पुणे विभागातील 2 लाख 63 हजार 747 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले विभागात कोरोना बाधित 3 लाख 50 हजार 846रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे,दि. 17 :- पुणे विभागातील 2 लाख 63 हजार 747 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 50हजार 846 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 78 हजार इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 9 हजार 99 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.17 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. पुणे जिल्हा पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 35 हजार 852 रुग्णांपैकी 1 लाख 88 हजार 154 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 443 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 255 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.23 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.78 टक्के आहे. सातारा जिल्हा सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 26 हजार 448 रुग्णांपैकी 17 हजार 107 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 589 आहे. कोरोनाबाधित एकूण 752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 26 हजार 390 रुग्णांपैकी 18 हजार 245 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 166 आहे. कोरोनाबाधित एकूण 979 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हा सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 25 हजार 653 रुग्णांपैकी 15 हजार 437 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 247 आहे. कोरोनाबाधित एकूण 969 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 36 हजार 503 रुग्णांपैकी 24 हजार 804 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 555 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 144 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 7 हजार 752 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 456 सातारा जिल्ह्यात 972, सोलापूर जिल्ह्यात 461, सांगली जिल्ह्यात 865 तर कोल्हापूर जिल्ह्यात 798 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. पुणे विभागातील सर्व्हेक्षण आजपर्यत विभागामध्ये एकुण 15 लाख 43 हजार 548 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 50 हजार 856 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. ( टिप :- दि. 16 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मिळालेल्यांना मोबदल्याचे वाटप
पुणे -कोरोना महामारीमुळे सध्या सर्वांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून, अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पण त्यातून सावरण्यासाठी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत(दादा) पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला असून, या उपक्रमाची वचनपूर्ती आज माननीय दादांच्या कोथरुड कार्यालयात संपन्न झाली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर ज्यांचे हातावर पोट आहे, अशांसमोर आपल्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी अशा होतकरु व गरजू व्यक्तींना मदतीचा हात देण्याचे निश्चित केले होते. यामध्ये या गरजू व्यक्तींमधील कलागुणांच्या अनुषंगाने एक महिन्याचा रोजगार आणि त्याचा मोबदला देण्यात येणार होता. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक गरजूंनी दादांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. या सर्वांचे कलागुण जाणून त्यांना योग्य तो रोजगार मिळवून देण्याची जबाबदारी दादांनी मतदार संघाचे प्रचार आणि प्रसिद्धी प्रमुख रणजीत हगवणे आणि पक्षाच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या उल्का मोकसदार यांच्याकडे सोपवली होती. या दोघांनीही ही जबाबदारी लिलया सांभाळली. या दोघांनी त्यांच्या मुलाखती घेऊन, कौशल्य गुणाच्या अनुषंगाने रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या. आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या सर्वांना त्यांच्या मोबदल्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आणि कोथरुड विधानसभा मतदार संघाचे प्रभारी नगरसेवक राजेश येनपुरे, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पुनित जोशी, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष सुनिल गेहलोत, या उपक्रमाची जबाबदारी लिलया सांभाळलेले रणजीतजी हगवणे आणि पक्षाच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या उल्का मोकजदार, कार्यलय प्रमुख राहुल देशपांडे उपस्थित होते.
मुद्रांक शुल्कातील कपातीनंतर प्रथमच सादर झालेल्या प्रकल्पास उत्साहपूर्ण प्रतिसाद
– ‘महिंद्रा हॅपीनेस्ट®’तर्फे या उद्योगातील पहिल्या, पूर्णपणे एकत्रिकृत डिजिटल प्लॅटफॉर्ममधून झाले घरखरेदीचे व्यवहार; प्रत्यक्ष भेट देण्याची आवश्यकता संपुष्टात
– ‘हॅपीनेस्ट पालघर’ हा ‘एमएमआर’मधील पहिला ‘एनर्जी पार्क’ असलेला निवासी प्रकल्प
मुंबई, 17 सप्टेंबर, 2020 : महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लि. या कंपनीच्या परवडणाऱ्या घरांच्या ‘महिंद्रा हॅपीनेस्ट®’ या मालिकेतील दुसरा प्रकल्प पालघर येथे डिजिटल पद्धतीने यशस्वीपणे सादर करण्यात आल्याचे आज घोषित करण्यात आले. पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा असून निवासी प्रकल्पांसाठीचे ते नव्याने उदयास येणारे ते ठिकाण आहे. हा प्रकल्प सादर झाल्यापासून येथील शंभराहून अधिक घरांची विक्री केवळ एका आठवड्यात ऑनलाईन पद्धतीने झाली. याकरीता एका ‘टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म’चा आधार घेण्यात आला. या प्लॅटफॉर्मवरून घर खरेदी करणे हा ग्राहकांसाठी एक अद्वितीय, स्पर्शविरहित व्यवहाराचा अनुभव ठरला. महिंद्रा लाईफस्पेसिस® व रिअल इस्टेट उद्योगासाठी तंत्रज्ञानातील सोल्युशन पुरवणाऱ्या ‘सेल डॉट डू’ या आघाडीच्या कंपनीने हा प्लॅटफॉर्म संयुक्तपणे उभारला आहे.
‘मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन’मधील (एमएमआर) अशा स्वरुपाचा पहिलाच निवासी प्रकल्प असलेल्या ‘हॅपीनेस्ट पालघर’मध्ये सुंदर घरांच्या बरोबर ‘एनर्जी पार्क’ही देण्यात आले आहे. तेथे सर्व वयोगटातील रहिवाशांकरीता काळजीपूर्वक निवडलेल्या तीस मैदानी कसरतींचा समावेश आहे. या अद्वितीय कसरतींमधून सर्वांगाला व्यायाम होतोच, त्याशिवाय हालचालींमधून कौशल्य वाढ, ताकद, संतुलन व शारिरीक समन्वय यांच्यात वाढ होते. ‘हॅपिनेस्ट पालघर’मधील घरांची खरेदी केलेल्यांनी व्यवहाराची प्रक्रिया घरातूनच आपल्या सोयीने संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केली आहे. प्रकल्पातील घरांची निवड करण्यापासून प्रकल्प अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, कागदपत्रे दाखल करणे, पेमेंट करणे या सर्व बाबी या ग्राहकांनी डिजिटल पद्धतीने, स्पर्शविरहित सुविधांच्या सहाय्याने पार पाडल्या.
‘महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लि.’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद सुब्रमण्यन म्हणाले, “ग्राहकांच्या वाढत्या गरजा ओळखून त्यानुसार आम्ही आमच्या प्रकल्पांमधील घरांत सतत नवनवीन बदल करीत असतो. त्यातून त्यांना घरखरेदीचा अत्युकृष्ट अनुभव देऊ करतो. घरांची प्रत्यक्षपणे विक्री करण्याच्या प्रक्रियेत, घरांचा शोध ऑनलाईन स्वरुपात घेऊन खरेदीचा अंतिम निर्णय हा साईटवर प्रत्यक्ष जाऊन घर पाहिल्यावर, तसेच साईटवरील विक्री व्यवस्थापकाशी समोरासमोर बसून चर्चा करून होत असतो. आता मात्र ग्राहकांचे लोकसंख्याशास्त्र, त्यांचा दृष्टीकोन व सवयी यांच्यात बदल झाल्याने ऑनलाइन घरखरेदी प्रत्यक्षात घडून आली आहे. ‘हॅपीनेस्ट पालघर’च्या केवळ डिजिटल स्वरुपातच झालेल्या सादरीकरणाला मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद पाहता, ही बाब सिद्ध होते. भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये प्रथमच, विक्रीचा व्यवहार वैयक्तिकृत, ‘मोबाइल-फर्स्ट’ तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केला जात आहे. साईटवर प्रत्यक्ष भेट किंवा व्यवस्थापकाशी समोरासमोरच्या बैठका यांची गरज यामध्ये उरली नाही. निरोगी, नैसर्गिक परिसरामध्ये सामाजिक व सांस्कृतिक समन्वयास महत्त्व देणाऱ्या समुदायात विश्वसनीय विकसकाने बांधलेल्या उच्च-गुणवत्तेच्या घरांना मागणी मोठ्या प्रमाणावर असते, हे गृहीतक ‘हॅपीनेस्ट पालघर’च्या यशातून प्रमाणित होते.”
75 टक्के मोकळी जागा, एक मियावाकी जंगल, 600 हून अधिक झाडे, एक पर्यावरणीय तलाव, फळ बाग, सुगंधी बगीचा आणि अनेकविध उच्च-ऊर्जा उपक्रम होणारा भाग असे वातावरण असलेला ‘हॅपीनेस्ट पालघर’ हा प्रकल्प, कुटुंबांना ताजेतवाने होण्याची आणि घराबाहेर चांगल्या प्रकारे वेळ घालवण्याची संधी देतो आणि त्याचवेळी शहरांशी जोडून घेण्याची सुविधाही देतो. ‘हॅपीनेस्ट पालघर’चा पहिला टप्पा 3.94 एकरवर पसरलेला आहे. यात तळमजला अधिक 4 मजले अशा चार इमारती असून 450 हून अधिक ‘स्टुडिओ’ व ‘वन-बीएचके’ अपार्टमेंट आहेत. 157.48 चौरस फूटांपासून 390.51 चौरस फुटांपर्यंतची चटई क्षेत्र असलेली घरे या प्रकल्पात आहेत. ‘हॅपीनेस्ट पालघर’मधील घरांच्या किंमती 9.45 लाख रुपयांपासून सुरू होतात. या किमतीमध्ये मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, जीएसटी व एक वर्षांचा देखभाल खर्च यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, ‘हॅपीनेस्ट पालघर’मधील सर्व ग्राहकांना मल्टिप्लायर रिबेट प्लॅन’ (एमआरपी)चे फायदे मिळू शकतील. यातून त्यांना लवकर नोंदणी केल्यास अतिरिक्त सवलती मिळतील.
पालघर हे ऐतिहासिक स्थळे, समुद्रकिनारे, धबधबे, तलाव, किल्ले आणि धरणे या पर्यटनविषयक गोष्टींनी समृद्ध आहे आणि तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे त्यास औद्योगिक महत्त्वही लाभले आहे. पालघरला एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे आणि जगप्रसिद्ध वारली कलाप्रकाराचे हे घर आहे. नवीन नगरविकासाच्या योजना, विरार ते डहाणू रोड या दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे प्रस्तावित चौपदरीकरण आणि मुंबई व अहमदाबादला जोडणारी नियोजित वेगवान रेल्वे यांमुळे जलदगतीने वाढणारे व सर्व बाजूंनी व्यवस्थित जोडले गेलेले केंद्रस्थान म्हणून पालघरच्या आकर्षणात भर पडत आहे. पालघरमध्ये हवामान थंड (2-3 अंश सेल्सियसने) आणि हवेच्या प्रदूषणाची पातळी 50 टक्क्यांनी कमी आहे.
‘हॅपीनेस्ट पालघर’मधील रहिवाशांना पालघर रेल्वे स्थानक आणि प्रस्तावित खराळे रोड स्थानक या दोन्ही ठिकाणी जाणे सोयीस्कर आहे. आगामी जिल्हा प्रशासकीय केंद्रापासून हा प्रकल्प अवघ्या दोन किमी अंतरावर असून बँका, एटीएम, किराणा बाजार, शॉपिंग सेंटर्स, आरोग्य सेवा, शैक्षणिक संस्था आणि हॉटेल्स व रेस्टॉरंट्सच्या यांच्या सानिध्यात ते आहे.
‘हॅपीनेस्ट पालघर’मधील रहिवाशांना रिटेल आर्केड, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा स्वतंत्र भाग, कॅम्पिंग डेक, इनडोअर गेम्स एरिया, गेमिंग झोन, जिम, लाईफ-साइज रूफटॉप बोर्ड गेम्स, कम्युनिटी हॉल असलेले क्लब हाऊस, एव्ही रूम आणि 24/7 सीसीटीव्ही मॉनिटरींग यांसह अनेक वैशिष्ट्ये आणि सुविधा उपलब्ध असतील. याव्यतिरिक्त, ‘मायसिरीज’ ऑफरद्वारे एक मिनी थिएटर, गेस्टरूम, लॉन्ड्री सेवा किंवा हॉबी रूम या सुविधांच्या संचापैकी एक निवडण्याची मुभा घरखरेदीदारांना आहे. ग्राहकांची निवड व आर्थिक व्यवहार्यतेच्या निकषावर सुविधांचा अंतिम सेट सह-निर्मिती व वापरागणिक पैसे या तत्वांवर उपलब्ध होईल.
‘महिंद्रा हॅपीनेस्ट’च्या पर्यावरण-अनुकूल जीवनशैलीनुसार, ‘हॅपीनेस्ट पालघर’ हा प्रकल्पदेखील ‘आयजीबीसी ग्रीन होम्स’ प्रमाणित आहे, तसेच भरपूर सूर्यप्रकाश व नैसर्गिक वायुवीजन यांच्या दृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे. प्रकल्पातील घरमालक जल-कार्यक्षम जोडणी, उर्जाबचतीसाठी एलईडी आणि सौर पथदिवे यांद्वारे खर्चाची बचत करू शकतात. ‘हॅपीनेस्ट पालघर’मध्ये सांडपाणी पुनर्वापरासाठी एसटीपी, एक सेंद्रिय कचरा प्रक्रिया केंद्र आणि भूजल पातळी वाढण्यासाठी प्रगत ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर’ समाविष्ट आहे. दिव्यांगांसाठी खास रचना येथे करण्यात आल्या आहेत. प्रकल्पासाठी लागणारे सर्व बांधकाम साहित्य हे 250 किमी त्रिज्येच्या क्षेत्रात उपलब्ध असणारे वापरण्यात येणार आहे. त्यामुळे येथील कार्बनचे उत्सर्जन 60 टक्क्यांनी कमी होईल.
‘हॅपीनेस्ट’ प्रकल्प पालघर महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणामध्ये (“महारेरा”) ** नोंदणीकृत आहे. सर्व ‘महिंद्रा हॅपीनेस्ट®’ची घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्रता निकष पूर्ण करतात. त्या आधारावर पात्र ग्राहक कर्ज व्याज अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.
‘महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लि.’विषयी
महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड हा 19.4 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या महिंद्रा समुहाचा रिअल इस्टेट व पायाभूत सुविधा विकसनाचा व्यवसाय आहे. भारतातील शाश्वत शहरीकरणात ही कंपनी अग्रेसर आहे. 1994 मध्ये तिची स्थापना करण्यात आली. ‘महिंद्रा लाइफस्पेसिस®’ आणि ‘हॅपीनेस्ट®’ या ब्रँड्सअंतर्गत निवासी घरांच्या विकसनाद्वारे आणि ‘महिंद्रा वर्ल्ड सिटी’ आणि ‘ओरिजिन्स बाय महिंद्रा वर्ल्ड सिटी’ या शहरे व उद्योग यांच्या एकत्रित वसाहतींद्वारे, भारतातील शहरांचे रुपांतर रमणीय प्रदेशांमध्ये करण्यास ही कंपनी कटिबद्ध आहे
देशातील सात शहरांमध्ये 25.3 दशलक्ष चौरस फूट ( 2.3 दशलक्ष चौरस मीटर) इतक्या क्षेत्रावर पूर्ण झालेल्या, चालू अवस्थेतील आणि आगामी स्वरुपाच्या निवासी प्रकल्पांचे कंपनीचे बांधकाम विस्तारलेले आहे; तसेच शहरे व उद्योग यांच्या एकत्रित वसाहती उभारण्याचे / व्यवस्थापनाचे कामही 5 हजार एकरहून अधिक जागेवर चार ठिकाणी सुरू आहे.
हरीत घरांच्या चळवळीची प्रणेती असलेली ‘महिंद्र लाइफस्पेसिस®’ ही कंपनी, जागतिक विज्ञान आधारित लक्ष्य उपक्रमासाठी (एसबीटीआय) कटिबद्ध असलेल्या भारतातील अव्वल रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक आहे. विचारपूर्वक केलेले डिझाइन आणि स्वागतार्ह वातावरण ही वैशिष्ट्ये बाळगून कंपनीचा विकास झालेला असल्याने येथील व्यक्ती आणि उद्योग या दोन्हींच्या जीवनमानात उन्नती साधली जाते.
‘ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूट’च्या ‘ग्रेट मिड-साइज वर्कप्लेस-2019’ यादीमध्ये ‘महिंद्रा लाइफस्पेसिस®’ 17 व्या क्रमांकावर आहे.Www.mahindralifespaces.com या वेबसाईटवर ‘महिंद्रा लाइफस्पेसिस®’ बद्दल अधिक जाणून घ्या.
‘महिंद्रा’ विषयी
महिंद्रा समूह हा 19.4 अब्ज डॉलर्स इतकी उलाढाल असलेला अनेक कंपन्यांचा समूह आहे. हा समूह लोकांना नवीन समृद्ध ’मोबिलिटी सोल्यूशन्स’ देऊन ग्रामीण भागात समृद्धी आणण्यास तसेच शहरी नागरिकांचे राहणीमान वाढविण्यास मदत करतो. नवीन व्यवसायांचे व्यवस्थापन आणि समाजोपयोगी कार्येही हा समूह करीत असतो. भारतात युटिलिटी वाहनांचे उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, आर्थिक सेवा आणि पर्यटन स्थळांच्या क्षेत्रातील उद्योग यांमध्ये या समुहाचे नाव अग्रभागी आहे. महिंद्र ही जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे. या समुहाच्या अन्य व्यवसायांमध्ये अपारंपारीक उर्जा, कृषी व्यवसाय, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट विकसन या उद्योगांचा समावेश आहे. भारतातच मुख्यालय असलेला महिंद्र उद्योग समूह 100 देशांमध्ये 2,56,000 पेक्षा अधिक लोकांना रोजगार देतो.
पुणे- माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं असं काहीजणांना वाटत असून काही लोक तसा प्रयत्न करत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे यशस्वी होणार नाहीत असंही ते म्हणाले आहेत. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
“जेव्हा तुम्ही लोकांना समजावू शकत नाही तेव्हा त्यांना गोंधळात टाका असा एक सिद्धांत आहे. मग कसंही करुन हे मागच्या सरकारच्या माथी कसं मारायचं सुरु होतं. दुर्दैवाने हे बोलणं मला शोभत नाही पण आज स्पष्टपणे सांगतो. काही बोटावर मोजण्याइतके लोक आहेत ज्यांना असं वाटतं की, माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं. काहीजण असा प्रयत्न करतात. पण मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे यशस्वी होणार नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. हा निर्णय मलाही पटलेला नाही. हा निर्णय धक्कादायक आहे. या निर्णयावर सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असं सांगतानाच काही लोक आता या विषयावर राजकारण करत असून केंद्राकडे बोट दाखवत आहेत. खरेतर हा राज्याचा कायदा आहे. त्यामुळे केंद्राचा संबंध येतोच कुठे?, असा सवालही त्यांनी केला.
पुणे, दि.17 सप्टेंबर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयाला मेडिकल कीटचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रत्येकी 500 एन95 मास्क, सॅनिटायझर व पीपीई कीट आहेत. माजी खासदार संजय काकडे यांच्या हस्ते या मेडिकल कीटचे वाटप करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर व इतर संलग्न वैद्यकीय कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. कोरोनाच्या लढाईत त्यांचे आरोग्यदेखील अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांची सुरक्षा व्हावी म्हणून त्यांना एन95 मास्क, पीपीई कीट व सॅनिटायझर देण्यात आले आहे. याप्रसंगी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार सिंग, बॉम्बे सपायर्सचे कमांडिंग ऑफिसर अनिरुद्ध सूर्यवंशी, पीएमपीएमएल चे संचालक शंकर पवार, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक दुर्योधन भापकर, अभय सावंत, मनीष आनंद, कमलेश चासकर, कार्तिकी हिवरकर, पुणे महापालिकेचे नगरसेवक राहुल भंडारी, भाजपा माथाडी कामगार संघटनेचे तुषार पाटील,अनंत खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी नगरसेवक राहुल भंडारी यांच्या वतीने मान्यवरांना माजी खासदार संजय काकडे यांच्या हस्ते भगवत गीता भेट देण्यात आली.
पुणे (प्रतिनिधी)-महापालिकेने साकारलेले बाणेर डेडीकेटेड कोविड रुग्णालय येत्या सोमवारपासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले जात असून सोमवारपासून सर्वच्या सर्व म्हणजे ३१४ बेड्स उपचारांसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यात २७२ ऑक्सिजन तर ४२ आयसीयू बेड्स असणार आहेत’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
बाणेर येथील पुणे महापालिकेच्या डेडीकेटेड कोविड रुग्णालयाला महापौर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन आढावा बैठक घेतली. आढावा घेताना उपचार, जेवण, औषधे आणि इतर व्यवस्थांची माहितीही महापौरांनी घेतली. सर्व व्यवस्थांबाबत रुग्ण आणि नातेवाईक समाधानी आहेत. महापौर मोहोळ यांनी विविध सूचनाही यावेळी प्रशासनाला दिल्या. यावेळी आयुक्त विक्रम कुमार, नगसेविका ज्योतीताई कळमकर, स्वप्नाली सायकर, गणेश कळमकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, उपायुक्त नितीन उदास, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांच्यासह रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि महापालिकेचे विविध अधिकारी समवेत होते.
महापौर मोहोळ म्हणाले, ‘बाणेर रुग्णालयासाठी एकूण २६ व्हेंटिलेटर उपलब्ध झाले असून त्यापैकी १५ कार्यान्वित झाले आहेत, तर येत्या दोन दिवसांत आणखी एक व्हेंटिलेटर उपलब्ध होईल. महापालिकेच्या ०२०-२५५००२११० या क्रमांकावर नोंदणी केले जाणाऱ्या रुग्णांना या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले जात आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी ५६ डॉक्टर्स, ५७ नर्स आणि ५१ मदतनीस उपलब्ध आहेत. आजपर्यंत या रुग्णालयात १०५ रुग्ण दाखल झाले असून सद्यस्थितीत ८ रुग्ण आयसीयूमध्ये तर ७० रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत’
‘रुग्णांच्या उपचारासाठी सेंट्रलाईझ पद्धतीने मॉनिटरिंग सिस्टीम ‘जम्बो’प्रमाणे या रुग्णालयातही बसवण्याच्या सूचना दिल्या असून याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासही सांगितले आहे. शिवाय नातेवाईकांना रुग्णांशी संवाद साधता यावा, साठी नातेवाईक कक्षात रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरसिंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा सूचनाही तातडीने दिल्या आहेत’, असेही महापौर म्हणाले.
१६ कोरोनाबाधित बरे होऊन घरी…
बाणेरच्या रुग्णालयातून आजवर १६ कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आले असून या केंद्रावर उत्तम उपचार आणि सुविधा उपलब्ध असल्याचे डिस्चार्ज रुग्ण सांगत आहेत.
गृह मंत्रालयाच्या 1 मे 2020 च्या निर्देशांनुसार आणि राज्य सरकारच्या विनंतीनुसार भारतीय रेल्वेने 1 मे 2020 पासून श्रमिक स्पेशल गाड्या सुरू केल्या. प्रवासी सेवा हळूहळू पुन्हा सुरू करण्यासाठी भारतीय रेल्वेने 12 मे 2020 पासून 15 विशेष गाड्यांच्या जोड्या आणि 1 जून 2020 पासून 100 विशेष गाड्यांच्या जोड्या सुरू करून प्रवासी रेल्वे सेवा पुन्हा सुरू केली. त्यानंतर 12 सप्टेंबर 2020 पासून 43 विशेष गाड्यांच्या जोड्या सुरू करण्यात आल्या. सध्या विशेष रेल्वे गाड्या मर्यादित थांब्यांसह सुरु आहेत. कोविड 19 नियमांचे व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी राज्य सरकारच्या सूचना लक्षात घेऊन मर्यादित थांब्यांसह केवळ विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊनच्या संकटाच्या काळात भारतीय रेल्वेने 5231 नॉन-एसी आयसीएफ डब्यांना तात्पुरत्या कोविड-19 आयसोलेशन युनिट मध्ये रूपांतरित केले होते. मध्य रेल्वे विभागाने 482 तर पश्चिम रेल्वे विभागाने 410 डब्यांचे अलगीकरण डब्यात रूपांतर केले.आवश्यकतेनुसार, 12 सप्टेंबर 2020 रोजी 813 डबे राज्य सरकारांना पुरविण्यात आले आहेत. या डब्यांची अलगीकरण डबे म्हणून असलेली गरज पूर्ण झाल्यावर त्यांना पुन्हा प्रवासी रेल्वे डब्यांमध्ये रूपांतरित केले जाणार आहे.
रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
सध्याच्या काळात सुरू असलेली जागतिक महामारी आणि वृद्धाश्रम चालवणाऱ्या संस्थांकडे हे आश्रम चालवण्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने या संस्थांना आगाऊ अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थांना 2020-21 या वर्षात यापूर्वीच रु. 83.74 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत देण्यात आला आहे.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय ज्येष्ठ नागरिकांसाठी एक राष्ट्रीय कृती योजनेची अंमलबजावणी करत असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या एकात्मिक कार्यक्रमाचा समावेश आहे. या कार्यक्रमाअंतर्गत वृद्धाश्रम चालवणाऱ्या राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश प्रशासन( नोंदणीकृत सोसायट्यांच्या माध्यमातून)/पंचायती राज संस्था/ स्थानिक संस्था, बिगर सरकारी संघटना(एनजीओ)/ स्वयंसेवी संघटना, यांसारख्या संस्थांना अनुदान देण्यात येते.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात आज राज्यसभेत ही माहिती दिली.
पुणे विभागातील 2 लाख 58 हजार 182 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले विभागात कोरोना बाधित 3 लाख 43 हजार 94 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव पुणे,दि. 16 :- पुणे विभागातील 2 लाख 58 हजार 182 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 43 हजार 94 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 75 हजार 987 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 8 हजार 925 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.60 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.25 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 31 हजार 196 रुग्णांपैकी 1 लाख 84 हजार 649 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 41 हजार 366 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 181 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.87 टक्के आहे. सातारा जिल्हा सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 25 हजार 476 रुग्णांपैकी 16 हजार 524 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 227 आहे. कोरोनाबाधित एकूण 725 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 25 हजार 929 रुग्णांपैकी 17 हजार 965 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 999 आहे. कोरोनाबाधित एकूण 965 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हा सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 24 हजार 788 रुग्णांपैकी 14 हजार 762 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 95 आहे. कोरोनाबाधित एकूण 931 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 35 हजार 705 रुग्णांपैकी 24 हजार 282 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 300 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 123 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 699 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 889, सातारा जिल्ह्यात 898, सोलापूर जिल्ह्यात 543, सांगली जिल्ह्यात 749 तर कोल्हापूर जिल्ह्यात 620 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. पुणे विभागातील सर्व्हेक्षण आजपर्यत विभागामध्ये एकुण 15 लाख 13 हजार 870 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 43 हजार 94 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. ( टिप :- दि. 15 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
अपना घर ड्रीमझ’ कर्ज योजनेत 2 लाख ते 30 लाखांपर्यंतचे कर्जवितरण
पुणे, 16 सप्टेंबर, 2020: आयसीआयसीआय होम फायनान्स (आयसीआयसीआय एचएफसी) या कंपनीने सुतार, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, शिंपी, पेंटर, वेल्डर, ऑटो मॅकेनिक, उत्पादन क्षेत्रातील यंत्रांवरील ऑपरेटर (उदा. लेथ, सीएनसी), तसेच लॅपटॉप, संगणक, आरओ यांची दुरुस्ती करणारे तंत्रज्ञ, त्याचप्रमाणे लघु व मध्यम व्यवसायांचे मालक, किराणा दुकानदार आदी शहरातील कुशल व्यावसायिकांसाठी ‘अपना घर ड्रीमझ’ ही नवीन सूक्ष्म गृहकर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेत कर्जाऊ रक्कम 2 ते 30 लाखांपर्यंतची आहे. ज्यांना स्वतःचे घर विकत घ्यायचे आहे; परंतु औपचारिक वित्तीय संस्थांकडे सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे असू शकत नाहीत, अशा असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी ‘अपना घर ड्रीमझ’ गृहकर्ज ही योजना खास काढण्यात आली आहे.
‘अपना घर ड्रीमझ’ गृहकर्ज योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना त्यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड, मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट ही कागदपत्रे द्यावी लागतील, तसेच 5 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 1500 रु. आणि 5 लाखांपुढील कर्जासाठी 3000 रु. इतकी रक्कम आपल्या खात्यात किमान शिल्लक स्वरुपात राखावी लागेल. रहिवासी आपल्या जवळच्या ‘आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी’च्या शाखेत जाऊन खास 20 वर्षांच्या मुदतीच्या सूक्ष्म गृहकर्जाचा लाभ घेऊ शकतील. पुण्यात कंपनीच्या शाखा शिवाजीनगर येथे, 1187/22, व्यंकटेश मेहेर, दुसरा मजला, घोले रोड, पुणे – 411005 आणि वाकड येथे कार्यालय क्र. 101, पहिला मजला, फॉर्च्यून बिझिनेस सेंटर, अॅम्बियन्स हॉटेल जवळ, कस्पटे वस्ती, वाकड, पुणे – 411057 येथे आहेत.
‘आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध कामानी म्हणाले, “’आयसीआयसीआय होम फायनान्स’मध्ये आम्ही अर्थव्यवस्थेतील असंघटीत क्षेत्रातील कष्टकऱ्यांचे व स्थानिक व्यावसायिकांचे अपना घर असण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आमच्या शाखांमधील कर्मचारी हे स्थानिक रहिवासी असल्यामुळे त्यांना प्रादेशिक अर्थव्यवस्थेचे आकलन असते. त्यामुळेच आमचे अंतर्गत कायदेतज्ज्ञ व तांत्रिक अधिकारी हे गृहकर्जांच्या अर्जांवर जलद गतीने, विनाअडथळा व किमान कागदपत्रांनिशी प्रक्रिया करण्यास मदत करू शकतात.”
या गृहकर्ज योजनेचा लाभ घेणारे ग्राहक ‘प्रधानमंत्री आवास’ योजनेचे (पीएमएवाय) सर्व लाभ मिळवू शकतात. यामध्ये अल्प उत्पन्न गट / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (ईडब्ल्यूएस / एलआयजी) आणि मध्यम उत्पन्न गट (एमआयजी – I आणि II) यांच्यासाठी ‘क्रेडिट-सबसिडी’ योजना (सीएलएसएस) उपलब्ध आहे. ‘पीएमएवाय – सीएलएसएस’ अंतर्गत, कर्जदार 2.67 लाख रुपयांच्या कमाल अनुदानास पात्र आहेत.
केंद्रिय गृह मंत्रालय व केंद्रिय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय यांच्यातर्फे देण्यात आलेल्या ‘कोविड-19’पासून सुरक्षिततेच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन ‘आयसीआयसीआय एचएफसीचे’ कर्मचारी व ग्राहक यांच्यासाठी करण्यात येते. शाखेत प्रवेश करण्यापूर्वी सर्व अभ्यागतांचे व कर्मचार्यांचे तपमान तपासणे, सुरक्षित अंतर सुनिश्चित करणे, शाखांचे सॅनिटायझेशन करणे, जागोजागी हॅंड सॅनिटायझर्स ठेवणे आणि प्रत्येकास फेस मास्क घालण्यास अनिवार्य करणे, ही शिस्त कंपनीच्या प्रत्येक शाखेत पाळली जाते. कंपनीच्या कर्मचाऱ्यांपैकी कोणास संसर्ग झाल्याचा संशय आल्यास, त्याला आरोग्य तपासणी करायला लावून निष्कर्ष येईपर्यंत विलग करण्यात येते, तसेच विलगीकरणासाठी / हॉस्पिटलायझेशनसाठी सर्व प्रकारची मदत करण्यात येते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ‘कॉन्टॅक्ट-ट्रेसिंग’ही केले जाते.
‘आयसीआयसीआय होम फायनान्स’बद्दल
आयसीआयसीआय होम फायनान्स (आयसीआयसीआय एचएफसी) ही ‘नॅशनल हाउसिंग बँके’मध्ये (एनएचबी) नोंदणी असलेली हाउसिंग फायनान्स कंपनी आहे. 65 वर्षे जुन्या आयसीआयसीआय समुहाचा ती एक भाग असून ‘आयसीआयसीआय बँक लिमिटेड’च्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. कोट्यवधी भारतीयांचे नवीन घर मिळवण्याचे स्वप्न साकार करण्याचे ‘आयसीआयसीआय होम फायनान्स’चे उद्दिष्ट आहे. गृहकर्जे आणि गृह सुधार कर्जे, कार्यालयीन कर्ज, सामान्य ग्राहकांना होम इक्विटी कर्जे आणि विकसकांना बांधकाम कर्जे वितरीत करणे हा या कंपनीचा प्राथमिक व्यवसाय आहे. या कर्जांशी संबंधित घरे व व्यावसायिक मालमत्तांचा शोध घेण्याची सेवाही कंपनी देऊ करते. आज, कंपनीकडे 1800 हून अधिक कर्मचारी आहेत, तसेच देशभरात 15 विभागीय कार्यालयांसह 139 स्वतंत्र शाखा आहेत.
येस बॅंकेचे एमडी व सीइओ प्रशांत कुमार यांचे प्रतिपादन
भारत हळूहळू नवीन सामान्य स्थितीत येऊ लागला आहे व अर्थव्यवस्थाही वेग धरू लागली आहे. अशा वेळी छोट्या उद्योगांना व समाज घटकांना आधार देणे अत्यावश्यक आहे, याची जाणीव येस बॅंकेला आहे. या उद्योगांना नवीन परिस्थितीशी जुळवून घेता यावे आणि त्यांनी भवितव्यासाठी सज्ज असावे, ही आपली जबाबदारी येस बॅंक ओळखून आहे.
“आम्ही आमच्या परिवर्तनाचा प्रवास मार्च 2020 मध्ये सुरू केला. येस बँकेची परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी त्यावेळी माझ्याकडे सोपविली गेली. आता पाच महिन्यांनंतर मी असे म्हणू शकतो, की ही जबाबदारी मी वैयक्तिकरित्या व व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत समाधानकारकपणे पार पाडत आहे. या संस्थेची फेररचना करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. बँक अधिक मजबूत संस्थेत परिवर्तीत करण्याच्या संकल्पात ग्राहक आणि कर्मचार्यांनी मला पाठिंबा दर्शविला आहे,’’ असे येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार यांनी म्हटले आहे.
उद्याच्या भविष्यासाठी बॅंकेचे ग्राहक व भागधारक यांचे सहकार्य घेऊन नव्या संभाव्यतेचा शोध घेण्यात येस बॅंक आघाडीवर आहे.
“हा प्रेरणादायक नवीन प्रवास सुरू केल्यावर सर्व भागधारकांची जबाबदारी आपल्यावर असल्याचे भान बॅंकेला आहे. एक संघटना म्हणून आम्ही आतापर्यंत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकलो आहोत आणि हा प्रवास करीत असताना आम्ही अनेक महत्त्वपूर्ण टप्पेही गाठले आहेत,” असे कुमार पुढे म्हणाले.
नवीन परिस्थितीमध्ये प्रगती साधण्यासाठी समुदायांना आणि लहान व्यवसायांना पाठिंबा देण्याचे धोरण बॅंकेने सुरू ठेवले आहे. समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने हे कार्य करण्यास येस बँक सुसज्ज आहे, तसेच ग्राहकांना योग्य ती मदत मिळत आहे, याची खात्री करुन घेण्यासाठी बॅंकेचे सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई, दि. 16 : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना आजारावर मात करून नेहमीच्या उत्साहात विधानभवन येथे आपल्या कार्यालयात आले.
दि. 7 व 8 सप्टेंबर, रोजी झालेल्या पावसाळी अधिवेशनाआधी त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे चाचणीमध्ये आढळून आले होते. त्यामुळे त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी स्वत:चे विलगीकरण करून उपचार घेतले. उपचारानंतर त्यांची कोरोना आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक (निगेटिव्ह) आल्यावर ते लोकसेवेच्या कार्यासाठी नेहमीच्या जोमाने आणि उत्साहाने पुन्हा सज्ज झाले.
त्यांनी गडचिरोलीतील महाविद्यालयास अनुदान उपलब्ध करून देण्यासंदर्भातील बैठक, विधानभवनातील दैनंदिन कामकाज तसेच मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. आपण लवकर बरे व्हावे यासाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.
पुणे : ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे (जीआयबीएफ) राष्ट्रीय अभियंता दिवस साजरा करण्यात आला. विविध प्रकारच्या अभियांत्रिकीच्या क्षेत्रात, तसेच कोरोना संसर्गाच्या काळात भरीव योगदान देणाऱ्या, अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला. ‘जीआयबीएफ’चे ग्लोबल प्रेसिडेंट डॉ. जितेंद्र जोशी, लीला पुनावाला फाउंडेशनच्या सहसंस्थापिका लीला पुनावाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बाणेर येथील ‘जीआयबीएफ’च्या कार्यालयात हा छोटेखानी समारंभ झाला.
कोरोनाची लक्षणे तपासण्यासाठी हजारो डॉक्टरांना उपयुक्त ठरलेले ‘कोविड कवच’ ऍप्लिकेशन बनवणाऱ्या दिमाख सहस्रबुद्धे, औषधे, रेशन किट व इतर साहित्य देऊन गरजूना दिलासा देणारे ‘इडार्च’चे डॉ. दिलीप देशपांडे, आरोग्य व्यवस्थापनात काम करणाऱ्या डॉ. अभय कुलकर्णी, ‘आयटी करिअर कौन्सिलिंग’च्या माध्यमातून हजारो लोकांना आयटीमध्ये रोजगार देणाऱ्या डॉ. दीपक शिकारपूर, क्युबिक टेकचे नितीन नायक आणि अश्विन बालवल्ली या अभियंत्यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ. जितेंद्र जोशी म्हणाले, “अभियंते राष्ट्राच्या उभारणीत महत्वाचे योगदान देतात. जागतिक स्तरावर अभियंत्यांच्या कलात्मक कामगिरीमुळे ओळख निर्माण होते. आज आपण ‘लोकल टू ग्लोबल’बाबत बोलत आहोत. हे ध्येय साध्य करण्यासाठी अभियंत्यांनी भारतीय उद्योगाला आणखी वेगळ्या उंचीवर नेण्याची आवश्यकता आहे.” लीला पुनावाला यांनीही या अभियंत्यांचे अभिनंदन केले. अभियांत्रिकी क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देणे ही चांगली गोष्ट आहे.
पुणे :देहविक्रय करणाऱ्या बुधवार पेठेतील ९९ टक्के महिलांना कोरोना साथीमुळे आलेल्या मंदीत संधी मिळाली तर पर्यायी व्यवसाय,रोजगार करण्याची इच्छा आहे,असे ‘आशा केअर ट्रस्ट’ या संस्थेच्या सर्वेक्षणात आढळले आहे. लॉकडाऊनमुळे देहविक्री करणाऱ्या व्यवसायातील ८५ टक्के महिलांनी मालक,व्यवस्थापक आणि सावकारांकडून कर्ज घेतले आहे.मात्र आता ग्राहकच नसल्याने ते फेडायचे कसे, हा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे.त्यामुळे बुधवार पेठेतील देहविक्रय करणाऱ्यांपैकी ९९ टक्के स्त्रिया उपजीविकेसाठी पर्यायांचा शोध घेऊ लागल्या आहेत.’आशा केअर ट्रस्ट’ या देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी कार्यरत संस्थेच्या पाहणीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. या संस्थेने केलेले सर्वेक्षण महापौर मुरलीधर मोहोळ यांना सादर करण्यात आले.आवश्यक पावले उचलण्याची विनंति करण्यात आली .’आशा केअर ट्रस्ट’ चे हे सर्वेक्षण महत्वपूर्ण आहे.मानवी दृष्टीकोणातून या समस्यांकडे पाहिले पाहिजे.त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत.जिल्हा प्रशासनाकडे संपर्क साधून या समस्यांमध्ये कोणते मार्ग काढता येतील ते पाहू’,असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या शिष्टमंडळाला सांगीतले. ‘आशा केअर ट्रस्ट ‘च्या शिष्टमंडळात ट्रस्टच्या अध्यक्ष शीला शेट्टी,सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे शैलेश बढाई,महाराष्ट्र इंटक कामगार संघटनेचे योगेश भोकरे,सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे,पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे फय्याज शेख,भोला वांजळे,एड. विद्या पेडणेकर यांचा समावेश होता.
बुधवार पेठ ही पुण्यातली सर्वात मोठी तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांची वसाहत आहे. या भागात सुमारे सातशे कुंटणखाने आणि जवळपास ३ हजार देहविक्रेत्या स्त्रिया असल्याचे सांगितले जाते. यातल्या तीनशे स्त्रियांचा अभ्यास करण्यात आला. यातल्या ८७ टक्के महिलांनी सांगितले की, कोरोनाची साथ येण्यापूर्वीही त्यांना देहविक्रयातून कुटुंबाचे पालनपोषण करण्याइतपतही उत्पन्न मिळत नव्हते. मात्र शिक्षणाचा अभाव,रोजगाराच्या कौशल्यांची उणीव आणि परतीचे मार्ग खुंटल्यामुळे त्यांना या नरकात खितपत पडावे लागले. कोरोनाच्या साथीनंतर मूळच्याच तुटपुंज्या उत्पन्नातही मोठी घट झाली.त्यामुळे आता अवस्था बिकट झाली आहे.त्यातूनच कर्जाचे ओझे वाढले आहे. परिणामी बहुतेक सर्वच स्त्रियांना पर्यायी काम-व्यवसायाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले आहे.या महिलांपैकी ८२ टक्के महिला २५ ते ४५ या वयोगटातील आहेत.८४ टक्के महिला अशिक्षित आहेत.त्यातील १६ टक्के मुलींना शालेय शिक्षण पूर्ण होण्याआधीच ते सोडून या व्यवसायात ढकलले गेले.८४ टक्के महिलांना या परिस्थितीत देहविक्रय करण्याची भीती वाटते. मात्र,कुंटणखाना चालकांकडून येणाऱ्या दबावामुळे आणि उपजीविकेच्या प्रश्नामुळे पर्याय राहत नाही.६८ टक्के महिलांना वाटते कि व्यवसाय पुन्हा तग धरेल.संधी मिळाली तर पर्यायी काम करण्याची ९९ टक्के महिलांची तयारी आहे. आशा केअर ट्रस्ट च्या अध्यक्ष शीला शेट्टी म्हणाल्या,’कोरोना विषाणू साथीमुळे देहविक्रय करणाऱ्या महिलांचे पुनर्वसन करण्याची संधी आहे.ज्या महिलांना नाईलाजाने हा व्यवसाय निवडावा लागलेला आहे,ज्या महिला जबरदस्तीने या व्यवसायात ढकलल्या गेल्या आहेत,त्यांना कर्जाच्या सापळ्यातून मुक्त करण्यासाठी ट्रॅफिकिंग व्हिक्टीम रिलीफ फंड दिला गेला पाहिजे.आणि आयुष्याची नवी दिशा दाखवली पाहिजे.महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या समस्या सोडवणुकीसंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.जिल्हा प्रशासनही आवश्यक पावले उचलेल अशी आशा आहे’ राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन अंतर्गत महिलांसाठी टेलरिंग,डाटा एन्ट्री,टेलिकॉलिंग,विक्री व विपणन,पॅकेजिंग,उद्योजकता आदी व्यावसायिक कौशल्यांवर आधारित मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रम देहविक्रेत्या स्त्रियांसाठी राबविता येतील,असे अहवालात सूचित करण्यात आले आहे.याच महिलांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या’फ्रिडम’ संस्थेच्या म्हणण्यानुसार देहविक्रय व्यवसायातील या महिलांना आधीपासून अनेक यातनांना सामोरे जावे लागत आहे,त्यांना पर्यायी पुनर्वसनाची संधी दिली पाहिजे.सामाजिक संस्था आणि सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.कोविडमुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे . या महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्था राज्य सरकारकडेही हे प्रश्न मांडणार आहेत.
मिटसॉगतर्फे ऑनलाईन ‘यूपीएससी-2019 यशस्वितांचा 12वा राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन सत्कार व परिषदेचे उद्घाटन
पुणे, 16 सप्टेंबरः “ भारताला विश्व गुरू बनविण्यासाठी प्रशासकीय अधिकार्यांनी आपल्या सेवेत पारदर्शकता, प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, मानवता आणि प्रगतीसाठी सदैव सहभागी व्हावे. तसेच, प्रशासकीय सेवेमध्ये कधीही शॉट कटचा वापर करू नये.” असा सल्ला केंद्रीय प्रशासकीय अधिकरणाचे अध्यक्ष व पटणा उच्च न्यायालयाचे माजी न्या.एल. नरसिंम्हा रेड्डी यांनी दिला. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग), पुणेतर्फे यूपीएससी स्पर्धा परीक्षा-2019 मधील यशस्वितांच्या 12 व्या राष्ट्रीय स्तरावरील सत्कार आणि प्रोत्साहन सोहळा व ‘प्रशासकीय सेवेच्या परिक्षेची तयारी कशी करावी आणि प्रशासकीय सेवेसमोरील आव्हाने’ या विषयावरील चार दिवसीय परिषदेच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी लाला बहाद्दुर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिस्ट्रेशनचे संचालक डॉ. संजीव चोपडा, लोकसभेचे माजी महासचिव अनूप मिश्रा, नवी दिल्ली येथील मनोहर पर्रीकर इन्स्टीट्यूट फॉर डिफेन्स स्टडी अँड अॅनॅलिसेसचे संचालक सूजान चिनॉय व भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. एव्हीएस रमेश चंद्रा हे प्रमुख सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ.एन.टी. राव, मिटसॉगचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील व सहयोगी संचालिका प्रा. डॉ. शैलश्री हरिदास हे उपस्थित होते. यूपीएससी 2019 मध्ये भारतात प्रथम आलेला प्रदिप सिंग याला रूपये 51 हजाराचे पारितोषिक व सन्मानपत्र त्यांना पाठविण्यात येणार आहे. न्या.एल. नरसिंम्हा रेड्डी म्हणाले,“ प्रशासकीय अधिकार्यांकडे मोठ्या प्रमाणात अधिकार असतात. त्याचा योग्य वापर करून प्रत्येकाने समर्पण भावाने कार्य करावे. समर्पण भाव हा अत्यंत महत्वाचा आहे, कुटुंबाची पर्वा न करता भारतीय सैनिक सीमेवर जी सेवा देतात तशी सेवा दयावी. या सेवेत पैशाला अधिक महत्व न देता सेवा महत्वाची आहे.” यूपीएससी 2019 मध्ये प्रथम रैंक प्राप्त करणारे प्रदिप सिंग म्हणाले, इंजिनियरींग केल्यानंतर 2016 मध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही. मन खचल्यामुळे वडिलांनी व मित्रांनी प्रोत्साहन दिले. कठोर परिश्रमाच्या जोरावर भारतात प्रथम आलो. या परिक्षेची तयारी करतांना स्मार्ट वर्क बरोबर रोज तीन तास मन लावून अभ्यास करावा. दृढ निश्चय व अभ्यासात सातत्य ठेवल्याने यश तुम्ही खेचून आणू शकता. ए.व्ही.एस रमेश चंद्रा म्हणाले,“प्रशासकीय सेवा करतांना पारदर्शकता, समर्पण आणि परिश्रमेच्या भावनेने सेवा करावी. सिव्हील सर्व्हिसमध्ये चांगले कर्मयोगी बना, तुम्ही अशी सेवा करा ज्याने समाजाची प्रगती होईल. आपल्या देशाने वसुधैव कुटुम्बकमची शिकवण दिली आहे, ती गोष्ट लक्षात असू दयावी. सध्या कोविड 19 च्या काळात भारताची स्थिती संपूर्णपणे वेगळी झाली आहे.” अनूप मिश्रा म्हणाले,“ बाहुबली बनून या सेवेत सर्वांचा आदर, मानवता आणि स्मित हास्य चेहरा ठेवून कार्य करावे. त्यासाठी कठीण परिश्रम आणि समर्पणाचे गुण आपल्या अंगी भिनवावे. या क्षेत्रात का आलो हे ओळखून सार्वजनिक सेवेचे व्रत हे महत्वाचे आहे, याचे भान ठेवावे. जीवनात बरेच प्रलोभने येतील या पासून सर्वांनी सावध रहावे.” सुजॉन चिनॉय म्हणाले,“ देशातील सर्वात शेवटच्या मानवाचा विकास झाला पाहिजे हे सूत्र धारण करून प्रशासकीय सेवा करावी. सर्वांचा विकास हा मंत्र काम करतांना सदैव लक्षात असावा. सध्या या देशात सायबर सुरक्षेवर खूप मोठ्या प्रमाणात कार्य होणे गरजचे आहे.” राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ देशातील सर्व यूपीएससीतील यशस्वीतींचा सत्कार कार्यक्रमाने आज एक तप पूर्ण केला आहे. लॉकडाउनच्या काळात डॉक्टर आणि प्रशासकीय लोकांची सर्वात मोठी भूमिका आहे. भविष्यात प्रशासकीय स्तरावरील लोकांना घेऊन समाजात काही नवीन पॉलिसी स्तरावर कार्यकरण्याचा मानस आहे. आज आपल्या माध्यमातून देशाला चांगले प्रशासक मिळाले आहेत. जगात भारतीय प्रशासकीय सेवा ही सर्वात चांगली आहे.”प्रा. डॉ. शैलश्री हरिदास यांनी प्रस्ताविक केले.प्रा.डॉ. एन.टी.राव व रविंद्रनाथ पाटील यांनी डब्ल्यूपीयूची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा.डॉ. गौतम बापट व विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा. डी.पी.आपटे यांनी आभार मानले.