Home Blog Page 2549

जनता वसाहतीच्या प्रश्नासाठी पालिकेसमोर उपोषणाचा इशारा (व्हिडीओ)

0

पुणे- जनता वसाहती च्या नागरिकांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होते आहे . हाताला काम नाही ,पोटाला घास नाही अशा अवस्थेत भयाचे जिणे नशिबी आल्याने आणि पालिकेच्या प्रशासनासह सर्वांनींच पाठ फिरविल्याने हताश आणि असहाय बनलेल्या जनता वसाहतीच्या नागरिकांना घेऊन आपण महापालिकेच्या दारात आमरण उपोषणाला बसणार आहोत असा इशारा पर्वती मतदार संघाचे शिवसेना विभागप्रमुख सुरज लोखंडे यांनी दिला आहे .

लॉकडाऊननंतर तब्बल ६०दिवस कोरोनाला दूर ठेवणाऱ्या जनता वसाहतीमध्ये रुग्ण आढळून आल्यानंतर वस्तीमध्ये कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना कामासाठी बाहेर पडता येत नाहीये. हातावरील पोट असलेले नागरिक त्यामुळे हवालदिल झाले असून रेशन कीट द्या अन्यथा कामावर जाऊ द्या अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.लॉकडाऊन लागू झाल्यापासून अनेकांचे रोजगार बंद आहेत. अनेकांना पगार मिळालेले नाहीत. मोलमजुरी करणाऱ्यांच्या जगण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मागील तीन महिन्यांपासून घरी बसून असलेल्या असंघटित कामगारांना आता रोजगाराचे वेध लागले आहेत.
एकीकडे लॉकडाऊन शिथील होत असताना झोपडपट्ट्यांमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे या वस्त्या कंटेन्मेंट झोनमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
वसाहतीमधील सर्व किराणामालाची दुकाने, दुध, भाजीपाला बंद आहे. त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर करावी, पाच तास जीवनाश्यक वस्तू, दुध, भाजीपाला व धान्याची दूकाने उघडण्यास परवानगी द्यावी अन्यथा कामगारांना कामावर जाण्याची परवानगी द्यावी. जनता वसाहत मधील 14 हजार कुटुंबास अन्नधान्याचे किट घरपोच देण्यात यावे अशी मागणी जनता वसाहत कृती समिती आणि शिवसेनेच्यावतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, विशाल धनवडे आणि विभाग प्रमुख सुरज लोखंडे उपस्थित होते.

मुंबई पोलीस आता अधिक गतिमान; गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते पोलिसांसाठीच्या सेगवे चे उद्घाटन

0

मुंबई – पोलीस विभागासाठी उपयुक्त अशा  सेगवे चे( सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर ) उद्घाटन आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते मरिन ड्राईव्ह येथे संपन्न झाले.     

यावेळी आ. रोहित पवार मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त दक्षिण विभाग निशिथ मिश्रा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे पोलीस दल हे जागतिक पोलिसिंग स्टॅंडर्ड नुसार अत्याधुनिक सुसज्ज अशा साधन सामग्रीने भक्कम करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे. त्यानुसार या सेग वे चे उद्घाटन करण्यात आले असल्याची माहिती श्री. देशमुख यांनी यावेळी दिली.

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अशा प्रकारची यंत्रणा पोलिसांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पोलिसाच्या मास्कला माईक लावण्यात येणार असून ते त्याद्वारे लोकांना गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितते संदर्भात सूचना देऊ शकतील, तसेच त्यांच्या मदतीला पब्लिक अड्रेस सिस्टीम असलेले अत्याधुनिक ड्रोन देखील आहेत. त्याचाही उपयोग होऊ शकेल, असे श्री. देशमुख म्हणाले.

मरिन ड्राईव्ह येथे पन्नास सेगवेचे उद्घाटन करण्यात आले. यातील दहा  सेग वे हे वरळी साठी तर पाच नरिमन पॉइंट साठी आहेत. त्याचप्रमाणे बांद्रा, जुहू, वर्सोवा या ठिकाणी देखील हे सेग वे देण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

१९५६ पासून विधानपरिषदेत मातंग समाजाला प्रतिनिधित्व नाही -हा अन्यायच .मातंग नेते एकवटले (व्हिडीओ)  

0

भाजपसह महाविकास आघाडीला केला सवाल …?

पुणे-महाराष्ट्रात विधानपरिषद अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत मातंग समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. मातंग समाजावर झालेला हा अन्याय दूर करण्यासाठी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यत्वासाठी यंदा मातंग समाजाला प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणी मातंग समाजातील सर्व प्रमुख राजकीय पक्षाच्या नेतेमंडळीतर्फे गुरुवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.यावेळी काँग्रेसचे शहाराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप, आरपीआय मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे, शिवसेनेचे नेते बाळासाहेब भांडे, भाजपाचे बापूसाहेब कांबळे, लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हातागळे, नगरसेवक अविनाश बागवे आदी उपस्थित होते.रमेश बागवे म्हणाले, सर्व राजकीय पक्ष मातंग समाजाला गृहीत धरतात. आमचा समाज हा विकासापासून वंचित आहे. या समाजाला प्रतिनिधित्व देताना दुर्लक्षित करू नका. तुम्हाला जो योग्य वाटेल त्याला संधी द्या. तो कोणत्याही पक्षाचा असू द्या. तिन्ही पक्षांच्या लोकांना भेटून आमच्या समाजाचा प्रतिनिधी 70 वर्षांत विधानपरिषदेवर गेला नाही हे सांगणार आहे.महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्याकडेही याबाबत मागणी करणार आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षात जर समाजाला विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळाल्यास समाजात आनंदाचे वातावरण निर्माण होणार असल्याचे बागवे यांनी सांगितले.सुभाष जगताप म्हणाले, आमचा समाज कष्टाळू आहे. आजपर्यंत संधी न देणे हा अन्याय आहे. शिक्षणापासून वंचित असलेला हा समाज आता एकजूट व्ह्यायला सुरुवात झाली आहे.आतापर्यंत आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाने विधानपरिषदेवर संधी दिली नाही, मात्र महाविकास आघाडीने संधी दिली, हा संदेश जाणार आहे.हनुमंत साठे म्हणाले, मातंग समाजाला संधी देण्याची गरज आहे. शासनाने आमच्या समाजाचा विचार करावा.बाळासाहेब भांडे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांना मानणारे हे सरकार आहे.मातंग समाजातील साहित्यिक, कलावंत, खेळाडू, राजकीय प्रतिनिधी कोणालाही विधान परिषदेवर घेण्यात यावे, अशी मागणी अविनाश बागवे यांनी केली आहे.

‘कोविड-१९’शी सामना करायचाय? आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार करू शकता

0

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना

मुंबई :- कोरोना विषाणूच्या (कोविड -१९ ) प्रादुर्भावाचा सामना करता यावा यासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी औषधांसंदर्भात मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने जारी केल्या आहेत.  शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने यासंदर्भात नेमलेल्या टास्क फोर्स  संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर, गठित करण्यात आलेल्या टास्क फोर्स ऑन आयुष फॉर कोविड-१९ ने सुचवलेल्या मार्गदर्शक सूचनांचा यासाठी आधार घेण्यात आला आहे.

रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपचार

आयुर्वेदिक औषधी – संशमनी वटी १ गोळी दिवसातून दोनदा असे १५ दिवस. तुळस चार भाग, सुंठ दोन भाग, दालचिनी दोन भाग व काळी मिरी एक भाग या द्रव्याच्या भरड चूर्ण तयार करा. वरील औषधीचे तीन ग्रॅम भरड चूर्ण १०० मिलीलिटर उकळलेल्या पाण्यात मिसळून ५-७ मिनिटे ठेवा व नंतर हे पाणी प्या. च्यवनप्राश १० ग्रॅम सकाळी सेवन करा (मधुमेही रुग्णांनी साखरविरहित च्यवनप्राश सेवन करा).  सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल / खोबरेल तेल किंवा हे बोटाने लावा. तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळ तेल/ खोबरेल तेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या करा व नंतर हे तेल थुंका व गरम पाण्याने चूळ भरा असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करा.

युनानी औषधी

काढा (जोशंदा)-घटक द्रव्ये- बिहिदाना ५ ग्रॅम, बर्गे गावजबान ७ ग्रॅम, उन्नाब ७ दाने, सपिस्तान ७ दाने, दालचिनी ३ ग्रॅम, बनपाशा ५ ग्रॅम यांचा काढा करून २५० मिलिलिटर पाण्यामध्ये १५ मिनिटे उकळा व गरम असताना चहाप्रमाणे दिवसातून १ किंवा २ वेळा १५ दिवसांकरिता घ्या. २. खमीरा मरवारीद दुधासोबत ५ ग्रॅम दिवसातून दोनदा घ्या. मधुमेही रुग्णांनी घेऊ नये.

होमिओपॅथी औषधी

१. आर्सेनिकम अल्बम ३० – ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्या. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करा.

कोविड-१९ सारखी लक्षणे असणाऱ्या इतर आजारासाठी आयुर्वेदयुनानी आणि होमिओपॅथी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावयाची औषधे.

आयुर्वेदिक औषधी

१. टॅबलेट आयुष ६४ – (५०० मिलिग्रॅम)  दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्या.      

२. अगस्त्य हरितकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्या.

३. अणुतेल – तीळतेल – दोन थेंब प्रतिदिन सकाळी नाकपुडीत टाका.

४. ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा पाण्यात उकळून त्याची वाफ दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्या.

५. खोकला व घास खवखवत असल्यास साखर अथवा मध यामध्ये लवंग चूर्ण मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्या.

युनानी औषधी

१. अर्धा ग्लास पाण्यामध्ये आरके अजिब ५ थेंब मिसळून गुळण्या करा, असे १५ दिवस करा.

२. तिर्यक अर्बा – हब्बूल घर, ज्यूतिआना, मूर झरवंद तविल या सर्व घटकांचे चूर्ण तयार करून तुपामध्ये परता व मध गरम करून त्यामध्ये ही औषधे मिसळा. याचा वापर चूर्ण स्वरूपातही करता येतो, हे औषध १५ दिवस घ्या.

ही औषधे व उपचार हे आजाराला प्रतिबंध व्हावा तसेच अशा अनेक रूग्णांवरील पूरक उपचारास फायदेशीर ठरू शकतात म्हणून सुचविण्यात आले आहेत. तथापि केाविड १९ ची लक्षणे जाणवल्यास शासनाच्या आरोग्य यंत्रणेकडून तात्काळ चाचणी करून घेण्याचे आवाहन शासनाने केले आहे.

सामान्य प्रतिबंधात्मक उपाय:

१. वैयत्तिक स्वच्छतेचे पालन करा,

२. वारंवार साबणाने हात २० सेकंदापर्यंत धुवा.

३. खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल ठेवा.

४. ज्या व्यक्ती आजारी आहेत किंवा ज्यांना सर्दी खोकला इत्यादी आजाराची लक्षणे आहेत, अशा व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळा.

५. जिवंत प्राण्यांशी संपर्क टाळा. कच्चे न शिजवलेले मांस खाणे टाळा.

६. पशुपालन गृह तसेच जिवंत पशु विक्री केंद्र किंवा कत्तलखाने या ठिकाणी प्रवास टाळा.

आयुष उपाययोजना पुढीलप्रमाणे

१. ताजे, उष्ण व पचायला हलके भोजन घ्या. ऋतूनुसार भाज्यांचा समावेश करा.

२. तुळशीची पाने, ठेचलेले आले व हळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे.

३. सर्दी व खोकल्यासाठी चिमूटभर काळी मिरी, चूर्ण मधातून सेवन करणे फायदेशीर आहे.

४. कोविड-१९ लक्षणांमध्ये तुळस, गुळवेल, आले आणि हळद या सामान्य औषधी वनस्पती उपयुक्त आहेत.

५. थंड, फ्रिज मध्ये ठेवलेले व पचायला जड असलेले पदार्थ टाळा.

६. थंड वाऱ्याचा थेट संपर्क टाळा.

७. विश्रांती व वेळेत झोप हितकारक आहे.

८. प्रशिक्षित योग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायाम करा.

९.  सूप / पाणी – मुगडाळ पाण्यात उकळून तयार केलेले मुगाचे गरम कढण / सूप / पाणी प्या, ते पोषक आहे.

१०. सुवर्ण दुग्ध / दुग्ध – १५० मिलीमीटर गरम दुधात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण मिसळून हे दूध दिवसातून एकदा किंवा दोनदा प्या.

मुंबईमध्ये आठवडाभरात ५०० आयसीयू बेड्स नव्याने उपलब्ध होणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई,: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. जळगाव येथील बाधित वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, प्राध्यापक, नर्स आणि सुरक्षारक्षक यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

दरम्यान, आज राज्यामध्ये कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल तसेच काही जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी संवाद साधला.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५० टक्के असून मुंबईतील धारावी बागातून गेल्या काही दिवसांपासून रुग्ण येण्याची संख्या मदावली आहे, असे श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले. अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना सेव्हन हिल, सेंट जॉर्ज येथे आठवडभरात सुमारे ५०० आयसीयू बेड उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले

केंद्र शासनाने कंटेनमेंट झोनसाठीचे निकष बदलावे

केंद्र शासनाने कंटेनमेंट झोनसाठी जे निकष केले आहेत त्यात बदल करण्याबाबतची मागणी आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली. कंटेनमेंट झोनमध्ये शेवटचा रुग्ण आढळल्यानंतर २८ दिवस त्या भागातील व्यवहार बंद ठेवले जातात. हा बंद काटेकोरपणे पाळला जावा यासाठी पोलिस तैनात केले जातात. त्यामुळे राज्यातील पोलिस मोठ्या संख्येने अशा कंटेनमेंट झोनच्या ड्युटीवर आहेत. त्यांना आराम मिळावा हा पोलिस फोर्स अन्यत्र वापरता यावा यासाठी २८ दिवसांच्या निकषाऐवजी १४ दिवस कंटेनमेंट झोनमध्ये व्यवहार बंद ठेवण्याबाबत विचार व्हावा व त्यावर केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना पाठविण्यात याव्या, अशी मागणी श्री. टोपे यांनी केली.

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करावी

मुंबईमध्ये आरोग्य कर्मचारी, पोलिस, महापालिका कर्मचारी, खासगी रुग्णालयातील कर्मचारी तसेच शासकीय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी  उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी केली. कोरोना व्यतिरिक्त अन्य जे आजार आहेत क्षयरोग, पावसाळ्यात होणारे आजार, मलेरिया, डेंग्यू याच्या नियंत्रणासाठी राज्य शासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी लोकांनी स्वयंशिस्त पाळावी. मास्क वापरावे, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, हात स्वच्छ धुवावेत आदी बाबी कटाक्षाने पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

दर्जेदार शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित शिक्षण महत्त्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

एचएसएनसी समूह विद्यापीठाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

 मुंबई, :  विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कौशल्याधारित शिक्षण आणि प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यापूर्वी संशोधनाकडे विद्यार्थ्यांचे अधिक लक्ष होते. जागतिकीकरणामुळे संशोधनाबरोबरच कौशल्याधारित शिक्षणाची गरज आहे. राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाच्या (रुसा) माध्यमातून विविध महाविद्यालयांनी एकत्र येऊन समूह विद्यापीठ स्थापन करावे. त्यामुळे नवनवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकता येतील. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन एक मिशन म्हणून पुढाकार घेण्याचे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या उद्‌घाटनप्रसंगी केले.

विद्यार्थ्यांचे आनंदाने शिक्षण व्हावेआपत्कालीन परिस्थितीत परीक्षेपेक्षा शिक्षण सुरु राहिले पाहिजे – मुख्यमंत्री

शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच तंत्रज्ञानाच्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये शिक्षण कसे सुरु राहील यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करुन परीक्षा कधी सुरु होणार यापेक्षा शिक्षण कसे सुरु राहील याकडे सर्वानी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर आनंद मिळतोच पण ते शिक्षण घेताना अधिक आनंदी राहून ते कसे यशस्वी होतील याकडे महाविद्यालयांनी लक्ष द्यावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या उद्‌घाटन प्रसंगी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षण हे जीवनावश्यक असल्याने चौकटबद्ध शिक्षणापेक्षा आनंदाने जगण्याची कला शिकविणारे शिक्षण असले पाहिजे. या समूह विद्यापीठामुळे शैक्षणिक दर्जा उंचावण्याबरोबरच नवनवीन अभ्यासक्रमाचे स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनासुद्धा कला, संगीत, आरोग्य, कृषी, क्रीडा आशा विविघ विषयात कोणत्याही वयात शिक्षण घेता येईल आणि विद्यार्थी आपली कला जोपासतील. मीसुद्धा कला शाखेचा विद्यार्थी आहे. मी मुख्यमंत्री झालो नसतो तर चांगला कलाकार झालो असतो. असे सांगून मला अजूनही शिक्षण घेण्यास आवडेल, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

शि‍क्षित, सुशिक्षित आणि सुसंस्कृत असे देशाचे भवितव्य घडविणारे शिल्पकार आपण तयार करत आहात. जागतिकीकरणामध्ये शिक्षण क्षेत्रात बदल होत आहेत. मात्र शिक्षणाची भूक मात्र तीच कायम आहे. त्यासाठी दर्जेदार गुणवत्तापूर्ण सहज सोपे विद्यार्थ्यांना आनंद देणारे शिक्षण दिले पाहिजे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. याचा फायदा आपत्कालीन परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना होत आहे. या विद्यापीठामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही वयात शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येतील.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या वेबसाईटचे ऑनलाईन उद्‌घाटन करण्यात आले.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, महानगराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी समूह विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा कौशल्यावर आधारित शिक्षण घेता येईल. शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेबरोबरच दर्जेदार शिक्षणासाठी शासन प्रयत्न करत आहेत. व्हर्टिकल युनिव्हर्सिटीसाठीसुद्धा शासनाने समिती गठित केली आहे.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, एचएसएनसी समूह विद्यापीठाचे प्रमुख निरंजन हिरानंदनी, महाविद्यालयांचे प्राध्यापक सहभागी होते.

अनुसूचित जमातीतील कुटुंबांना शिधापत्रिका काढण्यासाठी येणारा खर्च न्यूक्लिअस बजेट योजनेतून-आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी

0

मुंबई, – शिधापत्रिका (रेशनकार्ड) नसलेल्या अनुसूचित जमातीमधील आदिवासी, पारधी समाजातील कुटुंबांना शिधापत्रिका काढण्यासाठी येणारे शुल्क आता आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लिअस बजेट योजनेतून करण्यात येणार आहे. तसेच शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांच्या याद्या तयार करणे, कागदपत्रे तयार करणे आदी खर्चही यातून होणार असल्यामुळे शिधापत्रिका नसलेल्या अनुसूचित जमातीतील कुटुंबांना शिधापत्रिका मिळणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांनी दिली.

रेशनकार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अथवा आर्थिक कारणांमुळे अनुसूचित जमाती व पारधी समाजातील कुटुंबांना अडचणी येत होत्या. सध्याच्या कोविडमुळे निर्माण झालेल्या काळात शिधापत्रिका नसल्यामुळे अशा कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे अनुसूचित जमाती व पारधी समाजातील कुटुंबांना शिधापत्रिका काढण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत मदत करण्यात येत आहे. तसेच ही शिधापत्रिका काढण्यासाठी येणारा खर्च आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लिअस बजेट योजनेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांच्या याद्या तयार करणे, त्या कुटुंबांचे आवश्यक कागपदत्रे तयार करणे, शिधापत्रिकासाठी आवश्यक शुल्क आदीचा खर्चही प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत या योजनेतून करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे अनुसूचित जमाती, पारधी समाजातील कुटुंबांना शिधापत्रिका मिळणार आहेत. शिधापत्रिका मिळाल्यामुळे या कुटुंबांना विविध योजनेतून अन्नधान्य पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असून लॉकडाऊन काळात कोणतेही कुटुंब अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री अॅड. पाडवी यांनी व्यक्त केला.

पोलिसांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कर्तव्य बजावावे-गृहमंत्री अनिल देशमुख

0

नवी मुंबई दौऱ्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन

नवी मुंबई :- सध्याच्या लॉकडाऊन काळात नवी मुंबईतील पोलीस बांधव अत्यंत मेहनतीने आपले कर्तव्य बजावत आहेत, याचा मला अभिमान आहे. कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी त्यांनी आरोग्याची काळजी घेत कर्तव्य बजावावे असे भावनिक आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  काल नवी मुंबई येथे केले नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजीव कुमार, सह पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, उपायुक्त सर्वश्री सुरेश मेंगडे शिवराज पाटील, अशोक दुधे, प्रवीण पाटील,पंकज डहाणे आदी अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या  कोविड संदर्भातील होत असलेल्या कामाबद्दल  त्यांनी समाधान व्यक्त केले. पोलिस व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याबाबत आयुक्तांना सूचना केली. तसेच पोलीस आयुक्तालयासाठी आधुनिक ड्रोन सुविधा आवश्यक सामग्री  घ्यावी अशाही सूचना मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी केल्या.

बैठकीच्या  सुरुवातीला नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने  लॉकडाऊन  काळात केलेल्या कामाबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे श्री. संजीव कुमार यांनी सविस्तर माहिती दिली. यात प्रामुख्याने पोलिस व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य संदर्भातील घेतलेली काळजी तसेच त्यांना पुरविण्यात आलेल्या सुविधा, परप्रांतीय कामगारांना केलेली मदत त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्याबाबत केलेली कार्यवाही आदींची माहिती देण्यात आली.तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे बांधकाम,पोलीस स्टेशन बांधकाम संदर्भातील अडीअडचणींबाबत चर्चा केली.

यानंतर गृहमंत्री श्री. देशमुख यांनी नेरूळ येथील पोलिसांसाठी उभारलेल्या सावली कोविड विलगीकरण कक्षाची पाहणी करून उपयुक्त सूचना दिल्या.

पोलिसांसाठी 50 खाटांचे विशेष कोविड केअर सेंटर

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या वतीने पोलिसांसाठी ५० खाटांचे विशेष कोविड केअर सेंटर कळंबोली येथे उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन गृहमंत्र्यांच्या हस्ते बैठकीपूर्वी करण्यात आले. अशा प्रकारचे विशेष सुविधा सेंटर सर्व ठिकाणी उभारण्याबाबतच्या सूचना पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिल्या असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार यांनी हे सेंटर सुरू केल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन गृहमंत्र्यांनी केले. कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलीस बांधवांबद्दल तीव्र दुःख असल्याचे गृहमंत्री म्हणाले, पोलिसांसाठी, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे याकरिता आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

रायगड, रत्नागिरीतील निसर्ग चक्रीवादळ बाधितांना प्रतिकुटुंब दहा किलो गहू व तांदळाचे मोफत वाटप-छगन भुजबळ

0

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई,-निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड,रत्नागिरी जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील बाधित नागरिकांसाठी शासनाकडून विविध स्तरावर मदत करण्यात येत असून राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने प्रतिकुटुंब दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना धान्य प्राप्त झाले असून त्याचे वाटप सुरु करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

खासदार शरद पवार यांनी नुकतीच निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी आपद्ग्रस्त भागातून पवार साहेब यांनी दूरध्वनीद्वारे छगन भुजबळ यांच्याशी याबाबत संपर्क साधला होता. त्यानंतर छगन भुजबळ यांनी या भागात तातडीने अन्नधान्याचे वाटप करण्याचे आदेश दिले असून या भागातील नुकसानग्रस्त नागरिकांना अन्नधान्य वाटप सुरु करण्यात आले आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असून येथील नागरिकांना दिवा लावण्यासाठी देखील केरोसीन उपलब्ध नसल्याने याआधीच राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्यावतीने ५ लिटर मोफत केरोसिनचे वाटप यापूर्वीच सुरु केले आहे. त्याचसोबतच आता रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील बाधित नागरिकांसाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्यावतीने प्रतिकुटुंब दहा किलो गहू व दहा किलो तांदळाचे मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना धान्य प्राप्त झाले असून त्याचे वाटप सुरु करण्यात आले आहे. त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील जिल्ह्यातील ७ लाख ६९ हजार ३३५ इतक्या शिधापत्रिकाधारकांना तर रत्नागिरी जिल्ह्यातील ९४ हजार ५२६ इतक्या शिधापत्रिकाधारकांना या मोफत धान्याचा लाभ देण्यात येत असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

लॉकडाऊनच्या काळात ४७० सायबर गुन्हे दाखल; २५५ जणांना अटक

0

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पावले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४७०  गुन्हे दाखल झाले असून २५५ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’चे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.

राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४७० गुन्ह्यांची (ज्यापैकी ३१ N.C आहेत) नोंद १० जून २०२० पर्यंत झाली आहे. त्याची प्रामुख्याने जिल्ह्यानुसार आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९४ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी  १९१  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इन्स्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब) गैरवापर केल्या प्रकरणी ५० गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २५५ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन (takedown) करण्यात यश आले आहे .

पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील मंचर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे या पोलीस विभागात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४० वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने परिसरातील एका डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला आहे अशा आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या व्हाट्सअपद्वारे विविध व्हाट्सअप ग्रुपवर शेअर केली होती . त्यामुळे परिसरात अफवा पसरून काही काळ संभ्रम निर्माण झाला होता व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

वेबसाईट सुरक्षिततेची खात्री करा

सध्याच्या काळात, सरकारने ऑनलाईन मद्य खरेदीला व डिलिव्हरीला सशर्त परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, जर तुम्हाला मद्य खरेदी करायचे असल्यास सदर ॲप किंवा वेबसाईट  वापरण्यासाठी सुरक्षित आहे याची  खात्री करा व मगच  वापरा ,तसेच कुठल्याही अॅपवर शक्यतो आपला बँक खात्याचा नंबर ,डेबिट /क्रेडिट कार्ड नंबर व त्यांचे पिन नंबर सेव करू नका. शक्यतो cash on delivery चा पर्याय ऑर्डर बुक करताना निवडा. जर अशा वेबसाईट किंवा अॅपवर तुम्ही फसविले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करा व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण  नोंदवा. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

पालखी प्रस्थान सोहळ्यास 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी -जिल्हाधिकारी राम

0

पुणे,- : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळयास श्री क्षेत्र देहु येथुन 12 जून 2020 व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयास श्री क्षेत्र आळंदी येथुन 13 जून 2020 रोजी पालखी प्रस्थान सोहळयास मंदीर परिसराच्या आतमध्ये जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत उपरोक्त निर्देशांचे पालन करुन परवानगी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीच्या अनुषंगाने श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र देहु, ता. हवेली, जि. पुणे व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी,ता.खेड जि.पुणे येथुन पंढरपुरला जाण्यासाठी प्रस्थान करीत असतात. तरी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र देहु येथुन 12 जून २०२० व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी येथुन 13 जून 2020 रोजीच्या प्रस्थान सोहळयास या दोन दिवसांसाठी परवानगी देण्यात आलेली आहे.
पुणे जिल्हयातील श्री क्षेत्र देहु व आळंदी यांचा प्रतिबंधित क्षेत्रात समावेश नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचना व निर्देशाप्रमाणे नियमावलीचे पालन करुन राखून तसेच पालखी सोहळा प्रस्थानावेळी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आलेल्या सर्व नागरिकांनी मास्क वापरणे, स्वच्छता व निर्जंतुकीकरण इत्यादी नियमांचे पालन करुन दोन्ही पालखी सोहळ्याच्या प्रस्थान मंदीर परिसराच्या आतमध्ये परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी आदेशान्वये कळविले आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या झाली 03 हजार 509- डॉ म्हैसेकर

0

पुणे विभागातील 08 हजार 571 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 13 हजार 625रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे:-पुणे विभागातील 08 हजार 571 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 13 हजार 625 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 04 हजार 431 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 623 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 271 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.91 टक्के आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
 यापैकी पुणे जिल्हयातील 10 हजार 643 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 06 हजार 682 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 03 हजार 509 आहे. कोरोनाबाधित एकूण 452 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 244 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.78 टक्के आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत  पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 597  ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 562, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 02, सांगली जिल्ह्यात 10 तर कोल्हापूर  जिल्ह्यात 03 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
 सातारा जिल्हयातील 689 कोरोना बाधीत रुग्ण असून 419 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.        ॲक्टीव रुग्ण संख्या 241 आहे. कोरोनाबाधित एकूण 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 सोलापूर जिल्हयातील 1412 कोरोना बाधीत रुग्ण असून 798 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 486  आहे. कोरोना बाधित एकूण 128  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 सांगली जिल्हयातील 186 कोरोना बाधीत रुग्ण असून 101 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 79 आहे. कोरोना बाधित एकूण 06 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 कोल्हापूर जिल्हयातील 695 कोरोना बाधीत रुग्ण असून 571 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.    ॲक्टीव रुग्ण संख्या 116 आहे. कोरोना बाधित एकूण 08  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 01 लाख 07 हजार 803 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 01 लाख 04 हजार 280 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 03 हजार 503 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 90 हजार 428 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 13 हजार 625 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.    

( टिप :- दि. 11 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

हिंजवडी येथील कोविड आरोग्य केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ

0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांची निर्मिती- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे -कोरोना लढाईला तीन महिने होत आहेत, याकाळात राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधांची निर्मिती होत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या समर्पित कोविड आरोग्य केंद्राचा ऑनलाईन पद्धतीने हस्तांतरण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील लोकार्पण सोहळ्यास शुभेच्‍छा दिल्‍या.

 यावेळी  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे,  खासदार सुप्रिया सुळे, विप्रो लिमिटेडचे अध्यक्ष रिशाद प्रेमजी हे ऑनलाइन तर पुण्यातील राजीव गांधी इन्फोटेक पार्क येथील आरोग्य केंद्रातून  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसेकर, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, विप्रोचे उपाध्यक्ष हरिप्रसाद हेगडे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे,  जिल्हा परिषदेचे सभापती प्रमोद काकडे आदी उपस्थित होते.

    यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून ते आजची परिस्थिती यामध्ये आपण सुधारणा करीत फार पुढे गेलो आहे. राज्यात प्रारंभी दोनच चाचणी केंद्र होते. आज 80 हून अधिक चाचणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. लवकरच ही संख्या 100 च्या पुढे जाईल.  कोरोना विषाणू हा संपूर्ण जगासाठी नवीन आहे. कोरोनाच्या विरुध्द लढाई लढत असतांना वेळेवर सुविधा निर्माण कराव्या लागल्या असून त्यात आपल्याला यश येत आहे, ही सकारात्मक बाब आहे. सुरुवातीला आपल्याकडे 350 आयसोलेशन बेड होते. आजच्या घडीला आयसीयू, आयसोलेशन, ऑक्सीजनयुक्त पुरेशा प्रमाणात सर्व बेड उपलब्ध आहेत.

            विप्रो हॉस्पिटलच्या बाबतीत बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, विप्रो कंपनी दर्ज्‍याशी तडजोड करत नसल्याची त्‍यांची खासियत आहे. यानुसारच  विप्रोच्यावतीने अतिशय दर्जेदार व सुसज्ज रुग्णालय उभारणी करण्‍यात आली आहे. याबद्दल विप्रोच्‍या सर्व टीमचे त्‍यांनी अभिनंदन केले.

कोरोना विषाणू गुणाकाराने वाढतो, त्यामुळे आपणा सर्वांना स्वयंशिस्त पाळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. संपूर्ण जगात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. कोरोना सोबत जगतांना नागरिकांना स्वयंशिस्त पाळावी लागेल. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व सुविधायुक्त असलेले रुग्णालय उभारणी विप्रोने केली असून त्याचा निश्चितच भविष्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे करण्यासाठी उपयोग होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

      सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे म्हणाले, विप्रोच्या सहकार्याने अतिशय सुसज्ज हॉस्पिटल तयार झाले आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी या रुग्णालयाचा निश्चितच उपयोग होईल. शासनाच्यावतीने या रुग्णालयासाठी 1 कोटी 32 लाख रुपयाचा निधी देण्यात येत आहे. अनलॉक परिस्थितीत रुग्णसंख्या वाढत असली तरी निर्माण केलेल्या सुविधांचा लाभ रुग्णांच्या उपचारासाठी होईल. आजच्या मितीला ग्रामीण भागात जरी कोवीड रुग्णांचे प्रमाण कमी असले तरी भविष्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून या रुग्णालयात व्यवस्था निर्माण केल्या आहेत, असे ते म्‍हणाले.

विप्रोचे अध्‍यक्ष रिशाद प्रेमजी म्‍हणाले, माणुसकीच्‍या भावनेतून आम्‍ही राज्‍यातीलच नव्हे तर देशातील निराधार, बेरोजगारांना अन्‍न व औषधोपचार सुविधा देण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहोत. पुणे जिल्हयाची गरज ओळखून ग्रामीण भागातील रुग्णांसाठी समर्पित कोविड केअर हॉस्पिटल बनविण्याची तयारी दर्शविली. शासनाने त्‍यास सकारात्‍मक प्रतिसाद दिल्‍याबद्दल त्‍यांनी आभार मानले. कोरोनामुळे आरोग्‍य आणि आर्थिक समस्‍या निर्माण झाल्या असल्‍या तरी आपण सर्व यावर मात करण्‍यात यशस्‍वी होवू, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

    जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी प्रास्‍ताविक केले. त्‍या म्हणाल्या, कोरोनाच्या संकटकाळात पुणे जिल्हा परिषद कार्यक्षमतेने काम करीत आहे. संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचे सुसज्ज  समर्पित कोविड आरोग्य केंद्र पीपीपी मॉडेल मधून सुरु करण्याचा देशात पहिला मान पुणे जिल्हा परिषदेने मिळवला आहे. पुणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात 27 ठिकाणी तपासणी केंद्रे व 60 ठिकाणी उपचार सुविधा उभ्या केल्या आहेत. कोरोना संक्रमण रोखण्यात जिल्हा परिषद प्रशासन नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, कोविड आरोग्य केंद्राच्या उभारणीकरीता दीड महिन्यापूर्वी पाहणी केली होती. कोविड 19 विषाणूचे संकट लक्षात घेता दीड महिन्यात पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने 450 रुग्ण क्षमता असलेले रुग्णालय उभारण्यात आले असून आज रुग्णांच्या सेवेसाठी दाखल होत आहे.

विप्रोचे उपाध्‍यक्ष हरिप्रसाद हेगडे यांनी संगणकीय सादरीकरण करुन रुग्‍णालयाची माहिती दिली.

कोरोनाबाधित रुग्णावर विप्रो कंपनी लिमिटेड आणि महाराष्ट्र शासन यांचा सामंजस्य करार एक वर्षाकरिता केलेला आहे. या हॉस्पिटलमध्ये सौम्य व मध्यम स्वरूपाच्या पेशंटवर उपचार केले जातील. करारानंतर हे हॉस्पिटल जिल्हा आरोग्य सोसायटीमार्फत चालवण्यात येणार आहे. या हॉस्पिटलमध्ये लागणारे मनुष्यबळ व साधन सामुग्रीची तरतूद राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत करण्यात येणार आहे.

विप्रो कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा

• हॉस्पिटलसाठी लागण्यात येणारी इमारत

• एकुण खाटांची क्षमता – ५०४

• अतिदक्षता विभागामध्ये १० बेड आणि ५ व्हेन्टीलेटरची सोय

• डीफेलटर मशीन – ०५

• ई.सी.जी. मशीन ०१

• ए.बी.जी. मशीन – ०१

• विप्रो कंपनी लिमिटेड मार्फत रुग्णाच्या मनोरंजनासाठी प्रत्येक वार्ड मध्ये एक टीव्ही, कॅरम बोर्ड, बुद्धिबळ, मासिके व वर्तमानपत्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

• रुग्णवाहिका- २

• विप्रो कंपनी लिमिटेड मार्फत सर्व रुग्णांना आहार सेवा पुरवण्यात येणार आहे.

• हॉस्पिटलला लागणारे बेड शिट्स ब्लँकेट्स, गाद्या व पेशंटचे कपडे या कंपनीकडून पुरविले जातील.

जिल्हा आरोग्य सोसायटी यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा-

• रुग्णालयाचे व्यवस्थापन वैद्यकीय अधीक्षक हे पाहतील.

• हॉस्पिटलमध्ये लागणारे मनुष्यबळ व साधनसामग्रीची तरतूद एनएचएम मार्फत करण्यात येणार आहे.

• हॉस्पिटलला लागणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, सर्व प्रकारचे टेक्नीशियन हे मनुष्यबळ जिल्हा आरोग्य सोसायटीमार्फत पुरविले जातील.

• रुग्णांच्या आवश्यक रक्ताच्या चाचण्या केल्या जातील. कोरोना तपासणीचे स्वॅब (थुंकी नमुना) घेण्याची सुविधा उपलब्ध आहे व ते तपासणीसाठी एनआयव्ही, पुणे येथे पाठवले जातील.

• जंतू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजना या योजनेसाठी लागणारी साधन सामग्री जिल्हा आरोग्य सोसायटीमार्फत देण्यात येणार आहे.

• बायोमेडीकल वेस्ट व्यवस्थापन लाईफ सीक्यूअर या संस्थेच्या मार्फत करण्यात येणार आहे.

• वस्त्र धुलाई, स्वच्छता सेवा या प्रकारच्या अवैद्यकीय सुविधा या कंत्राटी स्वरुपात असलेल्या सेवा बाह्य स्रोतांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

एनआयआरएफ रँकिंगमध्ये भारती विद्यापीठ आयएमईडीला 63 वे मानांकन

0

पुणे :-भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.) ला ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’(एन.आय.आर.एफ) सर्वेक्षणात  देशात ६३  व्या क्रमांकाच्या महाविद्यालयाचे मानांकन मिळाले आहे.भारती विद्यापीठालाही सर्वेक्षणाच्या विद्यापीठ क्रमवारीत ६३ वे मानांकन मिळाले आहे. भारती विद्यापीठाच्या ३ फ़ार्मसी इन्स्टिट्यूट,१ अभियांत्रिकी महाविद्यालय आणि १ व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय पहिल्या १०० क्रमवारीत आहे . 

‘संस्थापक स्व.डॉ.पतंगराव कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, सचिव  डॉ.विश्‍वजीत कदम यांच्या पाठिंब्यामुळे व त्यांच्या प्रोत्साहनामुळे भारती विद्यापीठाने हे यश मिळविले आहे. उच्चशिक्षणाला पोषक वातावरण, उत्तम शिक्षणपद्धती, उत्तम शिक्षकवर्ग व विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळेच आयएमईडी ला व्यवस्थापनाच्या शिक्षणक्षेत्रात मोठे योगदान देणे शक्य झाले आहे.’ अशी प्रतिक्रिया  डॉ. सचिन वेर्णेकर यांनी व्यक्त व्यक्त केली.भारती अभिमत विद्यापीठा चे कुलपती डॉ . शिवाजीराव कदम ,सचिव डॉ. विश्वजित कदम ,कुलगुरू डॉ .माणिकराव साळुंखे यांनी आय.एम.ई.डी. आणि सर्व इन्स्टिट्यूटचे  अभिनंदन केले . 

वंदेभारत अभियानांतर्गत मुंबई विमानतळावर आतापर्यंत ८ हजार ४६५ प्रवाशांचे आगमन

0

मुंबई -वंदेभारत अभियानांतर्गत ५५ विमानांमधून आतापर्यंत मुंबई विमानतळावर ८४६५ प्रवाशांचे आगमन झाले असून यात मुंबईतील प्रवाशांची संख्या २४८८ इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या २९१८ आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ३०५९ आहे.

आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार,टांझानिया, स्पेन, आयर्लंड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशिअस, ब्राझिल, थायलंड,केनिया, मियामी, व्हिएतनाम, इटली, स्वीडन,इथिओपिया, रोम या देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.

१ जुलै २०२० पर्यंत आणखी ५० विमानांमधून प्रवासी मुंबईत दाखल होतील.

महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी दिनांक २४ मे २०२० रोजी  मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्या अनुषंगाने आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. मुंबईतील प्रवाशांच्या संस्थात्मक क्वारंटाईनची व्यवस्था विविध हॉटेल्समध्ये करण्यात येत आहे.  इतर राज्यातील व महाराष्ट्राच्या उर्वरित भागातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तिथे गेल्यावर त्यांना त्यांच्या जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्तांमार्फत क्वारंटाईन केले जात आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. त्यांचा वाहतूक पास संबंधित राज्यातून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे.

वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीपणे राबवित आहे.