Home Blog Page 2439

मी घेतलेली लस करोनाची नाही, तर… सिरमच्या लशीवर शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण

0

पुणे- मी घेतलेली लस करोनाची नाही असं म्हणत सिरममध्ये जाऊन घेतलेल्या लशीवर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.  मात्र मी आणि माझ्या स्टाफने घेतलेली लस ही करोनावरची नसून प्रतिकार शक्ती वाढवणारी आहे. कोविडवरची लस येण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत वेळ लागेल असं सिरमकडून सांगण्यात आल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. लोकांना वाटते की मी लस घेतली आहे. अशी चर्चा लोकांमध्ये खासगी असते की सिरमचे प्रमुख पवारांचे वर्ग मित्र आहे. त्यामुळे त्यांनी ती लस घेतली असेल असं लोक बोलतात. पण मी आणि माझ्या स्टाफने घेतली लस ही करोनावरची नाही तर प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

गांधीवादी डॉ. कुमार सप्तर्षींचे कार्य प्रेरणादायी-डॉ. संप्रसाद विनोद

0

पुणे : “आज देशात कलुषित वातावरण बनले आहे. प्राकृतिक आणि मानसिक आरोग्य गंभीर होत चालले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना महामारी हे त्याचेच द्योतक आहे. आज निसर्गाने मानवाला विषाणू संसर्गाचा वाहक बनवले असून, मानवजातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या परिस्थितीला माणूसच कारणीभूत आहे. त्यामुळे मानवजातीच्या रक्षणासाठी सद्यस्थितीत पर्यावरण संवर्धन आणि गांधी विचारांचे आचरण आवश्यक आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी नेते, विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यदत्ता ग्लोबल पीस रिसर्च फाउंडेशन’ची स्थापना करण्यात आली. या फाउंडेशनच्या माध्यमातून दिला जाणारा पहिला ‘सूर्यदत्ता गांधीयन फिलॉसॉफी अवार्ड २०२०’ डॉ. कुमार सप्तर्षी यांना योगाचार्य डॉ. संप्रसाद विनोद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार सोहळा डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या कर्वेनगर निवासस्थानी सोशल डिस्टनसिंग आणि इतर नियमाचे पालन करून झाला. प्रसंगी डॉ. उर्मिला सप्तर्षी, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, सल्लागार सचिन इटकर, कार्यकारी संचालक प्रा. सुनील धाडीवाल, प्रा. अक्षित कुशल, प्रा. रेणुका घोसपुरकर, सिद्धांत चोरडिया, सेवासदनच्या सीमा दाबके आदी उपस्थित होते.
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, “गांधींना प्रत्यक्षात पाहता आले नाही. परंतु, जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी, बाळासाहेब भारदे अशा गुरूंकडून गांधीविचार आत्मसात केला आणि जगलो. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करून आत्मनिर्भर भारत करण्याचा संकल्प महात्मा गांधींनी केला होता. म्हणूनच त्यांनी ‘खेड्याकडे चला’ असा संदेश दिला होता. मात्र, आज त्याचा उलट अर्थ घेतला जात आहे. आजही विषमता, अस्पृश्यता, लाचारी अशा गंभीर समस्या आपली पाठ सोडत नाहीत. अशावेळी गांधीविचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याची आणि तो प्रत्यक्षात आणण्याची आवश्यकता आहे. सज्जनांची संख्या वाढवून दुर्जनाची संख्या कमी करायला हवी. गांधींनी सुरु केलेले निसर्गोपचार आजच्या काळातही उपयुक्त ठरत आहेत. अणुबॉम्बसारख्या विनाशकारी निर्मितीवर गांधी विचारांचा उतारा अधिक प्रभावी आहे.”

डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्ता शिक्षण संस्थेने गांधी विचारांना आदर्श मानत गेली दोन दशके कार्य उभारले आहे. आमच्या विद्यार्थी-शिक्षकांमध्ये हे विचार रुजावेत, यासाठी प्रयत्नशील आहोत. गतवर्षी गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त सूर्यदत्ताच्या विद्यार्थ्यांनी खास खादीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठे प्रदर्शन भरवले. खादी संकल्पनेवर फॅशन शो केला. गांधी विचारांतून आणखी प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, तसेच हे विचार जगणाऱ्यांचा सन्मान करावा, या उद्देशाने ‘सूर्यदत्ता ग्लोबल पीस रिसर्च फाउंडेशन’ची स्थापना केली आहे.”
डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले, “स्वओळख झालेले आणि वैचारिक पातळी, अधिष्ठान असलेले असे डॉ. कुमार सप्तर्षी आहेत. त्यांचे कार्य आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आताच्या परिस्थितीत युवापिढीला गांधी विचार पटवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवायला हवेत. कारण, युवकांमध्ये गांधी विचार रुजले तर देशाच्या जडणघडणीला आकार येईल. या पिढीला दिशा देण्याचे डॉ. सप्तर्षी यांच्यासारख्या गांधीवादी लोकांनी करावे.” डॉ. उर्मिला सप्तर्षी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. सचिन इटकर यांनी आभार मानले. 

यूपीमध्ये अत्याचार -पीएम आणि एच एम यांना १० हजार निषेधाची पत्रे पाठवणार – अश्विनी कदम

0

पुणे-यूपी मध्ये सुरु असलेला अत्याचार आणि अनागोंदी कारभाराबाबत पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना निषेधाची १० हज्जार पत्रे पाठविण्याचा निर्धार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला विभागाच्या वतीने करण्यात आला आहे .याबाबतची घोषणा आज येथे नगरसेविका अश्विनी कदम यांनी केली

उत्तर प्रदेश मधील हाथरस शहरा मध्ये एक अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात तीचा काही दिवसात मृत्यू झाला. पण अजून आरोपी हे जेल बंद झाले नाहीत. आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी व गुन्हेगाराना फाशीची शिक्षा द्यावी यासाठी युपी सरकारचा निषेधार्थ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पर्वती मतदार संघाच्या वतीने दांडेकर फुल येथे आंदोलन करण्यात आले.
नगरसेविका अश्विनी कदम म्हणाल्या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला विभागाच्या वतीने पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना 10 हजार पोस्ट कार्ड पाठवून निषेध व्यक्त करणार आहेत. याप्रसंगी केंद्र, यु पी सरकारवर टीका करत भारतामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री पुरुष सम-समान कायदा देत एक चांगले संविधान या देशाला दिले. स्त्रीला देवीचे रूप दिले आहे आणि याच देशात स्त्री वर अत्याचार होतो याबाबत संताप व्यक्त केला
तर नगरसेविका प्रिया गदादे यांनी मीडियावर आरोप करत अनावश्यक बातम्यांना महत्व देणे देशासाठी मारक आहे.यावेळी नगरसेविका सौ.अश्विनी नितीन कदम , नगरसेविका प्रिया गदादे, दिलीप अरुंदेकर , संतोष नांगरे ,रवी शिंदे, अमोल ननावरे , प्रेम गदादे , डॉ. सुनीता मोरे , मृणालिनी वाणी , प्राजक्ता जाधव,संजय दामोदरे , समीर पवार, संतोष पिसाळ , फारुख शेख , रुपेश आखाडे,प्रशांत कुदळे,वैभव डोळस , संकेत शिंदे, सागर कांबळे उपस्थित होते.

शिवसेना युवासेनेच्या दीपक मारटकरांचा ४७ वार करून खून

0

पुणे- पुण्यात  शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व दिवंगत माजी नगरसेवकाचे पुत्र दीपक विजय मारटकर (वय ३२) यांचा बुधवार मध्यरात्री बुधवार पेठेतील विजयानंद चित्रपटगृह परिसरात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी कस्सून तपास करून आरोपींची पार्श्वभूमी पाहुन मोक्का अंतर्गत कारवाई करावी उसे पत्र  बिधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे  यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार   या खूनामुळे मध्यवस्तीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी काही वेळातच यातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या एका तरुणीसह तिघांना अटक केली आहे. तर इतरांचा शोध घेतला जात आहे. अश्विनी कांबळे, महेंद्र सराफ आणि निरंजन मकाळे यांना अटक केली आहे. तर, सनी कोलते, संदीप कोलते, रोहित कांबळे, राहुल रागीर व इतर दोघांवर फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी मारटकर यांचे मेहुणे राहुल भगवान आलमखाने (वय ४३,रा. गवळी आळी, विजयानंद चित्रपटगृहाजवळ, बुधवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

महापालिका निवडणुकीत विजय मारटकर यांनी बुधवार पेठ भागातून शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी अश्विनी कांबळे हिने सुद्धा बहुजन समाज पार्टीकडून या भागातून निवडणुक लढविली होती. त्यावेळी कांबळे व मारटकर यांच्यात वाद झाला होता. दरम्यान, आरोपी महेंद्र सराफ याच्या बरोबर मारटकर यांचा वाद झाला होता. तर काही महिन्यांपूर्वी दीपक मारटकर यांना आरोपींनी धमकावले होते. चार दिवसांपूर्वी दीपक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात या प्रकाराची माहिती दिली होती. गुरूवारी (१ ऑक्टोबर) मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास मारटकर जेवण करून गवळी आळी परिसरात थांबले होते. त्यावेळी दबा धरून बसलेले हल्लेखोर दुचाकीवरून आले. मारटकर यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यास सुरूवात केली. तीक्ष्ण शस्त्राने ४७ वार केले. यात मारटकर गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा पहाटे मृत्यू झाला.

माहिती मिळताच पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त मिलींद पाटील, फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान याची माहिती वाऱ्या सारखी पसरली. त्यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हल्लेखोरांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असून पथके रवाना केली असल्याचे सांगण्यात आले.

मारटकर यांचा खूनानंतर सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते फरासखाना पोलीस ठाण्यात जमले होते. शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, अजय भोसले, प्रशांत बधे, नगरसेवक विशाल धनवडे, गजानन पंडीत, राजेंद्र शिंदे, भारतीय जनता पक्षाचे प्रमोद कोंढरे, रिपब्लीकन पक्षाचे मंदार जोशी, राष्ट्रवादीचे अजय दराडे, गणेश नलावडे, मनसेचे वसंत मोरे, रूपाली पाटील ठोंबरे, आशिष साबळे आदींनी पोलीस उपायुक्त गोरे यांची भेट घेतली. हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी स्वयंसहाय्यता बचतगट योजना – अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती

0

४ हजार बचतगटांद्वारे महिलांचे होणार सक्षमीकरण

३३.९० कोटी रुपये खर्च अपेक्षित, कर्जासाठी प्रतिवर्ष ५ कोटी रुपये

मुंबई, दि.2 : राज्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी पुढील ५ वर्षांकरीता स्वयंसहाय्यता बचतगट योजना राबविण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या योजनेसाठी अंदाजे ३३.९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) ही योजना राबविण्यात येईल. या योजनेसंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील १२ शहरांमध्ये मुस्लिम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी सध्या बचतगट योजना राबविली जाते. ३१ मार्च २०२० रोजी या योजनेची मुदत संपली. आता या योजनेस १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ पर्यंत राबविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, नांदेड, मालेगाव (नाशिक), कारंजा (वाशिम), परभणी, पुणे, नागपूर, औरंगाबाद, भिवंडी, मुंब्रा – कौसा (ठाणे) आणि मिरज (सांगली) या १२ शहरांमध्ये ही योजना राबविण्यात येईल.

योजनेसाठी भरीव आर्थिक तरतूद

या योजनेसाठी अंदाजे ३३.९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी लोकसहभागाचा ८.२८ कोटी रुपये निधी वगळता २५.६२ कोटी रुपयांचा निधी, तसेच अमरावती जिल्ह्याकरिता नवीन लोकसंचलीत साधन केंद्र (सीएमआरसी) तयार करण्याकरिता १.९६ कोटी रुपये असे एकूण २७.५८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शासनामार्फत या निधीची तरतूद करण्यात येईल. याशिवाय मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत बचतगटांना प्रतिवर्ष ५ कोटी रुपये इतके कर्ज वाटप करण्याचेही प्रस्तावित असल्याचे मंत्री श्री.मलिक यांनी सांगितले.

८०० नवीन बचतगटांद्वारे ८ हजार ८०० महिलांचे संघटन

या योजनेतून पुढील ५ वर्षात नव्याने तयार होणाऱ्या ८०० बचतगटांद्वारे ८ हजार ८०० महिलांचे संघटन उभे करण्यात येईल. नवीन बचतगटातील महिलांना संकल्पना प्रशिक्षण व बुक किपींगचे प्रशिक्षण देण्यात येईल. तर जुन्या गटातील सभासदांची व्यावसायिक कौशल्यवृद्धी करण्याच्या अनुषंगाने ३ हजार २०० गटांपैकी प्रती गट ५ याप्रमाणे सुमारे १७ हजार सदस्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल. नवीन व जुन्या गटांना बँकेमार्फत पतपुरवठा व वैयक्तिक उद्योगांना चालना देण्यात येईल. यासाठी बँक मित्र ही संकल्पना राबविण्यात येईल. याशिवाय सद्यस्थितीत असलेल्या १३ लोकसंचलीत साधन केंद्रांचे (सीएमआरसी) बळकटीकरण करण्यात येईल, तर अमरावती जिल्ह्यात एक नवीन सीएमआरसी स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी १.९६ कोटी रुपये इतकी अतिरिक्त अंदाजपत्रकीय तरतूद अपेक्षित आहे.

३२ हजार महिलांना उद्योजकीय प्रशिक्षण

या योजनेंतर्गत महिलांना उद्योजकीय प्रशिक्षणही देण्यात येणार असून सुमारे ३२ हजार महिलांना उद्योजक म्हणून तयार करण्याचे नियोजन आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना या तज्ञ संस्थेने विकसित केलेल्या उद्योजकता विकास प्रशिक्षण मोड्युलच्या आधारे हे प्रशिक्षण देण्यात येईल. याशिवाय महिलांची शैक्षणिक पात्रता वाढविणे, आरोग्य व पोषण आहाराबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठीही कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

बचतगटांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन आधुनिक युगाशी स्पर्धा करु शकेल असे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. यासाठी महिलांना मार्केटींग, जाहिरात, लेबलिंग, पॅकेजिंग इत्यादी बाबींचे प्रशिक्षण आवश्यक आहे. पुढील ५ वर्षात नवीन निर्माण होणारे ८०० बचतगट आणि सध्या कार्यरत ३ हजार २०० बचतगटातील महिलांना याप्रमाणे प्रशिक्षण देण्यात येईल, असे मंत्री श्री.मलिक यांनी सांगितले.

राज्यपालांचे महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

0

मुंबई, दि. २ : महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची देखील आज 116 वी जयंती आहे. त्यानिमित्त राज्यपालांनी शास्त्रींच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर, खासगी सचिव उल्हास मुणगेकर यांसह राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना यावेळी अभिवादन केले

महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विधानभवनात अभिवादन

0

मुंबई, दि. 2: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर तसेच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव विलास आठवले, राजेश तारवी, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव रवींद्र जगदाळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले

भारती हॉस्पिटल येथील आरटीपीसीआर लॅबव्दारे २४ तासात चाचणी अहवाल देण्याचा प्रयत्न – राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

0

सांगली,  : भारती हॉस्पिटल येथे सुरू करण्यात आलेल्या आरटीपीसीआर लॅबमध्ये दररोज ४०० ते ५०० कोरोना चाचण्या करण्यात येणार असून त्याचा अहवाल २४ तासाच्या आत देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सहकार, कृषि, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.

भारती हॉस्पिटल सांगली येथे नूतन आटीपीसीआर लॅब, ब्लड बँक-प्लाझ्मा थेरपी व टेलिमेडीसीन कक्षाचे उद्घाटन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, भारती विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम, भारती विद्यापीठ मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. एस. व्ही. देशमुख आदी उपस्थित होते.

डॉ. कदम पुढे म्हणाले, भारती हॉस्पिटल सांगली येथे सुरू करण्यात आलेल्या आरटीपीसीआर लॅबमुळे रूग्णांना लवकर कोरोनाचाचणी अहवाल मिळणार असून जिल्हा प्रशासनासही याची मदत होणार आहे. कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी भारती हॉस्पिटल सांगली येथे १५ मार्च २०२० पासून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. यामध्ये संशयित व पॉझिटीव्ह कोविड रूग्णांच्या उपचारासाठी १६० बेड्ची सुविधा आहे. यामध्ये ४० बेड्स आयसीयु आहेत. आयसीयुमध्ये १५ व्हेंटीलेटर व १० हाय फ्लो नसल कॅन्युल्स आहेत. ६ केएल ऑक्सिजन प्लँटच्या माध्यमातून सर्व १६० बेड्सना ऑक्सिजनची सुविधा आहे. ऑक्सिजन बॅकअपसाठी ११० जम्बो सिलेंडर आहेत.

आरटीपीसीआर चाचणी बरोबरच, प्लाझ्मा थेरपी, रॅपीड ॲन्टीजन टेस्ट, डायलेसिस, डेडिकेटेड सोनाग्राफी, डिजिटल एक्सरे फॅसिलिटी, सिटी स्कॅन आदी सुविधा उपलब्ध असल्याचे सांगून राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, आत्तापर्यंत १ हजार ४१७ संशयित व १ हजार ९५ कोविड पॉझिटीव्ह रूग्णांवर उपचार करण्यात आले असून ७२९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत उपचाराखाली १११ रूग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त स्टेशन चौक सांगली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून यश मिळविण्यातच खरी कसोटी – प्रादेशिक संचालक श्री. नाळे

0

पुणे,  : महावितरणने अनेक संकटांना यशस्वी तोंड देत आजवर प्रगतीच केली आहे. सद्यस्थितीत कोरोनामुळे आर्थिक संकटासह इतर विविध आव्हाने समोर असले तरी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून यश मिळविण्यातच खरी कसोटी असते. वीजग्राहकांच्या सहकार्याने या आव्हानांवर लोकाभिमुख व सार्वजनिक कंपनी म्हणून आपण निश्चितच मात करू, असा विश्वास पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी व्यक्त केला.

गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवन’मध्ये शुक्रवारी (दि. 2) राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती तसेच पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. नाळे बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. पंकज तगलपल्लेवार यांची उपस्थिती होती. कोविड-19 चे काटेकोरपणे नियम पाळून अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम झाला.

महात्मा गांधी यांनी ग्राहकसेवेबाबत दिलेल्या मोलाच्या संदेशानुसार ग्राहकसेवा देण्याचे तसेच प्रादेशिक विभागात सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. नाळे यांनी यावेळी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले. ते म्हणाले की, वीजग्राहक हे महावितरणचे खरे आधारस्तंभ आहेत. कोरोना विषाणूने सध्या जगाला ग्रासले असले तरी हळूहळू अनलॉकमुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. महावितरणसाठी हा काळ अत्यंत खडतर आहे. मात्र सर्वांची कर्तव्यनिष्ठा, अथक परीश्रम, उत्कृष्ट ग्राहकसेवा आणि वीजग्राहकांचे सहकार्य यामुळे सर्व संकटांवर निश्चितपणे मात करता येईल. कोरोनाच्या संकटकाळात महावितरणचे वीजयोद्धे देत असलेली ग्राहकसेवा ही अभिमानास्पद आहे. मात्र सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोविड-19 चे नियम पाळून आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

कार्यक्रमात अधीक्षक अभियंता श्री. पंकज तगलपल्लेवार, उपमहाव्यवस्थापक श्री. अभय चौधरी, जनसंपर्क अधिकारी श्री. निशिकांत राऊत आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता श्री. संतोष पटनी यांनी केले. यावेळी सहायक महाव्यवस्थापक सौ. दिप्ती आंबेकर-माळवदे, कार्यकारी अभियंता श्री. अविनाश श्रीगडीवार आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

ज्ञानेश्वरांचे विश्वात्मक तत्वे जगाला शांतीचा मार्ग दाखवतील स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे विचार

0
  • प्रा. डॉ. विश्वनाथ कराड लिखित ‘फे्रन्डस, यू मे बिलिव्ह इट ऑर नॉट’ या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, 2 ऑक्टोबर: “ संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांनी ज्ञान आणि वैराग्य काय आहे हे सांगितले. त्याच ज्ञानाच्या आधारेच मानवला आत्मज्ञानाची अनुभूती येते. ज्ञानेश्वरांनी सांगितलेले विश्वात्मक तत्वेच हे जगाला शांतीचा मार्ग दाखवेल. व्यक्ति, समष्ठी, सृष्टी आणि प्रकृती या गोष्टी जीवनात अत्यंत महत्वाच्या आहेत. मानवी जीवन सार्थ करण्यासाठी आत्मचिंतनाबरोबरच भक्ती व तपश्चर्या गरजेची आहे.” असे विचार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड लिखित ‘फे्रन्डस, यू मे बिलिव्ह इट ऑर नॉट’ या पुस्तकाचे प्रकाशन गोविंददेव गिरीजी महाराज, सुप्रसिद्ध विद्वान व साधक स्वामी योगी अमरनाथ व जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी पद्मविभूषण डॉ. विरेंद्र हेगड हे सन्माननीय अतिथि म्हणून उपस्थित होते. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.एन.टी.राव, प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे, प्रा.डी.पी. आपटे, डॉ. आर.एम. चिटणीस, प्रा. पुष्पिता अवस्थी, मिटसॉग व पब्लिक पॉलिसीचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील व वर्ल्ड पीस डोमचे संचालक दर्शन मुंदडा हे उपस्थित होते.
स्वामी गोविंदगिरी महाराज म्हणाले,“ डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी शिक्षण, मानवी हक्क, शांतता अभ्यास, विज्ञान आणि अध्यात्म इत्यादी विविध विषयांवर बरेच पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये जगभर पसरलेली नैतिकता सापडेल. जागतिक शांततेचा संदेश देणारी सार्वभौम शांतता आणि सौहार्दाच्या शोधात मानवाधिकार, मानवी मूल्ये आणि सामाजिक बदल दिसेल. डॉ. कराड यांची सर्वात प्रेरणादायक बाब म्हणजे त्यांनी जागतिक शांतता आणि त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य यावर पुस्तके लिहिणे सुरूच ठेवले आहे. त्यांचे जीवन जसे आहे तसेच पुस्तके ही प्रेरणादायी आहेत.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,“ डॉ. कराड यांनी उत्तम पुस्तक लिहिले आहे. भगवद गीता, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर यांनी मानव कल्याणाचा उपदेश केला आहे. त्याच तत्वाचा मानव कल्याणसाठी कसा उपयोग करता येईल हे त्यांनी पुस्तकात नमूद केले आहे. हे पुस्तक कल्पनाकरू शकत नाही अशा प्रकारचे आहे. यातून संपूर्ण मानवजातीला विश्वात्मक संदेश दिला जाईल. निसर्गाचे चक्र सतत विस्तार पावत आहे. हे सर्व कोण घडवित आहे. हे एक गुह्य आहे.”
स्वामी योगी अमरनाथ म्हणाले,“ साधना, तपस्चर्या आणि भक्ती या गोष्टी मानवला परमांनद देतात. या सृष्टीवर साधनेशिवाय काहीच साध्य होऊ शकत नाही. तसेच समर्पण भाव व निष्काम कर्म करीत राहिल्यास मानवाचे उत्थान होते.”  
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ संत ज्ञानेश्वरांनी 730 वर्षापूर्वी ज्ञानतत्व, विश्वात्मक तत्व सांगितले जे सर्व धर्मासाठी लागू होतात. हे गुपित तत्व आज प्रत्येक मानवासाठी महत्वपूर्ण आहेत. कोरोना व्हायरसच्या काळात हे तत्वे मानवाला सुख, समाधान आणि शांती देईल.”
राहुल कराड यांनी स्वागत पर भाषण केले. प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी पुस्तकाची पार्श्वभूमी सांगितली.
प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व प्रा.डॉ. आर.एम. चिटणीस यांनी आभार मानले.

होम क्वारंटाईन, लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी औषध वाटप उपक्रमाचे आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

0

पुणे : माँ आशापुरा चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंड, लायन्स क्लब ऑफ पुणे विजयनगर यांच्या संयुक्त विद्यमाने होम क्वारंटाईन आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी औषध किट वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांच्या हस्ते या औषधे किट वाटप सुरुवात झाली. या औषधांच्या किटमध्ये १५ दिवसांचे डॉक्टरांनी सुचवलेल्या गोळ्या आहेत. जवळपास औषधांच्या ५००० किटचे वाटप केले जाणार आहे. यंदाचा नवरात्र महोत्सव टाळून आशापुरा मंदिराच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड, माँ आशापुरा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी, पुणे चॅप्टरचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, राजेश सांकला, इंदर छाजेड, मंगेश कटारिया, हेमंत रायसोनी, अशोक भंडारी, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंडचे अध्यक्ष  लायन्स ज्योतिकुमार अगरवाल, लायन्स क्लब ऑफ पुणे विजयनगरचे अविनाश शहाणे, सामाजिक सेवा उपक्रम प्रमुख राजेंद्र गोयल, समन्वयक शाम खंडेलवाल आदी उपस्थित होते.

ऑनलाईन क्लासेस व परीक्षांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवा – असीमकुमार गुप्ता

0

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. असीमकुमार गुप्ता यांचे निर्देश 

मुंबई, : राज्यभरात सध्या शाळा व महाविद्यालयांचे वर्ग व परीक्षा ऑनलाईनद्वारे सुरु आहेत. सोबतच प्रामुख्याने आयटी व इतर क्षेत्रात देखील वर्क फ्रॉम होम सुरु आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी उपाययोजना करावी. अत्यावश्यक कामे असल्याखेरीज वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभालीसाठी वीजपुरवठा बंद ठेवू नये, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. असीमकुमार गुप्ता यांनी दिले आहेत.

राज्यात येत्या दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत शैक्षणिक वर्ग बंद राहणार आहेत. त्यामुळे शालेय वर्ग व परीक्षा तसेच इतर महत्वाच्या परीक्षा ऑनलाईनद्वारे सुरु आहेत. या पार्श्वभूमिवर महावितरणकडून अखंडित वीजपुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेण्यात यावी. तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून प्राधान्याने वीजपुरवठा करण्यात यावा. अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद ठेवू नये. देखभाल व दुरूस्तीचे काम अत्यंत आवश्यक असल्यास ऑनलाईन शैक्षणिक वर्ग व परीक्षांचा कालावधी टाळून कामे करण्यात यावे. तत्पुर्वी महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधीत शैक्षणिक संस्थांशी समन्वय व संवाद साधून पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीचे नियोजन करावे व त्यासंबंधीची माहिती ‘एसएमएस’द्वारे संबंधीत वीजग्राहकांना देण्यात यावी, असेही निर्देश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. असीमकुमार गुप्ता यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

महात्मा गांधींची ग्रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
  • सेवाग्रामला वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा मिळावा
  • सेवाग्रामच्या जपवणुकीसाठी निधी कमी पडू देणार नाही

वर्धा, : महात्मा गांधी एक विचार आहे. ‘खेड्याकडे चला’ या त्यांनी दिलेल्या संदेशाचे आपण आज आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. त्यांची ग्रामराज्य तसेच स्वातंत्र्याची संकल्पना अंमलात आणण्यासाठी आजही गांधीजींचे विचार मार्गदर्शक ठरतात. खेड्यातील माणसाला त्याचे जीवन आनंदाने जगता यावे यासाठी खेड्यांना विकासाच्या मार्गावर नेऊन ती सक्षम आणि स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्य आणि विकास खेड्यापर्यंत नेणे म्हणजे सर्वांनी खेड्याकडे जाणे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले.

महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीच्या सप्ताहनिमित्ताने सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामांचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, पशुसंर्वधन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजीत कांबळे, वित्त व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रबर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि विनोबा भावे यांना अभिवादन करुन मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, काळाला आपल्या कामातून दखल घ्यायला लावणारी थोर व्यक्तिमत्त्वेच महात्मा होतात. सेवाग्राम येथून स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झाली. तेव्हा तंत्रज्ञानही नव्हते, पारतंत्र असल्यामुळे सर्व बाजुंनी बंधने होती. प्रसाराची कोणतीही साधने नसतानाही स्वातंत्र्य संग्रामाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे काम महात्मा गांधी यांनी केले. एखाद्या ठिकाणी गांधीजी जाणार असे कळल्यानंतर नागरिकांची तिथे प्रचंड गर्दी व्हायची, हे आजोबांनी सांगितल्याची आठवण त्यांनी यावेळी विशद केली. गांधीजींना ऐकायला, पाहायला जनसागर उसळायचा, हे भाग्य मागून मिळत नाही तर कमवावे लागते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

स्वातंत्र्य चळवळीचे रणशिंग फुंकले तसेच चळवळीची बीजे रुजली तो सेवाग्राम आश्रम जगभरातील गांधी अनुयायी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण व्हावे, यादृष्टीने आश्रमाला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शस्त्राशिवाय युद्ध जिंकू शकतो, हे सांगणाऱ्या महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमाचा जागतिक प्रेरणा केंद्र म्हणून लौकीक निर्माण करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या आश्रमाला लवकरच भेट देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

गांधीजींच्या स्मृती जपणाऱ्या सेवाग्राममधील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करुन ते म्हणाले, सेवाभावी कार्यकर्त्यांनी वास्तूसोबतच गांधीजींची मूल्येही जपली. मूल्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सेवाग्रामच्या कार्यकर्त्यांनी मूल्य जपवणुकीचे केलेले काम आपल्याला करायचे आहे. तत्वहीन राजकारण, चारित्र्याशिवाय शिक्षण, कष्टाशिवाय पैसा, नीतीशुन्य व्यवहार, त्यागाशिवाय उपासना, मानवतेशिवाय शास्त्र, विवेकरहित आनंद या महात्मा गांधींनी सांगितलेल्या सात सामाजिक पापांची संकल्पनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विशद केली.  त्याचे अर्थ समजून सांगतांना त्यातील विचारांचे महत्त्व सेवाग्राम आश्रमापुरते मर्यादित न ठेवता त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची गरजही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

सेवाग्राम येथील विकासकामांचे लोकार्पण केले आहे. त्यामुळे त्याची जपणूक करण्याची जबाबदारीही आपलीच आहे.  स्मारकाच्या जपणूकीसाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिली. चरखागृहात महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची नितांत सुंदर स्कल्पचर उभे करणाऱ्या जे. जे. स्कुलचा अभिमान असल्याचे ते म्हणाले.

सेवाग्रामच्या भूमीचे पावित्र्य राखण्याचे काम आपलेच – उपमुख्यमंत्री अजित पवार

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सेवाग्रामच्या भूमीचे पावित्र्य राखण्याचे काम आपलेच आहे. सेवाग्राम आश्रम, पवनार आश्रम आणि धाम नदीच्या सौंदर्यीकरणाचे काम करताना त्याचे पावित्र्य जपले जावे, यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. विकासाची कामे करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी देशी झाडे लावण्याचे आवाहन त्यांनी केले.

महात्मा गांधी यांच्या ‘खेड्याकडे चला’ हा विचार घेऊन स्वयंपूर्ण गावे, जलस्त्रोत आणि गावांच्या स्वच्छतेवर भर देऊन देशाची वाटचाल शाश्वत विकासाकडे झाली तर तेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असा आशावाद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री सुनिल केदार

कोरोना काळातही सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामांचा निधी उपलब्ध करुन दिला, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानत पालकमंत्री सुनिल केदार म्हणाले, गांधी विचारधारेचा अंगिकार करणाऱ्या आणि सेवाग्रामला नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या अभ्यासक आणि पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले. इंडस्ट्रीयल आणि मोटार वाहनांच्या स्क्रॅपचा वापर करुन जगातील पहिले असे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे अनुक्रमे 31 आणि 19 फूट ऊंचीचे स्कल्पचर उभारण्यात आले आहेत. येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

येथील बेरोजगारांनी स्वयंरोजगाराची कास धरावी, यासाठी एम. गिरी या संस्थेत प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाकडे पाठविला असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती पालकमंत्री सुनिल केदार यांनी केली.

यावेळी कार्यक्रमात महात्मा गांधी यांचे सेवाग्राम येथील वास्तव्य आणि येथून झालेल्या स्वातंत्र्य चळवळीबाबत तसेच सेवाग्राम विकास आराखड्यातील झालेल्या कामांवर आधारीत तयार केलेल्या चित्रफिती उपस्थितांना दाखविण्यात आल्यात. उपस्थितांचे आभार जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी मानले तर संचालन ज्योती भगत यांनी केले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 69 हजार 578

0

पुणे विभागातील 4 लाख 40 हजार 681 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,
विभागात कोरोना बाधित 3 लाख 59 हजार 462 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे, दि.2 :- पुणे विभागातील 4 लाख 40 हजार 681 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 59 हजार 462 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 69 हजार 578 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 11 हजार 641 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.64 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 81.57 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 86 हजार 677 रुग्णांपैकी 2 लाख 42 हजार 180 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 38 हजार 10 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 487 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.26 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.48 टक्के आहे.


सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 37 हजार 812 रुग्णांपैकी 28 हजार 60 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 592 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 160 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 33 हजार 954 रुग्णांपैकी 25 हजार 807 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 980 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 167 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 37 हजार 339 रुग्णांपैकी 28 हजार 886 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 80 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 373 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 899 रुग्णांपैकी 34 हजार 529 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 916 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 454 रुग्णांचा मृत्यू झाला आहे


कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 462 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 656, सातारा जिल्ह्यात 512, सोलापूर जिल्ह्यात 465, सांगली जिल्ह्यात 525 तर कोल्हापूर जिल्ह्यात 304 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागामध्ये ब-या होणा-या रुग्णांमध्ये एकूण 6 हजार 265रुग्णांचा समावेश आहे. यात पुणे जिल्हा 3 हजार 768, सातारा 602, सोलापूर 641, सांगली 789 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 465 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 19 लाख 36 हजार 619 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 40 हजार 681 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 1 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत घरोघरी सर्वेक्षणावर भर

0
  • आतापर्यंत 61 लाख 5 हजार 305 नागरिकांची तपासणी – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची माहिती

पुणे, दि.2 :- कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीन ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम राज्यभर राबविण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हयात घरोघरी सर्वेक्षणावर भर देवून ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणात आतापर्यंत 61 लाख 5 हजार 305 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून 32 हजार 368 नागरिक कोरोना संशयित आढळून आले आहेत. यातील 28 हजार 300 नागरिक संदर्भित करण्यात आले असून 3 हजार 841 नागरिक कोरोना बाधित आढळून आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत पुणे महानगरपालिका क्षेत्रात 16 लाख 37 हजार 86 नागरिकांची, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 18 लाख 79 हजार 217 नागरिकांची तर ग्रामीण भागातील 25 लाख 89 हजार 2 अशा एकूण 61 लाख 5 हजार 305 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रात 7 हजार 60 संशयित नागरिक सापडले आहेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 2 हजार 400, ग्रामीण भागात 22 हजार 908 असे एकूण 32 हजार 368 एवढे कोरोना संशयित नागरिक सापडले आहेत.
पुणे महानगरपालिका क्षेत्रात 6 हजार 984 नागरिक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 516 नागरिक तर पुणे ग्रामीण भागात 19 हजार 800 असे एकूण 28 हजार 300 नागरिक संदर्भित करण्यात आले आहेत. या मोहिमेंतर्गत केलेल्या सर्वेक्षणा दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात 780 कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 286, पुणे ग्रामीण भागात 2 हजार 775 असे एकूण 3 हजार 841 कोरोना बाधित नागरिक आढळून आले आहेत. जिल्हयातील ग्रामीण भागात एकूण 574 गावांचे सर्वेक्षण झाले असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी सांगितले आहे.