Home Blog Page 2458

पुणे महानगरपालिकेचे सर्व टेस्टिंग सेंटर आठवड्यातील सातही दिवस चालू ठेवा-विशाल तांबे

0

पुणे- पुणे महानगरपालिकेच्या वतीने १९ आरटीपीसीआर आणि २१ रॅपिड टेस्ट सेंटर पंधरा क्षेत्रिय कार्यालयांच्या माध्यमातून चालवली जातात. दर सात किंवा पंधरा दिवसांनी झोन प्रमाणे आठवड्यातील एक दिवस ही टेस्टिंग सेंटर बंद ठेवली जातात निश्चितपणे तिथे काम करणार्‍या आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा कामाचा ताण बघता सुट्टी देणे ही गरजेचे आणि क्रमप्राप्त आहे. पण शहरातील वाढणारी कोरोना ग्रस्तांची संख्या बघता ही सेंटर या काळामध्ये आठवड्यातून एक दिवस बंद ठेवणे अडचणीचे आहे. म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचा देखील विचार करून आणि पुणे शहरातील नागरिकांना करोनाच्या वाढत्या संसर्गातून मुक्त करण्यासाठी टेस्टिंगची गरज पाहता ही टेस्टिंग सेंटर सातही दिवस चालू ठेवणे गरजेचे आहे,तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचा विचार करता त्या ठिकाणी दुसरी पर्यायी व्यवस्था देखील प्रशासनाने उपलब्ध करावी ही विनंती, इथून पुढच्या काळामध्ये या सर्व टेस्टिंग सेंटरमधील टेस्टिंग ची संख्यादेखील वाढवावी आणि आणि सातही दिवस पुणे महानगरपालिकेचे सर्व टेस्टिंग सेंटर सुरू ठेवण्यात यावीत, अशी मागणी नगरसेवक विशाल तांबे यांनी केली आहे

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 76 हजार 364

0

पुणे विभागातील 2 लाख 46 हजार 236 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले
विभागात कोरोना बाधित 3 लाख 31 हजार 139 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे,दि. 14 :- पुणे विभागातील 2 लाख 46 हजार 236 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 31 हजार 139 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 76 हजार 364 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 8 हजार 539 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.58 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.36 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 24 हजार 826 रुग्णांपैकी 1 लाख 78 हजार 393 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 41 हजार 401 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.35 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 23 हजार 949 रुग्णांपैकी 14 हजार 833 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 457 आहे. कोरोनाबाधित एकूण 659 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 24 हजार 839 रुग्णांपैकी 17 हजार 174 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 728 आहे. कोरोनाबाधित एकूण 937 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 23 हजार 192 रुग्णांपैकी 13 हजार 92 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 248 आहे. कोरोनाबाधित एकूण 852 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 34 हजार 333 रुग्णांपैकी 22 हजार 744 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 530 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 7 हजार 214 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 134, सातारा जिल्ह्यात 1 हजार 86, सोलापूर जिल्ह्यात 661 , सांगली जिल्ह्यात 886 तर कोल्हापूर जिल्ह्यात 447 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 14 लाख 73 हजार 239 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 31 हजार 139 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 13 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

फौजिया खान यांनी घेतली राज्यसभा सदस्याची शपथ

0

नवी दिल्ली, दि. १४  : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्या फौजिया खान यांनी आज राज्यसभा सदस्याची शपथ घेतली.

संसदेतील वरिष्ठ सभागृह राज्यसभेत आज नवनिर्वाचित सदस्यांचा शपथ विधी पार पडला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु यांनी श्रीमती खान यांना शपथ दिली. यापुर्वी २२ जुलै रोजी महाराष्ट्रातील सहा सदस्यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली होती. फौजिया खान यांनी महाराष्ट्रमध्ये विविध मंत्रीपदे भूषविली आहेत.

राज्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा; जिल्ह्यांनी आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदवावी

0

मुंबई, दि.14 : राज्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रत्येक जिल्ह्याने आपल्या आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदविल्यास त्यादृष्टीने नियोजन करुन ऑक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले. अन्न व औषध प्रशासन आयुक्तालय येथे ऑक्सीजन तयार करणारे उत्पादक, पुरवठादार आणि वाहतुकदार यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन सचिव विजय सौरभ, आयुक्त अरुण उन्हाळे, आरोग्य विभागाचे आयुक्त रामास्वामी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोविड-१९ च्या रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे ऑक्सीजन पुरवठा करतांना आवश्यक असणारी यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित राहावी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ.शिंगणे यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले, राज्यातील ११ टक्के रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता पडते आहे. याचं प्रमाण सुमारे 500 मेट्रिक टन एवढे आहे तर सध्या  एक हजार पेक्षा जास्त ऑक्सीजनचे उत्पादन होत आहे. तरीही काही ठिकाणी ऑक्सीजन मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सर्व पुरवठादार आणि वाहतुकदार यांनी आपले वितरणाचे जाळे वाढवून योग्य सहकार्य करुन गरजूंपर्यंत ऑक्सीजन पोहोचेल याची खबरदारी घ्यावी. या कामात काही अडचण असल्यास शासनातर्फे अडचण दूर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

ऑक्सीजन पुरवठ्यासह मास्कच्या किंमती, सॅनिटायझरची उपलब्धता, रेमडेसिविर आणि इतर औषधे तसेच खासगी डॉक्टरांकडे उपलब्ध असलेला ऑक्सीजनचा साठा याचाही डॉ.शिंगणे यांनी सविस्तर आढावा घेतला.

विशेष नियंत्रण कक्ष

कोविड-१९ चा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांसाठी अन्न व औषध पुरवठा विभागाने विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. राज्यात कोणत्याही जिल्ह्यात ऑक्सीजनची आवश्यकता असल्यास त्या जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकीत्सक हे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत आपली मागणी नोंदवितात. जवळच्या पुरवठादाराकडून ऑक्सीजन तातडीने त्या जिल्ह्याला  उपलब्ध करुन दिले जाते. या कंट्रोल रुम मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागासह आरोग्य विभाग आणि उद्योग विभागाचे संबधित अधिकारी समन्वय साधत असतात. यासाठी टोल फ्री क्रमांक १८ ०० २२२ ३६५ तसेच ०२२-२६५९२३६४ हा दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सर्वांच्या सहभागातून प्रभाविपणे राबविण्यात यावी

0

मुंबई, : राज्य शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेतली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, हाऊसिंग सोसायट्या आदी सर्वांच्या सहभागातून ही मोहीम यशस्वी करुन कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यात यावी, असे आवाहन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येत आहे. उपनगर जिल्ह्यात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री.ठाकरे यांनी आज वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांच्यासह उपनगर जिल्ह्यातील बृहन्मुंबई महापालिकेचे उपायुक्त, सर्व १५ वॉर्डांचे सहायक आयुक्त यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या अनुषंगाने उपनगर जिल्ह्यात महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले.
कोरोनाला रोखण्यासाठी ‘सेल्फ डिफेन्स’ आवश्यक
पालकमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, कोरोनावर मात करण्यासाठी लोकांनी स्वत:हून स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. या मोहिमेचा हा मुख्य उद्देश आहे. कोरोनाला रोकण्यासाठी ‘सेल्फ डिफेन्स’वर (स्वयंसुरक्षा) भर देणे गरजेचे आहे. तसेच हाऊसिंग सोसायट्या, चाळी, झोपडपट्ट्या आदी सर्व ठिकाणी लोकांनी मास्कचा योग्य पद्धतीने वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर अंमलबजावणी, स्वच्छता आदींबाबत स्वयंसेवकांच्या सहाय्याने जनजागृती करावी. महापालिकेनेही वॉर रुम आणि इतर संपर्क यंत्रणांच्या आधारे आजारी व्यक्ती, संशयित व्यक्ती यांच्या संपर्कात राहून त्यांना योग्य माहिती द्यावी. नवरात्रीचा सणही लवकरच येत असून त्याअनुषंगाने सोशल डिस्टन्सिंग आणि इतर दक्षतांबाबत जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
मोहिमेसाठी महापालिकेमार्फत नियोजन
यावेळी उपनगरातील सर्व १५ वॉर्डमधील सहायक आयुक्त यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्यांच्या क्षेत्रात करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाचे स्वयंसेवक हे त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांची प्राणवायू पातळी आणि शारीरिक तापमान तपासणार आहेत. नागरिकांना आरोग्य शिक्षणासह महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे, कोरोनाचे संशयित रुग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे याचाही यात समावेश आहे. मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. मोहीम कालावधीत साधारणपणे दोन वेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेट देणार आहेत.

लहान बालकांमधील दिव्यांगत्व कमी करण्यासाठी विशेष शाळेत ‘शीघ्र निदान, शीघ्र उपचार’ उपक्रम – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

0

मुंबई, दि. 14 : शून्य ते सहा वयोगटातील बालकांमधील दिव्यांगत्व वेळीच ओळखून त्यावर योग्य उपचार केल्यास त्या बालकास कायमचे दिव्यांग होण्यापासून रोखणे शक्य आहे. यासाठी राज्यातील दिव्यांगांच्या सर्व विशेष शाळांमध्ये ‘शीघ्र निदान, शीघ्र उपचार’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य तसेच अली यावर जंग राष्ट्रीय मूक बधिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यातील सर्व विशेष शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना ‘शीघ्र निदान व शीघ्र उपचार’ या उपक्रमाचे ५ दिवसीय प्रशिक्षण वेबिनारद्वारे देण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले.

श्री.मुंडे म्हणाले, राज्यातील बालकांमधील दिव्यांगत्वाचे प्रमाण व निश्चित संख्या जाणून घेण्यासाठी त्याचे सर्वेक्षण व ऑडिट करणे गरजेचे आहे. सामाजिक न्याय विभागाचे उद्दिष्ट दिव्यांगांना केवळ सेवा शुश्रूषा आणि सहानुभूती देणे नसून त्यांना उपजीविकेसाठी सामान्य व्यक्तिप्रमाणे सक्षम करणे हे आहे.

लहान बालकांमधील जन्मापासून कमी अधिक प्रमाणात आलेल्या व्यंगत्वाला वेळीच निदान करून त्यावर योग्य उपचार केल्यास ते रोखणे किंवा त्याची तीव्रता व प्रमाण कमी करणे शक्य आहे असेही यावेळी श्री.मुंडे म्हणाले.

सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवनातील प्रत्येक संधी विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी राज्यातील सर्व दिव्यांग विशेष शाळांमध्ये उपचार केंद्र सुरू करत असून, यासाठी संबंधित शिक्षक, भौतिक उपचार तज्ञ आदींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आधुनिक उपचार पद्धती, यंत्रसामग्री यांचा वापर करून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन शिक्षकांनी संपूर्ण क्षमतेने त्यांचे योगदान दिल्याने लहान मुलांमधील अल्प व मध्यम स्वरूपाचे व्यंगत्व कमी करणे किंवा त्याची तीव्रता कमी करणे निश्चितच शक्य आहे, असेही यावेळी श्री. मुंडे यांनी नमूद केले.

पालकानंतर विद्यार्थ्यांच्या सर्वात जवळ शिक्षक असतात त्यामुळे त्यांनी चौकटीबाहेर पडत आपले योगदान द्यावे, दिव्यांग विद्यार्थ्यांना सामान्य मुलांप्रमाणे सामान्य शाळेत ज्या दिवशी शिक्षण घेता येईल त्यादिवशी खऱ्या अर्थाने या उपक्रमाचे उद्दिष्ट साध्य होईल. केवळ सुविधा देणे नाही, तर उपचार करून सुधारणा करणारा विभाग म्हणून सामाजिक न्याय विभागाची वेगळी ओळख निर्माण करण्याचा मानस असून यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र रुग्णलाय भविष्यात स्थापण्याचाही मानस असल्याचे श्री.मुंडे यांनी यावेळी सांगितले.

पाच दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करून श्री.मुंडे यांनी यामध्ये सहभागी सर्व अधिकारी, शिक्षक व अन्य सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या उपसचिव श्रीमती तारिका रॉय, राज्य सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, दिव्यांग कल्याण आयुक्त श्रीमती प्रेरणा देशभ्रतार यांनीही विचार व्यक्त केले.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या उपसचिव तारिका रॉय, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, अली यावर जंग संस्थेच्या संचालिका डॉ. सुनी मॅथ्यू यासह प्रमुख अधिकारी, राज्यभरातील विशेष शिक्षक व कर्मचारी वेबिनारद्वारे उपस्थित होते.

मराठा आरक्षण:न्यायालयातील स्थगिती उठविण्यासाठी विविध घटकांसह एकजूट व समन्वयाने प्रयत्न करणार

0

मुंबई, दि. १३ :- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी एकजुटीने आणि विरोधी पक्षासह, विविध संस्था, संघटना तसेच विधिज्ज्ञ अशा घटकांशी समन्वय साधून प्रयत्न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मराठा आरक्षण कायदा, राज्यातील विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश, भरती प्रक्रिया तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या आढाव्याबाबत आज मुख्यमंत्र्याचा वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते. तर गृहमंत्री अनिल देशमुख, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

बैठकीत महाधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) सुजाता सौनिक, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विधि व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा, व्हिजेएनटी विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे-निंबाळकर,वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल आदी उपस्थित होते.

बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्यास दिलेल्या अंतरिम स्थगितीमुळे राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासह भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने झालेल्या परिणामाबाबत विस्ताराने आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे आणि उमेदवारांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये यासाठी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

आरक्षण कायद्यावरील स्थगिती उठविण्यासाठीच्या प्रयत्नात विरोधी पक्षानेही सहकार्य करण्याचे आश्वस्त केले आहे. त्याअनुषंगाने विरोधी पक्ष नेते तसेच विधिज्ज्ञ, संस्था, संघटना अशा विविध घटकांशी चर्चा करून तसेच समन्वय साधून सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू ठामपणे मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘जम्बो’मध्ये करोना रुग्णांना असा मिळतो प्रवेश

0

पुणे : जम्बो कोविड रुग्णालयात प्रमाणित केंद्रीय पद्धतीने रुग्णांना प्रवेश देण्यात येत आहे. यासाठी पुणे महापालिकेची कोविड बेड हेल्पलाईन किंवा इतर कोविड रुग्णालयांच्या संदर्भानेच प्रामुख्याने प्रवेश देण्यात येत आहेत. तरी व्यापक हिताच्या दृष्टीने या प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी दिली.

पुणे महापालिकेच्या 020-25502110 या हेल्पलाईनला रुग्ण वा त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा. तेथून COEP जम्बो कोविड सेंटरशी समन्वय साधून केला जाईल. त्यामध्ये करोनाबाधित रुग्णांचे पाच प्रकारांमध्ये वर्गीकरण करून आवश्यकतेनुसार पुढील प्रक्रिया केली जाते.
1) तीव्र लक्षणे असलेले कोविड पॉझिटिव्ह, 2) गृह विलगीकरणातील मात्र ऑक्सिजनची गरज आहे असे, 3) कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड हॉस्पिटल यांच्याकडून संदर्भांकित रुग्ण या तीन परिस्थितीतील रुग्णांकरिता मनपाच्या हेल्पलाईनकडून COEP जम्बो सेंटरच्या साह्याने बेड निश्चित करण्यात येईल.

4) लक्षणे नसलेलेे किंवा सौम्य लक्षणे असलेल्या बाधित रुग्णांना गृह विलगिकरणात किंवा कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. आणि 5) रुग्णांना थेट प्रवेश दिला जाणार नाही. मात्र संशयित करोना रुग्णांना तीव्र लक्षणे असल्यास त्यांची अँटिजेन चाचणी केली जाईल.
किंवा या परिस्थितीत स्वॉबची RT-PCR चाचणी घेतल्यास रुग्णांना संशयित रुग्णांच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात येते. आणि चाचणीचे निष्कर्ष येईपर्यंत लक्षणांच्या अनुषंगाने उपचार केले जातात.

पॉझिटिव्ह आढळल्यास ट्राएज रुममध्ये डॉक्टर रुग्णांना स्थिर करून पुढील उपचारांची रुपरेषा ठरवतात. नोंदणी करून रुग्णांना संबंधित वॉर्डमध्ये प्रवेश देण्यात येतो.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन ज्यांना निरीक्षणाखाली ठेवून उपचार करणे आवश्यक आहे अशा रुग्णांना प्राधान्याने प्रवेश देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रवेश देण्यासाठी सर्वत्र स्वीकारली जाणारी ही केंद्रीय पद्धत अवलंबिण्यात येत आहे, अशी माहिती श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.

मराठी कलाकारांचा काँग्रेसला अभिमानच!- सचिन सावंत

0

मराठी कलाकार जागतिक दर्जाचे; कमाईत मोजायला शरम वाटली पाहिजे.

मुंबई,- मुंबई व महाराष्ट्राच्या अस्मितेला शिव्याशाप देणाऱ्या व महाराष्ट्रातील १३ करोड जनतेचा अपमान करणाऱ्या कंगणासारख्या कृतघ्न नटीचे समर्थन करतानाच भारतीय जनता पार्टीने आता आपल्या अकलेचे तारे तोडत मराठी कलाकारांचाही अपमान केला. मराठी कलाकारांची कमाई कंगणासारख्या नट्यांपेक्षा कमी असली तरी ते कंगणा व भाजपासारखे कृतघ्न, नतभ्रष्ट नाहीत. त्यांची मराठी माती व संस्कृतीशी नाळ घट्ट जोडलेली आहे. आम्हाला या मराठी कलाकारांचा अभिमान असून त्यांचा अपमान करणाऱ्या भाजपाचा धिक्कार आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांचा समाचार घेताना सचिन सावंत म्हणाले की, मराठी कलाकार डोंबिवलीमध्ये राहत असले तरी त्यांच्या कलेचा दर्जा  कमी नाही हे अवधूत वाघसारख्यांना माहित नाही. कंगणासारख्या वाचाळ, मराठी व महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोहचवणाऱ्या, मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या, मुंबई महापालिकेला बाबरसेना म्हणणाऱ्या नटीचे समर्थन करत भाजपाचे हे तीचे बोलविते धनी आहेत हे स्पष्ट आहे. यातूनच कंगणासारख्या पूर्वीच्या ड्रग अॅडिक्ट नटीची तुलना झाशीच्या राणीशी करणाऱ्यांची बौद्धीक पात्रता महाराष्ट्राने पाहिली आहे. आता मराठी कलाकारांबद्दल गरळ ओकून पुन्हा एकदा भाजपा हा महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे हे त्यांनीच दाखवून दिले आहे.
मराठी कलाकार, त्यांच्या अभिनयाचा दर्जा व चित्रपट सृष्टीतले त्यांचे योगदान काय आहे याचा अवधूत वाघ सारख्या सुमार बुद्धीच्या लोकांनी अभ्यास करावा आणि मग मराठी कलाकारांबद्दल बोलावे, असा मोफत सल्लाही सावंत यांनी दिला आहे. चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे मराठीच होते. व्ही. शांताराम, रमेश देव, सीमा देव, डॉ. श्रीराम लागू, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, अश्विनी भावे यांच्यासारख्या शेकडो मराठी निर्माते, कलाकार तसेच असंख्य कलाकार व चित्रपटसृष्टीशी संबंधीत मराठी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने ही चित्रपटसृष्टी उभी राहिली आहे आणि त्याच जीवावर कंगणासारखे उपरे आज जगत आहेत. मराठी कलाकारांनी त्यांच्या दर्जेदार अभिनयाने जग जिंकले आहे. त्यांची नाळ मराठी मातीशी, संस्कृतीशी जोडलेली आहे, अशा कलाकारांना पैशाच्या तराजूत तोलून अवधूत वाघ यांनी त्यांचा अपमान केला आहे.  
मुंबई, महाराष्ट्र व मराठी माणसाबद्दल भाजपाला नेहमीच आकस राहिला आहे. मागील पाच वर्षात महाराष्ट्राचे वैभव गुजरातला देऊन त्यांनी ते दाखवून दिलेच आहे. आता कंगणासारख्यांच्या दावणीला बांधून त्यांनी त्यांची पायरी स्वतःच दाखवून दिली आहे. मराठी कलाकारांचा आम्हाला अभिमान तर आहेच पण त्यांचा असा उपहास करणाऱ्या, कमाईवरून त्यांना हिणवणाऱ्या, कंगनाला झाशीची राणी आणि मराठी कलाकारांना रंक म्हणणाऱ्या भाजपा तीव्र शब्दात धिक्कार करत आहोत, असे सावंत यांनी म्हटले आहे.

कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला-संजय राऊत

0

मुंबई – अभिनेत्री कंगनाचा रानावतने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ‘कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही त्यावर बोलणेही बंद केले’, असे राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, ‘कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही त्यावर बोलणेही बंद केले, आता ज्याला जे करायचे ते करावे. पण आम्ही प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवू. जे कोणी मुंबई- महाराष्ट्रात येतात त्यातील कोणालाही आम्ही बाहेर जायला सांगितले नाही. फक्त मुंबई-महाराष्ट्राला आपले म्हणा. इतिहासाचे पाने नेहमी बदलत असतात, नवीन इतिहास लिहिला जातो, पण जुन्या इतिहासाची पाने फाडली जात नाहीत. त्यामुळे जे होत आहे आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत आणि पाहात आहोत की कुठला पक्ष महाराष्ट्र आणि देशाबद्दल काय विचार करतो. त्यांचे विचार किती वाईट आहेत आणि फक्त इतक्यासाठी कारण तुमची सत्ता गेली. त्यामुळे तुम्ही हा तमाशा करत आहात,’ असे राऊत म्हणाले.

‘राजकारणात हे पहिल्यांदा झालेलं नाही. सत्ता येते सत्ता जाते, सरकार बनतं सरकार जाते, पण राज्य आणि देशाची जनता नेहमी असते, त्यांच्यासाठी आम्हाला काम करायचे असते. ज्याप्रकारचे वातावरण महाराष्ट्रात काही लोकांनी तयार केले आहे, मला असे वाटते की ते समाजासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी चांगले नाही,’असे मत राऊत यांनी मांडले.

कंगना राजभवनात, राज्यपालांची घेतली भेट

0

मुंबई-बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ने राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. बीएमसीने कंगनाचे वांद्र्यातील कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी ही भेट होती असे समजते . दरम्यान या भेटीमध्ये नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली याविषयी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अभिनेत्री कंगना राणावत ने साडेतीन वाजताच्या सुमारास वांद्र्यातील घरातून निघाली. दुपारी चार वाजता ती राजभवनात पोहोचली. तिने राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली आहे. यावेळी तिची बहीण रंगोली तिच्यासोबत उपस्थित होती.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्या अभिनेत्री कंगना रानावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केली होती. यानंतर मोठ्या वादाला सुरुवात झाली होती. यानंतर कंगना विरुद्ध संजय राऊत असं शाब्दिक युद्धही झालं होतं. दरम्यान महापालिकेनं अनधिकृत बांधकाम केल्याच्या प्रकरणात कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. यानंतर कंगना जास्तच भडकली होती.

विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईबद्दल नागरिकांच्या तक्रारी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

0

पुणे – विनामास्क फिरणाऱ्यांवर, गाडी चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलीस चलन वसुलीची कारवाई करत आहेत त्या कारवाईबद्दल नागरिकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

वाहतूक पोलीस नागरिकांकडून पैसे घेऊन ई-चलन देण्याऐवजी त्याची पावती देतात. त्यातून गैरसमज निर्माण झाले आहेत. ही बाब सुद्धा पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून देणार आहे. तसेच मास्कव्यतिरिक्त बाकिच्या नियमांची भिती दाखवून मोठे चलन फाडले जाते अशाही नागरिकांच्या तक्रारी आहेत. या सगळ्या तक्रारींची दखल घेतली असून त्याबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे असल्याचे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन व्हावे याला माझी सहमती आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की, चौकाचौकात पोलीसांनी मोठ्या संख्येने उभे राहून फक्त दंडात्मक कारवाई म्हणून चलन वसुली करावी. हे मान्य होणारे नाही. पोलीसांनी जनजागृती करावी. विनामास्क असणाऱ्यांना समज द्यावी, चलनाची रक्कम कमी असावी असे आमदार शिरोळे यांनी सुचविले आहे.

सध्याच्या काळात नियमांचे पालन अधिक चांगल्या पद्धतीने कसे करता येईल याबाबत पोलीसांशी सहकार्य करणार असून आयुक्तांशीही त्याबाबत बोलणार असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.

महापालिका आयुक्तांनी केली आंबील ओढ्याची पाहणी

0

पुणे – परवा झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर अंबील ओढ्याची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या नागरसेविका अश्विनी कदम, मलनिस्सारण विभागाचे खानोरे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, धनकवडी-सहकारनगरचे सहायक आयुक्त निलेश देशमुख उपस्थित होते.

वर्षानुवर्षे माती येऊन अंबील ओढ्याची खोली कमी झाली आहे. एक दोनदा जोरदार पाऊस झाला की लगेच ओढ्याला पूर येतो. आजूबाजूला राहण्याऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होते, असे अश्विनी कदम यांनी सांगितले.

कात्रज तलावाचे पावसाळ्यात धरणाप्रमाणे पाणी सोडण्याचे नियोजन करावे, जेणे करून पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, प्राईम मुव्हने केलेल्या सर्वेनुसार अतिक्रमणमुक्त करून २२मीटर नाला रुंद करावा.

कात्रज ते म्हात्रे पुलापर्यंत अंबील ओढ्याची खोली आणि रुंदी पुढच्या 50 वर्षांचा विचार करून होणे गरजेचे आहे. नाला ऊगम स्थानापासून जसे जसे पुढे जाऊ तशी रुंदी-खोली वाढली पाहिजे. जेणेकरून भविष्यात ढगफुटीसारखी परिस्थिती झाली तरी पूरस्थिती होणार नाही.

अंबील ओढ्याच्या दोन्हीबाजूची अतिक्रमण काढणे आवश्यक आहे जेणे करून भविष्यात वित्तहानी आणि मनुष्यहानी होणार नाही, याची काळजी घ्यावी, सीमाभिंत तातडीने बांधून लगतच्या नागरिकांना सुरक्षा द्यावी, अंबील ओढ्या लगतच्या गावांनी घोषित वस्तीमधील बाधित होणाऱ्या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे, अशा अनेक उपाययोजना करण्याची मागणी अश्विनी कदम यांनी केली.

‘कुठे नेऊन ठेवलय पुणं आमचं’-मोहन जोशी यांचा भाजपला सवाल

0

पुणे : शहरामध्ये कोरोना साथीचा कहर झाला असून ते देशातील हॉटस्पॉट बनले आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि पक्षाच्या खासदार, आमदारांनी गेल्या सात महिन्यांपासून साथ आटोक्यात आणण्याकडे साफ दुर्लक्ष केले. भाजपच्या निष्क्रीयतेमुळे पुणेकर संकटात सापडले. आता ‘कुठे नेऊन ठेवले पुणे आमचे’ असा खोचक सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपला केला आहे.

शहराचे आरोग्य उत्तम राखणे हे कायद्यानुसार महापालिकेचे कर्तव्य आहे. परंतु त्यात महापालिकेने कुचराई केली आहे. महापालिकेत भाजपचे शंभर नगरसेवक आहेत. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेता ही पदे भाजपकडे आहेत. पण या पदाधिकाऱ्यांकडून स्टंटबाजी व्यतिरिक्त गांभीर्याने उपाययोजना झालेल्या नाहीत. राज्य सरकारने महापालिकेला दोन आरोग्य अधिकारी दिले. ऐन साथीच्या काळात ते रजेवर गेले. त्यांना रजेवर कसे जाऊ दिले? पालिकेवर कोणाचे नियंत्रण नाही का? राज्य सरकारने जंबो केअर सेंटर बांधले, ते चालविण्यासाठी पुणे महापालिकेकडे सोपविले. महापालिकेच्या स्थायी समितीने अकार्यक्षम ठरलेल्या संस्थेला टेंडर काढून काम दिले. त्यातून गोंधळ झालाच. त्या सेंटरमध्ये उपचारांअभावी पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. त्यासाठी भाजपलाच जबाबदार धरायला हवे. तसेच एका खाजगी कंपनीच्या सीएसआर फंडातून दळवी रुग्णालयाचे आधुनिकीकरण झाले. तिथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. पण, ते रुग्णालय आजमितीला वापरले जात नाही. ही भाजपचीच निष्क्रीयता आहे. डॉ. नायडू रुग्णालयात ऑक्सिजनची टाकी उभारायला हवी होती. ती साथीच्या काळात आवश्यक असूनही का उभारली गेली नाही? ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू होत असताना याकडे दुर्लक्ष का झाले? या निष्क्रीय कारभाराची किंमत पुणेकरांना मोजावी लागत आहे. असे जोशी यांनी पत्रकात खेदपूर्वक नमूद केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी पुण्यासाठी आठ कॉर्डीयक अॅम्ब्युलन्स दिल्या, पण पंतप्रधानांचे उजवे हात समजले जाणारे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर सात महिने उलटून गेल्यावर बैठका घेतात, त्यात ठोस घोषणा करीत नाहीत. खासदार गिरीश बापट, जावडेकर दोघे मिळून केंद्र सरकारकडून पुण्यासाठी जादा सुविधा मिळवू शकत नाहीत. अशावेळी या दोघांना पुणेकरांचे प्रतिनिधी असे का म्हणायचे? भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील आणि अन्य आमदार इतर गोष्टींचे राजकारण करत बसतात. पण, पुण्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत. ही बाब चीड आणणारी आहे असेही जोशी यांनी म्हटले आहे. प्रत्येक पुणेकर काळजीत आहे, अशा प्रसंगी जावडेकर यांनी ठाण मांडून प्रशासन हलवायला हवे होते, असेही जोशी म्हणाले.

पुण्यात शास्त्रज्ञ, संशोधक, उद्योजक, आयटी तज्ज्ञ आहेत, वैद्यकीय क्षेत्रातले नामवंत डॉक्टर्स, औषधी क्षेत्रातील सल्लागार आहेत. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा अशावेळी करून घेणे गरजेचे आहे. त्यातही भाजपचे महापौर, खासदार , आमदार कमी पडले आहेत. त्यांच्याशी संवाद ही साधलेला नाही. पुणेकरांनी भाजपला भरभरून दिले पण भाजपने बिकट प्रसंगात पुण्यासाठी काही केलेले नाही, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

साथीच्या काळात राजकारण करू नये याची जाणीव मलाही आहे. पण, पुण्यातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचे हाल आणि वेदना पाहून मी उद्वीग्न झालो आहे त्यामुळे मी ही भूमिका घेतली आहे असे मोहन जोशी म्हणाले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 75 हजार 903

0

पुणे विभागातील 2 लाख 40 हजार 678 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,
विभागात कोरोना बाधित 3 लाख 23 हजार 925 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे,दि.13 :- पुणे विभागातील 2 लाख 40 हजार 678 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 23 हजार 925 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 75 हजार 903 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 8 हजार 344 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.58 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.30 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 20 हजार 692 रुग्णांपैकी 1 लाख 74 हजार 627 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 41 हजार 117 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 948 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.13 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 22 हजार 863 रुग्णांपैकी 14 हजार 567 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 672 आहे. कोरोनाबाधित एकूण 624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 24 हजार 178 रुग्णांपैकी 16 हजार 997 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 258 आहे. कोरोनाबाधित एकूण 923 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 22 हजार 306 रुग्णांपैकी 12 हजार 376 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 109 आहे. कोरोनाबाधित एकूण 821 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 33 हजार 886 रुग्णांपैकी 22 हजार 111 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 747 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 8 हजार 65 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 717, सातारा जिल्ह्यात 716, सोलापूर जिल्ह्यात 740, सांगली जिल्ह्यात 936 तर कोल्हापूर जिल्ह्यात 956 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 14 लाख 47 हजार 350 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 23 हजार 925 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 12 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )