Home Blog Page 2479

एसटी महामंडळ लवकरच पेट्रोल पंप सुरु करणार ; परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची माहिती

0

एसटी महामंडळ व इंडियन ऑईल यांच्यात सामंजस्य करार

मुंबई,दि.१८ : प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करीत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली.

आज सह्याद्री येथे परिवहन मंत्री श्री.परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एसटी महामंडळ आणि इंडियन ऑईल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

या सामंजस्य करारानुसार भविष्यात राज्यातील एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर ३० ठिकाणी पेट्रोल-डिझेलपंप आणि ५ ठिकाणी एल.एन.जी.पंप (liquifid Natural Gas) सुरु करण्यात येणार आहे. सदर पेट्रोल-डिझेलपंप/ एल.एन.जी.पंप इंडियन ऑईलकडून बांधण्यात येणार असून त्याचे संचालन एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे.

श्री. परब म्हणाले, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या प्रवासी तिकिटातून मिळणाऱ्या हजारो कोटीच्या उत्पन्नाला एसटीला मुकावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटीने पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने मालवाहतुकीसारख्या उपक्रमाला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच टायर पुनर्स्थिरीकरण प्रकल्पातून देखील व्यावसायिक स्तरावर उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक उत्पन्न स्त्रोतांबरोबरच राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या एसटीच्या मोकळ्या जागेवर इंडियन ऑईलच्या सहकार्याने सर्वसामांन्यांसाठी पेट्रोल-डिझेल/एल.एन.जी. पंप उभारले जाणार आहेत.

या विक्रीतून एसटी महामंडळाला कायमस्वरूपी उत्पन्नाचा एक स्थिर स्त्रोत निर्माण होईल.

या प्रसंगी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व एसटीच्या वरिष्ठ अधिकऱ्यांसह इंडियन ऑईलचे महाराष्ट्र प्रमुख अमिताभ अखवैरी, महाव्यवस्थापक राजेश जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर नवे धोरण महाराष्ट्र भर राबविण्यासाठी विनंती. – खा. वंदना चव्हाण

0

पुणे-

सध्या कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. आता जवळपास सर्वच महाविद्यालयांत ऑनलाईन शिक्षणास सुरुवात झाली आहे. यामुळे सोयीं सोबत विद्यार्थ्यांना नविन अडचणी व आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. ऑनलाईन शिक्षण सुरु झाले असले तरी विशेष करून ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरनेट, कॉम्प्यूटर अथवा लॅपटॉप ची उपलब्धता नसल्याने शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यासाठी शासनाने आणि महाविद्यालयाने मार्ग काढणे गरजेचे आहे.

लॉकडाऊनमुळे आर्थिक चक्राला खीळ बसलेली आहे. अशा कठीण परिस्थितीत काही विद्यार्थ्यांना एक रकमी फी भरणे शक्य नाही यासाठी सुलभ हप्ते देण्यात येण्याची गरज आहे. तसेच महाविद्यालयांमध्ये ज्या सेवा अगर योजना सद्य परिस्थितीमुळे राबविण्यात येऊ शकत नाहीत अश्या अनेक शिर्षकाखाली आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्क कमी करण्याचा विचार होणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांबरोबर अधिक विचार विनिमय होऊन निर्णय घेण्यात अधिक सुलभता वाढवणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी व कल्याणासाठी “विद्यार्थी हक्क आयोग” ची स्थापना करण्याचा विचार व्हावा व विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ‘कमवा व शिका’ योजनेचा विस्तार करून तिचे बळकटीकरण करण्याची गरज आहे.

यासंदर्भातील निवेदन पत्राद्वारे श्री. उदयजी सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना दिले व हे धोरण महाराष्ट्र भर राबविण्यात यावे असे खा.चव्हाण यांनी पत्रात म्हंटले आहे

येत्या तीन वर्षांत नऊ मूलभूत क्षेत्रांतील अडचणी दूर करण्यातून अर्थव्यवस्थेचे उत्थान करणे शक्य : ‘पीडब्ल्यूसी इंडिया’चा अहवाल

0

·         येत्या तीन वर्षांत अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन व विकास यांची रूपरेषा तयार करण्यासाठी ‘जीडीपी’चे 75 टक्के क्षेत्र व्यापणाऱ्या नऊ क्षेत्रांचे विश्लेषण  

·         खासगी, सार्वजनिक उद्योग आणि नागरिकांच्या सहकार्याने संपूर्ण अंमलबजावणीची शिफारस

·         विकासाचे ध्येय गाठण्यासाठी धोरण, डिजिटल आणि पायाभूत सुविधा यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रयत्न करण्याची शिफारस

·         अर्थव्यवस्थेचे खोलीकरण, रुंदीकरण, उंची वाढवणे, औपचारीकरण आणि डिजिटलीकरण यांसाठी प्रयत्न आवश्यक

·         अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या व तिचे पुनरुज्जीवन झाल्यावर 9 टक्के जीडीपी गाठण्यास मदत करणाऱ्या 10 व्हेक्टर्सचा उल्लेख

·         भारताच्या पुढील तीन वर्षाच्या राष्ट्रीय प्रवासासाठी पूर्ण-संभाव्य वाढीची मानसिकतेची गरज अधोरेखित.

मुंबई, 18 ऑगस्ट, 2020 : पीडब्ल्यूसी इंडियाच ‘पूर्णसंभाव्य पुनरुज्जीवन व वाढ – भारताच्या मध्यम मुदतीच्या प्रवासाचा आलेख’ हा अहवाल गेल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात आला. पुढील तीन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उन्नती साधू शकतील अशा भारतातील नऊ प्रमुख क्षेत्रांतील मुख्य विषय आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या नियोजनाचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे. कोविड-19 मुळे भारतातील 1.35 अब्ज जनतेला टाळेबंदीमध्ये जगण्यास भाग पडले व त्यांच्यावर अभूतपूर्व संकट कोसळले. ‘पीडब्ल्यूसी इंडिया’च्या अहवालात उद्योग-व्यवसाय, सार्वजनिक क्षेत्र व समाजातील मान्यवर व्यक्ती यांच्या मुलाखती, क्षेत्रनिहाय विश्लेषण आणि देशव्यापी सर्वेक्षण यांचा आधार घेण्यात आला आहे. या अहवालात अधोरेखित केलेल्या मुदद्यांबाबतच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर केल्या व संयुक्तपणे कार्यवाही झाली, तर भारताच्या अर्थव्यवस्थेचे पुरुज्जीवन पुढील तीन वर्षांच्या कालावधीत जलद गतीने होऊ शकते आणि त्यानंतर तिची मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.

पीडब्ल्यूसी इंडियाचे अध्यक्ष श्यामल मुखर्जी म्हणाले, “भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ‘कोविड’ची साथ व टाळेबंदी हा एक तीव्र स्वरुपाचा धक्का आहे, परंतु तो भारतासाठी परिवर्तनाचा क्षणही असू शकतो. आपल्या दृष्टिकोनाचा फेरविचार करण्याची, व्यावसायिक परिसंस्थेच्या फेररचनेची आणि आपली अर्थव्यवस्था पुन्हा जोमाने सुरू करण्याची संधी आपल्याला उपलब्ध आहे. संपूर्ण समाजाला एकत्र घेऊन कार्याचा अवलंब करणे, सामान्य नागरिकांसह सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील उद्योग एकत्र आणणे यांतूनच अर्थव्यवस्थेचे जलद पुनरुज्जीवन होईल व तिची पुढील वाढ सुलभ होईल. या राष्ट्रीय स्वरुपाच्या कार्यासाठी संपूर्ण समाजाची सकारात्मक मानसिकता आवश्यक आहे, जी मध्यम मुदतीतही अर्थव्यवस्थेला सकारात्मक रूप देऊ शकेल.’’

पीडब्ल्यूसी इंडियाचे शासकीय रणनीती व परिवर्तन विभागाचे तज्ज्ञ शशांक त्रिपाठी म्हणाले, “नवनिर्माण व विकासाचे घर’ ठरलेल्या सुधारणांचे आठ आधार आमच्या अहवालात नमूद करण्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेची फेररचना करताना, ऐतिहासिकदृष्ट्या वाढीस अडथळा आणणाऱ्या गोष्टी आपण दूर करणे अत्यावश्यक असते. अर्थात प्रत्येक क्षेत्राने स्वत:च वाढणे आवश्यक असले, तरी माहितीचा वाढता ओघ आणि क्षेत्रे व संस्था यांच्यातील अभिसरण यांनाही महत्त्व आहे. पुढील काळात आपली अर्थव्यवस्थेची व्याप्ती सर्व बाजूंनी वाढवून आपण आपल्या विकासास गती देऊ आणि त्यास अधिक समावेशक बनवू शकू, असा विश्वास वाटतो.”

आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना जनतेच्या आरोग्याची स्थितीही वेगाने बदलते आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला थेट धक्का बसला आहे व ती मंदीच्या दिशेने जाऊ लागली आहे. ‘पीडब्ल्यूसी’च्या अहवालात देशांतर्गत खर्च, खासगी गुंतवणूक, सरकारी खर्च आणि निर्यातीतील आगामी वाढ यांबाबत आर्थिक चालना देणाऱ्या महत्त्वाच्या घटकांचा आढावा घेण्यात आला आहे. हे स्थूल स्वरुपाचे आर्थिक घटक पुनरुज्जीवन व विकास यांना पूरक ठरतील.

पुनरुज्जीवन  प्रगतीचे घर

विविध दिग्गज व्यक्तींशी झालेल्या चर्चेच्या आधारे, या अहवालात मागणी, पुरवठा, संसाधने आणि संस्था यांच्या वाढीच्या संदर्भात 8 प्रमुख उप-खांबांचा आराखडा देण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेत मागणी पूर्ण जोमाने वाढविण्यासाठी या अहवालात ‘सर्व क्षेत्रांमध्ये एकत्र नेणे’ आणि ‘प्रोत्साहन, विकेंद्रीकरण आणि पायाभूत सुविधा सक्षम करणे’ यासंबंधीच्या दोन उप-खांबांची रूपरेषा नमूद आहे. पुरवठ्याच्या पुनरुज्जीवनासाठी, “ऑपरेटिंग मॉडेलमधील बदल” आणि “पुरवठा साखळीची पुनर्रचना” हे दोन महत्त्वाचे खांब आहेत.

 ‘नैसर्गिक, आर्थिक आणि डेटायुक्त’ तसेच ‘मानवी आणि सांस्कृतिक’ संसाधनांतून इतर संसाधने मोकळी होऊ शकतील. संस्थांना आपली धोरणे विस्ताराने आखण्यासाठी व त्यांत विश्वास निर्माण करण्यासाठी ‘सुधारणा व सुशासन’ आणि ‘व्यवसायातील स्थिरता’ आवश्यक असणार आहे. या सर्व स्तंभांमध्ये सुधारणा आणि भक्कमपणा निर्माण होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान यांचा उपयोग करणे आवश्यक राहील. एकंदरीत, या अहवालात अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन व वाढ यांच्यासाठी 27 संकल्पना सुचविण्यात आल्या आहेत.

विशिष्ट परिणाम साधण्याकरीता नऊ क्षेत्रांचे सखोल विश्लेषण

कोरोना साथीच्या अगोदरच्या काळात असलेला ‘जीडीपी’ व ‘एमएसएमइ क्षेत्राचा विकास’ ही अवस्था पुन्हा गाठण्यात 75 टक्के योगदान असलेल्या 9 महत्त्वाच्या क्षेत्रांचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे. निरोगीपणा, सुरक्षितता व आरोग्य यांच्याशी संबंधित उत्पादने व सेवा यांच्या निर्मितीसाठी मागणी वाढू लागेल, तेव्हा ग्राहकोपयोगी वस्तू व किरकोळ विक्री, आरोग्य व औषधे, वाहने व औद्योगिक उत्पादने (आयपी) यांच्यावरही त्याचा प्रभाव पडेल. उर्जा आणि खाणकाम, पायाभूत सुविधा आणि रसद, माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षण ही क्षेत्रे खुली झाल्यावर माहितीच्या अखंड प्रवाहावर परिणाम होईल. त्यामुळे मूळ पायाभूत सुविधा व संसाधने यांच्यातील अडथऴे दूर होतील. वित्तीय सेवाक्षेत्र मुक्त होण्यामुळे अर्थव्यवस्थेतील भांडवलाचा प्रवाह सुनिश्चित होईल; सरकारी क्षेत्रांमधून हे सर्व शक्य होईल व नंतरच्या काळातही सरकारकडूनच सर्वांना थेट प्रोत्साहन मिळत राहील. देशात सर्वात जास्त रोजगाराच्या संधी देणारी शेती ही सर्व भागधारकांचे मुख्य लक्ष असेल. एमएसएमई हे एक स्वतंत्र क्षेत्र नसले तरी, सर्व नऊ क्षेत्रांमधील रोजगार आणि उत्पादकतेवर त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळेच अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाचा अभ्यास करताना या एमएसएम उद्योगांचा विचार करण्यात आला आहे.

अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाची भविष्यवाणी करणे खरे तर अवघड असते, परंतु नुकतेच झालेले ‘पीडब्ल्यूसी सीएक्सओ सर्वेक्षण’ आणि देशभरातील 1500 लोकांमध्ये घेण्यात आलेल्या एका व्यापक ग्राहक सर्वेक्षणाचा हवाला देण्यात येऊन, या अहवालात असे गृहीतक मांडण्यात आले आहे, की आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान होईल. अर्थात कोरोनावर व्यापक नियंत्रण मिळवण्यात आले व त्यावरील लशीची निर्मिती व तिचे वितरण सुरळीत झाले, तरच हे शक्य होणार आहे, असेही अहवालात म्हटलेले आहे.

मूल्य प्रस्ताव आणि संपूर्ण समाजाचा दृष्टिकोन

‘पीडब्ल्यूसी इंडिया’च्या अहवालात दहा मूल्य प्रस्तावांची रूपरेषा देण्यात आली आहे. पुनरुज्जीवन आणि वाढ या दृष्टीकोनातून पाहात असताना या प्रस्तावांचा विचार संस्था करू शकतात. बाजारातील मागणी हेरणे, विकेंद्रीकृत मागणी साध्य करण्यासाठी मॉडेल तयार करणे, उत्पादन व सेवा यांच्या प्रमाणात संतुलन साधणे, भविष्यातील किंमतीची संरचना करणे, संपूर्ण डिजिटल रूपांतरण घडवणे, जागतिक व स्थानिक पुरवठा साखळीचा फेरविचार करणे, कौशल्य जोपासणे, त्यात वाढ करणे व रोजगाराच्या संधी वाढवणे, अस्तित्व आणि पुनरुज्जीवनासाठी डेटा आणि भांडवलातून अंतर्दृष्टी मिळविणे हे ते 10 मूल्य प्रस्ताव आहेत. यांसाठी निरनिराळ्या घटकांचा विश्वास वाढवणे महत्वाचे आहे.

एखाद्या संस्थेमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘संपूर्ण संघटना’ हा दृष्टीकोन आवश्यक असतो. त्याचप्रमाणे व्यापक स्तरावर विचार केल्यास, यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण समाज या दृष्टीकोनाची अंमलबजावणी करता येईल.

पूर्ण-संभाव्य महत्त्वाकांक्षा

भारतासाठी सध्याचा क्षण परिवर्तनीय आहे. आपण अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत आणण्याच्या प्रक्रियेतील अडथळे दूर केले, तर आपण तिचे पुनरुज्जीवन तर करूच, त्याशिवाय, ती मजबूतही बनवू शकू, याची जाणीव पूर्ण-संभाव्य मानसिकता बाळगल्यास होते. प्रारंभिक संकेतांवरून असे दिसून येतेस ती व्यवस्थितपणे व वेगाने काम केले, तर मागील 5 वर्षातील 6.8 टक्क्यांचा विकास दर आपण यापुढील काळात वाढवू शकतो. ही पूर्ण-संभाव्य अशी महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी दहा ‘व्हेक्टर्स’चा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. आपण त्यांचे अनुसरण केले, तर अर्थव्यवस्थेचे केवळ पुनरुज्जीवनच नव्हे, तर तिची पुनर्बांधणीही होऊ शकते.

स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात सादर करण्यात आलेल्या या अहवालात खासगी, सार्वजनिक क्षेत्रे, तसेच संपूर्ण देशाकडून नवीन मानसिकता जोपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांनी आपण मध्यम मुदतीत अर्थव्यवस्था व देश परत रुळावर आणू शकतो.

अहवाल कार्यपद्धतीबद्दल

उद्योग, सरकार, समाजशास्त्र या क्षेत्रांतील जाणकारांच्या मुलाखती घेण्याव्यतिरिक्त, आम्ही जून 2020 मध्ये मेट्रो, शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भारतातील 1500 नागरिकांचे सर्वेक्षण केले. कोरोनाच्या साथीमुळे  समाज घटकांवर व अर्थव्यवस्थेवर झालेले सध्याचे व पुढील काही काळातील परिणाम या विषयांवरील 35 प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आले. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्यांपैकी बहुसंख्य (50 टक्क्यांहून अधिक) नागरिक हे 18 ते 26 या वयोगटातील नोकरी-व्यवसाय करणारे तरूण होते. महिला उद्योजक, खासगी व्यापारी, शेती-केंद्रित व्यवसाय, एमएसएमई आणि सरकारी कर्मचारी यांचादेखील सर्वेक्षणांमध्ये समावेश करण्यात आला.

पीडब्ल्यूसीबद्दल

समाजात विश्वास निर्माण करणे आणि महत्त्वपूर्ण समस्या सोडविणे हा पीडब्ल्यूसीमध्ये आमचा उद्देश असतो. 157 देशांमध्ये 2 लाख 76 हजार जणांना सामावून घेतलेले आमचे अनेक संस्थांचे नेटवर्क आहे. हे सर्वजण गुणवत्तापूर्ण सल्लासेवा, हमी व कर सेवा देण्यास वचनबद्ध आहेत. पीडब्ल्यूसी म्हणजे पीडब्ल्यूसी नेटवर्कमधील आणि / किंवा तिची एक किंवा अधिक सदस्य फर्म, असा संदर्भ येथे आहे. या प्रत्येक फर्मला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे. अधिक माहितीसाठी कृपया www.pwc.com/structure पाहा. पीडब्ल्यूसी इंडियाविषयी अधिक माहितीसाठी www.pwc.in ही वेबसाईट पाहा.

राज्यावरील कोरोनाचे, निराशेचे मळभ दूर करुन पोळा सण समृध्दी घेऊन येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला पोळा सणाच्या शुभेच्छा

मुंबई, दि. १७ : ‘अमावस्या श्रावणाची, आली घेऊन सणाला, कृषीवल आनंदाने, सजवितो हो बैलाला’… याच कृतार्थ भावनेने राज्यभरातील शेतकरी बैलपोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. कृषी संस्कृतीतला हा महत्वाचा सण राज्यावर दाटलेले कोरोना संकटाचे, निराशेचे मळभ दूर करुन सगळीकडे उत्साह, चैतन्य, आनंद, समृध्दी घेऊन येईल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकरी बांधवांसह सर्व जनतेला पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. आपली अर्थव्यवस्था आजही कृषी क्षेत्रावरच अवलंबुन आहे. या कृषी संस्कृतीत शेतकऱ्याच्या बरोबरीने बैल राबत असतात. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. शेतकऱ्यांचे बैलांप्रती भावनिक नाते असते. राज्यभरातील शेतकरी आपल्या प्रदेशानुसार तिथीनुसार येणाऱ्या अमावस्येला बैल पोळा सण साजरा करतो. काही ठिकाणी पोळा सणाला बेंदूर ही म्हटले जाते. जरी राज्यात हा सण वेगळ्या नावाने, वेगळ्या तिथीला साजरा केला जात असला तरी हा सण साजरा करण्यामागे सर्व शेतकऱ्यांची बैलांप्रती कृतज्ञतेची भावना सारखीच असते. सध्या राज्यभर चांगला पाऊस सुरु आहे, त्यामुळे पिकेही जोमात आहे, पिण्याच्या, शेतीच्या पाण्याची चिंता कमी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात चांगले अन्न-धान्य पिकेल, निराशेचे मळभ दूर होऊन राज्यात बैल पोळा सण निश्चितच समृध्दी घेऊन येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

दुर्गम भागातील नागरिकांना मिळाले ख-या अर्थाने स्वातंत्र्य

0

स्वातंत्र्यदिनी आदिवासींच्या खांद्यावरील ओझे कमी

पुणे, १८ ऑगस्ट: वर्षानुवर्षे दुर्गम भागातील नागरिक आणि आदिवासी डोक्यावरून किंवा खांद्यावरून पाणी वाहून आणत असत. आजही भारतामध्ये असे अनेक ठिकाणे आहेत की जिथे नागरिकांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. पाण्याने भरलेली जड भांड्यांचे ओझे दुरुन वाहून आणल्यामुळे अनेक माता-भगिणींना शरिराच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मिशन परिवर्तन – निरचक्रामुळे दुर्गम भागातील नागरिकांच्या पाणी वाहतुकीचे ओझे आता हलके होत आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील  सणसवाडी गावामधील आदिवासी कुटुंबांना १७ निरचक्रांचे वाटप ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन, रोस्ट्रम इंडिया सोशल ऑर्गनायझेशन आणि एक्सप्लिओ ग्रुपच्या वतीने करण्यात आले. यावेळी ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनचे संस्थापक तन्वीर इनामदार, सहसंचालक तमन्ना इनामदार तसेच वैभव मोगरेकर, अमोल उंब्रजे, दिवाकर मोगरेकर, जावेद पठाण, बालाजी नाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सणसवाडी ह्या गावात पाऊस पडला तरी पाणी जमिनीत मुरत नाही, वाहून जाते. अश्या वेळी विहीर/ बोअरवेलमध्ये पाणीसाठी होत नाही. त्यामुळे महिलांना घरापासून दररोज २ ते ३ किमी अंतरावरून पाणी आणावे लागते. मिशन परिवर्तन-निरचक्र मुळे या गावातील कुटुंबांना शारिरीक त्रासापासून स्वातंत्र्य मिळणार आहे. मिशन परिवर्तन-निरचक्र या उपक्रमांतर्गत आतपर्यंत २५० कुटंब आणि २२०० व्यक्तींना पाणी वाहतुकीसाठी मदत होत आहे

राज्यात २० ऑगस्टपासून सामाजिक ऐक्य पंधरवडा

0

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई, दि. १८ – दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा २० ऑगस्ट हा जयंती दिवस दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने राज्यात २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२० या कालावधीत सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे. राज्यातील विविध भागातील विविध धर्मांच्या व विविध भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकाविषयी ऐक्याची भावना, सौहार्दभाव वृध्दीगंत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे हा पंधरवडा साजरा करण्यामागे आहेत, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

सद्भावना दिवस व सद्भावना पंधरवडा हा कोरोना विषाणुच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार साजरा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रालयाच्या प्रांगणात सामाजिक अंतराचे पालन करून २० ऑगस्ट रोजी सद्भावना दिवस साजरा करण्यात येणार असून उपस्थिताना सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातून ऑनलाईन किंवा लाऊड स्पिकरमार्फत सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम आयोजित करावा, तसेच अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहाता यावा यासाठी वेबसाईटव्दारे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्यासाठी कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मुख्यालयात सामाजिक ऐक्याचा संदेश प्रसृत करण्यासाठी ऑनलाईन वेबिनार इत्यादीव्दारा संवाद, मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावेत. या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांना भाषण देण्यासाठी निमंत्रित करावे. बृहन्मुंबईत लोकांच्या विशेषत: युवकांच्या सहभागाने सांस्कृतिक कार्य संचालक यांनी सद्भावना विषयावर ऑनलाईन वेबिनार इत्यादीव्दारा संवाद, मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावा. यंदा सद्भावना शर्यतसारखे उपक्रम आयोजित करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या सामाजिक संस्था, संघटनेच्या कर्मचाऱ्यांना २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण

0

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई, दि. १८ : कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार विधी करणारे ग्रामीण भागातील शासकीय सेवेत नसलेल्या सामाजिक संस्था, संघटनेचे कर्मचारी यांना २५ लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यासंदर्भातील शासन परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले असून सर्व जिल्हा परिषदांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.  

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, शासनाने कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे समाजामध्ये विदारक चित्र पहावयास मिळत आहे. कोरोनामुळे मृत्यु झाला तर कुटुंबातील कोणालाही त्याचे अंत्यदर्शन होऊ शकत नाही तसेच अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहता येत नाही. हे चित्र फार हृदयदायक आहे. अशा व्यक्तीचे अंत्यसंस्कार उदा. दहन, दफन करणारे व्यक्ती आपल्या व कुटुंबियांच्या काळजीने अंत्यसंस्कार विधी करण्यास घाबरतात. अशावेळी शासकीय सेवेत नसलेले परंतु या संकटाच्या काळामध्ये आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून काही सामाजिक संस्था, संघटनेचे कर्मचारी संसर्गाचा विचार न करता आपला जीव धोक्यात घालून हा पवित्र विधी करण्यास धाडसाने पुढे येत आहेत. या कर्मचाऱ्यांनाही त्यातून कोरोना संसर्गाचा धोका असून त्यांचे आर्थिक संरक्षण करण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील या धाडसी कोरोना योद्ध्यांना विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यास कोरोनाचा संसर्ग होऊन त्याचा मृत्यू झाल्यास २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण ३० सप्टेंबरपर्यंत देण्यात येईल. कोरोना संदर्भातील गांभिर्य, परिस्थिती पाहून ३० सप्टेंबरनंतरही विमा कवच मुदत वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

संबंधित सामाजिक संस्था, संघटना यांच्या कर्मचाऱ्यांची नोंद ग्रामपंचातीमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कर्मचारी त्याच्या इस्पितळात दाखल होण्याच्या अथवा मृत्युच्या दिनांकापूर्वी १४ दिवसांच्या काळात कर्तव्यावर हजर असला पाहिजे, अशा काही अटींच्या अधीन राहून हे विमा संरक्षण देण्यात येत आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 958

0

पुणे विभागातील 1 लाख 21 हजार 772 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;
विभागात कोरोना बाधित 1 लाख 70 हजार 196 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे,दि.18 :- पुणे विभागातील 1 लाख 21 हजार 772 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 70 हजार 196 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 958 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 4 हजार 466 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.55 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 27 हजार 26 रुग्णांपैकी 97 हजार 335 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 727 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 964 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.33 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.63 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 7 हजार 539 रुग्णांपैकी 4 हजार 223 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 121 आहे. कोरोनाबाधित एकूण 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 13 हजार 829 रुग्णांपैकी 9 हजार 323 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 894 आहे. कोरोनाबाधित एकूण 612 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 6 हजार 578 रुग्णांपैकी 3 हजार 295 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 62 आहे. कोरोनाबाधित एकूण 221 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 15 हजार 170 रुग्णांपैकी 7 हजार 596 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 154 आहे. कोरोनाबाधित एकूण 420 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 117 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 829, सातारा जिल्ह्यात 222, सोलापूर जिल्ह्यात 227, सांगली जिल्ह्यात 258 तर कोल्हापूर जिल्ह्यात 581 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 8 लाख 21 हजार 773 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 70 हजार 196 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 17 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

कॅप्टन अमोल यादव यांच्या प्रकल्पास शासन सर्व सहकार्य करणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

0

मुंबई, : कॅप्टन अमोल यादव यांनी भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांच्या पुढील प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली.

कॅप्टन अमोल यादव यांनी मोठ्या कष्टाने भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांचे प्रात्यक्षिक देखील यशस्वी झाले आहे. यापुढे नागरी उड्डयण मंत्रालयाची (डीजीसीए) मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रकल्पासाठी उद्योग विभागाच्यावतीने सर्व सहकार्य केले जाईल. त्यांना प्रकल्प उभारण्यासाठी जागा दिली जाईल.

कॅप्टन अमोल यांचा प्रकल्प लागु करण्यासाठी उद्योग विभागाच्यावतीने एक बैठक घेतली जाईल. यामध्ये एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. शासनाकडून उद्योगांसाठी दिले जाणारे प्रोत्साहन कॅप्टन अमोल यांच्या प्रकल्पाला दिले जाईल, असे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

एका मराठी माणसाने विमान तयार करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरविले आहे, त्याचा सर्वांना अभिमान आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकल्पाचे कौतुक केले आहे. यापुढे देखील राज्य शासन त्यांना सर्व सहकार्य करेल, असे उद्योगमंत्री देसाई म्हणाले.

सिमेंट व रस्तेनिर्मितीसाठी करणार उत्सर्जित राखेचा वापर – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत

0

औष्णिक वीज प्रकल्पातून होणारे प्रदूषण कमी होणार

मुंबई, दि. १८ : औष्णिक वीज प्रकल्पातून होणारे प्रदूषण कमी करून उत्सर्जित होणाऱ्या राखेचा वापर रस्ते बांधकामात आणि सिमेंट कारखान्यात करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाचे धोरण तयार करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मुंबई येथे ऊर्जा विभागाला दिले.

पॅरिस करारानुसार औद्योगिक कारणांमुळे होणारे पर्यावरणातील बदल टाळण्यासाठी महानिर्मितीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्राद्वारे होणारे प्रदूषण टाळणे आवश्यक आहे, त्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात म्हणून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऊर्जामंत्री यांच्यासमवेत बैठक घेतली. या बैठकीला अनुसरून डॉ. राऊत यांनी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना यावेळी दिले.

उत्सर्जित राखेचा वापर रस्ते निर्माण करण्यासाठी आणि सिमेंट निर्मितीमध्ये करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ व सिमेंट उद्योग यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. ऊर्जा मंत्रालयासोबत पर्यावरण मंत्रालयसुद्धा यात सहभागी होणार असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

सध्या राज्यातील औष्णिक वीज प्रकल्पात वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळशाचा दर्जा चांगला नसल्याने यातून मोठ्या प्रमाणावर राखेची निर्मिती होते. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी जर त्याचा वापर सिमेंट कारखान्यात व रस्ते बांधण्यासाठी केला तर पर्यावरणाचे संवर्धन करता येईल. मात्र कोराडी व खापरखेडा येथील उत्सर्जित राखेचा वाहतूक खर्च अंदाजे 135 कोटी रुपये असून सदर खर्च रस्ते विकास महामंडळाने उचलावा अशी अपेक्षा डॉ. राऊत यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच सिमेंट उद्योगांना याचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

औष्णिक वीज निर्मिती केंद्रामुळे होणाऱ्या प्रदूषणाची तपासणी करण्यात येणार आहे. राज्यातील वेस्टर्न कोल्ड फिल्ड्स लिमिटेडच्या (डब्लूसीएल) खाणीतील उच्च दर्जाच्या कोळशाची विक्री इतर राज्यांना करण्यात येते. मात्र कमी दर्जाचा कोळसा महानिर्मितीच्या केंद्रांना देण्यात येत असल्याने यातून जास्त राख निर्माण होत आहे. लवकरच सर्व औष्णिक वीज निर्मिती केंद्राची तपासणी करण्यात येणार असून त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाची माहिती घेतली जाईल, अशी माहितीदेखील डॉ. राऊत यांनी दिली.

घरातच विसर्जित करा गणेश मूर्ती -महापौरांचे पुनश्चः आवाहन (व्हिडीओ)

पुणे- यंदाचा गणेश उत्सव हा स्व आणि आपल्या शहराच्या आरोग्य रक्षणाचा उत्सव आहे. त्यामुळे घरातच गणेश मूर्ती विसर्जित करण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन करत मूर्ती दान ,दारात आलेला फिरता हौद असे पर्याय हि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुचविले आहेत . पहा नेमके महापौर काय म्हणाले. …

अधिकारी महासंघाच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल – मुख्य सचिव संजय कुमार

0

मुंबई, : राज्य शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, वेतन त्रुटी संदर्भातील बक्षी समितीचा खंड दोन सादर करणे, चक्राकार पद्धतीच्या बदल्यांमधून महिलांना वगळणे, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेची मर्यादा काढणे आदी मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल, असे मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज येथे सांगितले.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या विविध मागण्यासंदर्भातील मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त विचारविनिमय समितीची बैठक आज मंत्रालयात झाली. त्यावेळी संजय कुमार बोलत होते. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंन्शु सिन्हा, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, विधी विभागाचे सचिव राजेंद्र भागवत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) अजित सगणे, राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस इंजि. विनायक लहांडे, उपाध्यक्ष डॉ. एस.एम. पाटील, विष्णू पाटील, सहसचिव सुदाम टाव्हरे, दुर्गा मंचच्या अध्यक्षा डॉ. सोनाली कदम, नितीन काळे, इंजि. मोहन पवार, सिद्धी सपकाळ, विशाखा आढाव आदी यावेळी उपस्थित होते.

देशातील 23 राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वय 60 वर्षे करावीत, वेतन त्रुटी संदर्भातील बक्षी समितीचा खंड दोन या महिनाअखेरपर्यंत सादर करावा, सेवाअंतर्गत प्रगती योजनेतील ग्रेड पेची मर्यादा काढावी, रिक्त पदे भरण्यात यावीत, प्रलंबित महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम देण्यात यावी, चक्राकार पद्धतीच्या बदल्यांमध्ये महिलांना वगळावे, केंद्राप्रमाणे भत्ते देण्यात यावेत, वाहतूक भत्ता वाढविणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

कोरोना काळात राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे मुख्य सचिवांनी कौतुक केले. तसेच या पुढील काळातही असेच काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्य सचिव संजय कुमार म्हणाले की, संघटनेच्या मागण्यासंदर्भातही राज्य शासन सकारात्मक विचार करेल. बक्षी समितीचा खंड दोन हा त्या समितीकडे सुधारणेसाठी पाठविण्यात आला आहे. तो अहवाल या महिना अखेरपर्यंत देण्यासंदर्भात समितीला सांगण्यात येईल. सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भा तपासून निर्णय घेण्यात येईल.

राज्य शासनाला वेळोवेळी सहकार्य करत असल्याबद्दल वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी संघटनेचे आभार मानले. पाच दिवसाचा आठवड्यासंदर्भातील प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केल्याबद्दल संघटनेच्या वतीने सामान्य प्रशासनच्या सचिव अंन्शु सिन्हा यांचे श्री. कुलथे यांनी अभिनंदन केले. 

श्री. कुलथे म्हणाले की, राज्य शासनाला केंद्र शासन तसेच देशातील 23 राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. त्याधर्तीवर लवकरात लवकर राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 करावे. महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कमही तातडीने देण्यात यावी. बक्षी समितीकडील खंड दोन या महिनाअखेपर्यंत प्राप्त करून घेऊन त्यावर निर्णय घ्यावा. राज्यातील अधिकारी महासंघाच्या वतीने राज्य शासनाला नेहमीच सहकार्य देण्यात येते. कोरोना काळात राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी हे सातत्याने काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मागण्यांचा राज्य शासनाने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा

0

मुंबई, दि. १८ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करतानाच कोरोना युद्धाच्या मध्यावर आपण काही ठिकाणी शिखराकडे गेलो तर काही ठिकाणी जात आहोत त्यामुळे गाफील न राहता आतापर्यंत ज्या उपाययोजना सुरू आहेत त्या यापुढेही नेटाने राबवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

गणेशोत्सव, राज्यातील कोरोना उपाययोजना यांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, राज्य टास्क फोर्सचे सदस्य सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय कोरोना उपाययोजना आणि मृत्यूदर यासंदर्भात आढावा घेतला.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे सर्वधर्मियांनी आतापर्यंतचे सगळे सण साधेपणाने घरातच साजरे करून शासनाला सहकार्य केले आहे. याप्रमाणेच आता येऊ घातलेला गणेशोत्सव आणि मोहरम हे गर्दी न करता साजरे करावेत. गणेशोत्सवासंदर्भात गृहविभागाने मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक निर्गमित केले आहे त्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणपतीची मूर्ती ४ फुटांची तर घरगुती गणेश मुर्ती २ फुटांची असावी असे या मार्गदर्शक सुचनांमध्ये नमूद केले आहे त्याचे पालन करतानाच आगमन आणि विसर्जन मिरवणूका निघणार नाहीत, गणेशोत्सवात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक असून गृह विभागाचे परिपत्रक सर्व संबंधितांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळावी

या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, जिथे शक्य नाही तिथे मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव निर्माण करावेत व तेथेही गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन विसर्जनाची व्यवस्था करण्यात यावी. महापालिका यंत्रणेकडे गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

 गणेशोत्सवातून सार्वजनिक गणेश  मंडळांनी  सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश द्यावा. कोरोना आणि एकंदरीतच आरोग्य विषयक जनजागृती मोहिम होती घेण्याचे आवाहन करतानाच दर्शनासाठी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास सोयीचे होईल. उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था चोख राहील याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात लोक गेले असून तिथे अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मृत्यूदर रोखण्यासाठी टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या

कोरोनाबाबत आढावा घेतल्यानंतर सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले, काही ठिकाणी परिस्थिती आटोक्यात तर काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात राहील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मृत्यूदर रोखण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्यात ज्या भागात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत तेथे अतिदक्षता विभागातील (आयसीयू) बेड आणि ऑक्सीजनची व्यवस्था असलेले बेड वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

चाचण्यांचे प्रमाण वाढवावे

कोरोना उपचारासाठी जम्बो सुविधांची उभारणी राज्यभर सुरु असून पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगत पावसाळी आजार डोके वर काढतात त्याकडे लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, चाचण्यांचे दर नियंत्रित राहतील याकडे लक्ष द्यावे,चाचणी रिपोर्ट लवकर येईल यासाठी प्रयत्न करावेत. कोरोनातून बरे होऊन घरी गेल्यानंतर रुग्णांना पुन्हा त्रास होत असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे पोस्ट कोविड परिस्थितीकडे, रुग्णांकडे लक्ष देण्याची अधिक गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती मोहिम

स्वयंशिस्त, मास्क वापरणे, हात धुणे, स्वच्छता राखणे यासारखे उपायच कोरोनावर सध्याचे औषध असल्याचे सांगतानाच आज ८० टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत. पण ते संक्रमण करू शकतात. त्यांच्या माध्यमातून होणारा प्रसार गंभीर बाब असल्याने अशा रुग्णांचे विलगीकरण करणे, त्यांना क्वारंटाईन करणे आवश्यक असून या रुग्णांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती मोहिम घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. कोरोनाच्या विषाणुला जोपर्यंत हरवत नाही तोपर्यंत अहोरात्र अविश्रांत मेहनत सुरु ठेवण्याचे आवाहन त्यांनी यंत्रणेला केले.

कायमस्वरूपीच्या सुविधांसाठी रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करावे – उपमुख्यमंत्री

गणेशोत्सवासाठीचे मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक राज्यात सर्वांसाठी एक सारखे असावे अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृह विभागाला केली. लिक्वीड ऑक्सीजन पुरवठ्याकडे मुख्य सचिवांनी लक्ष द्यावे त्याचे दर वाढणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

जिल्ह्यातून आलेल्या निधीच्या मागणीवर बोलतांना उपमुख्यमंत्री म्हणाले की, एसडीआरएफ, जिल्हा विकास निधी  (डीपीसी)  वापरावा. सीएसआरचा निधी अधिकाधिक मिळवण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी  लक्ष द्यावे. राज्यात जम्बो सुविधा उभ्या करतच आहोत पण त्याचबरोबर विभागीय आयुक्तांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी आहे त्या रुग्णांलयांमध्ये हा निधी खर्च करून तिथे आयसीयु बेड, ऑक्सीजनची सुविधा निर्माण करून या रुग्णालयांचे श्रेणीवर्धन केल्यास कायमस्वरूपी सुविधा म्हणून त्या उपयोगात येतील. 

समाज माध्यमांवरील चुकीच्या व्हीडिओंवर पोलिसांनी लक्ष ठेवावे- गृहमंत्री

समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या चुकीच्या व्हिडिओंवर पोलीसांनी लक्ष ठेवण्याच्या सुचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी दिल्या. गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची स्थानिक यंत्रणेने अधिकाधिक निर्मिती करावी जेणेकरून विसर्जनाला गर्दी होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

टेलीआयसीयुचा विस्तार करण्याची आवश्यकता – आरोग्यमंत्री

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना मोफत उपचार मिळतील यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तालुकास्तरावर रुग्णवाहिका उपलब्ध राहतील याकडे जिल्हाधिकऱ्यांनी लक्ष घालावे. लवकर निदानासाठी काही जिल्ह्यांमध्ये कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चाचण्यांची क्षमता पुरेशी असून त्याचा पूर्णपणे वापर करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

टेलीआयसीयु सुविधा राज्यात सुरू झाली असून भिवंडीमध्ये त्याच्या वापराने फायदा होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. जेथे विशेषज्ञ उपलब्ध नाही तेथे ही सुविधा फायदेशीर ठरत असल्याचे सांगतानाच सध्या सीएसआरच्या माध्यमातून ही योजना सुरू असून राज्यात तिचा विस्तार करण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना निर्मुलनासाठी कोणी काय केले ? भाजप विरोधात महाविकास आघाडीत पुन्हा वादंग (व्हिडीओ )

0

पुणे- केंद्र सरकारचे २० लाख कोटी कुठे गेले ? राज्य सरकारने किती खर्च केले ? खाजगी हॉस्पिटलवर नियंत्रण कोणाचे ? महापालिका करतेय काय ? राज्य सरकारला उशिरा जाग आली म्हणून जम्बो रुग्णालय उशिरा होतेय काय ? अशा विविध प्रश्नांवर लोकांची लुटमार सुरूच असल्याचा आरोप करत भाजप विरोधात महाविकास आघाडी च्या सदस्यांत आजच्या मुख्य सभेत पुन्हा वादंग झाले .या वादातच सभागृहनेते धीरज घाटे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा विषय आणि अन्य स्थायी समितीने तातडीने पाठविलेले अनेक विषय दाखल करून घेतले .

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/3380998205286020/

खासगी रुग्णालये आणि या रुग्णालयातील मेडिकल दुकानांकडून रूग्णांची लूट सुरू असून याविषयी प्रशासन नुसत्याच नोटिसा बजावत आहे. प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली जात नसल्याच्या मुद्द्यावरून महापालिकेच्या मुख्यसभेमध्ये गदारोळ झाला. यावेळी कोरोनाविषयक केलेल्या कामांवरून राज्य शासनाने उशीर केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाचे सर्व नगरसेवक आक्रमक झाले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली.
मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी मेडिकल्सवर कारवाई करावी असे फलक हाती धरत महापौरांच्या आसनासमोर उभे राहून खासगी रुग्णालयांमधील मेडिकल्सवर कारवाईची मागणी केली. अनेक दिवस कारवाईची मागणी करीत असतानाही प्रशासन कारवाई करीत नाही. सर्व खासगी रुग्णालयांच्या विरोधात तक्रारी व पुरावे आहेत. रुग्णांच्या नातरवाईकांना वाढीव औषधे खरेदी करायला लावली जात आहेत. नागरिकांकडून हजारो रुपयांची बिले वसूल केली जात असल्याचे मोरे म्हणाले.
हाच धागा पकडत काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी मागील तीन मुख्य सभांमध्ये हा विषय मांडूनही त्याविषयी गांभीर्याने कारवाई केली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. रुग्णालयात ४० हजारांच्या इंजेक्शनची मागणी केली जात आहे.कोविडची औषधे काळ्या बाजारात विकली जात आहेत. या विषयावर चर्चा घडविण्याची मागणी त्यांनी केली. शहरातील परिस्थिती नियंत्रणात नाही. पुणेकरांना त्रास होत आहे. कम्युनिटी स्प्रेड झालाय हे प्रशासन का मान्य करीत नाही असा प्रश्न उपस्थित करीत जम्बो कोविड सेंटर तीन महिन्यांपूर्वीच का उभारले नाही यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
त्यावर आक्रमक झालेल्या सभागृह नेते धीरज घाटे यांनी आम्ही नाही राज्य सरकारने उशीर केला आहे. पालिका आपले काम करीत आहे असे उत्तर दिले. या उत्तरावर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला.
राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपाला धारेवर धरत स्वतःचे अपयश राज्य शासनावर खपवू नका असे सुनावले. काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक सुभाष जगताप, प्रशांत जगताप, विशाल तांबे, अरविंद शिंदे आदी नगरसेवक आक्रमक होत महापौरांच्या आसनासमोर जमा झाले. ‘चार महिने तुम्ही काय केले, ३०० कोटी कशावर खर्च केले हे सांगा असा सवाल विरोधी पक्षांनी केला. एकंदरीतच या विषयावर मुख्यसभेत गदारोळ झाला.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य शासन आणि पालिका या विषयावर बोलू नये तसेच केवळ पुणे आणि कोरोना या विषयावर बोलूया, वसंत मोरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलूया, तीन सभांमध्ये हा विषय सुरू आहे. सर्वांची भावना सारखीच असल्याचे सांगत प्रशासनाला चौकशीचे निर्देश दिले.

महापालिकेत आता मिळू लागले निवृत्त सेवकांनाही पगार …

0

पालिकेचा गलथानपणा अन शिक्षकांचा प्रामाणीकपणा

पुणे- महापालिकेच्या गलथान कारभाराचे एक उदाहरण समोर आले आहे. निवृत्त झालेल्या १९ शिक्षकांचे पगार महापालिकेने त्यांच्या खात्यात रीतसर जमा केले आणि महापालिकेची हि चूक लक्षात येताच संबधित शिक्षकांनी तातडीने हि रक्कम स्वतः हून महापालिकेला जमा केल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. दरम्यान महापालिकेच्या अशा गलथान कारभाराचे पडसाद आता उमटणार कि ते ही झाकून  ठेवले जाणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.