Home Blog Page 2592

कोरोनाच्या विळख्यात ही महापालिकेत काही मश्गुल ठेक्यांच्या रिंगात (व्हिडीओ)

३२ ते ३८ कोटीच्या टेंडर साठी रिंग -अरविंद शिंदेंचा आरोप 

पुणे- एकीकडे शहर कोरोनाच्या विळख्यात सापडला असताना लोकांना आरोग्या बरोबर चरितार्थाची चिंता सतावत असताना सारे प्रशासन कोरोनाशी झुंजत असताना महापालिकेतील काही ठेकेदार आणि अधिकारी मात्र ठेक्यांच्या रिंगा करण्यात मश्गुल असल्याचा घणाघाती आरोप कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला आहे. आंबील ओढा कल्व्हरट बांधकामाचे ३२ ते ३८ कोटी चे टेंडर काडून ते अपात्र असलेल्या आणि खोटी कागदपत्रे दिलेल्या ,अनुभव नसलेल्या अशा ३ ठेकेदारांना दिल्याचा आरोप करत या कामाची वर्क ऑर्डर देवू नये अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. स्थायी समितीने या टेंडर ला मान्यता दिली आहे आणि हे काम वर्क ऑर्डर मिळण्यापूर्वीच ठेकेदाराने सुरु केले आहे असाही आरोप करत शिंदे यांनी याप्रकरणी दोषी असलेल्या सर्व अधिकार्यांना निलंबित करून कारवाई करावी अशी मागणी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कडे केली आहे. 

नागरिकांनी घाबरून जाऊ नये – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

0

शिर्डी : जगासह देशात व महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. सध्या कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यावर येऊ पहात असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. संगमनेर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ही  उपाययोजना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असून शहर व तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांवर विश्वास न ठेवता घरीच सुरक्षित थांबावे, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

कोरोनाबाबत संगमनेरातील जनतेला अवाहन करताना श्री.थोरात म्हणाले, कोरोना हे मानव जातीवरील संकट आहे. कोरोना हा अदृश्य शत्रू असून त्याचा मुकाबला करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क वापरणे याचबरोबर गर्दी करणे टाळणे व विनाकारण घराबाहेर पडणे टाळणे हे अत्यावश्यक आहे. या नियमांचे पालन केले तर आपण निश्चितच कोरोनाची साखळी तोडू शकतो. कोरोना संसर्ग तिसऱ्या टप्प्यावर येऊ नये आणि तो रोखण्यासाठी देशात, महाराष्ट्रात व तालुक्यात कोरोनाची साखळी तोडणे अत्यंत गरजेचे आहे. मागील दीड महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन असून महाराष्ट्र शासनाने कोरोना प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रभावी आणि अत्यंत चांगले काम केले आहे. प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि इतर सर्व शासकीय कर्मचारी अत्यंत सेवाभावीपणे आपले काम करत आहे. या सर्वांना संपूर्ण सहकार्य करणे प्रत्येक नागरिकांचे मुलभूत कर्तव्य आहे. आपण घरीच थांबलो तर या सर्वांवरील ताण कमी होईल. अशा संकटाच्या काळात आपण सरकारच्या सोबत राहणे गरजेचे आहे.

संगमनेर तालुक्यात व शहरात कोरोनाचे काही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्ण आढळलेल्या भागांमध्ये हॉटस्पॉट जाहीर करून लॉकडाऊनची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे  काही ठिकाणचे भाग सील केले गेले आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अफवा पसरविल्या जात असून नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे सूतोवाच त्यांनी केले. तसेच नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेबरोबर कुटुंबियांच्या सुरक्षिततेकरिता स्वतः घरी थांबा, विनाकारण घराबाहेर पडणे टाळा आणि मास्कचा वापर करा  असे आवाहनही केले. शासन व प्रशासन आपल्यासाठी काम करत आहे. संगमनेर शहर, कुरण,  धांदरफळ, घुलेवाडी या परिसरातील नागरिकांना थोरात यांनी दिलासा दिला आहे. या सर्व परिस्थितीवर आपण लक्ष ठेऊन असून प्रशासनाला वेळोवेळी सूचना देत आहोत. आपल्या सर्वांची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही थोरात यांनी केली आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध

0

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी आज झाली. यामध्ये १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध तर एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी येत्या दि. २१ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी एकूण १४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले होते.

नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे आणि पक्षाचे नाव पुढीलप्रमाणे :-

श्री. गोपीचंद कुंडलिक पडळकर (भा.ज.पा.), श्री. प्रवीण प्रभाकरराव दटके (भा.ज.पा.), श्री. रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील (भा.ज.पा.), डॉ. अजित माधवराव गोपचडे (भा.ज.पा), श्री. संदीप सुरेश लेले (भा.ज.पा.), श्री. रमेश काशिराम कराड (भा.ज.पा.).

श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना).

श्री. शशिकांत जयवंतराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. अमोल रामकृष्ण मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. किरण जगन्नाथ पावसकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. शिवाजीराव यशवंत गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी).

श्री. राजेश धोंडीराम राठोड (भा.रा.काँ.).

नामनिर्देशनपत्र अवैध ठरलेल्या उमेदवाराचे नाव आणि पक्षाचे नाव पुढीलप्रमाणे :-

श्री. राठोड शेहबाज अलाउद्दीन (अपक्ष).

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत दि. १४ मे २०२० आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रात कोरोना रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी

पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची पाहणी

पुणे, दिनांक 12- पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी नवल किशोर राम व साखर आयुक्त सौरभ राव यांनी संयुक्तरित्या नवीन मोदीखाना व भीमपुरा क्षेत्रातील उपाययोजनांबाबत पाहणी केली. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील उपाययोजनेप्रमाणेच पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रात उपाययोजना करून कोरोना रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील पाहणीवेळी मेजर जनरल नवनीत कुमार, पुणे कॅन्टोन्मेंटचे स्टेशन कमांडर ब्रिगेडीयर कुलजित सिंग, पुणे कॅन्टोंमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ. गायकवाड यांच्यासह पुणे कॅन्टोनमेंट, पुणे महानगरपालिका तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील लगतच्या भवानीपेठ क्षेत्रात सुरू असलेल्या उपाययोजनेप्रमाणेच कॅन्टोन्मेंट क्षेत्रात उपाययोजना राबवा, गरजेप्रमाणे प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती मदत करण्यात येईल. प्रतिबंधित परिसरातील नागरिकांना निश्चित केलेल्या कालावधीत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कुणाला येथून बाहेर जाता येणार नाही अथवा बाहेरून या ठिकाणी येता येणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूची निकड भासू नये यादृष्टीने भाजीपाला, दूध या सारख्या वस्तू त्याच ठिकाणी उपलब्ध होतील, या दृष्टीने समन्वय करून व्यवस्था करण्याबाबतच्या सूचनाही सबंधितांना देण्यात आल्या आहेत.

800 वृद्ध कलावंतांचे थकीत मानधन तात्काळ उपलब्ध करून द्या

यवतमाळ : राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्याची योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते. यवतमाळ जिल्ह्यात एकूण ८०० वृद्ध कलावंत आहेत. यांचे मानधन मागील ६ महिन्यांपासून थकीत होते. ही बाब निवेदनातून वृद्ध कलावंतांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर तात्काळ पुढाकार घेत पालकमंत्र्यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या संचालकांसोबत चर्चा केली. तसेच या वृद्ध कलावंतांचे मानधन तात्काळ जमा करण्याच्या सूचना दिल्या.

त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ८०० वृद्ध कलावंताच्या खात्यात त्यांच्या मानधनाची रक्कम त्वरित जमा करण्यात येईल, असे विभागाचे संचालक यांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील वृद्ध कलावंत व साहित्यिक यांना दिलासा मिळणार आहे

देहू,आळंदी पालखी सोहळयाचे स्वरूप कसे असेल याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय

– जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे, 12- देहू आळंदी पालखी सोहळयाचे नियोजन, स्वरूप कसे असेल याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील,योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, संतोष मोरे, माणिक मोरे,संजय मोरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, वारकरी संप्रदायाची परंपरा असणा-या ऐतिहासिक अशा श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला विशेष महत्त्व आहे. कोरोनाच्या संसर्गाचे संभाव्य परिणाम लक्षात घेता आळंदी ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे याबाबत आळंदी व देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार टाळेबंदीचे स्वरूप पाहता आळंदी ते पंढरपूर असा श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखीसोहळयाच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सोशल डिस्टसिंग’ बाबत शासनाची नियमावली, टाळेबंदीची परिस्थिती व येत्या काळातील संभाव्य चित्र, सार्वजनिक आरोग्याचे रक्षण, दिंडी सोहळयाचे स्वरूप नेमके कसे असावे व त्याचे नियोजन कशा प्रकारे करावे या बाबत शासन देत असलेल्या निर्णयानुसारच नियोजन करण्यात येईल, शासनाने दिलेल्या सूचनांचे अत्यंत काटेकोर पालन करून आम्ही कमी संख्येत पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवणार असल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांनी सांगितले.
देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे म्हणाले, आषाढी वारीची परंपरा अबाधित रहावी यासाठी तसेच या सोहळयासाठी गरजेच्या आवश्यक त्याच सुविधा शासनाकडून अपेक्षित आहेत, आम्ही समाजाची काळजी घेत तसेच शासनाचा नियमावलीचे पालन करून या पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीमध्ये पालखी सोहळयाचे स्वरूप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टसिंग,प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी संख्या तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संस्थानच्या
प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली.

कोरोना मुक्तीच्या लढयात परिचारिकांचे योगदान महत्वाचे -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयुक्तांच्या परिचारिकांना शुभेच्छा
पुणे ,दि. 12: कोरोना मुक्तीच्या लढयात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लाऊन रुग्णालयातील परिचारिका जोखीम पत्कारुन चांगली आरोग्य सेवा देत आहेत. या सर्व परिचारिकांचे योगदान महत्वाचे आहे, असे गौरवोद्गार विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज काढले.
बै.जी. वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या सभागृहात जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन व प्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलन करुन डॉ.म्हैसेकर यांनी केले ,त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, उपअधिष्ठाता डॉ.कार्यकर्ते, अधीक्षक डॉ.अजय तावरे, उपअधीक्षक डॉ.बी.जे. जाधव, अधिसेविका डॉ. राजश्री कोटके आदी उपस्थित होते. यावेळी अधिसेविका डॉ.राजश्री कोटके यांनी उपस्थित परिचारिक व परिचारिकांना आरोग्य सेवेची शपथ दिली.
डॉ. दिपक म्हैसेकर यांनी जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणाले, रुग्णालयामध्ये परिचारिका आपल्या कुटुंबाची काळजी न करता अपुऱ्या मनुष्यबळात सुध्दा दिवसरात्र तत्परतेने चांगली सेवा देवून आरोग्य सेवेचा दर्जा उंचावत आहेत. कोरोना मुक्तीच्या या लढयात त्यांचे योगदान महत्वाचे असून आरोग्य सेवेमधील परिचारिका एक महत्वाचा घटक आहे. परिचारिकांनी त्यांच्या या अखंड आरोग्य सेवेतून मानवतेचे दर्शन घडवले आहे. तसेच परिचारिकेबरोबरच परिचारकही अहोरात्र सेवा देत आहेत. जगावर कोरोनाचे संकट असतांना असंख्य परिचारिका व परिचारक बंधू रुग्णांसाठी देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत. कोरोना मुक्तीच्या लढयातील परिचारक बंधू आणि भगिणींचे हे योगदान कोणीही विसरु शकरणार नाही, अशा शब्दात जागतिक परिचारिका दिनाच्या गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या व आभार मानले.
अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे म्हणाले, परिचारिका या आरोग्य सेवेतील महत्वाचा घटक असून सध्याच्या कोरोना मुक्तीच्या लढयात त्या उत्कृष्टरित्या आपली सेवा बजावत आहेत. त्यांच्या या सेवेला मी सलाम करतो, अशा शब्दात त्यांनीही सर्व परिचारिकांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संगीता भुजबळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.मृदुला फुले यांनी मानले.
कार्यक्रमानंतर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी रुग्णालयात कोरोना शॅम्पल तपासणीच्या लॅबला भेट देवून पहाणी केली व कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा बैठक घेवून आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारक, परिचारिका उपस्थित होत्या.
०००००

पुणे विभागात 34 हजार 384 क्विंटल अन्नधान्याची तर 10 हजार 788 क्विंटल भाजीपाल्याची आवक

-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे, दि. 12 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 34 हजार 384 क्विंटल अन्नधान्याची तर 10 हजार 788 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 3 हजार 699 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 7 हजार 191 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे विभागात 11 मे 2020 रोजी 101.52 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.76 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात 19 हजार 150 स्थलांतरित मजुरांची सोय
85 हजार 785 मजुरांना भोजन

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 129 कॅम्प, कामगार विभागामार्फत 68 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 18 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 215 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 19 हजार 150 स्थलांतरित मजूर असून 85 हजार 785 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
0000

‘कोरोना’मुक्ती लढ्यातील ‘परिचारिकां’च्या सेवेची सुवर्णाक्षरांनी नोंद होईल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्‌गार

0

मुंबई, दि. 12: कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या, प्रसंगी डॉक्टरांच्याही एक पाऊल पुढे जाऊन जोखीम पत्करुन रुग्णांची सेवासुश्रूषा करणाऱ्या ‘परिचारिका’ भगिनींच्या सेवाकार्याची नोंद मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक ‘परिचारिका’ दिनानिमित्त समस्त  परिचारक बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.

जागतिक ‘परिचारिका’दिनाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, मानवतेच्या कल्याणात रुग्णसेवेचे स्थान सर्वोच्च आहे. जगभरातल्या परिचारिकांनी त्यांच्या सेवाकार्यातून मानवतेची अखंड सेवा केली आहे. परिचारक बंधु-भगिनींना समाजात स्नेहाचं, आदराचं स्थान लाभत आलं आहे. आज जगावर कोरोनाचं संकट असताना असंख्य परिचारिका भगिनी देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत. उपचारांच्या बरोबरीनं रुग्णांना धीर, विश्वास, आत्मबळ देत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत याच परिचारिकांची भूमिका मुख्य असून या लढाईत त्याच मुख्य सैनिक आहेत. स्वत:च्या जीवाची जोखीम पत्करुन, कुटुंबाचा विचार बाजूला ठेवून असंख्य परिचारिका भगिनी आज दिवसरात्र रुग्णसेवा करीत आहेत. शहरी, ग्रामीण, दुर्गम भागात कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास शब्द अपुरे आहेत, अशा भावना उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

‘कोरोना’वर सध्यातरी कोणतेही हमखास औषध नसल्यानं रुग्णांची योग्य काळजी आणि शुश्रूषा हीच आरोग्य संजीवनी ठरत आहे. हे काम परिचारिका भगिनी अत्यंत सेवाभावानं, तन्मयतेने करत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधित रुग्णांचं कोरोनामुक्त  होण्याचे प्रमाण चांगले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत समस्त परिचारक बंध-भगिनींचं हे योगदान कोणीही विसरू शकणार नाही. साथीचे आजार, इतर दुर्धर आजार, सध्याचं कोरोनाचं संकट अशा अनेक संकटांचा सामना या परिचारिका भगिनी करीत असतात. त्यांच्या सेवाकार्याची नोंद घेऊन त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांचं मनोबल वाढवणं, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे आपले कर्तव्य आहे. कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकणार असून या विजयात परिचारिकांचा वाटा सर्वात मोठा असेल, त्यांच्या कार्याची नोंद सुवर्णाक्षरांनी होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

कोरोना वर मात करणाऱ्या औषधांच्या चाचण्या भारतात सुरु.

0

पुणे- अ‍ॅंटीव्हायरल ड्रग फॅव्हीपीरावीर या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या भारतात सुरु झाल्या आहेत अशी माहिती ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्स लिमिटेडने मंगळवारी दिली. फॅव्हीपीरावीर हे करोना व्हायरसवर प्रभावी ठरणाऱ्या औषधांपैकी एक आहे. एप्रिल महिन्यात भारतातील औषध नियमन करणाऱ्या संस्थेकडून फॅव्हीपीरावीर औषधाच्या क्लिनिकल चाचण्यांना परवानगी मिळाली होती. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दिलेल्या परवानगीमुळे Covid-19 च्या रुग्णांवर औषधाची चाचणी घेण्याची परवानगी मिळालेली आपण पहिली कंपनी ठरल्याचे ग्लेनमार्ककडून सांगण्यात आले. जपानमधील फुजीफिल्म होल्डींग कॉर्पोरेशन एविगन या ब्रॅण्डनेमखाली फॅव्हीपीरावीर या औषधाची निर्मिती करते.

जपानमध्ये ताप, सर्दीवर असलेल्या फॅव्हीपीरावीर या औषधाचा वापर करण्याची २०१४ मध्ये परवानगी देण्यात आली.

“भारतात फॅव्हीपीरावीर औषधाच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. दहा किंवा त्यापेक्षा जास्त सरकारी-खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांवर या चाचण्या घेण्यात येतील. जुलै-ऑगस्टपर्यंत या चाचण्यांचे निष्कर्ष समोर येतील” असे ग्लेनमार्ककडून सांगण्यात आले. “फॅव्हीपीरावीर औषधाचा रुग्णावर नेमका काय परिणाम होतो. त्याची वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना उत्सुक्ता आहे. सध्या करोना व्हायरसवर प्रभावी औषध नाहीय. त्यामुळे या चाचण्यांचा निष्कर्ष महत्वपूर्ण असणार आहे” असे डॉ. मोनिका टंडन यांनी बीएसई फायलिंगमध्ये म्हटले आहे. त्या कंपनीच्या उपाध्यक्ष आणि क्लिनिकल डेव्हलपमेंट विभागाच्या प्रमुख आहेत. भारतात सध्या करोना व्हायरसचे ७०,७५६ रुग्ण आहेत. २२९३ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली- वैद्यकीय चाचण्यांना आठवड्यात प्रारंभ

0

पुणे-कोरोना व्हायरसवर पुण्यातील जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटने प्रतिबंधक लस विकसित केली असून, या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांना देशभरात येत्या आठवड्यात प्रारंभ होणार आहे.

या वैद्यकीय चाचण्यांसाठी देशातील 40 वैद्यकीय संशोधन केंद्रांची निवड करण्यात आली असून, यामध्ये कराड येथील कृष्णा हॉस्पिटलचाही समावेश आहे. जगभरात महत्वपूर्ण ठरणाऱ्या या कोरोना लस संशोधन अभ्यास प्रकल्पासाठी कृष्णा हॉस्पिटलची निवड झाल्याने, कराडचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर पोहचण्यास मदत होणार आहे, अशी माहिती कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली आहे.

धनुर्वात, गोवर, डेंग्यू यासारख्या आजारांवरील लस शोधणाऱ्या पुण्यातील जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटने अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी ‘कोडाजेनिक्स’च्या मदतीने फेब्रुवारी महिन्यातच कोरोनावर मात करणारी लस विकसित करण्यास प्रारंभ केला. आता या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ची मान्यता मिळाली आहे. देशातील 40 निवडक संस्थांमध्ये होणाऱ्या या वैद्यकीय चाचण्यांसाठी गोवा येथील सुप्रसिद्ध ‘सी.आर.ओ.एम. क्लिनिकल रिसर्च ॲन्ड मेडिकल टुरिझम’ या एन.ए.बी.एच. मान्यताप्राप्त संस्थेचे सहकार्य लाभणार आहे.अत्याधुनिक सुविधा, सुसज्ज इन्फ्रास्ट्रक्चर, तज्ज्ञ स्टाफ, वैद्यकीय संशोधनाचा दीर्घ अनुभव या निकषांच्या आधारे कृष्णा हॉस्पिटलची या महत्वपूर्ण संशोधन अभ्यास प्रकल्पासाठी निवड करण्यात आली असून, कृष्णा हॉस्पिटलमधील सर्व तज्ज्ञ संशोधक डॉक्टर्स या संशोधन कार्यात अमूल्य योगदान देण्यासाठी सज्ज झाले आहेतया चाचण्यांमध्ये पहिल्या टप्प्यात समाजातील उच्च जोखीम गटात मोडणाऱ्या; जसे की आरोग्य कर्मचारी, पोलिस, सुरक्षा गार्ड, भाजीपाल व फळ विक्रेते, किराणा माल विक्रेते यांचा अभ्यास केला जाणार आहे. कृष्णा हॉस्पिटलमधील डॉ. सुजाता पाटील, डॉ. अपर्णा पतंगे व डॉ. सुजाता जाधव या प्रकल्पाच्या समन्वयक म्हणून काम पाहणार असून, ‘सी.आर.ओ.एम.’चे संचालक डॉ. धनंजय लाड आणि डॉ. विजयकुमार पाटील हे सीरम इन्स्टिट्यूटच्यावतीने प्रकल्पाचे निरीक्षक म्हणून काम पाहतील. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी या लसीचा मोठा उपयोग होणार असून, वैद्यकीय चाचण्यांच्या यशस्वीतेनंतर ही लस लवकरच सामान्य लोकांसाठीही उपलब्ध करून देण्याचा सीरम इन्स्टिट्यूटचा मनोदय आहे.

उद्धव ठाकरेंची संपत्ती आहे एवढी….

मुंबई-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील अर्ज भरला. राष्ट्रवादीकडून यावेळी शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्याचबरोबर त्यांनी आज शपथपत्रात स्वतःची आणि पत्नी रश्मी ठाकरे यांची एकत्रित संपती अधिकृत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अंदाजे 125 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांच्याकडे एकूण ३ बंगले आहेत. ज्यापैकी वांद्रे पूर्व कला नगर येथे ‘मातोश्री’ बंगला आणि ‘मातोश्री’च्या अगदी समोर बांधले जात असलेले नवे घर याचा समावेश आहे

त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे कर्जत येथे फार्म हाऊस आहे.

ठाकरे यांच्या उत्पन्नाचे विविध कंपन्यांचे भाग, विविध कंपन्यांमध्ये भागीदारी आणि त्यांचे डिव्हिडंड असे विविध स्रोत आहेत. त्याचबरोबर त्यांनी शपथपत्रात स्वतःच्या मालकीचे एकही वाहन नसल्याचे म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पोलिसांमध्ये एकूण 23 प्रकरणांची नोंद आहे. ज्यामधील 12 रद्द झाले असून बाकीच्या खाजगी तक्रारी आहेत.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यात त्यांना विधीमंडळाचे सदस्य व्हावे लागणार आहे. उद्धव ठाकरे हे आता विधानपरिषदेवर निवडून जाणार आहे. त्यासाठी त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ज्यामध्ये त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जेव्हा विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली होती. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेवर आरोप होते. त्यांनी थेट संपत्ती जाहीर करावी लागेल म्हणून ठाकरे निवडणूक लढत नाही, असा आरोप केला होता. त्यानंतर ठाकरे यांच्या संपत्तीची प्रामुख्याने चर्चा सुरु झाली होती.

 

पुण्यात तपासण्यांच्या तुलनेत घटतेय पॉझिटिव्ह रुग्ण संख्या

पुणे- कोरोना संशयितांच्या नमुने तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आले असून, तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोना संशयितांच्या नमुने तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. या तपासण्यांचे प्रमाण वाढले तरी त्या तुलनेत कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात घटली आहे.

नाशिक, नगर, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीचे प्रमाण सुमारे तीस टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे.

खाजगी रुग्णालयां बाबत तक्रारी

ससून रुग्णालयामध्ये रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर, दुसरीकडे काही खासगी रुग्णालयांबाबत तक्रारी येत आहेत. चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या आणि जादा शुल्क वसूल केल्याप्रकरणी खासगी रुग्णालयास नोटीस देण्यात आली असून, व्यवस्थापनाला त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. पुणे कॅन्टोनमेंटमधील न्यू मोदीखाना परिसरात रुग्ण संख्या वाढत आहे. भवानी पेठ लगतचा हा परिसर आहे.

साडेबारा हजार मजूर रवाना
पुणे जिल्ह्यातून मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर, रेवा उत्तर प्रदेशातील अलाहाबाद प्रयागराज, राजस्थान येथील जोधपूर यासह अन्य राज्यांमध्ये 12 हजार 421 मजूर आपल्या घरी परतले आहेत. बिहार राज्यातील मजुरांनाही पाठविण्यात येणार आहे. येत्या तीन-चार दिवसांत आणखी काही विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती राम यांनी दिली.

‘ या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, अन कोरोना पासून 4 हाथ लांब रहावे ..

दिडशे फुटावरुन आप्तियांनी घेतले अंत्यदर्शन,कर्मचाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार..

पुणे-घरातील एखाद्या व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुडीला कवटाळून धाय मोकलून रडताना आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र करोनाच्या या संकटामुळे रक्‍ताची नाती दुरावत असल्याचेही आता पहायला मिळत आहे. पुण्यातील एका करोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कारास नकार दिला. मुलगा आणि भाऊ फक्‍त या दोघांनीच दीडशे फूट लांबून अंत्यदर्शन घेतले. मृतदेहावर अंत्यसंस्काराची वाट न पाहता स्मशानभूमीतून काढता पाय घेतला. अखेर वायसीएममधील कर्मचाऱ्यांनी जीवावर  उदार होऊन कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध नसताना अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडविले.

करोना हा साथीचा आजार आहे. या आजाराने मृत्यू झाल्यावर मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून नातेवाईकांच्या ताब्यात देतात. महापालिका कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत मयत व्यक्‍तीवर अंत्यसंस्कार केले जातात. जर मयत व्यक्‍तीला कोणीच नातेवाईक नसल्यास त्याच्यावर वायसीएम प्रशासनाकडून अंत्यसंस्कार केले जातात.

पुण्यात राहणाऱ्या एका व्यक्‍तीला त्रास होऊ लागल्याने तो काळेवाडी येथील आपल्या भावाकडे आला. भावाने त्यास रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे त्याची प्रकृती आणखीनच बिघडल्याने त्यास वायसीएम रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी केलेल्या तपासणीत तो करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. उपचारादरम्यान सोमवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला आणि तेथूनच त्यांच्या मृतदेहाची अवहेलना सुरू झाली.

करोना बाधिताचा मृत्यू झाल्यावर त्याचा भाऊ आणि मुलगा सकाळी सहा वाजता रूग्णालयात दाखल झाला. मात्र त्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. प्रशासनाने त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे, अशी त्यांची मागणी होती. तर नातेवाईक असल्याने असे करता येणार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. एका कॉंग्रेस कार्यकर्त्याच्या पुढाकाराने हालचाली सुरू झाल्या. सकाळी अकरा वाजेपर्यंत मृतदेह शवागृहात पडून होता. अखेर आयुक्‍तांनी आदेश दिल्यावर प्रशासनाने अंत्यसंस्कारासाठी हालचाली सुरू केल्या.

मृतदेह दुपारी लिंकरोड, चिंचवड येथील स्मशानभूमी रुग्णवाहिकेतून आणण्यात आला. त्यावेळी नातेवाईक दीडशे फूट लांब उभे होते. मृतदेह रुग्णवाहिकेतून खाली काढण्यासाठी मदत करा, अशी विनवणी रुग्णवाहिकेसोबत आलेला कर्मचारी करीत होता. माझ्याकडे असलेले पॅक हॅन्डग्लोज तुम्ही घाला, मी तसाच मृतदेह उचलतो, अशीही विनवणी तो कर्मचारी नातेवाईकांना करीत होता. तरीदेखील रक्‍ताच्या नात्याला पाझर फुटला नाही.

‘तुम्हीच सगळे करा, आम्ही लांबून पाहतो’, असे नातेवाईकांनी सांगितले. पीपीई किट किंवा इतर आवश्‍यक सुरक्षिततेची साधने नसतानाही रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढून तो विद्युत दाहिनीकडे नेला. त्यानंतर स्मशानभूमीत आलेले नातेवाईक अंत्यसंस्काराची वाट न पाहता निघून गेले.
नातेवाईक नसल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे की नाही, असा प्रश्‍न रुग्णवाहिकेसोबत आलेल्या कर्मचाऱ्यांना पडला. मृतदेह जाळलाच नाही, असा आरोप नातेवाईकांनी केल्यास काय करायचे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला. मात्र त्यावेळी तिथे असलेल्या सामाजिक कार्यकर्ते यांनी त्या कर्मचाऱ्याची समजूत काढल्यानंतर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.   अशी बातमी एका स्थानिक  वृत्तपत्र प्रतिनिधिने दिली आहे.

1053 कामगार 36 बसेस मधून छत्तीसगढ़, मध्यप्रदेशात रवाना

पुणे- शिरूर तालुक्यातून आज मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधील १०५३ कामगारांना वैद्यकीय तपासणी करून ३६ एसटी. बसेसमधून सीमेपर्यंत रवाना करण्यात आल्याची माहिती पुण्याचे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परराज्यातील मजूर, कामगार यांना सीमेपर्यंत सोडण्याचा शासनाने निर्णय घेतला.
त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
पुण्याचे उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख आणि तहसिलदार यांनी पायी जाणाऱ्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील मजुरांना बससेवा उपलब्ध करून दिली. या नागरिकांना फूड पॅकेट देवून
रवाना करण्यात आले. तत्पूर्वी सोशल डिस्टन्सिगचे पालन, आरोग्य तपासणी, मास्कचा वापर या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्यात आली.