Home Blog Page 2483

कचरा नियोजनाखाली दरमहा ५० व ७० रुपये घेऊन पुणेकरांची होणारी लूट थांबवा – आबा बागुल

0

पुणे- शहरामध्ये नागरिक ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून वेगवेगळा पिशव्यांमध्ये ठेवतात. तो कचरा उचलण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने सार्वजनिक संस्था नेमल्या आहेत.सदर संस्था त्याबदल्यात झोपडपट्टीमधील प्रत्येक घरास  ५० रुपये दरमहा व इतर भागातील  घरास   ७० रुपये दरमहा  शुल्क  नागरिकांकडून आकारात असून ही शुल्क आकारणी बेकायदेशीर असल्याचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. . 
पुणे महानगरपालिका पुणेकरांकडून  मिळकत करामध्ये  एआरव्हीच्या २५ टक्के सफाईकर आकारात असून हा कर घेण्या व्यतिरिक्त आपण नागरिकांवर कचऱ्यासाठी अतिरिक्त कर लादत आहोत.हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पुणे महानगरपालिकेत कमीत कमी १० ते १२ लाख प्रॉपर्टी असेसमेंट झालेल्या असून त्यांच्याकडून प्रत्येकी ५० व ७० रुपये शुल्क घेतले जातात  त्याची एकूण  अंदाजे   १०० कोटी रुपये नागरिकांकडून  बेकायदेशीरपणे घेण्यात येतात. याची कोणतीही लेखी स्वरूपात  पावती दिली जात नसल्याने महानगरपालिकेकडे याची कोणतीही नोंद नाही. हि जनतेची दिशाभूल आणि लूट आहे. असे म्हंटले तर वावगे होणार नाही. कायद्याने एकाच कामासाठी दोनदा कर आकारणे हे बेकायदेशीर आहे. आपण हे स्वछ व भगतसिंग संस्थेसाठी करत आहात हि अतिशय चुकीची बाब आहे. नागरिक सफाई कर भरत असताना त्यांच्याकडून पुन्हा पैसे घेणे बेकायदेशीर असल्याने नागरिकांकडून पैसे घेऊ नये. हे त्वरित थांबण्याचे आदेश द्यावेत असे आबा बागुल म्हणाले.  
पुणे महानगरपालिका  मिळकत करामध्ये सफाई कर आकारात असल्याने साफसफाई,स्वच्छता,कचऱ्याची विल्हेवाट लावणे हि महानगरपालिकेची जबाबदारी आहे. असे असताना देखील आपण नागरिकांनी वर्गीकरण केलेला कचरा गोळा करण्यासाठी  दुसऱ्यांदा नागरिकांकडून पैसे घेणे हे बेकायदेशीर आहे. पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी सर्व शहरात  स्वच्छता करतात,कचरा गोळा करतात  परंतु वर्गीकरण केलेला कचरा या संस्थेचे कामगार घरोघरी  गोळा करून महानगरपालिकेच्या गाड्यांमध्येच  टाकतात. आता आपल्या कर्मचाऱ्यांनाच पुन्हा वर्गीकरण केलेला कचरा गोळा करण्यास सांगणे गरजेचे आहे. आपण कचरा गोळा करण्यासाठी कोणती संस्था नेमल्यास त्यांचे पैसे महानगरपालिकेने देणे गरजेचे आहे. कारण मिळकत कारमध्ये साफसफाई व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी २५ टक्के कर आकारण्यात येत असून नागरिकांकडून पुन्हा त्यासाठी शुल्क आकाराने हे अतिशय चुकीचे आहे. हे आपण ताबडतोब बंद करावे व याची माहिती आम्हाला मिळावी. नागरिकांकडून वर्गीकरण केलेला कचरा गोळा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारू नये.असे आबा बागुल म्हणाले.  
नवीन कर प्रणाली  राज्य सरकार सुरु करू शकते परंतु मुख्यसभा देखील नागरिकांवर अश्याप्रकारे कर आकारू शकत नाही. महाराष्ट्र मुनसिपाल ऍक्ट मध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. असे शुल्क आकारणे हे बेकायदेशीर असल्याने वर्गीकरण केलेला कचरा गोळा केल्याच्या बदल्यात दिलेल्या शुल्काची पावती देखील दिली जात नाही. जर कोणी नागरिक या बेकायदा आकारणी विरोधात कोर्टात गेल्यास व्याजासह नागरिकांना पैसे परत दयावे लागतील व त्याच्यावर आयपीसी सेक्शन द्वारे फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याची सर्व जबाबदारी आयुक्तांची राहील हे बेकायदेशीर होणारे काम त्वरित थांबवण्याची मागणी आयुक्तांना दिलेल्या पत्रात आबा बागुल यांनी केली. 

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 223

0

पुणे विभागातील 1 लाख 11 हजार 449 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;
विभागात कोरोना बाधित 1 लाख 58 हजार 781 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 15 :- पुणे विभागातील 1 लाख 11 हजार 449 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 58 हजार 781 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 223 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 4 हजार 109 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 70.19 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 19 हजार 965 रुग्णांपैकी 91 हजार 389 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 821 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 755 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.18 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 6 हजार 836 रुग्णांपैकी 3 हजार 397 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 225 आहे. कोरोनाबाधित एकूण 214 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 12 हजार 749 रुग्णांपैकी 8 हजार 494 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 671 आहे. कोरोनाबाधित एकूण 584 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 हजार 650 रुग्णांपैकी 2 हजार 499 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 960 आहे. कोरोनाबाधित एकूण 191 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 13 हजार 581 रुग्णांपैकी 5 हजार 670 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 546 आहे. कोरोनाबाधित एकूण 365 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 104 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 449, सातारा जिल्ह्यात 332, सोलापूर जिल्ह्यात 427, सांगली जिल्ह्यात 271 तर कोल्हापूर जिल्ह्यात 625 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 77 हजार 626 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 58 हजार 781 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 14 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण

0

स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योद्धे व उपस्थितांना दिल्या शुभेच्छा..

पुणे दि 15 : भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते येथील विधानभवनाच्या (कौन्सिल हॉल) प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.

 यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, निवृत्त अधिकारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा

0

नवी दिल्ली, दि. १५ : भारत देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समूह राष्ट्रगीताचे सादरीकरण आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पथसंचलन झाले.

या कार्यक्रमास चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार सुरेश धानोरकर, महाराष्ट्र सदनाच्या गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त तथा सचिव निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र सदनात निवासास असणारे अतिथी तसेच दिल्ली स्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

राजधानीतील लाल किल्ल्यावर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व त्यांनी देशवाशियांना संबोधित केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.  

पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी ‘स्मार्ट पोलीसींग’ उपक्रम उपयुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे, दि. 15 : पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस विभागाचा ‘स्मार्ट पोलीसींग’ उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला. पुणे जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या इमारतीसोबतच आधुनिक सोईसुविधेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे ग्रामीण पोलीस विभागाच्या ‘स्मार्ट पोलीसींग’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त सुहास दिवसे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांच्यासह पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत. या पुरस्कारप्राप्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाच्या संकटकाळात पोलीस बांधव मोठ्या जिद्दीने, शर्थीने रस्त्यावर उतरून कार्यरत आहेत. पोलीसांच्या कुटुंबियांनी याकामी त्यांना दिलेली साथ महत्त्वाची आहे, त्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. समाजाच्या भल्यासाठीच पोलीस कोरोनाच्या कालावधीत ‘कोरोना’ विरूदध लढले, आपण सर्व मिळून कोरोनाची ही लढाई निश्चित जिंकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे ग्रामीण पोलीस विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेला स्मार्ट पोलीसींग उपक्रम निश्चितच उपयुक्त आहे. स्मार्ट पोलीसींग उपक्रमामुळे पोलीस दलामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसादासोबतच पोलीस दल अधिक सतर्क होण्यास मदत होईल. अत्याधुनिक पोलीस स्टेशन, तंत्रज्ञान व दळणवळण, कामकाजात गतिमानता, जनतेशी पोलीसांचे सलोख्याचे संबंध, तपासात गतिमानता, आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली, वाहतुकीचे नियमन, अभिलेख देखभाल व प्रशिक्षण यामुळे पोलीस दल अधिक सुसज्ज होण्यास मदत होईल तसेच पुणे जिल्हयातील पोलीस स्टेशनच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची तरतूद करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक करताना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, पोलीस स्टेशनच्या कामकाजात सुसुत्रता यावी तसेच वातावरण चांगले राहावे यासाठी स्मार्ट पोलीसींग उपक्रम राबविला जात आहे. महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी गावोगावी महिला सुरक्षा समित्यांचीही स्थापना करण्यात आली आहे. यासोबतच स्मार्ट पोलीसींग उप्रकमाबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच स्मार्ट पोलीसींग उप्रकमा अंतर्गत घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये निर्माण करण्यात आलेल्या सोई सुविधेबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी सोर ग्रृपच्या सेजल रुपलग व समीर रुपलग या दाम्पत्यांचाही सत्कार करण्यात आला.
पुणे ग्रामीण पोलीस स्मार्ट पोलीसींग या पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आभार बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलींद मोहीते यांनी मानले.

विमान दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मसालाकिंग डॉ. धनंजय दातार २० लाख रुपयांचा निधी देणार

0

मुंबई – एअर इंडियाचे दुबईहून आलेले विमान केरळमधील कोझिकोड विमानतळावर घसरुन अलिकडेच झालेल्या दुर्घटनेत वैमानिक, सह-वैमानिक व प्रवाशांसह १८ जण मृत्यूमुखी पडले. या मृतांच्या वारसांना वैयक्तिक साह्य म्हणून अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार त्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत २० लाख रुपयांचा निधी देणार आहेत.

यासंदर्भात बोलताना डॉ. दातार म्हणाले, “या विमानाचे सारथ्य भारतीय हवाई दलातून निवृत्ती घेऊन एअर इंडियात आलेले, अत्यंत अनुभवी व निष्णात वैमानिक कॅप्टन दीपक वसंत साठे करत होते. ते भारतीय हवाईदलाचे उत्कृष्ट व गौरवपूर्ण कामगिरी बजावलेले अधिकारी होते. माझे दिवंगत वडील महादेव दातार हेसुद्धा भारतीय हवाईदलाचे माजी अधिकारी होते त्यामुळे मला या दलाविषयी प्रबळ आत्मीयता आहे. मी या विमान अपघाताची बातमी ऐकली तत्क्षणी त्यातील मृतांसाठी स्वतःहून काही मदत करण्याची उर्मी मनात दाटून आली.”

ते पुढे म्हणाले, “या दुर्दैवी विमान फेरीतील अनेक प्रवासी असे होते ज्यांनी परदेशातील त्यांचे रोजगार गमावले होते. अनेकजण व्हिजिट व्हिसाची मुदत संपल्यामुळे मायदेशी परत येत होते. अनेकांपुढे आर्थिक विवंचना होत्या. अशा स्थितीत मृत प्रवाशांवर अवलंबून असणाऱ्या कुटूंबियांवरील किमान आर्थिक दडपण काहीसे हलके व्हावे म्हणून मी वैयक्तिकरीत्या हा पुढाकार घेतला आहे. गेलेला जीव परत येणार नाही याचे दुःख आहेच, पण या अर्थसाह्यामुळे किमान मृतांच्या कुटूंबाना अडचणींवर मात करण्यात मदत तरी होईल. मी एअर इंडियाच्या आपत्ती व्यवस्थापन संघाशी थेट समन्वय साधून ही मदत अखंड स्वरुपात योग्य व गरजू लोकांच्या हाती पडेल यासाठी प्रयत्न करत आहे. मला नेहमीप्रमाणेच भारतीय कॉन्सुलेटचा या मोहिमेसाठीही पाठिंबा मिळत आहे.”

डॉ. दातार हे सध्या आणखी एका सामाजिक मदत उपक्रमात व्यग्र आहेत. कोविड १९ साथीमुळे अरब देशांत अडकून पडलेल्या गरजू व निर्धन भारतीयांना मायदेशी सुखरुप पोचवण्यासाठी त्यांनी स्वनिधीतून दहा लाख दिऱ्हॅमहून अधिक खर्च केला आहे. आतापर्यंत त्यांनी ३८०० हून अधिक भारतीयांना घरी सुरक्षित पोचवले आहे. या उपक्रमाची आखाती प्रदेशातील भारतीय समुदायाकडून प्रशंसा होत आहे. गरजू व निर्धन भारतीय कामगारांच्या मोफत विमान तिकीटाचा व मोफत वैद्यकीय चाचणीचा खर्च डॉ. दातार उचलत आहेत. याखेरीज परदेशात अडकलेल्या भारतीयांना खाद्यपदार्थांचे मोफत संच पुरवणे व त्यांच्यासाठी मोफत क्वारंटाइनची व्यवस्था करणे, यासाठीही ते स्वयंसक्रियतेने खर्च करत आहेत.

पुण्यातील ‘या’पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर

0

पुणे : स्वातंत्र्य दिनाचा पार्श्वभुमीवर केंद्र सरकारकडून दिले जाणारे राष्ट्रपती विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. पुण्यातील आठ पोलिस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे.

पुणे पोलिस दलातील परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, कोथरुड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुषमा चव्हाण, पोलिस उपअधिक्षक अनिल पाथरुडकर, रेल्वेच्या पुणे विभागातील पोलिस उपअधिक्षक नरेंद्रकुमार गायकवाड, दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागाची सुनील यादव व राज्य राखीव पोलिस दलाचे (एसआरपीएफ ग्रुप एक) असिस्टंट कमांडंट सादिकअली सय्यद यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहिर झाले आहेत.

अभ्यासिकांना निकषात परवानगी द्या : महापौर मुरलीधर मोहोळ

0

महापौरांची आयुक्तांना सूचना, लवकरच सुरु होणार अभ्यासिका

पुणे (प्रतिनिधी)

विद्येचे माहेर तसेच स्पर्धा परिक्षांचे म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुणे शहरात १०० पेक्षा जास्त अभ्यासिका आहेत. त्यामुळे अनेक राज्यांतून, जिल्हयांतून शिक्षणासाठी तसेच विविध स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी पुणे शहरात येतात. त्यामुळे आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शहरातील अभ्यासिकांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परवानगी देण्यात यावी, अशी सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांकडे केली आहे. यावर लवकरच निर्णय होणार असून अभ्यासिका सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये एमपीएससी, यूपीएससी, नीट आदी स्पर्धा परिक्षा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर परिक्षांच्या तयारीसाठी लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनी पुणे शहरात दाखल झाले आहेत.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘संपूर्ण वर्षभर विद्यार्थी या परिक्षेचा अभ्यास करत असतात. मात्र अभ्यासिका बंद असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास पोषक वातावरण मिळत नाही. तरी, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे निकष पाळून अभ्यासिका सुरु करण्यास परवानगी देण्याची सूचना आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे’.

एका दिवसात वाढला धरणातील ‘एवढा’पाणी साठा…

0

नदिकाठच्या गावे, वसाहती ना सतर्कतेचा इशारा

पुणे, ता. 14 : खडकवासला धरण साखळीतील पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे मागील 24 तासांत शुक्रवारपर्यंत पाणीसाठ्यात दीड अब्ज घनफूट (टीएमसी) ने वाढ झाली. शुक्रवारी सायंकाळी टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांतील पाणीसाठा 21.55 टीएमसी (73.92 टक्के) इतका झाला आहे.जो काल 65 टक्के एवढा होता.खडकवासला धरणातून गुरुवारी सायंकाळी मुठा नदीतून 11 हजार 705 क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला होता. तो आज सकाळी पाच हजार 136 क्युसेक करण्यात आला. त्यानंतर पुन्हा रात्री नऊ वाजल्यापासून 9 हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) कंसात टक्केवारी :

  • टेमघर 2.01 (54.06)
  • वरसगाव 8.79 (68.58)
  • पानशेत 8.78 (82.42)
  • खडकवासला 1.97 (100)

खडकवासला धरणाचे ‘जलपूजन’ !

0

खडकवासला साखळी धरण प्रकल्पाच्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे.त्यामुळे संपूर्ण प्रकल्पातील पाणीसाठा ७० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता पूर्णपणे मिटला आहे. याचंच औचित्य साधत आज खडकवासला धरणात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
याप्रसंगी उपमहापौर सौ.सरस्वतीताई शेंडगे,काँग्रेसचे गटनेते श्री.आबा बागुल, नगरसेवक आजय खेडेकर,हरीदास चरवड,जयंत भावे,धनराज घोगरे,नगरसेविका सौ.मंजुश्री खर्डेकर,स्मिता वस्ते,राजश्री नवले,निता दांगट,अश्विनी पोकळे,तसेच महापालिका व पाटबंधारे विभागाचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

गणेश विसर्जनासाठी महापौरांचा कल्पविलासी खेळ रंजनात्मक -आबा बागुलांची खोचक टिका

0

पुणे-यंदा गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे पुण्याच्या महापौरांनी सार्वजनिक व घरगुती श्री गणेशाच्या विसर्जनासाठी नवनवीन योजना मांडल्या. नदी अथवा कॅनॉलमध्ये विसर्जन केल्याने प्रदूषण होते हे लक्षात घेऊन सुमारे १०-१२ वर्षां पूर्वी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध भागात हौद उभारून त्यात श्रींचे विसर्जन कारण्याची व्यवस्था केली गेली होती. मात्र आता हे हौद असणार नाहीत, तर ‘कल्पक’ महापौरांनी बादलीत श्रींचे विसर्जन करण्याची नामी योजना जाहीर केली.त्यासाठी महानगरपालिकेतर्फे लिक्विड देणार असल्याचीही घोषणा केली. आता त्यातील अव्यहार्यता लक्षात आल्यावर ‘कल्पक’ महापौरांनी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात विसर्जनासाठी फिरते हौद ही नवी कल्पना जाहीर केली आहे.

पुण्याच्या ‘कल्पक’ महापौरांच्या या भन्नाट कल्पनांनी श्रद्धाळू पुणेकर मात्र संभ्रमात पडले आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात फिरते हौद ठेवले. ज्या ठिकाणी असे हौद असतील तेथे गर्दी होणार नाही काय? दीड दिवस,पाच दिवस,सात दिवस,आणि दहा दिवस या प्रत्येक विसर्जनाच्या दिवशी हे हौद उपलब्ध असणार काय ? विसर्जनापूर्वी श्रींची आरती करण्याची प्रथा आहे. ती आरती करण्यासाठी अश्या ठिकाणी मान्यता मिळेल काय ? अश्या हौदात विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी रांगा लावायच्या काय ? अश्या रांगांमध्ये सहा फुटांचे अंतर राखण्याची व्यवस्था केली आहे काय ? पुण्यात सुमारे ४ लाख घरगुती गणपती बसतात. त्यासाठी १५ फिरते हौद पुरेसे ठरणार आहेत काय? तिथे होणाऱ्या गर्दीमुळे ट्राफिक जॅम होणार यासाठी ‘कल्पक’ महापौरांनी उपाययोजना केली आहे काय? जर विसर्जन सुरु झाल्यानंतर तो हौद भरला तर तो फिरता हौद नेऊन कोठे रिकामा करणार? त्या जागी नवा फिरत हौद येईपर्यंत विसर्जनासाठी आलेल्या श्रद्धाळू भाविकांनी हातात मूर्ती घेऊन तिस्टत उभे राहायचे काय? याउपर नदी अथवा कॅनॉल येथे भाविक श्रींच्या विसर्जनासाठी आले तर त्यांना विसर्जनास अटकाव करणार काय? हे आणि असे अनंत प्रश्न श्रद्धाळू पुणेकर विचारत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी महापौर प्रयत्न करीत आहेत. त्याचे पुणेकरांनी कौतुकही केले आहेत. परंतु पुणेकरांना वरील प्रश्नांनी भंडावून सोडले आहे. पुणेकरांना माझी एवढीच विनंती की , आजून थोडे थांबा आपले ‘कल्पक’ महापौर श्रींच्या विसर्जनासाठी अजून काही अदभूत कल्पना मांडतील. त्याची वाट पहा. असे ‘कल्पक’महापौर महाराष्ट्रात कोठेही नाहीत. ते पुण्याला लाभले आहे. हे पुणेकरांचे भाग्य समजा आणि त्यांच्या नवनवीन कल्पनांची वाट पहा ‘सुज्ञास अधिक सांगणे न लगे’.

स्टेट बँकेत अधिकारी पदावर काम करण्याची संधी

0

पुणे : भारतीय स्टेट बँकेतर्फे महाराष्ट्रातील योग्य पदवीधर युवक/युवतीना स्टेट बँकेत सर्कल बेस्ड ऑफिसर पदावर काम करण्याची सुवर्णसंधी बँकेने उपलब्ध करून दिली आहे. बँकेचे मुख्य महा प्रबंधक श्री दीपक कुमार लल्ला यांनी ही माहिती दिली. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२० अशी आहे.

महाराष्ट्रातील मराठी भाषिक उमेदवारांना महाराष्ट्रातच अधिकारी पदांवर काम करण्याची सुवर्ण संधी यामुळे उपलब्ध होत आहे. ग्रामीण बँक अथवा शेड्युल कमर्शियल बँकेमध्ये दोन वर्षाचा अनुभव असलेल्या ३० वर्षाखालील मराठी तरुणांना या पदासाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो, असे दीपक कुमार यांनी सांगितले. मंडळ आधारित अधिकारी किंवा सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) असे या पदाचे नाव असून सहाय्यक प्रबंधक या श्रेणीत नियुक्तीसाठी हे अर्ज मागविण्यात येत आहेत.

श्री दीपक कुमार लल्ला यांनी सर्व मराठी तरुणांनी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. या संबंधतील संपूर्ण माहितीसाठी https://www.sbi.co.in/careers  या  किंवा https://bank.sbi/careers या वेबसाईटला भेट देवून पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येऊ शकेल, असेही त्यांनी नमूद केले.

प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

0

पुणे, दि. १४ : कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा (रक्तद्रव) उपचार पद्धती यशस्वी ठरत असल्याने अधिकाधिक व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

प्लाझ्मा दाते आणि प्लाझ्मा स्वीकृते यांच्या मध्ये समन्वय यासाठी मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा प्रयत्न करत आहे. यासाठी http://puneplasma.in हे ॲप विकसित करण्यात आले आहे. शासकीय निर्णय आणि कायदेशीर बाबी लक्षात घेऊन यामध्ये समन्वय साधला जात आहे. ॲपवर प्लाझ्मा दान करण्यासाठी ३३ जणांनी इच्छा प्रदर्शित करून नोंदणी केली आहे तर ६१ जणांनी प्लाझ्माची मागणी केली आहे. प्लाझ्मा दात्यांच्या कुटुंबातील सदस्याला भविष्यात प्लाझ्माची गरज भासल्यास त्यांना प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे प्लाझ्मा दात्यांनी कोणतीही शंका मनात न ठेवता पुढे यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

निवृत्तीवेतनधारकांनी आयकर गणनेसाठी उचित पर्यायाची माहिती कळविण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. १४ : निवृत्तीवेतनधारकांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या आयकर गणनेसाठी आयकर वसुलीच्या जुनी कर पद्धती (Old Tax Regime) आणि नवी कर पद्धती (New Tax Regime)
दोन प्रकारांपैकी उचित पर्याय निवडून त्याची माहिती ३० सप्टेंबरपूर्वी ईमेलद्वारे अधिदान व लेखा कार्यालयाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या अर्थसंल्पात आयकर कायद्यामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आयकर वसुलीचे नवीन सेक्शन ११५ बीएसी नुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या आयकर गणनेसाठी जुनी कर पद्धती (Old Tax Regime) आणि नवी कर पद्धती (New Tax Regime) असे दोन प्रकार ठरविण्यात आले आहेत. यापैकी योग्य असणारा पर्याय निवडावा. त्यासाठी आवश्यकता भासल्यास नजीकच्या सनदी लेखापालांची मदत घेण्याचेही सूचित करण्यात आले आहे.

निवड केलेला पर्याय अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांना apaopensdat.mum-mh@gov.in या ई-मेलवर आपल्या नाव, पीपीओ क्रमांक, बँक व खाते या माहितीसहित ३० सप्टेंबर २०२० पूर्वी कळविणे आवश्यक आहे. या पर्यायानुसार देय होणारी टीडीएस वजाती करण्यात येणार आहे. टॅक्स पद्धतीची निवड वेळेत न कळविणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांची टीडीएस वजाती पूर्वीप्रमाणेच म्हणजे जुन्या कर पद्धतीनुसार केली जाणार आहे, असे अधिदान व लेखा अधिकारी वैभव राजेघाटगे यांनी कळविले आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अँटिजेन चाचणी किटसाठी निधी उपलब्ध करुन देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधला लोकप्रतिनिधींशी संवाद

■  ५० हजार अँटीजेन किट घेण्याची कार्यवाही तात्काळ करा

■ अधिकाधिक रुग्णालयात ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’चा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यवाही करा

■ ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा

■ अधिक रुग्णसंख्या असणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित करा

■ अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा

■ गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जनजागृती करावी

पुणे, दि.१४ : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी अँटिजेन किट घेण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देत ५० हजार अँटिजेन किट घेण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच ‘कोरोना’ रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

‘कोविड-१९’ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेच्या माजी उपसभापती आमदार डॉ. निलम गोऱ्हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झाल्या. यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सर्वश्री दिलीप मोहिते, अशोक पवार, संजय जगताप, राहूल कूल, अतुल बेनके, सुनिल टिंगरे, सुनिल शेळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील कोरोना रुग्णदर व मृत्यूदर तसेच प्रशासनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने अधिकाधिक रुग्णालयांचा या योजनेत समावेश होण्यासाठी कार्यवाही करावी. हवेली, खेड, मावळ, शिरुर, पुरंदर अशा रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या भागाबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी प्रशासकीय अधिकारी व आरोग्य विभागाने विशेष लक्ष द्यावे. ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असे सांगून ‘जम्बो’ रुग्णालयाचे काम लवकरच पूर्ण होणार असून यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी मदत होईल. नागरिकांनी देखील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घ्यायला हवी, असे त्यांनी सांगितले.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी यावर्षी आषाढी वारी, बकरी ईद, दहिहंडी असे सर्व सण-समारंभ मर्यादित उपस्थितीत साजरे करण्यात आले असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षीचा गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा करण्याबरोबरच गणेश विसर्जन घरगुती स्वरुपात करायला हवे. लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक गणेश मंडळांना विश्वासात घेवून याबाबत जनजागृती करावी. उद्योजकांनी कारखाने सुरु ठेवताना कोरोना विषयी घ्यावयाच्या दक्षतेबाबत तसेच कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विभागीय आयुक्तांनी उद्योजकांच्या सोबत बैठक घेवून आवश्यक त्या सूचना कराव्यात. जिल्ह्यात पूर परिस्थिती व ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी जलदगतीने निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सांगून पुणे-नाशिक रेल्वे बाबतचा विषयही लवकरच मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील बांधकाम मजुरांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची नोंदणी करुन घेण्यासाठी प्रयत्न करावा, असे सांगून जिल्ह्यातील विविध विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा केली.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. प्रत्येक तालुक्यात कोविड केअर केंद्रात खाटांची संख्या वाढविण्यावर भर द्यावा. तसेच ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांसाठी पुण्यातील रुग्णालयात राखीव खाटा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत.

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, ग्रामीण भागात गंभीर रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी रुग्णवाहिका, व्हेंटीलेटर, ऑक्सीजनयुक्त खाटा आदी सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

राज्य शासन व प्रशासन कोरोना विषाणू नियंत्रणासाठी  चांगले काम करत असल्याच सांगून विधान परिषदेच्या माजी उपसभापती आमदार निलम गोऱ्हे म्हणाल्या, खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांबरोबरच अन्य आजाराच्या रुग्णांनाही बेड उपलब्ध होणे गरजेचे आहे.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रशासन उत्तमरित्या काम करत असल्याचे सांगून आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या. आमदार सर्वश्री दिलीप मोहिते, अशोक पवार, संजय जगताप, राहूल कूल, अतुल बेणके, सुनिल टिंगरे, सुनिल शेळके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक त्या सूचना केल्या. उद्योग व्यवसाय सुरु ठेवतांना उद्योजकांनी कामगारांच्या आरोग्याची  काळजी घ्यावी, सीएसआर निधीतून मदत उपलब्ध करुन द्यावी. अवाजवी शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करावी. अधिक रुग्णसंख्या असणाऱ्या भागांत कोविड रुग्णालय सुरु करावे, तपासणी संख्या वाढवावी, अँटीजेन तपासणी करण्यात यावी. प्लाझ्मा थेरपीचा वापर वाढविण्यात यावा, अशा सूचना यावेळी केल्या.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपायोजनांची माहिती दिली. तसेच प्लाझ्मा उपचार पद्धतीचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील रुग्ण दर व मृत्यू दर, प्रतिबंधित क्षेत्रे, अधिक रुग्णदर असणाऱ्या भागात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.  कोविड रुग्णालये, व्हेंटिलेटर, उपलब्ध खाटा व अन्य आवश्यक आरोग्य सेवा सुविधा व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.