Home Blog Page 2533

सलून व जिम 28 जूनपासून होणार सुरु; राज्य सरकारने घेतला निर्णय

0

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या व्यायमशाळा आणि सलून सुरु करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला आहे. येत्या २८ जूनपासून व्यायामशाळा आणि सलून सुरु होईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये सलूनचा व्यावसाय सुरु करण्याबाबत चर्चा झाली. यानंतर कोरोनाची विभागवार परिस्थिती लक्षात घेऊन सलून व्यावसाय सुरु करण्यात येणार आहे. तसेच याबाबत सरकारकडून लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील, असं अस्लम शेख यांनी सांगितले.
सलूनमध्ये फक्तं केस कापण्याची परवानगी असेल. दाढी करण्याची परवानगी सध्या नाही. केस कापणाऱ्याने आणि कापून घेणारे दोघांनाही मास्क बंधनकारक असेल, अशी माहिती मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी दिली.

राज्यात सलून सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला असला तरी ब्युटी पार्लर आणि स्पा सुरू करण्यास मात्र तूर्त परवानगी देण्यात आलेली नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सलूनबाबत विविध विषयांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात आला. सलूनसाठी नियमावली तयार करण्यात येणार असून सोशल डिस्टन्सिंगचं पालन, मास्कचा वापर, सॅनिटाइझ करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीचा राज्यातील लाखो सलून व्यावसायिकांना फटका बसला आहे. अनेकांवर त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना सोशल डिस्टसिंग तसेच स्वच्छतेचे नियम पाळून आपला व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सलून चालकांकडून करण्यात येत होती.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन

0

पुणे – भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या पातळीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंडई येथे टिळक पुतळ्याजवळ पडळकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

पुण्यात पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पडळकर यांचा बोलविता धनी भाजप आहे. हा पक्ष दुतोंडी आहे. त्यामुळे पडळकर नव्हे तर भाजपने माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. नेते जयदेव गायकवाड, स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, प्रदीप देशमुख, नगरसेवक बाबुराव चांदेरे, प्रकाश म्हस्के, महेश हांडे, राकेश कामठे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

सध्या भाजप व त्या विचारधारेतील मंडळींना सत्ता गेल्याने मानसिक रोगाने पछाडले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर ज्यांची बोलायची लायकी नाही, असे अनेक लोक गेले काही दिवस भ्रमिष्ट झाल्यासारखे बरळत आहेत. यातून ते लवकर बरे व्हावेत, अशा आमच्या त्यांना सदिच्छा आहेत.

सुसंस्कृत महाराष्ट्राला अशोभनीय अशा या वर्तणुकीचा व वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, असे राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण आणि आमदार चेतन तुपे यांनी म्हटले आहे.

तर, शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यावर टीका करण्याची पडळकर यांची लायकी नाही. बारामती विधानसभा मतदारसंघात डिपॉझिट जप्त करून जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे.

किमान आता तरी त्यांनी जपून आणि भान ठेवून बोलावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पडळकरांना त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला..

सीए स्थापना दिवसानिमित्त ‘आयसीएआय’तर्फे भव्य रक्तदान शिबिर

0

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भासत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सनदी लेखापाल (सीए) स्थापना दिवसानिमित्त दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाऊंटंटस स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. २८ जून, १, ३ व ४ जुलै या चार दिवशी शहराच्या विविध भागात हे रक्तदान शिबीर होणार आहे.
येत्या रविवारी (दि. २८ जून) फडके संकुल, टिळक रोड व आयसीएआय भवन, बिबवेवाडी येथे १० ते ५ या वेळेत, तर डीएमकेएच, फॉरचुन हाऊस, बाणेर-पाषाण लिंक रस्ता येथे ९.३० ते ४.३० या वेळेत हे शिबीर होईल. बुधवारी (१ जुलै)  एसपीसीएम, सेंट्रल पॉईंट, मित्र मंडळ, पर्वती येथे १०.३० ते १ या वेळेत, इंटरलिंक कॅपिटल अड्वायझर्स, केके मार्केट, पुणे सातारा रस्ता येथे ११ ते ५ या वेळेत, राठी अँड राठी कंपनी, कमल कीर्ती, सिंहगड रस्ता, पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ ९ ते २ या वेळेत, तर एसएनजे अँड कंपनी, एरंडवना येथे ९ ते ५ या वेळेत हे शिबीर होणार आहे.
कोरोनामुळे सध्या अनेक रुग्णालयांना रक्ताचा पुरवठा आवश्यक आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांत रक्तदान शिबिरे झालेली नाहीत. ही गरज लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे सीए स्थापना दिवसानिमित्त हे भव्य शिबीर आयोजिले आहे. शहराच्या विविध भागात होत असलेल्या या शिबिरांमध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे. असे आवाहन ‘आयसीएआय’ पुणे शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी केले आहे.

प्रतिकूल ‘निसर्ग’वर मात करीत महावितरणने 99 टक्के वीजग्राहकांच्या दारी आणला प्रकाश

0

पुणे, : तब्बल 4197 वीजखांबांची वीजवितरण यंत्रणा जमीनदोस्त करीत पुणे जिल्ह्यातील मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव व मुळशी, वेल्हे तालुक्यांमध्ये अंधार पसरविणाऱ्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या अभुतपूर्व तडाख्यावर मात करीत महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी अविश्रांत दुरुस्ती कामांद्वारे या भागातील आतापर्यंत 6 लाख 27 हजार 100 (99 टक्के) वीजग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे.

      ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे महावितरणच्या मंचर, मुळशी व राजगुरुनगर विभागामध्ये वीज वितरण यंत्रणेला प्रथमच एवढ्या प्रमाणात अस्मानी तडाखा बसला. दुर्गम, अतिदुर्गम भागात घनदाट जंगलातून, डोंगरदऱ्यांतून गेलेल्या वीजयंत्रणेमधील 4197 वीजखांब चक्रीवादळामुळे जमीनदोस्त झाले होते. परिणामी 862 गावे, वाड्यावस्त्यांमध्ये अंधार पसरला होता. सुमारे 5 लाख 29 हजार 900 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक तसेच कृषीपंप व इतर वर्गवारीतील 1 लाख 1 हजार 600 असे एकूण 6 लाख 32 हजार 930 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या तिनही विभागातील 47 उपकेंद्र, 389 उच्चदाब वाहिन्या आणि 16586 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा सुरु करण्याचे आव्हान स्वीकारून महावितरणचे 168 अभियंते, 599कर्मचारी आणि 59 कंत्रादारांच्या 634 अशा एकूण 1401 मनुष्यबळावर यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते.

कोरोना विषाणूमुळे मनुष्यबळाच्या कमतरतेसह विविध अडचणी तसेच ग्रामीण भागातील दुर्गम व डोंगरदऱ्या तसेच संततधार पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत 862 पैकी 843 गावे, वाड्यावस्त्यांमध्ये वीजपुरवठा सुरु झाला आहे. आतापर्यंत 5 लाख 26 हजार 700 (99.4 टक्के) घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक तसेच 1 लाख 400 (98 टक्के) कृषीपंप व इतर ग्राहकांसह एकूण 6 लाख 27 हजार 100 (99 टक्के) ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. यामध्ये 1194 पैकी 1184 लहानमोठ्या पाणीपुरवठा योजना, 209 पैकी 204 मोबाईल टॉवरचा देखील समावेश आहे. सध्या लघुदाब वितरण यंत्रणेची दुरुस्ती सुरु असून अतिदुर्गम 19 वाड्यावस्त्या, आदिवासी पाडे तसेच सर्व वर्गवारीतील 5800 वीजग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे.

मावळ, मुळशी व जुन्नर या डोंगरदऱ्या व दुर्गम भागात लोकवस्ती असलेल्या तालुक्यांमध्ये दरवर्षी कमी अधिक प्रमाणात वादळाचा तडाखा बसतो. मात्र ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्याने या तिनही तालुक्यातील वीज वितरण यंत्रणा नेस्तनाबूत करून टाकली होती. महावितरणचे अविश्रांत दुरुस्ती काम, स्थानिक ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधी व इतर शासकीय यंत्रणांनी दिलेले सहकार्य आदींमुळे आव्हानात्मक असलेल्या वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. तसेच अभूतपूर्व ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या आव्हानाला तोंड देत महावितरणने पुन्हा एकदा वीजग्राहकांना प्रकाशमान केले आहे.

महापालिका नागरिकांचा अंत पाहते का? नगरसेविका अश्विनी कदम यांचा सवाल

0

पुणे-पहाटे दोन वाजता पर्वती जलकेंद्र येथे मोठा बिघाड झाल्यामुळे कोणतीही पूर्वकल्पना न देता संपूर्ण पर्वती परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे आज शिवदर्शन, लक्ष्मीनगर ,तावरे कॉलनी, अरण्येश्वर, पद्मावती, सहकारनगर, चव्हाण नगर, संभाजी नगर ,तळजाई, बिबवेवाडी, मार्केट यार्ड,महर्षी नगर परिसरामध्ये नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेसाठी पाण्याची अत्यंत गरज असताना नागरिकांना अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे पिण्याच्या पाणी सुद्धा उपलब्ध होऊ शकले नाही त्यामुळे नागरिक अक्षरशा हतबल झाले व नागरिकांनी संताप सुद्धा व्यक्त केला.पुणे महानगरपालिकेचा हा अत्यंत भोंगळ कारभार त्याचा फटका आज वरील भागातील नागरिकांना बसला.पाण्यासाठी जनजीवन विस्कळीत झाले होते.
विद्युत पुरवठा करणारे बावीस केव्ही ची केबल फ्लॅश झाली असे कारण सांगण्यात येत आहे. परंतु अशा पद्धतीने विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर अन्य मार्गाने किंवा दुसरा पर्याय महानगरपालिकेकडे विद्युत पुरवठा करण्यासाठी उपलब्ध नव्हता ही अत्यंत खेदाची बाब आहे. पुणे महानगरपालिकेने समान पाणीपुरवठाच्या नावाखाली दोन हजार कोटी कर्जे काढलेल्या असताना नागरिकांवर अशी वेळ येते हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणूनच पुणे महानगरपालिका नागरिकांचा सहनशक्तीचा अंत पाहते का? असा सवाल राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी उपस्थित केला.

होंडातर्फे नवी ग्राझिया 125 बीएसव्हीआय लाँच

• कामगिरी आणि कार्यक्षमता125 सीसी एचईटी बीएसव्हीआय पीजीएम- एफआय इंजिन ईएसपी (एनहान्स्ड स्मार्ट पॉवर)

•         #अक्वाएटरिझोल्यूशन – पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरमुळे प्रत्येकवेळेस धक्का न बसता आणि कोणत्याही आवाजाशिवाय सुरू

•  इंटेलिजंट इन्स्ट्रुमेंट डिस्प्लेमुळे वेळेआधी आणि सुखद प्रवासासाठी मिळते माहिती उदा. किती अंतरानंतर इंधनाची टाकी संपेल, सरासरी इंधन कार्यक्षमता आणि प्रत्यक्षातील इंधन कार्यक्षमता.

•  तंत्रज्ञान – गाडी थांबल्यानंतर बंद होणारी यंत्रणा आणि इंजिन कट- ऑफसह साइड स्टँड इंडिकेटर

जबरदस्त आरामदायीपणा आणि सोयीस्करपणा

·  नव्या एलईडी डीसी हेडलॅम्पमुळे सोयीस्कर कमी वेग आणि रात्रीच्या प्रवासासाठी पुरेसा प्रकाश

·  इंजिन स्टार्ट/स्टॉप बटन – एकाच बटनाच्या मदतीने इंजिन चालू/बंद करण्याची सोय

·  एकत्रित हेडलॅम्प बीम आणि पासिंग स्विच – दोन्हींवर नियंत्रण करण्यासाठी एकच स्विच

·  बहुपयोगी स्विच – सीट अनलॉक करा आणि बोटाने इंधनाची टाकी उघडा

·  सुधारित ग्राउंड क्लियरन्ससह (+16 एमएम) टेलिस्कोपिक सस्पेंशनमुळे प्रवास आणखी सफाईदार

ग्राहकाला मिळणार जबरदस्त स्टाइल आणि मूल्य

•  नवा एलईडी स्प्लिट पोझिशन लॅम्पमुळे मिळतो आकर्षक फ्रंट स्टान्स

• आधुनिक व स्टायलिश टेल लॅम्प, स्पिल्ट ग्रॅब रेल आणि साइड पॅनेलवर थ्रीडी लोगो एम्बलेम

• ग्राझिया बीएसव्हीआयवर सहा वर्षांचे खास वॉरंटी पॅकेज

•  ग्राझिया 125 दोन प्रकारांत उपलब्ध – स्टँडर्ड आणि डिलक्स

• आकर्षक किंमत रू. 73,336 (स्डँडर्ड प्रकारासाठी, एक्स- शोरूम गुरुग्राम, हरियाणा)

नवी दिल्ली, 24 जून 2020 – #अक्वाएटरिझोल्यूशन सह पुढे जात होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने आज आधुनिक, शहरी स्कूटर – उठावदार, आकर्षक, पूर्णपणे नवी ग्राझिया 125 बीएसव्हीआय लाँच केली.

नवी ग्राझिया 125 सादर करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘फॉर्म, स्टायलिंग आणि तंत्रज्ञानामध्ये लक्षणीय बदल करत सादर करण्यात आलेली ग्राझिया 125 बीएसव्हीआय तरुणाईचे लक्ष वेधून घेईल. नवी ग्राझिया ट्रेंड सेटिंग ग्राहकांसाठी स्टायलिश पद्धतीने प्रवासाचा नवा अनुभव देणारी असेल. होंडाचे जागतिक स्तरावर मान्यता पावलेले  ईएसपी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण नवी वैशिष्ट्ये आणि आकर्षक स्टायलिंग या गाडीला खास बनवतात. ’

जबरदस्त बुद्धीमत्ता

नवी ग्राझिया 125 आपले अत्याधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये, बोल्ड डिझाइन्स यांसह रायडर्सचे लक्ष वेधून घेईल.

ग्राझिया 125 मध्ये भारत स्टेज व्हीआयचे पालन करणारे, होंडाचे विश्वासार्ह 125 सीसी पीजीएम- एफआय एचईटी (होंडा इको तंत्रज्ञान) इंजिन बसवण्यात आले असून त्याला एनहान्स्ड स्मार्ट पॉवरची (ईएसपी) जोड देण्यात आली आहे.

नवी ग्राझिया 125 भविष्यातील तंत्रज्ञान वर्तमानात आणणारी असून हे तंत्रज्ञान म्हणजेच अचूक आणि अभिजात एनहान्स्ड स्मार्ट पॉवर (ईएसपी) भारताला जागतिक स्तरावर नेईल.

एनहान्स्ड स्मार्ट पॉवरमध्ये (ईएसपी) पुढील गोष्टी एकत्रित करण्यात आल्या आहेत.

–  होंडाच्या अनोख्या एसीजी स्टार्टरमुळे भारतीय रस्त्यांवर #अक्वाएटरिझोल्यूशन सुरू झाले आहे, कारण या स्टार्टरमुळे इंजिन धक्क्याशिवाय आणि वाहन चालवताना करंट निर्माण करण्यासाठी आणि बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एसी जनरेटरने सुरू होते. यामुळे पारंपरिक स्टार्टर मोटरची गरज भासत नाही आणि पर्यायाने गियर मेशिंगचा आवाजही येत नाही.

–  दोन मेकॅनिकल वैशिष्ट्यांमुळे इंजिन कमी प्रयत्नांत सुरू होते – एक म्हणजे थोड्याशा उघडलेल्या एक्झॉस्ट व्हॉल्व्ह्जसह (कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या सुरुवातीला) डिकॉम्प्रेशनच्या प्रभावी वापरामुळे तसेच स्विंग बॅक वैशिष्ट्यांमुळे जे इंजिनला किंचित विरूद्ध दिशेने फिरवते आणि त्यामुळे पिस्टनला ‘रनिंग स्टार्ट’ मिळतो. पर्यायाने कमी उर्जेसह इंजिन सुरू करणे सोपे होते.

–    सुधारित टम्बल फ्लो – होंडाने इंटिग्रेटेड डाय- कास्टिंग प्रक्रियेसह जगातील पहिले टम्बल फ्लो तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान इनलेट पोर्ट शेपचा पूर्ण वापर करत टम्बल फ्लोची निर्मिती करते आणि रिव्हर्स फ्लोचा वापर करून अतिरिक्त भाग समाविष्ट न करता ज्वलन घडून येते.

–    नवी प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (पीजीएम- एफआय) – हे इंजिन डेटा तसेच सहा बुद्धीमान सेन्सर्सकडून (इंजिन ऑइल तापमान सेन्सर, इंजिन वेग सेन्सर, ऑक्सिजन सेन्स, हवेच्या दाबाशी संबंधित सेन्सर, हवेच्या तापमानाशी संबंधित सेन्सर, थ्रॉटल पोझिशन सेन्सर) सतत मिळणाऱ्या अभिप्रायाच्या मदतीने सिलेंडरमध्ये योग्य प्रमाणात इंधन भरते आणि पर्यायाने अखंडित आणि एकसारखे पॉवर आउटपुट मिळते.

–    घर्षणात घट – ऑफसेट सिलेंडर, कॉम्पॅक्ट वेट क्रँकशाफ्ट आणि पिस्टनमुळे एकंदर इंजिन घर्षणात घट होते. त्यातून इंधनाची कार्यक्षमता वाढते. पिस्टन कुलिंग जेट्स कार्यक्षमता सुधारतात व इंजिनचे जास्तीत जास्त तापमान कायम राखतात.

–    नव्या ग्राझिया 125 मध्ये आयडलिंग स्टॉप यंत्रणा देण्यात आली आहे, जी ट्रॅफिक लाइट किंवा इतर छोट्या थांब्यावर आपोआप इंजिन बंद करते. त्यामुळे इंधनाचा अनावश्यक वापर होत नाही व पर्यायाने उत्सर्जनात घट होते. थ्रॉटलच्या मदतीने इंजिन सहजपणे परत सुरूही करता येते.

जबरदस्त आरामदायीपणा आणि सोयीस्करपणा

नवे डीसी हेडलॅम्प अखंडित प्रकाश देतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस खराब रस्त्यांवर आणि कमी वेग असताना गाडी चालवणे सोयीस्कर होते.

यामध्ये अनोखा बहुपयोगी स्विच देण्यात आला आहे. याच्या मदतीने सीट अनलॉक करता येते तसेच बाहेरील बाजूल असलेल्या इंधाच्या टाकीचे झाकणही उघडता येते.

दुहेरी काम करणारा इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच खालच्या बाजून दाबल्यानंतर इंजिन सुरू होते आणि वरच्या बाजूने दाबल्यानंतर इंजिन बंद होते.

इंटिग्रेडेट हेडलॅम्प बीम आणि पासिंग स्विचमुळे एकाच स्विचच्या मदतीने हाय/लो बीम आणि पासिंग सिग्नल देणे शक्य होते.

इंजिन कट- ऑफची जोड असलेले साइड स्टँड इंडिकेटर साइड स्टँडवर लावला असताना इंजिन सुरू होऊ देत नाही आणि प्रवास आणखी सोपा व सोयीस्कर होतो.

इंटेलिजंट इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले – पूर्णपणे डिजिटल मीटरला नवे इंटेलिजंट इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे, ज्यावर डिस्टन्स टु एम्प्टी (टाकीत असलेल्या इंधनाच्या जोरावर गाडी किती अंतर जाऊ शकेल), सरासरी इंधन कार्यक्षमता (एकंदर इंधन कार्यक्षमता दर्शवणारा डिस्प्ले) आणि प्रत्येक प्रवासासाठी प्रत्यक्षातील इंधन कार्यक्षमता इत्यादी माहिती देण्यात येते. या मीटरवर थ्री स्टेप इको इंडिकेटर, घड्याळ, सर्व्हिसिंगची आठवण करणारा इंडिकेटर तसेच मायलेजशी संबंधित इतर माहितीही दिली जाते.

थ्री स्टेप अडजस्टेबल रियर सस्पेंशनमुळे रायडरला त्याचा आरामदायीपणा आणि रस्त्याच्या परिस्थितीनुसार तीन टप्प्यांत आपली रायडिंगची पसंती निवडता येते.

अतिरिक्त ग्राउंड क्लियरन्ससह (+16एमएम) देण्यात आलेले टेलिस्कोपिक सस्पेंशन नव्या ग्राझिया बीएसव्हीआयवरील प्रवास आणखी आरामदायी बनवतो.

सीटखालील स्टोअरेजची नव्याने रचना करण्यात आली असून पुढील बाजूस देण्यात आलेला अधिक मोठा, उच्च दर्जाचा ग्लोव्ह बॉक्स जास्त उपयुक्त झाला आहे.

ग्राझिया 125 मध्ये इक्विलायझर तंत्रज्ञानासह कॉम्बी- ब्रेक सिस्टीम (सीबीएस) बसवण्यात आले आहे. या होंडाच्या आधुनिक कॉम्बी ब्रेक सिस्टीममधील (सीबीएस) अनोखा इक्विलायझर फक्त डाव्या बाजूचा लिव्हर दाबून एकाच वेळेस पुढील आणि मागच्या चाकांमध्ये उर्जेचे समान वितरण करतो. यामुळे ब्रेकिंग अंतर कमी होतो आणि नेहमीच्या ब्रेकिंगच्या तुलनेत जास्त चांगला समतोल साधला जातो.

जबरदस्त स्टाइल

नवा स्प्लिट एलईडी पोझिशन लॅम्प ग्राझिया 125 ला जास्त आक्रमक लूक देतो. नवा टेल लॅम्प, जेटपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेले रियर विंकर्स आणि स्प्लिट ग्रॅब रेल आधुनिक प्रतिमा तयार करतात.

साइड पॅनेलवरील थ्रीडी लोगो एम्बलेम आणि फ्लोअर पॅनेलवरील होंडाचे असामान्य बॅजिंग ग्राझिया 125 चे रुप आणखी खुलवतात. प्रीमियम ब्लॅक अलॉय व्हील्स गाडीच्या एकंदर डिझाइन आणखी भर घालतात.

आवश्यक विश्वासार्हता

या क्षेत्रात होंडाने पहिल्यांदाच सहा वर्षांची खास वॉरंटी पॅकेज (3 वर्षांची नेहमीची + 3 वर्षांची अतिरिक्त वॉरंटी) ग्राझिया 125 वर दिले आहे.

किंमती, प्रकार आणि आकर्षक रंग

ग्राझिया 125 या आठवड्यापासून पाठवली जाईल. तिचे स्टँडर्ड व डिलक्स असे दोन प्रकार असून ते मॅट सायबर यलो, पर्ल स्पार्टन रेड, पर्ल सायरन ब्लू आणि मॅट अक्सिस ग्रे या चार उठावदार रंगांत उपलब्ध आहेत. ग्राझिया 125 बीएसव्हीआय रू. 73,336 मध्ये (स्टँडर्ड प्रकार, एक्स शोरूम गुरुग्राम, हरियाणा) उपलब्ध करण्यात आली आहे.

*स्टँडर्ड प्रकारात उपलब्ध

**डीलक्स प्रकारात उपलब्ध

डिजिटल शिक्षणातुन अध्यापन : कॅम्प मधील शाळांचा प्रयोग यशस्वी

0

पुणे :
 भारतात वेगाने पसरत असणा-या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे कॅम्प परिसरातील शाळांनी  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होउ नये म्हणून डिजिटल  शिक्षणावर भर दिला व विद्यादानाचे कार्य ऑन लाईन  चालू ठेवले आहे.अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल,अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल,इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज येथे  दिनांक 16 एप्रिल पासून विद्यार्थ्यांना या झूम अॅपद्वारे शिक्षण देण्याचे कार्य आजतागायत चालू आहे. इयत्ता 6 वीं ते 11 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना यादवारे शिक्षण देण्यात येते. प्राथमिक वर्गात विद्यार्थ्यांच्या सहभाग सुरुवातीला इंटरनेट च्या अडचणींमुळे  कमी होता  तरी नंतर वाढला. 8 वी ते 11 वीं पर्यंत 60 ते 70 विदयार्थी ऑनलाईन वर्गात उपस्थित असतात. इयत्ता नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना तीन तास प्रतिदिन शिक्षण दिले जाते,तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. 

दिनांक 16 जून रोजी अॅग्लो उर्दू बॉईज हायस्कूलच्या सर्व शिक्षकांना गूगल क्लासरूम चे प्रशिक्षण देण्यात आले,अशी माहिती  मुख्याध्यापक परवीन शेख यांनी दिली.विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे केले जावे.यासंबंधी तसेच शिक्षणाची प्रक्रिया आणखी मनोरंजक व प्रभावी कसे करू शकाल याचे उत्तम मार्गदर्शन यावेळी शिक्षकांना मिळाले.गूगल क्लासरूम मध्ये पाठ्यपुस्तकाचा वापर,यू टूबचा वापर ,तर विद्यार्थ्यांना गृहपाठ देणे,त्यांचे गूणदान करणे यासंबंधी प्रशिक्षण सर्व शिक्षकांना देण्यात आले.शिक्षकांचा चांगला  प्रतिसाद यासाठी मिळाला.शिक्षकांना प्रशिक्षण देताना सामाजिक अंतर ठेवण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले.
 पारंपरिक अध्यापन पद्धतीपेक्षा ऑनलाईन अध्यापन पद्धती नवीन असली तरी विद्यार्थ्यांनी जुळवून घेतले आहे,अशी माहिती अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल च्या मुख्याध्यापक आयेशा शेख यांनी दिली.येथे सहावी ते दहावी पर्यंतचे १ हजारहून अधिक विध्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.
इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये के जी पासून बारावी पर्यंत चे विद्यार्थी ऑन लाईन शिक्षण घेत आहेत.विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आठवड्याचे वेळा पत्रक तयार करण्यात आले आहे,अशी माहिती मुख्याध्यापक मोहम्मद इब्राहिम जहागीरदार यांनी दिली.व्हिडीओ,पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन,वर्क शीट च्या माध्यमातून अध्यापन केले जात आहे. 
ऑन लाईन अध्ययन आणि अध्यापनासाठी सर्व सुविधा महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या शाळांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.कोरोना साथीच्या काळात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.मात्र,जीवन शिक्षणाच्या दृष्टीने पारंपरिक पद्धतीला पर्याय नसल्याचे मत अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी व्यक्त केले.लवकरात लवकर कोरोनाची साथ आटोक्यात येऊन विध्यार्थ्यांच्या पारंपरिक शिक्षणाला सुरुवात व्हावी,असेही ते म्हणाले. 

राज्य शासनाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार मधुवंती दांडेकर यांना जाहीर

0

मुंबई, दि. 24 जून : राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री श्रीमती मधुवंती दांडेकर यांची निवड करण्यात आली आहे. रु. ५  लाख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची निवड केली.

श्रीमती मधुवंती दांडेकर यांची संगीत नाटकांमधली कारकीर्द तब्बल ५५ वर्षांची आहे. आज वयाच्या ७२ व्या वर्षीही त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. अभिजात शास्त्रीय व अभिजात मराठी संगीत नाटकांचा वारसा मिळालेल्या मधुवंती दांडेकर यांना गायनाची आवड लहानपणापासून होती. शालेय वयापासूनच त्यांनी गायन व नाट्य स्पर्धांमधून अनेक पारितोषिकं मिळवली होती. स्वरराज छोटा गंधर्व, संगीतभूषण पंडित राम मराठे, पंडित ए.के. अभ्यंकर, पंडित यशवंतबुवा जोशी यांसारख्या ज्येष्ठ व श्रेष्ठ गुरूंकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे  शिक्षण घेतले. सुमारे 25 मराठी संगीत नाटकांमधून त्यांनी अनेक उत्तमोत्तम भूमिका केल्या.  तसेच गुजराती व उर्दू नाटकांतूनही त्यांनी काम केले. मधुवांतीताईंनी अनेक नामांकित संस्थांच्या नाटकात ज्येष्ठ कलावंतांबरोबर भूमिका केल्या. मधुवंतीताई आजही संगीत व नाट्यक्षेत्रात मोठ्या उत्साहाने व आस्थेने कार्यरत आहेत.

शासनाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल श्रीमती दांडेकर यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी अभिनंदन केले आहे. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी  श्रीमती फैय्याज, श्री.प्रसाद सावकार, श्रीमती जयमाला शिलेदार, श्री.अरविंद पिळगावकर, श्री.रामदास कामत, श्रीमती कीर्ती शिलेदार, श्रीमती रजनी जोशी, श्री.चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर, श्रीमती निर्मला गोगटे आणि श्री.विनायक थोरात यांना प्रदान करण्यात आला आहे.

आधुनिक उत्पादन प्रणालीतील संशोधन संधी ‘ विषयावर आंतरराष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम

0

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजन 
पुणे :
‘आधुनिक उत्पादन प्रणालीतील संशोधन संधी ‘ विषयावर आंतरराष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ला बुधवारी प्रारंभ झाला .सात  दिवसीय या  फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम चे    आयोजन भारती अभिमत  विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे करण्यात आले होते.  भारती अभिमत  विद्यापीठ अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव अध्यक्ष स्थानी होते. 
जर्मनीचे तज्ज्ञ डॉ अलेक्झांडर श्वांट ,डॉ के बी सुतार ,डॉ पी व्ही जाधव ,डॉ व्ही के कुर्तकोटी यांनी मार्गदर्शन केले. देश विदेशातून ७०० संशोधक,अभियंते ,प्राध्यापक सहभागी झाले. 
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ आनंद भालेराव म्हणाले,’  कोरोना साथीच्या काळात सर्व जगावर दुष्परिणाम झाले आहेत. जगाच्या अर्थकारणाची  रचनाच बदलत आहे. अशावेळी भारताला आत्मनिर्भर व्हायचे असेल तर प्रशिक्षित मनुष्यबळ ,प्रगत तंत्रज्ञान एकत्र आणून पूरक वातावरण तयार करावे लागेल.उत्पादन क्षेत्रासाठी भारत नेहमीच पहिली पसंती राहिलेला आहे. यापुढे गुणवत्तेची कास धरून अजून उत्तम उत्पादने जगाच्या बाजारपेठेत आणावी लागतील. त्यातून भारत हा ‘ मॅन्युफॅक्चरिंग हब ‘ म्हणून उदयास येईल. गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी गुणवत्तापूर्ण प्रक्रिया पुढे आणाव्या लागतील. ग्राहकांच्या कमी झालेल्या  मागण्या आणि इतर घटकांचा विचार करावा लागेल. हायब्रीड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी चा वापर करावा लागेल ‘.
जर्मनीतील   हायब्रीड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी क्षेत्रातील  ‘आधुनिक उत्पादन प्रणालीतील संशोधन संधी ‘ विषयावर  जर्मनीचे तज्ज्ञ डॉ अलेक्झांडर श्वांट यांनी मार्गदर्शन केले. फॅकल्टी प्रोग्रॅमचे सह प्रमुख डॉ के बी सुतार यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक डॉ पी व्ही जाधव यांनी आभार मानले. डॉ व्ही के कुर्तकोटी यांनी सूत्र संचालन केले. 

कोरोना योद्ध्यांचा ‘आयएसए’तर्फे सन्मान

0

रितू छाब्रिया, अरुणा कटारा, विनोद रोहानी आदी प्रमाणपत्र देऊन सन्मानित
पुणे : कोरोनाच्या संकटकाळात समाजातील पीडित घटकांना आपल्या कार्यातून, सेवेतून दिलासा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना इंडियन स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया, होप फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा कटारा, साहिल केदारी, डॉ. बंटी धर्मा, डॉ. पीटर दलवानी, सिंध की पुकारचे संपादक विनोद रोहानी, अमृत केदारी, कुमार शिंदे, जितू अडवाणी, दिनेश दोडाणी, दिनेश होले, महेश सुखरामानी, श्याम पंजवानी, रोहित महाजन, विकास भांबुरे, ज्योती मलकानी आदीचा उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.

असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश हेमनानी म्हणाले, “कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून लढा देत आहेत. त्यासोबतच समाजातील अनेक संस्था, व्यक्ती लॉकडाऊनमुळे पीडित लोकांना दिलासा देण्यासाठी झोकून देऊन काम करीत आहेत. त्यांच्या कार्याचा उचित गौरव व्हावा, तसेच त्यांच्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, यासाठी संस्थेतर्फे या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला आहे.”

भोर तालुक्यातील कोंढरी गावचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे दि.24 : – पुणे जिल्हयामध्ये भोर तालुक्यातील कोंढरी गावाचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज येथे सांगितले.
भोर तालुक्यातील कोंढरी येथे गत पावसाळयात भूस्खलनाची घटना घडली होती. यादृष्टीने कोंढरी गावची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी केली. यावेळी आमदार संग्राम थोपटे, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, भोरचे उप विभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसिलदार अजित पाटील, भोरचे पोलीस निरिक्षक श्री.मोरे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे,पंचायत समिती सदस्य रोहन बाठे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोंढरी गावच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळण्यासाठी गतीने पाठपुरावा करण्यात येत आहे. या गावच्या पुनर्वसनामुळे 40 कुटूंबांचे कायमस्वरुपी पुनर्वसन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार संग्राम थोपटे यांनी आंबेगाव तालुक्यातील माळीण गावच्या धर्तीवर कोंढरी गावचे पुनर्वसन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी भोर तालुक्यातील प्रशासनातील विविध विभागांचे विभागप्रमुख, ग्रामस्थ उपस्थित होते.
यानंतर वेल्हा तालुक्यातील अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेल्या घोल गावाची जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी पाहणी केली. अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेल्या या गावातील वैद्यकीय सुविधा, रस्ते, विद्युत पुरवठा, दूरसंचार सेवा अशासारख्या मुलभूत सोईसुविधांविषयीच्या अडचणींबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी सरपंच कोंडीराम मोरे यांनी गावातील समस्यांबाबत तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. घोल गावच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी सांगितले. यावेळी घोल प्रशासनातील विविध विभागांचे प्रमुख तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

एकाच दिवशी ४१६१ रुग्णांना घरी सोडले

0
मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.२४: राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४१६१ एवढ्या विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत ७३ हजार ७९२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात आज ३५३० रुग्ण घरी सोडण्यात आले. राज्यात मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दि. २९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून सुमारे १५ दिवसानंतर दि. १५ जून रोजी ५०७१ एवढे रुग्ण बरे होऊन एकाच घरी सोडण्यात आले. आज त्यानंतर पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५१ टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टिव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर कायम आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आज सोडण्यात आलेल्या ४१६१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ३५३० (आतापर्यंत एकूण ५१ हजार ७३७) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ३५५ (आतापर्यंत एकूण ११ हजार २९९), नाशिक मंडळात १३९ (आतापर्यंत एकूण ३६५२), औरंगाबाद मंडळ २१ (आतापर्यंत एकूण २५६२), कोल्हापूर मंडळ २४ (आतापर्यंत एकूण १३८३), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ५३२), अकोला मंडळ २६ (आतापर्यंत एकूण १४४८), नागपूर मंडळ ५९ (आतापर्यंत एकूण ११७९) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

६२ हजार ३५४ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. २४ : राज्यात आज ४१६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  एकूण संख्या ७३ हजार  ७९२ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५१.६४ टक्के एवढे झाले आहे. आज कोरोनाच्या ३८९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६२ हजार ३५४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज सोडण्यात आलेल्या ४१६१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ३५३० (आतापर्यंत एकूण ५१ हजार ७३७) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ३५५ (आतापर्यंत एकूण ११ हजार २९९), नाशिक मंडळात १३९ (आतापर्यंत एकूण ३६५२), औरंगाबाद मंडळ २१ (आतापर्यंत एकूण २५६२), कोल्हापूर मंडळ २४ (आतापर्यंत एकूण १३८३), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ५३२), अकोला मंडळ २६ (आतापर्यंत एकूण १४४८), नागपूर मंडळ ५९ (आतापर्यंत एकूण ११७९) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख २३ हजार ७७५ नमुन्यांपैकी १ लाख ४२ हजार ९०० नमुने पॉझिटिव्ह (१७.३४ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५७ हजार  ९४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ५८१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २०८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ७२ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत.  सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.७२ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले ७२ मृत्यू हे मुंबई मनपा-३८, ठाणे मनपा-१, कल्याण-डोंबिवली मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-१, नाशिक मनपा-४, जळगाव-१, नंदूरबार-१, पुणे-२, पुणे मनपा-१०, पिंपरी-चिंचवड मनपा-२, सोलापूर मनपा-४, रत्नागिरी-२, जालना-१, उस्मानाबाद-२, अकोला मनपा-२, बुलढाणा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (६९,५२८), बरे झालेले रुग्ण- (३७,००८), मृत्यू- (३९६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८,५४८)

ठाणे: बाधित रुग्ण- (२७,८८०), बरे झालेले रुग्ण- (११,७७८), मृत्यू- (७७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५,३२८)

पालघर: बाधित रुग्ण- (४०२८), बरे झालेले रुग्ण- (११५८), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७७७)

रायगड: बाधित रुग्ण- (२८८९), बरे झालेले रुग्ण- (१७९३), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००१)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (५१७), बरे झालेले रुग्ण- (३६१), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३१)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१८२), बरे झालेले रुग्ण- (१४६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

पुणे: बाधित रुग्ण- (१७,४४५), बरे झालेले रुग्ण- (९४०७), मृत्यू- (६३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४०१)

सातारा:  बाधित रुग्ण- (८७६), बरे झालेले रुग्ण- (६६८), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६६)

सांगली: बाधित रुग्ण- (३०३), बरे झालेले रुग्ण- (१७६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११८)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७५८), बरे झालेले रुग्ण- (७००), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२३६८), बरे झालेले रुग्ण- (१२२४), मृत्यू- (२३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१२)

नाशिक: बाधित रुग्ण- (३१०४), बरे झालेले रुग्ण- (१७२०), मृत्यू- (१९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९१)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (३०१), बरे झालेले रुग्ण- (२३१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८)

जळगाव: बाधित रुग्ण- (२५००), बरे झालेले रुग्ण- (१२९६), मृत्यू- (१९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००६)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (९०), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

धुळे: बाधित रुग्ण- (५८८), बरे झालेले रुग्ण- (३५३), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८६)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३८६७), बरे झालेले रुग्ण- (१९९२), मृत्यू- (२०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६७४)

जालना: बाधित रुग्ण- (३९५), बरे झालेले रुग्ण- (२६४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)

बीड: बाधित रुग्ण- (१०२), बरे झालेले रुग्ण- (७०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२९)

लातूर: बाधित रुग्ण- (२३७), बरे झालेले रुग्ण- (१४९), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५)

परभणी: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२३१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०)

नांदेड: बाधित रुग्ण- (३०१), बरे झालेले रुग्ण (१७८), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१८६), बरे झालेले रुग्ण- (१३५), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३)

अमरावती: बाधित रुग्ण- (४७१), बरे झालेले रुग्ण- (३२८), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)

अकोला: बाधित रुग्ण- (१३९१), बरे झालेले रुग्ण- (७९१), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५८)

वाशिम: बाधित रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१७९), बरे झालेले रुग्ण- (१२०), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२५५), बरे झालेले रुग्ण- (१६१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६)

नागपूर: बाधित रुग्ण- (१३६६), बरे झालेले रुग्ण- (९४२), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४११)

वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

भंडारा: बाधित रुग्ण- (७७), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१०३), बरे झालेले रुग्ण- (८५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (६४), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (६०), बरे झालेले रुग्ण- (४७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (११८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९७)

एकूण: बाधित रुग्ण-(१,४२,९००), बरे झालेले रुग्ण- (७३,७९२), मृत्यू- (६७३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१५),ॲक्टिव्ह रुग्ण-(६२,३५४)

 (टीप-आज राज्यात एकूण नोंदविलेल्या २०८ मृत्यूंपैकी ७२ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि १३६ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ८२,सोलापूर -१३,नाशिक -१०, नवी मुंबई -९, जळगाव -८, कल्याण डोंबिवली -५, ,ठाणे -३, उल्हास नगर -१, भिवंडी -१, पिंपरी चिंचवड -१, अकोला -१, सातारा -१ व इतर राज्यातील १ यांचा समावेश आहे. हे १३६ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

मास्क न घालणाऱ्यांना महापालिका करणार ५०० रुपये दंड

0

पुणे- महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शहर आणि महापालिका हद्दीत कुठेही अगदी सरकारी कार्यालयात सुद्धा मास्क विना कोणी नागरिक ,अधिकारी दिसले तर त्यांना तातडीने ५०० रुपये दंड (तडजोड शुल्क ) आकारून तो जागेवर त्यांच्याकडून वसूल करावा असे आदेश महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयातील सर्व प्रमुख ,उप आणि सहायक आरोग्य निरीक्षक यांना दिले आहेत . अन्यथा त्यांच्यावर भा.द वी १८८ नुसार कारवाई करायचे अधिकार हि या महापालिका अधिकारी,कर्मचारी वर्गाला दिले आहेत .

लग्न समारंभासाठी या आहेत अटी आणि शर्ती …

0

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने लग्नसमारंभ साजरा करण्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अटी शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन अधिसूचना निर्गमित केलेली आहे.
कोविड १९ विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केलेली असून त्यास ३० जून २०२० पर्यंत मुदतवाढ आणि टप्पे निहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्यासाठी “मिशन बिगीन अगेन” (MISSION BEGIN AGAIN) बाबत अधिसूचना जाहीर केलेली आहे.
कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन दरम्यान, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ ५० लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तथापि, हे लग्न समारंभ कोणकोणत्या ठिकाणी पार पाडता येतील याबाबतचा उल्लेख सदर आदेशामध्ये नाही. ५० लोकांच्या मर्यादेत घराच्या परिसरात लग्न समारंभ साजरे करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे ५० लोकांच्या मर्यादेतच सोशल डिस्टसिंग पाळून खुले लॉन, विना वातानुकुलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह येथे समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्याबाबतच्या विविध मागण्या शासनाकडे प्राप्त झाल्या. या सूचना व मागणी विचारात घेता तसेच आता पावसाळा सुरु झाला असल्यामुळे खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग तसेच कोव्हीड -१९ संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास नागरिकांकडून मागणी प्राप्त झाल्यास परवानगी देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, शासन अधिसूचना सुधारणा पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात लागू करण्यात आल्या असून
सर्व संबंधित प्रशासकिय विभाग यांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी. पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात महाराष्ट्र शासन अधिसूचनेत पुढील अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात येईल.
अटी व शर्ती :
१. लग्न समारंभाच्या ठिकाणी सर्व नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील.
२. लग्न समारंभाच्या ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई आहे आणि त्याचे उल्लंघन केल्यास सदरील व्यक्ती दंडनीय कारवाईस पात्र राहील.
३. लग्न समारंभाच्या ठिकाणी जास्तीत जास्त ५० व्यक्ती उपस्थित राहतील व त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर (सोशल डिस्टेंसिंग) सहा फूट राखणे बंधनकारक राहील.
४. लग्न समारंभाच्या ठिकाणी गुटखा, पान, तंबाखू खाण्यास व मद्यपानास सक्त मनाई राहील.
५. लग्न समारंभाची जागा, वारंवार हाताळले जाणारे भाग निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

६. लग्न समारंभाच्या आत व बाहेर जाण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हात धुणे,सॅनिटायझरचा वापर या करिता संंबंधित विनावातानुकूलित मंगल कार्यालय /हॉल/खुले लॉन/सभागृह व्यवस्थापक/मालक यांच्यामार्फत व्यवस्था करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत वातानुकूलित सेवेचा (एसी) वापर करण्यात येऊ नये.
७. लग्न समारंभाच्या ठिकाणी बसण्याच्या जागा सामाजिक अंतर राहील अशा पद्धतीने खुणा (मार्किंग) करुन निश्चित करण्यात याव्यात.
८. लग्न समारंभाच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापक / मालक यांच्या मार्फत करण्यात यावी.
९. लग्न समारंभाच्या ठिकाणी नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले तर सदर भागातील खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह तात्काळ बंद करण्यात येतील.

या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना विरूध्द भारतीय साथ अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, व भारतीय दंड संहिता (४५ऑफ १८६०) कलम १८८ आणि या संदर्भातील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.