Home Blog Page 2457

ढासळती आरोग्य व्यवस्था आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष -भीम आर्मी बहुजन एकता मिशनच्यावतीने अंत्ययात्रा आंदोलन

0

पुणे- शहरातील ढासळती आरोग्य व्यवस्था आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने भीम आर्मी बहुजन एकता मिशनच्यावतीने ”  पुण्यातील आरोग्य यंत्रणेची अंतयात्रा आंदोलन ”  करण्यात आले . पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आले . हे आंदोलन भीम आर्मी बहुजन एकता मिशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ता पोळ यांच्या नेर्तृत्वाखाली करण्यात आले .

पुण्यातील आरोग्य व्यवस्था ढासळली असून कोरोना संसर्गावर नियंत्रण राखण्यास पुणे महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे . संपूर्ण देशभरात आपला सर्वांगीण विकास , आर्थिक प्रगती करीत पुणे नावारूपाला आले असताना आधुनिक आणि प्रगत असलेल्या पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणे हि बाब अत्यन्त लाजिरवाणी आणि शरमेची आहे .

रोजच्या रोज कोरोनाचा संसर्ग वाढत असून त्यावर नियंत्रण करणे प्रशासनाकडून शक्य होत नाही . रुग्णांना बेड नाही , ऑक्सिजन मिळत नाही , पर्याप्त औषधोपचार नाही , तज्ञ व कुशल डॉकटर्स , कर्मचारी वर्ग नाही , खाजगी हॉस्पिटलची लूट सुरु आहे , रुग्णांना जेवणाची व्यवस्था योग्य नाही , मृत्यूचे प्रमाण प्रचंड आहे , जम्बो हॉस्पिटलमध्ये भ्रष्ट्राचार झाला असून संपूर्ण व्यवस्था विस्कळीत झाली आहे . यामुळे सामान्य नागरिकांचा आरोग्य यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे . याविषयी आपण तात्काळ कार्यवाही करून आरोग्य यंत्रणेमध्ये सर्वोच्च सुधारणा कराव्यात व नागरिकांच्या रागाचा विस्फोट होण्याची शक्यता असून नागरिक रस्त्यावर येऊन आपला विरोध आणि निषेध व्यक्त करतील व प्रशासनास त्यांना नियंत्रण करणे शक्य होणार नाही , असे निवेदनात देण्यात आले .

या आंदोलनात  भीम आर्मी बहुजन एकता मिशनचे  पुणे जिल्हाध्यक्षा नीता आडसुळे , उपाध्यक्षा उषा राजगुरू , पुणे शहर कार्याध्यक्षा स्वाती गायकवाड , प्रदीप कांबळे , राहुल बनसोडे , मुकेश गायकवाड , भीमराव कांबळे , कन्हेय्या पाटोळे , जालिंदर वाघमारे , निरंजन कांबळे , मामा बनसोडे , नितेश निकम , बाळू गायकवाड , अमित गायकवाड , अश्रफ खान , आकाश गंडगुले आदी उपस्थित होते .

यावेळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले कि , आम्ही सक्षमपणे काम करू , यावर उपाय योजना म्हणून रोज ५० बेड वाढवीत आहोत . पुणे आसपास परिसरातून  रुग्ण येत असल्यामुळे पुण्यात पुणेकरांना बेड मिळणे अवघड होत आहे . यावरचआम्ही उपाय योजना करीत आहोत .

गरिबांसाठी मोफत अन्न योजनेसाठी देखरेख आणि जनजागृती अभियान

0

लोकजनशक्ती पार्टीची घोषणा

पुणे:

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मार्च मध्ये जाहीर केलेली ३ महिन्याच्या आणि जुलै मध्ये जाहीर पाच महिन्याच्या मोफत  धान्य  वाटपासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे का हे पाहण्यासाठी आणि गरीबांपर्यंत धान्य पोहोचत आहे की नाही याची देखरेख करण्यासाठी ‘जनजागृती आणि देखरेख अभियान ‘ सुरु करण्याची घोषणा लोकजनशक्ती पार्टी ने केली आहे . 
जनजागृती करून लाभार्थीना घरपोच धान्य अथवा जवळच्या सेंटर मधून धान्य वाटप करण्याची व्यवस्था करावी, उत्पन्नाची अट रद्द करावी ,अशी पार्टीने  मागणी लोकजनशक्ती पार्टीने आज पत्रकाद्वारे केली आहे.
पुणे  शहर जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट,पुणे शहर जिल्हा उपाध्यक्ष संजय चव्हाण   यांनी ही माहिती दिली .अल्हाट यांच्यासह संजय चव्हाण , प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे,प्रवक्ते के.सी.पवार,आदिनाथ भाकरे  यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.पार्टीचे अध्यक्ष राम विलास पासवान हे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री  असल्याने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी,यासाठी पार्टीचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत .मार्च मध्ये जाहीर केलेले धान्य पूर्ण पणे वितरीत झालेले नाही आणि जुलै पासून जाहीर झालेले धान्य कोटा उचलला गेलेला आहे ,मात्र ,त्याच्या वितरणाची पार्टीकडून माहिती घेतली जाणार आहे .

टाळेबंदीच्या काळात या योजनेअंतर्गत सुरुवातीस तीन महिने लाभधारकांना ही योजना योग्य पध्दतीने न समजल्याने व त्याची लॉकडाऊन काळात जनजागृती न झाल्याने धान्य वाटपात मोठया प्रमाणात अनियमितता व काळाबाजार झाल्याची चर्चा आहे. जुलै मध्ये या योजनेस मुदतवाढ मिळाली . रेशनकार्ड धारक आणि दुकानदार यांच्यामधील उडालेले खटके यामुळे ही योजना राबविण्याच्या पद्धती बाबत संशय बळावतो आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे पुढील पाच महिने मोफत धान्य वितरणासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली लाभधारकांना घरपोच योजना राबवावी. अथवा प्रत्येक विभागात धान्याचे सेंटर उभी करावीत.हे सेंटर परिमंडळातील प्रत्येक विभागतील शाळेमध्ये सिसिटीव्हीच्या निगराणीखाली उभारावे. रेशनिंग कार्ड पाहुन त्याची योग्य ती नोंद केल्याची पावती देवून ही योजना राबवावी,अशी मागणी प्रसिद्धी पत्रकात  करण्यात आली आहे. ही योजना पारदर्शक पध्दतीने राबविली जाईल.कोणत्याही प्रकारच्या काळाबाजारास वाव देऊ नये.

या योजनेच्या अमंलबजावणीवर सामाजिक कार्यकर्तेही आपआपल्या परीने सहकार्य करतील. या योजनेचा गरजूंना लाभ होवून कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहणार नाहीत, अशी काळजी घ्यावी, योजनेच्या अंमलबजावणी बाबत कोणाही विषयी तक्रार असल्यास लोकजनशक्ती पुणे कार्यालय ०२० २६११४८४९ ,संजय अल्हाट यांच्याशी ९३२५७७११७७,अशोक कांबळे ८२६३८०५६४५ ,संजय चव्हाण ९११२३३५०२३  या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा ,असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.

भारती अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा

0

पुणे :
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या  अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे १५ सप्टेंबर रोजी ‘अभियंता दिन साजरा करण्यात आला.या निमित्त ‘रोबोटॉक्स  ऑटोमेशन अँड फ्युचर जॉब्ज ‘ विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला. ससेक्स विद्यापीठचे वरिष्ठ व्याख्याता डॉ बाओ खा नागूयेन यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव यांनी स्वागत केले.अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी,प्राध्यापक,मान्यवर सहभागी झाले.भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. 

आशेचा दीप प्रज्‍वलित करणारं ‘दिवा’ संमेलन

0

            दिवाळी अंक ही महाराष्‍ट्राची सांस्‍कृतिक परंपरा. साधारण मार्च महिन्‍यापासून दिवाळी अंकांच्‍या निर्मितीस प्रारंभ होतो. विषयाची निवड त्‍यानुसार लेखक, कवी, चित्रकार, व्‍यंगचित्रकार यांना पत्र लिहून साहित्‍य पाठवण्‍याचं आवाहन केलं जातं. काही मंडळी गुढीपाडव्‍याच्‍या मुहूर्तावर साहित्‍य लेखनास प्रारंभ करतात. हा सारा काळ साहित्यिक क्षेत्रात एक भारलेपण निर्माण करणारा असतो. यंदा मात्र साहित्यिक क्षेत्रात एक वेगळीच उदासीनता जाणवत आहे. पुणे शहरात 9 मार्चला कोरोनाबाधित व्‍यक्‍ती आढळून आल्‍यापासून दिवाळी अंक निघतील की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली. तथापि, ‘दिवा’ या दिवाळी अंकांच्‍या संपादकांच्‍या संघटनेनं आपल्‍या ऑनलाईन अधिवेशनात यावर चर्चा करुन एक आशेचा दीप प्रज्‍वलित केला आहे.

            दिवा प्रतिष्ठान आयोजित दिवाळी अंक संपादक, प्रकाशक, लेखक, वाचक, चित्रकार यांचं पहिलं (वेबिनार) अधिवेशन रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी  ५ वाजता संपन्‍न झालं. सुमारे पाच तास ऑनलाईन चाललेल्‍या या अधिवेशनात कोरोना आणि दिवाळी अंकांची छपाई हे विषय केंद्रस्‍थानी होते. कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्‍ट्र साहितय परिषदेचेप्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार व जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग सहभागी झाले. याशिवाय राज्‍यभरातील दिवाळी अंकांचे संपादक, लेखक, वाचक, वितरक यामध्‍ये ऑनलाईन सहभागी झाले.

            अधिवेशनाची सुरुवात गणेशवंदनेनं झाली. दीपप्रज्‍वलन प्रकाश पायगुडे, ग्रहांकित मासिकाचे संपादक चंद्रकांत शेवाळेदादा, प्रा. मिलींद जोशी आणि ज्‍येष्‍ठ प्रकाशक अरुण जाखडे यांच्‍या हस्‍ते झालं. अध्‍यक्षीय भाषणात प्रा. मिलींद जोशी यांनी दिवाळी अंकांचा इतिहास उलगडून दाखवला. दिवाळी अंकांमुळं मराठी साहित्‍याची सर्व दालनं समृध्‍द झाली.  दिवाळी अंकांनी नव प्रवाहांना स्‍वत:मध्‍ये सामावून घेतलं. वेगवेगळया स्‍तरावरील सर्जनाची प्रेरणा दिवाळी अंकांमुळंच मिळाली. जागतिकीकरणानंतर जीवनाचा पोत बदलून गेला. ज्ञानाच्‍या कक्षा रुंदावल्‍या, त्‍यामुळं त्‍या-त्‍या विषयाला वाहिलेले दिवाळी अंक निघू लागले. आधुनिक विज्ञान विस्‍तारत असतांनाच ज्‍योतिषविषयक दिवाळी अंकही मोठ्या संख्‍येनं विकले जावू लागले. दिवाळी अंकांना जाहिरात देणं हे धनिकांना आपलं सांस्‍कृतिक कर्तव्‍य वाटत होतं, मराठी भाषेविषयी कृतज्ञतेची भावना होती. यंदा कोरोनाच्‍या काळात सारं चित्र बदलून गेल्‍यासारखं वाटत आहे.  तथापि, ज्‍यांच्‍या मनात साहित्‍याचं प्रेम आहे, वाचनसंस्‍कृतीचं प्रेम आहे ते या परिस्थितीवर मात करतील, अशी आशा आहे. या अधिवेशनामुळं आशेचा दीप तेवत ठेवण्‍याचं काम केल्‍याची भावना प्रा. मिलींद जोशी यांनी व्‍यक्‍त केली. आजच्‍या काळात वेगवेगळे प्रयोग करावे लागणार, अर्थकारण तपासावं लागणार, इ-आवृत्‍ती, पीडीएफ याबाबत विचार करावा लागणार, असंही त्‍यांनी सांगितलं. हस्‍तांदोलन,आलिंगण आजच्‍या काळात कर्मकठीण झालं आहे. सॅनिटायझरला तीर्थाचं स्‍वरुप आलंय तर मुखपट्टी दागिना झाला आहे. दिवा संघटना सकारात्‍मकतेचा दिवा कार्यरत ठेवेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करुन प्रा.जोशी यांनी दिवाळी अंकांच्‍या संपादकांच्‍या पाठिशी महाराष्‍ट्र साहित्‍य परिषद खंबीरपणं उभी राहील, अशी ग्‍वाही दिली.

            आपल्‍याला लेखक म्‍हणून घडवण्‍यात दिवाळी अंकांचा मोठा वाटा असल्‍याचं प्रांजळपणे कबूल करुन प्रा. मिलींद जोशी यांनी याबाबतच्‍या आठवणी सांगितल्‍या. ते म्‍हणाले, भानू काळे यांनी ‘अंतर्नाद’ दिवाळी अंकासाठी  ‘20 सर्वश्रेष्‍ठ पुस्‍तकं’ असा विषय ठरवला. ज्‍येष्‍ठ साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांना सुनिता देशपांडे (पु. ल. देशपांडे यांच्‍या पत्‍नी) यांच्‍या ‘आहे मनोहर तरी’ या पुस्‍तकावर लिहीण्‍याची विनंती केली. प्रकृती अस्‍वास्‍थ्‍यामुळं त्‍यांनी लिहीता येणार नसल्‍याचं सांगितल्‍यावर दुसऱ्या कोणाकडून लिहून घेऊ, अशी विचारणा केली. त्‍यावर त्‍यांनी मिलींद जोशी यांच्‍याकडून लिहून घ्‍या, म्‍हणून सुचवलं. त्‍यानुसार भानू काळे यांनी माझ्याकडून लेख लिहून घेतला.  या लेखाचं सुनिता देशपांडे यांनी फोन करुन कौतुक केलं.  त्‍यावेळी मला तुम्‍हाला भेटायचं आहे, अशी मी त्‍यांना विनंती केली. दुसऱ्या दिवशी त्‍यांनी संमती दिली. त्‍यानंतर मी, माझी पत्‍नी, मुलगी  तसंच प्रा. अरुणा ढेरे, नंदा पैठणकर (जीएंच्‍या भगिनी) आम्‍ही सर्व त्‍यांना भेटायला गेलो. हा अनुभव रोमांचित करणारा होता. एका लेखामुळं मला थेट पुलंच्‍या घरात पोहोचवलं.

      ज्‍येष्‍ठ व्‍यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांनीही दिवाळी अंकांचा एक काळ गाजवलेला. त्‍यांनीही आपले अनुभव रंजकतेनं मांडले. ते म्‍हणाले, 1970ते 2000 पर्यंत दिवाळी अंकांना बरकत होती . या काळात आमची पिढी तरुण होती,  वाचायची आस होती. शेकडो ऑफिसेसमध्ये दिवाळी अंक लायब्ररी असे, तेथे खूप खप होई. मोबाईल सक्षम नव्हता. आज मितीस तो प्रचंड पॉवरफुल झालाय. नव्‍या पिढीतील तरुण- तरुणी, स्त्री-पुरुष, गृहिणी, मोलकरणी, भाजीवाल्या, छोटी मुलं मान झुकवून त्याच्यापुढे नतमस्तक झालीत. त्यात काय पाहायला वा वाचायला मिळत नाही?  हवं ते, नको ते त्यात आहे.  यु ट्यूबवर, गुगलवर फुकट पहायला मिळतं. कथा, कादंबऱ्या, जुने-नवे सिनेमे, गाणी,  खरेदी सर्व सहज उपलब्ध झाल्यानं आवर्जून पुस्तकं वा दिवाळी अंक वाचणं दुरावलं आहे. टीव्‍हीवर विनोदी, भयकथा, देव-धर्माच्या मालिका चोवीस तास उपलब्ध आहेत.आम्‍ही कोणत्या तोंडानं नव्या पिढीला दिवाळी अंक वाचायला सांगणार?  त्यात त्यांना आकर्षित करणारं काय आहे?  त्याच कथा, तेच लेखक, तेाच ठरावीक साचा, तुमच्या आमच्या पिढीसाठी चालला. नव्यासाठी तो परिचित नाहीच, पण आकर्षण वाटावा असाही दिसत नाही. त्यात कोरोनामुळं सर्व वृत्तपत्र इंडस्‍ट्रीच घायकुतीला आलीय. करोडोंची उठाठेव ठप्प झाली.  ‘टू बी ऑर नॉट टू बी’ सारखं जगणार की मरणार अशा उंबरठ्यावर

वृत्‍तपत्रसृष्‍टी उभी आहे ? दिवाळीअंक काढायचा की नाही? चालेल की नाही?  वाचक घेतील की नाही? सर्व काही कोरोनाच्या हाती. मात्र, दिवाळी अंक इतक्या सहजासहजी सरेंडर होणार नाहीत, असा आशावाद व्‍यक्‍त करुन ‘अगदी पठारावर नवी पाती, नवी पालवी जमिनीतून उगवताना दिसतील, नवे रंग, नवे ढंग, नव्या कल्पना नव्या पिढीसाठी नक्कीच घेऊन येतील’, असा दृढ विश्‍वास ज्‍येष्‍ठ व्‍यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांनी व्‍यक्‍त केला.

            जिल्‍हा माहिती अधिकारी तसेच व्‍यंगचित्रकार राजेंद्र सरग यांनी दिवाळी अंकांचं महत्‍त्‍व विशद करुन कोरोनामुळं आलेली आपत्‍ती ही  इष्‍टापत्‍ती समजून वाटचाल करण्‍याची गरज प्रतिपादन केली. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेवून नवीन पिढीला या माध्‍यमाशी जोडणं शक्‍य असल्याचं त्‍यांनी सांगितलं. महाराष्‍ट्र शासनानं ‘मिशन बिगीन अगेन’ अर्थात ‘पुनश्‍च हरि ओम’ म्‍हणत अनलॉकची प्रक्रिया सुरु केली असल्‍यानं सर्वांच्‍या मदतीनं कोरोनावर मात करण्‍यात यश येईल, असेही ते म्‍हणाले.

            मसापचे प्रमुख कार्यवाह  प्रकाश पायगुडे म्‍हणाले, दिवाळी अंक हे महाराष्‍ट्राचे वैभव आहे. दिवाळी अंकांचा सुवर्णकाळ आता राहिलेला नसला तरी सध्‍याच्‍या परिस्थितीवर मात करण्‍यासाठी एकजुटीची आवश्‍यकता आहे. ज्‍येष्‍ठ प्रकाशक अरुण जाखडे यांनीही वाचनसंस्‍कृती  टिकविण्‍यासाठी सर्वंकष प्रयत्‍न होण्‍याची गरज प्रतिपादन केली.

            ऑल दी बेस्‍ट, हास्यानंद व छोट्यांचा आवाज या दिवाळी अंकाचे संपादक विवेक मेहेत्रे यांनी डिजीटल दिवाळी अंकांची प्रक्रिया, तंत्रज्ञान, सामर्थ्‍य व मर्यादा यावर सविस्‍तर मार्गदर्शन केलं. ते म्‍हणाले, दिवाळी अंकांचा वाचक 44 ते 84 वर्षे या वयोगटातील आहे. तो तितका टेक्‍नोसॅव्‍ही नाही, त्‍यामुळं उपलब्‍ध सर्व मार्गांचा विचार करुन वाटचाल करावी लागणार आहे. इ-पोर्टलवर अंक विक्रीसाठी ठेवणं, मागणीनुसार अंकांची छपाई करणं, एकमेकांच्‍या अंकात दिवाळी अंकांची जाहिरात प्रसिध्‍द करणं आदी उपाय त्‍यांनी सुचवले. जे दिवाळी अंक निघणार आहेत, ते कोणत्‍या मार्गांनी उपलब्‍ध होणार आहेत, त्‍यांचीही माहिती वाचकांपर्यंत वेगवेगळ्या साधनांनी पोहोचली पाहिजे, असं त्‍यांनी सांगितलं.

            महाराष्‍ट्र साहित्‍य परिषदेच्‍या कोषाध्‍यक्षा सुनिताराजे पवार यांनी माणसानं आशावादी असावं, असं सांगून हे अधिवेशन मनोबल वाढविणारं संमेलन ठरेल,असा विश्‍वास व्‍यक्‍त केला. ‘आवाज’ दिवाळी अंकाचे संपादक भारतभूषण पाटकर यांनी उद्योग-धंद्यातील आर्थिक मंदी, दिवाळी अंकाचं अर्थकारण याबाबत चिंता व्‍यक्‍त केली. एजंट पाठिशी आहेत. तथापि, वितरण व्‍यवस्‍था सुरळीत होण्‍याची खात्री वाटली पाहिजे, असं ते म्‍हणाले. ‘अंतर्नाद’चे भानू काळे यांनी दिवाळी अंकांची उज्‍ज्‍वल परंपरा खंडित होवू नये, असं मत मांडलं. ‘ग्राहकहित’चे सूर्यकांत पाठक यांनी वितरणाची काही व्‍यवस्‍था करता येईल का यावर विचार करण्‍याचं आवाहन करुन ग्राहकपेठेत जागा उपलब्‍ध करुन देवू, असं सांगितलं. ‘विपुलश्री’ मासिकाच्‍या संपादिका माधुरी वैद्य यांनी 1999 पासून मासिक प्रकाशित करत असल्‍याचं सांगितलं. यंदा दिवाळी अंकाचं  22वे  वर्ष असून ‘वाचकांना चांगलं साहित्‍य देणं’ या जाणिवेतून अंक काढत आहोत, असं  त्‍या म्‍हणाल्‍या. ‘शतायुषी’चे संपादक डॉ. अरविंद संगमनेरकर यांनी यंदा अंक काढणार नसल्‍याचं सांगत सर्वांना आपापल्‍या तब्‍येतीची काळजी घेण्‍याचा सल्‍ला दिला. ‘धमालधमाका’चे संपादक नसिर शेख, ‘वेदांतश्री’चे संपादक सुनील गायकवाड, ‘धनंजय-चंद्रकांत’च्‍या संपादिका निलीमा कुलकर्णी, ‘पुणे प्रतिष्‍ठान’चे रवी चौधरी, चैतन्‍य खरे, संदिप खाडीलकर, सुनील ज्ञानेश सोनार, वाचक राजेश मंडोरे, वितरक जगदीश भुतडा यांनीही आपलं मनोगत मांडलं.

            ‘दिवा प्रतिष्ठान’ चे अध्यक्ष विजय पाध्ये यांनी प्रास्‍ताविक केलं. उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, सचिव शिवाजी धुरी यांनी उपस्थितांचं स्‍वागत केलं. प्रमुख पाहुण्‍यांचा परिचय महेंद्र देशपांडे, सोनल खानोलकर, विवेक मेहेत्रे यांनी करुन दिला. या ऑनलाईन अधिवेशनात ज्ञानेश्वर जराड, गजू तायडे, सतीश देसाई, धनंजय सिंहासने, शारदा धुळप, आशा ब्राह्मणे, गौरव कुलकर्णी, रुपाली अवचरे, सुभाष सबनीस, उल्‍हास पाटकर, शशिकला पवार, अमृता खाकुर्डीकर,  श्रीकांत भुतडा, विलास कसबे  आदी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन गौरी केंजळे यांनी केलं.

            दिवाळी अंकांनी महाराष्‍ट्राचं वैचारिक भरणपोषण केलं आहे. कोरोनामुळं ही समृध्‍द आणि वैभवशाली परंपरा खंडित होवू नये यासाठी सर्व संपादक, लेखक, चित्रकार, व्‍यंगचित्रकार, वाचक, वितरक एकत्र येवून सकारात्‍मक विचार करत आहेत, ही आनंददायी आणि समाधानाची बाब आहे.

राजेंद्र सरग

9423245456

माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वीपणे राबवून कोरोनाचा संसर्ग रोखूया-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

0

पुणे,दि.15: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम महत्वपूर्ण आहे. लोकसहभागातून ही मोहीम यशस्वीपणे राबवून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखूया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार अशोक पवार व पंचायत समिती सदस्या कावेरी कुंजीर प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, कुंजीरवाडीच्या माजी सरपंच सुनीता धुमाळ आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार अशोक पवार व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी कुंजीरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घेण्यात येणाऱ्या कोरोना रॅपिड अँटिजेन चाचणी केंद्राला भेट देवून माहिती घेतली आणि तपासणी मोहिमेत सहभागी अधिकारी, कर्मचारी व आशा वर्कर यांना मार्गदर्शन केले. तसेच गृहभेट देवून कोरोना लक्षणांबद्दल नागरिकांची विचारपूस करुन त्यांची प्राथमिक आरोग्य चाचणी घेतली.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत, तरीदेखील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम शासनाने हाती घेतली आहे. ही मोहीम यशस्वी करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या सहकार्यातून पुणे जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबवूया, असे डॉ.देशमुख यांनी सांगितले. शासनाचे सर्व विभाग याकामी सक्रिय असून या मोहिमेत नागरिकांनीही स्वतः हून सहभागी होऊन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आमदार अशोक पवार म्हणाले, कोणतेही अभियान व योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असतो. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियाना अंतर्गत घरोघरी तपासणी करण्यात येणार असल्यामुळे कोरोना बधितांना वेळेत उपचार मिळवून देणे शक्य होईल. नागरिक व रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासकीय यंत्रणा अहोरात्र झटत आहे. नागरिकांनीही मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आदी खबरदारी घेवून कोरोनाला आळा घालावा.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मोहिमेची सविस्तर माहिती दिली. घरोघरी सर्वेक्षण करुन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे, असे सांगितले.

गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी हवेली तालुक्यातील कोरोना परिस्थितीची व अभियानाची माहिती दिली. आभार दादा कुंजीर- पाटील यांनी मानले.

सारिपाट महाविकास आघाडीचा’ या पुस्तकाचे शरद पवार यांच्या हस्ते औपचारिक प्रकाशन

0

पुणे- महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीचा थरारक वेध घेण्यात आलेल्या ‘सारिपाट महाविकास आघाडीचा’ या लेखक विजय जगताप यांच्या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुण्यात केले.
राष्ट्रीय अध्यक्ष उद्योग कक्ष मराठा सेवा संघ प्रकाश जाधव, श्रीमती जनाबाई जाधव माजी नगरसेविका मुंबई महानगरपालिका, सचिन आडेकर ब्लॉक अध्यक्ष काँग्रेस (आय) पुणे, सामाजिक कार्यकर्ते ॲड. लक्ष्मण रानवडे आदी यावेळी उपस्थित होते.
देशातील सर्वात थरारक राजकीय नाट्यातून निर्माण झालेल्या सरकारच्या निर्मितीचा दस्ताऐवज म्हटलं जाईल असं पुस्तक म्हणजे “सारिपाट महाविकास आघाडीचा”याचा उल्लेख करता येईल.
२०१९ च्या विधानसभा निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाची मालिका निर्माण करून क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी घडलेली घटना म्हणजे सध्या राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार होय.
नऊ महिन्यांपूर्वी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेस हे तीन पक्ष मिळून बनलेले सरकार कोणाच्या ध्यानीमनी नसताना अनपेक्षितरित्या सत्तेवर आलं. भारताच्या राजकीय इतिहासात आजपर्यंत कधीच एखादया राज्यात सत्ता स्थापन होताना भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन सरकार बनवत असताना इतक्या खेळया,कुरघोड्या, डाव, प्रतिडाव, रातोरात उठलेली राष्ट्रपती राजवट, भल्या पहाटे झालेला शपथविधी आणि या प्रश्नी राज्यपालांच्या निर्णयावर थेट सर्वोच्च न्यायालयात सुरू झालेली सत्ताधारी व विरोधकांमधील लढाई,माघारी नाट्य असा इतका दमछाक करणारा प्रवास कधी झाला नाही तो महाराष्ट्रात घडला.
लेखक विजय जगताप यांनी हा संपूर्ण ३६ दिवसांचा प्रवास ओघवत्या शब्दात जसं घडलं तसं अशा रूपात या पुस्तकात मांडला आहे.सरकार निर्मितीच्या घटना घडामोडींचा हा एक दस्ताऐवज ठरेल व राजकीय अभ्यासक,संशोधक व विविध पक्षांचे कार्यकर्ते यांना संदर्भमूल्य ठरेल असा हा सारा उत्कंठा वाढविणारा प्रवास या पुस्तकात शब्दचित्र झाला आहे. विशेषत: शिवसेना व भाजप एकत्र असताना व पुढे २०१४ च्या सत्ताकाळात त्यांच्यात कुरबूरी सुरू झाल्यानंतरचे सारे वाकयुध्द व त्यांचा संसार मोडेस्तोवरच्या सगळ्या घटना व आठवणी या पुस्तकात मांडण्यात आल्या आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ नीलम गो-हे यांची लाभलेली प्रस्तावना त्यांच्यातील अभ्यासू शैलीचा व निरपेक्ष सामाजिक कार्यकर्ता पदाची परिचय करून देते. सरकार बनत असताना कशा घडामोडी होतात याची सामान्य नागरिकांना फारशी माहिती नसते.परंतू राजकारण नेमकं कसं शिजतं ? काय उलथापालथी होतात ? हे सारं वास्तव या पुस्तकातून स्पष्ट होते. शरद पवार , अजित पवार यांच्या स्वभाव शैलीचा व राजकारणातील विशेषत: शरद पवार यांच्या बुध्दीचातुर्याचा व चाणक्यनितीची नव्याने ओळख या पुस्तकातून घडते.या सरकारच्या निर्मितीत संजय राऊत हे सूत्रधार कसे ठरले , उध्दव ठाकरे व शिवसेना याविषयी सोनिया गांधी यांच्या मनात व दिल्ली वर्तुळात नेमकी अढी का आहे? ती उलगडण्याचे काम शरद पवार यांनी कसे केले? ही सारी उत्तरे या पुस्तकात मिळतात.

कोरोनाची परिस्थिती व सोशल डिस्टिंक्शन राखून या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन आज करण्यात आले.

महेश कोठारेंना विधानपरिषदेवर संधी द्या – ‘सलाम पुणे ‘ची राज्यपालांकडे मागणी

0


पुणे- प्रख्यात अभिनेते ,निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून संधी द्यावी अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पुण्यातील सलाम पुणे या संस्थेने केली आहे.
या संस्थेचे अध्यक्ष शरद लोणकर आणि कार्याध्यक्ष सुभाषचंद्र जाधव यांनी या संदर्भात राज्यपालांना आज पत्र पाठविले आहे. १९६८ पासून बालकलाकार असताना ‘तू कितनी अच्छी है,प्यारी प्यारी है, ओ मा … या राजा और रंक सिनेमातील लोकप्रिय गाण्यापासून ते आजवर महेश कोठारे यांनी केलेल्या सिनेक्षेत्रातील प्रवासाचा अनेकदा गौरव झाला आहे ,2 वेळा फिल्म फेअर , आठ वेळा महाराष्ट्र शासनाचे ,३ वेळा सलाम पुणे पुरस्कार मिळविणाऱ्या महेश कोठारे यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून कलावंत घडविले . त्यातील अनेकाना उभ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले . कोठारे यांचा संपूर्ण परिवार सिने सृष्टीत कार्यरत आहे .आपल्या योगदानाने कोठारे परिवाराची ओळख घराघरात निर्माण झाली आहे .जनतेशी त्यांची थेट नाळ जोडली गेली आहे . एका खऱ्या कलाहित,समाजहित जोपासणाऱ्या प्रख्यात अभिनेत्याला (महेश कोठारे यांना ) विधानपरिषदे वर काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती आहे. असे या पत्रात लोणकर आणि जाधव यांनी म्हटले आहे.

जम्बो रुग्णालयात माहिती व्यवस्थापन प्रणाली सज्ज, पारदर्शक यंत्रणेसाठी उपयुक्त

0
  • महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : COEP मैदानावरील जम्बो कोविड सेंटर येथे रुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणाली स्थापित करून त्याचा उपयोग करण्यात येत आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या प्रणालीचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो कोविड रुग्णालयाच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल व इतर अधिकारी उपस्थित होते.

जम्बो सेंटरचे प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने पुणे महापालिका प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. येथे अधिक संख्येने बेड सुसज्ज करावेत जेणेकरून करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी साह्य होईल, अशा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या.

तसेच, शहरातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी जम्बो सेंटर लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
पुणे महापालिकेकडून पूर्ण सहकार्य करण्यात येत असून, आवश्यक ते सर्व साह्य करण्यात येत आहे, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

येथील माहिती व्यवस्थापन प्रणालीमुळे रुग्णांना दाखल करून घेतल्यापासून ते डिस्चार्ज पर्यंतच्या सविस्तर नोंदी ठेवल्या जातात. या व्यवस्थेसाठी कमांड रुम तयार केली आहे. यापूर्वी अशी माहिती उपलब्ध होत नव्हती त्यामुळे ही व्यवस्था करण्यात आली आहे. आयसीयू, व इतर वॉर्डमधील रुग्णांवर प्रत्यक्ष होणारे उपचार, त्यांच्या प्रकृतीची स्थिती यांची माहिती येथील स्क्रीनवर डॉक्टरांना व व्यवस्थापनाला पाहता येईल, असे रुबल अग्रवाल यांनी सांगितले. तसेच, रुग्णांचा तपशील अंतर्गत डॅशबोर्डवर अपडेट केला जाणार आहे.

रुग्णांशी व्हिडिओ कॉलने संवादामुळे नातेवाईकांना मिळतोय दिलासा

0

पुणे : जम्बो कोविड रुग्णालयातील व्हिडिओ कॉल सुविधेमुळे रुग्णांशी थेट संवाद साधून विचारपूस करता येत असल्याने नातेवाईक समाधान व्यक्त करीत आहेत. आतापर्यंत 200+ व्हिडिओ कॉलद्वारे रुग्णांच्या नातेवाईकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. व्हिडिओ संवाद साधताना काही रुग्णांचे नातेवाईक भावुक होतात, तर अनेकजणांच्या मनातील शंका, भीती दूर होते, ते बोलल्यावर शांत होतात. या सुविधेमुळे नातेवाईकांना दिलासा मिळत आहे.

करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जम्बो कोविड रुग्णालयातील बेडची संख्या व यंत्रणेची क्षमता वेगाने वाढविण्यासोबतच येथे व्हिडिओ कॉलची सुविधा उपलब्ध करावी अशा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केल्या होत्या. त्यानुसार ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

येथे उपचार सुरू असलेल्या करोना रुग्णांची स्थिती त्यांच्या नातेवाईकांना पाहता यावी व त्यांच्याशी बोलता यावे यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली.
टॅब्लेट फोनद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. याद्वारे महापौर व अधिकाऱ्यांनी काही नातेवाईकांसह संबंधित रुग्णांशीही व्हिडिओ कॉलने संवाद साधला. दिवसातून एकदा एका नातेवाईकाला रुग्णाशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधता यावा यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार टॅबची व्यवस्था महापालिकेने केली आहे.

आपल्यावर व्यवस्थित उपचार होत आहेत का, काळजी घेतली जाते का, येथील व्यवस्थेत कोणत्या सुधारणा करणे अपेक्षित आहे अशी विचारपूस करताना महापौरांनी रुग्णांना धीर दिला.

उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या सुधारीत सूचना जारी

0

मुंबई, दि. १४ : भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत दिनांक 10 ऑक्टोबर 2018 व 06 मार्च 2020 रोजी तपशीलवार सूचना निर्गमित केल्या आहेत. या अनुषंगाने आयोगाने दिनांक 11 सप्टेंबर, 2020 रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा केली. संबंधित उमेदवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी यासंदर्भातील सूचना आणखी स्पष्ट करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. निवडणूकीय लोकशाहीच्या सर्वांगीण विकासासाठी/उन्नतीसाठी या नैतिक बाबीवर जोर दिला आहे.

सुधारीत सूचनांचे ठळक मुद्दे

अ.प्रसिद्धीसाठी सुधारीत वेळापत्रक:-

सुधारीत दिशानिर्देशानुसार उमेदवारांनी, तसेच त्यांना नामनिर्देशित केलेल्या राजकीय पक्षांनी संबंधित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबतचा तपशील वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करतील:-

(i) प्रथम प्रसिद्धी:- उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पहिल्या 4 दिवसांमध्ये.

(ii) दुसरी प्रसिद्धी:- उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या 5 व्या ते 8 व्या दिवसांमध्ये.

(iii) तिसरी प्रसिद्धी:-9 व्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत (म्हणजेच मतदान होण्याच्या 2 दिवस अगोदर)

हे वेळापत्रक मतदारांना त्यांच्या निवडीचा अधिकार चांगल्या माहितीच्या आधारे उपयोगात आणण्यास मदत करेल.

ब.         बिनविरोध विजयी उमेदवार तसेच त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षाच्या संदर्भात हे स्पष्ट करण्यात येते की, बिनविरोध विजयी उमेदवार तसेच त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय यांनी सुद्धा इतर उमेदवार व राजकीय पक्षांसाठी निश्चित केल्याप्रमाणे संबंधित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबतचा तपशील प्रसिद्ध करतील.

  1. आयोगाने ठरविल्यानुसार,आतापर्यंत प्रसिद्ध कारण्यात आलेल्या सूचना व प्रारुपे यांचे एक संकलन भागधारकांच्या हितासाठी प्रकाशित केले जात आहे. हे मतदार व इतर भागधारकांमध्ये अधिक जागरुकता निर्माण करण्यात मदत करेल.
  2. यासंदर्भातील सर्व सूचना,गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आणि त्यांना नामनिर्देशित करणारे राजकीय पक्ष यांनी पाळल्या पाहिजेत.
  3. या सुधारित सूचना तात्काळ प्रभावाने लागू होतील.

असे राज्य  निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

कोरोनाविरुद्धचा लढा आता घरोघर पोहोचवा

0

मुंबई, दि. 14 : कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करायची आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. आज वर्षा येथून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव  विकास खारगे, प्रधान सचिव आरोग्य डॉ.प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव सौरव विजय, राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक रामस्वामी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल आदींची उपस्थिती होती.

राज्यातील जिल्ह्यांतील पॉझिटिव्हीटी प्रमाण वाढते आहे. आपण सर्व सुविधा उभारत आहोत, गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून अहोरात्र मेहनत करीत आहोत मात्र आपले आव्हान अजून संपले नाही. लॉकडाऊन काळात आपण ही लाट थोपविली होती. आता आपण हळूहळू सर्व खुले करीत आहोत. आणखीही काही गोष्टी सुरू करण्याची मागणी अनेकजण करीत आहेत. आज काही लाख परप्रांतीय मजूर परत राज्यात आले आहेत. एकूणच कोरोनाची वाढती संख्या पाहता कोरोनासोबत कसे जगायचे ते आता शिकवावे लागणार आहे आणि या मोहिमेत आपण तेच करणार आहोत. रोग होऊच न देणे हा मंत्र महत्त्वाचा आहे त्यामुळे आपली आरोग्य पथके घरोघरी भेट देऊन सूचना सांगतील. पुढील काळात आपल्याला दक्षता समित्या देखील कायमस्वरूपी ठेवाव्या लागतील असे दिसते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की 2014 मध्ये मी शिव आरोग्य योजनेत टेलिमेडिसीनचे प्रात्यक्षिक दाखविले होते. यापुढील काळात आपल्याला वैद्यकीय उपचार किंवा तपासणी यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा लागेल.

ही मोहीम परिणामकारक होणे गरजेचे आहे, तसे झाले तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण जिंकूत असेही मुख्यमंत्री म्हणाले

ऑक्सिजन टँकर्सना प्रतिबंध नाही

सध्या राज्यात 1000 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होते मात्र गरज 500 मेट्रिक टन इतकी आहे. सध्या उत्पादन पुरेसे असले तरी पुढोल काळात गरज पडू शकते असे डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले. ते म्हणाले की जिल्ह्यांनी त्यांना लागणारी ऑक्सिजनची मागणी व्यवस्थित आणि पाहिजे तेवढीच नोंदवावी. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष यासाठी सुरू करण्यात आला असून त्यांच्या संपर्कात राहावे. ऑक्सिजनचा नेमका कियी उपयोग केला जातोय त्याचे दररोज ऑडिट करावे व अपव्यय टाळावा, असेही ते म्हणाले.

ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकर्सना आपत्कालीन वाहनांचा दर्जा देण्याचा निर्णय झाला असून त्यावर सायरन असतील. या टँकसची वाहतूक रोखू नये तसेच दिवसा देखील त्यांची वाहतूक शहरांत सुरू राहील, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी दिली.

मोबाईल ॲप देखील विकसित

या मोहिमेसाठी खास मोबाईल ॲप विकसित करण्यात आले असून ते सर्वसामान्य नागरिकांसाठी नव्हे तर आरोग्य पथकांना दैनंदिन अहवाल नोंदविण्यासाठी कामी येणार आहे. यातून योग्य रीतीने व जलदरीत्या विश्लेषण शक्य होईल, अशी माहिती रामास्वामी यांनी दिली.

या मोहिमेसाठी सर्व पथकाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याची तसेच सर्व आवश्यक प्रसिद्धी साहित्य जिल्ह्यांना देण्यात आल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आले.

याप्रसंगी सर्व विभागीय आयुक्तांनी आपापल्या विभागांमध्ये या मोहिमेची कशी तयारी सुरू आहे त्याची माहिती दिली.

ग्लॅमरस करिअर’ची संधी देणारी ‘फॅशन इंडस्ट्री’

0

पुणे- भारतीय संस्कृतीत पेहरावाला फार महत्व आहे. विविध प्रकारच्या पेहरावातून ही संस्कृती समृद्ध होत गेली आहे. फॅशन डिझाईन ही पोशाख, पेहराव आणि जीवशैलीच्या साहित्य रचनेला वाहिलेली एक कला आहे. ही कला सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभावाखाली असून, स्थलकालानुसार विकसीत होत गेली आहे. प्राचीन भारतीय राजेशाही परंपरेतून ही फॅशन डिझाईनची उत्पादने आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आज हे क्षेत्र अधिकच व्यापक होत गेले आहे. या क्षेत्रात करिअर करून आपल्यातील सर्जनशीलता आणि प्रतिभा दाखवण्याची संधी आपल्याला आहे.फॅशन डिझाईनिंग आजच्या काळात सर्वात आकर्षक, मोहक, भावणारा आणि उत्सुकता वाढवणारा असा करिअरचा पर्याय आहे. जर आपल्याकडे सर्जनशीलता, शैलीची जाण आणि कल्पकता असेल तर हे क्षेत्र आपली वाट पाहत आहे. एका बाजूला लोकांच्या सर्जनात्मक आणि भौतिक गरजा भागविण्याचे, तर दुसऱ्या बाजूला प्रतिभावान लोकांना ग्लॅमर, यश, प्रसिद्धी आणि चांगले उत्पन्न देण्याची क्षमता फॅशन इंडस्ट्रीमध्ये आहे.
फॅशन डिझाईनिंगमधील एक नावाजलेली संस्था म्हणजे सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी. इथे बॅचलर ऑफ सायन्स इन फॅशन डिझाईन, डिप्लोमा इन फॅशन टेक्नॉलॉजी असे दोन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दहावी उत्तीर्ण कोणताही विद्यार्थी डिप्लोमासाठी प्रवेश घेऊ शकतो. डिप्लोमा इन फॅशन डिझाईन हा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाशी संलग्न आहे. डिप्लोमा इन फॅशन टेक्नॉलॉजी किंवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी बीएस्सीसाठी प्रवेश घेऊन शकतो. हा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहे. या पाच वर्षाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना फॅशन इल्लूस्ट्रेशन, पॅटर्नमेकिंग, कन्स्ट्रक्शन, कपड्यांची ओळख, फॅशन मार्केटिंग अँड कम्युनिकेशन, टेक्स्टाईल्स अँड क्वालिटी अशुरन्स, फॅशन रिटेलिंग, सर्फेस ऑर्नामेंटेशन, कॅड, हिस्टरी ऑफ फॅशन, ट्रॅडिशनल टेक्स्टाईल, ड्रेपिंग आदी गोष्टी शिकता येणार आहेत.
अतिशय हुशार आणि सर्जनशील असलेल्या ही नवीन युवापिढी त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी आणि फॅशन जगतात आपले स्थान निर्माण करण्यासाठी फॅशन इन्स्टियूटमध्ये प्रवेश घेण्यात रुची दाखवत आहेत. या युवकांमध्ये अतिशय नाविन्यपूर्ण आणि प्रतिभाशैली असल्याने ट्रेंडस अनुकरण करण्यापेक्षा ट्रेंड निर्माण करणारे बनत आहेत. अनेक नवीन डिझायनर्स अनुभवासाठी करिअर म्हणून काम करतात. या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी आहेत. परंतु, अनेकजण या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी त्यांच्यातील सर्जनशीलता आणि व्यवस्थापकीय कौशल्य यांचा मेळ घालणे आवश्यक ठरते. फॅशन डिझाईनिंग हे करिअर हे केवळ ग्लॅमरस लोकांना भेटणे किंवा श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींशी संवाद करण्यापुरतेच मर्यादित नाही, तर जीवनशैलीच्या बाबतीत काटेकोर असलेल्या लोकांना आपल्या कल्पकतेतून समाधान देण्याचे काम करते. फॅशन डिझाइनमधील करिअर शैलीची भावना बाळगण्याचा विचार करणार्‍या मनाच्या सर्जनशील प्रतिभास प्रोत्साहित करते. या क्षेत्रातील महत्वाचा भाग आहे तो म्हणजे, कपड्यांचे डिझाईन, स्केचिंग, कापड कापणी, तुकड्याचे एकत्रित शिवणकाम आणि अंतिमतः विक्री आदींचा समावेश आहे. विविध शैलीची लोकप्रियता व विपणन आणि उत्पादनांना फॅशन शो आणि फॅशन लिखाणाच्या माध्यमातून होते. या दिवसांत फॅशनचे वाढत असलेले महत्व, कपड्यांत वैविध्य आणि स्थानिक बाजारात उत्पादनांची उपलब्धी यामुळे फॅशन डिझायनरला आणखीनच समृद्ध होणे शक्य होत आहे. आपल्या विशिष्ट भरतकाम पद्धती, सुंदर आणि श्रीमंत शिल्प, हातमाग फॅब्रिक्स, देहाती पोत आणि चमकदार रंगांसह जागतिक बाजारपेठेतील प्रमुख स्थान मिळवण्याचा फायदा भारत घेत आहे. भारतीय फॅशन डिझायनर्सनी भारतीय वसाहतींसाठी जागतिक बाजारपेठ तयार करण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
काही फॅशन डिझायनर्स फ्रीलांस म्हणून काम करत आहेत. काहीजण व्यक्तिगत पातळीवर काम करत आहेत. किंवा डिझाइनर कपडे बनवून दुकाने किंवा कपडे उत्पादकांना पुरवले जातात. काही लोक फॅशन कंपनीसाठी काम करतात, तर काहीजण कंपनीचे डिझाईन करतात. काहीजण स्वतःचे फॅशन दुकान काढून त्यांच्या कल्पक आणि सुंदर डिझाईनची विक्री करतात. काही लोक निर्यात कंपन्यात, कापड गिरण्यात, बुटीक्समध्ये, कपड्यांच्या दुकानात, लेदर कंपन्यात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर काम करतात.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील करिअरच्या संधी : फॅशन डिझाइनर, फॅशन कोऑर्डिनेटर, फॅशन इलस्ट्रेटर, फॅब्रिक टेक्नॉलॉजिस्ट, फॅशन कन्सल्टन्ट, फॅशन जर्नालिस्ट, फ्रीलान्स डिझाइनर, फॅशन स्टायलिस्ट, प्राध्यापक, बुटीक ओनर, कॉस्ट्यूम डिझाइनर, फॅशन इव्हेन्ट कोऑर्डिनेटर, फॅशन कोरिओग्राफर, फॅशन कटर, ब्रँड स्टोअर मॅनेजर, फॅशन फोटोग्राफर, फॅशन एडिटर, व्हिज्युअल मर्चंटायझर, ज्वेलरी डिझायनर, अपरेल डिझाइनर, ऍक्सेसरीज डिझाइनर, सेल्स असोसिएट, पब्लिक रिलेशन्स स्पेशालिस्ट, इन्व्हेंटरी प्लॅनर, रिटेल बायर, ग्राफिक डिझाइनर, टेक्स्टाईल डिझाइनर, क्रिएटिव्ह डिझाइनर, क्वालिटी अश्युअरन्स मॅनेजर आदी पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध आहे.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटने लंडन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग (एलएपीटी) यांच्याशी सामंजस्य करार केला आहे. त्याद्वारे गेली १५ वर्षे प्रमाणपत्र दिले जाते. लंडन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग ही जागतिक स्तरावर नामांकित संस्था असून, १८० देशांत कार्यरत आहे. ही एक स्वतंत्र संस्था आहे, जी स्टँडर्ड्स आणि गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी सल्ला व मार्गदर्शन करते. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट एक दर्जेदार आणि नामांकित संस्था असून, अनेक प्रसिद्ध संस्थांशी संलग्नित आहे. डिप्लोमाचे प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी सूर्यदत्ताने ‘एलएपीटी’शी करार केला आहे.

भाजप प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे ‘जायका’ प्रकल्पात दिरंगाई – खासदार वंदना चव्हाण

0

पुणे- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार  देशातील ३०२ प्रदूषित नदींपैकी मुळा-मुठा नदी आहे. नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा अत्यंत महत्वाच्या प्रकल्प म्हणून जायका प्रकल्पास मंजूरी देण्यात आली. जायका प्रकल्पाने केंद्र सरकारबरोबर १३ जानेवारी २०१६ रोजी दिल्लीत करार करून पुण्यातील मुळा- मुठा नदीपात्रातील प्रदूषण हटविण्यासाठी आणि शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ८४१ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले. परुंतू मुळा- मुठा नदीचे रूप पालटवून टाकणारा आणि प्रदूषण कमी करणारा महत्त्वाकांक्षी जायका प्रकल्प पुन्हा एकदा निविदांच्या प्रक्रियेत अडकला आहे. हा महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा नाकर्तेपणा असून पुणेकरांसाठी दुर्देवाची बाब आहे असे मत खा. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.

या प्रकल्पातंर्गत शहरात ११३ किलोमीटरच्या सांडपाणी वाहिन्या नव्याने टाकण्यात येणार आहेत. तसेच ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केंद्र उभारले जाणार आहेत. त्या शिवाय २४ स्वच्छतागृहांची उभारणी, नागरीकांचा सहभाग, जनजागृती अभियान, सांडपाणी संदर्भात जीआयएस मॅपिंग आदी गोष्टीचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात सहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे आणि दहा वर्षांसाठी त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेने सुमारे दीड वर्षांपूर्वी निविदा मागविल्या परंतु त्या अडकल्या आहेत व महापालिकेने नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिले आहेत. यावरून स्पष्ट होत आहे की, सत्ताधारी भाजपा प्रशासन, सल्लागार समिती व जायका यांच्यात समन्वय साधण्यात अयशस्वी ठरत आहे. परिणामी शहारतील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा या अत्यंत महत्वाच्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असल्याची खंत खा. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केली.

या प्रकरणातून अनेक प्रश्‍न उपस्थित होतात. मुळात हा प्रकल्प जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. आता निविदा प्रक्रियेलाच एवढा वेळ लागला तर, प्रकल्पाचे काम सुरू कधी होणार आणि तो मार्गी कधी लागणार ? केंद्र सरकारने ८४१ कोटी रुपयांचा निधी पुणे महापालिकेला उपलब्ध करून दिला तरी, कामे सुरू करण्यासाठीची प्रक्रिया वेगाने राबविण्यासाठी महापालिकेकडून  पुढाकार घेण्यात आला नाही. त्यामुळे हे अनुदान परत जाण्याची भीती शहरापुढे आहे. जायका प्रकल्प उभारण्यासाठीच्या निविदांवरून केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थितीत केला आहे. वास्तविक केंद्रात आणि महापालिकेत भाजपचेच सरकार आहे. तरीही त्यांच्यातील विसंवादामुळे पुण्याचे नुकसान होत आहे. स्मार्ट सिटीच्या बाबतीतही हेच दिसून आले. यातून असे स्पष्ट दिसते की शहराच्या विकासासाठी कोणते विकास प्रकल्प महत्त्वाचे आहेत, त्यांचा पाठपुरावा केला पाहिजे आणि त्यासाठीचे ‘व्हिजन ‘ही ठरवणे गरजेचे आहे. झालेली दिरंगाई दूर करून प्रकल्पाची अंमलबजावणी लवकरात लवकर वेगाने करण्यासाठी खा. वंदना चव्हाण यांनी पत्राद्वारे आयुक्तांना विंनती केली आहे.

ग्रामीण भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. 14 : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे. लक्षणे नसलेल्या रूग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवावे. ॲन्टीजेन चाचण्यांवर भर द्यावा त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये ऑक्सीजनचे बेड वाढविण्यात यावे. जिल्ह्यासाठी चार अंकी हेल्पलाईन क्रमांक निर्माण करावा. जिल्ह्यात टास्क फोर्स तयार करावा, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा आरोग्यमंत्री यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून घेतला. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार सुरेश धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, सुभाष धोटे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांच्यासह आयएमएचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कोरोना उपाययोजनांसंदर्भात विविध बाबींचा तसेच मागण्यांचा उहापोह केला. त्यावर आरोग्यमंत्री म्हणाले, १५ सप्टेंबर पासून राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सुरू होत आहे. त्याअंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे. चंद्रपूर जिल्ह्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता असून हे प्रमाण १५ ते २० पर्यंत वाढवावे. जनजागृतीवर मोठ्या प्रमाणावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांसाठी नवीन यंत्रसामग्री देण्यात येत असून, येणाऱ्या कालावधीत ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर चाचण्यांसाठी नवीन लॅब सुरू होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी पाठपुरावा करून तातडीने लॅब सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले.

समाज आरोग्य अधिकारी पदासाठी परीक्षा घेण्याचे काम सुरू असून, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने ५० डॉक्टरांची सेवा घेण्याचे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले. रूग्णवाहिकेसंदर्भात तक्रार येता कामा नये. खाजगी रूग्णवाहिका जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घ्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाच्या उपचारासाठी जिल्ह्यामध्ये टास्कफोर्स स्थापन करण्याच्या सूचना देतानाच, जिल्ह्यासाठी डॅशबोर्ड आणि हेल्पलाईन सुरू करावी. तसेच गंभीर रूग्णांसाठी टेलीआयसीयू सुविधेच्या माध्यमातून उपचार करण्याच्या सुचनाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुल्हाणे यांनी उपाययोजनांबाबत माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोरोना सहाय्यता कक्षाचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते उदघाटन

0

पुणे- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोव्हीड-१९ सहाय्यता कक्षाचे वनराज्य मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पुणे मनपा विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, पर्वती विधानसभा अध्यक्ष.नितीन कदम, दिलीप अरुंदेकर, नगरसेवक प्रिया गदादे पाटील, सुभाष जगताप , शिवाजी गदादे पाटील, सुनील बिबवे, आनंद बाफना, संतोष नांगरे, मृणालिनी वाणी, अमोल ननावरे, शिल्पा भोसले, श्वेता होनराव कामठे, डॉ. सुनीता मोरे , अशोक राठी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी शरद पवार यांनी आग्रही पुढाकार घेतला आहे. व अजित पवार यांच्या सूचनेनुसार व खासदार.वंदना चव्हाण व शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या साहय्यासाठी व कोविड विषाणूचा सामना करण्यासाठी राष्ट्रवादी पार्टी तर्फे NCP कोव्हिड ब्रिगेड’ उभारन्यात
आले आहे.
यासाठी पुणे शहरात विविध ठिकाणी नागरीकांसाठी NCP Pune City Covid-19 Help Desk सुरू करण्यात आले. यामार्फत कोविड हॉस्पिटलची अद्ययावत माहिती, टेस्टींगच्या सोयी, ॲम्ब्युलन्स, समुपदेशन केंद्र , इतर वैद्यकीय सोयी आदींची माहीती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.या ठिकाणी नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपणास covid संदर्भात अडीअडचणी असल्यास सदर ठिकाणी माहितीसाठी संपर्क करावा.