Home Blog Page 2473

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 50 हजार 352; एकुण 5 हजार 546 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 1 लाख 49 हजार 551 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;
विभागात कोरोना बाधित 2 लाख 5 हजार 449 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.26 :- पुणे विभागातील 1 लाख 49 हजार 551 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 5 हजार 449 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 50 हजार 352 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 5 हजार 546 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.77 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 72.8 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 49 हजार 897 रुग्णांपैकी 1 लाख 15 हजार 378 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 30 हजार 917 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 602 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.40 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.97 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 10 हजार 653 रुग्णांपैकी 6 हजार 165 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 164 आहे. कोरोनाबाधित एकूण 324 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 16 हजार 409 रुग्णांपैकी 11 हजार 891 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 832 आहे. कोरोनाबाधित एकूण 686 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 8 हजार 886 रुग्णांपैकी 4 हजार 910 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 631 आहे. कोरोनाबाधित एकूण 345 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 19 हजार 604 रुग्णांपैकी 11 हजार 207 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 808 आहे. कोरोनाबाधित एकूण 589 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 501 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 505, सातारा जिल्ह्यात 496, सोलापूर जिल्ह्यात 350, सांगली जिल्ह्यात 271 तर कोल्हापूर जिल्ह्यात 879 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 9 लाख 60 हजार 132 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 5 हजार 449 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 25 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

सिरम इन्स्टिट्यूटच्या कोवीड १९ वरील लसीची चाचणी सुरु… (व्हिडीओ)

0

मुंबई, दि. २६ : कोवीड १९ या संसर्गावर सिरम इन्स्टिट्यूट लस तयार करत आहे. या लसीची चाचणी करण्यासाठी पश्चिम क्षेत्रातील भारती विद्यापीठाच्या भारती हॉस्पिटलची निवड करण्यात आली आहे. स्वंयसेवक म्हणून या चाचणीसाठी तयार झालेल्या पाच जणांवर भारती हॉस्पिटलमध्ये लसीची चाचणी सुरू करण्यात येणार असल्याचे सहकार, कृषी, अन्न, नागरी पुरवठा, मराठी भाषा, औकाफ राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी आज येथे दिली.

मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. कदम म्हणाले की, जगभरात कोवीड १९ वर लस शोधण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे.  पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा कोरोनावर लसची निर्मिती सुरू आहे. या लसीची चाचणी करण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट व आयसीएमआरच्या वतीने देशभरातील १५ ठिकाणे निवडण्यात आली आहेत. त्यापैकी पुण्यातील भारती विद्यापीठाचे भारती हॉस्पिटल हे पश्चिम क्षेत्रातील एकमेव हॉस्पिटल आहे. गेल्या चार ते पाच महिन्यापासून भारती हॉस्पिटलमध्ये कोवीड १९ च्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत येथून दोन हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन बाहेर पडले आहेत.

सिरम इन्स्टिट्यूट व आयसीएमआरच्या माध्यमातून कोवीड लसीच्या चाचणीसाठी पाच जणांची निवड करण्यात आली असून हे पाचही जण स्वयंस्फूर्तीने यासाठी पुढे आलेले स्वयंसेवक आहेत. या पाच जणांची निवड ही आयसीएमआरच्या निकषानुसार झाली आहे. या पाचही जणांची पहिली आरटीसीपीआर चाचणी केली जाणार आहे.  त्याचप्रमाणे जे तंदुरुस्त लोक आहेत, ज्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आहेत, त्यांना ही लस देण्यात येणार आहे. त्यानंतर कोवीड १९ पॉझिटिव्ह असलेल्यांनाही लस देण्यात येणार आहे. या पाचही जणांच्या तब्येतीवर भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय टीम व आयसीएमआरचे संशोधक पुढील सहा महिने लक्ष ठेवणार आहेत. ही एक ऐतिहासिक घटना असून पुढील दोन ते तीन महिन्यात ही सिरम इन्स्टिट्यूटची लस उपलब्ध होईल, असेही डॉ.कदम यांनी यावेळी सांगितले.

मंदिरे सुरू करण्याच्या आंदोलनात भाजपा कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभागी व्हावे-भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे-मंदिरे सुरु करा या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे. भारतीय जनता पार्टीचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी केली.

आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होताना फेस मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे इत्यादी कोरोनासाठीच्या सर्व नियमांचे पालन करावे.

ते म्हणाले की, केंद्र शासनाने देवस्थाने सुरु करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे व देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरु देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरु करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खूप वेळा मागणी केली. सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरु करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही, राज्यातील महाविकास आघाडी सरकार ती मान्य करत नाही. “ठाकरे सरकार”ला इशारा देण्याकरिता व देवस्थाने सुरु करा या मागणीसाठी राज्यभर “दार उघड उद्धवा दार उघड” अशी हाक देत “घंटानाद आंदोलन” विविध धार्मिक संस्था व संघटनांतर्फे होणार आहे. या आंदोलनाला भाजपा पूर्ण पाठिंबा देत आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील.

ते म्हणाले की, तीर्थक्षेत्र आणि प्रमुख देवस्थांनांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून आहे. त्याचाही राज्य सरकारने सहानुभूतीने विचार करण्याची गरज आहे.

वीज कामगारांचे प्रश्न मार्गी लागणार

0

मुंबई, दि.26 : विविध विद्युत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांच्या समस्या व प्रश्नांबाबत ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आमदार भाई जगताप यांच्यासह आज बैठक घेतली. या बैठकीत डॉ. राऊत यांनी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींच्या सूचना व समस्या ऐकून घेत त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी दिले.

कोरोनामुळे महावितरणच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोना काळात वीज कर्मचारी कोरोना योद्धे बनून वीज पुरवठा करण्यासाठी अहोरात्र झटत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत वीज कर्मचाऱ्यांचे डॉ.राऊत यांनी कौतुक केले. तसेच सर्व वीज कर्मचारी संघटनांनी या बैठकीत जे मुद्दे मांडले त्याचा सर्व समावेशक विचार करुन अडचणी सोडविण्याची ग्वाही डॉ.राऊत यांनी यावेळी दिली.

मागासवर्गीयांचा आरक्षणाचा अनुशेष, बदली धोरण, मयत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी, फ्रँचाईझी धोरण, कंत्राटी कामगार, पदोन्नती, वीज कायदा सुधारणा, वीज चोरी रोखण्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढवणे, निवृत्तीधारकांचा प्रश्न सोडवणे इत्यादी विषयांवर विविध कामगार संघटनेच्या वतीने चर्चा व मागणी करण्यात आली. यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन उर्जामंत्र्यांनी यावेळी दिले.

कोरोना कालावधीत सर्व वीज कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात टाकून 24 तास अहोरात्र सेवा दिली. त्या सर्व कोविड योद्ध्यांचे आमदार भाई जगताप यांनी कौतुक केले. तसेच निसर्ग चक्रीवादळाच्या दुसऱ्या दिवशी स्वतः डॉ.राऊत यांनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल भाई जगताप यांनी डॉ.राऊत यांचे आभार मानले.

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) तथा सेवानिवृत्त ब्रिगेडियर पवन कुमार गंजु व विविध संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

नुसती घोषणा आणि सूचना नको महापौरसाहेब कार्यवाही करा – विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ

0

पुणे- कोरोनाचे काम करताना मृत्युमुखी पडलेल्या पालिका सेवकांना १ कोटीचे सुरक्षा कवचाचा आज पुनरुच्चार करत महापौरांनी मुख्य सभेची मान्यता मिळेल या भरवश्यावर आता पर्यंत मृत्युमुखी पडलेल्याच्या वारसांना किमान २५ लाख तरी द्या अशी विनंती आयुक्तांना केल्याने विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी , नुसत्या सूचना आणि घोषणा कशाला महापौर साहेब थेट कार्यवाही सुरु करा हो .. असे आवाहन केले आहे.

त्या म्हणाल्या ,’कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत कार्यरत मनपा अधिकारी कर्मचारी यांचा मृत्यू झाल्यास केंद्र सरकार 50 लाख मृत सेवकांच्या कुटूंबास देणार ही घोषणा हवेत गेल्याने आज महापौरांनी मुख्य सभा मान्यता देईल या भरवश्यावर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सेवकांच्या कुटुंबास 25 लाख रुपये देण्यासाठी आयुक्तांना निवेदन दिले त्यावर आम्ही सहमती दिली.
पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना म्रुत्युचे प्रमाण वाढत होते. यामध्ये पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी , अधिकारी व इतर सेवकांना कोरोना आटोक्यात आणण्यासाठी रात्रदिवस आपल्या जिवाची पर्वा न करता काम करीत आहेत. यातच काही सेवक व अधिकारी यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यावेळी महापौर यांनी अशा निधन झालेल्या सेवकांना एक कोटी रूपयाचे सुरक्षा कवच जाहिर केले. यामध्ये केंद्र सरकारची पन्नास लाख रुपयांची विमा योजना व पन्नास लाख रुपये पुणे महानगरपालिका देणार असे एक कोटी रुपयांचा सुरक्षा कवच जाहिर केले. त्याचबरोबर जर मयत झालेल्या सेवकाच्या वारसाला मनपा त नोकरी हवी असेल तर पंचवीस लाख रूपये रोख मनपा देणार असे जाहीर केले होते. परंतु आज पर्यंत एकाही मयत सेवकाला या सुरक्षा कवचाचा लाभ मिळाला नाही. आज असे समजते की केंद्राच्या विमा कंपनीने ही प्रकरणे रिजेक्ट केले आहे. या योजनेचा सुध्दा महापौर व प्रशासनाने पाठपुरावा करावा व मयत सेवकांना या योजनेचा लाभ मिळवुन द्यावा.परंतु आम्ही कोरोना मुळे मृत्यू झालेल्या सेवकांना आर्थिक मदत व वारसांना तातडीने नोकरी ही मागणी सुरुवातीपासून करीत आहोत.कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सेवकांच्या वारसांना तातडीने नोकरी द्यावी अशी आमची आग्रही मागणी आहेच, पण आजचे निवेदनानंतर प्रत्यक्षात मनपा सेवकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली पाहिजेराष्ट्रवादी काँग्रेस याविषयी पूर्णपणे प्रशासनाच्या पाठीशी आहे. परंतु आमची प्रशासनाला विनंती आहे की हे पचंवीस लाख रुपयांची आर्थिक मदत त्वरित मयत सेवकांच्या वारसांना मिळावी यासाठी तातडीने कार्यवाही करावी.असे दिपाली धुमाळ यांनी म्हटले आहे.

मेट्रोने व्यावसायिक संकुल उभारल्यास महापालिकेला हिस्सा द्यावा लागेल – आबा बागुल

0

कॉंग्रेसच्या गटनेत्यांनी आयुक्तांना भेटून केल्या विविध मागण्या

पुणे- पीएमपीएमएल बरखास्त करून पीएमटी पूर्ववत करा -मुळशी धरण ताब्यात घ्या -महापालिकेच्या मालकीची 1000 घरे मोकळी पडून तिथे रुग्णालयीन व्यवस्था करा ,कचऱ्यापासून वीट निर्मिती करा ,एच सी एम टी आर आणि मेट्रो यांनी जर व्यावसायिक संकुले उभारली तर त्यात महापालिकेने आपला हिस्सा मिळविलाच पाहिजे . मिळकत कराची बंद पडलेली जी आय एस मॅॅपिंग योजना कार्यान्वित करून मिळकत कर न भरणाऱ्या ४ लाख मिळकती कडून मिळकत कर वसुली सुरु करा . मुळशी धरणाचा राज्य सरकारशी टाटा कंपनीबरोबर असलेला करार संपला असल्याने ,आणि पुण्याची २४ तास पाणीपुरवठा योजना तयार असल्याने मुळशी धरण ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ करा ,सध्या मुळशीतून ५ टीएम सी पाणी घ्या . तळजाई टेकडी वरील प्रकल्प सुरु करा अशा विविध प्रकल्पांवर तसेच त्याशी निगडीत असलेले महापालिकेचे उत्पन्न आणि काही समस्या यावर आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचाशी कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी अत्यंत महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली ज्यास आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला .

आबा बागुल म्हणाले कि ,’एचसीएम टीआर प्रकल्पावर पावसकर सारख्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी .मेट्रो प्रकल्पाला आपण सार्वजनिक हित म्हणून जागा दिलेली आहे . जर मेट्रोने कुठे व्यावसायिक संकुले उभारली आणि त्यातून नफेखोरी अथवा कमाई केली तर त्यातील महापालिकेचा हिस्सा महापालिकेला मिळाला पाहिजे .पूर्वी पीएमटी स्वतंत्र पुणे महापालिकेची असताना वर्षाला कधी १०० ते २०० कोटी देण्याची वेळ आली नाही .पीएमपीएमएल तातडीने बरखास्त करून पूर्वीप्रमाणे आपापली पीएमटी चालविल्यास बरेच कोट्यावधी रुपये आपले वाचतील . मुख्य सभेने याबाबत ठराव हि संमत केला आहे. एस आर ए च्या माध्यमातून पाच ते सहा हजार सदनिका महापालिकेकडे पडून आहेत त्याचा मास्तर प्लान करून तिथे मनपाचे १००० बेडचे रुग्णालय तयार करता येईल ब्राझील चे कचर्यापासून वीट निर्मिती करण्याचे तंत्र अनेक देशांनी अंगिकारले असून आपणही ते स्वीकारून मायक्रो प्लानिंग केले पाहिजे .पुण्याची वाढती लोकसंख्या पाहता पुण्याला आणखी एका धरणाची भविष्यात गरज लागणार आहे त्या दृष्टीने मुळशी धरण आणि तेथील पाण्याचे सु नियोजन केले तर महापालिकेचे १५०० कोटी रुपये वाचतील असा दावा हि बागुल यांनी केला .

फिरत्या विसर्जन हौदांची संख्या वाढवणार-महापौर म्हणाले …

0
  • दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे ९० टक्के विसर्जन घरच्या घरी-महापौर म्हणाले
  • फिरत्या हौदांचे लोकेशनही समजणार-महापौर म्हणाले

पुणे -घरच्या घरीच बाप्पाचे विसर्जन या आपल्या आवाहनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गणेश विसर्जन पुणेकरांना आणखी सोयीस्कर व्हावे यासाठी पर्यावरणपूरक फिरत्या हौदांची संख्या वाढण्यात येणार असून हौदांचे लोकेशनही क्षेत्रिय कार्यालयांच्या माध्यमातून पुणेकरांना समजण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

गणेश विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महापौर मोहोळ यांनी महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, मनसे गटनेते वसंत मोरे, आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह विविध विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे ९० टक्के विसर्जन घरच्या घरी झाले होते. याच कल गृहीत फिरत्या हौदांचे नियोजन करण्यात येत आहे.

यावेळी माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपत पुणेकरांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद दिला असून आपल्या घरीच गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यास पसंती दिली आहे. दीड दिवसांच्या जवळपास ९० टक्के मूर्तींचे विसर्जन नागरिकांनी घरातच केले. याबद्दल पुणेकरांचे अभिनंदन आणि धन्यवाद. याच अनुषंगाने पुढील नियोजन करण्यात येत आहे. माझी पुणेकरांना विनंती आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरच्या घरीच विसर्जन करण्यास प्राधान्य द्यावे’.

गेल्या वर्षी दीड दिवसांच्या १३ हजार ५८५, पाचव्या दिवशी २५ हजार ८९६, सातव्या दिवशी २९ हजार ९९७ आणि शेवटच्या दिवशी ३ लाख ५५ हजार १५४ गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदात करण्यात आले होते. यावेळी रासने यांनी शेवटच्या दिवशींच्या मूर्तींची संख्या लक्षात घेता नियोजन करावे, बागुल यांनी धार्मिक भावना लक्षात घेऊन नियोजन करावे तर मोरे यांनी विसर्जनाच्या नियोजनाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी उद्घोषणा आणि जाहिरात करण्याची सूचना केली.पाचव्या, सातव्या आणि शेवटच्या दिवसाच्या विसर्जनाचे नियोजनही बैठकीत करण्यात आल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत

0

मुंबई दि.25 : सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड 19) करिता आज 3 लाख 37 हजार 240 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

या मदतीच्या रुपाने स्वीय सहाय्यकांनी सामाजिक बांधिलकी जपत कोविड 19 विरुद्धच्या लढाईत योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी या मदतीसाठी सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांना धन्यवाद दिले आहेत.
ज्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करावयाची आहे त्यांच्यासाठी माहिती खालीलप्रमाणे आहे.

इंग्रजीत-
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

राज्यात स्वदेशी झाडांच्या लागवड-संवर्धनाला चालना देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. 25 : देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ‘हिरकमहोत्सवा’निमित्त राज्यात 75 विशेष ‘रोपवाटिकां’ची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर वनराई तयार करण्यात येणार असून शासकीय रोपवाटिकेच्या माध्यमातून ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या सहकार्याने स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड आणि संवर्धनाला चालना देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या दालनात ‘सह्याद्री देवराई सामाजिक संस्थे’च्या वृक्षलागवडीसंदर्भातील विविध विषयांवरील बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी वनमंत्री संजय राठोड, ‘सह्याद्री देवराई’ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सिनेअभिनेते सयाजी शिंदे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य संरक्षक दिनेश त्यागी, अप्पर प्रधान मुख्य संरक्षक विवेक खांडेकर उपस्थित होते.

निसर्गाच्या संवर्धनासाठी राज्यभर वृक्ष लागवड व संवर्धन करण्यात येत असून त्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात वन विभाग आणि महसूल विभागाच्या जागेवर वनराई उभारण्यात येणार आहे. या कामात महसूल व वन विभागासोबत ‘सह्याद्री देवराई सामाजिक संस्थे’ला सहभागी करुन घेण्यात येणार आहे. या माध्यमातून स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड व संवर्धनाला चालना देण्यात येणार आहे. तसेच राज्यात 75 ठिकाणी फळझाडांच्या परसबागा फुलविण्यात येणार आहेत. तसेच राज्यभरात शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून अत्यंत जुनी झाडे शोधून तज्ज्ञ गटाच्या माध्यमातून त्या झाडांना ‘हेरीटेज’ म्हणून घोषित करण्यात येणार आहे. ‘सह्याद्री वनराई’च्या मॉडेलच्या मदतीने राज्यात कमी वेळात ‘घनवन’ तयार करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्यभर जिल्हानिहाय वृक्षसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार असून त्याला राज्य शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

..तर मातंग समाजाचा जानेवारीत राज्यव्यापी एल्गार (व्हिडीओ )

0

पुणे- स्वतंत्र आरक्षण ,अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न ,राज्यपाल नियुक्त विधानपरिषद अण्णाभाऊ साठे महामंडळ पुन्हा सुरु करणे, लहूजी वस्ताद साळवे स्मारक उभारणे या सारख्या समाजाच्या विविध मागण्यांसाठी मातंग समाजाने आज येथे सर्वपक्षीय  राज्यव्यापी ‘यल्गार’ चा इशारा दिला आहे. राज्यस्तरीय मातंग समाज पक्ष ,संघटना प्रमुखांची बैठक आज पुण्यातील हॉटेल ओर्बीट येथे घेण्यात आली . या बैठकीला राज्यातील सुमारे ३० विविध पक्ष आणि संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .आज या समाजात खूपच गंभीर परिस्थिती आहे. नौकऱ्या मध्ये समाज सर्वात कमी आहे. आरक्षणाचा फायदा मिळू न शकणारा समाज अशी ओळख या समाजाची होते आहे. त्यासाठी अ ब क ड वर्गीकरण करून आरक्षण मिळावे , विधानसभा अस्तित्वात आल्यापासून या समाजाला राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्व देण्यात आलेले नाही. त्या पासून कायम डावलण्यात आले . या शिवाय मुंबई ,पुणे येथील स्मारकाचे प्रश्न रखडलेले आहेत लहूजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारसी अद्याप अंमलात आणल्या गेल्या नाहीत . अशा विविध स्वरूपाच्या मागण्यांवर यावेळी चर्चा केली गेली. केवळ कोरोना या महामारी मुळे सध्या यावर जागृतीचे काम राज्यभर करून, या मागण्यांसाठी  जानेवारीत हा समाज रस्त्यावर एल्गार स्वरूपात आपला आक्रोश व्यक्त करेल असा इशारा येथे सर्व नेत्यांनी दिला . मातंग समाजाचे नेते रमेश बागवे , तसेच दलित महासंघाचे मच्छिंद्र सकते, रिपब्लिकन नेते हनुमंत साठे, माजी आमदार राजीव आवळे, राम गुंडीले,प्रा. मिलिंद आव्हाड ,शिवसेनेचे बाळासाहेब भांडे, तसेच सुकुमार कांबळे ,अनिल हातगळे ,विजय , मनोज कांबळे, नगरसेवक अविनाश बागवे,इचलकरंजी चे  नगरसेवक अब्राहम आवळे ,सुरेश पाटोळे ,संदीपन झोंबाडे ,काशिनाथ आल्हाट ,शिवाजीराव राजगुरू, विठ्ठल थोरात औरंगाबादचे संजय ठोकळ आदी मान्यवर कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग घेत एल्गार ची घोषणा केली .

पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाशी लढताना मृत्यू आल्यास वारसांना एक कोटी-महापौरांची पुन्हा ग्वाही

0

covid_19आरोग्य सेवकांसाठी .रू ५० लाख केंद्र शासनाकडून प्राप्त होणार..

तूर्तास २५ लाख तरी वारसांना द्या आयुक्तांकडे महापौरांची विनंती

केवळ मुख्य सभा न चालविल्याने मंजुरी प्रलंबित

पुणे- कोरोना विषाणू संसर्गग्रस्त रूग्णांसाठी उपचारात्मक कामकाज व अशा रूग्णांशी प्रत्यक्ष संबंध येवून दिवंगत झाल्यास त्यांना रक्कम रू १ कोटीचे सुरक्षा कवच पुरविण्यात आले आहे. यापैकी पुणे मनपा अधिकारी व सेवकांसाठी कोरोना विषाणु (कोविड – १९) सुरक्षा कवच योजनेबाबत ची हि माहिती आज महापौर कार्यालयाने प्रसिद्धीसाठी माध्यमांना पाठविली आहे.
या साठी महापौर कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे कि ,’ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेसाठी व त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापलिकेच्या विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत ही जबाबदारी पार पाडत असताना महापालिका अधिकारी व कर्मचारी अग्रभागी राहून कार्यरत असल्याने त्यांचा कोरोनाग्रस्त रूग्णांशी जवळाचा संपर्क येत आहे.
सदरील अधिकारी व कर्मचारी हे कोरोना विषाणू संसर्गग्रस्त रूग्णांसाठी उपचारात्मक कामकाज व अशा रूग्णांशी प्रत्यक्ष संबंध येवून दिवंगत झाल्यास त्यांना रक्कम रू १ कोटीचे सुरक्षा कवच पुरविण्यात आले आहे. यापैकी आरोग्य सेवकांसाठी र.रू ५० लाख केंद्र शासनाकडून प्राप्त होणार आहेत व महानगरपालिकेकडून ५० लाख किंवा एका वारसास पुणे महानगरपालिकेमध्ये नियुक्ती व र. रू २५ लाख अनुदान देण्यात येणार आहे.
उपरोक्त योजनेस स्थायी समिती मार्फत मुख्य सभेची मान्यता घेणेकामी तसा प्रस्ताव स्थायी समितीने शिफारस करून माहे जुलै २०२० च्या मुख्य सभेच्या कार्यपत्रिकेवर दाखल आहे. मुख्य सभा मंजुरी देईल या भरवशावर जे अधिकारी व कर्मचारी दिवंगत झालेले आहेत यांच्या वारसांना प्रत्येकी रक्कम र.रू २५ लाखाचे अर्थसहाय्य सत्वर देण्यात यावे.अशी महापौर यांनी सर्व पक्ष नेत्याशी चर्चा करून महापालिका आयुक्त यांस विनंती केली आहे.

राज्यातील मोठ्या गावांच्या विकासासाठी ‘ग्रामोत्थान’ योजना – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

0
  • नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर ‘ग्रामोत्थान’ योजनेची रचना
  • निधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडणार
  • मोठ्या गावांच्या विकासाला मिळणार गती

मुंबई : राज्यातील 25 हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या मोठ्या गावांत केवळ कर संकलनावर विकासकामे करताना मर्यादा येतात. त्यामुळे अशा मोठ्या गावांच्या विकासासाठी ‘नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर ‘ग्रामोत्थान’ योजना तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नियोजन आणि ग्रामविकास विभागाला दिले. या निर्णयामुळे राज्यातील जवळपास तीनशे मोठ्या गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात ‘राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार दिलीपराव बनकर, ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव अरविंद कुमार, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा उपस्थित होते.

राज्यात पंचवीस हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावांची संख्या साधारपणे तीनशेच्या आसपास आहे. या गावात केवळ घरपट्टी कर संकलनाद्वारे विकास करताना निधीच्या कमतरतेमुळे अनेक मर्यादा येतात. त्यामुळे अशा मोठ्या गावांना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत अनेक वेळा मागणी होत असते. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी शहरी भागाच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या ‘नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर राज्यातील मोठ्या गावांसाठी ‘ग्रामोत्थान’ योजना तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ही योजना नियोजन विभाग आणि ग्रामविकास विभागाद्वारे तयार करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन या योजनेला निधी उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यात येणार आहे.

या ‘ग्रामोत्थान’ योजनेमुळे मोठ्या गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. या माध्यमातून सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांची कामे, दिवाबत्ती, रस्तेदुरुस्ती, बाग बगीचे विकास यांसारखी नागरी सुविधांची कामे केली जाणार आहेत. मोठ्या गावांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या योजनेमुळे राज्यातील मोठ्या गावांच्या विकासाला गती मिळणार आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबरला

0

मुंबई, : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधानपरिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठका आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकांमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कामकाजमंत्री ॲड. अनिल परब,विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आदी उपस्थित होते.

या बैठकांमध्ये कोविड परिस्थितीत सुरक्षाविषयक मापदंडांचे पालन करुन अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे दि. 6 सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची कोविड-19 साठीची ‘आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. ज्या सदस्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली असेल अशा सदस्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था आवश्यकतेप्रमाणे सभागृहाच्या प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीमध्येही करण्यात येणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक सदस्याला सुरक्षा किट देण्यात येणार आहे. या किटमध्ये फेस शील्ड, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी वस्तूंचा समावेश असेल.

सदस्यांच्या स्वीय सहायकांना विधानमंडळात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, स्वीय सहायकांची आणि सदस्यांच्या वाहनचालकांची बसण्याची तसेच अल्पोपहार आदी व्यवस्था विधानमंडळ परिसरात तंबू (टेन्ट) टाकून करण्यात येईल.

सहव्याधी असलेल्या (कोमॉर्बिडीटी) सदस्यांना काळजी घेण्याबाबतच्या सूचना संबंधित पक्षाच्या गटनेत्यांकडून दिली जावी.

या अधिवेशनात शोक प्रस्तावावर चर्चा, अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयक यावर चर्चा घेण्यात येतील. यामध्ये 7 शासकीय विधेयके आणि एक विनियोजन विधेयकाचा समावेश असेल, अशी माहिती विधानमंडळ सचिव ॲड. राजेंद्र भागवत यांनी यावेळी दिली.

कामकाज सल्लागार समिती बैठकांना विधानसभा सदस्य सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, ॲड. आशिष शेलार, अमिन पटेल, सुनील प्रभू, विधान परिषद सदस्य सर्वश्री डॉ. रणजीत पाटील, अशोक ऊर्फ भाई जगताप, विजय ऊर्फ भाई गिरकर, जयंत पाटील, कपील पाटील आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत इतर पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांची परीक्षा

0

मुंबई दि.25: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखा वगळता इतर पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांची परीक्षा घेण्यात आली. विशेष म्हणजे सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यापीठामार्फत नजर ठेवण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत परीक्षा घेणारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रातले पहिले विद्यापीठ ठरले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखा वगळता इतर पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांची (दंत,आयुर्वेदिक,युनानी, होमिओपॅथी,नर्सिंग,फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ऑडिओलॉजी स्पीच थेरपी) यांची लेखी परीक्षा 17 ते 23 ऑगस्ट 2020 या काळात राज्यातील 115 केंद्रांवर पार पडली. या परीक्षेत 2421 विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज आले होते. आणि या परीक्षेला विद्यार्थ्यांची सरासरी 90 टक्के उपस्थिती होती.

श्री. देशमुख यांनी याबाबत माहिती दिली की, विद्यार्थ्यांची परीक्षा कोविड-19 परिस्थितीला अनुसरून सुरक्षित वातावरणात घेण्यात आली. या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 24 ऑगस्ट ते 24 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा 2 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2020 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर डिप्लोमा व सुपर स्पेशालिटी वैद्यकीय विद्याशाखेचे 2204 विद्यार्थी बसणार असून सदर परीक्षा 30 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सर्व वैद्यकीय आरोग्य विज्ञान विज्ञान शाखा यांच्या अंतिम वर्ष पदवीपूर्व व प्रथम वर्ष एमबीबीएस (जुना अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा 8 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबर 2020 व प्रात्यक्षिक परीक्षा विद्या शाखानिहाय 20 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2020 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. या परीक्षा 274 परीक्षा केंद्रांवर होणार असून या परीक्षेसाठी 9688 विद्यार्थी बसणार आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ मार्फत सर्व वैद्यकीय परीक्षांची तयारी पूर्ण करण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.

कोरोना संकटकाळात ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार

0

मुंबई, दि. २५ : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयम वेबपोर्टलमार्फत एकट्या जुलै महिन्यात तब्बल २१ हजार ५७२ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. तत्पुर्वी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली. लॉकडाऊनच्या काळात एकूण ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.

मंत्री श्री. मलिक म्हणाले, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.

एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर १ लाख ७२ हजार १६५ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यापैकी सुमारे १७ हजार ७१५ जणांना रोजगार मिळाला. त्यानंतर जुलै महिन्यात ५८ हजार १५७ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. जुलैमध्ये मुंबई विभागात १२ हजार १५१, नाशिक विभागात ०८ हजार ५२६, पुणे विभागात २२ हजार २६०, औरंगाबाद विभागात ६ हजार २७५, अमरावती विभागात ०३ हजार ३६६ तर नागपूर विभागात ०५ हजार ५७९ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. जुलैमध्ये २१ हजार ५७२ उमेदवारांना नोकरी मिळविण्यात यश आले आहे. मुंबई विभागातील ३ हजार ९४०, नाशिक विभागातील १ हजार ३२१, पुणे विभागातील १४ हजार ५२१, औरंगाबाद विभागातील १ हजार १०५, अमरावती विभागातील ४१४ तर नागपूर विभागातील २७१ उमेदवार नोकरीस लागले आहेत.

जुलैमध्ये ऑनलाईन मेळाव्यात २०४ उद्योजकांचा सहभाग

कौशल्य विकास विभागाने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. एप्रिल ते जून या ३ महिन्यात २४ ऑनलाईन रोजगार मेळावे झाले तर जुलै महिन्यात ३१ मेळावे झाले. जुलैमध्ये झालेल्या मेळाव्यांमध्ये २०४ उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील १९ हजार ०७८ जागांसाठी त्यांनी ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये १८ हजार १५३ नोकरीइच्छूक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत १ हजार ६५१ तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरु आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

नोकरीइच्छुक तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन

मंत्री श्री. मलिक म्हणाले की, यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरीइच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.