Home Blog Page 2579

‘लाल परी’मुळे अनेकांची झाली कुटुंबाशी भेट

0

जिल्ह्यातून १५ हजार मजुरांना राज्याच्या सीमेवर पोहोचविले

बाहेरगावी अडकलेल्या ३ हजार नागरिकांना जिल्ह्यात आणले

नंदुरबार, दि.19 : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आणि कुटुंबाच्या भेटीची ओढ असलेल्या अनेक मजूर आणि नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या ‘लाल परी’ द्वारे जिल्ह्यातून 18 हजार मजूर आणि नागरिकांना  शेजारील राज्याच्या सीमेवर किंवा त्यांच्या जिल्ह्यात पोहोचविण्यात आले, त्यापैकी फक्त नवापूर येथून 15 हजार प्रवाशांची सुविधा गेल्या आठवडाभरात करण्यात आली.

गुजरात येथे काम करणारे हजारो मजूर नवापूर येथे राज्याच्या सीमेवर अडकले होते. तहसीलदार उल्हास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाने त्यांच्या प्रवाशासाठी नियोजन केले. सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रवासाचे मार्ग व वेळापत्रक निश्चित करण्यात आले. सर्व प्रवाशांना बसेसद्वारे नियोजनपूर्वक विविध ठिकाणी पाठविण्यात आले

सर्वाधिक प्रवाशांना मध्यप्रदेश सीमेवर बिजासन येथे सोडण्यात आले. हे सर्व मजूर उत्तर भारतातील होते. त्यासाठी 568 बसेस सोडण्यात आल्या. प्रत्येक बसेमध्ये साधारण 22 मजूरांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पाठविण्यात आले. बंगाल आणि ओरिसाकडे जाणाऱ्या मजूरांना गोंदियापर्यंत 78 बसेसद्वारे सोडण्यात आले. नंदुरबार आगाराच्या बसेसचा हा सर्वात लांबचा प्रवास होता

याशिवाय खेतीया 13, नांदेड 1, वाशिम 2, खामगाव 1, अकोल 4, चंद्रपूर 1, औरंगाबाद 1, यवतमाळ 1, नागपूर 3, भंडारा 2, वर्धा 1 गडचिरोली 1, उमरगा 1, परभणी 1 आणि बीड येथे 1 बसद्वारे प्रवाशांना पाठविण्यात आले. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक बसेसची सुविधा नवापूर येथूनच करण्यात आली आहे. नवापूर येथून एकूण 15 हजार 572 प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासाच्या स्थळापर्यंत पोहोचविण्यात आले.

सूक्ष्म नियोजन आणि सहकार्याची भावना

धुळे आणि साक्री आगारातूनही बसेस मागविण्यात आल्या होत्या. प्रत्येक बससाठी प्रवाशांची यादी करणे, प्रवाशांची संपर्क, त्यांची वैद्यकीय तपासणी याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले. जय गुरुदेव संस्थेतर्फे मजूरांना प्रवासात भोजन पाकीट देण्यात आले, तर उल्टीचा त्रास होऊ नये यासाठी महिलांना औषधी गोळ्याही प्रशासनातर्फे देण्यात आल्या. त्यासाठी नायब तहसीलदार राजेंद्र नजन आणि त्यांच्या सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.

नियोजनात महसूल, पोलीस, नगरपालिका, आरोग्य विभाग, स्वयंसेवी संस्था अशा सर्वांनी सहभाग घेतल्याने   प्रशासनाला हे मोठे आव्हान पेलता आले आहे. मजुरांची संख्या अधिक असल्याने टोल नाका परिसरात ही सर्व व्यवस्था करण्यात आली. 22 प्रवाशांची नोंदणी पूर्ण होताच वाहनचालकाला सूचना दिली जात असे व त्यांच्याकडे प्रवाशांची स्वाक्षरीत यादी देऊन प्रवास सुरू होत असे. श्री.देवरे यांच्यासोबतच पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांनीदेखील महत्वाची भूमीका बजावली आहे. स्वयंसेवी संस्थेने या मजूरांच्या भोजनाची सोय केली होती.

फिलीपाईन्समधून आलेल्या विद्यार्थ्यांचा सुखरूप प्रवास

फिलीपाईन्समधून 21 विद्यार्थी अहमदाबाद विमानतळावर पोहोचले. सर्व विद्यार्थी तापी जिल्ह्यात आले असताना तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना विद्यार्थ्यांना स्वीकारण्याविषयी विचारणा केली. डॉ.भारुड यांनी तात्काळ त्यादृष्टीने सुचना दिल्या. 12 मे रोजी रात्री 10 वाजता हे विद्यार्थी नवापूर येथे पोहोचले. यातील नवापूर-नागपूर मार्गावर 11 आणि नवापूर-नांदेड मार्गावर 10 विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील क्वॉरंटाईन केंद्रापर्यंत पोहोचविण्यात अले.

जिल्ह्यातील इतर भागातूनही एसटी धावली

जिल्ह्यातील इतरही आगारातून 29 बसेसद्वारे प्रवासी मजूरांची व्यवस्था करण्यात आली. यात शहादा येथून खेतीयासाठी 2 तर भुसावळसाठी 3 बसेस सोडण्यात आल्या. नंदुरबार येथून बिजासनसाठी 10, खेतीया 9, परभणी 1, गोंदीया 2 आणि भुसावळसाठी 2 बसेस सोडण्यात आल्या. एकूण 2943 प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासाच्या स्थानापर्यंत सोडण्यात आले.

जिल्ह्यातील नागरिकांनाही गावी आणले

औरंगाबाद आणि नांदेड येथून 10 बसेसद्वारे 250 नागरिक, पुणे 20 बसेसद्वारे 491, जुनागढ  येथून नंदुरबार स्थानकावर आलेले 1320 नागरिक 44 बसेसद्वारे आणि गुजरातमधील जामनगर, द्वारका, हरीपुरा, दहेगाम, गांधीनगर, राजकोट येथे 9 बसेस पाठवून 225 नागरिकांना जिल्ह्यातील त्यांच्या गावी सोडण्यात आले. असे एकूण 83 बसेसद्वारे 2286 नागरिकांना नंदुरबार जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचविण्यात आले.

नवापूर येथून सर्वप्रथम 10 तारखेला 6 बसेस बिजासन येथे प्रवाशांना घेऊन गेल्या. त्यानंतर गुजरात येथून पायी किंवा वाहनाने येणाऱ्या प्रवाशांची नियमांचे पालन करीत सोय करण्यात आली. सर्वाधीक 200 बसेस 18 मे रोजी सोडण्यात आल्या. तर 17 मे रोजी 143 बसेस सोडण्यात आल्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत एका बसमध्ये 20 ते 22 प्रवासी बसविण्यात येत आहेत.

मनोज पवार, आगार व्यवस्थापक नंदुरबार-संकटकाळातील मोठ्या मोहिमेत सहभागी झाल्याचे आमच्या प्रत्येक वाहनचालकाला समाधान आहे. एसटी सामान्य माणसाच्या सुख-दु:खाशी जोडली गेली आहे याचा प्रत्यय यानिमित्ताने आला. प्रवाशांचा त्रास कमी करून त्यांना एसटीमुळे त्यांच्या कुटुंबियांना भेटता आले याचा आनंद प्रत्येक कर्मचाऱ्याला आहे.

उल्हास देवरे, तहसीलदार- गेले आठ दिवसापासून 24 तास हे काम सुरू आहे. कर्तव्यासोबत माणूसकीच्या भावनेने प्रशासनातील सर्व घटक काम करीत आहेत. स्वयंसेवी संस्थांचेही चांगले सहकार्य लाभले आहे. मजूरांना कुटुंबियांकडे पोहोचविण्यात काही अंशी आपलीही भूमीका असल्याचे निश्चितपणे समाधान आहे.

बापट साहेब तुम्ही आणि तुमच्या महापौरांनी केले काय ? ते सांगा .. शहर कॉंग्रेस अध्यक्षांचा पलटवार (व्हिडीओ)

 पुणे – आज खासदार गिरीश बापट आणि शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी शहरातील कोरोना संदर्भात अजित पवार तसेच राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाला टीकेचे लक्ष करून आंदोलनाची घोषणा केल्यानंतर शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे यांनी बापटांवर जोरदार टीका केली आहे. केंद्रात तुम्ही खासदार आहात  तुम्ही काय केले ? साडेसहा हजार कोटीचे बजेट असलेल्या महापालिकेत  तुमची सत्ता आहे   तुमच्या महापौरांनी काय केले ते सांगा असा सवाल करत बापट म्हणजे काय ,’ खोटे बोल पण रेटून बोल ‘ असा प्रकार असल्याचे ते म्हणाले .निव्वळ फेसबुक आणि व्हाटस एप वरून चमकून  जनतेच्या अडचणी दूर होत नाहीत आणि आता आंदोलने कसली करताय, जनतेच्या सेवेसाठी तत्परता दाखवा आणि संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी एकत्र काम करा असे ते म्हणाले . नेमके बागवे काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात …

विद्यार्थ्यांना कोठूनही परीक्षा देण्याची सुविधा

टीसीएस आयॉनने सादर केले रिमोट अॅसेसमेंटचे उत्पादन;

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नवीन उत्पादनाच्या माध्यमातून उमेदवारांचे सुरक्षित डिजिटल मूल्यांकन घरातूनच करणे एआय / एमएल अल्गोरिदममुळे शक्य

मुंबई, 19 मे, 2020 : विद्यापीठांना व परिक्षा मंडळांना विद्यार्थ्यांच्या परिक्षा दूरस्थ पद्धतीने आणि मोठ्या संख्येने, तसेच निष्पक्ष, सुरक्षित व पारदर्शक वातावरणात घेता याव्यात, याकरीता ‘टीसीएस आयॉन’ या ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’च्या उपकंपनीने ‘रिमोट अॅसेसमेंट्स’ ही प्रणाली सादर केली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) (बीएसई: 532540, एनएसई: टीसीएस) ही कंपनी माहिती तंत्रज्ञान सेवा, सल्ला सेवा व व्यवसायातील सोल्युशन पुरविणारी जागतिक कंपनी आहे.

सध्या ‘कोविड-19’च्या उद्रेकामुळे शिक्षण संस्था आणि परीक्षा मंडळांचे वेळापत्रक खूपच विस्कळीत झाले आहे. ‘टीसीएस आयॉन रिमोट अॅसेसमेंट्स’मुळे विद्यार्थ्यांना घरातून किंवा कोठूनही परीक्षा देणे शक्य होते. त्यामुळे त्यांना ‘कोविड’च्या आव्हानावर मात करता येईल.

परीक्षा मंडळांच्या आवश्यकतेनुसार, ‘टीसीएस आयॉन रिमोट अॅसेसमेंट्स’ ही प्रणाली परिक्षेच्या कार्यपद्धतीचे नियंत्रण तीन स्तरांवर करते. मूलभूत स्तरावर, ती डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट किंवा स्मार्टफोन हे उमेदवाराचे उपकरण बंदिस्त करून त्यातून केवळ परीक्षा देता येईल इतपतच ती सक्षम ठेवते. दुसर्‍या स्तरावर, ही प्रणाली उपकरणाच्या कॅमेऱ्याच्या कार्यावर नियंत्रण मिळवून ‘क्लाऊड’वरील मध्यवर्ती सर्व्हरवर व्हिडिओ प्रक्षेपित करते. हा व्हिडिओ प्रक्षेपण कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ‘मशीन लर्निंग फ्रेमवर्क’ वापरुन तपासला जातो. संभाव्य गैरप्रकारांचा शोध घेण्यासाठी आणि पर्यवेक्षकांना सतर्क करण्यासाठी या व्हिडिओ प्रक्षेपणाचे विश्लेषण केले जाते. तिसर्‍या स्तरामध्ये या सर्व वैशिष्ट्यांचा एकत्र उपयोग करून पर्यवेक्षक उमेदवारांवर प्रत्यक्ष वेळी व कोठूनही लक्ष ठेवण्याकरीता सज्ज होतात.

उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि योग्य कारवाई करण्यासाठी भरपूर वैशिष्ट्ये असलेली व्यवस्थादेखील या प्रणालीमध्ये पर्यवेक्षकांकरीता उपलब्ध आहे. ‘टीटीएस आयॉन रिमोट अॅसेसमेंट्स’मध्ये प्रश्न विचारण्याच्या 50 हून अधिक प्रकारांचा विचार करता येतो. वस्तुनिष्ठ प्रश्न, आकृत्या, आणि सूत्रे यांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याची संधी परीक्षेचे आयोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना या प्रणालीतून मिळते. प्रश्नपत्रिका द्रूतगतीने तयार करणे, त्या ‘एनक्रिप्टेड’ स्वरूपात सुरक्षित ठेवणे व ऐन परिक्षेपूर्वी त्यांचे वाटप विद्यार्थ्यांना करणे ही सुविधादेखील ‘टीटीएस आयॉन रिमोट अॅसेसमेंट्स’मध्ये उपलब्ध आहे.

विद्यार्थ्याने दिलेल्या बहुसंख्य उत्तरांचे मूल्यांकन या प्रणालीद्वारे केले जाऊ शकते. वस्तुनिष्ठ उत्तरांचे मूल्यमापन परिक्षकांकडून करण्याची सोय यात आहे. ही प्रणाली ‘टीसीएस आयॉन रिमोट मार्किंग प्लॅटफॉर्म’शी अखंडीत संलग्न असते. त्यातून परीक्षक त्यांच्या घरातूनच उमेदवारांची उत्तरे तपासून त्यांना गुण देऊ शकतात. उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांचे डिजिटल पद्धतीने विश्लेषण होते व ते गुण संबंधितांना कळविले जातात. अशा प्रकारे परिक्षांचे निकाल अत्यंत कमी वेळेत प्रसिद्ध होऊ शकतात.

‘टीसीएस आयॉन’चे जागतिक स्तरावरील प्रमुख अधिकारी वेंगुस्वामी रामास्वामी म्हणाले की, “दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेण्याची क्षमता विकसीत करून शिक्षण क्षेत्राला मदत करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. यातूनच आम्ही ‘टीसीएस आयॉन रिमोट अॅसेसमेंट्स’ ही प्रणाली निर्माण केली. विद्यार्थी, पर्यवेक्षक किंवा परीक्षा मंडळांचे अधिकारी हे कोणत्याही ठिकाणी असले, तरी या प्रणालीच्या मदतीने परीक्षा मंडळांचे प्रशासक हे सुरक्षित मार्गाने आणि वेगाने परीक्षा घेण्यास सक्षम असतील. यामुळे अधिकाऱ्यांना परीक्षेची प्रक्रिया त्वरीत आखून पूर्ण करण्यात मदत होईल.”

अनेक नामांकित परीक्षा मंडळे आणि शिक्षण संस्था यांनी शैक्षणिक परीक्षा घेण्यासाठी ‘टीसीएस आयॉन रिमोट अॅसेसमेंट्स’ प्रणालीचा लाभ घेणे यापूर्वीच सुरू केले आहे. या प्रणालीद्वारे आतापर्यंत दोन कोटी 80 लाखांहून अधिक उमेदवारांचे मूल्यांकन करण्यात आलेले आहे. या संदर्भात इच्छुक संस्था https://iur.ls/RemoteAssessments वर नोंदणी करून त्यांच्या परिक्षेच्या वेळापत्रकाचे त्वरीत नियोजन करू शकतात.

मिनरल वॉटर निर्मिती उद्योगाचा आवश्यक सेवांमध्ये समावेश, सरकारकडून कर्ज आणि सवलतींची घोषणा

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची उद्योजकांशी चर्चा सफल 

पुणे :मिनरल वॉटर निर्मिती,बाटलीबंद पाण्याची निर्मिती उद्योगाचा आवश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आला असून लॉक डाऊन मुळे  अडचणीत आलेल्या या उद्योगाला पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारकडून कर्ज,इतर भार न लावता प्रत्यक्ष दरातील  वीज आणि सवलतींची घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ने राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी  मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन सदस्यांचा झूम एप द्वारे संवाद घडवून आणला .

ही चर्चा आज मंगळवार दि १९ मे रोजी सकाळी ११ वाजता  झाली. महाराष्ट्र बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजयसिंह डुबल यांनी या चर्चेबाबत पत्रकाद्वारे माहिती दिली.

‘बाटलीबंद पाणी निर्मितीचे राज्यात हजारो उद्योग आहेत. कोरोना विषाणू साथीच्या लॉक डाऊन काळात हे उद्योग बंद पडलेले होते. लॉक डाऊन -४ मध्ये या उद्योगांना पूर्ववत निर्मितीची परवानगी मिळाल्यावर या उद्योजकांनी आपल्या अडचणी मांडण्यासाठी झूम एप द्वारे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा आयोजित केली आणि ती सफल झाली. असोसिएशन चे २७० सदस्य या चर्चेत सहभागी झाले.

मिनरल वॉटर निर्मिती उद्योगाचा आवश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आला असून लॉक डाऊन मुळे  अडचणीत आलेल्या या उद्योगाला पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारकडून विनातारण कर्ज देण्याची व्यवस्था केली जाईल .इतर भार न आकारता प्रत्यक्ष  दरात वीज आणि इतर  सवलतीं दिल्या जातील. या उद्योगांना बी आय एस प्रमाणपत्रासाठी दर वर्षी भरावी लागणारे सुमारे १.२५ लाख रुपये शुल्कही कमी व्हावे ,यासाठी केंद्राकडे आपण प्रयत्न करू,असे सुभाष देसाई यांनी सांगितले.

परवाना नसताना बाटलीबंद पाण्याची निर्मिती करणे गुन्हा असून शेकडो उद्योग बेकायदेशीर पणे निर्मिती करीत असल्याचे असोसिएशनने मंत्र्यांच्या निदर्शनास आणले . या विना परवाना उद्योगांवर कारवाई केली जाईल,असे सुभाष देसाई यांनी सांगितले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी आमची  चर्चा सफल यशस्वी झाली असून या सवलती मिळण्यासाठी आम्ही सरकारशी  पाठपुरावा करीत राहू,असे विजयसिंह डुबल यांनी सांगितले.

कोविड- 19 विषाणूच्या उपचारामधून निर्माण होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापनाबाबत बैठक संपन्न

   पुणे दि. 19 : कोविड -19 विषाणूच्या उपचारामधून निर्माण होणा-या जैव वैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापना संदर्भात हरित लवाद व राज्याचे मुख्य सचिव यांनी जिल्हास्तरावर उपाययोजना करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक संपन्न झाली.

            या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर,  पुणे मनपाचे आरोग्य  प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे, उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस, प्रताप जगताप, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे डॉ. साळवे आदींसह जैव वैद्यकीय कचऱ्याचे  व्यवस्थापन करणा-या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            यावेळी कोविड 19 विषाणूच्या उपचारामधून निर्माण होणा-या जैव वैद्यकीय कच-याचे व्यवस्थापन, अडचणी तसेच उपाययोजनांवर चर्चा झाली. पुणे महानगरपालिका व पिंपरी -चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात दोन जैव वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन करणारे प्रकल्प उभारणीबाबतही नियोजन करण्यात आले. जैव वैद्यकीय कचऱ्यातून अन्य आजार किंवा संसर्ग बळावण्याची दाट शक्यता असल्याने या कचऱ्याचे व्यवस्थापन होण्याची गरज आहे. यासाठी अशा स्वरुपाचा कचरा संकलित करून त्याची संबंधित यंत्रणेमार्फत विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. जैव वैद्यकीय कचरा स्वत:हून व्यवस्थित संबंधित संस्थेकडे नित्यनियमाने दिल्यास जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य होईल आणि आपले आरोग्य निरोगी राखण्यास आणखी मदत होईल, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाचा मृत्यूदर शून्यांवर आणण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नातून नक्कीच यश मिळवू

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी साधला संवाद

 पुणे, दि. 19 : पुणे जिल्हयातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यासोबतच मृत्युदर शून्यांवर आणण्यासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणा-या शासकीय तसेच विविध खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांची नियोजन बैठक घेण्यात आली.  कोरोनावर उपचारासोबतच इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन कायम डॉक्टरांच्या सोबत आहे. कोरोनामुळे वाढता मृत्यूदर शून्यांवर आणण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्नशील राहू व नक्कीच यात यश मिळवू, असा विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टारांशी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज संवाद साधला.             जिल्हाधिकारी राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीस यावेळी पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. दिलीप कदम, ससून रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार, पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, केईएम रुग्णालयाच्या डॉ. लीना शहा, डॉ. आरती लोखंडे, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. प्रदीप दळवी, डॉ. माधव भोज, भारती रुग्णालयाचे डॉ. जितेंद्र ओसवाल आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी राम यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांशी झालेल्या चर्चेत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना येणा-या अडचणी, कोरोनाबाधित रुग्णांचा मुत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी रुग्णांवर उपचार पदधती, शासकीय व खाजगी रुग्णालयातील समन्वय साधून रुग्णांची संख्या कशी कमी करता येईल यावर प्रामुख्याने लक्ष द्यावे. स्राव  चाचण्यांची स्थिती, सद्यस्थिती उपचार घेत असलेल्या रुग्णांची स्थिती तसेच आवश्यक साधनसामुग्रीबाबत चर्चा झाली. कोरोनावर उपचार करणा-या डॉक्टरांची मते जाणून घेत नव्याने काही बदल करता येतील का, याबाबतही चर्चा झाली.  बारामती व जुन्नर तालुक्यात कोरोनाच्या अनुषंगाने चांगले काम झालेले आहे. याबाबतचा सूक्ष्म अभ्यास करुन संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून जाणून घ्या, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या. जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचे स्वागत करून आपण अत्यंत काळजीने कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करत आहोत, यापुढेही कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करू, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या झाली  2 हजार 352 

पुणे विभागातील 2 हजार 355 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित 4 हजार 996 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

           पुणे दि. 19 :- पुणे विभागातील 2  हजार 355 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 हजार  996  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण  2 हजार 352 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 248 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 172 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

            यापैकी पुणे जिल्हयातील 4 हजार 280 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 69 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  1 हजार  996 आहे. कोरोनाबाधित एकूण  215 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  165 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

            कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात 157, सोलापूर जिल्ह्यात 53, कोल्हापूर जिल्ह्यात 40, सातारा जिल्ह्यात  5, सांगली जिल्ह्यात 2 अशी रुग्ण  संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

            सातारा जिल्हयातील 138 कोरोना बाधीत रुग्ण असून 75 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या  61  आहे. कोरोनाबाधित एकूण  2  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

            सोलापूर जिल्हयातील  443 कोरोना बाधीत रुग्ण असून 165 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 209 आहे. कोरोना बाधित एकूण 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

            सांगली जिल्हयातील 52 कोरोना बाधीत रुग्ण असून 33 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 18 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

            कोल्हापूर जिल्हयातील 83  कोरोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  68 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

            आजपर्यत विभागामध्ये एकुण  56 हजार 430  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी   46 हजार 992 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर  9 हजार 495  नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी  41  हजार  916  नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 4 हजार 996 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.      

             आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 17  लाख 94  हजार 763  घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत  5 कोटी  6 लाख 82 हजार  626 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3  हजार  307 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

सौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास महावितरण मोफत बदलून देणार

0

मुंबईदि. 19 मे 2020: महावितरणकडून राज्यभरात कार्यान्वित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील तीन किंवा पाच एचपी क्षमतेचे सौर कृषिपंप तांत्रिक बिघाडासह वादळी पाऊस, गारपिट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नादुरुस्त झाल्यास ते पूर्णपणे मोफत दुरुस्त करून किंवा बदलून देण्यात येणार आहे.

सध्या राज्यात वादळी पाऊस व गारपिटीचा धोका आहे. अनेक ठिकाणी वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला आहे. यामध्ये सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त होण्याची शक्यता आहे. नादुरुस्त झालेले सौर कृषिपंप नियमानुसार मोफत दुरुस्त करण्याचे किंवा बदलून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा तसेच शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेनुसार पहिल्या टप्प्यातील 25 हजार आणि दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित 75 हजार सौर कृषिपंप बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सध्या महावितरणने पहिल्या टप्प्याचे उद्दीष्ट पूर्ण करीत राज्यभरात तीन व पाच एचपी क्षमतेचे 25 हजार सौर कृषिपंप कार्यान्वित केले आहेत. तर उर्वरित 75 हजार सौर कृषिपंपाचे काम प्रगतीपथावर आहे. महावितरणच्या स्वतंत्र वेबपोर्टलद्वारे ‘ऑनलाईन’ अर्ज स्विकारण्यात आल्यानंतर निवड झालेल्या शेतकऱ्यांकडून लाभार्थी हिस्सा भरल्यानंतर निवड सूचीतील एजंसीची निवड करण्यात येत आहे. या एजंसीमार्फत शेतकऱ्यांना सौर कृषिपंप कार्यान्वित करण्याचे काम करण्यात येत आहे.

महावितरणने एजंसीसोबत केलेल्या करारानाम्यानुसार शेतकऱ्यांकडे बसविण्यात आलेल्या सौर कृषिपंपाच्या देखभाल व दुरूस्तीसाठी 5 वर्ष तर सौर पॅनलसाठी 10 वर्षांचा हमी कालावधी ठरविण्यात आला आहे. या हमी कालावधीत सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरूस्त झाल्यास त्याची मोफत दुरुस्ती करण्याची किंवा सौरपंप पूर्णपणे बदलून देण्याची जबाबदारी संबंधीत एजन्सीची राहणार आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या वादळी पावसामुळे किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे सौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास सौरपंपाची दुरुस्ती किंवा बदलून देण्यासाठी संबंधीत शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप नादुरुस्त झाला असल्यास किंवा सौर पॅनलमध्ये बिघाड झाल्यास 24X7 सुरु असलेल्या कॉल सेंटरच्या 18001023435 किंवा 18002333435 किंवा 1912 या टोल फ्री क्रमांकावर किंवा महावितरणच्या नजिकच्या कार्यालयात संपर्क साधून तक्रार दाखल करावी. महावितरणकडून संबंधीत एजंसीला ही तक्रार पाठवून सौर कृषिपंपाची दुरुस्ती करण्याची किंवा तो बदलून देण्याची कार्यवाही करण्यात येईल.

राज्यात आतापर्यंत ५२ हजार उद्योग सरू; औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र सावरतोय – उद्योगमंत्री सुभाष देसाई

0

मुंबई, दि. १९ : सध्या कोरोनामुक्त झालेल्या ग्रीन झोनमध्ये पूर्ण क्षमतेने उद्योग सुरू झाले आहेत. आतापर्यंत ७० हजार परवाने दिले असून त्यापैकी ५२ हजारांहून अधिक कारखाने सुरू झाले आहेत. यात साडेबारा लाख कामगार रुजू झाले आहेत. याशिवाय रेड झोनमधील अत्यावश्यक सेवा, निर्यात प्रधान उद्योग, संरक्षण दलासाठी लागणारे साहित्य- सामुग्री, सुटे भाग निर्मिती करणारे कारखाने, सिप्झ, डायमंड आदी क्षेत्रातील उद्योगांनाही उत्पादनासाठी परवानगी दिलेली आहे. परंतू रेड झोनमधील इतर उद्योगांवरील निर्बंध कायम ठेवले जाणार आहेत. एकूणच महाराष्ट्र राज्य औद्योगिकदृष्ट्या सावरतोय. अशा परिस्थितीत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.

वॉटर बॉटल असोशिएनच्यावतीने आयोजित वेबिनारमध्ये श्री.देसाई बोलत होते. यावेळी संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी सहभागी उपस्थित होते.

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमधून लघु, मध्यम उद्योगांना विनातारण कर्ज, पीएफमध्ये दिलासा देण्यात आला आहे. या पॅकेजचा लघु उद्योजकांन लाभ घ्यावा. राज्य सरकार देखील लघु उद्योगांना सवलती देत आहे. विजेचे स्थिरदर रद्द करून जेवढा वापर होईल तेवढे दर आकारले जात आहेत. वॉटर बॉटल संघटनने देखील केंद्राच्या या पॅकेजचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.देसाई यांनी केले.

पाणी उद्योगांचा दर्जा टिकवून वॉटर बॉटल संघटनेने आपली प्रतिमा अधिक शुद्ध व तेजस्वी करावी. केवळ पाणी उद्योगावर विसंबून न राहता इतर जोड उद्योग सुरू करावेत, असे आवाहन श्री.देसाई यांनी केले.

आतापर्यंत परदेशातील १९७२ नागरिक महाराष्ट्रात परत

0

क्वारंटाईनबाबत काटेकोर अंमलबजावणी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
मुंबई, दि. १९ : वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत १९७२ नागरिक आले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असून त्यांच्या क्वारंटाईनची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगितले.

या संदर्भात अधिक माहिती देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना निर्मुलनासाठी निग्रहाने लढत असतांना माणुसकीच्या नात्याने परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांमधील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे.

वंदे भारत अभियानांतर्गत १० देशातून १३ फ्लाईट्सद्वारे हे नागरिक महाराष्ट्रात आले आहेत. यात मुंबईतील ८२२ प्रवासी आहेत, उर्वरित महाराष्ट्रातील १०२५ तर इतर राज्यातील १२५ प्रवासी असल्याची माहितीही त्यांनी दिली. अजून २७ फ्लाईटसने परदेशात अडकलेले नागरिक महाराष्ट्रात येणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

इथून आले नागरिक
आतापर्यंत महाराष्ट्रात लंडनहून ६५३, सिंगापूरहून २४३, मनिलाहून १५०, सॅन फ्रान्सिस्को हून१०७, ढाक्याहून १०७, न्युयॉर्कहून २०८, क्वाललंपुर हून २०१, शिकागोहून १९५, कुवेत हून २, आदिस अबबा वरून ७८, काबूल-१२ आणि मस्कत- ओमान हून १६ नागरिक आले आहेत.

आलेल्या नागरिकांचे संस्थात्मक क्वारंटाईन
बृहन्मुंबईतील प्रवाशांची संस्थांत्मक क्वारंटाईनची सुविधा हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवासी यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

जे राज्य त्यांच्या नागरिकास घेण्यास तयार नाहीत त्यांना मुंबई येथे संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत असल्याचेही श्री.ठाकरे म्हणाले.

कोरोना प्रकरणी अपयश -भाजपच्या वतीने आयुक्तांकड़े तक्रार

पुणे, ता. १९ : कोरोना विषाणूमुळे पुणे शहरात निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आणण्यात राज्य शासन आणि प्रशासनाला आलेल्या अपयशाकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुणे शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ७ आयएएस दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, परंतु त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे प्रत्येक अधिकारी वेगवेगळे आदेश काढत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयश येत असल्याची टीका शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

रेड कंटेनमेंट विभागामध्ये ८० हजार कुटुंबांना शिधा पॅकेटस वितरण करण्याची घोषणा महापालिका प्रशासनाने एक आठवड्यापूर्वी केली होती. परंतु आठवड्यानंतर जेमतेम २० हजार पॅकेटस वाटण्यात आली आहेत. त्यामुळे या विभागात नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडावे लागत आहे. नागरिक बाहेर पडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने या भागातील नागरिकांना तातडीने पॅकेटस वाटण्याची व्यवस्था करावी अशी सुचना खासदार गिरीश बापट यांनी केली.

अधिकार्यांमध्ये समन्वय वाढावा, कोरोनाची वाढती रूग्ण संख्या लक्षात घेऊन बेडसची उपलब्धता करावी, रूग्ण आणि बेडसची उपलब्धता दाखविणारे पोर्टल विकसित करावे, अन्य रूग्णालये आणि दवाखान्यांमध्ये इतर आजारावर उपचार करण्यास टाळाटाळ केली जाते त्यांच्यावर कारवार्इ करावी, डॉक्‍टर, नर्सेस, आरोग्य सेवक, स्वच्छता कर्मचारी यांची निवास व्यवस्था, पीपीई किट, आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आरोग्य खात्यात आवश्यक असणार्या पदांची तातडीने भरती करावी, कोरोना रुग्ण आणि कॉरंटाइन केलेले नागरिक यांच्यासाठी पुरेसे बेडस, भोजन व्यवस्था, औषधे, मास्क, सॅनिटायझर, स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

पुणे शहरात मेट्रो, समान पाणीपुरवठा, भामा आसखेड प्रकल्प, रस्ते विकास, उड्डाणपूल आदी अर्धवट अवस्थेत असलेली विकासकामे तातडीने सुरू करावीत, महापालिकेची रुग्णालये सुसज्ज करावीत, पावसाळ्यापूर्वी करावयाच्या अत्यावश्यक कामांचे तातडीने नियोजन करावे, कचरा व्यवस्थापनाच्या कामांना गती द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

भाजपच्या वतीने शुक्रवारी आंदोलन

कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने येत्या शुक्रवारी (ता. २२ मे) सकाळी दहा वाजता भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.

मुळीक म्हणाले, ‘शहरातील तीन हजार प्रमुख कार्यकर्ते आपआपल्या घराच्या दारात उभे राहून राज्य शासनाचा निषेध करणारे फलक प्रदर्शित करणार आहेत. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे कटाक्षाने पालन केले जाणार आहे. कोरोनाची स्थिती निर्माण झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आपत्कालिन व्यवस्थेत मदत आणि विविध प्रकारचे सेवा कार्य करीत आहेत. कोरोना रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भाजपची भूमिका आहे. हे सहकार्य यापुढे ही कायम राहील. परंतु राज्य सरकारचे पुण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून, पुण्यात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहेत. या बेजबाबदारपणाकडे शासनाचे आणि जनतेचे लक्ष वेधणे हा या आंदोलनाचा हेतू आहे.’

पुण्यातील स्थितीचे गांर्भीर्य विषद करताना मुळीक म्हणाले, ‘ससून सर्वोपचार रूग्णालयात कालपर्यंत ४६९ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत दाखल केलेल्या रुग्णांपैकी ११५ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच ससूनमध्ये दाखल झालेल्या ४ रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू होत आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब, कर्नाटक या देशातील काही मोठ्या राज्यातील मृत झालेल्या व्यक्तिंच्या संख्येपेक्षा ससूनमधील मृतांची संख्या खूप मोठी आहे. तसेच कोरोनाग्रस्त रुग्ण संख्येच्या तुलनेत मृतांचे प्रमाणही मोठे आहे. ही बाब अतिशय गंभीर असून याकडे सरकारचे लक्ष वेधणे आवश्यक वाटते त्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.’

राज्य
पॉझिटिव्ह रूग्ण
मृत्यू रुग्ण
मृत्यूचे प्रमाण

उत्तर प्रदेश
४४६४
११२
३९.८५

तामिळनाडू
११७६०
८१
१४५.१८

आंध्र प्रदेश
२४०७
५०
४८.१४

कर्नाटक
१२४६
३८
३२.७८

पंजाब
१९८०
३५
५६.५७

ससून पुणे
४६९
११५
४.०७
४ व्यक्ती मागे 1 मृत्यू

कोविड-19 : अजित पवारांसह प्रशासनावर खा.गिरीश बापटांची टीका(व्हिडीओ)

पुणे-खा. गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी  महापालिका आयुक्त कार्यलयात जाऊन आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली.आणि शहरातील कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा केली.त्या नंतर माध्यमांपुढे बोलताना खा.बापट आणि भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राज्यसरकारसह अजित पवारांवर टीका केली.या वेळी ते नेमके काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात ऐका

पोटाला दोन घास खायला नाही,हाताला काम नाही, हे 20 लाख कोटीच्या गप्पा मारतात…

औरंगाबादः देशातील कोट्यावधी गोरगरीब आपले घर गाठण्यासाठी हजारो किलोमीटरची पायपीट करत आहेत, चालून दमलेल्या अनेकांनी रस्त्यातच आपले प्राण सोडले, तर कुणाला खायला मिळाले नाही जीव गमवावा लागला. हे सगळे चित्र दिसत असतांना, पोटाला दोन घास नाही म्हणून गरीब माणूस मरतोय, अशा परिस्थितीत सरकार वीस लाख कोटींच्या गप्पा कसल्या मारता? आधी रस्त्याने पायी निघालेल्या कुटुंबांना त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करा, त्यांना खायला पोटभर अन्न द्या, मग मोठ्या गोष्टी करा, अशा शब्दांत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजची खिल्ली उडवली. कोरोना संकटामुळे दोन महिन्यांपासून लॉकडाऊन असलेल्या देशाला पुन्हा उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने विविध क्षेत्रांसाठी वीस लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजचा लाभ कोणत्या क्षेत्राला कसा व किती होणार? याची सविस्तर माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग चार दिवस पत्रकार परिषद घेऊन देशाला दिली. विरोधकांनी या पॅकेजवर टिका केली असतांना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी देखील पॅकेज म्हणजे मृगजळ असल्याची टिका केली आहे.

आज सामान्य माणूस अन्न पाण्याशिवाय तडफडून मरतोय, त्याच्या पोटाला दोन घासांची गरज आहे. कोरोनाच्या संकटामुळे हाताला काम नाही, आपल्या राज्यात, घरी परतण्यासाठी त्याच्याजवळ पैसा नाही, तो आपल बिऱ्हांड पाठीवर घेऊन कच्च्याबच्यांसह हजारो मैलची पायपीट करतोय. त्याला मदत करणे, जगवणे हे सरकारने प्राधान्याने करायला हवे, पण ते न करता अर्थमंत्री फक्त कोट्यावधींचे आकडे लोकांच्या तोंडावर फेकत आहेत.निर्मला सीतारामन यांनी वीस लाख कोटींच्या पॅकेजची जी माहिती दिली, त्याचे पोस्टमार्टम आम्ही लोकसभेच्या अधिवेशनात निश्चित करू, पण ज्या पध्दतीने, व मुजोरपणे त्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या, हे देशाच्या अर्थमंत्र्यांना न शोभणारे होते. पॅकेज जाहीर करतांनाच देशाला लॉकडाऊनमधून बाहेर कसे काढणार? त्यासाठी सरकारने काय योजना आखली आहे, जनतेकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत? हे देखील स्पष्ट झाले पाहिजे.

नगर विकास प्रधान सचिवांनी विविध भागांची केली पाहणी

पुणे,दि.१८-नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी आज भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वाब सेन्टर व प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली.
पहाणी अंतर्गत भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले शाळेतील स्वाब सेंटरला भेट दिली.स्वाब सेंटर मधील नागरिकांची नोंदणी,स्वाब कक्ष,विलगिकरण कक्ष, प्रत्येक ठिकाणी नागरिकांकरिता करण्यात आलेली सुविधा व भोजन सुविधा याबाबतची माहिती घेतली.येथील सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
स्वाब सेंटर नंतर चुडामन तालीम, जुना मोटर स्टँड परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात करण्यात आलेला बंदिस्त भाग, अडथळे,पत्र्याने बंदिस्त केलेल्या भागाची पहाणी केली.
पहाणी प्रसंगी त्यांनी येथील परिस्थितीबाबत अविनाश बागवे, रफिक शेख,मनपा आयुक्त शेखर गायकवाड, साखर आयुक्त सौरभ राव,अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल,उपआयुक्त माधव देशपांडे,क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ बनकर,परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ,राजेश दिघे,डॉ,अब्दुल सलाम सुतार,सहाययक आरोग्यप्रमुख डॉ, वैशाली जाधव,उपायुक्त माधव जगताप आदींशी चर्चा केली.
या परिसरातील मंजुळाबाई चाळीत संशयित व बाधित रुग्ण आढळल्यामुळे या चाळीस भेट दिली.याप्रसंगी अरविंद शिंदे,मनपा आयुक्त शेखर गायकवाड,साखर आयुक्त सौरभ राव,अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अगरवाल यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
येथील सुविधांबाबत येथील नागरिक व चाळीचे सचिव यांच्याशीही चर्चा केली.
याप्रसंगी सहपोलिस आयुक्त डॉ,संजीव शिंदे,वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वप्ना गोरे,सह महापालिका आयुक्त विजय दहीभाते,क्षेत्रीय अधिकारी दयानंद सोनकांबळे,व अन्य अधिकारी उपस्थित होते.
तसेच पाटील इस्टेट परिसराची नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक व महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पहाणी केली.
या परिसरात आजपर्यंत आढळलेले संशयित रुग्ण,बाधित रुग्ण,स्वाब टेस्टिंग,नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा,क्विक रिस्पॉन्स टीम कामकाज,कॉन्टॅक्ट ट्रेसिंग,सर्वेक्षण,जनजागृती अशा विविध स्वरूपाच्या करण्यात आलेल्या कामकाजविषयी माहिती त्यांनी घेतली.
याप्रसंगी दिपके पोटे,मनपा आयुक्त शेखर गायकवाड,साखर आयुक्त सौरभ राव,पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग,अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अगरवाल,परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ,संतोष मुळे, सहाययक आरोग्यप्रमुख डॉ,वैशाली जाधव,क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ, मृणालिनी कोलते,उपायुक्त नितीन उदास,क्षेत्रीय अधिकारी किशोरी शिंदे,विभागीय आरोग्य निरीक्षक आय येस इनामदार व अन्य अधिकारी उपस्थित होते.

पोलिसांवर हल्ल्यांच्या २४० घटना; ८१९ व्यक्तींना अटक – गृहमंत्री अनिल देशमुख

0

कोविडसंदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख १० हजार गुन्हे दाखल

मुंबई दि.१८- राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १०  हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २४० घटना घडल्या. त्यात ८१९ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १७ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख १० हजार १४० गुन्हे नोंद झाले असून २० हजार ९११ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ४ कोटी ४९ लाख ४९ हजार १०४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लॉकडाऊन च्या काळात  या १०० नंबरवर ९३ हजार ६०६ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ६८० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ३ लाख ६६ हजार १४६ व्यक्ती क्वारंटाईन आहेत. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ३ लाख ९७ हजार १३९ पास देण्यात आले आहेत.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३१७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५९ हजार ३६३ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनाचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्दैवाने   मुंबईतील ७ पोलीस कर्मचारी व १ अधिकारी असे एकूण ८,पुणे १, व सोलापूर शहर १, नाशिक ग्रामीण १ अशा ११पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात १३१ पोलीस अधिकारी व ११४२ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत.पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

राज्यात एकूण ३ हजार ७९८ रिलिफ कॅम्प आहेत. तर जवळपास ३ लाख ६५ हजार १७९ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी.  त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.  लॉक डाऊनच्या काळात सर्व नियमांचे पालन करून कोरोनाशी मुकाबला करण्यास सहकार्य करावे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथिलता मिळाली असली म्हणजे लॉकडाऊन संपले असे नाही. उलट या काळात  सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.