Home Blog Page 2509

६० संगणक ऑपरेटर भरतीचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात …

0

पुणे- महापालिकेच्या सांखिकी विभागात संगणक ऑपरेटर भरतीच्या टेंडर प्रकरणात मोठा घोटाळा होत असल्याची चर्चा असून अपात्र ठेकेदारांना पात्र ठरवून टेंडर देण्याचा घाट घातला जात असल्याची माहिती मिळते आहे. प्रशासनाने मात्र या प्रकरणी सर्व काही नियमानुसार होत असल्याचा दावा केला आहे. आणि या टेंडर साठी कोणत्याही आमदार वा लोकप्रतिनिधीचा दबाव आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे

या प्रकरणाची हकीकत अशी कि ,सांखिकी विभागात  सहा महिने कालावधी साठी ६० संगणक ऑपरेटर भरतीचे ६८ लाखाचे टेंडर मागविण्यात आले होते . या साठी चौघांनी टेंडर भरले होते . . महापालिकेच्या नियम अटीत मात्र यातील दोन कंपन्या बसत नसताना त्यांना पात्र ठरविण्यात आल्याचा आरोप होतो आहे .   २ वर्षाचा अनुभव , शासकीय कामाचा अनुभव , भविष्य निर्वाह निधी आणि इएसआय  ची चलने अशा बाबी नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात यायला हवे होते  . पण प्रत्यक्षात चारही ठेकेदारांना पात्र करण्यात आले आहे . मर्जीतील ठेकेदाराला आणि एका लोकप्रतिनिधीच्या पीए ला काम देण्याच्या उद्देशाने जादुई कागदपत्रांची रेलचेल होऊ लागल्याची चर्चा यावर झडते आहे . 

लोकसेवा ई-स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के!

0

पुणे : दहावीचा सीबीएसई बोर्डाचा निकाल आज जाहीर झाला असून लोकसेवा ई-स्कूल पाषाणचा निकाल 100 टक्के लागला आहे. या परीक्षेला एकूण 48 विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये 26 मुले व 22 मुली होत्या. मिष्ठी रस्तोगी 96.6 टक्के गुण मिळवून प्रथम आली असून फ्रेंच भाषेत मिष्ठी रस्तोगी ला 100 पैकी 100 गुण मिळाले आहे. 
लोकसेवा ई-स्कूलमध्ये निलय दोषी 95.8 टक्के गुण मिळवून दुसरा तर, सोहम गारगोटे 95 टक्के गुण मिळवून तिसरा आला. एकूण विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. 22 विद्यार्थ्यांना 80 ते 90 टक्के गुणांच्या दरम्यान गुण मिळाले आहेत. 12 विद्यार्थ्यांना 70 ते 80 टक्के दरम्यान गुण मिळाले आहेत. 60 ते 69 टक्के गुणांच्या दरम्यान तीन विद्यार्थी आणि 50 टक्क्यांपेक्षा कमी गुण एका विद्यार्थ्याला मिळाले आहेत. इंग्रजी विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास 99, भाषा विषयात 100, गणितामध्ये 99, विज्ञानमध्ये 93 आणि सामाजिक शास्रामध्ये 98 गुण मिळाले आहेत.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, संचालिका निवेदिता मडकीकर, व्यवस्थापकीय संचालक दिनेशकुमार घोषाल आणि प्राचार्य डॉ. राजीव सेनगुप्ता यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पुणे विद्यापीठ चौकात चार टप्प्यांत वाहतुकीत बदल

0

पुणे – चतु:शृंगी वाहतूक विभागांतर्गत पुणे विद्यापीठ चौकातील आणि रेंजहिल्स येथील उड्डाणपूल पाडण्याचे काम 4 टप्प्यांत करण्यात येणार आहे. याच पार्श्‍वभूमीवर विद्यापीठ चौकामध्ये चार टप्प्यात वाहतुकीत बदल करण्यात येत आहेत. 15 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. याबाबत वाहतूक शाखेचे अपर पोलीस आयुक्‍त डॉ. संजय शिंदे यांनी आदेश जाहीर केले.

टप्पा -1
औंध रस्ता, बाणेर रस्ता, पाषाण रस्त्याकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
शिवाजीनगरकडून औंध रोड आणि बाणेर रोडकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. शिवाजीनगरकडून पाषाण रोडकडे जाणाऱ्या वाहनांनी विद्यापीठ ओव्हर ब्रीजवरून बाणेर रोडकडील बाजूने अभिमानश्री बाणेर चौकात डावीकडे वळून पाषाण रोडवर जाता येणार आहे.
सेनापती बापट रस्त्याकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
सेनापती बापट रस्त्याकडून पाषाण रस्ता, औंध रस्ता आणि बाणेर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी अनगळ लेनमार्गे गणेशखिंड गणपती मंदिरासमोरून विद्यापीठ चौकात येऊन पाषाण रस्ता, औंध रस्ता किंवा बाणेर रस्त्याकडे जाता येणार आहे.

टप्पा -2
औंध रस्ता, बाणेर रस्ता, पाषाण रस्त्याकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
शिवाजीनगरकडून औंध रोड आणि बाणेर रोडकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
शिवाजीनगरकडून पाषाण रोडकडे जाणाऱ्या वाहनांनी विद्यापीठ ओव्हर ब्रीजवरून बाणेर रोडकडील बाजूने अभिमानश्री बाणेर चौकात डावीकडे वळून पाषाण रोडवर जाता येणार आहे.
सेनापती बापट रस्त्याकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
सेनापती बापट रस्त्याकडून पाषाण रस्ता, औंध रस्ता आणि बाणेर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी अनगळ लेनमार्गे गणेशखिंड गणपती मंदिरासमोरून विद्यापीठ चौकात येऊन पाषाण रस्ता, औंध रस्ता किंवा बाणेर रस्त्याकडे जाता येणार आहे.

टप्पा -3
औंध रस्ता, बाणेर रस्ता, पाषाण रस्त्याकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
शिवाजीनगरकडून पाषाणकडे आणि बाणेरकडे जाणाऱ्या वाहनांनी रेंजहिल्स चौकातून, सेनापती बापट रस्ता जंक्‍शन, विद्यापीठ चौकात येऊन पाषाणकडे किंवा बाणेरकडे जाता येणार आहे.
शिवाजीनगरकडून औंधकडे जाणाऱ्या वाहनांनी रेंजहिल्स चौकातून सेनापती बापट रस्ता जंक्‍शन, विद्यापीठ चौकात येऊन बाणेर रस्त्याने बाणेर फाटा चौकात उजवीकडे वळून आयटीआय रस्त्याने औंधकडे जाता येता येणार आहे.

टप्पा -4
पाषाण रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी अभिमानश्री पाषाण चौकातून उजवीकडे वळून अभिमानश्री बाणेर चौकात मुख्य बाणेर रस्त्याने येऊन बाणेर रस्त्याने शिवाजीनगरकडे जाता येणार आहे.
औंध रस्ता आणि बाणेर रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
शिवाजीनगरकडून औंध रस्ता, पाषाण रस्ता आणि बाणेर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी रेंजहिल्स चौकातून सेनापती बापट रस्ता जंक्‍शन, विद्यापीठ चौकात येऊन औंध रस्ता, पाषाण रस्ता किंवा बाणेर रस्त्याकडे जाता येणार आहे.

उद्या १ वाजता बारावीचा ऑनलाईन निकाल

0

पुणे: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाकिंत प्रत देणे व पुनर्मल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र देणे यासाठीच्या अर्जांकरीता ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागांत एकाच वेळी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च कालावधीत घेण्यात आली होती.

राज्य मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार ऑनलाइन निकालानंतर विद्यार्थ्यांना विविध कामकाजासाठी शाळा, महाविद्यालय अथवा बोर्डाच्या कार्यालयात समक्ष जावून अर्ज करावा लागत होता. यंदा त्यात बदल करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालकांची गैरसोय आणि विभागीय मंडळाच्या कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा ऑनलाइन पद्धत राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार असून संबंधित परीक्षांचे ऑनलाइन निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी अर्ज करावे लागतात. या अर्जांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करणे आवश्‍यक आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याकरीता http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा लागणार आहे. या प्रक्रियेचे शुल्कही डेबिट व क्रेडीट कार्ड, युपीआय, नेट बॅंकींग या ऑनलाईन पध्दतीनेच भरावी लागणार आहे. मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांनी सूचनांनी दखल घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

0

पिंपरी :- पिंपरीच्या गोयल गंगा इंटरनैशनल स्कुल निकाल १०० टक्के लागला असून  स्कुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश  संपादन केले आहे . एकूण ११८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.  त्यातील सार्थक पवार याला ९८ टक्के, सोमेश्वर पाणीग्रही याला ९६.४ टक्के, वेदांत घोडके याला ९६.४ टक्के,  यूषिता कार्ला हिला ९५.६ टक्के ,आयुष्य सोमवंशी ९५.६ टक्के तर विधी बन्सल हिला ९५. ६ टक्के मिळाले आहे. 
११८ पैकी ७६ टक्के विद्यार्थ्यांना डिस्टींकशन मिळाले आहे. ११८ पैकी ३१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण  मिळवले आहेत. विशेष मुलांमधील ५ विद्यार्थ्यांनी ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. सार्थक पवार ,सोमेश्वर पाणिग्रही, विधी बन्सल आणि प्रभाव पटेल यांना गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत. अर्णव सोनावणे या विद्यार्थ्यांला संस्कृत मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत..    
शाळेच्या मुख्याध्यापिका भारती भागवाणी म्हणाल्या कि, “केवळ आमच्या मुलांचीच नाही तर देशभरातील विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी पाहून मला आनंद झाला. तुमच्या उज्ज्वल भविष्याची ही फक्त सुरुवात आहे. या पुढच्या आयुष्यात सर्वसामान्यांचे जीवन उंचावण्याची आणि देशाचे भविष्य घडविण्याची जबाबदारी आता तुमच्या मजबूत खांद्यांवर आहे हे नेहमी लक्षात ठेवा.

जागतिक युवा कौशल्य दिनी पाचशे जोरांचे प्रात्यक्षिक

0

जागतिक युवा कौशल्य दिनी पाचशे जोरांचे प्रात्यक्षिक. पुण्यातील शिक्षकाचा उपक्रम


पुणे :-जागतिक युवा कौशल्य दिनाचे ( १५ जुलै )औचित्य साधून फेस बुक लाईव्ह च्या माध्यमातून ५०० जोरांचे प्रात्यक्षिक सादर करण्याचा उपक्रम पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेतील शिक्षक प्रांजल अक्कलकोटकर यांनी केला. सलग दुसऱ्या दिवशी १६ जुलै रोजीही हा उपक्रम सुरू राहणार आहे.
कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर झालेल्या लॉक डाऊन च्या कालावधीत  जिम आणि अन्य क्रीडा केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत.परंतु पारंपरिक भारतीय व्यायाम हा घरच्या घरी देखील करता येतो.
या भारतीय व्यायाम परंपरेतून प्रेरणा घेऊन युवकांनी घरच्या घरी लॉक डाऊन मध्ये देखील बलोपासना चालू ठेवावी या उद्देशाने प्रांजल अक्कलकोटकर यांनी दि.१५जुलै रोजी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून ५०० जोरांचे प्रात्यक्षिक दिले.
सायंकाळी ६ ते ७  या वेळात हे प्रात्यक्षिक त्यांच्या वैयक्तिक फेसबुक अकाऊंट  वरून  दिले गेले. १६ जुलै रोजी ही हा उपक्रम चालू राहणार आहे. प्रांजल यांचा यापूर्वी १ हजार जोरांचा विक्रम झालेला असून शिव जयंती तसेच विजयादशमी चे औचित्य साधून ते ५०० जोरांचे प्रत्यक्षिक देत असतात.
भारतीय परंपरेतील दंड बैठका,सूर्यनमस्कार या सारखे व्यायाम प्रकार तरुणांनी जोपासावे हा या प्रात्यक्षिकामागील प्रमुख हेतू असल्याचे  त्यांनी सांगितले.
लॉक डाऊन च्या कालावधीत मनोबल आणि शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी अशा व्यायाम प्रकारांचा नक्की उपयोग होईल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती नाही ही समाधानाची बाब

0

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

मुंबई, : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेतील मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी वारंवार अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु, राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावी बाजू मांडली व विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून दिला, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात झालेल्या सुनावणीवर ते बोलत होते.

श्री.चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवर २७ जुलैपासून नियमित सुनावणी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. या सुनावणीत राज्य शासन भक्कमपणे बाजू मांडेल. शासनाच्या वतीने मुकूल रोहतगी व परमजितसिंग पटवालिया युक्तीवाद करणार असून, प्रख्यात वकिल कपिल सिब्बल व रफिक दादा हे मराठा आरक्षणाच्या बाजूने हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडणार आहेत.

आजच्या सुनावणीत वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास अंतरिम  स्थगिती न दिल्याबद्दल श्री.चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज करू नका

0

मुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्री, पर्यावरण मंत्र्यांना विनंती

वाघांच्या अधिवासाला धोका पोहोचण्याची शक्यता

मुंबई, : व्याघ्र संवर्धनाला खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले असून व्याघ्र प्रकल्पाचे यश आपण जगभर सांगतो ही गोष्ट लक्षात घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला खांडवा प्रस्तावित  रेल्वे गेज परिवर्तन या प्रकल्पाच्या बाहेरून  इतर पर्यायी भागातून  करावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रान्वये केली आहे. 

रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या अकोला ते खांडवा असे 176 किमी रेल्वे मार्गाला मीटर गेज मधून ब्रॉडगेज मध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला असून या रेल्वे मार्गाला लागून 23.48 किमीचे  रिअलाईनमेंटही करावे लागणार आहे. त्यामुळे हे रेल्वे मार्गाचे केवळ परिवर्तन राहणार नाही तर मार्गालगतच्या जागेचे पुन्हा आरेखन करावे लागणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्याऐवजी बाहेरून इतर पर्यायी मार्गाचे परिवर्तन करायचे ठरविले तर एकीकडे दुर्मिळ अशा वाघांच्या अधिवासाला धक्का लावण्याची गरज भासणार नाही आणि दुसरीकडे  जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांना तसेच आजूबाजूच्या 100 गावांना या नव्या ब्रॉडगेज मार्गाचा फायदा होईल असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे. 

मुख्यमंत्री म्हणतात की, 1973-74 मध्ये देशातील जाहीर करण्यात आलेल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांत मेळघाटचा प्रथम क्रमांक लागतो. 2768.52 चौ किमी एवढ्या क्षेत्रावर पसरलेला हा प्रकल्प जागतिकदृष्ट्या प्राधान्याने विकसित प्रकल्पांत मोडतो. प्रस्तावित ब्रॉडगेजमुळे स्वाभाविकच या भागातून मोठ्या प्रमाणावर रेल्वे वाहतूक वाढेल. परिणामत: प्रकल्पाच्या अगदी गाभ्यातील वन्य प्राण्यांच्या अधिवासाला अडथळा येण्याची शक्यता आहे. शिवाय या परिवर्तनामुळे रेल्वे गाड्यांचा वेगही वाढेल. मुळातच हा गाभा अबाधित व सुरक्षित ठेवण्यासाठी येथील 16 गावे आणि या गाभ्याबाहेरील 6 गावे इतर ठिकाणी पुनर्वसित केली आहेत. ही गावे या रेल्वे मार्गाच्या 10 किमी परीघातालीच होती. गावांचे  पुनर्वसन आणि प्राण्यांच्या अधिवासासाठी प्रयत्न केल्याने येथील वन्य जीव झपाट्याने वाढले.

भारतीय वन्यजीव संस्थेने देखील या भागातून रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज न करता इतर पर्यायी  भागातून करावे अशी सूचना केली आहे. केंद्रीय समितीने वन्यजीव राष्ट्रीय बोर्डास देखील मेळघाट प्रकल्पाच्या वान अभयारण्यातील 160.94 हेक्टर वन जमीन रेल्वे मार्ग परिवर्तनासाठी देण्याबाबत पुनर्विचार करावा असे म्हटले आहे. बोर्डाने राज्य शासनाला हा प्रस्ताव पाठवून विचार करावा असे कळविले आहे.

रेल्वे मार्गांचा विकास व्हायलाच पाहिजे पण तसे करतांना विशेषत: मेळघाटसारख्या ठिकाणी वाघांचे संवर्धन होणे आणि येथील पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे तितकेच महत्त्वाचे आहे, त्यामुळे ब्रॉडगेजसाठी पर्यायी मार्ग निवडावा असेही मुख्यमंत्री म्हणतात.   

जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास ६ महिन्याची मुदतवाढ

0

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नोंदणी करतेवेळी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ६ महिन्याची  वाढीव मुदत दिली जाईल, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) च्या विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा आहे.

मेडिकल आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना नोंदणी करतेवेळी जात पडताळणी प्रमाणपत्र जमा करणे गरजेचे आहे. प्रवेशासाठी नोंदणी केल्यानंतर दिलेल्या मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करायचे होते. मात्र लॉकडाऊन काळात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविणे विद्यार्थ्याना  गैरसोयीचे होत असल्याने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचा मोठा पेच निर्माण झालेला आहे अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांना मिळताच तातडीनं मुंबईत येऊन आदिवासी विकास, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व इतर मागास बहुजन कल्याण विभागाची सचिव स्तरावर तातडीने बैठक घेतली. या बैठकीत जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होता कामा नये यासाठी तातडीने या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून काल तातडीने संबंधित प्रस्ताव तयार करून आदिवासी विभागामार्फत माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यामळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यानाही जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात हे लक्षात घेऊन मराठा समाजासह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यांनाही का सूट देऊ नये हा प्रश्न उपस्थित करून सर्व विद्यार्थ्यांना सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे.

कुपोषण निर्मूलन उपाययोजनांसाठी बालकांची नियमित वजनमापे महत्त्वाची

0

– वजने घेण्याच्या कामात खंड पडता कामा नये – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

-अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही

मुंबई, : लहान बालकांचे योग्य पोषण होणे हा अंगणवाडी केंद्रांच्या कामामागील महत्त्वाचा उद्देश आहे. कुपोषण निर्मूलनासाठी बालकांचे नियमित वजन, उंची मापन करून वयानुरूप वाढ होते का हे पाहिले जाते, त्यामुळे कोरोना संक्रमणाचा कालावधी असला तरी आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना व सावधानता बाळगून या कामात खंड पडू दिला जाऊ नये. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांबाबत सकारात्मक विचार निश्चितच केला जाईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज दिली.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती या संघटनेच्या प्रतिनिधी एम. ए. पाटील आणि अन्य सदस्यांनी ॲड.ठाकूर यांना भेटून निवेदन सादर केले. याप्रसंगी एकात्मिक बाल विकास योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो उपस्थित होत्या.

संघटनेने निवेदनामध्ये म्हटले आहे की, नागरी भागातील तसेच ग्रामीण भागातही कोरोनाचा होत असलेला संसर्ग पाहता लहान बालकांना अंगणवाडी केंद्रावर पाठविण्यास पालक इच्छुक नाहीत. तसेच काही अंगणवाड्या या शाळांच्या परिसरात असून शाळांमध्ये कोरोनाच्या कारणामुळे काही व्यक्तींना क्वारंटाईन  केलेले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अंगणवाडी सुरू करणे धोकादायक आहे. कोरोना परिस्थितीमध्ये लहान बालकांचे लसीकरण, योजनेअंतर्गत गृहभेटी, जमेल तेथे ॲपवर प्रशिक्षण, गृहभेटीच्या वेळी प्रशिक्षण, पोषण आहार वाटप अशी कामे अंगणवाडी सेविका तत्परतेने करीत आहेत. त्यामुळे अंगणवाडी केंद्रे चालू करण्याची सक्ती करू नये.

काही जिल्हे व महानगरपालिका क्षेत्रात प्रशासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रक्तशर्करा तपासणी, ताप, रक्तदाब, स्वॅब तपासणी अशी वैद्यकीय तांत्रिक कामे सोपविली असून ज्यामध्ये योग्य ज्ञान नसल्यामुळे  अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका संभवतो. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ही तांत्रिक कामे लावू नयेत. बदलापूर तसेच अन्य काही ठिकाणी या अशा कामांना नकार दिल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणीदेखील संघटनेने केली आहे. याविषयी मंत्री ॲड. ठाकूर यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदतकार्य मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी तातडीने दूरध्वनीवरून चर्चा केली.

बालकांची वजनमापे घेताना होणारा प्रत्यक्ष संपर्क टाळणे तसेच वजनकाटे घरोघरी घेऊन फिरणे प्रत्येक वजनानंतर सॅनिटाइझ करणे, एकच झोळीकाटा सर्व ठिकाणी वापरणे या मर्यादांमुळे कोरोनाचा धोका बालकांना आहे. त्यामुळे वजन, उंची घेण्याच्या कामाला स्थगिती द्यावी, प्रतिबंधित क्षेत्रात कलम १४४, काही ठिकाणी संचारबंदी असे प्रतिबंध असल्यामुळे अंगणवाडीच्या कामांना स्थगिती द्यावी. काही ठिकाणी खासगी जागांमध्ये असलेली अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास जागा मालकांनी विरोध केला आहे. या बाबींचाही विचार करावा. तसेच ५५ वर्षापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्ती, गरोदर, स्तनदा माता, व्याधीग्रस्त व्यक्तींना असलेला कोरोनाचा धोका पाहता या गटातील कर्मचाऱ्यांना अंगणवाडी कामातून वगळावे आदी मागण्यादेखील निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

महामार्ग ठेकेदारावर कडक कारवाई करा- पालकमंत्री उदय सामंत

0

अपघात झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्याही सूचना

सिंधुदुर्ग : कणकवली येथील पुलाच्या बांधकामाची भिंत कोसळणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणी ठेकेदारावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये त्यांनी या सूचना दिल्या.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर. पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सलीम शेख, ठेकेदार कंपनीचे श्री. गौतम, कन्सलटंट कंपनीचे प्रतिनिधी, संदेश पारकर, संजय पडते आदी मान्यवर उपस्थित होते.

महामार्गाच्या कामाची पूर्ण चौकशी करण्यासाठी श्री. पोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, नेमलेल्या समितीने आठ दिवसात आपला अहवाल सादर करावा. जो पर्यंत महामार्गाच्या संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट होत नाही, ठेकेदाराने  नियमानुसार काम केले आहे किंवा कसे याचा संपूर्ण अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत त्यांचे एकही बील मंजूर करू नये. कामातील बेजबाबदारपणाबद्दल ठेकेदारासह सर्व जबाबदार यंत्रणा व व्यक्ती यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. जिल्हाधिकारी यांनी यासाठी पाठपुरावा करावा. कणकवली येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यालय असावे, या ठिकाणी ठेकेदार कंपनी आणि कन्सल्टंट कंपनी यांचे जबाबदार अधिकारी कायम उपस्थित असावेत. सध्या पडलेल्या भिंतीची तात्पुरती दुरुस्ती सुरू करावी. पावसाळ्यानंतर ती भिंत पूर्ण काढण्यात यावी. ज्याठिकाणी सध्या भराव आहे त्या ठिकाणी पिलरचा पुल उभारण्यासाठीचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने केंद्राकडे सादर करावा. महामार्गावरील तसेच मोऱ्यांमधून योग्यरित्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी तातडीने कार्यवाही करून काम सुरू करावे. महामार्गावर एखादा अपघात झाल्यास ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. या संदर्भात दोन दिवसात पुन्हा बैठक घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिली.

या बैठकीपूर्वी पालकमंत्री श्री. सामंत यांनी स्वतः सर्व अधिकारी यांच्या समवेत कणकवली येथे महामार्ग पुलाची भिंत पडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी अधिकारी वर्ग व स्थानिकांकडून सर्व समस्या जाणून घेतल्या.

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून त्याच प्रवर्गातील योग्य व्यक्तीची नियुक्ती करावी – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

0

मुंबई, : राज्यातील यापूर्वी मुदत संपलेल्या व डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित गावात सरपंचपद सध्या ज्या प्रवर्गासाठी (उदा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग, महिला, सर्वसाधारण इत्यादी) आरक्षित होते त्याच प्रवर्गाच्या योग्य व्यक्तीच्या नावाची प्रशासक म्हणून शिफारस करण्याची दक्षता घ्यावी. त्यामुळे त्या घटकावर अन्याय होणार नाही, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व पालकमंत्र्यांना पत्राद्वारे कळविले आहे.

सद्यस्थितीत यापूर्वी मुदत संपलेल्या ज्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी नियुक्त आहेत अशा अधिकाऱ्यांची कोरोनाच्या कामांसाठी आवश्यकता असल्याने त्यांच्या नियुक्त्या रद्द करुन त्या ग्रामपंचायतीवर सुद्धा ग्रामपंचायत क्षेत्रातील योग्य व्यक्तिची प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे, असे मंत्री श्री.मुश्रीफ यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरु राहील याअनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेणे शक्य होत नाही. त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या १३ जुलै २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मुदत संपणाऱ्या व यापूर्वी मुदत संपलेल्या आणि सद्यस्थितीत ज्या ग्रामपचायतीवर प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी नियुक्त आहेत अशा ग्रामपंचायतीवर सुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन स्तरावरील अधिकार प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या नियुक्त्या संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने करावयाच्या आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राज्यातील १९ जिल्ह्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून २०२० दरम्यान समाप्त झाली असून १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधी दरम्यान समाप्त होत आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर संबंधित अध्यादेशान्वये प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे शासनाचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.

सन २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. १०, दिनांक २५ जून, २०२० अन्वये नैसर्गिक आपत्ती किंवा आणीबाणी किंवा युद्ध किंवा वित्तीय आणीबाणी किंवा प्रशासकीय अडचणी किंवा महामारी यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार पंचायतीच्या निवडणूका घेणे शक्य झाले नसेल तर राज्य शासनास राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अशा पंचायतीचा प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १५१ मधील पोटकलम १ मध्ये खंड (क) मध्ये तरतूद करण्यात आली आहे.

खाजगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध बेडची अचूक माहिती डॅशबोर्ड वर नोंदवावी- विशेष कार्यअधिकारी सौरभ राव

0
  • पुण्यातील सर्व प्रमुख रुग्णालयांचे व्यवस्थापक व डॉक्टरांशी साधला संवाद
  • खाजगी रुग्णालय व्यवस्थापनासाठी 5 समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती
  • रुग्णालयांनी कोविड रुग्णांसाठी अधिक बेड उपलब्ध करावेत
  • समाजातील भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया
  • लक्षणे नसणाऱ्या रुग्णांच्या गृह अलगीकरणावर भर द्यावा
  • प्रशासन आणि डॉक्टरांनी समन्वयाने काम करावे

पुणे, : कोरोना रुग्णांना बेड व वैद्यकीय सेवा वेळेत मिळवून देण्यासाठी सर्व खाजगी रुग्णालयांनी उपलब्ध बेड व अन्य आवश्यक माहिती डॅशबोर्ड वर अचूक व वेळेत नोंदवावी, अशा सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी केल्या. खाजगी रुग्णालय व्यवस्थापनासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या 5 समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात आज विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख रुग्णालयांचे व्यवस्थापक, संचालक व डॉक्टरांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, ससून हॉस्पिटलचे प्र.अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, तसेच पुण्यातील खाजगी रुग्णालयांचे व्यवस्थापक, पदाधिकारी व प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.

श्री. राव म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी सुरुवातीपासून आतापर्यंत प्रशासन कार्यरत आहे. पुण्यात 9 मार्चला पहिला रुग्ण आढळला. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी खाजगी रुग्णालयांनी आणखी बेड उपलब्ध करुन द्यावेत. दोन इमारती असणाऱ्या रुग्णालयांनी एक इमारत ‘कोविड हॉस्पिटल’ म्हणून घोषित करुन त्यानुसार उपचार सुरु करावेत. त्याचबरोबर लक्षणे नसणाऱ्या रुग्णांचे समुपदेशन करुन गृह अलगीकरणावर भर द्यावा. कोरोना बद्दल समाजात असणारे भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहनही श्री. राव यांनी केले.

प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनात समन्वय असणे गरजेचे आहे, असे सांगून श्री. राव म्हणाले, यादृष्टीने उपजिल्हाधिकारी दर्जाचे 5 समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात येत आहेत. रुग्णालयांतील बेड ची उपलब्धता, आकारण्यात येणारे शुल्क शासकीय नियमानुसार होत असल्याबाबत माहिती घेणे व अन्य वैद्यकीय सेवा सुविधांवर नियंत्रण ठेवण्याचे काम हे अधिकारी करतील, असे ते म्हणाले.

रुग्णालयांतील सेवा सुविधांची व बेड, व्हेंटिलेटर आदी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने डॅशबोर्ड वर बिनचुक व पारदर्शक माहिती नोंद करावी. रुग्णांकडून अवाजवी शुल्क आकारणी करु नये. तसेच रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा होता कामा नये, असेही श्री. राव यांनी सांगितले.

यावेळी रुग्णालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवा- सुविधा, रुग्णसंख्या वाढल्यास गृह विलगिकरणातील रुग्णांसाठीचा औषधोपचार, खाजगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणारे शुल्क, कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या ड्यूटीचे वेळापत्रक व त्यांची निवासव्यवस्था, उपलब्ध ऑपरेशनल बेड, नॉन ऑपरेशनल बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, औषधासाठा, कोविड व नॉन कोविड रुग्णांसाठी व्यवस्था आदी बाबींचा सविस्तर आढावा श्री. राव यांनी घेतला.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, कोविड रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना व अन्य योजनांचा लाभ मिळवून द्यावा, या रुग्णांसाठी अधिकाधिक बेड तयार करावेत, असे त्यांनी सांगितले. तसेच अवाजवी शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश दिले.

महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम व पवनीत कौर यांनी आवश्यक त्या उपाययोजना सांगितल्या.

यावेळी भारती हॉस्पिटल, जहांगीर, रुबी, केईएम, ईनलॅक्स, नोबेल, सह्याद्री, इनामदार, दिनानाथ मंगेशकर, पूना हॉस्पिटल, देवयानी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आदी रुग्णालयांच्या डॉक्टरांनी डॅश बोर्ड चे सादरीकरण केले. याबरोबरच रुग्णालयांना येणाऱ्या अडचणी मांडल्या, तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 18 हजार 196

0

पुणे विभागातील 31 हजार 390 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले; विभागात कोरोना बाधित 51 हजार 198 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे:- पुणे विभागातील 31 हजार 390 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 51 हजार 198 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 18 हजार 196 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 612 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 654 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.31 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण   3.15  टक्के आहे,अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
 पुणे जिल्ह्यातील 42 हजार 846 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 26 हजार 623 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 78 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 145 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 424 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.14 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 11 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 724, सातारा जिल्ह्यात 106, सोलापूर जिल्ह्यात 69, सांगली जिल्ह्यात 27 तर कोल्हापूर जिल्ह्यात 85 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
 सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 1 हजार 949 रुग्ण असून 1 हजार 108 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 775आहे. कोरोनाबाधित एकूण 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार 305 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 422 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 535 आहे. कोरोना बाधित एकूण 348 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत 698 रुग्ण असून 372 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 305 आहे. कोरोना बाधित एकूण 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 400 कोरोना बाधीत रुग्ण असून 865 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 503 आहे. कोरोना बाधित एकूण 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 57 हजार 428 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 52 हजार 541 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 887 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 841 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 51 हजार 198 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.     

( टिप :- दि. 15 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून तपासणी करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे,:- कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी रुग्णालयांच्या यंत्रणेने कोरोना बाधित रुग्णांशी संपर्कात आलेल्या अधिकाधिक व्यक्तींना शोधून त्यांची तपासणी करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.
पुणे, देहू आणि खडकी कटक मंडळाच्या (कॅन्टोनमेन्ट) वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, पुणे कटक मंडळाचे (कॅन्टोनमेन्ट) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंग हे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणत वाढत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोरोना बाधित रुग्णांशी संपर्कात आलेल्या व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यावर भर द्यावा. कोविड केअर सेंटर, संस्थात्मक विलगीकरण सुविधा वाढवाव्यात. रुग्णावर उपचार करतांना दर आकारणी शासकीय नियमानुसार करावी. रुग्णाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून द्यावा. रुग्णाला वैद्यकीय सुविधा वेळोवेळी पुरविण्यात याव्यात. कोरोना रुग्णांबाबचा अहवाल अद्ययावत करुन वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात यावा. क्वॉरन्टाईन केलेल्यांना क्वॉरन्टाईनचा शिक्का मारण्यात यावा. तसेच रुग्णालयांना मनुष्यबळ व इतर अडचणी असल्यास त्याबाबतची माहिती ताबडतोब जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी. माहिती सुसंगत असावी. प्रशासन सर्वेतोपरी सहकार्य करेल, असेही जिल्हाधिकारी राम म्हणाले.
यावेळी पुणे, देहू आणि खडकी कटक मंडळाचे (कॅन्टोनमेन्ट) वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.