पुणे-गंगाधाम चौकात पुन्हा एका महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याने महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी महापालिकेत पथ विभाग प्रमुख यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना घेराव घालून खेळण्यातले ट्रक भेट देत वाहतूक नियोजनाला सोडून केलेले रस्ते याबद्दल संताप व्यक्त केला यावेळी पुणे शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, अमोल परदेशी,प्राजक्त जाधव,लखन वाघमारे,विद्या ताकवले,समीर पवार, अमोल ननावरे, प्राजक्ता जाधव , फारुख शेख, निलेश पवार, विद्या ताकवले, हर्षवर्धन दिघे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्ते म्हणाले कि,’ आज दिनांक ११ जून २०२५ रोजी गंगाधाम मार्केट यार्ड चौक, बिबवेवाडी येथे एका भरधाव ट्रकच्या धडकेत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे गेल्यावर्षीही याच भागात एका डंपरच्या धडकेत अशाच प्रकारे एका महिलेचा मृत्यू झाला होता.या दोन्ही घटनांसाठी थेट जबाबदार महापालिकेचे रस्त्यावरील दुर्लक्षित नियोजन आणि वाहतूक व्यवस्थेतील पोलीस प्रशासनाची निष्क्रियता हे मुख्य कारण आहे. नागरिकांचे प्राण हे राजकीय हस्तक्षेप, भ्रष्ट प्रशासन आणि निष्क्रिय यंत्रणेमुळे धोक्यात आले आहेत.याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस – पुणे शहर यांच्या वतीने मुख्य अभियंता (पथ विभाग), पुणे महानगरपालिका अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे निवेदन देत तीव्र आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनावेळी अमोल परदेशी यांनी अंगाला रक्त लावून, डोक्याला पट्ट्या बांधून, जणू अपघातग्रस्त व्यक्तीच्या रूपात स्वतःला सादर करून महापालिकेच्या संवेदनशून्यतेविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. या रूपातून त्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होत असलेल्या जीवितहानीचे वास्तव मांडले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात “खेळण्यातला ट्रक” मुख्य अभियंत्यांना भेट देऊन प्रशासनाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. हा ट्रक म्हणजे पुणेकरांच्या जीवाशी चाललेल्या महापालिकेच्या “खेळा”चे प्रतीक होता.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर यांची प्रमुख मागण्या:
अपघातप्रवण रस्त्यांचे तातडीने पुनर्निर्माण
वाहनगती नियंत्रणासाठी यंत्रणा उभारणे
वाहतूक पोलिसांची नियमित उपस्थिती
अपघात पीडित कुटुंबाला त्वरित मदत
महापालिकेच्या निष्क्रिय आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई
जर प्रशासनाने यापुढेही दुर्लक्ष केले, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर यांच्यातर्फे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.


