलांशी बोलावे लागते. त्याशिवाय विकासाच्या टप्प्यावर असताना मैदानी खेळ मुलांना मोटर सेन्स, हात व डोळ्यांचा समन्वय आणि एकंदर कामगिरी उंचावण्यास मदत करतात. तेव्हा तुमच्या मुलांना मोकळ्या हवेत खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या व त्यांना काही मजेदार खेळ खेळू द्या.

 घड्याळाचे काटे थांबवा आणि वाचत राहा

आई- बाबाही कधी काळी लहान होते आणि ते न्यायी पांडव, बिरबलाचं चातुर्य, विक्र- वेताळच्या गोष्टी वाचत मोठे झाले. या गोष्टींनी त्यांना काही महत्त्वाचे धडे शिकवले. मुलांना गुंतवून ठेवणाऱ्या गोष्टी सांगताना त्यांच्याबरोबरचं नातं घट्ट करणं, शिवाय गोष्टींतून आयुष्यातले महत्त्वाचे धडे देणं अशी दोन्ही कामं पालकांना करता येतील.

 संगीत, नृत्य, नाट्य इत्यादी

मुलांना गायन, नृत्यासारखे छंद लावण्यासाठी प्रोत्साहन द्या, कारण त्यातून मुलांचा भावनिक विकास होतो. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढतो, स्टेजवर सादरीकरण करताना मुलांना वाटणारी भीती यातून कमी होते. या गोष्टी मुलांचे कलागुण समोर आणण्यास, त्यांची सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीसा चालना देण्यास मदत करतात.

 सहलीला जा

मुलांना ट्रेकिंग, हायकिंग, कॅम्पिंगसाठी घेऊन जा. त्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम करतील असे नवीन खेळ आणि उपक्रम आजमावू द्या.

‘एच सी एम टी आर’ संपूर्ण प्रकल्पच रद्द करण्याची मागणी

0
पुणे:उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग (‘एच सी एम टी आर’) प्रकल्प आर्थिकदृष्ट्या खरेच व्यवहार्य आहे का? असा सवाल नागरिक कृती समितीने  प्रशासनाला आणि पालिकेला विचारला आहे. कृती समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात यावर प्रश्नचिन्ह उमटवले आहे. अव्यवहार्यतेच्या मुद्द्यावर संपूर्ण प्रकल्पच रद्द करण्याची मागणी ‘एच सी एम टी आर नागरिक कृती समितीने पत्रकाद्वारे केली आहे.   डॉ.सुषमा दाते , सारंग याद्वाडकर,प्राजक्ता दिवेकर ,सुमिता काळे ,पुष्कर कुलकर्णी ,रवी सिन्हा ,कनिझ सुखरानी ,गौरी मेहेंदळे ,वैशाली पाटकर ,हेमा चारी ,आशुतोष प्रधान ,नरेंद्र थत्ते ,तसेच प्रकल्पग्रस्त नागरिकांचा या कृती समितीत समावेश आहे .
१९ सप्टेंबर २०१९ च्या शासन आदेशानुसार राज्य शासन या प्रकल्पाला निधी देणार नाही किंवा कर्जासाठी कोणतीही  हमी देणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले  आहे . भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच फेब्रुवारी २०१९ मध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामुळे ती अवैध  आहे . या सर्व  कृतीनी  नागरिकांच्या मनात प्रशासनाप्रति अविश्वास निर्माण झाला आहे . सप्टेंबर २०१९ मध्ये  पुणे मनपाने पुन्हा एकदा  एकूण  ३६ किमी मार्गमध्ये ११ठिकाणी बदल  करून सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतली होती व त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे फेब्रुवारीची निविदा  अव्यवहार्य  ठरली आहे . प्रकल्प खर्चाची तपासणी तटस्थ संस्थेमार्फत करण्याची आवश्यकता असताना तशी तपासणी केली गेली नाही. केंद्रीय व्हीजीलंन्स  समिती कडे हे मुद्दे नेण्याची गरज आहे .खर्चाचा अंदाज, निविदा, बदलेला  मार्ग याचा कुठेही ताळमेळ नसल्याचे दिसून येते .
पालिकेकडून सातत्याने या प्रकल्पाच्या खर्चाबद्दल नागरिकांची दिशाभूल करण्यात येत होती. ₹५,१९२ कोटी  अंदाज खर्चाचा हा प्रकल्प मंजूर आलेल्या निविदेद्वारे ४० टक्क्यांनी वाढून ७,५३५ कोटी पर्यंत नेण्यात आला होता. मार्गावरील प्रस्तावित सुविधांचा  खर्च, तसेच  भूसंपादनाचा योग्य  खर्च अंदाजामध्ये विचारात घेतलेला  नाही . तो गृहीत धरला असता तर हा प्रकल्पाचा अंदाज खर्च  ₹८,५७२ कोटींच्याही वर जातो . पालिकेने भूसंपादनाचा गृहीत धरलेला खर्च देखील अंदाजापेक्षा बराच कमीच होता असे लक्षात येते . भूसंपादनासाठी गृहीत धरलेला खर्च अत्यंत अव्यवहार्य होता. भूसंपादनात मोबदला, नुकसानभरपाई व दिलाशापोटी  द्यावयाची रक्कम कायद्यांन्वये अनिवार्य  आहे , अशा अनेक बाबींचे स्पष्टीकरण पालिकेने दिलेले नाही. ही जाणीवपूर्वक केलेली दिशाभूल  आहे .
हा प्रकल्प हायब्रीड अन्युइटी मॉडेलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बनवलेला  असून, त्या करीता केंद्र शासनाने मदत करणे अपेक्षित आहे,असे पालिकेने म्हटले होते . केंद्र शासनाची गृहीत धरलेली मदत मिळणार नाही, हे पंतप्रधान कार्यालयाच्या अशा  इतर हायब्रीड अन्युइटी मॉडेल प्रकल्पांबाबत दिलेल्या आदेशावरून स्पष्ट झालेले आहे .
केंद्र आणि राज्य सरकार तयार नसताना पालिका कोणत्या मार्गाने हा प्रकल्प पूर्ण करणार, याचे उत्तर मिळालेले नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे  आणि  सर्व आक्षेपांचे  निरसन केल्याखेरीज   प्रकल्पाची एक वीटही रचणे अशक्य आहे ही वस्तुस्थिती आहे . तरीही निविदांची घाई करण्यात आली. पार्किंग, सेस, टोल, जाहिरातीद्वारे इ. द्वारे निर्माण होऊ शकणारे  उत्पन्नाच्या बाबीबद्दल  बिलकूल  स्पष्टता नाही  .
हा प्रकल्प लाखो पुणेकर नागरिकांच्या भवितव्याशी निगडित असल्याने व प्रकल्प नियोजनात  अनेक त्रुटी समोर आल्याने, सर्वांच्या  नागरी हितासाठी गठित झालेल्या कृती समितीने  या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेच्या सुरुवातीपासूनच शंका उपस्थित केल्या,आक्षेप घेतले.   त्या शंका ,आक्षेप रास्त आहेत याची खात्री समितीला आहे .

‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या संहितेचे रायगडावर पूजन

0

शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणार्‍या मुळशी पॅटर्न या चित्रपटाच्या जबरदस्त यशा नंतर लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे हे एक अतिशय भव्य ऐतिहासीक चित्रपट घेऊन येत आहेत सरसेनापती हंबीरराव’. या अतिभव्य ऐतिहासीक चित्रपटाच्या संहितेचे पूजन हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडावर महाराष्ट्रातील पाच शेतकर्‍यांच्या हस्ते करून प्रविण तरडे यांनी पुन्हा एक आदर्श पायंडा पाडला आहे.

या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी रायगडचा आसमंत दुमदुमला, भगव्या रंगाच्या फेट्यांनी वातावरण उल्हासीत झाले होते. तत्पूर्वी चित्रपटाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या अतिभव्य ऐतिहासीक मराठी चित्रपटाची निर्मिती उर्विता प्रॉडक्शन्स यांची आहे.  

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला. रायगडावर रंगलेल्या या मंगलमय सोहळ्याला चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, संदीप रघुनाथराव मोहिते पाटील, धर्मेंद्र सुभाष बोरा व सौजन्य सुर्यकांत निकम तीन निर्माते तसेच  धैर्यशील मोहिते पाटील, डीओपी महेश लिमये, अभिनेता राकेश बापट, सुनील अभ्यंकर, रमेश परदेशी, अमोल धावडे, सुनील पालकर, तेजपाल वाघ, निखिल चव्हाण, अनिरुद्ध दिंडोरकर, शिवव्याख्याते आणि इतिहास संशोधक सौरभ करडे, मार्केटिंग डायरेक्टर विनोद सातव, कार्यकारी निर्माते विशाल चांदणे यांच्यासह विविध गावातील शेतकरी, माजी सैनिक आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीडचे ग्रामस्थ आणि चित्रपटाचे कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.

कुठल्याही स्टुडीओचे पाठबळ नसताना, केवळ समाजभान जपणाऱ्या विषयाच्या बळावर प्रविण तरडे यांच्या मुळशी पॅटर्नया चित्रपटाने घवघवीत यश मिळवले. सरसेनापती हंबीररावया चित्रपटातून प्रविण तरडे आता ऐतिहासिक विषय घेऊन आले आहेत. सरसेनापती हंबीररावया अतिशय भव्यदिव्य मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते तसेच बहिर्जी नाईक, सोयराबाई, औरंगजेब, संताजी धनाजी आणि सर्जाखान या महत्वाच्या भूमिका पडद्यावर कोण साकारणार याबद्दल औत्सुक्य निर्माण झाले आहे, तसेच लवकरच चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होणार असून २०२० मध्ये सरसेनापती हंबीररावप्रदर्शित होणार आहे.

प्राजक्ता गायकवाड पडद्यावरच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही रणरागिणी!

0
मराठी प्रेक्षक हा मुळातच अतिशय चोखंदळ आहे. प्रतिभेला तितकीच साजेशी दाद कशी द्यायची हे तर मराठी प्रेक्षकांकडूनच शिकावे. अशीच दाद मिळवणारी प्राजक्ता गायकवाड ही छोट्या पाड्यावरील एक अतिशय प्रतिभासंपन्न अभिनेत्री. सध्या ती  ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ह्या प्रसिद्ध मराठी मालिकेमध्ये एक महत्वाची म्हणजेच ‘महाराणी येसूबाईची’ भूमिका वठवत आहे. संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडून सांगणारी ही एक सुप्रसिद्ध मालिका. सध्यातरी प्राजक्ता ह्या मालिकेच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त झालेली दिसत आहे. ह्या मालिकेचे चित्रीकरण आणि एकीकडे इंजिनियरिंगचा अभ्यास ह्या दोन्ही आघाड्यांवर सध्या ती अतिशय समर्थपणे लढत आहे.
अभिनयाचे क्षेत्र काही तिच्यासाठी नवीन नाही. मराठी प्रेक्षकांनी यापूर्वीही तिला ‘लक्ष्य’ आणि ‘नांदा सौख्यभरे’ ह्या मालिकांमध्ये सहअभिनेत्री म्हणून पहिले आहेच. २०१६ मध्ये ‘कलर्स मराठी’ वरील ‘तू माझा सांगाती’ ह्या प्रसिद्ध मालिकेमध्ये तिने ‘संत सखुबाई’ ची महत्वाची भूमिका केली होती. आताही तितकीच महत्वपूर्ण अशी ‘महाराणी येसूबाई’ ही भूमिका मिळण्यामागे नुसते तिचे सौंदर्यच नव्हे तर तिची अभिनयाविषयीची तळमळ सुद्धा तितकीच कारणीभूत आहे.
नुकत्याच एका प्रसिद्ध वृत्तमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीमधून तिने स्वतःच्या वैयक्तिक आयष्यावरही प्रकाश टाकला. “हुजूरपागा गर्ल्स हायस्कुल पुणे ” मधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनापासूनच ती अनेक सांस्कृतिक उपक्रमांमधून हिरीरीने भाग घेत असे. अनेक एकांकिका स्पर्धांमधून आपल्या अभिनयाची चुणूक तिने शालेय जीवनातच दाखवली होती. दहावीत असताना तिने ९२% गुण मिळवले. केवळ अभिनयात किंवा सांस्कृतिक उपक्रमांतच नव्हे  तर संस्कृत आणि मराठी भाषेच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून तिने शिक्षकांचीही मने जिंकली.
जेव्हा ‘महाराणी येसूबाईची’ भूमिका तिला देण्यात आली तेव्हा ती गव्हर्नमेंटच्या पॉलीटेक्नीक कॉलेजमध्ये तीन वर्षाचा पदविकेचा अभ्यासक्रम पूर्ण करत होती. जेव्हा ह्या भूमिकेबद्दल तिला विचारण्यात आलं तेव्हा तिला हे ही माहित होते कि हा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. आपले पुढील वेळापत्रक किती व्यस्त असणार ह्याचे पूर्ण भान ठेऊनच तिने ही ऑफर स्वीकारली आणि ही दोन्ही आव्हान लीलया पेललीदेखील.
काही दिवसांपूर्वीच ती महाराणी येसूबाई ची वेशभूषा करून लॅपटॉप वर नोट्स वाचत असतानाच फोटो व्हायरल झाला होता. जे लोक आपल्या वेळेचं कारण देत कामांमध्ये चालढकल करतात अश्या लोकांसाठी प्राजक्ताचे हे उदाहरण म्हणजे डोळ्यात घातलेले सणसणीत अंजनच ठरेल. आपले शिक्षक आणि सहविद्यार्थी आपल्याला रोज होणाऱ्या लेक्चर्स बद्दल अद्ययावत राहण्यात मदत करत असल्याचेही प्राजक्ता आवर्जून नमूद करते.
शिक्षण आणि अभिनयाची ही दोन व्यवधाने सांभाळता सांभाळता प्राजक्ताला स्वतःच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करून चालत नाही. रोज ‘जिम’ ला जाणे आणि ‘डाएट प्लॅन’ काटेकोरपणे सांभाळणे या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःला ती एकदम फिट ठेवते. तिच्या मते शिक्षण हे आधुनिक जीवनशैलीतील एक महत्वाचा भाग आहे. “मला  असलेल्या रुचीमुळेच शूटिंग आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळणे शक्य होते”, असं ती म्हणते.
आता एका नव्या कोऱ्या फिल्ममधून मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास ही गुणी अभिनेत्री सज्ज झाली आहे. लवकरच ती याबाबतीत आपल्या चाहत्यांशी संवाद साधेल.

सत्तास्थापनेसाठी सेनेला राज्यपालांचे आमंत्रण -24 तासाचा दिला अवधी…

0

मुंबई-सत्ता स्थापन करण्यास भाजपानं असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. उद्या संध्याकाळी (११ नोव्हेंबर) साडेसात वाजेपर्यंत शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासंदर्भात भूमिका मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे

भाजपानं सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं आहे.

युती तुटली कि नाही ..अजूनही कोणी स्पष्ट बोलेना …

0

पुणे- मुख्यमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत वाद झाल्याने विधानसभा बरखास्त होवूनही दुसरी विधानसभा अस्तित्वात येवू शकलेली नसताना आज सर्वात मोठा पक्ष म्हणजे सर्वाधिक जागा निवडून आलेल्या पक्षाने म्हणजे भाजपने राज्यपालांनी सत्ता स्थापने साठी  आमंत्रण दिलेले असतानाही आपण सत्ता स्थापन करू शकत नाही असे आज सायंकाळी राज्यपालांना भेटून सांगितले . या दरम्यान शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अद्याप देखील युती तुटल्याचे जाहीर केले नाही . किंवा आमची युती आता आहे किंवा नाही याबाबत काहीही वाच्यता केलेली नाही . या दोन्ही पक्षांनी एकत्रित पणे युती करून निवडणूक लढविली आणि बहुमत प्राप्त केले होते.

भाजपा सरकार स्थापन करू इच्छित नाही -चंद्रकांतदादा पाटील

0

मुंबई – शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला. त्यामुळे आता आम्ही सरकार स्थापन करणार नाही. असे भाजपने राज्यपालांना कळवले आहे. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना, भाजप आणि महायुतीला स्पष्ट बहुमत दिले होते. परंतु, शिवसेना आमच्यासोबत येत नाही. शिवसेना जनादेशाचा अपमान करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सत्ता स्थापित करत असेल तर आमच्याकडून शुभेच्छा… असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. भाजप सत्ता स्थापन करू शकत नाही हे राज्यपालांना कळवले असेही ते पुढे म्हणाले.

राजभवनावर भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि गिरीष महाजन उपस्थित होते.

 

व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून अमित शहांच्या आदेशानंतर भाजपची नेते मंडळी राज्यपालांच्या भेटीला रवाना

0

मुंबई – महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना वर्षा बंगल्यावर भाजप कोअर टीमची दुसरी बैठकही संपली. या बैठकीनंतर भाजपची नेते मंडळी थेट राजभवनावर रवाना झाले. संध्याकाळी 4 वाजता सुरू झालेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय नेते भूपेंद्र यादव यांचीही उपस्थिती होती. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून सर्वांचे मार्गदर्शन केले. या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि भूपेंद्र यादव यांच्यासह पंकजा मुंडे यांनी देखील उपस्थिती नोंदवली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजपचे नेते माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचा पहिल्या डावावर विजय

0

पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू  भालेकर करंडक निमंत्रित १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना डेक्कन जिमखानाविरुद्धच्या अनिर्णित सामन्यात पहिल्या डावाच्या अधिक्यावर पाच गुणांची कमाई केली.

डेक्कन जिमखाना क्लबच्या क्रिकेट मैदानावर झालेल्या या दोन दिवसीय लढतीत काल डेक्कन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 81.4षटकात 229धावा केल्या. याच्या उत्तरात पीवायसी हिंदू जिमखाना संघाने कालच्या 1बाद 28धावावरून डावास सुरुवात केली. पीवायसी संघाने 85षटकात 5बाद 294 धावा केल्या. यात श्रेयश वालेकरने 118 चेंडूत 10चौकारांसह 70धावा, तर आदर्श बोथराने 134 चेंडूत 17चौकार व 1षटकारांसह 92धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. श्रेयश वालेकर व आदर्श बोथरा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 218चेंडूत 137धावांची भागीदारी केली. हे दोघेही बाद झाल्यानंतर अखिलेश गवळी 57धावा व आदित्य लोंढे 52 धावा यांनी चौथ्या गडयासाठी 150 चेंडूत  85धावांची भागीदारी करून संघाला 65 धावांची पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. डेक्कन जिमखानाकडून यश बोरामनीने 48धावात 4 गडी बाद केले. पीवायसी हिंदू जिमखाना संघाला 5गुण, तर डेक्कन जिमखाना संघाला 3 गुण देण्यात आले. पीवायसी संघाने 3 सामन्यात 18 गुणांची कमाई केली आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पहिला डाव: डेक्कन जिमखाना: 81.4षटकात सर्वबाद 229धावा(यश बांबोळी 74(124, 6×4, ), आर्यन बांगले 44(159, 4×4), यश बोरामनी 39(71), निकुंज बोबरा 16, अथर्व वाणवे 12, श्रेयश जीवने 12, अक्षय खोपडे 9, आर्य जाधव 20.4-51-6, आदर्श बोथरा  15-28-2, साहिल चुरी 12-40-1) वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 85षटकात 5बाद 294धावा(श्रेयश वालेकर 70(118), आदर्श बोथरा 92(134), अखिलेश गवळी  57(100), आदित्य लोंढे 52(94), साहिल मदन नाबाद 13, यश बोरामनी 21-48-4, कुणाल वाळुंज 10-25-1): पहिल्या डावात पीवायसी संघाकडे 65धावांची आघाडी;सामनावीर आदर्श बोथरा.

‘सिंधी प्रीमियर लीग सीजन २’ रंगणार डिसेंबरपासून

0

लीग क्रिकेट स्पर्धेतून मिळणारा निधी सामाजिक संस्थांना देणार; संयोजकांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे : देशभरात विखुरलेला सिंधी समाज एकत्रित यावा, तंदुरुस्तीचे महत्व पटवून द्यावे, तसेच मोबाईल-इंटरनेटच्या जाळ्यात न अडकता मैदानावरील खेळण्याला प्राधान्य द्यावे यासाठी आयोजित केली जाणारी सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा यंदा २ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०१९ या कालावधीत पिंपरी येथे रंगणार आहे. पिंपरी येथील एमसीसी, मृणाल क्रिकेट ग्राउंडवर या क्रिकेट स्पर्धा आयोजिल्या असून, त्याचे सिंधी प्रीमिअर लीग फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपण होणार आहे. स्पर्धेतून मिळालेला निधी सामाजउपयोगी आणि विधायक कामासाठी देण्यात येणार असल्याची माहिती कन्वल खियानी, हितेश दादलानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कमल जेठानी, अंकुश मुलचंदानी, नरेश नशा, करण अस्वाणी, अवि तेजवानी, अवि इसरानी, रवी दर्यानी आदी उपस्थित होते.

हितेश दादलानी म्हणाले, “पिंपरी चिंचवडमधील विविध क्षेत्रातील उदयोजक तरुणांनी एकत्र येऊन या क्रिकेट लीगचे आयोजन केले आहे. सिंधी प्रीमियर लीग सीजन २ चे उद्घाटन २ डिसेंबर रोजी होणार आहे. माजी रणजी क्रिकेटपटू कैलास घटानी, उद्योजक राजेश उत्तमचंदानी आणि रोहीत गेरा यांना उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. खेळाडू, संघ मालक आणि विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. या लीगच्या माध्यमातून तरुणांनाना इंटरनेटच्या जाळ्यातून बाहेर पडता यावे, लोकांना भेटावे, एकत्र खेळावे असा उद्देश समोर ठेऊन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा देशातील सर्व सिंधी समाजपर्यंत पोहचवायची आहे. एक दिवस जगभरातील सर्व सिंधी समुदायांना आपापल्या शहरांमध्येही अशी स्पर्धा आयोजित करता यावी, हा यामागचा उद्देश आहे. ‘सिंधी फक्त व्यवसायापुरतेच आहेत’ हा समज खोडून काढावा यासाठीही आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत.”

कन्वल खियानी म्हणाले, “गेल्या वर्षी पार पडलेल्या स्पर्धेस मोठ्या प्रमाणात खेळाडूंकडून प्रतिसाद मिळाला होता. फेसबुकवर जवळपास ५१ हजार लोकांनी ही स्पर्धा पहिली. त्यामुळे यंदा होत आलेल्या लीगसाठी व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून, पुणे आणि लगतच्या भागातून मोठ्या प्रमाणात खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. स्पर्धेच्या उद्घाटनादिवशी प्रत्येक खेळाडूने आपल्या सात वर्षांखालील मुलांना बरोबर घेऊन येणे बंधनकारक करण्यात आले आहे, जेणेकरून संपूर्ण कुटुंब या स्पर्धेत सहभागी होईल. त्यातून याला क्रीडा महोत्सवाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. आपली संस्कृती साजरी करणे आणि त्याचा प्रसार करणे हेही यामुळे साध्य होणार आहे. त्यातून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वंचितांच्या शिक्षणासाठी, विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य केले जाणार आहे. तीन सामाजिक संस्थांना प्रत्येकी ५१ हजार रुपये देणगी दिली जाणार आहे.”

या स्पर्धेतील प्रत्येक संघाचे नाव सिंधी समाजाशी आणि संस्कृतीशी निगडित आहे. त्यामध्ये मस्त कलंदर (गीता बिल्डर्स, मयूर तिलवानी), सुलतान ऑफ सिंध (आशुतोष चंदीरमणि, चंदीरमणि असोसिएट्स), मोहेंजोदरो वॉरियर्स (मिलेनियम सेमीकंडक्टर, हरीश अभिचंदानी), सिंधफूल रेंजर्स (अनूप झमटानी, झमटानी ग्रुप), एसएसडी फाल्कन (विकी सुखवानी, सुखवानी लाइफस्पेस), इंडस डायनामॉस (सुमित बोदानी, शगुन टेक्सटाईल), दादा वासवानीज ब्रिगेड (अनिल अस्वाणी, अस्वाणी प्रमोटर अँड बिल्डर), झुलेलाल सुपरकिंग्ज (पियुष जेठानी, जेठानी ग्रुप), हेमू कलानी ग्लॅडिएटर्स (बिपिन डाखनेजा, ट्रिओ ग्रुप), गुरुनानक नाइट्स (प्रकाश रामनानी, पीव्हीआर टाईल्स वर्ल्ड), संत कंवरम रॉयल्स (राहुल लाडकानी, व्हीआरए रोहित सेल्स), आर्यन युनायटेड (राजीव मोटवानी, रोहित इन्फ्रा) अशी या संघांची नावे आहेत. स्पर्धेत १२ संघ असून १५१ खेळाडूची नोंदणी झालेली आहे. संघ विकत घेतलेल्या मालकांकडून २५ लाख आभासी (व्हर्च्युअल) चलनातून १५१ खेळाडूंचा लिलाव करण्यात आला.

सुखवानी लाईफ स्पेसेस , बालाजी होम्स (चंडीरामणी असोसिएट्स), नुरिया होमेटेल हॉस्पिटॅलिटी (सागर व निखिल सुखवानी), रवि बजाज आणि रोहित तेजवानी, झिरो ग्रॅव्हिटी बार अँड किचन (ऋषी तेजवानी), उत्तम केटरर्स (नवजीत कोचर), बॉम्बे सॅन्डविच (मनीष मनसुखानी), विशाल प्रॉपर्टीज (विशाल तेजवानी) अँड सुखवानी बिल्डर्स (सुरेश सुखवानी), ट्रिनिटी ग्रीन्स (हितेश जेठानी, सागर मुलचंदानी), राजनीता इव्हेंट्स (निखिल अहुजा),  क्लासिक कलेक्शन (नीरज चावला) यांचे या स्पर्धंसाठी सहकार्य लाभले आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात अखेर…अमित शहा यांची एन्ट्री (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे)

0

मुंबई: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात अखेर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एन्ट्री घेतली आहे. अमित शहा थोड्याच वेळात महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणार असून या बैठकीत शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायचे की नाही? यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटी बैठक सुरू होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन आणि भाजपचे इतर नेते उपस्थित आहेत. महाराष्ट्र भाजपने राज्याच्या सत्तेचा तिढा सोडवण्याचे सर्व अधिकार अमित शहा यांना दिले आहेत. त्यामुळे अमित शहा या बैठकीला संबोधित करणार आहेत. या बैठकीत शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद द्यायचे की नाही? शिवसेनेशी युती करायची की नाही? याचा निर्णय घेण्यात येणार आहे

मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकालाच बसवणार – उद्धव ठाकरे

0

मुंबई-आपण अजुनही युती तोडलेली नाही मात्र मुख्यमंत्रिपदावर शिवसैनिकालाच बसवणार, महाराष्ट्रात आपलचं सरकार येणार आहे. मुंबईतील मालाड येथील  हॉटेल द रिट्रिटमध्ये शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना असा विश्वास दिला आहे.

काँग्रेसच्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झाल्याचे वृत्त असून, त्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कामाला लागल्याचे दिसत आहे.  हॉटेल द रिट्रीट येथे असलेल्या पक्षाच्या आमदारांबरोबर त्यांची सध्या चर्चा  सुरू आहे. तर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे शनिवारी सायंकाळपासून आमदारांबरोबरच असून ते देखील आमदारांचे मत जाणून घेत होते. त्यामुळे सत्ता स्थापनेच्यादृष्टीने आता उद्धव ठाकरे आमदारांशी नेमकी काय चर्चा करणार? चर्चेनंतर कोणता निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळाबरोबरच अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेना सरकारला पाठिंबा द्यावा म्हणून काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या नेत्यांवर दबाव वाढविला आहे. जयपूरमध्ये असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाच्या नेत्यांकडे ही आग्रही मागणी लावून धरली आहे. काँगेसच्या ४० आमदारांनी एकमातांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठींबा द्यावा असं बैठकीत सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बळावर शिवसेना सरकार सत्तास्थापन करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपाबरोबर जाण्यासाठी शिवसेनेच्या अनेक आमदारांनी नकार दर्शवला आहे. तर,काँग्रेसच्या पाठींब्यावर सत्ता स्थापनेसाठी अनुकुलता दर्शवली जात आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेच निमंत्रण दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’वर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर बोलताना भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, “अजून निर्णय झालेला नाही. चार वाजता पुन्हा बैठक होणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल,”अशी माहिती त्यांनी दिली.