Home Blog Page 279

संगमवाडी ते बंडगार्डन पूल ते मुंढवा पूल नदी किनारी स्वदेशी वृक्षांचे रोपण सुरु

पुणे-आज दि. ०५/०६/२०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सदर ठिकाणी पुणे महानगरपालिकेमार्फत वृक्ष रोपणाच्या कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अति. महापालिका आयुक्त (इस्टेट) पृथ्वीराज बी.पी. उपस्थित होते.

पुणे शहरातून मुळा, मुठा व मुळा मुठा नदीचा एकात्मिक पद्धतीने विकास करणे करीता पुणे महानगरपालिकेच्या नदी पुनरुज्जीवनप्रकल्प राबविणेत येत आहे. पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा व मुळा-मुठा या नद्यांची एकूण लांबी ४४.४० कि. मी. आहे.
संगमवाडी ते बंडगार्डन पूल (स्ट्रेच-९) या ३.७ कि.मी. लांबीचे काम व बंडगार्डन पूल ते मुंडवा पूल (स्ट्रेच-१० व ११) या ५.३ कि.मी. असे एकूण ९.० कि.मी. पर्यंत काम प्रगती पथावर आहे.
स्ट्रेच -९ मध्ये शादलबाबा दर्गा ते गणेश घाट या दरम्यान ३०० मी. नदीकाठ सुधारणेच्या प्रकल्पाचे काम पुर्ण झाले असून, स्ट्रेच-१० व ११ मध्ये कोरेगांव पार्क येथे ८०० मी. लांबीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
संगमवाडी ते बंडगार्डन पूल (स्ट्रेच-९) व बंडगार्डन पूल ते मुंढवा पूल (स्ट्रेच-१० व ११) मध्ये प्रामुख्याने सुभाबूळ, कुभाबूळ व काटेरीबाभूळ, विलायती चिंच प्रजातीमधील झाडे काढून सदर ठिकाणी विदेशी प्रजाती ऐवजी स्वदेशी रोपे नियोजन बध्द पध्दतीने लावण्यात येणार आहे.
नवीन लागवड करण्यात येणाऱ्या झाडांची नावे पुढील प्रमाणे :-
करंज, मेढसिंगी, कांचन, कदंम्ब, साग, मुचकुंद, रक्तरोहिडा, पिंपळ, कैलासपती, बकुळ, काळाकुडा, पानजांभूळ इ. फुले येणारी झाडे.
आंबा, जांभूळ, गुलार, पुत्रवंति, भोकर, खिरणी, अर्जुन, आसन, चिरंजी इ. फळझाडे जी पक्षांसाठी उपयोगी आहेत.
घोळ, अर्जुन, आंबा, खिरणी इ. पक्षांना घरटी बांधण्यासाठी उपयुक्त अशी झाडे.
लिंब, कदम्ब, जांभूळ, आंबा, बड इ. मोठी झाडे सावलीसाठी लावण्यात येत आहेत .नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा अंतर्गत सुमारे १० ते १५ फुट उंचीची १२५० रोपे लावण्यात आली आहेत. तसेच सदर १२५० रोपांपैकी ८५० रोपे वन विभागाच्या जागेमध्ये, १५० रोपे येरवडा जेल या ठिकाणी व उर्वरीत २५० रोपे संगमवाडी पूल ते कल्याणीनगर पूल दरम्यान नदी सुधार प्रकल्पामधील Promenade, Gabion याठिकाणी लावणेत आलेली आहे.
यापूर्वी देखील पुणे महानगरपालिकेमार्फत स्वदेशी ५००० रोपांची लागवड आजमिती पर्यंत केलेली आहे. यापैकी ४००० झाडे संरक्षण विभागाच्या जागेमध्ये, ५०० आड़े आर्मी स्पोर्ट विभागाच्या जागेमध्ये व उर्वरीत आहे नदी सुधार प्रकल्पामधील Promenade, Gabion याठिकाणी लावणेत आलेली आहेत.


धुळ्यातील माजी खासदार डी. एस. अहिरे आणि कॉंग्रेस, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे – अजित पवार

मुंबई दि. ५ जून – शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे न्यायचे असेल तर त्यांचे विचार कधी आपण विसरु शकत नाही. हा देश अनेक धर्म, पंथ, भाषांनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे एकसंघ राहिलेला आहे हे स्पष्ट करतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.

धुळे जिल्ह्यातील काँग्रेस व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई के. सी. कॉलेज सभागृह झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

महिलांना मोठया प्रमाणात संधी देताना समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आहे. सन २०२९ मध्ये आपल्या महाराष्ट्रातून ९६ महिला या खास आरक्षित जागेतून आमदार होणार आहेत तसेच देशात खासदारांच्या ५४३ जागा असून तिथेही वन थर्ड महिला खासदार होणार आहेत. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी दिली त्या संधीचे त्यांनी सोनं केले आहे. ज्या देशाने पुरुषाबरोबर महिलांना वागणूक दिली आणि संधी दिली, मानसन्मान दिला ते देश जगात पुढे आहेत असेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितले.

आमच्या पक्षात नवा – जुना वाद नाही. ज्याच्यामध्ये कर्तृत्व, नेतृत्व आहे. ज्याच्यामध्ये समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे त्याला संधी मिळाली पाहिजे असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

धुळ्यातील माजी खासदार डी. एस. अहिरे, सिंदखेडचे काँग्रेस तालुकाध्यक्ष शामकांत सनेर, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुनिल नेरकर, काँग्रेस किसान सेलचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत भामरे, धुळे महानगरपालिकेचे माजी सभापती हरिश्चंद्र वाघ, धुळे जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत सैंदाणे, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अबीद पठाण आदी प्रमुख नेत्यांसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी माजी मंत्री अनिल पाटील, पक्षाचे कोषाध्यक्ष आणि आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, पक्षाचे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, माजी आमदार शरद पाटील, नाशिक म्हाडाचे माजी अध्यक्ष किरण शिंदे, धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया उपस्थित होते.

इंडियनऑइल यूटीटी सीझन ६: पीबीजी पुणे जॅग्वार्सचा दणदणीत विजय; कोलकाता थंडरब्लेड्सवर १०-५ अशी मात

या हंगामातील सर्व २३ सामने स्टार स्पोर्ट्स खेल आणि स्टार स्पोर्ट्स २ तमिळवर प्रसारित केल्या जातील आणि जिओहॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केल्या जातील.

अहमदाबाद: पीबीजी पुणे जॅग्वार्सने इंडियनऑइल यूटीटी सीझन ६ च्या लढतीत कोलकाता थंडरब्लेड्सचा १०-५ असा पराभव केला. यूटीटीच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स खेल आणि स्टार स्पोर्ट्स २ तमिळवर प्रसारित केले जातील आणि देशभरातील चाहत्यांसाठी जिओहॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केले जातील.

टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (टीटीएफआय) च्या नेतृत्वाखाली आयोजित आणि निरज बजाज व विटा दानी यांनी प्रमोट केलेले, इंडियनऑइल यूटीटी एक प्रमुख व्यावसायिक लीग म्हणून वाढत आहे. १६ दिवसांत, सर्व २३ सामने अहमदाबादच्या EKA Arena येथे होतील आणि तिकिटे फक्त बुकमायशोवर उपलब्ध असतील.

अल्वारो रोबल्सने आंतरराष्ट्रीय हेवीवेट्स आणि इंडियनऑइल यूटीटीच्या दिग्गज खेळाडूंमधील एका रोमांचक लढतीत क्वाद्री अरुणाला हरवून पीबीजी पुणे जॅग्वार्सला आदर्श सुरुवात करून दिली. त्याने तीनही गेम गोल्डन पॉइंट्सवर जिंकून हंगामातील त्याचा पहिला एकेरी विजय मिळवला. एकाच इंडियनऑइल यूटीटी मोहिमेत दोनदा असा दुर्मिळ पराक्रम पहिल्यांदाच घडला. त्यानंतर दिना मेश्रेफने अॅड्रियाना डियाझवर २-१ असा जोरदार विजय मिळवला आणि तिचा पहिल्या लीग विजयाची नोंद केली. अनिर्बान घोषसोबत जोडीने मिश्र दुहेरीत २-१ असा विजय मिळवून पुण्याला सामन्यावर लवकर नियंत्रण मिळवून दिले.

कोलकाता थंडरब्लेड्सने युवा स्टार अंकुर भट्टाचार्जीच्या सहाय्याने प्रत्युत्तर दिले, ज्याने दुसऱ्या पुरुष एकेरीत अनिर्बानला पराभूत केले. अनिर्बनने अंतिम गेम जिंकून अंकुरला पूर्ण स्वीप देण्यापासून रोखले. हा एक महत्त्वाचा गुण होता ज्यामुळे पुणे पुढे राहिले आणि कोलकाताला बरोबरी साधण्यापासून रोखले. त्यानंतर रीथ रिश्याने सेलेना सेल्वाकुमारला ३-० असे हरवून बरोबरी साधली.

अंतिम स्कोअर

पीबीजी पुणे जॅग्वार्स वि. वि. १०-५ कोलकाता थंडरब्लेड्स

अल्वारो रोबल्स वि. वि. क्वाद्री अरुणा २-१ ( १०-११, ११-१०, ११-१०)

दिना मेश्रीफ वि. वि. ॲड्रियाना डायझ २-१ (११-८, १-११, ११-१०)

अनिर्बन घोष/दीना मेश्रेफ वि. वि. अंकुर भट्टाचार्जी/एड्रियाना डायझ २-१ ( ११-९, ११-९ , ७-११)

अनिर्बन घोष पराभूत वि. अंकुर भट्टाचार्जी १-२ ( ८-११, ७-११, ११-८ )

रीठ रिश्या वि. वि. सेलेना सेल्वाकुमार ३-० (११-९, ११-८, ११-८)

अल्टिमेट टेबल टेनिस (UTT) बद्दल

२०१७ मध्ये अल्टिमेट टेबल टेनिस (UTT) ही भारतातील प्रमुख फ्रँचायझी-आधारित टेबल टेनिस लीग सुरू झाली. ही लीग नीरज बजाज आणि विटा दानी यांनी टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) च्या संयुक्त विद्यमाने प्रमोट केली आहे. आज, UTT ही आठ संघांची स्पर्धा आहे ज्यामध्ये ४८ जागतिक दर्जाचे खेळाडू प्रतिष्ठित जेतेपदासाठी लढत आहेत. ही लीग भारत आणि जगभरातील अव्वल खेळाडू आणि प्रशिक्षकांना आकर्षित करत आहे. या खेळाडूंमध्ये ऑलिंपिक, आशियाई आणि राष्ट्रकुल खेळातील पदक विजेते आहेत. UTT राष्ट्रीय रँकिंग स्पर्धा, टेबल टेनिस सुपर लीग प्रायोजित करून आणि देशातील WTT स्पर्धांचे सह-आयोजित करून देखील या खेळाला प्रोत्साहन देते. प्रत्येक आवृत्तीसह, UTT जागतिक टेबल टेनिसमधील प्रमुख स्पर्धा म्हणून आपले स्थान मजबूत करत आहे, खेळाची प्रतिष्ठा उंचावत आहे आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देत आहे.

अजूनही स्वप्नीच असे ते … शिवाजीनगर बस स्टॅन्ड

पीपीपी मॉडेलपोटी रखडले शिवाजीनगर बस स्टॅन्ड, यात कुणाचे हितसंबंध?पुण्यातील शिवाजीनगर बस स्टॅन्ड अद्यापही हवेतच!अजून साधा करारही नाही.

पुणे-मेट्रो स्टेशन बांधण्याच्या कारणास्तव शिवाजीनगर बस स्टॅन्ड पाडण्यात आले आणि तात्पुरते स्टॅन्ड जुन्या पुणे मुंबई हायवे वर हलवण्यात आले आता त्याला तब्बल पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. या मेट्रो स्टेशन संदर्भात महा मेट्रो आणि एसटी महामंडळ यांच्यामधील करारा सुद्धा सहा वर्ष झाली आहे. ही सर्व दिरंगाई केवळ व्यापारी संकुलावर डोळा ठेवणाऱ्या काही हितसंबंधी लोकांमुळेच होते आहे असा आरोप आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

पूर्वीच्या शिवाजीनगर बस स्थानकाची जमीन मेट्रो ने वापरली त्या बदल्यात नवीन बस स्थानक बांधून देण्याचे पूर्वीच्या करारात ठरले होते. परंतु मध्यवर्ती भागातील मोक्याची जागा व्यापारी उद्देशासाठी वापरता येईल या कारणास्तव याचे बांधकाम पुढे झाले नाही. याबाबतही नव्याने करार करणे अपेक्षित होते. 2023 मध्ये शशी प्रभू आर्किटेक्ट यांचे कडून एसटी स्थापत्य विभागाने नकाशे मागवले व त्यानुसार बांधकाम केले जाईल असे एसटी महामंडळाच्या विद्या बिलारकर यांनी सांगितले होते. परंतु त्यात पुन्हा अडकाठी केली गेली व आता मेट्रो हे बांधकाम करेल असे ठरवण्यात आले. या संदर्भात स्थानिक आमदार शिरोळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अनेकदा मोठ्या घोषणा केल्या.

परंतु आजअखेर यासंदर्भात कुठलाही करार झालेला नाही तसेच कुठलाही अधिकृत बांधकाम नकाशा तयार केला नाही अशी स्पष्ट माहिती पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी भेटीत दिल्याचे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
या जागेवरती व्यापारी संकुल बांधण्यात अनेकांना रस असल्यामुळेच पुणेकरांचे, बाहेरगावच्या प्रवाशांचे हाल झाले तरी चालतील , विलंब झाला तरी चालेल असे धोरण राबवले जात आहे असा आरोप आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खुलासा करावा अशी मागणी आम आदमी पार्टी ने केली आहे.

रामजी … परमनंटच्या समस्या परमनंट नाहीश्या कराल काय ? महापौर संघटनेकडून अपेक्षा

0

पुणे- पुण्याच्या माजी महापौरांच्या संघटनेने महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त नवल किशोर राम यांना मोठं कठीण कोडं घातलं आहे. महापौर संघटनेच्या वतीने आज आयुक्त नवल किशोर राम यांचे अभिनंदन तर करण्यात आलेच पण त्यांना असेही म्हटले आहेकी, शहराच्या कायम असलेल्या समस्या तुम्हालाही ठाऊक आहेतच तुम्ही त्यांचा कायमचा बंदोबस्त कसा कार्ल हे जरा स्पष्ट कराल काय ?आणि कायमचा बंदोबस्त करू शकाल काय ?

माजी महापौर संघटनेचे राजलक्ष्मी भोसले,कमल व्यवहारे,अंकुश काकडे,मुरलीधर मोहोळ,बंदना चव्हाण,बाळासाहेब शिवरकर
,शांतीलाल सुरतवाला,दत्तात्रय गायकवाड,दिप्ती चवधरी, दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप असे मान्यवर सभासद आणि पदाधिकारी आहेत . यांच्या वतीने आज काही माजी महापौरांनी आयुक्तांची भेट घेतली .त्यांनी यावेळी आयुक्तांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे कि,’

सर्व प्रथम आपले आमच्या संघटनेतर्फे मनःपूर्वक अभिनंदन. या पूर्वी पुणे जिल्हाधिकारी म्हणून आपण काम केले आहे. त्यामुळे पुणे शहराची आपणांस ओळख आहेच,
आम्ही आपणांस शहरातील काही महत्वाचे प्रश्नांकडे लक्ष वेधू इच्छितो.
१) पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत, त्यावर तात्पुरती कारवाई होते, यासाठी कायम स्वरूपी योजना तयार करणे,
२) अनधिकृत स्टॉल्स, फेरीवाले हे मोठ्या संख्येने झाले आहेत, त्या संदर्भात कारवाई करणे,
३) पुणे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, याकडे गांभीयनि लक्ष द्यावे.
४) पावसाचे पाणी अनेक ठिकाणी तुंबते त्याचा निचरा होत नाही, त्यासाठी उपाय योजना करणे,
५) पुणे शहरातील वाहतूक समस्या अतिशय गंभीर झाली आहे, त्यासाठी वाहतूक नियोजन या पदावर तज्ञ व्यक्तीची नेमणूक करावी.
६) शहरात लावले जाणारे अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर या संदर्भात कडक कारवाई करावी, ज्यांचे नावाने बोर्ड असतील त्यांचेवर फौजदारी कारवाई करावी.
या काही महत्वाच्या बाबी आम्ही आपल्या नजरेस आणू इच्छितो. सविस्तर चर्चा निश्चित
करू. आमच्या संघटनेचे आपणांस सदैव सहकार्य राहील.

मोदी सरकारमध्ये नव्या पाणबुड्यांना अजूनही मंजुरी का नाही ?

काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांचा घणाघात
   
पुणे- काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ म्हणाले ,’ धक्कादायक बाब म्हणजे भारतीय नौदलाकडे असलेल्या एकूण पाणबुड्यांपैकी जवळपास १५  पाणबुड्यांचे आयुष्य हे आता केवळ ७ ते ८ वर्षापर्यंतच मर्यादित आहे. याशिवाय ३ ते ४ पाणबुड्या पुढील ५ वर्षात निवृत्त कराव्या लागतील अशा अवस्थेपर्यंत पोहोचल्या आहेत. मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून एकही पाणबुडी निर्मिती वा खरेदीचा निर्णय घेतलेला नाही, हे खरे
आहे का? याचा खुलासा मोदी सरकार का करीत नाही असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.
 
 
भयानक म्हणजे, २०२३ च्या जुलैमध्ये पंतप्रधान मोदींच्या फ्रांसभेटीनंतर ३ स्कॉर्पीन प्रकारच्या पाणबुड्यांचा करार झाल्याचे मोदी सरकारतर्फे घोषितही केले गेले होते. ३० हजार कोटीच्या माझगाव डॉक सोबत झालेल्या करारास वर्ष उलटले तरीही  केंद्रीय अर्थ खात्याने अजूनही मंजुरी
दिलेली नाही, हे ही खरे की खोटे ? याचा खुलासा मोदी सरकारने करावा अशी मागणीही गाडगीळ यांनी केली आहे.

 
प्रचाराचा भपका करण्यात तरबेज असलेल्या मोदींच्या थाळी सरकारमध्ये सीमेचे रक्षण करणाऱ्या सैन्याच्या युद्धसामुग्रीसाठी वर्षानुवर्षे मंजुरीच मिळत नाही हे वरीलबाबीतून सिद्ध होते अशी खरमरीत टीका गाडगीळ यांनी केली आहे.
 
स्व. इंदिराजींच्या सरकारच्या काळात बॅ. विठ्ठलराव गाडगीळ संरक्षण उत्पादन मंत्री असताना अवघ्या २ वर्षात माझगाव डॉकने ३ फ्रिगेट्स व १ पाणबुडीचे जलावतरण केले होते याकडेही अनंत गाडगीळ यांनी लक्ष वेधले आहे.

आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण, सदरील घटनेकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा : उपसभापती नीलम गोऱ्हे

सोलापूर शहर पोलिसांना नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी तालुका मोहोळ येथे राहणाऱ्या २६ वर्षीय आशाराणी भोसले यांनी दिनांक ३ जून २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याच दरम्यान एका अल्पवयीन मुलीला तिच्या रंगावरून वडिलांनी सातत्याने बोलल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची घटना घडली.तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळयाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि उपसभापती डॉ.नीलम ताई गोऱ्हे या सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी श्री कुमार आशिर्वाद, सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी श्री.जंगम, सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील,सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार या सर्व अधिकाऱ्यासोबत नीलम गोऱ्हे यांनी बैठक घेतली.

या बैठकीनंतर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,आशाराणी भोसले यांच्यावर होणार्‍या अत्याचाराबाबत त्यांनी सुरुवातीच्या काळात पोलिसांकडे तक्रार केली.त्यावेळी पोलिसांनी तडजोड केली.त्याच दरम्यान त्या महिलेचा छळ झाला आणि तिला आत्महत्येचे पाऊल उचलावे लागल,त्यामुळे आशाराणीच्या छळाकडे दुर्लक्ष करणाऱ्या त्या पोलिसांची चौकशी करा,असे निर्देश ग्रामीण पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की,सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील तरुणी,महिला वरील अन्याय अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी भरोसा सेल, दक्षता समितीच्या माध्यमांतून वेळोवेळी महिलांशी संवाद साधण्यात यावा,जेणेकरून अशा अन्याय अत्याचाराच्या घटना सुरुवातीच्या कालावधीत समजण्यास मदत होईल.त्यातून पीडित तरुणी किंवा महिलेला न्याय देता येईल,असे निर्देश पोलिस अधिकार्‍यांना दिले आहे.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, राज्यभरातील तरुणी आणि महिलांवरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी सुरुवातीला पिडीतेने आपल्या आसपासच्या व्यक्तीला आपल्यासोबत घडणार्‍या घटनेबाबत सांगितले पाहिजे.तरच अशा घटना रोखण्यात आपल्याला यश येईल आणि महिलांच्या प्रश्नावर समाजातील प्रत्येक घटकांने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या प्रशासनाच्या तयारी बाबत नीलम गोऱ्हे यांनी आढावा देखील घेतला.त्याबाबत बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,पंढरपूर मुख्य बस स्थानकात प्रचंड अस्वच्छता आणि कचऱ्याचे साम्राज्य असल्याची माहीती समोर आली आहे.तसेच बस स्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावराबाबत नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन उपायोजना कराव्यात,त्याबाबत एस.टी विभागाचे नियंत्रक श्री अमोल गोंजारी यांना निर्देश देण्यात आले.
त्याचबरोबर नदी घाटातील पाणी वाळवंटातील खड्ड्यांमध्ये साचून होणाऱ्या संभाव्य अपघातांची शक्यता लक्षात घेऊन सदरचे खड्डे क्षेत्र प्रतिबंधित करून त्या ठिकाणी धोक्याचे फलक तातडीने लावण्याबाबत संबधीत अधिकार्‍यांना लवकर लवकर काम करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.

आयटीआय औंध येथे शिवराज्याभिषेक दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

पुणे दि. 5 : छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परीहार चौक, औंध, पुणे येथे 6 जून 2025 रोजी “शिवराज्याभिषेक” दिवस कार्यक्रमांतर्गत “कुटुंब प्रबोधन” या विषयावर मान्यवर व्याख्यात्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमासाठी औंध, पुणे परीसरातील स्थानिक नागरीक व प्रशिक्षणार्थी व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक सचिन धुमाळ यांनी केले आहे.

मराठी लघुलेखन अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

पुणे दि. 5 : छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, या संस्थमध्ये प्रवेश सत्र 2025-26 करीता स्टेनोग्राफी मराठी लेघुखनसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. प्रवेशाकरीता https://msbsvet.edu.in या लिंकवरुन प्रशिक्षणार्थ्यांनी 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत तसेच प्रवेशाकरीता आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती संस्थेमध्ये 01 ऑगस्ट 2025 पर्यंत जमा करावेत. गुणवत्ता यादी 04 ऑगस्ट 25 रोजी तयार करण्यात येणार असून प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही 06 ऑगस्ट 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, पुणे येथील मुख्य इमारतीच्या कौशल्य हॉल येथे होणार आहे प्रवेशित उमेदवारांचे नियमित प्रशिक्षण दि 07 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणार आहे.

तरी या इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन उपसंचालक, स.मा. धुमाळ, छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध यांनी केले आहे.

लाडक्या बहिणींना 1500 मिळण्यास सुरूवात:तुम्हाला मेसेज आला का?

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेंतर्गत मे महिन्याचा हप्ता वितरणास सुरूवात केली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. त्यामुळे महिलांना योजनेचा 11 वा हप्ता केव्हा मिळणार? हा प्रश्न निकाली निघाला आहे.

महायुती सरकारने गतवर्षी जुलै महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. तेव्हापासून आतापर्यंत महिलांना 10 हप्ते मिळालेत. पण मे महिना संपला तरी अद्याप महिलांना 11 वा हप्ता मिळाला नव्हता. पण आता हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाभार्थी महिलांना तसे मेसेज मिळण्यास सुरूवात झाली आहे.राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी बुधवारी रात्रीच एका पोस्टद्वारे मे महिन्याचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे.

महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असे त्या म्हणाल्या.

अदिती तटकरे यांच्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा निधी आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे एखाद्या लाभार्थी महिलेला पैसे जमा झाल्याचा मेसेज आपला नसेल तर त्यांनी बँकेत जाणून आपल्या खात्याची स्थिती जाणून घ्यावी. संबंधित बँकेचे अॅप असेल तर त्यातही त्यांना हा निधी जमा झाला किंवा नाही हे पाहता येईल. तूर्त या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या लाखांत असल्यामुळे सर्वांच्या खात्यात पैसे जमा होण्यास 3-4 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे आज तुमच्या पैसे आले नसतील तर तुम्हाला पुढील एक-दोन दिवस वाट पहावी लागेल.

अमित ठाकरेंचे राज – उद्धव युतीवर मोठे भाष्य:म्हणाले – दोघांकडेही एकमेकांचे नंबर, इच्छा असेल तर त्यांनी एकमेकांना फोन करावा

मुंबई-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. या बाबत मनसे नेते अमित ठाकरे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे. त्यांना युती करायची असेल तर उद्धव ठाकरेंनी फोन करावा. मीडियात किंवा वृत्तपत्रात बोलून युती होत नसल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.

या संदर्भात पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे यांनी त्यांच्या बाजूने भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या मीडियात दोन भाऊ – दोन भाऊ असे बोलले जात आहे. मात्र, यात युतीसंदर्भात त्या दोन भावांनी बोलायला हवे. खालील नेत्यांपैकी कोणी कितीही बोलून काही उपयोग होणार नाही. मी 2016 -17 किंवा कोविड काळात देखील हे बघितले आहे. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पहिला फोन केला होता. कोरोना हे भयंकर संकट आहे. कोणतेही सरकार असो आपण त्यांची साथ द्यायला हवी, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र, आता केवळ वर्तमानपत्रात बोलून अशा युती नसल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.

या विषयी बोलताना अमित ठाकरे यांनी म्हटले की, वृत्तपत्रातून किंवा माध्यमांतून कोणत्याही दोन पक्षांमध्ये युती होत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र तथा मनसे नेते अमित ठाकरे यांनी या बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. या दोघांनी एकत्र येण्यास आमची काहीही हरकत नाही. दोघ भाऊ एकत्र येण्यात मला काहीही इशू नाही. मात्र त्या दोन भावांनी बोलला पाहिजे, असे देखील अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा मात्र मीडियात बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काहीही होत नसल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.

५५ हजार कोटींचा समृद्धी महामार्ग ७० हजार कोटींचा कसा झाला?

मुंबई, दि. ५ जून २०२५
देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे परंतु हा महामार्ग भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. ५५ हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग शेवटी ७० हजार कोटी रुपयांवर गेला. १५ हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च फुगवला यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे, त्यामुळे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर समृद्धी महामार्ग प्रकल्पावर एक श्वेतपत्रिका काढावी, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यावर प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, घोडबंदर भाईंदर बोगदा व उन्नत मार्ग प्रकल्पात ३ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे, सुप्रीम कोर्टाचा हातोडा पडल्याने नाईलाजाने ह्या प्रकल्पाची निविदा रद्द करत असल्याचे सरकारला जाहीर करावे लागले. घोडबंदर भाईंदर प्रकल्पाप्रमाणे समृद्धी महामार्ग प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्या बगलबच्च्यांनी यातून मोठा मलिदा खाल्ला आहे. समृद्धीच्या भ्रष्ट पैशातूनच ५० खोके एकदम ओके चा कार्यक्रम झाला. समृद्धी महामार्ग हा भ्रष्टाचाराचा महामार्ग आहे. या महामार्गासाठी किती पैसे लागले, कोणत्या पुलाला किती खर्च आला, एका किलोमीटरला किती खर्च आला, शेतकऱ्यांना भूसंपादनाचे किती पैसे दिले, कंत्राटदारांना किती दिले, झाडे लावण्यास किती खर्च आला आणि टोलमधून किती वसुली सुरु आहे याचा संपूर्ण लेखाजोखा श्वेतपत्रिकेतून मांडावा असे सपकाळ म्हणाले.

समृद्धी महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेक भागात तडे गेले आहेत. महामार्ग सुरु झाल्यापासून विविध अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला तर शेकडो जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्ग हा फक्त सत्ताधारी पक्षातील मोजक्या लोकांची समृद्धी करणारा प्रकल्प ठरला आहे. यात झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल झाली पाहिजे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

फडणवीसांच्या हस्ते ‘समृद्धी’ मार्गाचे लोकार्पण:नाव न घेता एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; अजित पवार म्हणाले- ‘गार-गार वाटतंय’

एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोलासमृद्धी महामार्ग होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासाठी गेम चेंजर प्रकल्प ठरणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. समृद्धी महामार्गावर अकरा लाख मोठी आणि बावीस लाख छोटी झाडे लावण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरण पूरक हा महामार्ग असणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. कृषी, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना देणारा समृद्धी महामार्ग गेम चेंजर ठरणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

नाशिक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते ठाण्यातील आमणे पर्यंतच्या 76 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन आज झाले आहे. यामुळे एका अर्थाने मागील वेळी मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी पाहिलेले स्वप्न आता पूर्ण झाले आहे. यामुळे नागपूर ते मुंबई मधील अंतर कमी झाले असून वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकास गाथेतील एक मुकुटमणी, ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चा अंतिम टप्पा (इगतपुरी ते आमणे -76 किमी) सज्ज झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गावरील इगतपुरी–आमणे (76 किमी) अंतिम टप्प्याचे भव्य लोकार्पण होत आहे. या लोकर्पणानंतर संपूर्ण 701 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होऊन नागपूर–मुंबई प्रवास फक्त 8 तासांत पूर्ण करता येणार आहे.

फडणवीसांच्या गाडीचे स्टेअरिंग एकनाथ शिंदेंच्या हातातमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत या समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर या मार्गावरील बोगद्यातून या तिन्ही नेत्यांनी प्रवास केला. विशेष म्हणजे या वेळी देवेंद्र फडणवीस यांची गाडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालवली. या आधी मागील वेळी झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांची गाडी देवेंद्र फडणवीस यांनी चालवली होती, हे विशेष.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच गाडीत प्रवास केला असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र वेगळ्या गाडीतून या मार्गावरून जाताना दिसले. त्यामुळे याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. सरकार म्हणून आम्ही एकत्र काम करत आहोत. एकत्र निर्णय घेतले जात आहेत. हेलिकॉप्टरमध्ये देखील या तिघांनी एकत्र प्रवास केला. राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या नेत्याने आपल्या गाडीत बसावे, अशी इच्छा असते. त्यानुसार अजित पवार हे वेगळ्या गाडीत बसले होते. त्यात चर्चा करण्यासाठी काहीही नसल्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे.

आम्ही तिघेही एकत्रित गाडी चालवत आहोत. आम्ही तिघेही उत्तम ड्रायव्हर आहोत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे अतिशय उत्तम ड्रायव्हर आहेत. आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची आणि ड्रायव्हिंगची सवय असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. आमची गाडी अत्यंत छान चालू आहे. आम्ही तिघेही तीन शिफ्ट मध्ये गाडी चालवत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आता गाडी मी चालवणार आहे. त्यामुळे आम्ही बरोबर गाडी चालवतो का? हे तुम्ही दादांना विचारा, अशी मिश्किल टिपण्णी देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ड्रायव्हिंग केले. यावर पत्रकारांनी अजित पवार यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी एका शब्दात ‘गार गार वाटतय’ असे उत्तर दिले. अजित पवार यांच्या या मिश्किल टिपण्णी मुळे सर्वांमध्ये हशा पिकला होता. मात्र महायुतीमधील नेते एकत्रित समृद्धी महामार्ग वरील प्रवासाचा आनंद लुटताना दिसले.


देशातील सर्वात अत्याधुनिक महामार्ग

समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमणे हा शेवटचा ७६ किमी लांबीचा मार्ग आहे. या मार्गावर वाहने धावू लागल्यावर इगतपुरी ते कसारा घाट अवघ्या ८ मिनिटात पार करता येणार आहे. याआधी मुंबईहून नाशिकला जाताना पुर्वी ४ तासापेक्षा अधिक वेळ लागत होता. तो समृद्धी महामार्गामुळे आता २ तास ३० मिनिटे इतका वेळ कमी झाला आहे. समृद्धी ६ पदरी, १२० मीटर रुंदीचा आणि ७०१ किलोमीटर लांबीचा असुन देशातील सर्वात अत्याधुनिक महामार्ग आहे, असे म्हटले जाते.

६५ उड्डाणपूल, ६ बोगदे
समृद्धी महामार्ग १५० किमी प्रतितास गतीने प्रवासासाठी डिझाइन करण्यात आला आहे. या महामार्गावर ६५ उड्डाणपूल, २४ इंटरचेंज, कसारा घाटात ६ बोगदे आणि अनेक वाहन तसेच पादचारी अंडरपास आहेत. इगतपुरी ते मुंबई दरम्यान कसारा घाटा जवळ ८ किलोमीटर लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आला आहे, जो अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर मिस्ट सिस्टिमने सुसज्ज आहे.

‘इबलिस’ २० जून पासून चित्रपटगृहात!

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला की आता लढाई होणार…त्यानंतर ‘इबलिस’ या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. या पोस्टरमध्ये किल्ला, शाळेच दप्तर, दुर्बीण, दूरध्वनी आणि भगवा झेंडा विशेष लक्ष वेधून घेतं आहे. त्यामुळे चित्रपटप्रेमी प्रेक्षकांना काहीतरी हटके पाहण्याची पर्वणी लवकरचं मिळणार आहे. तेशा गर्ल चाइल्ड प्रोडक्शन आणि सार्थी एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘इबलिस’ हा चित्रपट येत्या २० जून ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

पालकांना आणि शिक्षकांना गोंधळात टाकून इतिहास आठवायला लावणारी काही इबलिस मुलं येत आहेत तुम्हाला भेटायला. ही इबलिस कार्टी एक मोहीम आखतात आणि ती मोहीम तडीस नेण्यासाठी आपल्या विचारांशी समरस होऊन येणाऱ्या कठीण परिस्थितीवर कशी मात देतात. त्याची अनसुनी कहाणी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बंदुक्या फेम दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी यांनी इबलिस या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अभिनेते नामदेव मुरकुटे यांनी या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. तेशा गर्ल चाइल्ड प्रोडक्शन, सार्थी एंटरटेनमेंट आणि प्राजक्ता राहुल चौधरी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. विजय निकम, पूनम शेंडे, अशोक केंद्रे, मंगेश सातपुते, नामदेव मुरकुटे आणि राजेश आहेर हे प्रमुख कलाकार असून यात ११ लहान मुलांनी देखील या चित्रपटात उत्तम अभिनय केला आहे.

दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी ‘इबलिस’ चित्रपटाविषयी सांगतात, “’इबलिस’ हा उर्दू शब्द आहे. अतिबुद्धिमान आणि सगळ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या लहान मुलांना गावाकडे इबलिस म्हणून संबोधले जाते. या चित्रपटात अशीच ११ लहान मुल आहेत त्यामुळे या चित्रपटाचं नाव इबलिस ठेवलं आहे. २०१७ – २०१८ मध्ये माझ्या बंदुक्या या चित्रपटाला जे यश मिळाल, अनेक पुरस्कार मिळाले, भरभरून प्रेम मिळाल. त्यामुळे सामाजिक विषयांना धरून मनोरंजक चित्रपट करावा अस मी ठरवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लहान मुलांमध्ये कसे रुजवू शकतो हा विचार मी करत होतो. मग मी ६ महिने रिसर्च करून अनेक वर्कशॉक घेवून तसेच या चित्रपटाचे लेखक नामदेव मुरकुटे यांच्याशी चर्चा करून हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. आणि हा चित्रपट येत्या २० जूनला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे माझी प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट आपल्या मुलांसोबत आणि कुटुंबासमवेत जरूर पहावा.”

(Sharad Lonkar)

ड्रग्ज माफियाविरुद्ध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा संघर्ष:शातिर -द बिगिनिंग

(Sharad Lonkar)

‘नडायची मस्ती आणि भिडायची खाज आम्ही कॉलेजची पोरं बरोबरच घेऊन चालतो’, किंवा ‘… तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल,असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा ‘शातिर – द बिगिनिंग’  या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर नुकताच लॉन्च झाला आहे. या ट्रेलरमुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता निश्चितपणे वाढवली गेली आहे. सस्पेन्स थ्रीलर ‘शातिर – द बिगिनिंग’  येत्या 13 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती चित्रपटाच्या टीमने पत्रकार परिषदेत दिली, तत्पूर्वी चित्रपटातील कलाकारांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती केली आणि श्री शंकर महाराज समाधी स्थळाला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

आजच्या  तरुणाईची कथा सांगणारा, सत्य कथेवर आधारित शातिर -द बिगिनिंग या चित्रपटाची निर्मिती श्रियांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून रेश्मा वायकर यांनी केली आहे. या चित्रपटा द्वारे सुनील सुशीला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. आजच्या तरुण पिढीला पडलेला अंमलीपदार्थांचा विळखा, ड्रग्स माफिया आणि पोलीस यंत्रणेच्या संघर्ष, व्यसनाधीनता, गुन्हेगारी यांच्याविरुद्ध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उभारलेला लढा या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

या बद्दल बोलताना दिग्दर्शक सुनील वायकर म्हणाले, शातिर -द बिगिनिंग हा चित्रपट माझा दिग्दर्शक म्हणुन पाहिलाच प्रयत्न आहे. समाजातील अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारी व्यसनाधीनता आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी त्या विरुद्धचा कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा लढा या चित्रपटातून दाखवून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. देशावर परकीय दहशतवादाचे जसे संकट आहे तसेच ड्रग्ज हे अंतर्गत दहशतवाद आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

चित्रपटाच्या निर्मात्या, अभिनेत्री रेश्मा वायकर म्हणाल्या, चित्रपटातील ‘पोरी आम्ही मराठी पोरी’ या गीताला मिळणारा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवणारा आहे. आज आपल्या समाजात अंमलीपदार्थ सहजतेने मिळत आहेत, ते घेणाऱ्या तरुणाईचे प्रमाण वाढत आहे, विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर अशाच प्रकरणामुळे मधल्या काळात चर्चेत होते. या दुष्ट प्रवृत्ती विरुद्ध लढा देणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाईची ही कथा आहे. अॅक्शन पॅक्ड अशी नायिका साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते.

शातिर – द बिगिनिंग या चित्रपटात अभिनेत्री रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण, रमेश परदेशी, अनिल नगरकर, मीर सरोवर, रामेश्वर गीते, रमा नाडगौडा, निशांत सिंग, वेद भालशंकर, अभिमन्यु वायकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाला रोहित नागभिडे यांचे संगीत असून वैभव देशमुख गीतकार आहेत. चित्रपटातील गीतांना वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे, श्याल्मली खोलगडे  यांनी स्वरसाज चढवला आहे.

सत्य घटनेवर आधारित, तरुणाईतील ड्रग्ज, व्यसनाधीनता असा संवेदनशील विषय घेऊन येणारा, सस्पेन्स थ्रीलर असलेला  शातिर – द बिगिनिंग हा मराठी चित्रपट येत्या 13 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.