Home Blog Page 2463

शेतकऱ्यांसाठी ५००० कोटींचे पॅकेज जाहीर करा… राज्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढा

0


कोरोना उपाययोजनांसाठी वाढीव निधी द्या
-विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मागणी
मुंबई,दि. ८ सप्टेंबर : अन्य राज्यांच्या धर्तीवर शेतकऱ्यांना ५००० कोटींची मदत जाहीर करा. छोटे व्यवसायिक, असंघटित कामगार, रिक्षा टॅक्सिचालकांसह गटई कामगारांना मदत द्या. वीजबिलात ५० टक्के सवलत द्यावी आणि राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज विधान परिषदेत केली. पुरवणी मागण्यावर चर्चा करताना त्यांनी कोरोना, महापूर, निसर्ग वादळ, शेतीचे नुकसान आणि सरकारची असंवेदनशीलता यावरून सरकारला जोरदार झोडपून काढले. महाविकास आघाडी सरकार आज प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरली आहे, असा घणाघात आरोपही त्यांनी केला.
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या व शेवटच्या दिवशी विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सांगितले की, राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळताना, मंत्रिमंडळात, तसच विविध खात्यात आणि प्रशासनात समन्वय नव्हता, असा आरोप करतानाच त्यांनी विविध रुग्णालयात रुग्णांची झालेली लूट, असुविधा, यंत्रणेतील त्रुटी याची आकडेवारीसह कमतरता स्पष्ट केली. तसेच भ्रष्टाचाराला निमंत्रण असलेली जंबो कोविड सेंटरची उच्चस्तरिय चौकशी करण्याची मागणीही दरेकर यांनी केली.
‘कोरोना योध्द्यांना शहिदांचा दर्जा द्यावा व त्या दर्जानुसार सवलती द्याव्यात. कोरोना उपाययोजनांसाठी अतिरिक्त निधी द्या. तसेच शेतकऱ्याच्या मालाची खरेदी सरकारने केलेली नाही. त्यामुळे शेतीमालाचे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना क्विंटलमागे १ हजार रुपयांची मदत द्या. राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच शेतकऱ्यांना भाजीपाला खराब झाला. त्यामुळे भाजीपाला शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या. कर्नाटक राज्याच्या धर्तीवर फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये अनुदान, धोबी व न्हावी, रिक्षा व टॅक्सी चालकांना, बांधकाम मजुरांना प्रत्येकी ५०००, आणि विणकरांना प्रत्येकी २००० अनुदान द्या, अशी मागणी यावेळी प्रविण दरेकर यांनी केली.
राज्यातील छोटे व्यावसायिक, गटई कामगार, लोहार, शिंपी, प्लंबर, इलेकट्रीशियन, असंघटित कामगार, डबेवाले यांना पुन्हा उभारी देण्यासाठी त्यांच्यासाठी एक अभ्यासपूर्ण पॅकेज तातडीने जाहीर करावे. निसर्ग वादळात उध्दवस्त झालेल्यांना त्वरित मदत मिळावी. जे जे प्रश्न उपस्थित केले त्यावर चौकशी करावी. असंवैधानिक कारणांनी राज्यातील वैधानिक विकास महामंडळाच्या मुदतवाढीचा प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावावा. या मुदतवाढीची शिफारस केंद्राला करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करावे
कोकणाकडे सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कोकणाचा विकास रखडला आहे. कोकणसाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करावे. कोकणातील पाटबंधारे मंडळाला आर्थिक तरतूद नाही. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करावेत. मच्छिमारांची थट्टा न करता, त्यांना चांगल्या प्रकारे मदत करा, अशीही मागणी प्रविण दरेकर यांनी केले.

शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी खासदार संजय राऊत

0

मुंबई- शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी खासदार संजय राऊत यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्यासह १० जणांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून माहिती देण्यात आली. यामध्ये खासदार अरविंद सावंत, खासदार धैर्यशील माने, खासदार प्रियंका चतुर्वेदी, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार व मुख्य प्रतोद सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, महापौर किशोरी पेडणेकर यांची पक्षप्रवक्ते म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.

यामध्ये खासदार अरविंद सावंत, खासदार धैर्यशील माने, खासदार प्रियंका चतुर्वेदी, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार व मुख्य प्रतोद सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, महापौर किशोरी पेडणेकर यांची पक्षप्रवक्ते म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.

कमला नेहरू रुग्णालयात 100 ऑक्सिजन बेडस तातडीने उपलब्ध करून द्या- पृथ्वीराज सुतार

0

पुणे -शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील कमला नेहरू रुग्णालयात 100 ऑक्सिजन बेडस तातडीने उपलब्ध करून द्या, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्यावर गेली आहे. अडीच हजारांवर नागरिकांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. रोज साधारण दोन हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत.

एकूणच कोरोनाचे संकट गंभीर होत चालले आहे. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर बेडस मिळत नसल्याने अनेक रुग्णांचा उपचारविनाच मृत्यू होत आहेत.

कमला नेहरू हॉस्पिटल हे 400 बेडसचे हॉस्पिटल आहे. या ठिकाणी सर्व सोयी – सुविधा उपलब्ध आहेत. ऑक्सिजन व्यवस्था असलेले बेड या ठिकाणी तयार आहेत.

कोरोना रुग्णांसाठी हे बेड उपलब्ध करुन द्यावेत, त्यासाठी आम्ही वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. मात्र, त्यावर काहीही कारवाई होत नाही.

भविष्यात बेडस न मिळाल्यामुळे पुणेकरांचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी त्वरित कमला नेहरू रुग्णालयात 100 ऑक्सिजनचे बेडस उपलब्ध करून घ्यावेत.

8 दिवसांत हे बेडस उपलब्ध करुन दिले नाही तर बेडस अभावी होणाऱ्या मृत्यूची जबाबदारी ही प्रशासनाची राहील, असा इशाराही पृथ्वीराज सुतार यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात दिला आहे.

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे

0

मुंबई, दि. 8 : विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ.नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

महिलांचे प्रश्न सोडविण्यास नीलमताई यांचे कायम प्राधान्य असते.  महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या स्वतः धावून जातात. निलमताईंची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून  त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो, असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे शुभेच्छापर भाषण  करतांना म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदस्य सर्वश्री जयंत पाटील, शरद रणपिसे, कपिल पाटील यांनीही मनोगत व्यक्त करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’ असणार वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे सूत्र – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची विधानसभेत घोषणा

0

मुंबई, दि. 8 : राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये 70 टक्के प्रादेशिक कोटा आणि 30 टक्के राज्यस्तर कोटा या धर्तीवर यापूर्वी प्रवेश करण्यात येत होते. मात्र आता 70 : 30 प्रादेशिक कोटा कार्यपद्धत रद्द करण्यात आली असल्याने ‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’ अशी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया असेल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत केली.

यापूर्वी उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ असे तीन प्रादेशिक विभाग करण्यात आलेले होते, ज्या प्रादेशिक विभागातून उमेदवार 12 वी उत्तीर्ण झालेला असेल त्या उमेदवारांसाठी त्यांच्या संबंधित प्रादेशिक विभागातील महाविद्यालयामध्ये 70 टक्के जागा राखीव असत. तसेच 30 टक्के जागा ह्या संपूर्ण राज्यातील उमेदवारांकरिता उपलब्ध असत. तीनही प्रादेशिक विभागामध्ये महाविद्यालयांची संख्या आणि पर्यायाने प्रवेशासाठी उपलब्ध जागांची संख्या भिन्न होत्या. त्यामुळे मराठवाड्यासारख्या प्रादेशिक विभागामध्ये जेथे महाविद्यालयांची संख्या कमी आहे, तेथील विद्यार्थ्यांना 70 टक्के प्रादेशिक जागांमध्ये कमी जागा उपलब्ध होत होत्या. त्यामुळे उच्च गुणवत्ता असूनही तेथील उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. तर काही विद्यार्थ्यांना प्रवेशास मुकावे लागत होते. त्यामुळे 70:30 कोटा पद्धत ही गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने मराठवाड्यातील पालकांकडून व विद्यार्थ्यांकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून ही कार्यपद्धती रद्द करण्याची वारंवार मागणी होत होती.

आतापर्यंत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता नीट (NEET) या राष्ट्रीय स्तरावरील एकाच सामाईक प्रवेश परीक्षेच्या गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येत होता. तसेच त्याबाबतची प्रवेशप्रक्रिया ही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांचेमार्फत राबविण्यात येत होती. 70:30 कोटा पद्धतीमुळे गुणवत्ताधारक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असल्याने ही कार्यपद्धती रद्द करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्याअनुषंगाने आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमामध्ये बदल करण्याकरिता 4 सप्टेंबर, 2020 रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

एआयटीएच्या सहसचिवपदी सुंदर अय्यर यांची, उपाध्यक्षपदी भरत ओझा यांची निवड

0

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2020: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव सुंदर अय्यर यांची अखिल भारतीय टेनिस संघटने(एआयटीए)च्या सहसचिवपदी निवड करण्यात आली असून तर, एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा यांची अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)च्या उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. संघटनेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकी नंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. 

खासदार डॉ अनिल जैन यांची अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)च्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. रविवारी येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या सर्व पदांच्या निवडणूका यशस्वीपणे पार पडल्या. बिनविरोध पार पडलेल्या या निवडणुकीत डेव्हीस करंडक स्पर्धेचे कर्णधार रोहित राजपाल यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली, तर अनिल धुपार यांची महासचिवपदी फेरनिवड करण्यात आली. 

भरत ओझा यांच्याबरोबरच आणखी आठ उपाध्यक्षांची निवड करण्यात आली असून यामध्ये माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांचा समावेश आहे. तसेच, मावळते महासचिव हिरन्मय चॅटर्जी आणि माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू विजय अमृतराज यांचाही आठ उपाध्यक्षकांमध्ये समावेश आहे. एकूण 4 सहसचिवांमध्ये प्रेमकुमार कारा, रक्तीम सेकिया व सुमन कपूर यांचाही समावेश आहे. तसेच, या कार्यकारिणीत आणखी 7 सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे. 

सुंदर अय्यर यांनी गेल्या 30 वर्षांपासून पुणे आणि महाराष्ट्रातील टेनिसच्या विकासामध्ये बहुमोल योगदान दिले असून विविध स्तरावरील स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करून त्यांनी राज्यातील टेनिसच्या विकासाला मोठाच हातभार लावला. सुंदर अय्यर यांनी भरत ओझा,  शरद कन्नमवार व एमएसएलटीए समिती यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील छोटी शहरे व गावांमध्येही टेनिसच्या सुविधा व प्रशिक्षणाच्या सोयी पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. तसेच, ग्रामीण परिसरातील गुणवान युवकांना प्रशिक्षकांच्या भूमिकेत आणण्यात सुंदर अय्यर यांनी महत्वाची भूमिका बजावली. व्हिजन प्रोग्राम आणि टेनिस लायब्ररी हे दोन अत्यंत उपयुक्त उपक्रम अय्यर यांनी राबविले. पुण्यात 45 वर्षानंतर डेव्हीस करंडक लढत आयोजित करण्यात अय्यर यांचा मोलाचा वाटा होता. 
राष्ट्रीय स्तरावर टेनिसच्या विकासाला हातभार लावण्यात आणि संघटनेसाठी कार्य करण्यात मला मोठाच बहुमान वाटतो, असे सांगून सुंदर अय्यर म्हणाले की, एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, माजी अध्यक्ष शरद कन्नमवार, एआयटीएचे माजी अध्यक्ष अनिल खन्ना माजी महासचिव हिरन्मय चॅटर्जी आणि विद्यमान महासचिव अनिल धुपार यांनी या प्रतिष्ठेच्या पदासाठी माझी निवड करताना माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आणि राष्ट्रीय स्तरावर सेवेची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. एआयटीएच्या सहसचिवपदी निवडून आलेले सुंदर अय्यर हे पुण्यातील डॉ.जीए रानडे यांच्यानंतर दुसरे आणि महाराष्ट्रातील चौथे व्यक्ती आहेत. 
एआयटीए संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी समिती पुढीलप्रमाणे
अध्यक्ष- डॉ अनिल जैन;
उपाध्यक्ष-हिरन्मय चॅटर्जी, चिंतन पारीख, नवनीत सेहगल, अनिल खन्ना, भरत ओझा, सीएस सुंदर राजू, विजय अमृतराज, राजन कश्यप;
महासचिव- अनिल धुपार;
खजिनदार- रोहित राजपाल;
सहसचिव- प्रेमकुमार कारा, रक्तीम सेकिया, सुमन कपूर, सुंदर अय्यर;
कार्यकारिणी समिती- डॉ.अखोरी प्रसाद, अनिल महाजन, अंकुश दत्ता, अशोक कुमार, गुरुचरण सिंग होरा, कॅप्टन मूर्ती गुप्ता, थॉमस पॉल. 

“शॉर्टकट मारावे लागले की रात्री कामे करावी लागतात,” उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला (व्हिडीओ)

0

मुंबई-

शॉर्टकट मारावे लागले की रात्री कामे करावी लागतात असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाने झाली. जी कामं करायची ती आम्ही दिवसा ढवळ्या करतो, रात्रीच्या अंधारात नाही असंही यावेळी ते म्हणाले. प्रत्येक पाऊल शांततेने उचलावं लागणार आहे, ओरडून बोलल्याने करोना होतो असाही अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/243970390228489/

“मुंबईत जन्मलेली पहिली व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभली हे मी माझं भाग्य समजतो. मुंबईकरांसाठी आपण अनेक गोष्टी आणणार असून जनसंपत्तीसह वनसंपत्तीही महत्त्वाची आहे. पर्यावरणाचा-हास होता कामा नये. काम करताना कोणताही अहंकार असता कामा नये. त्याचप्रमाणे शॉर्टकटही मारु नये, अन्यथा रात्रीच्या अंधारात झाडे कापावी लागतात. अशाच अनेक गोष्टी कराव्या लागतात. रात्री चालणारी कामं आम्ही दिवसा करु लागलो. जे करतो ते दिवसाढळ्या करतो,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

“आरे कारशेडसंबंधी आम्ही तज्ञांशी चर्चा करुन निर्णय घेत आहोत. जो खर्च झाला आहे तो वाया न जाता मेट्रोचा अधिक मुंबईकरांना लाभ घेता येत असेल तर त्यादृष्टीने पावलं टाकत आहोत,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्वांना करोना संकटात सहकार्य करण्याची विनंती केली.

“करोना संकटात अनेक चांगल्या गोष्टी झाल्या असून आपण आरोग्याकडे लक्ष देऊ लागलो आहोत. मुंबईसह जिथे गरज असेल तिथे सगळीकडे संसर्गजन्य आजार केंद्र निर्माण कऱण्याचा निर्णय घेण्यात आला,” असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. “सर्व गोष्टी सुरु करताना जनतेला करोनासोबत कसं जगायचं हे शिकवण्याची गरज आहे. करोना संकट शेवटचं असेल असं नाही. ते कदाचित पुढच्या संकटाची नांदीही असू शकते,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

आगामी काळात महाराष्ट्रात एक कार्यक्रम राबवण्याची इच्छा व्यक्त करत उद्धव ठाकरेंनी सहकार्य करण्याची विनंती केली. प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारली तर यंत्रणेवरील ताण कमी होईल असं सांगताना उद्धव ठाकरे यांनी राज्यात जनतेच्या जनजागृतीसाठी माझे कुटुंब,माझी जबाबदारी” योजना जाहीर केली. “दोन टप्प्यात ही योजना राबवली जाणार असून प्रत्येक कुटुंबाची आरोग्य चौकशी होणार आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.  ७ डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 65 हजार 580:एकुण 7 हजार 483 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 2 लाख 11 हजार 800 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, विभागात कोरोना बाधित 2 लाख 84 हजार 863 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.08 :- पुणे विभागातील 2 लाख 11 हजार 800 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 84 हजार863 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 65 हजार 580 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 7 हजार 483 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.63 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.35 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 97 हजार 286 रुग्णांपैकी 1 लाख 57 हजार 29 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 35 हजार 717 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 540 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.59 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 18 हजार 988 रुग्णांपैकी 11 हजार 29 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 446 आहे. कोरोनाबाधित एकूण 513 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 21 हजार 264 रुग्णांपैकी 15 हजार 388 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 36 आहे. कोरोनाबाधित एकूण 840 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 17 हजार 708 रुग्णांपैकी 9 हजार 478 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 547 आहे. कोरोनाबाधित एकूण 683 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 29 हजार 617 रुग्णांपैकी 18 हजार 876 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 834 आहे. कोरोनाबाधित एकूण 907 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 952 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 273 , सातारा जिल्ह्यात 498 , सोलापूर जिल्ह्यात 560 , सांगली जिल्ह्यात 683 तर कोल्हापूर जिल्ह्यात 938 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 13 लाख 15 हजार 523 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 84 हजार 863 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 7 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

तीन दिवसांच्या चौकशीनंतर नार्कोटिक्स ब्युरोने रियाला केली अटक

0

मुंबई-ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने रिया चक्रवर्तीला अटक केली आहे. थोड्याच वेळात तिची मेडिकल आणि कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर सादर करुन तिला रिमांड मागितला जाईल. ड्रग्ज प्रकरणातील दुसरे आरोपी शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांनाही कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

एनसीबीकडून रियाच्या चौकशीचा आज तिसरा दिवस होता. मागील तीन दिवसांत जवळजवळ 20 तास रियाला प्रश्नोत्तरे केली गेली. तत्पूर्वी सोमवारी रिया, तिचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि घरगडी दीपेश सावंत यांना समोरासमाेर बसवून चौकशी केली होती. जवळजवळ आठ तासांच्या चौकशी रियाने स्वतः ड्रग्जचे सेवन केल्याचे कबुल केले नव्हते. मात्र ड्रिंक आणि स्मोकिंग करत असल्याचे मान्य केले. रियाच्या म्हणण्यानुसार, तिने जे काही केले ते फक्त सुशांतसाठी केले.

  • रियाचे सत्य समोर आलेः बिहारचे डीजीपी

बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, रियाविरूद्ध एनसीबीकडे पक्के पुरावे आहेत. रियाचा ड्रग्ज पेडलर्सशी संबंध होता, हे आता उघड झाले आहे. याची पुष्टी झाल्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

  • रियाचे वकिल म्हणाले – सुशांत ड्रग्ज अॅडिक्ट होता

रियाचे वकिल सतीश मानशिंदे म्हणाले की, एका महिलेने ड्रग्जचे व्यसन असलेल्या व्यक्तीवर प्रेम केले म्हणून तीन तपास यंत्रणा तिच्या मागे लागल्या आहेत. सुशांत अनेक वर्षे मानसिकदृष्ट्या आजारी होता आणि बंदी असलेली औषधे खाल्ल्यामुळे त्याने आत्महत्या केली होती.

  • रिया अटकेसाठी होती तयार

प्रेम करणे गुन्हा असेल तर या गुन्ह्यासाठी कोणतेही परिणाम भोगण्यास रिया तयार आहे. निर्दोष असल्याने तिने अटक टाळण्याचा प्रयत्न केलेला नाही. ती अटकेसही सज्ज आहे, असे रियाचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले होते.

सुशांतच्या बहिणीविरोधात रियाने दाखल केली तक्रार

सोमवारी रात्री सुशांत मृत्यू प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला. सीबीआयच्या गुन्ह्यातील आराेपी रिया चक्रवर्तीने सुशांतची बहीण प्रियांका, डॉक्टर आणि इतरांविरुद्ध फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे. रियाने मुंबई पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत प्रियांका सिंह, राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉ. तरुणकुमार व इतरांनी सुशांतला बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन दिल्याचा आणि त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. ही तक्रार सुशांत व त्याच्या बहिणीत 8 जूनच्या व्हॉट्सअॅप चॅटबाबत आहे. याच दिवशी रिया सुशांतचे घर सोडून गेली होती.

  • रियाने काय आरोप केले?

सोमवारी एनसीबी कार्यालय सोडल्यानंतर रियाने वांद्रे पोलिस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरुन सुशांतची बहीण व डॉक्टर तरुण कुमार यांच्यावर भारतीय दंड संहितेतील 420,464, 465, 466, 468, 474, 306 आणि 120 बी कलमानुसार एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रियाचा आरोप आहे की, प्रियांका सिंहने सुशांत सिंहसाठी औषधांची स्लिप बनवली होती. ती चुकीची आहे, बनावट स्लिप आहे. डॉक्टरांनी सुशांतची तपासणी न करता फक्त प्रियांकाच्या सांगण्यावरुन नैराश्याची औषधे लिहिली होती. ही फसवणूक आहे आणि एनडीपीएस अॅक्ट, टेली मेडिसिन प्रॅक्टिस गाइडलाइन्सचे उल्लंघन आहे.

दुसरीकडे, ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एनसीबीच्या चौकशीसाठी रिया सलग तिस-या दिवशी एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली आहे. यापूर्वी सोमवारी रियाची आठ तास चौकशी केली. एनसीबीने या प्रकरणात नऊ जणांना अटक केली आहे.

दरम्यान, कोरोनाचा धोका व कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता रिमांडसाठी कोणत्याही आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच सादर करावे, असे आदेश कोर्टाने दिले आहेत..

  • सुशांतच्या कौटुंबिक वकिलांनी यावर प्रतिक्रिया दिली

रियाच्या तक्रारीवर सुशांतच्या कुटूंबाचे वकिल विकास सिंह म्हणाले की, “मुंबई पोलिसांना या प्रकरणाशी कुठले तरी कारण काढून जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. जेणेकरुन हे प्रकरण ते त्यांच्या पद्धतीने हाताळतील आणि सुशांतच्या कुटूंबाचा न्याय मिळणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, कारण हा अवमान करण्याचा विषय आहे. मुंबई पोलिसांना तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही.”

  • पोलिसांनी सांगितले- प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले

मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, रियाच्या तक्रारीवरून दाखल केलेली तक्रार सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डोळ्यासमोर ठेवून सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.

  • सुशांतची बहीण श्वेता म्हणाली- एफआयआर चुकीची आहे

श्वेता सिंग किर्तीने ट्विटरवर लिहिले की, “खोट्या एफआयआरने आमचे धैर्य खचणार नाही.”

रुपाली पाटील यांना अटक ,आणि जामिनावर सुटका

सौरव राव तेव्हा त्यांना भेटले खरे ,पण नंतर गुन्हाही दाखल केला बरे …

पुणे : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या दारातील ‘बाऊन्सर’ हटवण्याचा पवित्रा घेऊन ‘जम्बो घुसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रुपाली पाटील यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांची 14 दिवसांची डिटेक्शन मागणी फेटाळून न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली . रुपाली पाटील यांनी उच्चपदावर आणि अमराठी असलेल्या आय ए एस अधिकाऱ्याला बैठकीतून उठायला भाग पाडून रुग्णांची आणि त्यांच्या नातलगांची हेळसांड होत असल्याने बाउन्सर धुद्काउन गेटवर चढून जम्बो सेंटर मध्ये प्रवेश केला होता .त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदविण्यात आला .

रुपाली पाटलांच्या अटकेच्या निषेधार्थ मनसेच्या महिला आघाडीने पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी उभारलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरची गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्यावतीने आंदोलने करण्यात आली. त्यात ‘जम्बो’च्या दारात नेमलेले ‘बाऊन्सर’ रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी हुजत घालत आहेत.त्यावरून वादाच्या घडत असल्याकडे लक्ष वेधत रुपाली आणि मनसेच्या काही कार्यकत्यांनी गेल्या आठवड्यात शिवाजीनगर येथील ‘सीओईपी’च्या आवारात आंदोलन केले. तेव्हा आता विभागीय आयुक्त सौरभ राव आणि काही अधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. राव यांना भेटण्याचा आग्रह करीत पार्टील यांनी जम्बोच्या मुख्यप्रवेशद्वारावर चढून आत प्रवेश केला. तेव्हा, तेथील सुरक्षा व्यवस्था आणि पाटील यांच्यात किरकोळ वादही झाला होता. मात्र, आरोग्य सुविधा असलेल्या ठिकाणी अशा प्रकारे ‘बाऊन्सर’ का नेमता असा प्रश्न करीत पाटील या थेट राव यांच्याकडे गेल्या आणि त्यांच्याशी चर्चा केली.रुपाली पाटील यांच्या मागणीची दखल घेत, राव यांनी सुरक्षा व्यवस्थेला सूचना केल्या होत्या. त्यानंतरही दारातील बाऊन्सर’ हटविण्यावरून रुपाली आणि त्यांचे कार्यकर्ते ठाम राहिले होते. त्यानंतर राव यांच्या सूचनेवरूनच जम्बो व्यवस्थापनाकडून रुपाली यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुषंगाने पाटील यांना मंगळवारी दुपारी अटक झाली. त्यानंतर त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले.

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ड्रग्ज चौकशीच्या वक्तव्यावर कंगना ने ही दिली प्रतिक्रिया

0

मुंबई -महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, कंगनाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी केली जाईल. अध्ययन सुमन (शेखर सुमनचा मुलगा) च्या मुलाखतीचा आधारे ही कारवाई केली जाणार आहे. अध्ययनने कंगनावर अनेक आरोप केले आहेत. यावर कंगनानेही तिची प्रतिक्रिया दिली आहे. जर माझ्याशी संबंधित ड्रग्ज कनेक्शनचा पुरावा मिळाला तर मुंबई कायमची सोडेल, असे कंगना म्हणाली आहे.

कंगनाने प्रतिक्रिया देताना म्हटले, “मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या या उपकारांमुळे मी खूप खूष आहे. कृपया माझी चाचणी घ्या. माझे कॉल रेकॉर्ड तपासा. जर आपल्याला ड्रग पेडलरकडून काही दुवा मिळाला तर मी माझी चूक स्वीकारेल आणि कायमची मुंबई सोडून जाईल. तुम्हाला भेटण्याची वाट बघतेय.”

  • अध्ययनचा आरोप – कंगना मला मारहाण करायची

अध्ययनने डीएनए वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, “एका पार्टीत कंगनाने मला जोरदार चापट मारली होती, तेव्हा मला रडू कोसळले होते. नंतर तिने मला कारमध्ये मारहाण केली. मी ती रात्र कधीही विसरू शकत नाही. मी तिला घरी सोडल्यावर तिने मला सँडल फेकून मारली होती. माझा फोन भिंतीवर जोरात आपटून तोडला. कंगनाने मला घरी बोलावले आणि स्वतःच्या चांगल्या करिअरसाठी पूजा केली आणि रात्री 12 वाजता स्मशानभूमीवर काही वस्तू मला फेकायला लावल्या”, असा खुलासा अध्ययने या मुलाखतीत केला होता.

  • कंगनाविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल होऊ शकतो

मंगळवारी शिवसेनेच्या आयटी सेलने ठाणे जिल्ह्यातील श्रीनगर पोलिस ठाण्यात कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे म्हटले आहे.

  • बीएमसीचे म्हणणे आहे की कंगनाच्या कार्यालयातील ही 10 बांधकामे अनधिकृत आहेत

1. ग्राऊंड फ्लोअरवर टॉयलेटला ऑफिस केबिन बनवले.

2. स्टोअर रूममध्ये किचन बनवले गेले.

3. स्टोअरमध्ये पाय-यांजवळ आणि पार्किंग एरियात नवीन शौचालये बांधली जात आहेत.

4. तळ मजल्यावरील पॅन्ट्री तयार केली जात आहे.

5. पहिल्या मजल्यावरील लिव्हिंग रूममध्ये लाकडी विभाजन करुन खोली / केबिन तयार केले जात आहे.

6. पहिल्या मजल्यावर पूजेच्या कक्षात पार्टिशन करुन मीटिंग रुम / केबिन बनवले गेले.

7. पहिल्या मजल्यावरील मोकळ्या जागेत टॉयलेट बांधले गेले.

8. दुसर्‍या मजल्यावरील पायर्‍याची जागा बदलली गेली.

9. पहिल्या मजल्यावरील आडव्या पद्धतीने 2.बाय 6. चा स्लॅब वाढवला गेला.

10. दुसर्‍या मजल्यावरील भिंत काढून बाल्कनी बनवली गेली.

  • कंगनाला 14 दिवस क्वारंटाइन केले जाईल

कंगना रनोट ही येत्या 9 सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या Y+ सिक्युरिटीत ती मुंबईत दाखल होणार आहे. कंगना मुंबईत आल्यानंतर तिला नियमानुसार होम क्वारंटाईन केले जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. “येत्या बुधवारी (9 सप्टेंबर) कंगना रनोट ही हिमाचल प्रदेशातून मुंबईत येणार आहे. त्यामुळे परराज्यातून आलेल्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाइन केले जाते. त्यामुळे नियमानुसार कंगनाच्या हातावरही विमानतळावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जाणार आहे”, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

  • हरामखोर म्हटल्यावर संजय राऊत यांनी दिले होते स्पष्टीकरण

शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला हरामखोर असे म्हणत हिणवले होते. त्यावरुन गदारोळ उठल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना या शब्दाच्या वापराबाबत राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. अभिनेत्री कंगना रनोट म्हणजे नॉटी गर्ल आहे असे वक्तव्य राऊत यांनी सोमवारी केले. कंगनाला ‘नॉटी गर्ल’ आणि ‘बेईमान’ म्हणायचे होते असे ते म्हणाले.

  • बीएमसीने कंगनाच्या ऑफिसमध्ये बेकायदा बांधकामांची नोटीस चिकटवली

दुसरीकडे, बीएमसीने आज कंगनाच्या मुंबईस्थित ऑफिसमध्ये बेकायदा बांधकामांची नोटीस चिकटवली असून तिच्याकडे 24 तासांत उत्तर मागितले आहे. याबद्दल स्वत: कंगनाने ट्विटद्वारे माहिती दिली. तिने लिहिले, ”सोशल मीडियावरील माझ्या मित्रांनी बीएमसी विरोधात संताप व्यक्त केला होता म्हणून त्यांनी आज बुलडोझर आणला नाही. परंतु, ऑफिसमध्ये नोटीस चिकटवली आहे. मित्रांनो येणारे दिवस माझ्यासाठी खूप धोकादायक असू शकतात, परंतु आपले प्रेम आणि समर्थन मिळत आहे.”

‘जम्बो’चा गाडा आत्ताशी रुळावर ! महापौरांचा दावा

0

  • कोरोनाबाधितांशी संवाद साधल्याचाहि दावा
  • म्हटले उपचार, सोई-सुविधा आणि वस्तुस्थितीचा घेतला आढावा
  • सरकारी आणि खासगी बेड्सचे प्रभावी केंद्रीकरणाच्याही सूचना दिल्या .

पुणे –

जम्बो रुग्णालयाबद्दल असलेल्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर आपण थेट जम्बोतील उपचार घेणारे रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत वस्तुस्थितीचा आढावा घेतला. गेल्या काही दिवसांत जम्बोच्या परिस्थितीत सुधारणा होत असून येत्या दोन दिवसांत आणखी बेड्स रुग्णसेवेत उपलब्ध होणार आहेत. शिवाय भेटीदरम्यान अधिकाऱ्यांशी चर्चा करत विविध सूचनाही दिल्या आहेत. असा दावा एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे .

या पत्रकात त्यांनी असेही म्हटले आहे कि , जम्बो रुग्णालयाबद्दल गेल्या काही दिवसांत मोठ्या तक्रारी येत होत्या. रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाही, उपचारांमध्ये दिरंगाई होते आणि सुविधा मिळत नाहीत, असे तक्रारींचे स्वरूप होते. म्हणूनच जम्बो हॉस्पिटलची परिस्थिती नेमकी काय आहे? इथली यंत्रणा कशी आहे? याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आणि रुग्ण, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी आपण थेट जम्बो रुग्णालयात आढावा घेऊन विविध सूचना केल्या. आधीच्या एजन्सीचे काम काढून घेतल्यानंतर परिस्थिती बदलत असून समाधानाची स्थिती आहे. संबंधित एजन्सीवर कारवाईदेखील केली जाणार असून नव्या एजन्सीची नेमणूक केली आहे.

शहरात उपलब्ध असलेल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपलब्ध ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्सची माहिती आणि उपलब्धता समजण्यासाठी प्रभावीपणे केंद्रीकरण करुन त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. शिवाय खासगी लॅब्सच्या बाबतीत दैनंदिन माहिती तातडीने वॉर्ड ऑफीसमध्ये नोंदवून रुग्णांशी संपर्क साधण्याची यंत्रणा राबवण्यची सूचना दिली गेली आहे.

याबाबत माहिती देताना मोहोळ यांनी पुढे असेही म्हटले आहे कि , ‘ जम्बोत आताच्या घडीला १७८ रुग्ण उपचार घेत असून यापैकी काही रुग्णांना भेटून त्यांच्याशी सोई-सुविधा आणि उपचारांबद्दल चर्चा केली. यावरून रुग्णांमध्ये समाधान असल्याची परिस्थिती निर्माण होत आहे. याआधी रुग्णांच्या नातेवाईकांना भेटू दिलं जात नव्हतं, त्यावर आपल्या सुचनेनुसार दिवसातून तीन वेळा नातेवाईकांना संपर्क साधता येण्याची सुविधा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपलब्ध केली असून नातेवाईकांना सद्यस्थितीची माहिती दिली जाते. उपलब्ध औषधे आणि एम्ब्युलन्स याचाही माहिती घेतली आहे. शिवाय रुग्णांना दिलं जाणाऱ्या जेवणाचीही स्थिती स्वतः समजून घेतली. एकूणच परिस्थिती स्थिरावत असल्याचे चित्र आहे’.

‘येत्या दोन दिवसांत आणखी १०० ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होणार असून आयसीयू बेड्सची संख्या ६० पर्यंत नेण्यात येत आहे. टप्प्या-टप्प्याने पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुरु होत आहे. रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर बैठक घेऊन विभागीय आयुक्त सौरव राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असेही महापौरांनी सांगितले.

कोरोनामुळे शहरात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पक्षनेत्यांची तातडीने बैठक घ्यावी -आबा बागुल

0

पुणे-

गेल्या ४ महिन्यांपासून पुणे शहरामध्ये  कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहराच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय सादक बादक चर्चाकरून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपण फक्त महापौरांशी चर्चा करून वेगवेगळे  निर्णय घेता त्यास आम्ही सर्व पक्ष समर्थन देत आलेलो आहोत. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तो वाढत असताना कोणत्याही पक्षाची अधिकृत बैठक घेऊन आपण अजून चर्चा केलेली नाही. ऑनरेकॉर्ड चर्चा न केल्याने उद्या शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्याची सर्व जबाबदारी आपली व खात्याची राहील. यासाठी आपण तातडीने पक्षनेत्यांची दर चार दिवसांनी अधिकृत बैठक घ्यावी अशी मागणी आयुक्तांना दिलेल्या पत्रात काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी केली. 
ते म्हणाले पुणे शहराच्या हितासाठी कामकाजाच्या वेळेप्रमाणे सर्व पक्षनेते  आपला वेळ देण्यास तयार असून त्यांची अधिकृत बैठक घेऊन त्याचे मिनिट्स ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अशी बैठक होत नसल्याने  विरोधी पक्षांकडे  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही ठोस मुद्दे व  काही सूचना असतात. ते मुद्दे व सूचनांची  आयुक्तांशी अनधिकृतपणे चर्चा  होते .परंतु  अनधिकृतपणे केलेल्या चर्चेला काहीही महत्व नसते . अधिकृतरीत्या त्याचा अजेंडा काढून त्याचे अधिकृत मिनिट्स नोंद करून निर्णय घेणे हे सभा कामकाज नियमावली व महाराष्ट्र म्युनसिपल ऍक्ट नुसार बंधनकारक आहे. नगरसचिवांनी कार्यपत्रिका जाहीर  करून हे विषय अजेंड्यावर घेऊन त्याच्यावर चर्चा होणे गरजेचे असते. महानगरपालिका आयुक्त नवीन असल्याने त्यांना  कामकाजाची माहिती होण्यासाठी आम्ही वाट पाहत होतो. परंतु  तत्कालीन आयुक्तांप्रमाणे ते देखील अशी मिटिंग घेत नाही हे योग्य नाही. पुणे शहराच्या हितासाठी आयुक्तांकडून चांगले निर्णय अपेक्षित असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पक्षनेत्यांच्या बैठकीत त्यावर चर्चा होऊन निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. 
शासन स्तरावर शासनाच्या बैठकी होतात त्या महानगरपालिकेच्या रेकॉर्डवर नसतात. शासनाने घेतलेल्या बैठकांचे मिनिट्स त्यांच्या रेकॉर्डला असतात. शासनाच्या बैठका ह्या विभागीय आयुक्त व जिल्हाधीकाऱ्यांच्या अखत्यारीत असतात. त्याचा महानगरपालिकेच्या अजेंड्याशी काहीही संबंध नसतो. पक्ष नेत्यांच्या बैठकी आपल्या समक्ष  सर्व अधिकाऱ्यांसह होणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनाच्या  प्रादुर्भावामुळे  मुख्यसभा होत नसल्याने अन्य सभासदांना कशाचाही थांगपत्ता लागत नाही.त्यामुळे पक्ष नेत्यांची कोरोना बाबतीत बैठक घेणे अत्यंत गरजेचे आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनप्रमाणे  पुणे शहरात ४३३५ डॉक्टर आहेत.एवढे डॉक्टर असूनही आपला समन्वय बरोबर नसल्यामुळे सर्व डॉक्टर दिवसेंदिवस काम करताना दिसत नाहीत. शहरात कोरोना रुग्णांसाठी ५००० बेडची क्षमता आहे. व ४३३५ डॉक्टर असताना शहरात कोरोनामुळे एकही नागरिकाचा बळी गेला नव्हता पाहिजे. परंतु शहरात एवढे डॉक्टर असताना चुकीच्या व्यवस्थापनामुळे नागरिकांचे कोरोनाने मृत्यू होत आहे ही गंभीर बाब आहे. याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन होण्यासाठी देखील पक्षनेत्यांच्या बैठकी होणे गरजेचे आहे. असे आबा बागुल शेवटी म्हणाले. 

कोरोना वरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर देवेंद्र फडणवीसांचे जोरदार प्रहार (व्हिडिओ)

0

आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली उत्तरे

पुण्यातील खाजगी हॉस्पिटल ने लावलेली 1 कोटी ची रक्कम कमी केल्याचा आरोग्यमंत्री यांची माहिती

सुशांत सिंग आत्महत्या, कंगना राणावत संदर्भात सुरुवातीला गोंधळ

मुंबई- राज्यात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, राज्यातील परिस्थितीवरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान सरकारवर निशाणा साधला. “महाराष्ट्रात मुंबई पुणे महत्त्वाचं आहे. नाशिक औरंगाबाद, नागपूरही महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई पाहायचं, उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पाहायचं मग बाकी जिल्ह्यांना कोण वाली आहे?,” असा सवाल फडणवीस यांनी केला.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/237896010932407/

“मुख्यमंत्र्यांनी मुंबई पाहायचं, उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पाहायचं मग बाकी जिल्ह्यांना कोण वाली आहे? इतर ठिकाणं याच राज्यात आहेत. यांचा कोण वाली आहे? कोणता नवा पैसा सरकारनं या ठिकाणी दिला? त्या  ठिकाणी राहणारे लोकदेखील आपलेच आहेत ना. त्यांच्याकडेही लक्ष द्यावं. तिथे जाणं शक्य नसेल तर इथून आढावा घ्यावा. मुंबई पुण्याइतकंच मर्यादित तुमचं राज्य आहे का?,” असा सवालही फडणवीसांनी यावेळी केला. “करोनाच्या लढाईत ऑकसीजन बेडची कमतरता आहे. मेडिकल ओक्सीजन आता कोणीही तयार करू शकतं. पण काळाबाजार थांबवायला हवा. ऑक्सिजन अभावी लोकांचा मृत्यू होतोय. कोविडच्या लढाईतलं गांभीर्य सरकारला नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही मदतीला तयार आहोत. ही फक्त सत्तारुढ पक्षाची लढाई नाही. पण निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. परंतु त्याचं गांभीर्य दिसत नाही. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतलं नाही तर येत्या काळात रोज २ हजार लोकांना जरी रुग्णालयात न्यावं लागलं तरी तेवढी व्यवस्था उरणार नाही. आरटीपीसीआरच्या टेस्ट, आयसोलेशनच्या व्यवस्था राज्यात वाढवल्या पाहिजेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

१० लाखांचं बिल देऊ शकणाऱ्या करोना रुग्णाला कुठेही बेड मिळतो.जो गरीब आहे त्याला मात्र मरायला सोडून दिलं जातं आहे. असा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला. राज्य सरकार करोनाबाबत गंभीर नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. खासगी रुग्णालयांमध्ये भरमसाठ बिलं आकारली जात आहेत. ठाकरे सरकारचे निर्णय कागदावर आहेत त्याची अमलबजावणी होत नाहीत. गरीब रुग्णांनी काय करायचं असा संतप्त सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये करोना रुग्णांची मृत्यूसंख्या वाढली आहे. या सगळ्या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. करोनाच्या काळात आम्हाला टीका करण्याची हौस नाही मात्र सरकार काय करतं आहे ते दिसतच नाही त्यामुळे बोलावं लागतं आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

कल्याणच्या सभेत एकदा बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पोलिसांचा अपमान केल्याची आठवण विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस यांनी करून दिली. हे पोलिस भांडी घासायच्या लायकीचे आहेत, अशा शब्दांत ठाकरे यांनी पोलिसांचा अवमान केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इज्जत आहे आणि पंतप्रधान आणि राज्यपालांना इज्जत नाही का, त्यांची इज्जत म्हणजे चिंध्या आहेत का, असा सवाल त्यांनी केला.

विधानसभेत बोलताना फडणवीस यांनी जोरदार प्रहार केले. कोरोनाकाळात सरकार कसे कुचकामी ठरले, यावर त्यांनी सडेतोड भाषण केले. ते म्हणाले की कंगना रानावतने मुंबई पोलिसांचा अपमान केला हे मान्य आहे.

आम्ही त्याचा निषेध केला. मात्र जेव्हा आपलेच नेते पोलिसांचा अपमान करत होते तेव्हा त्यांनी कोणी सवाल विचारला का? कल्याणच्या सभेत ठाकरे यांनी बोलताना हे पोलिस भांडी घासायच्या लायकीचे असल्याचे कसे काय बोलले? मात्र मनाला येईल त्याप्रमाणे बोलण्याचे स्वातंत्र्य आपल्यालाच आहे, असे कसे, असा सवाल त्यांन केला.

एखाद्या माध्यमाने विरोधात बातमी दिली तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे या सरकारचे धोरण आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून राज्यपाल आणि पंतप्रधान यांच्याबद्दल जी भाषा वापरली जाते ती किती खालच्या पातळीवरची आहे, याचा कधी छगन भुजबळ तुम्ही विचार करणार की नाही, असे विचारत मुख्यमंत्र्यांनाच इज्जत आहे का आणि बाकिच्यांची इज्जत म्हणजे चिंध्या का, असे त्यांनी विचारले.

गृह खात्याबद्दल फडणवीस यांनी जोरदार बॅटिंग केली. कोविड सेंटरमध्ये अनेक महिलांवर अत्याचार झाले. त्यावर गृहमंत्री काय बोलणार? महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी दिशा कायदा हे सरकार आणणारे होते. त्याचे काय झाले? दिशा कायद्याची कॅबिनेटमध्ये दिशा कशी बदलली हे मला माहीत आहे. अजितदादा तुम्ही मास्क घालून हसता. पण ते आम्हाला कळतंय, असा टोला त्यांनी मारला. दूधदर वाढविण्याबाबत आम्ही आंदोलन केले. शेतकरी संघटनेचने राजू शेट्टी यांनी आंदोलन केले. आमचे जाऊद्या किमान त्यांच्या आंदोलनाची दखल घ्या. ते तुमच्या सोबत आहेत की नाही, हे मला माहीत नाही, असाही चिमटा त्यांनी काढला.

कोरोनाच्या परिस्थितीत मुंबई आणि पुण्याकडे लक्ष दिलं जाते. मात्र नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर ही महाराष्ट्रात आहे.
मुख्यमंत्री हे मुंबई पाहतात आणि उपमुख्यमंत्री हे पुणेम मग इतर शहरांकडे कोण पाहणार आढावा का घेतला जात नाही? पैसे का दिले जात नाही? तुमचं राज्य हे फक्त मुंबई आणि पुणे मर्यादित आहे का, अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.

विधिमंडळात अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव (व्हिडीओ)

0

मुंबई-रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/663310204319632/?__tn__=%2CdkC-R&eid=ARBuL8e_tecjEWgn_y8WN7W9-mxrbdXsq6uWkjig8UDyLrPhs-AB6xHgfReFSNqQiFMkU6BkKEXaNape&hc_ref=ARTygi-QwbgfgyrO3bT-ZWGoHFidaHy0iLRDWh_udNoUFV2ltbKVXPc9S034KryDDgM

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला आहे. तसंच हेतुपुरस्सर आणि आक्षेपार्ह असून अर्णब गोस्वामींवर विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडण्यात आला. प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव मांडला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली.प्रताप सरनाईक यांच्या या प्रस्तावानंतर विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला. या प्रस्तावानंतर भाजपानं गदारोल घातला. दरम्यान, राज्य सरकार आणि जनतेचा अवमान असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/3611869895491848/?__tn__=%2CdkC-R&eid=ARBuL8e_tecjEWgn_y8WN7W9-mxrbdXsq6uWkjig8UDyLrPhs-AB6xHgfReFSNqQiFMkU6BkKEXaNape&hc_ref=ARTygi-QwbgfgyrO3bT-ZWGoHFidaHy0iLRDWh_udNoUFV2ltbKVXPc9S034KryDDgM