Home Blog Page 2505

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांच्या सूचना गांभीर्याने घ्या : महापौर (व्हिडीओ)

0

पुणे-कोरोनाच्या संकट काळात सभासदांचा नागरिकांशी सातत्याने संपर्क आहे. त्यामुळे ते वास्तवाला धरून बोलतात. सभासदांच्या ज्या काही सूचना आहेत, त्या प्रशासनाने गांभीर्याने घ्याव्यात, असे स्पष्ट आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/288212205735282/

मंगळवारी पुणे महापालिकेची ऑनलाइन सभा घेण्यात आली. त्यामध्ये नगरसेवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.हडपसर मतदारसंघात 2 हजार 200 रुग्ण वाढले आहेत. येथे 3 क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले. मात्र, या केंद्रातील बाथरूम आणि टॉयलेटमध्ये पाणी नाही. आरोग्य प्रामुख्याने एकदाही भेट दिली नाही. राज्य शासनाने नियुक्त केलेले आयएएस अधिकारी सुद्धा आले नाहीत, अशा तक्रारी नगरसेवक योगेश ससाणे यांनी केल्या.

या प्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ससाणे यांनी अंगात फ्लेक्स घालून ‘हडपसर महापालिकेत आहे का ?’, असा सवाल उपस्थित केला. तर ही गंभीर बाब असल्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले. त्यावर राजकारण करू नका, महापौर मार्ग काढतील, असे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले म्हणाले.ऑगस्टमध्ये 4 किंवा 5 तारखेला महापालिकेची सर्वसाधारण सभा घेऊ. समस्या संदर्भात चर्चा करू, असे आश्वासन महापौरांनी दिले.

कोरोनाच्या संकट काळात अजूनही रुग्णालये लोकांकडून पैसे घेतात. त्यावर आपण काय कारवाई करणार आहात, असा सवाल नगरसेवक अविनाश बागवे यांनी उपस्थित केला.

रुग्णांकडून किती पैसे घ्यावेत हे शासकीय परिपत्रक रद्दीत जमा करून, खाजगी हॉस्पिटलची मनमानी सुरू आहे. राज्य शासनाने दर ठरवून दिले आहेत, असे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले.

तर, नागरिकांशी नगरसेवकांचा सातत्याने संपर्क असतो. आजही अपूर्ण यंत्रणा आहे. क्वारांटाईन सेंटर, बिल, बेडस याची गंभीरपणे दखल घ्या. ऑगस्ट महिन्यात शासनाच्या आदेशानुसार सविस्तर चर्चा करून सभासदांना संधी देऊ, असे आश्वासन महापौरांनी दिले.

पुणे शहरात कोरोना झपाट्याने वाढत आहेत. नगरसेवकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही नेहमीप्रमाणे महापौरांनी केले.

बुलढाणा जिल्ह्यात २१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन

0

बुलडाणा,  दि. 21 : जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना संसर्गग्रस्त रूग्णांचे प्रमाण वाढले आहे. संसर्गाची साखळी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी दि. २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२० च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण एक महिन्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे.तसेच प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी औषधालय, दवाखाने व दुध वितरण, संकलन वगळून इतर सर्व बाबींवर बंदी घालण्यात येत असून या दोन्ही दिवशी संचारबंदी लागू राहणार आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज दिले आहेत.   

तसेच सोमवार ते शुक्रवार या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात सर्व उद्योग, व्यवसाय आदी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू असणार आहेत. त्याच दिवशी दुपारी ३ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत दूध, वर्तमानपत्र वितरण आदी वगळता संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत कडक कर्फ्यु लागू असणार आहे. तसेच १ जुलै २०२० च्या आदेशामध्ये ज्या बाबी बंद राहतील, असे नमूद केले आहे. त्या बाबी दिनांक ३१ जुलै २०२० पर्यंत तशाच बंद राहतील. दवाखाने, औषधालय, वैद्यकीय तसेच अत्यंत आवश्यक मानवी कामासाठी बाहेर पडणारे नागरिक, आंतर जिल्हा वाहतूक / पासधारक वाहने व माल वाहतुक सुरू राहील. शहराच्या हद्दीबाहेरील सर्व पेट्रोलपंप २४ तास सुरू राहतील.

या काळात अत्यावश्यक असणाऱ्यांनीच बाहेर पडावे. विनाकारण कुणीही बाहेर फिरू नये. सर्वांनी चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रूमाल वापरावा. चेहऱ्यावर काही बांधलेले नसल्यास दंड आकारण्यात येईल. सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींना आवश्यकतेनुसार संचार करण्यास मुभा राहील. मात्र ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे. कोणत्याही परिस्थितीत दोन व्यक्तीमध्ये किमान तीन फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. जिल्ह्यामध्ये संचार करण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात येत असल्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी इंसीडेंट कमांडर यांची परवानगी आवश्यक असणार आहे. उपविभागीय दंडाधिकारी यांनी परवानगी देण्याकरीता विविध कार्यालयांचे मदतीने पासेस देण्याची व्यवस्था करावयाची आहे. तसेच ज्या विभागाशी संबंधीत कामकाज असेल त्या विभागास पासेस देण्याची परवानगी असेल. शासकीय कर्मचारी यांना कार्यालयीन कामासाठी ओळखपत्रावर परिभ्रमणास मुभा असणार आहे.

विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस विभाग कार्यवाही करणार आहे. अत्यावश्यक सेवा व वस्तु देणाऱ्या वाहनांवर पासेस, स्टीकर्स वाहनावर लावणे आवश्यक आहे. या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये, साथरोग अधिनियम १८९७ अंतर्गत व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये संबंधीतांवर कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 23 हजार 931 ,एकुण 1 हजार 959 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 40 हजार 99 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 65 हजार 989 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 21 :- पुणे विभागातील 40 हजार 99 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 65 हजार 989 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 23 हजार 931 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 959 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 794 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.77 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.97 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 54 हजार 13 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 34 हजार 371 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 18 हजार 244 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 12 हजार 695 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 803 व पुणे कॅन्टोंन्मेंट 198 , खडकी विभागातील 47 , ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 445 , जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 56 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 398 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 26 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 218 व पुणे कॅन्टोंन्मेंट 29 , खडकी विभागातील 26 , ग्रामीण क्षेत्रातील 66, जिल्हा शल्य चिकीत्सक 33 यांच्याकडील रुग्णांचा समावेश आहे. तसेच 581 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.63 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 75 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 563, सातारा जिल्ह्यात 3, सोलापूर जिल्ह्यात 202, सांगली जिल्ह्यात 54 तर कोल्हापूर जिल्ह्यात 253 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 554 रुग्ण असून 1 हजार 370 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 96 आहे. कोरोनाबाधित एकूण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 5 हजार 829 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 872 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 578 आहे. कोरोना बाधित एकूण 379 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 63 रुग्ण असून 439 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 590 आहे. कोरोना बाधित एकूण 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 2 हजार 530 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 47 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 423 आहे. कोरोना बाधित एकूण 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 3 लाख 32 हजार 256 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 3 लाख 27 हजार 264 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 992 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 60 हजार 534 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.

( टिप :- दि. 21 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

खोळंबलेली विकासकामे तातडीने सुरू करा -भाजपच्या शिष्टमंडळाची आयुक्तांकडे मागणी

0

पुणे, ता. २१ – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या स्थितीत गेल्या चार महिन्यांपासून खोळंबलेली पुणे महापालिकेची विकासकामे तातडीने सुरू करावीत अशी मागणी शहर भाजपच्या शिष्टमंडळाने आज मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, सिध्दार्थ शिरोळे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, मेधा कुलकर्णी, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, शहर भाजप प्रभारी गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

मुळीक म्हणाले, ‘गेल्या चार महिन्यांपासून शहरातील महापालिकेची सुरू झालेली आणि अर्धवट असलेली विकासकामे खोळंबली आहेत. त्यामध्ये मेट्रो, भामा आसखेड प्रकल्प, समान पाणीपुरवठा, बसेसची खरेदी, विविध ठिकाणी उड्डाणपूल, चांदणी चौकातील वाहतूक प्रकल्प, शिवणे-खराडी नदीपात्रातील रस्ता, कात्रज कोंढवा रस्ता, आंबील ओढा पुनर्विकास, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, समाविष्ट गावांतील विकासकामे, स्मार्ट सिटी प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना, ई लर्निंग प्रणाली या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. ही सर्व विकासकामे तातडीने सुरू करावीत अशी मागणी केली आहे.’

मुळीक पुढे म्हणाले, ‘कोरोना शी सक्षमपणे लढता यावे यासाठी केंद्र सरकारने राज्याला २८ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. विविध समाजघटकांच्या कल्याणकारी योजनांबरोबर आपत्ती निवारण निधीमध्ये १ हजार ६५१ कोटी आणि आरोग्यासाठी ४४८ कोटी असे २ हजार ५९ कोटी रुपये दिले आहेत. तसेच दहा लाख पीपीई किट, १६ लाख मास्क, औषधे अशी भरीव मदत केली आहे. पुणे महापालिकेच्या माध्यमांतून कोरोना निवारणासंदर्भात २०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. राज्याने मात्र महापालिकेला केवळ तीन कोटी रुपयांचा निधी देऊन बोळवण केली आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने राज्य सरकार सापत्न वागणूक देत आहे. शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने ५०० कोटी रुपयांची मदत करावी.’

खासदार बापट म्हणाले, ‘कोरोनाचा लढा केंद्र, राज्य, महापालिका अशा तीन पातळींवर लढावा लागणार आहे. केंद्राला राज्य सरकारला भरीव आर्थिक पॅकेज दिले असताना राज्य सरकार मात्र कुठलेच आर्थिक पॅकेज जाहीर करीत नाही. हातावर पोट असणारे कष्टकरी, श्रमिक, बाराबलुतेदार यांना जीवन कसे जगायचे हा मोठा प्रश्न पडला आहे. त्यांना नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत लागणार आहे. शासनाने जास्तीत जास्त मदत करणारे आर्थिक पॅकेज जाहीर करावे.’

खासदार बापट पुढे म्हणाले, ‘पुणेकर हा केंद्रबिंदू मानून आम्ही कार्यरत आहोत. कोरोनाबाधित रुग्णांना उपचार मिळावेत, ते बरे व्हावेत यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न आम्ही करीत आहोत. त्यासाठी आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाची गरज आहे. ठिकठिकाणी कोव्हिड निवारण केंद्र निर्मिती करण्यात येत आहे. महापालिकेच्या माध्यमांतून आवश्यक असणारी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषधे उपलब्ध करून देत आहोत. खासदार निधीतून महापालिकेला ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आमदारानीही निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्य सरकारने भरीव आर्थिक मदत करण्याची आवश्यकता आहे. हे करताना कुठलेही राजकारण केलेले नाही. करत नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. तसेच शहरातील विकासकामे तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे.’

गणेशखिंड, पुणे व लांडोरखोरी, जळगाव यांना जैविक वारसा क्षेत्र घोषित करणार – वनमंत्री संजय राठोड

0

मुंबई, दि. 21 : गणेशखिंड उद्यान पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे झोनल कृषी संशोधन केंद्र असून येथील 33.01 हेक्टर क्षेत्र व जळगाव शहरालगत लांडोरखोरी येथील 48.08 हेक्टर क्षेत्र जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

वनमंत्री श्री.राठोड पुढे म्हणाले, राष्ट्रीय जैविक विविधता मंडळ चेन्नई यांचेकडून जैविक वारसा स्थळे घोषित करण्याबाबत राज्यांना मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत.राज्यात नागपूर येथे जैविक विविधता मंडळ कार्यरत असून राज्यातील जैविक विविधतेबाबत ते कामकाज करीत आहे. यापूर्वी राज्यात ग्लोरी ऑफ आल्लापल्ली, गडचिरोली हे पहिले जैविक वारसा क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनंतर आता गणेशखिंड, पुणे व लांडोरखोरी, जळगाव हे नवीन जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

गणेशखिंड, पुणे

गणेशखिंड उद्यान पुणे येथे पिकांच्या 49 जाती, फळांच्या 23 जाती उपलब्ध आहेत. या उद्यानात 35 विविध क्षेत्र असून तेथे विविध वृक्ष व फळझाडे आहेत. यापैकी काही वृक्ष हे 100 वर्ष जुने आहेत. गणेशखिंड पुणे या केंद्राने विविध पिके व फळे यांच्या नवीन 19 जाती विकसित केल्या आहेत. पेशव्यांच्या काळात या भागात आंब्याची बाग विकसित करण्यात आली होती. ब्रिटिशांच्या कारकीर्दीत गव्हर्नर जनरल सर जॉन माल्कम यांनी हे उद्यान विकसित केले. काही वर्षांनंतर जॉर्ज मार्शल वूड्रो यांनी 1873 मध्ये या बोटॅनिकल गार्डनची जबाबदारी स्वीकारली. पुढे राहुरी कृषी विद्यापीठाने या उद्यानाला स्वतःच्या कार्यक्षेत्रात सामावून घेतले आणि त्या पेशवेकालीन आंब्याच्या बागेचे आणि जुन्या झाडांचे संवर्धन केले आहे. उद्यानाच्या सर्व स्थित्यंतरांची कागदपत्रेही उपलब्ध आहेत.    

जैववैविध्याचा अनमोल ठेवा    

गणेशखिंड फळ संशोधन केंद्राच्या पेशवेकालीन आंब्याच्या बागेतील आंब्याची जात हा इतरत्र न आढळणारा जनुकीय ठेवा आहे. याशिवाय, या बागेत 165 प्रकारची जंगलात आढळणारी झाडे आहेत. यातील 48 वनस्पती औषधी आहेत. दुर्मिळ प्रकारातील बुरशी, सूक्ष्म जीवांच्याही नोंदी आहेत. विद्यापीठाने या बागेची जैवविविधता नोंदवही (बायोडायव्हर्सिटी रजिस्टर) तयार केली असून यात वनस्पतींबरोबरच सरपटणारे प्राणी, कासव, बेडूक, किडे आणि तेथील सर्व पिकांची सविस्तर माहिती त्यामध्ये आहे.

लांडोरखोरी, जळगाव

लांडोरखोरी जळगाव हे स्थळ मेहरून या गावात स्थित असून मेहरून जलाशयाच्या जवळ आहे.हे स्थळ राखीव वन क्षेत्रात असून जळगाव वन विभागाच्या अखत्यारीत आहे.याबाबत जळगाव नगरपालिकेचा संमती ठराव प्राप्त झाला आहे.या क्षेत्रावर बोरीची झाडे असून येथे विविध पक्षी व प्राण्यांचा अधिवास आहे.

मोरांचे अधिवास क्षेत्र

लांडोरखोरी हे क्षेत्र मोर या पक्षाचे अधिवास केंद्र आहे.लांडोरखोरी वनोद्यान हे 48.08 हेक्टर क्षेत्रावर जैवविविधतेने नैसर्गिक अधिवास क्षेत्र आहे. जळगाव वनविभागाने गेल्या पाच वर्षांपासून जाणीवपूर्वक प्रयत्न करून हिरवा पट्टा विकसित केला आहे. समृद्ध जैवविविधतेने संपन्न अशा खैर, नीम, अंजन, बोर, बाभूळ, काटेसावर, शेवगा, आपटा, हेंकळ या सारख्या 70 हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती या ठिकाणी आहेत. तर रानडुकर, चिंकारा, निलगाय, ससा, मुंगुस, मोर सारख्या सस्तन प्राण्यांचा वावर, दगड पाल, साधी पाल, उद्यान सरडा, शामेलीयन, धामण, कवड्या, तस्कर सारख्या सरपटणाऱ्‍या प्राण्यांच्या 15 पेक्षा जास्त प्रजातीही येथे आहेत. तसेच चंडोल, कापशी, सोनपाठी सुतार, कोतवाल, युरोपियन चाष, शिक्रा इत्यादी स्थानिक व स्थलांतरीत पक्षांच्या 68 प्रजाती येथे आढळून येतात. या 48.08 हेक्टरपैकी 10 हेक्टरमध्ये हे वनोद्योन विकसित केले गेले आहे.

राज्यातील अधिकाधिक जैविक वारसा क्षेत्रे शोधून त्यांचे जतन व संवर्धन करण्यात यावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.अशा प्रकारे जैविक वारसा स्थळे निर्माण केल्याने या क्षेत्रातील प्राणी, पक्षी व वनस्पती संवर्धन योजना तयार करण्यात येऊन प्रजातीचे मूळ स्थळी संवर्धन व वंशवृद्धी करण्यात येते. म्हणून येणाऱ्या काळात राज्यात अशी अनेक ठिकाणे शोधून त्यांना जैविक वारसा स्थळे म्हणून घोषित करणार असल्याची माहितीही वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय राजकीय हेतूने नाही

0

 ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पत्राद्वारे माहिती

मुंबई, दि. २१ : त्र्याहत्तरावी घटनादुरूस्ती, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, निवडणूका घेता येत नाहीत अशी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करूनच कोरोना महामारीच्या काळात गावगाडा सुरळीत चालावा यासाठी गावातील योग्य व्यक्तिची प्रशासकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाला करावा लागला आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू नसून लोकशाही मार्गाने पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी योग्य कार्यक्षम व्यक्तीची नियुक्ती करावी हीच अपेक्षा आहे, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांना पत्राद्वारे कळविले आहे. राज्यातील गावे समृद्ध करण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. याविषयी लवकरच आपणाशी चर्चा करणार आहे. तसेच, प्रशासकाच्या निर्णयाबाबतही भेटीच्या वेळी सविस्तर माहिती देईन, असेही मंत्री श्री.मुश्रीफ यांनी पत्रात म्हटले आहे.

ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर केल्या जाणाऱ्या प्रशासकाच्या नियुक्तीबाबत ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांना पत्र लिहिले होते, त्याअनुषंगाने मंत्री श्री.मुश्रीफ यांनी श्री.हजारे यांना पत्र पाठवून या निर्णयाची सविस्तर माहिती दिली आहे.

ग्रामपंचायतींना मुदतवाढ देता येत नाही

मंत्री श्री.मुश्रीफ यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींचा ५ वर्षाचा कार्यकाळ संपत आला आहे. सन १९९२ साली झालेल्या ७३ व्या घटनादुरूस्तीनुसार ग्रामपंचायतीचा कालावधी ५ वर्षे निश्चित करण्यात आला आहे. सन २००५ साली कार्यकाल संपलेल्या १३ जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मुदतवाढ दिली होती. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने या गोष्टीला आक्षेप घेत ते रद्द केले होते. राज्यघटनेत तरतूद नसल्याचा निर्वाळा त्यावेळी निवडणूक आयोगाने दिला होता. त्यावेळी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाचा निर्णय कायम केला होता. उच्च न्यायालयाने तर याच्याही पुढे जाऊन सांगितले की मुदत संपलेल्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांना अशी मुदतवाढ देऊन त्यांना मागच्या दाराने आणता येणार नाही.

कोरोनाच्या महामारीत व या उद्भवलेल्या परिस्थितीत निवडणूक आयोगाला निवडणूक घेणे शक्य नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने सरकारला कळविले की, डिसेंबर, २०२० पर्यंत आम्ही निवडणूका घेवू शकत नाही. राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी नेमायचे झाल्यास विस्तार अधिकाऱ्यांची संख्या ही मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींपेक्षा अत्यल्प आहे. तसेच विस्तार अधिकारी हे कोरोना महामारीच्या उच्चाटनाच्या कामकाजात व्यस्त आहेत.

पाच वर्षाच्या कालावधीत सरपंचावर अविश्वास ठराव येवून सर्वांनी राजीनामे दिले तर किंवा न्यायालयाने एखादी निवडणूक बेकायदेशीर ठरविली तर प्रशासक नियुक्तीची ग्रामपंचायत अधिनियमात तरतूद आहे. तसेच भ्रष्ट कारभार करून लोकशाहीविरोधी कामकाज केले असे सरकारला वाटले तर तेथे प्रशासक नेमण्याची अधिनियमात तरतूद आहे. परंतु ५ वर्षे कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूका होवू न शकल्यास काय करावे यासंबंधी अधिनियमात तरतूद अस्तित्वात नाही. त्यामुळे अधिनियमात शासनाने दुरूस्ती करून युद्ध, आणीबाणी, वित्तीय आणीबाणी, महामारी अशा परिस्थितीत निवडणूक घेता येणे शक्य नसल्यास योग्य व्यक्तीची नियुक्ती प्रशासक म्हणून शासनास करता येईल असा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडून वित्त विभागाकडे व त्यानंतर विधी व न्याय विभागाने तपासल्यानंतर मुख्य सचिव, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्यामार्फत मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी सादर केला होता. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर व राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर अध्यादेश निर्गमित करून कायद्यात दुरूस्ती झाली आहे, असे मंत्री श्री.मुश्रीफ यांनी सांगितले.

पालकमंत्री हे जिल्ह्याचे शासनाचे प्रतिनिधी

राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर मुदत संपल्यानंतर प्रशासक नेमणूकीचे अधिकार शासनाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देऊन पालकमंत्र्यांच्या सल्याने नेमणूक करावी अशा प्रकारे शासन निर्णय निर्गमित केला आहे. पालकमंत्री हे त्या जिल्ह्याचे शासनाचे प्रतिनिधी म्हणून कामकाज पाहत असतात व जिल्हास्तरीय विविध समित्यांवर सदस्य पालकमंत्र्यांद्वारेच नियुक्त केले जातात. पालकमंत्री त्या जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचा भाग म्हणून कार्यरत असतात. जिल्ह्याच्या नियोजन मंडळाचेही ते अध्यक्ष असतात व जिल्ह्यात उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासन व शासन यामध्ये दुवा म्हणून काम करतात. पालकमंत्र्यांना मी पत्र लिहून ग्रामपंचायतीमधील सध्याच्या सरपंचाच्या आरक्षणनिहाय गावातील कार्यक्षम व चांगल्या व्यक्तीची नियुक्ती करावी, असे कळविले आहे, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पत्रात म्हटले आहे.

या सर्व बाबींचा विचार करून कोरोना महामारीच्या काळात गावगाडा सुरळीत चालावा यासाठी छातीवर दगड ठेवून हा निर्णय शासनाला करावा लागला आहे. एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये नियुक्तीवरून काही वाद झाल्यास किंवा चूकीच्या पद्धतीने नियुक्ती झाल्यास ती रद्द करण्याचा अधिकार ग्रामविकास विभागाला आहे. तसेच या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालय मुंबई, नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल झाल्या आहेत. याबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे, असेही मंत्री श्री.मुश्रीफ यांनी पत्रात नमूद केले आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर काम करत असतानाही आपले मार्गदर्शन आवश्यक आहे. त्यामुळे मी आपण वेळ द्याल त्यावेळी येवून चर्चा करणार आहे, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पत्रात नमूद केले आहे.

पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव पदाचा मनीषा म्हैसकर यांनी स्वीकारला पदभार

0

मुंबई, दि. 21 : पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव म्हणून श्रीमती मनीषा म्हैसकर यांनी आज पदभार स्वीकारला. श्रीमती म्हैसकर या १९९२ साली भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी राज्यात विविध विभागात कामकाज केले आहे.

बदलत्या हवामानाची व पर्यावरणाची दखल घेण्याचे काम राज्याचा पर्यावरण विभाग विविध योजनांतून व उपक्रमांतून करीत असतो. पर्यावरण रक्षणात शासकीय उपाययोजना, पर्यावरण विषयक कायदे, व्यापक जनजागृती आणि सर्वसामान्य माणसाचा आग्रही सहभाग याकरीता पर्यावरण विभागाचे कामकाज अधिक गतीमान करण्यावर भर दिला जाईल, असे श्रीमती म्हैसकर यांनी यावेळी सांगितले. 

श्रीमती म्हैसकर यांनी शासनाच्या विविध विभागात काम करताना यापूर्वी राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक म्हणून नावीन्यपूर्ण योजनांतून शासकीय कामकाजाच्या प्रसिद्धीला वेगळी दिशा दिली होती. विशेषत: लोकराज्य मासिकाचा वाचक वर्ग व लाखो प्रतिंचे वितरण हे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले.

गेली पाच वर्षे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून काम करीत असताना केंद्रीय स्तरावर राज्याला सातत्याने अव्वल स्थानावर नेण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांचा यापूर्वीचा मुंबई महानगरपालिकेत साडेचार वर्षे अतिरिक्त आयुक्त म्हणून आरोग्य क्षेत्रातील कामाचा अनुभव लक्षात घेऊन मुंबई शहरातील कोविड 19 च्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नेमण्यात आलेल्या टास्क फोर्समध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

0000

‘जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ’ स्थापन -अध्यक्षपदी अमेय खोपकर ,उपाध्यक्ष महेश मांजरेकर

0

मराठी नाट्यसृष्टीतील आघाडीच्या १५ निर्मात्यांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन केली आहे. सदरहू संघटनेचे नाव, कार्यकारिणी आणि उद्दिष्टे आम्ही आपणांस सादर करीत आहोत. आजच्या या वेबसंवादात करमणूक क्षेत्रातील पुष्कर श्रोत्री, कविता लाड-मेढेकर, अतुल परचुरे, निवेदिता सराफ, अवधूत गुप्ते, प्रसाद ओक, सचित पाटील, तेजश्री प्रधान, संतोष जुवेकर, सुयश टिळक, संकर्षण कऱ्हाडे, पुरुषोत्तम बेर्डे, राजेश देशपांडे व इतर अनेक मान्यवर कलाकार तंत्रज्ञ उपस्थित होते. निर्मिती सावंत आणि अशोक सराफ यांनी आवर्जून शुभेच्छा दिल्या. राज्यातील विविध शहरांतील अनेक पत्रकार मंडळीनी यात सहभाग घेतला.

नाव : ‘जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ  

सन्माननीय सल्लागार

लता नार्वेकर

प्रशांत दामले

अध्यक्ष:  अमेय खोपकर

उपाध्यक्ष: महेश मांजरेकर

कार्यवाह:  दिलीप जाधव

सहकार्यवाह: श्रीपाद पद्माकर

कोषाध्यक्ष: चंद्रकांत लोकरे

प्रवक्ता : अनंत पणशीकर

कार्यकारिणी सदस्य: सुनील बर्वे,   नंदू कदम

उद्दिष्ट आणि कार्य –

१) चांगली आणि व्यावसायिक नाटकांच्या निर्मिती प्रक्रियेत संघातील निर्मात्यांना पाठिंबा देणे.

२) नाटक व्यवसाय मोठा होण्याच्या दृष्टीने पाऊल उचलणे.

३) नाटक मुंबई-पुणे पुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्र, इतर राज्यात व देशाबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयोग होण्यासाठी प्रयत्नशील राहाणे.

४) महाराष्ट्रातील नाट्यगृहांच्या अवस्थेविषयी आढावा घेऊन सुधारणांच्या दृष्टीने पाऊल उचलणे.

५) प्रायोगिक नाटकांना राज्यस्तरावर सपोर्ट सिस्टम उभी करणे.

६) नाटकांची प्रसिद्धी करण्यासाठी वर्तमानपत्रांसोबतच इतर माध्यमं उपलब्ध करून देणे.

७) नाटक, OTT platform शी संलग्न करून देण्यासाठी प्रयत्न करणे.

८) नाटक व्यवसायाचे ४ प्रमुख घटक = निर्माता, कलाकार, बॅकस्टेज आणि प्रेक्षक आहेत. या सर्वांच्या हितासाठी कटिबद्ध राहणार.

९) नाट्यगृहांचे व्यवस्थापन आणि देखभाल संबंधी विचार आणि कृती आराखडा तयार करणे.

१०) या संघात सभासदांची खोगीर भरती होणार नसून जे सातत्याने कार्यरत आहेत व पुढेही राहणार आहेत अशा निर्मात्यांनाच सभासदत्व देण्यात येईल.

११) संघाचे संस्थापक सदस्य हे आघाडीचे निर्माते आहेतच त्याशिवाय भारत आणि भारताबाहेर, परदेशात देखील सातत्याने प्रयोगशील असणाऱ्या निर्मात्यांसोबत कार्य करणे.

नाटक मोठं करण्याच्या दृष्टीने आणि नाट्यव्यवसाय वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने ह्या नवीन निर्माता संघाची स्थापना करण्यात आली आहे. लवकरच निर्माता संघाचा दृष्टिकोन आणि सविस्तर योजनांची माहिती आपल्याला कळवण्यात येईल असं प्रवक्ते श्री. अनंत पणशीकर ह्यांनी सांगितले. जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ असे ह्या संघाचे नाव असल्याने नाटक करणारे सर्वच म्हणजे व्यावसायिक, हौशी, प्रायोगिक, समांतर सर्वांना सामावून घेण्याच्या दृष्टीने ही कार्यकारिणी प्रयत्नशील राहील तसेच दुसऱ्यांची रेष न पुसता आपली स्वतःची रेष मोठी करण्यातच आनंद वाटेल असे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. अमेय खोपकर ह्यांनी या प्रसंगी केले.

नोबेल हॉस्पिटलच्या कोरोना वार्डातून… थेट रिपोर्ट

0

कोरोनावर मात करून शिवसेनेचे भानगिरे पुन्हा जनसेवेत रुजू –

हवे तर आम्हाला देव मानू नका ,पण किमान लुटारू ,राक्षस म्हणून तरी हिणवू नका – डॉ. राज कोद्रे 

पुणे- आपल्या प्रभागात आणि एकूणच पूर्व पुण्यात कोरोना महामारी मुळे जनतेच्या सेवेस वाहून घेताना जनतेत मिसळत मदतीचे कार्यक्रम घेत राहिलेल्या शिवसेनेच्या नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांना कोरोनाची लागण झाली, १० दिवस हडपसरच्या नोबेल हॉस्पिटल मध्ये उपचार घेत कोरोनावर मात केल्यानंतर आज सोमवारी  सायंकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांनी या रुग्णालयातील प्रत्येक नर्स ,आय , मावशी ,वार्ड बॉय आणि डॉक्टर्स यांचे आभार मानीत त्यांना निरोप दिला . यावेळी त्यांनी हॉस्पिटलच्या कामकाजाच्या ,उपचाराच्या आणि एकूणच देखभालीसाठी काम करणाऱ्या सर्वांचे कौतुक करीत प्रत्येकाला मिठाई आणि स ॅनीटायझर चे वाटप करून कृतज्ञता व्यक्त केली . आणि पुन्हा आपण आता जनसेवेस सज्ज होत असून काही दिवसातच आपल्या हॉटेल मध्ये १०० बेड्स चे कोविड रुग्णालय सुरु करीत असल्याची घोषणा यावेळी केली .शहरात करोनाग्रस्तांचा आकडा मोठया प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रभागातील रूग्णांना उपचासाठी बेड मिळत नसल्याने शिवसेना नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी आपले कोंढवा येथील 40 खोल्यांचे हॉटेल करोना रूग्णांवर उपचारासाठी देण्यात येणार आहे. त्यात, सुमारे 100 बेडची सुविधा केली असून त्यासाठी आवश्‍यक असलेले डॉक्‍टर तसेच इतर वैद्यकीय स्टाफही ते स्वत: उपलब्ध करून देणार आहेत. त्यासाठीचे पत्र भानगिरे यांनी प्रशासनास दिले आहे. कोरोनावर यशस्वी मात करून भानगिरे पुन्हा लोकांच्या मदतीसाठी मैदानात उतरले असून आता त्यांनी आपले हॉटेलच रूग्णांसाठी देत आणखी एक आदर्श घालून दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने या केंद्राचे लोकार्पण करण्यात असल्याचे भानगिरे यांनी स्पष्ट केले.

हवे तर देव मानू नका पण कृपया लुटारू ,राक्षस म्हणून हिणवू नका – डॉ . राज कोद्रे  यावेळी हॉस्पिटलचे डॉ राज कोद्रे यांनी खाजगी हॉस्पिटल बाबत समाजात पसरत असलेल्या गैर समजा बाबत मोठी चिंता आणि दुखः व्यक्त केले . ते म्हणाले ,’ आमच्या कडे ९० टक्के महिलाच या विभागात देखील नर्स म्हणून काम करतात त्यातील ६० ते ७० टक्के महिला या केरला च्या आहेत . आय ,मावशी , वार्ड बॉय मिळेनासे झालेत त्यामुळे आहेत ते दोन दोन शिफ्ट काम करतात ,बरे येथे आल्यावर आणि एकदा पीपीई कीट परिधान केल्यावर पाणी पिता येत नाही, जेवण करता येत नाही आणि वा ॅश रुम्लाही जाता येत नाही अशा अवस्थेत येथे सेवा करावी लागते .येथील मेहनत लक्षात घ्या आणि दुसरीकडे समजत कोविड विभागात काम करणाऱ्या सेवक सेविकांना घरे भाड्याची असतील तर ती खाली करण्यासाठी सक्ती केली जाते. आम्हाला हवे तर देव मानू नका पण लुटारू आणि राक्षस म्हणून तरी किमान हिणवू नका … आम्ही जी बिलासाठी  दर आकारणी करतो ती सर्व शासकीय यंत्रणांनी घालून दिलेलीच करतो . पण कोरोना म्हटले कि बहुधा घरातल्या सर्वांची तपासणी करावी लागते आणि अवाढव्य खर्च असा ओरडा करीत समाज आम्हाला हिणवू लागतो . आमच्या जागेवर काम केले किंवा करतात त्यांना ठाऊक आहे . आम्ही हि माणसेच आहोत ,आम्हालाही भावना आहेत , जेवढे जीव वाचतील तेवढा आनंद डॉक्टरला प्रथम होतो .असे ते म्हणाले. (पहा हा व्हिडीओ रिपोर्ट थेट नोबेल हॉस्पिटल मधून …..)

लवकरच कोरोनावर लस, ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची मनुष्यांवरील दुसरी चाचणीही यशस्वी

0

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात ब्रिटनमधून आनंदाची वार्ता आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस मनुष्यांवरील चाचणीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात यशस्वी ठरली आहे. लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकात सोमवारी प्रकाशित निकालांनुसार ही लस सुरक्षित आढळली. तिचा मनुष्यांवर धोकादायक दुष्परिणाम आढळला नाही. या लसीने कोरोनाला निष्क्रिय करणाऱ्या अँटिबॉडीजची मात्रा वाढवलीच, व्हायरसविरुद्ध लढणाऱ्या इम्यून टी-सेल्सचीही पातळी वाढवली. तथापि, संशोधकांनी सांगितले की, ही लस काेरोनाविरुद्ध प्रभावीपणे सुरक्षा करते की नाही याची खात्री होण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या गरजेच्या आहेत. ऑक्सफर्डच्या प्रो. सराह गिल्बर्ट म्हणाल्या, आम्हाला खूप काम करायचे आहे. तूर्त निकाल आशादायक आहेत.

ऑक्सफर्डने लस अॅस्ट्राजेनेका कंपनीसोबत तयार केली आहे. अॅस्ट्राजेनेकाने पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटशी उत्पादनाचा करार केलेला आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईआे अदर पूनावाला म्हणाले, ‘आम्ही आॅक्सफाेर्ड लसीवर काम करत आहोत. भारतात आॅगस्टपर्यंत मानवी चाचण्या होतील. लस २०२० च्या अखेरीस उपलब्ध होऊ शकते.

चिंपांझीच्या सर्दीला कारणीभूत व्हायरसपासून लस तयार केली आहे, तो व्हायरस कोरोनासारखाच आहे
या लसीचे नाव सीएचएडीआेएक्स १ एनसीआेव्ही-१९ असे आहे. चिंपांझीच्या सर्दीस कारणीभूत होणाऱ्या व्हायरसचे जेनेटिक इंजिनिअरिंग करून ही लस तयार केली आहे. हे कोरोना व्हायरससारखेच आहे. वैज्ञानिकांनी त्यात कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनचे जेनेटिक इंन्स्ट्रक्शनही टाकले आहेत. म्हणजेच ही लस कोरोना व्हायरससारखीच आहे. जेव्हा लस शरीरात जाते तेव्हा पेशी स्पाइक प्रोटीन तयार करतात. त्या इम्यून सिस्टिमला कोरोनाला ओळखून त्यांचा नायनाट करण्याचे प्रशिक्षण देतात.

भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणाले : पुढे सर्व ठीक राहिले तर डिसेंबर ते जानेवारीपर्यंत आपल्यालाही लस मिळेल
ऑक्सफर्डच्या लसीमुळे भारतातही उत्साह आहे. देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. प्रो. के. विजयराघवन म्हणाले, ‘सर्व काही ठीक राहिले तर डिसेंबर ते जानेवारीपर्यंत भारताला लस मिळेल. ऑक्सफर्डने सर्वात मोठा अडथळा पार केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लसीचे गंभीर साइड इफेक्ट्स नाहीत. दुसऱ्या टप्प्यात मोठे दुष्परिणाम दिसले नसतील तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसह लस लाँच केली जाऊ शकते. नियामक लसीला तत्काळ परवानगी देऊ शकतात. एआयमुळे रिस्क मॅनेजमेंटचा अचूक आकडा अल्पावधीतच मिळतो.
– दरम्यान, दिल्ली एम्समध्ये सोमवारी भारतात निर्मित पहिली कोरोना लस ‘कोवाक्सिन’ची मानवी चाचणी सुरू झाली. १०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

अँटिबॉडी आणि टी-सेल्स नेमके करतात तरी काय?
अँटिबॉडीज राेगप्रतिकार क्षमतेचाच एक भाग आहेत. अँटिबॉडी या इम्यून सिस्टिमपासून निर्मित प्रोटीन आहेत, त्या व्हायरसच्या पृष्ठभागाला चिकटून त्याला निष्क्रिय करतात. टी- सेल्स हा पांढऱ्या पेशींचाच एक प्रकार आहे. त्या शरीरातील संक्रमित पेशींना शोधून नष्ट करतात.

१०७७ लोकांवर चाचण्या, ताप-डोकेदुखीचे साइड इफेक्ट
१८ ते ५५ वर्षे वयाेगटातील १०७७ लाेकांवर चाचण्या झाल्या. इंजेक्शन दिल्यानंतर १४ दिवसांत लाेकांतील टी-सेल्सचे प्रमाण अत्युच्च पातळीवर गेले. २८ दिवसांनी अँटिबॉडीही प्रचंड वाढल्या. लसीचे ताप व डोकेदुखी हे साइड इफेक्ट्स आहेत. मात्र ते साध्या पॅराासिटामॉलनेही बरे होतात.

जगभरामध्ये तयार होत असलेल्या लसींची स्थिती
लस टप्पे

– आॅक्सफर्ड विद्यापीठ 2*
– वुहान इन्स्टिट्यूट 2
– कॅन सिनाे बायाेलाॅजिक्स 2
– माॅर्डेना 2
– इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल बायाेलाॅजी 2
– सिनाेव्हॅक 2
– बायाेएनटेक 1**
– इम्पीरियल काॅलेज लंडन 1
– नाेव्हाव्हॅक्स 1
* मानवी चाचणीचा दुसरा आणि तिसरा टप्प्पा एकाच वेळी सुरू आहे.
**पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा एकाच वेळी सुरू आहे.

मुंबईतील कोरोना प्रतिबंधाचे जगाकडून कौतुक; आता आणखी कसोटी, गाफील राहू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. २० : – ‘मुंबईसारख्या लोकसंख्येची मोठी घनता असलेल्या शहराकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. आपण प्रयत्नपूर्वक या विषाणूचा संसर्ग रोखला आहे. त्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली आहे. वॉशिंग्टन पोस्टनेही कौतुक केले आहे. पण आता आपली आणखी कसोटी आहे. त्यामुळे गाफील न राहता कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

मुंबईतील कोरोना विषाणूचा प्रतिबंध तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीस परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, महापालिकेचे आयुक्त आय. एस चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह , मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, संजीय जयस्वाल, पी. वेलारसू, सुरेश काकाणी, उपायुक्त तसेच वॉर्डनिहाय सहायक आयुक्त विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच वैद्यकीय तसेच आरोग्य यंत्रणांचे प्रमुख, काही रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, मुंबईची परिस्थिती तुम्ही सर्वांनी अहोरात्र मेहनतीने काबूत ठेवली आहे. या कामाची दखल डब्लूएचओ आणि वाश्गिंटन पोस्टने घेतली आहे. आपण कोणतीही माहिती लपवत नाही, याचे कौतुक वाश्गिंटन पोस्टने केले. या कौतुकास्पद परिस्थितीतही आता आपली कसोटी आहे. जगभर जे निरीक्षण आहे, त्यामध्ये आता दुसऱी लाट येईल असे म्हटले जाते. त्यामुळे

आपले प्रयत्न आणखी तीव्रतेने आणि प्रभावीपणे राबवा. दुसरी लाट तेव्हाच येते ज्यावेळी आपण गाफील राहतो. पण आणखी सतर्क राहूया. रुग्ण संख्येचा हा आलेख कमी होईल यासाठी प्रय़त्न करूया. रुग्णाला कमीत कमी अंतरावर उपचारासाठी जावे लागेल अशा सुविधा वाढवायच्या आहेत. सुरवातीला कोरोना शहरात होता. पण आता प्रसार ग्रामीण भागातही होऊ लागला आहे. राज्याच्या अन्य भागातही या सुविधांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. हळूहळू आपण मुंबई खुली करतो आहोत. त्यासाठी कुणाचा दबाव घेण्यापेक्षा आपण नागरिकांच्या जीवांशी बांधिल आहोत, अशा पद्धतीने काम करत आहोत. आपल्याला या सर्व गोष्टी काटेकोरपणे करायच्या आहेत. मुंबईला तुम्हा सर्वांच्या अनुभवातून पूर्वपदावर आणायचे आहे. त्यासाठी यंत्रणांना आणखी सतर्क करा. व्हॅक्सिन येईपर्यंत आरोग्य सुविधांच्या दृष्टीने आणखी काही गोष्टी साध्य करण्याचे प्रयत्न आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईतील नालेसफाई आणि पावसाळ्यातील साथीचे आजार रोखण्याच्या दृष्टीनेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. ते म्हणाले, नाले सफाई वर्षोनुवर्ष करतो. पण साफ झालेला नाला पुन्हा काही दिवसांत कचऱ्याने भरतो. आता कोरोनाच्या निमित्ताने आपल्या टीम बाहेर आहेतच. त्यांच्याकडून या कचरा टाकण्यावर लक्ष ठेवा. मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींकडेही लक्ष देण्याची गरज आहे. त्याठिकाणच्या नागरिकांचे स्थलांतर आदी अनुषंगिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात याची काळजी घ्या.

आगामी सण वार आणि उत्सवाच्या काळात कोरोनाच्या अनुषंगाने दक्षता घेण्याचे आणि त्याबाबत वेळोवेळी नागरिकांपर्यंत मार्गदर्शक सूचना वेळेत पोहोचविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले.

मुंबईतील गणेशोत्सव त्यातील सार्वजनिक तसेच कौटुंबिक उत्सव, गणेशाचे आगमन आणि विसर्जन व्यवस्था तसेच कोकणात गणेशोत्सवासाठी जाऊन येणारे नागरिक यांच्यापर्यंत मार्गदर्शक सूचना, वस्तुस्थितीची माहिती वेळेत पोहोचविण्यात यावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बैठकीच्या समारोपात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या अहोरात्र मेहनतीचे कौतुक करतानाच, जीवावर बेतणारी मेहनत करत आहात. निश्चिंत राहू नका. पण हे काम करतानाही स्वतःची सुद्धा काळजी घ्या. मास्क आणि वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्या, त्याबाबतही गाफील राहू नका, असे आवाहनही केले.

महापालिका आयुक्त श्री. चहल म्हणाले की, गेल्या काही दिवसांत मुंबईतील ८३१ प्रतिबंधित क्षेत्र १५३ ने कमी करण्यात यश आले आहे. सील इमारतींची संख्या कमी करण्यावरही लक्ष केंद्रित करणार आहोत. रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीए आणि महापालिका एकत्र येऊन समन्वयाने डॅशबोर्ड प्रणाली उपलब्ध करून देणार आहोत. धारावीतील बरे झालेल्या काही रुग्णांची पुढच्या पाच दिवसात तपासणी करणार आहोत. त्यातील प्लाझ्मा दान करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम अशांकडून शिबिरात प्लाझ्मा घेण्यात येणार आहे. त्यासाठी हे शिबीर देशात एक वेगळा उपक्रम ठरेल. मोठा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात अँटीजेन चाचण्यांची संख्या वाढविण्यावरही भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिस यांना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. जिथे रुग्ण आढळून येतात, तेथे एकत्रित जाऊन डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात येत असल्याची तसेच २२४ प्रभागात फवारणी सुरु आहे. टाक्यांच्या निर्जंतुकीकरणावर भर देण्यात येत आहे.

महापालिकेच्या रस्त्यांबाबतच्या तक्रारींची प्रणाली अन्य यंत्रणांशी संलग्न करून खड्डे बुजविण्याच्या कामांमध्ये एकसूत्रीपणा आणण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

बैठकीत कोरोना प्रतिबंधाबाबत झोपडपट्टी आणि सोसायट्यांच्या क्षेत्रातील परिस्थिती आणि उपाययोजनांची माहिती वॉर्डनिहाय सादर करण्यात आली.

पुन्हा टेंडर घोटाळ्याच्या भोवऱ्यात महापालिका

0

पुणे- आंबील ओढ्याला कलव्हर्त बांधण्याचे स्थायी समितीने मंजूर केले टेंडर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे रद्द करण्याची नामुष्की आल्यावरही महापालिकेचा कारभार सुधारला नसून आता कात्रज पासून आंबील ओढा कॉलनी पर्यंत ओढ्याला सीमा भिंत बांधण्याचे टेंडर अर्थात यासाठी काढलेले ३ टेंडर देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत . शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांनी या एकूण २० कोटीच्या ३ टेंडरमध्ये गफला करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला असून अवघ्या ९ इंचाची भिंत बांधून पुरापासून रक्षण होणार आहे काय ? असा सवाल उपस्थित केला आहे . पहा याबाबत नेमके ओसवाल यांनी काय म्हटले आहे ते ऐका त्यांच्याच शब्दात..

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण

0

मुंबई-श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह निवडक ३०० जणांना निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंचे नाव आले तरी राजकीय कुतुहूल कायम आहे.

कोरोनाचे संकट असताना अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा होत असल्याने रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले होते. राम मंदिर बांधून कोरोना जाईल असे भाजपवाल्यांना वाटत असेल तर हरकत नाही, अशा शब्दांत पवारांनी टीका केली होती. भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून भाजप व महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरले आहे. शिवसेनेला कोंडीत पकडण्याची संधी राष्ट्रवादीसोबतच भाजपनेही घेतली असल्याचे सांगितले जाते.

भूमिपूजनाचे निमंत्रण पाठवण्यामागे आहेत ही कारणे

– सन १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडली होती त्या वेळी “ते जर शिवसैनिक असतील तर त्याचा मला गर्व आहे’ अशा शब्दांत त्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. बाबरी पतन खटल्यातही शिवसेनाप्रमुखांचे नाव होते.
– जुलै २०१९ मध्ये उद्धव ठाकरे परिवारासह अयोध्येत शिवसेनेच्या सर्व खासदारांना घेऊन गेले हाेते. राज्यात सत्ता स्थापनेस १०० दिवस झाल्यावर ते दुसऱ्यांदा अयोध्येला गेले होते. तसेच शिवसेनेच्या वतीने मंदिर न्यासाला ५ कोटी देणगी देण्यात आली आहे.
– भाजपबरोबरील युती तुटल्यानंतर शिवसेना राम मंदिर मुद्द्यावर मोदी व भाजपला टोकत होती.

– महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सत्तेत असल्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची राजकीय कोंडी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. अयोध्येतील उपस्थितीवरून आघाडीत वितुष्ट येऊ शकते असा त्यामागे होरा आहे.

– पवारांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे गप्प का ? शरद पवार यांनी हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. त्यांच्या वक्तव्यावर स्वत:ला हिंदू म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का आहेत, असा प्रश्न ‘शिवसंग्राम’चे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.

भूमिपूजन सोहळ्यासाठी पवारांची ‘एनओसी’ लागणार नाही ही अपेक्षा– प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, भाजप
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांचे ना-हरकत प्रमाणपत्र लागणार नाही अशी अपेक्षा आहे.

हिंदुत्व अजिबात सोडलेले नाही, हे सांगण्यासाठी शिवसेनेची धडपड
काँग्रेस-राष्ट्रवादी या धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर राज्यात सरकार स्थापन केले असले तरी हिंदुत्व अजिबात सोडलेले नाही, हे सांगण्याची धडपड शिवसेना करत आहे. मात्र मंदिराचा मुद्दा हातून गेल्याने शिवसेनेची गोची झाल्याचे मानले जाते.

राम मंदिर-शिवसेनेचे नाते राजकीय नव्हे अतूट, कायमसंजय राऊत,प्रवक्ते, शिवसेना


राम मंदिर आणि शिवसेनेचे नाते अतूट आणि कायम आहे. हे काही राजकीय नाते नाही. राजकारणासाठी आम्ही कधी अयोध्येला जात नाही. श्रद्धा आणि हिंदुत्व या भावनेतून शिवसैनिकांनी राम मंदिरासाठी बलिदान केलेले आहे. अयोध्येच्या रस्त्यातील सर्व अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत.

अयोध्येला जाणे हा उद्धव ठाकरेंच्या श्रद्धेचा विषय– बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्यास तो त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे.

विलगीकरणातील व्यक्तींना घरबसल्या मिळणार करोनाविषयी वैद्यकीय सल्ला

0

स्मार्ट सिटीच्या ‘पुणे टेलिमेडिसीन अॅप’वर वैद्यकीय सेवांशी व्हा कनेक्ट

पुणे : सौम्य लक्षणे असलेल्या करोनाबाधित व्यक्तींचे मार्गदर्शक सूचनांनुसार गृह विलगीकरण करून त्यांना घरीच उपचार देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. या व्यक्तींना आरोग्यविषयक कोणतीही शंका असल्यास किंवा वैद्यकीय सल्ला हवा असल्यास ते आता तज्ञ डॉक्टरांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधून शकतात. पुणे स्मार्ट सिटीने रुग्णालय व्यवस्थापन एकात्मिक प्रणाली (HMIS) अंतर्गत ‘पुणे टेलिमेडिसीन- आरोग्य धीर’ हे मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केले आहे.

‘पुणे टेलिमेडिसीन- आरोग्य धीर’ या अॅपवरून थेट डॉक्टरांशी संवाद साधता येणार आहे. तसेच, संवाद साधल्यानंतर आपल्या सर्व वैद्यकीय नोंदी, डॉक्टरांची टिप्पणी व अहवाल अॅपवर एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे. करोनाबाधित प्रत्यक्ष बाहेर जावे लागू नये यासाठी एक प्रकारे दृकश्राव्य स्वरुपातील ही व्हिडिओ ओपीडी सुविधा उपलब्ध झाली आहे. शारीरिक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) पाळून नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या पथदर्शी उपक्रमाला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेते धीरज घाटे, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अग्रवाल, व इतर मान्यवर उपस्थित होते.

https://tinyurl.com/y4hahkue या लिंकवर जाऊन किंवा क्यूआर कोड स्कॅन करून पुणेकर नागरिकांनी प्ले स्टोअरमधून ‘पुणे टेलिमेडिसीन- आरोग्य धीर’ हे अॅप डाऊनलोड करावे. यामध्ये विविध सेवा सुविधांचे पर्याय देण्यात आले आहेत. आपणास आवश्यक असणाऱ्या सुविधेचा पर्याय निवडून संबंधित आरोग्य सेवेचा लभा घ्यावा, असे आवाहन महापौर श्री. मुरलीधर मोहोळ, आयुक्त श्री. विक्रम कुमार व पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत रुग्णालय व्यवस्थापन एकात्मिक प्रणाली (HMIS) या एका महत्त्वाच्या प्रकल्प पुणे स्मार्ट सिटीने पुढाकार घेतला आहे. सर्व प्रकारच्या आरोग्य सेवांशी नागरिकांना जोडणे हा यामागील उद्देश आहे. या प्रकल्पाअंतर्गत हे अॅप विकसित केले असून, करोनाच्या अनुषंगाने आरोग्यविषयक सुविधा कोणत्या आहेत याबाबतची माहिती येथे उपलब्ध करण्यात येणार आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, “सर्वसामान्यांसाठी सुलभ व उपयुक्त असे हे मोबाईल अॅप आहे. यामुळे आरोग्य सुविधेत भर पडणार असून, शहरातील करोनाच्या संकटाला तोंड देताना, तसेच संसर्ग रोखण्यासाठी हे मोबाईल अॅप साह्यभूत ठरणार आहे.”

पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ रुबल अग्रवाल म्हणाल्या, “करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सध्या करोनाबाधित रुग्णांसाठी सेवा देण्यावर भर आहे. तसेच, पुढील काळात याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढवून लवकरच इतर रुग्णांसाठीही अनेक सेवा उपलब्ध केल्या जातील. डॉक्टरांची वेळ घेणे, सल्ला घेणे यासह विविध सेवा घरबसल्या या मोबाईल अॅपवरून देण्यात येणार आहेत.”

या लिंकवर जाऊन किंवा खालील क्यूआर कोड स्कॅन करून हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करा.
https://tinyurl.com/y4hahkue

राज्यात १ लाख ३१ हजार ३३४ ॲक्टिव्ह रुग्ण

0

राज्यात आतापर्यंत पावणेदोन लाख रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, : राज्यात गेल्या २० दिवसात कोरोनाचे ८४ हजार ११८ रुग्ण बरे झाले आहेत. याकाळात दिवसाला सरासरी ४२०० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज ५४६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ७५ हजार २९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८२४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३१ हजार ३३४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ६६७ नमुन्यांपैकी ३ लाख १८ हजार ६९५ नमुने पॉझिटिव्ह (१९.११ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ६५ हजार ७८१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ४३४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७७ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले १७६ मृत्यू हे मुंबई मनपा-४१, ठाणे-५, नवी मुंबई मनपा-११, कल्याण-डोंबिवली मनपा-११, उल्हासनगर मनपा-६,वसई-विरार मनपा-२, रायगड-४,पनवेल-२,नाशिक मनपा-२, धुळे मनपा-१, जळगाव-१८, जळगाव मनपा-३, पुणे-९, पुणे मनपा-२२, पिंपरी-चिंचवड मनपा-११,सोलापूर-१, सोलापूर मनपा-४, सातारा-२, कोल्हापूर-४, सांगली-४,औरंगाबाद मनपा-३, जालना-१,लातूर-२, नांदेड मनपा-२, अमरावती-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-२, वर्धा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील  

मुंबई: बाधित रुग्ण- (१,०२,४२३), बरे झालेले रुग्ण- (७२,६४८), मृत्यू- (५७५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,७२८)

ठाणे: बाधित रुग्ण- (७६,७४९), बरे झालेले रुग्ण- (३६,६७६), मृत्यू- (२०६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८,००३)

पालघर: बाधित रुग्ण- (१२,२६३), बरे झालेले रुग्ण- (६५८३), मृत्यू- (२४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४३२)

रायगड: बाधित रुग्ण- (११,८३५), बरे झालेले रुग्ण-(६३२१), मृत्यू- (२३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२८२)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (१२०२), बरे झालेले रुग्ण- (७२५), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३५)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२८४), बरे झालेले रुग्ण- (२३८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)

पुणे: बाधित रुग्ण- (५७,०२४), बरे झालेले रुग्ण- (२०,३११), मृत्यू- (१४०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५,३१२)

सातारा:  बाधित रुग्ण- (२४२६), बरे झालेले रुग्ण- (१३१८), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०२५)

सांगली: बाधित रुग्ण- (९६५), बरे झालेले रुग्ण- (५०५), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२९)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (२२५०), बरे झालेले रुग्ण- (९५०), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६६)

सोलापूर: बाधित रुग्ण- (५८३६), बरे झालेले रुग्ण- (२६८३), मृत्यू- (३८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७६३)

नाशिक: बाधित रुग्ण- (९९२१), बरे झालेले रुग्ण- (५३८६), मृत्यू- (३६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१६६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१६६६), बरे झालेले रुग्ण- (८२८), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०३)

जळगाव: बाधित रुग्ण- (७७२३), बरे झालेले रुग्ण- (५०३१), मृत्यू- (४१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२७८)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३९७), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८५)

धुळे: बाधित रुग्ण- (१९८९), बरे झालेले रुग्ण- (१२८२), मृत्यू- (८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२१)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१०,०३६), बरे झालेले रुग्ण- (५४४९), मृत्यू- (३७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२१५)

जालना: बाधित रुग्ण- (१४६१), बरे झालेले रुग्ण- (६६४), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४१)

बीड: बाधित रुग्ण- (३३९), बरे झालेले रुग्ण- (१६७), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१६४)

लातूर: बाधित रुग्ण- (११०८), बरे झालेले रुग्ण- (४९६), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५९)

परभणी: बाधित रुग्ण- (३७१), बरे झालेले रुग्ण- (१६४), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (४३५), बरे झालेले रुग्ण- (३०६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६)

नांदेड: बाधित रुग्ण- (८९३), बरे झालेले रुग्ण (४२१), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३७)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५००), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४१)

अमरावती: बाधित रुग्ण- (१२८०), बरे झालेले रुग्ण- (८५६), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७७)

अकोला: बाधित रुग्ण- (२११०), बरे झालेले रुग्ण- (१६६५), मृत्यू- (९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४६)

वाशिम: बाधित रुग्ण- (३६२), बरे झालेले रुग्ण- (१५८), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९७)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (५२५), बरे झालेले रुग्ण- (२२७), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७४)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (५५६), बरे झालेले रुग्ण- (३७८), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६१)

नागपूर: बाधित रुग्ण- (२५८२), बरे झालेले रुग्ण- (१४६०), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०९०)

वर्धा: बाधित रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (३९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०)

भंडारा: बाधित रुग्ण- (१८७), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२३०), बरे झालेले रुग्ण- (१९६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण- (१४८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (१९४), बरे झालेले रुग्ण- (११५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (२६०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२७)

एकूण: बाधित रुग्ण-(३,१८,६९५) बरे झालेले रुग्ण-(१,७५,०२९), मृत्यू- (१२,०३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०२),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,३१,३३४)

 (टीप:ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)