Home Blog Page 2527

हर्षवर्धन पाटील आता रणांगणात ,म्हणाले ,सारी वीजबिले माफ करा …

पुणे-करोना विषाणूमुळे सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प झालेला असताना नागरिकांच्या हातामध्ये पैसा नाही. त्यातच राज्यात अनेक भागात महावितरणकडून नागरिकांना जादा वीज बिलं दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातही असा प्रकार निदर्शनास आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि प्रशासनाच्या कारभाराविरोधात रास्ता पेठेतील महावितरणच्या प्रवेशद्वाराबाहेर भाजपाच्यावतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले.जनतेच्या जिव्हाळ्याचे आणि प्रत्येक माणसापर्यंत पोहोचतील असे प्रश्न घेऊन आता हर्षवर्धन पाटील हे जिल्ह्यातच नव्हे तर शहरात देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीला आता धोबी पछाड करण्यासाठी सरसावणार असल्याचे या निमित्ताने भाजपच्या राजकीय वर्तुळातून सांगितले गेले. शहरातून काकडे,बापट यांच्यासह जिल्ह्यातून त्यांना भाजपची मोठी कुमक या साठी लाभेल असे बोलले जातेय .

भाजपा नेते हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. कंदील घेऊन आणि लाईट बिलं जाळून यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.पाटील म्हणाले, “मागील चार महिने राज्यातील जनता करोना विषाणूच्या संकटाला सामोरे जात आहे. या काळात रोजगार नसल्याने त्यांच्या हातात पैसा नाही. त्यात महावितरणकडून अनेक नागरिकांना जादा बिलं देण्यात आली आहेत. आता ही बिलं ते कशी भरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही जादा बिलं सरकारने मागे घ्यावीत.” जनतेचे लाईट बिल माफ करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

कोरोनाबाधितांसाठी खासगी रुग्णवाहिका, वाहने ताब्यात घेणार: शासन निर्णय जाहीर

0

मुंबई, दि.१ : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज आरोग्य विभागाने जारी केला आहे. अधिग्रहित केलेले रुग्णवाहक वाहन जास्त गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येईल.

राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी त्यांची संख्या वाढविण्याकरिता जिल्ह्यांमध्ये रुग्णालये, स्वयंसेवी संस्था यांच्याकडील रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतानाच गरज भासल्यास, खासगी वाहन पुरवठादारांची वाहने देखील रुग्णवाहक वाहन म्हणून वापर करण्याचा निर्णय झाला आहे.

कोरोनाकाळात खासगी रुग्णवाहिकांसाठी रुग्णांकडून अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन खासगी रुग्णवाहिका आणि वाहने अधिग्रहित करताना त्यांचा दर निश्चित करून ते उपलब्ध करून देण्यात येईल. अधिग्रहित केलेल्या रुग्णवाहिका आणि वाहने  २४ तास उपलब्ध राहतील. रुग्णवाहिका अधिग्रहित करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी  (महापालिका क्षेत्र वगळता ) आणि महापालिका आयुक्त (महापालिका क्षेत्रात) राबवतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या दरानुसार भाडे तत्वावरील वाहनांचे दर निश्चित करावे. त्यासाठी वाहनाचे भाडे, प्रत्यक्ष प्रवासाचे अंतर (किलोमीटर्स) याचा विचार करण्यात यावा, असे या शासन निर्णयात म्हटले आहे.

या रुग्णवाहिका वाहन चालकासह, इंधनाच्या खर्चासह भाडे तत्वावर घेता येतील अथवा जेथे वाहन चालक उपलब्ध नसेल तेथे रुग्णवाहिका मासिक भाडेतत्वावर ताब्यात घेण्यात येतील. त्यांना स्थानिक परिवहन मंडळ, राज्य परिवहन, चालक पुरवठा कंपन्या, स्थानिक प्रशासनाकडील वाहनचालकांच्या सेवा अधिग्रहित करून चालक उपलब्ध केले जातील. या रुग्णवाहिकांच्या इंधनाचा खर्च स्थानिक प्रशासनामार्फत केला जाईल.

लक्षणे नसलेल्या तसेच इतर रुग्णांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने या अधिग्रहित केलेल्या वाहनांमध्ये किरकोळ बदल करून रुग्णवाहक वाहन म्हणून त्याचा वापर करावा व आवश्यकतेनुसार वाहने ताब्यात घ्यावीत, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी शासन निर्णयात म्हटले आहे.

● जिल्हाधिकाऱ्यांनी अधिग्रहित केलेल्या रुग्णवाहिका व वाहनांव्यतिरिक्त अन्य खासगी रुग्णवाहिका व वाहनांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत किमान दर निश्चित करण्यात यावा. या दराप्रमाणे खासगी वाहनचालक आकारणी करीत आहेत हे तपासण्यासाठी तपासणी यंत्रणा तयार करण्यात येईल.

● जादा दर आकारणीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त त्यांच्या कार्यक्षेत्रात यंत्रणा तयार करतील.

● अधिग्रहित केलेली रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध असेल

● रुग्णवाहिकेत स्मार्ट फोन, इंटरनेट सुविधा असेल. टोल फ्री १०८ रुग्णवाहिकेचे ॲप त्यात असेल ते या क्रमांकाच्या प्रणालीशी जोडले जाईल.

● रुग्णवाहिकेला संपर्कासाठी रुग्णांना १०८ क्रमांक किंवा स्थानिक प्रशासनाने सुरू केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल. 

८ ते १२ जुलैपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा

0

सुमारे १७ हजार रोजगारांच्या संधी उपलब्ध

मुंबई, दि. १ : मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुशल तसेच अकुशल उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. ८ ते १२ जुलै, २०२० दरम्यान करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी जवळपास १६ हजार ७२६ रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने केले आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्रे, मुंबई यांचेकडील मुंबई शहर, मुंबई उपनगर तसेच ठाणे येथील विविध पायाभूत प्रकल्पांमध्ये गवंडी, सुतारकाम, फीटर (स्टील फिक्सींग), फीटर (बार बेंडींग), वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन अशा कुशल तसेच अकुशल स्वरुपाच्या रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

सदर संधी‍ जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना उपलब्ध होण्याकरिता मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांमार्फत दिनांक ०८ जुलै, २०२० ते १२ जुलै, २०२० दरम्यान ऑनलाईन पद्धतीने  ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.  या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये नियोक्त्यांकडून उमेदवारांच्या मुलाखती स्काईप, व्हॉट्सॲप आदींच्या माध्यमातून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचे नियोजन आहे.

सदरच्या ऑनलाईन मेळाव्यामध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदविलेल्या रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्डने लॉगिन करावे व पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा यावर क्लिक करून मुंबई उपनगर जिल्ह्यातील उमेदवारांनी मुंबई उपनगर जिल्हा निवडून उपलब्ध कंपनीला नोकरीसाठी खालीलप्रमाणे अर्ज करावा.

अशी करावी नोंदणी

Employment ->Job Seeker login with Registration no.& Password->Pandit Dindyal Upadhyay Job Fair->District Mumbai Suburban->(View Job Fair Detail) Vacancy Listing (View Company Vacancies)->Click on I Agree-> Apply for suitable Vacancies या पद्धतीने सहभाग नोंदवावा. मुंबई शहर जिल्ह्यातील उमेदवारांनी मुंबई शहर जिल्हा निवडून उपलब्ध कंपनीला नोकरीसाठी पुढीलप्रमाणे अर्ज करावा. Employment ->Job Seeker login with Registration no.& Password->Pandit Dindyal Upadhyay Job Fair->District Mumbai City->(View Job Fair Detail) Vacancy Listing (View Company Vacancies)->Click on I Agree-> Apply for suitable Vacancies. सदर मेळाव्यामध्ये उमेदवार एकापेक्षा जास्त कंपनीचा पर्याय निवडू शकतो.

वेब पोर्टलवर रोजगार मेळाव्यात सहभाग घेताना काही अडचण उद्भवल्यास मुंबई शहरच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी दूरध्वनी क्र. २२६२६३०३ किंवा या ई-मेल-mumbaicity.employment@gmail.com आणि मुंबई उपनगरच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी दूरध्वनी क्र. २२६२६४४० किंवा या ई-मेल-mumbaisuburbanrojgar@gmail.com वर संपर्क साधावा.

पती-पत्‍नीमधील नोक-झोक’हप्‍पू की उलटन पलटन’येतेय नवे किस्से घेऊन …

अॅण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील पडद्यावरील जोडी हप्‍पू व राजेशची भूमिका साकारणारे योगेश त्रिपाठी व कामना पाठक ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी बनली आहे. त्‍यांच्‍यामधील हास्‍यपूर्ण पती-पत्‍नी तूतू-मैंमैं, मजेदार वन-लायनर्स आणि अद्वितीय विनोदीशैलीसाठी ते ओळखले जात आहेत . यंदाच्‍या ‘इंटरनॅशनल जोक डे’निमित्त या दोघांमधील काही विलक्षण संवादांची यादी बनवली गेली  . हप्‍पू सिंगची सुरूवात बॉलिवुडच्या  ‘पंछी बनू उडता फिरू’ या गाण्याने झाली. राजेश त्‍याचे खरे हेतू जाणून घेत त्‍वरित प्रतिक्रिया देते ‘घरमें ही उडो, सामनेवाली पीहार गयी हुई है.” गाताच हप्‍पू ओशाळतो. राजेश तिच्‍या माहेरी जाते आणि हप्‍पूसिंग राजेशला कॉल करतो, ती कॉल घेत म्‍हणते, ”कितनी बार कहा है की अब तुम्‍हारे घर नही आयूंगी! फिर रोज फोन क्यूं करते हो?” आणि हप्‍पू अगदी प्रेमळपणे राजेशला म्‍हणतो, ”ये सुनकर अच्‍छा लगता है इसलिए.”

दुस-या एका सीनमध्‍ये राजेश घरी परत येते आणि हप्‍पू तिला विचारतो, ”कहां गयी थी?” राजेश प्रतिक्रिया देत म्‍हणते, ”ब्‍लड डोनेट करने गयी थी.” हप्‍पू त्‍याच्‍या थट्टेबाज स्‍टाइलमध्‍ये म्‍हणतो, ”मेरा खून पीते-पीते ओव्‍हरफ्लो होने लगा क्‍या जो अब खून बेचने भी लगी हो?” तो नकळतपणे तिला खून-चूसने-वाली म्‍हणतो! हप्‍पू व राजेश यांच्‍यामधील भांडण मालिकेला अधिक उत्‍साहपूर्ण बनवतात. पण यामध्‍ये गोष्‍टी काहीशा वेगळ्या आहेत. एका रोमँटिक क्षणामध्‍ये हप्‍पू वेष बदलत राजेशला म्‍हणतो, ”सेल्‍फ-कंट्रोल कोई तुमसे सीखे.” राजेश अभिमानाने मान्‍य करते, पण त्‍यानंतर विचारते, ”पर किस बात का सेल्‍फ-कंट्रोल?” हप्‍पू अगदी हप्‍पूसारखाच वागत म्‍हणतो, ”दिन भरमें इतना मीठा खाती हो पर हमारे लिए कभी शब्‍द मीठा नही निकलने देती.” सीधा बोलती-बंद! आणखी एका हास्‍यपूर्ण एपिसोडमध्‍ये हप्पू दरोगा सिंग आणि त्‍याची धर्मपत्‍नी राजेश यांच्‍यामधील बोलती-बंद स्थितीला दाखवण्‍यात आले, जेथे राजेश म्‍हणते, ”मेरी शराफत ही थी की मैंने आपको देखे बगैर शादी कर ली.” हप्‍पू त्‍वरित प्रतिक्रिया देत म्‍हणतो, ”मेरी शराफत तो देखो, की मैंने देख कर भी इनकार नही किया.” 

हास्‍यजनक संवाद म्‍हणण्‍याबाबत सांगताना योगेश त्रिपाठी म्‍हणाला, ”प्रेक्षकांनी नेहमीच दबंग राजेश आणि तिचा पती दरोगा हप्‍पू सिंग यांच्‍यामधील विनोदी संवादांची प्रशंसा केली आहे आणि त्‍यांना ते संवाद आवडले देखील आहेत. पडद्यामागे देखील कामना आणि मी एकमेकांची मस्‍करी करतो. कॉमेडी आणि पती-पत्‍नीमधील ही नोक-झोक आमच्‍यामध्‍ये नैसर्गिकपणे येते. अर्थातच, संवादाचा सराव करण्‍यासाठी बरीच तयारी करावी लागते. ही मालिका विनोदी असल्‍यामुळे खूप आव्‍हानात्‍मक देखील आहे. तुमची इच्‍छा असताना देखील तुम्‍ही संवाद बोलताना हसू शकत नाही. पण सर्वात मजेशीर बाब म्‍हणजे काही संवाद असे आहेत की ते बोलताना आम्‍ही स्‍वत:हून हसायला लागतो. आम्‍हाला या लॉकडाऊनदरम्‍यान हे संवाद आणि आमच्‍या मालिकेसाठी शूटिंगची खूप आठवण आली. शूटिंगदरम्‍यान आम्‍ही खूप मौजमजा करत आलो आहोत. आता आम्‍ही पुन्‍हा एकदा शूटिंगसाठी तयारी करत आहोत. यामुळे  ‘हप्‍पू की उलटन पलटन’चे नवीन मजेदार एपिसोड्स अॅण्‍ड टीव्‍हीवर.रसिकांना पाहायला मिळणार आहेत

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 10 हजार 93

पुणे विभागातील 17 हजार 54 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 28 हजार 248 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 1 :- पुणे विभागातील 17 हजार 54 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 28 हजार 248 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 10 हजार 93 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 551 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.37 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.90 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 23 हजार 321 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 13 हजार 731 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 824 आहे. कोरोनाबाधित एकूण 766 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 425 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.88 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.28 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 274 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1186, सातारा जिल्ह्यात 19, सोलापूर जिल्ह्यात 35, सांगली जिल्ह्यात 23 तर कोल्हापूर जिल्ह्यात 11 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1050 रुग्ण असून 740 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 265 आहे. कोरोनाबाधित एकूण 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 2 हजार 644 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 624 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 753 आहे. कोरोना बाधित एकूण 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 383 रुग्ण असून 239 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 132 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 850 कोरोना बाधीत रुग्ण असून 720 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 119 आहे. कोरोना बाधित एकूण 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 78 हजार 352 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 74 हजार 846 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 506 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 46 हजार 270 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 28 हजार 248 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

भाजपचे ‘सेल्फीविथ कोरोना फायटर अभियान’ डॉक्‍टर दिनानिमित्त डॉक्टरांचा सन्मान

पुणे : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आपत्कालिन स्थितीत समाजाची निरंतर सेवा करणार्या व्यक्तिंचा सन्मान करण्याच्या उद्देशाने शहर भाजपच्या वतीने ‘सेल्फीविथ फ्रंटलाइन कोरोना फायटर अभियाना’चा शुभारंभ शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आला.

आज डॉक्टरदिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणार्या ५० हून अधिक डॉक्‍टरांचा भाजप कार्यालयात सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. भाजपचे स्थानिक स्तरावरील पदाधिकारी आपआपल्या प्रभागातील दोन हजारहून अधिक डॉक्‍टरांचा आणि अन्य क्षेत्रांतील योद्ध्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

मुळीक म्हणाले, ‘स्वत:ची किंवा कुटुंबाची पर्वा न करता प्रसंगी जीवावर उदार होऊन डॉक्टर आपले समाजसेवेचे कार्य सेवाभावी वृत्तीने करीत असतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही समाजाची जबाबदारी आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरील ताण हलका करण्यासाठी आपण प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे.’

संघटन सरचिटणीस राजेश पांडे, उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांची भाषणे झाली. सरचिटणीस गणेश घोष यांनी सूत्रसंचालन, राजेश येनपुरे यांनी प्रास्ताविक आणि डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी आभार प्रदर्शन केले. युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे, उज्ज्वल केसकर, शाम सातपुते, मुकेश गवळी यावेळी उपस्थित होते.

कोकणातील लघु उद्योजकांसाठी नवीन संधी – उद्योगमंत्री सुभाष देसाई

0

मुंबई, दि. १ : आगामी काळात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग सुरू होणार आहेत, याद्वारे कोकणातील छोट्या-मोठ्या उद्योजकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले. कोकण उद्योग फोरमच्यावतीने ‘ग्रामीण उद्योगांतील संधी’ या विषयावरील वेबिनारमध्ये श्री. देसाई बोलत होते. मुंबई व परिसरातील सुमारे दोनशे छोटे-मोठे उद्योजक यात सहभागी झाले होते.

उद्योगाला चालना देण्यासाठी राज्यशासन सातत्याने प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून सध्या 70 हजार उद्योग झाले आहेत. त्याद्वारे सुमारे 16 लाख कामगार रुजू झाले आहेत. अलीकडेच राज्य शासनाने काही परदेशी कंपन्यांसोबत 24 हजार कोटींचे सामजंस्य करार केले आहेत. यातील बरेच उद्योग हे कोकणात सुरू होणार आहेत. याद्वारे कोकणातील लघु उद्योजकांसाठी नवीन संधी खुल्या होणार आहेत. त्याचा कोकणातील उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे श्री. देसाई म्हणाले.

राज्यशासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी 500 कोटी रुपयांची तरदूत केलेली आहे. त्यातील बहुतांश हिस्सा कोकणासाठी राखीव ठेवला आहे. सेवा उद्योगासाठी दहा लाख तर मोठ्या भांडवलासाठी पन्नास लाखांपर्यंत कर्ज काढता येईल. या दोन्ही योजनांमध्ये उद्योजकांचा हिस्सा केवळ 10 टक्के असेल. बाकीचे सर्व पैसे राज्य सरकार घालणार आहे. राज्यशासनाने हमी घेतल्याने बँकांकडून विनातारण कर्ज मिळणार आहे. या योजनेत कोकणातील तरुणांना मोठी संधी आहे.

ते पुढे म्हणाले, कोकणात कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. फळफळाव मोठ्या प्रमाणात आहे. यावर प्रक्रिया करणारे, साठवणूक करणारे उद्योग सुरू करावेत. याखेरीज समूह विकास योजना राबविली जात आहे. यासाठी दहा कोटी रुपये उपलब्ध आहेत. उद्योजकांनी एकत्र येऊन काम केल्यास फायदा होईल. अन्न प्रक्रिया उद्योगाला राज्य सरकारने चालना दिली आहे. अन्न आणि फळ प्रक्रिया उद्योग केल्यास त्यासाठी प्रशिक्षण देण्याची शासनाने सोय केली आहे.

नव्या उद्योजकांसाठी एमआय़डीसी तयार गाळे उपलब्ध करून देणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील नवउद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले आहे.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने तंत्रज्ञान क्षेत्रात अभिनव प्रयोग करणाऱ्या जिल्ह्यांना इनोव्हेशन डिस्ट्रिकचा दर्जा दिला जातो. महाराष्ट्रातून रत्नागिरी जिल्ह्याचा यासाठी विचार व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे श्री. देसाई म्हणाले.

याशिवाय रायगड जिल्ह्यातील नवीन एमआयडीसी मंजूर झाली आहे. य़ा ठिकाणी अनेक मोठे उद्योग सुरू होणार आहेत. विशेषतः अभिनव असे फार्मा पार्क या ठिकाणी सुरू केले जाणार आहे. कोकणातील पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाला चालना दिली जाईल, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

स्वयंपूर्ण खेड्यातूनच बनेल आत्मनिर्भर भारत- अविनाश धर्माधिकारी

पुणे : “भारताकडे सर्व प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. संशोधनाची जोड देऊन त्याचा स्थानिक पातळीवर कुशलतेने वापर केल्यास खेडी स्वयंपूर्ण बनतील. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठेत ब्रँड मिळवून दिला आणि खेडी स्वयंपूर्ण झाली, तर आगामी काळात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल,” असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.  
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाऊंटंट स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सीए स्थपना दिवसाच्या निमित्त आयोजित ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावरील व्याख्यानात (लाईव्ह वेबिनार) अविनाश धर्माधिकारी बोलत होते. युट्युबवरून प्रसारित झालेल्या या व्याख्यानावेळी ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष समीर लड्डा, सचिव-खजिनदार सीए काशिनाथ पाठारे, सीए जगदीश धोंगडे, सीए एस. बी. झावरे, सीए यशवंत कासार आदी उपस्थित होते.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, “जागतिक स्तरावर भारतीय बाजारपेठ सर्वात मोठी असून, ही आपली ताकद आहे. मागणी-पुरवठा याचा मेळ घालून स्थानिक उत्पादनांना प्राधान्य दिले, तर आपली अर्थव्यवस्था जलदगतीने सुधारेल. त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पना मांडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेले आर्थिक पॅकेज या संकल्पनेला बळ देणारे आहे. १३५ कोटीच्या बाजारपेठेत एकाच प्रकारचा जीएसटी आकारला तर स्वातंत्र्योत्तर वाटचालीतील मोठी क्रांती होईल. विदेशी विशेषतः चिनी वस्तू आणि सेवांचा वापर टाळण्यासह अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, लोकसंख्या आणि मागणी यावर अधिक विचार करण्याचा मंत्र मोदी यांनी दिला आहे. ‘ट्रेड फॅसिलिटेशन ऍग्रीमेंट’ झाले तर भारताला जागतिक व्यापारात ३०० बिलियन डॉलर्सचा वाटा मिळेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.”
खासगी क्षेत्राला सर्व सरकारी क्षेत्रे खुली करण्याचे धोरण अवलंबले जात आहे. मागणी-पुरवठा यावर आधारित बाजारपेठ चालेल. सरकार केवळ बाजारपेठ व्यवस्थित चालण्यासाठी नियमन करण्याच्या भूमिकेत असेल आणि ही अर्थव्यवस्थेसाठी महत्वाची बाब असणार आहे. तेव्हा भारतीय उद्योजकांनी बाजारपेठेची मागणी ओळखून वाटचाल करावी, असेही धर्माधिकारी यांनी नमूद केले. सीए अभिषेक धामणे यांनी प्रास्ताविकात सीए दिवसानिमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. सीए जगदीश धोंगडे यांनी स्वागत-परिचय करून दिला. सीए समीर लड्डा यांनी आभार मानले.

लालबागचा राजाकडून यंदा गणेशोत्सव रद्द

0

मुंबई-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जगप्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेश मंडळाने यंदाचा गणेशोत्सवाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोना परिस्थितीत राज्यातील स्थिती सर्वात वाइट आहे. अशात लालबागचा राजा मूर्तीची प्रतिष्ठापना करणार नाही तर केवळ ‘आरोग्योत्सव’ साजरा करणार आहे. यापूर्वीच अनेक गणेश मंडळांनी मूर्तीची उंची कमी करण्याचे निर्णय घेतले आहेत. परंतु, लालबागमध्ये यंदा मूर्तीच न बसवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. तरीही गणेशोत्वसाच्या 11 दिवसांमध्ये या ठिकाणी रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी यासारखे उपक्रम राबविले जाणार आहेत.

लालबागचा राजा गणेश मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी गणेशोत्सवाची रक्कम दान करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी सांगित्याप्रमाणे, “यावेळी गणेशोत्सव साजरे करणार नाही. तसेच गणेशोत्सवासाठी असलेले पैसे मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दान केले जाणार आहेत. यासोबतच, आम्ही एलओसी (नियंत्रण रेषा- भारत पाकिस्तान सीमा) आणि एलएसी (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा – भारत चीन सीमा) वर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणार आहोत.”

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले जात आहेत. अशात गणेशोत्सवात गर्दी टाळणे शक्य नाही. त्यामुळेच, लालबागचा राजा गणेश मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 87 वर्षांपासून लालबागमध्ये गणेशोत्सवाची परंपरा आहे. केवळ मुंबई आणि देशच नव्हे, तर परदेशातून सुद्धा भाविक लालबागच्या दर्शनासाठी येतात. पण, पहिल्यांदाच मूर्ती स्थापना आणि विसर्जनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वीच अनेक गणेश मंडळांनी मूर्तींची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईचा राजाची मूर्ती सुद्धा 22 फुटांची मूर्ती स्थापित न करता 3 फुटांची मूर्ती स्थापित करणार असे जाहीर करण्यात आले होते. यासोबतच, परळचा राजा गणेश मंडळाने सुद्धा आपली गणेश मूर्ती 23 फुटांची न ठेवता 3 फुटांची करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच, 101 वर्षांची परंपरा असलेल्या चिंचपोकळीचा चिंतामणी या गणेश मंडळाने सुद्धा पोलिस आणि प्रशासनासह लोकांची दग-दग टाळण्यासाठी मंडपातच मूर्ती घडवण्याचे ठरवले आहे.

अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदीक औषध ग्रामीण ५ कोटी जनतेस मोफत देणार

0

मुंबई, दि. १ – प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील सुमारे 5 कोटी जनतेस मोफत देण्यात येणार असल्याचे ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले. यासाठी औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.  

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त समितीने उपरोक्त औषधे तात्काळ आवश्यक त्याप्रमाणे कमीत-कमी कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करून खरेदी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. आयुष मंत्रालयाच्या सूचनेस अनुसरून आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे मोफत औषध जनतेला तत्परतेने पुरवावे. या कार्यासाठी जमा केलेल्या रक्कमेतून खरेदीचा खर्च भागविण्यात येईल व खर्च भागवून उर्वरित रक्कम ज्या-त्या जिल्हा परिषदांना जमा करण्यात येईल. ही प्रक्रिया व वाटप तीन आठवड्यामध्ये पूर्ण करावे, असेही जिल्हा परिषदांना कळविण्यात आले आहे, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. यासंबंधीचा विभागाचा शासन निर्णय व आरोग्य मंत्रालय यांचे शासन निर्णय जिल्हा परिषदांना आवश्यक कार्यवाहीस्तव पाठविण्यात आले आहेत. 

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमियोपॅथीक अर्सेनिक अल्बम औषध चांगली कामगिरी करते असे आयुष मंत्रालयाने परिपत्रक काढले आहे. त्यामुळे हे औषधेखरेदी करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागानेही घेतला होता. केंद्र व राज्य शासनाने प्रत्येक सर्व विभागांच्या अखर्चित निधीची माहिती घेण्याचे काम सुरू केले होते. ग्रामविकास विभागाने तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी व चौदाव्या वित्त आयोगाच्या रक्कमेवरील व्याज या निधीमधून राज्याच्या पातळीवरून ग्रामीण भागातील 5 कोटी लोकांना वितरणासाठी विभागाने अर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदीची निविदा काढली होती. परंतु, ज्या दरामध्ये औषधे मिळणे आवश्यक होते तो उद्देश सफल होऊ शकला नाही. त्यामुळे ही खरेदी प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. आता यासाठी औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

सुनी सुनी पंढरी ही माझी…

0

पंढरपूर – ‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी’ अशी महती असलेलली पंढरी आज सुनी सुनी दिसत होती. राज्यातील सकल संतांच्या पादुका पंढरीत वारीसाठी आल्या, पण त्यांच्यासमवेत दरवर्षी असलेला भक्तांचा प्रवाह नसल्यामुळे चंद्रभागेला जणू भाविकांची ओहोटी आल्यासारखे वाटत होते.दशमीला दरवर्षी अनेक संतांच्या समवेत सुमारे दहा लाख भाविक पंढरीत येतात. यंदा कोरोनामुळे ठराविक वाहनांमधून हरिनामाचा गजर करीत मोजके वारकरी आल्याने पंढरीचे रूपच पालटले. पंढरी सुनीसुनी होती. चंद्रभागेचा तीर रिकामा होता. पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू केल्याने रस्ते ओस पडले होते. जेथे या दिवशी रस्त्यावर चालणे शक्‍य नसते, तेथे शांतता होती.

आषाढी वारीसाठी प्रमुख सात संतांच्या पादुका मोजक्‍या वारकऱ्यांसमवेत मंगळवारी रात्री उशिरा दाखल झाल्या. मात्र लाखो वारकऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे पंढरीला भक्तिरंग आला नाही. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने पायी वारी रद्द करण्याचा निर्णय घेतला; तसेच संतांच्या पादुका थेट पंढरीला नेण्याची जबाबदारी घेतली. त्यानुसार, संतांच्या पादुकांसाठी एसटी बस देण्यात आल्या.

विठू माऊली च्या महापुजे समयी काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे (व्हिडिओ)

0

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं

पंढरपूर, दि. 1 जुलै:- महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, श्री. तेजस ठाकरे उपस्थित होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि सौ. अनुसया बढे (मु.चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन श्री. ठाकरे यांनी भाविकांना केले. वारकरी सांप्रदायाने शासनाच्या वतीने वेळोवळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेस शासनाच्यावतीने पाच कोटी रुपयांचा अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष साधना भोसले, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शिवाजीराव मोरे, माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले, पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.

जय हरी विठ्ठल..मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा संपन्न (व्हिडिओ)

0

पंढरपुर -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची शासकीय महापूजा झाली.

लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणारा आषाढी एकादशीचा सोहळा करोनाच्या संकटामुळे यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. करोनामुळे विविध नियम बंधनांमध्ये पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मानाचे वारकरी आणि ठराविक पुजारी यांच्या उपस्थितीत ही शासकीय पूजा पार पडली. तसेच सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यावेळी उपस्थित होते.

राज्यात कोरोनाच्या ७५ हजार ९७९ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री

0

मुंबई, दि.२९ : राज्यात आज कोरोनाच्या ४८७८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७५ हजार ९७९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज १९५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ९० हजार ९११ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.२ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख  ६६ हजार ७२३ नमुन्यांपैकी १ लाख ७४ हजार ७६१ नमुने पॉझिटिव्ह (१८.७ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७८ हजार ३३ लोक होम क्वारंटाईन आहेत. सध्या ३८ हजार ८६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २४५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ९५ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १५० मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.४९ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले ९५ मृत्यू हे मुंबई मनपा-३६, ठाणे-३, ठाणे मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा- ४, भिवंडी निजामपूर मनपा-३, वसई-विरार मनपा-२, नाशिक-२, नाशिक मनपा-१, जळगाव-५, पुणे-१, पुणे मनपा-५, पिंपरी चिंचवड मनपा-३, सोलापूर मनपा-२, कोल्हापूर-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-११, लातूर-१,अकोला-२, अकोला मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (७७,६५८), बरे झालेले रुग्ण- (४४,१७०), मृत्यू- (४५५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८,९२४)

ठाणे: बाधित रुग्ण- (३७,६३०), बरे झालेले रुग्ण- (१५,०४२), मृत्यू- (९५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,६३१)

पालघर: बाधित रुग्ण- (५८५८), बरे झालेले रुग्ण- (२६२१), मृत्यू- (१०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१२९)

रायगड: बाधित रुग्ण- (४२५४), बरे झालेले रुग्ण- (२१२७), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०२३)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (५९५), बरे झालेले रुग्ण- (४३५), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३३)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२१९), बरे झालेले रुग्ण- (१५४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१)

पुणे: बाधित रुग्ण- (२२,३२७), बरे झालेले रुग्ण- (११,२७०), मृत्यू- (७५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,३०५)

सातारा:  बाधित रुग्ण- (१०७६), बरे झालेले रुग्ण- (७२४), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०८)

सांगली: बाधित रुग्ण- (३७६), बरे झालेले रुग्ण- (२१७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४८)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८४६), बरे झालेले रुग्ण- (७११), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२४)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२६५१), बरे झालेले रुग्ण- (१४७३), मृत्यू- (२६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१२)

नाशिक: बाधित रुग्ण- (४२२६), बरे झालेले रुग्ण- (२२३२), मृत्यू- (२२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७७२)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (४३१), बरे झालेले रुग्ण- (२७३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४४)

जळगाव: बाधित रुग्ण- (३४१५), बरे झालेले रुग्ण- (१९१६), मृत्यू- (२३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६५)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१७५), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६)

धुळे: बाधित रुग्ण- (१०९४), बरे झालेले रुग्ण- (५४४), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९४)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (५३२८), बरे झालेले रुग्ण- (२३४९), मृत्यू- (२५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७२३)

जालना: बाधित रुग्ण- (५५२), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०४)

बीड: बाधित रुग्ण- (११८), बरे झालेले रुग्ण- (९१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)

लातूर: बाधित रुग्ण- (३३१), बरे झालेले रुग्ण- (१९१), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२)

परभणी: बाधित रुग्ण- (९९), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२७०), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

नांदेड: बाधित रुग्ण- (३४४), बरे झालेले रुग्ण (२३१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२१५), बरे झालेले रुग्ण- (१६९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६)

अमरावती: बाधित रुग्ण- (५६६), बरे झालेले रुग्ण- (४११), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२४)

अकोला: बाधित रुग्ण- (१५३६), बरे झालेले रुग्ण- (९७३), मृत्यू- (७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८६)

वाशिम: बाधित रुग्ण- (१०२), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२४५), बरे झालेले रुग्ण- (१४५), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२८५), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)

नागपूर: बाधित रुग्ण- (१४६८), बरे झालेले रुग्ण- (११४४), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०९)

वर्धा: बाधित रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६)

भंडारा: बाधित रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१२३), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (५५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (८९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६)

एकूण: बाधित रुग्ण-(१,७४,७६१), बरे झालेले रुग्ण-(९०,९११), मृत्यू- (७८५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१६),ॲक्टिव्ह रुग्ण-(७५,९७९)

 (टीप-आज राज्यात एकूण नोंदविलेल्या २४५ मृत्यूंपैकी ९५ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि १५० मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ५७, ठाणे मनपा, १५, भिवंडी -४२, कल्याण डोंबिवली-२, मीरा भाईंदर -४, ठाणे -३, पालघर -५, पनवेल -७, सोलापूर -६, औरंगाबाद -४, पुणे -३, नाशिक -१ आणि जळगाव -१ यांचा समावेश आहे. हे १५० मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

कौशल्य विकास विभागामार्फत आता ऑनलाईन रोजगार मेळावे

0

मुंबई, दि. 30 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. सध्याचा लॉकडाऊनचा कालावधी बघता प्रत्यक्ष रोजगार मेळावे घेता येणे शक्य नसल्याने विभागामार्फत आता ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

या मोहीमेंतर्गत राज्यात आतापर्यंत एकूण 14 ऑनलाईन व्हर्च्युअल रोजगार मेळावे झाले असून त्यास उद्योजक व उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन मेळाव्‍यांमध्‍ये एकूण 115 उद्योगांनी त्यांच्याकडे असलेली 12 हजार 322 रिक्‍तपदे अधिसूचित केली. 25 हजार 047 उमेदवारांनी ऑनलाईन भाग घेतला व त्यापैकी 1 हजार 211 उमेदवारांची निवड झाली असून इतर उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु आहे, अशी माहितीही मंत्री श्री.मलिक यांनी दिली.

कौशल्य विकास विभागाने बेरोजगार तरुणांना नोकरी आणि उद्योजकांना कुशल उमेदवार मिळवून देण्याच्या अनुषंगाने तयार केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाचा प्रभावीपणे वापर करून हे मेळावे घेतले गेले. पुणे, सातारा, औरंगाबाद, नागपूर, सांगली आणि ठाणे येथील जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयांनी प्रत्येकी 1 ऑनलाईन रोजगार मेळावा घेतला. नाशिक आणि यवतमाळ येथील कार्यालयांनी प्रत्येकी 2 तर उस्मानाबाद मॉडेल करिअर सेंटर यांनी 4 ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित केले.

मंत्री श्री.मलिक म्हणाले की, या ऑनलाईन मेळाव्यांमध्ये सर्व रोजगार इच्छूक व ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार संबंधित उद्योगांकडे मुलाखतींचे नियोजन करुन, संगणक प्रणालीद्वारे एसएमएस पाठवून अवगत करण्यात येते. तसेच त्यांच्या मुलाखती दूरध्वनी, व्हॉटस्ॲप, स्काईपद्वारे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष कंपनीमध्ये ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेतल्या जातात. यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सर्व बाबींचे समन्वय कौशल्य विकास कार्यालयांमार्फत केले जाते. महास्वयंम वेबसाईट यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यापुढील काळातही ऑनलाईन रोजगार मेळाव्‍याचे आयोजन करण्‍याबाबत कॅलेंडर तयार करण्‍यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

सर्व उमेदवार व उद्योग यांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे देऊ केलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचणी असल्यास आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री श्री.मलिक यांनी केले आहे.