पुणे- कॉंग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांच्या गटनेत्यांनी केलेल्या मागणीनुसार प्रशासनाने ठेवलेला 6 ते साडेसात मीटररुंदीचे रस्ते ९ मीटर रुंद करण्याचा ३२३ रस्त्यांचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीत एक आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली . पुण्यातील सर्वच अरुंद असलेले 6 ते साडेसात मीटर रुंदीचे रस्ते ९ मीटर रुंद करावेत अशी विरोधकांची मागणी असली तरी तशीच आमचीही इछ्या आहे. परंतु सध्या जिथे ९० टक्के हून अधिक नागरिकांना लाभ होईल अशा ठिकाणी प्राधान्याने रस्ते रुंद करण्याचा आमचा प्रयत्न राहील कोणावर अन्याय ,कोणाला त्रास न देता , शहराच्या विकासाला गती मिळेल अशा पद्धतीने सर्वांना बरोबर घेऊनच आम्ही काम करणार असल्याचे रासने म्हणाले . मिळकतकर भरण्यास सवलती देणे ,रुग्णांना दुध वाटप करणे यासह अनेक निर्णय आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आले . याबाबत नेमके रासने यांनी काय सांगितले ते ऐका त्यांच्याच शब्दात …..
कोरोनाची लस विकसित करण्यासाठी 30 माकडांवर प्रयोग
पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे करणार सुपुर्द – वनमंत्री संजय राठोड यांची माहिती
मुंबई,दि. २ : कोरोना विषाणूमुळे (कोविड-19) होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तात्काळ विकसित करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला 30 माकडांची आवश्यकता आहे. ही ३० माकडे राज्याच्या हद्दीतील घेण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर करण्यात येईल.यासाठी 30 माकडे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले.
सध्या राज्यात कोरोना विषाणूमुळे होत असलेला प्रादुर्भाव व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकल्पास तातडीने परवानगी देण्याबाबत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी ३० मे २०२० रोजीच्या पत्रान्वये शासनास मान्यता देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार ही माकडे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले.
अनुभवी मनुष्यबळामार्फत या माकडांना पकडणे, त्यांना कुशलतेने हाताळणे, त्यांना सुरक्षितपणे बाळगणे, पकडलेल्या माकडांना तसेच परिसरातील इतर वन्यप्राण्यांना इजा तसेच त्यांचा दैनंदिन जीवनक्रम विस्कळीत न होऊ देणे, प्रकल्पाचा व्यापारी तत्वावर उपयोग न करणे आदी अटी शर्तींच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आली आहे अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली.
पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या झाली 4 हजार 135 -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे विभागातील 5 हजार 635 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 10 हजार 247 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे:-पुणे विभागातील 5 हजार 635 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 हजार 247 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 135 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 477 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 223 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 7 हजार 947 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 4 हजार 729 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 861 आहे. कोरोनाबाधित एकूण 357 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 205 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 286 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 174, सातारा जिल्ह्यात 53, सोलापूर जिल्ह्यात 43, कोल्हापूर जिल्ह्यात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 573 कोरोना बाधीत रुग्ण असून 200 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 351 आहे. कोरोनाबाधित एकूण 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 992 कोरोना बाधीत रुग्ण असून 446 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 458 आहे. कोरोना बाधित एकूण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 112 रुग्ण असून 65 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 43 आहे. कोरोना बाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 623 कोरोना बाधीत रुग्ण असून 195 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 422 आहे. कोरोना बाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 91 हजार 282 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 86 हजार 230 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 52 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 75 हजार 851 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 10 हजार 247 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
(टिप : – दि.2 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
रुग्णांना खाटा उपलब्ध होण्यासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयांना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या अचानक भेटी चार रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस
मुंबई,:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. मंगळवारी पहाटे दोन वाजेपर्यंत आरोग्यमंत्री रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेत होते.
रुग्णांना दिलेल्या खाटांची अचूक माहीती रुग्णालय प्रशासनाने जाहीर फलकावर द्यावी. राज्य शासनाच्या नियमांचे पालन केलेच पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, या भेटीमध्ये चारही रुग्णालयांमध्ये काही बाबींची अपूर्णता आढळून आल्याने राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
कोरोना तसेच कोरोना शिवाय अन्य आजारांच्या रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होऊ नये यासाठी राज्य शासनाने मुंबईसह राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातूनही रुग्णांना मोफत उपचाराचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रने घेतलेला हा अभिनव निर्णय अन्य राज्यांनाही प्रेरणादायी ठरला आहे.
८० टक्के खाटा राखीव करूनही रुग्णांना खाटा नाकारण्याचे किंवा बेड फुल झाल्याचे कारण खासगी रुग्णालयांकडून दिले जाते. यासंदर्भात रुग्णांच्या तक्रारी येत असून त्याची दखल घेत काल रात्री दहाच्या सुमारास आरोग्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालयांना भेट देण्याचे मिशन हाती घेतले. त्यांच्या सोबत राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे होते.
सुरूवातीला त्यांनी बॉम्बे हॉस्पीटलला भेट दिली. तिथे खाटांच्या उपलब्धतेबाबत जाहीर फलक नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णालयातील एकूण खाटा, ८० टक्केनुसार दिलेल्या खाटा, शिल्लक खाटा यांची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी जसलोक, हिंदुजा, लिलावती या रुग्णालयांनाही भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांनी राखीव खाटांची माहिती दर्शविणारा तक्ता पाहिला.
रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेली ही मोहिम पहाटे दोन पर्यंत सुरू होती. रुग्णांना खाटा नाकारू नका. त्यांना वेळेवर उपचार द्या. शासनाला सहकार्य करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. काही रुग्णालयांमध्ये बेडच्या उपलब्धतेबाबत आणि दिलेल्या बेड बाबत माहिती दर्शविणारे फलक नव्हते, शासनाने उपाचारासाठी जे दर निश्चित केले आहेत ते दरपत्रक लावण्यात आलेले नव्हते. क्षमतेच्या ५० टक्केही खाटांचा वापर न करताही अनेक रुग्णांना प्रतिक्षा करावी लागत आहे अशी विविध बाबी या भेटी दरम्यान निदर्शनास आल्या.
राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी केलेल्या नियमांचे पालन न करण्यात आल्याने डॉ. सुधाकर शिंदे यांनी या बॉम्बे हॉस्पीटल, जसलोक हॉस्पीटल, हिंदुजा हॉस्पीटल, लिलावती हॉस्पीटल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.
मुख्य सचिव अजोय मेहता यांनी घेतला पुणे विभागाच्या कोरोना परिस्थितीचा आढावा
विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे साधला संवाद
पुणे, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली या जिल्हयांतील कोरोना परिस्थितीबाबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर व सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, आरोग्य उपसंचालक डॉ.संजय देशमुख, ससून रुग्णालयाचे अधीष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे आदी सहभागी झाले.
डॉ.म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात कोरोना प्रतिबंधासाठी शहरी व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय तयार होणाऱ्या नवीन हॉटस्पॉटवर देखील लक्ष देण्यात येत आहे. सध्या ग्रामीण भागात देखील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे या भागातील रुग्णदर कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपाययोजना करत आहेत. परराज्य व परजिल्हयातून प्रवास करुन आलेल्या तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक व श्वसनाशी संबंधित आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह असणारे नागरिक, गरोदर महिला, लहान बालके यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. तसेच त्यांच्यात कोरोना सदृश लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात येत आहेत.
शासनाच्या नियमानूसार दर आकारणी न करता जादा दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा पातळीवर समितीची स्थापना करण्यात आली आहे. अशा रुग्णालयाची तक्रार प्रशासनाकडे प्राप्त झाल्यास त्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी संबंधित अधिकारी व रुग्णालय प्रमुखांशी वेळोवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधून आवश्यक त्या सूचना देवून प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. पावसाळयाच्या तोंडावर कोरोना संसर्गाबरोबरच डेंग्यू, मलेरिया, स्वॉइन फ्ल्यू अशा अन्य आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये, यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी यावेळी दिली.
महापालिका आयुक्त शेखर गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच झोपडपट्टी व प्रतिबंधीत क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीवर भर देण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगलीचे जिल्हाधिकारी अनुक्रमे नवल किशोर राम, शेखर सिंह, मिलिंद शंभरकर, दौलत देसाई व डॉ.अभिजीत चौधरी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपआपल्या जिल्हयातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी प्रशासनाच्या अडचणी व राज्य शासनाकडून अपेक्षीत मदतीबाबत चर्चा करण्यात आली.
ज्या भागात रुग्ण नाहीत तो भाग कंटेनमेंट झोन मधून वगळावा -नगरसेवक वनराज आंदेकर
पुणे- कसबा पेठ,भवानी पेठ,रास्ता पेठ,गणेश पेठ,रविवार पेठ,शुक्रवार पेठ,बुधवार पेठ या परिसरात कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे.मात्र येथील सर्वच ठिकाणी रुग्ण आढळत नसून ज्या भागात रुग्ण नाहीत असा भाग कंटेनमेंट झोन मधून वगळावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक वनराज आंदेकर यांनी महापौर मुरलीधर मोहोळ व महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. ते म्हणाले कि आमच्या भागात सर्व कष्टकरी लोक रहातात .त्यात रिक्षा चालक ,हमाल,विडी कामगार , भाजी विक्रेते,घरकाम करणाऱ्या महिला,खासगी कर्मचारी व निमसरकारी कार्यालयातील कर्मचारी राहतात.गेली अडीच महिने ते सर्व नियमांचे पालन करीत आहेत.परंतु आज अनेक कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.पैश्याच्या अडचणी मुळे घरगुती वादाचे परिणाम उद्भवतात.ज्या ठिकाणी रुग्ण नाहीत त्या ठिकाणी थोडी शिथिलता मिळावी.तसेच येथील दुकानदारांकडे नाशवंत माल पडून आहे.त्या मालाची वैधता आता संपत आहे.या दुकानदारांना आपला माल दुकानांमधून बाहेर नेण्यासाठी व विकण्यासाठी जास्त वेळ मिळावा म्हणून कंटेनमेंट परिसरात काही भागात काही काळासाठी शिथिलता मिळावी अशी मागणी वनराज आंदेकर यांनी केली आहेया या प्रसंगी दीपक जगताप,गणेश नलावडे,किरण कद्रे व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाला रोखण्यासाठी – मी चौकीदार हा पॅटर्न राबविणार-खा. गिरीश बापट (व्हिडीओ)
पुणे – पुणे शहरातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी भाजपचे 100 नगरसेवक, 6 आमदार, खासदार चौकीदार म्हणून काम करणार असल्याचे सांगूनकोरोनाला रोखण्यासाठी – मी चौकीदार हा पॅटर्न राबविणार असल्याची घोषणा आज खासदार गिरीश बापट यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली . पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, शहर सरचिटणीस राजेश येनपुरे, राजेश पांडे यांनी मनपा आयुक्त कार्यालयात कोरोना नियंत्रित करण्यासाठी नियुक्त केलेल्या चार आयएएस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गिरीश बापट म्हणाले, या 4 आयएएस अधिकाऱ्यांना शहरातील वेगवेगळे भाग वाटून देण्यात आले आहेत. त्यांच्यामध्ये सुसूत्रीकरण व्हावे. आमचे असंख्य कार्यकर्ते काम करायला तयार आहेत. लाखो लोकांना जेवण, अन्नधान्य, भाजीपाला, दूध वाटप करण्याचे काम केले. कोरोनाच्या टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने संख्या वाढत आहे. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही बापट यांनी केले. जास्तीत जास्त कोरोना टेस्ट होण्याची गरज आहे. ही संख्या बाहेर येणे गरजेचे आहे. आगामी काळात कोरोनाला रोखण्यासाठी 100 नगरसेवक, आमदार, खासदार चौकीदार म्हणून काम करणार आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी आणखी पुढे जायचे आहे. ही बैठक यशस्वी झाली. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांशी मी संपर्कात आहे. 162 वार्डात हा पॅटर्न राबविण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर काम व्हावे, गावभर कार्यकर्त्यांनी फिरत बसू नये, असा सल्लाही बापट यांनी दिला. शहरात सध्या 50 टक्केच डॉकटरांनी दवाखाने उघडे ठेवले. आणखी 50 टक्के दवाखाने उघडण्यासाठी आम्ही विंनती करू. किटसह सर्व सुविधा महापालिका द्यायला तयार आहेत. खोकला झाला म्हणजे कोरोना नाही. तर, पालकमंत्री यांनी कोरोना संदर्भात बैठक घेतल्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर पत्र लिहिले होते. त्यानंतर लोकप्रतिनिधींची बैठक झाल्याची आठवण बापट यांनी करून दिली. आम्हाला कोरोनाचे राजकारण करायचे नाही. भाजप कोरोनाच्या युद्धात काम करणार आहे. राज्यभर आंदोलन केल्याने चांगला परिणाम झाला. महापालिकेच्या कामाच्या बाबत समाधनी असून, आणखी चांगले काम व्हावे. जनतेच्या हिताचे काम व्हावे. प्रशासनाने सातत्याने लोकप्रतिनिधीशी बोलले पाहिजे, अशी अपेक्षाही बापट यांनी व्यक्त केली.
एच. सी. एम.टी.आर रस्ता लांबणीवर टाकणे-मोठी चूक :आबा बागुल
एच. सी. एम.टी.आर रस्ता :निधीच्या पर्यायांचा विचार व्हावा
पुणे -गेल्या ४० वर्षांपासून प्रस्तावित असलेला आणि भविष्यातील पुण्याच्या वाहतुकीसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार [एच. सी. एम. टी. आर] मार्गाबाबत पालिका प्रशासनाचा पुन्हा एकदा गलथानपणाचा कारभार सुरु झाल्याने हा महत्वाकांक्षी प्रकल्प लांबणीवर पडणार तर आहे शिवाय जीवघेण्या वाहतुकीत पुणेकरांना मरणाच्या खाईत लोटण्याचाच हा प्रकार आहे,अशी भूमिका माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत मांडली तसेच या मार्गासाठी निधीच्या पर्यायांचा विचार पालिका प्रशासनाने करावा आणि कोणत्याही स्थितीत हा प्रकल्प पूर्णत्वास न्यावा ;अन्यथा न्यायालयीन लढा दिला जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, मागील ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे व खडकी कॅंटोन्मेंट अंतर्गत रिंगरोडसाठी (एचसीएमटीआर) शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १९८७च्या विकास आराखड्यामध्येही (डीपी) ‘एचसीएमटीआर’ दर्शविण्यात आला होता. राज्य सरकारने २०१७मध्ये मंजुरी दिलेल्या विकास आराखड्यावर ‘एचसीएमटीआर’ची आखणी (अलाइनमेंट) निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, महापालिकेने जागतिक स्तरावर निविदा काढल्या मात्र त्या अबोव्ह आल्या आहेत. असे असताना कोरोनाचा प्रादुर्भाव याचा आधार घेऊन हा मार्ग करण्याची आमची क्षमता नाही, ही पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची भूमिका नक्की कोणाच्या हिताची आहे ? हा प्रश्नही महत्वाचा आहे.
गेली १९ – २० वर्षे एचसीएमटीआर रस्त्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करीत आहे. निविदा प्रक्रियेपर्यंत आलेल्या या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधीचा मुद्दा उपस्थित करून लांबणीवर टाकण्याची भूमिका एकप्रकारे पुणेकरांना मृत्यूच्या खाईत लोटणारी अशीच आहे.प्रशासनाच्या गलथानपणामुळे ही स्थिती ओढवली आहे. ज्यावेळी हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला, त्यावेळी तो केवळ पाचशे कोटी रुपयात साकारणार होता मात्र प्रशासकीय गलथान कारभारामुळे आज हा प्रकल्प सहा हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे.
भविष्यातील पुण्यासाठी त्यावेळी नियोजनकारानी हा मार्ग प्रस्तावित केला होता ;पण प्रशासन पातळीवर चालढकलचा कारभार आजतागायत सुरु आहे, हे पुन्हा एकदा पालिका आयुक्तांच्या भूमिकेमुळे अधोरेखित होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला हा मार्ग करता येत नाही ,त्यासाठी निधीचे दिलेले कारणही संयुक्तिक वाटत नाही. त्यात पुणेकरांसाठी महत्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प लांबणीवर टाकणे, अप्रत्यक्ष रद्द करण्याचा अधिकार पालिका आयुक्तांना नाही.ज्या निधीचे कारण प्रशासन देत आहे . तेही योग्य वाटत नाही. उलट हा मार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी निधी कसा उभारला जाईल याचा प्राधान्याने विचार करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या अनेक जागा सद्यस्थितीत मोकळ्या आहेत, त्या बी. ओ. टी वर अगर त्यातील काही भूखंडाची पालिका मुख्यसभा आणि राज्यशासनाच्या मान्यतेने विक्री करून हा प्रकल्प मार्गी लावणे सहजशक्य आहे. पण निधीचे कारण देऊन लांबणीवर टाकण्याची म्हणजेच गुंडाळण्याची भूमिका पुणेकरांच्या हिताची नाही. स्वाईन फ्लू असो किंवा आताचा कोरोना आणि जीवघेण्या वाहतूक कोंडीत करदाता पुणेकर दररोज मृत्यूला सामोरा जात आहे, हे केवळ आणि केवळ प्रशासनाच्या गलथान कारभारामुळेच,ही वस्तुस्थिती आहे असेही आबा बागुल म्हणाले.
जिथे गरज नसताना समान पाणीपुरवठ्यासाठी टेंडर काढले गेले आहे. तीन हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी कर्जरोखेही उभारले गेले आहे मग एचसीएमटीआर रस्त्यासाठी वेगळी भूमिका का ? वास्तविक केवळ दहा टक्के भागाला पाणी पोहचत नसताना, समान पाणीपुरवठा योजना राबविण्याची गरजच काय ? हेही लक्षात घेतले पाहिजे. आज जीवघेण्या वाहतुकीत दररोज पुणेकर मृत्यूशी खेळत आहेत. त्यांचा जीव वाचविणे हे आपले काम आहे. सर्व पक्षनेते यांच्यासमवेत बैठक घेऊन एचसीएमटीआर मार्ग कसा मार्गी लावता येईल यासाठी अनेक पर्यायांवर
चर्चा करता येऊ शकते पण आमची क्षमता नाही हे प्रशासनाचे म्हणणे पूर्णतः चुकीचे आणि ते पुणेकरांना मारक असेच आहे. जर निधीच्या कमतरतेमुळे हा मार्ग करता येत नसेल तर उद्या विकास आराखड्यातील लाखो कोटींचे प्रकल्प ही प्रशासन रद्द करणार का ?असा सवालही आबा बागुल यांनी केला. मुळात एचसीएमटीआर प्रकल्पासाठी सहा हजार कोटी रुपये हे काही एक वर्षात लागतील असे अजिबात नाही. पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे आज या एचसीएमटीआर प्रकल्पाबाबत नकारात्मक भूमिका घेऊन कोणत्या बांधकाम व्यावसायिकांचे, उद्योगपतींचे हित जोपासले जाणार आहे हा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे निधी नाही हे कारण अथवा पर्याय महापालिका प्रशासन देऊ शकत नाही. आज काय, आहे त्याच रस्त्यांवर पुन्हा पुन्हा तीच विकासकामे होत आहे, निधी खर्च केला जात आहे. त्यामुळे आगामी दोनशे वर्षे पुणेकरांना वाहतुकीसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या एचसीएमटीआर मार्गाबाबत सकारात्मक भूमिका घेण्याची नितांत गरज आहे. त्यात कोणतेही राजकारण होऊ नये. हा सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहे,त्यांची जीवघेण्या वाहतूक कोंडीतून सुटका करणे हेच महत्वाचे आहे. असेही माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले
धारावीतील ऑक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे विशेष रुग्णालय उद्यापासून होणार कार्यान्वित
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली पाहणी
मुंबई, दि. १ : मुंबईतल्या घनदाट लोकवस्तीचा भाग असलेल्या धारावी येथील महाराष्ट्र नेचर पार्कजवळ ऑक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाला आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत हे रुग्णालय उभे राहिल्यामुळे या भागातील रुग्णांना आहे तेथेच उपचाराची सुविधा मिळणार आहे. उद्यापासून हे रुग्णालय कार्यान्वित होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे बऱ्याचदा श्वास रोखण्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागते अशा वेळी या रुग्णांना वेळीच ऑक्सिजनचा पुरवठा झाला तर त्यांचे प्राण वाचू शकतात. स्थानिकांना आहे त्या भागातच उपचाराची सोय व्हावी यासाठी मुंबई महापालिकेमार्फत धारावीतील बस डेपो जवळ हे कोरोना आरोग्य सेंटर सुरू करण्यात आले आहे. केवळ १५ दिवसांमध्ये २०० खाटांच्या या रुग्णालयाची उभारणी झाली असून तेथे प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सोय आहे. त्यामुळे ज्या कोरोनाबाधित रुग्णाला श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागला त्याला तत्काळ या सेंटरमध्ये आणून ऑक्सिजन देऊन उपचार केले जातील.या रुग्णालयासाठी १० डॉक्टर्स, १५ नर्स, वॉर्डबॉय तसेच पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रुग्णालात सीसीटीव्ही यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे. त्याचबरोबर थर्मल सेंसर यंत्रणा देखील असून त्याद्वारे तापाच्या रुग्णांची वेळीच तपासणी होणे शक्य होईल. कोरोनाशिवाय अन्य संशयित रुग्णांवर याठिकाणी मोफत उपचार करण्यात येतील.आज आरोग्यमंत्र्यांनी या रुग्णालयाला भेट देऊन त्याची पाहणी केली. अल्पावधित रुग्णालय उभे राहिले याबद्दल त्यांनी यंत्रणेनेचे कौतुकही केले. यावेळी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आदी उपस्थित होते. श्री. दिघावकर यांनी रुग्णालयाबाबत आरोग्मयंत्र्यांना माहिती दिली.
चक्रीवादळाच्या व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 01 – चक्रीवादळ आणि कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी साधन सामुग्रीसह सज्ज रहावे. रेल्वे, रस्ते वाहतूक, महामार्गाची अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावीत असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये आयोजित केलेल्या मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी, के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे, वैशाली राजमाने तसेच शासकीय व जिल्हा परिषदेचे सर्व संबंधित खाते प्रमुख उपस्थित होते.
चक्रीवादळाचा धोका वाढला असून सर्व यंत्रणांनी अत्यंत सतर्क राहावे असे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गाची 85 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत कामे तातडीने पूर्ण करावीत. राष्ट्रीय महामार्गाबाबत भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. जिल्ह्याच्या संपर्कासाठी महत्त्वाचे घाट रस्ते सुरू राहण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. घाट मार्गावर कोसळणाऱ्या दरडींबाबतची माहिती तातडीने मिळावी व त्या हटवता याव्यात. तसेच रस्त्यावर पडणारी झाडे, मुख्यतः आंबोली घाटामध्ये, त्वरीत हटवता यावीत यासाठी महसूल, वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वय ठेवावा. शोध व बचाव साहित्य अद्ययावत ठेवावे. आरोग्य विभागाने पावसाळ्यातील साथरोग नियंत्रणाबाबत दक्षता घ्यावी. स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. पुरामुळे दूषित होणाऱ्या पाणीसाठ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठीची यंत्रणा सज्ज ठेवावी. वीज पुरवठा सुरळीत सुरू राहण्याबाबत संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. पूर क्षेत्रातील नागरिकांना निवाऱ्यासाठीची यंत्रणा तयार ठेवावी, पावसाळा कालावधीत पाटबंधारे विभागाने धरणातील पाण्याच्या विसर्गाची माहिती विहित वेळेत नदी काठच्या गावांना द्यावी, विशेषतः तिलारी धरण क्षेत्रामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी सतर्क रहावे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठा व विसर्ग यांची दैनंदिन माहिती महसूल विभागास व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास कळवावी, मस्त्य विभागाने पर्ससिन नेट मासेमारीस आळा घालण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात आदी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी या बैठकीत केल्या.
खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले, महामार्गामध्ये ज्यांच्या जमीने गेल्या आहेत त्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने देण्यात यावेत, महामार्गाबाजूच्या पाण्याचा निचरा होण्याचे काम तात्काळ पूर्ण करा. जिल्ह्यामध्ये संभाव्य भुस्खलनाचा धोका ओळखून त्याप्रमाणे यंत्रणा कार्यरत ठेवावी. एस.टी महामंडळाने बस फेऱ्यांचे नियोजन करुन जनतेला सेवा उपलब्ध करुन द्यावी असे सांगून खासदार निधी लवकरात लवकर खर्च करावा अशा सूचना दिल्या.
या बैठकीनंतर पालकमंत्री श्री. सामंत यांनी कुडाळ येथे महामार्गाच्या कामाची पहाणी केली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता सलिम शेख कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, महामार्ग ठेकेदाराचे प्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी महामार्गाच्या दोन्ही बाजूनी पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल या पध्दतीने ड्रेनेज सिस्टीम तयार करावी. महार्गासाठी अधिग्रहित केलेल्या सर्व जमिनी ताब्यत घ्याव्यात, मंजूर सर्व मोबदले तातडीने द्यावेत. महामार्गावर अपघात क्षेत्र तयार होणार नाही तसेच पावसाळ्यात महामार्गावर पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. अनाधिकृत कट बंद करावेत, लवकरात लवकर महामार्ग सुरु होईल याचे नियोजन करावे अशा सूचना दिल्या.
झाराप ता.कुडाळ येथे माणगाव फाट्यावर सर्कल उभारण्याबाबत ग्रामस्थांची मागणी आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे सल्लागार, कार्यकारी अभियंता व ठेकेदार यांच्या सोबत रत्नागिरी येथे बैठक घेवून निर्णय घेण्याविषयी पालकमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
किनारपट्टीवर संपूर्ण सावधानता, एनडीआरएफ तुकड्याही तैनात
मुंबई, दि १ : निसर्ग चक्रीवादळ ३ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.आज गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हीसीद्वारे चर्चा करून या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तयार ठेवण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या व्यक्ती कच्च्या घरांत राहत आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत दवंडी व लाऊडस्पीकर द्वारे सांगण्यात आले आहे. यासाठी पक्की निवारा गृहे देखील तयार ठेवण्यात आली आहेत. मच्छीमारांना समुद्रातून बोलविण्यात आले असून तटरक्षक दलाला देखील सुचना देण्यात आली आहे. वादळामुळे झाडे पडणे, भूसख्खलन, जोरदार पाऊस यामुळे हानी होण्याची शक्यता घेऊन प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील विशेषत: सखल भागातील झोपडपट्टीवासियांना देखील स्थलांतरित करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
नॉनकोविडरुग्णालयेउपलब्ध
मदत व बचाव कार्य करताना कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच नॉनकोविड रुग्णालये उपलब्ध करण्याचे निर्देश दिल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले. कोविडसाठी तात्पुरते उभारण्यात आलेल्या रुग्णालयांतील रुग्णांना देखील सुरक्षित स्थळी कसे हलविता येईल ते पाहण्यास सांगण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास अधिक रुग्णालये उपलब्ध करणे व त्याठिकाणी जनरेटर्सची सुविधा करण्यासही सांगण्यात आले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
एनडीआरएफ, एसडीआरएफतैनात
या चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या १६ तुकड्यांपैकी १० तुकड्या तैनात करण्यात आल्या असून एसडीआरएफच्या ६ तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसेच पालघर आणि रायगड मधील रासायनिक कारखाने, अणू ऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. मंत्रालयात देखील २४ तास नियंत्रण कक्ष सुरु असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्र्यांसमवेत या व्हीसीसाठी मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव मदत व पुनर्वसन किशोर राजे निंबाळकर तसेच इतर सचिव उपस्थित होते.
३२३ रस्त्यांचे रुंदीकरण -प्रस्तावावर माहिती द्या,नंतर मान्यता घ्या -विरोधी पक्षांची मागणी (व्हिडीओ)
पुणे – महापालिका हद्दीतील सहा ते साडेसात मीटर रुंदीचे रस्ते ९ मीटर रुंद करण्याचा प्रस्तावाला अपुऱ्या माहितीच्या आधारावर मान्यता देण्या ऐवजी या प्रकरणी सविस्तर माहिती सादर करून नंतर एक्माताने हा प्रस्ताव मान्य करावा .त्यासाठी किमान आठवडाभर तरी हा प्रस्ताव पुढे ढकलावा अशी मागणी आज महापालिकेतील विरोधी पक्षांच्या गटनेत्यांनी एकत्रित पणे स्थायी समिती अध्यक्षांना भेटून केली . विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, कॉंग्रेसचे अरविंद शिंदे ,शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांनी स्थायी अध्यक्ष हेमंत रासने यांना भेटून लेखी निवेदन देवून हि मागणी नोंदविली .महापालिकेने १९८७ च्या तसेच २०१२ च्या विकास आराखड्यातील रस्त्यांचे अद्याप रुंदीकरण केलेले नाही . महापालिकेने कोणते ३२३ रस्ते निवडलेत ? तेवढेच का निवडलेत ? करायचे तर सर्व रस्ते ९ मीटर रुंद करा असे आक्षेप विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घेतले आहेत .२०१५ पूर्वी 6 मीटरच्या रस्त्यांवर टीडीआर दिला जात होता त्यानंतर तो बंद का केला गेला ? असाही प्रश्न या निमिताने उपस्थित केला जातोय . दरम्यान जिथे जिथे रस्ता रुंदीकरण होईल तिथे तिथे ज्याना त्याची झाल पोहोचेल त्यांना कशा पद्धतीने सामावून घेतले जाणार आहे ? कोणाचा कसा फायदा होणार आहे ? आणि कोण अडचणीत येवू शकते अशा सर्व बाबींवर सविस्तर माहिती मिळाल्यानंतर हा हा प्रस्ताव मंजूर करावा अशी भूमिका महापालिकेतील विरोधी पक्षांनी घेतली आहे .
राज्यात कोरोनाच्या ३७ हजार ५३४ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि.१: राज्यात आज ७७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३० हजार १०८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २३६१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३७ हजार ५३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ७१ हजार ५७३ नमुन्यांपैकी ७० हजार ०१३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६७ हजार ५५२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ७०४ खाटा उपलब्ध असून सध्या ३६ हजार १८९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात ७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ७० (मुंबई ५२, ठाणे ५, नवी मुंबई ९, कल्याण डोंबिवली ४), नाशिक- ६ (मालेगाव ६), पुणे- ११ (पुणे ९, सोलापूर २), लातूर-१ (उस्मानाबाद १), अकोला-१(यवतमाळ १).
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४५ पुरुष तर ३१ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ७६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३७ रुग्ण आहेत तर ३६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ७६ रुग्णांपैकी ५१ जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २३६२ झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५४ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १४ मे ते २८ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील २२ मृत्यूंपैकी मुंबई ९, नवी मुंबई -५, औरंगाबाद -३, रायगड – २, बीड -१, मीरा भाईंदर -१ आणि ठाणे १ असे आहेत.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (४१,०९९), बरे झालेले रुग्ण- (१६,९८५), मृत्यू- (१३१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२,७८९)
ठाणे: बाधित रुग्ण- (९९४१), बरे झालेले रुग्ण- (३६३७), मृत्यू- (२१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०८९)
पालघर: बाधित रुग्ण- (१०७१), बरे झालेले रुग्ण- (३९१), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४७)
रायगड: बाधित रुग्ण- (११४८), बरे झालेले रुग्ण- (५९८), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०७)
नाशिक: बाधित रुग्ण- (११८२), बरे झालेले रुग्ण- (८९३), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२२)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (१२०), बरे झालेले रुग्ण- (५७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७)
धुळे: बाधित रुग्ण- (१४५), बरे झालेले रुग्ण- (८८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१)
जळगाव: बाधित रुग्ण- (६९६), बरे झालेले रुग्ण- (२९८), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२६)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (३५), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५)
पुणे: बाधित रुग्ण- (८०४५), बरे झालेले रुग्ण- (३७९३), मृत्यू- (३३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९१४)
सोलापूर: बाधित रुग्ण- (९३३), बरे झालेले रुग्ण- (४२३), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४०)
सातारा: बाधित रुग्ण- (५२७), बरे झालेले रुग्ण- (१७७), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३४)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (५०९), बरे झालेले रुग्ण- (१५०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५५)
सांगली: बाधित रुग्ण- (११२), बरे झालेले रुग्ण- (६२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३३), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२६४), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६०)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१५४३), बरे झालेले रुग्ण- (१०१२), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६३)
जालना: बाधित रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (५७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१)
हिंगोली: बाधित रुग्ण- (१९०), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८४)
परभणी: बाधित रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९)
लातूर: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (७६), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)
बीड: बाधित रुग्ण- (४७), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२०)
नांदेड: बाधित रुग्ण- (१२३), बरे झालेले रुग्ण- (९१), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६)
अकोला: बाधित रुग्ण- (६०३), बरे झालेले रुग्ण- (३२६), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४८)
अमरावती: बाधित रुग्ण- (२३२), बरे झालेले रुग्ण- (१२४), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९२)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (१३०), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (३३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७)
वाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)
नागपूर: बाधित रुग्ण- (५९२), बरे झालेले रुग्ण- (३७८), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०३)
वर्धा: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७)
भंडारा: बाधित रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)
गोंदिया: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (३८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (१७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (३६), बरे झालेले रुग्ण- (१०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५)
एकूण: बाधित रुग्ण-(७०,०१३), बरे झालेले रुग्ण- (३०,१०८), मृत्यू- (२३६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टीव्ह रुग्ण-(३७,५३४)
(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या ३३३ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३२९४ झोन क्रियाशील असून आज एकूण १८ हजार ६७४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ७०.६९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 लागू-जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : पुणे ग्रामीण जिल्हयाचे ग्रामीण कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रियासंहिता 1973 कलम 144 (1 (3) प्रमाणे शासनाकडील 31 मे 2020 चे अधिसूचने नुसार अत्यावश्यक कारणा शिवाय वैयक्तीकरित्या नागरिकांना संचारास मनाई करन्याकामी दिनांक 1जून 2020 ते 30 जून 2020 पर्यंत दररोज रात्री 9 पासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू केलेबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आदेश.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचेअध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापनकायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कोव्हीड -19 साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी शासनाने संपुर्ण महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा केलेली असून त्यास वाचा क्र. 7 अन्वये 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ आणि टप्पेनिहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्यासाठी “मिशन बिगीन अगेन” बाबत अधिसूचना जाहीर केलेली आहे.
भारत सरकार व महाराष्ट्र सरकार आरोग्य मंत्रालय यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात लोकांनी येऊ नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येणे थांबणे, चर्चाकरणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्व सामान्य जनतेस व त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. त्या करीता तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 हे महसूल व वनविभाग,आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन यांचेकडील अधिसूचना क्र. डिएमयू/2020, सीआर.92/डिआयएसएम-04,दि. 31 मे 2020 रोजीच्या अधिसूचनेमधील निर्देशाप्रमाणे दि. 1 जून2020 ते 30 जून 2020 पर्यंत संपुर्ण देशात संचारबंदी लागू केलेली आहे. तसेच पुणे फौजदारी दंड प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये कोणत्याही व्यक्तीला पुणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना कोणत्याही रस्त्यावर सार्वजनिक वाहतुकीने रस्त्यावर, गल्लोगल्ली इ. ठिकाणी संचार वाहतूक,फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्य मनाई करणारा आदेश 30 जून 2020 पर्यंत दररोज रात्री 9 ते सकाळी 5वा. दरम्यान लागू करण्यात आला आहे. पूणे जिल्हयाचे ग्रामीण कार्यक्षेत्रात ग्रामपंचायत,नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद हद्दीत संचारबंदी कालावधी वगळता इतर वेळी मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचेकडील अधिसूचनेत परवानगी देण्यात आलेल्या सर्व उपक्रम व कृतींना अधिसूचनेतील अटी व शर्तींच्या अधिन राहून परवानगी राहील.
पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकांनी संचारबंदी कालावधीत पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात विनाकारण अनावश्यक वावरणा-या व्यक्तींवर योग्य तो पोलिस बंदोबस्त नेमणूक करुन नियंत्रण ठेवावे. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 भारतील साथ रोग नियंत्रणअधिनियम 1897 व भारतीय दंड विधान 1860 कायद्याचे कलम 188 प्रमाणे सर्व संबंधित दंडनीय कारवाईस पात्र राहतील, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेशीत केलेआहे.
खाजगी रुग्णालयांनी कोविड -१९ रुग्णांकडून शासन नियमानुसार दर आकारणी करावी -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे,-कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना खाजगी रुग्णालयांनी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार दर आकारणी करावी, अशा सूचना करुन खाजगी रुग्णालय व्यवस्थापनाने प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुशंगाने विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज कॉन्सिल हॉल मध्ये पुणे व पिंपरी चिंचवड मधील खाजगी रुग्णालय प्रमुख व वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. बैठकीला आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, भारती हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. अस्मिता जगताप यांच्यासह पुणे व पिंपरी चिंचवड मधील खाजगी रुग्णालय प्रमुख, वैद्यकीय अधिकारी, व डॉक्टर उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, राज्य शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मेस्मा, आपत्कालिन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खाजगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. खासगी रुग्णालयांनी शासनाच्या आदेशात निश्चित करून दिल्यानुसार दर आकारणी करावी. खाजगी रुग्णालयांनी रुग्ण सेवा चोखपणे बजवावी, तसेच कोरोना प्रतिबंधाबाबत समाजमाध्यमांमध्ये जनजागृती करावी, असे सांगून रुग्णालयांच्या अडचणी निश्चितच दूर केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
पुणे, पिंपरी चिंचवड शहरात व जिल्ह्यात वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी सर्वांनी योग्य नियोजन करावे, असे डॉ. म्हैसेकर म्हणाले, रुग्णालयाने शासनाकडे अद्ययावत व वस्तूस्थितीदर्शक माहिती सादर करावी, जेणेकरून व्यवस्थापन करणे सुलभ होईल. प्रत्येक रुग्णाला उपचार मिळणे आवश्यक असून ती आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे, आपण सर्व मिळून ही जबाबदारी निश्चितपणे पार पाडू, असा विश्वासही डॉ. म्हैसेकर यांनी व्यक्त केला.
कोरोना उपचार करणा-या हॉस्पिटलचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व अन्य वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन व इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी तयार केलेल्या कोविड केयर सॉप्टवेअरबाबत डॉ. म्हैसेकर यांनी माहिती दिली.
बैठकीत पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण, उपचार करण्यात आलेले रुग्ण, हॉस्पिटलमधील सोयी-सुविधा, रुग्णवाहिका व्यवस्था, अधिक रुग्ण असलेली क्षेत्रे, रुग्णांचे समुपदेशन, मृत्यू दर कमी करण्यासाठी उपाययोजना, डॉक्टरांना आवश्यक सोयी-सुविधा, पीपीई किट, सॅनिटायझर आदी वैद्यकीय साधनसामग्रीची उपलब्धता, उपलब्ध आणि आवश्यक डॉक्टर व परीचारकांची संख्या अशा विविध बाबींचा डॉ. म्हैसेकर व श्री. राम यांनी आढावा घेतला.
मृत्युदर कमी करण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावेत
जिल्हाधिकारी नवल किशोर राम
कोविड-१९ विरुद्ध च्या युद्धात डॉक्टर, परीचारिकांची भूमिका महत्वपूर्ण असून मृत्यूदर कमी करण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
खाजगी रुग्णालयांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून एकत्रित काम करावे व पुणे जिल्हा कोरोनामुक्त करुया, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी सरकारी आणि खाजगी रुग्णालये मिळून काम करणे आवश्यक आहे, असे सांगून ते म्हणाले, डॉक्टरांनी कोरोना रुग्णांवर उपचार करताना काही बदल करणे आवश्यक असल्याचे कळविल्यास प्रशासन निश्चितच सकारात्मक असेल.
रुग्णालयांनी बेड व्यवस्थापन व्यवस्थित हाताळावे, जेणेकरून अडचण निर्माण न होता प्रत्येक गरजू रुग्णाला तातडीने उपचार देणे सुलभ होईल, असेही जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले.
यावेळी पुण्यातील खाजगी रुग्णालय व्यवस्थापनाचे प्रमुख, डॉक्टर तसेच कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत खाजगी रुग्णालय प्रमुख व वैद्यकीय अधिकारी यांनी सूचना केल्या व रुग्णालयातील सेवा-सुविधा व साधनसामग्रीची माहिती दिली.
