Home Blog Page 2487

मुंबईत अभय योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ – पालकमंत्री आदित्य ठाकरे

0

मुंबई, दि. १२ : बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोना संकटामुळे अडचणीत असलेल्या मुंबईकरांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

यासंदर्भात आमदार सुनील प्रभु यांनी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर पालकमंत्री श्री. ठाकरे यांच्या विनंतीनुसार मुंबई महापालिकेने अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची मुदत आज १२ ऑगस्ट रोजी संपणार होती. मुंबई महापालिकेच्या पाणी बिलाच्या थकबाकीवर दरमहा २ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाते. अभय योजनेअंतर्गत २ टक्के अतिरिक्त शुल्क माफ केले जाते. मुंबईकरांना आता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाबद्दल मुंबई महापालिकेचे तसेच मुदतवाढ मिळण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार सुनील प्रभू यांचे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी आभार मानले आहेत.

प्रमाणित नसलेल्या दुधात नीळ टाकण्याचे निर्देश – पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार

0

दुधातील भेसळ विरोधात दुग्धव्यवसाय आणि अन्न व औषध प्रशासन विभाग समन्वयाने कठोर कारवाई करणार

मुंबई दि. १२ : राज्यातील दुधात होणारी भेसळ विरोधात दुग्धव्यवसाय विकास विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभाग समन्वयाने कारवाई करणार असून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन प्रमाणित नसलेल्या दुधात निळ टाकण्याचे निर्देश पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात दूध भेसळ रोखण्यासंदर्भात करण्यात येत येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा घेण्याकरिता आयोजित बैठकीत ते बोलत होते.

श्री. केदार म्हणाले, दुधातील होणारी भेसळ रोखण्याकरिता दुधाचे नमुने तपासण्याकरिता मी स्वत: मराठवाडा विभागात जाणार असून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे पश्चिम महाराष्ट्रात दुधाचे नमुने तपासण्याकरिता जाणार आहे. तसेच मुंबईसह ठाणे या भागात दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त हे दुधाचे नमुने तपासून दोंषीवर कारवाई करणार आहे, असे श्री. केदार यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पिशवीबंद दुधाची मागणीत घट झाली असून हॉटेल, रेस्टॉरंट व मिष्टांन्न निर्मित केंद्र मोठ्याप्रमाणात बंद झाली आहे. परिणामी राज्यातील दुधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे दुग्धउत्पादक शेतकऱ्यांकडे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला होता. तो प्रश्न शासनाने दूध भुकटीच्या स्वरुपात सोडवला. तसेच दुधाची मागणी आणि पुरवठा याचा समतोल राखण्याकरिता दुग्ध व्यवसाय विभागाने दक्ष रहावे, असे श्री. केदार यांनी सांगितले. 

राज्यात भेसळयुक्त दुध ग्राहकांना विकले जात असल्याने शेतकऱ्यांच्या दुधाच्या विक्रीवरही त्याचा परिणाम होतो. दूध भेसळ रोखल्यास शेतकऱ्यांच्या दूध विक्री हा जोड धंदा किफायतशीर ठरणार असून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे. यासाठी संबधित अधिकाऱ्यांनी दूध भेसळ हा विषय गांभिऱ्याने हाताळावा अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

दुग्ध व्यवसाय विभाग आणि अन्न औषध प्रशासन या विभागाद्वारे दूध भेसळ रोखण्याकरिता शासनाकडे उपलब्ध असलेल्या मोबाईल व्हॅन अद्ययावत करावे. त्यासाठी लागणारे रसायन तत्काळ उपलब्ध करावे. तंत्रज्ञ व्यक्तीनी प्रशिक्षण देण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले दूध भेसळ करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. भविष्यात दूध भेसळ करण्याचे धाडस करणार नाही, अशी कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीत दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त सुमंत भांगे अन्न व औषध विभागाचे आयुक्त अरुण उन्हाळे दुग्ध व्यवसाय विभागाचे उपायुक्त  एस.आर. सिरपुडकर यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

…अन्यथा मंत्रालयास घेराव घालणार : संभाजीराजे

0

पुणे : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्याच्या तांबडी गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना २६ जुलै रोजी घडली. या घटनेला दोन आठवडे उलटूनही अद्याप मुख्य आरोपीला अटक झालेली नाही. त्यामुळे राज्यातील मराठा संघटनानी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोपर्डी (नगर) पाठोपाठ तांबडीतील घटनेबाबतही सरकार आणि पोलिसांकडून दिरंगाई होत आहे. जलदगतीने तपास करून या घटनेतील मुख्य आरोपीस तातडीने अटक करावे, अन्यथा मंत्रालयास घेराव घालणार आहोत, असा इशारा मराठा संघटनानी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा क्रांती मोर्चाचा वतीने १८ ऑगस्ट २०२० रोजी मंत्रालयास घेराव घालणार असल्याचे स्पष्ट केले. शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संभाजीराजे दहातोंडे पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, परशुराम कासोळे आदी उपस्थित होते. तेलंगणा सरकारप्रमाणे या घटनेतील आरोपींनाही थेट एन्काउंटर करून मारावे, असेही दहातोंडे म्हणाले.

संभाजीराजे दहातोंडे म्हणाले, “कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशी होण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे एकापाठोपाठ अशा घटना घडताहेत. तांबडी येथील नववीत शिकणाऱ्या मुलीवर झालेली बलात्कार आणि हत्येची घटना संतापजनक आहे. ही मुलगी उत्तम खेळाडू होती. तसेच ती विद्यमान सरपंचांची मुलगी होती. मात्र, गेल्या १५ दिवसांत मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांनी नेमकी काय कारवाई केली किंवा त्या कुटुंबाला भेटून सांत्वन केले का, असा आमचा सवाल आहे. अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या तपासाला जसे प्राधान्य दिले जात आहे, तसेच प्राधान्य महाराष्ट्राच्या या कन्येला न्याय मिळवून देण्यासाठी द्यावे.”


“या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी मराठा संघटनांच्या समन्वयकानी तांबडी येथे पीडितेच्या कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले. तसेच तपासकार्याचा आढावा घेतला. अशा घटनांमध्ये होत असलेल्या दिरंगाईमुळेच त्याची पुनरावृत्ती होत आहे. त्यामुळे या घटनेचा तपास लवकरात लवकर लावून न्यायालयात चार्जशीट दाखल करावे. या प्रकरणी सरकारने ऍड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करून जलदगती न्यायालयात हा खटला चालवावा. कोपर्डी आणि तांबडी या दोन्ही घटनेतील पीडितांना त्वरित न्याय मिळवून द्यावा. अन्यथा मंत्रालयाला घेराव घालणार आहोत.

सोन्याचे भाव ५०,००० रुपयांखाली घसरले

0

सोन्याच्या दरात सुरू असलेली घसरण बुधवारीही सुरूच राहिली असून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस १,८७२.१९ डॉलर्स या तीन आठवड्यांतील नीचांकी पातळीवर आला. भारतातही याचे पडसाद उमटले असून सोन्याचा भाव तीन टक्क्यांपेक्षा जास्त घसरून प्रति १० ग्रॅम ४९,९५५ रुपये इतका झाला. गुंतवणूकदारांनी केलेल्या नफारुपी विक्रीमुळे तसेच करोनावर लस मिळत असल्याच्या वृत्तानं गुंतवणूकदार निश्चिंत झाल्यामुळे सोन्याच्या खरेदीऐवजी विक्रीकडे कल दिसून येत आहे, परिणामी सोन्याचे भाव घसरत आहेत.

अमेरिकेतील गोल्ड फ्युचर्समध्येही २.४ टक्क्यांची घसरण होऊन ते प्रति औंस १,९०० डॉलर्सवर आले आहेत. गेल्या सत्रामध्ये तब्बल १५ टक्क्यांनी घसरलेले चांदीचे भावही आणखी २.८ टक्क्यांनी घसरले व प्रति औंस २४.११ डॉलर्स झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे भारतातही सोन्याचे व चांदीचे भाव घसरत आहेत.

काही महिने सोन्यामध्ये असलेल्या तेजीला लगाम बसत असून सोने आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति औंस १,८०० डॉलर्सच्या पातळीवर येऊ शकतं असं वृत्त तज्ज्ञांच्या हवाल्यानं रॉयटर्सनं दिलं आहे. अमेरिकी डॉलर्सच्या भावावर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे भाव वर खाली होत असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष डॉलरकडे लागलेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर वधारला तर सोनं महाग होतं व डॉलर घसरला तर सोनं स्वस्त होतं. गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकी रोख्यांच्या परताव्यामध्ये झालेल्या वाढीमुळे काही काळ डॉलरची मागणी वाढत होती, परिणामी सोनं महाग होत होतं.

एका दिवसातील घसरणीचा विचार केला तर तब्बल सात वर्षात सोनं पहिल्यांदाच एकाच दिवशी इतकं घसरलं आहे. अर्थात, एका वर्षाचा विचार केला तर मात्र सोन्याचे भाव तब्बल २५ टक्क्यांनी वधारले आहेत. करोना महामारीमुळे वैश्विक मंदीच्या भीतीनं ग्रासलेल्या जागतिक गुंतवणूकदारांनी आसरा म्हणून सोन्याच्या खरेदीचा सपाटा लावला होता, परिणामी सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात भडकले होते. येत्या काळातही आर्थिक मंदीवर उतारा म्हणून मध्यवर्ती बँका आपल्या तिजोऱ्या मोकळ्या सोडण्याची शक्यता बघता सोन्याचा भाव पुन्हा प्रति औंस २,००० डॉलर्सकडे जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

खडकवासला भरले…पण गेल्या वर्षापेक्षा साडेदहा टीएमसी पाणीसाठा कमीच

0

पुणेः धरण क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांमध्ये १८.६३ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरण हे सुमारे ९९.१६ टक्के भरले असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास बुधवारी खडकवासला धरण हे सुमारे शंभर टक्के भरण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, सोमवारी सायंकाळपासून मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाने हजेरी लावल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. मात्र, दिवसभर तुरळक पाऊस होता.पानशेत ७०.७५ टक्के भरले तर वरसगाव ५८.२८ टक्के आणि टेमघर ४४ .९५ टक्के भरले आहे . पण गेल्या वर्षाच्या तुलनेत साडेदहा टीएमसी पाणी साठा अद्याप कमीच असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान खडकवासल्यातून मुठा नदीत ४२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

धरण                 टीएमसी         टक्के

खडकवासला      १.९६         ९९.१६%
पानशेत               ७.५३         ७०.७५%
वरसगाव             ७.४७          ५८.२८%
टेमघर                 १.६७          ४४.९५%

सध्याचा पाणीसाठा  – १८.६३ टीएमसी व ६३.९१  टक्के

मागील वर्षी धरणातील पाणीसाठा –  २९.१५ टीएमसी व १००टक्के

टेमघर धरण परिसरात रात्रभर सुमारे ४० मिलिमीटर, तर दिवसा सुमारे तीन मिलिमीटर पाऊस पडला. वरसगाव आणि पानशेत धरण क्षेत्रात रात्री प्रत्येकी २४ मिलिमीटर, तर दिवसा अनुक्रमे पाच आणि सहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला धरण क्षेत्रात रात्रभर सुमारे १७ मिलिमीटर पाऊस पडला. मात्र, दिवसभर अवघा दोन मिलिमीटर पाऊस झाला. चारही धरणे ही सुमारे ६३ .९१टक्के भरली असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

टेमघर धरणात १.६४ टीएमसी, वरसगाव धरणामध्ये ७.४२ टीएमसी, पानशेत धरणामध्ये ७.४३ टीएमसी आणि खडकवासला धरणात १.९३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या दिवशी चारही धरणे ही शंभर टक्के भरली होती. या धरणांमध्ये २९.१५ टीएमसी पाणीसाठा होता. यंदा १८.४२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

पिंपरी चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण हे सुमारे ५२ टक्के भरले असून, ४.४५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यातील अन्य धरणांपैकी गुंजवणी धरण क्षेत्रात २४ मिलिमीटर, निरा देवघर धरण परिसरात ३२ मिलिमीटर, भाटघर धरण क्षेत्रात २२ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. गुंजवणी धरण सुमारे ८६ टक्के, नीरा देवघर धरण सुमारे ५६ टक्के, भाटघर धरण सुमारे ६९ टक्के भरले आहे. वीर धरण सुमारे ९४ टक्के, भामा आसखेड धरण हे सुमारे ५३ टक्के भरले असल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

उद्धव ठाकरे… तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागणार -निलेश राणेंचे ट्विट

0

मुंबई- सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान या सुनावणीदम्यान महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयामध्ये झाल्याचा दावा भाजपाचे नेते निलेश राणेंकडून करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे… तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

दरम्यान निलेश राणेंकडून शिवसेनेवर सातत्याने टीका होत असल्याचे पाहायला मिळते. निलेश राणे यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला म्हटले की, ‘उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आले, की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

भाजपचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांची प्रदेश ‘निमंत्रित सदस्य’ म्हणून निवड

0

पुणे : – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. यानंतर भाजपच्या प्रदेश कार्यरणीच्या सदस्यांमध्ये पुण्यातील नगरसेवक राजेंद्र यशवंत शिळीमकर यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिळीमकर यांची निवड केली असून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.
शिळीमकर यांना देण्यात आलेल्या पत्रामध्ये नजीकच्या काळात पक्षाचे काम देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोपवलेल्या या जबाबदारीवर राजेंद्र शिळीमकर यांनी आभार मानले आहेत. दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने निभावून, पक्ष वाढीसाठी नेहमीच प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया राजेंद्र शिळीमकर यांनी दिली आहे.

श्रीहरीची मुरली…(लेखिका-पूर्णिमा नार्वेकर)

0

नको वाजवू श्रीहरी मुरली
तुझ्या मुरलीने तहानभूक हरली…

कृष्णजन्माष्टमी जवळ आली की मन नकळत कृष्णमय होऊन जाते आणि कृष्णाचे गोडवे गाणारी गाणी मनात फेर धरून नाचायला लागतात. त्यातीलच हे एक गाणे. कृष्ण म्हटलं की डोळ्यांसमोर राधाकृष्ण उभे राहतात आणि बासरीही.
खरंच आहे की बासरीच्या सुरांनी राधेला वेड लावलं होतं पण सर्व सख्या, गोपिका, मुके जीव अगदी सगळयांनाच मोहिनी घातली होती. श्रीकृष्ण हा सोळा कलांनी परिपूर्ण आहे असं पुराणात म्हटलंय आणि श्रीकृष्णाला सर्वांत प्रिय म्हणजे बासरी.
एकदा चिडून जाऊन सगळ्या गोपी-सख्यांनी बासरीला विचारलं की, आम्ही श्रीकृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला असतो; पण आम्हाला साधा भावही देत नाही, तुला मात्र सतत ओठांशी धरून असतो. अशी जादू तरी काय केली आहेस तू…?
      बासरीने सांगितले, ‘तुम्ही माझ्यासारख्या व्हा, मग तुम्हालाही श्रीकृष्ण जवळ घेईल.’
      ती म्हणाली, ‘मी अगदी सरळ आहे, ना एखादी गाठ, ना एखादं वळण. मी पोकळही आहे. त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडला आहे.
      माझ्यावर असणार्‍या सहा भोकांतून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सर्व शत्रू मी काढून टाकले आहेत.’ खरंय की नाही…या उत्तरातून खूप छान संदेश बासरीने दिला आहे.
      तर अशी ही बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू तोडतात तेही तिथी पाहून. पंचमी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तिथींना बांबू तोडला तर कीड लागते. कारण या तिथींच्या शेवटी ‘मी’ येतो, या मीपणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो व बासरी टिकत नाही, असा लोकसमज आहे.
      लोकगीत आणि वाद्यवृंदात रमलेल्या या बासरीला शास्त्रीय संगीताच्या दर्जेदार मैफलीत स्थान मिळवून दिलं ते कै. पं. पन्नालाल घोष यांनी.
तीन-चार तासांची केवळ बासरीची स्वतंत्र मैफल होऊ शकते हे पन्नालाल घोष यांनी दाखवून दिले.
तसंच या बासरीला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून दिली ती पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी.
 
बोरिवलीला राहणारे प्रसिद्ध बासरीवादक आनंद काशीकर यांनाही बासरीवादनाची आवड लहानपणापासूनच. शाळेत असल्यापासून त्यांची बासरीशी गट्टी जमली पण खऱ्या अर्थाने शिक्षण सुरू झाले ते बारावी नंतर. पंडित मल्हारराव कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घेतले. गेली ३३ वर्षे आनंद काशीकर हे बासरीवादन शिकवताहेत आणि असंख्य विद्यार्थी घडवत आहेत. त्यांचा मुलगा अद्वैतबद्दल सांगायचं झालं तर ‘बापसे बेटा सवाई’ असं म्हणायला हरकत नाही. वयाच्या चौथ्या वर्षापासून अद्वैतने आपल्या वडिलांकडे बासरीचे धडे गिरवायला सुरुवात केली. सेंट्रल गव्हर्नमेंटची त्याला स्कॉलरशिपही मिळालीय. इतकेच नाही तर ‘ऑल इंडिया  रेडिओ’वरील २०१७ स्पर्धेचा तो विजेता आहे. लहान वयात अद्वैतने बासरीवादनात खूप मोठे यश संपादन करून हा वारसा पुढे चालू ठेवला आहे. बासरीबद्दल काशीकरांकडून मिळालेली माहिती अशी – एकूण १२ स्केलच्या १२ बासऱ्या असतात.  प्रोफेशनल कार्यक्रमासाठी जाताना १२ लहान आणि १२ मोठ्या अशा एकूण २४ बासऱ्यांचा सेट बरोबर घेऊन जावा लागतो. सोलोमध्ये वाजवायचे असेल तर साधारण ‘सफेद इ स्केल (सफेद ३ ज्याला वेस्टर्न स्केल इ म्हणतात)’ची बासरी लागते. पण सतार, संतूरसाठी ‘डी स्केल’ची बासरी वाजवतात. बासरी हे वाद्य तसे  वाजवायला कठीण…कारण फुंकरेवरचा कंट्रोल असणं खूप महत्वाचं. हे टेक्निक शिकण्यासाठी कित्येक वर्षं सुद्धा लागतात. मात्र या वाद्याने फुफ्फुसाचा चांगला व्यायाम होतो. दम्याचा त्रास असणाऱ्यांना डॉक्टर सुचवतात की बासरीचे टेक्निक शिका, त्याने नक्कीच फरक पडतो. बासरीसाठी लागणारा बिनगाठीचा बांबू हा  आसाममधील एका विशिष्ट ठिकाणाहून येतो. बांबूमध्ये गाठी असतातच, पण आसाममधल्या बांबूचं वैशिष्ट्य असं की २ गाठींमधील  अंतर हे कधी कधी 3 ते 4 फूट एवढे असते. त्यामुळे मोठ्या बासऱ्या (ज्यांचा ध्वनी गंभीर किंवा सखोल असतो) बनवणे सोपे जाते. तसेच ह्या बांबूंची भिंत फार जाड नसते. त्यामुळेच तेथील बांबू बासऱ्या बनवण्यासाठी उत्तम ठरतात. या बांबूचे वैशिष्ट्य असे की त्यात गाठ जवळपास नसतेच. सध्या युपीमधील पीलीभीत या ठिकाणी बासरीचे सर्वाधिक विक्रेते आहेत.
मी जी बासरी वाजवतो त्याची लांबी पावणेतीन फूट आहे. एवढ्या मोठ्या बांबूत गाठ नाही. लॉकडाऊनच्या काळात काशीकरांचे ऑनलाईन क्लासेस चालू होते. याच लॉकडाऊनचा त्यांनी चांगला उपयोगही करून घेतला. त्यांनी जवळपास २४ बासऱ्यांचा सेट बनवला. स्वतः बनवलेली बासरी वाजवताना मिळणारा आनंद अवर्णनीय आहे, असेही त्यांनी सांगितले.

असाच एक कृष्णभक्त जो बासरीची मनोमन सेवा करतो. बासरी वाजविणे हेच त्याचं आयुष्य आहे. याचं त्यांनी कुठेही शास्त्रोक्त शिक्षण घेतलं नाही. मुरलीधर त्याचा गुरु. श्री कृष्णाचं नाव घेतो आणि बासरी वाजवतो. त्यांचं नाव आहे अरविंद कुमार. अयोध्येवरून मुंबईत कामधंद्यासाठी आलेल्या अरविंद कुमारांचं बासरीशी नातं जुळलं आणि मग तेच जीवन-उत्पन्नाचं साधन बनलं. गल्लोगल्ली ते बासरी वाजवत  फिरतात आणि विकतातही. पाठीवरील पिशवीत २५० बासऱ्या घेऊन रोज फिरतात. १०० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत बासऱ्या त्यांच्याकडे असतात. पितळ्याची बासरीसुद्धा त्यांच्या संग्रहात आहे. दिवसाच्या ३०-४० बासऱ्या तरी विकल्या जातात.  प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरासिया, विवेक सोनार अशा नामवंत कलाकारांसोबत त्यांनी बासरी वाजवलेली आहे.  पण तरीही गल्लोगल्ली फिरून बासरी वाजत फिरताना आत्मिक शांती मिळते, असं ते म्हणतात. हिरो सिनेमातील गाणी, चौदहवी का चांद है, होठोसे छु लो तुम, एक प्यार का नगमा हे… अशी अनेक लोकप्रिय गाणी बासरीवर वाजवत सकाळ ते संध्याकाळपर्यंत फिरत असतात. त्यांचा मुलगाही बासरी वाजवतो. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ते आत्मसात करणे कठीण नाही, हे अरविंद कुमार यांच्याकडून शिकावं.
बासरीबद्दल जाणून घेताना, ही  बासरी ऐकताना सगळे मंत्रमुग्ध का होतात…याचं गुपित आता कुठे उलगडलं
नको वाजवू श्रीहरी मुरली
तुझ्या मुरलीने तहानभूक हरली…

© पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग, 

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.), 

मुंबई – 400068

पुण्यात आता दीड लाखापेक्षा अधिक बील समितीच्या मजुरीनंतरच हॉस्पिटला पेड होणार

0

पुणे : पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना खाजगी रुग्णालयांकडून प्रचंड बिल लावून नागरिकांची लूट सुरू आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 83 प्रकरणात खासगी रुग्णालयांना नोटीसा देण्यात आल्या असून, बिलांची तांत्रिक तपासणी करुन पुढील कारवाई करण्यात येईल असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
याबाबत राव यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांकडून अधिकचे बील घेतले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासाठीच प्रशासनाने 8 उपजिल्हाधिकारी , 28 ऑडिटर आणि 4 डॉक्टर यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती दीड लाखांपेक्षा अधिक बील रुग्णाला दिल्यास एक तासाच्या आत या बिलाची तपासणी करून योग्या आहे किंवा आक्षेप असतील तर तसे स्पष्ट करेल. त्यानंतरच संबंधित रुग्णांने बील पेड करायचे आहे. यात आतापर्यंत या समितीकडे 83 तक्रारी आल्या असून, 11 प्रकरणात स्पष्टीकरण दिले आहे. या सर्व प्रकरणांची तांत्रिक तपासणी करुन दोषी आढळून येणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले.

आज राज्यात ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान

0

राज्यात आतापर्यंत झाल्या २८ लाखांहून अधिक चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि.११ : राज्यात आज १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.७९ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

राज्यात आज २५६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४२ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २८,३७,५७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,३५,६०१ (१८.८७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १०,०४,२३३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मी इम्पोर्ट ठेकेदार नाही …पाटील

0

अरविंद शिंदे यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे -पाटलांचा दावा

पुणे- आंबील ओढ्याला सीमाभिंत घालण्यासाठी महापालिकेने आणि स्थायी समितीने मान्यता दिलेल्या सावी इन्फ्रास्ट्रक्चर चे विकास पाटील यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी गट नेते यांनी केलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले . काल मायमराठी ला आलेल्या शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे त्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न ‘माय मराठी ‘कडे केला . ते म्हणाले ,’ मला इम्पोर्ट झालेला किंवा केलेला ठेकेदार म्हणणे हे साफ चुकीचे आहे. गेल्या वीस वर्षापासून मी पुणे महानगरपालिकेच्यासल्लागार व बांधकामाशी निगडीत आहे यासंदर्भात कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत.पूर्वी मी महापालिकेची कामे केली आहेत . आणि पी डब्ल्यू डी, एम आय डीसी ,एम एस आर डीसी ,नॅशनल हायवे ची कामे केलीत . चाकण येथे आपण ६ मीटर रुंदीची ३० मीटर उंचीची सीमा भिंत एका कंपनीला बाधून दिली आहे. खास तंत्रज्ञान वापरून आपण कामे करत असल्याने इस्टीमेट करताना आपणास या तंत्राचे सादरीकरण करण्यास बोलाविले होते ते आपण महापालिकेत उपस्थित राहून केले आहे.
सदरच्या निविदेत बांधकामाचे मोजमाप हे स्क्वेअर मीटर पद्धतीने नमूद केलेले आहे.
संरक्षक भिंतीच्या बांधकामाची निविदा काढतांना सर्वांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची
संधी मिळावी यात पारंपरिक पद्धतीने देखील ठेकेदार त्यांची निविदा सादर करू शकतात व नवीन
तंत्रज्ञान यांनादेखील निविदा स्पर्धेत भाग घेता यावा यासाठी स्क्वेअर मीटर पद्धतीने निविदा
काढण्यात आली.अशाप्रकारे सन 2016 साली निविदा क्रमांक 253, ठेकेदार : पाटील कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांनादेखील संरक्षक भिंतीचे बांधकाम व त्याचे मोजमाप हे स्क्वेअर मीटर
पद्धतीने दिलेले असून तसे पुणे महानगरपालिकेने मंजूर केलेले आहे.तसेच सन 2016 साली निविदा क्रमांक 254 अन्वये ठेकेदार एस ए इन्फ्रा यांनादेखील संरक्षक भिंतीचे बांधकाम व त्याचे मोजमाप हे स्क्वेअर मीटर पद्धतीने दिले असून तसे पुणे महानगरपालिकेने मंजूर केलेले आहे
सदरच्या निविदेतील जॉइंट व्हेंचर विषयीचा खुलासा करताना ते म्हणाले,’ निविदेत जॉइंट व्हेंचर करण्यास परवानगी दिलेली आहे. सदरची परवानगी ही महानगरपालिकेच्या फायद्यासाठी व शासकीय नियमानुसार असून यासंदर्भात ठेकेदार म्हणून आम्ही योग्य ती शासकीय कायदेशीर पूर्तता केलेली आहे.
संरक्षक भिंतीच्या कामासाठीच्या अनुभवाविषयी बोलताना ते म्हणाले ,’आमच्या कंपनीला तीस वर्षाचा अनुभव असून गेल्या वीस वर्षापासून संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा सरकारी व खाजगी क्षेत्रातील खूप मोठा अनुभव आहे त्यासंदर्भात आवश्यक ते प्रमाणपत्र त्यांनी निविदे सोबत सादर केलेले असून त्याची चौकशी झालेली आहे.
खूप वर्षानंतर, पुणे महानगरपालिकेच्या मोठ्या रकमेच्या निविदा प्रक्रियेत अत्यंत पारदर्शकपणे
व महानगरपालिकेच्या फायद्याच्या दृष्टीने सदरील निविदा प्रक्रिया ही राबवलेली असून यामध्ये
पुणे महानगरपालिकेची कोट्यावधी रुपयाची बचत होणार आहे.हे काम आम्ही ठेकेदारी पद्धतीने न घेता डिझाइन बिल्ड ह्या पद्धतीने घेतलेले आहे.

या कामासाठी आम्ही पुणे महानगरपालिकेच्या संपर्कात गेल्या एक वर्षापासून होतो. गेल्या वीस वर्षापासून आम्ही संरक्षक भिंतीचे बांधकाम, व त्याचा आराखडा तयार करणे व बांधकामाचे
नियोजन करून बांधकाम करून देणे ह्या व्यवसायात आहोत.सन 1999 -2000 साली आम्ही हे नवीन तंत्रज्ञान विकसित केलेले असून सदरच्या तंत्रज्ञानाने संरक्षण भिंतीच्या बांधकाम खर्चात 20 ते 25 टक्के एवढी बचत होत असून वेळेत व गुणवत्तेत खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.
या नवीन तंत्रज्ञानाचा वापर हा पुणे महानगरपालिकेत जवळपास अठरा ते वीस वर्षांपूर्वी केलेला
असून अशा प्रकारे केलेले अनेक बांधकामे, त्याचे दाखले माझ्याकडे उपलब्ध आहेत.
सदरच्या नवीन तंत्रज्ञानाचे पेटंट घेतले असून याचा वापर हा बांधकाम क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात
पैशाची बचत, वेळेची बचत व उत्कृष्ट गुणवत्ता यासाठी होत आहे. या सीमा भिंतीचे अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे काम आम्ही करून दाखवू असा दावाही त्यांनी मायमराठी कडे केला आहे. ते म्हणाले ३० वर्षापासून माझे मित्र असलेल्या राजेश पांडे यांना शुभेच्छ्या देणारे होर्डींग्ज मी लावले हे खरे आहे पण त्याचा अर्थ ,संबध या टेंडर शी जोडणे चुकीचे आहे .असेही ते म्हणाले.

अरविंद शिंदेंचा विरोध डावलून ‘सावी’च्या सिमाभिंती टेंडरला स्थायीची मंजुरी (व्हिडीओ)

0

कोरोनाच्या जम्बो सेंटर ला स्थायीकडून ७५ कोटी उपलब्ध

गणेश मूर्ती पाण्यात विरघळणारी पावडर खरेदीसाठी ३४ लाख तरतूद

पुणे – मागीलवर्षी सप्टेंबरमध्ये आलेल्या पूरामध्ये उध्वस्त झालेल्या आंबिल ओढ्यातील सिमाभिंती बांधण्याच्या तीन निविदांना आज स्थायी समितीच्या बैठकीमध्ये एकमताने मंजुरी देण्यात आली, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.कॉंग्रेसच्या अरविंद शिंदे यांचा विरोध असतानाही कॉंग्रेससह सर्वांनी एकमताने या निविदांना मंजुरी दिली .या शिवाय कोरोनारूग्णा वर उपचारासाठी उभारण्यात येणाऱ्या जम्बो सेंटर साठी ७५ कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला आणि गणेश विसर्जनासाठी मूर्ती पाण्यात विरघळणारी पावडर खरेदी करण्यासाठी ३४ लाखाच्या खरेदीला स्थायी समितीने आज मान्यता दिली . हे सर्व विषय बैठकीत आयत्या वेळी मांडून मंजुरी देण्यात आली .

मागीलवर्षी आंबिल ओढ्याला आलेल्या महापुरामुळे अनेकठिकाणच्या पुलांचे तसेच ओढ्याच्या सीमाभिंती पडून शेजारील सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. या पूरामध्ये जिवितहानी सोबतच मोठ्याप्रमाणावर वित्तहानीही झाली होती. यानंतर ओढ्यावरील पुल दुरूस्ती तसेच सिमाभिंतींचे कामही हाती घेण्याचा निर्णय झाला होता. पहिल्या टप्प्यात ओढ्यातील सर्व राडारोडा आणि गाळ काढून खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे. तर सीमाभिंतीच्या कामाच्या तीन निविदांना स्थायी समितीने आज मान्यता दिली.

या तीन निविदांपैकी के.के. मार्केट ते पदमावती पूल व गजानन महाराज चौक ते वैकुंठाजवळ ओढा ज्याठिकाणी मुठा नदीला मिळतो तेथपर्यंतच्या कामाची ६ कोटी १८ लाख रुपयांची मे. सावी इफ्रास्ट्रक्चर्स ऍन्ड प्रॉपर्टीज प्रा. लि.ची १५.०३ टक्के कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली. याच कंपनीने पेशवे तलाव ते पदमजी पार्क व पदमावती पूल व गजानन महाराज चौक दरम्यान महापालिका मिळकतींच्या सीमाभिंती बांधण्याची १५.०३ टक्के कमी दराने भरलेली ८ कोटी ९४ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. तर पदमजा पार्क ते के.के. मार्केट आणि कात्रज स्मशानभुमी दरम्यान महापालिकेच्या मिळकतींच्या सिमाभिंती बांधण्याची १८.५१ टक्के या सर्वात कमी दराने आलेली मे. साई सिद्धी इफ्रास्टक्चर कंपनीची एक कोटी ७७ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली, अशी माहीती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

आता अरविंद शिंदे काय भूमिका घेणार याकडे लक्ष

दरम्यान, मे. सावी इफ्रास्ट्रक्चर्स ऍन्ड प्रॉपर्टीज प्रा.लि. ही कंपनी अपात्र असताना तिला पात्र करण्यासाठी अधिकार्‍यांच्या एस्टीमेट कमिटीने जाणीवपूर्वक अटीशर्ती तयार केल्या आहेत. प्रथमच सीमाभिंतीच्या कामाचे घनफुटांऐवजी चौरस फुटांवर एस्टीमेट करण्यात आले आहे. एका भाजप पदाधिकार्‍याच्या दबावाखाली अतिरिक्त आयुक्त डॉ. शांतनु गोयल यांनी असा चुकीचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवला आहे. हा प्रस्ताव मंजूर केल्यास नगरविकास विभागाकडे तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेउन दिला होता. यानंतरही स्थायी समितीमध्ये एकमताने हा प्रस्ताव मंजूर झाल्याने शिंदे काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

जंबो हॉस्पीटलसाठी 75 कोटी रुपयांच्या खर्चास ‘स्थायी’ समितीची मान्यता

 राज्य शासनाच्यावतीने कोरोनावरील उपचारासाठी सुरू करण्यात येत असलेल्या तीन जंबो कोविड रुग्णालयासाठी पुणे महापालिकेच्या हिश्श्याचे ७५ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तातडीने तपासणी करण्यासाठी आणखी एक लाख अँन्टीजेन किटस् खरेदी करण्याचा निर्णय आज स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आल्याची माहिती रासने यांनी दिली.

कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून राज्य शासनाने उपचारासाठी तीन जंबो कोविड हॉस्पीटल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये उभारण्यात येणार्‍या या कोविड हॉस्पीटल उभारणीची जबाबदारी पीएमआरडीए कडे देण्यात आली आहे. या तीनही हॉस्पीटलसाठी साधारण २६० कोटी रुपये खर्च येणार आहे. यासाठी दोन्ही महापालिका २५ टक्के निधी देणार आहे. पुणे शहरातील सीओईपी महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात येणार्‍या हॉस्पीटलचे काम सुरूही झाले आहे. ठेकेदाराला या कामाची आगाउ रक्कम देण्यासाठी पुणे महापालिकेने ५० कोटी रुपये निधी पीएमआरडीकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव आज मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता.

यासोबतच सीओईपी महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात येणार्‍या कोविड हॉस्पीटलसाठी आवश्यक साधनसामुग्री, औषधे, प्रयोगाशाळा तपासण्या, एक्स रे, कपडे, धुलाई, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन आदी बाबींच्या निविदा महापालिकेकडून राबविण्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधीच्या खर्चासही आज स्थायी समितीमध्ये मान्यता देण्यात आली असल्याची माहिती रासने यांनी दिली.

आणखी १ लाख अँन्टीजेन कीटस्ची खरेदी

कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांची तातडीने तपासणी करून संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेेने मागील महिन्यांत एक लाख अँटीजेन कीटस् खरेदी केल्या आहेत. अँटीजेन किटस्द्वारे करण्यात येत असलेल्या तपासणीचा अहवाल अर्धा तासात प्राप्त होत असल्याने मागील महिन्याभरामध्ये संसर्ग झालेले रुग्ण शोधण्यात मदत झाली. परंतू या कीटस् संपत आल्याने आरोग्य विभागाने आणखी १ लाख किटस् खरेदीसाठी निविदा अल्पमुदतीची निविदा राबविली होती. या निविदेला मान्यता देण्यात आली आहे. यासाठी ४ कोटी ५९ लाख रुपये खर्च येणार आहे, अशी माहिती हेमंत रासने यांनी दिली

मार्की मांगली – २ कोळसा खाण लिलावातून वगळण्याची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची केंद्रीय मंत्र्यांना विनंती

0

मुंबई, दि. ११ : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहून विदर्भातील मार्की मांगली – २ या कोळसा ब्लॉकचा लिलाव थांबविण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

हा लिलाव झाल्यास संपूर्ण वनक्षेत्रातील इकोसिस्टम आणि त्याच्यावर अवलंबून असलेले वन्यजीव यांचे खूप नुकसान होऊ शकते. मार्की मांगली – २ कोळसा ब्लॉक हा टीएटीआर – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या कॉरिडॉरमध्ये असल्यामुळे या भागातील वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. खाण ब्लॉक प्रस्तावित असलेला विभाग हा ताडोबाच्या मंजूर व्याघ्र संवर्धन योजनेच्या क्षेत्राच्या अंतर्गत येतो.

प्रस्तावित खाण क्षेत्रातील सुमारे २५० हेक्टर क्षेत्र हे या प्रकल्पाच्या जवळपास ५० टक्के क्षेत्र आहे. हे क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन परिक्षेत्रातील राखीव जंगलभूमीवर आहे. २०१५ मध्ये पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयाने ही प्रस्तावित खाण अबाधित क्षेत्रामध्ये असल्याचे नमूद केले आहे, परंतु २०१८ मध्ये मंत्रालयाने असे काही नमूद केल्याचे आढळून आले नसल्याचे काही वृत्तांमध्ये सूचित करण्यात आले आहे.

पर्यावरणीयदृष्ट्या मौल्यवान असलेल्या या संवर्धन क्षेत्राचे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेता मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, या प्रकल्पामुळे प्रदेशातील वाघ केवळ त्यांचा नैसर्गिक अधिवास गमावणार नाहीत तर खाणकाम आणि माणसांच्या वाढत्या अस्तित्वामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. त्यामुळे या कोळसा खाणीचा लिलाव थांबविण्यात यावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील बांदर कोळसा खाण प्रकरणी हस्तक्षेप करुन त्याचा लिलाव वगळल्याबद्दल मंत्री श्री. ठाकरे यांनी केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानले आहेत. याबाबत मंत्री श्री.ठाकरे यांनी यापूर्वी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती. ते म्हणाले की, लिलाव यादीमधून बांदर खाण वगळल्यामुळे तिथे वाघांसाठी अत्यंत संवेदनशील असे इको झोन तयार होईल. यामुळे मौल्यवान जैवविविधतेचा नाश होण्यापासून संरक्षण झाले आहे, असे ते म्हणाले.

सुर्यदत्ता एज्युकेशन फौंडेशनकडून ‘रिसोर्स अँड असेट बँक’ची स्थापना

0

पुणे : सुर्यदत्ता ग्रुपच्या एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत दिवंगत रत्नाबाई आणि बन्सीलाल चोरडिया यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने सुर्यदत्ता एज्युकेशन फौंडेशनच्या वतीने ‘असेट बँक’ उभारण्यात आल्या आहेत. सूर्यदत्ता स्कुल ऑफ इंटरनॅशनल हॉटेल मॅनेजमेंट अंतर्गत सुर्यदत्ता फुड बँक, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी अंतर्गत सुर्यदत्ता क्लोदिंग बँक, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अंतर्गत सुर्यदत्ता प्रॉडक्ट्स बँक, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड इनोव्हेशन सेंटर अंतर्गत सुर्यदत्ता नॉलेज बँक आणि सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, सूर्यदत्ता इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी आणि सूर्यदत्ता कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजी या संस्थांच्या अंतर्गत सूर्यदत्ता बिझनेस बँक अशा पाच बँकांचा यात समावेश आहे. या बँकांमार्फत अर्थात इन्स्टिट्यूटमार्फत विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. समाजातील गरजू, होतकरू, आर्थिक मागास वर्गातील लोकांना, शेतकर्‍यांना, सैन्यदलातील सदस्यांना, नोकरदारांना, दिव्यांग मुलांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती सुर्यदत्ता ग्रुपच्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांनी दिली आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी ७४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हा सामाजिक उपक्रम सुरु होत आहे.
सुषमा चोरडिया म्हणाल्या, “सुर्यदत्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या संकल्पनेतून या असेट बँकांची निर्मिती झाली आहे. कोअर टीममध्ये प्रा. डॉ. शैलेश कासंडे, डॉ. विजयालक्ष्मी, डॉ. शेफाली जोशी, उल्हास चौधरी, अजित शिंदे, मंदार दिवाने, रेणुका घोसपुरकर, मोनिका कर्वे, स्नेहल नवलाखा, डॉ. राम चंद्र आदींचा समावेश असणार आहे. सुर्यदत्ता फुड बँकेच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्था, रोजंदारीवरील मजूर, रस्त्यावर राहणारे नागरिक यांच्यासह गरजूंना अन्न पुरवले जाणार आहे. सुर्यदत्ताच्या पदाधिकाऱ्यांचे, संबंधितांचे जन्मदिवस, तसेच विविध महत्वपूर्ण दिवसांचे औचित्य साधून हे अन्नदान होणार आहे. तसेच गरजूना जीवनावश्यक साहित्य दिले जाणार आहे. क्लोदिंग बँकेमार्फत वापरायोग्य कपड्यांचे संकलन, तसेच नवीन कपडे घेऊन गरजू लोकांना पुरविण्यात येणार आहेत. आलेले कपडे स्वच्छ धुऊन, विद्यार्थी व शिक्षकांकडून त्याचे रफ़ू-अल्ट्रेशन करून ते वितरित केले जाणार आहेत. ज्यांना गरज आहे, अशा लोकांना या कपड्यांचे वाटप केले जाईल. नवीन आणि वापरलेले अशा दोन्ही प्रकारचे कपडे गरजूंपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. अनाथ आश्रम, महिला आश्रम, वृद्धाश्रमात राहणार्‍या गरजुंना याची मदत होणार आहे. नेहमीच्या वापरातील, उबदार कपडे आपण देऊ शकाल.”
“सुर्यदत्ता प्रॉडक्ट बंकेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या पुनर्वापर होऊ शकेल, अशा उत्पादनांचे संकलन केले जाईल. त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करून गरजूना ते दिले जाणार आहेत. तसेच शालेय साहित्य, जसे कि वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल्स, रबर, कंपास आदिंचा समावेश असेल. शिवाय, अवांतर वाचनाची पुस्तके आदी साहित्य समाजातील गरजू विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप केले जाणार आहे. सुर्यदत्ता नॉलेज बँकेमधून ज्ञानदानाचे कार्य होणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरुपात विविध गोष्टींचे ज्ञान दिले जाणार आहे. त्यामध्ये भारतीय संस्कृती मूल्ये, चालू घडामोडींची माहिती, प्रश्नोत्तरे, प्राथमिक शिक्षण अशा स्वरुपात हे ज्ञानदान होणार आहे. बिझनेस बँकेच्या माध्यमातून स्टार्टअप आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यास नवोद्योजकांना माहिती आणि इतर सहाय्य पुरवले जाणार आहे. स्टार्टअपसाठी प्रेरित करण्याचा उद्देश यामागे असून, सुर्यदत्ता परिवारातील प्राध्यापक, विद्यार्थी किंवा इतर कर्मचारी हे काम करतील. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे वळण्यासोबतच देशातील ‘एसएमई’ चालना मिळेल,” असेही चोरडिया यांनी नमूद केले. तसेच अधिक माहितीसाठी 9763266829 या क्रमांकावर किंवा sgiassetbk@suryadatta.edu.in या ईमेलवर संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मुलांमध्ये चांगले गुण रुजावेत. त्यांच्यात उद्योजकतेविषयी, करिअरविषयी नवीन कल्पना रुजाव्यात, उपलब्ध स्रोतांपासून नवीन ध्येये सध्या करावीत, या उद्देशाने हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे. या बँक विद्यार्थ्यांसाठी रिसोर्सेसचा खजिना असेल, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याच्याशी आपल्याला जोडून घ्यावे, असे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले. 

प्रधानमंत्र्यांनी घेतला १० राज्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा

0

महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार; कोरोनानंतरच्या उपचारासाठीची व्यवस्था करणे आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १२ : देशाच्या एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी ८० टक्के रुग्ण हे १० राज्यांमध्ये आहेत. या दहा राज्यांच्या प्रयत्नातून कोरोनाला हरविलं तर देश जिंकेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला. दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना बरे झाल्यानंतरही अन्य आजार झाल्याचे निदर्शनास आले असून कोरोनानंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी केले. 

आज प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सितारामन, आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार विविध राज्यांचे मुख्य सचिव आदि उपस्थित होते.

मृत्यूदर १ टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

दहा राज्यांमध्ये ॲक्टिव्ह केसेसचे प्रमाण ८० टक्के आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात या राज्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले. या राज्यांकडून कोरोना विरुद्ध करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे आणि अनुभवातून कोरोनावर एकत्रितपणे मात करणे शक्य होईल. ही १० राज्ये जिंकली तर देश जिंकेल असे सांगतानाच कोरोनामुळे होणारा मृत्यूदर १ टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे श्री.मोदी यांनी सांगितले.

एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या ७२ तासांत त्या व्यक्तीच्या निकटसहवासातील व्यक्तींचे सर्वेक्षण चाचण्या केल्या तर संसर्गाचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे सुरूवातीचे ७२ तास महत्त्वाचे हे लक्षात घेऊनच ट्रेसींग, टेस्टींग वाढवावे असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले.

यावेळी महाराष्ट्राने केलेली कामगिरी मांडताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, कोरोना बाधित आणि मृत्यू झालेली एकही केस लपवली नाही. पारदर्शीपणे माहिती दिली. कोरोनाबाबत अनेकांच्या मनात भिती तर अनेकांमध्ये काही ही होत नसल्याची लापरवाई आहे तर पोटासाठी बाहेर पडण्याची मजबूरी देखील आहे अशा तीन अवस्थेत कोरोनाचा सामना सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही – मुख्यमंत्री ठाकरे

राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

याकाळात शिवभोजन योजनेच्या माध्यमातून महिन्याला लाखो लोकांना केवळ ५ रुपयांमध्ये जेवणाची सोय केली. राज्यातील गरीब जनतेला याचा मोठा लाभ झाला आहे. मागच्या आठवड्यात कुपोषण निर्मुलनासाठी आदिवासी बालकांना व मातांना दुध भूकटी मोफत देण्याचा निर्णय देखील राज्यशासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्या लोकांना इतर आजार झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर कोरोनानंतरही उपचार व्हावे यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात साथ रोग नियंत्रण रुग्णालय मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करणार असल्याचे ते म्हणाले.

इमिनॉलॉजी लॅबची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले. विविध प्रकारच्या विषाणूंचा उद्भव कसा आणि का होतो यावर संशोधन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जे उद्या करायचे ते आज आणि आज करायचे ते आत्ता असे उद्याचे जग कोरोनाने आजच दाखवले.

अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत देशपातळीवर एकच निर्णय घ्यावा

विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांचे जीवन धोक्यात घालता कामा नये त्यामुळे नॉन प्रोफेशनल कोर्सेसच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेऊ नयेत अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्रधानमंत्र्यांकडे केली. विद्यार्थ्यांना सरासरी मार्क्स देऊन (ॲग्रीगेट) उत्तीर्ण करण्यात यावे. कोरानामुळे किती काळ असे राहणार याचे उत्तर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य किती काळ टांगून ठेवणार, यासाठी देशपातळीवर एकच निर्णय लवकरात लवकर घेण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षाबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता असून विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार, मौखिक स्वरूपात परीक्षा घेण्याची गरज. अंतिम वर्षाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कोरोना युद्धात त्यांच्या इच्छेनुसार मदत घेता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात कोरोना उपचारासाठी ऑक्सीजन, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांसह सज्ज अशा साडेतीन लाख खाटा उपलब्ध असल्याचे सांगतानाच या सुविधांसाठी डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मास्क, सोशल डिस्टंसिंग सध्या हे औषध

कोरोनावर अद्याप औषध नाही आणि लस अजून उपलब्ध झालेली नाही.  जनजागृती करतांना आज घडीला तरी मास्क, सोशल डिस्टंसिंग हेच औषध आणि लस आहे असे नागरिकांना समजून सांगतले आणि अशा पद्धतीने कोरोनासोबत आपण जगायला शिकलो तर लॉकडाऊन नाही तर अनलॉकिंगची प्रक्रिया आणखी सोपी व जलद होईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडले.