Home Blog Page 2446

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 77 हजार 251

0

पुणे विभागातील 3 लाख 21 हजार 393 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 4 लाख 9 हजार 377 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे,दि.26 :- पुणे विभागातील 3 लाख 21 हजार 393 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 9 हजार 377 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 77 हजार 251 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 10 हजार 733 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 78.51 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 68 हजार 832 रुग्णांपैकी 2 लाख 20 हजार 695 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 42 हजार 121 आहेत. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 82.09 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 33 हजार 987 रुग्णांपैकी 24 हजार 46 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 909 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 31 हजार 289 रुग्णांपैकी 21 हजार 987 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 203 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 32 हजार 832 रुग्णांपैकी 23 हजार 193 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 406 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 233 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 42 हजार 437 रुग्णांपैकी 31 हजार 472 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 612 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 353 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 5 हजार 961 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 628, सातारा जिल्ह्यात 915, सोलापूर जिल्ह्यात 502, सांगली जिल्ह्यात 607 तर कोल्हापूर जिल्ह्यात 309 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 3695,सातारा जिल्हयामध्ये 831, सोलापूर जिल्हयामध्ये 396, सांगली जिल्हयामध्ये 827 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 563 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 17 लाख 98 हजार 436 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 9 हजार 377 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 25 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
*

महापालिकेच्या पोटे दवाखान्यात हेल्थ एटीएमचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते लोकार्पण

0

पुणे- पुणे महापालिकेच्या कै.शिवशंकर पोटे दवाखान्यातून शासकीय दरामध्ये उत्तम आरोग्य सुविधा दिल्या जातात. या आरोग्य सुविधेमध्ये आता हेल्थ एटीएमचा समावेश झालेला आहे त्याचा लाभ प्रत्येक नागरिकांनी घ्यावा असं आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांनी केलं. पुणे महानगरपालिकेच्या पद्मावती येथील कै. शिवशंकर पोटे दवाखान्यामध्ये विधान परिषदेचे आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीमधून हेल्थ एटीएम मशीन बसवण्यात आले आहे. या मशीनचे लोकार्पण महापालिका आयुक्त विक्रमकुमार

यांच्या हस्ते शनिवारी (दि. २६) करण्यात आले. त्यावेळी आयुक्त बोलत होते.

यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्षा व नगरसेविका सौ.अश्विनीताई कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पर्वती विधानसभा अध्यक्ष श्री. नितीन कदम, पुणे महापालिकेचे उपरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे, माजी शिक्षण मंडळ उपाध्यक्ष श्री. नरेंद्र व्यवहारे, गणेश नलावडे, सुशांत ढमढेरे, अमोल ननावरे, तुषार नांदे, ऋषिकेश भुजबळ, शंकर सहाने, मयूर शिंदे, अमोल पालखे, अरुण ढावरे, संग्राम वाडकर, भरत सुराना, महेश गायकवाड, दिलीप पवार, अनिल हांडे, दिगंबर कोबल, अमित जगधने, राजभाऊ अवघडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या मशीनद्वारे शासकीय दरामध्ये विविध प्रकारच्या २२ आरोग्य चाचण्या केल्या जाणार आहेत. वजन, उंची रक्तदाब, मधुमेह, शरीरातील ऑक्सिजन, बॉडी टेम्परेचर, पल्स, हिमोग्लोबिन, बीएमआय, बॉडी फॅट, बॉडी वॉटर, बॉन मास, स्केलेटन मसल्स, हेल्थ स्कोर इत्यादी चाचण्या करून दिल्या जाणार आहेत. त्याचा रिपोर्ट पाच मिनिटात उपलब्ध होऊन संबंधित व्यक्ती फिट आहे की अनफिट हे समजू शकणार आहे.

आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, “अश्विनी कदम यांनी जास्तीतजास्त निधी उपलब्ध करून घेतल्यामुळे या दवाखान्यात सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. पुणे महानगरपालिका हा एक सागर आहे व त्यातून छोटे छोटे निधी उभे करताना अश्विनीताईंचा संघर्ष व घेतलेले कष्ट दिसून येतात. महापालिकेचे डॉक्टर्स देखील आज उत्तम सेवा देतात, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर सर्व स्तरातील लोकांनी महापालिकेच्या आरोग्य सुविधेचा लाभ घेतला पाहिजे” या आरोग्य सुविधेमध्ये आता हेल्थ एटीएमचा समावेश झालेला आहे त्याचा लाभ प्रत्येक नागरिकांनी घ्यावा असं आवाहन आयुक्तांनी केलं.

यावेळी बोलताना सौ. अश्विनीताई कदम म्हणाल्या, ” हेल्थ एटीएम साठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सौ अश्विनीताईंनी आमदार अनंत गाडगीळ यांचे आभार. प्रत्येक नगरसेवकाला वाटते की आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या चांगल्या सुविधा उपलब्ध असाव्यात. त्यातूनच महापालिकेच्या दवाखान्यात उत्तम आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने पोटे दवाखान्यात पुणे महापालिकेच्या माध्यमातून कदम डायग्नोस्टिक सेंटर सुरु केले. शासकीय दरामध्ये सर्व प्रकारच्या चाचण्या या ठिकाणी करून दिल्या जातात. आज या दवाखान्यातील आरोग्य सुविधेचा लाभ केवळ गरीब किंवा मध्यमवर्गी नागरिक घेत नसून उच्च मध्यमवर्गीय देखील या दवाखान्याला भेट देतात. आज हेल्थ एटीएमच्या सुविधेमुळे प्रत्येकाला आपली सर्वप्रकारची आरोग्य चाचणी करून घेता येणार आहे ” भविष्यात महापालिकेच्या प्रत्येक दवाखान्यात अशा प्रकारचे मशीन उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचं नगरसेविका सौ. अश्विनीताई कदम यांनी सांगितलं.

यावेळी कोरोनाच्या काळामध्ये देखील आपला दवाखाना सुरु ठेऊन नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी कार्य करणारे खासगी वैद्यकीय व्यावसायिक डॉ. शैलजा राऊत, डॉ. पूजा मौर्य, डॉ. प्रियांका काकडे, डॉ. नितीन बोरा, डॉ. दत्तात्रेय बिक्कड यांचा आयुक्तांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी आपले प्रस्तावित काम बंद आंदोलन स्थगित करावे – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

0

मुंबई दि. २५: राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक हे आरोग्य विभागाचा कणा असून कोरोना विरोधातील लढ्यात त्यांची भूमिका मोलाची असल्याने दिनांक २८ सप्टेंबर २०२० पासून प्रस्तावित असलेले कामबंद आंदोलन त्यांनी स्थगित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केले आहे.

शासन निर्णय निर्गमित; लवकरच मोबदला मिळणार

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, आशा स्वयंसेविकांना आणि गट प्रवर्तकांना प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यातील मंजुरीनुसार सेवांवर आधारित मोबदला मिळतो. त्यासोबत आशा स्वयंसेविकांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने आशा स्वयंसेविकेस दरमहा २ हजार आणि गट प्रवर्तकांना दरमहा ३ हजार  राज्य शासनाच्या निधीतून मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.  या निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार लवकरच त्यांना सर्व  मोबदला मिळणार आहे.

केंद्र शासनाकडे मागणी

याबरोबरच प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात गटप्रवर्तकांचा जो मोबदला कमी करण्यात आला आहे त्या मोबदल्याची मागणी  नव्याने केंद्र शासनाकडे करण्यात येत आहे.

माझे कुटुंब- माझी जबाबदारी अभियानात काम करताना जोपर्यंत कोविड झालेल्या रुग्णांचे लवकर निदान होत नाही तोपर्यंत कोविड विरोधातील लढाई आपण पूर्णपणे जिंकणार नाही. आपल्या मदतीनेच राज्यात “माझे कुटुंब- माझी जबाबदारी” हे अभियान  राबविण्यास सुरुवात झाली आहे.  याकरिता आपणास केंद्र शासनाने दरमहा मंजूर केलेल्या  १ हजार रुपयांव्यतिरिक्त दररोज १५० रुपये इतका मोबदला अदा करण्यात येणार आहे.  तसेच याकामी सोबतीला मदतीसाठी एक स्वयंसेवकदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेताना आपणास सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज, सारखे संरक्षण साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे.

मोहिमेतील माहिती संकलित करण्यासाठी व ती भरणे सोयीचे व्हावे यासाठी ॲप तयार करण्यात आले आहे. ॲपमध्ये माहिती भरताना काही अडचणी आल्यास उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रपत्रात लेखी स्वरूपात माहिती भरण्याची मुभा देखील आपणास दिली आहे असे ही मुख्यमंत्र्यांनी आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

कोरोना नियंत्रणात आशा स्वयंसेविकांचा अमूल्य वाटा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका योजनेची अंमलबजावणी सुरु असून राज्यात ग्रामीण आणि शहरी भागात मिळून ६६ हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका तर ४ हजार गटप्रवर्तक काम करत आहेत. आशा स्वयंसेविका योजनेमुळे राज्यातील नवजात बालकांचे मृत्यू, बालमृत्यू व माता मृत्यू कमी करण्यात मोलाची मदत मिळाली आहे. कोविड १९ या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवतांना देखील त्यांची खुप मदत होत आहे. आशा स्वयंसेविकांनी कोविड प्रादुर्भावाच्या काळात प्रत्येक घराला भेट देऊन,कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करून नियंत्रण मिळवण्यात अमूल्य वाटा उचलला आहे असेही मुख्यमंत्री या पत्रात आवर्जून म्हणतात.

विमानतळावरील रिक्षासेवेला मुदतवाढ :चालकांकडून खा.बापटांचे जंगी स्वागत

0

पुणे दि. 25 : केन्द्रिय दळणवळण मंत्रालयाने लोहगाव विमानतळावरील रिक्षांना प्रवासी वाहतूक करायला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. खासदार गिरीश बापट यांनी नवीदिल्लीत संबधित मंत्र्यांशी गेल्या आठवड्यात चर्चा करून या रिक्षाचालकांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळवून दिली. या रिक्षाचालकांनी आज खासदार बापट यांचे लोहगाव विमानतळावर जंगी स्वागत केले. त्यांचा खास सत्कारही केला.

यावेळी बापट म्हणाले की,पुणे विमानतळावरील एल. व्ही. रिक्षा संघटना गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांना सुविधा देत आहे. परंतु मुदत संपल्यामुळे त्यांना गेले काही दिवस प्रवासी वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. त्यामुळे जवळपास 180 रिक्षा धारकांचा व त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या सर्व रिक्षा धारकांनी मला वेळोवेळी कल्पना दिली होती. त्यानुसार नुकतीच दिल्ली येथे संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मी केंद्रीय विमानपतन मंत्री यांची समक्ष भेट घेतली. त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यानुसार आज संघटनेला पुढील सहा महिन्यांसाठीपरवानगी देण्यात आली.
आज मी विमानतळावर आलो. तेथे या रिक्षाचालकांनी माझे मन भरून कौतुक व स्वागत केले. रिक्षाचालकांना मिळालेल्या परवानगीमुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास मोठी मदत होणार आहे. रिक्षाचालकांचा रोजी रोटीसह कर्जाच्या हप्त्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांना आता हातभार लागतो आहे याचा मला आनंद आहे.

एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी संगीत भाषा- प्रांतापलीकडे पोहोचविले – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

0

मुंबई, दि.२५ :-  आपल्या नाद-मधुर सुरांनी संगीत हे भाषा-प्रांत यांच्या पलीकडे असते हे सिद्ध करणारे ज्येष्ठ गायक एस. पी. बालसुब्रमण्यम सुरांच्या दुनियेतील मनस्वी अवलिया होते. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.मुख्यमंत्री श्री.ठाकरे शोकसंदेशात म्हणतात, भारतीय चित्रपटसृष्टीला  मिळालेले संगीताचे वरदान ‘एसपीं’नी आपल्या सुरांनी आणखी झळाळून टाकले. त्यांनी सोळा भाषांतून हजारो गाणी गायली, तीही विविध प्रकारची. यातून सुरांवर हुकुमत गाजविणाऱ्या ‘एसपीं’नी आपला एक रसिक वर्ग निर्माण केला. संगीत हे भाषा आणि प्रांत या पलीकडे असते हे सिद्ध करत ‘एसपीं’नी आपल्या नाद-मधुर सुरांनी भारतासह जगातील रसिकांना मोहवून टाकले. त्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती. अगदी अलीकडे त्यांनी मराठीतही एक गाणे आपल्या मनस्वी शैलीत गायले होते. कोरोनाशी झुंज देत असणाऱ्या या सुरांच्या दुनियेतील अवलियाला काळाने आपल्यातून ओढून नेले आहे. त्यांच्या आवाजाची जादू मागे राहील, ते त्या अर्थाने अजरामर आहेत. पण एक मनस्वी कलाकार आपल्यातून निघून जाणे दुःखद आहे. ज्येष्ठ गायक एस.पी.सुब्रमण्यम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

आंबील ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या मृतात्म्यांना श्रद्धांजली …

0

पुणे- गेल्या २५ सप्टेंबर २०१९ रोजी पुणे शहरातील अंबिल ओढा परिसरातील आलेल्या पुरात ज्या 5नागरिकांचे प्राण गेलले त्यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पर्वती विधानसभेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री अंकुश काकडे, नगरसेविका अश्विनी कदम, नितीन कदम,दिलीप अरूंदेकर, माजी नगरसेवक सुनील बिबवे संतोष नांगरे, रवी चौधरी, अमोल ननावरे, गौरी जाधव, तुषार नांदे,ऋषिकेश भुजबळ अमोल पालखे, नारायण गायकवाड, मंथन जागडे, नरेश बागुल, संग्राम वाडकर, साईल तांबोळी, प्रदीप शिवशरण इत्यादी उपस्थित होते.

महाराष्ट्रात शेतकरी विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक लागू होणार नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे-संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसंबंधीत विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. दरम्यान शेतकरी विधेयकाच्या विरोधात देशभरातून आंदोलन होत आहे. महाविकास आघाडी सरकारही याला विरोध करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात शेतकरी विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक लागू होणार नसल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे.

पुण्यातील पत्रकारांशी बोलताना पवार यांनी हा निर्णय जाहीर केला. अजित पवार म्हणाले की, ‘आम्ही सध्या कायदेशीर अभ्यास करत आहोत, ही बिले घाईत मंजूर झाली आहेत. आम्ही राज्यात याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेऊ. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडूनही या बिलाचा विरोध केला जात आहे.’

या विधेयकाला शेतकरीविरोधी कायदा असे संबोधून शेतकरी संघटनांकडून घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अखिल भारतीय किसान सभेने पाठिंबा दर्शवला आहे. तर कोल्हापुरातही राजू शेट्टी यांनी बिलाची प्रत जाळली. शेतकर्‍यांचे उत्पादन व्यापार व वाणिज्य (पदोन्नती आणि सुलभता) विधेयक 2020 आणि शेतकरी (सबलीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन व शेत सेवा विधेयक, 2020 हा विरोधी पक्षाच्या आक्षेप असूनही आवाजी मतदानाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की एनडीए सरकारने पिकांच्या एमएसपी वाढीसंदर्भात इतिहास रचला आहे.

देशातील राजकारणाचे माध्यमांवरसुद्धा वर्चस्व;ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून बाजपेयी यांचे मत

0

एमआयटी डब्ल्यूपीयूत ऑनलाईन दुसरी राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचा समारोप

पुणे:“राजकारणामुळे देशातील सामाजिक, आर्थिक आणि राजकारणाचे क्षेत्र खूपच प्रभावीत झाले आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, सीबीआय आणि पार्लमेंटला सुध्दा त्यांच्या अधिकारांचा पूर्ण वापर करतांना विचार करावा लागतो. अशा जात्यामध्ये माध्यमे कसे सुटू शकतील, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. माध्यमांकडून ज्या प्रकारे रिर्पोटिंग होत आहे त्यात शांती शोधणे अवघड आहे.” असे मत ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून बाजपेयी यांनी मांडले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय ऑनलाईन, “दुसरी राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेच्या” समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या परिषदेचा प्रमुख विषय जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रसार माध्यमांची भूमिका हा होता.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार आशितोष, अरूणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व सुप्रसिद्ध लेखक तथागत रॉय, विवेकांनद इंटरनेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि तुघलकचे संपादक स्वामीनाथन गुरूमुर्ती, ले. जनरल अरविंदर सिंग लाम्बा (पीव्हीएसएम, व्हीएसएम) आणि यूएस येथील इन्फीनेटी फाउंडेशनचे संस्थापक व लेखक राजीव मल्होत्रा हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एन.टी.राव, प्र-कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू प्रा. डी.पी. आपटे व लिबरल आर्ट, फाइन आर्ट आणि मिडिया अ‍ॅण्ड जर्नालिझम स्कूलच्या अधिष्ठाता प्रा.डॉ. अनुराधा पराशर हे उपस्थित होते.
पुण्यप्रसून वाजपेयी म्हणाले,“ सध्याच्या काळात पत्रकार संस्था ज्या प्रकारे काम करीत आहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या जवळचे संबंध असणे गरजेचे झाले आहे. समजा तुम्हाला वृत्तपत्र काढायचे असेल तर आरएनआयशी जवळीक हवी. ही झळ जवळपास देशातील सर्वच क्षेत्रात पोहचत आहे. टाटा कंपनीला मोठा नुकसान होत आहे, परंतू अंबानी आणि अडानी यांच्या सर्व कंपन्या फायद्यात आहे. त्याचप्रमाणे माध्यमांमध्ये सुद्धा असे घडतांना दिसत आहे.”
“ देशाला या सर्व गोष्टींपासून वाचवायचे असेल तर प्रशासन आणि पत्रकारांना समोर येणे गरजेचे आहे. तसेच, देशाला शिक्षित करावे लागेल. कारण विरोधी पार्टीचे नेते पार्लमेंटमध्ये गप्प बसलेले आहेत. मुख्य प्रवाहाचे संपादक देशात आज आपल्या कुवतीनुसार काही चांगले काम करतांनाही दिसत आहे. सध्याच्या काळात संपूर्ण जग हे भारतातील पर्यावरण, न्यूक्लियर मुद्दा आणि हुकुमशाही सत्तेकडे आ वासून पाहत आहेत आणि आम्ही ते भोगत आहोत. सध्या या देशात कोल्ड वॉर सुरू आहे, ते थांबविण्यासाठी माध्यमांनांच कठोर भूमिका घेऊन कार्य करावे लागेल.”
तथागत रॉय म्हणाले,“ देशातील शांतीसाठी माध्यमांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. रोजच्या घटनांंची सत्य माहिती समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य त्यांनी करावे. तसेच, संकटाच्या काळात तटस्थ भूमिका पार पाडावी. चीन आणि पाकिस्तान या देशांची समस्या ही अवघड आहे. त्यामुळे मिडियाने सुदधा यांच्या संदर्भातील योग्य बातम्या दयावे.”
आशितोष म्हणाले,“ आरोग्य, आर्थिक चक्र आणि राष्ट्रीय सुरक्षा या तीन गोष्टी सध्याच्या काळात संपूर्ण जगात सुरू आहे. त्यामुळे माध्यमांनी आपली महत्वाची भूमिका पार पाडावी. परंतू गेल्या तीन महिन्यांपासून चीनचा वाद, देशातील आर्थिक स्थिती आणि वाढती बेरोजगारी सारखे विषयांवर माध्यमात चर्चा होतांना दिसत नाही. हे लज्जास्पद आहे. पत्रकारितेला काय झाले हे कळत नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांनी आपले योग्य कर्तव्य पार पाडावे. देशाच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याची हिम्मत पत्रकारांनी ठेवावी.”
राजीव मल्होत्रा म्हणाले,“भारतीय माध्यमांनी संपूर्ण जगासमोर देशाची संस्कृती आणि चांगल्या राजकारणाचे दर्शन घडवावे. माध्यमांनी आपली वैचारिक पातळी वाढविण्यावर जोर द्यावा. कारण जागतिक स्तरावर पाहिले तर अलझझीरा, बीबीसी सारख्या माध्यमांसमोर आमची तुलनाच होऊ शकत नाही. देशातील माध्यमांमध्ये खळबळजनक, भावनीक, गंभीर विचारशीलता आणि शोध पत्रकारिता दिसत नाही, ही चिंताजनक बाब आहे. त्यांच प्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्रकारिताही दिसत नाही. अशा वेळेस पत्रकारांना पूर्ण पणे विकसित व्हावे लागेल. त्यासाठी अभ्यास, संशोधन आणि तपस्या करावी.”
ले. जनरल अरविंदर सिंग लाम्बा म्हणाले,“ माध्यमे हे एक शस्त्र असल्याने पत्रकारतेची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. 1965 च्या लढाईच्या वेळेस पत्रकार आणि माध्यमांनी चांगली भूमिका बजावली होती. आंतरराष्ट्रीय संबंधांना अधिक मजबूती देण्यासाठी मुख्य प्रवाहातील वृत्तपत्र आणि मॅगझिन यांचे महत्व अनन्यसाधारण असते. माध्यमांनी प्रपोगंडा पसरू नये, तर ज्ञानाचा विकास करा. देशाच्या विकासाठी माध्यम आणि पत्रकारिता ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतात.”
डॉ. विश्वनाथ दा कराड म्हणाले,“ कोरोना व्हायरसमुळे जगात भितीचे वातावरण निर्माण झाले असून गेल्या 6 महिण्यांपासून लोक घरात बंद आहे. अशा वेळेस सकारात्मक मानसिकता ठेवेणे गरजेचे आहे. या काळात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. 21 व्या शतकात भारत विश्व गुरू कसा बनेल या वर माध्यमांची आपली भूमिका मांडायला सुरूवात करावी.”
स्वामिनाथन गुरूमुर्ती यांनी समयोचित विचार व्यक्त केले.
प्रा. डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले तसेच, प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसचालन केले.  प्रा.डॉ. अनुराधा पराशर यांनी आभार मानले.

एका महिन्यात सहा हजारांनी घसरलाय भाव…

0

सोन्या चांदींच्या दरांमधील घसरणीचे सत्र सलग पाचव्या दिवशीही सुरुच आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा ०.२७ टक्क्यांनी गडगडले. त्यामुळे सोन्याचे दर आज प्रति तोळा ४९ हजार ७७१ रुपायांपर्यंत खाली आले. तर दुसरीकडे चांदीच्या दरांमध्येही ०.५० टक्क्यांची घसरण होऊन प्रति किलो दर ५९ हजार ३२९ रुपयांपर्यंत गडगडले. करोनाची दुसरी लाट येऊ शकते या भितीने गुंतवणुकदारांनी आता डॉलरमध्ये सुरक्षित गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळेच अमेरिकन चलन अधिक मजबूत होताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये आणखीन घसरण होऊ शकते असंही तज्ज्ञांचं मत आहे.

पहिल्या सरत्रामध्ये सोन्याचे दर प्रति तोळा ०.६४ टक्क्यांनी म्हणजेच ३०० रुपये तर चांदीचे दर प्रति किलोसाठी १.८ टक्के म्हणजेच एक हजार ६० रुपयांनी वधारले होते. मात्र या संपूर्ण आठवड्यामध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्या चांदींच्या दराला घरघर लागल्याचे चित्र दिसून आलं. या आठवड्यामध्ये सोन्याचे दर प्रति तोळा दोन हजारांनी तर चांदीचे दर प्रति किलो ९ हजारांनी स्वस्त झालेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्येही सोन्याचे दर घसल्याचे दिसत आहे. सोन्याचे दर आज ०.२ टक्क्यांनी पडले आणि प्रति औंस (२८.३४ ग्रॅम) १८६४.४७ डॉलरपर्यंत आले. आठवडाभरात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याचे दर चार टक्क्यांनी कमी झालेत. तर चांदीचे १.१ टक्यांनी घसल्याने प्रति औंस २२.९५ डॉलरपर्यंत खाली आले. प्लॅटीनमचा दर ०.३ टक्क्यांनी घसरुन ८६४.७२ डॉलरला तर पॅलाडियमचा दर दोन हजार २२६.४४ डॉलरपर्यंत कमी झाले आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याच्या किंमतीमध्ये मागील काही दिवसांनी सातत्याने घट होताना दिसत आहे. अमेरिकन चलनाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थिती अधिक मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी पडझड झाली आहे. या आठवड्यामध्ये डॉलर इंडेक्स १.५ टक्क्यांनी वधारला. एप्रिलनंतर डॉलरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 77 हजार 778 ;एकुण 10 हजार 557 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 3 लाख 15 हजार 81 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात 4 लाख 3 हजार 416 रुग्ण कोरोना बाधित-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे,दि.25 :- पुणे विभागातील 3 लाख 15 हजार 81 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 3 हजार 416 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 77 हजार 778 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 10 हजार 557 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 78.10 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 65 हजार 204 रुग्णांपैकी 2 लाख 17 हजार रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 42 हजार 283 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 921 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.23 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 81.82 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 33 हजार 72 रुग्णांपैकी 23 हजार 215 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 857 आहे. कोरोनाबाधित एकूण एक हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 30 हजार 787 रुग्णांपैकी 21 हजार 591 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 103 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 93 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 32 हजार 225 रुग्णांपैकी 22 हजार 366 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 652 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 207 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 42 हजार 128 रुग्णांपैकी 30 हजार 909 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 883 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 336 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 702 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 521, सातारा जिल्ह्यात 850 , सोलापूर जिल्ह्यात 557, सांगली जिल्ह्यात 685 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 89 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 17 लाख 72 हजार 876 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 3 हजार 416 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 24 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकांचे लोकार्पण

0

पुणे,दि. 25 : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत खरेदी केलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. पुणे जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या रुगणवाहिका सेवेत दाखल होत आहेत.

विधानभवन प्रांगणात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) मृद व जलसंधारण, पदुम, वने, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, आ. चेतन तुपे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, यांच्यासह तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे जिल्हा परिषदेने संकटाच्या काळात कायम मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या संकटातही रुग्णवाहिका देवून ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोनाच्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत घरोघरी आरोग्य तपासणी केली जाणार आहे, यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्हयातील निवडक सरपंच उपस्थित होते.

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणा-या रुग्णालयांनी जादा दर आकारल्यास कारवाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे,दि. 25 : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रूग्णालयांनी आकारावयाच्या दरासंबंधी यापूर्वीच शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कुठल्याही रूग्णालयाने त्याहून जादा दर आकारू नये. असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच औषधांचाही काळाबाजार करणा-यांवरही कारवाई करण्यात येईल असा इशारा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिला. माझे कुटुंब,माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत कोरोनाचे निदान होवून वेळेत उपचार करणे सुलभ होणार असल्याने ही मोहित अत्यंत प्रभावीपणे राबवा, असे निर्देशही त्यांनी दिले.
विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्हयातील कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) मृद व जलसंधारण, पदुम, वने, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, आ. माधुरी मिसाळ, आ. चेतन तुपे, आ. सुनिल शेळके, आ.सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही अत्यंत महत्वाकांक्षी मोहिम सुरू केली आहे. घरोघरी जावून या मोहिमे अंतर्गत प्रत्येक कुटुंबाची आरोग्याच्या दृष्टीने तपासणी होणार आहे, या मोहिमेमुळे कोरोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे, यातून रुग्णाला वेळेपूर्वीच उपचार मिळतील व रुग्ण लवकर बरा होईल, त्यामुळे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा, असे निर्देशही त्यांनी दिले.
कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांसाठी इतर आवश्यक उपचाराबाबतही दक्षता घेण्याच्या सूचना करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेत उपचारासाठीच्या सुविधांही सातत्याने वाढविण्यात येत आहेत. कोरोनाच्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. कोरोनाला कुणीही सहजपणे घेऊ नये. या साथीवर मात करण्यासाठी आपली जबाबदारी लक्षात घेत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम यशस्वी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

        महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे महानगरपालिकाही सातत्याने उपचार सुविधांमध्ये वाढ करते आहे. जम्बो रुग्णांलयामध्येही उपचार सुविधा वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
        विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोना स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गाबाबतची स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली.
                  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद तसेच उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मुळशी धरण प्रकल्पातून दोन टीएमसी वाढीव पाणी मिळण्यासाठीसुर्वे समितीने लवकर अहवाल सादर करावा-उपमुख्यमंत्री

0

पुणे दि.25: जिल्हयातील जलसंपदा विभागाच्या विविध कामांचा उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला.
पुण्यातील विधानभवन सभागृहात झालेल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त सचिव अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे, तसेच पाटबंधारे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नीरा डावा कालव्यावरील वितरण प्रणालीचे विशेष दुरुस्ती प्रस्ताव तसेच शेटफळ तलाव धरण व कालव्याच्या कामाचे प्रस्ताव निधीसाठी राज्य शासनाकडे सादर करावेत. नीरा डावा मुख्य कालव्यातून होणारी पाणीगळती थांबविण्यासाठी या कालव्याच्या अस्तरीकरण व दुरुस्तीच्या कामाचा प्रस्ताव तातडीने सादर करा. नीरा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या जीर्ण झालेल्या दगडी बांधकामांचे काँक्रेटीकरण करुन बांधकामे मजबूत करावीत, असे सांगून इंदापूर तालुक्यातील जुन्या शासकीय इमारती, कार्यालये व विश्रांतीगृहाच्या इमारतीच्या दुरुस्तीची कामेही हाती घ्यावीत, अशा सूचना करुन मुळशी धरण प्रकल्पातून नागरिकांना शेती, आणि पिण्यासाठी दोन टीएमसी वाढीव पाणी मिळण्यासाठी तसेच कोळवण खोऱ्यातील शेतीसाठी पाणी उपसा योजना राबविण्यासाठी सुर्वे समितीने लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळवून देण्यासाठी अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावेत. भागाचे सेवानिवृत्त सचिव अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी पाटबंधारे विभागातील कामांच्या प्रश्नांबाबत तसेच विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली.

चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम गतीने मार्गी लावा-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे दि.25: नागरिकांच्या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याबरोबरच वेळेची बचत होण्याच्या दृष्टीने चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम गतीने मार्गी लावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी केल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी आठ वाजल्यापासून पुणे जिल्हयातील विकासकामांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.डी.चिटणीस, सैन्य दल तसेच सबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नागरिकांच्या सोयीसाठी चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी पुरविला जाईल, तथापि दोन्ही महानगरपालिका व महसूल विभागाने भूसंपादनाची कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच या परिसरातील सुशोभिकरणाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या परवानग्या महानगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मिळवून द्याव्यात. चांदणी चौकाची सुधारणा करण्याच्या कामात अडचण येऊ नये यासाठी सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिल्या. नाशिक रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नाशिक फाटा ते मोशी रस्ता रुंदीकरण काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे सांगून यामार्गावरील मेट्रोचा समावेश करण्यात येत असल्यामुळे त्या अनुषंगाने भूसंपादनासह अन्य कामे जलद गतीने पूर्ण करावीत,असे ही ते म्हणाले. विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.डी.चिटणीस यांनी कामांच्या सद्यस्थितीची माहिती दिली.

एस.पी. बालासुब्रमण्यम यांची मृत्यूशी झुंज संपली

0

5 ऑगस्टपासून कोरोनाशी झुंज देत असलेले प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. बालासुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून होते. मात्र, गेल्या 24 तासांत त्यांची प्रकृती नाजूक झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.

एसपी यांना प्रेमाने ‘बालू’ म्हटले जाते. ज्यांच्या आवाजात अशी जादू आहे की, प्रत्येकजण त्यांच्या प्रेमात पडतो. मोहम्मद रफी, किशोर कुमार यांच्यासारख्या दिग्गजांमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या या गायकाचा आवाज इतरांपेक्षा अगदी वेगळा आहेे. बाला हे बॉलिवूडमध्ये सलमान खानचा आवाज म्हणून ओळखले जातात. सुमारे दशकभर त्यांनी सलमानसाठी एकाहून एक गाणी गायली. मैनें प्यार किया या चित्रपटातील दिल दिवाना या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा बेस्ट मेल प्लेबॅक सिंगरचा अवॉर्ड मिळाला होता. 

एक नजर टाकुयात, बाला यांच्या खासगी आयुष्यावर

एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा जन्म 4 जून 1946 रोजी आंध्र प्रदेश येथील नल्लोर जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील रंगमंचाशी जोडलेले होते. त्यांनी वडील एस. पी. सम्बामूर्तींंकडूनच कलेसंबंधी माहिती समजून घेतली आणि नंतर त्यांचा कल संगीताकडे गेला. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाही ते संगीत शिकत होते. त्यांनी पहिल्यांदा तेलुगू कल्चर संस्थेतील संगीत स्पर्धेत बक्षीस मिळवले होते. 1966 मध्ये त्यांना ‘श्री श्री श्री मर्यादा रमन्ना’ या चित्रपटात गाण्यासाठी पहिली संधी मिळाली. या गाण्याच्या फक्त आठ दिवसांनंतरच बालासुब्रमण्यम यांना तेलुगू चित्रपटाव्यतिरिक्त इतर गाणी गाण्याची संधीही मिळाली. यानंतर ते तामिळ आणि तेलगू चित्रपटासाठीच गात राहिले. त्यांनी पहिल्यांदा ‘एक-दूजे के लिए’ या हिंदी चित्रपटासाठी गाणी गायली. या चित्रपटातील सर्वच गाणी सुपरहिट झालीत आणि बॉलिवूडला एकदम युनिक आवाजाचा गायक मिळाला. ‘एक दूजे के लिए’ चित्रपटाला फिल्म फेअर पुरस्काराचे 13 कॅटेगिरीसाठी नामांकन मिळाले होते. यातील तीन कॅटेगिरीमध्ये उत्कृष्ट एडिटिंग, उत्कृष्ट गीत आणि उत्कृष्ट स्क्रीनप्लेसाठी पुरस्कार मिळाले. बालासुब्रमण्यम यांना ‘तेरे मेरे बीच’गाण्यासाठी नामांकन मिळाले होते, परंतु त्यांना पुरस्कार मिळाला नाही. मात्र, याच चित्रपटासाठी उत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना मिळाला.

सलमान खानच्या करिअरच्या सुरुवातीला बालासुब्रमण्यम यांनी त्याला आवाज दिला होता. ‘मैंने प्यार किया’ सारखे चित्रपटातील -‘आते जाते’, ‘कबूतर जा जा’, ‘आजा शाम होने आई’, ‘मेरे रंग में रंगने वाली’ आणि टायटल साँग (मैंने प्यार किया) मध्ये बालासुब्रमण्यम यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली. त्यावेळी सलमानसारख्या नवीन अभिनेत्याला बालासुब्रमण्यम यांनी आपला आवाज देणे मोठी गोष्ट होती. या चित्रपटातील ‘दिल दीवाना बिन सजना के माने ना’या गाण्यासाठी त्यांना बेस्ट प्लेबॅक गायकाचा पुरस्कार मिळाला. याशिवाय त्यांना लता मंगेशकर यांच्यासोबत गायलेले गाणे ‘दीदी तेरा देवर दीवाना’साठी फिल्मफेअरचा विशेष पुरस्कारदेखील मिळाला.

  • जावेद अख्तर यांच्या मनात होता संशय

जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, ज्यावेळी सर्वत्र किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांचाच बोलबाला होता, त्यावेळी त्यांच्यासमोर एस. पी. बालासुब्रमण्यम हा एकच गायक मजबुतीने उभा राहू शकत हाेता. हा किस्सा ‘सागर’ चित्रपटाशी संबंधित आहे. या चित्रपटातील गाणी जावेद साहेबांनी लिहिली होती. यात एक ‘यूं ही गाते रहो, यूं ही मुस्कुराते रहो’ हे मस्तीखोर गाणे रेकाॅर्ड होणार होते. हे गाणे ऋषी कपूर आणि कमल हसनवर चित्रीत केले जाणार होते. हे गाणे मस्तीचे असल्यामुळे दुसरा गायकही किशोर कुमार यांच्या स्टाइलने गाणारा पाहिजे होता. आर. डी. बर्मन आणि जावेद यांनी हे गाणे बालासुब्रमण्यम यांच्याकडून गाऊन घेण्याचा विचार केला. या गाण्यामध्ये बालासुब्रमण्यम, किशोर दा यांना टक्कर देऊ शकतील की नाही याचा दोघांनाही संशय होता. मात्र, ज्यावेळी गाणे रेकॉर्ड झाले तेव्हा बालासुब्रमण्यम यांनी सिद्ध केले की, ते तामिळ आणि तेलुगूमध्येच नव्हे तर हिंदीतदेखील खूप उत्कृष्ट गाणी गाऊ शकतात.

  • लागोपाठ 12 तासांत 21 गाणी केली रेकॉर्ड

एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी 8 फेब्रुवारी 1981 रोजी एक अप्रतिम रेकॉर्ड बनवला आहे. त्यांनी सकाळी 9 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत कन्नडमध्ये 21 गाणी रेकॉर्ड केली. त्यांनी एका दिवसात तामिळमध्ये 19 आणि हिंदीमध्ये 16 गाणी रेकॉर्ड केली आहेत. एक काळ असा होता की, एका दिवशी ते 15-16 गाणी रेकॉर्ड करणे ही त्यांची दिनचर्या झाली होती. याच काळात बालासुब्रमण्यम हिंदी चित्रपटातील आपल्या गाण्यांबाबत खूप गंभीर झाले. त्यांना एखादे गाणे कठीण वाटायचे त्यावेळी ते तयार करण्यासाठी 8-10 दिवसांचा कालावधी घेत असत. जर निर्मात्यांनी घाई केली तर ते गाण्यासाठी नकार देत असत.