Home Blog Page 2594

चालू शैक्षणिक वर्षांपासून पहिली व सहावीत मराठी सक्तीची

0

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आढावा

मुंबई, दि .११ : राज्यात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून पहिली व सहावीत या वर्गासाठी सर्व माध्यमांच्या शाळांतून मराठी भाषा विषय शिकविणे सक्तीचे केले जाणार आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई व शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी या संदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेतला.

महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करणे हा कायदा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहांनी मंजूर केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल, असे आश्वासन मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिवेशनात दिले होते. त्याच अनुषंगाने होत असलेल्या कार्यवाहीचा आज आढावा घेण्यात आला. या संदर्भात शिक्षण आयुक्त विश्वास सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज बैठक घेण्यात आली. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यश्र श्री. अभ्यंकर, शिक्षण संचालक आणि बालभारतीचे संचालक उपस्थित होते.

सर्वप्रथम बालभारतीतर्फे राजीव पाटोळ यांनी अनिवार्य मराठीसाठी वर्गवार अभ्यासक्रम आणि पाठ्य़पुस्तके या संदर्भातील पूर्वतयारीबाबत सादरीकरण केले. शिक्षण विभागाने सर्व अभ्यासक्रमांच्या शाळांसाठी मराठी सक्तीने शिकविण्यासाठी केलेल्या पूर्वतयारीबद्दल मराठी भाषा मंत्री श्री. देसाई यांनी शालेय शिक्षणमंत्री आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच आगामी शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी मराठी भाषेचा वर्गवार अभ्यासक्रम, इयत्ता पहिली व सहावीसाठी पाठ्य़पुस्तके आणि प्राशिक्षण साहित्य, तयार करण्याबाबत सूचना केली. तसेच २०२०-२१ च्या प्रथम सत्रापासून सर्व माध्यमांच्या शाळांनी मराठी विषय सक्तीने शिकविण्याच्या कायद्याचे अनुपालन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने अधिसूचना निर्गमित करावी, असेही सूचविले.

या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करणे, मसुदा तयार करणे आदी बाबीवर यावेळी चर्चा करण्यात आली.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कायद्याच्या अमंलबजावणीसाठी क्षेत्रिय अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे आणि नियमावली तयारी करण्यासाठी एका कार्यबल गटाची स्थापना केल्याचे सांगितले. या कार्यबल गटात मराठी भाषा विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याची सूचना श्री. देसाई यांनी केली.

विधानसभा उपाध्यक्षांकडून स्थानिक विकास निधीतून ४१ लाख ३० हजारांची मदत

0

नाशिक दि. ११ – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरावरुन प्रयत्न होत असून, अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या कोरोना नियंत्रणासाठी पेठ तालुक्यातील पेठ ग्रामीण रुग्णालय व सात-बारा केंद्र आणि दिंडोरी तालुक्यातील दोन ग्रामीण रुग्णालय व दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी स्थानिक विकास निधीतून ४१ लाख ३० हजार रुपयांची मदत केली. या निधीतून कोरोना लढ्यासाठी आवश्यक ती साधनसामुग्री घेण्यात आली आहे.

या साहित्याचा वापर कोविड १९ सेंटर तसेच डेडिकेटेड कोविड-१९ सेंटर व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी केला जाणार आहे. या निधीच्या माध्यमातून देण्यात आलेले आवश्यक वैद्यकीय साहित्य व इतर बाबींचे वितरण श्री. झिरवाळ यांनी केले.

यावेळी पेठ तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील व कोचरगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. खोकले यांनी हे साहित्य स्वीकारले. पेठ तहसीलदार संदीप भोसले, दिंडोरी तहसीलदार कैलास पवार, गोकुळ झिरवाळ तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

पेठ तालुक्यासाठी देण्यात आलेले साहित्य

ऑक्सिमीटर ८, पीपीई किट ५००, एन-९५ मास्क एक हजार, नेब्युलायझर ५, सॅनिटायझरच्या दोन हजार बॉटल, चादरी १८८, बेडशीट ११९ व  फोम गाद्या ३० देण्यात आल्या आहेत.

दिंडोरी तालुक्यासाठी देण्यात आलेले साहित्य

दिंडोरी तालुक्यासाठी १२ ऑक्सिमीटर, पीपीई किट ५००, एन- ९५ मास्क एक हजार, नेब्युलायझर ५, सॅनिटायझर दोन हजार बॉटल, चादरी २१६, बेडशीट १५३, फोम गाद्या ३६ देण्यात आल्या आहेत.

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि.११ : लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करताना आपण ग्रीन झोन्समध्ये उद्योग- व्यवसाय सुरु होतील, असे पाहिले आहे. मुंबईतही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरु करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. परप्रांतीय मजुरांची वाहतूक सुरु झाली आहे मात्र हे करताना प्रत्येक राज्याने व्यवस्थित काळजी आवश्यक आहे अन्यथा कोरोना संसर्ग देशभर वाढू शकतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आपले विचार मांडत होते.

लॉकडाऊनच्या बाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, आम्ही सर्व राज्ये त्याप्रमाणे अंमलबजावणी करूत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून सर्व जण अडकले आहेत. परराज्यातील मजुरांना घराची ओढ लागली आहे. इतर राज्यांतले महाराष्ट्रीय परत येत आहेत. हे मजूर विविध झोन्समधून ये – जा करीत आहेत, अशा वेळी सर्वांनी व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, अन्यथा संसर्ग वाढण्याचा धोका देशाला आहे. महाराष्ट्राने साडे पाच लाख मजुरांच्या निवारा व नाश्ता, भोजनाची व्यवस्था चोखपणे ठेवली तसेच इतर राज्यांशी समन्वय ठेऊन मजुरांना पाठवणे सुरु केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आपण एप्रिलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला. आता असे सांगण्यात येते की मे मध्ये या रोगाचा उच्चांक येईल, तो जून, जुलैमध्येही येऊ शकतो असेही बोलल्या जाते. वूहानमध्ये परत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झालाय,असे मी वाचले. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा इशारा दिला आहे. अशावेळी लॉकडाऊन बाबत काळजीपूर्वक कार्यवाही व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुंबई मध्येही उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

पीक कर्ज मिळावे

महाराष्ट्रात कोरोना पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना सुरु होती. मात्रे काही जिल्ह्यांमध्ये विशेषत: विदर्भात निवडणुकांमुळे तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही. आता खरीप हंगाम सुरु झाला आहे.  शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पीक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेला केंद्रामार्फत सुचना द्याव्यात, सुमारे १० लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

जीएसटी परतावा लवकर मिळावा

राज्याला ३५ हजार कोटींचा फटका बसला असून जीएसटी परताव्यापोटी तसेच केंद्रीय कराच्या हिशापोटी संपूर्ण रक्कम लवकरात लवकर मिळावी म्हणजे या संकट समयी मदत होऊ शकेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कंटेनमेंट क्षेत्राकडे अधिक काटेकोर लक्ष देण्यात येत असून  लॉकडाऊनची अधिक कठोर अंमलबजावणी. चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे. नेहरू सायन्स सेंटर, रेसकोर्स मैदान, वांद्रा-कुर्ला संकुल, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर येथे विलगीकरणाची, उपचाराची व्यवस्था केल्याचेही ते म्हणाले.

या कोरोनाचा प्रतिबंध करणारे औषध बनविणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देऊन ते तयार करण्यात पुढाकार घेतल्यास उपयोग होईल असेही ते म्हणाले. वैद्यकीय उपकरणांवरील जीएसती शुल्क माफ करावे तसेच काही संस्था उपकरणे आयात करीत आहेत सीमा शुल्कात सवलत द्यावी असेही ते म्हणाले.

मुंबई पुणे सारखा तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स देशाच्या पातळीवर तयार करून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तो संपर्कात राहील असे पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

आवश्यकता भासल्यास मनुष्यबळ द्यावे 

केंद्रीय पथकांनी मुंबई-पुणे येथे भेटी दिल्या असून उपयुक्त सूचना केल्या आहेत. आमचे पूर्ण सहकार्य असेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अहोरात्र काम करीत आहेत. विशेषत: पोलिसांना मधूनमधून विश्रांती देण्याची गरज आहे, त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्थेचे काम आहे, ते आजारी पडून चालणार नाही त्यामुळे  आवश्यकता भासेल तसे केंद्र सरकारने त्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचा ताण कमी होईल.  त्याचप्रमाणे केंद्रीय संस्था, पोर्ट ट्रस्ट, लष्कराची रुग्णालये व आयसीयू बेड्स सुविधाही मिळाल्यास पुढे कोरोनाशी लढतांना त्याचा उपयोग होईल.

कोरोना संकटावर मात करण्यासाठी परिचारिकांचे योगदान अमूल्य

0

अमरावती, दि. 11 : सेवा हे ब्रीद घेऊन आयुष्यभर रुग्णांची शुश्रुषा करणाऱ्या परिचारिका, आरोग्य सेविका या आरोग्य यंत्रणेचा कणा असून, कोरोना संकटावर मात करण्यासाठी त्यांचे अमूल्य योगदान मिळत आहे. जिल्ह्यात सुमारे 10 हजार परिचारिका, आरोग्य सेविका, मदतनीस कार्यरत असून, त्या अविरतपणे अहोरात्र काम करत आहेत.

संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी, दुर्गम भागात आरोग्यसुविधा पोहोचविण्यात, आरोग्य सेवा वितरणात, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य पुरविण्यास आणि आता कोरोनासारख्या महाभयंकर संसर्गजन्य विषाणूशी लढण्यासाठी परिचारिका सदैव   तत्पर आहेत. आधुनिक शुश्रुषा शास्त्राच्या संस्थापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा 12 मे हा जन्मदिवस आहे. त्यांच्या  सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो. यानिमित्त अखंड सेवेचे व्रत घेतलेल्या परिचारिकांना मनस्वी सलाम करते, अशा शब्दांत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी परिचारिका व आरोग्यसेविका भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.

आधुनिक परिचर्येचा पाया घालणाऱ्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस अर्थात 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.  कोरोनासारखे महाकाय संकट संपूर्ण विश्वात घोंगावत असताना आपली आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून रुग्णांना उपचार करीत आहेत. या सर्व प्रक्रियेत रुग्णांची संपूर्ण सेवा  करण्याचे महत्त्वाचे काम परिचारिका करत  आहेत.

रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा जास्त वेळ परिचारिकेच्या देखरेखीखाली असतो. रुग्ण सर्वात प्रथम परिचारिकाच्या संपर्कात येतो.  रूग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करत स्वतःच्या आयुष्यातला काळोख विसरून रूग्णाच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते.  जिल्ह्यामधील विविध रूग्णालयांत दहा हजारांहून अधिक परिचारिका, आरोग्यसेविका, मदतनीस या तपासणी, उपचार, अतिदक्षता वॉर्डात उपचार अशा विविध कामांत योगदान देत आहेत.

सध्याच्या युगातील बदललेले वातावरण, असाध्य रोगात झालेली वाढ, विविध संसर्गजन्य आजार व सध्याचा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव यामुळे जगभरातील सगळ्याच देशात परिचर्या सेवेची मागणी वाढत आहे.  कोविड 19 आजारांच्या नियंत्रणामध्ये परिचारिकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. कारण परिचारिका हा आरोग्य यंत्रणेतील मोठा समूह मजबूत कणा आहे. त्यांच्यामुळेच उपचार योग्यपद्धतीने होण्यास मदत होत आहे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

परिचारिका, आरोग्यसेविका, मदतनीस भगिनी या डॉक्टरांच्या बरोबरीने रुग्णांना उपचार देत आहेत. परिचारिका ज्यावेळी आपल्या अभ्यासाला सुरुवात करून थेट रुग्ण सेवा प्रशिक्षणास सुरुवात करतात. त्यावेळी  या व्यवसायाशी निगडित शपथ घेतात किंवा प्रतिज्ञा करतात. ती शपथ खूपच प्रेरणादायी आहे, त्याचा वेगळा सोहळा हा प्रत्येक नर्सिंग कॉलेजमध्ये पार पडत असतो. या प्रतिज्ञेशी बांधिल राहून या भगिनी आयुष्यभर सेवेत अविरत असतात. जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, स्त्री रूग्णालय, विभागीय संदर्भ रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे, महापालिका रुग्णालये, नगरपालिका रुग्णालय याशिवाय विविध संस्थांची, तसेच  रुग्णालयांत शुश्रुषेद्वारे रुग्णांना निरामय आयुष्य मिळण्यासाठी धडपडणा-या या सर्व सेविकांबद्दल जागतिक परिचारिका दिनानिमित्त  विविध स्तरांतून कृतज्ञता व्यक्त होत आहे.

पुणे विभागात कोरोना बाधितांची संख्या झाली ३ हजार ३६५ : आजपर्यंत १ हजार २३७ रुग्ण बरे होऊन घरी (व्हिडीओ)

पुणे दि.11 :- पुणेविभागातील 1 हजार 237  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या  3 हजार 365 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 1  हजार 953 आहेत. विभागात कोरोना बाधित एकूण 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  115 रुग्ण  गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.यापैकी पुणे जिल्ह्यातील 2 हजार 926  बाधित रुग्ण असून  1 हजार 139   कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या  1 हजार 630  आहे. कोरोनाबाधित एकूण 157  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच     107 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्ह्यातील 119  कोरोना बाधित रुग्ण असून 20  बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 97 आहे. कोरोनाबाधित एकूण 2  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 264 कोरोना बाधित रुग्ण असून  41  बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 209 आहे. कोरोनाबाधित एकूण  14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 38   कोरोना बाधित रुग्ण असून 28  बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 9  आहे. कोरोनाबाधित एकूण 1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील  18 कोरोना बाधित रुग्ण असून 9  बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकूण 34 हजार 64 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 32  हजार  366 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर  1 हजार 671  नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी    28 हजार 969  नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून  3   हजार 365 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.   

आजपर्यंत विभागामधील 92 लाख 99 हजार 876 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 2 लाख 32 हजार 714 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 176  व्यक्तींना अधिक तपासणीसाठी  संदर्भीत करण्यात आले आहे.

परदेशातून आलेल्या व्यक्तीचे विलगीकरण : 

दि.10.05.2020 रोजी परदेशातून एकूण 141 व्यक्तीचे विभागामध्ये आगमन झालेले आहे. या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे.

परप्रांतीय व्यक्तीसाठी रेल्वेची सुविधा : – 

दि. 11.05.2020 रोजी दु. 4.00 वाजेपर्यंत पुणे विभागातून मध्यप्रदेशासाठी – 4, उत्तरप्रदेशासाठी – 2, उत्तराखंडसाठी -1, तमिळनाडूसाठी -1 अशा एकूण 8  रेल्वे रवाना झालेल्या आहेत. तसेच  दि.11.05.2020  रोजी  सायं 5.00 वा.जबलपूर  (म.प्र.) साठी  व  रात्री 10.00 वा. जयपूर (राजस्थान) साठी  रेल्वेगाड्या रवाना होत आहेत.                             

धोकादायक धरणांना भेट देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तयार करा

0

मुंबई, दि. ११ : राज्यातील लघु पाटबंधारे योजनांची मान्सूनपूर्व तपासणी करून धोकादायक धरणांना भेटी देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विभागाला दिल्या.

श्री. गडाख म्हणाले, मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व धरणांचा मान्सूनपूर्व तपासणी अहवाल वेळीच सादर केला जाईल याची दक्षता घ्यावी, तसेच धरण सुरक्षिततेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात व धोकादायक धरणे सुस्थितीत येतील याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, याबाबत कुठालाही हलगर्जीपणा होणार नाही यासाठी दक्ष रहावे.

मान्सून पूर्व धरण तपासणी तसेच धोकेदायक धरणांना सक्षम अधिकाऱ्यांनी भेटी देऊन आवश्यक उपाययोजना करणे ही अत्यावश्यक बाब म्हणून गृहीत धरण्यात यावी, मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारित पूर्ण झालेल्या व पाणीसाठा होत असलेल्या योजनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्राधान्याने करावयाची कार्यवाही व उपाययोजनांसाठी देण्यात आलेल्या सूचनांचे कटाक्षाने पालन करावे असे श्री. गडाख यांनी सांगितले.

पावसाळ्यादरम्यान धरणफुटी अथवा क्षतिग्रस्त होण्याची घटना उद्भवू नये यासाठी प्राधान्याने करावयाच्या कार्यवाहीबाबत पत्राद्वारे सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. महसूल, पोलीस व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून मान्सुनपूर्व दुरुस्ती करणे, तलावालगतच्या मनुष्यवस्तींना सूचना देणे, प्रथम पाणीसाठा करताना घ्यवयाची काळजी या सर्व बाबींविषयी येणाऱ्या पावसाळ्यापुर्वी प्रथम प्राधान्याने तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

मान्सूनपूर्व धरणाच्या तपासणी करीता मृद व जलसंधारण प्रादेशिक मुख्य अभियंता, यांच्या पत्राव्दारे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी तथा अधीक्षक अभियंता, मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा कार्यकारी अभियंता, मृद व जलसंधारण विभाग, व त्यांचे अधिपत्याखालील क्षेत्रिय कर्मचारी यांना, COVID19 आजार व कोरोना या विषाणूच्या संसांर्गाच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या सूचना व घ्यावयाचीच सर्व दक्षता यांचे पालन करण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यासाठी प्रवास करण्यास विशेष बाब म्हणून अनुमती देण्यात आली असल्याचे श्री.गडाख यांनी सांगितले.

विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणूक : १४ उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्रे दाखल

0

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह १० उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. नामनिर्देशन दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली.

विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी येत्या दि. २१ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. आज नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची नावे आणि पक्षाचे नाव पुढीलप्रमाणे.

श्री. संदीप सुरेश लेले (भा.ज.पा.), श्री. रमेश काशिराम कराड (भा.ज.पा.).

श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना),

श्री. शशिकांत जयवंतराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. अमोल रामकृष्ण मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. किरण जगन्नाथ पावसकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. शिवाजीराव यशवंत गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी).

श्री. राजेश धोंडीराम राठोड (भा.रा.काँ.)

श्री. राठोड शेहबाज अलाउद्दीन (अपक्ष)

यापूर्वी दि. ८ मे रोजी चार उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये श्री. गोपीचंद कुंडलिक पडळकर (भा.ज.पा.), श्री. प्रवीण प्रभाकरराव दटके (भा.ज.पा.), श्री. रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील (भा.ज.पा.), डॉ. अजित माधवराव गोपचडे (भा.ज.पा) यांचा समावेश आहे.

नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. १२ मे रोजी होणार असून नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम मुदत दि. १४ मे २०२० आहे.

1278 नवीन रुग्णांचे निदान-राज्यात कोरोनाचे एकूण २२ हजार १७१ रुग्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. १० : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १७१ झाली आहे. आज १२७८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३९९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  ४१९९ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ३८ हजार ७६६ नमुन्यांपैकी २ लाख १५ हजार ९०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २२ हजार १७१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ४४ हजार ३२७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १४ हजार ४६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ५३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ८३२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील १९, पुण्यातील ५, जळगाव शहरात ५, धुळे शहरात २, धुळे ग्रामीण भागात १, पिंपरी चिंचवड मध्ये १, अहमदनगरमध्ये १, औरंगाबाद शहरात १, नंदूरबारमध्ये १, सोलापूर शहरात १ तर वसई विरारमध्ये १ मृत्यू झाला आहे. मालेगाव शहरातील १४ मृत्यू हे २७ एप्रिल ते १० मे २०२० या कालावधीतील आहेत. त्यांची नोंद आज घेण्यात आली आहे. याशिवाय मध्यप्रदेशमधील एक मृत्यू आज मुंबई येथे झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी ३३ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ५३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १९  रुग्ण आहेत तर ३०  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. रुग्णांना असणाऱ्या इतर आजारांबाबत १७ जणांची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३६ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये (७५ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १३,७३९ (५०८)

ठाणे: १२१ (२)

ठाणे मनपा: ८८० (८)

नवी मुंबई मनपा: ८२६ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: ३५१ (३)

उल्हासनगर मनपा: २६

भिवंडी निजामपूर मनपा: ३० (२)

मीरा भाईंदर मनपा: २१४ (२)

पालघर: ३४ (२)

वसई विरार मनपा: २२९ (१०)

रायगड: ९२ (१)

पनवेल मनपा: १३८ (२)

ठाणे मंडळ एकूण: १६,६८० (५४४)

नाशिक: ५९

नाशिक मनपा: ३८

मालेगाव मनपा:  ५६२ (३४)

अहमदनगर: ५४ (३)

अहमदनगर मनपा: ०९

धुळे: ९ (३)

धुळे मनपा: ४५ (३)

जळगाव: १४४(१२)

जळगाव मनपा: ३४ (७)

नंदूरबार: २२ (२)

नाशिक मंडळ एकूण: ९७६ (६४)

पुणे: १६२ (५)

पुणे मनपा: २३७७ (१४६)

पिंपरी चिंचवड मनपा: १४० (४)

सोलापूर: ९

सोलापूर मनपा: २४१ (११)

सातारा: ११९ (२)

पुणे मंडळ एकूण: ३०४८ (१६८)

कोल्हापूर: १३ (१)

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: ३३

सांगली मिरज कुपवाड मनपा: ४ (१)

सिंधुदुर्ग: ६

रत्नागिरी: ३६ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ९८ (३)

औरंगाबाद:९३

औरंगाबाद मनपा: ४७५ (१३)

जालना: १२

हिंगोली: ५९

परभणी: १ (१)

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ६४१ (१४)

लातूर: २५ (१)

लातूर मनपा: १

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ४

नांदेड मनपा: ३९ (३)

लातूर मंडळ एकूण: ७३ (४)

अकोला: १७ (१)

अकोला मनपा: १४२ (१०)

अमरावती: ४ (१)

अमरावती मनपा: ७८ (११)

यवतमाळ: ९६

बुलढाणा: २४ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: ३६२ (२४)

नागपूर: २

नागपूर मनपा: २४९ (२)

वर्धा: ०

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ३

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: २५७ (२)

इतर राज्ये: ३६ (९)

एकूण:  २२ हजार १७१  (८३२)

(टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या ३०८ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. मागील काही दिवसातील ६६५ कोविड बाधित रुग्ण आय सी एम आर यादीनुसार आज अद्ययावत झाल्याने या रुग्णसंख्येचा समावेश आजच्या दैनंदिन आकडेवारीत करण्यात आलेला नाही तथापि ते एकूण रुग्ण संख्येत समाविष्ट आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या कोविड१९ पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. सदरील अहवाल आय सी एम आर टेस्ट आय डी १६०६९२३ पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका आणि जिल्ह्यांची आकडेवारी डेटा क्लिनिंगनुसार आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १२३७ कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२ हजार ७६८ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५५.६१ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत डाळ वाटप केली जाणार-अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

0

मुंबई दि.१० मे :- पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल ते जुन २०२० या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रती कार्ड १ किलो चणाडाळ किंवा तुरदाळ मोफत वाटप केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे अन्न,नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असून अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत राज्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तीन महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे वाटप नियमित करण्यात येत आहे. त्याचपार्श्वभूमीवर या लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी मोफत डाळ वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर, कार्ड धारकाला १ किलो चणाडाळ किंवा तुरदाळ मोफत देण्यात येणार आहे.यासाठी केंद्र शासनाकडून राज्याला प्रती माह सोळा हजार मेट्रिक टन चणाडाळ व तुरडाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मध्य प्रदेशातील मजूर रवाना- जिल्हाधिकारी राम

पुणे, दि.10-
दौंड व पुरंदर तालुक्यात लॉकडाऊन मुळे अडकलेल्या मध्यप्रदेशमधील 1172 मजुरांना विशेष श्रमिक रेल्वे द्वारे दौंड रेल्वे स्टेशन येथून आज सायंकाळी 5 वाजता रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
आज एकूण 1172 मजूर व त्यांचे कुटुंब यांना मध्यप्रदेशातील 33 जिल्ह्यांमध्ये पाठवण्याची सोय करण्यात आली. या मजुरांना पाठवताना त्यांचे थर्मल स्क्रीनिंग करून प्राथमिक तपासणी व सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करून शिस्तबद्धरित्या पाठवण्यात आले. सर्व मजुरांना पाठवण्याचे नियोजन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार व प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार संजय पाटील व सर्व महसूल अधिकारी, पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन व नगरपालिका यांच्या साहाय्याने पार पडले

लॉकडाऊनमुळे जिल्हयात अडकलेले परराज्य तसेच जिल्हयाबाहेरील नागरिक आपल्या मूळगावी रवाना


पुणे दि.10 : – लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित केले आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवेगळया अधिका-यांकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदा-या देण्यात आल्या आहेत. यानुसार प्रशासनाकडून या नागरिकांची यादी तयार करुन संबंधित राज्यांकडे परवानगी घेण्याची प्रक्रीया गतीने सुरु करण्यात आली आहे. यानुसार नागरिकांना शासनाने विहीत केलेल्या नियमांनुसार तसेच सोशल डिस्टनंसिंगचे काटेाकोर पालन करुन प्रवासाला परवानगी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणा अत्यंत काळजीने याबाबतचे नियोजन करत आहे.
जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या या मोहिमेंतर्गत आज देहू येथील तात्पुरता निवारा केंद्रातील 20 नागरिकांना सोलापूर येथे रवाना करण्यात आले. स्वारगेट येथून दोन एसटी बसमधून 43 विद्यार्थ्यांना जळगाव येथे तसेच मौजे शिवे येथून 24 कामगारांना हिंगोली, नांदेड येथे रवाना करण्यात आले तसेच आणि कामशेत, तालुका मावळ येथून 110 मजूरांना 5 बसमधून लातूर, वाशिम येथे पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने पाठविण्यात आले.
जिल्हा प्रशासनाने प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी हाती घेततेल्या उपक्रमातून यापूर्वी कोटा ( राजस्थान) मधून एकूण 74 विद्यार्थ्यांना धुळे आगाराच्या चार एसटी बसेसमधून स्वारगेट येथे आणण्यात आले तसेच प्रजापती ब्रम्हकुमारी, माऊंट अबू ( राजस्थान) येथे अडकलेल्या 80 साधकांनादेखील विशेष वाहनाने पुण्यात आणण्यात आले. शासनाच्या निर्देशानुसार त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर लंडनहून आलेल्या विमानाने पुणे जिल्हयातील 65 नागरिक आले. या नागरिकांना बालेवाडी येथील हॉटेल सदानंद रिजन्सी येथे अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
मुळशी तालुक्यातील पिरंगुट ग्रामपंचायत येथील परराज्यातील 24 मजूरांना त्यांच्या मूळ गावी जाण्याकरीता राजस्थान येथे बसमूधन पाठविण्यात आले. तसेच श्रमिक स्पेशल रेल्वेने वेगवेगळया निवारागृहांमध्ये असलेल्या मध्यप्रदेशातील 1093 मजूरांना उरुळी कांचन येथून रेवा ( मध्य प्रदेश) येथे पाठविण्यात आले, तर 1131 मजूरांना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे विशेष रेल्वेने पाठविण्यात आले आहे.
राज्यांतर्गत मजूरांपैकी नांदेड जिल्हयातील 38 मजूरांना तीन वाहनांमधून तर शिरुर येथील तीन निवारागृहांमधील 38 मजूरांना विशेष बसने वाशिम जिल्हयातील त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

एअर इंडियाच्या 5 वैमानिकांना कोरोना विषाणूची लागण

0

नवी दिल्ली. एअर इंडियाच्या पाच वैमानिकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. नुकतंच हे सर्वजण कार्गो फ्लाइटने चीनला गेले होते. उड्डाण घेण्याच्या 72 तासांपूर्वी केलेल्या प्री-फ्लाइट टेस्टमध्ये या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली. कंपनीने सांगितले की, या सर्व वैमानिकांना सध्या मुंबईत क्वारेंटाइन करण्यात आले आहे.

एअर इंडियाने लॉकडाउननंतर अनेक कोरोना संक्रमित देशात आपले विमान पाठवले आहे. यादरम्यान 18 एप्रिलला दिल्लीवरुन ग्वांग्झोसाठी बोइंग 787 ने उड्डाण घेतली होती. एअरलाइनने शंघाई आणि हॉन्गकॉन्गसाठीही मेडिकल कार्गो उड्डाणी घेतली होती.

वैमानिक चिंतेत

एअर इंडियाकडून याबाबत सध्या स्पष्टीकरण आलेले नाही. एका सूत्राने सांगितले की, ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत वैमानिकांना कोरोना विषाणूचा मोठा हॉटस्पॉट असलेल्या न्यूयॉर्कसारख्या ठिकाणांवर जायचे आहे. त्यामुळे, काही वैमानिक चिंतेत आहेत.

चाचण्या निगेटिव्ह आल्यावर ड्यूटी करतात

उड्डाण घेतल्यानंतर वैमानिकांना हॉटेलमध्ये नेण्यात येते. तिथे ते आपल्या रिपोर्टी वाट पाहतात. रिपोर्ट येण्यासाठी 24-48 तास लागतात. त्यांची रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर कंपनी त्यांना घरी पाठवते. अरायव्हलच्या पाच दिवसानंतर क्रु मेंबरची दुसरी चाचणी केली जाते. त्यांच्या रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर परत त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवले जाते.

दुसरी फेज 15 मे पासून सुरू होईल

‘वंदे भारत मिशन’अंतर्गत भारतात येणाऱ्या नागरिकांना फ्लाइटचा आणि क्वारेंटाइनचा खर्च स्वतः भरावा लागेल. पहिल्या फेजमध्ये 14 मे पर्यंत 12 देशातून 14 हजार 800 भारतीयांना परत आणण्याचा प्लॅन आहे. मिशनची दुसरी फेज 15 मे पासून सुरू होईळ. या फेजमध्ये सेंट्रल एशिया आणि यूरोपीय देश जसे- कजाकिस्तान, उज्बेकिस्तान, रशिया, जर्मनी, स्पेन आणि थायलँडमधून भारतीयांना आणले जाईल.

पुण्यात या भागात कडेकोट १०० टक्के लॉक डाऊन-अत्यावश्यक सेवांची दुकाने बंद- फक्त दवाखाने सुरु

पुणे: शहरातील करोनाचा सर्वाधिक प्रसार असलेल्या 69 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सोमवारपासून 100 टक्के लॉकडाऊन करण्यात येणार आहे. हे आदेश 17 मेपर्यंत कायम असतील. या कालावधीत केवळ खासगीद वाखाने सुरू ठेवण्यात येणार असून, इतर सर्व सेवांची दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश रविवारी काढले आहेत.

या ठिकाणी असणार 100 टक्के लॉकडाऊन

मंगळवार पेठ-जुना बाजार, पर्वतीदर्शन परिसर 1,2, पर्वती चाळ क्र. 52 झोपडपट्टी, पर्वती दांडेकर पूल झोपडपट्टी, आंबील ओढा कॉलनी परिसर, दत्तवाडी परिसर, शहर मध्यवर्ती भाग कसबा, नाना, भवानी पेठ कसबा – विश्रामबागवाडा, भवानी पेठ कसबा, विश्रामबागवाडा, भवानी पेठ- सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ (पै), गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ(पै), रविवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, महात्मा फुले पेठ (गंज पेठ), गणेश पेठ, कसबा पेठ, घोरपडी पेठ, कोंढवा बुद्रुक काकडेवस्ती, उंड्री, होलेवस्ती कोंढवा, कात्रज, सुखसागरनगर, अंबामाता मंदिर परिसर, कोथरूड-शिवतारा इमारत, चंद्रगुप्त सोसायटी, महाराज कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन दक्षिणेकडील वसाहत , पुणे स्टेशन-ताडीवाला रोड, पर्वती, तळजाई वस्ती 1,2, धनकवडी, बालाजीनगर, गुलाबनगर चैतन्यनगर, आंबेगाव खुर्द जांभूळवाडी साईसमृद्धी परिसर, लोहगाव, कालवडवस्ती नगर रोड, गुलटेकडी, डायसप्लॉट बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, गुलटेकडी, मीनाताई ठाकरेनगर, प्रेमनगर झोपडपट्टी, येरवडा गांधीनगर 1,2, ताडीगुत्ता, नागपूर चाळ, आदर्श इंदिरानगर, आळंदी रस्ता येरवडा, टी.पी. स्कीम, फुलेनगर, रामनगर वानवडी – रामटेकडी, गोसावीवस्ती, वैदूवाडी वानवडी, सय्यदनगर 1, 2, 3 कोंढवा खुर्द शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, तांबोळी बाजार, मिठानगर, एस.आर.पी.एफ. वानवडी, शिवाजीनगर, कामगार पुतळा, कामगार पुतळा वसाहत, महात्मा गांधी झोपडपट्टी, पाटील इस्टेट, कामगार आयुक्त कार्यालयालगतची झोपडपट्टी, कॉंग्रेस भवन पाठीमागील बाजू, चिंतामणीनगर, मुंढवा सय्यदनगर मगर पेट्रोल पंपाजवळील परिसर, गजानन कॉलनीमधील सर्व सहा गल्ल्या, मुंढवा वेताळनगर परिसर, हांडेवाडी रस्ता, इंदिरानगर हडपसर – मुंढवा हांडेवाडी रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे

दरम्यान, या भागात गरज भासल्यास महापालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून या भागातील नागरिकांसाठी भाज्या आणि दुध उपलब्ध करून दिले जाणार आहे. मात्र, ते सुध्दा महापालिका आणि पोलिसांच्या माध्यामातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर त्यासाठी त्या भागातील स्थिती लक्षात घेऊन मोकळया जागांमध्ये या सुविधा देण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे आयुक्तांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

मटका किंग रतन खत्री यांचे निधन, वयाच्या 88 व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास

0

मुंबई. मटका किंग रतन खत्री यांचे निधन झाले आहे. मुंबईतील नवजीन सोसायटीतील राहत्या घरा त्यांनी 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. 1960 च्या काळात त्यांनी कल्याण भगत यांच्यासोबत मुंबईत मटक्याचा धंदा सुरू केला होता. मागील अनेक दशकांपासून आणि आजही मटका अनेकांचा आवडीचा धंदा आहे. खत्री यांच्या जाण्याने सट्टा किंवा मटका क्षेत्रात दुख व्यक्त होत आहे.

1960 च्या दशकात खत्री यांनी कल्याण भगत यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. खत्री भगतला मॅनेजर म्हणून जॉइन झाले होते. 1964 मध्ये खत्री यांनी भगतपासून वेगळे होऊन स्वत: चा रतन मटका सुरू केला. मटका किंवा एका भांड्यात चिट्सवरून चिठ्ठी काढणे इतके प्रसिद्ध झाले की त्या काळात जुगाराची उलाढाल दररोज 1 कोटी रुपयांच्या घरात असायची.

सट्टा, मटका किंवा लॉटरी हा आकड्यांचा खेळ म्हणून लोकप्रिय आहे. हा खेळ स्वातंत्र्यांच्या पूर्वीपासूनच मुंबईत प्रसिद्ध आहे. यात न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजमधून कापसाचे दरवाजे उघडणे व बंद करणे यावर पैसे लावले जायचे. 1960 च्या दशकात मटका हा मुंबईतील सर्वच वर्गात लोकप्रिय होता.

विधान परिषद -राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी दोन उमेदवार जाहीर

मुंबई. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपने आपले उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून माहिती दिली.

राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या दोन जागांसाठी साताऱ्यातील शशिकांत शिंदे आणि अकोल्यातील अमोल मिटकरी यांच्या नावाची घोषणा झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटरवरुन दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यांनी ट्वीट केले की, ‘शशिकांत शिंदे (सातारा) व अमोल मिटकरी (अकोला) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार असतील. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील याची मला खात्री आहे.’