Home Blog Page 271

राहुल गांधींचे लेखाला मुख्यमंत्री फडणवीसांचे लेखानेच प्रत्युत्तर, म्हणाले- मतदान वाढलेल्या जागी एनडीए जिंकली म्हणणे हास्यास्पद

मुंबई-कॉंग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या ‘मॅच फिक्सिंग महाराष्ट्र’ मुलाखत देताना भाजपवर जोरदार टीका केली आहे. 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या लोकशाही यंत्रणेमध्ये हेराफेरी करण्यासाठी तयार केलेला मॅच फिक्सिंगचा आराखडा होता. आता हेच प्रकार बिहारमध्येही होणार आहे. भाजपला जिथे जिथे हार पत्करावी लागते तिथे अशा प्रकारची गैरकृत्ये केली जातात, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखानेच प्रत्युत्तर दिले आहे.

राहुल गांधी यांनी त्यांचे लेखात 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांत मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले होते; पण त्यानंतरही हे आकडे वाढत गेले. मतदानाची अंतिम टक्केवारी 66.05 टक्के असल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी सांगण्यात आले. म्हणजे या मतांमध्ये 7.83 टक्क्यांची वाढ झाली. राज्यातील केवळ 12000 बूथमध्ये नव्या मतदारांची भर पडली. त्यातील 85 मतदारसंत भाजपला विजय मिळाला होता, असा दावा राहुल गांधींनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या लेखाला प्रत्युत्तर देताना म्हटले की, शेवटच्या तासात मतदान वाढलेल्या जागी एनडीए जिंकली म्हणणे हास्यास्पद आहे. कामठीचे उदाहरण त्यांनी दिले. पण जे उदाहरण त्यांनी दिले नाही, ते मी येथे देतो आहे. माढ्यात शेवटच्या तासात 18 टक्के मतदान झाले, तिथे शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला. वणीत शेवटच्या तासात 13 टक्के मतदान झाले, तिथे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला आणि श्रीरामपूरमध्ये 12 टक्के मतदान झाले, तिथे काँग्रेस विजयी झाली.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाबाबत काही पुरावे उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोग त्यांना नक्कीच उत्तर देईल. पण मुख्य मुद्दा म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा आणि लोकांच्या जनादेशाचा सतत होणारा अपमान, जनतेने राहुल गांधींना नाकारले आहे आणि सूड म्हणून ते जनतेला आणि त्यांच्या जनादेशाला नाकारत आहेत. यामुळे काँग्रेस पक्ष आणखी अडचणीत येईल. त्यांच्याच पक्षाचे आमदार एका दिवसात कोणालाही भेटण्याची वेळ मिळावी असे आव्हान देणारी विधाने का करतात याचे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. लोकशाही प्रक्रिया आणि संवैधानिक संस्थांबद्दल सतत शंका उपस्थित करून ते देशाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत आणि कोणते विष पसरवत आहेत याची त्यांना जाणीव असली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काँग्रेसच्या काळात निवडणूक आयुक्त सरकारने थेटपणे निवडले. 26 पैकी 25 निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट निवडले. प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षनेत्यासह आयुक्त नियुक्तीसाठी आयोग नेमला, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. मोदी सरकारपेक्षा मनमोहनसिंग सरकारमध्येच मतदार वाढल्याचा दावाही देवेंद्र फडणवीसांनी केला. 2014 ते 2019 दरम्यान देशभर 63 लाख मतदार वाढले. 2019 ते 2024 दरम्यान देशभर 75 लाख मतदार वाढले. तर 2004 ते 2009 दरम्यान देशभर 1 कोटी मतदार वाढल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 2024 मध्ये मतदारसंख्या वाढीत काहीही असाधारण नाही, असे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मतदानापासून ते मतदारांच्या संख्येपर्यंत, राहुल गांधी खोट्या अफवा निर्माण करण्यासाठी, लोकशाही प्रक्रिया आणि संवैधानिक संस्थांबद्दल शंका निर्माण करण्यासाठी पुरावे विकृत करतात. महाराष्ट्रातील पराभवामुळे त्यांना आणि त्यांच्या मित्रपक्षांना किती दुःख झाले आहे हे मला माहिती आहे. पण जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी, लाडकी बहिणी, सामान्य जनता आणि सर्व नागरिकांच्या जनादेशाचा अशा प्रकारे अपमान करत राहिलात तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांचा सेवक म्हणून मी महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा नेहमीच निषेध करेन.

देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये, आयोगाने वस्तुनिष्ठ खुलासा करावा: नाना पटोले

‘बटेंगे तो कटेंगे’वाल्या देवेंद्र फडणविसांनी ‘भारत जोडो’वर बोलू नये, भाजपाची विचारसरणीच विभाजनवादी.

मुंबई, दि. ८ जून
भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या संगनमताने विधानसभा निवडणुकीत गडबड घोटाळा केला आहे. बोगस मतदार याद्या बनवूण, मतांची चोरी करून भाजपा सत्तेत आली आहे. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर लगेच काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह हा घोटाळा कसा केला गेला याची मांडणी केली आहे पण निवडणूक आयोग समाधानकारक उत्तरे देत नाही. सर्व प्रश्नांची मुद्देसुद उत्तरे ही आयोगानेच दिली पाहिजेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाची वकिली करू नये, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेखाला उत्तर देत नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीने देशात चुकीचा पायंडा पाडला आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेवरच संशय व्यक्त होत असेल तर लोकशाही व्यवस्थेसाठी ते अत्यंत गंभीर व धोकादायक आहे. २०१४ पासून देशातील सर्व स्वायत्त संस्था भाजपा सरकारने कठपुतली बाहुल्या बनवल्या आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी या संस्थांचा स्वायत्तपणा टिकला पाहिजे यासाठीच राहुल गांधी प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत. लोकशाही शासन व्यवस्थेत सरकार व संस्थांना प्रश्न विचारणे हा संविधानाने दिलेला हक्क आहे. विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नावर आयोगाने उत्तरे दिली पाहिजेत, भाजपा व फडणवीस यांच्या उत्तरांना काँग्रेस भीक घालत नाही. फडणवीस काय आयोगाचे वकील आहेत का, त्यांनी ही वकिली बंद करावी, असे नाना पटोले म्हणाले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, आरोप केले नाहीत, त्याची उत्तरे निवडणूक आयोगाने देणे गरजेचे आहेत असे असताना भाजपा व देवेंद्र फडणवीस मुद्द्यापासून लक्ष दुसरीकडे वळवत राहुल गांधी व भारत जोडो यात्रेला बदनाम करण्याचे काम करत आहेत. काँग्रेस पक्षाची भूमिका भारत जोडोची आहे पण भाजपा व फडणवीस यांची विचारसरणी बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, अशी विभाजनकारी भारत तोडोची आहे, असेही नाना पटोले म्हणाले..

राहुल गांधींनी आयोगाला विचारलेल्या प्रश्नांना भाजपा कडून उत्तरे म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच: रमेश चेन्नीथला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला लावलेला कलंक पुसून टाका, लोकशाहीवरचा विश्वास टिकवण्यासाठी आयोगानेच खुलासा करावा.

मुंबई, दि. ८ जून २०२५
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फसवणूक, हेराफेरी आणि जनादेशाचे पद्धतशीर उल्लंघन करून लोकशाहीचे वस्त्रहरण कसे केले गेले हे राहुल गांधी यांच्या लेखातून तर्कसंगत मांडणी केलेली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरच संशय बळावला असल्याने या गंभीर प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने देऊन संभ्रम दूर करणे अपेक्षित असताना भाजपाकडून त्याची उत्तरे दिली जात आहेत हे आणखी गंभीर असून निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाले यावर शिक्कामोर्तब करणारे आहे, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात रमेश चेन्नीथला यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जे घडले ते अचानक घडलेले नाही तर ते अतिशय काळजीपूर्वक आखलेले ऑपरेशन होते, लोकशाही प्रक्रियेवर एक सुनियोजित हल्ला होता. राहुल गांधी यांच्या सविस्तर खुलाशातून हे विचलित करणारे सत्य उलगडले आहे. एकेकाळी लोकशाहीचा दीपस्तंभ असलेल्या महाराष्ट्रातून लोकशाही मुल्ल्यांना काळीमा फासला जात आहे हे विदारक आहे. निवडणूक आयोगाकडे काँग्रेस पक्ष सातत्याने पाठपुरावा करत आहे पण आयोगाकडून त्यावर समाधानकारक खुलासा केला जात नाही. आयोगाकडून केवळ वरवरची उत्तरे दिली जात आहेत. चंदिगड उच्च न्यायालायनेही हरियाणा विधानसभा निवडणूक प्रश्नी सीसीटीव्ही फुटेज देण्यास सांगितले असता सरकारच्या मदतीने नियम बदलून ती माहिती देता येणार नाही असा बदल करण्यात आला तो का व कशासाठी..

महाराष्ट्रात मतदारयाद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला. बोगस मतदान करण्यात आले. मतांची टक्केवारी वाढवली. मतांची टक्केवारी सात सात दिवस जाहीर केली नाही हे सर्व संशायास्पद आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस व मित्रपक्षांना प्रचंड मोठा विजय मिळाला पण पाच महिन्यात एकदम उलट परिणाम कसे येऊ शकतात. काहीतरी काळेबेरे असल्यानेच भाजपा व निवडणूक आयोग लपवालपवी करत आहे पण हे सत्य बाहेर आणण्यासाठी काँग्रेस यापुढेही पाठपुरावा करत राहिल असे चेन्नीथला म्हणाले.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम व किरण कुलकर्णींची नार्को टेस्ट करा; महाराष्ट्रातील मतांच्या चोरीचे सत्य उघड होईल.

मुंबई, दि. ८ जून २०२५

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या चोरीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लेख लिहून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत पण त्याची मिरची मात्र भाजपाला लागली. प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले आहेत, त्याची उत्तरे त्यांनी देणे अपेक्षित असताना भाजपा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहून उत्तरे दिली आहेत. फडणवीस यांचा लेख हास्यास्पद असून राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुद्देसुद उत्तरे देण्याऐवजी टीका करत जनतेला भ्रमित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, असे सडेतोड उत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या लेखाची चिरफाड केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस व भाजपा युती हीच मतांच्या चोरीचे लाभार्थी आहेत, ते आरोपी आहेत, सत्तेचा मलिदा लाटत आहेत आणि तेच उत्तरे देत आहात, तुम्ही रामशास्त्री प्रभूणेंच्या अविर्भावात वावरू नका, तुमचा कारभार तर घाशिराम कोतवालचा आहे. फडणवीस यांनी दिलेली उत्तरे ही थातूर मातूर आहेत.
फडणवीस हा माणूस अत्यंत खोटारडा आहे. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही. अजित पवार व राष्ट्रवादी बरोबर कधीच जाणार नाही, छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांची जागा जेलमध्येच आहे हे सांगणारे, नारायण राणेंवरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणारे हे तेच फडणवीस आहेत जे आज अजित पवार, नारायण राणे व भुजबळांना शेजारी घेऊन बसले आहेत. आता चक्की पिसिंग, पिसिंग नाही तर त्यांच्यासोबतच मिक्सिंग व फिक्सिंग सुरु आहे. भ्रष्ट मंत्र्यांना क्लिन चिट देण्यात ते पटाईत आहेत. आता तर त्यांनी निवडणूक आयोगालाही क्लिन चिट देऊन टाकली, त्यामुळे संशय अधिक बळावला आहे. ‘दाल में कुछ काल नही’ तर सर्व दाळच काळी आहे, असे सपकाळ म्हणाले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आजपर्यंत ज्या मुद्द्यांची मांडणी केली ते काळाच्या कसोटीवर खरे ठरले आहेत. चीनचा भारताला धोका आहे असा इशारा दिला होता, आता चिनी ड्रॅगन भारताला विळखा घालत आहे. नोटबंदीचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल GDP कमी होईल असे सांगितले, ते खरे ठरले. कोरोना मुळे मोठा धोका असल्याचा इशारा दिला होता पण भाजपा सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, त्याचे गंभीर परिणाम भारताला आज भोगावे लागत आहेत. आताही निवडणूक आयोगाच्या एकूणच प्रक्रियेवर शंका उपस्थित होत आहे. लोकशाही व्यवस्थेचा हा प्रश्न आहे, त्या शंकांचे निरसन करण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे पण आयोग उत्तर देत नाही, सीसीटीव्ही फूटेज देत नाही, उलट नियम बदलून टाकले. निवडणूक आयुक्त नियुक्तीवर फडणवीस बोलले पण काँग्रेसच्या काळातच टी. एन. शेषन आयुक्त झाले त्यांनी आचारसंहिता काय असते ते दाखवून दिले. पण भाजपाच्या मोदी सरकारने तर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती पॅनलमधून सरन्यायाधिश यांना वगळून आपल्याच एका मंत्र्यांची त्या जागी वर्णी लावली हे सांगण्यास फडणवीस विसरले आहेत. फडणवीस यांचा लेख हा सारवासारव करणारा आहे, कदाचित दिल्लीतील ‘आका’ने सांगितल्याने हा लेखप्रपंच केला असावा. त्यांच्या लेखाला लेखाने उत्तर देण्याची गरज वाटत नाही, त्यावर एखाद्या चारोळीतूनच उत्तर दिले जाऊ शकते, असा टोलाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला आहे.

राहुल गांधी मीडियाकडे का जातात, या निवडणूक आयोगाच्या प्रश्नालाही सपकाळ यांनी उत्तर दिले आहे. मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, हे आयोगाला मान्य नाही का? आणि काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांना वस्तुनिष्ठ उत्तरे आयोगाने द्यावीत असेही सपकाळ यांनी म्हटले आहे. तसेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम व तत्कालीन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची नार्को टेस्ट करा, महाराष्ट्रातील मतांच्या चोरीचे सत्य उघड होईल अशी मागणीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी केली आहे.

आपण गडचिरोलीला गेले होतो असे फडणवीस सांगत आहेत पण ते गडचिरोलीला का जातात तर तिथल्या खाणीतून मोठा मलिदा मिळतो त्यासाठी ते वारंवार तेथे जातात व त्यासाठीच त्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद घेतले आहे. आम्ही मात्र गडचिरोलीला जाऊन मतांच्या चोरीविरोधात जनजागृती करणार आहोत, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्सच्या सणसवाडी प्रकल्पाचे उद्घाटन

पुणे, दि. ८ : जॉन डिअर इंडियातील पुण्यातील प्रकल्पाने ‘मेक इन महाराष्ट्र’ला महत्व दिले असून त्यांनी कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानावर आधारीत स्मार्ट मशिन्सच्या उत्पादनात पुढाकार घ्यावा आणि असे तंत्रज्ञान महाराष्ट्रात तयार करून जगात निर्यात करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.शिरुर औद्योगिक वसाहत क्षेत्रात जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्सच्या सणसवाडी प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएचे आयुक्त दीपक सिंगला, पोलीस अधिक्षक संदीप गिल, राजेश सिन्हा, मुकुल वासने, देवेंद्र बहीरट आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रासह भारत आणि पूर्ण जगात जॉन डिअरने आपले मूल्य कायम ठेवत प्रगती साधली असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हवामान बदलाल्या काळात कृषी क्षेत्रावर परिणाम होत आहे. जॉन डिअरसारख्या उद्योगसंस्था नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून चांगले कार्य करीत आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेचा कृषी क्षेत्रातही उपयोग सुरू झाला असून कृषी प्रक्रीयेत अनुकूल बदल घडवून उत्पादनात गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होत आहे. कृषी क्षेत्रात त्यामुळे खूप चांगले बदल घडून येतील.

नुकत्याच पुणे येथे झालेल्या कृषी हॅकॅथॉनमध्ये अनेक चांगल्या कल्पनापुढे आल्या. या कल्पनांना उत्पादनात बदलून ही उन्नत तंत्रज्ञानाची क्रांती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची क्षमता जॉन डिअरमध्ये आहे. उद्योगसंस्थेला बाजारातील महत्व कायम ठेवण्यासाठी नाविन्याचा शोध घ्यावा लागतो आणि जॉन डिअर त्यात आघाडीवर आहे. जॉन डिअरने स्मार्ट मशिन्सची ही क्रांती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी आणि स्मार्ट मशिन्स इथे तयार करून जगात निर्यात करावेत. महाराष्ट्रात संस्थेच्या विस्तारात राज्य शासन सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली..

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ७० टक्के महिलांना रोजगार देण्याच्या धोरणामुळे जॉन डिअर संस्था यशस्वी ठरत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’, ‘डिझाईन इन इंडीया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’ या तिन्ही गोष्टी जॉन डिअर इंडियाने अनुसरल्या आहेत. राज्यातून ९ देशात निर्यात केली जात आहे. संस्थेचा ८० टक्के महसूल हा निर्यातीतून मिळत आहे. डिझाईनींगच्या क्षेत्रात भारतात त्यासाठी आवश्यक गुणवत्ता उपलब्ध आहे. जॉन डिअरकडून उत्पादनाचे डिझाईनींग आणि प्रमाणिकरण इथे होत आहे. या दोन बाबी प्रत्येक उद्योगासाठी महत्वाच्या आहेत. संस्था या दोन्ही गोष्टी इथेच करीत असल्याने ती खऱ्या अर्थाने भारतीय आणि महाराष्ट्रातील संस्था आहे.

जॉन डिअरकडून शेतकऱ्यांसाठी चांगले तंत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. अन्य क्षेत्राच्या तुलनेत कृषी क्षेत्रात उन्नत तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धीमत्तेची जास्त गरज आहे. यामुळे शेतीच्या परंपरागत पद्धतीच्या कामात बदल होईल, शेतीच्या कामात अधिक अचूकता येईल आणि हे तंत्रज्ञान उत्पादन, उत्पादकता यावर परिणाम करणारे असेल. आणि जॉन डिअर इंडियाच्या केंद्रस्थानी याच बाबी आहेत. पेरणीपासून कापणी पश्चात कृषी प्रक्रीयेपर्यत संपूर्ण कृषीकार्यात जॉन डिअरने चांगले तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणले.

राजेश सिन्हा यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाची माहिती दिली. महाराष्ट्रात उद्योगांसाठी चांगले वातावरण असल्याने जॉन डिअर इंडियाने राज्यात पाचवी मोठी गुंतवणूक केली आहे. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून चांगले उत्पादन करण्यात शेतकऱ्यांना नव्या प्रकल्पामुळे मदत होणार आहे. गेल्या सात वर्षात कृषी आणि रस्ते निर्माण क्षेत्रात जॉन डिअरने भारतात योगदान दिले आहे. पुणे येथे होणारे उत्पादन पुर्णत: भारतात निर्मित असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जॉन डिअर इंडियाच्या नव्या प्रकल्पाची पाहणी केली आणि माहिती घेतली.

पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाचे उद्घाटन

पुणे, दि. ८ : प्राथमिक आरोग्यावर भर दिल्यास विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरील ताण कमी होतो. त्यामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यादृष्टीने राज्यातील आरोग्य सेवेची पुर्नरचना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

मावळ तालुक्यातील आंबी- तरंगवाडी येथे पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबईचे अध्यक्ष तथा कुलपती डॉ. विजय पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूरचे कुलपती संजय पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबईच्या उपाध्यक्ष तथा उपकुलपती डॉ. शिवानी पाटील, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, उद्योजक रामदास काकडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासनाच्या विविध योजना नीटपणे राबविण्याचे काम विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात येते. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून ५ लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत करण्यात येतात. आरोग्यसेवेच्या क्षेत्रात विमा आणि सेवेची खात्री या माध्यमातून गरिबातल्या गरीब रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. राज्यात प्राथमिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासह द्वितीय स्तरीय आरोग्य सेवाही बळकट करण्यात येणार आहेत. विशेषोपचारासाठी शासकीय रुग्णालये, विद्यापीठांची आणि खाजगी रुग्णालये आहेत. आरोग्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या काही वर्षात १० वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यात असे महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. मुलींना वैद्यकीय शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णयही शासनाने घेतला. यातून शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विस्तार आणि गुणवत्ता दिसून येत आहे. विद्यापीठाने असेच कार्य सुरू करून नवनवीन ठिकाणी रुग्णालय आणि शैक्षणिक संकुल उभे करावे. त्यामागे समाजसेवेची भूमिका असल्याने शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल.

महाराष्ट्रात शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी क्रांती आणण्याचे आणि तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात संधी मिळवून देण्याचे काम करणाऱ्यांमध्ये डॉ. डी. वाय. पाटील हे एक अग्रणी नाव असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात उच्च शिक्षणाच्या खासगीकरणामुळे डॉ.डी.वाय.पाटील आणि त्यांच्यासारख्या व्यक्तींनी संस्था उभ्या केल्या आणि उच्च शिक्षणाचा विस्तार झाला. त्यामुळे अनेकांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. राज्यात सात खासगी विद्यापीठे या कुटुंबाने सुरू केली आणि गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम सुरू केले. गुणवत्तेला धक्का न लावता उत्तम शिक्षण देण्यासाठी डी.वाय.पाटील यांच्या कुटुंबाने चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. या वाटचालीत पुष्पलता पाटील यांचे संस्कार महत्वाचे ठरले असल्याने त्यांचे नाव रुग्णालयाला देण्यात आले आहे.

पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयात अत्यंत आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या परिसराला वरदान ठरेल असे रुग्णालय उभे करण्यात आले आहे. औद्योगिक वसाहत आणि परिसरातील सामान्य माणसाला कमी खर्चात चांगले उपचार देण्यासाठी या रुग्णालयाचा फायदा होणार आहे. डॉ.विजय पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ७० खाटा आरक्षित ठेवल्या आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीने संदर्भित केलेले १२ ते १५ हजार रुग्णांवर उपचार इथे करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रास्ताविकात कुलपती डॉ.पाटील यांनी रुग्णालयाची माहिती दिली. रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या सर्व सुविधा पुरविण्यात येतील. केंद्र आणि राज्य शासनाने सुरू केलेल्या आयुष्मान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा परिसरातील नागरिकांना लाभ घेता येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांना चांगली सेवा द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

पुष्पलता डी. वाय. पाटील धर्मादाय रुग्णालय ६०० खाटांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मल्टीस्पेशालिटी रुग्णालय असून येथे विविध सेवा उपलब्ध आहेत. आंबी, मावळ, तळेगाव भागातील जनतेला या रुग्णालयातून आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत. रुग्णालयाने स्वतःचा ऑक्सिजन प्रकल्प उभारला आहे.

सर्व शासकीय कार्यालयत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन

पुणे, दि. ७ : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे , खासदार मेधा कुलकर्णी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे , आमदार भीमराव तापकीर, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महाऊर्जाच्या महासंचालक डॉ.कादंबरी बलकवडे, महाराष्ट्र राज्य वीज कंपनीचे संचालक विश्वास पाठक, ऊर्जा दक्षता ब्युरोचे सचिव मिलिंद देवरे, अतिरिक्त महासंचालक डॉ. त्रिगुण कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, महाऊर्जासाठी येत्या काळात दोन उद्दीष्टे महत्वाची आहेत. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याला गती द्यावी लागेल. प्रधानमंत्री सुर्यघर योजना यशस्वी योजना असून त्या योजनेशी संलग्न असलेली राज्याची योजना सुरू करून पहिल्या टप्प्यात १०० युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक आणि दुसऱ्या टप्प्यात ३०० युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक सौर ऊर्जेवर आणायचे आहेत. ३०० युनिटपर्यंत वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांचे वीजचे देयक शून्यावर यावे असा प्रयत्न आहे. ही दोन्ही उद्दीष्टे पूर्ण करण्यासंदर्भात महाऊर्जा हे काम चांगल्यारितीने करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अपारंपरिक क्षेत्रात महाराष्ट्राची भरारी
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, हरित इमारतीसाठी असलेली सर्व मानके पूर्ण करणारी, निसर्गाचा पूर्णपणे उपयोग करणारी, ऊर्जेची बचत करणारी आणि आवश्यक असणारी ऊर्जा १०० टक्के निर्माण करणारी महाऊर्जाची ही नवी इमारत हरित इमारतीचा उत्तम नमुना आहे. ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात आणि अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात, महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली आहे. गेल्या २ वर्षात देशभरात ४ लाख कृषी पंप बसाविण्यात आले असतांना राज्याने अपारंपरिक ऊर्जेच्या वापरला प्रोत्साहन देत ५ लाख सौर कृषीपंप बसविले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून १६ हजार मेगा वॉट क्षमतेचे फिडर २०२६ पर्यंत सौर ऊर्जेवर परिवर्तीत करण्यात येणार आहेत. त्याचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. विभाजीत पद्धतीने असलेला, आशियातील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. एकूणच सौर, पवन आणि हायड्रोजन क्षेत्रातही राज्याने भरारी घेतली असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

सौर ऊर्जेच्या वापरामुळे वीजेचे दर कमी होणार
महाऊर्जाने गेल्या काही वर्षात अपारंपरिक ऊर्जा निर्माण करण्यात चांगली कामगिरी केली आहे. सौर ऊर्जेच्या निर्मितीत देशात आपण अग्रेसर आहोत. विभाजीत पद्धतीने सौर ऊर्जेवर वीज निर्माण करूनही देशात आपण महत्वाचे स्थान मिळविले आहे. कुसुम योजनेच्या अंमल बजावणीतही आपण पुढे आहोत. २०२६ च्या डिसेंबरपर्यंत कृषीची संपूर्ण वीजेची मागणी सौर ऊर्जेवर परिवर्तित करू शकू. गेल्या २० वर्षात दरवर्षी वीजेचे दर ९ टक्क्याने वाढवत आहोत. २०२५ ते २०३० मध्ये दरवर्षी वीजेचे दर आपण कमी करणार आहोत.

२०३० पर्यंत ५२ टक्के वीज अपारंपरिक स्रोताद्वारे निर्माण करणार
सौर ऊर्जा निर्मितीसाठी येणाऱ्या समस्या दूर करण्याला प्राधान्य देत असल्याने वेगाने काम होत आहे. नुकताच रशियाच्या शासकीय कंपनीसोबत थोरियमपासून ऊर्जा निर्मितीत करार करण्यात आला असून हा करार भारतासाठी ऊर्जा क्षेत्राचे चित्र बदलणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कामांमुळे पर्यावरणाचा विनाश थांबविता येईल आणि २०३० पर्यंत ५० टक्के वीज अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातून निर्माण करण्याचे स्वप्नही पूर्ण होईल. २०३० पर्यंत राज्यात ५२ टक्के वीज अपारंपरिक स्रोतातून निर्माण होईल, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते महाऊर्जाच्या प्रगती अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी अन्य मान्यवरांसह अपारंपरिक उर्जेसंदर्भातील प्रदर्शनाला भेट दिली. सुरवातीला त्यांच्या हस्ते महाऊर्जा कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

अशी आहे महाऊर्जा विकास अभिकरण इमारत
महाऊर्जाच्या औंध येथील नवीन इमारतीचे बांधकाम पर्यावरण पूरक (ग्रीन बिल्डिंग), सुपर इ.सी.बी.सी. व नेट झिरो एनर्जी संकल्पना धर्तीवर करण्यात आले आहे. यामध्ये पोरोथम ब्लॉक, डबल ग्लेज्ड विंडोज, सिरॅमिक जाळी, रेडियन्ट कुलिंग सिस्टिम, अर्थ टनेल ट्युब सिस्टिम, व्हेंच्युरी इफेक्ट, टू स्टेज इव्हॉपरेशन सिस्टिम, सोला ट्युब व २९० कि.वॅ. क्षमतेचे पारेषण सलंग्न सौर संयंत्र इ. चा वापर करण्यात आला आहे.

कलिंग कला केंद्र ट्रस्टतर्फे १५ जूनला ‘रज महोत्सव २०२५’

भारतीय नऊ शास्त्रीय नृत्य कलांचे सादरीकरण; डॉ. ममता मिश्रा यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे: मासिक पाळीच्या आरोग्याबाबत जनजागृती आणि मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी कलिंग कला केंद्र ट्रस्टतर्फे ओडिशाच्या पारंपरिक ‘रज महोत्सव २०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवार, दि. १५ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजता बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, पुणे येथे आयोजित या रज महोत्सवात भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन घडणार असून, विविध प्रकारच्या नऊ शास्त्रीय नृत्यांचे सादरीकरण होणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. ममता मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी हिरकणी सोशल फाउंडेशनच्या सीईओ पूर्णिमा लुनावत, ट्रस्टच्या सचिव निक्षिता सारंगी, सहसचिव पौलमी चॅटर्जी व खजिनदार लोकनाथ सारंगी उपस्थित होते.

डॉ. ममता मिश्रा म्हणाल्या, “महोत्सवात प्रसिद्ध ओडिशी ‘बनस्ते डाकीला गजा, बरसके थरे आसीची रज’ या नृत्य-गायनातून रजस्वलाची भावना व्यक्त होईल. यामध्ये स्वागतिका महापात्रा, रश्मीता प्रसाद, स्मिता दास, अरुणिमा मोहंती यांच्यासह ओडिशी नृत्यांगना मधुमिता मिश्रा यांच्या शिष्य सादरीकरण करणार आहेत. नृत्य नवरत्न या कार्यक्रमातील आकर्षण असून, यामध्ये पुजायिता भट्टाचार्य (ओडिशाचे ओडिशी), पौलोमी साखळकर (पश्चिम बंगालचे गौडीयो), सुजा दिनकर (केरळचे मोहिनीअट्टम), धनिया मेनन (आंध्रप्रदेशचे कुचिपुडी), मौसमी रॉय-देव (उत्तरप्रदेशचे कथक), पारोमिता मुखर्जी (केरळचे कथकली), सुमना चॅटर्जी (मणिपूरचे मणिपुरी), योषा रॉय (आसामचे सात्रीया), प्रिया भट्टाचार्य (तामिळनाडूचे भरतनाट्यम) नृत्यप्रकार सादर करणार आहेत. ‘रंगबती’ गाण्यावर ओडिशाचे प्रसिद्ध लोकनृत्य सादर होणार आहे. सर्व महिला कलाकारांना ‘रज क्वीन’चा क्राऊन देऊन सन्मानित केले जाणार आहे.”

“ट्रस्टतर्फे गेल्या १५ वर्षांपासून ‘एक विचार, अनेक राज्ये’ या कल्पनेवर आधारित भारतीय शास्त्रीय नृत्य, संगीत, कला व संस्कृतीचे शिक्षण देण्यासह त्याचा प्रचार करत आहे. ओडिशामध्ये रज महोत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. आसाममध्ये कामाख्या मातेसाठी होणारा अंबुबाची महोत्सव, महाराष्ट्रात होणार ऋतुमती उत्सव, ज्यातून स्त्री जीवनाचे चक्र आणि प्रजननाच्या भारतीय सांस्कृतिक श्रद्धेला प्रोत्साहन देतात. हा रज महोत्सव मासिक पाळी स्वच्छता आणि जागरूकता यांना संस्कृतीशी जोडतो. रज हा मूळ शब्द ‘रजस्वला’ आहे. हा चार दिवसांचा उत्सव असून, ओडिशात प्राचीन काळापासून साजरा केला जातो. हा आई पृथ्वीच्या मासिक पाळी आणि मातृत्वाच्या तयारीचे प्रतीक आहे. हा उत्सव पावसाळ्यातील पहिल्या पावसाबरोबर साजरा केला जातो. त्यातून धरती शेतीसाठी सुपीक बनते. यामध्ये पहिल्या दिवशी पहिली रज (रजस्वला), दुसऱ्या दिवशी मिथुन संक्राती, तिसऱ्या दिवशी शेषा रज, तर चौथ्या दिवशी हळदीचे पाणी व फुलांचे वसुमती स्नान असते. या चार दिवसांत मुलींना राणीसमान मान असतो. पारंपरिक पोशाख, झुला, गोडधोड पदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात,” असेही डॉ. ममता मिश्रा यांनी नमूद केले.

सनी विनायक निम्हण आयोजित भव्य रक्तदान शिबिरातून मानवतेला मानवंदना: ११०४ रक्तदात्यांचे रक्तदान..

पुणे-सोमेश्वरवाडी :

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वतीने सोमेश्वर मंदिर प्रांगण, सोमेश्वरवाडी, पाषाण येथे अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने तरुण मावळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत, मानवतेला मानवंदना म्हणून तब्बल ११०४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी बोलताना सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले. “सनी निम्हण गेली पाच वर्षांपासून सातत्याने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहे. रक्तदानासारखं पुण्याचं कार्य दुसरं काही नाही. रक्त हे तयार करता येत नाही, त्यामुळे रक्तदान हाच रक्ताचा एकमेव स्रोत आहे. म्हणूनच हे फार मोठं आणि पवित्र कार्य आहे. सनी विनायक निम्हण यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे समाजात एक चांगला संदेश गेला असून, रक्तदानासारख्या पवित्र कार्यासाठी नागरिकांना प्रेरणा मिळाली आहे.” असे म्हणत त्यांनी सनी निम्हण यांच्या मौल्यवान योगदानाचे मनापासून कौतुक केले.

याप्रसंगी दत्तात्रय गायकवाड (माजी महापौर), माजी नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडळ अध्यक्ष लहू बालवडकर, माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, राहुल कोकाटे, वसंतराव जुनवणे, शहाजी रानवडे, सुहास निम्हण, सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष पोपटराव जाधव, खंडूशेठ आरगडे, ज्ञानेश्वर पारखे, मनोहर आरगडे, शांताराम महाराज निम्हण, पांडुरंगअप्पा दातार, औंध गाव विश्वस्त मंडळ अध्यक्ष राहुल गायकवाड, योगेश जुनवणे, महेंद्र जुनवणे, सुप्रीम चोंधे, गिरीश जुनवणे, रणजीत कलापुरे, हेरंब शेळके, विशाल शिंदे, सचिन वाडेकर, जयप्रकाश निम्हण, अशोक दळवी, भरत जोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

डॉ. प्रमोद चौधरी लिखित ‘पैलतीरावरून… तर असं झालं’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे: भारताची भविष्यातील वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात मांडण्यात आलेले त्यांचे विचार आणि अनुभवांच्या बोलामुळे नवउद्योजकांना आणि देशासाठी काही करण्याची उर्मी असणाऱ्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

डॉ. प्रमोद चौधरी यांच्या उद्योजकीय प्रवासावर आधारित ‘पैलतीरावरून… तर असं झालं’ या पुस्तकाचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी ,प्राज इंडस्ट्रिजचे अध्यक्ष आणि पुस्तकाचे लेखक डॉ. प्रमोद चौधरी, भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रकाशक विकास सोनी, अतुल मुळे आदी उपस्थित होते.

डॉ. प्रमोद चौधरी यांच्यासारख्या नाविन्याचा ध्यास असणाऱ्या संशोधकाच्या पुस्तकाचे प्रकाशन करतांना आनंद होत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पुस्तकाचे सिंहावलोकन करतांना त्यांचे जीवन आणि संघर्षासोबत पुढच्या पिढीसाठी त्यांनी मांडलेले विचार महत्वाचे वाटतात. एखाद्या व्यक्तिचे व्यक्तिमत्व त्याच्या विचारातून लक्षात येते. पुस्तकातून डॉ. चौधरी यांच्या जगण्यातील मूल्ये कळतात, त्यांनी कठीण परिस्थितीतून मिळवलेले यश लक्षात येते. गुणवत्ता, तंत्रज्ञान, विश्वास आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी उद्योग क्षेत्रात यश संपादन केले.

पुस्तकातून २००९ ते २०१४ या संघर्ष काळातील उद्योगाची स्थिती मांडण्यात आली आहे. इथेनॉलच्या संदर्भात तत्कालिन प्रधानमंत्री स्व. अटल बिहारी वाजपेयी असतांना अनुकूल निर्णय घेण्यात आला. त्यानंतरच्या काळात आलेल्या संकटावर डॉ. चौधरी यांनी नवे उपाय योजून यशस्वीपणे मात केली. २०१४ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात इथेनॉलबाबत अनुकूल धोरण लागू करण्यात आले. हे धोरण प्रभावी लागू करण्यासाठी डॉ. चौधरी यांच्या सुचनेनुसार त्यात आणखी चांगले बदल करण्यात आले आणि त्यातून २० टक्क्यापर्यंत इथेनॉलचे संमिश्रण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून एकप्रकारे १ लाख कोटीपेक्षा अधिकचे परकीय चलन वाचवू शकत आहोत. या आत्मनिर्भरतेच्या स्वप्नाला तंत्रज्ञान आणि सहकार्य प्राजने पुरविले, अशा शब्दात श्री. फडणवीस यांनी डॉ. चौधरी यांच्या कार्याचा गौरव केला.

ते पुढे म्हणाले, टूजी इथेनॉलमुळे कृषी क्रांती शक्य झाली आणि शेतकऱ्यांचे सबलीकरणाकडे वेगाने वाटचाल सुरू झाली. साखर उद्योगासमोर आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी नवे तंत्रज्ञान देण्याचे कार्य आणि साखर कारखानदारीपुढे नेण्यामागे प्राजचे प्रयत्न आहेत. साखर उद्योगावर आधारित लाखो शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी उपपदार्थ निर्मिती महत्वाची ठरली आहे. प्राजच्या माध्यमातून उप पदार्थांची अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. स्वच्छ विमान इंधन निर्मितीतही प्राजने मौलिक योगदान दिले आहे. डॉ. चौधरी यांच्या प्रयत्नांमुळे सीबीजीचे धोरण ठरविण्यात मदत झाली. त्यातून नवीन अर्थव्यवस्था निर्माण होतांना दिसत आहे.

देशासमोर प्लास्टिकचे संकट फार मोठे आहे. अविघटनशील प्लास्टिकच्या विघटनाचे तंत्रज्ञान प्राजमध्ये तयार करण्यात येत आहे. याच्यावर आधारित उद्योग देशात उभे करण्यासाठी डॉ. चौधरी यांनी मार्गदर्शन केल्यास अर्थकारण आणि पर्यावरण दोन्हीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. डॉ. चौधरी यांचे हे राष्ट्रकार्य असेच सुरू रहावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.प्रा. जोशी म्हणाले, भाषा आणि उद्योग यांचा जवळचा संबंध आहे. जागतिक स्तरावर मराठी उद्योजक यशस्वी होतांना तो मराठी भाषेचा सन्मान असतो. कोणतीही पार्श्वभूमी नसतांना ग्रामीण भागातून आलेल्या चौधरी यांची ही यशकथा युवकांना प्रेरणा देणारी आहे. जैव इंधन आणि जैव वायुच्या क्षेत्रात डॉ. चौधरी यांनी बहुमोल योगदान दिले आहे. त्यामुळे खनिज इंधनावरचे देशाचे अवलंबित्व कमी झाले आहे. नाविन्याचा ध्यास धरणारे आणि काळाच्या पुढे पाहणारे ते द्रष्टे उद्योजक आहेत. तरुण पिढीच्या आशा आकांक्षा जागविणारे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे हे पुस्तक असल्याचे त्यांनी सांगितले.

लेखक डॉ. चौधरी यांनी पुस्तकाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या काही वर्षात देशात जैव इंधनाच्या विकासाला गती मिळाली आहे. या विकासाचा ध्यास घेवून केलेल्या प्रयत्नांची माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. यापुढील टप्प्यात जैव इंधनाचा अधिक उपयोग व्हावा यासाठी प्रयत्न करायचे आहे. शासनाकडून या दिशेने प्रयत्न होत आहेत. यामुळे कार्बनचे प्रमाण कमी करून पर्यावरणाला खूप मोठा फायदा होणार आहे. एनर्जी ट्रान्झिशनसाठी प्राजतर्फे प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. सोनी यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

राजकीय अनैतिकतेचे काळे ढग शिक्षण क्षेत्रासाठी घातक : डॉ. रमेश पानसे

0

अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे पहिल्या पु. ग. वैद्य कार्यगौरव पुरस्कराने डॉ. रमेश पानसे यांचा सन्मान

पुणे : शिक्षणक्षेत्राविषयी कुठल्याही राजकीय पक्षावर विसंबून राहण्याची सध्याची परिस्थिती नाही. राजकीय क्षेत्राइतकी अनैतिकता दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात नाही. हे राजकीय अनैतिकतेचे काळे ढग शिक्षण क्षेत्रासाठी घातक आहेत. शासकीय शैक्षणिक क्षेत्रात भ्रष्टाचार वाढीस लागलेला असून नीतिमत्ता संपलेली आहे. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता बिघडत चाललेली आहे, अशी खरमरीत टीका ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व ग्राममंगलचे संस्थापक डॉ. रमेश पानसे यांनी केली.
सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेतर्फे संस्थेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पु. ग. वैद्य यांच्या नावाने देण्यात आलेल्या पहिल्या कार्यगौरव पुरस्काराने डॉ. रमेश पानसे यांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. पुरस्काराचे वितरण समरसता पुनरुत्थान गुरुकुलमचे संस्थापक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध कथाकार भारत सासणे होते. रोख रक्कम, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. वसुंधरा पुरुषोत्तम वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी मंचावर होते. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे आज (दि. 7) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षण क्षेत्रात बालसाहित्यावर लिखाण झाले असले तरी सर्वसामान्यांसाठी असलेले बालसाहित्य आजही दुर्लक्षित आहे, असे मत नोंदवून डॉ. रमेश पानसे पुढे म्हणाले, मुलांच्या सहवासात त्यांच्या गरजेनुसार घडलेल्या साहित्यकृतींची दखल साहित्यिक तसेच साहित्य संस्थांनी घेणे आवश्यक आहे. साहित्य कुठेही उगवते. मराठी भाषेत आदिवासी मुले मोठ्या प्रमाणात कथा, कवितांचे लिखाण करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या कल्पनाशक्तीला खतपाणी मिळावे या हेतूने संस्थात्मक पातळीवर कार्य होणे आवश्यक आहे. या करीता ‌‘ग्राममंगल‌’मध्ये अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेची शाखा सुरू करण्याची इच्छा आहे. ते पुढे म्हणाले, मातृभाषेचे ज्ञान उत्तमप्रकारे येण्याआधीच इंग्रजी भाषेचे शिक्षण शासनाने सक्तीचे केल्यामुळे मुलांचे इंग्रजीच नाही तर मराठी देखील कच्चे राहिले आहे. ज्यामुळे सगळे शिक्षणच मागे पडत आहे. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या शासन निर्णयाला विरोध असल्याचेही ते म्हणाले. शिक्षण संस्थांचे यश दाखविण्यासाठी अंतर्गत गुण दिले जातात या पद्धतीवरही त्यांनी टीका केली.

खोट्या शिक्षकांची संख्या आठ हजारांवर..

शिक्षण पद्धतीतील शासकीय भ्रष्टाचार या विषयी बोलताना डॉ. पानसे म्हणाले, आठ हजारांहून अधिक खोटे शिक्षक सध्या कार्यरत आहेत. या क्षेत्रात सरकारी हुकुमशाही वाढत चालली आहे. लोकप्रतिनिधींच्या हव्यासापोटी या गोष्टी घडत आहेत.

गिरीश प्रभुणे म्हणाले, पुस्तकी शिक्षणामुळे गोठे निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत डॉ. रमेश पानसे यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक प्रयोग केले आहेत. पाठ्यक्रम शिक्षणात सुलभता, मुलांना समजेल अशा भाषेत शिक्षण, आजच्या युगाला साजेसे प्रयोग त्यासाठी साधननिर्मिती तसेच मुलांसाठी निर्माण केलेले साहित्य संवादात्मक करणे, विविध उपक्रम, प्रयोग, साहित्य तयार करणे यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात सुबोध पद्धतीने कार्य करताना ग्रामीण व्यवस्था, अर्थशास्त्र, मुलांची आत्मसात करण्याची क्षमता, हस्तकौशल्य याविषयी डॉ. पानसे विविध प्रयोग करीत आहेत. पु. ग. वैद्य यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा प्रभुणे यांनी गौरव केला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना भारत सासणे म्हणाले, संस्कार, अभिरुची, व्यक्ती जाणिव, पुस्तकांची उपलब्धता, वाचन आणि शिक्षणाचा प्रारंभ हे मुलांच्या वाढीचे विविध टप्पे आहेत. किशोर वयात मुलांना कुठले साहित्य वाचायला मिळावे या विषयी चर्चा होणे आवश्यक आहे. मुलांच्या वाढीच्या वयात मूल्यव्यवस्था, माणुसकी, आनंदाचा आविष्कार, कला, आदरभाव, व्यक्तीविकास, नैतिकता याविषयी माहिती करून देणे आवश्यक असते. मुलांच्या जीवनातून अद्भुत रस हद्दपार झाल्यास पुढे जाऊन ही मुले शुष्क पोटार्थी बनतात. त्यामुळे बालसाहित्यातून मनोरंजन, अद्भुतता नाहीशी होणे धोक्याचे आहे. न वाचणारी व्यक्ती मोठ्या पदांवर कार्यरत होतात तेव्हा इतिहास, सहिष्णुता, मानवता यांच्याबद्दल सजग नसल्यामुळे त्यांच्यात नैतिकतेबद्दलही जागरुकता निर्माण होत नाही.

प्रास्ताविकात अनिल कुलकर्णी यांनी पुरस्काराविषयी तर माधव राजगुरू यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती सांगितली. सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन डॉ. स्वाती महाळंक यांनी केले. तर आभार कोषाध्यक्ष संजय ऐलवाड यांनी मानले.

मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन आणि देवराई आवश्यक : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे दि.७:- मनुष्य जातीच्या चंगळवाद आणि भोगवादी वृत्तीमुळे निसर्गाचे आजवर बरेच नुकसान झाले आहे.मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन आणि देवराई याचे झाळे वाढणे आवश्यक आहे असे मत उप सभापती डॉ .नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले .
ग्रीन हिल्स ग्रुप या संस्थेतर्फे देवराई फाउंडेशन,सहयाद्री देवराई,वनाई नैसर्गिक शेती फार्म आणि कृषी पर्यटन केंद्र या संस्थांच्या सहकार्याने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “देवराई” संकल्पनेवर आधारितप्रदर्शन आणि प्रकल्पांचे बालगंधर्व कलादालनात आयोजन करण्यात आले आहे.त्या प्रदर्शनाचे उदघाटन डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी.,पुण्याचे उपवनसरंक्षक महादेव मोहिते, जेहलम जोशी,पर्यावरण संवर्धन अधीक्षक मंगेश दिघे,ग्रीन हिल्स ग्रुपचे प्रमुख अतुल वाघ,देवराई फाउंडेशनचे रघुनाथ ढोले,भूजल विज्ञान शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे,देववन संकल्पनेचे किशोर मोहोळकर आणि वनाई नैसर्गिक शेती फार्म व कृषी पर्यटन केंद्राचे सहसंचालक अथर्व वेताळ सहयाद्री देवराईच्या स्मिता जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,येत्या कालावधीत आपल्या सर्वांना रिफ्युज,रियुज , रिड्युस,रिसायकल आणि रिथिंक या पाच ” आर ” वर काम करावे लागणार आहे.किल्ले आणि दुर्ग संवर्धनासाठी राज्यसरकारने 3 टक्के निधी मंजूर केला आहे.या निधीच्या माध्यमातून पर्यावरणाच्या दृष्टीने अधिकधिक काम करण्याची गरज आहे.त्याच बरोबर आपण सर्वानीच वनविभागाच्या ज्या जागा आहेत. त्यासाठी सर्वांनी पुढे येऊन काम केले पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या, प्रत्येक तालुक्यात देवराई निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.परंतू जीआर निघून ही या योजनेचा पुरेसा प्रचार प्रसार झालेला नाही.पण सध्याचा काळ हा सोशल मिडीयाचा असून या माध्यमांचा वापर करून आपल काम, योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच काम करावे, शासनाच्या प्रत्येक योजनेत समाजाचा देखिल सहभाग असणे आवश्यक आहे.या दृष्टीने पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी देखील याबाबत पुढाकार घ्यावा,पुणे मनपाने देखील सामाजिक संस्थांशी समन्वय साधत फोरम ची स्थापना करून राज्य सरकारच्या पर्यावरण पूरक योजना प्रत्यक्षात उतरविण्याच्या दृष्ट्रीने कार्यतत्पर राहावे,असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी मातोश्रीवर झाली बैठक:उद्धव ठाकरे युतीसाठी तयार, अनिल परबांवर जबाबदारी; चंद्रकांत खैरेंचा खुलासा

मुंबई-उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित येण्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या असून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे म्हटले जात आहे. आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील उद्धव ठाकरे आणि मनसेसोबतच्या युतीवर मोठे भाष्य केले. ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली होती, असा खुलासा खैरे यांनी केला आहे. लवकरच दोन्ही बंधू एकत्र येतील, असा दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सूचक विधाने केली जात आहेत. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना लवकरच बातमी देतो म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच चंद्रकांत खैरे यांच्या खुलाशयामुळे राज उद्धव यांची जवळीक वाढल्याचा अंदाज आहे.

ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून चंद्रकांत खैरे यांनी मोठा खुलासा केला आहे. राज-उद्धव एकत्र येण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली होती. बैठकीत उद्धव ठाकरे युतीसाठी तयार आहेत, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. आपण हात पुढे करायला तयार आहोत, ते टाळी देतात का पाहू. या युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परब यांच्यावर दिली होती. लवकरच दोन्ही बंधू एकत्र येतील, असा दावाही खैरे यांनी केला आहे.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी हे दोघे बंधू एकत्र यावेत ही तमाम शिवसैनिकांची इच्छा असल्याची भावना व्यक्त केली आहे. राज व उद्धव यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. आम्ही केवळ इच्छा व्यक्त करतो. प्रत्यक्ष त्यांनी एकत्र आले पाहिजे. या दोघांसह शिंदे यांनीही एकत्र येऊन एक अखंड शिवसेना तयार करावी, असे ते म्हणालेत. शिवसेनेच्या विभाजनामुळे शिवसेनेचे खूप मोठे नुकसान झाले. आज दोन्ही बंधू एकत्र येण्याची गरज आहे. एकनाथ शिंदेही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेत आहेत. ते ही या युतीत आले पाहिजेत.

महाराष्ट्रात लोकशाही पराभूत झाली नाही, तिचा निर्घृण खून करण्यात आला: रमेश चेन्नीथला

0

मुंबई, दि. ७ जून २०२५

महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीबाबत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आकडेवारीसह मांडलेले सत्य हा फक्त निव्वळ लेख नाही तर भारताच्या लोकशाहीवरील योजनाबद्ध केलेल्या आघाताचे सत्य उघड करणारा दस्ताऐवज आहे. लोकशाही संस्थाना ताब्यात घेऊन आपल्या फायद्यासाठी वाकवून कपट, फसवणूक करून महाराष्ट्रात जनमताची चोरी करण्यात आली, असा हल्लाबोल महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.

२०२४ साली महाराष्ट्राचे प्रभारीपद स्वीकारल्यानंतर माझ्या पहिल्याच निवडणुकीत म्हणजेच लोकसभेत काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीने मोदी लाटेला थोपवले आणि महाराष्ट्रात भाजपचा पराभव केला. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात झालेला भाजपचा पराभवच त्यांच्या पूर्ण बहुमताच्या मार्गातील मुख्य अडथळा ठरला. मात्र, अवघ्या सहा महिन्यांत असे काय घडले? ज्या महाविकास आघाडीला १७० हून अधिक जागा मिळायला हव्या होत्या, ती केवळ ५० जागांवर आली, ही कुणालाही पचण्यासारखी बाब नाही. ज्या मोदींचा महाराष्ट्रात पराभव झाला त्याच महाराष्ट्रात ज्यांच्या राजकारणावर विश्वासघाताचा, संधीसाधूपणाचा आणि गद्दारीचा शिक्का लागला आहे त्यांनी असा काय पराक्रम केला की ज्यामुळे त्यांना एवढा प्रचंड विजय मिळवला. ही काही सहज घडलेली गोष्ट नाही. हा एक लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवरील पूर्वनियोजित योजनाबद्ध हल्ला होता.महाराष्ट्रातील लोकशाही हरली नाही, तिचा शिरच्छेद करण्यात आला असे चेन्नीथला म्हणाले.

२०१९ लोकसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदारांची संख्या होती ८.९८ कोटी. २०२४ लोकसभा पर्यंत, ही संख्या नैसर्गिक वाढ म्हणून ९.२९ कोटी झाली, म्हणजेच पाच वर्षांत ३१ लाखांची वाढ झाली परंतु केवळ पाच महिन्यांतच म्हणजेच विधानसभेच्या निवडणुकीत ही संख्या अचानक ९.७ कोटींवर पोहोचली, म्हणजे ४१ लाख मतदार वाढले.शासनाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील प्रौढांची एकूण संख्या ९.५४ कोटी असताना ९ कोटी ७० लाख मतदार कसे झाले ?

आकडेवारीतील तफावत…

मतदानाच्या दिवशी प्राथमिक मतदान टक्केवारी ५८.२२% होती. ना कुठे मोठ्या रांगा होत्या, ना कुठे रात्री उशिरापर्यंत मतदान सुरु होते मग, एकाच रात्रीत मतदानाची अंतिम आकडेवारी ६६.०५% एवढी कशी वाढली? ही तब्बल ७.८३% टक्क्यांची वाढ म्हणजेच ७६ लाखांहून अधिक मतदारांनी सायंकाळ नंतर मतदान केले. याला जनमताची चोरी नाही तर काय म्हणायचे?

राहुल गांधी यांनी हा विषय केवळ लेखरूपात मांडलेला नाही, त्यांनी लोकशाहीच्या नियोजित अंताच्या कटाचा पर्दाफाश केला आहे. ही लढाई महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. ही लढाई आपल्या लोकशाहीचे अस्तित्व व स्वातंत्र्य टिकवण्याची आहे. निवडणूक आयोगाने जनतेला याचे उत्तर दिले पाहिजे. काँग्रेस पक्ष जनतेच्या बरोबर खंबीरपणे उभा आहे. आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष सुरू ठेवू. जनतेने सजग राहावे, सतत माहितीवर नजर ठेवावी आणि एकत्र राहावे. कारण आपण आता जर या दरोड्याकडे डोळेझाक केली तर आपले उरलेले स्वातंत्र्यही हिरावले जाईल असे चेन्नीथला म्हणाले.

गणेशपेठेतील मच्छीमार्केट मध्ये २०१६पासून दरमहा खंडणी वसुली: शिवम उदयकांत आंदेकर व इतर ५ जणांविरुध्द खंडणी,दरोड्याचा गुन्हा दाखल

पुणे- गणेशपेठेतील मच्छीमार्केट मध्ये २०१६पासून दरमहा खंडणी वसुली करणे न देणाऱ्यांच्या दुकानांवर दरोडा टाकणे याप्रकरणी पुणे पोलिसांनी शिवम उदयकांत आंदेकर व इतर ५ जणांविरुध्द खंडणी,दरोड्याचा गुन्हा दाखल करून शिवम आंदेकर वय २९ वर्ष रा. डोके तालीम मागे, नाना पेठ, पुणे व आकाश सुरेश परदेशी वय २८वर्ष रा. लोहीयानगर, पुणे यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सांगितले कि,’ यातील फिर्यादी यांना गणेश पेठ मच्छी मार्केट याठिकाणी सरकारी जागेवर व्यवसाय करण्यासाठी शिवम उदयकांत आंदेकर वय २९ वर्ष रा. डोके तालीम मागे, नाना पेठ, पुणे याने जीवे ठार मारण्याची धमकी देवून दरमहा ५० हजार रुपये हप्त्याची मागणी करून सन २०१६ पासून त्याचा हस्तक नामे आकाश परदेशी रा.लोहीया नगर, पुणे याचे करवी एप्रिल-२०२५ पर्यंत अंदाजे रुपये ४८ लाख खंडणीपोटी प्रत्यक्ष व ऑनलाईन पध्दतीने वसूल केलेबाबत व त्यानंतर फिर्यादि यांनी एप्रिल-२०२५ पासून आर्थिक अडचणीमुळे हप्ता देण्यास असमर्थता दाखविल्यावर त्यांना मे-२५ मध्ये परत जीवे मारण्याची धमकी देवून त्यांचे अपरोक्ष दुकानातील मासे व्यवसायचे ९०,०००/- किं रु. चे सामान ४ ते ५ गुंडाकरवी बाहेर फेकून दिले, सदरचे सामान फिर्यादी हे घेण्यास गेले असता त्यांना ते न देता जबरदस्तीने टेम्पोमध्ये घालून घेवून निघून गेले. त्याबाबत फिर्यादी यांनी वेळोवेळी सदरचे सामान परत करणेबाबत्त व व्यवसाय करू देणेबाबत विनंती केली असता त्यांना व त्यांच्या पत्नीला अपमानित करून हकलून दिलेबाबत लेखी तक्रार दिल्याने सदरबाबत तात्काळ फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं १०८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०८ (२) (४) (५), ३१० (२), ३५१ (३),३ (५) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी नामे शिवम उदयकांत आंदेकर वय २९ वर्ष रा. डोके तालीम मागे, नाना पेठ, पुणे व आकाश सुरेश परदेशी वय २८वर्ष रा. लोहीयानगर, पुणे यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त, परि-१ (अतिरीक्त कार्यभार) पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर श्रीमती. अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस ठाणे प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) अजित जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वैभव गायकवाड, पोलीस उप निरीक्षक, अरविंद शिंदे, फरासखाना पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.