Home Blog Page 2536

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार – गृहमंत्री अनिल देशमुख

0

मुंबई – सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी राज्य शासन आग्रही आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या  तक्रारी या प्राप्त होत आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. ज्या बँक पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचनासुद्धा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे अशा बँकांची तक्रार  जिल्हाधिकारी यांनी दिली तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

चीनी हॅकर्सच्या कोविड ईमेलपासून सावध राहण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

0

मुंबई -सध्याच्या काळात भारत-चीन सीमेवरील वाद पाहता, चायनीज हॅकर्स आता भारतावर मोठा सायबर अटॅक करण्याची शक्यता असल्याचे समजते. हा सायबर हल्ला करण्यासाठी चीनी हॅकर्स एका ईमेलचा वापर करत आहेत. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात येत आहे.

चीनच्या हॅकर्सनी 20 लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा प्लॅन केला आहे. यामध्ये एक ईमेल आयडीदेखील समोर आला आहे. चीनी हॅकर्स ncov2019@gov.in या  ईमेलच्या माध्यमातून भारतावर सायबर हल्ला करणार आहे. या सायबर हल्लयामध्ये  भारतीयांची खासगी आणि आर्थिक माहिती उघड होण्याची भीती आहे. तुम्हाला आकर्षित करणारा किंवाआर्थिक प्रलोभन देणारा विषय [Email Subject] असलेला इमेल पाठवला जाईल.जसे की फ्री कोविड टेस्ट, फ्री कोविड-१९ किट (Free Covid Test, Free Covid-19Kit) त्या इमेल मध्ये काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा अटॅचमेंट डाऊनलोड करण्यासाठी सांगितले असेल. हा खोटा इमेल covid2019@gov.in / ncov2019.gov.in अश्या प्रकारच्या खोट्या सरकारी इमेल वरून पाठवल्याचे भासवले जाऊ शकते.

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि वरील दाखविल्याप्रमाणे या प्रकारच्या कोणत्याही ईमेल ला प्रतिसाद देऊ नका आणि covid2019@gov.in / ncov2019.gov.in या ईमेल आयडीने जर तुम्हाला कोणताही मेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करू नका किंवा कोणताही रिप्लाय या मेलवर देऊ नका.सायबर सुरक्षा संगणक आणि मोबाईल साठी एक चांगला, अपडेटेड आणि अधिकृत [Paid/Licensed] अँटीव्हायरस वापरावा. संगणकातील सॉफ्टवेअर आणि मोबाईलमधील अप नियमित पणे अपडेट करा. कठीण आणि मोठे पासवर्ड ठेवा. आणि ते नियमितपणे बदलत राहा,तुमच्या महत्त्वाच्या माहितीचा नियमित बॅकअप घ्या.प्रलोभने देणारे संशयास्पद इमेल उघडू नये. त्यातील लिंक वर क्लिक करू नये. त्यातील अटॅचमेंट डाउनलोड करू नये आणि उघडू नये.खोट्या आणि प्रलोभने देणाऱ्या इमेल आणि वेबसाईटपासून सावध राहा. असुरक्षित आणि संशयास्पद वेबसाईटवर तुमची महत्त्वाची माहिती जसे कि यूजर नेम, पासवर्ड, कार्ड नंबर, पिन नंबर, ओटीपी तसेच इतर गोपनीय माहिती टाकू नका असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या काळात हेल्पलाईनद्वारे तब्बल २५ हजार व्यक्तींचे समुपदेशन

0

मुंबई, दि.२३: कोविड-१९ परिस्थितीमुळे लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अडकून पडलेले राज्यातील तसेच परराज्यातील मजूर, कामगार तसेच स्थलांतरितांना आर्थिक, मानसिक समस्या तसेच ताण-तणावावर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत महिला व मुलांकरिता विशेष सहाय्य कक्षामार्फत मदत तसेच समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत २५ हजार १६३ व्यक्तींना समुपदेशन, मार्गदर्शन किंवा माहिती पुरविण्यात आली असून घरगुती हिंसाचाराच्या अनुषंगाने समुपदेशकांना प्रत्यक्ष तसेच हेल्पलाईनवर प्राप्त ४ हजार ६५ दूरध्वनी संदेशांच्या प्रकरणात मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामाची प्रशंसा महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

कोरोना विषाणूमुळे मनात असलेली भीती,अस्वस्थता , कुटुंबाची काळजी, भविष्यातील अंधार, कुटुंबापासून लांब राहावे लागणार याची जाणीव, मानसिक ताणतणाव या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशनाची सेवा शासनाने उपलब्ध करून दिली. महिला व बाल विकास आयुक्तालयाने राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनास आयुक्तालयांतर्गत कार्यरत सर्व १२३ समुपदेशन केंद्रांची यादी, कार्यरत असलेल्या सर्व सोशल वर्कर्सच्या नाव आणि संपर्क क्रमांकासहित यादी उपलब्ध करून दिली. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी याबाबतचे नियोजन केले आणि त्याप्रमाणे काम केले. हे  कक्ष तथा समुपदेशन केंद्रे पोलीस ठाण्यांच्या आवारात आहेत.

जिल्हा आणि तालुका स्तरावर जिल्हा प्रशासनाने व्यवस्था केलेल्या निवासी शिबिरातून राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेले मजूर, कामगार आणि त्यांचे कुटुंबीय तर होतेच पण पर राज्यातील परत निघालेले मजूर मोठ्या प्रमाणात प्रत्येक शिबिराच्या ठिकाणी आढळून आले. शिबिरात राहत असलेल्या सर्व स्त्री, पुरुष स्थलांतरित मजुरांना समुपदेशकांनी कोरोना विषाणूबाबतची माहिती तसेच घ्यायची काळजी, स्वच्छतेचे महत्त्व, योग्य सुरक्षित अंतर, मास्कचा नियमित वापर, सॅनिटायझरचा वापर आदी माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितली. 

समुपदेशनाद्वारे मानसिकभावनिक आधार

कोरोना विषाणूबाबत शिबिरात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात भीती,अस्वस्थता होती तसेच कुटुंबाची, भविष्याची चिंता होती. या सर्व मानसिक ताण तणावावर  समुपदेशकांनी अतिशय कौशल्यपूर्ण काम करत समुपदेशनाच्या माध्यमातून भावनिक, मानसिक आधार दिला आणि त्यांचे मनोधैर्य वाढविले. वैयक्तिक मजुरांच्या  समस्यांवर काम केले. आर्थिक अस्थिरतेमुळे अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचार  येत होते समुपदेशकांनी त्याना सकारात्मक विचार करायला शिकविले. काही ठिकाणी काहीही करून घरी परतण्याच्या तीव्र इच्छेने शिबिरातून मजूर पळून जात होते. त्याकरिता त्यांनी सहनशीलता दाखवावी आणि स्थानिक प्रशासनाला मदत करावी यासाठी त्यांच्याशी सातत्याने बोलून मदत करत होते. हे सगळे काम समुपदेशकांनी समुपदेशनाच्या विविध तंत्रांचा आणि अनुभवाचा वापर करून  केले. 

मजुरांसोबत घेतले विविध उपक्रम – गटचर्चा

समुपदेशकांनी, सोशल वर्कर्सनी मजुरांच्या राहण्याची, जेवणाची नीट व्यवस्था आहे ना याबाबत स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली लक्ष पुरविले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून कोविड १९, व्यक्तिगत स्वच्छता, ताणतणावांचे नियमन याबाबत सत्रे घेतली. मजुरांच्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी योगासने, खेळ यांचासुद्धा वापर करण्यात आला.  

विविध शासकीय यंत्रणाखासगी,सामाजिक संस्थायांच्यासोबत समन्वय

शिबिरातील  महिला व पुरुषांना आवश्यक असलेल्या कपडे , औषधे, जेवण, पाणी , कोरडे अन्नपदार्थ, अंथरूण- पांघरून आदी गरजेच्या वस्तूंसाठी समुपदेशकांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने विविध  सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, खाजगी वैद्यकीय व्यवसायी आदी व्यक्ती आणि गटासोबत समन्वय आणि नेटवर्किंग करून साहित्य उपलब्ध करून दिले. विशेषतः महिलांसाठी सॅनिटरी पॅड्स , इतर कपडे यांचीही व्यवस्था या माध्यमातून करण्यात आली.  काही ठिकाणी नेटवर्किंगच्या माध्यमातून नाश्ता, जेवणासाठी सोय करून दिली.

मजुरांच्या परतीच्या प्रवासासाठी मदत आणि मार्गदर्शन

लॉकडाऊनच्या काही टप्प्यानंतर शासनाने राज्यांतर्गत आणि राज्याच्या बाहेर प्रवासासाठी परवानगी दिल्यांनतर शिबिरातील बाहेरच्या राज्यात घरी जाऊ इच्छिणाऱ्या  मजुरांसाठी व राज्यांतर्गत जिल्ह्यात त्यांच्या राहत्या घरी जाण्याची वाट पाहणाऱ्या सर्व लोकांना  समुपदेशकांनी अनेक पातळीवर मदत केली. त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून देणे, ई-पास काढण्यात मदत करणे कागदपत्रांची पूर्तता करणे, प्रवासाची व्यवस्था करणे अशा सर्व पद्धतीने समुपदेशकांनी स्थलांतरित मजुरांना मानसिक, भावनिक आधार तर दिलाच पण त्यांनी आपापल्या घरी सुखरूप परत जावे यासाठी सुद्धा मदत केली. परतीच्या प्रवासासाठी लागणारे पाणी , कोरडा खाऊ, फूड पॅकेट्स दिली.

समुपदेशकांनी दूरध्वनीद्वारे हाताळली कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे

लॉकडाऊनच्या दरम्यान समुपदेशन केंद्र बंद होती. तरीसुद्धा केवळ महिलांचेच नाही तर पुरुषांकडूनही विविध कारणांसाठी मदत मिळावी यासाठी दूरध्वनी येत होते. कक्षामध्ये नोंद घेतलेल्या अर्जामधील वादी/प्रतिवादी तसेच नवीन कॉलर यांनी समुपदेशकांना संपर्क केला. कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी, रेशनचे अन्नधान्य मिळण्यासाठी, आपल्या घरी  पोहोचण्यासाठी मदत मिळण्यासाठी, आर्थिक अडचण, कोविड-१९ मुळे ताणतणाव आणि भिती अशा विविध कारणासाठी आलेल्या फोन कॉल्स मध्ये समुपदेशकांनी हस्तक्षेप केला. तर काही प्रकरणांमध्ये रेशन, वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली आहे.  फक्त कॉलर व्यक्तीलाच नाही तर त्या विभागात राहणाऱ्या इतर कुटुंबानाही रेशनचे धान्य पुरविण्यात आले आहे. 

लॉकडाऊनमध्ये घरी सर्व असल्यामुळे महिलांना कामाचा अतिरिक्त भार, आर्थिक चणचण, काही ठिकाणी कौटुंबिक अत्याचार वाढू लागला. अशावेळी त्या घरातून बाहेर पडू शकत नव्हत्या. महिलांवरील हिंसा थांबविण्यासाठी महिलेच्या नवऱ्याशी व कुटुंबाशी समुपदेशकांनी बोलणे केले आहे. काही महिलांना आश्रय गृहाची सेवा,तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरणाची सेवा मिळवून देण्यासाठी मदत पुरविण्यात आली. काही प्रकरणात पोलीस आणि संरक्षण अधिकाऱ्यांच्या मदतीने महिलेची सुटका करून पोलीस कम्प्लेंट तसेच कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत ‘डोमेस्टिक इन्सिडन्स रिपोर्ट’ (डीआयआर) भरून न्यायालयात दाखल करण्यात आले. 

मला बोलायचे आहे‘ हेल्पलाईनने केले बोलते

महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र शासन पुणे आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांच्याकरिता कार्यरत असणारे समन्वयक आणि ‘व्हीएडब्ल्यू कक्ष’ कार्यक्रम अधिकारी  यांनी हिंसाचारग्रस्त महिलांसाठी ऑनलाईन मंच ‘मला बोलायचे आहे’ या हेल्पलाइनद्वारे समन्वयकांनाही मदतीसाठी/चौकशीसाठी फोन कॉल्स प्राप्त झाले. स्थानिक महिला समुपदेशन केंद्रांच्या सहाय्याने व इतर स्टेकहोल्डर्स च्या नेटवर्किंग ने हस्तक्षेप करण्यात आला व समुपदेशन करण्यात आले.

राज्यात कोरोना बाधित पोलीस ११०० ;वैद्यकीय कर्मचारी -माध्यम प्रतिनिधी यांची गणना नाही

पुणे- राज्यात ११०० पोलिसांना कोरोना ची बाधा झाल्याची माहिती गृहमंत्री यांच्याकडून दिली जाते आहे. वैद्यकीय कर्मचारी ,पत्रकार यांपैकी कोणी -किती कोरोना बाधित आहेत याबाबत मात्र कोणत्याही स्तरावरून माहिती गोळा केली जात नाही अगर दिली जात नाहीं असे स्पष्ट चित्र आहे .दरम्यान आज राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ६ लाख २८ हजार ९२. एवढी नोंदविली गेली आहे .

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली माहिती

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३४ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी ६४ लाख १९ हजार ८७८ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यात ६ लाख २८ हजार व्यक्ती क्वारंटाईन करण्यात आले आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ०४ हजार ३१पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १९ जून या कालावधीत
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २७९ (८५८ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०४ हजार ३५१

राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ६ लाख २८ हजार ९२.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५

जप्त केलेली वाहने – ८४ हजार १६१

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ४८

(मुंबईतील ३१ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३२, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण१,पालघर १, जालना १)

कोरोना बाधित पोलीस – ११८ पोलीस अधिकारी व ९८२ पोलीस कर्मचारी

राज्यातील एकूण रिलिफ कँप – ९८ (सुमारे ३ हजार २३५ लोकांची व्यवस्था)

‘स्वराज्यजननी जिजामाता’आजपासून चित्रीकरणाला सुरवात

0

कोरोनाच्या प्रार्दुभावाने गेले तीन महिने सर्व काही ठप्प होतं पण आता हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत आणि आखून दिलेल्या नियमांचं पालन करून मालिकांचं चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याची परवानगीसुद्धा निर्मात्यांना मिळाली आहे. याचं पार्शवभूमीवर सोनी मराठी वाहिनीने सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे योग्य ते पालन करून मुंबईतील पहिल्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. मुंबईत चित्रीकरण होणारी स्वराज्यजननी जिजामाता ही पहिली मालिका आहे.  

                       सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. एका मुलखावेगळ्या आईची गाथा, जिनं स्वराज्याचा सिंह घडवला अशा जिजामातांच्या आयुष्यावर ही मालिका आहे. या मालिकेचं चित्रीकरण दादासाहेब फाळके चित्रनगरी  इथं सुरू झालं आहे. सरकारनं आखून दिलेले सर्व नियम पळून या मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं आहे. संपूर्ण सेटचं सॅनिटायजेशन करण्यात आलं आहे. सेटवर मास्क सक्तीचे असून नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आता चित्रीकरण पार पडणार आहे. काही लोक सेटवरच राहून काम करणार असून त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं ही निर्मात्या संस्थांची जबाबदारी आहे. मुंबईत चित्रीकरण सुरू होणारी ही पहिलीच मालिका आहे. ही मालिका डॉ. अमोल कोल्हे यांची असल्यानं आणि ते स्वतः डॉक्टर असल्यानं चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी त्यांनी स्वतः सेटवर उपस्थित राहून  सर्वांना नियम समजावून सांगितले व सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर चमू यांना प्रोत्साहन दिले.                     तीन महिन्यांनंतर आपापल्या कामावर रुजू झाल्यामुळे सर्वच मंडळींमध्ये उत्साह होता.  ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही ऐतिहासिक मालिका असल्यानं मिळालेल्या वेळेत कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखेसाठी कसून तयार केली आहे. आता नियमांच्या चौकटीत राहून आपलं काम व्यवस्थित करून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी  ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेचा पूर्ण चमू सज्ज झाला आहे. पाहत राहा  ‘स्वराज्यजननी जिजामाता’ सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वा. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

मुख्यमंत्र्यांनी केला थेट सेंट जॉर्ज रुग्णालयात कॉल; अंध ऑपरेटरला दिली शाबासकी

0

मुंबई, दि २३ :  दुपारी साडेबाराची वेळ. सेंट जॉर्ज रुग्णालयात आलेला कॉल नेहमीप्रमाणे राजू चव्हाण यांनी उचलला. टेलिफोन ऑपरेटर म्हणून चव्हाण यांचा नेहमीप्रमाणे हा व्यस्त दिवस होता. त्यात कोरोनामुळे चौकशीसाठी येणाऱ्या दूरध्वनींचे प्रमाणही वाढलेले. पण हा आलेला कॉल होता थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून…. राजू चव्हाण यांचे अभिनंदन करण्यासाठी !!

दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले राजू चव्हाण एक दिवसही रजा न घेता गेल्या दोन महिन्यांपासून  रोज कामावर येतात. आणखी एक शारीरिकदृष्ट्या दिव्यांग ऑपरेटर संदीप शिंदेदेखील नियमितपणे मीरा रोड येथून  सेंट जॉर्जला पोहोचतात आणि कर्तव्य बजावतात. श्री.चव्हाण हे दिवसपाळी तर श्री.शिंदे हे रात्रपाळीवर असतात. यासंदर्भात वृत्तपत्रांतील बातमीची दखल घेऊन स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कोविड योद्ध्यांशी बोलून त्याचे अभिनंदन करायचे ठरविले. त्याप्रमाणे ते श्री.चव्हाण यांच्याशी बोलले. मुख्यमंत्री आपले कौतुक करताहेत म्हटल्यावर आश्चर्याचा धक्का बसलेल्या श्री.चव्हाण यांनी त्याही स्थितीत या सगळ्यांचे श्रेय आपल्या वरिष्ठांना दिले आणि मी आपला खारीचा वाटा उचलला असे उद्गार काढले. “तुम्ही खूप चांगले काम करीत आहात. अशा परिस्थितीत जिथे रुग्णालयांत कर्मचाऱ्यांची गरज आहे, तुम्ही  दिव्यांग असूनही कुठेही सुट्टी न घेता काम करता हा इतरांसाठी आदर्श आहे. असा सर्वांनी खारीचा वाटा उचलला तर मोठ्या लढाया जिंकता येतात” असे मुख्यमंत्री म्हणाले.

ऑपरेटरचे काम करताना केवळ दूरध्वनी जोडून देणे एवढेच काम आम्ही करीत नाही तर अनेकदा ज्यांचे कॉल येतात ते लोक रुग्णांचे नातेवाईक असतात, गोंधळलेले आणि घाबरलेले असतात. अशा वेळी त्यांना आम्ही धीर देतो त्यांना मार्गदर्शन करतो असेही श्री.चव्हाण यांनी सांगितले.

ज्ञात अज्ञात कोविड योद्धे

कोरोना काळात मदतीला धावून जाणाऱ्या अनेक लोकांनी वेळप्रसंगी कशाचीही पर्वा न करता काम केले आहे, मदत केली आहे. त्यांनी कुठलीही अपेक्षादेखील व्यक्त केलेली नाही, कसलाही मोबदला त्यांना यासाठी मिळालेला नाही. अशा ज्ञात-अज्ञात लोकांमुळे कोरोनाचा हा लढा आपण जिंकू. विशेषत: मुंबईसारख्या गजबजलेल्या ठिकाणी विविध आपत्तींमध्ये लोक माणुसकीने इतरांच्या मदतीला धावतात. ही आपत्ती निराळी आहे. या वैद्यकीय आणीबाणीत आरोग्याला धोका आहे हे माहित असूनही अशी माणुसकी न सोडता तसेच कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींच्या प्रति आदर वाटतो असे मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात. 

कोरोनाने मृत्यू झाल्यास महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाखांचे सानुग्रह अनुदान-ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

0

मुंबई, दि.23: अखंडित वीज उत्पादनाचे  कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे.

महानिर्मितीमध्ये विविध कंत्राटदारामार्फत बाह्यस्त्रोताद्वारे कार्यरत असणारे कंत्राटी कामगार तसेच सुरक्षारक्षक यांचा मृत्यूदेखील कोरोनामुळेच झाल्यास त्यांच्या वारसांना ३० लाख रुपयांचे अनुदान सहाय्य पुरवण्यात येणार असल्याचे  राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ जोखीम पत्करून कर्तव्य बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभाग गंभीर असून, त्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

महानिर्मितीमध्ये तांत्रिक तसेच अतांत्रिक संवर्गांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान लागू असेल.       

ह्याकरिता, मृत्यूचे कारण हे  कोविड-१९ विषाणूशी संबंधित असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र  शासकीय/पालिका/महानगरपालिका/आयसीएमआर नोंदणीकृत खासगी रुग्णालये/प्रयोगशाळा यांच्याकडून प्राप्त अहवालाच्या आधारे करण्यात आलेले असावे. सदर सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी कामावरील उपस्थितीबाबत अटी व शर्ती या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राहतील, असे महानिर्मितीने स्पष्ट केले आहे.

मोफत अन्नधान्य योजना सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्याची राज्याची केंद्राकडे मागणी

0

मुंबई, दि.२३ :  कोविड – १९ प्रादुर्भावामुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी  प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रतिशिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात येत आहे. मात्र अद्याप कोरोनाचा धोका कायम असल्याने श्रमिकांच्या हाताला काम नाही त्यामुळे या योजनेस जुलै ते सप्टेंबर २०२० या कालावधीत मुदतवाढ देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी यासाठी आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. आज याबाबत श्री.पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून मोफत अन्नधान्य योजनेस पुढील तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी यापूर्वीच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे.

कोविड-१९ या विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात तसेच विविध राज्यांमध्ये चालू असलेल्या लॉकडाऊन काळात अन्नधान्य मिळण्यास अडचणी  निर्माण झाल्या. या परिस्थितीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (पीएमजीकेएवाय) सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत एप्रिल ते जून २०२० या कालावधीत प्रति माह प्रति लाभार्थी ५ किलो प्रमाणे तांदूळ आणि प्रतिकुटुंब प्रतिमाह तूर डाळ असे अतिरिक्त अन्नधान्य पुरविण्यात आले.यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला.

शासनाच्या वतीने जनजीवन सुरळीत करण्याच्या दृष्टीने अनलॉक प्रक्रिया सुरु केलेली असली तरी देशातील अर्थचक्राला गती येण्यासाठी आणि सामान्य नागरिकांचे जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत होण्यासाठी अजून काही कालावधी  लागण्याची  शक्यता आहे. संपूर्ण व्यवहार आणि जनजीवन अजून पूर्णपणे सुरळीत सुरु झालेले नाही. त्यामुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या अतिरिक्त धान्य पुरवठ्याचा कालावधी पुढील जुलै ते सप्टेंबर २०२० असे तीन महिने वाढवण्यासाठी शासनाने  १८ जून २०२० रोजी केंद्र शासनाकडे मागणी केली आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सुरु असलेला मोफत धान्य वितरणाचा कार्यक्रम जुलै ते सप्टेंबर २०२० या तीन महिन्यांच्या कालावधीत सुरू ठेवण्यासाठी आपल्या स्तरावरून केंद्र शासनाकडे प्रयत्न करण्याची विनंती, श्री. भुजबळ यांनी श्री.शरद पवार यांना केली आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

0

कॅटॅलिस्ट फाऊंडेशन चा अनोखा उपक्रम

पुणे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त कॅटॅलिस्ट फाऊंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.कोरोना मुळे मागील ३ महिन्यांपासून लोक घरात असल्यामुळे सर्व काही ऑनलाईन होतांना दिसत आहे. राजकीय सभा, मुलाखती, मार्गदर्शन, शाळांचे लेक्चर ऑनलाईन झालेले आपण पाहिले.याच पद्धतीने वक्तृत्व स्पर्धा देखील ऑनलाईन पद्धतीने घेऊन कॅटॅलिस्ट फाऊंडेशन अनोखा उपक्रम राबवित आहे.

राज्यातील सर्वच नागरिक ह्या स्पर्धेत सहभागी घेऊ शकतात, या स्पर्धेत सहभागासाठी वय, भाषा असे बंधन नाही. याशिवाय ही स्पर्धा पूर्णपणे निःशुल्क आहे.

राजर्षी शाहू महाराज – उत्तम प्रशासक, राजर्षी शाहू महाराज – रयतेचा राजा,

राजर्षी शाहू महाराज – आरक्षणाचे जनक, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आधुनिक यंत्र, तंत्र आणि विचारांचे पुरस्कर्ते शाहू महाराज, कला, क्रीडा आणि संगीत जोपासणारा राजा – राजर्षी शाहू महाराज व माणगाव परिषद – राजर्षी शाहू महाराज असे एकूण ७ विषय या स्पर्धेसाठी ठेवण्यात आले असून सरासरी ५ मिनिटांमध्ये आपले मनोगत सादर करून दिनांक २६ जून २०२० पर्यंत व्हाट्सएप द्वारे कॅटॅलिस्ट फाऊंडेशन कडे पाठवावा असा पॅटर्न राबविण्यात येणार आहे.

या स्पर्धेत प्रथम विजेत्यास ₹५५५५/-, द्वितीय विजेत्यास ₹३३३३/-, तृतीय विजेत्यास ₹२२२२/- तर ३ उत्तेजनार्थ वक्त्यांना प्रत्येकी ₹११११/- असे पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी वक्त्यास डिजिटल सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

कॅटॅलिस्ट फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सुनील माने ह्यांनी यंदा माणगाव परिषदेची शताब्दी असल्याने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याचे मागील वर्षी घोषित केले होते. मात्र यंदा कोरोनाची परिस्थिती पाहता ही स्पर्धा ऑनलाईन करावी लागत आहे. या स्पर्धेत राज्यातील जास्तीत जास्त वक्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुनील माने यांच्या वतीने करण्यात आले आहे.

डाक विभागातील कोरोना बाध‍ितांना राज्यपालांकडून एक लाख रुपयांची मदत प्रदान

0

मुंबई, दि. २३ – डाक विभागातील कोरोना बाध‍ित कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज एक लाख रुपयांचे वैयक्तिक योगदान दिले. राज्याचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल हर‍िशचंद अग्रवाल यांनी आज राजभवन येथे राज्यपालांकडून एक लाख रुपये रकमेचा धनादेश स्वीकारला. यावेळी सहाय्यक पोस्ट मास्तर जनरल श्रीनिवास व्यवहारे हे देखील उपस्थित होते.

डाक विभागातर्फे नोव्हेंबर महिन्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत राज्यपाल श्री. कोश्यारी यांना प्रथम क्रमाकांचे २५ हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले होते.  या रकमेत स्वत:चे ७५ हजार रुपये जोडून ही रक्कम राज्यपालांनी डाक विभागातील कोरोना बाध‍ित कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कल वेलफेअर फंडाला दिली.

महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने “ढाई आखर” पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत “प्रिय बापू अमर है” या व‍िषयावर आंतरदेशीय पत्र प्रवर्गात केलेल्या निबंध लेखनासाठी राज्यपालांना प्रथम क्रमाकाचे पारितोषिक प्राप्त झाले होते.

संस्थात्मक अलगीकरण करताना आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करा

0

चंद्रपूर : सावली तालुक्यामध्ये कोरोना आजारासंदर्भात आतापर्यंत केलेल्या उपायोजना सकारात्मक आहेत. मात्र संस्थात्मक अलगीकरण करताना नागरिकांना प्राथमिक सुविधा तसेच त्यांना एकाकीपणा येणार नाही, याची खातरजमा करा, असे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

आपल्या पाच दिवसीय दौऱ्यामध्ये गडचिरोली येथून पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सावली तालुक्यामध्ये आल्यानंतर तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला मूल उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, नगराध्यक्ष विलास यासलवार, सभापती विजय कोरेवार, तहसीलदार पुष्पलता कुंभरे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मडावी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर मडावी, पोलीस निरीक्षक राठोड, उपविभागीय अभियंता सी.बी.कटरे,  दिनेश चिरुनवार, आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील परिस्थिती प्रत्येक तालुक्यातील सकारात्मक पाठबळामुळे उत्तम आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये स्वतःच्या घरात गृह अलगीकरण होणे शक्य नसते. अशावेळी बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवताना आवश्यक प्राथमिक गरजा पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे. सोबतच नागरिकांनी देखील कोरोना आजारापासून त्यांचे व कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागत असल्यामुळे, संस्थात्मक अलगीकरण करण्यात येत असल्याचे समजून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आरोग्य विभागाने तालुक्यातील कोरोना संदर्भातील उपाययोजनेचा आढावा सादर केला. सावली तालुक्यामध्ये संस्थात्मक अलगीकरण, गृह अलगीकरणात असलेल्या नागरिकांची माहिती देण्यात आली. तालुक्यांमध्ये आतापर्यंत संशयित असणाऱ्या ५९ लोकांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. सर्व अहवाल निगेटिव्ह  असल्याची माहिती त्यांनी दिली. तालुक्यामध्ये आतापर्यंत बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची गावागावांमध्ये नोंद घेतली जात असून ग्रामस्तरावर सरपंच व आशा वर्कर यांच्यामार्फत यासाठी मदत मिळत असल्याची माहिती यावेळी आरोग्य यंत्रणेने पालकमंत्र्यांना दिली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचा देखील आढावा घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तालुक्यांमध्ये सुरू असलेले रस्त्यांचे खडीकरण, याबाबतही आढावा घेतला गेला. तालुक्यामध्ये जवळपास ३५ खडीकरणाची कामे प्रलंबित असून ती तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था संदर्भातही यावेळी पालकमंत्र्यांनी जाणून घेतले. अवैध दारू विक्री संदर्भात येत असलेल्या तक्रारींचा यावेळी त्यांनी उल्लेख केला. याकडे लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील अनेक भागातून गुरांची अवैध वाहतूक होत असल्याबाबतही तक्रारी आहेत. याकडे पोलिसांनी गंभीरतेने लक्ष वेधावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

सावली शहरातील नगरपंचायती अंतर्गत असणारी कामे, प्रलंबित आराखडे घनकचरा व्यवस्थापन, प्रलंबित सभागृहाचे काम, याकडे देखील लक्ष वेधण्याचे त्यांनी सांगितले.

अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे हे १५० वे जयंती वर्ष आहे. सावली येथे महात्मा गांधी यांचा पदस्पर्श झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांचा एक भव्य पुतळा उभारण्याचे काम तातडीने पूर्णत्वास न्यावे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यासंदर्भात तातडीने आराखडा सादर करून आवश्यक सौंदर्यीकरण व त्यांच्या सावली येथील भेटीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीतून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल अशा पद्धतीने मांडणी करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सावली भागातील काही विकास कामांसाठी जिल्हा नियोजन अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्याचे काम करावे. यासाठी शाळांचे वॉल कंपाऊंड बांधण्याची कामे मंजूर करण्यात आली असून ती तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले. तालुक्याच्या विकासासंदर्भातल्या प्रलंबित कामांना गती देऊन पूर्ण करण्याचे देखील यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित अन्य पदाधिकाऱ्यांनीही काही सूचना केल्या. या सूचनांना गंभीरतेने घेत योग्य प्रतिसाद देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

शाळांना अनुदान वाटप, शिक्षकांच्या मागण्यांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेणार – उपमुख्यंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. २२ :- राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर केलेल्या निधीचं वितरण करणे, अंशत: अनुदानित शाळांना प्रचलित धोरणाप्रमाणे टप्पा देण्याचा शासननिर्णय जारी करणे, कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांना अनुदानासह मान्यता देणे, अघोषितला घोषित करुन अनुदान देणे आदी मुद्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून या मुद्यांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार करुन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

कोरोना संकटामुळे लागू टाळेबंदीचा फटका राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही बसला असून शिक्षक बांधवांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितित आज सह्याद्री अतिथिगृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार सर्वश्री बाळाराम पाटील, दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे, किशोर दराडे आदींनी उपस्थित केलेल्या शिक्षणविषयक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

राज्यातील शाळांचे अनुदान, वाढीव मान्यता व शिक्षकांच्या संदर्भात मागील सरकारने सप्टेंबर महिन्यात लागू केलेल्या अटी शिथील करुन संबंधिताना मदत करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा तसेच मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात यावा, असे ठरवण्यात आले. बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, तसेच वित्त व शालेय शिक्षण विभागाचे सचिव उपस्थित होते.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 6 हजार 835

0

पुणे विभागातील 12 हजार 267 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 19 हजार 932 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 22:- पुणे विभागातील 12 हजार 267 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 हजार 932 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 6 हजार 835 आहे. विभागात कोरोना बाधीत एकुण 830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 466 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.54 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.16 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 15 हजार 942 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 9 हजार 446 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 852 आहे. कोरोनाबाधित एकूण 594 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 350 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.57 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.73 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 524 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 431, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 57, सांगली जिल्ह्यात 12 तर कोल्हापूर जिल्ह्यात 04 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 838 रुग्ण असून 643 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 156 आहे. कोरोनाबाधित एकूण 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 2 हजार 126 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 266 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 679 आहे. कोरोना बाधित एकूण 181 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 288 कोरोना बाधीत रुग्ण असून 180 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 100 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत 738 रुग्ण असून 682 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 48 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 37 हजार 946 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 36 हजार 754 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 192 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 16 हजार 497 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 19 हजार 932 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 22 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

राज्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळांची संख्या १०३

0

प्रति दशलक्ष चाचण्यांच्या संख्येत दुप्पटीने वाढ

मुंबई, दि.२२ : राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या १०३ एवढी झाली असून त्यामध्ये ६० शासकीय तर ४३ खासगी प्रयोगशाळा आहेत. २६ मे ते २० जून या कालावधीत प्रयोगशाळांच्या संख्येत ३० ने वाढ झाली असून प्रति दशलक्ष चाचण्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. असे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

दि.९ मार्च रोजी राज्यात कोरोनाचा पाहिला रुग्ण आढळून आला त्यावेळेस मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी चाचण्यांची सुविधा होती. त्यानंतर कोराना चाचण्यांच्या सुविधेत दिवसेंदिवस राज्यशासनाने वाढ केल्याने ही संख्या आता १०३ एवढी झाली आहे. राज्याचे प्रतिदशलक्ष प्रयोगशाळा नमुन्यांचे प्रमाण ५८४७ एवढे असून देशपातळीवरील हे प्रमाण ४६१० एवढे आहे.

देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत असून गेल्या तीन महिन्यात सातत्याने चाचण्यांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मुंबईतील जी.टी. हॉस्पीटल येथील प्रयोगशाळांचा शुभारंभ गेल्या आठवड्यात झाला. कालपर्यंत ७ लाख ७३ हजार ८६५ एवढे नमुने पाठविण्यात आले असून त्यापैकी १ लाख ३२ हजार ७५ एवढे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण पाठविलेल्या नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्यांचे प्रमाणे हे १७ टक्के आढळून आले आहे.

२६ मे रोजी राज्यात ७३ प्रयोगशाळा होत्या त्यावेळी प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ३ हजार ३४७ एवढे होते. २९ मे रोजी ७७ प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ३३८७ होते. ५ जून रोजी राज्यात ८३ प्रयोगशाळा होत्या तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ४०८६ एवढे होते. १२ जून रोजी ९५ प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाणे ४८६१ एवढे होते. २१ जून रोजी १०३ प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ५८४७ एवढे आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात प्रयोगशाळांची संख्या अनुक्रमे अशी

  • मुंबई – २७ (शासकीय १२, खासगी १५)
  • ठाणे – ७ (शासकीय २, खासगी ५),
  • नवी मुंबई – ३ (शासकीय १, खासगी २)
  • पुणे – २२ (शासकीय १०, खासगी १२)
  • नागपूर – ११ (शासकीय ७, खासगी ४)
  • कोल्हापूर – ३ (शासकीय २, खासगी १)
  • नाशिक- ४ (शासकीय २, खासगी २)
  • सातारा- २ (शासकीय १, खासगी १)
  • अहमदनगर – २ (शासकीय १, खासगी १)
  • पालघर (डहाणू) – १
  • रत्नागिरी – १
  • सिंधुदूर्ग – १
  • सांगली (मिरज) – १
  • सोलापूर- २
  • धुळे – १
  • जळगाव – १
  • अकोला – १
  • अमरावती – २
  • यवतमाळ – १
  • गडचिरोली – १
  • चंद्रपूर – १
  • गोंदिया  – १
  • वर्धा – १
  • औरंगाबाद – १
  • नांदेड – २
  • बीड – १
  • लातूर – १
  • परभणी – १

केळेवाडीच्या राउत दवाखान्यात स्वॅब कलेक्शन चालू करा- रिपोर्ट येईपर्यंत कोणाला घरी सोडू नका -महापौर

0

पुणे- प्रतिबंधित क्षेत्रातील कोरोना विषाणू महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण करणेसाठी महापौर यांनी आज दि. २२/६/२०२० रोजी केळेवाडी, पौड रोड कोथरुड येथे पाहणी दौरा केला. पाहणी दौ-यादरम्यान स्थानिक सभासद व माजी उपमहापौर दीपक मानकर, सौ. छाया मारणे, सौ. वैशाली मराठे तसेच, रामचंद्र हंकारे- आरोग्य अधिकारी, ज्ञानेश्वर मोळक-सह महापालिका आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन), अविनाश सकपाळ-उपआयुक्त (झोनिपु), माधव जगताप-उपआयुक्त (अतिक्रमण), नितीन उदास, उपआयुक्त, परिमंडळ क्र. २, संदिप कदम -महापालिका सहाय्यक आयुक्त-कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालय, संतोष मुळे-क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी, पोर्णिमा गायकवाड- पोलिस उपआयुक्त, प्रतिभा जोशी -पोलिस निरिक्षक, आदी. अधिकारी उपस्थित होते.
सदर पाहणी दरम्यान महापौर यांनी मनपा प्रशासन व पोलिस प्रशासन यांना खालीलप्रमाणे सूचना दिल्या.

  1. केळेवाडी येथील पुणे महानगरपालिकेचा स्व. सुंदराबाई गणपत राऊत दवाखाना येथे त्वरित स्वॅब कलेक्शन सेंटर चालू करावे. या सगळ्या परिसरात स्वॅब घेतल्यानंतर नागरिकांना रिपोर्ट येईपर्यंत घरी सोडू नये. तसेच आवश्यक साधन सामुग्री, मंडप, उपयुक्त सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधिताना सूचना दिल्या.
  2. सदर परिसरामधील सार्वजनिक स्वच्छतागृहांची यादी करुन पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन दैनंदीन स्वच्छता करुन घ्यावी. तसेच स्वच्छता केलेले फोटो संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना रोजचे रोज पाठवावे. प्रत्येक सार्वजनिक स्वच्छतागृहांबाहेर फ्री हॅंड वॉश बेसिन बसविण्यात यावेत.
  3. प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व को-मॉर्बिड (ज्या नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी आहे तसेच जे नागरिक इतर आजारांनी बाधित आहे ) व ज्येष्ठ नागरिक या सर्वांच्या आरोग्य तपासणी क्रस्ना डायग्नोस्टीक द्वारे करण्यात याव्यात. यासाठी मनपा प्रशासनाची व स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेण्यात यावी. पॉझिटीव्ह रुग्णांवर आवश्यक ते पुढील सर्व उपचार तातडीने सुरु करावेत, जेणेकरुन कोरोना बाधित रुग्णांच्या जिवितास धोका निर्माण होणार नाही, अशा सूचना मा. महापौर यांनी केल्या.
  4. संपूर्ण परिसरासाठी सूक्ष्म प्रतिबंधित झोन तयार करुन आरोग्य विभागातील नर्सेस, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटातील सदस्या, आशा वर्कर यांची मदत घेऊन सर्वेक्षण करण्यात यावे.
  5. स्थानिक लोकप्रतिनिधी, मनपा प्रशासन, मा. पोलिस उपआयुक्त, स्थानिक पोलिस निरिक्षक, क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांनी दैनंदिन समन्वय साधावा.
  6. सदर ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र योजना राबवून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात.
  7. प्रतिबंधित क्षेत्रात जास्तीत जास्त रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याबाबत मा. आरोग्य अधिकारी, पुणे मनपा यांना सूचना देण्यात आल्या. तसेच सदर रुग्णवाहीका रुग्णास वेळेवर उपलब्ध होणेसाठी व वस्तीमध्ये येणे व जाणेचे मार्ग त्यावेळेपर्यंत खुले करुन देणेबाबत पोलिस प्रशासनास सूचना देण्यात आल्या.

महापौर यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की, जरी संबंधित क्षेत्र प्रतिबंधित केले असले तरी, कोणीही घाबरून जाऊ नये. तसेच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांना योग्य ते सहकार्य करावे; जेणेकरून सर्वांनी योग्य ती काळजी घेतल्यास या संकटावर आपण नक्कीच मात करू.