Home Blog Page 2454

‘इंडिया फाइट्स’ कोरोना;अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्याला सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार

0

नवी दिल्ली, दि. १७ : पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज प्रदान केला.

विश्वकर्मा जयंती दिनानिमित्त भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) च्यावतीने दुसऱ्या ‘विश्वकर्मा’ पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन दूरदृश्यप्रणालीच्या व्दारे करण्यात आले. एआयसीटीई अंतर्गत असणाऱ्या देशातील विविध संस्थांना  14 श्रेणींमध्ये 34 संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थांना विशिष्ट क्षेत्रात त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी प्रोत्साहित करणे, मान्यता देण्यासाठी या पुरस्काराने गौरविण्यात येते. यामुळे समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते.

यावेळी श्री. पोखरियाल म्हणाले, भारतात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता महामारीपासून नागरिकांचे संरक्षण करण्याचे महत्त्वपूर्ण आव्हान सध्या देशासमोर आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी तांत्रिक संस्था संशोधनाव्दारे मदत करीत आहेत.  त्यामुळेच विश्वकर्मा पुरस्कार 2020 या वर्षाची संकल्पना ‘इंडिया फाइट्स’ कोरोना अशी ठेवली आहे.

संपूर्ण 14 श्रेणींतील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणेला सन्मानित  करण्यात आले. यासह या महाविद्यालयाला  दुसऱ्या श्रेणीतील दुसरा पुरस्कारही प्राप्त झाला. दुसऱ्या श्रेणीतील तिसरा पुरस्कार पुण्यातीलच डॉ. डी.वाय.पाटील, औषध विज्ञान आणि संशोधन संस्थेला प्रदान करण्यात आला. सहाव्या श्रेणीतील दुसरा पुरस्कार औरंगाबादमधील महात्मा गांधी मिशन, जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी विद्यालयाला प्रदान करण्यात आला.   नवव्या आणि अकराव्या श्रेणीतील क्रमश: दुसरा आणि तिसरा पुरस्कार पुण्यातील विश्वकर्मा तांत्रिक संस्थेने पटकावला आहे.  असे एकूण 8 पुरस्कार महाराष्ट्राने पटकाविले आहे.

विविध 14 श्रेणींसाठी 33 संस्थांची निवड करण्यात आली. यासाठी 900 हून अधिक संस्थांची नोंदणी झाली होती.  या श्रेणीमध्ये आसपासच्या परिसरातील आयोजित जनजागृती कार्यक्रम, समुपदेशन / टेली समर्थन प्रदान, सामुग्री / उत्पादन – उत्पादित / विकसित (उदा. मास्क , सॅनिटायझर, व्हेंटिलेटर इ.), साहित्य / उत्पादन वितरीत (उदा. मास्क ,  सॅनिटायझर, साबण, अन्न, कपडे, औषध, अभ्यास साहित्य इ.), सार्वजनिक मालमत्ता देखभाल (इमारत / उपकरणे), लॉकडाउन कालावधी दरम्यान तुमच्या संस्थेतील  विद्यार्थ्यांसाठी किती नाविन्यपणे तुम्ही वर्ग घेणे , जवळच्या महाविद्यालयीन / शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन टीचिंग लर्निंग कार्यक्रमाचे आयोजन, कोविड -19 चा सामना करण्यासाठी अधिकाऱ्यांना पुरवण्यात आलेल्या संस्थात्मक पायाभूत सुविधा, प्रदान केलेल्या अन्य मदतीचा तपशील (दौरा,  सेवा, स्थलांतरितांना मदत  इ.), मदत निधीसाठी तुमची संस्था / प्राध्यापक / विद्यार्थ्यांनी दिलेले आर्थिक योगदान,  कोविड -19 च्या प्रसार आणि प्रतिबंधाविरूद्ध  प्रकल्प / योजना / उपक्रम राबविण्यात अधिकाऱ्यांना  मदत करणे, कोविड –19 च्या विरूद्ध इतर कोणतेही योगदान, कोविड -19 नंतर पुनर्विकास / पुनर्वसन योजना या श्रेणींचा समावेश होता.

जादा दर आकारणी – दोन ॲम्ब्युलन्सवर कारवाई :जिल्हाधिकारी

0
प्रत्यक्षात असे आहेत दर…..

पुणे-कोवीड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ॲम्ब्युलन्स मालकांनी रुग्णांची वाहतूक करतांना आकारणी करावयाचे दर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांचेमार्फत निश्चित करण्यात आलेले आहेत. तसेच निश्चित केलेले दर ॲम्ब्युलन्स मध्ये दर्शनी भागात प्रदर्शित करण्याबाबतही यापूर्वी वृत्तनिवेदन देण्यात आले होते. तसेच रुग्णाची वाहतूक करतांना जास्त दर आकारणी केले बाबत या कार्यालयाने माहे जुलै २०२० मध्ये ॲम्ब्युलन्स
च्या मालकाविरुध्द गुन्हा दाखल केलेला होता व प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारणी करू नये म्हणून सर्व ॲम्ब्युलन्स धारकांना सुचना देण्यात आलेल्या होत्या. तसेच जादा दर आकारणी झाल्यास तात्काळ प्रादेशिक परिवहन कार्यालयास तक्रार नोंदविण्याबाबतही जनतेस आवाहन करण्यात आले होते.

मोटार वाहन क्रमांक एमएच-१२डीटी-३१५८ (Maruti Omni Ambulance) तसेच एमएच-१४सीडब्लू ०५१३ (Traveler Cardiac Ambulance) या ॲम्ब्युलन्स धारकांनी रुग्णाकडून जास्त भाडे घेतल्याची तक्रार जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडे प्राप्त झाली. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधित वाहन मालकांविरुध्द तात्काळ कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिले. या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथील वायुवेग पथकाने नमूद दोन्ही ॲम्ब्युलन्स ताब्यात घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे अटकावून ठेवलेल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित वाहनांविरुध्द मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार कारवाई करण्यात आलेली आहे.
रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ॲम्ब्युलन्सच्या वापरानुसार व प्रकारानुसार किती भाडे देण्यात यावे याची माहिती देण्यात येत आहे. सद्यस्थितीत कोरोनाग्रस्त पेशंटची संख्या वाढत असल्याने ठरवून दिलेल्या
प्रमाणेच दर आकारणी करण्यात यावी याबद्दल सर्व ॲम्ब्युलन्स चालकांना आदेशित करण्यात येत आहे.
रुग्णवाहिकांनी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारल्यास तात्काळ प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे तक्रार दाखल करावी. या तक्रारीनुसार तात्काळ कठोर कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी कळविले आहे.

पाण्याचे ऑडिट करून महापालिकेच्या मुख्य सभेपुढे मांडा – आबा बागुल

0

पुणे -शहरात अनियमित आणि असमान पाणीपुरवठा होत आहे. सर्वसामान्य पुणेकरांच्या घरामध्ये वेळी अवेळी पाणी येते, रात्री बेरात्री उठून अर्धा तास येणारे पाणी भरणे,यासह पाण्याशी निगडित अनेक समस्या पुणेकरांना सतावत आहे. या समस्यांचे मूळ जाणून घेण्यासाठी व पुणेकरांवरील अन्याय टाळण्यासाठी पाण्याचे ओपन ऑडिट करून ते महापालिकेच्या मुख्य सभेपुढे मांडले जावे, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागुल केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पुणे शहरात पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत. काही भागात नळाद्वारे पाणी मिळत नसल्याने टँकरने पाणी पुरविले जाते, टँकरभोवती गर्दी करून पाणी भरले जाते, सध्याच्या कोरोना साथीच्या काळात ही गर्दी घातक आहे.

परंतु, सामान्य पुणेकरांना नाईलाजाने गर्दीतच पाणी भरावे लागते. त्याच वेळी आलिशान इमारती, मॉल्स, मोठे बंगले, सुपर शॉपी अशा वास्तूंना मुबलक पाणीपुरवठा होताना दिसतो. यामागचे नेमके कारण लक्षात येत नाही, असे बागुल म्हणाले.

खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यातून 14 टीएमसी पाणी शहराला पुरविले जाते. राज्य सरकारमार्फत पाणीवाटपाचे नियोजन केले जाते. 14 टीएमसी पाण्यापैकी 8 टीएमसी पाण्याचाच हिशेब लागतो. उर्वरित पाणी कोणाला दिले जाते हे गुलदस्त्यात आहे.

पाणी पुरवठ्याच्या 24 बाय 7 योजनेखाली पाणीपट्टी वाढवायची पण सामान्य पुणेकराला त्यानुसार सेवा द्यायची नाही.

हॉटेल्स, मॉल्स, टाऊनशिप या ठिकाणी मुबलक पाणीपुरवठा करायचा याचे गौडबंगाल पुणेकरांसमोर उघड होणे गरजेचे आहे. याकरिता पाणी पुरवठ्याचे ओपन ऑडिट करून महापालिकेच्या मुख्य सभेपुढे मांडावे, जनतेसमोर खुले करावे, अशी मागणीही बागुल यांनी निवेदनात केली आहे.

आठवडयात एसटी कर्मचाऱ्यांना पगार न दिल्यास राज्यव्यापी आंदोलन ..विपक्ष नेते प्रविण दरेकर

0

मुंबई – येत्या आठ दिवसात राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार दिले नाहीत, तर भाजप कर्मचा-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल आणि भाजपच्या वतीने राज्यातील सर्व एसटी आगरांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज विधापरिषदेचे विरोधीक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज दिले.
एसटी कर्मचा-यांच्या थकीत पगाराचा प्रश्न व अन्य प्रलंबित मागण्यांविषयी विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेतली. एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. तसेच सर्व प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. यावेळी आमदार राहुल नार्वेकर, कर्मचारी प्रतिनिधी चंद्रकांत राणे, मनोहर नारकर,बी.डी.पारले आदि उपस्थित होते.
त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, कोरोना काळात जीवाची बाजी लावणाऱ्या कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांशी शासनाला काही देणे-घेणे नाही. व्यवस्थापकीय संचालकांच्या म्हणण्यानुसार एसटीचे उत्पन्न १०० कोटी आहे आणि ३०० कोटीचे पगार थकीत आहे. या कर्मचाऱ्यांच्या पगार विषयीची मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे. पण आता कागदपत्र रंगवण्यापेक्षा तीन महिने एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही, त्यामुळे त्यांचे घर कसे चालेल याविषयी माणुसकीच्या दृष्टिकोनातून संवेदनशीलतेने त्यांच्याकडे बघण्याची आवश्यकता आहे. म्हणून भाजपने त्यांना आठवड्याभराचा अल्टिमेटम दिला आहे. आठ दिवसात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला नाही तर भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करणार असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
परिवहन मंत्र्यांच्या कारभारावर बोट ठेवत दरेकर यांनी त्यांचाही समाचार घेतला.परिवहन मंत्र्यांनी तीनशे रुपयांचा भत्ता जाहीर केला होता पण अजूनपर्यंत अनेक कर्मचाऱ्यांना भत्ता मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना भत्ता लवकरात लवकर देण्याची मागणीही आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचा विमा देऊ अशी घोषणाही करण्यात आली होती, पण अजून त्या कर्मचा-यांना विमा मिळालेला नाही. मृत्य झालेल्या एसटीच्या ४३ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाखाचे विमा कवच तात्काळ देण्याची मागणीही करण्यात आल्याचे सांगताना ते म्हणाले की, पत्रकारांच्या बाबतीतही शासन संवेदनशील नाही. पांडुरंग रायकर या पत्रकारांच्या मृत्यूनंतर ५० लाख विमाची घोषणा करण्यात आली पण अजूनही पत्रकारांना विमा कवच देण्यात आलेले नाही.
महाराष्ट्राची खरी जीवन वहिनी एसटी आहे. त्यामुळे शासनाने एसटीकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आम्ही शासनाकडे एसटीसाठी २ हजार कोटींच्या मदतीची मागणी केली आहे. पण शासनाने १ हजार कोटी जरी एसटी महामंडळाला दिले तरी कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांचा पगाराचा विषय मार्गी लागेल, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न -सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे

0

बीड , दि. १७  : मराठा आरक्षण आंदोलनात मी सक्रिय सहभाग घेत कायम आरक्षणाच्या बाजूने राहिलो आहे;  राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनेच असून मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न केले जातील असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री  धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनास भेट देऊन मंत्री श्री मुंडे यांनी आंदोलकांच्या मागण्या ऐकून निवेदन स्वीकारले. यावेळी आ. संदीप क्षीरसागर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या पूर्णपणे पाठीशी असून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी तसेच अन्य न्यायालयीन प्रक्रियेसाठी कुठेही कमी पडणार नाही, असे यावेळी श्री. मुंडें यानी आंदोलकाना आश्वस्त केले.

यावेळी मराठा आरक्षणासह विविध  मागण्यांचे निवेदन मराठा क्रांती मोर्चा, बीडच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देण्यात आले.

जन्म – मृत्यू दाखले वेळेत मिळत नाहीत, आयुक्तांनी लक्ष घालावे : दीपाली धुमाळ

0

पुणे-मार्च 2020 कोरोना आल्यापासून पुणेकरांना जन्म व मृत्यू दाखले वेळेत मिळत नाही. प्रशासकीय कामकाजासाठी सेवक वर्ग नसल्याने जन्म व मृत्यू दाखले मिळत नसल्याचे उत्तरे देण्यात येत आहेत. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विपक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केले आहे.

पुणे महानगरपालिकेचे जन्म व मृत्यू दाखले देणे व नोंद ठेवणे यासाठी आरोग्य विभाग अंतर्गत स्वतंत्र जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालय आहे. मनपाकडून नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले मिळतात.मात्र, मागील 5 ते 6 महिन्या पासून कोरोनाचे संकट आल्याने हे दाखले पुणेकरांना वेळेत मिळत नाही. हे दाखले तातडीने उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे नातेवाईकांचे अनेक कामे खोळंबलेली आहेत. प्रशासनाकडून वेळेत काम पूर्ण न झाल्याने जन्म व मृत्यू कार्यालयात रांगा लागत आहे.मृत्यू होऊन 6 महिने उलटले तरी मनपाकडे याबाबत नोंद नाही. त्यामुळे नागरिक कार्यालयात गर्दी करतात. परंतु, त्यांचे निराकरण न करता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. या प्रकरणी माहिती घेवून, आवश्यकता वाटल्यास कर्तव्य कसूर केल्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदनही आयुक्तांना दीपाली धुमाळ यांनी गुरुवारी दिले आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन(व्हिडीओ)

0

पुणे : एक मराठा लाख मराठा.. मराठा आरक्षण हक्काचे . नाही कुणाच्या बापाचे, मोदी सरकार हाय हाय, ठाकरे सरकार हाय हाय अशाप्रकारे जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत मराठा आरक्षणा संदर्भात ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही शासकीय भरती प्रक्रिया राबवू नका, पोलिस भरती प्रक्रिया स्थगित करा यासारख्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चा शिष्टमंडळाने मराठा आरक्षण स्थगितीविषयी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजेंद्र कोंढरे,बाळासाहेब आमराळे , धनंजय जाधव, राजेंद्र कुंजीर , सचिन अडेकर , तुषार काकडे ,अमर पवार , युवराज दिसले , अश्विनी खाडे , सारिका जगताप उपस्थित होते.

मराठा समाजाचा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. वेळोवेळी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात लाखोंचे मोर्चे काढण्यात आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने अन्याय झाल्याची भावना मराठा समाजात असून राज्य सरकारविरुद्ध मोठी नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटनांनी एकत्र येत केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवला. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत पुण्यातील मुस्लिम संघटनांसह काही आंबेडकरी चळवळीतील संघटना देखील सहभागी झाल्या.

छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय.. आरक्षण आमच्या हक्काचे… मराठा आरक्षणावरील अडथळे दूर करा, सारथीची मुस्कटदाबी बंद करा आदी घोषणांची फलक झळकवत व जोरदार नारे देत सकाळी मराठा क्रांती मोर्चातर्फे महिला-पुरुष तरुण-तरूणी आदी कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे समाज प्रचंड अस्वस्थता पसरली असून ठिकठिकाणी बैठका सुरु आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अध्यादेश न काढता स्थगिती उठविण्यासाठी न्यायाधीशांकडे विनंती अर्ज करावा.त्याचप्रमाणे लाखोंच्या संख्येने काढण्यात आलेल्या मोर्चाच्यावेळी मराठा समाजातील तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे देखील तात्काळ मागे घेण्यात या आमच्या मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली नाही तर मराठा आरक्षणासाठीचा लढा अधिक आक्रमक करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने दिली.

भारतात कोरोनाग्रस्त सक्रीय रुग्ण संख्या १० लाख ९ हजार ९७६

0

नवी दिल्ली – आज देशातील एकूण सक्रिय रूग्णांच्या संख्येने 10 लाखाचा (10,09,976) टप्पा ओलांडला आहे.भारतात गेल्या दोन दिवसांत कोवीड -19 चा संसर्ग झालेले रूग्ण मोठ्या संख्येने बरे झाल्याचे दिसून आले आहे. या दोन दिवसांत तब्बल 82,000 पेक्षा जास्त रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या 24 तासात 82,961 सक्रिय रूग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.

बरे झालेल्या रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे बरे होणाऱ्या रूग्णांच्या राष्ट्रीय सरासरीतही वाढ होऊन ती 78.64% इतकी झाली आहे.

बरे झालेल्या एकूण रूग्णांपैकी एक पंचमांश पेक्षा जास्त अर्थात 17,559 (21.22%) रूग्ण महाराष्ट्रातील असून त्याखालोखाल आंध्र प्रदेशमधले 10,845, कर्नाटकमधले 6580, उत्तर प्रदेशमधले 6476 आणि तमीळनाडूमधले 5768 असे 35.87% रूग्ण बरे झाले आहेत.

या सर्व राज्यांमधले एकूण 57.1% रूग्ण बरे झाले आहेत.

यातील सुमारे निम्मे (48.45%) सक्रिय रूग्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये आहेत. तर या राज्यांबरोबरच उत्तर प्रदेश आणि तमीळनाडू, अशा पाच राज्यांमध्ये सुमारे 60% सक्रिय रूग्ण आहेत.

आतापर्यंत एकूण 40 लाखापेक्षा जास्त (40,25,079) रूग्ण बरे झाले आहेत. सक्रिय रूग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रूग्णांची संख्या 30 लाखांपेक्षा जास्त (30,15,103) असून चार पटीने जास्त आहे. देशभरात गेल्या 24 तासात कोरोना संसर्गामुळे 1132 जण दगावले आहेत. यात महाराष्ट्रातील 474 जणांचा समावेश असून दगावलेल्या एकूण रूग्णांपैकी 40% पेक्षा जास्त रूग्ण महाराष्ट्रातील आहेत. त्याखालोखाल उत्तर प्रदेश (86), पंजाब (78), आंध्र प्रदेश (64) आणि पश्चिम बंगाल (61) अशा चार राज्यांमधील 25.5% रूग्ण गेल्या 24 तासांत दगावले आहेत.

मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

माझे कुटुंब, माझी जबाबदारी ” मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

औरंगाबाद, :- मराठवाडा ही संतांची भूमी आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून व त्यांनी सहन केलेल्या अत्याचारातून ही भूमी रझाकारांच्या जोखडातून मुक्त झाली आहे. मराठवाड्यासाठी आजचा दिवस स्वातंत्र्यदिन आहे. या आंदोलनामध्ये जसा मराठवाडा सहभागी झाला होता तसेच आता आपण कोरोना विषाणू उच्चाटनासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेत येथील जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. त्यातही आपल्या सर्वांचा सहभाग हवा, असे सांगून त्यांनी औरंगाबादच्या विकासासाठी औरंगाबाद विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा मानसही बोलून दाखवला.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभाजवळ पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री श्री.ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मुंबई येथून सहभागी झाले होते. या ठिकाणाहूनच त्यांनी जनतेला उद्देशून शुभेच्छापर संदेशातून मार्गदर्शन केले.

ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार उदयसिंग राजपूत, आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिका प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाड्याच्या भूमीसाठी अनेक आबालवृध्दांनी चिवटपणे लढा दिला आहे. या भूमीवर जेव्हा अन्याय होतो, तेव्हा मराठवाडा कसा पेटून उठतो त्याचे हे एक प्रतीक हा आजचा दिवस आहे. अन्यायाविरुद्ध लढणे व तो मोडून टाकणे हे आपल्या भूमीचे, मातीचे वैशिष्ट्ये आहे. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ व त्यांचे सहकारी तसेच अनेक अबालवृद्ध मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात सहभागी झाले होते. त्यांच्यामुळे आपण हा आजचा दिवस पाहू शकत आहोत. या शुरवीरांची आजची पिढी ही त्यांचे वारसदार आहेत. तोच वारसा घेऊन आपण हा मराठवाडा जपला पाहिजे आणि विकसितही केला पाहिजे.

आज जरी आपण मोकळा श्वास घेत असलो तरी एक वेगळी लढाई आपण सध्या लढत आहोत, असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, एका बाजूला मोकळा श्वास आणि दुसऱ्या बाजूला तोंडावरती मास्क. मला खात्री आहे की, मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अबालवृद्धांनी ज्या पद्धतीने रझाकारी अत्याचार मोडून टाकला त्यापद्धतीनेच आपण कोरोना आक्रमणही परतवून लावूया. कोरोना विषाणू विरुद्ध आपल्याला लढायचे आहे. त्यासाठी मास्क हे आपले शस्त्र आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण नुकतीच “माझे कुटुंब, माझी जबाबदारी ” ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन आपण कोरोनावर मात करुयात.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे पुढे म्हणाले की, मराठवाडा जिद्दी, चिवट, हिम्मतवंतांचा आहे. मराठवाडा विकासाच्या दिशेने चालला आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची जबाबदारी आपल्या सरकारने निश्चितपणे घेतली आहे. मुंबई ते नागपूर या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मराठवाडा समृद्ध होणार आहे. मुंबई, पुण्याला ज्याप्रमाणे विकास प्राधिकरण आहे त्या पद्धतीने औरंगाबाद विकास प्राधिकरण करण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल. मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की, मी माझा मराठवाडा कोरोनामुक्त करेन आणि मराठवाड्याच्या विकासासाठी, सुखसमृद्धीसाठी निश्चित प्रयत्न करीन.

सुरुवातीला स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन पालकमंत्री व मान्यवरांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर पोलीस दलाकडून बँड, बिगूल वाजवून व बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री व मान्यवरांनी स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेऊन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते मनपा अधिकारी-कर्मचारी यांच्या सहयोगाने रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात येणाऱ्या कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण यांच्या हस्ते करण्यात आले.

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री अमित देशमुख

0

लातूर,दि.१७ :- मराठवाडा मुक्तिसंग्रामात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. निजाम शरण येत नसल्याने भारत सरकारने पोलीस कारवाई करून १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त केला व या लढ्यामुळे भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले. या लढ्यात ज्या थोर वीरांनी आपले जीवन समर्पित केले त्या थोर हुतात्म्यांना अभिवादन करून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.

टाऊन हॉल येथील हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभ येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या बहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, संसदीय कार्य, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती भारतबाई साळुंखे, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री अमित देशमुख पुढे म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामात मराठवाड्यातील अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य लढा उभा करून मराठवाड्यातील जनतेला निजामाच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हौतात्म्य पत्करले. त्या सर्व शहिदांना अभिवादन करून आपण सर्वजण आजच्या या शुभदिनी विकासासाठी एकत्रित आले पाहिजे. राज्य शासन मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

आपला covid-19 विरोध चा लढा संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने covid-19 संसर्ग वाढणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनी महाराष्ट्र राज्य कोविड -19 मधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम राज्याच्या प्रत्येक शहरी व ग्रामीण भागात सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोवीड मुक्त राज्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्वाची आहे. लातूर जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ झालेला असून जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब व कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी यात सहभागी व्हावे अशी अपेक्षा, पालकमंत्री देशमुख यांनी व्यक्त केली.

आज संपूर्ण मराठवाड्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा हा समारंभ उत्साहाने साजरा होत आहे. या समारंभास उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी तसेच ऑनलाइन प्रेक्षपणाद्वारे हा समारंभ साजरा करणारे स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता,विद्यार्थी-पालक पत्रकार बंधू-भगिनींना पालकमंत्री देशमुख यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती भारतबाई साळुंखे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनीही हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर पोलीस पथकाने मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. तसेच पोलीस बँड पथकाने यावेळी मानवंदना दिली. त्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री देशमुख यांच्याकडून समारंभास उपस्थित लोकप्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी व मान्यवरांच्या भेटी घेऊन सर्वांना मराठवाडा मुक्ति दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मार्फत “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या आरोग्य पथका मधील आशा वर्कर्स यांना प्रतिनिधिक स्वरुपात सुरक्षा किट व नागरिकांच्या तपासणीसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय किटचे वितरण पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते येथे करण्यात आले.

त्याप्रमाणेच लातूर महापालिकेचे अंतर्गत बेघर व्यक्तींना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचा धनादेशाचे वितरण झाले. तर कोरोना काळात चांगली सेवा बजावलेल्या वैद्यकीय अधिकारी, नर्स इत्यादींना कोरोना योद्धा म्हणून श्री . देशमुख यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

दिवसभरात ४ हजार १५३ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

0

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7  सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.  यासाठी टोल फ्री क्रमांक –  १८००८३३३३३३  व्हाट्सॲप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून  commstateexcise@gmail.com ई-मेल आहे.

मुंबई दि. १७ : राज्यात १५ मे २०२०  पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. काल दिवसभरात ४ हजार १५३  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि  मुंबई उपनगरात ३ हजार ८५८  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा  देण्यात  आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण १०,७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ९,५७९ अनुज्ञप्ती सुरू आहेत. राज्य शासनाने ३ मे, २०२० पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. राज्यात १५ मे २०२०  पासून घरपोच मद्यविक्री योजनाअंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येतआहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थलावरऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. १ एप्रिल २०२०  ते ३१ जून २०२० या काळात १ लाख ५४ हजार २६९  ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी १ लाख ४९ हजार ४२९ ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.

ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेतांना येतअसलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असून आता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीद्वारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच ऑनलाईन परवाना घ्यायचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने ऑफलाईन पद्धतीने सुद्धा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात.

दि.24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातीलअधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. काल दि. १६ सप्टेंबर २०२० रोजी राज्यात ८९ गुन्हे नोंदविण्यात आले असून ५० आरोपींना अटक करण्यात आली आहे. २५ लाख ३० हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि.२४ मार्च, २०२० पासुन दि. १५ सप्टेंबर २०२० पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण १८,०७४ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९,७६४ आरोपींना अटक करण्यात आली असून  १,६८० वाहने जप्त करण्यात आली असून ४१ कोटी ७७ लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सामाईक प्रवेश परीक्षां अर्ज भरण्याच्या वाढविलेल्या कालावधीचा ४८ हजार ६३४ विद्यार्थ्यांना लाभ

0

मुंबई, दि.१६ : विद्यार्थी आणि पालकांच्या विनंतीचा विचार करता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांनी विविध सामाईक प्रवेश परीक्षांसाठी नव्याने नोंदणी सुरू केली होती. या वाढीव कालावधीचा लाभ ४८ हजार ६३४ विद्यार्थ्यांना झाला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

श्री. सामंत म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी विविध सामाईक प्रवेश परीक्षांसाठी अर्ज भरू शकले नव्हते. याबद्दल विद्यार्थी आणि पालकांची मागणी लक्षात घेता राज्य सीईटी सेल’ने दोन दिवसांचा कालावधी वाढविला होता. दिनांक ७ व ८ सप्टेंबर २०२० असा हा दोन दिवसीय वाढीव कालावधी होता. ज्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

या वाढीव कालावधीमध्ये विविध विद्या शाखांच्या सामाईक प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.  नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये

एम.पी.एड. – ३२५

बी.पी.एड. – १२६५

बी.एड. – १६७१५

एम.एड. – ६७७

एल.एल. बी.(तीन वर्ष ) – १२०१०

एल.एल. बी.(पाच वर्ष ) – ४०६७

बी.एड. – एम.एड. – ६४९

बी.ए./बी.एस्सी बी.एड. – ११२३

एम.सी.ए. – १८९०

बी.एच.एम.सी.टी. – ३६१

एम.एच.एम.सी.टी. – ३७

एम. आर्किटेक्चर– २८७

एम.एच.टी.सी.ई.टी. – ९२२८

या अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

‘इनोव्हेशन्स इन ऑटोमोटिव्ह’वर’टीटीए’तर्फे शनिवारी व्याख्यान

0

पुणे : टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशन (टीटीए), डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी (डीओटी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इनोव्हेशन्स इन ऑटोमोटिव्ह’वर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. १९) दुपारी ३ वाजता झूम मिटद्वारे हे व्याख्यान होणार आहे.

प्रो-बिझनेस इनोव्हेशन्सचे संचालक हेमंत पाध्ये बोलणार आहेत. ‘डिओटी’चे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर हे कार्यक्रमाचे उद्घाटक असणार आहेत. यावेळी ‘टीटीए’चे यशवंत घारपुरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम, आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘टीटीए’चे सचिव विलास रबडे यांनी दिली आहे.जागतिक पातळीवर ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील प्रवाह, इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह क्षेत्रात इलेक्ट्रिक व्हेइकल्ससाठीच्या (इव्ही) संधी, आयसीई ते इव्ही मायग्रेशन आदी मुद्यांवर हेमंत पाध्ये विश्लेषण करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, यात सहभाग घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी www.tta.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ९८२००२६२६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही रबडे यांनी कळविले आहे.

लायन्स क्लब एस.टी. कर्मचाऱ्यांची काळजी घेईल: अभय शास्त्री

0

स्वारगेट एस.टी. कर्मचाऱ्यांना, प्रवाशांना मास्क वाटप

पुणे :’ सीमेवर सैन्य ज्या धैर्याने कामगिरी बजावते, त्याच धैर्याने प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी. कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. सेवाभावी उपक्रमातून लायन्स क्लब एस.टी. कर्मचाऱ्यांच्याकरिता  कार्यरत राहील ‘, असे प्रतिपादन  लायन्स क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री यांनी केले.

लायन्स क्लब ऑफ इको फ्रेंडस, लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीमच्या वतीने स्वारगेट एसटी स्टँड,डेपोच्या कर्मचाऱ्यांना, प्रवाशांना कोविड पासून सुरक्षेसाठी मास्कचे वाटप प्रांतपाल अभय शास्त्री, पुनीत कोठारी , अनील मंद्रुपकर,सुहास कुलकर्णी ,रोहिणी नागवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुनिता चिटणीस,प्रीती दीक्षित , महादप्पा अणदुरे,  प्रमोद उमरदंड  तसेच स्वारगेट डेपोचे अधिकारी उपस्थित होते.

अभय शास्त्री म्हणाले, ‘ कोविड साथी मुळे  असाधारण परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉक डाऊनमुळे एस्.टी. सेवा बंद होती. ती आता सुरू झाली आहे.अशा वेळी असाधारण सेवा बजावणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरतील.एकमेकांनी एकमेकांची काळजी घेण्याने सुरक्षितता वाढेल .’

कार्यक्रमाचे संयोजक अनील मंद्रुपकर यांनी प्रास्ताविक आणि स्वागत  केले.

मनोरुग्‍णांच्‍या पुनर्वसनाचा सर्वंकष आराखडा तयार करा- जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख

0

पुणे, दिनांक 17- प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्‍णांच्‍या पुनर्वसनाचा सर्वंकष आराखडा तयार करण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. जिल्‍हा नियोजन समिती, कम्‍युनिटी सोशल रिस्‍पॉन्सिबिलीटी, स्‍वयंसेवी संस्‍था यांच्‍या मदतीने या आराखड्याच्‍या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्‍ध करण्‍याचा प्रयत्‍न केला जाईल, असेही त्‍यांनी सांगितले.

जिल्‍हाधिकारी कार्यालयात रुग्‍ण कल्‍याण नियामक समितीची बैठक झाली. यावेळी जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख बोलत होते. बैठकीस जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. अशोक नांदापूरकर, प्रादेशिक मनोरुग्‍णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजीत फडणीस, स्‍थानिक मनोविकार तज्ञ डॉ. भरत सरोदे, शर्मिला सय्यद आणि इतर सदस्‍य उपस्थित होते.        डॉ. देशमुख म्‍हणाले, ज्‍या रुग्‍णांना बरे झाल्‍यानंतरही त्‍यांचे नातेवाईक घेवून जात नाहीत किंवा बरे झालेले तथापि, त्‍यांचा मूळ ठावठिकाणा सापडत नसलेल्‍या रुग्‍णांच्‍या पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे. याकरिता स्‍वयंसेवी संस्‍थांची मदत घेतली जावी. सध्‍या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्‍याने या रुग्णांना कोरोनाची लागण होणार नाही, याचीही काळजी घ्‍यावी, आवश्‍यकता वाटल्‍यास त्‍यांच्‍यासाठी स्‍वतंत्र 2 वॉर्ड निर्माण करण्‍यात यावेत, असेही ते म्‍हणाले.        मनोरुग्‍णालयात दाखल रुग्‍णांवर उपचार करतांना त्‍यांचे नातेवाईक जवळ असतील, तर असे रुग्‍ण लवकर बरे होण्‍याची शक्‍यता असते. या बाबीचा विचार करुन फॅमिली वॉर्ड विकसित करता येतील, का याचाही विचार करण्‍याची सूचना जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केली. प्रादेशिक मनोरुग्‍णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजीत फडणीस यांनी प्रास्‍ताविक केले.