मुंबई: मुंबईत दारूच्या दुकानांबाहेर झालेली गर्दी लक्षात घेऊन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आपल्या विशेषाधिकारात कठोर निर्णय घेतला आहे. मुंबईत उद्यापासून दारूची दुकाने पुन्हा बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी काढले आहेत. जीवनावश्यक वस्तू व औषधांची दुकाने सोडून मुंबईत इतर कोणतेही दुकान उघडण्यास मनाई राहिल, असे पालिका आयुक्तांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव मुंबईत आहे. असे असताना मुंबईतील कंटेंटमेंट झोन वगळून इतर भागात केंद्र सरकारचे दिशानिर्देश व राज्य सरकारच्या सूचनांनुसार काही अटींवर दारूची दुकाने व इतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, ही परवानगी मिळताच मुंबईत प्रामुख्याने विविध वाइन शॉपबाहेर मोठी गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील विविध भागांत दारूच्या दुकानांबाहेर मद्यप्रेमींनी रांगा लावल्या. त्यात फिजिकल डिस्टन्सिंगचेही भान राखले गेले नाही. ही बाब गांभीर्याने घेत पालिका आयुक्तांनी कठोर पाऊल उचलले आहे.
बागवे आणि बागुल यांच्यात रस्सीखेच …?
पुणे- येत्या 21 मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी दोन ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांमध्ये रस्सीखेच होत आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी उपमहापौर, नगरसेवक आबा बागुल अशी त्यांची नावे आहेत . तर, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांच्याही नावाचा विचारही पक्षाच्या पातळीवर सुरू असल्याचे वृत्त आहे.
माजी राज्यमंत्री असलेल्या रमेश बागवे यांनीही पक्षाची धोरणे सामान्यां पर्यंत पोहोचविण्यास आणि त्यातून बांधणी करण्यावर कायम भर दिला आहे.रमेश बागवे यांनी पक्षाच्या पडत्या काळात पक्षाला संजीवनी देण्याचे काम केले आहे. मोदी आणि फडणवीस यांच्या सत्ता काळात कॉंग्रेस भवनला सदैव आक्रमकतेने कार्यरत ठेवणारा अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भाजप विरोधात त्यांनी जेवढा आंदोलनाचा धडाका लावला तेवढा आजपर्यंत कोणीही लावला नाही . माजी गृहराज्यमंत्री असताना त्यांनी आर आर पाटील यांच्या सोबत काम केले .त्यांच्याच काळात कसाब ला फाशी दिली गेली .दलित मातंग समाजाचे बलशाली नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आहे. बागवे यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कॅन्टोन्मेंट मतदारसंघात अतिशय कमी मतांनी पराभव झाला. ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसमधून काही जन भाजपवासी झाले. त्यांनी कॉंग्रेस विरोधी प्रचार करून दगलबाजी केली .आणि अगदी मिळणारा विजय बागवे यांच्या हातून अत्यंत अल्प मतांनी निसटला . कॉंग्रेस मध्ये फार पूर्वीपासून फार जन आहेत . हे सारे निष्ठावंत देखील सद्य स्थितीत बागवे आणि त्यांचे पुत्र नगरसेवक अविनाश बागवे यांना कॉंग्रेसच्या शहरातील बलस्थानांमध्ये वरचा क्रमांक देतात .
कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये ज्यांचा सर्वात वरचा क्रमांक लागतो आणि ज्यांना सातत्याने आमदारकी हुलकावणी देण्यात आली असे आबा बागुल हे मागील 30 वर्षांपासून पुणे महापालिकेचे नगरसेवक आहेत.पुण्यातून ज्येष्ठ नागरिकांना काशीयात्रा घडविणारा आधुनिक श्रावण बाळ, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आक्रमक आणि अभ्यासू भाषणे करणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघ गेल्या 25 वर्षांपासून आरक्षित होता. त्यामुळे त्यांना निवडणूक लढविता आली नाही.अनेकदा त्यांची आमदारकीची संधी हुकली यावेळी राष्ट्रवादीला पर्वती मतदार संघ देण्यात आल्याने त्यांना रिंगणात उतरल्यावर माघार घ्यावी लागली .बागुल यांनी विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीकडे कळविले आहे. त्यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलणेही झाले आहे असे सांगण्यात येवू लागले आहे. .येत्या निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीचे 5, तर भाजपचे 4 सदस्य विधान परिषदेवर निवडून येऊ शकतात. सध्या कोरोनाचे महाभयंकर संकट असल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. २१ मे रोजी 9 जागांसाठी मतदान होणार आहे.
त्यासाठी ४ मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल. ११ मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, १२ मे रोजी अर्जांची छाननी होणार असून १४ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर २१ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होणार असून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
लॉक डाऊन बाबत महापालिका क्षेत्रात सर्व अधिकार महापालिका आयुक्तांना – विभागीय आयुक्त (व्हिडीओ)
पुणे- लॉक डाऊन बाबत शासनाच्या नियमांची अंमलबजावणी तंतोतंत केली जाईल ,महापालिका क्षेत्रात झोन ठरविणे नियमांची अंमलबजावणी करणे याबाबत सर्व अधिकार महापालिका आयुक्ताकडे असतील विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी पुणे यांनी Lockdown संदर्भात माहिती दिली नेमके ते काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात
आज ८४१ नवीन रुग्णांचे निदान; राज्यात एकूण १५ हजार ५२५ रुग्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि.५: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ५२५ झाली आहे. आज ८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३५४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २८१९ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८२ हजार ८८४ नमुन्यांपैकी १ लाख ६७ हजार २०५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १५ हजार ५२५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ९९ हजार १८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १२ हजार ४५६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ३४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६१७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील २६,पुण्यातील ६,औरंगाबाद शहरात १ तर कोल्हापूरमध्ये १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी २४ पुरुष तर १० महिला आहेत. आज झालेल्या ३४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ३४ रुग्णांपैकी २८ जणांमध्ये ( ८२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: ९९४५ (३८७)
ठाणे: ८२ (२)
ठाणे मनपा: ४६६ (८)
नवी मुंबई मनपा: ४१५ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २२७ (३)
उल्हासनगर मनपा: १२
भिवंडी निजामपूर मनपा: २० (२)
मीरा भाईंदर मनपा: १८२ (२)
पालघर: ३१ (१)
वसई विरार मनपा: १६१ (४)
रायगड: ५६ (१)
पनवेल मनपा: १०७ (२)
ठाणे मंडळ एकूण: ११,७०४ (४१६)
नाशिक: २१
नाशिक मनपा: २७
मालेगाव मनपा: ३६१ (१२)
अहमदनगर: ४४ (२)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव: ४७ (११)
जळगाव मनपा: ११ (१)
नंदूरबार: १९ (१)
नाशिक मंडळ एकूण: ५७१ (३०)
पुणे: १०३ (४)
पुणे मनपा: १८३६ (११२)
पिंपरी चिंचवड मनपा: १२३ (३)
सोलापूर: ३ (१)
सोलापूर मनपा: १२७ (६)
सातारा: ७९ (२)
पुणे मंडळ एकूण: २२७१ (१२८)
कोल्हापूर: ९ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)
सिंधुदुर्ग: ३ (१)
रत्नागिरी: १० (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ६२ (४)
औरंगाबाद:३
औरंगाबाद मनपा: ३३७ (११)
जालना: ८
हिंगोली: ५५
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ४०५ (१२)
लातूर: १९ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: २८ (२)
लातूर मंडळ एकूण: ५४ (३)
अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ५६ (५)
अमरावती: २ (१)
अमरावती मनपा: ५९ (९)
यवतमाळ: ९२
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: २४१ (१७)
नागपूर: २
नागपूर मनपा: १७९ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १८७ (२)
इतर राज्ये: ३० (५)
एकूण: १५ हजार ५२५ (६१७)
( टीप – ही माहिती केंद्र सरकारच्या कोविड१९ पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. सदरील अहवाल आयसीएमआर टेस्ट आय डी १२०३१७८ पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका आणि जिल्ह्यांचे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डेटा क्लिनिंग झाले असल्यामुळे प्रगतीपर आकडेवारीमध्ये वाढ आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या प्रगतीपर आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. आज राज्यात गेल्या २४ तासांमध्ये नव्याने ८४१ रुग्णांची नोंद झाली असून इतर १४३ रुग्ण डेटा क्लिनिंग प्रक्रियेमुळे वाढले आहेत.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ९४३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ११ हजार ६२९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५०.८१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
आज ५ मे कोरोनाची पुण्यातील स्थिती -विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर (व्हिडीओ)
* कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विविध विभाग युध्द पातळीवर कार्यरत
* लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करुन घ्यावी
* स्वगृही परतणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात पथके स्थापन
* केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार सर्व जिल्हयांमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी
पुणे दि.5:- पुण्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचे विविध विभाग एकमेकांमध्ये समन्वय ठेवून युध्द पातळीवर काम करत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांनीही घराबाहेर न पडता, गर्दी टाळून सूचनांचे तंतोतंत पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यावेळी डॉ. म्हैसेकर बोलत होते.
कोरोना रुग्णांची माहिती देतांना विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात कोरोना बाधीत 2 हजार 388 रुग्ण असून 617 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 644 असून 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 93 रुग्ण गंभीर असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्हयात 2 हजार 122 कोरोना बाधीत रुग्ण असून 553 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 454 असून 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 86 रुग्ण गंभीर असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडावे, असे सांगून डॉ.म्हैसेकर म्हणाले, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्याबरोबरच मास्क, सॅनिटायझर व वेळोवेळी हातांच्या स्वच्छतेवर सर्वांनी भर देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कोविड-19 ची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करुन घ्यावी. कोविड-19 रुग्णांना वैद्यकीय सुविधा देणाऱ्या रुग्णालयांसाठी पुरेसे पीपीई किट, मास्क उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येत असून वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती तयार करण्यात आली आहे. ससूनमध्ये प्रायेगिक तत्वावर प्लाझ्मा थेरपी साठी परवानगी मिळाली आहे. एका व्यक्तीचे रक्तसंकलन करण्यात आले असून लवकरच कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपीव्दारे उपचार सुरु करण्यात येईल,असे डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.
आपल्या जिल्हयातून स्वगृही जाणाऱ्या तसेच पर जिल्हयातून आपल्या जिल्हयात येणाऱ्या नागरिकांची सोय करण्याकरीता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. परराज्यात अथवा पर जिल्हयात जाण्यासाठी इच्छुकांना कोणत्याही डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करुन ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. तथापी त्यांना ज्या भागात जायचे आहे, तेथील प्रशासनाची परवानगी आल्यानंतरच जाण्याची परवानगी दिली जाईल. केंद्र व राज्य शासनाचा निर्णय झाल्यास त्यांच्यासाठी सोशल डिस्टंन्सिंगचा विचार करुन विशेष रेल्वेची व बसेसची सोय करण्यात येईल. पुणे विभागात देखील काही ठिकाणाहुन रेल्वे व बसेसव्दारे विद्यार्थी, कामगार व अडकलेल्या नागरिकांना पाठविण्याबाबत विचार सुरु आहे, असेही ते म्हणाले. खाजगी गाडीने पर जिल्हयात जावू इच्छिणाऱ्या ३ व्यक्तींनाच चारचाकी वाहनातून जाण्यासाठी परवानगी दिली जाईल.
लॉकडाऊनबाबत केंद्र शासनाच्या सूचनांनुसार राज्याने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार विभागातील सर्व जिल्हयांमध्ये कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त व पोलीस आयुक्त शहरातील कन्टेंन्मेंट झोनसाठी तर ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक विविध आदेशांची अंमलबजावणी करत आहेत. झोपडपट्टी भागात अपुऱ्या जागेमुळे सोशल डिस्टंन्सिंगचे पालन होत नसल्याने या भागातील रुग्ण्संख्या वाढत आहे. या ठिकाणी संस्थात्मक कॉरंन्टाईन होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, मास्क व सॅनिटायझरचे वाटप अशा उपाययोजना केल्या जात आहेत. कन्टेंन्मेंट झोनमधील नागरिकांनी कोणत्याही प्रकारे ये-जा न करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्हयात लॉकडाऊनमध्ये करण्यात येणाऱ्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराबाहेर तसेच ग्रामीण भागात उद्योगधंदे, वाईनशॉप सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तथापी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन न झाल्यास व दुकानाबाहेर गर्दी झाल्यास संबंधित दुकानाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले. वाढत्या रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 16 हजाराहुन अधिक बेडची तयारी करण्यात आली आहे. कोविड-19 सॅम्पल तपासणीचे प्रमाण वाढविण्यात येत असून दररोज सरासरी 850 च्या दरम्यान सॅम्पलची तपासणी करण्यात येत आहे. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून लवकरात लवकर कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर राज्यातून व पर जिल्हयातून पुणे जिल्हयात येण्यासाठी इच्छुक विद्यार्थी व नागरिकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने परवानगी देण्यात येत आहे. याबरोबरच पर जिल्हयात जाणाऱ्यांचीही सोय करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत.
मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी कन्टेंन्मेंट झोनमधील कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. या भागात सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे,असे सांगितले. वेगवेगळया कारणास्तव आजारी असणाऱ्या रुग्णांनाही कोरोनाची लागण झाल्याचे ससून व रुबी रुग्णालयाच्या निदर्शनास आल्यानंतर योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम यांनी आतापर्यंत 1 हजार 219 विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात आली असून 1 हजार 700 प्रकरणे प्रलंबित असून त्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलीस विभागामार्फत या कामासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.
प्रारंभी कोरोना प्रतिबंधक कामातील पोलीस विभाग व महानगरपालिका विभागाचे कर्मचारी दिलीप लोंढे, उमाबाई पाटोळे व रंजनाबाई चव्हाण यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
0000
संचारबंदीत अडकलेल्या राज्यातील सर्व लोकांना एसटीने मोफत घरी सोडणार
१० हजार एसटी बसेसमार्फत पुढील चार दिवसात होणार सुरूवात – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार
गडचिरोली : महाराष्ट्रामधील वेगवेगळया जिल्ह्यात असणाऱ्या लोकांना त्यांच्या त्यांच्या गावी सोडण्यासाठी शासनाकडून एसटी बसेसमार्फत मोफत सेवा दिली जाणार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले. यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात 10 हजार बसेस द्वारे संचार बंदीमुळे अडकलेल्या लोकांना स्वजिल्हयात जाण्यासाठी मोफत एसटी सेवा पुरविण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. याबाबतचे नियोजन, संबंधित जिल्हा प्रशासनाची माहिती, प्रवाशांना तपासण्याचे काम, आवश्यकता पडल्यास त्यांना संस्थात्मक विलगीकरणाचे काम याबाबत सविस्तर चर्चा विभागाकडून करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गडचिरोली येथे कोरोनाबाबत आयोजित केलेल्या आढावा बैठकीवेळी ते बोलत होते.
राज्यातील मुंबई पुण्यासह सर्व जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गलेले लोक असतील या सर्वच लोकांना पुढील चार पाच दिवसात त्यांच्या स्वजिल्हयात सोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लक्ष घालून विषय मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले. मुख्यंमत्र्यांनी मदत व पुनवर्सन विभागाला कोणत्याही प्रकारे प्रवाशांना तिकीटांचा भुर्दंड पडणार नाही अशा उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार एसटी महामंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय विभागाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला यामुळे सुरक्षित आपल्या घरी जाण्यास मदत होणार आहे. ही कोरोना लढाई जिंकण्यासाठी राज्यात प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्य करत असून आपण ही लढाई लवकरच जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रशासन व शासनाच्या चांगल्या योगदानामुळे राज्यात कोरोना मृत्यू दर आटोक्यात ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. इतर देशांच्या तुलनेत राज्य शासन कोरोना बाधितांची संख्या रोखण्यातही यशस्वी झाले आहे. प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन जनतेकडून झाल्याने आपण ही आकडेवारी कमी ठेवण्यात याशस्वी झालो. राज्य शासनाकडून दिलेल्या निर्देशांचे पालन करून तसेच आवश्यक उपाययोजना करून आपण ही कोरोना लढाई निश्चितच जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यातून आपला देश, आपले राज्य व गाव वाचवू असे ते म्हणाले. त्यांनी राज्यातील जनतेला घरी राहा सुरक्षित राहा असा संदेशही यावेळी दिला.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांनी सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी
-जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे दि.5: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करणाऱ्या सर्व खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांनी कोविड-19 ची सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी अशी सूचना, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी श्री. राम यांच्या अध्यक्षतेखाली खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांच्या डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, जिल्हयातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांमध्ये मोठया प्रमाणात कोविड-19 ची सॅम्पल तपासणीसाठी येत असतात. त्या सॅम्पल तपासणीचा अहवाल वेळेत प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. तसेच प्रयोगशाळांसाठी पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक असणाऱ्या मशिनरी, इतर साहित्य कमी पडत असल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाकडे याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत. आपणास आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याकरीता प्रशासन सहकार्य करेल, असेही श्री. राम यांनी सांगितले आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या शॅम्पल तपासणीबाबतची माहिती जाणून घेतली.
यावेळी खासगी आणि शासकीय कोविड-19 ची सॅम्पल तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळेचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
००००
विप्रो कडून पुण्यात हिंजेवाडी येथे विशेष कोविड रुग्णालयाची उभारणी
४५० खाटांच्या रुग्णालयासाठी महाराष्ट्र शासनासमवेत सामंजस्य करार
विप्रोच्या मदतीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत- मुख्यमंत्री
मुंबई दिनांक ५: जागतिक माहिती तंत्रज्ञान, सल्लामसलत व व्यवसाय प्रक्रिया सेवा कंपनी असलेल्या विप्रो लिमिटेड कंपनीने पुणे येथे ४५० खाटांचे विशेष कोविड रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी यासंबंधीचा सामंजस्य करार नुकताच महाराष्ट्र शासनासमवेत केला आहे. हे विशेष कोविड रुग्णालय पुण्याच्या हिंजेवाडी येथे माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरु करण्यात येईल.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि विप्रो लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा ग्लोबल हेड ऑपरेशन्सचे प्रमुख हरि प्रसाद हेडगे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, विप्रोच्या या मानवतावादी योगदानामुळे आपली वैद्यकीय पायाभूत सुविधा आणखी मजबूत होईल आणि साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांना याचा लाभ होईल
450 खाटांचे हे विशेष रुग्णालय महिन्याच्या अखेरीस तयार होईल आणि मध्यम प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज असेल. गंभीर रुग्णांना तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय सेवा केंद्रात हलवण्यापूर्वी त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी या विशेष रुग्णालयात १२ खाटा उपलब्ध असतील. हे कोविड १९ साठी समर्पित असे स्वतंत्र कॉम्प्लेक्स असेल. येथे नियुक्त केलेल्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी या विशेष संकुलात २४ उत्तम खोल्यांची व्यवस्थाही असेल.
आवश्यक वैद्यकीय व्यावसायिकांच्या सहाय्याने रुग्णालय त्वरित सुरु करण्यासाठी विप्रो, प्रशासकासह संरचनेनुसार आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याबरोबरच भौतिक पायाभूत सुविधा, वैद्यकीय फर्निचर आणि उपकरणे प्रदान करेल.
या विषाणुविरुद्ध लढतांना सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणतात की, या विषाणुचा मानवी जीवनावरील परिणाम टाळण्यासाठी या आपत्तीच्या प्रसंगात देशाप्रतीच्या समर्पित भावनेला कटिबद्ध राहून विप्रोने सहकार्याचा हात पुढे केला आहे तसेच विप्रो शासनासमवेत एकत्र येऊन या लढ्यात सहभागी होत आहे, महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेस लिमिटेड आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन ने कोविड १९ विरुद्ध लढतांना या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत ११२५ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. कोरोना विषाणुचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव रोखण्यासाठी मदतीच्या रुपाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या संसाधनांचा नक्कीच उपयोग होईल व त्याद्वारे वैद्यकीय क्षेत्र सक्षम होण्यास देखील मदत मिळेल.
सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणाऱ्या विप्रो आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन ने मुंबई, पुणे, औरंगाबाद वाळूज, अमळनेर, अहमदनगर, अकोला, बीड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसह देशभरात मदत कार्य केले असून शासनाच्या बरोबरीने कोविड १९ विषाणु विरुद्धच्या लढ्यात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत देशातील 34 लाखाहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचली आहे.
…
स्वयंस्पष्ट आदेश मिळेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील दुकाने बंदच राहतील- फत्तेचंद रांका
पुणे -जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त या तिघांनी काढलेल्या स्वतंत्र आदेशांमध्ये विसंगती असल्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांना भेटून एकच स्वयंस्पष्ट आदेश काढण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसा आदेश निघेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे.
पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक काल (सोमवारी) रात्री पुण्यात झाली. त्यात वरील निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी एक ऑडिओ क्लिपद्वारे दिली असून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे.
पुणे व्यापारी महासंघाचा आदेश येईपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व दुकाने बंद राहतील, असे रांका यांनी सांगितले आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत असलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता कोणत्याही व्यापाऱ्याने स्वतःचा, आपल्या परिवाराचा तसेच दुकानातील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन रांका यांनी केले आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता तसेच रेड झोनमधील दुकाने उघडण्यास परवानगी देण्याबाबत पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी या तिघांनी तीन स्वतंत्र आदेश काढले असून तिन्ही आदेशांमध्ये विसंगती आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या व लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्याला आम्हाला तोंड द्यावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आपण पालकमंत्री अजित पवार यांच्याशीही बोललो आहोत. आज (मंगळवारी) जिल्हाधिकाऱ्यांना भेटून एकच स्वयंस्पष्ट आदेश काढण्याबाबत विनंती करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. किरकोळ व्यापाऱ्यांना पोलीस व महापालिका अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून होत असलेला त्रास सहन केला जाणार नाही, असा इशाराही रांका यांनी दिला आहे.
दारुविक्री त्वरित बंद करण्याची पुणे व्यापारी महासंघाची मागणी
लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य माणूस बाहेर पडला तर त्याला पोलिसांच्या दंडुक्यांचा प्रसाद देण्यात येतो, तेच दारुची दुकाने उघडण्यास परवानगी देऊन शासनाने जणू कोरोनाला आमंत्रणच दिेले आहे, अशी टीका रांका यांनी केली. दारुच्या दुकानांसमोर होणारी गर्दी, लागणाऱ्या लांबच लांब रांगा हे कोरोना संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे दारुविक्रीवर त्वरित बंदी घालण्याची मागणी पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांनी सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी
-जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे दि.5: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करणाऱ्या सर्व खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांनी कोविड-19 ची सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी अशी सूचना, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी श्री. राम यांच्या अध्यक्षतेखाली खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांच्या डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, जिल्हयातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांमध्ये मोठया प्रमाणात कोविड-19 ची सॅम्पल तपासणीसाठी येत असतात. त्या सॅम्पल तपासणीचा अहवाल वेळेत प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. तसेच प्रयोगशाळांसाठी पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक असणाऱ्या मशिनरी, इतर साहित्य कमी पडत असल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाकडे याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत. आपणास आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याकरीता प्रशासन सहकार्य करेल, असेही श्री. राम यांनी सांगितले आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या शॅम्पल तपासणीबाबतची माहिती जाणून घेतली.
यावेळी खासगी आणि शासकीय कोविड-19 ची सॅम्पल तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळेचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
००००
सामाजिक चळवळीतील झुंजार कार्यकर्ता हरपला -उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शांताराम कुंजीर यांना श्रध्दांजली
मुंबई दि.5 : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा समाजासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लढणारे शांताराम कुंजीर यांच्या निधनाने सामाजिक चळवळीतील झुंजार कार्यकर्ता हरपला असल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शांताराम कुंजीर यांनी मराठा समाजाच्या दु:ख, वेदना आणि प्रश्नांसाठी कायमच संघर्षाची भूमीका घेतली. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी संघर्ष करताना तरुणांनी वाचन करुन आपले ज्ञान वाढविले पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह असे. परस्पर विरोधी विचारांच्या लोकांशी समन्वय आणि संवाद ठेवून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम तडीस नेले. गेल्या 26 वर्षांपासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी आपले सामाजिक लढ्याचे काम केले. त्यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला कार्यकर्ता हरपला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
*****
आज ७७१ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १४ हजार ५४१ – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि.४: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात आज नव्याने ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. आजच्या आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे तसेच मनपा यांच्याकडील आकडेवारी ही आयसीएमआर वेबपोर्टल यादीनुसार अद्ययावत करण्यात आली आहे यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात आज ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २४६५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ७६ हजार ३२३ नमुन्यांपैकी १ लाख ६२ हजार ३४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १४ हजार ५४१जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९८ हजार ४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ३५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील १८, पुण्यातील ७ , अकोला मनपातील ५, सोलापूर जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, ठाणे शहरात १आणि नांदेड शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू आज मुंबईत झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २२ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर १९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या पैकी दोघांच्या इतर आजारांबद्दलची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३३ रुग्णांपैकी २३ जणांमध्ये ( ७० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे आजार होते.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: ९३१० (३६१)
ठाणे: ६४ (२)
ठाणे मनपा: ५१४ (८)
नवी मुंबई मनपा: २५४ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २२८ (३)
उल्हासनगर मनपा: ४
भिवंडी निजामपूर मनपा: २२ (२)
मीरा भाईंदर मनपा: १५२ (२)
पालघर: ४६ (१)
वसई विरार मनपा: १५८ (४)
रायगड: ४१ (१)
पनवेल मनपा: ६४ (२)
ठाणे मंडळ एकूण: १०,८५७ (३९०)
नाशिक: २१
नाशिक मनपा: ३१
मालेगाव मनपा: ३३० (१२)
अहमदनगर: ३५ (२)
अहमदनगर मनपा: ०७
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव: ४६ (११)
जळगाव मनपा: ११ (१)
नंदूरबार: १८ (१)
नाशिक मंडळ एकूण: ५३१ (३०)
पुणे: १०२ (४)
पुणे मनपा: १७९६ (१०६)
पिंपरी चिंचवड मनपा: १२० (३)
सोलापूर: ३ (१)
सोलापूर मनपा: १२६ (६)
सातारा: ७९ (२)
पुणे मंडळ एकूण: २२२६ (१२२)
कोल्हापूर: ८
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)
सिंधुदुर्ग: २ (१)
रत्नागिरी: १० (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ६० (३)
औरंगाबाद:३
औरंगाबाद मनपा: ३१० (१०)
जालना: ८
हिंगोली: ५२
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ३७५ (११)
लातूर: १९ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: २८ (२)
लातूर मंडळ एकूण: ५४ (३)
अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ४८ (५)
अमरावती: १ (१)
अमरावती मनपा: ५७ (९)
यवतमाळ: ९१
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: २२९ (१७)
नागपूर: २
नागपूर मनपा: १७२ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १८० (२)
इतर राज्ये: २९ (५)
एकूण: १४ हजार ५४१ (५८३)
(टीप – ही माहिती केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, कोविड१९ पोर्टलवरील प्रयोगशाळांनी दिलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे.सदरील अहवाल आय सी एम आर टेस्ट आय डी ११३९५४पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई मनपा आणि ठाणे , रायगड, व पालघर हे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांबाबत आय सी एम आर प्रयोगशाळेच्या एकूण आकडेवारीत वाढ झालेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या अहवालात बदल होऊ शकतो. )
दरम्यान, आज महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री यांनी पुणे संचालक आरोग्य सेवा कार्यालयातील कोरोना वॉर रुमला भेट दिली. राज्य पातळीवर करोना नियंत्रणाचे काम कशा प्रकारे सुरु आहे, याची माहिती घेतली.
सावधान पुणेकरांनो… बाहेर पडायची घाई करू नका..! पोलिसांची विनंती आणि इशाराही ..(व्हिडीओ)
पुणे-लॉकडाऊन संपला समजू नका , धार्मिक स्थळे ,कार्यक्रमांना बंदीच आहे. पहा पुण्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी म्हटले आहे हे …सावधान पुणेकरांनो… बाहेर पडायची घाई करू नका..! कृपया संयम पाळा ,बेजबाबदार वागू नका ,अतिशय मर्यादित प्रमाणात सरकारने सवलती दिल्या आहेत . आम्हाला मोठ्या प्रमाणात कारवाई करावी लागेल अशी वेळ येवू नये . आज आपण मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आलात ,तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये … पहा आणि ऐका पूर्णतः नेमके सह पोलीस आयुक्त शिसवे यांनी काय म्हटले आहे.त्यांच्याच शब्दात …..
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/875428472942022/
नाशिक शहरातील मद्य विक्रीची दुकाने बंदच; आदेशाचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द
सवलतींचा अतिवापर झाल्यास त्या बंद करणे क्रमप्राप्त – जिल्हाधिकारी सूरज मांढरे
नाशिक : सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये मद्य विक्रीस शासनाने परिपत्रकाद्वारे 3 मे 2020 रोजी परवानगी दिली. नाशिक शहर रेड झोनमध्ये असूनही मद्यविक्री दुकाने सुरू करण्यात आली. परंतु बऱ्याच मद्य विक्री दुकानांवर सुरक्षित वावराच्या नियमांना पायदळी तुडवत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पोलिसांना मनुष्यबळाचा वापर करावा लागला. म्हणून पुढील आदेशापर्यंत नाशिक शहरातील मद्य विक्री दुकाने बंद राहतील. तसेच आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित दुकानांचे परवाना रद्द करण्यात येईल, तसेच सवलतींचा अतिवापर झाल्यास त्या बंद करणे क्रमप्राप्त ठरणार आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.
याबाबत आज जारी करण्यात आलेल्या आदेशात श्री. मांढरे म्हणतात, शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेत सोमवारी नाशिक शहरातील सर्व मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्यात आली. मात्र बहुतांशी दुकानांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन हाणामारीदेखील झाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिस विभागाला मनुष्यबळाचा वापर करावा लागला. तसेच सदर दुकानांवर कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर, चेहऱ्यावर मास्क घातले जात नसल्याची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे. ही दुकाने सुरू ठेवल्यास मोठ्या प्रमाणावर विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नाशिक शहर विभागातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद राहणार असल्याचे श्री. मांढरे यांनी कळविले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईस पात्र असतील. तसेच आदेशाचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास परवाना तात्काळ रद्द करण्यात येणार असल्याचेही श्री. मांढरे यांनी कळविले आहे.
आता लॉकडाऊन शिथिल केल्याने महापौर आयुक्तांवर नाराज ..म्हणाले ,’मोठ्या धोक्याला निमंत्रण ‘
पुणे -शहरात सुमारे ९७ टक्के भागात महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शिथिल केलेल्या लॉकडाऊनला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध केला असून, त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.
पहा,वाचा,नेमके या संदर्भात महापौर मोहोळ यांनी काय म्हटले आहे …..
अत्यावश्यक सेवेसह लेनमधील पाच दुकाने स.१० ते सा.६ पर्यंत खुली ठेवण्याच्या निर्णयाला विरोध !
पुण्यात आजपासून अत्यावश्यक सेवेसह लेनमधील पाच दुकाने स.१० ते सा.६ पर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय. याला माझा विरोध आहे. पुणेकरांनी पहिले दोन लॉकडाऊन व्यवस्थित पाळले असताना आणि रुग्णसंख्या आटोक्यात येण्याची शक्यता असताना नवे आदेश शहराला परवडणारे नाहीत,अशी माझी भूमिका आहे.
आज सकाळपासून पुण्यातील सर्वच रस्त्यांवर असणारी गर्दी चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा, त्याही स. १० ते दु. २ या वेळेत संपूर्ण शहरात असाव्यात, अशी माझी मागणी आहे. शिवाय नव्या आदेशानुसार १० ते ६ वेळ असल्याने लोक दिवसभरही बाहेर असू शकतील. यावर नियंत्रण कसे आणणार?
पुण्यात संवेदनशील परिस्थिती असताना लॉकडाऊन शिथिल करायचा असेल तर त्याबाबत पूर्णपणे अंमलबजावणी करुन निर्णय घेणे आवश्यक आहे. नव्या आदेशामुळे पोलिसांवर मोठा ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकाच लेन/रस्त्यावर अत्यावश्यक व्यतिरिक्त इतर पाच दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली गेली आहे. मात्र ही पाच दुकाने निवडण्याचे निकष काय? यावरून वाद होण्याची शक्यता नाही का? किंवा ५ व्यतिरिक्त इतर दुकान चालकांवर अन्याय झाल्याची भावना का होणार नाही?
कोरोनासंदर्भात लढा देताना गेली दीड महिना मी स्वतः प्रत्यक्ष फिल्डवर आहे. त्यामुळे संक्रमणाच्या या टप्प्यावर इतका वाढीव वेळ आणि सवलती देणे पुणेकरांना परवडणारे नाही. किंबहुना मोठ्या धोक्याला हे निमंत्रण देण्यासारखे आहे, असे माझे मत आहे.
केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेऊन त्याची वेळ सकाळी १० ते दुपारी २ इतकी असावी, ही माझी मागणी सर्व प्रशासनाने गांभीर्याने घेऊन त्यावर तातडीने अंमलबजावणी करावी, ही समस्त पुणेकरांच्या वतीने विनंती !
आपल्या मागणीसंदर्भात पालकमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्याशीही माझे बोलणे झाले असून त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आपण अपेक्षा करूयात ते या प्रकरणी हस्तक्षेप करुन तातडीनं निर्णय घेतील.
नजीकच्या काळात आपल्याला कोरोनासोबतच जगायचं आहे, व्यवसाय सुरु करायचे आहेत, हे मीही मान्य करतो. पण याचा अर्थ असा नाही की अत्यंत घाईघाईने निर्णय घ्यायचा आणि सव्वा महिना प्रभावीपणे राबवलेल्या लॉकडाऊनवर पाणी फिरवायचं?
