Home Blog Page 2602

विप्रो कडून  पुण्यात हिंजेवाडी येथे  विशेष कोविड रुग्णालयाची उभारणी

४५० खाटांच्या रुग्णालयासाठी महाराष्ट्र शासनासमवेत सामंजस्य करार

विप्रोच्या मदतीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत- मुख्यमंत्री

मुंबई दिनांक ५: जागतिक माहिती तंत्रज्ञान,  सल्लामसलत व व्यवसाय प्रक्रिया सेवा कंपनी असलेल्या विप्रो लिमिटेड कंपनीने पुणे येथे  ४५० खाटांचे  विशेष कोविड रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी यासंबंधीचा सामंजस्य करार नुकताच महाराष्ट्र शासनासमवेत केला आहे. हे विशेष कोविड रुग्णालय पुण्याच्या हिंजेवाडी येथे माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरु करण्यात येईल.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि विप्रो लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा ग्लोबल हेड ऑपरेशन्सचे प्रमुख हरि प्रसाद हेडगे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,  विप्रोच्या या मानवतावादी योगदानामुळे आपली वैद्यकीय पायाभूत सुविधा आणखी मजबूत होईल आणि साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांना याचा लाभ होईल

450 खाटांचे हे विशेष रुग्णालय महिन्याच्या अखेरीस तयार होईल आणि मध्यम प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज असेल. गंभीर रुग्णांना तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय सेवा केंद्रात हलवण्यापूर्वी त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी या विशेष रुग्णालयात १२ खाटा उपलब्ध असतील. हे  कोविड १९ साठी समर्पित असे स्वतंत्र कॉम्प्लेक्स असेल. येथे नियुक्त केलेल्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी या विशेष संकुलात २४ उत्तम खोल्यांची व्यवस्थाही असेल.

आवश्यक वैद्यकीय व्यावसायिकांच्या सहाय्याने रुग्णालय त्वरित सुरु करण्यासाठी विप्रो, प्रशासकासह  संरचनेनुसार आवश्यक असणारा कर्मचारी  वर्ग नियुक्त करण्याबरोबरच भौतिक पायाभूत सुविधा, वैद्यकीय फर्निचर आणि उपकरणे प्रदान करेल.

या विषाणुविरुद्ध लढतांना सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणतात की,  या विषाणुचा मानवी जीवनावरील परिणाम टाळण्यासाठी या आपत्तीच्या प्रसंगात देशाप्रतीच्या समर्पित भावनेला कटिबद्ध राहून विप्रोने सहकार्याचा हात पुढे केला आहे तसेच विप्रो शासनासमवेत एकत्र येऊन या लढ्यात सहभागी होत आहे, महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेस लिमिटेड आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन ने कोविड १९ विरुद्ध लढतांना या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  आतापर्यंत ११२५ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.  कोरोना विषाणुचा  मानवी जीवनावर होणारा प्रभाव रोखण्यासाठी मदतीच्या रुपाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या संसाधनांचा नक्कीच उपयोग होईल व त्याद्वारे वैद्यकीय क्षेत्र सक्षम होण्यास देखील मदत मिळेल.

सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणाऱ्या विप्रो आणि  अझीम प्रेमजी फाऊंडेशन ने  मुंबई,  पुणे,  औरंगाबाद वाळूज,  अमळनेर,  अहमदनगर,  अकोला, बीड, चंद्रपूर आणि गडचिरोली या  जिल्ह्यांसह देशभरात मदत कार्य केले असून शासनाच्या बरोबरीने कोविड १९ विषाणु विरुद्धच्या लढ्यात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत  देशातील 34 लाखाहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचली आहे.

स्वयंस्पष्ट आदेश मिळेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील दुकाने बंदच राहतील- फत्तेचंद रांका

पुणे -जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त या तिघांनी काढलेल्या स्वतंत्र आदेशांमध्ये विसंगती असल्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांना भेटून एकच स्वयंस्पष्ट आदेश काढण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसा आदेश निघेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे.

पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक काल (सोमवारी) रात्री पुण्यात झाली. त्यात वरील निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी एक ऑडिओ क्लिपद्वारे दिली असून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे.

पुणे व्यापारी महासंघाचा आदेश येईपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व दुकाने बंद राहतील, असे रांका यांनी सांगितले आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत असलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता कोणत्याही व्यापाऱ्याने स्वतःचा, आपल्या परिवाराचा तसेच दुकानातील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन रांका यांनी केले आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता तसेच रेड झोनमधील दुकाने उघडण्यास परवानगी देण्याबाबत पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी या तिघांनी तीन स्वतंत्र आदेश काढले असून तिन्ही आदेशांमध्ये विसंगती आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या व लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्याला आम्हाला तोंड द्यावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आपण पालकमंत्री अजित पवार यांच्याशीही बोललो आहोत. आज (मंगळवारी) जिल्हाधिकाऱ्यांना भेटून एकच स्वयंस्पष्ट आदेश काढण्याबाबत विनंती करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. किरकोळ व्यापाऱ्यांना पोलीस व महापालिका अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून होत असलेला त्रास सहन केला जाणार नाही, असा इशाराही रांका यांनी दिला आहे.

दारुविक्री त्वरित बंद करण्याची पुणे व्यापारी महासंघाची मागणी

लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य माणूस बाहेर पडला तर त्याला पोलिसांच्या दंडुक्यांचा प्रसाद देण्यात येतो, तेच दारुची दुकाने उघडण्यास परवानगी देऊन शासनाने जणू कोरोनाला आमंत्रणच दिेले आहे, अशी टीका रांका यांनी केली. दारुच्या दुकानांसमोर होणारी गर्दी, लागणाऱ्या लांबच लांब रांगा हे कोरोना संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे दारुविक्रीवर त्वरित बंदी घालण्याची मागणी पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांनी सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी

-जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे दि.5: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करणाऱ्या सर्व खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांनी कोविड-19 ची सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी अशी सूचना, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी श्री. राम यांच्या अध्यक्षतेखाली खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांच्या डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, जिल्हयातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांमध्ये मोठया प्रमाणात कोविड-19 ची सॅम्पल तपासणीसाठी येत असतात. त्या सॅम्पल तपासणीचा अहवाल वेळेत प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. तसेच प्रयोगशाळांसाठी पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक असणाऱ्या मशिनरी, इतर साहित्य कमी पडत असल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाकडे याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत. आपणास आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याकरीता प्रशासन सहकार्य करेल, असेही श्री. राम यांनी सांगितले आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या शॅम्पल तपासणीबाबतची माहिती जाणून घेतली.
यावेळी खासगी आणि शासकीय कोविड-19 ची सॅम्पल तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळेचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
००००

सामाजिक चळवळीतील झुंजार कार्यकर्ता हरपला -उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शांताराम कुंजीर यांना श्रध्दांजली

मुंबई दि.5 : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा समाजासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लढणारे शांताराम कुंजीर यांच्या निधनाने सामाजिक चळवळीतील झुंजार कार्यकर्ता हरपला असल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शांताराम कुंजीर यांनी मराठा समाजाच्या दु:ख, वेदना आणि प्रश्नांसाठी कायमच संघर्षाची भूमीका घेतली. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी संघर्ष करताना तरुणांनी वाचन करुन आपले ज्ञान वाढविले पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह असे. परस्पर विरोधी विचारांच्या लोकांशी समन्वय आणि संवाद ठेवून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम तडीस नेले. गेल्या 26 वर्षांपासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी आपले सामाजिक लढ्याचे काम केले. त्यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला कार्यकर्ता हरपला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
*****

आज ७७१ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १४ हजार ५४१ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.४: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात आज नव्याने ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. आजच्या आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे तसेच मनपा यांच्याकडील आकडेवारी ही आयसीएमआर वेबपोर्टल यादीनुसार अद्ययावत करण्यात आली आहे यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात आज  ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २४६५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ७६ हजार ३२३ नमुन्यांपैकी १ लाख ६२ हजार ३४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १४ हजार ५४१जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९८ हजार ४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ३५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील १८, पुण्यातील ७ , अकोला मनपातील ५, सोलापूर जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, ठाणे शहरात १आणि  नांदेड शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू आज मुंबईत झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २२ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३  रुग्ण आहेत तर १९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या पैकी दोघांच्या इतर आजारांबद्दलची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३३ रुग्णांपैकी २३ जणांमध्ये ( ७० टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे आजार होते.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ९३१० (३६१)

ठाणे: ६४ (२)

ठाणे मनपा: ५१४ (८)

नवी मुंबई मनपा: २५४ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: २२८ (३)

उल्हासनगर मनपा: ४

भिवंडी निजामपूर मनपा: २२ (२)

मीरा भाईंदर मनपा: १५२ (२)

पालघर: ४६ (१)

वसई विरार मनपा: १५८ (४)

रायगड: ४१ (१)

पनवेल मनपा: ६४ (२)

ठाणे मंडळ एकूण: १०,८५७ (३९०)

नाशिक: २१

नाशिक मनपा: ३१

मालेगाव मनपा:  ३३० (१२)

अहमदनगर: ३५ (२)

अहमदनगर मनपा: ०७

धुळे: ८ (२)

धुळे मनपा: २४ (१)

जळगाव: ४६ (११)

जळगाव मनपा: ११ (१)

नंदूरबार: १८ (१)

नाशिक मंडळ एकूण: ५३१ (३०)

पुणे: १०२ (४)

पुणे मनपा: १७९६ (१०६)

पिंपरी चिंचवड मनपा: १२० (३)

सोलापूर: ३ (१)

सोलापूर मनपा: १२६ (६)

सातारा: ७९ (२)

पुणे मंडळ एकूण: २२२६ (१२२)

कोल्हापूर: ८

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: ३२

सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)

सिंधुदुर्ग: २ (१)

रत्नागिरी: १० (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ६० (३)

औरंगाबाद:३

औरंगाबाद मनपा: ३१० (१०)

जालना: ८

हिंगोली: ५२

परभणी: १ (१)

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ३७५ (११)

लातूर: १९ (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ३

नांदेड मनपा: २८ (२)

लातूर मंडळ एकूण: ५४ (३)

अकोला: ७ (१)

अकोला मनपा: ४८ (५)

अमरावती: १ (१)

अमरावती मनपा: ५७ (९)

यवतमाळ: ९१

बुलढाणा: २४ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: २२९ (१७)

नागपूर: २

नागपूर मनपा: १७२ (२)

वर्धा: ०

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ३

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: १८० (२)

इतर राज्ये: २९ (५)

एकूण:  १४ हजार ५४१ (५८३)

(टीप – ही माहिती केंद्र सरकारच्या सूचनेनुसार,  कोविड१९ पोर्टलवरील प्रयोगशाळांनी  दिलेल्या कोविड १९ बाधित  रुग्णांच्या माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे.सदरील अहवाल आय सी एम आर टेस्ट आय डी ११३९५४पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई मनपा आणि ठाणे , रायगड, व पालघर हे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांबाबत आय सी एम आर प्रयोगशाळेच्या एकूण आकडेवारीत वाढ झालेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या अहवालात बदल होऊ शकतो. )

दरम्यान, आज महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री यांनी पुणे संचालक आरोग्य सेवा कार्यालयातील कोरोना वॉर रुमला भेट दिली. राज्य पातळीवर करोना नियंत्रणाचे काम कशा प्रकारे सुरु आहे, याची माहिती घेतली.

सावधान पुणेकरांनो… बाहेर पडायची घाई करू नका..! पोलिसांची विनंती आणि इशाराही ..(व्हिडीओ)

पुणे-लॉकडाऊन संपला समजू नका , धार्मिक स्थळे ,कार्यक्रमांना बंदीच आहे. पहा पुण्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी म्हटले आहे हे …सावधान पुणेकरांनो… बाहेर पडायची घाई करू नका..! कृपया संयम पाळा ,बेजबाबदार वागू नका ,अतिशय मर्यादित प्रमाणात सरकारने सवलती दिल्या आहेत . आम्हाला मोठ्या प्रमाणात कारवाई करावी लागेल अशी वेळ येवू नये . आज आपण मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आलात ,तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये … पहा आणि ऐका पूर्णतः नेमके सह पोलीस आयुक्त शिसवे यांनी काय म्हटले आहे.त्यांच्याच शब्दात …..

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/875428472942022/

 

नाशिक शहरातील मद्य विक्रीची दुकाने बंदच; आदेशाचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द

0

सवलतींचा अतिवापर झाल्यास त्या बंद करणे क्रमप्राप्त – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

नाशिक : सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये मद्य विक्रीस शासनाने परिपत्रकाद्वारे 3 मे 2020 रोजी परवानगी दिली. नाशिक शहर रेड झोनमध्ये असूनही मद्यविक्री दुकाने सुरू करण्यात आली. परंतु बऱ्याच मद्य विक्री दुकानांवर सुरक्षित वावराच्या नियमांना पायदळी तुडवत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पोलिसांना मनुष्यबळाचा वापर करावा लागला. म्हणून पुढील आदेशापर्यंत नाशिक शहरातील मद्य विक्री दुकाने बंद राहतील. तसेच आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित दुकानांचे परवाना रद्द करण्यात येईल, तसेच सवलतींचा अतिवापर झाल्यास त्या बंद करणे क्रमप्राप्त ठरणार आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.

याबाबत आज जारी करण्यात आलेल्या आदेशात श्री. मांढरे म्हणतात, शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेत सोमवारी नाशिक शहरातील सर्व मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्यात आली. मात्र बहुतांशी दुकानांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन हाणामारीदेखील झाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिस विभागाला मनुष्यबळाचा वापर करावा लागला. तसेच सदर दुकानांवर कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर, चेहऱ्यावर मास्क घातले जात नसल्याची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे. ही दुकाने सुरू ठेवल्यास मोठ्या प्रमाणावर विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नाशिक शहर विभागातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद राहणार असल्याचे श्री. मांढरे यांनी कळविले आहे.

या आदेशाचे उल्लंघन  करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईस पात्र असतील.  तसेच आदेशाचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास परवाना तात्काळ रद्द करण्यात येणार असल्याचेही श्री. मांढरे यांनी कळविले आहे.

आता लॉकडाऊन शिथिल केल्याने महापौर आयुक्तांवर नाराज ..म्हणाले ,’मोठ्या धोक्याला निमंत्रण ‘

पुणे -शहरात सुमारे ९७  टक्के भागात महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी   शिथिल  केलेल्या लॉकडाऊनला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध केला असून, त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.

पहा,वाचा,नेमके या संदर्भात महापौर मोहोळ यांनी काय म्हटले आहे …..

अत्यावश्यक सेवेसह लेनमधील पाच दुकाने स.१० ते सा.६ पर्यंत खुली ठेवण्याच्या निर्णयाला विरोध !

पुण्यात आजपासून अत्यावश्यक सेवेसह लेनमधील पाच दुकाने स.१० ते सा.६ पर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय. याला माझा विरोध आहे. पुणेकरांनी पहिले दोन लॉकडाऊन व्यवस्थित पाळले असताना आणि रुग्णसंख्या आटोक्यात येण्याची शक्यता असताना नवे आदेश शहराला परवडणारे नाहीत,अशी माझी भूमिका आहे.

आज सकाळपासून पुण्यातील सर्वच रस्त्यांवर असणारी गर्दी चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा, त्याही स. १० ते दु. २ या वेळेत संपूर्ण शहरात असाव्यात, अशी माझी मागणी आहे. शिवाय नव्या आदेशानुसार १० ते ६ वेळ असल्याने लोक दिवसभरही बाहेर असू शकतील. यावर नियंत्रण कसे आणणार?

पुण्यात संवेदनशील परिस्थिती असताना लॉकडाऊन शिथिल करायचा असेल तर त्याबाबत पूर्णपणे अंमलबजावणी करुन निर्णय घेणे आवश्यक आहे. नव्या आदेशामुळे पोलिसांवर मोठा ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकाच लेन/रस्त्यावर अत्यावश्यक व्यतिरिक्त इतर पाच दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली गेली आहे. मात्र ही पाच दुकाने निवडण्याचे निकष काय? यावरून वाद होण्याची शक्यता नाही का? किंवा ५ व्यतिरिक्त इतर दुकान चालकांवर अन्याय झाल्याची भावना का होणार नाही?

कोरोनासंदर्भात लढा देताना गेली दीड महिना मी स्वतः प्रत्यक्ष फिल्डवर आहे. त्यामुळे संक्रमणाच्या या टप्प्यावर इतका वाढीव वेळ आणि सवलती देणे पुणेकरांना परवडणारे नाही. किंबहुना मोठ्या धोक्याला हे निमंत्रण देण्यासारखे आहे, असे माझे मत आहे.

केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेऊन त्याची वेळ सकाळी १० ते दुपारी २ इतकी असावी, ही माझी मागणी सर्व प्रशासनाने गांभीर्याने घेऊन त्यावर तातडीने अंमलबजावणी करावी, ही समस्त पुणेकरांच्या वतीने विनंती !

आपल्या मागणीसंदर्भात पालकमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्याशीही माझे बोलणे झाले असून त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आपण अपेक्षा करूयात ते या प्रकरणी हस्तक्षेप करुन तातडीनं निर्णय घेतील.

नजीकच्या काळात आपल्याला कोरोनासोबतच जगायचं आहे, व्यवसाय सुरु करायचे आहेत, हे मीही मान्य करतो. पण याचा अर्थ असा नाही की अत्यंत घाईघाईने निर्णय घ्यायचा आणि सव्वा महिना प्रभावीपणे राबवलेल्या लॉकडाऊनवर पाणी फिरवायचं?

 

 

 

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश

0

राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दिसला पाहिजे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि ४ : अर्थचक्रही सुरु राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोन नुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्समध्ये कसे येतील ते पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा पण अंमलबजावणीत कुचराई करू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले. आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.

थोडी शिथिलता मिळताच नागरिक मोकळीक मिळाल्यासारखे फिरत असल्याचे काही शहरांमधील दृश्य गंभीर होते. पोलीस आणि प्रशासनाने गर्दीही होणार नाही आणि सुरक्षित अंतर राहील हे पाहिलेच पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मे अखेरपर्यंत राज्यात सर्वत्र ग्रीन झोन हवा

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी  तसेच पोलीस हे ज्या पद्धतीने कोरोना परिस्थिती हाताळत आहेत त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे मात्र मला येणाऱ्या काही दिवसांत ठोस रिझल्ट दिसला पाहिजे. लॉकडाऊन करणे सोपे होते पण आता त्यात शिथिलता आणताना खरी परीक्षा सुरु झाली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, काही जिल्ह्यांमध्ये अजूनही लॉकडाऊनचे योग्य पालन होत नाही अशा तक्रारी येत आहेत. मला कल्पना आहे की आपण प्रयत्न करीत आहात पण मे अखेरपर्यंत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रीन झोन आलेला दिसला पाहिजे.

रेड झोनमधून इतर झोनमध्ये संसर्ग नको

ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये आपण उद्योग- व्यवसाय काही प्रमाणात सुरु केले मात्र याठिकाणी रेड झोन मधून येऊन कुणी संसर्ग पसरवता कामा नये ही काळजी घ्यावी लागेल. लक्षणे दिसत नसल्याने अनेक व्यक्ती या कामाच्या ठिकाणी जाऊन धोका पसरवू शकतात हेही आपल्याला पाहावे लागेल. काही वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यांना संसर्ग झाला आहे हे चिंता वाढवणारे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. घाई गर्दीने आपल्याला काहीही करायचे नाही. आत्तापर्यंत आर्थिक आघाडीवर जे नुकसान व्हायचे ते होतेच आहे पण आपण प्रयत्नपूर्वक नियंत्रणात आणलेली ही साथ आता कोणत्याही परिस्थितीत पूर्णत: रोखून पुढील नुकसान होऊ न देणेच महत्त्वाचे आहे. जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील आणि अडकलेल्या लोकांचे येणे जाणे काटेकोरपणे नियम पाळूनच होईल हेही त्यांनी स्पष्ट केले.

नॉन कोव्हीड रुग्णास दुर्लक्षित करू नका

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कोव्हीड आणि नॉन कोव्हीड रुग्ण या दोघांनाही योग्य आणि वेळेत उपचार मिळणे महत्त्वाचे आहे. आपापल्या भागातील डॉक्टर्सना, वैद्यकीय क्षेत्रातील चांगल्या लोकांना याकामी सहभागी करून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

रुग्ण माहिती अद्ययावत ठेवावी

यावेळी बोलताना मुख्य सचिव अजोय मेहता म्हणाले की, शहरी भागात असलेला कोरोना राज्याच्या ग्रामीण भागात शिरकाव होऊ न देणे महत्त्वाचे आहे. जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांनी कोरोनाविषयक रुग्णांची सर्व माहिती अद्ययावत ठेवायची आहे तसेच चाचण्यांचे अहवाल वेळेत मिळतील याकडे बारकाईने लक्ष द्यायचे आहे. आयसीएमआरचा डाटा हाच प्रमाण मानला जाईल. यात कुठेही चूक होता कामा नये असे सांगितले. कंटेनमेंट क्षेत्राकडे अधिकाधिक लक्ष द्यायचे आहे. हे क्षेत्र जितके लहान ठेवता येईल तितके ठेवा तसेच क्षेत्राच्या सीमा पूर्णत: बंद असतील, तसेच क्षेत्राच्या आतमध्ये देखील वेळच्यावेळी तपासण्या, सुरक्षित अंतर, फवारणी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत राहील व तेथील लोक हे पाळतील हे पाहावे असेही ते म्हणाले.

 कोविड योद्धे लवकरच मैदानात

यावेळी माहिती देतांना प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी कोविड योद्धा म्हणून सहभागी झालेल्यांचे प्रशिक्षण दोन तीन दिवसांत संपेल आणि मग हे सर्व त्या त्या जिल्ह्यांत वैद्यकीय सेवेसाठी जाऊ शकतील अशी माहिती दिली. प्रथमोपचार प्रशिक्षण घेऊन गिर्यारोहक महासंघाचे कार्यकर्ते देखील नगर, ठाणे, सांगली इथे प्रशासनास मदतीसाठी तयार आहेत असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या

प्रधान सचिव राजीव जलोटा यांनी यावेळी कोरोना बाबतीत जिल्ह्यांची आकडेवारी आणि निष्कर्ष यांचे संगणकीय विश्लेषण केले व ५ दिवसांची सरासरी सादर केली.  प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनीही याला अनुसरून माहिती दिली. देशातल्या एकूण रुग्णसंख्येच्या ३१ टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत तसेच देशातील एकूण मृत्युच्या ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत. बरे होऊन घरी जाण्याची टक्केवारी १९ टक्के इतकी असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून ९.३ दिवस इतका झाला आहे. देशात रुग्ण  दुप्पट होण्याचा कालावधी ११.३ दिवस इतका आहे. मृत्यू दर देशात ३.२३ टक्के आहे तर महाराष्ट्रात देखील तो कमी होऊन ४.२२ टक्क्यांवर आला आहे. महाराष्ट्रात दर दशलक्ष १२२५ चाचण्या महाराष्ट्रात होतात त्या देशात सर्वाधिक आहेत असे सांगितले.

ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण दुप्पटीचा कालावधी कमी आहे तसेच मृत्यू दर जास्त आहे अशा जिल्ह्यांमध्ये अधिक काळजी घ्यावी व हे रोखण्यासाठी नियोजन करावे असेही बैठकीत सांगण्यात आले.

प्रधान सचिव राजीव मित्तल तसेच डॉ.नितीन करीर यांनी देखील यावेळी परप्रांतीय मजुरांना कशा पद्धतीने पाठवत आहोत याची माहिती दिली.

इतर राज्यात व जिल्हयांमध्ये जाणाऱ्या लोकांनी, विद्यार्थ्यांनी, मजुरांनी घाबरुन जावून नये – विभागीय आयुक्त

 

पुणे दि 4: पुणे विभागातून इतर राज्यांत किंवा इतर जिल्हयांमध्ये जाणाऱ्या लोकांनी, विद्यार्थ्यांनी, मजूरांनी घाबरुन जावू नये, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागात अडकलेल्यांना ज्या भागात जावयाचे आहे त्यांना त्यांच्या भागाची स्वीकृती देणे अपेक्षीत आहे. जी व्यक्ती किंवा ग्रुप जावू इच्छितो त्यांनी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावेत. तसेच खाजगी किंवा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र चालू शकतील. त्यामुळे शासकीय रुग्णालयांच्या समोर अनावश्यक गर्दी टाळावी. सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे. हे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपण अर्ज पाठवावा. अर्ज पाठविल्यानंतर तो अर्ज संबंधीत जिल्हाधिकारी यांच्याकडे जाईल. जेथे जावू इच्छीता त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज पाठविण्यात येईल. त्यांची संमत्ती मिळाल्यावरच जाण्यास परवानगी दिली जाईल. अशी परवानगी देतांना त्यांनी स्वत: जाण्याची व्यवस्था करणे अपेक्षीत आहे. काही ठिकाणी राज्य शासन व केंद्र शासन जसा निर्णय घेईल त्याप्रमाणे रेल्वेची व्यवस्था केली जावून शकते. परंतु त्याबाबतीत केसनिहाय निर्णय होईल्. म्हणून माझी सर्वांना पुन्हा कळकळीची विंनती आहे की विनाकारण, अनावश्यक गर्दी टाळावी. आजपर्यंत आपण सोशल डिस्नसिंग व लॉकडाऊन मुळे जे काही प्राप्त केलय त्याचे विनाकारण नुकसान होईल असे कुठलीही कृती करु नये, असेही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले आहे.

कोरोना प्रभावग्रस्त वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर

जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे, दि.4: पुणे जिल्हयातील महानगरपालिका क्षेत्राकरिता प्राधिकृत अधिकारी असणारे पुणे व पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त यांनी दिनांक 3 मे 2020 रोजी रात्री 12 वाजल्यापासून आदेशात नमूद महापालिका क्षेत्र हे हॉटस्पॉट/ कंन्टेनमेंट झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. तसेच कोरोना प्रभावग्रस्त व्यक्तींची वाढती संख्या विचारात घेऊन जिल्हयातील ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 7 तालुके प्रतिबंधित क्षेत्रे जाहिर केल्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निर्गमित केले आहेत.
पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील काही भाग हॉटस्पॉट/ कंन्टेनमेंट झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत.
तसेच बारामती तालुका – माळेगाव बुद्रक व लकडेनगर.
इंदापूर तालुका- भिगवण, तक्रारवाडी व डिक्सळ.
हवेली तालुका – मौजे जांभुळवाडी, मौजे वाघोली, आव्हाळवाडी, भावडी, केसनंद, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, सोनापूर, मालखेड, वरदाडे, जांभूळवाडी व कोळेवाडी या गावाचा रहिवास परिसर, मौजे किरकटवाडी (कोल्हेवाडी), मौजे नऱ्हे, खानापूर, लोणीकंद, उरळी कांचन, पिसोळी, वडाची वाडी, हांडेवाडी या गावाचा रहिवास परिसर, सिध्दीविनायक नगरी, दत्तनगर, परमार कॉम्प्लेक्स, निगडी (पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्र), मांजरी बुद्रुक, कदमवस्ती, लोणी काळभोर, कोंढवे धावडे.
शिरुर तालुका- शिक्रापूर.
वेल्हा तालुका- मौजे निगडे मोसे, मौजे ओसाडे, वेल्हे बुद्रुक, कोंढवाळे बुद्रुक व कोंढवाळे खुर्द, खोडद, ढाणे, वाघदरा, ब्राम्हणघर, हिरपोडी.
भोर तालुका – मौजे नसरापूर, कामथडी, खडकी, उंबरे, केळवडे, नायगाव, मालेगाव, देगाव, दिडघर, सांगवी बुद्रुक, निधान, विरवाडी, व केतकवळे.
दौंड तालुका – मौजे दहिटणे, मिरवाडी, नांदूर, खामगाव, गणेशनगर, देवकर मळा, बैलखिळा, व डुबेवाडी, दौंड शहर व बिगर नगरपालिका क्षेत्र, मौजे गोपाळवाडी, माळवाडी, मसनरवाडी, लिंगाळी, पवार वस्ती, दळवीमळा (सोनवडी), भवानीनगर व भोंगळेमळा (गिरीम).
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड – खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड कोरोना बाधित 3 कि.मी. परिसर
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड – पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड मोदीखाना कॅम्प 3 कि.मी. परीसर, ताडिवाला रोड, गल्ली नंबर 2, 32, 234 घोरपडी गाव, लक्ष्मीनगर व यशवंतनगर येरवडा.
देहू कॅन्टोन्मेंट बोर्ड – देहू गाव व देहू रोड कॅन्टोन्मेंट या गावाचा रहिवासी परिसर

मुंबईची अर्थव्यवस्था संकटात -वैद्यकीय सेवांमध्ये सुधारणा बरोबर राज्य सरकारने लॉकडाउनही उघडावे

0

मोठ्या संख्येमध्ये रोजगार संपुष्टात येण्याची शक्यता- भाजपा अध्यक्ष लोढ़ा 

मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्येसुद्धा लॉकडाउन उघडण्याबरोबरच वैद्यकीय सुविधा विकसित करण्याविषयी राज्य सरकारने तत्काळ विचार करावा, कारण देशातील काही अन्य राज्यांमध्ये लॉक-डाउन उघडण्याची सुरुवातही झाली आहे. मुंबईची अर्थव्यवस्था संकटात आहे, त्यामुळे मुंबईमध्येही आरोग्य सेवा सुधारणांसह त्या बळकट करण्याबरोबर लॉक- डाउन उघडण्यासंदर्भात राज्य सरकारने आपली योजना स्पष्ट करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी, मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा यांनी राज्य सरकारला केली आहे. लोढ़ा यांनी म्हंटले आहे की, लॉकडाउन आणखी काही काळ राहिला, तर मुंबईतील उद्योग धंदे व व्यापार ठप्प होईल व त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी समाप्त होतील, आणि लॉक- डाउन उघडल्याशिवाय वैद्यकीय सुविधांचा विकाससुद्धा शक्य नाही आहे.

लॉकडाउन संदर्भात मुंबईच्या जनतेमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे, असे म्हणून मुंबई भाजपा अध्यक्षांनी म्हंटले की, 18 मे नंतर मुंबईमध्ये रोजगाराची स्थिती कशी असणार आहे, हे लोकांना माहिती नाही आहे. त्यांनी म्हंटले आहे की, मुंबईमध्ये आता जर आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी भक्कम प्रयत्नांबरोबरच राज्य सरकारने लॉकडाउन उघडले नाही, तर मुंबईसाठी‌ आगामी काळात परिस्थिती अतिशय गंभीरसुद्धा होऊ शकते. कारण एका बाजूला कोरोना संक्रमित लोकांची संख्या वाढेल व दुसरीकडे वाणिज्य कामेही ठप्प होतील. ही परिस्थिती समजल्यामुळे लोक मोठ्या संख्येने मुंबईतून निघून जाण्याच्या तयारीत आहेत. लोढ़ा यांनी हेसुद्धा म्हंटले की, लोकांना हे माहिती नाही आहे की, लॉकडाउननंतर सरकार कशा प्रकारे मार्केट उघडणार आहे व व्यापाराच्या विकासासाठी कशा प्रकारे प्रयत्न करणार आहे. अशा असमंजस स्थितीमध्ये अडकलेल्या लाखो कामगार लोकांना कसेही करून मुंबईतून बाहेर पडावेसे वाटत आहे.

मुंबई भाजपा अध्यक्ष लोढ़ा यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्र सरकार ह्याबद्दल काहीही बोलत नाही आहे. त्याउलट देशातील काही इतर राज्यांनी ह्यासंदर्भातील आपली योजना घोषित करून लॉकडाउन उघडण्याची प्रक्रियासुद्धा सुरू केली आहे. लोढ़ा यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले व म्हंटले की, 24 मार्चला देशामध्ये लॉक-डाउन करण्याचा निर्णय घेणे अतिशय महत्त्वाचे होते. कारण तेव्हा लॉक- डाउन झाले नसते तर देशभरात आणि मुंबईमध्येही स्थिती अतिशय भयावह झाली असती. परंतु मुंबईमध्ये कोरोना संक्रमणाची जी स्थिती आहे, ती खूप दीर्घ काळ टिकणारी आहे. कारण आरोग्य सेवांना बळकटी दिल्याशिवाय परिस्थितीमध्ये सुधारणा शक्य नाही आहे. अशा स्थितीत, मुंबईच्या अर्थव्यवस्थेला विपरित अवस्थेत जाण्यापासून वाचवणे हे सर्वांचे पहिले कर्तव्य आहे. त्यामुळे देशातील इतर राज्यांच्या बरोबरच मुंबईमध्येही राज्य सरकारने आरोग्य सेवांना बळकटी देण्यासाठी व त्यांना भक्कम करण्याबरोबर लॉकडाउन उघडण्यासंदर्भात तत्काळ निर्णय घेऊन आपली योजना स्पष्ट केली पाहिजे.

पुण्यातून रेल्वेने परराज्यात जाणाऱ्या मजुरांचा खर्च काँग्रेस करणार -मोहन जोशी

पुणे – परराज्यातील आपापल्या गांवी रेल्वेने जाऊ इच्छिणाऱ्या पुणे आणि परिसरातील मजुरांचा खर्च काँग्रेस पक्ष करणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली. याबाबतचे निवेदनही त्यांनी पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांना दिले आहे.

केंद्र सरकारने केवळ चार तासांची मुदत देऊन लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे लाखो मजूर आपापल्या गांवी जावू शकले नाहीत. त्यातील काहीजणं पायपीट करत गेले. १९४७ च्या फाळणीनंतर प्रथमच असे विदारक चित्र देशात पाहायला मिळाले. आजही लाखो मजूर देशाच्या अनेक भागांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना आपापल्या गांवी जायचे आहे. पण, जाण्यासाठी काही व्यवस्था नाही. त्यांच्याजवळ पैसेही नाहीत. हे मजूर संकटात असताना भारत सरकार व रेल्वे मंत्रालय या मजुरांकडून गाडी भाड्यासाठी पैसे घेत आहे हे दुर्देव आहे. परदेशात अडकलेल्यांना आपण आपले कर्तव्य म्हणून विशेष विमान पाठवून त्यांना मायदेशी आणण्याची मोफत सोय केली. गुजरातमधील एका कार्यक्रमाच्या भोजन आणि प्रवासासाठी शंभर कोटी रुपये खर्च केले. रेल्वे मंत्रालयाने प्रधान मंत्री कोरोना फंडात एकशे एक्कावन्न कोटी देणगी देऊ शकते तर देशाच्या विकासात ज्यांचे योगदान आहे त्या गरीब मजुरांना मोफत रेल्वेची सुविधा का देऊ शकत नाही? या मजुरांच्या मोफत रेल्वे प्रवासासाठी काँग्रेस पक्षाने वारंवार मागणी केली. परंतु, ना सरकारने, ना रेल्वे मंत्रालयाने त्याकडे लक्ष दिले. म्हणून काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनिया गांधी यांनी ठाम भूमिका घेऊन निर्णय घेतला की, या मजुरांना त्यांच्या गांवी मोफत पाठविण्यासाठी त्या-त्या राज्यांमधील प्रदेश काँग्रेस त्या मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च करेल. त्यांच्या या भूमिकेला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाप्रमाणे पुणे आणि परिसरातून रेल्वेने गांवी जावू इच्छिणाऱ्या मजुरांचा खर्च काँग्रेस पक्ष करणार आहे.

याकरिता पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक यांना निवेदने दिली. पुणे आणि परीसरातून जावू इच्छिणारे मजूर, रेल्वे प्रशासनाचा त्यांच्यासाठी होणारा खर्च याचा तपशील मागवला आहे. तो तत्काळ मिळावा असे निवेदनात म्हटले आहे.

रेल्वेने जावू इच्छिणाऱ्या मजुरांची तपासणी बी.जे मेडिकल ग्राऊंड अथवा तत्सम ग्राऊंडवर करण्यात यावी असे जिल्हाधिकाऱ्यांना सुचविण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय स्वरुपाचे सहकार्य करण्याची तयारी काँग्रेस पक्षाने दाखवली आहे असे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यांच्या सीमा आणखी काही दिवस बंदच

कंटेन्टमेंट झोनमधील प्रादुर्भाव कमी करण्यावर राज्य शासनाचा भर

मुंबई, दि. 4 – राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता  उपाययोजना करण्यात येत असताना हळूहळू आर्थिक व्यवहाराला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेड झोन आणि कंटेन्टमेंट झोनमधील बाधितांची संख्या कमी करण्यावर भर देणे आवश्यक असल्यामुळे आंतर जिल्हा  प्रवासावर अजूनही निर्बंध आहेत. जिल्ह्यांच्या सीमा अजून काही काळ बंदच राहतील, असे आज राज्य शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

कंटेन्टमेंट झोन वगळता इतर ठिकाणी एकल दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असली, तरी साथरोग नियंत्रण कायद्यानुसार दिलेल्या अधिकारानुसार स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी अथवा महानगरपालिका आयुक्त दिलेल्या सवलतीबाबत वेगळा निर्णय घेऊ शकतात. तसे करताना ते अधिकची सवलत देऊ शकत नाहीत पण राज्य शासनाने दिलेली सवलत सकारण नाकारू शकतात, असेही आज शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. त्यासंदर्भात राज्य शासनाने सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने सुरू करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात दुकानदार व नागरिकांमध्ये संभ्रम राहू नये, यासाठी राज्य शासनाच्या वतीने शासनाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी पत्रकारांच्या शंकांचे निरसन केले.

राज्य शासनाने काढलेल्या आदेशानुसार, शहरी भागात महानगरपालिका व नगरपरिषद हद्दीमधील मॉल, बाजार संकुल व बाजारातील जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने बंद राहतील. त्याचप्रमाणे कंटेन्टमेंट झोन वगळून शहरी भागात सर्व प्रकारची स्वतंत्र एकल (Standalone) दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील दुकाने सुरु करता येतील. क्षेत्रातील स्वतंत्र (Standalone) दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील दुकाने असे दुकान स्थित असलेल्या गल्ली/रस्त्यावर अत्यावश्यक वस्तू विक्री दुकानांव्यतिरिक्त व्यवहार सुरु असलेल्या इतर दुकानांमध्ये जास्तीत जास्त 5 दुकाने चालू करण्यास अनुमती दिली आहे. मात्र, एका लेनमधील कुठली पाच दुकाने सुरू करावीत, यासंदर्भात त्या भागातील दुकानदारांनी आपआपसात ठरविल्यास चांगले होईल. मात्र, तसे न करता आल्यास यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन व महानगरपालिका आयुक्त हे निर्णय घेतील, असे श्री. गगराणी यांनी  सांगितले. यासंबंधीच्या सूचना जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. सुधारित आदेश काढल्यानंतर अद्यापही दुकानदारांची तयारी पूर्ण झाली नसल्याने अनेक ठिकाणी दुकाने उघडण्यात आली नाहीत. येत्या एक-दोन दिवसात ही दुकाने सुरू होऊ शकतील.

नागरिकांनी अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये

जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने सुरू केल्यानंतर होणारी गर्दी टाळण्यासाठी योग्य ती काळजी प्रशासनामार्फत घेण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यकता असल्याशिवाय खरेदीसाठी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

राज्य शासनाने सध्या कंटेन्टमेंट झोनमधील प्रादुर्भाव कमी करण्यावर भर दिला आहे. प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातून ग्रीन अथवा ऑरेंज झोनमधील जिल्ह्यात प्रवासास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमा आणखी काही दिवस बंद राहणार आहेत. मात्र, वैद्यकीय कारणामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास परवानगी देण्यात येत असून आतापर्यंत अशा कारणांसाठी 56 हजार 600 नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे.

मजुरांच्या स्थलांतरासाठी योग्य ती काळजी

परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी परत पाठविण्यासाठी राज्य शासनाने योग्य ती काळजी घेतली आहे. ज्या राज्यांना अशा मजुरांना घेण्यास मंजुरी दिली आहे, अशा राज्यातील मजुरांना रेल्वे अथवा खासगी बसेसद्वारे त्या त्या राज्यात पाठविण्यात येत आहे. आतापर्यंत 35 हजार मजुरांना इतर राज्यात पाठविण्यात आले आहे. मजुरांना पाठविताना त्यांची योग्य ती तपासणी करून पाठविण्यात येत आहे. तसेच विविध राज्यांशी मजुरांच्या स्थलांतरासंदर्भात सातत्याने चर्चा सुरू आहे.

इतर नैसर्गिक आपत्तीपेक्षा कोविड प्रादुर्भावाचे संकट हे वेगळे आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत व पुनर्वसनावर भर देण्यात येते. मात्र, कोविडचा प्रादुर्भाव किती काळ टिकेल व तो कमी करण्यासंदर्भात नेमकी प्रक्रिया अद्याप तयार नसल्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी वेळोवेळी केंद्र शासन व राज्य शासन आदेश निर्गमित करत आहे. स्थानिक परिस्थितीनुसार राज्य शासन निर्णय घेत आहे. सध्या कोविड रुग्णाच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची संख्या दिसून येत आहे. कंटेन्टमेंट झोनची अंमलबजावणी कडकपणे केल्यामुळे पूर्णपणे नवीन रुग्ण सापडत नाहीत.

आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उपाययोजना

लॉकडाऊन झाल्यानंतर वस्तू व सेवा कर, मुद्रांक शुल्क, उत्पादन शुल्क येणे बंद झाल्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती प्रभावित झाली आहे. कोविडमुळे जीवितहानी कमी करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. त्यानंतर आर्थिक स्थिती सुधारण्याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने आर्थिक व्यवहार सुरू करण्यात येत आहे. कोविडचा संसर्ग कमी झाल्यानंतर राज्याची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी काय उपाययोजना करावे, हे सुचविण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच आर्थिक व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. ही समिती त्यांच्या अहवाल दिल्यानंतर त्यावर राज्य शासन योग्य ती कार्यवाही सुरू करणार आहे. राज्यातील आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कंटेन्टमेंट झोन वगळता इतर भागातील उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. काही ठिकाणी असे उद्योग सुरू झाले असून अनेक ठिकाणी नियमांची पूर्तता करून लवकरच उद्योग सुरू होतील, असेही राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ‘महापारेषण’कडून साडेपाच कोटी

0

मुंबई, दि. 4 : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला राज्यातील ऊर्जा विभागाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने चांगला प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महापारेषणने सुमारे साडेपाच कोटी रूपये जमा केले आहेत. ‘कोरोना’ विरोधी लढ्यामध्ये केलेल्या आर्थिक योगदानाबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महापारेषणचे कौतुक केले आहे.

कोरोना संकट निवारणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी ही मदत देण्यात येत असल्याचे महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुमारे १ कोटी ५५ लाख ४३ हजार ३६१ रुपये देऊन महापारेषणने प्रतिसाद दिला होता. आता महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका दिवसाचे वेतन सुमारे १ कोटी ९३ लाख ३५ हजार ७६२ रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहेत. तसेच महापारेषणच्या सांघिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) फंडातून तब्बल दोन कोटी रूपये राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या लढाईसाठी महापारेषणने एकूण सुमारे साडेपाच कोटी रूपये दिले आहेत.

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. वाघमारे म्हणाले, ‘कोरोना’ विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी सरकारकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. महापारेषणकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही महापारेषणच्या कामाचे जाहीर कौतुक केले आहे. वीजपुरवठा अखंडित व चांगल्या क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.