पुणे दि.12:-पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व वाढती रुग्णसंख्या विचारात घेता मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी व भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा.लिमिटेड चाकण, ता. खेड या कंपनीस मेडीकल ऑक्सीजन उत्पादन सुरु करणे आवश्यक आहे. एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा.लिमिटेड चाकण कंपनीला विद्युत जोडणी करण्यासाठी परिसरातील इतर कंपन्यांचा विद्युत पुरवठा ठराविक कालावधीकरीता बंद करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
एअर लिक्वीड या कंपनीस मेडीकल ऑक्सीजन उत्पादन सुरु करण्याकरीता एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा. लिमिटेड चाकण या कंपनीस विद्युत जोडणी करण्यासाठी 132 के.व्ही. चिंचवड- चाकण विद्युत वाहिनी, 220 के.व्ही. व्होकसवॅगन ते 220 के.व्ही. चाकण उपकेंद्र ही वाहिनी व 220 के.व्ही. चाकण उपकेंद्रामधून निघणारे सर्व 22 के.व्ही. व 132 के. व्ही. वाहिनीचा पुरवठा दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत बंद करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कोवीड-19 साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व वाढती रुग्णसंख्या विचारात घेता मेडीकल ऑक्सीजनचा उत्पादन व पुरवठा सुरळीत होण्यासाठी व भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता एअर लिक्वीड इंडिया होल्डींग या कंपनीस मेडीकल ऑक्सीजन उत्पादन सुरु करणेकरीता हा आदेश पारीत करण्यात आला आहे.
मे.आयनॉक्स एअर प्रोडक्टस प्रा. लि. चाकण व मे टायोनिपॉन सॅनसो इंडिया प्रा. लि. चाकण यांच्या मेडीकल ऑक्सीजन उत्पादनावर देखील या विद्युत पुरवठा बंद कालावधीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे.आयनॉक्स एअर प्रोडक्टस प्रा. लि.चाकण व मे टायोनिपॉन सॅनसो इंडिया प्रा. लि. चाकण यांनी सध्या होत असलेला मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी व तद्नंतर देखील विनाअडथळा सुरळीत राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना या आदेशान्वये देण्यात आल्या आहेत. या दिवशी ज्या रुग्णालयांना ते मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा करतात, त्यांच्याशी मागणी बाबत समन्वय ठेवून आवश्यक तो मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा करावा. कोणत्याही परिस्थीतीत रुग्णांची गैरसोय होणार नाही याबाबतची जबाबदारी संबंधित कंपन्यांची राहिल.
एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा. लिमिटेड, चाकण ही कंपनी इतर राज्यात मेडीकल ऑक्सीजन चे उत्पादन करीत असल्याने त्यांनी बंद कालावधीमध्ये मेडीकल ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरु राहण्यांकरीता आयनॉक्स एअर प्रोडक्टस चाकण व टायोनिपॉन चाकण यांच्याशी समन्वय साधून मेडीकल ऑक्सीजन पुरवठा करण्याची जबाबदारी एअर लिक्वीड इंडिया होल्डिंग, चाकण यांची राहील. त्यापुढे पुणे शहरातील व जिल्हयातील शासकीय रुग्णालये व इतर रुग्णालये यांना मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा नेहमीप्रमाणे सुरळीत राहील, याची जबाबदारी आयनॉक्स एअर प्रोडक्टस प्रा. लि. चाकण ता. खेड व टायोनिपॉन चाकण ता, खेड यांची राहील. एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा. लिमिटेड चाकण या कंपनीस विद्युत जोडणी करण्याकरीता दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीची राहील.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथ रोग नियंत्रण नयम 1897 तसेच भारतीय दंड विधान 1860 चे कलम 188 प्रमाणे सर्व संबंधित दंडनिय कार्यवाहीस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
चाकण परिसरातील कंपन्यांचा विद्युत पुरवठा ठराविक कालावधीकरीता बंद -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
काँग्रेसने राजकारणासाठी शिवाजी महाराजांविषयी वाद निर्माण करू नये
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन
पुणे-छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वाद निर्माण करून त्याच्या आधारे आपला राजकीय मतलब साधण्याचा प्रकार काँग्रेस पक्षाकडून सुरू आहे. अपयशामुळे काँग्रेस पक्ष हताश झाला असला तरी आपले राजकीय महत्त्व टिकविण्यासाठी काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करून वाद निर्माण करू नये, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी केले.
आ.. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे व गुलामनबी आझाद यांनी या जयघोषाला आक्षेप घेतला. त्यामुळे सभापती व देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी नियम स्पष्ट केले. त्यावरून पद्धतशीर गदारोळ केला गेला. सभापतींनी शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यापासून रोखल्याचा अत्यंत चुकीचा आरोपही केला गेला. काँग्रेस नेत्यांनी उदयनराजे यांच्या घोषणेला आक्षेप घेतला नसता तर पुढे काही घडलेच नसते.
ते म्हणाले की, कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यात मणगुत्ती येथे नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यावरून वाद झाला. स्थानिक गावकऱ्यांच्या दोन गटातील वादातून हा प्रसंग निर्माण झाला. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी स्थानिक आमदार आहेत. त्यांची या वादात भूमिका आहे. या वादात महाराष्ट्रातील नेत्यांनी पडू नये, असे जारकीहोळी यांचे वक्तव्य प्रसिद्ध झाले आहे. काँग्रेस नेत्याशी संबंधित घडामोडींमुळे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वाद होणे व राजकीय गदारोळ होणे हा प्रकार पुन्हा घडला.
ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारताचे दैवत आहेत. काँग्रेस पक्षाकडून गेल्या काही दिवसात शिवाजी महाराजांविषयी वाद निर्माण करण्याचा व त्याच्या आधारे भारतीय जनता पार्टीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा मी निषेध करतो. काँग्रेसला भाजपाशी जो काही राजकीय संघर्ष करायचा असेल तो त्यांनी जरूर करावा, आम्ही त्याला सडेतोड उत्तर देऊ. पण काँग्रेसने या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करू नये.
अध्यक्षपदी भरत पाटील,सेक्रेटरीपदी डॉ सिमरन जेठवानी
पुणे :
रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या अध्यक्षपदी भरत पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी सेक्रेटरीपदी डॉ सिमरन जेठवानी तर खजिनदारपदी होमी वाडिया यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष ब्रिग्रेडियर डॉ अमरजीत सिंह यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.
ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल रश्मी कुलकर्णी व सहाय्यक प्रांतपाल पल्लवी साबळे आदी उपस्थित होते.१२ ओगस्ट २०२० रोजी हा कार्यक्रम पार पडला.
भाजपच्या कार्यकारिणीत तब्बल 12 उपाध्यक्ष, काकडे समर्थकांना मानाचे स्थान
पुणे-मागील काही महिन्यांपासून रखडलेली भारतीय जनता पार्टीची जम्बो पुणे शहर कार्यकारिणी बुधवारी जाहीर करण्यात आली.यामध्ये तब्बल 12 जणांची उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कार्यकारिणीत भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या समर्थकांना मानाचे स्थान देण्यात आले आहे.
2017 च्या महापालिका निवडणुकीपासून काकडे यांच्या समर्थकांना स्थान मिळत नसल्याची ओरड सुरू होती.
पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आज सर्वांना निवडीचे पत्र पाठविले आहे.
नगरसेवक हरिदास चरवड, माजी नगरसेवक दिनेश धाडवे, नगरसेविका मानसी देशपांडे, भूषण तुपे, संतोष राजगुरू, योगेश बाचल, गणेश कळमकर, सुनील मारणे, श्रीपाद ढेकणे, दिलीप काळोखे, डॉ. संदीप बुटाला, रमेश काळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
राजेश पांडे यांची सरचिटणीस-संघटन, तर गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दीपक पोटे यांची सरचिटणीसपदी, नगरसेविका गायत्री खडके, प्रशांत हरसुले, चंद्रकांत पोटे, माजी नगरसेवक किरण बारटक्के, मंगला ढोरे, कोमल शेंडकर, हरीश निकम, संदीप लोणकर, अनिता तलाठी, सुनील माने, निलेश कोंढाळकर यांची चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
रस्त्यावर,पदपथावर गणेशमूर्तीची विक्रीस परवानगी नाही -महापौर कार्यालयाचा आदेश
पुणे- श्री गणेशात्सवानिमित्त प्रतिवर्षी श्री गणेश मूर्ती विक्री स्टॉल्सना बहुतांश फुटपाथवर जागा देण्यात येते . तथापि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश मूर्ती विक्री स्टॉलसाठी रस्ता अथवा पदपथांवर यावर्षी परवानगी देण्यात येणार नाही .असे महापौर कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या संदेशात म्हटले आहे.
यंदाचे वर्षी श्री गणेश मूर्ती विक्री व्यावसायिकांना फक्त पुणे महानगरपालिका क्रीडांगणांवर स्टॉलसाठी परवानगी दिली जाणार आहे . फक्त या वर्षासाठी पुणे महानगरपालिका क्रीडांगणांवरील श्री गणेश मूर्ती विक्री स्टॉलसाठी अनामत रक्कम रु . ५००० / – व प्रतिदिन भाडे रक्कम रु . ५०० / – आकारण्यात यावे तसेच पुणे महानगरपालिका शाळांच्या वर्गखोल्या देखील श्री गणेश मूर्ती विक्रेत्यांसाठी विनामूल्य उपलब्ध करुन देणेत याव्यात अशा सूचना महापौर यांनी पुणे मनपा प्रशासनास दिल्या आहेत .असे या संदेशात म्हटले आहे .
जर पार्थ अपरिपक्व तर त्याला उमेदवारी का दिली हेही पवारांनी स्पष्ट करावे – दरेकर
पुणे-पार्थ पवारांनी केलेल्या मागणीला कवडीचीही किंमत नाही. असे पार्थ पवारांच्याबाबत त्यांनी वक्तव्य केले आहे. पार्थ पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका अपरिपक्व नेत्याला उमेदवारी दिली का ? असा प्रश्न निर्माण होतो. पार्थ पवार युवा नेते आहेत. त्यांच्या भूमिकेत काही खाली-वर असू शकते. पण त्यांना काडीचीही किंमत नाही असे म्हंटल्याने या युवा नेतृत्वाचे मनोबल त्यामुळे खच्ची होईल, असे मला वाटते,’ अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केली होती. त्यानंतर पार्थच्या या मागणीवर आजोबा शरद पवार यांनी चांगलीच कानउघडणी केली. मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात पवारांनी प्रतिक्रिया दिली.
मुंबई पोलिसांवर तर पवार साहेबांप्रमाणे सर्वसामान्य जनतेचा, सर्व नेत्यांचा पूर्ण विश्वास आहे. पवार साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलेय, केंद्रात मंत्री म्हणून काम केलेय आणि प्रशासकीय यंत्रणांचे कामकाज त्यांना नीट माहिती आहे. त्यामुळे मुंबई पोलीस काय, बिहार पोलीस काय किंवा सीबीआय काय, अंतिमतः या तपास यंत्रणांच्या माध्यमातून सत्य जनतेसमोर येणे आवश्यक असते. खरा गुन्हेगार लपता काम नये, यासाठी या तपास यंत्रणा आहेत. आणि यासाठी त्यांची हरकत नसल्याचं त्यांचे वक्तव्य अगदी योग्य आहे, असे मला वाटते.
तसेच
आदित्य ठाकरेंच्या नियुक्तीला विरोधीपक्षनेत्यांचा विरोध
मुंबई-
“पद्म पुरस्काराच्या समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची निवड करणे खूप घाईचे आहे. अननुभवी अशा तरुण मंत्राच्या अध्यक्षतेखाली एवढ्या मोठ्या पुरस्कारासाठीच्या समिती तयार करणे संयुक्तिक आहे असे मला वाटत नाही. जरी ते राजशिष्टाचार मंत्री असले तरी एका प्रकरणामध्ये कोर्टामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख झालेला आहे. अशावेळी या सन्मानाच्या पुरस्कारासाठीच्या समितीमध्ये; अध्यक्षपदी अनेक जेष्ठ, बुजुर्ग, अनुभवी, मंडळी असताना त्यांची नियुक्ती करणे योग्य आहे,” असे मला वाटत नाही, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या नियुक्तीबद्दल आक्षेप नोंदविला आहे.
राज्यात कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा झाले कमी
तिसऱ्यांदा दरांमध्ये सुधारणा; प्रति तपासणी ३०० रुपयांची कपात – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि.१२ : राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १९००, २२०० आणि २५०० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्य शासनाने समिती नेमून काही दिवसांपूर्वी कोरोना चाचण्यांचे दर निश्चित केले होते. रुग्णालयातून रुग्णाचा स्वॅब घेतला त्यासाठी २२०० रुपये दर आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेऊन तपासणी केली तर त्यासाठी २५०० रुपये आकारायचा निर्णय झाला होता. काही व्यक्ती, रुग्ण स्वत: थेट प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करतात त्यांच्याकडून २८०० रुपये आकारले जात होते. अशा वेळी त्यांच्याकडून २८०० रुपयांऐवजी २५०० रुपये आकारावेत असे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले.
मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळे चाचण्यांसाठी लागणारे रिएजंटस्, व्हीटीएम कीट व पीपीई किट यांची उपलब्धता वाढल्याने त्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे तपासणी खर्चात कपात होणे आवश्यक होते. याबाबी लक्षात घेऊन प्रयोगशाळा व किटस् उत्पादकांशी चर्चा करून समितीने शिफारशींसह आपला अहवाल शासनला सादर केला. त्यानुसार चाचण्यांचे पुन्हा सुधारित दर निश्चित करण्यात आले.
त्यामुळे आता सॅम्पल घेऊन त्याची वाहतूक आणि सॅम्पलचे रिपोर्टींग त्याकरिता २२०० रुपयांऐवजी १९०० रुपये आकारण्यात येईल. तर स्वॅब कलेक्शन सेंटर, कोरोना केअर सेंटर्स, क्वारंटाईन सेंटरमधील येथून स्वॅब घेतल्यास २५०० रुपयांऐवजी २२०० आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २५०० रुपये सुधारीत दरानुसार आकारण्यात येणार आहेत.
एयर इंडिया एक्सप्रेसमध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव : चीफ मेडिकल ऑफिसर, ग्रेड-एम-५ (मुंबई) – १
शैक्षणिक पात्रता : इंडियन मेडिकल कौन्सिल मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२० रोजी कमाल वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
पदाचे नाव : सिनियर असिस्टंट मेडिकल, ग्रेड-एस-३ (मुंबई) – १
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२० रोजी कमाल वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
पदाचे नाव : डेप्युटी चीफ ऑफ फायनान्स, ग्रेड-एम-७ (मुंबई) – १
शैक्षणिक पात्रता : सीए / आयसीडब्ल्यूए आणि अनुभव
वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२० रोजी कमाल वय ५० वर्षांपेक्षा पेक्षा जास्त नसावे.
पदाचे नाव : मॅनेजर फायनान्स, ग्रेड-एम-४ (मुंबई) – २
शैक्षणिक पात्रता : सीए आणि अनुभव
वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२० रोजी कमाल वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर फायनान्स, ग्रेड-एम-३ (मुंबई) – २
शैक्षणिक पात्रता : सीए / आयसीडब्ल्यूए आणि अनुभव
वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२० रोजी कमाल वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १४ ऑगस्ट २०२०
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3kFJmEj
https://www.airindiaexpress.in/en/about-us/careers
अर्ज पाठविण्यासाठीचा पत्ता : द चीफ ऑफ एचआर, एयर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड, एयरलाईन्स हाऊस, दरबार हॉल रोड, गांधी स्क्वेअर, कोची – ६८२०१६
वाघोली परिसरात वीजयंत्रणेसाठी 13 कोटींची कामे सुरु
पुणे, दि. 12 : जलदगतीने विस्तारीत होणाऱया वाघोली परिसरातील वीजग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणकडून वीज वितरण यंत्रणेच्या विविध कामांसाठी 12 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून कंत्राटदारांकडून कामे देखील सुरु झाली आहेत. या कामांमुळे वीज वितरण यंत्रणेचा कायापालट होणार आहे. तसेच जुनाट यंत्रणाही बदलण्यात येत आहे. दरम्यान, ग्राहकांशी सतत संवाद साधून अडचणी समजून घेत देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात तांत्रिक बिघाडांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
मुळशी विभाग अंतर्गत वाघोली शाखे अंतर्गत सुमारे 60 हजार वीजग्राहक आहेत. महावितरणकडून लोणीकंद उपकेंद्रातील एकूण 22 वीजवाहिन्यांद्वारे वाघोली परिसरात वीजपुरवठा केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे तसेच वाढत्या नागरीकरणामुळे वीज वितरण यंत्रणेवर ताण येत असल्याने महावितरणकडून वीजयंत्रणेचे सक्षमीकरण तसेच देखभाल व दुरुस्तीचे कामे नियमितपणे करण्यात येत आहे. या परिसरातील वीजग्राहकांशी सातत्याने संवाद साधून तक्रारींचे निवारण करण्यासोबतच स्थानिक वीजयंत्रणेत बदल व सुधारणा करण्यात येत आहे. परिणामी तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण सद्यस्थितीत कमी झाले आहे.
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडून लोणीकंद उपकेंद्र ते पूर्वरंग सोसायटीमधील पूर्वरंग उपकेंद्रापर्यंत 42 किलोमीटरच्या चार उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्यांचे काम सुरु केले होते. वीजयंत्रणेवरील ताण कमी होण्यासोबतच सुरळीत वीजपुरवठ्यासह पर्यायी स्वरुपाचा वीजपुरवठा वाघोली परिसराला उपलब्ध होणार होता. मात्र काही अडचणी व राईट ऑफ वेमुळे हे काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. या चारही भूमिगत वाहिन्या कार्यान्वित झाल्यास संपूर्ण वाघोली परिसराला मोठा फायदा होणार आहे.
वाघोली परिसरातील नागरीकरण व विजेची वाढती मागणी पाहता महावितरणने एसएसएमआर (system strengthening under metro region) योजनेतून 12 कोटी 67 लाख रुपयांच्या विविध कामांना मंजुरी दिली आहे. त्याची कामेही युद्धपातळीवर सुरु झालेली आहेत. यामध्ये नवीन रिंग मेन युनिट, एबी स्विच, फिडर पिलर्स बसविणे, नवीन वितरण रोहित्र, रोहित्रांची क्षमतावाढ, 15 किलोमीटर नवीन भूमिगत वाहिनी, 35 किलोमीटर वीजतारा बदलणे आदी 25 प्रकारचे कामे करण्यात येत आहेत. यासोबतच यंदाच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामामध्ये रोहित्रांतील तेलाची पातळी वाढविणे, गंजलेले व सडलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, सुरक्षिततेसाठी वीजवाहिन्यांना स्पेसर्स किंवा पीव्हीसी स्पेसर्स बसविणे, लोंबकळणाऱ्या वीजतारांचे झोल काढणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सची दुरुस्ती तसेच क्लिनिंग व झाकणे लावणे, नवीन किटकॅट बसविणे, झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, नादुरुस्त सर्व्हीस वायर बदलणे, रोहित्रांच्या केबल बदलणे इत्यादी कामे करण्यात आलेली आहेत. त्यामुळे वाघोली परिसरात तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे अत्यल्प झाले आहे.
जेड रेसिडेंसीमध्ये 10 दिवसांत एकूण 77 मिनिटे वीज खंडित – वाघोली येथील 900 घरांच्या जेड रेसिडेंसीमध्ये एकूण 9 स्वतंत्र इमारती आहेत. त्यातील काही इमारतीमधील रहिवाशांनी वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार विविध माध्यमांद्वारे केली आहे. मात्र वस्तुस्थिती पडताळून पाहिली असता गेल्या 10 दिवसांमध्ये विविध वेळेत झालेल्या खंडित वीजपुरवठ्याचा एकूण कालावधी 77 मिनिटांपेक्षा अधिक आढळून आला नाही. त्यातही 10 मिनिटांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत वीजपुरवठा खंडित नव्हता. वादळ, पाऊस, झाडे, फांद्या पडणे व इतर विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास या इमारतींना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी तांत्रिक उपाय करण्यास 5 ते 10 मिनिटांचा कालावधी आवश्यक आहे. विशेष म्हणजे जेड रेसीडेंसीमधील काही इमारतींकडे कॉमन मीटरच्या वीजबिलांची 52 लाख रुपयांची थकबाकी होती. सद्यस्थितीतही काही इमारतींकडे फेब्रुवारीपासून 19 लाख रुपयांची थकबाकी आहे. मात्र महावितरणने कोविड प्रादुर्भावामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली नाही.
साखर आयुक्त कार्यालयात ‘कोरोना किलर’ विषाणूनाशक उपकरण
पुणे :
राज्याच्या साखर आयुक्त कार्यालयात विषाणूनाशक कोरोना किलर उपकरण बसविण्यात आले आहे.इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असलेल्या भाऊसाहेब जंजिरे यांच्या इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स प्रा.लि (पुणे) या कंपनीने ‘आयनायझेशन’ च्या तत्वावर तयार केलेल्या ‘कोरोना किलर’ विषाणूनाशक उपकरणाचे प्रात्यक्षिक आज बुधवार दि १२ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील साखर आयुक्त कार्यालयात दाखविण्यात आले.प्रात्यक्षिकानंतर हे उपकरण कार्यालयात बसविण्यात आले.भाऊसाहेब जंजिरे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली . ‘कोरोना मुळे अनेक उद्योगांप्रमाणे साखर उद्योगही अडचणीत आला आहे.साखर कारखान्यांमधील दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे.अशा पार्श्वभूमीवर विषाणू,बुरशी आणि बॅक्टेरिया नाशक इलेक्ट्रॉनिक उपकरणे साखर कारखान्यांना उपयुक्त ठरतील.साखर कारखान्यांना,संबंधित कार्यालये आणि आस्थापनांना या उपकरणांमुळे निर्धोकपणे दैनंदिन कामकाज करता येईल.’ असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.
आयसीएमआर ,राष्ट्रीय विषाणु संशोधन संस्था ,नायडू हॉस्पिटल यांनी ‘कोरोना किलर ‘ विषाणू नाशक इलेक्ट्रॉनिक उपकरणाला दिलेली कार्यक्षमता प्रमाणपत्र यावेळी साखर आयुक्तांना देण्यात आली .
भाऊसाहेब जंजिरे म्हणाले ,’हे इलेक्ट्रॉनिक उपकरण अत्यंत चांगल्या पद्धतीने काळाची गरज ओळखून तयार केलेले आहे. आवश्यक परीक्षण संस्थांची प्रमाणपत्रे असल्याने हे उपकरण सगळीकडे लावणे शक्य आहे . ज्या हॉस्पिटलमध्ये कोविड -१९ चे रुग्ण आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये ,सेंटरमध्ये डिसन्फेक्ट करण्यासाठी हे उपकरण अत्यंत महत्त्वाचे काम करीत आहे .’
आयनायझेशन च्या माध्यमातून कोरोना व्हायरस च्या आवरणास नष्ट करून व्यक्तीचे कोरोना विषाणू पासून रक्षण करणाऱ्या ‘कोरोना किलर ‘ या इलेक्ट्रॉनिक उपकरणास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( आयसीएमआर ),नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी तर्फे जुलै २०२० मध्ये कार्यक्षमता प्रमाणपत्र देण्यात आले आहे .पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स प्रा.लि .या कंपनीने संशोधित केलेले आणि अशा स्वरूपाची मान्यता मिळवणारे हे पहिले उपकरण आहे .
‘कोरोना किलर ‘ हे फक्त विजेवर चालणारे आणि साबण किंवा सॅनिटायझर न लागणारे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे . ते कोणत्याही बंद परिसरात वापरता येते . घर ,हॉस्पिटल ,शाळा ,हॉस्पिटल ,गाड्या ,विमान, प्रयोगशाळा ,क्वारंटाईन सेंटर ,कारखाने ,मंदिरे अशा कोणत्याही ठिकाण ते वापरता येते . या इलेक्ट्रॉनिक उपकरणास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( आयसीएमआर ),नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी तर्फे मान्यता देण्यात आली आहे . तसेच पुण्यातील नायडू रुग्णालयानेही यशस्वी वापराचे प्रमाणपत्र दिले आहे. कोविड रुग्णाचे मास्क ,हातमोजे ,बेडशीट आणि इतर वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यास देखील हे उपकरण उपयोगी ठरते.
पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 906, एकुण 3 हजार 798 रुग्णांचा मृत्यू
पुणे विभागातील 1 लाख 1 हजार 636 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;
विभागात कोरोना बाधित 1 लाख 46 हजार 340 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे,दि.12 :- पुणे विभागातील 1 लाख 1 हजार 636 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 46 हजार 340 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 906 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 798 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.60 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 69.45 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 12 हजार 131 रुग्णांपैकी 84 हजार 645 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 24 हजार 934 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 552 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.49 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 हजार 939 रुग्णांपैकी 2 हजार 806 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 941 आहे. कोरोनाबाधित एकूण 192 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 हजार 647 रुग्णांपैकी 7 हजार 626 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 449 आहे. कोरोनाबाधित एकूण 572 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 हजार 902 रुग्णांपैकी 1 हजार 692 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 51 आहे. कोरोनाबाधित एकूण 159 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 हजार 721 रुग्णांपैकी 4 हजार 867 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 531 आहे. कोरोनाबाधित एकूण 323 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 561 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 44 , सातारा जिल्ह्यात 174, सोलापूर जिल्ह्यात 323, सांगली जिल्ह्यात 126 तर कोल्हापूर जिल्ह्यात 894 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 28 हजार 942 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 46 हजार 340 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 11 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
हि तर महापौरांनी गणेश विसर्जनावरील लादलेली अघोषित बंदी ..आम्ही झुगारणार -मनसे
:महापौरसाहेब इंग्रज बनायचा प्रयत्न करू नका …मनसे चे शहराध्यक्ष अजय शिंदे आक्रमक
: गणेश विसर्जना वर लादलेली अघोषित बंदी आम्ही मानणार नाही विसर्जन घाटावरच करणार….
पुणे-घरातल्या घरातच गणपती कसा बुडवायचा ? असा प्रश्न कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी उपस्थित केल्यानंतर आता मनसे ने घरीच विसर्जन या महापौरांच्या कल्पनेवर टीकेची झोड उठविली आहे . हव्या त्या ,योग्य उपाययोजना सुचवा, सोशल डिस्टन्सं बंधनकारक करा , दरवर्षी प्रमाणे मनपासेवकाच्या माध्यमातून विसर्जन योजना राबवा , अगदी गरज असेल तर आम्हाला ही सहभागी करून घ्या पण गणेश विसर्जनावर अघोषित बंदी लादू नका , घरातच विसर्जन करा हि एकूणच गणेश विसर्जनावर अघोषित बंदी आहे अशी भूमिका घेत महापौरांना मनसे ने आव्हान दिले आहे.
या संदर्भात मनसे चे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी महापौरांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,
जगावर करोना संकट आहे तसच ते देशावर ही आहे आणि महाराष्ट्रावर ही आहे.आणि महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात तो फक्त देवदेवतांच्या मागे लागला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे मनपाच्या निर्णया वरून वाटत आहे. काल परवा आपण पुणेकरांना गणपतीमूर्ती च्या साईज ठरवून देत गणेशाच्या मुर्ती घरातच विसर्जीत करायचं बंधन घातले.इंग्रजांच्या काळात ही अशीच बंधन घालण्यात येत होती.
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू नका हे आवाहन पुणेकरांनी स्वीकारलं गणेश मूर्ती देवळातच बसवण्याची तयारी ही सुरू झाली त्यात ही खरतर काही ठिकाणी अडचणी आहेत अनेक सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मुर्ती ना देवळं नाही त्या कुठे ठेवायच्या हा प्रश्न आहेच मा .चंद्रकांतदादानी देखील या संदर्भातील मागणी केली आहे. आणि अशा परिस्थितीत मांडवाची मागणी रास्त आहे.
आता प्रश्न गणेश विसर्जनाचा तर गणेश विसर्जनाला या वर्षी तरी कोणी मिरवणुका काढणार नाही घरगुती गणपतीच विसर्जन हे प्रत्येक घरातील जास्तीत जास्त ४ मंडळी कडून होत आणि सगळ्याच घरातील गणपती एकाच दिवशी आणि एकच वेळी विसर्जित होत नाही
1 दिवस दीड दिवस पाच दिवस सात दिवस गौरीगणपती दहा दिवस आणि अनंत चतुर्थी ला विसर्जित होणारे असे विविध दिवशी विसर्जित होणारे गणपती असतात आणि पुण्यात अश्याच स्वरूपात विसर्जन होते. आणि ते एकाच ठिकाणी होते असं ही नाही पुण्यातील प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयातील हद्दीत हे विसर्जन होते.या प्रत्येक विसर्जन ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याची आणि गर्दी मुळे पोलिसी कारवाई झाल्याची नोंद ही कुठेच नाही. मग घरीच विसर्जनाच आणि गणेश मूर्तीच्या उंचीचा बंधन का ?तुम्ही कोण आहात आमच्या धार्मिक बाबी मध्ये हस्तक्षेप करणारे ?
आणि ती ही गरज नसताना आहो बालाजी पासून ओंकारेश्वर पर्यंत सगळी मंदिर उघडली . तुम्ही सगळे मॉल उघडले राज्यसरकरच्या कृपेने अगदी पोलीस बंदोबस्तात वाईन शॉप उघडली त्या ठिकाणी गर्दी होत नाही का मटणाच्या दुकाना बाहेर चार चार किलोमीटरच्या रांगा लागल्या रस्त्यावर गर्दी आहे आणि देवांना का बंधन घालता? बंधन घालता आणि घाटावर विद्युत रोषणाई करता दोन अडीच कोटींची टेंडर कशा साठी काढता नक्की साधायच काय आहे.म्हणजे विद्युत विभागाचे टेंडर काढणार लोकांन वर बंधन घालून केमिकल खरेदी करणार हे नक्की कोणा साठी चर्चा अशी आहे की मध्यवस्तीतील एका विद्यमान लोकप्रतिनिधी च्या नातेवाईका साठी हा खटाटोप गेल्या 3 वर्षा पासून सुरू आहे . असे या पत्रकात म्हटले आहे . सोबत पत्र येथे पहा.


गोदरेजअँड बॉयसने आपल्या अनोख्या रिटेलफॉरमॅटसाठी ट्रेडमार्क मिळवला
हा मापदंड रचणारी गोदरेज अँड बॉयस पहिली भारतीय कंपनी
- युअँडअस डिझाईन स्टुडिओचे अनोखे स्वरूप आणि संकल्पना यासाठी ट्रेडमार्कची नोंदणी करण्यात आली आहे; अशाप्रकारे ट्रेड रजिस्ट्रेशन्स असलेल्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गोदरेज अँड बॉयसचा समावेश
पुणे-१२ ऑगस्ट, २०२०: गोदरेज उद्योगसमूहातील आघाडीची कंपनी गोदरेज अँड बॉयसचा ब्रँड असलेली युअँडअस ही आपल्या विशेष रिटेल स्टोअर फॉरमॅटची ट्रेडमार्क नोंदणी करणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे. कंपनीने केलेल्या घोषणेनुसार युअँडअस होम डिझाईन स्टुडिओचे अनोखे स्वरूप व संकल्पना यासाठी ट्रेडमार्क तसेच नाविन्यपूर्ण लेआऊट, फॉरमॅट आणि बाह्यरूप, अंतर्गत सजावट यासाठी अतिरिक्त ट्रेडमार्क्सची नोंदणी करण्यात आली आहे.
गोदरेज अँड बॉयसचे बिझनेस युनिट असलेल्या गोदरेज इंटेरिओचा भाग असलेल्या युअँडअस मध्ये घरातील अंतर्गत रचना, सजावट यासाठी डिझाईन तसेच बांधकाम संबंधी सर्व सेवा-सुविधांचा जागतिक दर्जाचा सह-निर्माण अनुभव प्रदान केला जातो. मुंबई, ठाणे, पुणे, बंगलोर आणि हैदराबाद या शहरांमध्ये युअँडअस होम डिझाईन स्टुडिओ उभारण्यात आले असून प्रत्येक स्टुडिओ अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाने सुसज्ज असून त्याठिकाणी विशेष डिझाईन तज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. ग्राहककेंद्री संरचना आणि त्याच्या मुळाशी रचनात्मक दृष्टिकोन यावर आधारित युअँडअस होम डिझाईन स्टुडिओमध्ये ग्राहकांना असीमित अनुभव प्रदान केला जातो, त्यांच्या गरजेनुसार वैविध्यपूर्ण डिझाईन पर्याय, उच्च दर्जाचे साहित्य आणि प्रकल्प व्यवस्थापन साधने तसेच या सर्वांच्या सोबतीने नाविन्यपूर्ण व पेटंटेड तंत्रज्ञान हे सर्व युअँडअस होम डिझाईन स्टुडिओमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करवून देण्यात आले आहे.
गोदरेज अँड बॉयसचे बिझनेस युनिट असलेल्या गोदरेज इंटेरिओचे चीफ ऑपरेटींग ऑफिसर श्री. अनिल एस. माथूर यांनी सांगितले, “आजच्या काळातील जागतिक पातळीवरील अग्रेसर रिटेलर्सनी आपल्या रिटेल संचालनाला अनोखे स्वरूप मिळवून देण्यासाठी अशाच प्रकारच्या ट्रेड ड्रेस रजिस्ट्रेशन्समार्फत आपल्या प्रत्यक्ष आणि डिजिटल उपस्थितीची असीमित सांगड घातली आहे. युअँडअस रिटेल स्टोअर डिझाईन ट्रेडमार्क्स हे अशा प्रकारचे भारतातील पहिलेच ट्रेडमार्क्स आहेत, स्पेशलाइज्ड रिटेल फॉरमॅट्ससाठी हा नवा मापदंड आहे आणि याद्वारे आम्ही आमच्यासारख्या जागतिक पातळीवरील ब्लू-चिप कंपन्यांच्या बरोबरीला आलो आहोत, शिवाय यामुळे आम्ही आमच्या ग्राहक-केंद्री कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा पल्ला पार करण्यात यश मिळवले आहे.”
युअँडअस होम डिझाईन स्टुडिओचे हेड श्री. मनोज राठी यांनी सांगितले, “युअँडअस ट्रेडमार्कमुळे आम्हाला भारतातील सहयोगी व वैयक्तिकृत रिटेल उद्योगक्षेत्रात नवे मापदंड रचण्यात मदत मिळेल. आमच्या स्टुडिओमध्ये किंवा व्हर्च्युअल कन्सल्टेशनमार्फत ग्राहक आमच्या डिझाईन तज्ञांसोबत चर्चा, विचारविनिमय करून आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात साकार करू शकतात, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जागेचे, रचनेचे तपशीलवार लेआऊट्स, सजावट आणि फर्निशिंग यांचा समावेश असलेल्या अंतिम डिझाइन्सचे व्हर्च्युअल रूप त्यांना पाहता येऊ शकते.”
युअँडअस होम डिझाईन स्टुडिओमध्ये डिझाईन तज्ञ आणि स्थानिक कौशल्ये यांची सांगड घालून ग्राहकांना हव्या त्या प्रकारच्या सेवा सुविधा व उत्पादने पुरवली जातात व ग्राहकांच्या इच्छेप्रमाणे घर, जागांची बांधणी, सजावट करून दिली जाते. युअँडअसच्या सेवा सुविधा व उत्पादने ग्राहककेंद्री दृष्टिकोन, अत्याधुनिकता व उच्च गुणवत्ता यासाठी नावाजली जातात.
युअँडअस डिझाईन स्टुडिओ
युअँडअस डिझाईन स्टुडिओच्या रूपाने गोदरेज इंटेरिओने फर्निचर डिझायनिंगची अनोखी संकल्पना आणली आहे. उत्पदनांमध्ये नावीन्य, कौशल्ये, ग्राहकांकडून मिळालेले महत्त्वपूर्ण प्रतिसाद यातून आम्ही “सह-निर्मिती” ही संकल्पना बनवली, जी आज काळाची गरज बनली आहे. युअँडअसमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना स्वतः फर्निचर डिझाईन करण्यात मदत करतो, या फर्निचरमध्ये त्यांच्या संकल्पना व आमची कौशल्ये यांचा अनोखा मिलाप असतो. आम्ही याठिकाणी नाविन्यपूर्ण व सामाजिक जबाबदारीचे पालन करण्याच्या बिझनेस मॉडेलचा अवलंब करतो, याठिकाणी आम्ही सुतारांना रोजगार मिळवून देतो, जेणेकरून ते शाश्वत जीवनशैली जगू शकतात.
ग्राहकांना संपूर्ण समाधान व आनंद देणारा अनोखा रिटेल अनुभव मिळावा यासाठी आम्ही युअँडअस स्टुडिओमध्ये आधुनिक तंत्रांचा उपयोग केला आहे. त्यामुळे आमच्या स्टुडिओमध्ये येऊन ग्राहक उत्पादनांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतात व आपल्या आवडीनुसार घराची सजावट अगदी सहजपणे करू शकतात.
युअँडअस डिझाईन स्टुडिओ या शहरांमध्ये आहेत – मुंबई – ३ स्टुडिओ, पुणे २ स्टुडिओ, बंगलोर – १ स्टुडिओ व हैदराबाद – १ स्टुडिओ.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण!
निर्माते बाळासाहेब कर्णवर – पाटील आणि सूर्यकांत कडाकने यांच्या “पुण्यश्लोक प्रॉडक्शन्स”द्वारे दिग्दर्शक दिलीप भोसले दिग्दर्शित “पुण्यश्लोक अहिल्यादेवी” या हिंदी आणि मराठी चित्रपटाची विशेष चर्चा निर्माण झाली होती. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या चित्रपटाच्या मुखचित्राचे प्रकाशन झाल्याने राजकीय वर्तुळातही चित्रपटाविषयी विविध चर्चा रंगू लागल्या होत्या. २० मान्यवर तज्ज्ञ, लेखक-साहित्यिकांच्या सहकार्याने डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांनी अल्पावधीत कथानक पूर्ण करून पुढील कार्याला गती दिली आहे.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा” दुर्लक्षित इतिहास जगभरातील प्रेक्षकांना परिचित व्हावा यासाठी निर्माते बाळासाहेब कर्णवर – पाटील आणि दिग्दर्शक दिलीप भोसले यांनी डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांच्या मार्गदर्शनाखाली खास, (महाराष्ट्र,गुजरात , राज्यस्थान,कर्नाटक,गुजरात, ) संशोधनासाठी २० मान्यवर तज्ज्ञ लेखक – साहित्यिकांना आमंत्रित करून लेखन कार्याची सुरुवात केली. मात्र त्यानंतर महाराष्ट्रासह भारतात लॉकडाऊन जाहीर झाल्याने या परिस्थितीतही चित्रपटाच्या लेखन संशोधन कार्यात व्यत्यय येऊ नये यासाठी विशेष काळजी घेत व्हर्च्युवल भेटीगाठींचे आयोजन करण्यात आले. डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपटाचं संपूर्ण कथानक पूर्ण झालं आहे. त्याविषयी डॉ. केले सांगतात, “पुण्यशील, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती अहिल्यादेवी होळकरांचा आयुष्यपट अडीच तीन तासात मांडणे तसं खूपच अवघड काम आहे. परंतु त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे., लेखनाचं हे काम करत असताना संपूर्ण होळकर शाही अंगात संचारली गेल्याचा अनुभव येत होता व त्यामुळे अहिल्यादेवी सारखे प्रचंड मोठे व्यक्तिमत्व नव्याने साकारले जात होते”.
अहिल्यादेवी अत्यंत बुद्धिमान, प्रखर विचारवंत आणि स्वाभिमानी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. विविध विषयांवर दररोज त्या विपुल विचार विनिमय करायच्या जनतेच्या समस्या ऐकून त्यांची सोडवणूक करायच्या. त्यांनी प्रजेसाठी केलेल्या महान कार्यामुळे आजही त्यांचा लौकिक आहे. धर्म, संस्कृती परंपरा यांचा सन्मान करून प्रसंगी हातात तलवार घेऊन,राजकारणाचा आदर्श निर्माण करून, त्यांनी आपले साम्राज्य समृद्ध केले. अनेक किल्ले, विश्रामगृहे,घाट, विहीरी आणि रस्ते तयार करण्यासाठी त्यांनी सरकारी पैशांचा, वापर न करता स्वतःच्या पैशाचा , हुशारीने वापर केला. लोकांसोबत सण साजरे केले. केवळ दक्षिण भारतातच नव्हे तर हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत त्यांनी हे कार्य केले आहे. सोमनाथ, काशी, गया, अयोध्या, द्वारका, हरिद्वार, कांची, अवंती, बद्रीनारायण, रामेश्वर, मथुरा आणि जगन्नाथपुरी अश्या अनेक मंदिरांमध्ये त्यांनी दानधर्म केले. या बरोबरच, त्यांनी लोकांसाठी वाराणसीचा गंगा घाट, उज्जैन, नाशिक, विष्णुपाद मंदिर आणि बैजनाथ या मुख्य तीर्थक्षेत्रांच्या आसपास अनेक घाट आणि धर्मशाळा बांधल्या. मुघल यवन आक्रमकांनी पाडलेली मंदिरे पाहून त्यांनी, सोमनाथमध्ये शिव मंदिर बांधले. आणि अनेक मंदिराचा जिर्णोद्धार केला,आणि अनेक दर्गे व मशिदी बांधण्या साठीही त्यांनी देणग्या दिल्या, अहिल्यादेवींच्या अफाट कार्याचे सूक्ष्म निरीक्षण करून एका अडीच तासाच्या चित्रपटात मांडण्याचे कसब दिग्दर्शक दिलीप भोसले यांना पेलावायचे आहे. त्यांच्या जीवन कार्याचा परिचय करून घेण्यासाठी ते गेली तीन वर्षे अथक परिश्रम करीत आहेत.
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य आजच्या कठीण परिस्थितीतही अत्यंत मार्गदर्शक आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी एक आदर्श समाजापुढे – देशापुढे ठेवला आहे. त्यांच्या कार्याची माहिती आजच्या नव्या पिढीला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अगदी योग्य वेळी हा चित्रपट आम्ही तयार करीत असून महाराष्ट्रासह जगभरातील तरुण प्रेक्षक या चित्रपटाशी, अहिल्यादेवींच्या कार्याशी नक्की एकरूप होतील”, असे मत निर्माते बाळासाहेव कर्णवर-पाटील यांनी व्यक्त केले. लवकरच अहिल्यादेवींच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीची निवड केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
